काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (५) -- केनू संग खेलू होली...

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१) -- आमार श्वप्नो तुमी...
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२) -- प्रथम धर घ्यान दिनेश..
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३) -- मनमोहना बडे झुटे..
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (४) -- मेरी सांसो को जो..

--------------------------------------------------------------------------------------------------

केनू संग खेलू होली..! (संगीत - हृदयनाथ मंगेशकर)
(इथे ऐका..)

यमनचं एक शांत परंतु तेवढंच आर्त स्वरूप. जमून गेलेला अध्धा त्रिताल. दिदीच्या गळ्यातून उमटणारा तानपुर्‍यातला गंधार मन:शांती देणारा, मुक्तिचा मार्ग दाखवणारा..!

'पिया त्यज गये है अकेली..' मधला एकटेपणा, एकाकीपणा केवळ दिदीच दाखवू जाणे! 'हमसे करे क्यू पहेली' ओळीतील 'करे' या शब्दावरील तीव्र मध्यमावरच्या अनवट ठेहरावानंतर येणार्‍या 'क्यू पहेली' वरील म' नीनी ध प प ह्या संगतीतील यमनचा गोडवा काही औरच!

'बहु दिन बिते' या ओळीत लागलेल्या तार षड्जापाशी शब्द संपतात!

'बहु दिन बिते अजहू न आए, लग रही कालाबेली' या ओळीतील काळंबेरं या अर्थाने वापरलेला 'कालाबेली' ह शब्द खूप छान वाटतो. दिदीचं शब्दांचं उच्चारण अर्थातच सुरेख. विशेष करून 'पहेली', 'दुहेली', 'दरसन दीजो', 'जियडो मुरझावे' हे शब्द कानाला खूप गोड लागतात!

सुंदर संगीतरचना. सतारीची साथसंगत मन प्रसन्न करून जाते.

संगीतकारांनी मन चाहेल तितका लुटत रहावा, परंतु यमनचा खजिना कधीही रिता होणार नाही हेच खरं!

-- तात्या अभ्यंकर.

लेखनविषय: दुवे:

Comments

लताबाईंकडून यमन ऐकावा

असे म्हणतात. आम्ही लताबाईंकडून काहीही ऐकून घेऊ :-) त्यांच्या गळ्यातला गंधार सुरुवातीला "किनु सं" मध्ये दिसतो, तोच ना?

भोपळे बांधून गानगंगेत पोहणार्‍या माझ्यासाठी मधून-मधून तुम्ही सुरावटही दिलीत ते फार चांगले केलेत.

मुळातच भजन गोड आणि श्राव्य आहे. भजन गाताना शब्दांचा सोपेपणा लताबाईंनी मुळीच हरवू दिला नाही. संगीत स्पष्ट शब्दांना उठाव देते आहे.

मीराबाईची बोली/भाषा राजस्थानी होती, त्यामुळे त्यातले शब्द सोपे वाटता-वाटता कधीकधी समजत नाहीत. ओळीचा शेवट म्हणजे संगीतातल्या न्यासासारखा, त्यातही यमक असले म्हणजे ओळ "घरी पोचली" असा भास होतो. अशा परिस्थितीत मीराबाईसारखी समर्थ कवयित्री यमकाचे शब्द विशेष अर्थपूर्ण किंवा लडिवाळ योजते. गाणारी, आळवणारी व्यक्ती त्या शब्दावर थबकणार असते, याची पक्की जाण कवयित्रीला होती. मीराबाई स्वतःच आपली भजने गायची - त्यामुळे हे कौशल्य स्वानुभवाने उच्च कोटीला पोचलेले असणार.
इथे
होली-अकेली-सेली-मेली-पहेली-कालाबेली-हेली-बेली-चेली-दुहेली
हे यमकाचे शब्द. पैकी अधोरेखित शब्द मला अपरिचित होते. यूट्यूब चित्रफितीवर इंग्रजी अनुवाद दिला आहे, पण अमुक शब्द समजायला तो भावानुवाद पुरेसा नव्हता. (इंटर्नेट वर शब्दकोश असतात हे किती चांगले!)

किन्हु संग खेलूं होली
पिया त्यज गये है अकेली

प्रियकर नाही तर होळीच्या आनंदात एकटेपणाच जास्त वाटतो

माणिक-मोती सब हम छोडे़
गलेमें पहनी सेली

सेली म्हणजे गंडा किंवा दोरा. माणके-मोती टाकून मीरेने गळ्यात गंडा बांधला आहे.

भोजन भवन भलो नहीं लागै
पिया कारण भयी अकेली
मुझे दूरी क्यूं मेली

प्रियाशिवाय एकटीला जेवण, घरदार काहीच रुचत नाही - हा दुरावा मला का मिळाला?

अब तुम प्रीत अवरसुं जोडी
हमसे करी क्यू पहेली

आता तू प्रीती दुसर्‍या कोणाशी जोडली आहे, मला असे कोड्यात का टाकतो आहेस?

बहु दिन बीते अजहु न आये
लग रही कालाबेली
कीणु दिल मां येई हेली

कालाबेली म्हणजे बहुधा तगमग. मराठी शब्दकोशात "कालाबुली"=तगमग असा शब्द सापडतो.
हेली म्हणजे सखी, सहेली. तर असा अर्थ मला जास्त सोपा लागतो -

खूप दिवस झालेत, ते अजून नाही आले
मला तगमग वाटते आहे
सखी! माझ्या हृदयात काहीबाही येते आहे...

श्याम बिना जियडो़ मुरझावे
जैसे जल बिन बेली

जियडो़=जियरा म्हणजे जीव/अंतःकरण. श्याम नाही तर जीव कोमेजून जातो आहे, जशी पाण्यावाचून वेल कोमेजावी.

मीरा को प्रभु दरसन दीजो
मैं तो जनम जनम की चेली
दरस बिना खडी़ दुहेली

चेली म्हणजे चेला शब्दाचे स्त्रीरूप. दुहेली म्हणजे संकटात पडलेली. प्रभू! मीरा जन्मजन्मांतरीची चेली आहे, तिला दर्शन द्या. दर्शनाबिना बिकट परिस्थितीत ती ताटकळत आहे.

भलो, जियडो वगैरे राजस्थानीमधले "ओ"-अंती शब्द गुजरातीमार्फत आपल्या मराठी कानांना आपलेसे वाटतात. आणि दुसर्‍या दिशेने गोव्याच्या मार्फत आलेल्या लताबाईंचा आवाज...

सुरेख प्रतिसाद,

"किनु संग" मध्ये दिसतो, तोच ना?

येस. शेवटी 'ग रेग' अशी संगती आहे. 'त्यज' या शब्दावर जो गंधार आहे तो साक्षात तानपुर्‍यातील गंधार. प़सासासा़ असा जर सुरेल तानपुरा मिळवला तर त्यातनं जो नैसर्गिक शुद्धगंधार ऐकू येतो, नेमका त्याच क्वालिटीचा गंधार दिदीच्या गळ्यातून ऐकू येतो!

भोपळे बांधून गानगंगेत पोहणार्‍या माझ्यासाठी मधून-मधून तुम्ही सुरावटही दिलीत ते फार चांगले केलेत.

भोपळे सोडलेत तरी हरकत नाही. गानगंगेत बुडू लागलात तरी चालेल. किंबहुना गानगंगेत बुडण्यातच मौज आहे! :)
आम्हीही अद्याप हातपायच मारत आहोत, गटांगळ्या खात आहोत, परंतु मजा येते! असो.

वाटता कधीकधी समजत नाहीत. ओळीचा शेवट म्हणजे संगीतातल्या न्यासासारखा, त्यातही यमक असले म्हणजे ओळ "घरी पोचली" असा भास होतो.

क्या बात है! ही खास 'धन्याशेठ-पेश्शल' उपमा! आवडली.. :)

कालाबेली म्हणजे बहुधा तगमग. मराठी शब्दकोशात "कालाबुली"=तगमग असा शब्द सापडतो.

मला तर एका विद्वानाने याचा अर्थ काळंबेरं असा सांगितला होता. 'बहु दिन बीते अजहु न आये, तेव्हा आता तुझी दुसर्‍या कुणावर प्रिती जडली आहे, असं काहीसं काळंबेरं मनात आलं, असा अर्थ मला एका विद्वानाने समजावला होता. तगमग हा अर्थ आत्ताच कळतो आहे. मी गाण्याच्या सांगितिक बाजूवर लिहायचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यातल्या शब्दांबाबत धन्याशेठ, तुझ्यासारख्या गाढा व्यासंग असणार्‍या व्यक्तिकडून अगदी असाच विस्तृत प्रतिसाद अपेक्षित होता.

भलो, जियडो वगैरे राजस्थानीमधले "ओ"-अंती शब्द गुजरातीमार्फत आपल्या मराठी कानांना आपलेसे वाटतात. आणि दुसर्‍या दिशेने गोव्याच्या मार्फत आलेल्या लताबाईंचा आवाज...

क्या बात है! धन्यवाद धन्याशेठ, सुंदर प्रतिसाद!

आपला,
(ऋणी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

वा!

दोन्ही प्रतिसाद आवडले. आता एकत्रित वाचून गाणे परत ऐकत आहे.

मन प्रसन्न करणारा यमन.

पंचमाचा वापर

तात्यांनी दुवा दिलेल्या या गाण्यात 'पिया त्यज गये है अकेली' मधली जी आर्तता आहे त्याच्यामागे पंचम न वापरणे हे एक मुख्य कारण जाणवते. 'पिया त्यज गये है अकेली' या ओळीवर फक्त ४ वेळा पंचम वापरला गेला आहे (०:३३,२:१०,३:२३,४:३२ या वेळी). बाकी ठिकाणी वर अगदी तार गंधारापर्यंत जाऊनही खाली येताना पंचम न घेता 'ध म् ग रे' अशी संगती घेतलेली आहे. वर सांगितलेल्या वेळेला आणि बाकी ठिकाणी 'पिया त्यज गये' मधील फरक ऐकून पहावा. मुळात पंचम न घेता येणारी 'नी ध म् ग' ही संगती काहीशी आर्त छटा असणारी आहे (उदा. राग सोहोनी ज्यात असं सरळ खाली येतात, काही वेळा पूरियामध्ये सुद्धा. फक्त तिकडे कोमल ऋषभ आर्तता आणायला एक मुख्य घटक असतो), तिचा वापर पं. मंगेशकरांनी उत्तम करून घेतला आहे. यावरून राजकल्याण हा राग आठवला. यमनमधला मुख्य स्वर पंचम यात वर्ज्य असतो. 'यमन मधला पंचम काढून मारव्याच्या अंगाने बढत करत गेलं (म्हणजे रे-ध चमकवत ठेवून) की राजकल्याण मिळतो' असं वसंतराव देशपांड्यांनी सांगितल्याचं कुठेतरी वाचलं आहे. या संदर्भात त्याचे विवेचन कोणी करू शकले तर उत्तम होईल.

 
^ वर