पॅकेज डील ऑफ विपश्यना! (भाग - १)

इंस्टंट इडली मिक्स, इंस्टंट पिझ्झा मिक्स, टू मिनिट नूडल्स अशा सगळ्या इंस्टंटच्या आजच्या जमान्यात अध्यात्म, तत्वज्ञान, बुद्धाची शिकवण, विपश्यना अशा गोष्टींचं सुद्धा 'इंस्टंट-पॅकेज-मिक्स' मिळू शकतं हे तुम्हाला माहिती आहे? विश्वास बसणार नाही अशीच ही गोष्ट आहे आणि बुद्धिवादाला तर हा मोठाच धक्का आहे. पण आज 'इंस्टंट बुद्धा फिलॉसॉफी मिक्स' अगदी सहज अव्हेलेबल आहे. श्री सत्यनारायण गोएंकाजींच्या विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूटनं ही यूजर फ्रेंडली विपश्यना तुमच्या पर्यंत आणलीये!

ही गोष्ट दहा बारा वर्षांपूर्वीची असेल. माझ्या न्यूझिलंडमध्ये राहणाऱ्या एका मित्राचा अचानक एक दिवस मला फोन आला. गोएंकाजींचा दहा दिवसांचा विपश्यनेचा कोर्स त्यानं तिथंच केला होता आणि त्या कोर्सच्या प्रभावाखाली आला होता. मी पण इथे हा कोर्स करणं कसं आवश्यक आहे आणि त्यानं माझ्या जीवनात कसे आमुलाग्र बदल घडतील वगैरे वगैरे भरपूर बेनेफिटस त्यानं मला ऐकवले. मागं 'सत्याग्रही विचारधारा' मध्ये डॉ सप्तर्षींचा एक याच विषयावरचा लेख वाचला होता. शिवाय आमच्या दोन चार विचारी मित्रांनीही याला दुजोरा दिला आणि मीही विपश्यना कोर्ससाठी पुण्याजवळ मरकळच्या केंद्रात प्रवेश घेतला. दहा दिवस जगापासून लांब रहायचं आणि दहा दिवसात तुम्ही कुणाशी किंवा कुणी तुमच्याशी बोलणार नाही, या दोन मोठ्या आकर्षणांनीही मी उद्युक्त झालो.

तुम्हा आम्हाला प्रत्येकालाच आज जगण्यासाठी तीव्र स्पर्धेला तोंड द्यावं लागतंय. रोजच्या चिंता आहेत, वैफल्य आहेत, ताण-तणाव आहेत, भीती आहे, पळापळ आहे. या सगळ्यातून सुटण्याची धडपड आहे. शरीराला, मनाला स्वस्थता मिळवून देणार्या उपायांची शोधाशोध आहे. यातूनच वेगवेगळ्या देवांची, नवसा-सायासांची, महाराजांची, सदगुरुंची, जगदगुरुंची उत्पत्ती आहे. ज्योतिषांची, मांत्रिकांची, खवीसांची चलती आहे.

अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धानं जीवनाचं विशिष्ट तत्वज्ञान माणसाला दिलं. वेदपरंपरेतून निर्माण झालेली धार्मिकता, कथा-पुराणांचं स्तोम, कर्मकांड यांची या काळात बजबजपुरी माजली होती. खरं हिंदू तत्वज्ञान बाजूला पडलं होतं आणि यज्ञयागाला, महत्त्व आलं होतं. बुद्धानं स्वतः राजस्वी जीवनाचा त्याग करून कर्मकांड, तंत्र-मंत्र विरहीत असं साधं सरळ सोपं तत्वज्ञान मांडलं. आज अडीच हजार वर्षांनंतर सुद्धा हे सारं तत्वज्ञान, यात सांगितलेला ध्यान धारणेचा मार्ग, यात सांगितलेली विचार करण्याची पद्धत माणसाला मनःस्वास्थ्य मिळवून देऊ शकतात.

आता प्रश्न असा आहे की जिथं स्वतः गौतम बद्धासारख्या तपस्व्याला सुद्धा हे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी, बोधी प्राप्त करण्यासाठी, सारं आयुष्य वेचावं लागलं, ज्यानं स्वतःच शिकवणूकीतून असं सांगितलं की हे संपूर्ण तत्वज्ञान आत्मसात करण्यासाठी तुम्हाला हा जन्म कदाचित अपुरा पडेल आणि तुम्हाला अजून एक जन्म घ्यावा लागेल, तिथं दहा दिवसात धम्म म्हणजे काय ते संपूर्ण शिकवून खात्रीनं मनःशांती मिळवून देणार्या मार्गावर नेऊन सोडण्याची शाश्वती कुणी देत असेल तर यावर कितपत विश्वास ठेवावा? किंवा मनःशांतीचा मार्ग दहा दिवसात मिळतही असेल - कदाचित - पण म्हणून हे म्हणजेच धम्म किंवा बुद्धाचं सारं तत्वज्ञान आहे का?

विपश्यना या पाली शब्दाचा अर्थ अंतर्मुख होऊन स्वतःकडे बघणं, मनाच्या जडणघडणीचं निरिक्षण करणं असा आहे. बुद्ध तत्वज्ञान समृद्ध, अथांग आणि चहू बाजूंनी फुललेलं आहे आणि विपश्यना हा या तत्वज्ञानातला एक लहानसा भाग आहे. पाली भाषेत विपश्यना ध्यानतंत्राचा उल्लेख 'विपश्यना भावना' असा केलेला आढळतो. आधी सांगितल्याप्रमाणे विपश्यना म्हणजे अंतर्मुखता आणि भावना म्हणजे अनुभव घेणे किंवा वाढीस लावणे. म्हणजेच अंतर्मुख होऊन स्वतःचं निरिक्षण करण्याची सवय लावून घेणे. आता पारंपारिक रित्या विचार करता विपश्यना भावनेच्या निदान दोन तरी पद्धती अस्तित्वात आहेत. एक थेरवाद विचारसरणीची आणि दुसरी महायान विचारसरणीची. पहिली म्हणजे समथा-पुबनगमा-विपश्यना. ही श्री सयाग्यी उ बा-खीन यांची परंपरा. यात प्रथम श्वासोश्वासावर आणि नंतर शरीराच्या प्रत्येक भागावरून केंद्रीत लक्ष्याचा झोत फिरवण्यावर भर दिलेला आहे. दुसरी पद्धत महायान विचार सरणीतली. यात साधकाची अंतर्मुखता ही शुद्ध किंवा दुसऱ्या कशाचाही (उदा. - समथा) लवलेशही नसलेली अंतर्मुखता आहे. अशा साधकाला 'सुखा-विपसका' म्हटलंय.

वर म्हटल्याप्रमाणं बुद्ध तत्वज्ञान स्वतःच्या पद्धतीनं मांडणारे थेरवाद आणि महायान असे दोन भिन्न विचार प्रवाह (स्कूल ऑफ थॉटस) आहेत. किंवा महायान म्हणजे उत्तरेकडे वाढलेला आणि थेरवाद म्हणजे दक्षिणेकडचा अशीही या विचारांची विभागणी करता येते. महायान विचारप्रणाली म्हणजे गौतम बुद्धांनंतर काही शतकांनी निर्माण झालेलं बुद्ध तत्वज्ञान. म्हणजे मूळ पाली सूत्रांचा या विचार प्रवाहाच्या पंडितांनी त्यांच्या दृष्टिकोनातून लावलेला अर्थ आणि त्यावर आधारलेलं हे तत्वज्ञान. हे तत्वज्ञान उत्तरेला तिबेट, चीन, मंगोलिया, जपान या देशांमध्ये जास्त रुजलं. महायान वादात आनापान सती आणि सतिपठ्ठण या दोन्ही सूत्रांना फार महत्त्व दिलं जात नाही. किंवा दुसऱ्या शब्दात म्हणजे श्वासोश्वासावर लक्ष केंद्रीत करण्यावर किंवा मनसमृद्धिच्या चार आस्थापनांवर विशेष भर दिलेला नाही. परंतु गोएंकाजी थेरवाद शाखेतले. थेरवाद या शब्दाचा शब्दशः अर्थ 'वडिलधाऱ्यांची शिकवणूक'. गौतम बुद्धानं सांगितलेल्या सूत्रांचा जसाच्या तसा अर्थ घेऊन त्यावर आधारित हे तत्वज्ञान. श्रीलंका, ब्रम्हदेश, व्हिएटनाम, थायलंड अशा दक्षिणेकडच्या देशांमध्ये थेरवाद तत्वज्ञान जास्त मानलं जातं. थेरवाद विचारप्रवाहात अशी आख्यायिका आहे की ज्यावेळेस बुद्धानं आनापान सती सूत्र किंवा श्वासोश्वासावर लक्ष केंद्रीत करायला शिकवणारं सूत्र, सांगितलं त्यावेळेस ते सूत्र शिकवण्यासाठी तीन महिने कमी पडल्यामुळे, त्यानं 'सावथी' शहरा बाहेरच्या गर्द राईतल्या शिबिरात चौथा महिना सुद्धा मुक्काम केला होता. हेच आनापान सती सूत्र गोएंकाजींच्या शिबिरात तुम्हाला तीन दिवसात शिकून समाधी गाठता येते!

आनापान सती आणि सतिपठ्ठण ही दोन्ही बुद्ध तत्वज्ञानातल्या सर्वात महत्त्वाच्या सूत्रांपैकी. यापैकी आनापान सती श्वासोश्वासावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सोळा पद्धती शिकवतं. तर सतिपठ्ठणात मनसमृद्धिच्या चार आस्थापनांबद्दल सांगितलं आहे. या दोन्ही सूत्रांचा अभ्यास एकत्रीत रित्या केला जातो. आनापान सती सूत्रात सांगितल्याप्रमाणे श्वासोश्वासावर लक्ष्य केंद्रीत करण्याचा सराव अतिशय आवश्यक असतो. कारण यातून सतर्कता जागृत होऊन काळजीपूर्वक आणि सखोल निरिक्षण करता येतं. आणि निरिक्षण म्हणजे मनाचं, स्वत्वाचं निरिक्षण. म्हणजेच विपश्यना आणि विपश्यनेतूनच मुक्तीच्या दरवाज्यापर्यंत जाता येतं.

- क्रमशः

Comments

शंका

विपश्यना या पाली शब्दाचा अर्थ अंतर्मुख होऊन स्वतःकडे बघणं, मनाच्या जडणघडणीचं निरिक्षण करणं असा आहे.

मागे कुठे तरी बिपाशाच्या(बसू) नावाची व्युत्पत्ती वाचली होती. तेव्हा बिपाशा हे 'विपाशा'चे बंगालीकरण असल्याचे कळले होते. त्यातच विपाशाचे पंजाबीकरण होऊन बियास(नदी) हा शब्द् तयार झाल्याचेही नमूद केले होते आणि विपाशा य संस्कृत शब्दाचा अर्थ 'पाशातून मुक्त करणारी=मोक्षदायिनी' असल्याचेही लिहीले होते. विपश्यना हा शब्द विपाशाचे एखादे रूप असावे अशी शंका व शक्यता वाटते. त्यामूळे त्त्याचा अर्थही 'मोक्ष'संदर्भात काहीतरी असावा.

बाकी लेखाविषयी मतप्रदर्शन करणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. कारण या विषयात मी थोडा मंद आहे.
तरीही.....फास्ट फूडच्या जमान्यात 'विपश्यना व ध्यान-योग'चा क्रॅशकोर्सच लोक प्रेफर करणार ना...:-)

प्रतिक्रिया

माहितीपूर्ण लेख. या विषयाबद्दलचेही ज्ञान अतिशय तोकडे असल्याने , हे सर्व पूर्ण नवीन वाटते आहे. मनात प्रश्न आहेत , परंतु लेखाचे अपूर्ण रूप लक्षांत घेतां , लेख पूर्ण झाल्यावरच विचारेन. बौद्ध विचार, त्यातील विपश्यनेच्या मागची तात्विक बाजू , विपश्यनेचे तंत्र/मंत्र आणि इतर अंगे , आणि अर्थातच त्याचा परिणाम असे एकूण तुमच्या लेखाचे चित्र असावे. त्यामुळे , लेख पूर्ण झाल्यावरच प्रश्न विचारतो. दरम्यान , लेखाबद्दल आभार.

असेच म्हणतो

या लेखमाले बद्दल सुद्धा उत्सुकता आहे. तसेच बौद्ध धर्मात हिंदूंकडून काय काय आत्मसात केले आहे ते सुद्धा कळायला मदत होईल.

असेच

विपश्यना हे नाव वगळता त्याबद्दल काडीचीही माहिती नाही. ही लेखमाला अशी माहिती देऊन जाईल असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

चलती

तुम्हा आम्हाला प्रत्येकालाच आज जगण्यासाठी तीव्र स्पर्धेला तोंड द्यावं लागतंय. रोजच्या चिंता आहेत, वैफल्य आहेत, ताण-तणाव आहेत, भीती आहे, पळापळ आहे. या सगळ्यातून सुटण्याची धडपड आहे. शरीराला, मनाला स्वस्थता मिळवून देणार्या उपायांची शोधाशोध आहे. यातूनच वेगवेगळ्या देवांची, नवसा-सायासांची, महाराजांची, सदगुरुंची, जगदगुरुंची उत्पत्ती आहे. ज्योतिषांची, मांत्रिकांची, खवीसांची चलती आहे.

आम्ही बी ह्येच म्हन्तो. स्वप्नभय या दोन गोष्टींवर अनेक व्यवसाय चालतात.विवेकवाद तिथे पांगळा पडतो.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर