नॅनोला दोष देऊ नका!

रीडर्स डायजेस्ट मासिकात काही महिन्यांपूर्वी वाचलेल्या एका लेखाचा मराठी अनुवाद पुढील लेखात दिला आहे. भारतातली वाहनांची भरमसाट वेगाने वाढणारी संख्या, प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नाबाबतची अनास्था, प्रशस्त बनवले तरीही अपुरेच पडणारे रस्ते आदी विविध समस्यांवर या लेखातून काही उत्तरं मिळतील असं वाटतं. लेखातली मतं सदरहू लेखकाची आहेत, मी केवळ इथे मांडली असली तरी बरीच पटण्यासारखी, विचार करायला लावणारी आहेत. बरेच दिवस लिहू लिहू म्हणत रेंगाळत पडलेला हा लेख आता मांडत आहे. उपक्रमावर सध्या यासंदर्भातले लेख येत आहेतच, त्यात माझ्याकडून थोडीशी भर.-

-सौरभ

राजेंद्र के पचौरी जे क्लायमेट चेंजच्या इंटरगव्हर्नमेंटल पॅनेलचे अध्यक्ष आहेत त्यांना सध्या, टाटाच्या लवकरच बाजारात येणार्‍या नॅनोमुळे भयकारी स्वप्न पडत आहेत. सुनिता नारायण (सेंटर फॉर सायन्स ऍंड एनव्हार्यन्मेंट) म्हणतात की फक्त नॅनोच नाहीतर सगळ्याच गाड्यांमुळे त्यांना भयंकर स्वप्नं पडतात.
परंतु मला पडणार्‍या स्वप्नांमधली खलनायक नॅनो नाही आणि इतर गाड्याही नाहीत. खरा दोष सरकारची मूर्ख धोरणं, जी अनुदानं देतात आणि प्रदूषण,भेसळ आणि रस्त्यावरच्या वाढत्या रहदारीला उत्तेजन देतात यांचा आहे.
पर्यावरणाबद्दल बोलणार्‍या ढोंगी लोकांना नॅनो एक भयंकर संकट वाटत आहे कारण तिची कित्येकांना परवडण्याजोगी किंमत. अजून लाखो गाड्या आता रस्त्यावरच्या रहदारीत भर घालतील आणि त्यासाठी अजून खनिज तेलाचा उपसा होईल. विशेष म्हणजे या लोकांची ही वर्चस्ववादी वृत्ती हे त्यांचं शहाणपण, हुशारी समजली जात आहे. या लोकांकडे स्वत:च्या गाड्या आहेत पण गरीबांनी गाड्या विकत घेणं, त्यांनीही मोबाईल होणं आणि पर्यायाने वाढणार्‍या रहदारीत आपला अजून वेळ जाणं त्यांना नको आहे.
खरंतर विरोध व्हायला हवा तो मोठ्या गाड्या (ज्या जास्त जागा आणि इंधन वापरतात) आणि जुनाट गाड्यांना, ज्या खूप प्रदूषण करतात. पण हे सोडून हे ढोंगी पर्यावरणवादी अशा नव्या गाडीला विरोध करत आहेत जीची किंमत कमी आहे, मायलेज जास्त आहे आणि प्रदूषण उत्सर्जन कमी आहे.
नॅनोमुळे गाड्यांच्या संख्येत भरमसाट वाढ होईल असे मानता येणार नाही. जागतिक प्रमाण लक्षात घेता भारतातील प्रतिव्यक्ती गाड्यांचं प्रमाण कमी आहे. लंडन आणि न्यूयॉर्क मध्ये गाड्यांची सर्वोच्च (ultra high) घनता असूनही तिथली हवा दिल्लीच्या तुलनेत जास्त शुद्ध आहे. आपला खरा दोष हा खूप सारी चुकीची धोरणं आहे, खूप सार्‍या गाड्या हा नाही.
वाहनांना सुद्धा आपल्याकडे भरमसाट अनुदानं दिली जातात. रस्ते आणि उड्डाणपूल बांधायला कोटी रुपये खर्च होतात तरीदेखील काही रस्त्यांवरचा टोल वगळता रस्त्यावापर नि:शुल्क आहे. वाहतूक नियमन करणारे पोलिस आणि सिग्नल्स यासाठी खूप खर्च होतो पण ही सेवाही फुकट उपलब्ध करुन दिली जाते. अशा तर्‍हेच्या या छुप्या अनुदानांमुळे शहरांना रस्त्यांचा विस्तार करणे आणि सार्वजनिक वाहतूक सुधारणे अशा कामांसाठी पैसा कमी पडत आहे.
शहरांमधल्या जागांचे भाव आता काही लाख प्रति चौ.मीटर इतके वाढले आहेत. तरीदेखील उपनगरांमध्ये पार्किंग फुकट आहेच शिवाय मध्यवस्तीत तर केवळ दहा रुपये दिवसभरासाठी आकारले जातात. फक्त एका गाडीपुरती लागणारी २३ चौ. मीटरची जागा जवळजवळ ४० लाखांची जमीन व्यापते. एका गाडीला एका ऑफिस डेस्क पेक्षा जास्त जागा लागूनही ऑफिस डेस्कला त्याचं बाजारभावाप्रमाणे पूर्ण भाडं भरावं लागतं आणि पार्किंग साठी मात्र दहा रुपये भरले तरी भागतात.
दिवसभर गाडी पार्क करण्यासाठी न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन मध्ये अनुक्रमे जवळजवळ १५ डॉलर (७२० रु) ते ३० डॉलर (१४४० रु.) पर्यंत दर आकारले जातात. सीएसईने मध्य़ंतरी दिल्लीत पार्किंगचे दर दिवसाला १२० रु पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला होता जो तातडीने मोडून काढण्यात आला. म्हणजे आता पार्किंगची जागा शहरातल्या हिरवाईपेक्षा वाढत जाईल. अशा परस्थितीत आपण नक्की कशाला प्राध्यान्य द्यायला हवं?देत आहोत?
क्रुड ऑईलची जागतिक किंमत १९९८ पासून जवळजवळ १३ पटीने वाढत १३० डॉलर प्रतिबॅरलच्याही पुढे निघून गेली होती. ( जी आत्ता अलीकडे घसरत बरीच खाली आली आहे.) मात्र भारतातले दर या तुलनेत दुप्पटही झालेले नाहीत. तरीही डावे अजून अनुदानं द्यायची भाषा करतच आहेत. अशा स्थितीत सर्व शिक्षा अभियान आणि रोजगार हमी योजना या दोन्हींवर एकत्रित जेवढा पैसा सरकार खर्च करत नाही त्याहीपेक्षा जास्त किंमत केवळ इंधनासाठी मोजली जात आहे.
आपण मारे श्रीमंत देशांना त्यांनी हरित वायू उत्सर्जन कमी करावं म्हणून भाषण देत असतो, मात्र स्वत:च्याच देशात त्याला अनुदान देतो. डिझेलला सुद्धा पेट्रोलच्या तुलनेत किंमत कमी राहावी म्हणून अनुदान दिलं जातं, साहजिकच भारतातले वाहन उत्पादक जगात सर्वाधिक प्रमाणात डिझेल वाहनांची निर्मिती करतात. डिझेलच्या धुरात आढळणारे सस्पेंडेड पार्टिकल्स खूप विषारी असतात. असं हे घातक अनुदान काय कामाचं?
तीच गोष्ट केवळ गरीबांना परवडावं म्हणून मातीमोल किंमतीला विकलं जाणार्‍या रॉकेलची. एकूणातले १/३ रॉकेल तर भेसळ करण्यासाठीच वापरले जाते. त्याने तर अफाट प्रदूषण होतं, मग तुम्ही कितीही पर्यावरणपूरक गाडी वापरा.
मग याच्यातून मार्ग काय? अनुदानं कमी केलीच पाहिजेत शिवाय वाहनं आणि इंधनावरचे कर वाढवले पाहिजेत जेणेकरुन त्यांची सामाजिक/खरी किंमत वसूल होईल. पार्किंगलाही आपण जे सर्वात मोठं आणि तरीही अदृश्य असं अनुदान देत आहोत तिथे आपणाला निश्चित सुरुवात करता येईल.
पाश्चिमात्त्य देशातले कित्येक कार मालक कामाला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात. कारण शहर मध्यवस्तीतली पार्किंगची जागा मिळणं दुर्मिळ आहेच शिवाय ते बरंच महागही आहे. आपणही पार्किंगची जागा दिवसभरासाठी न देता तासाप्रमाणे दर आकारले पाहिजेत. यासाठी दर तासाला १० रुपये अशी आपल्या कडच्या मेट्रो शहरांमध्ये सुरुवात करता येईल.
टोकियोमध्ये तुमची स्वत:ची खाजगी पार्किंग जागा असल्या शिवाय तुम्हाला कार खरेदी करता येत नाही. असा काही उपाय भारतासाठी करणं अतिरेकीपणाचं ठरेल पण यावरुनच आपल्याला भविष्यकालीन मार्ग सुचेल. कारमालकांकडून आपण आताच या पार्किंग जागेची खरी/सामाजिक किंमत वसूल केली तरच ते लहान गाड्या, त्याही कमी खरेदी करतील आणि त्याहून कमी लोक कामाला जाण्यासाठी त्यांचा वापर करतील. याने बहुतांश रहदारी, गर्दी आणि प्रदूषणला आळा बसेल.
शहर प्रशासनाने देखील वाहनांवर एकदाच (one time) कर न आकारता वार्षिक तत्त्वावर आकारणी केली पाहिजे आणि मिळालेल्या करातून सार्वजनिक वाहतूक आणि रस्ते सुधारण्यासाठी पैसा खर्च केला पाहिजे. यातूनच एक काटकसरी, रास्त समतोल निर्माण होईल, खाजगी वाहतुकीने सार्वजनिक वाहतुकीसाठी पैसा उपलब्ध होईल. लंडन आणि न्यूयॉर्क मध्ये गाड्यांची घनता जास्त आहेच पण सार्वजनिक वाहतूक घनताही जास्त आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे.
भुयारी रस्त्यांबरोबरच शहरांनी गर्दी आणि प्रदूषण टाळण्यासाठी एलिव्हेटेड रस्त्यांचाही पर्याय वापरायला हवा. लता मंगेशकर यांनी मध्यंतरी त्यांच्या मुंबईतल्या फ्लॅटच्या जवळचा एलिव्हेटेड रोडचा पर्याय बासनात गुंडाळायला लावला. त्यांच्या गळा आणि गाण्यावर परिणाम होईल असे त्यांना वाटले असावे बहुतेक. जरी असा रस्ता झालाच असता तर उलट पदपथावर राहून प्रदूषणाचे गंभीर परिणाम भोगणार्‍यांना थोडं उंचीवर प्रदूषण होऊन जरा दिलासा तरी मिळाला असता. पण याची काळजी त्या कशाला करतील?
अजून एक करता येण्याजोगा पण राजकीयदृष्ट्या गैरसोयीचा वाटणारा उपाय म्हणजे वाहनांवरची एक्साईज ड्यूटी (कर) वाढवणे, इंधन अनुदानं कमी करणे/ काढून टाकणे. पेट्रोल, डिझेल आणि रॉकेलमधली भेसळीला उत्तेजन देणारी दर तफावत कमी करणे. डिझेल गाड्यांना तर अजून जास्तीचा सेस कर लावून येणारा पैसा त्यांच्या प्रदूषणाचे परिणाम भोगणार्‍यांचं आरोग्य सुधारण्यासाठी वापरला पाहिजे.
हा एक लांबचा, राजकीयदृष्ट्या गैरसोयीचा कार्यक्रम आहे. त्यातलं काही प्रत्यक्षात येईल की नाही देव जाणे!
परंतु हा मार्ग स्वीकारायला हवा, उगाच नॅनोविरोधात निदर्शनं करण्यापेक्षा!

- स्वामिनाथन अंकलेसरिया अय्यर,
रीडर्स डायजेस्ट जुलै २००८

Comments

चांगला लेख

प्रथम सौरभदा यांचे आभार. आपन मर्‍हाटीत नस्ता दिला तर आमी कवा तो वाचला असता?
अनेक बौद्धिक कसरती करत हा लेख आपल संतुलन राखतो. दोष नॅनोचा नाही हे मान्य. नॅनो हे निमित्त.

खरा दोष सरकारची मूर्ख धोरणं, जी अनुदानं देतात आणि प्रदूषण,भेसळ आणि रस्त्यावरच्या वाढत्या रहदारीला उत्तेजन देतात यांचा आहे.

वाक्यात थोडेसे बदल करुन अनेक् समस्यांबाबत हे म्हणता येईल.

जागतिक प्रमाण लक्षात घेता भारतातील प्रतिव्यक्ती गाड्यांचं प्रमाण कमी आहे.

संख्याशास्त्रीय कसरती करणे हा तर विद्वानांचा छंदच. तुलना फक्त गाड्यांच्या प्रमाणाची नको. आनुषंगिक पायाभुत सेवा सुविधा व रोड व्हेईकल इंडेक्स , वाहतुकीचे प्राधान्यक्रम,नियम व अंमलबजावणी, सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाबी परिणाम करणारे घटक आहेतच.

नॅनोमुळे गाड्यांच्या संख्येत भरमसाट वाढ होईल असे मानता येणार नाही

पण लक्षणीय वाढ होईल ना! त्याचा परिणाम हा इतर परिणामासारखाच होणार ना! नॅनो चे उत्पादन हे गरजेपोटी निर्माण होतय की स्वार्थापोटी हा छुपा मुद्दा आहे. आता दारुचे उदाहरण घ्या.
१) दारु मर्यादित प्रमाणात उपलब्ध ठेवणे व त्याचे दुष्परिणाम लोकांना सांगणे
२) दारु मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवणे व त्याचे दुष्परिणाम लोकांना सांगणे
यात दारु पिणार्‍या लोकांना कुठला पर्याय सोयीचा? पहिल्या पर्यायात सहज उपलब्धता नसल्याने सामान्य पिणार्‍याला इच्छा झाली तरी त्याचा मार्ग खुंटायचा. बेवडा मात्र कुठूनही उपलब्ध करुन तो पित असे. दुसर्‍या पर्यायात सामान्याला उपलब्धता झाल्याने त्याचे पिण्याचे प्रमाण वाढणार. सामान्य पिणारा बेवडा होण्याची शक्यता वाढणार.
आता त्याला परवडत म्हणुन तो पितो कि उपलब्ध आहे म्हणुन पितो? कि दोन्ही? त्याचे दुष्परिणाम असल्याने लोकांनी दारु पिउ नये. न पिल्याने गिर्‍हाईक कमी होतील. मागणी कमी झाली कि उत्पादन घटेल. उत्पादन घटले कि दुकानांची संख्या कमी होईल्. पर्यायाने उपलब्धता कमी होईल. असे तर्कशास्त्र ताणत प्रबोधन करता येईल?

पर्यावरणाबद्दल बोलणार्‍या ढोंगी लोकांना नॅनो एक भयंकर संकट वाटत आहे कारण तिची कित्येकांना परवडण्याजोगी किंमत

असे वाचतो
पर्यावरणाबद्दल बोलणार्‍या पैकी ढोंगी लोकांना नॅनो एक भयंकर संकट वाटत आहे कारण तिची कित्येकांना परवडण्याजोगी किंमत.
या ढोंगी लोकांचा एक फायदा होतो कि पर्यावरण ही गोष्ट दखलपात्र होते. अन्यथा ही गोष्ट भारतात तरी नगण्य मानली जाते.हे स्वतः मात्र गाड्या उडवतात कारण सार्वजनिक वाहतुक व्यवस्था यांनाही गैरसोयीची वाटतेच ना!

आता समजा असे कुणी म्हटल कि अगोदरच उदंड चारचाकी झाल्यात आन त्यात नॅनोची भर कशाला? विरोध भरीला आहे नॅनोला नाही. नॅनो ऐवजी समजा बॅबो आली तर त्यालाही विरोध. विरोध वा समर्थन करण हातात असत. प्रश्नाची सोडवणुक मात्र व्यवस्थेच्या कचाट्यात. चला यानिमित्ता चर्चा होते हेही नसे थोडके.
प्रकाश घाटपांडे

धन्यवाद.

आपन मर्‍हाटीत नस्ता दिला तर आमी कवा तो वाचला असता?
आधी मी नेटवरच इंग्रजी दुवा शोधण्याचा बराच प्रयत्न केला पण नाही मिळाला. पण हा लेख मांडायचा तर होताच. असो, भाषांतर कितपत जमते याचा अंदाज तरी आला.
तुलना फक्त गाड्यांच्या प्रमाणाची नको.
हे पटले. आपल्याकडे नॅनो सारख्या गाड्या जरुर याव्यात. पण अपुरे रस्ते, वाहतुकीच्या नियमांबाबत बेफिकीरी यांबाबत काही केले नाही तर दोन ते तीन दिवस वाहतूक पूर्ण कोलमडण्याचे दिवस आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहेत.
भारतात पर्यावरण नगण्य मानले जाते असे तुम्ही म्हटले आहे. खरेच असे आहे? इतर सदस्यांना काय वाटते? माझ्या मते आपण पुरेसे जागरुक आहोत पण ठोस कारवाईच होत नाही. अर्थात मग असली कुचकामी जागरुकता पण काय उपयोगाची?
बॅबो ही कुठली गाडी? गुगलून पाहिले असताही उत्तर मिळाले नाही.;-)

-सौरभ

==================

स्त्रीबद्दल आपल्याला धास्ती वाटते. कारण एकतर कोणत्याही स्त्रीला पुरुषाकडे खाऊ की गिळू असं रोखू़न पाहता येतं.

संधी

आधी मी नेटवरच इंग्रजी दुवा शोधण्याचा बराच प्रयत्न केला पण नाही मिळाला.
ही संधी आहे.
बॅबो ही कुठली गाडी?
ही काल्पनिक आहे.

(स्वामी-भक्त) तो

छान लेख

सौरभदा, हा लेख येथे दिल्या बद्दल प्रथम धन्यवाद.
दोष नॅनोला देणे चुकीचेच आहे. मुळ मुद्दा आहे तो कमी किंमत असल्याने सगळेच लोकं गाड्या घेउ लागतील. मग इंधनाचा वापर/तुटवडा/पार्किंगसाठीची जागा हे सगळे मुद्दे आहेत. या लोकांना पुर्वीच्या चुका मान्य नाही करायच्या, पण या पुढे लोकं चुका करु नयेत असे त्यांना वाटते म्हणून त्यांचा उदात्त हेतु आहे विरोधासाठी. त्याच वेळे हे लोकं असे नाही म्हणणार की सर्वांनी जुन्या मोठ्या गाड्या भंगारात टाकाव्यात, त्यावर बंदी घालावी. अथवा पर्यावरणाच्या कारणाने याच लोकांनी आपल्या अलिशान गाड्यांच्या बदल्यात नॅनो घ्यावी. अथवा टाटा हवेवर चालणारी गाडी बनवत आहेत. कदाचित भविष्यात नॅनोला सुद्धा तेच इंजिन येईल आणि मग पर्यावरणाचा मुद्दाच दुय्यम होउन जाईल असा सुद्धा विचार या लोकांच्या मनात का नाही येत? येत असल्यास तो बोलला का जात नाही?
वर जो ढोंगीपणाचा मुद्दा आहे, तो अत्यंत योग्य आहे. इतके दिवस चारचाकी हि चैन होती. आता नाही राहणार. खरतरं भ्रमणध्वनी हे सुद्धा गरजेच आहेत असे नाही. पण त्या बद्दल कोणीच काही बोलत सुद्धा नाही. पर्यावरण, सार्वजनीक वाहतुक व्यवस्था आणि असेच एकमेकात गुंतलेल्या मुद्यांवर उपाय हे चर्चेचे आणि कृतीचे वेगळे विषय आहेत. जर या लोकांना खरच या विषयात रस असेल तर उपाय नक्कीच शोधता येतील आणि अंमलबजावणी सुद्धा करता येईल. पण ते नाही. टु स्ट्रोक गाड्या आता नव्याने डिझाईन केल्या जातात का? नाही. असे अनेक उपाय आहेत. पर्यावरणाचा र्‍हास थांबवायचा तर चंगळवाद सर्वात आधी थांबवायला हवा. पण ते करायची तयारी मात्र कोणी दाखवत नाही. भाषणे/दोष द्यायला सगळेच तयार.





दोष/भाषणे

पर्यावरणाचा र्‍हास थांबवायचा तर चंगळवाद सर्वात आधी थांबवायला हवा. पण ते करायची तयारी मात्र कोणी दाखवत नाही. भाषणे/दोष द्यायला सगळेच तयार.

अगदी नेहमी माझी गाडी या मुद्द्यावर येऊन अडकते.

मागे उपक्रमावर अशीच एकदा चर्चा झाली होती. त्याचबरोबर असे देखील बोलणे एकदा निघाले.

नॅनो चंगळवादासाठी काढलेली आहे असे मलाही वाटत नाही. पण जेव्हा दुसरा माणूस आपण बससाठी रांग लावून उभे असताना बाजूने ऐटीत बंदिस्त्त एसी गाडीत केसही इकडचा तिकडे न होता जाताना दिसतो आणि आपण धूळ खात बसने किंवा एस्टीने जायचे असे दिसते तेव्हा अशा सामान्य माणसाला तू चंगळवादाच्या मागे लागू नकोस असे सांगणे कठीण आहे. सामान्यांना परवडावी अशी गाडी काढली तर टाटांचे व्यापारी कौशल्यच त्यात दिसते. तेव्हा नॅनोपेक्षा हा मुद्दा आपल्या सार्वजनिक वाहतुकीच्या सोयींविषयी अनास्थेचा आहे.

गाड्यांच्या संख्येला प्रोत्साहन सरकारने देऊ नये हे मात्र मान्य, पण मग त्यासाठी सुबक आणि कार्यक्षम अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तयार करणे हे त्याहून महत्त्वाचे आहे. मुख्यत्वे डिझेलला अनुदान, अत्यंत अरूंद रस्ते, दिल्लीतील प्रदूषण यांचा संबंध गाड्यांच्या संख्येपेक्षा इतरच गोष्टींशी अधिक असावा.

पण "भुयारी रस्त्यांबरोबरच शहरांनी गर्दी आणि प्रदूषण टाळण्यासाठी एलिव्हेटेड रस्त्यांचाही पर्याय वापरायला हवा. लता मंगेशकर यांनी मध्यंतरी त्यांच्या मुंबईतल्या फ्लॅटच्या जवळचा एलिव्हेटेड रोडचा पर्याय बासनात गुंडाळायला लावला. त्यांच्या गळा आणि गाण्यावर परिणाम होईल असे त्यांना वाटले असावे बहुतेक. जरी असा रस्ता झालाच असता तर उलट पदपथावर राहून प्रदूषणाचे गंभीर परिणाम भोगणार्‍यांना थोडं उंचीवर प्रदूषण होऊन जरा दिलासा तरी मिळाला असता. पण याची काळजी त्या कशाला करतील?" यावरून वेगळी चर्चा सुरू करूया :)

सहमत..

सामान्य माणसाला तू चंगळवादाच्या मागे लागू नकोस असे सांगणे कठीण आहे. हे उदाहरण पटले.
सकाळमधला अनिल नेनेंचा हा लेख वाचा.
१९६५ ते २००७ या काळात अमेरिकेने चीनच्या तेल वापराच्या सहा पट आणि भारताच्या तेल वापराच्या पंधरा पट अधिक तेल वापरले. अन्य विकसित देशांनीही चीनपेक्षा पंधरा पटीने आणि भारतापेक्षा ३५ पटीने तेल वापरले आहे. कार्बन उत्सर्जनातही अमेरिकेचाच वाटा सर्वाधिक आहे. वातावरणात कार्बन डाय ऑक्‍साईड वायूचे वाढलेल्या प्रमाणाला अमेरिकेत एक शतकापूर्वी वापरात असलेल्या फोर्ड मोटर कंपनीच्या "मॉडेल टी' कारणीभूत आहे. शास्त्रज्ञांच्या मते आज हवेत असलेल्या कार्बन डाय ऑक्‍साईडपैकी सुमारे निम्मा वायू किमान शंभर वर्षे जुना असावा!

लता मंगेशकर यांच्या बद्दलच्या प्रतिसादाची मी ही वाट बघतो आहे. ;-)

-सौरभ

==================

स्त्रीबद्दल आपल्याला धास्ती वाटते. कारण एकतर कोणत्याही स्त्रीला पुरुषाकडे खाऊ की गिळू असं रोखू़न पाहता येतं.

शिशा तोडो आंदोलन.

अनेकदा रस्त्यावर रहदारी भरपूर असते आणि तिचे रुपांतर कोंडीत झालेले असते. अशा वेळेस शेजारीच एखादी गाडी आणि त्यात वाहक + १ जण असे स्वरुप असते. चाळा म्हणून अशा वेळेस पुढेमागे बघितले तर १५/२० अलिशान गाड्या (१+१) रांगेतच आहेत असेही जाणवते.

अशावेळेस अशा गाड्यांच्या काचा फोडाव्यात असाही नतदृष्ट विचार मनात आल्याखेरीज राहत नाही.

या आंदोलनाचे जन्माअगोदरचे बारसेही मी केले आहे, " शिशा तोडो" आंदोलन्.

बघुया कधी सुरु होते हे...

हिंसक प्रतिसाद

चक्क हिंसेला उत्तेजन देणारा प्रतिसाद? मला वाटत कि हा प्रतिसाद विषयांतर करतो आहे.





असहमत.

विषयांतर नाही, गाड्याच्या काचा फोडण्याची पद्धत कदाचित हिंसक असु शकेल,

परत तेच्...

द्वारकानाथ, अहो लोक नाईलाज असल्याशिवाय असला पर्याय वापरत नाहीत. परदेशांमध्ये आणि आता दिल्लीच्या मेट्रोमध्येही चांगल्या सेदान गाड्या बाळगण्याची ऐपत असणारेही प्रवास करतातच ना. कारण ज्या प्रवासाला त्यांना पूर्वी तास लागत होता तोच प्रवास आता अर्ध्या तासात, मेट्रोत आरामशीर बसून शिवाय स्वस्तात करता येत असताना कोण उगाच गाडीचं इंधन, चालकाचा पगार यांवर खर्च करेल? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली मिळणे महत्त्वाचे आहे. लोक आपणहून तिचा वापर करतील. प्रत्येकालाच आपला फायदा कशात आहे हे चांगले कळते.

-सौरभ

==================

स्त्रीबद्दल आपल्याला धास्ती वाटते. कारण एकतर कोणत्याही स्त्रीला पुरुषाकडे खाऊ की गिळू असं रोखू़न पाहता येतं.

सहमत्.

मध्ये लोकसत्ता मध्ये एक लेख आला होता. नविन रस्ते बांधणे, गाड्यांचे वाहनतळ निर्माण करणे यात आणि मुक्त असे सार्वजनिक वाहतुक व्यवस्था निर्माण करणे याची जर तुलना केली तर मोफत (मुक्त) सार्वजनिक व्यवस्था स्वस्त पडते.

उदा. पुण्यात शिवाजीनगर ते भोसरी असा रस्ता/ उड्डाणपुल बांधला तर त्याचा खर्च अंदाजे २०० कोटी येईल ( + भ्रष्टाचार). त्याच्या समोर जर स्वस्त / मोफत सार्वजनिक व्यवस्था दिली तर लोक स्वताच्या गाड्या वापरणार नाही आणि सार्वजनिक व्यवस्थेचा खर्च वार्षिक १० कोटी पेक्षा जास्त राहणार नाही.

आकडेवारीला काही आधार?

आपण दिलेल्या आकडेवारीला काही आधार? अभ्यासाला बरा पडेल.





 
^ वर