पर्यावरण - आपण काय करू शकतो?

आज २२ एप्रिल, जागतिक वसुंधरा दिनानिमित्त रम्या यांनी पर्यावरणाचा र्‍हास [मानवाकडून] या लेखावर दिलेल्या प्रतिसादाचे लेखात रूपांतर केले आहे. या लेखाच्या निमित्ताने पर्यावरणाची हानी आणि आपण काय करू शकतो यावर चर्चा व्हावी.
उपक्रम.

मला अजूनही आठवतं, माझ्या लहानपणी ३३ अंश सेल्सियस हे मुंबईतील उन्हाळयातलं महत्तम तापमान असायचं. यावर्षी एप्रिल महिन्यातच ३६ अंश सेल्सियस पार केलं.
विकास करताना पर्यावरणाकडे केलेल्या दुर्लक्षाचाच हा परिणाम आहे.
पाच सात वर्षांपूर्वी मी पहाटे पहाटे व्यायाम म्हणुन सायकलने फेरफटका मारायला बाहेर पडत असे. अशावेळी परेल ते भायखाळा असा प्रवास असे. पहिल्याच दिवशी सायकल चालवताना अचानक हवेमध्ये गारवा जाणवायला लागला. थोड्याच अंतरावर राणीच्या बागेची हद्द सुरू झालेली दिसली. पुढे हाच अनुभव रोज यायला लागला.
सांगण्याचा मुद्दा हा, की जर फक्त एवढा लहानसा वृक्षांनी अच्छादलेला जमिनीचा तुकडा जर वातावरणात जाणवण्या एवढा फरक करू शकतो तर नक्कीच एकंदरीत परिस्थिती सुधारता येऊ शकते.
पण सुरवात मात्र स्वतः पासुनच करायला हवी.
फक्त चर्चा करुन काय उपयोग? प्रत्यक्ष कृती करायला हवी.
आपल्या सोसायटीत, रस्त्यांच्या कडेला, आपल्या मैदानाशेजारी जमेल तिथे झाडे लावायला हवीत.
रस्त्यांच्या कडेला इतकी झाडे हवीत कि दुपारचं तळपतं उन जाणवायला नको.
आणि यात अशक्य काहीच नाही.
आणि झाडेही इथल्या हवामानाला आणि पशूपक्ष्याना साजेशीच असायला हवीत. गुलमोहर सारखी झाडे दिसायला कितीही सुंदर असली तरी ती येथील पशुपक्ष्याना फळे, मध आणि निवार्‍या साठी पुरेश्या भरगच्च फांद्या देतात कि नाही हे तपासून मगच झाडे लावायला हवीत.
स्थानि़क झाडे निवडायला हवीत.
बरं झाडे लावता येत नाहीत आणि आहेत ती टिकवूनही ठेवता येत नाहीत. ज्याना झाडे लावता येत नसतील त्यानी इथे नमूद केलेल्या गोष्टी करून पहाव्यात. कागद हा झाडांपासून तयारा होतो हे काही नव्याने सांगायची गरज नाही. वापरून झालेला कागद हा कचरा म्हणून न फेकता तो रद्दी मध्येच द्यावा. वापरुन झालेला कागद म्हणजे फक्त वर्तमान पत्राचा कागद असा गैरसमज करुन घेऊ नका. वाण्याच्या दुकानातून एखादी वस्तू बांधून आणलेला कागद, नको असलेल्या झेरॉक्सचे कागद, निवडणुकांच्या काळात आपल्या नेते मंडळींनी वाटलेली प्रसिद्धी पत्रके इ. गोष्टी सुद्धा रद्दीतच द्या.

यासंदर्भात आणखीन एक गोष्ट सांगाविशी वाटते. काही वर्षापूर्वी एका वर्तमान पत्रामध्ये पर्यावरण विषयक एक सदर प्रसिद्ध झालं होतं. त्यात एक महत्वाची गोष्ट सुचवली होती. पालक मुलांसाठी दरवर्षी नवीन वह्या पुस्तके विकत घेतात. मागील वर्षीच्या वह्या सर्रास रद्दी मध्ये दिल्या जातात. पण त्या वह्यांमधील किती वह्याची किती पानं कोरीच होती हे पाहीलं जातं का? त्या कोर्‍या पानांचा उपयोग पुढील वर्षा साठी केला जाऊ शकत नाही का? मग मी हा प्रयोग करुन पहायचं ठरवलं. त्यावर्षी मी बारावी विज्ञान वर्षाला असल्या कारणाने बरंच कच्चं लिखाण करायला लागायाचं. मी त्यासाठी वर्तमान पत्रात सांगितल्या प्रमाणे रद्दी मधील कोरे कागद वापरायला सुरूवात केली. छापील कागदाची मागील कोरी बाजू सुद्धा उपयोगात आणली. आणि काय सांगू मंडळींनो, ते बारावीचं वर्ष सोडाच पण आजतागायत मी कच्च्या कामासाठी वही खरेदी केलेली नाही!!!!! म्हणजे आपण अजाणतेपणाने किती उपयुक्त कागद कचर्‍यात फेकतो त्याचा विचार करा !!

या ठिकाणी महात्मा गांधींनी सांगीतलेला एक विचार तंतोतंत लागू होतो. "There is enough for everyone's need but not for anyone's greed"

मनुष्य प्राण्याच्या गरजा भागवण्यासाठी हा निसर्ग नक्कीच समर्थ आहे. पण याची चंगळवादाची हौस मात्र हा निसर्ग नाही पुरवू शकत.

आज आम्ही आंधळा विकास साधत आहोत. आणि यासाठी पर्यावरणाचा बळी दिला जातोय.
एखाद्या शेतकर्‍याची, त्याच्या आई-वडिलांनी रक्ताचा घाम करून मिळवलेली ,पिकावू शेतजमीन आम्ही विकासाच्या नावाखाली त्याच्याकडुन हिसकावून घेत आहोत. त्याच्या आई-वडिलांनी मुलाच्या मायेनी वाढवलेली झाडं तोडतो आहोत. त्या जमीनीवर आम्ही मोठमोठे कारखाने, कॉरपोरेट सेन्टर्स, उभारात आहोत. या बांधकामा साठी आणि कारखान्यासाठी आसपासच्या विहिरी, तलाव उपसत आहोत. आणि त्यामधील तथाकथीत सुशिक्षीत, उच्चभ्रू तंत्रज्ञांना filtered minerals water पाजत आहोत.
आमचं बांधकाम सुद्धा येथील वातावरणाला बिलकूल साजेसं नसणारं. आमच्या इमारतीच्या भिंती सुद्धा खिडक्या नसलेल्या, बाहेरून छान दिसणार्‍या अत्यंत पातळ अशा काचांपासून बनविलेल्या. त्या फार गरम होतात म्हणून आम्ही आतमध्ये वातानूकूलीत यंत्रणा बसवतो. इंग्रजांनी सुद्धा बांधकामं करताना येथील हवामानाला अनुकूल अशा, भरपुर खिडक्यांच्या हवेशीर इमारती बांधाल्या. आज हे स्वातंत्र्यापूर्व काळातलं तंत्रज्ञान म्हणून आम्ही वापरत नाही, कारण आम्ही आज विकसनशील देशातले आहोत!
या वातानुकूलीत यंत्रणांना फार वीज लागते. ती आम्ही उरल्या सुरल्या शेतकर्‍यांकडे भारनियमन करुन मिळवतो.
विकास करायचा म्हणजे हे सर्व आलंच अशी आम्ही सारवासारवही करतो.

पण आज आम्हाला मातीत हात घालायला लाज वाटते. तर झाडे लावणे दूर.
आम्ही विकसनशील देशातील सुशिक्षीत माणसं. झाडं, पानं, फुलं ह्या सर्व शेतकर्‍यांनी करायच्या गोष्टी. आम्ही का म्हणुन कराव्यात या गोष्टी? ज्याला त्रास होइल तो करील. वातावरणातील उष्णता वाढली तर आम्ही आमचा एअरकंडिशन वापरू! लोडशेडिंग असेल तर जनरेटर वापरू! हवेतील ऑक्सिजन का काय म्हणतात तो कमी झाला तर आम्ही ऑक्सिजनच्या नळकांड्या वापरून कामावर जाऊ.
पण झाडे लावण्याचं आणि पर्यावरणाचं आम्हाला सांगू नका. We don't have time to talk this nonsense !

(निसर्ग प्रेमी) रम्या

लेखनविषय: दुवे:

Comments

मी हे करतो...

कित्येक वर्षांपासून मी हे करतो.
१. बाहेर पडताना खरेदी करावयाची असल्यास स्वतःची पिशवी घेऊन बाहेर पडणे. (मला हातात पिशवी बाळगायची लाज वाटत नाही.) दुकानदाराला आवर्जून प्लॅस्टिकची पिशवी नको असे सांगणे
२. झाडे लावणे - माझ्या शेतात जिथे जिथे शक्य आहे तिथे आंबा, शेवगा, लिंबोरा अशी झाडे लावली आहेत
३. बागकाम करणे - माझ्या फ्लॅटच्या बाल्कनीत मी तीसएक कुंड्यांची बाग केली आहे. तिचा पर्यावरणाला किती उपयोग होतो ते मला माहिती नाही, पण बागकामात माझा वेळ झकास जातो. घरातला सगळा विघटनशील कचरा या कुंड्यांत टाकतो. भांडी विसळलेले, दाढीसाठी वापरलेले पाणीही या झाडांसाठी वापरतो. (गेल्या पावसाळ्यात एका रात्री या झाडांपैकी ब्रह्मकमळाच्या झाडांना पंधरा टपोरी शुभ्र अत्यंत सुगंधी फुलं आली!)
४. प्रत्येक कागदाच्या दोन्ही बाजू लिखाणासाठी वापरणे. मी जिथे काम करतो, त्या ठिकाणी ज्याला ज्याला पाठकोर्‍या कागदाची गरज पडेल त्याने ते माझ्याकडून घेऊन जावेत असे मी सर्वांना कळवले आहे.

दुसर्‍या बाजूला वहानाचा वापर कमी करणे, चालत, सायकलने किंवा सार्वजनिक वहानाने प्रवास करणे हे करणे मला जमलेले नाही (आणि भविष्यात जमेल असे वाटत नाही).
सन्जोप राव

काही बदल

"दुसर्‍या बाजूला वहानाचा वापर कमी करणे, चालत, सायकलने किंवा सार्वजनिक वहानाने प्रवास करणे हे करणे मला जमलेले नाही (आणि भविष्यात जमेल असे वाटत नाही)."

मलाही असेच वाटत होते. मी जेव्हा सुरुवातीला सार्वजनिक वाहनाने प्रवास करायला सुरुवात केली तेव्हा त्याला लागत असलेल्या वेळामुळे कंटाळा यायचा. त्यातही मी जेथे राहते तेथल्या थंडीचा मारा सहन व्हायचा नाही. शिवाय येथे कितीही कमी अंतर असले तरी थेट प्रवास करता येत नाही, दोनदा तरी वाहने बदलायला लागतात. तसेच गाडी पकडायला सकाळी लवकर उठून निघायला नको वाटायचे. पण नंतर लक्षात आले की मी एकटीच अशी नाही. अनेक जण बरोबर असतात आणि आनंदाने प्रवास करतात. तसेच मला त्या वेळाचा वापर पुस्तके वाचायला, लिहायला आणि गाणी ऐकायला, ध्वनिमुद्रित केलेले कार्यक्रम/गाणी ऐकायला करता येतो, तेव्हा त्यामागचा कंटाळा निघून गेला. तरी पूर्णपणे सार्वजनिक वाहनांवर अवलंबून राहणे शक्य होत नाही. पण आठवड्यातून निदान तीन दिवस तरी असा प्रवास मी करते आणि आता त्याचे काही वाटत नाही.

पण स्वतःचे वाहन घेऊन जात असलात तरी काही गोष्टी करू शकता - १/२ किंवा अधिक लोकांनी एकत्र प्रवास करणे. वाहन रस्त्याच्या कडेला कोणाची वाट बघत (जास्त वेळ) थांबवले (याला येथे "आयडलिंग") म्हणतात. तर ते चालू न ठेवता ते बंद करणे - वाहनाची काळजी घेणे - फिल्टर्स आणि टायर्स नीट ठेवणे, इत्यादी.

चित्रा

पर्यावरण

मोहन पाठक
उत्तम. मी देखील अनेक् गोष्टी करतो.
कापडी पिशवी वापरतो. फळांच्या बिया मातीत् टकतो.कागद् फार जपुन वापरतो.

कळत नकळत दिशाभूल

मिलिंद,

आपण जे म्हणत आहात तो विचार म्हणून सांगत आहात की विचाराला चालना देयला म्हणून सांगत आहात, ते माहीत नाही पण खालील दोन उत्तरे द्यावीशी वाटली:

उदाहरणार्थ. प्लास्टीकची पिशवी विरुद्ध कापडी पिशवी. समजा तुम्ही रोजच्या वापरानंतर कापडाची पिशवी धूत असाल, तर त्या धुण्यासाठी वापरलेले पाणी, साबण ह्याचा पर्यावरणावर परिणाम ह्याविरुद्ध प्लास्टिकच्या पिशवीचा पर्यावरणावरील परिणाम. ह्यात कशाचा जास्त विपरीत परिणाम होतो, ह्याचा तुम्ही विचार केला आहे का? असल्यास काय निष्पन्न झाले ? नसल्यास का नाही ?

आपण जेंव्हा कापडी पिशवी धूतो, तेंव्हा होणारे पाणी हे नंतर सांडपाण्याच्या प्रतिक्रीयेतून जाते (वेस्टवॉटर ट्रिटमेंट मधून जाते). मग ते समुद्रात अथवा नदीत सोडले जाते. जिथे असे केले जात नाही तेथे मग आपण पाणी अंघोळीला अथवा शौचाला पण वापरणे आपल्या म्हणण्याप्रमाणे योग्य ठरणार नाही... प्लॅस्टीकच्या पिशव्या मात्र अनंत काळासाठी तशाच जमिनीत राहणार आहेत. त्यातली रसायने जमिनीवर आणि पाण्यावर आणि पिकांवर परीणाम करणार आहेत. तेंव्हा त्यांचा परीणाम हा गंभिर असतो.

पेट्रोल विरुद्ध इथेनॉल ह्याविषयी असेच. एक लिटर इथेनॉल मक्यापासून निर्माण करायला जितकी ऊर्जा खर्च होते, त्यापेक्षा कमी उर्जा एक लिटर पेट्रोल उपसण्यात खर्च होते. तरी देखील तथाकथित पर्यावरणतज्ञ इथेनॉलचा पुरस्कार करतात. का? विचार व्हावा.

आपला मुद्दा हा ग्राह्य केंव्हा आहे, जेंव्हा मका हा इथेनॉलकरायला म्हणून वापरला जातो तेंव्हा. पण इतर गोष्टी तयार होत असताना जेंव्हा इथेनॉल बायप्रॉड़क्ट् म्हणून् तयार् होतो तेंव्हा नाही. शिवाय भूगर्भातून पेट्रोल, गॅसोलीन आणि इतर पदार्थ काढताना, त्यांवर प्रोसेस करून त्या जगभर पाठवताना उर्जा काय कमी खर्च होते असे म्हणणे आहे का? शिवाय जिथे शक्य आहे तिथे "कार्बन ऑफसेटींग" केले तर गोळाबेरीज करून इथेनॉल योग्य ठरू शकते.

"कार्बन ऑफसेटींग"वर मी नंतर लिहीन..

- विकास

फॅ ! फॅ!

कॅलिफोर्नियात नेहमी ७० ते १०० च्यादरम्यान तपमान रहावे, वगैरे.

'फॅ' राहिला की काय?
(सेल्सियशी) तो

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

विजेचा वापर

विजेचा वापर गरजेपुरताच करून (प्रसंगी आपल्या गरजा कमी करून) आपण पर्यावरणाच्या रक्षणात हातभार लावू शकतो असे वाटते. विजेची निर्मिती, विशेषकरून विकसनशील आणि (आर्थिकदृष्ट्या) मागासलेल्या देशात, पर्यावरणाची बर्‍याचअंशी हानी करण्यास कारणीभूत आहे. शिवाय विजेची उपकरणे वापरताना वातावरणात कार्बन डाय ऑक्साइड सोडला जातो ते वेगळेच.
आपण पुढील गोष्टी करू शकतो,

  • गरज नसेल तेंव्हा दिवे, पंखे, वातानुकूलन, संगणक बंद करणे.
  • टिव्ही, सीडी प्लेअर नुसता दूरनियंत्रकाने बंद न करता पूर्णपणे बंद (स्विचऑफ) करणे. चार्जर सारखी उपकरणे (सॉकेटला जोडलेल्या अवस्थेत असतील आणि बटन सुरू असेल तर) प्रत्यक्ष वापरात नसतानाही वीज वापरत असतात.
  • संगणक बंद करणे शक्य नसल्यास गरज नसेल तेंव्हा मॉनिटर बंद करणे. इ.

विजेचा वापर कमी करण्याचे आर्थिक फायदे आहेतच.

विजेबद्दल

विजेच्या वापरा/बचतीपेक्षा विजेच्या निर्मिती प्रक्रियेचा पर्यावरण हानीत मोठा वाटा आहे असे वाटते. (जसे धरणामुळे होणारा वनजीवनाचा र्‍हास, औष्मिक उर्जेतील प्रदूषण, आण्विक उर्जेमागील प्रसारण इत्यादी.) शिवाय वातानुकूलक, शीतकपाटे विजेच्या वापरापेक्षा वायू-विशिष्टांच्या वापरामुळे पर्यावरणाला हानी पोहोचवतात. त्यामुळे अशांचा वापर पूर्ण बंद करणे किंवा पर्यायी तंत्रज्ञान शोधणे हे पर्याय उजवे वाटतात. अशा बचतीमुळे वीजनिर्मितीवरील ताण (हलक्या प्रमाणात का होईना) कमी होतो हे मात्र खरे, शिवाय आर्थिक फायदे अर्थात आहेतच.

अवांतर: महाराष्ट्रात वीजबचतीचे महात्म ओळखून ही जबाबदारी खुद्द शासनानेच समर्थपणे पेलली आहे.

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

मानसिकता बदलण्याची आवश्य़कता

थोडासा विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. बर्‍याच गोष्टी आपण गृहीत धरून चालतो. त्या खरोखरीच आवश्यक आहेत का? याचा विचार करायला हवा.
उदा. सर्किट रावांनी सुचविल्या प्रमाणे "कापडाची पिशवी धूत असाल, तर त्या धुण्यासाठी वापरलेले पाणी, साबण ह्याचा पर्यावरणावर परिणाम ह्याविरुद्ध प्लास्टिकच्या पिशवीचा पर्यावरणावरील परिणाम"
यामध्ये आपण गृहीत धरतो की, कापडाची पिशवी धुण्यासाठी रोज साबण वापरण्याची आवश्यकता आहे.
या वापरलेल्या साबणाचा पर्यावरणावर किती परिणाम होतो याचा विचार करण्यापेक्षा या ठिकाणी साबणाची खरोखरच गरज आहे का, याचा विचार आधी करायला हवा. (अर्थात यात मतभेद असू शकतात).
सांगायचा मुद्दा हाच की आपण अनावश्यक वापर टाळायला हवा.
नैसगिक जीवन शैली अंगीकारावी. उगाच टि.व्ही वर साबणाच्या जाहिराती येतात म्हणुन उठसूठ साबणाचा वापर टाळावा.
एकदा टि. व्हि. वर एका निसर्ग प्रेमी मुलीची मुलखत पाहिली. आता तिचं नाव आठवत नाही. पण ती सर्पमित्र (सर्पमैत्रिण?) म्हणुन तिची मुलाखत घेतली गेली होती. मुलाखतीच्या दरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना तिने हा मुद्दा उपस्थीत केला. तिने म्हणे साबण वापरायचे सोडून दिले होते! आणि यात अनैसर्गिक असे तिला काहीच वाटत नव्हते.
आमच्या सरांनी एकदा एक गोष्ट सुचवली. ते म्हणाले, आजकाल केसांच्या शॅम्पूंच्या खूप जाहिराती येतात. हे शॅम्पू पूर्वी 'हप्ते मे सिर्फ एक बार होते'!. आता ते 'ऱोजाना' झाले आहेत!
आमच्यामध्ये असा काय मोठा गुणसूत्रीय बदल झाला ज्या मूळे आमचे केसांना नेहमी शॅम्पू वापरण्याची गरज भसावी?
एखाद्या कंपनीने एखाद्या वस्तूचं उत्पादन करुन ते जाहिरातींच्या मार्फत आमच्या टाळक्यावर मारावं आणि आपण ते आधुनिकतेच्या नावाखाली कोणताही विचार न करता स्विकारावं!

खरंच

आम्ही एकदा गंमत म्हणून दूरदर्शनवर येणार्‍या जाहिरातीतली प्रत्येक उत्पादने वापरली तर किती खर्च येईल हे काढत होतो. झाडून सर्व उत्पादने वापरल्यास महिन्याचा खर्च ३-५ हजारत जातो निव्वळ सौंदर्य प्रसाधनांचाच. (दात घासले..फलाणी पेस्ट. मग अमूक साबण, ढमूक फेसवॅश, तमूक स्क्रब, तमूक शांपू, ढमूक कंडीशनर, अमका केसाचा गुंता काढणारा फवारा, तमके आंघोळीनंतर लावायचे द्रावण, फलाणे नखाचे क्रिम, तमके बॉडी लोशन, तमके हँड लोशन, ढमके पायांच्या भेगांचे क्रिम, अमके केशनाशक,तमके डोळ्याभोवती लावायचे क्रिम, अमके रात्र क्रिम इ.इ.इ.इ.......यादी लांबतच जाते.)

महत्वाचा प्रश्न/संकेतस्थळ

प्रस्ताव महत्वाचा आहे. वर सुचवलेले उपाय तर आहेतच (विजेची, पाण्याची, इतर साधनांची बचत), याचबरोबर जास्तीत जास्त लोकांना यातली गंभीरता पटवून देणे आत्यंतिक गरजेचे आहे. मी वर सुचवलेले (बचतीचे ) उपाय करतो. याशिवाय नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचा सदस्य आहे. फावल्या वेळात एखाद्या संस्थेसाठी काम करायचे मनात आहे.

महाजालावर फिरताना एक संकेतस्थळ सापडले. या संकेतस्थळाला रोज एकदा भेट दिली तर त्यावरचे प्रायोजक जंगले वाचवण्यासाठी एक ठराविक देणगी देतात. कृपया सर्व सदस्यांनी याला भेट द्यावी ही विनंती. संकेतस्थळ इथे आहे.

माझा अनुभव

रम्या यांच्या परळ - भायखळा सायकल फेरी प्रमाणेच माझा ही अनुभव आहे. अगदी आजही आपण हा अनुभव घेऊ शकता. पुर्व द्रुतगती मार्गावर चेंबुर कडुन मुलूंडच्या दिशेने येताना जसे तुम्ही घाटकोपर उड्डाणपुल सोडून विक्रोळीच्या दिशेने मार्गक्रमण करता, तेंव्हा तुंम्हाला लगेचच वातावरणात थोडा गारवा जाणवतो. याचे कारण महामार्गाला लागून असलेला खारफुटी (मॅनग्रोव्हज) चा सलग पट्टा होय. अगदी असाच अनुभव तुंम्ही आरे वसाहती मधील मार्गाने प्रवास करताना घेऊ शकता.

रम्या यांनी दुसऱ्या एका महत्वपुर्ण मुद्याकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणजे स्थानिक तसेच पशु पक्ष्यांना पुरक झाडे लावणे. प्रत्येक पक्षी कावळ्यां प्रमाणे उकीरड्यावरचे खाऊन जगू शकत नाही. मुंबई मधून तर वड पिंपळ जवळपास हद्दपारच झाला आहे. याचा परिणाम त्यावर अवलंबून असणाऱ्या पशू पक्ष्यांवर झाला आहे.
दिलिप कुलकर्णी यांचे "निसर्गायण" व "दैनंदिन पर्यावरण" ही पुस्तकं या संदर्भात मार्गदर्शक व प्रेरणा देणारी आहेत.
- जयेश

धन्यवाद

पुस्तकांचा संदर्भ दिल्याबद्दल धन्यवाद जयेश राव.

अशा विषयावरील लेखन वाचण्यात रस घेणारे अजुनही खुप आहेत. हे जाणुन फार बरं वाटलं आणि उत्साह सुद्धा वाढला.

रम्या

उपयुक्त माहिती

या दुव्यावर आपली कुठली उपकरणे उर्जेचा वापर किती सुयोग्यपणे करतात हे कळेल.जसे...

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

जागतिक पर्यावरण दिन

आज जागतिक पर्यावरण दिन आहे. यंदाच्या वर्षी मुख्य समारंभ नॉर्वेमध्ये आहे. वाढत्या तापमानामुळे होणार्‍या गंभीर परिणामांबद्दल राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक समितीने चेतावणी दिली आहे.

या पानावर अधिक माहिती आहे.

दासानसाथि पिन्ज्ररा

दास पलवनारि औशधे वापरने कमि करुन् पर्यावरनातिल् प्रदुशन कमि करन्यासथि मि लावलेला शोध पाहा . हा पिनजरा मि नेहमि वापरते . स्वस्त आनि घरातल्या वस्तुनपासुन् तयार करता येतो . याचा वापर आपन् खुप जनाननि केला तर उपयोग होउ शकेल .त्यासाथि या सन्केत स्थलाला भेत द्या .

http://www.instructables.com/id/MOSQUITO-KILLER-TRAP/

 
^ वर