उर्जेचा अपव्यय टाळा
तसा बरेच दिवस हा विचार मनात घोळत होता. पण सकाळमधली ही बातमी वाचली आणि म्हटलं उपक्रमावरची मंडळी काय म्हणतात पाहू.
शाळेत वगैरे शिकताना असं वाचलं होतं के आता पृथ्वीवर खनिजतेलाचे फक्त ५०-६० वर्षे पुरतील एवढे साठे शिल्लक आहेत. आणि मग बर्याच वृत्तपत्रांतून वगैरे वाचलेल्या बातम्या.
पेट्रोल, डिझेल, एल्. पी. जी, वीज सारख्या मौल्यवान संपत्तीची उधळपट्टी आजूबाजूला सर्रास चालू आहे. माझ्या मते
१. फोर्म्युला १ शर्यती आणि तत्सम. या गाड्यांचे मायलेज किती असा प्रश्न विचारला तर मी मूर्ख ठरेन. :-))
२. शक्य असताना सार्वजनिक परिवहन न वापरणे. घरी माणशी एक वाहन बाळगणे
३. निऑन, हॅलोजनचे दिवे असलेले मोठे जाहिरातफलक
४. दिवसरात्र चालणारे क्रिकेट सामने
.
.
.
अशा अनेक गोष्टींनी आपण आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेतोय. सगळ्या गोष्टींची किंमत पैशात केल्याने असा होत असावं.
एकंदरीत यावर उपाय म्हणजे मोठ्या प्रमाणावर जनजागृती आणि वैयक्तिक पातळीवर स्वतःला बदलवण्याची इच्छाशक्ती असू शकेल.
बोला काय म्हणता?
____
या चर्चेत कोणकोणत्या प्रकारे उर्जेचा र्हास होतोय आणि आपण तो कसा टाळू शकतो हे मुख्यत्वे अपेक्षित आहे. बाकी मैदान मोकळं आहे.
Comments
महत्वाचा विषय
हा विषय महत्वाचा आहे (माझ्या व्यक्तिगत जिव्हाळ्याचाही आहे) आणि आपण तो चालू केल्या बद्दल धन्यवाद. काही संवाद चालू करण्यापुरते मुद्दे:
उर्जा ही नुसती राष्ट्रीय साधनसंपत्ती नसून तीला संरक्षण मुल्य (स्ट्रॅटेजीक व्हॅल्यू) आहे हे मान्य असायला हवे. जे पाण्याच्या बाबतीत तेच उर्जेच्या बाबतीतही.
आज भारत ज्या एका (पाश्चात्यांच्या व्याख्येप्रमाणे आणि म्हणून मर्यादीत अर्थानेच, पण) विकसनशील ते विकसीत या प्रवासातील महत्वच्या टप्प्यावर आला आहे त्यात गाड्या आणि इतर उपकरणे ही गरजेप्रमाणेच स्टेतस सिंबॉल्सपण झाले आहेत. मला व्यक्तिगत ते पटत नसले तरी समजू शकतो, समाजवादाच्या नावाखाली सर्वांना वैभवप्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी सर्व दरीद्रीच कसे राहतील असा उलटा विचार केला गेला. परीणामी विशेष करून स्वातंत्र्यानंतरची ५० वर्षातील भूकेचा गेल्या १० वर्षात समाज वचपा काढतोय आणि श्रीमंतीच्या चुकीच्या व्याख्येत अडकतोय.
या चर्चेत कोणकोणत्या प्रकारे उर्जेचा र्हास होतोय आणि आपण तो कसा टाळू शकतो हे मुख्यत्वे अपेक्षित आहे.
उर्जेचा (इंधनाचा) अतिरीक्त र्हास मला वाटते आपल्या देशात विशेष करून फक्त खाजगी गाड्यांमुळेच होत असावा. महाराष्ट्राचे नशीब म्हणून आपल्याला असे राज्यकर्ते लाभले, ज्यांनी उर्जा (वीज) वाढवायला काही केलेच नाही! परीणामी एकंदरीतच जर तृटी असेल तर उधळणपट्टी होत असली तरी त्याला तुर्तास तरी मर्यादा आहेत असे वाटते. उर्जा बचतीची शिकवण आपल्या राज्यकर्त्यांनी समजालाचाशा प्रकारे दिली...
उर्जेचे व्यवस्थापन आणि भारताला योग्य असे उर्जा बचतीचे आणि उत्पादनाचे "स्टँडर्ड" ठरवणे महत्वाचे वाटते. अमेरिकेत उधळण खूप असली आणि हे सरकार काही पर्यावरण मित्र नसले तरी सरकारी इ पी ए या संस्थेकडून "एनर्जी स्टार" या प्रकारचा पद्धतशीर आणि चांगला प्रचार चालू आहे. आपण ते अवश्य पहा/चाळा. त्यातून बरेच कही शिकण्यासारखे आणि घेण्यासारखे आहे. याच्याशी जवळून संबंध आल्यामुळे, यावर अजून लिहू शकेन पण तुर्त इतकेच लिहून थांबतो.
आरती
डॉ.आनंद कर्व्यांच्या सदर कार्यक्रमाल मी उपस्थित होतो. त्यांच्या या संकेतस्थळावर भेट द्या. त्यांच्याशी कार्यक्रमानंतर गप्पा ही मारल्या. घनकचर्यापासून कोळसा बनवण्याचे साधे यंत्र विकसित केले आहे. उर्जेच्या क्षेत्रातही भरपूर पैसा मिळवण्याच्या संधींबाबत त्यांनी पारंपारिक कुंभारांना विकसित चूली बनवण्याचे प्रशिक्षण दिले आणि कुंभारांना पैसा मिळू लागला. आरती बायोगॅस, विवेकी शेगडि, इत्यादि उपकरणांचे प्रदर्शन होते. विशेष करुन ग्रामीण भागात ७० ते ७५ टक्के उर्जा ही चुलीवर खर्च होते. त्यात सुधारणा करुन गॅससारखी ज्योत आणली. कचरा ही संपत्ति आहे. भविष्यातील उर्जेचा साठा आहे. नोकरशहांच्या साम्राज्या मुळे ही चळवळ फोफावत नाही. कारण नोकरशहांचा पहिला प्रश्न असतो कि माझा यात काय फायदा?
प्रकाश घाटपांडे
गूडन्यूज इंडीया
गूडन्यूज इंडीयात यांच्याबद्दलच लिहून आले होते असे वाटते.
गूडन्यूज इंडीया ही वेबसाईट चांगल्या बातम्या देण्यासाठी तयार करण्यात आली होती. आता ती आहे पण बंद झाल्यात जमा. कारण अर्थातच "माणसाने कुत्र्याला चावले" ही "कुत्र्याने माणूस चावला" या पेक्षा जास्त चविष्ठ बातमी होते.
फायदेपटू
माझा यात काय फायदा?
इथंच तर घोडं अडतंय ना...
आरतीबद्दल आधीही ऐकलं होतं. अपारंपारीक उर्जा स्त्रोतांचा शोध आणि त्यांचा वापर करण्यासाठी सुलभ तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे.
अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.
हो, पण..
१. फोर्म्युला १ शर्यती आणि तत्सम. या गाड्यांचे मायलेज किती असा प्रश्न विचारला तर मी मूर्ख ठरेन. :-))
२. शक्य असताना सार्वजनिक परिवहन न वापरणे. घरी माणशी एक वाहन बाळगणे
३. निऑन, हॅलोजनचे दिवे असलेले मोठे जाहिरातफलक
४. दिवसरात्र चालणारे क्रिकेट सामने
हो पण या गोष्टी बंद करणं आपल्या हातात थोडंच आहे? कोण विचारतंय आपल्याला? :)
२. शक्य असताना सार्वजनिक परिवहन न वापरणे. घरी माणशी एक वाहन बाळगणे
कसं शक्य आहे? समजा एखाद्या घरी जर दोन - तीन कमावती, बाहेर जाणारी माणसं असतील तर ती मंडळी एकच वाहन कसं काय वापरणार? आणि सार्वजनिक परिवहनमध्ये बसायला किंवा धड उभं रहायलाही जागा मिळत नाही त्याचं काय? असं असतांना स्वतःचं वाहन घेणं जर शक्य असेल आणि इंधनाचा खर्च परवडत असेल तर कुणीही मनुष्य स्वतःचंच वाहन वापरणार ना?
३. निऑन, हॅलोजनचे दिवे असलेले मोठे जाहिरातफलक
४. दिवसरात्र चालणारे क्रिकेट सामने
वरील गोष्टींना आपल्या वैयक्तिक पातळीवर कधी आपण विरोध, निदर्शनं केली आहेत का ते सांगा पाहू अभिजितराव? :) तसं असेल तर पुढल्या वेळेस एखाद्या मोठ्या शॉपिंग मॉलच्या झगझगत्या निऑन साईन बोर्डाच्या विरोधात त्या शॉपिंग मॉलसमोर विरोध दर्शवायला किंवा निदर्शनं करायला मीही आपल्यासोबत निश्चित असेन याची खात्री बाळगा!
परंतु नुसतं इथे लिहून आणि त्यावर चर्चा करून फारसा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही. सामाजिक प्रश्नांवर बोलणं खूप सोप्पं आहे, पण स्वतः त्या विरोधात काही पाउलं उचलणं, वैयक्तिक पातळीवर त्याचा विरोध करणं खूप कठीण आहे असं मला वाटतं!
तात्या.
अन्वयार्थ
तात्याबा,
अभिजीत यांनी उदाहरणे देताना कदाचीत(काही करण्यासाठी म्हणून) जरा जास्तच मोठी दिली असे म्हणालात तर मान्य करीन. पण विहीर आहे तेंव्हा वाटेल तसे पाणी वापरा आणि ते संपल्यावर तहान लागली तर बस तसेच विहीर खणून पण काही उपयोग नाही असा प्रकार आहे.
या चर्चेतील मूळ मुद्दे काय असा विचार केला तर समजेलः
आता आपण म्हणालात त्याप्रमाणे वैयक्तीक पातळीवर काय करता येईल?
एक इंग्रजीत चांगले वाक्य आहे (अचूक लक्षात नाही आणि कोणाचे ते पण माहीत नाही): " हे जग तुम्हाला तुमच्या पुर्वजांनी दिलेली भेट नसून तुमच्या वंशजांसाठीची ठेव आहे".
आपण उल्लेखलेले वरील उद्गार(हो पण या गोष्टी बंद करणं आपल्या हातात थोडंच आहे? कोण विचारतंय आपल्याला? ...सामाजिक प्रश्नांवर बोलणं खूप सोप्पं आहे.. वगैरे) मी काही वर्षांपूर्वी कामानिमित्ताने अमेरिकेत ऐकलेले आहेत. बुशबाबा तर काय अजूनही डोळ्यावर झापड घालून बसला आहे. पण एकंदरीतच लोकांना हळू हळू समजू लागल्याचे जाणवते. स्वतःच्या कामात पर्यावरणीय काळजी घेणे हळू हळू वाढत आहे कारण ते करणे योग्य आहे हे समजतयं. त्याचे आर्थीक फायदेही समजू लागले आहेत.
मला बर्याचदा वाटते की ३०-६० सालातल्या अमेरिकेच्या सामाजीक जडण(बि)घडणीच्या टप्प्यातून आज भारत चालला आहे. पुढे सुधारूही, पण पुढच्याच्या ठेचा बघून आधीच सुधारले तर काय वाईट आहे का?
गमंत म्हणून हे पान पहा. त्यात आपल्या राहणीमानातून आपण किती पृथ्व्यांइतकी नैसर्गीक साधनसंपत्ती वापरतो ह्याचा अंदाज "कार्बन फूटप्रिंटद्वारे" काढला जातो. मॉडेल जरी अमेरीकेसाठी असले तरी थोडेफार आक्डे घालून (ऑईल युसेज सोडा कारण ते घर गरम करण्यासाठी असते) बरीच माहीती कळेल...
उदाहरणे
उदाहरणे जरा मोठी वाटत आहेत खरं. पण त्यामागे एवढी उधळपट्टी होत आहे आणि त्याचं कुणाला काहीच वाटत नाही ही भावना होती. तशी मागे चँपियन्स् ट्रॉफीच्या वेळी दिवसरात्र सामने घेण्यावरून टीका झाली होती.
अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.
काही अंशी सहमत
वरील गोष्टींना आपल्या वैयक्तिक पातळीवर कधी आपण विरोध, निदर्शनं केली आहेत का ते सांगा पाहू अभिजितराव? :) तसं असेल तर पुढल्या वेळेस एखाद्या मोठ्या शॉपिंग मॉलच्या झगझगत्या निऑन साईन बोर्डाच्या विरोधात त्या शॉपिंग मॉलसमोर विरोध दर्शवायला किंवा निदर्शनं करायला मीही आपल्यासोबत निश्चित असेन याची खात्री बाळगा!
परंतु नुसतं इथे लिहून आणि त्यावर चर्चा करून फारसा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही. सामाजिक प्रश्नांवर बोलणं खूप सोप्पं आहे, पण स्वतः त्या विरोधात काही पाउलं उचलणं, वैयक्तिक पातळीवर त्याचा विरोध करणं खूप कठीण आहे असं मला वाटतं!
कठिण आहे मान्य....अशक्य नक्कीच नाही... :-)
एकट्याने निषेध फलक घेऊन नक्कीच बसलो नाही कधी. पण काही जबाबदार्या सामुहिक असतात आणि काही वैयक्तिक. १०-१२ समविचारी टाळकी एकत्र आली की नक्क्कीच बीसीसीआयवर मोर्चा काढू दिवसरात्र सामने टाळा म्हणून.
या क्षेत्रात काम करणार्या एन्. जी. ओ. वगैरे असल्या तर त्यांच्या मार्फत काही करता येईल. माहितीच्या अधिकाराचा वापर करून सरकारी गाड्यांसाठी किती पेट्रोल डिझेल खर्च होते, किती नेत्यांनी वीज बिले थकित ठेवली आहेत वगैरे माहिती उजेडात आणता येईल.
वैयक्तिक दृष्ट्या विकास यांनी सांगितल्या प्रमाणे उर्जेची बचत करता येईल.
अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.
अनेक बाजू आहेत
माझे स्प्ष्ट मत असे आहे की या प्रश्नाला येवढीच बाजू नाही.
आर्थिक बाजू
आजच्या घडीला पाहिलेत तर उर्जा विभागातल्या महत्वाच्या इंधन या प्रकारावर कार कंपन्या व ऑईल कंपन्या यांचे नियंत्रण जाणवते.
ऑइल कंपन्यांचा नफ्याचा ताळेबंद सरळ सरळ किती जास्त इंधन खपवता आले याच्याशी निगडीत असणार. मग त्यासाठी कोणत्याही थराला जायला अमेरिकन, ब्रिटिश व डच कंपन्या तयार आहेत. त्यातही अमेरिकन शेअर होल्डर्स ना आपली कंपनी कसा का होईना नफा कमावणारी हवी आहे यात शंका नाही. (त्यावर सोशली रिस्पॉन्सिबल कंपनी हा मलमपट्टीचा एक भाग आहेच पण ते वेगळे ढोंग!) एन्रोनही दाभोळला गॅसवर विज बनवणार होती हे लक्षात घेतलेले बरे! मग जर इंधन खपलेच नाही तर नफा कसा होणार?
शिवाय कार कंपन्या कश्या चालणार? आजच्या घडीला या सगळ्यात अडकलेले भांडवल पाहता फक्त विजेवर चालणारी कारही यां कंपन्याना पोटशूळ देते! हाय्ड्रोजन विसरा. जोवर त्यात 'चांगला नफा कमीतकमी भांडवलात' येत नाही तोवर ते होणे नाही.
शिवाय पाश्चात्य जगात याचा 'फारसा' काही गम पस्तावाही दिसून येत नाही.
पर्याय
यावरच्या संशोधनात या कंपन्या पैसा गुंतवायला नाखुष असतात. (अनेकदा असे महत्वाचे आर्थिक परिणाम करणारे संशोधन दाबून टाकले जाते असेही ऐकले आहे.)
ब्राझिल पेट्रोल ऐवजी मोठ्या प्रमाणात ऊसा पासून येणारे अल्कोहोल व एथेनॉल इंधन म्हणून वापरतो त्यामुले अनेक युरोपिय व अमेरिकन कंपन्यांना पोटदुखीचा मोठा आजार उद्भवला होता असे म्हणतात. त्यामुळे तेथे अमेरिकन हस्तक्षेपाचा मोठा प्रयत्न आहे असे म्हणतात. त्यावर उपाय म्हणून अनेकदा इथेनॉलमुळे जास्त प्रदुषण होते वगैरे सारखे राळ उडवणारे मुद्दे बाहेर काढले जातात.
माध्यमे
आपली माध्यमे ही बरेचदा सरळसोट पणे जे अमेरिकन ते चांगले या विचार सरणीने चालतात. मग तेथे जे 'दिसते' ते इथे ही 'दिसावे' असे मानून तसेच प्रेक्षकांना दाखवतात. बोनडोक लोक ते स्विकारतात. पण सगळेच तसे नसतात.
पश्चिमेकडे या संदर्भात अल गोर ने मोठी मोहीम घेउन माध्यमांमध्ये थोडीफार ओरड केल्यावर, एक माहितीपट काढल्यावर काहीसे या संदर्भात बोलणे सुरु झाले असावे. पण बाकी आनंदच आहे. चार सिलिंडर्स चे गाडी हल्ली फालतू वाटते म्हणे. कमीत कमी सहा किंवा आठ लागतात. आमची गाडी किती इंधन खाते यावरच डामडौल ठरत असेल तर बोलायलाच नको!
आणी एफ १ शर्यतीत अनेक प्रकारचे हितसंबंध गुंतलेले असतात. ते बंद केले तर अनेक व्यवसाय बंद होतील. शिवाय प्रत्येक देश यातून आपला किती फायदा झाला हे मोजून पहातच असतो. (दर वेळी होतोच असे नाही!)
समाज
शिवाय इंधन सहजतेने नि 'स्वस्तात मिळणे' हाही एक माज करण्यामागचा भाग असतोच ना? आज सामान्य अमेरिकन लोकांना त्यांच्या अकलेपेक्षा जास्त पैसे मिळतात मग ते असे आठ आठ सिलिंडर्स् मध्ये जाळण्याशिवाय काय पर्याय आहे बरं?
आज मला गाडी आहे ना? मग आत नवी नि मोठी कशी घेता येईल हे पाहू... शिवाय त्याला ए सी नको बॉ! वेदर कंट्रोल हवा बर का! पर्यावरण?? ते काय असते बॉ? गाडीत तर मस्त गार असते आमच्या! ओहो! ते.... ते... तो प्रॉब्लेम त्या इंडिया चायना सारख्या देशात आहे हो... इकडे नाही काही...! नो नो!! इट्स नॉट हियर हं बाबा!
हे भारतात घडत नाही असे म्हणणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात राहणे होईल. पण तरीही एकुणच या विषयी भारतातच चांगल्यापैकी जनजागृती आहे असे म्हणायला हरकत नाही असे वाटते.
आपला
इंधनपंत
सहमत
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
भारतात अजून स्वातंत्र्य उपभोगणारी ४-५ वीच पिढी आहे ना.(१५ वर्षाला पिढी बदलते असं कुठंतरी वाचलं होतं) हळू हळू इकडेही आठ-आठ सिलिंडर जाळतीलच की.
घरगुती गॅस व्यावसायिक कारणासाठी वापरणे, चारचाकी गाड्या, रिक्षा घरगुती गॅस सिलिंडरवर चालवणे असे प्रकार तरी चर्चा किंवा योग्य प्रचारातून आणि कडक शिक्षा उपाययोजना करून टाळता येतिल.
अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.
गाड्या
पुण्यात फिरत असताना आलेले अनुभवः
तरूण पिढीचे (विशेषत: १८-४० वयोगटातील) निरीक्षण केले ते असे:
बर्याच जणांकडे घरात निदान दोन स्कूटर व एक गाडी आहे ( हे निरीक्षण , नंबर्स नाहीत). सतरा-अठरा वर्षाची मुले महाविद्यालयांत जाताना स्कूटर घेउनच जातात. बसची सोय नाही, आणि कमावत्या, उच्च /मध्यमवर्गीय घरांतील मुले बससाठी थांबत नाहीत. नवरा-बायकोंमध्ये वेळेचे नियोजन करून एकाच गाडीने जाण्याची पद्धत दिसत नाही. भाजी बाजार जरी दोन रस्ते ओलांडून पलिकडे असला तरी स्कूटर घेऊन जाणार, शिवाय मुलांना क्लास वगैरेला घातलेले असते, ते क्लास जवळ असले तरी त्यांना स्कूटरवर मागे बसवून (हेल्मेटशिवाय ) नेणार आणणार. शिवाय मित्रमैत्रिणींकडे जाता येताना चक्कर मारण्यासाठीही एकाच वेळी जायची पद्धत नाही, दिवसाकाठी अश्या दोन तरी फेर्या होतातच. उपहारगृहात जायची पद्धतही खूप आहे, (मुंबईच्या मानाने जास्त वाटली) त्यासाठीही गाडीच्या चकरा होतातच. याला अपवाद नाहीत असे नसेल, पण जे पाहिले ते असे वाटले. ही प्रवृत्ती घातक वाटली. पण मुलांना लाखो रुपयांच्या गाड्या घेऊन देणारे, त्यांच्या अनिर्बंध वापरावर कसलाही नियम न बसवणारे पालक पाहिले की आश्चर्य वाटते. नाका तोंडाला, केसांवरून रंगीबेरंगी फडकी गुंडाळून जाणार्या मुली पाहिल्या की पर्यावरणाचा प्रश्न या इंधनाच्या बेदरकार वापरामुळे किती त्रासदायक होणार आहे याची कल्पना येते. पण आता त्याचे मला काय ही मनोवृत्तीच अधिक प्रमाणात दिसते.
गाड्यांचे कारण
पुण्यामध्ये बससेवा नाही असे म्हटले तरी चालेल. तुम्हाला बस "कधीही" वेळेवर मिळणार नाही. रिक्षावाले अतिशय मुजोर आहेत. आपल्याला जिथे जायचे आहे. तिथे ते कधीही येणार नाहीत. त्यामुळे गाडीवर जाण्याशिवाय पर्याय नाही.
हे कारण नाही
आमच्याकडे बससेवा नाहीच. रिक्षा, टॅक्सी आणि इतर कोणतीही सार्वजनिक वाहतूकीची साधने नाहीत. कोणत्याही फुटकळ कामासाठी बाहेर पडायचे झाल्यास मैलोन् मैल जावे लागते. हवा ही अशी नाही की तुम्ही चालत एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकता परंतु पोलिसी यंत्रणा, लोकांची विवेकबुद्धी इ. जागृत आहे. आम्हालाही गाडीशिवाय पर्याय नाही, प्रत्येक कुटुंबाकडे २-३ गाड्या असतातच परंतु सिग्नल तोडणे, हेल्मेटशिवाय जाणे, बेदरकार चालवणे हे होत नाही.
इंधनाची किंमत वाढलेली आहेच सध्या त्यामुळे ते कसे वाचवावे याचे पर्याय सतत टिव्हीवर किंवा रेडिओवर सांगितले जातात. लोक ते पाळण्याचा आटोकाट प्रयत्नही करतात.
तेव्हा खरे कारण असे आहे की "सामान्य माणसाला आपण करत असलेल्या अपव्ययाची जाणीव नाही. अमेरिकेतही ती आहेच असा दावा नाही पण तशी जाणीव होत नसेल तर ती सतत करून देणे हे विवेकी नागरीकांचे/ सरकारचे कर्तव्य आहे."
अवांतरः वर चित्राताईंनी म्हटले आहे की मुलांना एवढ्या महागाच्या गाड्या घेऊन देतात, यावर एक किस्सा आठवला की आमच्या ओळखीच्या एका कुटुंबातील महाविद्यालयीन मुलाला गाडीची गरज होती ये-जा करण्याकरता. आईवडिलांना त्याला नेणे आणणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी त्याला एक अतिशय डब्बा गाडी खरेदी करून दिली आणि कारण हे सांगितलं की "ही गाडी घेऊन तू घर आणि शाळा इतकाच प्रवास करू शकतोस. फार फिरवलीस तर ती बंद पडेल हे ध्यानात असू दे." सहज आठवले.
मान्य परंतु...
पुण्यात गाड्या घेण्याचे कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव हेच आहे. माहितीतल्या ९० टक्के लोकांनी अतिआवश्यक गरज म्हणूनच गाडी घेतली आहे.
एक उदा देतो. चिंचवड स्टेशन ते चाफेकर चौक हे २.४ किमीचे अंतर चालत जाणे सर्वांनाच नेहमी शक्य होत नाही. विशेषतः पावसाळ्यात व उन्हाळ्यात. मात्र चिंचवड स्टेशन चौकात कधीही पीएमटी-पीसीएमटी थांबत नाही. या एवढ्याश्या अंतरासाठी रिक्षावाले कमीत कमी ६० रुपये मागतात. त्यामुळे एक तर लिफ्ट मागणे. किंवा स्वतःची गाडी असणे हे दोनच पर्याय राहतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चिंचवड स्टेशन परिसर हा जुन्या मुंबई पुणे महामार्गावर आहे व बस वर्दळ सर्वात जास्त आहे.
तुलनेने लांब व नव्याने विकसित होणार्या परिसरात तर बसवाले अजून पोचलेलेही नाहीत.
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक कार्यक्षम आहे. बेस्ट व लोकल रेल्वे यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत वैयक्तिक मालकीच्या गाड्या कमी आहेत असे वाटते. तशी व्यवस्था विकसित केल्यास पुण्यातही गाड्यांची संख्या कमी होईल.
बेदरकार चालवणे व सिग्नल तोडणे हे अधिक वेगळे प्रश्न आहेत. त्यांचे समर्थन करण्याचा हेतू नाही.
हम्म्!
हे खरे आहे आणि वाहतूक अधिक शिस्तशीर आहे. मला स्वतःला पुण्यात प्रवास करणे नको वाटते, विशेषतः वळणावर वळणारे रिक्षा पाहिले की हृदयविकाराचा सौम्य झटका येतो की काय असे नेहमी वाटते. - ह. घ्या.
हे समीकरण आताशा बदलू लागले आहे. पूर्वी घरात फोन असणे हे स्टेटसचे (मराठी शब्द?) लक्षण होते, नंतर गाडी असणे हे होते. आज एकापेक्षा अधिक गाड्या त्याही SUV की व्हॅन आणि लेटेस्ट डिझाईनच्या इ. असणे हे "स्टेटस"चे लक्षण आहे. खुद्द माझ्या इमारतीत सांगायचे झाले तर २५ कुटुंबे राहतात आणि दुचाकी चारचाकी वाहने ४० पेक्षा जास्त आहेत. ईमारतीच्या ज्या मोकळ्या जागेत आम्ही खेळायचो तेथे आज त्या गाड्या ठेवायलाही जागा नाही ही वस्तुस्थिती आहे.
हल्ली भारतातील लहान मुले वय ३ ते ९ इ. कोठे खेळतात असा प्रश्न नेहमी पडतो.
सकाळच्या अग्रलेखातून
१४ ऑगस्ट रोजी सकाळमध्ये आलेला संतुलित अग्रलेख.
वाहनकर - न पटणारे उत्तर
सर्वाधिक दुचाकी वाहनांचे शहर अशी बिरुदावली मिरविणाऱ्या पुण्यातील वाहनांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जुन्या आणि नव्या वाहनांवर कर आकारण्याचा प्रस्ताव गैरलागू आणि अव्यवहार्य आहे. २००७ या वर्षातील पुण्याची लोकसंख्या ३० लाखापेक्षा अधिक आहे. २०११ पर्यंत ती ४० लाख होईल, असा अंदाज आहे. शिक्षणाचे माहेरघर आणि उद्योगनगरी असलेल्या या शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मात्र अत्यंत अकार्यक्षम आणि बेभरवशाची आहे. जो नागरिक नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी पोचण्यासाठी दुचाकी खरेदी करण्यास जातो, त्यास करापोटी आणखी हजार रुपये रक्कम भरावी लागल्यास तो वाहन खरेदीच करणार नाही असे समजणे, ही फसवणूक ठरावी. या वाहनकरामुळे आधीच कराचे सर्वाधिक प्रमाण असणाऱ्या पुणेकरांना आणखी महागाईला सामोरे जावे लागेल. वाहनकर आकारण्याचा हेतू वाहनांची संख्या कमी करणे हा आहे. परदेशात खासगी वाहन घेणे अशा स्वरूपाच्या करामुळे सामान्य माणसाला परवडतच नाही. मात्र त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक अतिशय उत्तम दर्जाची आहे. बीआरटीसारखा प्रयोग हडपसर आणि सातारा रस्त्यावर राबविला जातो आहे; मात्र त्या बस खरेदी करण्यासाठी पैसा लागतो. प्रायोगिक तत्त्वावरील ही योजना यशस्वी झाल्यानंतर तिचे सार्वत्रिकीकरण होण्यासाठी निधीची आवश्यकता भासणार आहे. तो केंद्र आणि राज्य सरकारने उपलब्ध करून द्यायला हवा. बंगळूर, नवी दिल्लीत तसा निधी सरकारने दिला, त्याचे परिणाम मेट्रोसारख्या सेवेमुळे दिसत आहेत. पीएमटी आणि पीसीएमटीच्या विलीनीकरणात राजकीय अडथळे किती आले, हे सर्वज्ञात आहे. तसेच अडथळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यात (वर्षानुवर्षे?) येत आहेत असे दिसते. सिंहगड रस्त्याचेच उदाहरण द्यायचे झाल्यास सहा आसनी रिक्षांना विरोध झाला. आता त्याच रस्त्यावर खासगी बस धावणार आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही अनुदानाशिवाय फायद्यात चालविणे अवघड आहे. दहा लाख रुपयांची मोटार खरेदी करणाऱ्याला आणि पन्नास प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बससेवेला एकाच दराने डिझेल खरेदी करावे लागते. ही विसंगती दूर करायला हवी. मुळात डिझेलसारखे इंधन केंद्र सरकार अनुदान देत असल्याने परवडते. या अनुदानाचा हेतू या विसंगतीने नष्ट होतो. त्यासाठी मोटारी वापरणाऱ्यांवर शहरांतर्गत वापरासाठी जादा अधिभार आकारणे सयुक्तिक ठरेल. दुचाकीला हा निकष लावणे योग्य नाही; कारण ती घेणारा चैनीसाठी घेत नाही. सम- विषम तारखेला वैयक्तिक वाहनांऐवजी बसचा वापर करणे, आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरणे अशा पूरक उपायांनी वाहनसंख्या कमी होऊ शकते. त्यासाठी सामाजिक संस्था, पोलिस, गणेश मंडळे, महापालिका यांनी जागृती निर्माण केल्यास त्याचे स्वागतच होईल. सार्वजनिक संस्था आणि सरकारी यंत्रणेचे अपयश झाकण्यासाठी कर वाढविण्यासारखे सोपे मार्ग अनुसरण्याची लागण आता तरी थांबविली पाहिजे
म्हणून
रोज संध्याकाळी एक तास मुलांना ह्या ग्राउंडवर सोडून (महिना ५०० रुपये, प्रति मूल) आया कट्ट्यावर बसून सासूची निंदा वगैरे सांस्कृतीक कार्यक्रम करतात.
म्हणून त्याला "ग्राउंड रीऍलीटी" म्हणत असावेत!
सदरहू वर्णनाचे ग्राउंड
पाहिले आहे, पण पावसाळ्यात हा प्रकार जास्त होत असावा असे वाटते. एरवी मुली-मुले खाली खेळताना दिसली. माझ्या लहानपणी हा प्रश्न माझ्या आईवडिलांना सुदैवाने नव्हता, पण मुंबईत मोकळ्या जागा तेव्हाही कमीच होत्या.
उदाहरण
योग्य आहे, पण २.४ किमी साठी ३-४ जणांनी एकत्र वाहन करणे (शेअर ) हा पर्याय असू शकतो. परंतु तसे पर्याय (कदाचित मध्यमवर्गीयांना ज्यांना गाड्या परवडतात त्यांची संख्या चिंचवडला वाढत असल्याने असेल) उपलब्ध होत नसावेत. तरी तुमच्या स्वतःच्या गाड्या असल्या तरी वर दिल्याप्रमाणे वाहनांचा अतिरिक्त वापर टाळता येऊ शकतो, पण ते टाळण्याचा विचार झालेला दिसत नाही हे मान्य कराल का? निदान माझ्या पहाण्यात ही संख्या नगण्य आढळून आली.
पुण्यातले रिक्षावाले - २ (तत्वज्ञ रिक्षावाला)
काळः १९९९
स्थळः डेक्कन आणि कोथरूड दरम्यान कोठेतरी, भरधाव निघालेल्या रिक्षात.
मी: अहो, जरा हळू चालवा. बरोबर लहान मूल आणि वृद्ध आहेत.
तो: हळू गेलं की जग आपल्यापुढे निघून जातं.
मी: हो पण आम्ही इथे सुट्टीसाठी आलोय, आम्हाला घाई नाही आणि ऍक्सिडेंटही करून घ्यायचा नाही.
तो: अहो ताई, इतकं काय घाबरायचं? एक दिवस सर्वांनाच मरायचं आहे ना!
मी: हो रे! पण तुझ्या रिक्षात कशाला मरू?
तो खजील-बिजील काही नाही. हाहाहा!! हसला आणि रिक्षा आणखीच भरधाव. मी मनातल्यामनात डोक्याला हात लावला.
आजानुकर्णोक्ती
दै.सकाळ चा अग्रलेख उधृत केल्या बद्दल धन्यवाद, पण त्यावर काही अजानुकर्णोक्ती झाली नाही. पण लेखात सुचवलेले उपाय हे प्रगल्भ लोकशाहीतील आहे असे मी म्हटले तर ती दर्पोक्ती ठरू नये.
प्रकाश घाटपांडे