सिल्व्हियाच्या नजरेतून भारत

सिल्विया मूळची जेनोव्हा, इटलीमधली. पदार्थविज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ती बोलोन्यामध्ये संपादिका म्हणून काम करते आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे भारत आणि भारतीय संस्कृतीबद्दल तिला वाटणारे प्रेम, जिव्हाळा. ती तीनदा भारतात येऊन गेली आहे आणि पुस्तके, चित्रपट यांच्याद्वारे भारतीय संस्कृतीला हर प्रकारे समाजावून घेण्याचा तिचा नेहेमी प्रयत्न असतो. तिने वाचलेल्या भारतीय लेखकांची यादी पाहून मी थक्क झालो. हे वाचणे तर सोडाच, यातल्या बर्‍याचशा लेखकांची नावेही मला ठाउक नव्हती.

२००७ च्या उन्हाळ्याच्या सुट्टीत सिल्हिया मुंबईत आली. पण ही भेट पर्यटनासाठी नव्हती. आकांक्षा ही संस्था मुलांना शिक्षण, कौशल्ये (स्किल्स) आणि करियर यांच्या संदर्भात शक्य ती मदत देण्याच्या हेतूने कार्यरत आहे. या संस्थेतर्फे सिल्विया महिनाभरासाठी झोपडपट्टीतील मुलांना शिकवण्यासाठी भारतात आली होती. या महिन्याभरातील अनुभव तिने तिच्या दुसर्‍या अनुदिनीत नोंदवले आहेत. हे अनुभव अत्यंत ऋद्य आहेत. वाचताना कुठेतरी मनाला स्पर्श करून जातात.

सिल्व्हियाचे काम, तिला भारत आणि भारतीय संस्कृतीबद्दल वाटणरा जिव्हाळा हे सर्व पाहून तिची ओळख अधिक लोकांना व्हावी असे वाटले. यासाठी तिची एक छोटीशी मुलाखत घेतली.

मी : तुला भारतात येण्याची कल्पना कशी सुचली? आणि तू किती वेळा येऊन गेली आहेस?

सिल्व्हिया : २००२ साली सलमान रश्दी यांचे मिडनाइट्स चिल्ड्रेन वाचताना माझी भारताशी पहिली ओळख झाली. पुस्तक वाचताना मला जाणवले की भारत हा एक वेगळा देश आहे. मला भारताबद्दल, तिथल्या लोकांबद्दल आणि संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची इच्छा झाली. मी भारताबद्दलची दुसरी कादंबरी वाचत असताना (अरूंधती रॉय यांची गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज) मला केरळमधील एका माणसाकडून इटालियन साहित्याबद्दल विचारणा करणारी एक मेल आली. (योगायोगाने ही कादंबरीही केरळमध्येच घडते.) आमची चांगली मैत्री झाली, त्याने मला मलयालम साहित्यावर बरीच पुस्तके पाठवली. (मला ती फारच आवडली.) मग मी भारतात जाऊन त्याला भेटण्याचा निर्णय घेतला. आधी मी राजस्थानला गेले आणि नंतर केरळमध्ये जाऊन त्याच्या कुटुंबाबरोबर काही काळ घालवला. (हा अनुभव फारच स्मरणीय होता.) माझ्या दुसर्‍या भारतभेटीत मी लदाखला गेले. आणि तिसर्‍या वेळी मी मुंबईत मुलांबरोबर काम केले.

मी : भारतात आल्यावर तुझी पहिली प्रतिमा काय होती? आणि त्यात बदल झाला आहे का?

सिल्व्हिया : माझी भारताची सर्वात पहिली प्रतिमा मी पहाटे चार वाजता दिल्लीला आले आणि जयपूरची ट्रेन पकडण्यासाठी गेले त्यावेळची आहे. त्यावेळी दिल्ली स्टेशनच्या जमिनीवर इतके लोक झोपलेले होते की मला त्यांच्यामधून वाट काढणे अवघड झाले. हे थोडे धक्कादायक वाटले. सुरूवातीचे काही दिवस मला थोडे भरकटल्यासारखे झाले. पण इथल्या लोकांच्या स्नेहभाव आणि मैत्रीपूर्ण वागणुकीमुळे मी काही दिवसातच इथे रूळून गेले. जसजशी मला भारत आणि भारतीय लोकांबद्दल अधिकाधिक माहिती होते आहे तसतसे माझी भारताबद्दलची प्रतिमा बदलते आहे. आमच्या संस्कृती आणि भारतीय संस्कृती आणि समाज यात बराच फरक आहे पण तरीही संस्कृतीची बंधने ओलांडून माणसाच्या भावना किती सारख्या असतात हे पाहून आश्चर्य वाटते.

मी : तुझ्या मुंबईतील मुलांबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल काही सांग ना.

सिल्व्हिया : माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभवांपैकी तो एक होता. मी निरनिराळ्या झोपड्पट्ट्यांमधील मुलांना गणित आणि इंग्रजी शिकवत होते. हे काम आकांक्षा या संस्थेच्या अंतर्गत होते. आकांक्षा मुलांना शिक्षणाबाबत मदत करण्यासाठी खूपच प्रयत्नशील आहे. आणि या सर्वांहूनही महत्त्वाचा होता तो या मुलांशी झालेला संपर्क. मी त्यांना जे शिकवले त्यापेक्षा कैक पटींनी या चिमुरड्यांनी मला शिकवले. मला सर्वात आश्चर्याची गोष्ट ही वाटली की इतक्या गरीबीच्या वातावरणात असतानाही ही मुले किती आशादायी होती, द्यायला किती तत्पर होती. परत येताना माझ्या मनात एकच शब्द होता : माणुसकी.

सिल्व्हिया उत्तम लेखिकाही आहे. मागच्या महिन्यात फ्लोरेन्स इथे रिव्हर टू रिव्हर हा भारतीय चित्रपटांचा महोत्सव झाला. याबद्दलचा सिल्व्हियाचा अनुभव खालील अनुवादित परिच्छेदात. मूळ इटालियन परिच्छेद इथे.

रिव्हर टू रिव्हर मधून परत येताना

शनिवारी सकाळी फ्लोरेन्सला जायला निघाले. ट्रेन बर्‍याच उशिरा आली. माझ्या हातात इंतरनाझ्झिओनाले चा ताजा अंक होता. पहिल्याच पानावर मुंबईच्या हल्ल्यांची बातमी होती. लेख अस्वस्थ करणारे होते. भारत-पाक युद्ध, सध्याच्या स्फोटक परिथितीमध्ये एका देशाच्या हृदयाला झालेली जखम आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी हिंसेचा मार्ग वापरला जाण्याची शक्यता या सर्वांवर लेखांमध्ये चर्चा होत होती. पण रविवारी संध्याकाळी त्याच ट्रेनमधून परत येताना मनावरचे ओझे थोडे हलके झाल्यासारखे वाटत होते. याची कारणे होती रिव्हर टू रिव्हर ह्या फ्लोरेन्समधील भारतीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट (ज्यांनी मला काही काळासाठी का होईना, भारतात परत नेले होते) आणि जोडीला मित्र-मैत्रिणींची सुंदर साथ.

एका भारतीय रेस्तरॉमध्ये आम्ही दहा जण जमलो होतो. आमची ही पहिलीच भेट. आमच्या भेटीमध्ये एकच समान धागा होता आणि तो म्हणजे भारत. आंतरजालावरचे दुवे, अनुदिन्या, शोधयंत्रे, फोरम, फेसबुक आणि यासारखी इतर संकेतस्थळे (यातील बरीचशी भारतीय संगणक तंत्रज्ञांनीच बनवलेली असणार) या सर्वांच्या सहाय्याने आम्ही भौगोलिकरीत्या दूर असलो तरी एकत्र येण्यात यशस्वी झालो होतो. यातले कुणी बरेचदा भारतात जाऊन आले होते आणि त्यांनी बरेचसे भारतीय चित्रपट पाहिलेले होते. कुणी भारतात कधीच गेले नव्हते मात्र जुन्या बॉलिवूड चित्रपटांपासून ते आत्ताच्या नवीन तमिळ चित्रपटांपर्यंत सर्वांची त्यांना इत्थंभूत माहिती होती. कुणी भारतात मोठ्या प्रोजेक्टवर जाण्याच्या तयारीत होते पण विलंब कशामुळे होतो आहे याबाबत अंधारात होते. कुणी आर्ट फिल्मचे शौकीन होते तर कुणाचे बॉलिवूड हाच खरा भारतीय चित्रपट आहे असे ठाम मत होते. कुणाला भारतात जाऊन झणझणीत करी आणि इतर मसालेदार पदार्थ खाणे ही कल्पनाच अशक्य वाटत होती. (त्यांचे मत बदलण्यात आम्ही यशस्वी झालो अशी आम्हाला आशा आहे.) कुणी भारतयात्रेत चौकस आणि बुद्धीमान दृष्टीकोन ठेवून पुस्तके, चित्रपट यांच्या पलिकडे असणारा भारत शोधण्याचा प्रयत्न केला होता. आणि कुणी नॉस्टाल्जिक झाल्यानंतर भारत पुस्तकांमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला होता पण का कुणास ठाउक, चित्रपटांकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केले होते. (हो, ही मी होते.)

आणि यापलिकडे होती आशा. बघितलेले सर्व भारतीय चित्रपट हेच सुचवीत होते : गरीब विद्यार्थ्यांना आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी तयार करणारा गणिताचा प्राध्यापक, पैशामुळे आनंद मिळत नसतो हे शिकवणारा दिल्लीतील ऑटोरिक्षा चालक, समाजाने धिक्कारलेला, पण नंतर समाजात परत येणारा एक भटका, धर्मांधतेच्या वातावरणातही स्वतःवर संतुलन राखणारे, हे सर्व.

काही दिवसांपूर्वी मुंबईत जे घडले त्यासाठी मला शब्द सुचत नव्हते. आज एक सुचतो आहे, कदाचित याचा काही संबंध नसेलही, पण निदान शब्द तर आहे. आशा.

Comments

चांगला अनुभव

बाहेरच्यांच्या नजरेतून आपण कसे दिसतो हे वाचायची उत्सुकता असते. अर्थात अनेकदा भ्रमनिरासही होतो. मात्र लेखिकेने चांगले मत व्यक्त केले आहे असे दिसते
(लेखिकेने उल्लेखलेली रश्दी आणि रॉय यांची पुस्तके मला फारशी आवडली नसली तरी (त्यातल्या त्यात रॉयचे अगदीच नाही) मुलाखतीचा प्रकार आवडला.)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

दुरूस्ती

हे अनुभव अत्यंत ऋद्य आहेत या वाक्यात हृद्य असे हवे. आणखीही एक-दोन छोट्या चुका राहून गेल्या. क्षमस्व.

----
"This is Linus Torvalds. I announce Linux."
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

हृद्य

हृद्य अनुभव ! शुद्धलेखनाची बाब ही केवळ तांत्रिक आहे. इतरांच्या नजरेतुन भारत पहाताना सुद्धा एक विविधता असते. ती अनुभवाला आली.धन्यवाद राजेंद्र.
प्रकाश घाटपांडे

सार्थकी..

सकाळी सकाळी उपक्रम उघडलं आणि हा मस्त लेख वाचायला मिळाला. दिवस छान जाणार असं दिसतं!
दुर्दैवाने सिल्व्हियाची अनुदिनी इटालियन (की फ्रेंच?) मध्ये असल्याने काहीच वाचता आले नाही.
त्या यादीतल्या बर्‍याच लेखकांची नावंही माहित नाहीत मग वाचणं तर दूरच : सहमत!

(सध्या 'ट्रेन टू पाकिस्तान' वाचत असलेला) सौरभ

==================

स्त्रीबद्दल आपल्याला धास्ती वाटते. कारण एकतर कोणत्याही स्त्रीला पुरुषाकडे खाऊ की गिळू असं रोखू़न पाहता येतं.

गूगल

दुर्दैवाने सिल्व्हियाची अनुदिनी इटालियन (की फ्रेंच?) मध्ये असल्याने काहीच वाचता आले नाही.

गूगलचा उपयोग होतो का पाहा.

फार छान

फार छान आणि प्रेरक माहिती.
छान मुलाखत, आवडली.

आकांक्षा विषयी ही अजून येवू द्यायला हवे होते का?

आपला
गुंडोपंत

आवडले

लेख व दुवे वाचायला आवडले.

सिल्वियाताईंची ओळख आवडली.

धन्यु राजेंद्र.

छान

लेख कालच वाचला होता. पण प्रतिक्रिया देणे राहुन गेले.
अभारतीयांच्या नजरेतुन भारत समजुन घेणे हि माझी आवडती गोष्ट आहे. खास करुन ज्यांना भारताबद्दल आपुलकी आहे अशा लोकांकडून. बाकी आपुलकी नसलेल्यांकडून तेच तेच अनुभव येत असतात.
नोकरीच्या निमित्ताने काही अमेरिकन जे भारतात आले होते आणि काही युरोप मधल्या भारतप्रेमींकडून अनेक मजेशीर, आनंददायक अनुभव आले आहेत. त्यातला एकजण असा आहे जो स्वतः अमेरिकेत भारतीय पद्धतीचे जेवण स्वतः बनवुन खातो. सिल्विया प्रमाणे सुद्धा अनेकजण भेटले ज्यांना भारताच्या गरिबीकडेच न पाहता इथे असलेल्या जीवनाशी समरस व्हायला आवडते. मला सर्वात सुखद बसलेला धक्का म्हणजे के के ट्रॅव्हल्स मधुन येताना आंग्ल भाषेत माझ्या सोबत गप्पा मारणार्‍या जर्मन काकूंनी पुणे विद्यापीठ आल्यावर चालकाला चक्का मराठीत, ते ही व्याकरणामध्ये कोणतीही चुक न करता सांगितले की "गाडी चौकात थांबवा. मी येथुन रिक्षा ने जाणार आहे."
जर्मनीमध्येच माझ्या साहेबाने मला विचारले होते की तुमच्याकडे काही शेतकर्‍यांकडे मर्सडिजच्या गाड्या असतात असे ऐकले आहे. हे खरे आहे का? त्याला हे खरे आहे हे सांगताना, मी त्याला भारताच्या शेती, सहकार, साखरसम्राट आणि पुर्ण ग्रामीण जीवनातुन तिथे बसुनच फिरवले होते आणि तो सुद्धा भारावुन गेला होता. हे आठवले.





मुलाखत

एका अभारतीय व्यक्तीकडून आपल्या देशाबद्दल बोलताना वाचले आणि आपण आपल्या देशालाच किती कमी ओळखतो ही भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली. कुठल्याही गोष्टीकडे पहायचा , काही लोकांचा एक नितळ अनुभव असतो त्यातली ही एक व्यक्ती वाटली. पदार्थविज्ञान शास्त्रात पी एच् डी , इटालियन व्यक्ती आणि आपल्यापैकी अनेकांपेक्षा जास्त भारत पहाते, भारतीय लेखन वाचते , किंबहुना आपल्यापेक्षा जास्त भारत या व्यक्तीला "कळलेला" असतो.

मला वाटते , अशा व्यक्ती स्फूर्ती देतात. त्या हे सांगतात की, एखादे झाड कुठल्याही अन्य संदर्भाखेरीज एखाद्या टेकाडावर उभे असते , तशी , नि:संदर्भ ओढ जर कुणाला तुझ्या देशाबद्दल वाटत असेल , तर , अरे वेड्या , पुन्हा एकदा आपल्या देशाकडे एकदा पहा - शक्य होईल तितपत नितळ दृष्टिकोनातून.

मुंबईवर झालेल्या निर्घृण हल्ल्यानंतर इथे (आणि अन्यत्रही. वास्तव आणि आंतरजालीय समाजजीवनात, दोन्हीकडे) जी घनघोर चर्चा झाली ती होणे क्रमप्राप्त होतेच. आवश्यकही. परंतु तितकेच आवश्यक आहेत अशा अनेक "सिल्वियां"चे अनुभव. प्रत्येक सिल्विया परदेशातलीच असेल असे नाही. काही जण आपल्या देशातलेही असतील : रक्ताच्या नद्या वहात असताना त्याच्या काठावर सौहार्दाचे मळे फुलवणारे , ज्ञानाची, माहितीची आणि आपुलकीची देवाणघेवाण करणारे.

मुलाखत फार आवडली.

छान -

तुमच्याकडे काही शेतकर्‍यांकडे मर्सडिजच्या गाड्या असतात असे ऐकले आहे. हे खरे आहे का?

खरे आहे. विशेषत: पोखरान नंतर परदेशीयांच्या भारताकडे बघण्याच्या दृष्टीकोनात फारच बदल झाला आहे. नाहीतर १५-२० वर्षापूर्वी पर्यटक म्हणून भारतातून तिकडे गेलेल्यांना विचारायचे, काहो तुमच्याकडे हत्ती आणि लांडगे सर्रास रस्त्यावरून फिरत असतात असे ऐकले आहे, हे खरे का ?

ह्म्म्म

संधी मिळताच भारताचे चांगले चित्र उभे करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे असे मला तरी वाटते. समाजातले मतभेद हे सगळीकडेच आहेत. पण राष्ट्रवाद हा भारत सोडून सर्वत्र हमखास पहायला मिळतो. लोकसत्ता मधला हा लेख सुद्धा हेच सांगतो असे वाटते.





मुलाखत आवडली

सिल्वियाची छोटेखानी मुलाखत आवडली. भारतात आल्यावर हरवल्याची भावना निर्माण होणे हे साहजिक वाटते. गर्दीचे एक कारण आहेच परंतु जर मोठ्या शहरांत न उतरता लहान ठिकाणी किंवा इतर राज्यांत उतरणे झाले तर अशी भावना निर्माण होण्याबद्दल आधीही वाचले आहे. सिल्वियाच्या मनात असणारी भारताची आपुलकी मनाला आनंद देऊन गेली.

अवांतर १: रश्दी आणि रॉय खेरीज इतर कसदार लेखकांची पुस्तके तिला वाचायला मिळाली असती तर तिचे भारताबद्दलचे प्रेम किंचित अधिक वाढले असते काय? - ह. घ्या. ;-)

अवांतर २: या निमित्ताने राजेंद्रराव पुन्हा लिहिते झाले. अभिनंदन! - कृपया ह. घेऊ नये. :-)

सिल्व्हिया यांची ओळख आवडली

सिल्विया यांना भारताबद्दल आपुलकी वाटते, त्यांची मुलाखत आणि ब्लॉगचा अनुवाद वाचणे मला आवडले.

राजेंद्र आणि सिल्व्हिया (ब्लॉग प्रतिसादांत) एकमेकांना म्हणतात की त्यांना एकमेकांच्या देशाची ओळख किती उथळ आहे हे त्यांना जाणवते - (पण अशाच परस्पर आपुलकीमधून आपली स्वतःबद्दलची ओळख वाढते, ही पुरवणी मी जोडतो).

अवांतर : राजेंद्र पुन्हा लिहिते झाले, याबद्दल अभिनंदन - त्यांनी उपक्रमाला इटालीची ओळख करून द्यावी. प्रियाली यांच्याशी सहमत.

आभार

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.

आपल्या देशाबद्दल इतरांना कसे वाटते याबद्दल उत्सुकता वाटणे नैसर्गिक आहे असे वाटते. यापैकी बरीचशी मते स्टिरीओटिपीकल असतात, त्यांना विचारात घेण्याची गरजही वाटत नाही. तुम्ही हत्तीवरून फिरता का असे आजकाल कुणी विचारत नाही पण एकूणात क्याटेगरी तीच. भारत म्हणजे नेमके काय हे पूर्वग्रह न ठेवता प्रामाणिकपणे जाणून घेण्याचा प्रयत्न त्या मानाने कमी दिसतो. म्हणूनच दिसला तर त्याबद्दल सांगावेसे वाटते.

सिल्व्हियाने भारताबद्दल बरेच वाचन केले आहे. वर म्हटल्याप्रमाणे रश्दी किंवा रॉय मलाही फारसे भावलेले नाहीत. पण तिने विक्रम सेठ, आर के नारायण, मुल्कराज आनंद आणि गांधी यांची पुस्तकेही वाचलेली आहेत. यावरून तिचा दृष्टीकोन समतोल असावा असे वाटते. तिला गालिबच्या काही गझला पाठवल्यानंतर गालिबही प्रचंड आवडला. तिला भारताबद्दल वाटणारी आपुलकी पाहिली की देशांची बंधने फक्त कागदोपत्री असतात असे वाटायला लागते.

अशा वेळी आपल्याला आपलीच नवी ओळख होते. सिल्व्हियाचे लेख वाचल्यानंतर असे वाटते. इथे नितळ अनुभव हा शब्द चपखल बसतो. स्वतःच्या मर्यादाही कळतात, आत्मपरीक्षणही करता येते. सिल्हियाने एक महिना मुंबईत येऊन जे काम केले ते मी तीस वर्षे भारतात राहून बरेचदा करू शकलो असतो पण एकदाही केले नाही.

मी लिहीता झालो याबद्दल मलाही छान वाटते आहे. :)

----
"This is Linus Torvalds. I announce Linux."

मुलाखत

धन्यवाद.
मुलाखत अजूनही अधिक घ्यायला हवी होती असे वाटले. सिल्व्हियाला भारताबद्दल नक्की काय वाटते आहे, किंवा ती समजूत कशी बदलते आहे ते कळले नाही. अजून लिहा...

करेक्ट

मुलाखत अजूनही अधिक घ्यायला हवी होती असे वाटले. सिल्व्हियाला भारताबद्दल नक्की काय वाटते आहे, किंवा ती समजूत कशी बदलते आहे ते कळले नाही.

असेच म्हणतो ! विद्यापिठात बरेच परदेशी विद्यार्थी / विद्यार्थीनी भारतीय संस्कृती, इतिहासाचा अभ्यास करतात, शिकत असतांना अनुभवातून त्यांची काही मते तयार होतात. पण बर्‍याचदा ही मतं भावनिक स्वरुपाची असतात असे वाटते, म्हणून मुलाखत मलाही जरा अपूर्णच वाटली . तरिही मुलाखतीबद्दल आपल्याला धन्यवाद दिलेच पाहिजेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी पुस्तक

सिल्व्हियाने मला असे एखादे मराठी पुस्तक विचारले आहे की ज्याचे इंग्रजीत भाषांतर झाले आहे. कुणाला माहिती असल्यास कृपया सांगावे.

----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

 
^ वर