चमत्कार, विज्ञान आणि शास्त्र -

वैदिक शास्त्रग्रंथ, पुराणे व तत्कालीन वाल्मिकी रामायण, भारतादि महाकाव्ये (काहींना हे इतिहास ग्रंथ म्हणून मान्य आहेत) यांतून ठिकठिकाणी असे काही उल्लेख आहेत ज्यांचे संशोधन होऊन त्यामागचे विज्ञान जगापुढे आणणे उपयुक्त ठरेल.
साधारण शंभर वर्षापूर्वी असा समज होता की ह्या विश्वातील सर्व वस्तूंचे दोन प्रकारात विभाजन होते. एक पदार्थ म्हणजे matter दुसरे म्हणजे energy अर्थात् चेतनत्त्व. पदार्थ म्हणजे दगड, भिंती, लाकूड, टेबल इत्यादि. चेतनत्त्व म्हणजे चेतनता असलेले वृक्ष, प्राणी, मानव वगैरे. दुसरा समज होता की कोणत्याही पदार्थातील सर्वात सूक्ष्म घटक म्हणजे अणु. पण पुढे आढळले की त्याच्याही अंतरंगात एक nucleus नावाचा घटक असून त्यात neutrons व protons असतात आणि बहिरंगात electrons असतात. nucleus स्थायी स्वरूपाचा असतो आणि electrons अंतस्थ nucleus च्या सभोवती वर्तुळाकार सतत फिरत असतात.
म्हणजे निसर्गात तीन मूलभूत कण (fundamental particles) असून त्यांचे गुणधर्म भिन्न भिन्न आहेत आणि अणूच्या निर्मितीत हे तिन्ही कण आवश्यक आहेत. पुढे समजले की अणू प्रारणे (radiation) शोषून घेऊन रासायनिक बदल घडवू शकतात तसेच योग्य परिस्थितीत अणू प्रारणे उत्सर्जित करतात. प्रारणे तरंगस्वरूप (frequency) असतात. आणखी काही वर्षांनी समजले की अणु व प्रारणे यांच्यात उर्जा विनिमय घडतो त्यावेळी प्रारणे पुंजस्वरूप (quantum) असल्यासारखीच वागतात. याचा अर्थ एकच वस्तू कधी प्रारणरूप तर कधी पुंजस्वरूप असू शकते. म्हणजे ती वस्तू पदार्थही आहे आणि ती ऊर्जाही आहे. म्हणजेच त्याचे स्वरूप द्वैती आहे. विरोधाभास दिसतो खरा पण वस्तुस्थिती द्वैती स्वरूपाचीच आहे. निष्कर्ष : निसर्ग कसा आहे हे निसर्ग ठरवतो. आपण नैसर्गिक वस्तुस्थिती समजावून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. अणु व प्रारणांचे द्वैतीस्वरूप हे वस्तुस्थितीचे शक्य तेवढे अचूक वर्णन आहे.
शास्त्रज्ञ बोहर याने अणुप्रणालीद्वारे सूक्ष्म अणु आणि त्याहून सूक्ष्मतर अणुघटक यांचे नविन गतिशास्त्र "पुंजगतिशास्त्र" (quantum mechanics) या शास्त्राचा पाया घातला. बरेच पुढे या शास्त्राचे परिपूर्ण भावंड quantum electrodynamics सुप्रतिष्टीत झाले. Quantum Electrodynamics या प्रणालीने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यातील जवळजवळ सर्व घटनांचे यशस्वी स्पष्टीकरण दिलेले आहे.
आता अणुचे स्वरूप जर पदार्थ आहे तर त्यात ऊर्जा येते कुठून. अणुचे संशोधन चालूच होते. शास्त्रज्ञांनी अणुच्या अंतरंगाच्याही आत म्हणजे nucleus च्या आत जायचा प्रयत्न केला तेव्हां त्यांना तिथे quark नावाचा पदार्थ दिसला. जेव्हां त्यांनी त्याच्याही आंत जायचा प्रयत्‍न केला तेव्हां त्यांना एक विलक्षण गोष्ट आढळली आणि ती म्हणजे त्या quark मध्ये होता एक तरंग, एक vibration. त्याला
भौतिकशास्त्रात string म्हणतात. शास्त्रज्ञांच्या लक्षात आले की अणुला जिथून ऊर्जा मिळते ती या तरंगापासून उत्पन्न होते. याचा अर्थ हे सर्व विश्व तरंगापासून बनलेले आहे. ह्या विश्वामधली प्रत्येक वस्तू तरंगांनी बनलेली आहे. म्हणजेच विश्वामध्ये सर्वत्र vibrations आहेत. हे सर्व विश्व तरंगाच्या कंपनांनी भरलेले एक अतिप्रचंड जाळे आहे. या विश्वातील प्रत्येक वस्तू एकमेकाशी एका अती सूक्ष्म स्तरावर जोडलेली आहे. म्हणून या विश्वाला Holographic Universe असेही म्हणतात. पण ह्या theory चा चमत्काराशी संबंध काय ?
आधुनिक शास्त्रात म्हटले आहे - When we concentrate on a thought, the thought becomes true because our bodies transform it into action - हे कसे काय होते ? आपण जेव्हां विचार करतो तेव्हां आपल्या अंतरंगात विचार तरंग निर्माण होतात. ज्या प्रकारची आपली विचार स्पंदने असतात त्याप्रकारची एक फ्रिक्वेंसी निर्माण होते. आपल्याला वाटते की आपले विचार, विचार तरंग आपल्यापुरतेच मर्यादित असतात. पण तसे होत नाही. आपले विचार तरंग वातावरणात, आपल्या अवतीभवती असलेल्या space मध्ये पसरतात. मग एक महत्त्वाची क्रिया घडते आणि ती म्हणजे ज्या फ्रिक्वेंसीचे आपले विचार आहेत ते त्याच फ्रिक्वेंसीचे विचार शोधतात आणि त्या विचारांना उत्तेजित करतात. एवढेच नव्हे तर जड पदार्थावर परिणाम घडवू शकतात. 1979 पासून Princeton Engineering Anomalies Research laboratory हे प्रयोग करीत होती. पण आता ती बंद करण्यात आली आहे. कारण - “If people don’t believe us after all the results we’ve produced, then they never will.”
In light of this आता आपले संत काय म्हणतात ते पाहावे लागेल. मागच्या शतकात स्वामी प्रज्ञानंद सरस्वती म्हणून एक संत होऊन गेले. १९६८ मध्ये ते समाधीस्त झाले. तत्पूर्वी त्यांनी गोस्वामींच्या रामचरितमानसचे मराठीतून समश्लोकी दोहे, सोरठे व चौपाया या स्वरूपातच भाषांतर केले आहे. आणि त्यावर १५-१६ खंडामध्ये प्रत्येक श्लोकाचा अर्थ विशद करणारी बृहत् टीकाही लिहिली आहे. जड चेतन बद्दल एके ठिकाणी ते म्हणतात -
" जग जड व चेतन यांनी व्याप्त आहे. वृक्षलतादिकांत चैतन्य आहे म्हणूनच झाड मेले असे म्हणतात. दगड मेला सुकला असे कोणी म्हणत नाही. याचे कारण त्यातील चैतन्य प्राणांच्या अभावी क्रियाशील नाही. [प्राण ही चैतन्याची एक शक्ति आहे; श्वास प्रश्वास यांतून प्राण वायुबरोबर शरीरात आत बाहेर जातो/येतो; व आत गेल्यावर अपान, उदान, समान इत्यादित विभागून आपले कार्य करतो. प्राण आणि चैतन्य हे वेगळे आहेत]. बंद ठेवलेल्या पिठाच्या गिरणीतील चैतन्यासारखे किंवा बटण दाबून निरुद्ध केलेल्या विजेच्या दिव्याच्या
प्रकाशासारखे. पाषाणादिकातील व मंत्रांतील चैतन्य निरुद्ध असते. मीरा, कान्होपात्रा, तुलसीदास, समर्थ, एकनाथ, ज्ञानेश्वर यांच्यासारखे महातज्ञ (इंजिनीअर) भेटले तर ते प्रगट होते. योग्य गुरू भेटला तर मंत्र चेतन होतो. मृतसंजीवनी मंत्र फक्त शुक्राचार्यांनाच चेतन होता. या लेखकास व इतर अनेकांस तो माहीत आहे, पण जड असल्याने निष्क्रिय आहे." 'महायोगविज्ञान' या ग्रंथाचा संदर्भ देऊन ते पुढे म्हणतात - " जडांत १/३२ (बत्तीसांश) चैतन्य आहे, स्थावरांत १/१६, कीट पतंगादि जंगमात १/४, पशुपक्षी इत्यादित ३/८, मनुष्यांत १/२, देवतांत ५/८ पर्यंत असते. अष्टमहासिद्धिमंतांत १०/१६ ते १२/१६ पर्यंत असते तर १२ पासून पुढे विविध अवतारांत असते. श्रीराम व श्रीकृष्ण यांच्यात जडाचा, मायेचा अंश नसल्याने ते १६ कलांचे पूर्णावतार होत. " देव देवता म्हटले की लगेच विकृत अर्थ काढायची आवश्यकता नाही. इथे देवता शब्दाने अभिप्रेत आहेत ते अग्नि, वायु इत्यादि ज्यांना mighty phenomenal forces of the nature म्हणतात अशा शक्तिंचे अधिपति; ज्यांना सृष्टी प्रसव संबंधात लोकपाल म्हटले आहे. पहा - ऐतरेय
उपनिषद)
ह्या विधानानुसार महाभूतांच्या अधिपतिंपेक्षा महासिद्धि संपादित योगी जास्त सक्षम असतात असे दिसते. भगवद् गीतेत ३/११ इथे म्हटले आहे - इष्टान् भोगान् हि देवा दास्यंते - जो वर्णाश्रमानुसार आपल्या वाट्यास आलेले कर्म व्यवस्थित करतो त्याला इष्ट
असलेले काम्य भोग देव पुरवितात; नुसते पुरवितात एवढेच नव्हे तर दास्यत्व पत्करून पुरवितात; शब्द वापरला आहे तो 'दास्यंते'. पुढे १९ श्लोकात म्हणतात असक्तो हि आचरन् कर्म परं पुरुषः आप्नोति - म्हणजे आणखी उन्नत अवस्थेत अव्यक्ताच्याही पलिकडील स्थिती प्राप्त करू शकतो. असा योगी जर ब्रह्मदेवासमान सृष्टी निर्मितीची क्षमताही प्राप्त करू शकतो, तर तो काय करू शकणार नाही.
कालच एका प्रवचनात श्री. शंकर वासुदेव अभ्यंकर (महाराष्ट्रात तरी हे नाव परिचित असावे) यांनी एक विधान केले - आता तर quantum physics ने जडदेखील हलवू शकतो हे सिद्ध केले आहे. ज्ञानदेवांनी भिंतीतील प्रत्येक कणामधील चेतन तत्त्वाचे channelling करून भिंतीलाही चालायला भाग पाडण्याची शक्यता आहे. अभ्यंकर संत असले तरी विद्यावाचस्पती (PhD) आहेत. उगाच काहीतरी बरळणार्‍यांपैकी नव्हेत.
पातंजल योगशास्त्रांत प्रसव आणि प्रतिप्रसव असा एक विषय येतो. प्रसव म्हणजे कापूस, त्यापासून दोरा आणि दोर्‍यापासून वस्त्र. प्रतिप्रसव याच्या उलट गति. कठोपनिषदात चित्ताचा प्रसव आणि प्रतिप्रसव सांगितला आहे. अव्यक्त, अव्यक्तांतून महत्,
महत्तत्त्वांतून बुद्धि, बुद्धींतून मन, मनांतून सूक्ष्म विषय, सूक्ष्म विषयांपासून इंद्रिये आणि इंद्रियांच्या द्वारा स्थूल विषयांचा भोग हा क्रम म्हणजे प्रसव. अशाच रीतीने अर्थाहून पर मन, मनाहून परा बुद्धी, बुद्धीहून पर महत्, महत् हून अव्यक्त, अव्यक्ताहून पर पुरुष हा प्रतिप्रसव. संत तुकाराम 'आता मी जातो' म्हणाले. त्यांच्या गमनाबद्दल बर्‍याच तज्ञांनी बरेच तर्क केले आहेत. पण तत्कालीन इतर भक्तांच्या काही अभंगावरून असे दिसते की एका क्षणी महाराज दिसतात आणि दुसर्‍या क्षणी गायब. कसे नाहीसे झाले पत्ताच लागला नाही. योगशास्त्रातील असंप्रज्ञात सामाधी ज्याला साधली आहे तो असे सदेह परतत्त्वात लीन होऊ शकतो असे म्हटले आहे. महाराज सदेहाने विदेही झाले असण्याची शक्यता आहे. पण दुसरा कोणी असे , आणि तेही आमच्या डोळ्यासमोर, करणारा नसल्यामुळे त्याला अंधश्रद्धावाल्यांचा चमत्कार अथवा भाकडकथा म्हणावे लागते. जाऊ द्या. जुनी गोष्ट आहे, तेव्हां आता त्याची शहानिशा करणे ही शक्य नाही.
आपल्याच काळात भारतातील श्री. विश्वेश्वरय्या नावाचे भौतिक शास्त्रातले एक शास्त्रज्ञ. एकदा रेल्वेने प्रवास करीत असताना काही वाचन करीत होते. अचानक उठले आणि साखळी ओढून गाडी थांबवली. चवकशी सुरू झाली. शांतपणाने म्हणाले, " तीन मैलावर रूळांचे सांधे निखळलेले आहेत". कशावरून - गाडीचा होणार्‍या खडखडातील बदल. आणि त्यांनी सांगितले त्याप्रमाणे रूळांचे सांधे ढिले केले गेले असल्याचे आढळले. किती जणांना आवाजातील एवढा सूक्ष्म फरक जाणवेल. त्यालाही तपश्चर्या लागते. आणखी २०० वर्षांनीच या गोष्टीला चमत्कार म्हटले तर आश्चर्य करण्यासारखे त्यात काही नाही.
मागच्या वर्षी टीव्ही वर 'शाब्बास इंडिया' म्हणून एक सिरीयल चालायची. बर्‍याच जणांनी पाहिली असेल. एका एपिसोड मध्ये एका गृहस्थाने concentrated Sulphuric Acid च्या दहा-बारा बाटल्या घेऊन केवळ आंघोळ केली एवढेच नव्हे तर एक बाटली गटागटा पिऊन दाखविली. हजारो प्रेक्षकांसमोर. पण त्या आधी प्रसार माध्यमातील एकाने एक बाटली घेऊन जवळ असलेल्या कपड्यांच्या ढिगावर ओतली आणि सर्व कपडे बघता बघता राख होऊन गेले. आता असे Acid घशातून उतरले कसे ? आणि
आतडी जळाली कशी नाहीत ? एका गृहस्थाने ५०० यात्री बसलेले एक विमान डोक्याच्या केसांना दोरी बांधून त्याद्वारे ओढले. चांगले १०० मीटर. पहिल्या प्रयोगात प्रयत्‍न फसला पण लगेच दोन दिवसात त्याने तो प्रयोग यशस्वीपणे करून दाखविला. पहिल्या प्रयत्‍नाचे वेळी विमान उभे असलेल्या जागेची तपासणी झाली तेव्हा तिथे चढ असल्याचे आढळले. फार पूर्वीच्या ह्या घटना नव्हेत. मागील वर्षीच्याच.
वाल्मीकि रामायणात बालकाण्डातील २७ व २८ या दोन सर्गामधे विश्वामित्रांनी रामाला कितीतरी प्रकारची अस्त्रे दिली. ती अस्त्रे धारण करण्याची पात्रता श्रीरामामध्येच होती. कोणालाही देण्यासारखी असती तर राम व लक्ष्मण बरोबरच होते. पण लक्ष्मणाला नाही दिली. अशा प्रकारच्या शक्त्या धारण करण्यासही फक्त काही जणच पात्र असतात. प्राणीमात्रांचे मुख्य जीवन म्हणजे पाणी आणि नंतर अन्न. अन्नावाचून बरेच दिवस जगता येईल पण साधारण मनुष्यास पाण्याशिवाय ८/१० दिवस सुद्धा जगणे कठीण. याला अपवाद असतोच. कोणी मुळीच पाणी न पिता राहणार दिसला तर निश्चितच जलाचे सूक्ष्मरूअ जो रस तो त्या व्यक्तीला काहीतरी विशिष्ट कारणांनी शरीरातूनच मिळत असतो. त्याला तालुस्त्राव असे म्हणतात. सर्व अस्त्रविद्या प्रदान करण्यापूर्वी (२२ व्या सर्गात) विश्वामित्रांनी श्रीरामाला बला अतिबला अशा दोन विद्या शिकविल्या आणि म्हणाले, "यांचा अभ्यास केल्याने तुला भूक तहानेचा त्रास कधीही होणार नाही" आताही अणु स्फोट करायचे तंत्र फार थोड्या लोकांनाच माहीत असते; आणि त्यातही ते तंत्र वापरून तयार केलेला Bomb वापरायची authority सर्व जगात मिळून अगदी मोजक्या लोकांनाच असते.
’आम्ही विज्ञानवादी' असे तर सर्वच म्हणतात. पाण्याचा एक घटक म्हणजे ऑक्सिजनचा एक घटक व हैड्रोजनचे दोन घटक यांचे मिश्रण. थीअरी म्हणून हे अशिक्षितालाही मान्य आहेच. पण असे दोन पदार्थ घेऊन पाणी बनवून दाखवा ना ? carbon di oxide मधून ही पाणी बनविता येते म्हणतात. फक्त काही अब्ज डॉलर खर्च येतो एवढेच. आणि ते तरी कोण्या विज्ञानवाद्याने पाहिले आहे काय ? नाही ना ? पण आपल्या अंगणातले गवत रोज रात्री co2 पासून पाणी रोजच निर्माण करते. पण तो चमत्कार नव्हे. त्याला म्हणायचे unexplained विज्ञान. आताच मी एक डबी विकत घेतली. शर्टाच्या खिशात मावते. त्यात शेकडो ग्रंथ साठवण्याची क्षमता आहे. दुकानदार म्हणाला ह्याला external drive म्हणतात आणि त्याची क्षमता 320 GB आहे म्हणाला. कोणी विज्ञानवादी ही डबी माझ्या डोळ्यादेखत बनवून दाखवू शकेल काय ? फक्त raw material घेऊन. assembling प्रकार चालणार नाही. No readymade circuits, chips or parts. फक्त स्वबळावर. आहे कुणाची तयारी ? किती खर्च लागेल, किती काळ लागेल, किती जमवाजमव करावी लागेल याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. instant पाहिजे तरच त्यामागचे विज्ञान मान्य. कोणी म्हणेल हा वेडा दिसतोय. तुम्हीही अशी डबी बनविणारा माणूस बघितला नाही. तरी तुम्हाला त्यमागचे विज्ञान मान्य आहे. मग मानवी इंद्रियांना आकलन होऊ शकत नाही अशा गोष्टी करणार्‍या योगी जर कोणी प्रत्यक्ष अनुभव घेतला असेल आणि त्या बद्दल जर कोणी सांगत असेल तर ? तर ती बनते भाकडकथा. कल्पित कथा. कारण ? कारण ती माझ्या डोळ्यासमोर झाली तरच मला मान्य.
अखेर आपल्या मर्यादित इंद्रियांना ज्याचे आकलन होते तेच वास्तव, अर्थात विज्ञान. बाकी सर्व अंधश्रद्धा पसरविणार्‍यांचे चमत्कार किंवा कल्पितकथा. पण आपल्या इंद्रियांची शक्ति किती ? शेवटी PEAR ने बंद होण्याचे जे कारण सांगितले तेच खरे.

Comments

विज्ञान आणि सत्य

लेखाचा एकूण सूर असा दिसतो की स्वतःला विज्ञानवादी म्हणवणारे वैज्ञानिकांच्या शोधांवर प्रत्यक्ष खात्री करून न घेता (किंवा पडताळा घेणे शक्य नसतांनाही) विश्वास ठेवतात, पण योग्याच्या अतींद्रीय अनुभवांना मात्र भाकडकथा म्हणतात. या ठिकाणी एक गोष्ट लक्षांत घ्यायला पाहिजे ती म्हणजे वैज्ञानिक शोधांमुळे तंत्रज्ञान विकसित होते व त्याचा फायदा सर्वसामान्य माणसापर्यंत पोचतो. शिवाय विज्ञानांतील एखादा नवीन शोध काही काळाने commonplace understanding होते. गुरुत्वाकर्षणाच्या नियम शोधून काढणारा न्यूटन शास्त्रज्ञ (एक लोकोत्तर माणूस) होता. पण हल्ली हा नियम शाळकरी मुलांनाही माहीत आहे व त्याची संगती ते रोजच्या अनुभवाशी लावू शकतात. योग्याच्या अनुभवाविषयी असे सांगता येईल का?

मस्त लेख

मस्त लेख! आवडला.
शेवटी दिलेले उदाहरण अगदी योग्य आणि चपखल आहे.

यावर आपले तथाकथित विज्ञानवादी अगदी गप्प कसे काय बसले याचे मात्र कुतुहल वाटते आहे.

आपला
गुंडोपंत

गप्प(?)

यावर आपले तथाकथित विज्ञानवादी अगदी गप्प कसे काय बसले याचे मात्र कुतुहल वाटते आहे.

गप्प नसावेत परंतु वरील लेख हा विचार करून लिहिलेला वाटला. (विचार चूक की बरोबर ही वेगळी गोष्ट) त्याला विचार करून उत्तर देण्यासाठी पुंजभौतिकिबद्दल पुरेशी माहिती हवी. ती निदान माझ्याकडे तरी नाही. त्यामुळे सद्यपरिस्थितीत गप्प बसण्यात शहाणपणा वाटतो. गप्प बसणे म्हणजे वरील लेखाचा स्वीकार करणे असे नाही. कदाचित, त्यातील अनेक गोष्टी कळल्या नसाव्यात असेही असेल. उदा.

आपल्या अंगणातले गवत रोज रात्री co2 पासून पाणी रोजच निर्माण करते.

म्हणजे कसे हे मला कळले नाही.

वैज्ञानिक संज्ञा आणि साहित्यातील संज्ञा यांचा अनेकदा घोळ झाल्याचे लक्षात येते. उदा. सहनशक्ती. आनंद घारे यांच्या मागील एका लेखात या विषयी परंतु थोडी उलट स्वरूपातील चर्चा झाली होती. संतसाहित्यातील अनुभूती आणि वैज्ञानिक प्रयोगांतील निष्कर्ष यांचा ताळमेळ मला लागत नाही, समजत नाही आणि पटत नाही त्यामुळे लेख मला नीटसा समजला नाही. कदाचित, इतरांचेही असेच झाले असावे. चू. भू. द्या. घ्या.

ज्ञानेश्वरांच्या कार्याला चमत्कारांची जोड देऊन त्यांच्या कार्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष होत असेल तर ते खेदजनक आहे. अन्यथा, ज्ञानेश्वरीबद्दल चर्चा न होता किंवा त्याबद्दल पुरेशी माहिती नसून चमत्कारच लक्षात राहत असतील तर ते मला अयोग्य वाटते.

बरेचदा, उपेक्षितांचे, अडाण्यांचे, किंवा जे पोटापाण्याच्या भ्रांतीत व्यग्र आहेत त्यांचे लक्ष खेचून घेण्यासाठी काहीतरी सनसनाटी करण्याची आवश्यकता असते. असे दिसून येते की युगपुरुष ही सनसनाटीखेज गोष्ट करण्यात सहभागी नसतात परंतु त्यांचे भक्तगण नक्कीच प्रसार आणि प्रचार करण्यासाठी चमत्कारांची जोड देण्यात उत्सुक असतात. सामान्य माणसाला रोजच्या चिंतेवर काहीतरी अद्भुत उपाय मिळवण्याची आशा असते आणि म्हणून तो अद्भुताकडे आकर्षित होतो हे जगात सर्वत्र दिसते. ज्ञानेश्वरांचे जीवन, कार्य आणि ध्येय पाहता त्यांना असे चमत्कार दाखवण्यात आणि आपला मोठेपणा दाखवण्यात खूप रुची असावी असे मला प्रामाणिकपणे वाटत नाही.

डिस्क्लेमरः मी "तथाकथित" विज्ञानवादी आहे असे मला वाटत नाही परंतु केवळ चमत्कारांत गुरफटलेल्यांबद्दल खेद वाटतो.

मलाही

संतसाहित्यातील अनुभूती आणि वैज्ञानिक प्रयोगांतील निष्कर्ष यांचा ताळमेळ मला लागत नाही, समजत नाही आणि पटत नाही

मलाही असेच वाटते. दुसरे म्हणजे दर महिन्याला कुठेतरी अशी चर्चा होत असते. कुठेकुठे तेचतेच प्रतिसाद परत देत बसायचे*? (विक्रमादित्य आपला हट्ट सोडत नाही आणि आमच्या डोक्याची कधीच शंभर शकले झाली आहेत.)
वानगीदाखल हा लेटेष्ट सामना पहावा.

*म्हणजे आमचे जीवण अगदी ह्यापनिंग वगैरे नसले म्हणून काय झाले. यापेक्षा चांदनी चौक टू चायना पाहिलेला काय वाईट?

----

तथाकथित

प्रियाली यांनी "शब्दांचे अर्थ" वगैरे योग्य चर्चा केलेली आहे.

शब्दांचे अर्थ ठरवल्याशिवाय बोलणारे बहुधा भांडत असतात, पण "आपण सोपे बोलतो" असे ठणकावून सांगतात.

कधीकधी असे म्हणतात : "आणि त्या शब्दांचे खेळ करणार्‍या विज्ञानाच्या व्याख्या वगैरे नका सांगु मला!"

अर्थातच गुंडोपंतांच्या वरील विनंतीला दोन्ही बाजूने मान कसा द्यावा, हा प्रश्नच आहे. प्रियाली यांनी स्पष्टीकरण देऊन मान दिला, मी स्पष्टीकरण न देता मान देतो.

सुंदर

सुंदर लेख. आवडला. पण खरेतर शेवईवाद हा आपल्या पूर्वजांनी आधीच मांडला होता त्यामुळे याचे खरे जनक आपणच आहोत. याबद्दलचा सज्जड पुरावा मंडकोपनिषदाच्या नऊशे सत्तावनाव्या श्लोकात सापडतो. दुर्दैवाने पानशेतच्या पुरात याच्या सर्व प्रती वाहून गेल्याने आता पुरावा विचारू नये.

शेवई म्हणजे खरेतर आपल्या समईची वात. शेवई-सेवई-सेमई-समई असा तो कठीण प्रवास आहे. आपले पूर्वज किती महान होते याचा हा आणखी एक पुरावा. तर अशा समईच्या वातींनीच हे विश्व बनले आहे. नंतर पाश्चात्यांनी ही कल्पना ढापून स्ट्रिंग थिअरी मांडली. पण प्राचीन भारतात समईच्या ज्योतीइतकीच स्ट्रींग थिअरीही जुनी आहे.

आपले पूर्वज महान होते. साहजिकच आपणही महान आहोत. यावर अविश्वास दाखवणार्‍याच्या ल्यापटॉपच्या र्‍यामची शंभर शकले होऊन त्याला कधीच सिस्टीम बूट करता येणार नाही. ही शापवाणीही प्राचीन ग्रंथांमध्ये आढळते.

----

आमच्या मते

दुर्दैवाने शेवईवाद आणि स्ट्रिंग थिअरी या दोन्हींतही गती नसल्यामुळे यावर अधिक टिप्पणी आम्ही करू शकत नाही याचा खेद वाटतो.

आम्हाला तरी कुठे आहे? :)
पण आमच्या मते एखाद्या विषयात गती असणे आणि त्या विषयावर मराठी संकेतस्थळांवर प्रतिसाद देणे या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत. त्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे याबद्दल आम्हाला शंका वाटते. म्हणून आम्ही बाजीप्रभूंच्या बेअरिंगने बेधडक कुठल्याही विषयावर* प्रतिसाद द्यायला एका पायावर तयार असतो.

*आमची रेंज मोठी आहे. रासायनिक खते ते अमेरिकेतील मंदी व्हाया ब्रिटनी स्पिअरची सध्याची मानसिक परिस्थिती.

----

शाप

यावर अविश्वास दाखवणार्‍याच्या ल्यापटॉपच्या र्‍यामची शंभर शकले होऊन त्याला कधीच सिस्टीम बूट करता येणार नाही. ही शापवाणीही प्राचीन ग्रंथांमध्ये आढळते.

ह हा पु वा
प्रकाश घाटपांडे

पिअर

पिअर का बंद झाली त्याबद्दल अधिक माहिती इथे. त्यांच्या प्रेस रिलिझमध्ये तरी “If people don’t believe us after all the results we’ve produced, then they never will.” हे कारण सापडले नाही.

----
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

पिअर

" If people don't ... " हे पिअर चे ऑफिशियल् कारण नव्हे. पिअर च्या फाऊंडरने [Robert G. Jahn] काढलेले उद्गार आहेत ते. त्याच दिवशीच्या न्युयार्क टाईम्सने ने दिलेल्या बातमीत आहे हे वक्तव्य. चुकून हे निदर्शनास आणून द्यायचे राहिले. कारण त्याच वाक्याखाली 'Princeton made no official comment.' असेही लिहिलेले आहे.

धन्यवाद..

अशा विधानांसोबत संदर्भही दिल्यास वाचकांना सोईचे होईल.

----

 
^ वर