स्वप्न संकेत

१)आपण कळत्या -नकळत्या वयापासून कधीही न पाहीलेल्या वास्तु,इमारती,घरे,गड-किल्ले,रस्ते इत्यादी बाबी स्वप्नात का दिसतात?
२)भगवान रजनीश यांनी वर्णन केलेली देजायू अवस्था हीच काय?
३)याला वैद्न्यानिक आधार मिळेल काय?
४) याचा काही संकेतार्थ लावता येतो काय?
५) पुनर्जन्मा सारख्या विचारांना यामुळे बळकटी मिळते काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

दुर्गा भागत यांचा अनुभव...

खूप चांगला विषय घेतला आहे चर्चेला...

प्रख्यात साहित्यिक-संशोधिका (दिवंगत) दुर्गा भागवत यांनी याबाबतचा एक अनुभव लिहून ठेवला आहे...
दादरमधील एका अतिशय जुन्या घराजवळून जाताना त्यांना नेहमीच असे वाटायचे की, आपले या घराशी काहीतरी नाते आहे...या घरात आपण कधीकाळी राहिलेल्या आहोत. आपल्या आयुष्याचा बराचसा काळ (अर्थात या जन्मीचा नव्हे) त्या घरात गेला आहे...त्या घराचे अंतरंग (interior) कसे असावे, याची त्यांनी मनात जशी कल्पना केली होती, अगदी तसेच ते घर होते. कुतूहलापोटी दुर्गाबाई त्या घरात जाऊनही आल्या होत्या आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या कल्पनेत त्यांना ते घर जसे दिसले होते, अगदी तसेच ते होते...!!!
कोणतीही गोष्ट बुद्धीच्या निकषावर घासून-पुसून घेणाऱया एका संशोधिकेचा हा अनुभव आहे, एवढे सांगितले तरी पुरे...पण दुर्गाबाई स्वतः प्लॅंचेटही करीत असत, असेही वाचले आहे... :) दुर्गाबाईंशी थोडाफार संवाद साधण्याची (या विषयावर मात्र नव्हे) संधीही मला मिळाली होती... असो.
काही काही प्रसंग आयुष्यात असे घडतात की, वाटते, अरे, असाच प्रसंग यापूर्वीही कधीतरी घडून गेला आहे आपल्या आयुष्यात...पण कधी ते मात्र आठवत नाही...
या विषयावर खूप काही लिहिण्यासारखे आहे. वेळेअभावी सध्या फक्त एवढेच लिहीत आहे...
या विषयावर अनेकांकडे सांगण्यासारखे बरेच काही असेल, असे वाटते...

दुर्गा भागवत

केवळ दुर्गा भागवतच नव्हे तर सुनीताबाई देशपांडे आणि जी.ए. कुलकर्णी यांनीही असे अनुभव लिहीले आहेत. मागे उपक्रमावरच ही चर्चा झाली होती. मात्र त्याचा दुवा सापडत नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आठवले तसे

मला वाटते त्यांनी "आठवले तसे" या पुस्तकात या संदर्भात आठवण दिली आहे.

स्मरणशक्ती

तुषार काळभोर

एखादी घटना किंवा एखादी वस्तू आपण पूर्वी कधीतरी पाहिली आहे असे वाटणे ही तितकीशी असामान्य गोष्ट नाही. खरे तर ती मेंदूतील एक रासायनिक प्रक्रिया आहे.

मला वाटते मानसशास्त्रातील तद्न्य अधिक प्रकाश टाकू शकतील.

स्वप्नसंकेत

मराठी असे आमुची मायबोली
***********************************
श्री.सूर्यकांत डोळस प्रश्न करतातः
१)आपण कळत्या -नकळत्या वयापासून कधीही न पाहीलेल्या वास्तु,इमारती,घरे,गड-किल्ले,रस्ते इत्यादी बाबी स्वप्नात का दिसतात?
३)याला वैद्न्यानिक आधार मिळेल काय?
५) पुनर्जन्मा सारख्या विचारांना यामुळे बळकटी मिळते काय?

........
उत्तरे:
१) या वास्तू प्रत्यक्ष पाहिल्या नसल्या तरी त्यांची चित्रे पाहिली असतील, चित्रपटांत दृष्ये पाहिली असतील अथवा अशा वास्तूंची वर्णने वाचताना/ऐकताना आपल्या मनश्चक्षूंसमोर चित्रे उभी राहातात त्यांच्या प्रतिमा मेंदूत उमटलेल्या असतील. त्यामुळे अशी दृष्ये स्वप्नात दिसू शकतात. त्यांचा पूर्वजन्माशी काही संबंध नाही.
३) याला वैज्ञानिक आधार वर लिहिला आहे तोच. अन्य कोणता माझ्या वाचनात नाही.
५) स्मृतींची नोंद मेंदूत असते. कोणत्याही कारणाने स्मृतिकेंद्राचा रक्त पुरवठा थांबला की त्यातील स्मृती पुसल्या जातात. म्हणजे मृत्युनंतर स्मृती पूर्णतया नष्ट होतात. जीन्स मधील संगणक प्रणाली (प्रोग्रॅम्स) मागच्या पिढींतून पुढच्या पिढीत संक्रमित होतात. त्या अर्थाने पितरांचा पुनर्जन्म होत असतो असे म्हणता येईल.

देजावू

बद्दल एक थिअरी अशी की
१. काही प्रसंगांबाबत आपली स्मृती अर्धवट असते.
२. जर एखादा नवीन प्रसंगात या अर्धवट स्मृतीच्या सादृश्य घटना/वातावरण असेल तर देजावू झाल्यासारखे वाटते.
अधिक माहिती इथे.

ताक. हे प्रयोगाचे निष्कर्ष आहेत. ते देजावू कितपत विश्वासार्हतेने समजावून देऊ शकतात हे तज्ज्ञ लोकच सांगू शकतील.

----

हे स्वप्न तर भावी पिढीससाठी गुढ संदेश

पुनर्जन्मासारख्या विचारांना यामुळे बळकटी मिळते काय?

तुम्ही स्वप्नाचा योग्य अर्थ लावाल तर बळकटी मिळेल. न जाणो पुढल्या जन्मात तुम्हीच अशी एखादी गाडी चालवत असाल त्याची कारणे:
१. तुमचा पुर्नजन्म होईपर्यंत इंधन टंचाईमुळे गाड्या ओढाव्या लागतील
२. तोपर्यंत जागेच्या टंचाईमुळे रुळ लोकांच्या दारात पोहोचले असतील
३. लोकांचे सरासरी आयुष्यमान वाढल्याने म्हातार्‍या वयातहि गाड्या ओढण्यासारखी कामे करावी लागतील
४. वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे त्या वयातही गाड्या लीलया ओढता येतील
...
....
......

असे अनेक निष्कर्षे , सुचना खरंतर "स्वप्नसंकेत" तुम्हाला स्वप्नातून मिळत होत्या आणि तुम्ही कोणत्यातरी वैज्ञानिक वगैरे कारणांने त्याकडे दुर्लक्ष केले. :)

(स्वप्नशिरोमणी) ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

जबरी!

सहीच लिहितोस की तू स्वप्नशिरोमण्या!
:))
आपला
गुंडोपंत

दिपिका पदुकोण

असं म्हणतात -

अगर किसी चीज़ को दिलसे चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने की कोशिशमें लग जाती है

अहो, दिपिका पदुकोण मिळणार असेल तर मी देजा वू, स्वप्नसंकेत, पुनर्जन्म आणि इतर सर्व गोष्टींवर झोपून - डोळे बंद करून - विश्वास ठेवायला तयार आहे.

- राजीव.

इतक्यातच

इतक्यातच महा अनुभव या दिवाळी अंकात एक छान कल्पनारम्य कथा याच विषयावर वाचली.

एका माणसाला झोपेत, स्वप्नात एक मोबाईल सापडतो आणि तो जागा झाल्यावर तो फोन खरंच त्याच्याकडे असतो अशा स्वरूपाची.
असो,

३)याला वैद्न्यानिक आधार मिळेल काय?

अहो मुळात वि़ज्ञान म्हणजे तरी नक्की काय? हे माणसाला अजून उमजले नाही तर त्याचा आधार कशाला शोधायचा? आणि त्या शब्दांचे खेळ करणार्‍या विज्ञानाच्या व्याख्या वगैरे नका सांगु मला!

आपला
८४ लक्ष जन्मात भटकत असलेला
गुंडोपंत

माझा पुनर्जन्मावर पुर्ण १००% गाढ विश्वास आहे!

माझा अनुभव

मला असे स्वप्न पडले आहे की त्यात दिसलेले दृश्य तपशीलासकट जसेच्या तसे मी दोनएक महिन्यात अनुभवले आहे.
ते दृश्य एका प्रसंगाचे होते.. आणि त्याबद्दल मी आधी कधीच काही कल्पना केली नव्हती. आणि क्ल्पना केली असली तरी त्यात जी घटना पाहिली ती जशीच्या तशी समोर घडली हे मला नवलईचे वाटते.
यावर कशाचा (विद्न्यान/अध्यात्म) आधार मिळावा असे मला वाटत नाही. जे होणार होते ते दिसले असे मी म्हणतो.

असे होणे शक्य नाही असे कुणी म्हणाले तर ते शक्य आहे असे मी म्हणेन. ते कसे शक्य आहे असे कुणी विचारले तर माझे अजून काही मत बनले नाही.
--लिखाळ.

स्वप्न आणि माझा अनुभव

फ्रॉइड नावाचा कोणी एक विचारवंत होऊन गेला आहे म्हणतात, त्याने मनाचे दोन भाग केले एकाला म्हणे तो प्रकट मन आणि एकाला अप्रकट मन असे म्हणायचा त्याच बरोबर मनाच्या खाली आणखी एक भाग होता तो सर्वात खालचा तळ (मनाचा तळ ) इथे म्हणे नैसर्गिक प्रेरणा, वासना,इच्छा आणि बरेच रॉ मटरेल इथे साठवलेले असते. झोपेत आपल्या बौध्दिक व मानसिक प्रक्रिया या शिथील होतात आणि मनाच्या तळात दडपलेल्या ज्या काही भावना आहेत त्या सेन्सॉर बोर्डासारख्या काट-छाट होऊन म्हणजे आठवणी, चित्र, आणि काय-काय असेल ते सर्व स्वप्नात जशाच तशा येत नाही त्या कशाच्या तरी प्रतिके बनून येतात ते सर्व प्रतिक स्वरुपात स्वप्नात येतात.

आता माझा एक अनुभव ; मला एक स्वप्न सतत पडते, माझ्या स्वप्नात एक बाई येते, आणि संस्कृत शिकवत आहे असे स्वप्न सारखे पडते. खरं म्हणजे मी मराठी मेडियमचा विद्यार्थी . बाईचा चेहरा जरासा जाडा-भरडा असा काहीसा येतो. बरं ! शाळेतल्या सर्व मॅडम आठवून पाहिल्या तसा चेहरा एकीचाही नाही. त्यामुळे फ्रॉइड जे म्हणतो की सर्व आठवणी मनाच्या तळात जमा होतात त्या मनाच्या तळात ही आठवण तर नाही मग स्वप्न कसे पडते, हे न उलगडलेले कोडे आहे. तेव्हा खूप काही लिहायचे सुचते आहे, तुर्तास इतकेच.

-दिलीप बिरुटे

??

खरं म्हणजे मी मराठी मेडियमचा विद्यार्थी

तुम्हाला मराठी माध्यमात शिकणारा म्हणायचे आहे का? की मेडियम हा मराठीतला नवा शब्द आहे? शब्दसंग्रह करणारे सांगु शकतील काय? तसेच बाई आणि मॅडममधला फरक नाही कळला. नाही म्हणजे बाई शोधायला मॅडम का आठवल्या? खुलासा केलात तर आनंद आहे. :)





मॅडम आणि माध्यम

तुम्हाला मराठी माध्यमात शिकणारा म्हणायचे आहे का?

हो, असेच म्हणायचे होते.

की मेडियम हा मराठीतला नवा शब्द आहे?
माहित नाही.


नाही म्हणजे बाई शोधायला मॅडम का आठवल्या?
खरं म्हणजे नुकत्याच शाळेच्या आठवणी चाळल्या तेव्हा लक्षात आले की, मी शाळेत शिकवणार्‍या शिक्षिकेला 'बाई' असेच म्हणायचो. च्यायला मॅडम हा शब्द कसा घुसखोरी करुन आला कळले नाही. असो, चुका शोधल्याबद्दल आभारी.

स्वगत : इतक्या दिवस शुद्धलेखनाची भीती वाटायची,आता लिहिलेला शब्द इंग्रजी की मराठी त्याची भीती वाटायला लागली आहे

ओळख

फ्रॉइड नावाचा कोणी एक विचारवंत

फ्रॉइडची ओळख एक क्रांतिकारी मानसशास्त्रज्ज्ञ/मानसोपचारतज्ज्ञ अशी असावी असे वाटते.

----

विचारवंत

मानसशास्त्रज्ज्ञ/मानसोपचारतज्ज्ञ यात काही विचारवंतही असावेत असे वाटते

-दिलीप बिरुटे

विचारवंत

विचारवंत ह्या शब्दाच्या व्याख्येबाबत आमचा नेहेमी गोंधळ होतो. उदा. आम्ही विचारवंत आहोत असे आम्हाला वाटते पण आमच्या सहकार्‍यांना मात्र तसे वाटत नाही.

----

लोबसंग रांपा

डॉ. लोबसंग रांपा यां तिबेटी धर्मगुरुची पुस्तके वाचनीय आहेत. त्यापैकी एका पुस्तकात वाचलेले काहि आठ्वते ते असे: (वाक्य वेगळी आहेत/असावीत मात्र त्यांनी हाच आशय दिला आहे)
माणूस झोपला की त्याचा आत्मा फीरायला बाहेर निघतो त्याचा वेग इतका अफाट असतो की प्रकाशाचा वेग त्याच्यापुढे काहिच नाहि. तर आत्मा म्हटले की त्याला स्थळा प्रमाणे काळाचेही बंधन नसते. त्या आत्माने अनुभवलेल्या काहि घटना आपल्याला स्वप्नात दिसतात. (याच कारणाने झोपलेल्या बाळाला तीट लावत नाहित कारण बालकाचा आत्मा शरीराची खुण विसरतो म्हणे :-) )
अजून एक म्हणजे त्या घटना पृथ्वीवरच असतील असे नव्हे

डॉ. लोबसंग रांपा यांची पुस्तके
१. तृतीय नेत्र
२. तिबेटी डॉक्टर
अजून एक आहे.. नाव विसरलो...
(लेखकाचा दावा आहे की) या महाशयांनी परकाया प्रवेश केला आहे व वय १५०+ आहे तसेच तिसरा डोळा जागृत केला आहे असे म्हणतात

(दिड डोळ्यांचा ;) ) ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

डॉ. लोबसंग वर्तक

महाशयांनी परकाया प्रवेश केला आहे व वय १५०+ आहे तसेच तिसरा डोळा जागृत केला आहे असे म्हणतात

डॉ. लोबसंग वर्तकांचा अनुभव अंमळ मजेशीर आहे.

आपला,
डॉ. प. वि. आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पडण्याची भावना

कधी कधी असा अनुभव येतो: - जरा डोळा लागायला लागला की कुठल्यातरी विश्वात जायला लागतो - अर्थातच स्वप्नात. आणि काही कळायच्या आत धपकन वरून खालीपडल्या सारखे अथवा तोल गेल्यासारखे वाटते. दचकून जाग येते आणि नक्की स्वप्नात काय होते ते काही केल्या आठवत नाही.

असा प्रकार मी अगदी तान्ह्या मुलांचा पण होताना पाहीला आहे फक्त ती दचकतात पण उठत नाहीत इतकाच फरक.

या संदर्भात मी "आत्मा बाहेर पडतो.." वगैरे ऐकले होते.

हम्म!

कधी कधी असा अनुभव येतो: - जरा डोळा लागायला लागला की कुठल्यातरी विश्वात जायला लागतो - अर्थातच स्वप्नात. आणि काही कळायच्या आत धपकन वरून खालीपडल्या सारखे अथवा तोल गेल्यासारखे वाटते. दचकून जाग येते आणि नक्की स्वप्नात काय होते ते काही केल्या आठवत नाही.

असा अनुभव मला नेहमी येतो. माझ्या कुटुंबातही सर्वांना येतो. मला वाटते याचा संबंध फक्त शारीरिक नियंत्रणाशी असतो. माणूस जागृतावस्थेत आपले हात पाय यांच्यावर नियंत्रण ठेवून असतो. जागृतावस्थेतून निद्रावस्थेत जाताना ते नियंत्रण सुटत असल्याचा हा अनुभव असतो असे मला वाटते कारण पायावरचे नियंत्रण सुटले की अद्याप न झोपलेला मेंदू धप्पकन पडलो असेच सुचवणार. ;-)

शक्य आहे

आपण म्हणता ते शक्य आहे. मला कारण माहीत नाहीच आहे. अनुभव मात्र नक्कीच येतो.

कारण झोपेत, आत्मा वगैरे फिरायला बाहेर पडणे आकलनशक्तीच्या बाहेरचे आहे आणि तसे असेल तर तो अनुभव नेहमी येयला हवा. :-) पण हे कधितरी होते.

लोकमित्र मंडळ

चर्चाप्रस्तावकाराचे लोकमित्र समुदायात स्वागत आहे.

हा समुदाय लोकशिक्षणात्मक लेखकांसाठी आहे. त्यांना विनानफा तत्त्वावर नियतकालिकांत आपले लेख छापून यावे असे वाटावे. सदस्यांनी असे लेख लिहावे. (सध्या मंडळ लेख जमा करत आहे. पुरेसे लेख जमले की पुढे कार्य करेल.)

* आपले काही लेख उपक्रमावर (किंवा आम्हाला बघता येतील अशा दुसर्‍या संकेतस्थळावर) प्रसिद्ध करावेत : मर्यादा (आदमासे) ५०० शब्द जास्तीत जास्त एक कृष्णधवल चित्र. (चित्राचा प्रत अधिकार लेखकाकडे असावा, किंवा मुक्त असावा.)
* विषय शिक्षणात्मक/माहितीपर असावा. शैली ललित असली तरी चालेल. पण मूळ आणि स्पष्ट उद्देश शिक्षणात्मक असावा.

समुदायाच्या नवीन सदस्याकडून लोकशिक्षणात्मक लेख येतील म्हणून शुभेच्छा.

"लोकमित्र" सदस्यनाम

हे सदस्यनाम मी नोंदवले आहे. या खात्यातून "लोकमित्र" संबंधी व्यवस्थापकीय प्रतिसाद देईन. वादविवाद वगैरे करणार नाही.

धनंजय

आमच्या स्वप्नातले संकेत

आमच्या स्वप्नातले संकेत आम्हालाच समजत नाहीत,कुणी ते समजाउन दे़णारा अजुन तरी भेटला नाही.मी जागेपणीच्या स्वनाबद्दल बोलतेय बरका!!

स्वप्नातच स्वप्न दिसावे - असे सर्व भास

१)आपण कळत्या -नकळत्या वयापासून कधीही न पाहीलेल्या वास्तु,इमारती,घरे,गड-किल्ले,रस्ते इत्यादी बाबी स्वप्नात का दिसतात?
- दिसत असतील पण नक्की आठवत नाही. मानवी मन अनाकलनीय आहे. प्रत्यक्षात पाहिलेल्या गोष्टींवर संस्कार करून त्यांचे विपर्यस्त स्वरूप दिसू शकते. हे निद्रावस्थेतच काय पण जागेपणीही होऊ शकते.

२)भगवान रजनीश यांनी वर्णन केलेली देजायू अवस्था हीच काय?
-देजावू ही अवस्था रजनीशांनी वर्णन केल्याप्रमाणे आहे म्हणजे काय? ते कळले नाही. जगातील सत्तर टक्के लोकांना 'देजा वू' होते. (संदर्भ : विकी)मलाही अनेकदा झालेले आहे.
पण 'देजा वू' आणि स्वप्ने यांच्यात खूपच फरक आहे.

३)याला वैद्न्यानिक आधार मिळेल काय?
-याला म्हणजे कशाला? स्वप्नांना? तो तर आहेच! (पहा : पुन्हा विकी) मनाचे भरकटणे - अनिर्बंध विचार करणे म्हणजेच स्वप्न. माझ्या मताप्रमाणे झोपेत विचारांवर ताबा ठेवणारी ज्ञानेंद्रिये बंद झाल्याने मानवी विचार स्वैर होतात. यावेळी शरीर 'झोपलेले' असले तरी मेंदू झोपलेला नसतो. रॅपिड आय मूव्हमेंट (आरईएम) स्लीप किंवा वेगवान चक्षू विस्थापन झोप या काळात पडलेली स्वप्ने जास्त बारकाव्यांची असतात. या काळात माणूस एका प्रकारे 'वेडाच' झालेला असतो म्हणाना! फक्त त्याचे शरीरावर नियंत्रण नसल्याने तो 'वेडाचार' करू शकत नाही.

४) याचा काही संकेतार्थ लावता येतो काय?
- याला काही संकेतार्थ असेल का? याबद्दल विश्वास ठेवणारे आणि न ठेवणारे या दोन्ही बाजूंकडून भरपूर संशोधन आणि दावे झालेले आहेत. माझ्या मताने तसे काही नसावे. आपल्याला प्यारालिसिस झाला आहे असे स्वप्न बर्‍याच लोकांना पडते. मलाही एकदोनदा पडलेले आहे. पण तो काही मला भविष्यात होणार्‍या प्यारालिसिसचा संकेत नव्हे. त्याचेही एक शास्त्रीय कारण आहे. (संदर्भः पुन्हा विकी)
परंतु तरीही विश्वास ठेवणारे लोक स्वप्नाचे अर्थ लावू पहातात, त्यात संकेत शोधतात हे नाकारता येत नाही.

स्वप्ने भविष्याचा संकेत देतात हे खरे असेल तर - लोकहो, सावधान! एका अणुबाँब स्फोटाचा 'अनुभव'(!!!) मी तीन-चार महिन्यांपूर्वी पहाटे पहाटे पडलेल्या स्वप्नात घेतला आहे. ते स्वप्न मला जसेच्या तसे आठवते. त्यावेळच्या संवेदना आणि विचार इतके खरे होते की जागे झाल्यावर बराच वेळ मी खरोखरच जिवंत आहे की मी जिवंत आहे हेच स्वप्नात पडलेले स्वप्न आहे असे वाटत होते.("स्वप्नातच स्वप्न दिसावे - असे सर्व भास!") ;)

५) पुनर्जन्मा सारख्या विचारांना यामुळे बळकटी मिळते काय?
- 'पुनर्जन्म' हा स्वप्नांपरता (वेगळा) विषय आहे. मुळात पुनर्जन्म असतो का? हाच वादाचा विषय आहे.

किंचित भर

या काळात माणूस एका प्रकारे 'वेडाच' झालेला असतो म्हणाना! फक्त त्याचे शरीरावर नियंत्रण नसल्याने तो 'वेडाचार' करू शकत नाही.

अशी करणारीही काही माणसे भेटावीत. झोपेत चालणारी, बोलणारी, ताडकन उठून समोरच्याला घाबरवणारी,वगैरे. ;-) पण ती जागेपणी यकदम नॉर्मल असतात.

अवांतरः

स्वप्ने भविष्याचा संकेत देतात हे खरे असेल तर - लोकहो, सावधान! एका अणुबाँब स्फोटाचा 'अनुभव'(!!!) मी तीन-चार महिन्यांपूर्वी पहाटे पहाटे पडलेल्या स्वप्नात घेतला आहे. ते स्वप्न मला जसेच्या तसे आठवते. त्यावेळच्या संवेदना आणि विचार इतके खरे होते की जागे झाल्यावर बराच वेळ मी खरोखरच जिवंत आहे की मी जिवंत आहे हेच स्वप्नात पडलेले स्वप्न आहे असे वाटत होते.("स्वप्नातच स्वप्न दिसावे - असे सर्व भास!") ;)

अमेरिकेत नव्हताना स्वप्नात तुम्ही? ;-) असो. झोपायच्या आधी पोलीसी, डिटेक्टीव सिरिअल्स आणि न्यूज चॅनेल्स पहाणे बंद करा. त्या ऐवजी श्रीदेवी, माधुरी, करिना यांचे चित्रपट बघा. (की हेच कारण ऍटमबॉम्बचा स्फोट होण्याचे असावे? -ह. घ्या)

माझे स्वप्न

माझे स्वप्न

स्वतः मला एक प्रकारचे स्वप्न वारंवार पडते. ते स्वप्न मी सत्त्यात अनुभविले नाही आणि ते अनुभविणे ह्या जन्मी तरी अशक्यप्राय आहे.

सदरील स्वप्नांत स्वतःला पंख फुटले असून स्वत: मुंबई, पुणे, चेन्नै आणि तिरुवनंतपुरम् इ. इ. तसेच आसपासच्या इलाख्यावरून घिरट्या घालतो आहोत ह्याप्रकारचे दृष्य दिसते. अवकाशांतून पाहिल्यास जसे दिसेल, अगदी तसेच दिसते. (वाचकांनी गूगल् अर्थ् वरिल नकाशे डोळ्यांसमोर आणावेत.) बराच काळ हे स्वच्छंदावकाशभ्रमण चालू असते आणि स्वतः उतरत उतरत खाली येतो आहोत असे वाटत असतांना अचानक निद्रानाश पावून स्वप्न संपते. विशेष म्हणजे जाग आल्यावर 'खूप वेळ उड्डाण केल्यावर' येतो तसा थकवा आलेला असतो.

सदरील स्वप्न मला पूर्वी दोन-चार दिवसांत एकदा ह्या गतीने पडावयाचे, ते आतांशा चार-सहा महिन्यांत एकदा ह्या वारंवारितेने पडते.

विषय निघालाच, म्हणून येथे अनुभव कथन केला. आमच्या मित्रमंडळींसमक्ष बोलतो, तर 'यंदाच्या जन्मीं वकील झालेला तूं मागच्या जन्मीं नक्की कावळा असावास, ग्यारण्टि आहे!' असे काहीवाही ऐकावयास मिळते! ;-)

हैयो हैयैयो!

सप्तरंगी स्वप्न

मराठी असे आमुची मायबोली
***********************************
श्री.हैयो हैयैयो! यांचे स्वप्न वाचून मला आश्चर्यच वाटले. कारण यांनी वर्णन केले आहे तसेच स्वप्न मला वारंवार पडत असे. सध्या क्वचितच पडते. स्वप्नात मला पंख फुटलेले दिसत नाहीत. मात्र हवेत सहजपणे तरंगत जातो. खाली रेल्वेस्टेशने दिसत नाहीत.डोंगर,दर्‍या, नद्या दिसतात.वर आकाशाकडे पाहिले तर सगळीकडे चमचमणारे सप्तरंग दिसतात.हा अनुभव विलोभनीय असतो. जाग आल्यावर स्वप्नातले अनुभव आठवण्याचा प्रयत्न करतो. तुटक तुटक आठवते. सगळे सलगपणे आठवत नाही.त्यामुळे निराश होतो. यावर आधारित एक कविता लिहिली होती.काही ओळी आठवतातः
....

कधी सप्तरंगी स्वप्नी, रमे अजाणता मन
....विरघळे सत्यसृष्टी नुरे स्थळकाळ भान | थिजे काळ क्षण क्षण|
....अशा स्वनिल सृष्टीला नित्य हरवे पापणी
....मन आक्रंदे आकांत करी बिंबित दर्पणी |खंड खंड जुळवुनी

वा

वा! भाग्यवान आहात असे म्हणेन.

अजून पुढे जाता येईल अशी खात्री आहे. आणि रस्ता पण नक्की आहे!
पण ते स्वप्न आठवण्याच्या मागे का लागता, तो तर फक्त मार्गावरचा एक दगड असावा असं वाटतं.

दर वेळी बुद्धी आणि तर्क वापरून जबाबदारी घेतलीच पाहिजे असे नाही. काही काळ 'आपली जबाबदारी' निसर्ग या व्यवस्थेवर पण सोडून पाहा ना... फार छान अनुभव आहे तो!
(आमच्या सारख्या सामान्यांच्या भाषेत देवावर...?)

आपला
'तसा' बेजबाबदार आणि निवांत
गुंडोपंत

 
^ वर