ग्रामदैवत

हिंदू शास्त्रांप्रमाणे तीन प्रमुख दैवतांची आराधना करण्याचा प्रघात आहे. या दैवतांची विभागणी पुढील प्रकारे - ग्रामदैवत, कुलदैवत आणि इष्टदैवत. प्रत्येक व्यक्तीसाठी या तिन्ही दैवतांची निवड त्या व्यक्तीच्या जन्मवेळीच होते. अर्थात, या लेखाचा हेतू कुलाचाराबद्दल नाही.

ग्रामदैवत या संज्ञेचा विचार केला असता माझ्या तुटपुंज्या ज्ञानाने मला असे आठवते की गावावर संकट येऊ नये म्हणून एखाद्या रक्षणकर्त्या देवाची किंवा देवीची स्थापना करून त्याचे मंदिर उभारायचे आणि गावातील सण, उत्सव या मंदिराच्या साक्षीने पार पाडायचे अशी पूर्वापार प्रथा आहे. हे दैवत पूर, दुष्काळ, भूकंप यांसारखी नैसर्गिक संकटे, रोगराई इ. पासून गावाचे रक्षण करते असा सर्वसामान्य समज असतो. अशा दैवताला ग्रामदैवताचा मान का मिळाला याबाबतही अनेकदा विविध कथा, आख्यायिका ऐकण्यास मिळतात. उदा.

रामायणातील सुंदरकांडात हनुमान लंकानगरीत प्रवेश करताना त्याची भेट साक्षात लंकादेवीशी होते. ती हनुमानाचा मार्ग अडवून उभी असल्याने हनुमान तिला आपली ओळख विचारतो. त्यावेळेस ती त्याला पुढील उत्तर देते.

अहं राक्षसराजस्य् रावणस्य् महात्मन:
आज्ञाप्रतीक्षा दुर्धर्षा रक्षामि नगरीमिमाम्॥ ५-३-२८

श्लोकाचा सर्वसाधारण अर्थ असा आहे की मी राक्षसराज रावणाच्या आज्ञा पाळते आणि या नगराचे पराजित होण्यापासून संरक्षण करते. यापुढील श्लोकांवरून असे दिसते की मुष्टीप्रहार करून हनुमान लंकादेवीचा पराभव करतो आणि त्यावर दु:खी होऊन लंकादेवी सांगते की ब्रह्मदेवाने मला सांगितले होते की ज्या दिवशी एक वानर तुझा पराभव करेल त्यानंतर लंकानगरी आणि राक्षसांचा पराभव अटळ आहे.

पौराणिक कथा सोडून इतिहासात पाहायचे झाल्यास ग्रामदैवताची अनेक उदाहरणे मिळतात. जसे, पुणे गाव नव्याने वसवताना जिजाबाईंनी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीची स्थापना केली. मुंबईचे ग्रामदैवत मुंबादेवी ही मूळ कोळी समाजाची देवता. मुंबादेवीचे मंदिर १७ व्या शतकात बांधले गेल्याचा पुरावा सापडतो.(नक्की काळाबद्दल अनेक मतप्रवाह दिसले. हे मंदिर सुमारे ६०० वर्षांपूर्वी बांधले गेल्याचेही वाचण्यास मिळते.) मुंबा हे महाअंबा या नावाचे भ्रष्ट स्वरूप असल्याचे सांगितले जाते. तसेच या मंदिराची स्थापना मुंबा नावाच्या स्त्रीने केल्याने त्याला मुंबादेवी असे नाव पडल्याची गोष्टही ऐकवली जाते.

एका आख्यायिकेनुसार मुंबारक नावाचा राक्षस गावातील नागरिकांना त्रास देत असे. त्याचा धुमाकूळ वाढत चालल्याने त्रस्त नागरिकांनी ब्रह्मदेवाची उपासना केली. प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने आपल्या दिव्यशक्तीने एका आठ भुजांच्या देवीची निर्मिती केली. या देवीने मुंबारकाचा नि:पात केला. पश्चात्तापदग्ध मुंबारकाने देवीला शरण जाऊन आपल्या नावाने तिचे मंदिर उभारण्याचा पण केला, आणि अशा रीतीने मुंबादेवी हे नाव आणि मंदिर अस्तित्वात आले.

शहरे वगळून जर लहान गावांकडे किंवा खेड्यांकडे वळले, तर ग्रामदैवताची संकल्पना थोडी बदलते. बरेच ठिकाणी अकाली आणि अनैसर्गिक मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे, नागाचे किंवा ज्या मूळ पुरुषामुळे गाव अस्तित्वात आले अशा व्यक्तीचे मंदिर स्थापले जाते. बर्‍याचदा अशी मंदिरे एखाद्या झाडाच्या पारावर, दगडांना शेंदूर लावून बनवलेलीही आढळतात.

प्रकार कसेही असोत, बाह्य आणि अंतर्गत दुष्ट शक्तींपासून त्या गावाचे किंवा नगराचे रक्षण करण्यासाठी आणि शत्रूच्या किंवा ग्रामस्थांच्या मनात एका प्रकारचे आदरयुक्त भय निर्माण व्हावे या हेतूने ग्रामदैवताची स्थापना केली जात असे. याच पार्श्वभूमीवर इतर संस्कृतींत ही प्रथा होती का याचा शोध घेतला असता, आग्नेय आशियातील बौद्ध संस्कृतीत ती होतीच, असे दिसते. याखेरीज पाश्चिमात्य संस्कृतींतही ती असल्याचे आढळते. या लेखात ग्रीक संस्कृतीतील एका ग्रामदैवताबद्दल थोडीफार माहिती लिहीत आहे.

अथेना ही बुद्धीचातुर्य, कला, संस्कृती आणि युद्धाची कुमारी देवता ग्रीसची राजधानी अथेन्स या शहराची ग्रामदेवता आहे. या शहराला अथेन्स हे नाव या देवतेवरूनच पडल्याचे सांगितले जाते. प्राचीन अथेन्समध्ये ख्रि.पू.५०० च्या सुमारास पार्थेनॉन या अथेनाच्या देवळाची स्थापना केली गेल्याचे सांगितले जाते.

ग्रीसमधील मूळ पार्थेनॉन मंदिर
ग्रीसमधील मूळ पार्थेनॉन मंदिर

ग्रीक कलाकुसरीचा अप्रतिम नमुना आणि अद्याप व्यवस्थित असणारी एक प्राचीन वास्तू म्हणून पार्थेनॉनला एक वेगळे महत्त्व प्राप्त आहे. पार्थेनॉनची रचना आयताकृती असून ८ स्तंभ x १७ स्तंभ अशा रचनेवर संपूर्ण मंदिर उभे आहे. हे मंदिर पूर्ण करण्यास सुमारे १६ वर्षांचा कालावधी लागल्याचे सांगितले जाते. फिडिअस नावाच्या शिल्पकाराने या मंदिराचे बांधकाम केल्याचे कळते.

अमेरिकेत टेनसी राज्यातील नॅशविल या शहरात पार्थेनॉनच्या मंदिराची पूर्णाकृती प्रतिकृती १८९७ साली बनवली गेली. या वास्तूला भेट देण्याचा हल्लीच योग आला. टेनसी राज्याच्या शताब्दीप्रीत्यर्थ या इमारतीची निर्मिती करण्यात आली होती. सध्या या इमारतीचा कलादालन म्हणून उपयोग केला जातो. अनेक ग्रीक शिल्पांच्या अप्रतिम प्रतिकृतींनी या इमारतीतील दालने सजलेली आहेत. सर्वात भव्य मूर्ती अर्थातच अथेनाची. पाश्चिमात्य जगतातील बंदिस्त आवारातील ही सर्वात मोठी मूर्ती गणली जाते.

नॅशविलचे पार्थेनॉन
नॅशविलचे पार्थेनॉन

मूळ मंदिरात असणारी अथेनाची मूर्ती फिडिअस या शिल्पकाराने संपूर्णत: सोन्यात आणि हस्तिदंतात बनवली असल्याचे परंतु ग्रीसवरील अनेक परकीय स्वार्‍यांत या मूर्तीची लूट केली गेल्याचे आणि कालांतराने मंदिराला लागलेल्या आगीत ती जळून खाक झाल्याचे सांगितले जाते. ऐतिहासिक अभ्यासावरून १९९० साली नॅशविलच्या प्रतिकृती मंदिरात सुमारे ४२ फुटांची अथेनाची मूर्ती स्थापन करण्यात आली आणि २००२ साली तिला सुवर्णवर्खाने सजवण्यात आले.

अथेना
अथेना

मूर्तीचे सर्वसाधारण वर्णन करायचे झाल्यास या मूर्तीच्या उजव्या हातात अथेनाची सहकारी ग्रीक देवता नाइकी (Nike) अथेनाच्या डोक्यावर चढवण्यासाठी विजयी मुगुट घेऊन उभी आहे. अथेनाच्या डाव्या हातात प्रचंड आकाराची ढाल असून त्यावर ग्रीक देव आणि दानव यांच्यातील युद्धाची चित्रे कोरलेली आहेत. तिच्या डाव्या खांद्यावर रेललेला भाला आणि पायाशी सर्प आहे. हा सर्प म्हणजे एरिकथोनिअस हा अथेनाचा मानसपुत्र. आपल्या ढालीमागे त्याला दडवून ती एरिकथोनिअसचे रक्षण करते असे सांगितले जाते. अथेनाच्या चिलखतावर मेडुसा या राक्षसीचे मुंडके लावलेले आढळते. ग्रीक पुराणांनुसार पर्सिअस या योद्ध्याला अथेनाने मेडुसाचा नि:पात करण्यात मदत केली होती. विजयी झाल्यावर पर्सिअसने ते मुंडके अथेनाला भेट दिल्याचे सांगितले जाते. अथेनाच्या ढालीवरही मध्यभागी हे मुंडके दाखवले आहे.

अथेनाची ढाल
अथेनाची ढाल

मूर्तीची वस्त्रे आणि आभूषणे सुवर्णवर्खाने मढवलेली आहेत. भाला, ढाल, सर्प आणि नाइकी देखील सुवर्णवर्खाने मढवलेली आहेत. अथेनाचा चेहरा त्यामानाने बराच भडक रंगवलेला दिसतो. याचे स्पष्टीकरण जवळच वाचता येते. अनेक पौराणिक कथा आणि पुराव्यांच्या आधारे मूर्तिकाराने मूर्तीला असे स्वरूप दिल्याचे सांगितले जाते.

अमेरिकेतील रहिवाशांना नॅशविलला जाण्याची संधी मिळाल्यास या अप्रतिम कलादालनाला जरूर भेट द्यावी.

*
*
*
*
*

अवांतर: या कलादालनात एका छायाचित्रकाराने काश्गर, चीन येथे काढलेली काही अप्रतिम प्रकाशचित्रे पाहण्यास मिळाली. पिवळ्या कांतीच्या आणि नाजूक शरीरयष्टीच्या चिनी लोकांपेक्षा बरेच वेगळे दिसणारे हे लोक, त्यांच्या भटक्या जमाती, जत्रा, गाढवांचा बाजार इ. ची अप्रतिम प्रकाश/छायाचित्रे येथे लावली होती. भारतातील कुशाण राजे याच भागातून आले होते. याशिवाय या कलादालनात अतिशय अप्रतिम तैलचित्रांचा समावेश आहे.

संदर्भसूची:
इंग्रजी विकिपीडियावर पार्थेनॉन
नॅशविलचे पार्थेनॉन
ग्रीक दैवते

खुलासा: वरील लेख परिपूर्ण असल्याचा दावा नाही. रामायणातील संस्कृत श्लोक जसा मिळाला तसा टंकित केला आहे. जाणकारांना या लेखात त्रुटी आढळल्यास सुधारणा करण्यास मदत करावी. लेखासंदर्भात इतर माहिती प्रतिसादांतून लिहावी अशी विनंती.

Comments

तुमचे लेख

प्रियाली,
तुमचे लेख नेहमी माहितीपुर्ण आणि महत्वाचे असतात. जगाची भ्रमंती करतांना त्याचा भारतीय संस्कृतीशी झोडलेला संबंध (किंवा हे उलटही म्हणू शकता) मला आवडतो. त्यामुळे मी इतरही संस्कृतीबद्दल वाचतो.
अश्या माहितीपुर्ण लेखांबद्दल धन्यवाद .

नीलकांत

सुरेख

अथेन्स आणि मेडूसाबद्दल वाचले होते, पण त्यांचा संबंध माहीती नव्हता. (बहुधा कॅम्पबेलच्या पुस्तकत मेडूसाचे चित्र आहे, नक्की आठवत नाही.) नाइकी आत्तपर्यंत फक्त पायात घातले होते, त्याचाही उगम कळाला. :)
छायाचित्रे आणि लेख दोन्हीही माहितीपूर्ण आहेत.
राजेंद्र

नाइकी

>> नाइकी आत्तपर्यंत फक्त पायात घातले होते, त्याचाही उगम कळाला. :)
ओह.. ते देवतेचे नाव आहे होय. मलाही आताच तुमच्या प्रतिसादाने त्याचा उगम कळला :)
-- (रिबॉक चे बुट वापरणारा) लिखाळ.

सुंदर लेख

भारतीय आणि ग्रीक संस्कृतींचा ऐतिहासिक वारसा आणि त्यांचा संबंध ह्या दोन्ही गोष्टी लेखात सुंदर रितीने उमटल्या आहेत.

शैलेश

छान

लेख आवडला. पार्थेनॉनच्या चित्रांमुळे एकदम सुंदर दिसतो आहे. आणि माहिती वाचूनही मजा आली.

हाऊ पर्सिअस किल्ड् मेड्यूसा..

माहितीपूर्ण लेख तर आवडलाच, पण् त्या निमित्ताने नववी की दहावीत असलेला इंग्रजीच्या पुस्तकातला 'हाऊ पर्सिअस किल्ड मेड्यूसा' हा धडाही आठवला...
सन्जोप राव

मेड्युसा

आम्हाला हा धडा अभ्यासक्रमात नव्हता पण वरच्या वर्गांना होता असे वाटते. शाळेतील एका खडुस बाईंना ही मुले मेड्युसा म्हणून चिडवायचे त्यावरून वाटते.

असो. या बाई आमच्या वर्गाला कधीच नव्हत्या. दगड होण्यापासून वाचलो.

उत्तम

प्रियालीताई,
लेख नेहमी प्रमाणेच उत्तम आणि माहितीपूर्ण आहे.

>> गावावर संकट येऊ नये म्हणून एखाद्या रक्षणकर्त्या देवाची किंवा देवीची स्थापना करून त्याचे मंदिर उभारायचे आणि गावातील सण, उत्सव या मंदिराच्या साक्षीने पार पाडायचे अशी पूर्वापार प्रथा आहे.
या वरुनसहज आठवले म्हणून सांगतो. गुहागर येथे देवाचा पाट या समुद्रकिनार्‍याला समांतर रस्त्यावर एक गणपतीचे मंदिर आहे. ते ग्रामदैवत आहे की नाही ते मला माहित नाही पण त्याची कथा अशी ऐकली की तो आधी पूर्वाभिमुख होता. पण किनार्‍यावर समुद्राचे अतिक्रमण होवू लागले. मग लोकांनी त्याची प्रर्थना केली आणि त्याने आपले तोंड समुद्राकडे केले. ते पाहून समुद्र घाबरुन मागे हटला. तो गणपती आता पश्चिमाभिमुखच राहिला आहे.

>> भारतातील कुशाण राजे याच भागातून आले होते.
भारतावर स्वार्‍या करणारे अनेक वंशाचे लोक कोठून कोठून आले होते ते एकदा सांगावे. या संबंधी लेख लिहावा अशी विनंती.
-- (इतिहासप्रेमी) लिखाळ.

सुवर्ण गुणोत्तर

सुवर्ण गुणोत्तर नावाचे (मिलिंद लिमये ? यांचे?) एक सुरेख मराठी पुस्तक आहे, ज्यात या शृखलेविषयी सुरेख माहिती आहे. हेच गुणोत्तर याच संरचनेत नव्हे तर ग्रीक संस्कृतीत इतरही अनेक ठीकाणी वापरले जात असे (जसे मानवी शरीरसौष्टवाचे ग्रीक मापदंड). याच पुस्तकात हे गुणोत्तर/शृंखला निसर्गात कुठे-कुठे आढळते याची ही रोचक माहिती वाचल्याचे मोघम आठवते.

~ तो ~

फाय

मिलिंद,

फायची संज्ञा फिडिअसच्या नावावरूनच घेतलेली आहे. पिरॅमिड्सचीही रचना तशीच आहे असे वाटते. इजिप्तचा मूळ स्थापत्त्यशास्त्रज्ञ इमहॉटेप (इमूतेफ) याच्यापासून अशी बांधणी करण्याची पद्धत होती असे वाटते. त्यामानाने पार्थेनॉन अलिकडील म्हणावे लागेल.

चू.भू.द्या.घ्या.

सुंदर लेख

आवडला

लय झ्याक लेख

लय झ्याक लेख,
खूप आवडला मला.
माझ्या गावच्या काळम्मा देवीची आठवन आली.

आपल्या समद्यांचा मैतर
(गावरान)रम्या

सुंदर आणि नेटका

सुंदर आणि नेटका लेख. ग्रीको-रोमन देवतांबद्दल अधिक माहिती मराठीत वाचायला आवडेल. वैदिक देवसमूह आणि ग्रीक देवसमूह ह्यांत काही समानता आहेत. जसे 'थोर'(टीएचओर) आणि 'रुद्र'. त्याबद्दलही कुणी लिहिल्यास चांगले.

थॉर/ थोर - फ्रेया

थॉर हा नॉर्स देव, इंग्रजी दिवस Thursaday ला याच्यावरूनच नाव दिलेले अहे.

यावरून आठवले की काही वर्षांपूर्वी एका गोर्‍या गृहस्थाला ओळख करून दिल्यावर त्याने मला विचारले की "तुम्ही हिंदू असूनही तुमचे नाव फ्रेया कसे? फारच चकित झालो मी. तुमच्या आई वडिलांचे कौतुक वाटते." :)))))
खरेतर चकित मी झाले होते कारण या माणसाने ऐकण्यात चूक केली तरी तो ज्या आत्मविश्वासाने बोलत होता त्यावरून फ्रेया हे नाव प्रचलित असावे का असे वाटून गेले. त्यानंतर शोधले असता ते नॉर्स देवतेचे नाव असल्याचे कळले. त्यानंतर नॉर्स पुराणांवर वाचन केले होते. पुढे कधीतरी एखादा लेख टाकण्याचा प्रयत्न करेन.

फारच छान!

प्रियाली हीस,
लेख अभ्यासपुर्ण व मनापासुन लिहीलेला वाटला. खूप नवीन माहिती मिळाली.कौतूक!

ठीक..

लेख ठीक वाटला...

तात्या.

आभार

लेख आवडल्याबद्दल सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांचे आभार.

राजेंद्र

बहुधा कॅम्पबेलच्या पुस्तकत मेडूसाचे चित्र आहे, नक्की आठवत नाही

आहे. आहे. :) मी अजून तेथपर्यंत पोहोचले नाही. दोन चार पाने वाचली की डोळे आपोआप मिटतात पण जबरदस्त माणूस आहे. कोणत्या गोष्टीचा इतर कोणत्या गोष्टींशी संबंध लावेल ते कळणे अवघड. प्रचंड व्यासंग आहे.

लिखाळ
ग्रामदेवतेच्या तुमच्या छोट्याशा भरीबद्दल विशेष आभारी आहे.

भारतावर स्वार्‍या करणारे अनेक वंशाचे लोक कोठून कोठून आले होते ते एकदा सांगावे.

म्हणजे आर्य कोठून आले पासून सुरुवात केली तर वाद जास्त होतील :) त्यापेक्षा प्राचीन परकीय प्रवाशांवर लिहीता येईल.

पुन्हा एकदा धन्यवाद.
प्रियाली.

माहितीपूर्ण

लेख माहितीपूर्ण आहे.
आमच्या कडे लहानपणी एक तार्‍यांचे रशियन पुस्तक होते. (काहीतरी 'दुर्बिणीतून' असे नाव होते.) त्यात मेड्यूसाचा उल्लेख केसांच्या जागी साप असलेली दुष्ट स्त्री असा वाचल्याचा आठवतो.

आवडला/शंका

लेख आवडला. कधी टेनसीमध्ये जाणे झाले तर ह्या वास्तूला जरूर भेट फदेण्याचे करीन. अथेबनाची, तसेच भारतीय ग्रामदेवतांविषयीची माहिती मिळाली.

लेखामध्ये पुढील वाक्य आहे -" मूळ मंदिरात असणारी अथेनाची मूर्ती फिडिअस या शिल्पकाराने संपूर्णत: सोन्यात आणि हस्तिदंतात बनवली असल्याचे परंतु ग्रीसवरील अनेक परकीय स्वार्‍यांत या मूर्तीची लूट केली गेल्याचे आणि कालांतराने मंदिराला लागलेल्या आगीत ती जळून खाक झाल्याचे सांगितले जाते. "
शंका - सोन्याची मूर्ती असूनही जळून खाक कशी झाली? लूट झाल्याचे समजू शकते.

लेखामध्ये असेही वाक्य आहे - "ग्रीक कलाकुसरीचा अप्रतिम नमुना आणि अद्याप व्यवस्थित असणारी एक प्राचीन वास्तू म्हणून पार्थेनॉनला एक वेगळे महत्त्व प्राप्त आहे. "
शंका - मंदिराला कालांतराने आग लागली होती, तरी मंदिराची वास्तू अद्याप व्यवस्थित कशी राहिली?

उत्तर

ग्रीसवरील अनेक परकीय स्वार्‍यांत या मूर्तीची लूट केली गेल्याचे आणि कालांतराने मंदिराला लागलेल्या आगीत ती जळून खाक झाल्याचे सांगितले जाते.

जेव्हा तिची लूट केली गेली तेव्हा त्यावरील सर्व सोने लुटले गेले. सांगितले जाते की नंतर ब्राँझ धातूत तिची वस्त्रे आभूषणे तयार केली गेली. परंतु स्वार्‍यांमध्ये मूळ मूर्तीची हानी करण्यात आली होती.

मंदिराला आग लागली किंवा लावली त्यावेळेस विजयाच्या मदात* मूर्तीची नासधूस केली गेल्याचाही संभव आहेच, तरी मंदिराची मूळ वास्तू पक्क्या दगडांची असल्याने सुरक्षित राहिली असावी. शनिवारवाड्याचे उदाहरण बहुधा असेच आहे असे वाटते. वाड्याला आग लागली तरी लाकडी नगारखाना आणि सज्जे आढळतात आणि दगडी वास्तू ठीकठाक आहे. (शनिवारवाड्याचे उदा. सहजच आठवले म्हणून दिले. संदर्भ तपासलेले नाहीत. चूक असल्यास क्षमस्व!)

* हे बहुधा ग्रीकांचे स्पार्टाशी युद्ध झाले तेव्हा घडले असे वाटते. अधिक माहिती विकिच्या दुव्यावर निश्चित मिळेल. मलाही खोलात वाचावी लागेल.

अप्रतिम

आपला लेख खुप आवडला,

आजहि कोकणातल्या प्रत्येक गावात ग्रामदेवतेला प्रथम मान असतो.

धन्यवाद

लेख आवडला...

तपशील आणि शैलीही सुंदरच आहे. शीर्षकामुळे घरची आठवण मनात दाटून आली. धन्यवाद!

ग्रामदेवतेबद्दलचा लेख

लेख माहितीपूर्ण आहे.छान!

लेख् थोडा अभ्यास् पुर्ण असता तर् बरे झाले असते

लेख् थोडा अभ्यास् पुर्ण असता तर् बरे झाले असते.
भारतिय संस्क्रुतीमध्ये ग्राम देवता मुख्यतः भैरोबा / सटवाई / मरीआई असतो/असते.
सिंधुदुर्गा मधे वेतोबा आहे. भैरव् हा शिवा चा उपासक् / सेनानी मानला जातो
या सर्वामध्ये ही ग्राम देवता या आर्य / वैदीक् संस्क्रुती मधल्या काधीच् नव्हत्या. ग्रामदेवता बहुतेक् वेळा शैव् पंथाच्या असतात्. त्या ब्राम्हणेतरांकडुनच् पूजल्या जातात्. देवतांचे मुखवटे ओइतळी असतात्. देवता बहुतांशी मांसाहारी असतात्.
पुजारी हे गुरव् वगैरे जमातीचे असतात्
महाबळेश्वर् मध्ये ग्राम् दैवत् हे अतीबळेश्वर् आहे.जुन्या महाबळेश्वर् मधे त्याचे मंदीर् आहे.
ग्राम दैवाताचे मोठे मंदीर् असण्याचे हे तसे दुर्मीळ् उदाहरण्
ग्राम दैवतांचे आणखी एक् वैशिष्ठ्य् म्हणजे मूर्ती...या मूर्ती कधीच् त्रिभंग् दुभंग् अशा प्रकारत् आढळत् नाहीत्. त्यांचे आभुशण्/वस्त्रे सुद्धा साधी असतात्. शिल्प् कला फारशी नसते. बहुतेक् वेळा तर् छोटासा दगड् असतो.

अभ्यासपूर्ण लेख वगैरे

खुलासा: वरील लेख परिपूर्ण असल्याचा दावा नाही. रामायणातील संस्कृत श्लोक जसा मिळाला तसा टंकित केला आहे. जाणकारांना या लेखात त्रुटी आढळल्यास सुधारणा करण्यास मदत करावी. लेखासंदर्भात इतर माहिती प्रतिसादांतून लिहावी अशी विनंती.

लेखाच्या शेवटी येणारे डिस्क्लेमर कृपया वाचत जावे. लेख परिपूर्ण असल्याचा दावा नाही. आपल्याकडे अतिरिक्त माहिती असल्यास देत जावी. तिचे स्वागतच होईल.

असो, पुरवलेल्या माहितीबद्दल अनेक धन्यवाद.

प्रतिसादात

प्रतिसादात इतक्या शुद्धलेखनाच्या चुका नसत्या तरी बरे झाले असते
----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

 
^ वर