कुमारी देवी

आज नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी अचानक ही बातमी वाचण्यास मिळाली. ही गोष्ट यापूर्वीही वाचली असली तरी आज पुन्हा नव्याने वाचतानाही तेवढाच खेद वाटला. तिचा दुवा येथे चिकटवत आहे.

http://www.news.com.au/heraldsun/story/0,21985,24467194-663,00.html

कुमारी देवीची प्रथा नेपाळात फार प्राचीन नसल्याचे सांगितले जाते. सुमारे १२ व्या ते १७ व्या शतकांदरम्यान कधीतरी ही प्रथा अस्तित्वात आली. आख्यायिकेनुसार नेपाळी राजाशी दुर्गास्वरुप देवता खाजगीत सारिपाट खेळण्यास येत असे. याचा पत्ता कोणालाही नव्हता. एकदा राणीला कुणकुण लागल्याने तिने राजावर पाळत ठेवली आणि राजाला भेटायला देवी आल्यावर ती सामोरी गेली. याप्रकाराने देवी क्रोधित झाली आणि तिने राजाची कानउघडणी केली. लुप्त होण्यापूर्वी तिने राजाला सांगितले की जर राजाला तिला पुन्हा भेटायची इच्छा झाली तर ती शाक्य समाजात सापडेल. (गौतम बुद्ध हा शाक्य होता)

तेव्हापासून शाक्य समाजातील लहान मुलींना त्यांचा मासिक धर्म येण्यापूर्वी कुमारी देवी म्हणून निवडले जाते. दलाई लामा किंवा पंचेन लामा यांचा शोध घेताना जसे प्रयत्न केले जातात त्याप्रमाणेच ही देवी शोधण्यासाठीही अनेक विधी, प्रयत्न करावे लागतात आणि अनेक अटींची पूर्तता करावी लागते जसे -

तिची पत्रिका तपासली जाते. या मुलीला कधीही शारिरीक जखम झालेली नसली पाहिजे. तिचे दात पडलेले नकोत. ते २० असायला हवेत. तिचा आवाज, चालणे, बोलणे, केस, डोळे, शरीर अशी बत्तीस लक्षणे तपासली जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तिला अंधाराची भीती नाही हे तपासले जाते आणि मग तिची सर्वात कठिण परीक्षा घेतली जाते. कुमारी मातेच्या मंदिराच्या प्रांगणात रेडे आणि बोकडांचे बळी देऊन रात्रीच्या वेळी त्यांच्या मुंडक्यांवर दिवे लावून मुखवटेधारी व्यक्ती नृत्य करतात आणि या ठिकाणी या लहान मुलीला एकटे सोडले जाते. ती घाबरली नाही तर तिला नंतर संपूर्ण रात्र या बळी दिलेल्या प्राण्यांच्या मुंडक्यासमवेत घालवावी लागते. ही मुलगी न घाबरता, न रडता तिथे रात्रभर राहीली तर कुमारी देवी म्हणून तिची निवड होते.

kumari devi

यानंतर तिला कुटुंबापासून वेगळे, कुमारी देवीच्या मंदिरात ठेवले जाते. तिच्या कपाळावर देवीचा तिसरा नेत्र आरेखला जातो. तिची पूजा केली जाते. लोक कुमारीचौकात गर्दी करून तिचे दर्शन घेतात. दर्शन घेताना तिच्या पाया पडतात. दर्शनाच्या वेळेस देवीचे लहान मुलीसारखे वागणे जसे, टाळ्या वाजवणे, हसणे, रडणे, ओरडणे, आणलेल्या नैवेद्याकडे आशेने पाहणे भक्तांवर संकटे आणते असा समज आहे. या उलट, देवीने शांतपणे नमस्कार, नैवेद्याचा स्वीकार केला तर देवी पावते असा समज आहे. चांगली वस्त्रे, कपडे, मान या वातावरणात वाढणार्‍या मुलींना मासिकपाळी आल्यावर देवी त्यांचे शरीर सोडून जाते आणि या सर्व सुखसोयींपासून त्यांना अचानक वंचित व्हावे लागते.

यानंतर त्यांना दरवर्षी सरकारी मानधन मिळते परंतु अचानक आलेल्या बदलामुळे बर्‍याच मुली सामान्य जीवनाला रुळू शकत नाहीत. त्यांना नंतर लग्न करता येत असले तरी त्यांच्याशी लग्न करणारा माणूस वर्षभरात मरण पावतो असा समज अस्तित्वात आहे. (अनेक कुमारी देवींची लग्ने झाल्याचा दाखला विकिवर मिळतो) पुन्हा एकदा नव्याने देवीचा शोध सुरु होतो.

यापूर्वीची कुमारी देवी सजनी शाक्य मोठी झाल्याने तीन वर्षांच्या मतिना शाक्यची निवड करून कुमारी देवीची स्थापना करण्यात आली आहे.

हा सर्व वृत्तांत वाचताना एक प्रकारे विचित्र खेद होतो. या मुलींचे बालपण कोमेजून टाकून त्यांच्या तारुण्याशीही कळत-नकळत खेळ केला जातो. इतर अनेक धर्म आणि पंथातही कोवळ्या वयांत मुलांना देव, देवता, संन्यासी, साधू, आजन्म ब्रह्मचारी करणे होत आले आहे. ज्या वयांत निर्णय घ्यायची क्षमता नसते, चांगल्यावाईटाची जाण नसते, आपली आवड-निवड ठरवायची जाणीव नसते त्या वयांत दुसर्‍यांनी माथी मारलेले निर्णय घेऊन जगायची शिक्षा त्यांच्या माथी मारणे आणि इतर मुलांना मिळणार्‍या बाल्यापासून त्यांना वंचित ठेवणे हे सहजी पटणारे नाही. नवरात्रांत कन्यापूजा नावाचा जो प्रकार चालतो त्यात लहान मुलींच्या पाया पडणे, त्यांच्याकडून आशिर्वाद मागणे, त्यांना प्रसाद चढवणे असे प्रकार केले जातात. कुठेतरी आपण त्या उमलणार्‍या फुलांवर आपण हा प्रकार लादत असतो का? असे प्रकार, प्रथा केवळ समाजातील अशिक्षित समाजात होत असतील असे वाटत असल्यास आवर्जून सांगावेसे वाटते की कन्यापूजा ही अमेरिकेतही देवळांदेवळांतून चालते. चांगली सुशिक्षित, अतिउच्चशिक्षित माणसे लहान मुलींना रांगेत बसवून त्यांच्या पाया पडून, त्यांच्या हातात डॉलर्स कोंबताना आणि आशीर्वाद मागताना अनुभवले आहे.

अधिक माहिती:

http://en.wikipedia.org/wiki/Sajani_Shakya
http://hinduism.about.com/cs/godsgoddess/a/aa090903a.htm

चित्र http://solidaritynepal.org वरून साभार.

लेख फारच घाईत लिहिला आहे. काही संदर्भ चुकले असल्यास चू. भू. दे. घे.

Comments

माता

देवीला माता असेही म्हटले जाते. त्या न्यायाने ही 'कुमारी माता ' देखील होउ शकते. समाजातल्या कुमारी मातांचा प्रश्न या निमित्ताने आठवला. जैन साध्वींना निसर्ग धर्मा विरुद्ध वागावे लागते त्याचे परिणाम् काय होतात हे अधुन मधुन वर्तमान पत्रातल्या बातम्यांवरुन समजते.
प्रकाश घाटपांडे

नवीनच

नवीनच माहिती कळली. धन्यवाद...

श्रद्धेपुढे कसले शिक्षीत आणि अशिक्षीत..

कुमारीमाताबद्दलचा लेख माहितीपूर्णच. शेवटच्या उता-यातील भावनेशी सहमत आहे. अजूनही काही रुढी,परंपरा, यांचा विचार करता जग विज्ञानाकडे कितीही वेगाने जाऊ दे, तेव्हाच त्याचा उलटा प्रवास सुरुच असतो. श्रद्धेपासून दूर होता येत नाही. त्याचे उत्तम उदा. म्हणजे कुमारीमाता असावे. वरील लेखन वाचतांना वाघ्या-मुरळीची आठवण झाली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाघ्या-मुरळीबद्दल

जरा विस्तृत लिहाल का सर? मला फारशी माहिती नाही. या निमित्ताने ती तुमच्याकडून घेता येईल.

वाघ्या-मुरळीबद्दल...

वाघ्या-मुरळीबद्दल बुरुटेसर लिहितीलच, पण तत्पूर्वी...
कीर्तनाखालोखाल गायनाची, विशेषत: लोकसंगीताची परंपरा चालवणारे लोक म्हणजे वासुदेव, गोधळी, भुत्या, भराडी, पोतराज, जोगती आणि वाघ्यामुरळी, वगैरे होत. वासुदेवाच्या मुखी रंगणारी गाणी विविध प्रकारची आहेत. त्यांतली काही भक्तीचा महिमा रंगवणारी आहेत तर काही बालकृष्णाचे चरित्र सांगणारी आहेत. गोंधळी हा आबालवृद्ध श्रोत्यांना रंजविण्यासाठी कृष्णलीला, गौळणी, पोवाडे अशी विविध प्रकारची गीते आकर्षक पद्धतीने गातो. भुत्या सर्वत्र हिंडतो व तुळजापूरच्या आई भवानीची गाणी तन्मयतेने गातो. भराडी हा अनेक पुराणकथा व लोककथा गीतबद्ध करून लोकांना सांगतो. पोतराजाची गाणी ही मरीआईची किंवा महालक्ष्मीची असतात. याशिवाय त्याच्या पाठांत काही कथात्मक गीतेही असतात. पार्वती भिल्लीण झाली ही कथा त्यांत नेहमी असते. जोगती आणि जोगतिणी हे यल्लमाचे उपासक आहेत. त्यांच्या गीतांत यल्लमाचे माहात्म्य सांगणारी अनेक गीते असतात. वाघ्या-मुरळीच्या तोंडी शाहिरी ढंगाची गाणी असतात. ते प्रामुख्याने खंडोबाची गीते गातात. त्यांत खंडोबा व बाणाई यांच्या शृंगाराची गाणीही असतात.-- वाचक्‍नवी

मुरळी

वाचक्नवी यांनी बरेच लिहिले आहे. तरीही विषयाच्या अंगाने जरासे विषयांतर पण मुरळीबद्दल माहिती असलेले लिहिण्याचा प्रयत्न करतो. 'मुरळी' ही देवदासांच्या वर्गातील खंडोबाची उपासिका . मुरळ्यांना देवसेवेत राहून अविवाहित जीवन घालवावे लागते. अशा मुरळ्यांवर दारोदार भटकंती आणि अनेक संकटांना सामोरे जावे लागते. नवस करणे आणि मूल देवाला सोडण्यामुळे आयुष्याचे मातेरे होणारे लोकजीवनापैकी एक वाघ्या-मुरळी.

एखाद्याला मूल होत नसले म्हणजे तो खंडोबाला नवस करतो. ''देवा, खंडेराया, तू माझा नवसाला पावला तर मला होणारे मूल तुझ्या सेवेला अर्पण करेन.'' खंडोबाला अर्पण केलेल्या मुलाला 'वाघ्या' आणि मुलीला 'मुरळी' म्हणतात. कधी-कधी विवाहित स्त्रियाही नवसाने किंवा आपल्याला खंडोबाची बायको होण्याचे स्वप्न पडल्याने खंडोबाला आत्मसमर्पण करतात.

मुलीला मुरळी बनविण्याचा विधी जेजुरीला खंडोबाच्या देवळात करतात. मुलीला सजवून, कवड्याची माळ गळ्यात घालून भाल्यासारखा आणि त्याला झेंडा लावलेला असतो त्याला वरमाला घातली की ती मुरळी बनते. मुरळीला नंतर कोणाबरोबर लग्न करता येत नाही. कधी तरी पुढे 'वाघ्या' बरोबर 'मुरळी' ला पाठवण्यात येते. वाघ्या-मुरळी यांनी बहिण भावाप्रमाणे राहायचे असते. जागरण, गोंधळ करुन खंडोबाची सेवा करायची. कधी-कधी वाघ्याबरोबर मुरळीचे सूत जमते त्यांना मुलेबाळेही होतात ( चूभुदेघे)

देवाला सोडलेल्या या लोकांना हालाखीचे जीवन जगावे लागते. देवाची माणसे पण प्रचंड ससेहोलपट. अजाण-अज्ञान वयाच्या मुलामुलींना अशा प्रकारे जगायला लावणे म्हणजे त्यांच्या आयुष्याशी कृर थट्टा वाटते. कुमारीमातासारखे त्यांना खूप काही पैसे वैगरे मिळत नाही. इतकेच आपल्या लेखनावरुन आठवले होते बाकी काही नाही.

धन्यवाद

वाघ्या-मुरळीबद्दल जुजबी माहिती मला होती. विशेषतः मला वाटत होते की वाघ्या-मुरळी ही नवराबायको असतात परंतु, वाघ्या-मुरळी यांनी बहिण भावाप्रमाणे राहायचे असते. हे मला माहित नव्हते.

अशा उपेक्षित कलावंत आणि उपासकांबद्दल एखादा विस्तृत लेख लिहावा.

कुमारी देवी

कुमारी देवीबद्दल आधी ऐकले/वाचले होते. टिव्ही वर कधीतरी लहान दलाई लामा व नेपाळमधे कुमारी देवी पहाताना हे त्यांच्या इच्छेविरुद्धचे आयुष्य तर नव्हे हा विचार आला होताच.

पण बहुदा जेथे गरीबी आहे, बोकाळलेली धार्मीक श्रद्धा आहे तेथे कुटुंबाचे पालनपोषण करायला कोणाचा न कोणाचा बळी जाणारच. कधी उंटाच्या शर्यतीत पाठीवर किंचाळायला, कधी म्हातार्‍या माणसाशी लग्न करायला, कधी देवदासी, वारांगना बनुन त्याग करायला कोणतरी कुमार देव व देवी बनुन देवत्व मिळवणारच.

अरेरे

वाचून वाईट वाटले..
त्यातही विकीवरचा विदा दर्शवतो की १९७८ आधीच्या कुमारी देवींची व्यवस्थित लग्ने, मुले झालेली आहेत मात्र नंतरच्या एकाहि नाहि. काहि धार्मिक प्रथांना गेल्या २५ वर्षात जो व्यावसायिक आयाम आला आहे त्याचा हा परिणाम वाटतो. धार्मिक विधी/सण/जत्रा/पालख्या/वार्‍या हळूहळू आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून पाहिल्या जाऊ लागल्या आहेत.
एके काळी ब्राह्मण-बडवे याच अर्थकारणामुळे देवाला व्यापून होते परंतू तेव्हा त्यांचे पोट त्यावर अवलंबून होते. आता आधुनिक बुआ, बाबा, मठ यांचे पोट नव्हे तर हाव हे सगळं करवते आहे असे वाटते.

माझ्या शेजारच्या आजी आता इथे आल्या होत्या त्या सांगत होत्या जेव्हा ५०-५२ मधे नेपाळला गेल्या होत्या तेव्हा ही कुमारीदेवी मस्तपैकी काचापाणी खेळत होती. :) आणि तिचं हल्ली असतं तस प्रस्थ नव्हतं.

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

प्रस्थ

माझ्या शेजारच्या आजी आता इथे आल्या होत्या त्या सांगत होत्या जेव्हा ५०-५२ मधे नेपाळला गेल्या होत्या तेव्हा ही कुमारीदेवी मस्तपैकी काचापाणी खेळत होती. :) आणि तिचं हल्ली असतं तस प्रस्थ नव्हतं.

हे खरेच असावे. तू म्हणालास तसे पूर्वी यांची लग्ने होत असत पण नंतर अचानक हे थांबल्यासारखे वाटते. मला इतर अनेक बातम्यांत या मुलींची लग्ने आता होत नाहीत असा विदा मिळाला आणि विकिवर पूर्वी होत असत असा. आधुनिक काळात हा उलटा बदल का होत गेला याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे असे वाटते.

कुमारीपूजा

>>असे प्रकार, प्रथा केवळ समाजातील अशिक्षित समाजात होत असतील असे वाटत असल्यास आवर्जून सांगावेसे वाटते की कन्यापूजा ही अमेरिकेतही देवळांदेवळांतून चालते. चांगली सुशिक्षित, अतिउच्चशिक्षित माणसे लहान मुलींना रांगेत बसवून त्यांच्या पाया पडून, त्यांच्या हातात डॉलर्स कोंबताना आणि आशीर्वाद मागताना अनुभवले आहे.<<
हे माहीत नव्हते. ही प्रथा अमेरिकेतील हिंदू समाजात आहे की अन्य? हिंदू असतील तर कन्यापूजा करणारे हे भारतातल्या कुठल्या प्रांतातले असतात?
कुमारिकांचे पूजन करणे हा शक्तीपूजेचा प्रकार आहे. चैत्र शुद्ध तृतीयेपासून वैशाख शुद्ध तृतीयेपर्यन्त गौरीपूजा असते. चैत्र शुद्ध षष्ठी ही अशोकषष्टी समजतात. ज्येष्ठ शुद्ध ६बंगालमध्ये आणि दक्षिणी व पश्चिमी भारतात पाळतात. या दिवशी मुलांची प्राप्ती व्हावी म्हणून स्त्रिया षष्ठीदेवीची पूजा करतात. प्रत्येक मूल जन्माला आल्यानंतर ५व्या किंवा६व्या दिवशी सठीची पूजा प्रत्येक समाजात आहे. वैशाख शुद्ध ९मीला बंगाली स्त्रिया सीतेची पूजा करतात. पश्चिमी भारतात पौष शुद्ध ६ खस षष्ठी म्हणून पाळतात. ही मुलांचे आजारांपासून रक्षण व्हावे म्हणून तर देवीव्या आजारांपासून रक्षण व्हावे यासाठी (गुजराथमध्ये) पाळली जाणारी श्रावण कृष्ण सप्तमी (सीतला सप्तमी) आणि फाल्गुन कृष्ण अष्टमी ही उत्तरी भारतातली सीतला अष्टमी. माघ शुद्ध षष्ठी ही सीतला षष्ठी. शिवाय रंभा तृतीया, राधाष्टमी, अन्नपूर्णाष्टमी, कालीपूजा, हरितालिका, भवान्युत्पत्ति तिथी, दुर्गापूजा, ६४ योगिनींची पूजा, श्रीपंचमी, मनसापंचमी, ललितापंचमी , चंपाषष्ठी, होलिकापूजा, सरस्वती/शारदा पूजा, लक्ष्मीपूजन, इत्यादी दिवशी देवींची निनिराळ्या स्वरूपात पूजा केली जाते. कवि जयदेव, स्वामी रामानंद, कबीर, विद्यापति, चंडिदास वगैरे कवी आणि स्वामींनी लोकांचे मन या विविध शक्तिपूजांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्‍न केला. आणि त्यामुळेच या पूजा आता तुरळक स्वरूपातच आढळतात. नेहमीच्या चाकोरीबद्ध आयुष्यात काही आनंद आणि विरंगुळा या पूजांपासून मिळतो येवढाच स्त्रियांना त्यांचा फायदा.
महाराष्ट्रात आश्विन शुद्ध पंचमीला म्हणजे ललिता पंचमीला कुमारिकांना घरी बोलावून त्यांची पूजा केली जाते. पण महाराष्ट्रातल्या या प्रथेत टीका करण्यासारखे काही फारसे नाही. या निमित्ताने लहान मुली घरात येऊन काहीतरी आनंद देऊन आणि घेऊन जातात. ----वाचक्‍नवी

प्रथा

ही प्रथा अमेरिकेतील हिंदू समाजात आहे की अन्य? हिंदू असतील तर कन्यापूजा करणारे हे भारतातल्या कुठल्या प्रांतातले असतात?

ही प्रथा मला हिंदू समाजात असल्याचे माहित झाले कारण पाडव्याआधी येणार्‍या नवरात्रीतील विकेन्डला काही वर्षांपूर्वी आम्ही देवळांत गेलो असता आमच्या कन्येला खेचून कोणीतरी घेऊन गेले आणि तिला पूजेला बसवण्यात आले. (माझ्या धार्मिक बाबींतील अत्यल्प ज्ञानामुळे हे काय सुरु आहे ते मला चटकन कळले नाही आणि विचारणा करेपर्यंत पोरीच्या हातात डॉलर्सची गठ्ठी जमली होती) मोठमोठे ६०+ वयाचे डॉक्टर्स आणि कं. डायरेक्टर्स वगैरे पोरींच्या पाया पडताना पाहून चकित व्हायला झाले.

ही मंडळी उत्तर भारतीय होती. (हे सरसकट विधान आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सर्व भाग उत्तर भारत- गुजराथ, म. प्रदेशसकट असे मानून) यांतील काही कुटुंबे मूळ दिल्लीकर होती हे निश्चित.

महाराष्ट्रात आश्विन शुद्ध पंचमीला म्हणजे ललिता पंचमीला कुमारिकांना घरी बोलावून त्यांची पूजा केली जाते. पण महाराष्ट्रातल्या या प्रथेत टीका करण्यासारखे काही फारसे नाही. या निमित्ताने लहान मुली घरात येऊन काहीतरी आनंद देऊन आणि घेऊन जातात.

केवळ असे होत असेल तर त्यास कोणाचा आक्षेप असावा असे वाटत नाही. लहान मुलींना हा प्रकार आवडण्यासारखाच आहे. त्यानिमित्ताने त्यांना खाऊ, पैसे मिळत असतील तर मज्जाही आहे.

नाही

कुमारीमातेबद्दल वाचून वाईट वाटले. पण वर म्हटल्याप्रमाणे -
"महाराष्ट्रात आश्विन शुद्ध पंचमीला म्हणजे ललिता पंचमीला कुमारिकांना घरी बोलावून त्यांची पूजा केली जाते. पण महाराष्ट्रातल्या या प्रथेत टीका करण्यासारखे काही फारसे नाही. या निमित्ताने लहान मुली घरात येऊन काहीतरी आनंद देऊन आणि घेऊन जातात"

हे खरे आहे, मी लहान असताना अनेकदा शेजारी मराठी कुटुंबांमध्ये या पूजेला जात असे. वर म्हटल्याप्रमाणे त्यात खूप मजा असायची, मोठी बाई पाया पडते याची गंमत वाटे आणि अगदी रूपया-वगैरे मिळत असे. छान वासाचे गजरेही. सगळ्या घरांमध्ये ही प्रथा नव्हती, पण एक कुटुंब ती अगदी नेहमी पाळी. कुटुंब मराठीच होते.

वाईट वाटते

माझ्या घराशेजारी "कुमारी रेस्टॉरंट" नावाची नेपाळी खानावळ आहे. त्यांच्या मेनूकार्डावर या प्रथेबद्दल थोडासाच पण प्रशंसात्मक मजकूर आहे. कुतूहल वाटले म्हणून मी अधिक वाचले, आणि मुलीचे बालपण गुदमरत असावे असे मला वाटले.

खरे म्हणजे मला तिबेटी लामा प्रथेबद्दलही असेच वाटते. पण मुलग्यांना मासिक पाळी येत नसल्यामुळे लामापद आयुष्यभर टिकते. त्यामुळे हरपलेले बालपण फारतर राजघराण्याच्या युवराजाचे (प्रिन्स विल्यम, हॅरी, वगैरे यांचे) हरपते तितकेच.

बोडणासाठी लहान मुलीला काही दिवसांसाठी देवी करतात, ती गंमत असते. त्यावरून फारतर असे दिसते, की लहान मुलीत जिवंत देवी बघण्याची इच्छा सार्वत्रिक आहे. मुळात क्रूर नाही. त्या मुलीच्या आयुष्यात किती दूरगामी ढवळाढवळ होते, त्याच्यावर "क्रौर्य की मजा" हा निर्णय करावा.

([किती तात्कालिक मजा? किती दूरगामी परिणाम?] असाच काही विचार देवी किंवा देवचार अंगात येणार्‍या बाल/प्रौढ स्त्री-पुरुषांबाबत करावा. वेडगळपणे वागणारा एक मुलगा देवळात साखळीने बांधून ठेवलेला मी लहानपणी पाहिलेला आहे. गोव्यातलेच एक दत्ताचे देऊळ असावे असे अंधुक आठवते.)

 
^ वर