कटू इतिहासाची माहिती ?

अजिंठ्याची रंगचित्रे जगभर प्रसिद्ध आहेत. गेली अनेक वर्ष निसर्गाचे वार झेलत ती चित्र टिकून आहेत. मात्र एका लेखनाच्या निमित्ताने चित्रांचा काही इतिहासाची माहिती मिळाली आणि तो जरा कटु वाटला. १८२४ साली लेफ्टनंट अलेक्झांडर यांच्या नजरेस ही चित्रे पडल्यावर त्याचे उत्खनन झाले. १८२९ साली त्याने मुंबईच्या रॉयल ऐशियाटिक सोसायटीत लेण्यांवर निबंध वाचला आणि ब्रिटीश सरकारने लेण्यातील चित्रांच्या प्रतिकृती करण्यासाठी मेजर रॉबर्ट गिल यांच्यावर जवाबदरी सोपविली. रंगचित्रांच्या नकला गिलने विलायतेला पाठविल्या. नंतरही अनेक चित्रकारांनी नकला केल्या. चित्रकलेचे महादालन उघडले गेले.

त्याचवेळी इथे हैद्राबाद संस्थान असल्याने स्वाभाविकच हा भाग निजामाच्या अखत्यारित होता. निजामाने लेण्याची निगा राखण्यासाठी पुरात्व विभागाची स्थापना केली होती. पण त्या अधिकार्‍यांनी नीट व्यवस्था राखली नाही. गुहेतील बरीचशी रंगचित्रे लुप्त झाली. काही खराब झाली. काही काळपट पडली. उन,पाऊस, वारा याचा परिणाम झाला. उत्साही पर्यटकांनी आडदांडपना केला. पण सर्वात संतापजनक बाब म्हणजे निजामाच्या एका अधिकार्‍याने ज्या भिंतीवर रंगचित्रे आहेत त्या भिंतीचा गिलावा, चित्रासहित बाहेर काढून, लेण्यांना भेट देण्यासाठी येणार्‍या 'मेहमानांना' नजराणा म्हणुन पेश केला. असे अनेकदा घडत राहिले. अनेक रंगचित्रे खणून काढली गेली. चित्रसंपत्तीचा विंध्वस असा जाणीवपुर्वक झाला. चित्रकला त्याच्या सौंदर्याची अशी अपरिमित हानी झाली.

केवळ निजामाच्या मुस्लीम अधिकार्‍यांनीच हे नुकसान केले असे नाही तर ब्रिटीश अधिका-यांनी सुद्धा एक पाऊल पुढे टाकले. डॉ. वर्ड या विद्वानाने, मुंबई येथील संग्राहलयासाठी २० ते २५ सूंदर रंगचित्रे काढुन नेली. ले.अलेक्झांडरसारख्या एका ब्रिटीश अधिका-याच्या कार्यावर पाणी फेरण्याचाच हा प्रकार होता. इतिहास असे सांगतो की, मेजर गिल आणि प्रिंसीपल ग्रिफीथ या दोन कर्तबगार अधिका-यांनी चित्रांवर वारनिश लावण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा विपरित परिणाम झाला. पावसळ्यात पाणी वारनिशवर पडत गेल्याने चित्रे खिळखिळी झाली. आणि ती कोसळू लागली. अजिंठ्याची अभिजात कला नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. या बद्दल अधिक माहिती मिळावी, या उद्देशाने हा चर्चा प्रस्ताव.

( सदरील माहिती 'अस्मितादर्श' अंकात डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या एका अध्यक्षीय भाषणात वाचावयास मिळाली )

Comments

प्रतिपादन

इतिहास असे सांगतो असे म्हणुन अनेक ठिकाणी स्वतःचे प्रतिपादन केले जातो. इतिहास नेमके काय सांगतो? त्यात वास्तव किती? इतिहास हे शेवटी अनुमान आहे.
इतिहासाचे जतन केले पाहिजे हे जरी खरे असले तरी तो ठेवा जेव्हा हातुन निसटायला लागतो तेव्हा म्हटले जाते. प्रत्येक गोष्टीचे जतन केले तर विदागार किती मोठ होईल. लय हा अपरिहार्य आहे.
प्रकाश घाटपांडे

लय..

इतिहास नेमके काय सांगतो? त्यात वास्तव किती? इतिहास हे शेवटी अनुमान आहे.

असे असले तरी इतिहासाचे जतन केलेच पाहिजे, चित्र, शिल्प,वाडःमय, अशा स्वरुपाच्या साहित्यातून भारतीय इतिहासाच्या खाणाखुणा स्पष्ट होत जातात, त्यामुळे लय अपरिहार्य असले तरी गतकालीन मानवी जीवन कले च्या माध्यमातून कलेविषयी,मानवी जीवनविषयक माहिती देत असते तेव्हा अशा कलेंचा लय निसर्गामुळे होऊ द्या, पण मानवाने तो इतिहास नष्ट करु नये असे प्रामाणिपणाने वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इतर साहित्यसुद्धा..

जतन करायचे ते, नुसतेच चित्र, शिल्प, वाङ्‌मय नाही ,तर वास्तू , पोषाख, सणवार, संस्कृती, संगीत, नृत्य, आणि विशेषत: लिपी आणि भाषादेखील. त्यांच्यात हळूहळू होणार्‍या सुधारणा चालतील, पण जुने ते त्याज्य समजून एका झटक्यात बदल करणे अयोग्य!--वाचक्‍नवी

अजंठा..एक दु;खद आठवण

शरद
अजंठा.... एक दुख:द आठवण

पहिल्य़ांदा अजंठ्याला १९६० च्यासुमारास गेलो. जातांना पूर्वाभ्यास केलेला नव्हता. त्यामुळे जे दिसले तेवढ्याने भारावून गेलो.थोडीफ़ार छायाचित्रेही काढली. फ़ार हरकत कोणीच घेतनव्हते. नंतर १९६७ ला आर्किऑलॉजी डिपार्टमेंट्ने प्रसिध्द केलेले Ajanta Murals हे पुस्तक घेतले आणि लक्षात आले की त्यातली बरीच चित्रे आपण पाहिलीच नाहीत. काहीच कळेना.नंतर समजले की बरीच चित्रे पार खलास झाल्यामुळे बघताच आली नव्हती. पुढे २५-३० वर्षांनी परत गेल्यावर आणखी काही चित्रे गायब. म्हणजे प्रा. पानतावणे लिहतात त्याप्रमाणॆ पूर्वीच नव्हे तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपण निष्काळजीच राहिलो !.श्री. घाटपांडॆ म्हणतात त्याप्रमाणे इतिहासातील खरे-खोटेपणा बघावयाचा प्रश्न नसून आपण आपला अमोल कलावारसा गमावला हाच इतिहास आहे.[ उपक्रमच्या सभासदांची इच्छा असेल तर काही चित्रे डकवता येतील.] बाकी कालाय तस्मै नम;.
समित्पाणी

जरुर डकवा

.[ उपक्रमच्या सभासदांची इच्छा असेल तर काही चित्रे डकवता येतील.] बाकी कालाय तस्मै नम;.

पुर्वी कोणती चित्रे होती. आता कोणती चित्रे आहेत. याबद्दलची चित्र असतील तर आम्हाला तरी आनंद होईल. आणि नसली तरी आपल्याकडे कोणती चित्रे आहेत याची उत्कंठा लागून राहिली आहे,उपक्रमाच्या सभासदांनाही ते आवडेल असे वाटते. तेव्हा चित्रे जरुर टाका.

पहिल्य़ांदा अजंठ्याला १९६० च्यासुमारास गेलो. जातांना पूर्वाभ्यास केलेला नव्हता. त्यामुळे जे दिसले तेवढ्याने भारावून गेलो.थोडीफ़ार छायाचित्रेही काढली.

साठच्या सुमारास काढलेली चित्रे आता पाहणे हाही एक आनंदायक अनुभव असेल.
बाकी आपण आम्हाला वयाने आणि अनुभवानेही लैच मोठे आहात राव :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कटु इतिहास

प्रा. डॉ. कटू इतिहास आहे खरा. यावर उपाय योजना काय हे पुरातत्व खातेच सांगू शकते व प्रत्यक्षात काय परिस्थीती आहे ते असे वेळोवेळी केलेले लिखाण. जमल्यास अजुन् २, ५ वर्षांनी आढावा घ्या.

शरदजी आपले जुने फोटो बघायला नक्कीच आवडतील.

अरेरे

काही प्रमाणात कलावारसा र्‍हास पावला असे वाचून नेहमीच वाईट वाटते.

काही लोकांनी चित्रे खरवडून न्यायचा प्रयत्न केला ते वाईटच.

पण कित्येकदा प्रदर्शन आणि जतन करण्याच्या प्रयत्नातूनही कलावस्तूला नुकसान पोचते. (प्रदर्शन - लेण्यांमध्ये भगभगीत उजेड येऊ दिला, फोटो-फ्लॅश वापरू दिला तर चित्रांचा रंग फिका पडतो. आजकाल लेण्यांत वेगळी सौम्य प्रकाशयोजना आहे, आणि फ्लॅशफोटो काढू देत नाहीत. जतन - लेखातले व्हार्निशचे उदाहरण.)

यात मात्र एका प्रकारच्या विरोधाभासाची मनात व्यवस्था लावावी लागते, म्हणजे कटू इतिहासाबद्दल एक वेगळा विचार मनात येतो.

प्रदर्शन : या कलावस्तू आपला वारसा आहे, असे लोकांना जोवर (आपुलकीने) वाटते, तोवरच लोकशाहीत पुरातत्त्व खात्याची अर्थसंकल्पात सोय होईल. त्यामुळे भरपूर प्रदर्शन करायची गरज वाटावी, ही गोष्ट "लोक उदासीन आहेत, त्यांना बघायची उत्सूकता नाही, आपुलकी नाही" यापेक्षा बरी. त्याअनुषंगाने प्रदर्शन करण्याची सोय करताना थोडी नासधूस होणारच. प्रदर्शन करण्याची पद्धत नासधूस करू शकते, याबाबत सुरुवातीला अज्ञान असते, पण पुरातत्त्व खात्याने याविषयी सजग राहिले, तर जसेजसे ज्ञान मिळते तशीतशी प्रदर्शनाची पद्धत बदलू शकते. सजग राहाणे महत्त्वाचे.

जतन करणे : आपल्या डोळ्यासमोर चित्रांचे पापुद्रे निघून येत असताना ते पुन्हा चिकटवून बसवण्याचा मोह अनावर होतो. जतन करण्याचे तंत्रज्ञानही कुठल्याही नव्या कामासाठी तसे अनभिज्ञच असते. त्यामुळे दुसर्‍याच कुठल्यातरी रंगकामासाठी उपयुक्त असलेले व्हार्निश या ठिकाणी उपयोगी पडेल की नुकसान करेल ते आपल्याला माहीत नसते. व्हार्निश लावण्यापूर्वी (किंवा दुसरे जे काही करायचे आहे ते करण्यापूर्वी) आपली कृती नुकसान करू शकेल हे मनात असलेले बरे. जास्तीतजासत पूर्वचाचणी करूनही प्रत्यक्षात अनपेक्षित नुकसान होऊ शकते. तरी जास्तीतजास्त पूर्वचाचणी करणे महत्त्वाचे.

प्रदर्शन

प्रदर्शनाचा हेतू एकवेळ चांगला, जतन करतांना प्रयत्न वाया गेले तरी हरकत नाही. पण कलेविषयी अनास्था असू नये. (चित्र भेट म्हणुन देणे वगैरे इत्यादी )

अजिंठा चित्राच्या हेळसांडी बद्दल अधिक कुठे वाचायला मिळेल ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जाणीव असायला हवी

एखादी ऐतिहासिक वस्तू ही आपल्या देशाचा वारसा आहे याची जाणीव सर्वप्रथम स्थानिक लोकांना असायला हवी. यानंतर पर्यटकांना आणि शासनकर्त्यांना तर हवीच. प्रत्येक व्यक्तीत ती आढळणे कमी-जास्त असू शकेल परंतु विध्वंसक प्रवृत्ती कोणत्याही कोनातून समर्थनीय नाही.

ब्रिटीशांनी आपल्या देशात पुरातत्त्व खात्याला हातभार देऊन भारतीय संस्कृती जपण्यास मदत केली असेच मला वाटते पण तरीही 'हा देश आम्ही लुटायलाच आलो आहोत' या भावनेतून इंग्रजांनी लुटालुटही केली. ती सर्व लुट ब्रिटिश म्युझियममध्ये सध्या सुरक्षित आहे असे ते म्हणतात. ;-)

भारतीयांना तर ही जाणीवही नसावी. वसईच्या भुईकोट किल्ल्याचे दगड तोडून ते आपल्या घरांना लावणारे महाभाग आणि त्यांची घरे मूळ किल्ल्याचे वासे खिळखिळीत करून दिमाखात उभे आहेत. अशा करंट्यांना थांबवणे हे जागरूक नागरिकांचे काम आहे. पुरातत्त्वखात्याने बर्‍याच गोष्टींत लक्ष घातले असले तरी त्यांना मिळणारे पाठबळ आणि पैसा पाहता हे कार्य सफल होण्यास बराच अवकाश आहे असे वाटते.

असो,

अजिंठ्याच्या चित्रांबद्दल दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे.

भिंत...

सर्व प्रथम वेगळाच विषय आणि अस्वस्थ करणारी माहीती दुर्दैवाने आश्चर्य वाटले नसले तरी...

भारतीयांना तर ही जाणीवही नसावी. वसईच्या भुईकोट किल्ल्याचे दगड तोडून ते आपल्या घरांना लावणारे महाभाग आणि त्यांची घरे मूळ किल्ल्याचे वासे खिळखिळीत करून दिमाखात उभे आहेत.

एकदा आळंदीला लहानपणी गेलो होतो. तेंव्हाचे आठवते त्या प्रमाणे: एका भिंतीस "ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत" असे श्रद्धाळू अनेक वर्षे/शतके समजायचे (ती "स्टँड अलोन भिंत" इतकी शतके टिकली असली तर तोही एक चमत्कारच आहे) . पण नंतर आत्ताचे भाविक ती भिंत खरवडून/फोडून प्रसाद म्हणून खाऊ लागले, तसेच घरी नेऊ लागले. म्हणून सरते शेवटी त्या उरल्यासुरल्या भिंतीवर नवीन एका दगडी भिंतीचे आवतरण तयार करून त्यावर ज्ञानेश्वर आणि भावंडे तसेच चांगदेवाच्या मुर्तींची प्रतिष्ठापना केली (ते भिंतीवरून उडत आहेत आणि चांगदेव वाघावर बसून पहात आहेत असेच काहीसे) आणि मग ते सर्व प्रसाद खाणे थांबले....

अजिंठ्याची चित्र

अजिंठ्याची परिस्थिती चिंताजनकच आहे, ह्याकडे उपक्रमींचे लक्ष वळवल्याबद्दल धन्यवाद.

ह्या निमित्ताने मी जरा गूगलून बघितले की ती जुनी छायाचित्र कोणी विश्वजालावर चढवली आहेत का, पण मला तरी सापडली नाहीत. कोणास एखादा दुवा माहित असेल तर जरूर कळवावा.

खिरे

जतन करण्याचे तंत्रज्ञान

सध्या जपानी अर्थसाहायाने चाललेले जतन करण्याचे कार्य थोडेतरी तंत्रज्ञानावर अवलंबून आहे असे वाटते.
यापूर्वी झालेले जतन (?) सिमेंट भरण्याइतके प्रगत होते.

भारतातील लोक 'एक दुजे के लिये' चित्रपट पाहिल्यानंतर खूपच प्रेमळ झाले. अजिंठाही या प्रेमाच्या तडाख्यातून सुटलेले नाही. अनेक चित्रांवर 'अमूक बदाम-बाण तमकी' असे भित्तीलेख या प्रेमवीरांनी खरवडून त्यांचे प्रेम अजरामर केलेले आहे. शेवटी वटवाघूळांच्या विष्ठेचा वास येणार्‍या अंधार्‍या गुहांचा याहून आणखी जास्त योग्य वापर काय असणार?

अजंठा आणि जतन

शरद
अजंठा येथील चित्रांच्या जतनाचे प्रयत्न

डॉ.बिरुटे यांनी जतनाबद्दल उत्सुकता दाखवली म्हणून अजंठा येथील जतनाबद्दल थोडिशी माहिती येथे देत आहे. श्री. धनंजय यांनी त्याची पूर्वदिशा दाखवली आहेच.
या प्रयत्नांचे १९५३ पूर्वीचे व नंतरचे असे दोन भाग करता येतील. चित्रे खराब होण्याची कारणॆ : [१] आंतरीक ... सगळी चित्रे काळाच्या प्रभावाने खराब होत असतातच.पाणी,हवा, प्रकाश यांच्या प्रभावाने चित्रातील रंग व Binder [मराठी ?] हळूहळू नाहिसेच होतात. अजंठातील चित्रात नैसर्गीक रंग आहेत.बाइंडर म्हणून डिंक व सरसचा उपयोग केला आहे. हजारपेक्षा जास्त वर्षे होऊन गेल्यामुळे हानी होतच असते. [२] बाहेरची ..... धूळ, [तीचा पाण्यामुळे झालेला] चिखल, पक्षांची विष्टा, गुंफ़ेत पेटवलेल्या धूनी, दिवट्या, चित्रे बघण्याकरिता वापरलेले दिवे यांचा धूर, काजळी यांचा थर चित्रांवर साठतो. निरनिराळे किटकही चित्रे खराब करत असतात. आणि माणसे.. त्यांनी लिहलेली नावे, रंग हाताला लागतो का बघण्यासाठी चित्र घासून बघणॆ, टेकून बसणे, चित्रच्या चित्र निघते का बघणे व अज्ञानामुळे व्हार्निशसारख्या वस्तू पाहिजेल तश्या चित्रांवर लावणे असल्या नतद्रष्टपणानेही चित्रे खराब होत असतातच.
अजंठा पूर्वी निजाम राज्यात होते. तेंव्हा राजकर्त्यांचे अजंठासारख्या आडवळणी गावातील गुंफ़ांकडे दुर्लक्ष झाले तर विशेष नाही १८२० च्या सुमारास इंग्रज प्रवाश्यांचे लक्ष या गुंफ़ांकडे वेधले गेले व त्यांनी इंग्लंड्मध्ये त्यावर लेख लिहले. तेथील लोकांच्या आग्रहामुळे चित्रांच्या प्रती काढण्यासाठी माणसे पाठविण्यात आली. त्यांनी चित्राचे रंग चांगले दिसावेत म्हणून व्हार्निशचे जाड थर दिले. दोन वर्षात क्रॅक होऊन तुकडे खाली पडले, बरोबर रंग घेऊन ! बऱ्याच प्रमाणात नासधूस झाली.
१९२० ला निजामाने सेक्कोनी [L..Cecconi] आणि त्याचा मदतनीस ओर्सिनी [Orsini] यांना जतनाकरिता बोलाविले. त्यांनी अल्कोहोलमध्ये लाख विरघळवून त्याचा जाड थर देण्याचा प्रयोग केला.त्याशिवाय गम डमारचे पातळ द्राव्ही वापरले. पहिले गडद झालेले व्हार्निश काढावयाला स्पिरिट आणि टर्पेंटाईन वापरले. तसेच
१] लहान भेगा बुजवावयाला केसिन-चुना,
२] मोठ्या भोकांकरता प्लास्टर ऑफ़ पॅरिस,
३] जाड प्लास्टर्मध्ये खिळे,
४] जिलेटिन, यांचाही वापर केला.

१९५३ नंतर आर्किऑलॉजिकल सर्व्हेच्या ताब्यात अजंठा आले.त्यांनी बरेच नवेनवे प्रयोग केले. दुर्दैवाने तांत्रीक ज्ञान कमीच होते. देशाबाहेरून काही मदत मागावी असेही प्रयत्न केल्याचे आढळून येत नाही. अर्थात अजंठ्यातील चित्रे व "फ़्रेस्को" {fresco] यांमध्ये फ़रक असल्याने उपयोग झालाच असता असे नाही.प्लास्टर पडणे, रंग कोरडा होणॆ व लाखेचे ऑक्सिडेशन हे महत्वाचे प्रश्न होते. प्रथम जेथे-जेथे गरज होती तेथील प्लास्टर दुरुस्त करण्यात आले.ज्या ठिकाणी शक्य होते तेथील रंगावरील धूळ, कचरा,
कोळिष्टके कॅमल-हेर ब्रशने साफ़ करण्यात आली. रंगावरील थराकरिता Poly-vinyl Acetate च्या पातळ द्रवाचा उपयोग केला. काजळी,किड्याची घाण, तेलकट थर आणि लाखेचे थर काढ्ण्याकरिता निरनिराळी solvents [alcoho, methyl alcohl,naptha,cellosolve, terpentine etc.] वापरण्यात आली. जमेल तेव्हढे केले. एपॉक्झी वापरले नाही कारण ते देशात मिळत नव्हते !
हल्ली काय करतात माहित नाही. पण बाहेरून बरीच मदत [तांत्रिक] मिळत असेल. वर्ल्ड हेरिटेज म्हणून.
समित्पाणी

माहिती

बरीच नवीन माहिती मिळाली.
आपण काही चित्रे टाकणार होता त्याचे काय झाले ?

आर्किऑलॉजीकल सर्व्हे

बिरूटे सर,
विषय खूप उत्तम, आणि रसपूर्ण आहे.
येथे अजंठा येथील काही चित्रे बघता येतील, अर्थात शरद यांच्या चित्रांबद्दल खूपच उत्सुकता आहे. http://asi.nic.in/asi_monu_whs_ajanta_images.asp

माझे याआधी जे काही तुटक वाचन झाले आहे त्यावरून शिल्पे किंवा चित्रांच्या जतनाचे शास्त्र हे काहीसे आव्हानात्मक आहे. आणि मते -मतांतरे होतच राहतात. ही बातमी पहा -
http://query.nytimes.com/gst/fullpage.html?res=9D0CE3DA123EF934A25751C1A...

क्या बात है !!!

अजिंठ्याची बरीच चित्र पाहता आली, मस्त दुवा.
शिल्प, चित्रांचे जतनाचबद्दलचा दुवाही अभ्यासकांना दिशा देणारा ठरावा.

आभारी आहे.

अजंठा चित्रे

शरद
अजंठ्यामधील चित्रे पहातांना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मध्ययुगीन भारतीय चित्रकला आणि आजची चित्रकला यात फ़ार फ़रक आहे. तो जाणून घेतला नाही तर
त्या चित्रांमधले वर्म किंवा कलाच कळणार नाही. आपण आज पहातो किंवा काढतो ती चित्रे पाश्चिमात्य पध्दतीची असतात. त्यात perspective, proportion, vanishing point
इत्यादींवर भर दिलेला असतो.पूर्वी आपल्या इथे यातले काहीच नव्हते.भारतीय चित्रकलेने गृहित धरलेल्या गोष्टी थोडक्यात सांगतो. मगच चित्रांचे रसग्रहण करण्यास सोपे जाईल.
१] चित्रे साहित्य शास्त्राबरहुकुम काढली जात. सिंहकटी, कमलनयन,पृथु नितंब वा स्तन इत्यादी शब्दश: चित्रांकित केल्या जात.
२] बुध्द इतरेजनांपेक्षा थोर किंवा मोठा, चित्रात तो त्याच्या बायको-मुलापेक्षा दुप्पट-तिप्पट मोठा,
३] perspective चा वापर वा उपयोग आजच्या सारखा नसल्याने मागील व्यक्ती लहान दिसलीच पाहिजे असे बंधन नाही,
४] बहुतेक सर्व चित्रे जातक-कथांवर आधारीत आहेत. एकेक चित्र स्वतंत्ररित्या पाहिले तर संदर्भ लागेलच असे नाही, चित्र नाही-चित्र मालिका पहावयाची,
५]चित्रमालिकेतील चित्रे एकापुढे एक अशी असावयास पाहिजेत असे नाही,दुसरे पहिल्याच्या पुढे,तिसरे उजव्या कोपऱ्यात वर तर चौथे डाव्या कोपऱ्यात खाली, शक्य आहे.
६] राजकन्येच्या पायापाशी चार-पाच निळ्या वक्र रेषांनी समुद्र दाखवला जातो, त्यात दोन-तीन मासे दाखवले म्हणजे झाले. त्यातून येणाऱ्या जहाजात पंधरा वर्षानंतरची
तीच राजकन्या असू शकते !
७] ... हा चित्रकलेचा वर्ग नसल्याने येथेच थांबतो[ वर लिहलेल्यात असणाऱ्या कमतरता तज्ञ दुरुस्त करतीलच.] आजच्या चित्रांबद्दल स्पष्टीकरण देत नाही. आपली
इच्छा असेल तर देता येईल.पण मग चित्र कमी द्यावी लागतील.
समित्पाणी

class="caption">
P1010548" alt="">
P1010556" alt="">
P1010557" alt="">
P1010557" alt="">
P1010562" alt="">

+१

अजंठ्यामधील चित्रे पहातांना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मध्ययुगीन भारतीय चित्रकला आणि आजची चित्रकला यात फ़ार फ़रक आहे. तो जाणून घेतला नाही तर त्या चित्रांमधले वर्म किंवा कलाच कळणार नाही.
हा मुद्दा लक्षात आला नव्हता. यावर आणखी वाचायला आवडेल.
----

+१

हा मुद्दा लक्षात आला नव्हता. यावर आणखी वाचायला आवडेल.

खरे आहे.

शरद यांचा प्रतिसाद आवडला. त्यांनी दिलेल्या मुद्द्यांतून आता चित्रांकडे नव्याने पहायला हवे.

चित्रे आणि प्रतिसाद

शरदराव,
प्रतिसादातील काही मुद्यांवर चित्रांच्या निमित्ताने वाचायला अधिक आवडेल.
( साठाच्या सुमाराची ही चित्रं आहेत का ? आणि काही चित्र दिसत नाहीत वाटते )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हरवलेले चित्र

शरद

P1010557" alt="">

अजंठा आणखी चित्रे

शरद

P1010578" alt="">
P1010577" alt="">

नवी माहिती

धाग्याबद्दल बिरुटेंचे आभार. भारतीय समाज इतिहासाच्या जतनाबाबत उदास आहे हे सर्वज्ञात आहे. पण एका भारतीयाने अजंठ्याची चित्रे जतन करण्यासाठी दिलेले योगदान स्मरले पाहिजे. दुर्दैवाने मला त्या महाभागाचे नांव व अन्य संदर्भ आठवत नाहीत.
साठच्या दशकात काही गुहांतील चित्रे विजेच्या दिव्याच्या उजेडात पाहून इतरांप्रमाणे मी ही प्रभावित झालेलो होतो. शरद यांनी दिलेल्या माहितीचा पुढचा अध्याय म्हणजे विजेचे प्रखर दिवे लावल्यानेही चित्रे खराब होत असल्याचे यथावकाश लक्षात आल्यानंतर ही चित्रे पहाण्याचे जवळजवळ सर्वच मार्ग बंद झाले. त्यावेळी (सत्तरच्या दशकाशेवटी वा ऐंशीच्या सुरुवातीला) एका बंगाली छायाचित्रकाराने उपलब्ध फिल्मचा अंधारात वापर करण्याचे तंत्र विकसित केले. माझ्या अल्प आठवणीनुसार त्याला २० ते ४० मिनिटे शटर उघडे ठेवावे लागत असल्याचे स्मरते. या तंत्राचा वापर करून आलेली काही चित्रे दाखवून त्याने अर्थसाहाय्य (बहुतेक परदेशी ) मिळविले व सर्वच भित्तिचित्रांची उत्तम छायाचित्रे मिळवली. यथावकाश त्याला कोडॅक कंपनीने या प्रकल्पासाठी लागणारी विशेष फिल्मही खास बनवून पुरवली. त्यातील् निवडक चित्रांचे पुस्तकही परदेशातील नामवंत प्रकाशकांनी (अदमासे नव्वदच्या दशकात) छापले असल्याचे स्मरते. अचाट किंमतीमुळे ते मला त्यावेळी घेता आले नव्हते असेही आठवते.
मला त्या उत्साही छायाचित्रकाराचे, पुस्तकाचे, प्रकाशकाचे नांव आठवत नाही याची माफी असावी . उत्सुक सभासदांना तपशील शोधण्यासाठी या माहितीची मदत होईल असे वाटते म्हणून हा प्रपंच. मला न आठवणारे तपशील कोणी शोधक वृत्तीचा अजंठाप्रेमी अन्य इतिहासप्रेमींना पुरवील अशी आशा करतो.
नैधृव काश्यप

 
^ वर