पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस

पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस

नुकतेच प्रा. प्रवीण दवणे यांचे "सूर्य पेरणारा माणूस" नावाचे पुस्तक वाचनात आले. प्रकाशक: साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था), प्रथमावृत्तीः ८ मे २००८, मूल्यः रु. १००/- फक्त. विस्मयकारक नावाच्या, या पुस्तकात विस्मयचकित करणाऱ्या एका आयुष्याचा आलेख साकारला आहे. उण्यापुऱ्या एका दशकाच्या कालावधीत नव्या मुंबईतील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारूपास आलेल्या "हावरे बिल्डर्स" चे संस्थापक कै. सतीश काशिनाथ हावरे यांचे ते चरित्र आहे. आजमितीस 'हावरे बिल्डर्स' दररोज दहा-बारा घरे आणि दुकानांचा ताबा ग्राहकास सुपूर्त करत आहेत. नव्या मुंबईच्या क्षितिजरेषेवरच त्यांनी 'हावरे' नाव कोरले आहे. बांधकामक्षेत्रात सर्वात गतिमान आणि विश्वासार्ह व्यवसाय समर्थपणे प्रस्थापित करून ग्राहकांच्या पसंतीस पोहोचवणाऱ्या मराठी मातीतल्या उद्योजकाची ही यशोगाथा आहे. उद्योजकतेची आस मनात धरून समोर येणाऱ्या होतकरू मराठी तरुणांना, आयुष्य घडवावे कसे ह्याचा वस्तुपाठ म्हणून ते उपयोगी ठरू शकेल याचा विश्वास वाटतो.

दुवा क्र. १: हावरे डॉट कॉम या त्यांच्या संकेतस्थळावर आता या पुस्तकाचे 'वि-पुस्तक (e-book)' आविष्करण निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. वाचकांनी ते अवश्य वाचावे आणि उद्योजकतेचा मार्ग गवसतो का ह्याची चाचपणी करावी. मार्ग नाही तरी दिशा अवश्य मिळू शकेल. किमान प्रेरणा तर खासच.

दुवा क्र. २: 'सूर्य पेरणारा माणूस'
http://www.haware.com/Surya-Peranara-Manus-Pravin-Davane.pdf

दवणे म्हणतात, "जिद्दीच्या बिया घेऊन सतीश हावरे नावाचा 'सूर्य पेरणारा माणूस' आकाशावर आपली नाममुद्रा कोरून गेला. महाराष्ट्रातल्या प्रत्येक धडपडणाऱ्या युवकाला जिद्दीच्या बिया देण्याचे मोलाचे काम सतीश हावरे यांच्या आयुष्याने केलेले आहे. इमारती उभ्या करतांना, हजारो उपेक्षितांची, आयुष्ये उभी करणाऱ्या सतीश हावरे यांचे अजिंक्य जीवन नियतीलाही पुसता आले नाही. विदर्भातील पथ्रोट या छोट्या गावातून नव्या मुंबईतील 'हावरे बिल्डर्स'पर्यंतचा हा गगनचुंबी प्रवास. प्रत्येक पालकासाठी! प्रत्येक शिक्षकासाठी! जिंकू इच्छिणाऱ्या प्रत्येक कोवळ्या मनासाठी! "

Comments

अरे वा

वाचते आणि मग लिहीते.

पुस्तकपरिचयाबद्दल आभार..

वा!

गोळेसाहेब,
चांगला परिचय करून दिलात. वाचावेसे वाटते आहे.
अशी प्रेरणादायी आणि काही तरी वेगळे घडवून दाखवणारी लोकं आम्हाला फार आवडतात!

(पण इ कॉपी वाचायचा फार कंटाळा येतो. पुस्तक हातात धरून लोळत चिवडा खात आणि चहा पीत वाचण्यात जी मजा आहे ती कशातच नाही!)
आपला
गुंडोपंत

पुस्तक चाळलं पण...

गोळेसाहेब,
इतक्यातच आपण दिलेले पुस्तक चाळलं पण...
प्रामाणिक पणे सांगतो,
दवणेंनी अतिशय शब्द बंबाळपणे लिहिलंय असं वाटलं. किती उपमा द्याव्यात?माणूस ग्रेट असतो पण त्याचं प्रत्येक(च) वागणं ग्रेट(च) असतं?

ते सगळं इतकं बंबाळ की वाचायचाच कंटाळा आला!

केक दिसायला खुप सुरेख असला तरी खातांना आयसिंगच खुपच जास्त झाल्यावर जे होतं, तसंच झालंय या पुस्तकाचं!

(तरीही टाळूला चिकटलेलं डालडाचं आयसिंग काढत काढत पुर्ण वाचायचा प्रयत्न करेन!)

आपला
गुंडोपंत प्रामाणिक

उद्योजकतेपाठच्या प्रेरणांचा आपण शोध घ्यावा!

दवणेंनी अतिशय शब्द बंबाळपणे लिहिलंय असं वाटलं >> अगदी. अगदी.

आपण उद्योजकतेपाठच्या प्रेरणांचा शोध घ्यावा! पाल्हाळाशी आपले काय कर्तव्य!!

प्रेरणा आणि उद्योजकता शोधायला लावली त्यांनी, शब्दजाळातून, अलंकारांतून आणि मोकळ्याच सोडून दिलेल्या वाक्यांतून.
प्रत्यक्ष कर्तृत्व ज्यांनी पाहिलेलेच नाही त्यांना, त्याची ओळख करून द्यायची, तर त्यांनी ते शोधायला लावले आहे.
हा मात्र एक आगळाच अनुभव आहे.

माझ्या सांगण्यावरून आपण वाचण्याचे कष्ट घेतलेत, हे आवडले.

बाष्प-गद्गदित :)

गुंडोपंतांशी सहमत आहे. गटणेलाही लाजवेल अशी दवणेंनी गदगदलेली, उद्गारचिन्हांचा सढळ वापर केलेली सद्गदित भाषा वापरली आहे. शिवाय कथालेखकाच्या कृतींचे समर्थन करताना त्यांनी मारलेल्या कोलांटउड्याही एरव्ही भरभरून उपदेशाचे डोस पाजणार्‍या (सावर रे इ. तून) लेखकाच्या लेखणीतून वाचून माफक करमणूक झाली. कै. हावरे यांचे चरित्र प्रेरणादायक निश्चितच आहे, पण 'नुसतीच दाढी, आत ऋषीच नाही' असला प्रकार एकंदरीत आहे.

वानगीदाखल हे पहा (खासकरून शेवटचे वाक्य)-
"लपंडाव, शिवाशिवी, हुतूतू हे नेहमीचेच; पण आमराईत आंब्यांच्या घमघमाटानं वसंत दरवळला की वार्‍याने पडलेले आंबे वेचायला सतीश सर्वांच्या पुढे असे. भीती ही गोष्ट सतीशला माहीतच नसावी. म्हणूनच शाळेतनं येता-जाता एखाद्या उनाड म्हशीच्या पाठीवर बसण्यात त्याला गंमत वाटे. इतर जण पायी चालत असताना जणू निसर्गाने दिलेली ब्लॅक फोर-व्हीलरच! घरचा धाकदपटशा असूनही कष्टाच्या ताकाचं रुपांतर आनंदाच्या लोण्यात होऊन जाई."

जवळपास प्रत्येक पानावर अशी उदाहरणे आहेत. ती एकवेळ लेखकाच्या शैलीचा हव्यास म्हणून सोडून देता येतील. पण कॉलेजात उपस्थिती कमी असल्याने परीक्षेला बसायला प्राचार्यांनी मनाई केल्यावर, त्यांना त्यांच्याच केबिनमध्ये "मामू लोक अंदर बैठते है" असे सुनावणार्‍या कथानायकाचे समर्थन श्री. दवणेंसारख्या एका प्राध्यापकानेच करावे (अगदी त्या भागाला ह्या वाक्याचेच शीर्षक देऊन) हे वाचल्यावर 'सर्वे गुणा: कांचनमाश्रयन्ति' हे खरे आहे, याची पुन्हा खात्री पटली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विशेषणबाजीचा अतिरेक

प्रवीण दवणे हे नाव वाचूनच पुस्तक वाचायची इच्छा झाली नाही. मात्र पैशे असले की हव्या त्या कोलांट्याउड्या कशा मारता येतात हे उदाहरण वाचून करमणूक झाली :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

शोध कर्तृत्वाचा घ्या, अभिव्यक्तीचा पंचनामा इथे उपयोगाचा नाही!

आजानुकर्ण, प्रतिसादाखातर धन्यवाद.

पैशे असले की हव्या त्या कोलांट्याउड्या कशा मारता येतात >>
मात्र, शून्यातून हजारो कोटी रुपयांची उलाढाल करणारे साम्राज्य उण्यापुर्‍या दशकात उभे करता येत नाही.

शोध कर्तृत्वाचा घ्या, अभिव्यक्तीचा पंचनामा इथे उपयोगाचा नाही! ती कशी आहे, हे वर सगळ्यांनीच गौरवलेले आहे.

शिवाजी दिसला ही आनंदाची गोष्ट आहे!

नंदन, प्रतिसादाखातर धन्यवाद. लगेच वाचलेतही हे पाहून आणखी बरे वाटले.

कै. हावरे यांचे चरित्र प्रेरणादायक निश्चितच आहे >> मलाही असेच वाटले.

'सर्वे गुणा: कांचनमाश्रयन्ति' >> पुस्तकापाठची प्रेरणाच त्यातून जाणवते.

मात्र मिठाई, मिठाई, मिठाई सगळ्या पेटार्‍यांतून जात असतांनाही,
आपल्याला त्यातला शिवाजी दिसला ही आनंदाची गोष्ट आहे.
म्हणून तर आपण वाचतो, इतरांनाही वाचायला उद्युक्त करतो.

आता

प्रत्येक पालकासाठी! प्रत्येक शिक्षकासाठी! जिंकू इच्छिणाऱ्या प्रत्येक कोवळ्या मनासाठी! "

मामू लोग वगैरे प्रकारानंतर
'आता' हे वाक्य फार त्रासदायक वाटंतय...!

आपला
गुंडोपंत

मनोरंजक

पुस्तक चाळले. प्रतिक्रियांशी सहमत आहे. बरीच वाक्ये पचायला जड गेली.
हावरे बिल्डर्स जगात सर्वोच्च नाव झाले आहे. (वर्ल्ड फेमस इन् इंडिया?)
प्रश्न सोडवायला हावरे साहेब मायक्रो-सेकंद घ्यायचे इ.
कदाचित हे चरित्र सौम्य भाषेत, अतिशयोक्ती न करता लिहीले असते तर वाचावेसे वाटले असते.

----

हा कदाचित सर्वात समर्पक अभिप्राय ठरावा.

कदाचित हे चरित्र सौम्य भाषेत, अतिशयोक्ती न करता लिहीले असते तर वाचावेसे वाटले असते. >>

हा कदाचित सर्वात समर्पक अभिप्राय ठरावा.

कमिशन केलेले पुस्तक

प्रिय गोळेकाका, पुस्तकाचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. पुस्तके धावते वाचले. नंदनशी सहमत आहे. कमिशन केलेले हे पुस्तक दवण्यांनी अगदी दवण्यांसारखे लिहिले आहे.

उद्योजकता हुडकायचे काम त्यांनीच अवघड केले आहे असे वाटते.

चित्तरंजन, कमिशन करण्यात फारशी चूक वाटत नाही.

पण पुनरोक्ती, प्रच्छन्न अलंकरण, अर्धवट सोडलेले माहितीचे धागे, अर्धवट सोडलेली वाक्ये, नेमकेपणाचा अभाव इत्यादी गोष्टींकडे दुर्लक्ष करून उद्योजकता हुडकायचे काम त्यांनीच अवघड केले आहे असे वाटते.

धर्मांतर

सतिश हावरेंनी आदिवासी भागात धर्मांतर थांबवायला मदत
केली होती हे वाचून मात्र अतिशय आनंद झाला.
नंतर पुस्तक बरं आहे कारण दवणे बहुदा उपमा देवून थकले असावेत.

त्यामुळे पुढे पुढे पुस्तक 'वाचवले' जाते!

पुस्तक वाचले एका छोट्या गावातून आलेल्या आणि आर्थिक दृष्ट्या यशस्वी झालेल्या मुलाची कथा खरंच चांगली आहे.

फक्त सगळं काही छान-छान, गोड-गोड आणि उदात्तच करून नसतं टाकलं तर अजून मनालाही आवड्ली असती हे निश्चित!!

आपला
गुंडोपंत

 
^ वर