भारताचा वैचारिक इतिहास आणि 'ब्रह्म' संकल्पना

धनंजय यांनी सुरू केलेल्या चर्चा प्रस्तावामुळे मला माझ्याच काही मतांचा नव्याने विचार करावा लागला. म्हटले तर पूर्वीच्या ऐकीव (पण तज्ञ) माहितीवर आधारलेली ती मते होती. इतरांची होती. पण मला पटलेली होती. त्यांना पुन्हा एकदा चक्षुर्वैसत्यम् शब्दांशी ताडून पाहिले. (ब्रह्मसूत्रे , शांकरभाष्य, रामानुजभाष्य , वैशेषिक दर्शन, आठ प्रमुख उपनिषदे,(छांदोग्य मिळाले नाही पण मिळेल!), धर्म आणि बुद्धीवाद वगैरे) त्यांना खोटे ठरायचे असेल तर मला उपलब्ध झालेल्या ग्रंथाहूनही आणखी स्पष्ट प्रमाण लागेल.

या विषयाची जी संगती लागली ती अशी -

१. वेदसंहिता मोठ्या प्रमाणावर मानवाच्या प्राथमिक ज्ञानावर आधारित आहेत. (पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश - स्वर्ग - गोधन - घोडे - युद्ध - स्त्रीपुरुष संबंध - यजन इ.)

२. बराच काळ स्थिरावलेल्या संस्कृतींमध्ये जसा विचारांचा विकास होतो तसा तो वैदिक संस्कृतीत होत होता.

३. त्यातूनच ईश, ईशावास्य, कठ, छांदोग्य, बृहदारण्यक, मंडुक, ऐतरेय, तैत्तरेय आदि उपनिषदांचा जन्म झाला.

४. पूर्वासुरींनी सांगितलेले विचार सहसा नाकारले जात नाहीत. ते नाकारण्यासाठी वैचारिक क्रांती व्हावी लागते. 'वेद' पूर्वापार चालत आलेले असल्याने त्यांना पूर्णपणे न नाकारता वेदांमधील विचारांना आपापल्या परीने आणि मताप्रमाणे 'स्वयोग्य' वळण लावण्याचा प्रयत्न या उपनिषदांत दिसतो. परंतु काही उपनिषदे त्याही पुढे जाऊन ज्याला आजच्या भाषेत आधुनिक म्हणता येईल असे विचार मांडताना दिसतात. (ब्राह्मणे ही या उपनिषदांचा भाग म्हणून होती असेही दिसते.)(इ.स.पूर्व ८०० ते इ.स. पू. ५००)

५. न्याय-सांख्य-वैशेषिक-बौद्ध या मूळ वेदातून निर्माण झालेल्या विचारधारांचाच तत्कालीन आधुनिक अवतार होता. अनेक उपनिषदांमध्ये या मतांचा उल्लेख आढळतो. या विचारपरंपरा टप्प्याटप्प्याने अधिकाधिक निरीश्वरवादाकडे प्रवास करताना दिसतात.

६. ज्याला पूर्वमिमांसा म्हणतात ते कट्टर कर्मकांडी आणि यज्ञाधारित तत्वज्ञान एका बाजूला तर दृष्टीगोचर जगात ईश्वराची आवश्यकताच पूर्णपणे नाकारणारे बौद्ध तत्वज्ञान दुसर्‍या बाजूला असा एक प्रखर संघर्ष गौतम बुद्धाच्या हयातीत आणि पुढे बौद्ध मतप्रसाराच्या काळात झालेला दिसतो. (इ.स. पू. ५०० ते इ.स. १००)
याच काळात वैदिक धर्म अधोगतीला लागून त्या काळातली सूज्ञ माणसे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी द्विधा मनःस्थितीत पोचली असावीत. (उदा. अर्जुन - पुढे पहा.)
त्यांना पुनः वैदिक धर्माकडे खेचण्यासाठी कर्मकांडाला बाजूला सारणारे पण ईश्वराला मानणारे असे नवे तत्त्वज्ञान (ज्यात बुद्धीच्या उपयोगाला, ज्ञानाला आणि चिकित्सेला स्थान होते) असे एक 'ब्रह्म' तत्त्वज्ञान निर्माण झाले. 'अथा तो ब्रह्मजिज्ञासा' ही त्या तत्त्वज्ञानाची नांदी म्हणता येईल. बादरायण व्यासांनी* आपल्या ब्रह्मसूत्रात न्याय-सांख्य-वैशेषिक-बौद्ध या सर्व विचारप्रणालींचे खंडन करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला. हीच ती उत्तरमिमांसा विचारधारा.( *बादरायण = व्यास हे समिकरण अजून नक्की नाही.)
या तत्त्वज्ञानाप्रमाणे ईश्वर आहे, तोच सर्व विश्वाचा निर्माता आहे, तो विश्वव्यापक आहे, त्यालाच ब्रह्म असे म्हणतात. तो सर्व प्राणीमात्रात प्राण म्हणून वास करतो. तो निर्जिवांत पदार्थ आहे. ( परंतु ब्रह्म कशापासून निर्माण होते ते मला तरी समजलेले नाही. अशा प्रकारच्या अनुत्तरित शंकांना मूर्खांच्या शंका, अश्रद्धांच्या शंका म्हणून बाजूला सारलेले आहे. )
हे तत्त्वज्ञान त्याकाली बौद्धमत बाजूला सारायला पूर्णपणे यशस्वी ठरले नसले तरी निदान वैदिक विचारांचे संपूर्ण उच्छेदन थांबवण्यात यशस्वी ठरले. याचे कारण बौद्धमताला मिळालेला राजाश्रय आणि तरीही ब्राह्मणांचे समाजावर असलेले वैचारिक वर्चस्व हे असावे.
बौद्ध मतांचा पूर्ण पराभव झाला नाही तरी इतर वैदिक विचारपरंपरा ( न्याय-सांख्य-वैशेषिक)मात्र लयाला गेल्या. त्यांचा पुढे कसलाही उत्कर्ष झाला नाही. उलट त्याही विपर्यस्त स्वरुपात उत्तरमिमांसेत विलीन झाल्या.

इथे बरेच मोठे विषयांतर -
'धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे|' ही स्थिती उत्पन्न झाली की ईश्वर पुन्हा अवतार घेतो - तो केवळ शारिर रूपात नव्हे तर विचारांच्या रूपातसुद्धा! महाभारतकार बादरायण 'व्यास' उत्तरमिमांसेचे खंदे पुरस्कर्ते होते. (कदाचित उद्गाते होते.)गीता हे एक उपनिषद आहे असे म्हटले जाते. ते व्यासांनी लिहिले आहे. पर्यायाने त्यात व्यक्त झालेली धर्ममते व्यासांची आहेत.पण श्रीकृष्ण या महान विभुतीच्या तोंडून ते बाहेर पडलेले दाखवल्याने आणि श्रीकृष्ण परमेश्वराचा पूर्णावतार असल्याने प्रत्यक्ष परमेश्वरच - भगवान ते सांगतो (गातो?) आहे ('श्रीमद्भगवद्गीता') असा आभास निर्माण होतो. मग त्यावर अपील नाही.
स्वमतप्रचार-प्रसारासाठी प्रत्यक्ष ईश्वराची साक्ष काढणार्‍या व्यासांना मानले पाहिजे.
पण असे करूनही बौद्धमताचा संपूर्ण पराभव न झाल्याने गौतम बुद्धालाही ईश्वरी अवतार बनवून त्यात गोवले गेले.

असो. परंतु एकीकडे कर्मकांडाचे खरे स्वरूप (दानधर्म, समाजकल्याण, पर्जन्याची निर्मिती यांसाठी यज्ञ करावा - इति व्यास) सांगताना त्याचा त्याग करावा असेही व्यास सांगतात. गीतेच्या दुसर्‍या अध्यायात त्यांनी सांख्य विचारधारेची किंवा बुद्धीवादाची भलावण केलेली दिसते. याचाच अर्थ सांख्य तत्त्वज्ञान सहजासहजी बाजूला सारण्याइतके क्षीण नव्हते. म्हणूनच गीतेत पदोपदी विरोधाभास दिसतो. अर्जुन हे पात्र ('याच काळात वैदिक धर्म अधोगतीला लागून त्या काळातली सूज्ञ माणसे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी द्विधा मनःस्थितीत पोचली असावीत') अशाच एका द्विधा माणसाचे प्रतिक आहे. त्याची मते समजावून घेत, त्याच्या कलाकलाने त्याला 'अद्वैत' किंवा 'ब्रह्म' संकल्पना सांगितलेली दिसते. एकीकडे स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञ करणारी माणसे मूर्ख आहेत आणि ऐहिक विषयभोग व्यर्थ आहेत असे म्हणताना मध्येच श्रीकृष्ण -'हतो वा प्राप्स्यसि स्वर्गंम् | जितं वा भोक्ष्यसे महीम्| ' असे प्रलोभन अर्जुनाला का दाखवतो?- हे मला न सुटलेले कोडे आहे. म्हणून हा सुप्रसिद्ध श्लोक 'प्रक्षिप्त' असावा असे मी मानतो.

पुन्हा मूळ विषयाकडे -
७. पुढे इ.स. ३०० नंतर दोन गोष्टी घडल्या - पश्चिमेकडील साम्राज्य रचनेचा अकस्मात अंत झाला. भारताचे परराष्ट्रव्यापार थंडावले आणि आर्थिक मंदी येऊ लागली. गुप्त काळात सुवर्णयुगातला भारत मध्ययुगीन अवकळेकडे वाटचाल करू लागला.
इ.स. ५०० नंतर गुप्त साम्राज्याचा अंत झाला आणि संस्कृतीच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी शांती अणि राजाश्रय नष्ट झाला. अनेक लहान लहान राज्ये उदयाला आली. सतत युद्धे झाल्याने पिकांची, अर्थव्यवहारची नासाडी होऊन सामान्य जनतेची वाताहात झाली. (कदाचित दुष्काळही पडले असावेत.)
याचे खापर (बौद्ध विचार नीट न समजल्याने ईश्वराची भीती नष्ट झाली, जनता अनिर्बंध, अनैतिक वर्तन करू लागली इ. ) बौद्ध धर्मावर फोडण्यात आले.

८. येथे (इ.स. ७५० नंतर)आदिशंकराचार्यांचा धर्मतत्त्वज्ञानाच्या क्षितिजावर उदय झाला. वीरराघवाचार्यांनी संपादलेल्या 'वैशेषिकदर्शन' ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे कणाद(, काश्यप अथवा उल्लुक या तिन्ही नावांच्या एकाच) ऋषीने वैशेषिक सूत्रे लिहिली असावीत. (ज्यात अणू हाच विश्वाचा कारक आहे हा विचार आहे.) परंतु "owing to various reasons, the traditional interpretations of Kanada-sutras were lost." "... Sankaramisra, the auther of Upaskaraadmits that he was not having any sutra- commentary before him to help him in his task.""Udayana mentions that Kanada's Vaisheshikadarsana was not held high in esteem by some in his days."
याचाच अर्थ असा की 'वैशेषिक दर्शन' हा कणादाचा ग्रंथ मुख्य विचारधारेपासून अनेक शतके (इ.स. पूर्व ३०० ते इ.स. ७५० - ते इ.स. २००८!) बाजूला पडला होता. कदाचित तो मौखिक ज्ञान परंपरेचा भागही राहिला नसावा. त्यातील अनेक महत्त्वाचे मुद्दे अथवा सूत्रे भ्रष्ट अथवा नष्ट झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वैदिक परंपरा जपणार्‍या पंडितांकडे तो अभ्यासाविना आला असेल.
त्या विपर्यस्त रूपाचा अभ्यास करण्याचे खरेतर शंकरांना काहीच कारण नव्हते. कारण त्यांच्या काळापर्यंत कणादवाद नष्टप्रायच झाला होता. मुख्य शत्रू होता तो बौद्ध धर्म तत्त्वज्ञान!
परंतु अद्वैतवादाचे पुनरुत्थान करताना पुन्हा एकदा बादरायणाच्या ब्रह्मसूत्रांवर भाष्य करणे क्रमप्राप्त होते आणि त्यात वैशेषिक तत्त्वज्ञानावर सूत्रे असल्याने वैशेषिक तत्वज्ञानाचा अभ्यास करणे आलेच! शंकरांनी केलेले कणादाचे खंडन हे खरेतर बादरायणाने केलेले कणदाचे खंडन आहे. शंकराचार्यांनी आपल्या (कदाचित अर्धवट माहितीवर आधारलेल्या) अभ्यासाप्रमाणे त्यावर भाष्य केले इतकेच! शंकरांनंतर रामानुजांनी त्याच ग्रंथावर केलेले भाष्य पाहिले तर या दोन प्रतिभावान व्यक्तींची मुळत 'ब्रह्मसूत्रे' समजावून घेण्यातली तफावत दिसते. तशीच त्यांची वैशेषिक विचारांची समजही वेगेवेगळी होती हेही कळते.

यावेळी मुख्य वैचारिक हल्ला मोडकळीला आलेल्या बौद्धधर्मावर असल्याने आणि या विचारांना सामाजिक अनागोंदीची जोड मिळाल्याने शंकर बौद्ध तत्त्वज्ञानाचा पाडाव करण्यात यशस्वी झाले.(संभवामि युगे युगे!)
परंतु भौतिक विज्ञानाची हाकालपट्टी पूर्वीच झाली होती.

९. कणादाने केलेले अणूचे वर्णन परिपूर्ण होते असे नव्हे. परंतु तो एक 'हायपोथेसिस' होता असे म्हणता येईल. जसे - 'यज्ञ केल्याने पाऊस पडतो' किंवा 'आत्मा हृदयात वास करतो' किंवा 'वर्महोलमधून कालप्रवास करता येतो' इ. त्यावर पुढे संशोधन होण्याइतके त्याकाळचे भौतिक विज्ञान - ज्याला त्या काळी 'अविद्या' म्हटले जात असे - पुढे गेले होते काय? याचे उत्तर मिळत नाही. (छांदोग्य उपनिषदात सूक्ष्मदर्शक यंत्राचा उल्लेख (इतरत्र संदर्भात) आढळला पण ते नक्की कसे होते ते कळत नाही.) परंतु कणांना रूप होते असे त्याने म्हटले आहे. कण किंवा अणू म्हणजे 'विश्वाचे उत्पत्तीपूर्वीचे सूक्ष्मरूप' असे त्याला म्हणायचे असावे असेही वाटते. अणू म्हणजे शुक्रजंतू असेही वाटते.
"अत्यंत सूक्ष्म घनगोल (परिमंडल) असे रूप असलेले कण काही न समजण्यासारख्या कारणाने (अदृष्ट) एकत्र येतात आणि त्यापासून विश्वातील पदार्थांची उत्पत्ती होते" असे काही त्याने म्हटले असावे. हे प्राथमिक विज्ञान आहे.
भारतात वैशेषिक विचारधारा पुढे चालू राहिली असती तर... वगैरे विचार मनात येतात.

१०. ब्रह्मवादाने भक्ती मार्गाची द्वाही फिरवल्याने समाजाच्या चौकसबुद्धीची आणि पर्यायाने भविष्यात होऊ शकणार्‍या भौतिक विकासाची हानी झाली. कारण बादरायणाने ब्रह्मसूत्रात किंवा शंकर-रामानुजांनी भाष्य करताना भौतिक विकासावर उघड हल्ला चढवलेला नसला तरी ब्रह्मवादिनांचा अध्याहृत संदेश 'मोक्ष'- बंधनातून मुक्ती - वासनांतून मुक्ती - इंद्रीय दमन - सुखोपभोग, विषयवासना, जिव्हालौल्य यांचा त्याग हाच आहे. असे तत्त्वज्ञान रूढ झाले म्हणजे भौतिक विकास थंडावणार हे निश्चित!
(उदा. इंटरनेटवर जाणे हे घोर पाप आहे, तसे केल्याने मनुष्य नरकात जातो/ मोक्षपदी जात नाही असे जर जगातील समस्त धर्मांनी १९८० मध्ये जाहीर केले असते आणि त्यांचे असे म्हणणे लोकांनी मान्य केले असते तर ...?)

परंतु या र्‍हासाला कोणी जबाबदार असेल तर बादरायण होता असे फारतर म्हणता येईल. शंकर-रामानुजांना दोषी धरण्यात अर्थ नाही.(समाजाची आणि पर्यावरणाची अवनती अनिर्बंधित भौतिक विकासामुळे होते हे त्यांचे मत सर्वथैव चुकीचे होते असे म्हणता येईल काय? आजच्या परिस्थितीत जागतिक अन्नटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग इ.इ. प्रश्न भौतिक विकासाचेच पैलू आहेत असे वाटते काय? -असे प्रश्न पडू शकतात.)

Comments

बादरायण

इन्स्टंट नॉलेज साठी बेष्ट लेख.
बादरायण ची भानगड समजली नाही. बादरायण संबंध हा वाक्यप्रचार माहित आहे. पण त्याचा संबंध बदरी वा बोराचे झाड याचेशी असल्याचे स्मरते.
अन ती ब्रह्मसत्या जगन्मिथ्या ची ष्टोरी जरा सांगा कि.
प्रकाश घाटपांडे

+१

बादरायण व्यास हा शब्द प्रथमच ऐकला. व्यासांचे नाव कायम कृष्णद्वैपायन असे ऐकल्याचे आठवते.

बाकी थोडे अवांतर - प्रकाशरावांनी वर विचारलेल्या "ष्टोरी" संदर्भातः

शंकराचार्यांचे मूळ वचन होते - ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर:।।

ह्याचा अर्थ "ब्रम्ह सत्य आहे, जग मिथ्य आहे, पण आपला जीव हेच ब्रम्ह आहे!" असा आहे. थोडक्यात जीवनाला आणि स्वतःचे महत्व कमी करण्याला शंकराचार्यांनी या श्लोकात सांगीतल्या सारखे वाटत तरी नाही. किंबहूना परत "सततच्या बदलणार्‍या या सभोवतालच्या जगाला मिथ्या समजून पण स्वतःमधे दडलेले ब्रम्ह ओळखून जीवनात योग्य वाटचाल करत पुढे जात रहा," असा पण तत्वज्ञानी अर्थ असावा असे वाटते.

आपली माणसे "ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या " इतकेच म्हणून थांबू लागली आणि सगळी गोची झाली.

बादरायण व्यास

व्यासांना हे नाव त्यांनी बद्रीवनात केलेल्या तपस्येने पडले असावे बहुधा. बद्रीवन म्हणजे बहुधा आताचे बद्रीनाथ हे स्थान. येथेच महर्षी व्यासांनी महाभारताची रचना केली असे म्हटले जाते.

लेख जितका कळला तितका आवडला.

पण असे करूनही बौद्धमताचा संपूर्ण पराभव न झाल्याने गौतम बुद्धालाही ईश्वरी अवतार बनवून त्यात गोवले गेले.

मुळात गौतम बुद्ध हा विष्णूच्या दशावतारातील भाग आहे या मागे हीच सर्व संकल्पना तर आहे.

मुख्य वैचारिक हल्ला मोडकळीला आलेल्या बौद्धधर्मावर असल्याने आणि या विचारांना सामाजिक अनागोंदीची जोड मिळाल्याने शंकर बौद्ध तत्त्वज्ञानाचा पाडाव करण्यात यशस्वी झाले.

पटण्यासारखे आहे.

परंतु भौतिक विज्ञानाची हाकालपट्टी पूर्वीच झाली होती.

खरे आहे. भौतिक सुख, गरजा, शास्त्रे यांची गळचेपी झाली हे नाकारता येत नाही.

विचारी

वाचनीय आणि विचारी लेख.
आवडले.
विसुनानांनी असेच लिहित रहावे असे वाटले.

आणि विकासरावांचेही काही वाचायला मिळाले नाही बरेच दिवसात...

आपला
गुंडोपंत

असेच म्हणतो

वाचनीय आणि विचारी लेख.
आवडले.
विसुनानांनी असेच लिहित रहावे असे वाटले.

आणि विकासरावांचेही काही वाचायला मिळाले नाही बरेच दिवसात...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आद्य शंकराचार्यांची निवडक स्तोत्रे

मधुश्री प्रकाशन - पुणे
यांनी आद्य शंकराचार्यांची निवडक स्तोत्रे प्रसिद्ध केली आहेत. किंमत रु.१०० मात्र.
नक्की कशावर आधारीत निवड आहे हे कळले नाही, सध्याच येथे शंकराचार्यांवर चर्चा घडत असल्याने हे पुस्तक इंटरेस्टींग वाटले.

आपला
गुंडोपंत

लेख आवडला.

पण अनेक विधानांच्या बाबतीत प्रश्न विचारले जाऊ शकतात. (खुद्द लेखकाला या लेखामधे प्रश्न विचारण्यासारखे पावलोपावली आहे हे तत्वतः मान्य असावे असे मी धरून चालतो.)

समाजाची आणि पर्यावरणाची अवनती अनिर्बंधित भौतिक विकासामुळे होते हे त्यांचे मत सर्वथैव चुकीचे होते असे म्हणता येईल काय? आजच्या परिस्थितीत जागतिक अन्नटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग इ.इ. प्रश्न भौतिक विकासाचेच पैलू आहेत असे वाटते काय? -असे प्रश्न पडू शकतात.)

अन्नटंचाई आणि पर्यावरणाचे प्रश्न हे आणि यासारखे असंख्य प्रश्न भौतिक विकासाच्या प्रक्रियेतून निर्माण झाले असे जरी असले तरी त्यामुळे भौतिक विकासाच्या प्रक्रियेत सुधारणा आवश्यक आहे असे म्हणता येईल. त्या प्रक्रियेलाच दोष देता येणार नाही. औद्योगिक क्रांती आणि शतकानुशतके चाललेल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या प्रक्रियेमधे निश्चित दोष निर्माण झाले; पण इथे प्रश्न तत्वाचा आहे. एक तत्व म्हणून अधिभौतिक विकासाला दूषण लावण्यात धोका संभवतो.

हतो वा

शरद
हतो वा ......
श्री. विसुनानांना हा श्लोक प्रक्षिप्त का वाटावा हे कळत नाही.अर्जुन प्रत्यक्ष स्वर्गात जाऊन,तेथे राहून आलेला आहे.गीतेच्या सुरवातीला यद्ज्याची निंदा करावयाची नसून अर्जुनाला कर्तव्याची जाणीव करून द्यावयाची आहे. तेव्हढ्यापुरते त्याला स्वर्गाचे आमिष दाखविणे योग्य होते. यमाने नचिकेताला विद्या देण्याच्या आधी अशीच प्रलोभने दाखवली होती.भगवानांनी
आपण म्हणता त्याप्रमाणे अर्जुनाला त्याच्या कलाकलाने ब्रह्मविद्या दिली.
समित्पाणी शरद

कसून केलेल्या अभ्यासाची परिणती

कसून केलेल्या अभ्यासाची परिणती असलेला निबंध आहे हा.

पूर्वमीमांसकांची तुम्ही जरा जास्तच खरडपट्टी केली की! कर्मकांडांचे निमित्त करून पूर्वमीमांसक "ज्ञान म्हणजे काय?" "अर्थ समजतो म्हणजे नेमके काय समजते?" अशा मूलभूत प्रश्नांवर मौलिक चर्चा करतात. हे सखोल विचार त्या चर्चिलेल्या कर्मकांडाच्या पार पलिकडे ज्ञान-विज्ञानाच्या मुळाशी जातो.

(दुसर्‍या कुठल्या संदर्भात पूर्वमीमांसकांचे "अरुणाधिकरण" इतकेच थोडेसे वाचलेले आहे. तेवढ्या शितावरून भाताची परीक्षा केली आहे.)

पूर्वमीमांसकांचा पुढे कधी माझ्याकडून अभ्यास होईल तसे त्यांच्या दर्शनातील काही गमतीजमती सांगेन.

गीताप्रेस, गोरखपूर / पूर्वमीमांसादर्शन

गोरखपूरची गीताप्रेस ही एक बरीच जुनी प्रकाशनसंस्था अतिशय नाममात्र शुल्कात संबंधित विषयावरील पुस्तके प्रकाशित करते. सदर विषयाशी संबंधित पुस्तकांची माहिती अशी :
ईशादि नौ उपनिषद् - ५४४ पृष्ठे, ५० रू. ($२)
वेदान्त दर्शन - ४८० पृष्ठे, ४० रु. ($२)
ईशावास्योपनिषद्, केनोपनिषद्, मांडूक्योपनिषद्, प्रश्नोपनिषद्, तैत्तिरियोपनिषद्, ऐतरेयोपनिषद्, श्वेताश्वतरोपनिषद् - ४ ते २२ रू ($०.२ ते $१.१)
बृहदारण्यकोपनिषद् - १३७६ पृष्ठे, १०० रू ($५),
कठोपनिषद् -१६० पृष्ठे, १२ रु ($०.६)
छान्दोग्योपनिषद् - ९२८ पृष्ठे, ७० रु ($३.५)

याशिवाय शंकराचार्यलिखित - विवेक-चूडामणि (रू. १२, $०.६), अपरोक्षानुभूति (रु. ४, $०.२), प्रश्नोत्तरी (रू. २, $०.१)

उपनिषदांवर विशेष अंक यांनी काढला होता (१९४९). त्यात प्रमुख नऊ उपनिषदांचा मूलपाठ आणि अर्थ आहेच शिवाय ४५ इतर उपनिषदांचा अर्थ आहे. किंमत १२५ रु. ($६.२५) (सर्व विशेषांक)

याशिवाय सर्व पुराणे, महाभारत, रामायण इ. अश्याच नाममात्र शुल्कात आहेत.

त्यांच्या संकेतस्थळावर (http://www.gitapress.org) खरेदीची सोय आहे असे दिसते. भारतातील सर्व प्रमुख शहरात यांची दुकाने आहेत. इतरत्र पोस्टाने मागवता येते. पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या समोरील छोटेखानी दुकानात पूर्वी मिळायची.


पूर्वमीमांसादर्शन हे १९०८ चे पुस्तक http://www.archive.org वर मिळाले. पुस्तकाचा आकार ११ मे.बा. आहे

ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या |

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या

श्री. विकास लिहितात : "शंकराचार्यांचे मूळ वचन होते - ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर:।।
ह्याचा अर्थ "ब्रम्ह सत्य आहे, जग मिथ्य आहे, पण आपला जीव हेच ब्रम्ह आहे!" असा आहे
.
.....आचार्यांचे मूळ वचन अचूक उद्धृत केले आहे. मात्र अर्थ काटेकोर नाही. ’पण’ अर्थाचा शब्द मूळ वचनात नाही.तसेच " "नापर:" चा अर्थ दिलेला नाही.माझ्या मते "ब्रह्म सत्यम्‌ " मधे सत्यम्‌ चा अर्थ खरे (true) असा नसून ’वास्तव’(real) असा आहे.मराठीत सत्य आणि खरे हे शब्द समानार्थी वापरले जातात. तसेच मिथ्या चा अर्थ "अस्तित्वात नसलेले, भ्रामक,भासमान " असा आहे. ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर:। चा अर्थ असा असावा:-----
ब्रह्म हे वास्तव आहे. (ब्रह्मालाच अस्तित्व आहे). जग भासमान आहे.(जगाला अस्तित्व नाही.) जीव हा ब्रह्म आहे. (जीव हा)दुसरा कोणी नाही.
..जीव आणि ब्रह्म यांतील अभेद हेच अद्वैत मत होय. "सोsहम्‌," " तत्त्वमसि" ही वचने याच मताचा परिपोष करतात.

 
^ वर