मराठी माणूस,हिंदू माणूस आणि भारतीय नागरिक!..काही साम्यस्थळे!

विषय पाहून चक्रावलात? विषय फार गहन आहे? अहो हे मला माहीत आहे हो. पण मी काठाकाठानेच पोहणार आहे. कारण फार खोलात शिरण्याची माझी क्षमता नाहीये ह्याची मला पूर्ण जाणिव आहे. ह्या तिघांच्यात जाणवणार्‍या दोषांत(मी इथे फक्त दोषांबद्दलच बोलणार आहे) एक समानता आढळते. त्याबद्दलची माझी काही ढोबळ निरीक्षणे मी इथे नोंदवणार आहे. त्यावर आपलीही मते जाणून घ्यावीत म्हणतो.

काही ठळक दोष जे वरील तिघात समान आहेत.

१)कृती कमी उक्ती जास्त. म्हणजे घोषणा करण्याची उपजत आवड पण अंमलबजावणीच्या नावाने बोंब.
२)मुत्सद्दीपणाचा अभाव. जे करायचे त्याची करण्याआधी जाहीर चर्चाच फार,त्यामुळे विरोधकांचे चांगलेच फावते.
३)अती सहिष्णुता. आपल्या विरोधात कुणी अवाजवी बोलले,वागले तरी त्याचा योग्य वेळी योग्य त्या प्रकारे बंदोबस्त करणे तर दूरच पण मनाचा उदारपणा दाखवण्यासाठी तिथे सोयिस्कर दुर्लक्ष करणे.
४)स्वत:च्या माणसांवर उठसूठ टीका करणे. प्रतिस्पर्ध्याला वचक बसेल असे वागण्याऐवजी स्वत:च्याच लोकांना अक्कल शिकवणे.
५)एकीचा अभाव. आपापसात सामंजस्य निर्माण करण्याऐवजी दुही कशी वाढेल अशी वक्तव्ये आणि वागणूक करणे.

मंडळी मी वर लिहिलेले सगळे दोष हे ममा(मराठी माणूस, हिंमा(हिंदू माणूस) आणि भाना(भारतीय नागरिक)ह्यांच्यामध्ये कमीजास्त प्रमाणात आढळतात.पण ह्यामध्ये ममा हा सर्वात कमजोर आहे,त्यानंतर हिंमा आणि मग भाना. हा नेमका काय प्रकार आहे? चला पुढे वाचा.

ममा:आपल्याच प्रदेशात(महाराष्ट्रात)हा आता उपरा ठरायला लागलाय.इथले राजकीय नेते मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी अमुक करू आणि तमुक करू असा नुसता घोषणांचा मारा करत असतात.पण कृतीच्या नावाने शून्य. कागदोपत्री मराठी भाषा जरी इथली राजभाषा असली तरी सगळे कागदी व्यवहार अजूनही इंग्लिश मध्ये आणि इतर सर्वसामान्य व्यवहार हिंदीमध्ये चालतात.नोकरी धंद्यात इथला भुमिपुत्र म्हणून ज्याला प्राथमिकता मिळायला हवी त्या ममा ला कुणी हिंग लावूनही विचारत नाही. मराठी अस्मितेचे गाजर दाखवून काही लोक आंदोलनं वगैरे करतात आणि त्यात मराठी माणूसच भरडला जातो. परप्रांतीयांना फुकटची इतरांची सहानुभूती मिळते. जे काही मराठी भाषा आणि ममा साठी करायचे ते बिनबोभाटही करता येत असते. पण इथल्या लोकांना,विशेष करून राजकारण्यांना असे काही करण्याऐवजी मोठमोठ्या घोषणा करण्यात आणि स्वत:भोवती दिवे ओवाळून घेण्यातच स्वारस्य असते. त्याला आम ममाशी काहीही देणेघेणे नसते.
अशा तर्‍हेच्या घोषणांमुळे विरोधकांचे मात्र फावते आणि मग आपली एकत्रित शक्ती ह्याविरुद्ध उभी करून महाराष्ट्र आणि ममाला संकुचित,जातीयवादी वगैरे ठरवून मोकळे होतात.

आता जेव्हा संपूर्ण देशाचा विचार करतो तेव्हा ममाच्या जागी हिंमाला ठेवा. इथेही वरचे सर्व निकष लागू होतात. हिंदू नेते हिंदूंच्या भल्यासाठी(हिंदू बहुसंख्यांक असल्यामुळे ते साहजिक आहे) जे करायचे ते बिनबोभाटपणे करू शकतात पण त्यांना तसे काही करण्याच्या ऐवजी फुकट प्रसिद्धी हवी असते. त्यामुळे राणा भीमदेवी घोषणा करायच्या की ज्यामुळे निधर्मीवादाची झूल पांघरलेल्यांच्या हातात एक आयतेच हत्यार मिळते.इथे हिंमाच्या हिताचे म्हणजे दुसर्‍यांच्या अहिताचे असे नसते पण घोषणा करणार्‍यांना काही तरी सनसनाटी निर्माण करायची असते असे त्यांच्या वक्तव्यावरून कुणालाही वाटू शकते; त्यामुळे त्यावरून रण माजते आणि मूळ विषय बाजूलाच जातो.सर्व जनतेला रोजगार हमी.अन्न,वस्त्र,निवारा,पाणी अशा प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी
प्राथमिकता देण्याऐवजी नसलेले धार्मिक प्रश्न उकरून काढण्यात ह्या नेत्यांना स्वारस्य असते.त्यामुळे होते काय की इथला बहुसंख्य हिंमा हा उपरा ठरतो.त्यातून हिंदूंमधील तथाकथित विद्वान आणि स्वत:ला पुरोगामी म्हणवणारी माणसे नुसते ’हिंदू’ असे काही ऐकले की लगेच कावकाव करायला सुरुवात करतात.त्यांना अन्य धर्मीयांनी स्वत:ला त्या धर्माचे अनुयायी म्हटले तर त्यात काहीही वावगे वाटत नाही पण हिंमा ने आपण हिंदू आहोत असे म्हटले तर ते जातीयवादाचे द्योतक मानले जाते.

हाच निकष आंतर्राष्टीय पातळीवर भाना ला लागू पडतो. चीन,अमेरिका,पाकिस्तान भारताला अक्कल शिकवायचा प्रयत्न करतात. स्वत:हून कधी कुणावर आक्रमण न करणार्‍या भारतीयांना शांतता आणि संयमाचे धडे दिले जातात. दिवसाढवळ्या चालणार्‍या पाकिस्तानी दहशतवादाला आम्ही चोख उत्तर देऊ वगैरे घोषणा सत्ताधारी नेहमीच करत असतात पण प्रत्यक्ष काहीच करत नाहीत. चीनने आपला प्रदेश बळकावला तरी भारताला आंतर्राष्ट्रीय समुदायाकडून सोडा पण इथल्या मार्क्सवादी पक्षाकडूनही पाठिंबा मिळत नाही. मुत्सद्दीपणात भारतीय नेहमीच मार खातात. मग तो ताश्कंद करार असो,अणुभट्टी-करार असो अथवा चीन-पाकिस्तान बरोबरची सीमावादाची बोलणी असोत,प्रत्येक ठिकाणी आपण कमी पडतो.

मंडळी ह्यातला एकेक विषय हाताळायचा म्हटला तरी त्यावर पानेच्या पाने लिहिता येतील इतके हे विषय सर्वव्यापी आहेत आणि माझ्यासारख्याची ती कुवत नाही. तेव्हा मी इथेच थांबतो. ह्या ठिकाणी बरेच मुद्दे अध्याहृत राहिलेले आहेत. ते आपण आपापल्या कुवतीनुसार समजून घ्याल अशी अपेक्षा करतो आणि आता खरंच थांबतो.
इति अलम्!

Comments

अनेक ठिकाणी लागू होणारे विश्लेषण

हे उत्तम निरीक्षण :

१)कृती कमी उक्ती जास्त. म्हणजे घोषणा करण्याची उपजत आवड पण अंमलबजावणीच्या नावाने बोंब.
२)मुत्सद्दीपणाचा अभाव. जे करायचे त्याची करण्याआधी जाहीर चर्चाच फार,त्यामुळे विरोधकांचे चांगलेच फावते.
३)अती सहिष्णुता. आपल्या विरोधात कुणी अवाजवी बोलले,वागले तरी त्याचा योग्य वेळी योग्य त्या प्रकारे बंदोबस्त करणे तर दूरच पण मनाचा उदारपणा दाखवण्यासाठी तिथे सोयिस्कर दुर्लक्ष करणे.
४)स्वत:च्या माणसांवर उठसूठ टीका करणे. प्रतिस्पर्ध्याला वचक बसेल असे वागण्याऐवजी स्वत:च्याच लोकांना अक्कल शिकवणे.
५)एकीचा अभाव. आपापसात सामंजस्य निर्माण करण्याऐवजी दुही कशी वाढेल अशी वक्तव्ये आणि वागणूक करणे.

ऐकून आश्चर्य वाटेल पण साधारणपणे हेच मत "(अमेरिकेतला) इंग्रजीभाषक, ख्रिस्ती माणूस, अमेरिकन माणूस" यांच्याबद्दल अमेरिकेत दिले जाते.

आजकाल अनेक ठिकाणी इंग्रजीबरोबर स्पॅनिशमध्ये पाट्या अमेरिकेत दिसतात. हे आक्रमण रोखण्यात इंग्रजीभाषकाला अपयश आले आहे, याबाबत अनेकांना खेद वाटतो.
ख्रिस्ती धर्म अमेरिकेत बहुसंख्य असून ख्रिस्ती धर्माविरुद्ध जीवशास्त्र शाळेत शिकवण्यात येते. चर्चचा दुरूनही संबंध दिसला तर सरकारी पैसा, अनुदाने बंद केली जातात. खूप गोष्टी ख्रिस्ती धर्माच्या नाकावर टिच्चून केल्या जातात. याबाबत काही का करता येत नाही? म्हणून ख्रिस्ती लोक अशीच काही कारणमीमांसा देतात.
अमेरिका अतिसहिष्णू आहे, भिडस्तपणे अणुबाँबाचा वापर करत नाही, त्यामुळे अन्य देशातील विघ्नसंतोषी लोक अमेरिकेविरुद्ध अतिरेकी कारवाया करतात आणि युद्ध करायची चुणूक दाखवतात. (अशी अमेरिकेत अनेकांची कारणमीमांसा आहे. भारतातील वाचकांना हास्यास्पद वाटू शकेल.)

असो. कुठल्यातरी वेगळ्याच भाषेबद्दल, धर्माबद्दल आणि देशाबद्दल ही चर्चा जायला नको. पण तरी अमेरिकेतही साम्यस्थळे इतकी घनिष्ठ बघितल्यामुळे ही माहिती तुमच्या लेखाच्या संदर्भात द्यावीशी वाटली. तुमची कारणमीमांसा तुम्हाला वाटते त्यापेक्षा अधिक ठिकाणी लागू आहे, हे कौतुकास्पद आहे. येथे चर्चिलेल्या गोष्टी या दूरदेशात माझ्या आजूबाजूला लागू आहेत. त्यामुळे ही चर्चा मी मोठ्या उत्सूकतेने वाचत आहे.

अशीच

हं!
साधारणपणे अशीच प्रतिक्रीया आपण आधीही दिली आहे असे आठवते.
त्यामुळे गुंडोपंतांचे बरेच विचार डहुळले गेले होते/आहेत.
या शिवाय मिपावर निलकांतचे लिखाणही या संदर्भात महत्वाचे ठरावे.

मात्र हे अनेक ठिकाणी लागू होणारे विश्लेषण जगभर(?) सारखेच असेल तर त्याची कुठेतरी भाषा-समाजशास्त्रीय मिमांसापण करितच असणार. तीही वाचायला पाहिजे.

हा भाग तसा संवादशास्त्राशीही तेव्हढाच जोडलेला आहे.

आपला
गुंडोपंत

खरंच गंमत आहे!

अमेरिका अतिसहिष्णू आहे, भिडस्तपणे अणुबाँबाचा वापर करत नाही, त्यामुळे अन्य देशातील विघ्नसंतोषी लोक अमेरिकेविरुद्ध अतिरेकी कारवाया करतात आणि युद्ध करायची चुणूक दाखवतात. (अशी अमेरिकेत अनेकांची कारणमीमांसा आहे. भारतातील वाचकांना हास्यास्पद वाटू शकेल.)

हे वाचून खरंच गंमत वाटली. जिथे अमेरिकेचा अर्थाअर्थी संबंध नव्हता अशा अफगाणिस्तान आणि इराकची अक्षशः धुळधाण उडवल्यावरही जर अमेरिकनांचे म्हणणे असेच असेल तर मग आम्ही भारतियांनी काय म्हणावे?आमच्याकडे तर शब्दच नाहीत. भारतात शेजारी देशाकडून होणारे नियमित दहशतवादी हल्ले बहुदा ह्या अमेरिकनांच्या खिजगणतीतही नसावेत असे वाटते. भारताइतका संयम(की भिडस्तपणा) दुसरा कोणता देश दाखवू शकेल असे आज तरी वाटत नाही. असो. परदु:ख शीतल असते असे म्हणतात ते काही खोटे नाही. शेवटी ज्याला त्याला त्याचा देश प्यारा हेच खरे.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

सहमत

सहमत आहे. हे विचार वाचून खरेच नवल वाटले. प्रत्येकाच्या गागलमधून जग किती वेगळे असू शकते याचे एक उदाहरण.
----
"इतने सारे नाम? बाकी लोग किधर है?"

हम्म... | प्रश्ने प्रश्ने

>> ऐकून आश्चर्य वाटेल पण साधारणपणे हेच मत "(अमेरिकेतला) इंग्रजीभाषक, ख्रिस्ती माणूस, अमेरिकन माणूस" यांच्याबद्दल अमेरिकेत दिले जाते.

मला यात आजिबात आश्चर्य वाटत नाही. ही वाक्ये कोणत्याही भाषेत लिहा प्रत्येकाला ती 'आपलीच' (दर्दभरी) कहाणी वाटेल. असे का व्हावे यावर विचार व्हावा. यातूनच लेखात मांडलेल्या प्रश्नांचे उत्तर मिळेल आणि/किंवा असे प्रश्न निरर्थक/निरुपयोगी आहेत हेही समजेल.

एकंदरित लेखात मांडलेले मुद्दे पटले नाहीत. पहिले आणि मुख्य कारण म्हणजे याला कोणताही वास्तविक, तार्किक, कायदेशीर आणि व्यावहारिक(ही) आधार नाही.

>> १)कृती कमी उक्ती जास्त. म्हणजे घोषणा करण्याची उपजत आवड पण अंमलबजावणीच्या नावाने बोंब.

हा दुर्गुण ममालाच कसा बरे चिकटला? असे काही सर्वेक्षण झाले आहे काय? हा दुर्गुण ममाच काय कामा, तमा, तेमा, उभामा, बिमा, रामा इ. इ. इ. सर्व लोकांमध्ये मिळेल.

>> २)मुत्सद्दीपणाचा अभाव. जे करायचे त्याची करण्याआधी जाहीर चर्चाच फार,त्यामुळे विरोधकांचे चांगलेच फावते.

"मुत्सद्दीपणाचा अभाव." मुद्दे वरीलप्रमाणेच. "विरोधकांचे चांगलेच फावते" मधले विरोधक कोण?

>> ३)अती सहिष्णुता. आपल्या विरोधात कुणी अवाजवी बोलले,वागले तरी त्याचा योग्य वेळी योग्य त्या प्रकारे बंदोबस्त करणे तर दूरच पण मनाचा उदारपणा
>> दाखवण्यासाठी तिथे सोयिस्कर दुर्लक्ष करणे.

"अती सहिष्णुता" मुद्दे वरील प्रमाणेच. "आपल्या विरोधात अवाजवी" बोलणारा ममा असेल तर? मनाचा उदारपणा, क्षमाशीलता हे गुण आहेत, ते अंगिकारण्यासाठी प्रयत्न करू नयेत का?

>> ४)स्वत:च्या माणसांवर उठसूठ टीका करणे. प्रतिस्पर्ध्याला वचक बसेल असे वागण्याऐवजी स्वत:च्याच लोकांना अक्कल शिकवणे.

'स्वतःच्या' म्हणजे? 'स्वतःची माणसे' ची व्याख्या प्रत्येकाची परिस्थितीनुसार वेगवेगळी असते. माझ्या जातीची, माझ्या गल्लीत राहणारी, माझ्या गावाची, माझ्या धर्माची, माझ्या भागातील, माझ्या राज्यातील, माझ्या देशातील यापैकी कोणत्याही एका किंवा एकाहून अधिक प्रकारची माणसे अशी ही व्याख्या बदलत असते. "प्रतिस्पर्ध्याला वचक बसेल असे वागण्याऐवजी... " प्रतिस्पर्धी कोण? "स्वतःची माणसे" चुकत असतील तर त्यांच्यावर टिका करणे, त्याच्या आचरटपणाकडे दुर्लक्ष न करता त्याला विरोध करणे हा खरोखर एक चांगला गुण आहे.

>> ५)एकीचा अभाव. आपापसात सामंजस्य निर्माण करण्याऐवजी दुही कशी वाढेल अशी वक्तव्ये आणि वागणूक करणे.

'स्वतःच्या माणसांची' एकी का? (स्वतःची माणसे या संबंधीची वरील मुद्द्यात दिलेली माहिती पुन्हा पाहावी.)

फलश्रुती- या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तर शोधण्याचा प्रयत्न जो कोणी करेल त्याला या लेखात दाखवलेले दुर्गुण स्वतःमध्ये दिसणार नाहीत :)

जबरी प्रतिसाद!

हाहाहा! नवीनराव! जबरी उत्तर आहे.
खरंच तुमच्यासारखी हुशार माणसं जास्त प्रमाणात जगात असतील तर प्रश्न अगदी चुटकी सारखे सुटतील हो.
कारण प्रश्नाला प्रश्नच समजायचे नाही. "कुठे आहे प्रश्न?" असे म्हणून मोकळे व्हायचे. खरंच असे करता आले तर किती बहार येईल?
मस्त. तुमचा दृष्टीकोण आवडला.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

हसण्यावारी नेऊ नका | सोयीसाठी पुन्हा प्रश्न

हसण्यावारी न नेता माझ्या प्रतिसादात आलेल्या प्रश्नांची तुमच्या समजुतीनुसार उत्तरे देण्याचा प्रयत्न केलात तर (चर्चेच्या दृष्टीने) चांगले होईल असे प्रामाणिकपणे वाटते. मी विचारलेले प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला प्रश्न समजून घेण्याच्या जिज्ञासेतून आले आहेत.

आपल्या सोयीसाठी प्रश्न सारांशरूपाने पुन्हा देत आहे

१. "कृती कमी उक्ती जास्त. म्हणजे घोषणा करण्याची उपजत आवड पण अंमलबजावणीच्या नावाने बोंब."
प्रश्न १. हा दुर्गुण ममांमध्ये (इतर भाषिकांपेक्षा अधिकप्रमाणात) आढळतो या निष्कर्षाला काही आधार आहे का? असेल तर कोणता?

२. "मुत्सद्दीपणाचा अभाव. जे करायचे त्याची करण्याआधी जाहीर चर्चाच फार,त्यामुळे विरोधकांचे चांगलेच फावते."
प्रश्न १. हा दुर्गुण ममांमध्ये (इतर भाषिकांपेक्षा अधिकप्रमाणात) आढळतो या निष्कर्षाला काही आधार आहे का? असेल तर कोणता?
प्रश्न २. या निष्कर्षात 'विरोधक' म्हणजे कोण?

३. "अती सहिष्णुता. आपल्या विरोधात कुणी अवाजवी बोलले,वागले तरी त्याचा योग्य वेळी योग्य त्या प्रकारे बंदोबस्त करणे तर दूरच पण मनाचा उदारपणा
दाखवण्यासाठी तिथे सोयिस्कर दुर्लक्ष करणे."
प्रश्न १. "आपल्या विरोधात अवाजवी" बोलणारा ममा असेल तर काय करावे?
प्रश्न २. मनाचा उदारपणा, क्षमाशीलता हे गुण आपल्यामध्ये असावेत की नसावेत?

४. "स्वत:च्या माणसांवर उठसूठ टीका करणे. प्रतिस्पर्ध्याला वचक बसेल असे वागण्याऐवजी स्वत:च्याच लोकांना अक्कल शिकवणे."
प्रश्न १. "स्वतःची माणसे" म्हणजे नक्की कोण? मला प्रसंगाप्रमाणे माझ्या जातीची, माझ्या गल्लीत राहणारी, माझ्या गावाची, माझ्या धर्माची, माझ्या भागातील, माझ्या राज्यातील, माझ्या देशातील यापैकी कोणत्याही एका किंवा एकाहून अधिक प्रकारची माणसे 'स्वतःची' वाटतात यांच्यात 'कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट' झाल्यास मी काय करावे?
प्रश्न २. "प्रतिस्पर्ध्याला वचक बसवायचा" मध्ये प्रतिस्पर्धी कोण?
प्रश्न ३. "स्वतःची माणसे" चुकत असतील तर त्यांच्यावर टिका करणे, त्याच्या आचरटपणाकडे दुर्लक्ष न करता त्याला विरोध करणे चुकीचे आहे का? असल्यास/नसल्यास का?

५. "एकीचा अभाव. आपापसात सामंजस्य निर्माण करण्याऐवजी दुही कशी वाढेल अशी वक्तव्ये आणि वागणूक करणे."
प्रश्न १. एकी कोणाची? 'स्वतःच्या' माणसांची का? ('स्वतः' च्या अर्थासाठी प्रश्नसंच ४ पाहावा.)

उत्तरे देण्याचा प्रयत्न.

१) शासकीय(महाराष्ट्र शासन) व्यवहारात मराठीचा आग्रह नाही. सनदी अधिकारी,पोलिस अधिकारी,जिल्हाधिकारी वगैरे सर्व सरकारी अधिकारी बहुतेक करून अमराठी असणे. मग मराठीची अंमलबजावणी कशी होईल?
हेच तामिळनाडु,बंगाल वा अन्य प्रांतात चालू शकेल काय?

२) शासनाच्या नोकर्‍यांसाठीची किमान पात्रता.. मराठी लिहिणे,वाचणे,बोलणे अशी ठेवायला हवी आहे. तिथेही सगळा आनंदी आनंदच आहे. इथे मराठी भाषिक उमेदवारांना प्राधान्य असले पाहिजे...पण एकूण इथेही आनंदच आहे. इतर प्रांतात हे असेच चालते काय?

३)राज्याच्या प्रश्नांवर आणि त्यांच्या सोडवणूकीवर सर्वपक्षीयांमध्ये किमान एकमत असायला हवे. पण ते नाही. उदा. बेळगाव-कारवारचा प्रश्न. ह्यावर कर्नाटकातल्या सर्व पक्षांचे एकमत आहे. वेळप्रसंगी ह्या बाबतीत पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आमदार-खासदारकीचा राजीनामा द्यायचीही तयारी. महाराष्ट्रात असे आहे काय?

४) परप्रांतीयांच्या बाबतचे धोरण... ह्यातही महाराष्ट्राच्या भल्यासाठी पक्षापक्षात एकमत नाही. एकगठ्ठा मतदानावर नजर ठेवून आपापले हितसंबंध जपण्यात सगळे मश्गुल आहेत.

५) मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी कुणी काही बोलले की त्याची संभावना 'संकुचित' अशा शब्दात करण्यात आपलेच लोक पुढे असतात. निदान ह्या बाबतीत तरी एकमत असावे; पण नाही. इथेही पक्षीय राजकारण आडवे येते. म्हणजे मराठी माणूसच मराठी माणसाला आडकाठी करतो. स्वतःला पुरोगामी म्हणवणारे लोक ह्यात आघाडीवर असतात.

नवीनराव मला जसे जमले तसे मी लिहिलेय. आशा आहे ह्यातून काही प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील.
नसतील मिळाली तर मात्र मी ह्यापेक्षा जास्त काही लिहू शकत नाही. काही गोष्टी स्वतः समजून घ्यायच्या असतात. तुम्ही त्या समजून घ्यायचा प्रयत्न करा. प्रत्येक प्रश्नाला उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी जर प्रतिप्रश्नच करायचा असेल तर कुणीही ते करू शकतो. अशाने प्रश्न सुटण्याऐवजी निष्कारण गुंता होतो.
पुरावे वगैरे तुम्ही मागू नका आणि ते द्यायला मी काही गो.रा. खैरनार(ट्रकभर पुरावे) नाही . जे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसतेय ते जर तुम्हाला दिसत नसेल तर मग माझे बोलणेच खुंटले.

ह्यापेक्षा जास्त काही लिहीण्याची माझी बौद्धिक क्षमता नाही हे नम्रपणे नमूद करतो.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

प्रश्न, उत्तरे आणि पुरावे

आधीच्या प्रतिसादात विचारलेल्या प्रश्नांना बगल दिली आहे असे वाटते. हरकत नाही. तुम्ही विचारलेले प्रश्न हे माझ्या मूळ प्रश्नांशी थेट संबंधित नाहीत असे नमूद करून तुमच्या प्रश्नांची माझ्यामते उत्तरे प्रतिसादाच्या शेवटी दिली आहेत. आता इतर मुद्दे :

>> काही गोष्टी स्वतः समजून घ्यायच्या असतात. तुम्ही त्या समजून घ्यायचा प्रयत्न करा.
त्या प्रयत्नातूनच मला आधी विचारलेले प्रश्न पडले.

>> प्रत्येक प्रश्नाला उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी जर प्रतिप्रश्नच करायचा असेल तर कुणीही ते करू शकतो.
चर्चाप्रस्तावकाने मांडलेल्या गृहितकांना जर कोणी आव्हान दिले, प्रश्न विचारले तर त्यांना उत्तर मिळावे. प्रश्न विचारूच नका असे तर तुम्हाला सुचवायचे नाही ना? प्रश्नकर्त्याचा हेतू प्रामाणिक आहे असे समजून (म्हणजे तसा आहेच;) उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे नेहमीच चांगले असते. त्यातून आपल्या गृहितकाला बळ मिळते किंवा आपले गृहितक चुकीचे होते हे कळते.

>> पुरावे वगैरे तुम्ही मागू नका आणि ते द्यायला मी काही गो.रा. खैरनार(ट्रकभर पुरावे) नाही . जे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसतेय ते जर तुम्हाला दिसत नसेल
>> तर मग माझे बोलणेच खुंटले.
तुम्ही केलेली विधाने कोणत्या आधारावर केली असे विचारले जाणे स्वाभाविक आहे. सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ गोष्टीला ट्रकभर पुराव्यांची गरज नाही, एखादाही चालेल. असो मी प्रश्नांचे पुरावा न लागणारे आणि पुरावा लागणारे असे दोन भाग करतो.

पुरावा न लागणारे प्रश्न

१. संदर्भ : "मुत्सद्दीपणाचा अभाव. जे करायचे त्याची करण्याआधी जाहीर चर्चाच फार,त्यामुळे विरोधकांचे चांगलेच फावते"
प्रश्न १. यामध्ये विरोधक म्हणजे तुमच्या मते कोण?

२. संदर्भ : "अती सहिष्णुता. आपल्या विरोधात कुणी अवाजवी बोलले,वागले तरी त्याचा योग्य वेळी योग्य त्या प्रकारे बंदोबस्त करणे तर दूरच पण मनाचा उदारपणा दाखवण्यासाठी तिथे सोयिस्कर दुर्लक्ष करणे."
प्रश्न १. "आपल्या विरोधात अवाजवी" बोलणारा मराठी माणूस असेल तर काय करावे?
प्रश्न २. मनाचा उदारपणा, क्षमाशीलता हे गुण आपल्यामध्ये असावेत की नसावेत?

३. संदर्भ : "स्वत:च्या माणसांवर उठसूठ टीका करणे. प्रतिस्पर्ध्याला वचक बसेल असे वागण्याऐवजी स्वत:च्याच लोकांना अक्कल शिकवणे."
प्रश्न १. "स्वतःची माणसे" म्हणजे नक्की कोण? मला प्रसंगाप्रमाणे माझ्या जातीची, माझ्या गल्लीत राहणारी, माझ्या गावाची, माझ्या धर्माची, माझ्या भागातील, माझ्या राज्यातील, माझ्या देशातील यापैकी कोणत्याही एका किंवा एकाहून अधिक प्रकारची माणसे 'स्वतःची' वाटतात यांच्यात 'कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट' झाल्यास मी काय करावे?
प्रश्न २. "प्रतिस्पर्ध्याला वचक बसवायचा" मध्ये प्रतिस्पर्धी कोण?
प्रश्न ३. "स्वतःची माणसे" चुकत असतील तर त्यांच्यावर टिका करणे, त्याच्या आचरटपणाकडे दुर्लक्ष न करता त्याला विरोध करणे चुकीचे आहे का?

४. "एकीचा अभाव. आपापसात सामंजस्य निर्माण करण्याऐवजी दुही कशी वाढेल अशी वक्तव्ये आणि वागणूक करणे."
प्रश्न १. एकी कोणाची? 'स्वतःच्या' माणसांची का? ('स्वतः' च्या अर्थासाठी प्रश्नसंच ३ मधील प्रश्न १ पाहावा.)

पुरावा लागणारे प्रश्न

१. संदर्भ : "कृती कमी उक्ती जास्त. म्हणजे घोषणा करण्याची उपजत आवड पण अंमलबजावणीच्या नावाने बोंब."
प्रश्न १. हा दुर्गुण ममांमध्ये (इतर भाषिकांपेक्षा अधिकप्रमाणात) आढळतो या निष्कर्षाला काही आधार आहे का? असेल तर कोणता?

२. संदर्भ : "मुत्सद्दीपणाचा अभाव. जे करायचे त्याची करण्याआधी जाहीर चर्चाच फार,त्यामुळे विरोधकांचे चांगलेच फावते."
प्रश्न १. हा दुर्गुण ममांमध्ये (इतर भाषिकांपेक्षा अधिकप्रमाणात) आढळतो या निष्कर्षाला काही आधार आहे का? असेल तर कोणता?

=============================================================
तुमच्या नव्या प्रश्नांविषयी माझे मत

>> १) शासकीय(महाराष्ट्र शासन) व्यवहारात मराठीचा आग्रह नाही. सनदी अधिकारी,पोलिस अधिकारी,जिल्हाधिकारी वगैरे सर्व सरकारी अधिकारी बहुतेक
>> करून अमराठी असणे. मग मराठीची अंमलबजावणी कशी होईल? हेच तामिळनाडु,बंगाल वा अन्य प्रांतात चालू शकेल काय?

(सर्वसामान्य मराठी माणूस यावरून विषय आता प्रशासनाकडे वळला आहे मूळ विषयाशी दूरचा संबंध आहे हे नमूद करून) हे अधिकारी 'भारतीय' प्रशासकीय सेवेतून येतात. सर्व राज्यातील उमेदवार आपापल्या पात्रतेप्रमाणे, योग्यतेप्रमाणे यात निवडून येतात. शिवाय प्रत्येक राज्यात इतर राज्यातले अधिकारी असतातच, इतर राज्यातील अधिकार्‍यांची टक्केवारी कमी जास्त असेल इतकेच. पुराव्यादाखल हे पाहा.

>> २) शासनाच्या नोकर्‍यांसाठीची किमान पात्रता.. मराठी लिहिणे,वाचणे,बोलणे अशी ठेवायला हवी आहे. तिथेही सगळा आनंदी आनंदच आहे. इथे मराठी
>> भाषिक उमेदवारांना प्राधान्य असले पाहिजे...पण एकूण इथेही आनंदच आहे. इतर प्रांतात हे असेच चालते काय?

(सर्वसामान्य मराठी माणूस यावरून विषय आता शासकीय नोकर्‍यांच्या पात्रतेकडे वळला आहे मूळ विषयाशी दूरचा संबंध आहे हे नमूद करून) महाराष्ट्रातील शासकीय नोकर्‍यांचे निकष आणि इतर राज्यातील नोकर्‍यांचे निकष यांची मला व्यक्तिशः माहिती नाही. अशी तुलनात्मक माहिती देऊ शकलात तर "इतर प्रांतात असे चालत नाही फक्त महाराष्ट्रात असे चालते" हा दावा लगेच मान्य करेन.

>> राज्याच्या प्रश्नांवर आणि त्यांच्या सोडवणूकीवर सर्वपक्षीयांमध्ये किमान एकमत असायला हवे. पण ते नाही. उदा. बेळगाव-कारवारचा प्रश्न. ह्यावर
>> कर्नाटकातल्या सर्व पक्षांचे एकमत आहे. वेळप्रसंगी ह्या बाबतीत पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आमदार-खासदारकीचा राजीनामा द्यायचीही तयारी.
>> महाराष्ट्रात असे आहे काय?

सीमाप्रश्नावर महाराष्ट्रातील सर्व पक्षांचे एकमत आहे आणि हा प्रश्न महाराष्ट्र सरकारने (कोणत्या एका पक्षाने नव्हे) न्यायालयात नेलेला आहे.

>> परप्रांतीयांच्या बाबतचे धोरण... ह्यातही महाराष्ट्राच्या भल्यासाठी पक्षापक्षात एकमत नाही. एकगठ्ठा मतदानावर नजर ठेवून आपापले हितसंबंध जपण्यात
>> सगळे मश्गुल आहेत.

कोणत्याही राज्यातील लोकांना कोणत्याही राज्यातील शहरात (काही विशिष्ट अपवाद वगळता) जाऊन राहण्याचा, काम करण्याचा घटनेने अधिकार दिलेला आहे. कोणत्याही पक्षाने याबाबत 'धोरण' ठरवून त्यात फरक पडणार नाही आहे.

>> मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी कुणी काही बोलले की त्याची संभावना 'संकुचित' अशा शब्दात करण्यात आपलेच लोक पुढे असतात.
"न्याय्य हक्क" सर्व भारतीयांना सारखेच आहेत. विशिष्ट प्रांतात जन्माला आलेल्या, विशिष्ट भाषा बोलणार्‍या भारतीयांना अधिक "न्याय्य हक्क" आणि इतर प्रांतातून आलेल्या, वेगळी भाषा बोलणार्‍यांना कमी "न्याय्य हक्क" अशी आपली कायदेशीर चौकट नाही. आणि वाटले कोणाला विचार संकुचित तर त्याने तसे म्हणून दाखवले तर तो त्याच्या प्रामाणिकपणा, स्पष्टवक्तेपणा म्हटला पाहिजे आणि असे न घाबरता बोलू शकतो यबद्दल सुरक्षा व्यवस्थेचे कौतुक झाले पाहिजे.

उत्तरे तुम्हीच दिलीत!

मला प्रश्न विचारता विचारता आपण त्याची नेमकी उत्तरे दिली आहेत. आता मी वेगळे काय सांगू?
"समजनेवालेको इशारा काफी होता है " असे कुणीसे म्हटलंय.
मी जे ममांचे दोष म्हणत होतो त्याचे प्रात्यक्षिक आपणच दिलेले आहे हे बहुधा आपल्या लक्षात आले नसावे. म्हणूनच इतका ढळढळीत पुरावा असल्यानंतर अजून काही लिहिण्यासारखे बाकी आहे असे मला वाटत नाही.
मदतीबद्दल धन्यवाद!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

?

>> मला प्रश्न विचारता विचारता आपण त्याची नेमकी उत्तरे दिली आहेत.

? (चक्रावलेला स्माइली)

>> आता मी वेगळे काय सांगू?

मी उत्तरे दिली असे तुम्ही म्हणताय, आता (तरी) त्या प्रश्नांविषयी तुम्हाला काय वाटते ते प्रश्नवार सांगा. सोयीसाठी मी पुरावा लागणारे व न लागणारे असे वर्गीकरण केले होते. पुरावा लागणारे नको असतील तर पुरावे न लागणार्‍यांविषयी तुमचे मत सांगा.

१. संदर्भ : "मुत्सद्दीपणाचा अभाव. जे करायचे त्याची करण्याआधी जाहीर चर्चाच फार,त्यामुळे विरोधकांचे चांगलेच फावते"
प्रश्न १. यामध्ये विरोधक म्हणजे तुमच्या मते कोण?

२. संदर्भ : "अती सहिष्णुता. आपल्या विरोधात कुणी अवाजवी बोलले,वागले तरी त्याचा योग्य वेळी योग्य त्या प्रकारे बंदोबस्त करणे तर दूरच पण मनाचा उदारपणा दाखवण्यासाठी तिथे सोयिस्कर दुर्लक्ष करणे."
प्रश्न १. "आपल्या विरोधात अवाजवी" बोलणारा मराठी माणूस असेल तर काय करावे?
प्रश्न २. मनाचा उदारपणा, क्षमाशीलता हे गुण आपल्यामध्ये असावेत की नसावेत?

३. संदर्भ : "स्वत:च्या माणसांवर उठसूठ टीका करणे. प्रतिस्पर्ध्याला वचक बसेल असे वागण्याऐवजी स्वत:च्याच लोकांना अक्कल शिकवणे."
प्रश्न १. "स्वतःची माणसे" म्हणजे नक्की कोण? मला प्रसंगाप्रमाणे माझ्या जातीची, माझ्या गल्लीत राहणारी, माझ्या गावाची, माझ्या धर्माची, माझ्या भागातील, माझ्या राज्यातील, माझ्या देशातील यापैकी कोणत्याही एका किंवा एकाहून अधिक प्रकारची माणसे 'स्वतःची' वाटतात यांच्यात 'कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट' झाल्यास मी काय करावे?
प्रश्न २. "प्रतिस्पर्ध्याला वचक बसवायचा" मध्ये प्रतिस्पर्धी कोण?
प्रश्न ३. "स्वतःची माणसे" चुकत असतील तर त्यांच्यावर टिका करणे, त्याच्या आचरटपणाकडे दुर्लक्ष न करता त्याला विरोध करणे चुकीचे आहे का?

४. "एकीचा अभाव. आपापसात सामंजस्य निर्माण करण्याऐवजी दुही कशी वाढेल अशी वक्तव्ये आणि वागणूक करणे."
प्रश्न १. एकी कोणाची? 'स्वतःच्या' माणसांची का? ('स्वतः' च्या अर्थासाठी प्रश्नसंच ३ मधील प्रश्न १ पाहावा.)

मला वाटत नाही या प्रश्नांची उत्तरे मी दिली आहेत. पण असो. आता तुमचे (प्रश्नवार) मत ऐकण्यास उत्सुक आहे.

माफ करा!

नवीनराव माफ करा. तुम्ही म्हणता तशी उत्तरे मी तुम्हाला देऊ शकत नाही. तशी खुलासेवार उत्तरे देऊ शकलो असतो तर आनंदच वाटला असता. पण दूर्दैवाने माझी तेवढी कुवत नाही.
मला जे वाटले ते मी इथे मांडले. त्याच्याशी कुणी सहमत असतीलही/नसतीलही. ज्याचे जे काही मत आहे ते बदलण्याचा मी प्रयत्न करत नाहीये अथवा तसा आग्रह देखिल नाहीये. तसेच माझी मते ही अनुभवांती बनलेली आहेत. तीही इतक्या सहजासहजी बदलणारी नाहीयेत. मी फक्त माझे निरीक्षण नोंदवलेले आहे.
माझ्या अशा लेखनामुळे तुम्हाला जर वैयक्तिक त्रास झाला असेल अथवा तुमची अस्मिता दुखावली असेल तर कृपया मला माफ करा. "मला जे म्हणायचे आहे ते, मी मला जसे जमले तसे लिहीलेले आहे " असे आधीच म्हटलेले आहे. फार खोलात जाऊन त्यावर चर्चा करून कुणाचे मतपरिवर्तन करण्याइतपत अथवा ते मनावर बिंबवण्याइतपत मी ज्ञानी नाही. तेव्हा माझी विनंती आहे की तुम्हाला पटत नसेल तर कृपया दूर्लक्ष करा.
तुमचे मत मला पटण्यासारखे नसले तरी मला त्याबाबत आदरच आहे आणि राहील.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

हमम...

>> तुम्ही म्हणता तशी उत्तरे मी तुम्हाला देऊ शकत नाही. तशी खुलासेवार उत्तरे देऊ शकलो असतो तर आनंदच वाटला असता. पण दूर्दैवाने माझी तेवढी कुवत नाही.

कुवत वगैरे म्हणण्याची खरे तर आवश्यकता नाही. तुम्ही केलेल्या विधानातील शब्दांकडून तुम्हाला कोणता अर्थ अपेक्षित आहे हे सांगणे (इच्छा असल्यास!) अवघड नाही.

>> माझ्या अशा लेखनामुळे तुम्हाला जर वैयक्तिक त्रास झाला असेल अथवा तुमची अस्मिता दुखावली असेल तर कृपया मला माफ करा.

नाही हो बिलकुल नाही. मला कोणताही त्रास झालेला नाही. काळजीबद्दल आभारी आहे. 'अस्मिता' इतका कोणत्याही शब्दाचा चिखल झाला नसेल. भलेभले यावरून घसरून पडले आहेत. असो.

>> "मला जे म्हणायचे आहे ते, मी मला जसे जमले तसे लिहीलेले आहे " असे आधीच म्हटलेले आहे. फार खोलात जाऊन त्यावर चर्चा करून कुणाचे मतपरिवर्तन करण्याइतपत अथवा ते मनावर बिंबवण्याइतपत मी ज्ञानी नाही. तेव्हा माझी विनंती आहे की तुम्हाला पटत नसेल तर कृपया दूर्लक्ष करा.

तुम्ही केलेल्या विधानातील शब्दांकडून तुम्हाला कोणता अर्थ अपेक्षित आहे हे सांगणे म्हणजे 'फार खोलात जाऊन चर्चा करण्यासारखे' नाही.

>> तुमचे मत मला पटण्यासारखे नसले तरी मला त्याबाबत आदरच आहे आणि राहील.

मी फक्त तुमच्या विधानांविषयी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने ते जमले नाही. माझे मत सवडीने स्वतंत्र प्रतिसादात देईन. तोपर्यंत आधी उपस्थित केलेल्या प्रश्नांविषयी जाहीर नको असेल तर व्यक्तिगत विचार करून पाहावा अशी विनंती.

मतभेद असतील तर विचारांपुरते. असो.

महाराष्ट्र, सीमा प्रश्न, भारत व काश्मीर

कित्येक वर्षांपूर्वी म्हणजे, मला वाटतं यशवंतराव चव्हाण किंवा वसंतराव नाईक मुख्यमंत्री आसतांना एक विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभेंत, "सीमा प्रश्नाबद्दल केंद्र सरकार महाराष्ट्राला जी वागणूक देत आहे तीच वागणूक केंद्र सरकारला संयुक्त राष्ट्रसंघांत काश्मीर प्रश्नाबाबत मिळत आहे" असे म्हणाल्याचे त्यावेळच्या वृत्तपत्रांत वाचल्याचे आठवते.

युद्ध - तह

चांगला लेख - चर्चा! ५०च्या वर प्रतिसाद झाल्यावर नव्याने सुरू करायला विसरू नका! :-)

मराठी माणसाबद्दल म्हणले जाते की "युद्धात जिंकतात आणि तहात हरतात" (अर्थात कायमचा अपवाद शिवाजी!).

या विषयावर बरेच काही लिहीता येईल पण आता वेळेअभावी थोडक्यात इतकेच म्हणेन की जेंव्हा आपण द्रष्टेपण (भारतीय/हिंदू/मराठी म्हणून) घालवून बसलो. स्वतःच्या कोशाच्या बाहेर जाऊन स्वतःच्या बाहेर ज्या समाजाचा आपण भाग आहोत त्याचा विचार करणे सोडून दिले, सरशी तिथे देशी, हे चुकीच्या ठिकाणि वैयक्तिक स्वार्थासाठीच करत बसू लागलो तेंव्हा पासून ही घसरगुंडी चालू झाली.... नाहीतर कधी काळी इथे चाणक्य पण झाला होता आणि त्या मानाने अगदी नजीकच्या काळात शिवाजी आणि पहीला बाजीराव पेशवा पण झाला होता.

चांगला चर्चाविषय

चांगला चर्चाविषय. विकासराव म्हणतात त्याप्रमाणे दूसरा न्भाग उघडायला तयार रहा ;)

परंतू मला साम्यस्थळे म्हणताना केवळ दोषात्मक साम्यस्थळे देणे एकांगी वाटले (कदाचित लेखकही ममा, हिंमा व भारतीय असल्याने दोष क्रं १ व ४ नूसार ही कृती असावी ;))
मला या निमित्ताने दोन गोष्टी मांडावाश्या वाटताहेत
१) काहि चांगली साम्यस्थळे:
अ) अजूनही "शिक्षण घेणे" ही संस्कृती जोपासली आहे. परदेशांत (अनेक कारणांमुळे) उच्चशिक्षणाचा विचार केवळ सधन कुटुंबांमधेच होतो. आपल्यकडे असणारी शिक्षणासाठीची तळमळ तिथे कमी दिसते.
ब) कुटुंबव्यवस्था: अजून तरी भारतीय, मराठी व हिंदू यांमधे कुटुंब एकत्र (कमीतकमी दोन पिढ्या) नांदताना दिसत आहेत
क) धर्मिकता: सर्वधर्मसमभाव या नावाखाली नेते मंडळी कितिहि आरडाओरड करत असले तरी हिंदु, मराठी आणि भारतीय नागरीक आपापल्या धर्माला (आपापल्या परिने व समजुतीने ) धरून आहेत.
ड) खाद्यसंस्कृती: इतर जगातील अनेक देशांतील लोकांप्रमाणेच, भारतीय, मराठी आणि हिंदु तिघांनीहि आपापली खाद्य संस्कृती नीट जपलेली आढळते.

२) वरील मी नमूद केलेली चांगली साम्यस्थळे अथवा लेखकाने विषद केलेली दोषात्मक साम्यस्थळे यांना अनुक्रमे चांगली अथवा दोषात्मक म्हणणेही मला धाडसाचे वाटते. माझ्यामते हे गुण या गटांमधे सामायिक आहेत. ते चांगले आहेत की दोष आहेत हे प्रत्येक परिस्थितीवरून ठरवावे. आज दोष वाटणारा एखादा गुण उद्या एखाद्या परिस्थितीत सुगुण ठरेल व आज सगुण वाटणारा एखादा गुण काहि परिस्थितीत दोष समजला जाईल.

असो .

अजून मुद्दे चर्चेत सुचतील तसे आणि सुचले तर मांडिनच. तुर्तास हा "कृतीशुन्य वायफळ बडबडीचा डोस" इथेच थांबवतो ;)

(दोष १ ते ५ ने भरलेला मराठी, हिंदु आणि भारतीय ) ऋषिकेश

सहमत

ते चांगले आहेत की दोष आहेत हे प्रत्येक परिस्थितीवरून ठरवावे. आज दोष वाटणारा एखादा गुण उद्या एखाद्या परिस्थितीत सुगुण ठरेल व आज सगुण वाटणारा एखादा गुण काहि परिस्थितीत दोष समजला जाईल.

छान प्रतिसाद. विचारांशी सहमत!

+१

उत्तम चर्चाविषय आणि प्रतिसाद. बाकीच्या प्रतिसादांमधले मुद्देही चांगले आहेत. काही वेगळे सुचले तर लिहीतो.
----

धन्यवाद!

चांगला लेख - चर्चा! ५०च्या वर प्रतिसाद झाल्यावर नव्याने सुरू करायला विसरू नका! :-)

हाहाहा! वाचून गंमत वाटली. फारच अपेक्षा करता बुवा तुम्ही!

खरे तर हा लेख इथे चढवताना कुणी वाचण्याची तसदी घेतील की नाही असे प्रामाणिकपणे वाटले(पण १८० वाचने म्हणजे खूपच झाले), त्याचे कारण म्हणजे मी निवडलेला, फारसा जिव्हाळ्याचा वाटणार नाही असा विषय आणि त्यावरचे माझे मर्यादित ज्ञान. दोनतीन प्रतिसाद आले तरी खूप झाले अशी अपेक्षा होती. पण चांगले आठ प्रतिसाद आल्यामुळे मला ’ मी लिहीले ते अगदीच टाकावू नाही ’ असा साक्षात्कार झाला ही एक आनंदाची गोष्ट. :) हेही नसे थोडके!

सर्व संबंधितांचे मन:पूर्वक आभार!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

 
^ वर