तुक्या रंगी रंगलो

बर्‍याच दिवसांनी एक चांगला लेख वाचायला मिळाला. आपल्याला आवडेल याची खात्री आहे, प्रतिक्रीया जाणून घेयला आवडतील.

विकास

तुक्या रंगी रंगलो

बिशप डॉ. थॉमस डाबरे हे वसई धर्मप्रांताचे प्रमुख. ख्रिस्ती धर्माची सेवा करताना त्यांना रंजल्या गांजल्यांना आपले म्हणण्याची शिकवण देणारे तुकाराम भेटले आणि त्यांचं अवघं जीवन तुकामय होऊन गेलं.

मी शिकलो मराठी माध्यमात. मराठी मातृभाषा असल्यानं तिच्यावर खास प्रेम आहेच. वेगवेगळ्या भाषा, त्यातलं सौंदर्य मला नेहमीच आकषिर्त करतं. बऱ्याच भारतीय भाषा मला येतात. हिंदी, गुजराती, कोंकणी, तमिळ या भाषा मला नीट अवगत आहेत. संस्कृत तर शाळेपासून माझी आवडती. त्या विषयात मी नेहमीच पहिला असे. एकदा तर परीक्षेत गुणांचं रेकॉर्ड केल्यानंतर मला शिक्षकांनी स्टाफरूममध्ये बोलावून कौतुक केल्याचं आठवतंय. संस्कृत खरोखर संपन्न भाषा आहे. हल्ली अनेक व्यवधानांमुळे संस्कृतचं वाचन फार होत नाही, मात्र आजही भगवद्गीतेतली वचनं, उपनिषदांमधली महावाक्यं मला मुखोद्गत आहेत. सोमय्या कॉलेजमध्ये व्याख्यानं किंवा निबंध सादरीकरणासाठी अनेकदा जाणं होतं. तिथे फोन केला की 'अहं बिशप डाबरे...' अशी सुरुवात तर नेहमीच करतो. चर्चच्या कामांमुळे पुष्कळदा युरोपला जावं लागतं. तिथल्या भाषांचाही संपर्क वारंवार येतो, त्यामुळे लॅटीनही येतं. तसं इटालियन आणि फ्रेंचही थोडंबहुत येतं. कॅनडामध्ये क्वेबॅक सिटीमध्ये फ्रेंच कॉलनी आहे. येत्या जूनमध्ये मला तिथे व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आलंय. मी तिथे इंग्रजीतून बोलणार असलो तरी त्यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहारातलं फ्रेंच मला नेमकं उमगलं. भाषा माणसाच्या संस्कृतीविषयी सांगतात, लोकजीवनाचा त्या आरसा असतात. माणसांवर प्रेम करणाऱ्या कुणालाही भाषा मोहात पाडतात, तशाच मलाही!

वसईच्या शाळेत मराठीच्या तासाला शिकलेल्या अभंगवाणीतून तुकोबांची पहिली ओळख झाली. माध्यमिक शिक्षणानंतर गोरेगावच्या धामिर्क महाविद्यालयात दाखल झालो. नंतरचं शिक्षण पुण्यात, शिकागोला झालं. त्याच सुमाराला ख्रिश्चन धर्मात वेगळे वारे वाहू लागले होते. आपलाच धर्म श्रेष्ठ असं म्हणूून इतर धर्मांशी स्पर्धा करण्यापेक्षा दुसऱ्या धर्मांमधली सत्यबीजं अभ्यासावीत, चांगल्या गोष्टी स्वीकाराव्यातही, असा विचार पुढे येत होता. त्याच दरम्यान मी पीएचडी करण्याचा विचार करत होतो. तुकाराम मनात कुठेतरी होताच. 'द गॉड एक्स्पिअरन्स ऑफ तुकाराम : अ स्टडी इन रिलिजिअस सिम्बॉलिझम' हा संशोधनाचा विषय ठरला. तुकारामांच्या अभंगांचा अभ्यास करू लागलो तसा त्यांच्यातला महान कवी आणि थोर संत समोर येत गेला.

सामान्य माणसाच्या भाषेत बोलणारे त्यांचे अभंग, त्यांच्या भावभावनांना हात घालणारे अनुभव, कल्पक आणि प्रतिभेचा उत्तुंग अविष्कार दाखवणारी शब्दरचना आणि मानवतेशी तादात्म्य पावणारं मन आकळत गेलं आणि मी तुकयाचा कधी झालो समजलेच नाही. मी पुण्याच्या ज्ञानदीप विद्यापीठात 'महाराष्ट्रातील वारकरी' हा विषय शिकवायचो. हे विद्यापीठ ख्रिश्चन धमीर्यांसाठीच असल्याने तिथे जगभरातून वरिष्ठ धर्माधिकाऱ्यांनी निवडलेले सहाशे ते सातशे वेचक विद्याथीर्च येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झालेले आणि हा विषय ऐच्छिक म्हणून निवडलेले हे विद्याथीर् अत्यंत हुशार आणि चिकित्सक असत. त्यामुळे या विषयाची भरपूर तयारी करून मगच वर्गात जावं लागे. प्रज्ञा आणि ज्ञानाच्या खोलीचा अक्षरश: कस लागत असे. मी या विद्यार्थ्यांना देहू, आळंदी आणि पंढरपूरला घेऊन जाई. ज्ञानेश्वरीवरची प्रवचनं ऐकवत असे. तत्त्वज्ञान आणि धामिर्क संशोधनाच्या त्या काळात मी तुकारामांच्या अधिक जवळ गेलो.

तुकारामांचे साडेचार हजाराहून अधिक अभंग मी मुळातून अभ्यासले आहेत. १८६९ मध्ये मुंबई सरकारच्या पुढाकाराने इंदू प्रकाशने प्रसिद्ध केलेल्या गाथेमुळे तुकाराम खऱ्या अर्थाने जनमानसांपर्यंत पोहोचले. आता गाथेच्या अनेक प्रती उपलब्ध असल्या तरी त्या मूळ प्रतीचं महत्त्व कमी होत नाही. तुकाराम अद्वैतावर बोलतात, पर्यावरणावर बोलतात तसंच कौटुंबिक जीवनावरही भाष्य करतात. सामान्य माणसाला संसार नेटका करायला सांगणारे तुकाराम 'अणुरेणुया थोकडा' किंवा 'उरलो उपकारापुरता' या अभंगांमधून उच्च दर्जाचं तत्त्वज्ञान सांगून जातात. ईश्वरावर नितान्त श्रद्ध ठेवत माझ्या वाटचालीत प्रत्यक्ष 'तो' माझं बोट धरून चालवतो हे सांगताना 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरोनिया' असं म्हणतात तेव्हा सगळी वाटचालच सोपी होऊन जाते. विठ्ठलभक्तीमध्ये तल्लीन झालेला हा संत 'माझी विठाई माऊली' म्हणत 'घेई घेई वाचे, गोड नाम विठोबाचे' म्हणत विठोबमय झालेला दिसतो. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणणारे तुकाराम पर्यावरणाची चिंता वाहणाऱ्या आजच्या काळाच्या कितीतरी पुढे होते.

तुकोबांवर मी अनेक ठिकाणी संशोधनपर निबंध सादर केलेत, अनेक व्याख्यानांमधून बोललोय. प्रत्येक वेळी ते मला नव्याने सापडतात. १९९८ मध्ये रोम विद्यापीठातल्या एका परिसंवादामध्ये 'मेन ऑफ पीस इन डिफरण्ट रिलिजन्स' या विषयावर मी तुकोबांवर बोललो. मॉस्कोमध्ये 'हाऊस अॅण्ड होम इन महाराष्ट्र' या विषयावर बोललो. 'सासर माहेर अॅण्टिथेसिस इन अभंगाज ऑफ तुकाराम : फ्रॉम एलिनेशन ऑफ फुलफिलमेण्ट' हा निबंध सादर केलाय. बेळगाव, पुणे आणि र्वध्याच्या विद्यापीठांनी आयोजित केलेल्या व्याख्यानांमध्ये मी अनेकदा तुकारामांसंबंधी बोललो आहे.

जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते. आज महाराष्ट्रासह देशाभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योजना सरकारने जाहीर केली आहे, हे सरकारचं कर्तव्यच आहे. तुकारामांच्या काळातही १६३०-३१मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्यात त्यांची पत्नी, मुलं भाऊ गेले. जवळचे आप्त एकेक करून गेल्यावरही ते खचले नाहीत. तात्कालिन धर्ममार्तंडांकडून छळ झाला तरी परिस्थितीने गांजून त्यांनी आत्महत्येचा विचार कधी केला नाही. हे उदाहरण मला खूप मोलाचं वाटतं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी केवळ कर्जमाफीची मलमपट्टी उपयोगाची नाही तर त्यांना मानसिक आणि आध्यात्मिक बळ देणं गरजेचं आहे. आपल्या शरीराच्या गरजा असतात तशा आत्म्याच्याही गरजा असतात. संकटांमध्ये आत्मिक बळच माणसाला तारून नेतं. त्यामुळे सरकारपेक्षाही धामिर्क नेत्यांवर ही जबाबदारी जास्त आहे, असं मला वाटतं. आपल्या परंपरेमध्ये, धर्मांमध्ये तेवढं बळ नक्की आहे. एकदा शेतकरी मनाने मजबूत झाला की आत्महत्या तर सोडाच पण आपल्या हक्कांसाठी भांडण्याचं बळही त्याला येईल.

मला माहीत आहे, तुकाराम हे सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर असू शकत नाही, कोणी तसा दावाही करणार नाही. पण आधुनिकता, जागतिकीकरण, कम्प्युटरायझेशनच्या रेट्यात ऐहिक जीवन सुखकारक होऊनही सर्व प्रश्न सुटणार नाहीत तर ते अधिक गंभीर स्वरूप धारण करून समोर येताहेत. ते सोडवण्यासाठी मानवता आणि करुणा हीच मूल्यं महत्त्वाची ठरतील आणि म्हणूनच 'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले' असं म्हणणारा तुकाराम मला मोठा वाटतो.

- शब्दांकन: प्रगती बाणखेले

Comments

मुद्दा

आधी मला वाटले की आपण "एक नंबरचे डामरट विकासराव" असे म्हणालात :-) असो.

सदर लेखातील कर्जबाजारी शेतकर्‍यांचा उल्लेख हा मोठ्ठा लाल झेंडा - रेड फ्लॅग - आहे. आता ह्या शेतकर्‍यांना ख्रिश्चन करून घेण्याचा चर्चचा विचार दिसतो आहे.

तुम्ही योग्य मुद्यावर बोट ठेवलेत आणि माझ्याही तेच ध्यानात आले होते. पण हा "त्यांचा" दोष ठरतो की "(धर्माने) आपल्या" लोकांकडे दुर्लक्ष करण्याचा "आपला" गुन्हा ठरतो ?

वारकरी संप्रदाय धोक्यात

मागे एका अशाच लेखात/ दुव्यात तुम्ही यवनधर्मी जैतुनबी यांच्याबद्दल लिहले होते. आता बिशप डाबरे यांच्याबद्दल.

हिंदुंनो जागे व्हा तुमची महान धर्माची महान परंपरा असलेली चळवळ भ्रष्ट करण्याचा घाट घातला जातोय व अनुनयवादी षंढ काँग्रेस सरकार मुकाट्याने हे होऊ देतेय.

बिशप व त्यांचे ७००, ८०० हस्तक वारीत हेरगिरी करुन रोमला माहीती पुरवत आहेत व उघडपणे कबुल करुन देखील नाकर्ते सरकार गप्प आहे.

आपली संस्कृत भाषा, आपले लोकजीवन, आपले तुकाराम, आपले तत्वज्ञान व आपल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या नष्ट करायला निघाले आहेत. सनातनी हिंदुंनो जागे व्हा!! इतरांनी नष्ट करायच्या आत, तुम्हीच.......

संशय का मनी आला...

लेख आवडला. त्यात त्यांचे डामरट असणे इतकेच दिसले नाही.

परंतु,

एक प्रश्न जो तांब्यांना विचारला -

दुसर्‍या लेखकांचे लेख जसेच्या तसे (अगदी त्यांचे नाव दिले तरी) छापल्याने उपक्रमाला प्रताधिकार कायद्यामुळे अडचण येऊ शकेल काय?

नवीन नाही

दुसर्‍या लेखकांचे लेख जसेच्या तसे (अगदी त्यांचे नाव दिले तरी) छापल्याने उपक्रमाला प्रताधिकार कायद्यामुळे अडचण येऊ शकेल काय?

मी वकील नाही त्यामुळे वकीली उत्तर माहीत नाही. पण तसे वाटत तरी नाही. हा प्रश्न आत्ताच कसा पडला? कारण उपक्रम आणि मिपा वर असे अनेकदा लेख त्यांच्या दुव्यासकट दिले आहेत. मी दिलेत, घाटपांड्यांनी दिलेत. तसेच अजून ही आले असतील. त्यात काही वाड्मयचौर्य नाही, त्यातून काही धंदा करायचा हेतू नाही आणि जसा आहे तसाच दिला आहे . मागे एकदा प्रमोद रावांनी सुचवले होते की तो संपादीत करून द्या कारण काही मुद्रण दोष मूळ लेखात होते म्हणन. पण तसे केले नाही कारण तो हेतू नव्हता आणि मग ती ढवळाढवळ ठरू शकते इत्यादी. सर्व वर्तमानपत्रे त्यांचे लेख "मित्रांना पाठवा" म्हणून इमेलने दुवा पाठवायची व्यवस्था करतातच. यात फक्त मी दुव्या बरोबर लेख ही दिला आहे. तो पण सार्वजनीक स्थळी, व्यक्तिगत ब्लॉगवर नाही. आणि हो ते ही अगदी न्यू यॉर्क टाइम्स आदींना चालते म्हणूनच तर "ब्लॉग धिस" वगैरे लिहीलेले असते.

गैरसमज नको

हा प्रश्न आताच पडला कारण काल परवा मध्ये मनोगत आणि मिपाच्या चालकांनी तशी केलेली वक्तव्ये वाचली. येथे पहा -

http://www.manogat.com/node/13323#comment-114243

http://www.misalpav.com/node/1196

त्यावरून प्रथम हा प्रश्न गणेश तांब्यांना विचारला आहे आणि जर त्यांना विचारला तर इतरांनाही तो विचारणे आलेच.

त्यात काही वाड्मयचौर्य नाही, त्यातून काही धंदा करायचा हेतू नाही आणि जसा आहे तसाच दिला आहे .

याबाबत गैरसमज नाही, तसे चौर्य तांब्यांनाही करायचे आहे असेही म्हणायचे नाही. फक्त दोन्ही संकेतस्थळांनी अचानक हे धोरण का स्विकारावे हा प्रश्न मनात होता. असे लेख मूळ लेखक, स्त्रोत यासकट उद्धृत केल्याने लेखकाला भीती/ अडचण नसावी पण संकेतस्थळाला असावी काय असा प्रश्न होता.

अवांतर : म्हणूनच मूळ प्रतिसादाचे शीर्षक 'संशय का मनी आला...' असे आहे. :-)

गैरसमज अजिबात नव्हता!

गैरसमज करून प्रश्न विचारला नव्हता पण उत्सुकता वाटली कारण माझ्या लक्षात आले की तो दोनदा (मला आणि आधी तांब्यांना) विचारला आहे, पण त्या आधी मला अथवा इतरांना विचारला नव्हता.

मनोगताबद्दल माहीत नाही, पण मिपा वर धोरण करण्यासंदर्भात तात्यांचा उद्देश मला वाटते तिथे प्रचंड प्रमाणात येणारे ललीत लेखन आणि काव्यासंदर्भात असावे. उद्या मी अथवा इतर कोणी जर कथा/कविता (कादंबर्‍या शक्य नाही) देऊ लागले तर ते योग्य ठरणार नाही.

पण माझा उद्देश ह्या (अथवा अशा) वेगळ्या लेखावर वाचून चर्चा होण्याचा होता म्हणून तो येथे दिला. नुसताच दुवा दिला तर ते करणे जरा अवघड जाते.

असो. आता अजून थोडे या विषयाबद्दल पण मूळ चर्चेला अवांतरः अमेरिकन संगीत उद्योग आता जर कोणी स्वतः विकत घेतलेल्या सीडीवरील गाणी स्वतःच्या संगणकातून स्वतःच्या आयपॉडवर स्वतःला ऐकायला घेतली तरी "कॉपिराईट व्हायोलेशन" आहे असे ठरवायचा प्रयत्न करत आहेत! आमच्या पहीलीतील मुलीस बूक ऑन सीडी पब्लीक लायब्ररीतून आणून आयपॉडवर ऐकायला दिले. ते झाल्यावर तीने मला सांगीतले की आता ते "संगणकावरून पण काढून टाका", म्हणलं का गं? उत्तर मिळाले की नाहीतर कॉपिराईट व्हायोलेशन होईल!
आणि आमच्या इथले भारतीय दुकानदार चित्रपटांच्या आधीच पायरेटेड असलेल्या डिव्हीडीज् लायब्ररीम्हणून सांभाळणे अवघड जात असल्याने तितक्याच किंमतीत ($२) कॉपिकरून विकायला लागले आहेत !

प्रताधिकार कायदा.

प्रताधिकार कायदा.

दुसर्‍या लेखकांचे लेख जसेच्या तसे छापल्याने उपक्रमाला प्रताधिकार कायद्यामुळे अडचण येऊ शकेल काय.

योग्य ती काळजी घेतल्यास - (शक्यतो) नाही. मात्र असे लेख जसेच्या तसेच छापावेत. छापताना मूळ लेखकांचा तसेच पूर्वप्रसिद्धीचा उल्लेख करणे हे कायद्याने अत्यावश्यक आहे. तसेच मूळ लेखावरच्या बौद्धिक संपदा अधिकारावर आपण आक्रमण तर करत नाही आहोत ना, ह्याची काळजी घ्यावी.

हैयो हैयैयो!
अधिवक्ता - मुंबई उच्च न्यायालय.

धन्यवाद

हेच जाणून घ्यायचे होते. समाधान झाले.

बौद्धिक मशिनरी

फादर फ्रान्सिस दिब्रेटो पण असेच व्यक्तिमत्व आहे. या देशाशी असलेल्या निष्ठा तपासताना हिंदुएतर लोकांना नेहमीच संशयाच्या भोवर्‍यात पडाव लागत. धर्मप्रसार् हे कार्य करताना बौद्धिक दांडगाई करुन चालत नाही तेथे बौद्धिक कसरतच करावी लागते. मिशनर्‍यांकडे ही मशिनरी असतेच.
प्रकाश घाटपांडे

लेख आवडला.

असहिष्णुत्वाच्या या काळात असे काही वाचले की आनंद होतो. ज्ञानाला धर्मा-भाषेची आणि वंशाची कुंपणे नसतात, ज्याला सत्याचे ज्ञान करून घ्यायचे आहे त्याला ते इतर धर्मामधे, त्या धर्माच्या शिकवणीमधेसुद्धा मिळतेच यासारख्या गोष्टींचा प्रत्यय या लेखातून आला. केवळ धर्मप्रसाराचे उद्दिष्ट ठेवून इतका अभ्यास साधता येत नाही. लेखकाची मूळ विषयाबद्दलची तळमळ जाणवते. तुकारामाच्या लिखाणाचा इतका सखोल अभ्यास करताना लेखकाला त्याची खरीखुरी भेट घडली आहे असे मला वाटले. तुकारामाच्या इतक्या अभ्यासाच्या मागे , त्याचा उपयोग गांजलेल्याना आधार मिळण्याकरिता व्हावा असे म्हणण्यामागे केवळ मतलबी धर्मप्रसाराचा हेतू आहे असे सुचविणे चुकीचे आहे.

लेख आवडला

सुरुवातीला "मी इतक्या भाषा शिकलो, मला हे आणि ते ठाऊक आहे" अशी भाषा थोडी बोचली. शेवटी असे दिसते की हा लेख बिशपसाहेबांनी लिहिलेला नाही, शब्दांकन प्रगती बाणखेले यांनी केलेले आहे. कदाचित त्यांनी मुलाखतीतली उत्तरे जोडून एक लेख बनवला असावा. मुलाखतीत प्रश्नोत्तर म्हणून "मी अमुकतमुक केले" असे म्हटले तर अहंमन्य वाटत नाही.

आध्यात्मिक क्षेत्रात वावरणारा, तुकारामाचा चाहता, कुणीही व्यक्ती जर स्वतः लेख लिहील तर इतका मी-मी-पणा करणार नाही असे वाटते. त्यामुळे शब्दांकन करणार्‍या प्रगती बाणखेल्यांनी आपले काम चोख केले नाही, असे मला वाटते.

वेगळा मुद्दा :
अमेरिकेतील कायद्यानुसार, हा लेख येथे शब्दशः देणे हे प्रत-अधिकाराचे उल्लंघन आहे, असे मला वाटते.
पण येथे कोणता कायदा लागू होतो हे मला ठाऊक नाही.

योग्य निरीक्षण

आध्यात्मिक क्षेत्रात वावरणारा, तुकारामाचा चाहता, कुणीही व्यक्ती जर स्वतः लेख लिहील तर इतका मी-मी-पणा करणार नाही असे वाटते. त्यामुळे शब्दांकन करणार्‍या प्रगती बाणखेल्यांनी आपले काम चोख केले नाही, असे मला वाटते.

योग्य निरीक्षण!

अमेरिकेतील कायद्यानुसार, हा लेख येथे शब्दशः देणे हे प्रत-अधिकाराचे उल्लंघन आहे, असे मला वाटते. पण येथे कोणता कायदा लागू होतो हे मला ठाऊक नाही.

मी आत्ता वॉशिंग्टन पोस्ट आणि न्यू यॉर्क टाईम्समधे मुद्दाम पाहीले. त्यांनी कॉपिराईट म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे याची व्यवस्थित माहीती त्या दुव्यात ठेवली आहे. त्यामुळे आपण म्हणता ते योग्य आहे (जरी ते ब्लॉग, डीग्ग वगैरे करून देत असले तरी). एकाच संगणकावर उतरवून स्वतःसाठी /आणि विनाधंदा (नॉन कमर्शियल) उद्देशाने तो घेता येतो. पण टाईम्स ऑफ इंडीया/म. टा. मधे मात्र नुसतेच कॉपिराईट म्हणले आहे बाकी काहीच माहीती दिली नाही. त्यामानाने इ-सकाळ मधे नीट दिले आहे. थोडक्यात असे लेख देणे कदाचीत योग्य ठरणार नाही इतकेच म्हणावेसे वाटते...

उपाय आणि कौतुक

मूळ लेखातील ज्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे त्यांच्याशी संबंधित उतारे दिल्यास यातून मार्ग निघेल असे वाटते. बाकी लेखाच्या दुव्याचा आणि लेखकाचा उल्लेख केलेला आहेच.
आपला
(उपायशोधक) वासुदेव

लेख वाचताना बिशप साहेबांविषयी आदर वाटला. इतर धर्मियांचे आध्यात्मिक साहित्य वाचणे आणि त्याचा योग्य अभ्यास करणे हे खरोखर विशेष आहे. (बहुतेकदा दुसर्‍या धर्माचे दोष दाखवण्यासाठी, द्वेष वाढवण्यासाठी इतर धार्मिकसाहित्याचा अभ्यास केला जातो) अश्या प्रगल्भ धार्मिक नेतृत्वाची सर्व धर्मांना गरज आहे.
आपला
(कौतुकमिश्रित) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

संबंधित उतारे

हा उपाय खरंच चांगला वाटला.

मूळ लेखाचा दुवा, लेखाची उत्सुकता वाढवणारे संबंधीत उतारे असे देऊन हा प्रश्न सोडवता येईल असे वाटते.

कदाचित योग्य


थोडक्यात असे लेख देणे कदाचीत योग्य ठरणार नाही इतकेच म्हणावेसे वाटते...


प्रताधिकाराने जर मक्तेदारी वाढली तर त्याला उतार नक्कीच असणार. टी सिरीज वाल्या गुलशनकुमार ने ख्यातनाम गायक व एचएमव्ही सारख्या कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढली.(जय माता दी) आता मूळ लेखात फेरफार करुन एखाद्याने बेमालूम मिश्रण केले आणि हा लेख मला स्वतंत्र पणे स्फुरला आहे असे सांगितले तर प्रताधिकार काय सांगतो? प्रताधिकाराचे असे उल्लंघन सिद्ध करता येईल का? भारतात तरी या कायद्यान्वये कुणाला शिक्षा झाली आहे असे ऐकिवात नाही. त्यापेक्षा मूळ संदर्भ देउन तो उधृत केलेला काय वाईट. संदर्भाच्या देवाण घेवाणी साठी जर असे कायदे तांत्रिक अडथळे निर्माण करु लागले तर ज्ञानप्रसारासाठी सविनय कायदेभंग करावे लागतील. त्यातून निर्माण होणारे संकट हे इष्टापत्ती मानवी लागेल.
ज्ञानेश्वरांनी पण प्रताधिकाराचे उल्लंघन केले आहे. म्हणुनच त्यांना वाळीत टाकले ना?
मटा चा लेख आमच्यापर्यंत पोहचला ; आम्ही तो वाचला. हे थोडके नसे.
प्रकाश घाटपांडे

फरक

आता मूळ लेखात फेरफार करुन एखाद्याने बेमालूम मिश्रण केले आणि हा लेख मला स्वतंत्र पणे स्फुरला आहे असे सांगितले तर प्रताधिकार काय सांगतो?

ह्याला "प्लेजियारीजम्"अर्थात वाड्मयचौर्य म्हणतात ज्यात अगदी तेच शब्द तीच वाक्ये नसली तरी तोच गाभा असला तरी विनासम्दर्भ वापर त्याच भाषेत अथवा इतर कुठल्याही भाषेत केला तरी तसा धरला जातो. आचार्य अत्र्यांनी ना.सी. फडक्यांचे तसे वाड्मयचौर्य मला वाटते त्यांच्या "सारथी आणि घोडे" या ग्रंथसंपदेबाबत उजेडात आणले होते. व्यंकटेश माडगुळकरांच्या एका पुस्तकाबाबत नाव विसरलो पण माकडांवरचे प्रसिद्ध पुस्तक (कथा नाही) आहे, त्याबाबत मला वाटते माधव मनोहरांनी आरोप केला होता. पण व्यंकटेश माडगूळकरांनी ते कधी मान्य केले नाही, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे ते "ओरीजिनल" काम होते. (तसे असूही शकते - ग्रेट मेन थिंक्स अलाईक!)

ज्ञानेश्वरांनी पण प्रताधिकाराचे उल्लंघन केले आहे. म्हणुनच त्यांना वाळीत टाकले ना?

ज्ञानेश्वरांनी प्रताधिकाराचे उल्लंघन केले नाही, त्यांनी गीतेवर टिका केली आणि ती भावार्थ दिपिका म्हणून सांगितली. त्यातले एकेके दृष्टांत श्रीकृष्णाला सुचले नसावेत, अथवा त्याने वेळेअभावे सांगितले नसावेत :-) त्यांना वाळीत टाकले ते वडीलांमुळे. ज्ञानेश्वरी लिहीपर्यंत त्यांचे अध्यात्मिक आणि वैचारीक क्षेत्रातील श्रेष्ठत्व सर्वमान्य झाले होते. (अपवाद त्यावेळचे विसोबा खेचर आणि चांगदेव, ज्या दोघांनीपण नंतर ते मान्य केले आणि अनुक्रमे सोपानदेवाचे आणि मुक्ताईचे गुरूपण स्विकारले)

निरुपण

१) संस्कृत ही ज्ञानभाषा; त्याची मक्तेदारी फक्त ब्राह्मण वर्गाकडे होती.भाषांतरा पेक्षा गीतेची अन्वयार्थाद्वारे निरुपणे करणे हा त्यांच्या अर्थार्जनाचा भाग होता.ज्ञानेश्वरांनी प्राकृतीकरण करुन संपुष्टात आणली. जनसामान्यांना खुली केली. त्यामुळे स्वकीयांचा(?) रोष ओढवला. आता भावार्थदिपिकेचीच आत्तापर्यंत अनेक निरुपणे झाली. ज्याचा त्याचा प्रताधिकार ? बाबा महाराज सातारकरांची ऐश्वर्यावती ज्ञानेश्वरी चे काय झाले कुणास ठाउक?
२) व्यंकटेश माडगुळकरांच्या "सत्तांतर" या पुस्तकात आधारित असा उल्लेख आहे असे वाटते. (खात्री नाही)
प्रकाश घाटपांडे

सत्तान्तर

"व्यंकटेश माडगुळकरांच्या एका पुस्तकाबाबत नाव विसरलो पण माकडांवरचे प्रसिद्ध पुस्तक (कथा नाही) आहे, .."

'सत्तान्तर'?
बहुतेक.

- मेघना भुस्कुटे

सत्तांतरच

'सत्तान्तर'?
बहुतेक.

आपण आणि घाटपांडे साहेबांनी बरोबर सांगीतले ते सत्तांतरच होते. धन्यवाद

अर्थातच काही तरी भामटेपणा असणारच!

(माझी मते या बाबतीत मी कधी लपवली नाहीत. डाबर्‍यां सकट सगळे ख्रिस्ती मिशनरीज या बाबतीत नक्कीच काहीतरी भामटेपणा करत असणार याची मला खात्री आहे!)

अभंगातले कच्चे दुवे काढून/भलतेच अर्थ लावून "पहा किती फालतु आहे हे! येशु ला शरण या!!" असं सिद्ध करायला बसलेले चाप्टर लोक आहेत हे.
तो फ्रांसिस दिब्रिट्यापण तसलाच. सगळी गाणी म्हणून झाली की हे सगळे येशु(च) कसा ग्रेट याचा राग आळवणार!
या शिवाय या लोकांकडे संशयाने(च) का पाहिले जाते समाजाकडून याचाही विचार व्हायला हवा. आग असल्याशिवाय उगाच संशयाचा धूर येत नाही...

ख्रिस्ती मिशनरीज कसे वागत आहेत हे ज्यांनी जवळून पाहिले असेल त्यांना हे नीटच माहीत असेल, की कोणत्या गोष्टीचा कसा वापर हे लोक करून घेतील काही सांगता येत नाही.

त्यामुळे मला काही फारसा आनंद वगैरे वाटत नाही. वाटलीच तर काळजीच वाटते आहे.
घाटपांडे साहेब म्हणाले आहेत तशी बौद्धिक मशिनरी असतेच यांच्या कडे. या मशिनरीत तुकारामाचा वापर करून घेतील अशी सार्थ भीती वाटते मला. याही कारणाने मिशनर्‍यांना तत्सम बौद्धिक कारणी मिमांसा उभा करणारा संघ कायम डोळ्यात सलतो. मग अशा परिस्थितीत तर विठोबाला शरण या म्हणणारा तुकोबा कसा काय यांना चालेल?
या भूमीकेतून मला हे वागणे संशयास्पद वाटते.

याचा अर्थ वारकरी सम्प्रदायात ख्रिस्ती मिशनरीज आता मोठ्या प्रमाणात धर्म परिवर्तनासाठी घुसले आहेत असा लावायला हरकत नाही.

आपला
गुंडोपंत

असहमत.

व्यक्तिगत संबंधांमधे इतक्या सौम्य आणि ऋजु असणार्‍या व्यक्तिकडून इतका पूर्वग्रहदूषित प्रतिसाद वाचून खेद होतो. असो. याबाबतीत आपण असहमत असण्याबद्दल सहमत आहोत.

 
^ वर