जैतुनबी ' जन्माने मुसलमान... कर्माने अखंड वारकरी '

म.टा. मधील खालील लेख आवडला आणि इतरांनी पण वाचावासा वाटला म्हणून येथे चिअकटवत आहे.

Maharashtra Times

जैतुनबी

[ Wednesday, July 25, 2007 11:16:07 am]
प्रसाद पोतदार

आपण सर्वजण जात-पात , धर्म , पंथ यांच्या पारंपरिक चौकटीत राहूनच भक्तीमार्ग चोखाळतो. त्यामुळेच अशा चौकटी मोडून निखळ भक्तीभाव जोपासणाऱ्यांविषयी समाजात कौतुकाची आणि आदराची भावना असते. ' जन्माने मुसलमान... कर्माने अखंड वारकरी ' असा आयुष्याचा प्रवास करत असलेल्या जैतुनबी उर्फ जयदास महाराज या वारकरी संप्रदायामध्ये त्यामुळेच औत्सुक्याचा विषय बनून राहिल्या आहेत.

वारीची वाट अखंडपणे चालत असताना व्यक्तिगत सुखाला तिलांजली देऊन भजन , कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन एवढं एकच लक्ष्य जैतुनबींनी समोर ठेवलं आणि ते यथाशक्ती पार पाडलं. स्वातंत्र्याच्या चळवळीतही त्यांनी हिरिरीने भाग घेतला होता. समाजाविषयी आत्यंतिक तळमळ बाळगणाऱ्या या बाईंना वारकरी संप्रदायाच्या ओढीपोटी स्वजातीय आणि परजातीयांच्या प्रखर विरोधाला तोंड द्यावं लागलं.

जैतुनबी

जैतुनबी ही गवंडीकाम करणाऱ्या मकबूलभाई सय्यद यांची मुलगी. बारामतीजवळचं माळेगाव हे त्यांचं मूळ गाव. त्यांना वारकरी संप्रदाय कसा ' क्लिक ' झाला याचं कारण अगदी साधं असलं तरी मोठं रोचक आहे. त्या काळातली समाजातल्या नातेसंबंधांची वीण कशी होती हे सांगणारं आहे. काय आहे ही कथा ?...

मकबूलभाईंची भेट वारकरी संप्रदायाच्या गुण्याबुवांशी पडली. गुण्याबुवा जवळच्या पुरंदर तालुक्यातल्या भिवडीचे. गवंडीकाम करणारे बुवा म्हणजे गुण्याबुवा. त्यांची हरिभक्ती एवढी दांडगी की , हनुमानदास महाराज अशी त्यांची पंचक्रोशीत ओळख निर्माण झाली. एकाच व्यवसायातले असल्याने गुण्याबुवा आणि मकबूलभाई मित्र बनले आणि एकत्र मिळून गवंडीकाम करू लागले. त्यावेळी जैतुनबी होती दहा वर्षांची. गुण्याबुवा ' जय जय रामकृष्ण हरी ' च्या गजरातच काम करत. हरिनामात रंगलेल्या या माणसाला भजनकीर्तनाचा छंदच होता. उत्तम कीर्तनकार म्हणून त्यांची परिसरात ख्याती होती. छोटी जैतुनबी त्यांच्याबरोबर भजनकीर्तनात रमू लागली. ' जय जय रामकृष्ण हरी ' असा उद्घोष करू लागली. हरिनामाची गोडी लागलेल्या जैतुनबीला कृष्णभक्तीचं एवढं वेड लागलं की ' मेरे तो गिरिधर गोपाल दुसरो न कोई ', अशी तिची भावावस्था होऊ लागली. हनुमानदासजींनी तिला हळूहळू वारकरी संप्रदायाचे धडे दिले. हरिपाठ शिकवला. ज्ञानोबा-तुकोबांच्या सम्यकदृष्टीचं ज्ञान दिलं. भक्तिभावात आकंठ बुडालेली जैतुनबी वारकरी संप्रदायाशी कधी एकरूप झाली ते तिचं तिलाही कळलं नाही.

मग मात्र सुरू झाला सामाजिक संघर्ष. तिच्या हरिभक्तीला मुल्ला-मौलवींनी विरोध केला. घरच्यांनी विरोध केला. त्यावेळी ' भक्तांना जात नसते तर अंत:करणातला भक्तिप्रेमाचा सच्चेपणा हीच त्यांची खरी कसोटी असते ,' असा सल्ला तिला हनुमानदासांनी दिला. तो गुरुपदेश मानून जैतुनबीने वारकरी पताका खांद्यावर घेतली ती कायमचीच. तिच्या भक्तीचं सच्चेपण ओळखून हनुमानदासांनी तिचं जयदास महाराज असं नामकरण केलं.

एका बाजूला भक्तीसाधना सुरू असताना विवाहाचा प्रश्न आला त्यावेळी जैतुनबीने साफ नकार दिला. गुंतून पडणं तिच्या स्वभावात नव्हतं. लग्न न केल्याने तिला समाजाकडून रोषही पत्करावा लागला. पण कशालाच न जुमानता तिची भक्तिसाधना सुरूच राहिली. तिला जसा स्वजातीयांकडून त्रास होऊ लागला तसा हिंदूंकडूनही झाला. घरच्यांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण कृष्णप्रेमात आकंठ बुडालेल्या जैतुनबीने भक्तीमार्ग घट्ट धरून ठेवला. तेच आपल्या जीवनाचं ईप्सित मानलं.

त्यावेळी स्वातंत्र्यचळवळीचं वारं जोरदार होतं. तरूण जैतुनबी लढ्यासाठी स्फूतीर् देत गावोगाव फिरू लागली. १९४२च्या लढ्याच्या वेळी माधवराव बागल यांच्या सभेत तिने धिटाईने पोवाडा म्हटला आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. बागल यांनी जैतुनबीला क्रांतीसिंह नाना पाटील यांच्यापुढे उभं केलं. तिची धिटाई पाहून नाना पाटलांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्यामुळे अधिकच उत्साही होऊन जैतुनबी गावोगावी भटकत पोवाडे म्हणून राष्ट्रप्रेमाचं स्फुल्लिंग गावकऱ्यांमध्ये चेतवू लागली. उरुळीकांचन इथल्या निसगोर्पचार केंदात महात्मा गांधींनी तिचे पोवाडे ऐकून तिचं कौतुक केलं होतं.

स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी जैतुनबी माळेगावला आईवडिलांकडेच होती. तोपर्यंत अध्यात्माची खोली तिच्या लक्षात आली होती आणि वारकरी संप्रदायाची ताकद समजली होती. ज्ञानेश्वरी , तुकाराम गाथा , एकनाथी भागवत मुखोद्गत केलेली जैतुनबी सुरेख कीर्तन करू लागली होती. गुरू हनुमानदासांबरोबर वयाच्या दहाव्या वषीर्पासून सुरू केलेला वारीचा नियम जैतुनबीने आज ७६व्या वषीर्ही कायम ठेवला आहे. वारीत मुक्कामाच्या ठिकाणी करत असलेल्या कीर्तनाने वयाच्या चोविशीतच तिच्या नावानं दिंडी ओळखली जाऊ लागली आणि हनुमानदासांनीही दिंडीचा सर्व कारभार तिच्याकडे सोपवला. विशेष म्हणजे सुरुवातीला पालखीत महात्मा गांधींचा फोटो ठेऊन ती वारीत सहभागी होत होती. पंढरपुरात त्यांच्या नावाने मठ असून तिथे सकाळ-संध्याकाळ हरिपाठ होतो. आळंदीतही त्यांचा मठ आहे.

जैतुनबी स्वत: मुस्लिम धर्माप्रमाणे आचार पाळतात. पैगंबर मानतात. नमाज पढतात. रोजे करतात. पण पैगंबर आणि विठ्ठल यांत भेद करत नाहीत. ' भेदाभेद भ्रम अमंगळ ' ही उक्ती त्यांनी कृतीत आणली आहे. आषाढी आणि कातिर्की दोन्ही वाऱ्या करणारी जैतुनबींची दिंडी सासवडपासून वारीसाठी प्रस्थान ठेवते. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीमागे एक मैल अंतर राखून ही दिंडी चालते. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन करता यावं यासाठी दिंडी सोहळ्यात सामील होत नाही. जैतुनबींच्या कीर्तनाला मोठी गदीर् असते. त्यांचं कीर्तन कर्मकांडात अडकत नाही. कीर्तनात सामाजिक आशय असते. सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी संबंधित प्रश्नांवर त्यात भाष्य असतं. विशेषत: स्त्री शिक्षणावर त्यांचा मोठा भर असतो.

जैतुनबींच्या कीर्तनाचा साज काय वर्णावा! पांढऱ्याशुभ्र कपड्यात कमरेला शेला गुंडाळून उभ्या राहिल्यानंतर त्या खणखणीत आवाजात बोलू लागतात... ' बंधूंनो , असं जोरात भजन करा की ते महाद्वारातून विठ्ठलाच्या कानी पडावं. स्वारीला निघालेल्या घोड्यांच्या टापांसारखा आवाज येऊ द्या. विठ्ठल! विठ्ठल!! विठ्ठल!!! '... अन् खरंच टाळांचा आवाज घुमू लागतो आणि विठ्ठलनामाचा गजर होतो. जैतुनबी रसाळ वाणीत सांगतात. ' महिलांनी शिकलं पाहिजे. आपण साक्षर झालं पाहिजे. तुम्हाला एक गमंत सांगतेेेे... भागी भाकरी करत होती. तिची पोर पळत आली.

' आये ए आये

काय ग ?

' भाईर ये भाईर ' तेवढ्यात जोरात आवाज आला. भागी हातावर भाकरीचा उंडा घेऊन बाहेर आली. ती घाबरलेली होती. तिची पोरगी म्हणाली... ' आये हे विमान हाये! घाबरू नगं ' भागी घाबरली. तिलाही आत चल म्हणाली. मुलगी म्हणाली... आये मी शाळेत गेल्यावर विमानात बसीन. मंडळी , आता बायका विमान चालवतात. पायलट होतात. विमान चालवायला तुम्हाला कोणी सांगत नाही , पण तुम्ही शिका... साक्षर व्हा. नाहीतर तुम्हाला सर्वजण फसवतील. नुसतं विमान पाहू नका. विमान वाचा... विठ्ठल! विठ्ठल!!

विठ्ठलभक्ती आणि आजची राष्ट्राची गरज यांचा सुरेख मिलाफ जैतुनबींच्या कीर्तनात आहे. ' ज्ञानोत्तर भक्ती ' या विचारांशी बांधिलकी पत्करून त्या भक्तिरूप झाल्या आहेत. खेड्यातल्या स्त्रियांचा अडाणीपणा पाहून त्यांचं मन कळवळतं आणि प्रबोधनासाठी कीर्तनाचा आधार घेतं. मीरेपासून कान्होपात्रेपर्यंत सर्वांच्या भक्तीचा महिमा सांगून त्या श्ाोत्यांना दंग करून सोडतात.

मराठी पाचवी शिकलेली ही मुस्लिम स्त्री कोणाच्याही विरोधाला न जुमानता मानवतेच्या ऐक्याचं कार्य करते आहे. या देशावर , संस्कृतीवर , इथल्या सर्व देवतांवर प्रेम करत मानवताधर्माचा आचारविचार लाखो जनांसमोर जाहीरपणे मांडते आहे. ' प्रत्येक धर्म मानवता आणि शांतीचं शिक्षण देत असतो. धर्माचा लढा अधर्माशी असतो. समाजात मानवता हाच एक धर्म आहे. हिंदू-मुस्लिम असा भेद करू नका. अहंकार , अंधश्ाद्धा , स्वार्थ यांना तिलांजली द्या. चांगली संगत केलीत तर जीवन सुखमय होईल ', असा संदेश देतानाच

' आदम को खुदा मत कहो , आदम खुदा नही

लेकीन खुदा के नुरसे , आदम जुदा नही ' याची जाणीवही त्या करून देतात.

कीर्तनातून मिळालेल्या मानधनातून त्यांनी अनेक लोकोपयोगी कामांना मदत केली आहे. कल्याणजवळच्या हाजी मलंगच्या पायऱ्या बांधण्यासाठी १९६० मध्ये त्यांनी दीड लाखांची मदत केल्यानंतर परत एकदा त्या चचेर्त आल्या होत्या. पंढरपुरातल्या त्यांच्या मठातून अन्नदानाचं काम आजही सुरू असतं.

एवढं सगळं असतानाही त्यांनी कधी प्रसिद्धीचा मोह धरला नाही. साधी राहणी टाकली नाही. आसनस्थ होऊन महाराज म्हणून मिरवलं नाही. दिंडीत सर्व बारीकसारीक गोष्टींवर त्यांची चोख नजर असते , तसंच स्वयंपाकासाठी त्या स्वत: झटत असतात.

वारकरी संप्रदायात राम-कृष्ण-हरी हा मंत्र आचारविचारांशी नातं सांगणारा आहे. राम आणि कृष्ण जसे वेगळे नाहीत त्याप्रमाणेच विटेवरचा विठ्ठल हा बालरूपातला कृष्ण असून कृष्णभक्तीची महती मनात रुजवणारा आहे. जैतुनबी कृष्ण आणि विठ्ठल यांच्याबरोबरच पैगंबरही श्ाद्धास्थान मानून ' ईश्वर एक आहे ' या विचाराची जपणूक करणाऱ्या आहेत. राज्य सरकारने पैठण इथे झालेल्या भव्य सोहळ्यात जैतुनबींच्या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानपत्र बहाल केलं आहे. संयमशील , अभ्यासूवृत्ती आणि साधी राहणी यामुळे जैतुनबींनी अनेक सश्ाद्धांच्या मनात गौरवाचं स्थान प्राप्त केलं आहे. वयाच्या पंच्याहत्तरीनंतरही त्या वारीमध्ये तितक्याच उत्साहाने सहभागी होऊन कीर्तन करतात. कीर्तनाच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्र पालथा घातला आहे. त्यांना मानणारे अनुयायी , शिष्यगण सर्वदूर पसरलेले आहेत.

कीर्तनात त्या सुरेख गातात. बारामतीच्या घाणेकरबुवांकडून त्यांनी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले आहेत. त्या एकट्याच असल्याने वडिलांनी पुत्र दत्तक घेतला. त्यांचं नाव अब्बासभाई. अब्बासभाई आणि त्यांचा परिवार आक्कांची काळजी वाहतात. आपली बहीण वारकरी संप्रदायातून समाजप्रबोधन करते , तिला सर्वदूर लोकं मानतात , त्याचं कोडकौतुक अब्बासभाईंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतं. मुस्लिम धर्माचरण पाळणाऱ्या अब्बासभाईंचं दिसणं , वागणं , बोलणं , चालणं वारकऱ्याशी सार्धम्य सांगणारं असंच आहे. ते स्वत: वारीत सहभागी होऊन आक्कांच्या दिंडीला जमेल तेवढा हातभार लावत असतात.

' तेरी काया जाईंगे झूट रे

तू भजले रामका नाम '

अशा प्रकारच्या आक्कांच्या कीर्तनातले दाखले अब्बासभाईंनाही मुखोद्गत आहेत.

आक्कांच्या कीर्तनातील उपदेशाने द्वारकाबाई वेश्येचा धंदा सोडून भक्तीमार्गाला आली असून स्वतंत्र्यपणे कीर्तनही करू लागली आहे. अशी एक ना अनेक उदाहरणं जैतुनबींची भक्ती फळाला आल्याची निदर्शक आहेत.

जैतुनबी या जन्माने मुस्लिम असल्यामुळे आणि आपल्या विचारसरणीवर सत्तेच्या राजकारणाचा पगडा असल्यामुळे त्या मुसलमान आहेत या गोष्टीला अकारण महत्त्व येत असावं. पण वारकरी संप्रदायाने त्यांच्या प्रासादिक हरिकीर्तनामुळे त्यांना आदराचं स्थान दिलं आहे.

' बैसला संतांचे संगती
कळो येईल कमळापती '

ही तुकोबांची उक्ती जैतुनबींच्या जीवनात सार्थ ठरली आहे.

Comments

वारीचे वारकरी.

आवडले.म.टा.च्या छान लेखाची आठवण करुन दिलीस.अशा वारीच्या वारकर-यांना नमस्कार.

 
^ वर