पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी ? माहिती हवी आहे.

राम-राम मंडळी, जगभर पाळीव प्राण्यांना पाळण्याचे फॅड आहे, कोणी हौस म्हणून, कोणी प्रतिष्ठा म्हणून तर कोणी गरज म्हणून. कुत्रे, मांजर,पोपट, आणि काय काय प्राणी पाळतात. हे आपणास माहीत आहेच. आम्हीही कुत्रे पाळतो. आमच्याकडे पामेरीयन जातीचे पांढ-या शुभ्र केसांचे, भुंकताना आक्रमकपणे भुंकणारे( पण सर्वात डरपोक ) कुत्रे होते, पण दोन-तीन दिवस त्याची काळजी घेण्यात आमचे दुर्लक्ष झाले आणि एक ते दिवस मरण पावले. आता विचारा ते कसे मरण पावले, मित्र, हो त्याच्या अंगावर असंख्य 'गोचीड' झाल्याने आणि ते आमच्या लक्षात न आल्यामुळे ते मरण पावले. त्याच्या मरणाने आम्हा सर्वांचे डोळे भरले, कोणीही जेवलो नाही. त्याच्या आठवणीत बरेच दिवस गेले. दुसरे कुत्रे आणे पर्यंत त्याची आठवण येतच राहिली असो,

आता डॉबरमन जातीचे* कुत्रे तेव्हा त्याचे वय दोन महिन्याचे होते तेव्हा आणलेले आहे. त्याची शेपूट कापावी लागते, हे डॉक्टरांनी सांगितले. मग त्याची शेपूट कापून आणली, त्यांनी त्याला दोन टाके दिले. मित्र, हो मागचा अनुभव वाईट असल्यामुळे या कुत्र्याची काळजी वेळात वेळ काढून घेतो, जसे, त्याच्या कानातले किडे ट्वीजरने (चिमट्याने ) ओढून काढणे, गोचीड झाल्यास त्यासही ओढून काढणे, हे काम फार घाणेरडे आहे, कारण काढता, काढता ते फुटून जाते आणि हातावर ते रक्त वगैरे येते. शेपटीच्या खाली ब-याचदा त्यास जखम होते, आणि त्यात आळ्या पडतात, हे काम महाभयंकर आहे, डॉक्टरांकडे गेल्यावर ते थातूर- मातुर इलाज करतात पण काळजी घ्यावयाची ती मालकानेच. जखमेतून अळ्या निघाल्यास Topicure या स्प्रेने जखमेवर फवारल्यास अळ्या बाहेर पडतात, त्याहीपेक्षा Turpentin oil जखमेवर लावल्यासही अळ्या बाहेर पडतात, त्यानंतर hydrogen peroxid i.p ने जखम स्वच्छ करायची म्हणजे, असे काही दिवस केल्यास जखम बरी होते scabex हे औषध उलटी होऊ नये म्हणून, तर आजारी असल्यावर भूक लागण्यासाठी polybion या औषधांचा वापर करतो. या बाबतीत आमच्या एका माणसाच्या डॉक्टराने सांगितले होते की, लहान मुलांना जी औषधी दिली जातात तीच औषधे प्राण्यांना दिली जातात.........मित्र हो, हे सर्व सांगण्याचे कारण असे की प्राण्यांच्या घ्यावयाची काळजी साठी आपणास जर काही माहिती असेल तर कृपया सांगावी !!!

कारण पाळीव प्राण्याच्या सहवासात राहिल्यानंतर त्याचे मरणे अत्यंत त्रासदायक असते, माणसाचा कशा-कशात जीव लागत नाही, तेव्हा जगभरातील मंडळी इथे वावरत असतात, त्यांना जर काही माहिती असेल, तर पाळीव प्राणी पाळणा-यांना सदरील चर्चेचा उपयोग व्हावा, होईल असे वाटते.

सूचना :- डॉबरमन* जातीचा हा उल्लेख यात आला असला तरी कृपया, कोणत्याची मानवाच्या जाती,
धर्माकडे या चर्चेस नेऊ नये ही नम्र विनंती.

Comments

समर्था घरचे श्वान

त्या कुतर ओढीतून मी गेलो आहे.

असाध्य रोगाने ग्रस्त कुत्र्याला विष देऊन मारल्या नंतर कधीच कुठला प्राणी पाळायचा नाही हे ठरवून टाकले.

कुत्र्याचे माणसाळणे आणि मानवाचे पिसाळणे हे सौंदर्य आहे की विरोधाभास ते सांगणे फार जिकीरीचे आहे..

असो..

रौकेल टाकून सुद्धा गोचिडी मरतात असे ऎकले आहे.

ज्या ममतेने आपण या प्राण्यांचे पालन करतो त्याच्या ०.००१ % ममता जनावर सद्रुश्य जिवन ढकलणारया लाखो मानवांच्या नशीबी नसते..

आपण "डांबर मन" झालेलो असावे काय ?

रॉकेलने मरत नाहीत.

रौकेल टाकून सुद्धा गोचिडी मरतात असे ऎकले आहे.
गोचिडी रॉकेलने मरतही असतील पण त्यासाठी आम्ही ५० ग्रॅम पेट्रोल वाटीत घेऊन कुत्र्यावरची गोचिडी चिमट्याने ओढून ओढून काढतो आणि त्या वाटीत टाकतो, सर्वात घाणेरडा प्रकार. त्यासाठी इंजेक्शन असेल हो पण माहित नाही ?

ज्या ममतेने आपण या प्राण्यांचे पालन करतो त्याच्या ०.००१ % ममता जनावर सद्रुश्य जिवन ढकलणारया लाखो मानवांच्या नशीबी नसते..

आपण "डांबर मन" झालेलो असावे काय ?

जनावराच्या विषयात माणसाचे कशाला काढले राव, माणूस सुखाने जन्माला यावा आणि सुखाने मरावा यासाठी प्राचिन काळापासून ते आजतागायत चिंतन मंथन चालूच आहे, काय म्हणता ? :)

महत्वाची चर्चा!!

ना पाळीव प्राणि आहे माझ्याकडे, ना मी कोणाचा ;-) त्यामुळे काही माहिती देउ शकत् नाही. पण ते गोचीड, जखमा, अळ्या, पू, रक्त इ. माहिती दिल्यामुळे कधी कुठला प्राणी पाळेन असे वाटत नाही. त्याबद्दल धन्यवाद. कोणा ओळखीच्याला, प्राणी पाळायचा असेल तर हा लेख दाखवीन. :-)

नेमक्या तुमच्या शेवटच्या सुचनेमुळे माझा खालचा प्रतिसाद वाया गेला प्रा. डॉ.

अन्य धर्मीय विशिष्ट पद्धतीने काळजी घेतात त्यामुळे हळुहळू सर्व पाळीव प्राणी त्याच विशिष्ट धर्माच्या पाळीव संस्कृतीकडे आकर्षीत होणार. म्हणजे तुमच्या पाळीव प्राण्याला फुस लावुन बाटवले जाणार (२४० जिल्ह्यात तर हे झालेच आहे व इशान्यपुर्व भागात तर तुम्हाला कुत्रेपण विचारत नाही.)! उठा जागे व्हा! आपल्या पुरातन व उच्च पाळीव संस्कृतीचे जतन करा.

भयंकर

सर
आपण भयंकर वर्णन केले आहे. मात्र माझा नुभव असा नाही खरं तर सुखद आहे.

मात्र मीही कुत्रे पाळले होते डॉबरमॅन.
मात्र असा त्रास कधी झाला नाही.

कुत्र्यांच्या अंगावर अशाप्रकारचे पॅरॅसाइटस् येवू नयेत म्हणून त्यांना शक्यतो गल्लीतल्या कुत्र्यांसोबत मिसळू देवू नये.
हा मुख्य उपाय आहे!

या शिवाय जर कधी काही करणाने मिसळलेच तर त्यासाठे अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत.
आपण या साठी व्हेट कडे गेला असालच. पण तरीही त्याने कोणत्याही प्रकारची पवडर सुचवली नाही याचे आश्चर्य वाटते.

या किडे नाशक पावडर्स चांगल्या असतात असा मला तरी आमच्या कुत्र्याबाबतचा अनुभव आहे. शिवाय आठवड्या पंधरा दिवसातून चांगली आंघोल हा पण उपाय आहेच. या साठी विवीध प्रकारचे साबण व शांपु मिळतात. २ आंघोळीं मध्ये व पावडरच्या वापराने तुमचे कुत्रे संपुर्णपणे गोचिड विरहीत व्हायला हरकत नाही.
या शिवायही व्हेट डॉ. चा सल्ला घेतलेला बरा असे वाटते.
या शिवाय कुत्र्यांना पोहायलाही आवडते. त्यांना शक्य असल्यास नदीवर पोहायला नेलेत तर अनेक किडे गायब होतात असा अनुभव येईलच.
एकुणच कुत्र्यांची काळजी घेणे हा मनाला विरंगुळा देणारा प्रकार आहे यात शंका नाही.

आपला
गुंडोपंत

भुभु

नुकताच २ फेब्रुवारीला माझा बिट्टु भुभु वारला. त्याला कावीळ झाली होती. त्याला सर्वतोपरी उपाय केले. इंजेक्शने चे कोर्स. लिव्हरोलिन, बी व्हिटॅमिन काहि उपयोग झाला नाही . होमिओपाथी दिले. एकदम फरक पडला. तो खाउ लागला. ५० टक्के बरा झाला. मला वाटले झाला आता बरा.पण नंतर अचानक तब्येत खराब झाली. डॉक्टरांनी केव्हाच आशा सोडून दिली होती. होमिओपाथिचा प्रयोग हा शेवटचा उपाय म्हणुन केला.
गावठी क्रॉस्ड ब्रीड होता तो. मृत्युंजयेश्वराच्या मंदिरात एक् कुत्री व्याली होती. पिल्लांनी नुकतेच डोळे उघडले होते. त्यातल एक चॉकलेटी रंगाचे पिल्लू मुलीच्या आग्रहाखातर आणले. (रँडम चॉईस) . तोच हा बिट्टू. माझी मुलगी पहिलीत असताना आणला होता. ती गल्लीतील आडदांड कुत्र्यांशी खेळत असे. त्यातला एक टोण्या कुत्रा तिला अक्षरशः घोड्यासारखा फिरवत असे. लोक भयचकित होउन बघायचे.
बहुतकांनी पुलंचे 'माझे पाळीव प्राणी' ऐकले असेल. त्यातील कौतुक,उपहास,विनोद वगैरे वास्तवच आहे. लहान पणापासून मी शेतात, घरात कुत्र्यांच्या संगतीत असे. मला त्यांचे गारगार नाक खुप आवडे. ते आपल्या गालावर किंवा तळपायावर टेकवले कि मला शहारुन येते. पण "कुत्र्यांच्या तोंडात तोंड घालु नको. कुत्र्याला पाय लावायचा नाही तो खंडोबा असतोय." असे मला शेतातले गडी,घरातले सांगत असत. माझी सुप्त इच्छा होती कि भुभुंच्या सोबत अंथरुणात झोपायच. ते बिट्टुच्या रुपाने पुर्ण झाले. तो स्वतःला कुत्रा समजत नसे आणि आम्ही त्याला.मी त्याला मुलगाच मानला होता. शेवटी डॊक्टरांनी त्याला वेदनाविरहीत शांत मृत्यु दिला. (भाग्यवान बेटा) माझ्या हातात तो निष्प्राण झाला. जाताना त्याचे डोळे कृतज्ञता व्यक्त करुन गेले. मी हुंदका आणि अश्रू टाळू शकलो नाही.
मनोगतावर कोंबडी यांनी लिहिलेले 'सोयरा ' हे भुभायण http://www.manogat.com/node/10948 मला खुप आवडले. भुभुंच्या संगोपनावर बाजारात पुस्तके उपलब्ध आहेत. त्यात भरपुर माहिती असते. 'संरक्षक सोबती ,लेखक विजय भट व सौ मालती़ दाते , पुणे विद्यार्थी गुह प्रकाशन १७८६ सदाशिव पेठ पुणे ४११०३० हे पुस्तक माहिती पुर्ण आहे. इतर ही अनेक चांगली पुस्तके आहेत.

http://pets.indiatimes.com/ या वर भरपुर माहिती उपलब्ध आहे. बुरुटे सर आपल्या प्रस्तावानिमित्त माझी आठवणींची खपली निघाली. काय करणार? खोडकर,प्रेमळ, डँबिस ,निरागस बिट्टू डोळ्यासमोर येतो. माझे घरातील निम्मे संभाषण बिट्टुशी असे. त्याचे बोलके डोळे , देहबोली यातून तो माझ्याशी बोलत असे.
Get-Together1 (5)
त्याला वाहिलेली
श्रद्धांजली
आमच्या घरच्या नि:शब्द शांततेचा
बिट्टू हाच खरा शब्द होता
आमच्या घरच्या निरवतेचा बिट्टू हाच खुला 'रव' होता
बिट्टू हा तर दुवा होता.
समांतर जाणारे नदीचे काठ
अलगद, नकळत जोडणारा
तो भला भक्कम पूल होता
बिट्टू म्हणजे
घरच्या कुणाच जगण होता
घरच्या कुणाच खेळण होता
खरं म्हणजे बिट्टू हा तर सा-या घराच चैतन्य होता.
घरं ज्यानं गर्जत होतं
घर ज्यानं गाजत होतं
घर ज्यानं हलत होतं
घर ज्यानं बोलत होतं
घर ज्यानं डोलत होतं
असा सुमुख आमचा बिट्टू होता
आता घरात पसरलीये
एक न पेलवणारी शांती
हताश अशी एक उदासी!!

--by Manjiri Ghatpande bittu's mother

प्रकाश घाटपांडे

किती मस्त आहे हो हा

वा,
किती मस्त आहे हो हा बिट्टू.
आवडून गेला मला.
अशी साधीशी असणारीच जास्त आवडतात.
अजून फोटो द्या ना...

कविता/मुक्तक अगदी खरं आहे.

आपला
गुंडोपंत

श्री. घाटपांडे साहेबांचे आम्ही ऋणी आहोत.

सदरील चर्चा प्रस्तावाने काही माहिती मिळाली होतीच. मात्र या  चर्चा प्रस्तावामुळे श्री प्रकाश घाटपांडे यांनी आम्हाला नुकतेच 'संरक्षक सोबती'  हे पुस्तक भेट म्हणुन पाठवले आहे, आणि ती भेट आम्ही अतिशय आनंदाने स्विकारली आहे. त्या भेटीचा खूपच आनंद झाला. तो आनंद आमच्या प्राध्यापक मित्रांनी आमच्या चेहर्‍यावर पाहिला आहे, असो....
हे पुस्तक प्रत्येक पाळीव प्राण्यांवर प्रेम करणा-यांसाठी, त्याची काळजी घेण्यासाठी  अतिशय उपयोगाचे आहे, आम्ही श्री. घाटपांडे साहेबांचे  ऋणी आहोत...!!!!

संरक्षक सोबती.
विजय भट
सौ. मालती दाते.
प्रकाशकः-
गजानन संत
पुणे विद्यार्थी गृह प्रकाशनासाठी
सदाशिव पेठ,पुणे-४११०३०


किंमत.......(अनमोल)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझा एक प्रश्न

बिरुटेसर, घाटपांडे आणि इतरांची मते वाचतो आहे. एकूणच , उपक्रमातील इतर विषयांप्रमाणे हा धागासुद्धा माहितीपूर्ण बनत आहे - विशेषतः माझ्यासारख्यासाठी.

पाळीव प्राणी पाळणे भारतात असताना आर्थिक परिस्थितीमुळे म्हणा, घरच्या उदासीनतेमुळे म्हणा, शक्य झाले नाही. पाळीव प्राण्यांशी दोस्ती हा , मला वाटते एक अवयव असतो. माझा हा कधीच विकसित होऊ शकला नाही. मात्र त्याबाबत कुतूहल फार वाटते. ज्या व्यक्तिंच्या आयुष्यात पाळीव प्राण्यानी प्रेमाचे , जडणाघडणीचे स्थान होते/आहे ते लोक मला भाग्यवान वाटतात. आणि आता नुकतेच मला क्याट्-ऍलर्जी आहे हे सिद्ध झाले आहे. म्हणजे, या प्रकारच्या आनंदाला माझ्यापुरता कायमचा पूर्णविराम.

पाळीव प्राणी जवळ नसणार्‍या माझ्यासारख्या अज्ञ लोकांच्या वतीने काही प्रश्न विचारावेसे वाटत आहेत.

अमेरिकेमधे लक्षावधी लोक पाळीव प्राणी - विशेष करून कुत्रे आणि मांजरी - पाळताना दिसतात. हे सर्व प्राणी घरात वावरताना, त्या प्राण्यांच्या वास, त्यांचे सतत गळणारे केस , पाहुण्यारावळ्यांबरोबरचे सह-अस्तित्व या प्रमुख बाबीना इतके लोक कसे तोंड देतात ? बरे , "डॉग्-हाउस्" हे तर केवळ मी वाक्प्रचारापुरते ऐकले आहे. म्हणजे, हे सर्व प्राणी माणसांच्या घरातच अहर्निश वावरतात ; त्यांच्याकरता "वेगळे" टुमदार घर कुणाला परवडताना मला दिसत नाही. भारतात या बाबतीत काय परिस्थिती आहे ? उष्ण हवेचा प्रदेश असल्याने १२ महिन्यातील कुठल्याही कालखंडात प्राण्याला घराबाहेर ठेवण्याच्या दृष्टिने हवामानकडून काही आडकाठी नाही. पण घराबाहेर ठेवणे एकवेळ बंगलेवजा घरांमधे किंवा गावाकडे शक्य होईल. इतर शहरी फ्लॅट् वासीय काय करतात ?

माझा वाघ्या !!!

''चल रे वाघ्या बीगी-बीगी वाट कुणाची पाहू नको,
दुनिया सारी जरी पलटली, दूर तु माझ्याशी होऊ नको, माझा वाघ्या.......!!!

sandy  06032008194

0603200821606032008203


गेट वर पहारा देणारा, निरिक्षण करणारा, मालक फोटो का काढतोय तंद्रीतला, नाराज....दोस्त.


खरे तर, कुत्र्याला जीव लावण्याच्या बाबतीत आम्हीही तितकेच जागृक, आम्ही आमच्या जेवणाअगोदर विचारणार 'सॅन्डीला' जेवण टाकलंय का ? पाणी आहे का ? वगैरे........!!!


अमेरिकेत ट्रेनर असतात, इथेही असतात पण त्यांची फीस न परवडणारी असते, मुळात यांची किम्मत महाग, डॉबरमन.....रुपये चार हजार, जर्मन शेफर्ड आठ हजार, पामेलियन एक हजार, अशा त्याच्या किमती........ साधारणतः तीन महिन्याचे दहा हजार रुपये ट्रेनर घेतात.......आता आम्ही त्याला काही शाळेत टाकलेले नाही. त्याची भाषा आम्हाला कळते.....अनोळखी व्यक्तीस भुंकणे, मांजरीस भुंकणे, परिचयाच्या व्यक्तीस भुंकणे, या गोष्टी आम्हाला सवयीने कळल्या आहेत.


त्याचे आवडीचे खाद्य म्हणजे मटन.  जेव्हा जेव्हा आमच्याकडे असेल, तेव्हा तेव्हा त्याचा वाटा ठरलेला.
आठवड्यातून रविवारी स्नान वीथ  शॅम्पूने, त्याला सकाळ सायंकाळ फिरवणे...........इत्यादी.


आम्ही याला बांधून ठेवले आहे, एका परिचयाच्या माणसाने जरा डेरींग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने दाताने त्याला हलकेच ओरखाडले, तेव्हा पासून त्याला बांधून ठेवल आहे. तसे त्याचे इकडे तिकडे तोंड घालणे हीही एक कारण होतेच.


खरे तर या बाबतीत डॉक्टर कधी कधी योग्य निदान करीत नाही असे वाटते.......पामेलियन मरण पावले त्याला सारखे दोन दिवस सलायन लावले होते.....!!!  पाहू देवाच्या हातात आता, आपले प्रयत्न संपले. त्यामुळे माझा व्हेट. डॉक्टरांवर विश्वास नाही. त्यामुळे माहिती यावी हा उद्देश आहेच.

आमच्या घराला अंगण आहे, म्हणुन ही व्यवस्था होते, पण जे फ्लॅट मधे राहतात किंवा जागाच नाही त्यांच्या पाळीव प्राण्याच्या वेडाचे काय प्रश्नच आहे. ?
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडला...

गळ्याचा पट्टा खुप घट्ट झाला आहे का? फोटोत तसा दिसतोय.
आमचा असाच होता हो. फक्त काळानसून तपकीरी होता...पण असेच लांबट नाक.

कायम बांधून घालून जास्त चिडचिडे होतात अनुभव आहे.
आपला
गुंडोपंत

अलविदा

कावीळ सदृष आजारात (योग्य निदान झालेच नाही) आम्ही पाळलेल्या कुत्र्याची भूक मंदावली, आणि साताठ दिवसापासून त्याच्या न थांबणार्‍या उलट्या यासाठी लिव्ह-५२, ऐव्हील, पेरीपार्म,मेगॉपॉन, आणि शरीरातील शक्ती वाढावी यासाठी वेगवेगळी औषधी (सलायन) दिलीत. पण, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे 'सँडी' या पाळीव प्राण्याला आज अलविदा करावा लागले.

-दिलीप बिरुटे
(दु:खी)

आदरांजली

अरेरे... फार वाईट झाले.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

फ्लॅट मध्ये कुत्रा .. आणि..

नमस्कार,
खरेतर पाळलेला कुत्रा मेला की त्याचा इतका चटका लागतो की पुन्हा तो विषयच नको असे अनेकांच्या बाबतीत होते. माझ्या बाबतीतही तेच आहे. त्यामुळे प्रतिसादाला विलंब लावला. पण वरिल प्रतिसादात वाघ्या हे नाव पाहिले. जे माझ्या कुत्र्याचे होते..आणि हा प्रतिसाद लिहायला घेतला.

मी माझ्याकडे कुत्र्याला आणले तेव्हा आमच्या घराला आंगण होते. पण नंतर आम्ही फ्लॅट मध्ये आलो. त्या लहानशा घरात वरच्या मजल्यावर लहान गॅलरीत त्याला आम्ही ठेवत असू. पण त्याचा घरभर वास यायचा. त्याला किती आंघोळी घाला, पावडरी फासा..प्राणीसंग्रहालयात जसा वास असतो तसा वास यायचाच. पण ते आम्ही प्रेमापोटी सहन करायचो. पण उनाडणे, पळणे, मातीत लोळणे आणि 'काम' या सारख्या नैसर्गीक भावनांचा सुद्धा विचार करावा लागतोच. तो साधा गावठी होता. शेवटी माझ्या आई-बाबांनी मला समजावून त्याला मोकळा सोडायला लावला. तो आसपास फिरत असे. आणि आमच्या दारी बसत असे. त्याला आम्ही रेबीज इत्यादी इंजक्शने वेळोवेळी देत असू. तसेच म्युनसिपाल्टीचा बिल्ला सुद्धा गळ्यात अडकवला होता.
कालांतराने तो म्हातारा होवून गेला.

१. नियमित आंघोळ. चांगला कुत्र्यांचा साबण लावून.
२. अंग वाळले की त्याला गोचिडी होवू नयेत म्हणून पावडर. आणि ब्रश ने वारंवार त्याचे केस नीट विंचरणे. यामुळे गोचिडिंवर प्रतिबंध.
कानाच्यापाळीवर एक् छेद असतो. त्यात अनेकदा या गोचिडी लपतात.
३. भरपूर पळवणे, त्याच्याशी खेळणे, त्याच्याशी बोलणे. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी.
४. तो पाळीव असला तरी त्याला सर्व नैसरर्गीक भावना-गरजा असणार हे गृहित धरुन त्या पुरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे आता मोठेपणी मला वाटते.

--लिखाळ.

धन्यवाद .

लिखाळ यांच्या प्रतिसादाबद्दल आभार.

भारतात असताना मी जर कुत्रा पाळला असता तर १००% लिखाळ यांच्या वाघ्याप्रमाणे पाळला असता असे मला त्यांचे उत्तर वाचून वाटले.

दुवा

मी मार्जारवादी असल्याने कुत्र्यांचा विशेष अनुभव नाही. पण गूगलून पाहिल्यावर हा दुवा सापडला.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

आभार !!!

पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी ? या परिसंवादात ज्यांनी सहभाग नोंदवला व उपयुक्त माहितीची देवाण-घेवाण केली
ते परमाणु ,सहज, गुंडोपंत, श्री प्रकाश घाटपांडे,मुक्तसुनित, लिखाळ, राजेंद्र, तसेच ज्यांनी अशा चर्चांनांही व्यासपीठ उपलब्ध करुन दिले ते मी.उपक्रम यांचेही ,तसेच वाचकांचेही आभार मानतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुत्रा आणि काळजी

आबा
कुत्राच्या केसाच्या काळजी साठी हि पावत्द्र्र्
NOTIX pawder wapara.
लिखाळ. याचा लेख या साठी

 
^ वर