ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद

ई आवृत्तीच्या निमित्ताने

जेव्हा २००१ मध्ये प्रथम व २००३ मध्ये द्वितीय मुद्रित आवृत्ती प्रकाशित झाली तेव्हा खरं तर मला हे सगळं संकेतस्थळावरच लिहायच होत. म्हणुनच त्याचे स्वरुप एफ ए क्यु असे ठरवले गेले. पण एक विचार मनात आला कि इंटरनेटचा वापर करणारा वर्ग किती? त्यातून अशा प्रकारचे संकेतस्थळ पहायला कोण येणार? आपल्याला जर आपल्या वाचक वर्गापर्यंत पोचायचे असेल तर मुद्रित माध्यम व मराठी भाषा हाच पर्याय आहे. तो इंटरनेटचा वापर करणारा वर्ग नाही. तरी देखिल पुण्या-मुंबई कडचा वर्गच हे वाचणार खेड्यातील वर्ग पुन्हा वंचित राहणार. पण मला माझ्या मर्यादाही लक्षात घेणे आवश्यक होते. त्यानंतर प्रो. जयंत नारळीकरांनी लोकसत्ता १३ एप्रिल २००३ मध्ये परिक्षण लिहिल्याने पुस्तक एकदम प्रकाशात आले. पुढे हे मनोविकास प्रकाशनने प्रकाशित करण्यास रस दाखवला. त्यामुळे ते व्यावसायिक पद्ध्तीने जुलै २००५ वितरित झाले.
महाराष्ट्र पोलिस बिनतारी विभागातून अपघातानेच मी स्वेच्छानिवृत्त झालो व नंतर उपक्रमावर अपघातानेच आलो. वाटल आपलं पुस्तक जर महाराष्ट्राबाहेरील व परदेशी मराठी बांधवांना वाचायच असेल तर तो वर्ग हे पुस्तक मुद्रित स्वरुपात उपलब्ध करुन वाचू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला ई आवृत्तीच काढली पाहिजे. मग लेखमाला स्वरुपात हे टाकत राहिलो. उपक्रमामुळे हे ई - आवृत्ती स्वरुपात येण्यात मला अतिशय आनंद होतो आहे. उपक्रम व उपक्रमींचे मी प्रोत्साहनाबद्दल आभार मानतो.
प्रकाश घाटपांडे
डी २०२ कपिल अभिजात
डहाणुकर कॉलनी. कोथरुड पुणे ४११०२९
prakash.ghatpande@gmail.com
दि. २८ फेबुवारी २००८

अनुक्रमणिका

~

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .... मनोगत

लेखकाचे मनोगत

''तू ज्योतिषाचा कोर्स कुठं केला?`` असा एक प्रश्न मला हमखास विचारला जातो. पण मी कुठंही कोर्स केला नाही. हे सांगितलं तर त्यांना पटत नाही. या विषयातले ग्रंथ,लेख, व्याख्यानं, चर्चासत्र, अधिवेशन आणि आपली शिकण्याची इच्छा हेच आमचे गुरु. या विषयांत मी जातक, विद्यार्थी, अभ्यासक, समर्थक, ज्योतिषी, चिकित्सक अशा सर्व पातळयांवर अनुभव घेतले.
भविष्याविषयी उत्कंठा असणं ही अत्यंत स्वाभाविक आहे. केवळ उत्कंठे साठी ज्योतिषाकडे येणारी माणसे कमी व अडचणीत आहे, संकटात आहे म्हणून मार्गदर्शनासाठी येणारी माणसेच जास्त. मनुष्य अडचणीत असला की चिकित्सा वगैरे असल्या भानगडीत तो पडत नाही. साहजिकच श्रद्धा हाच भाग मग जोपासला जातो. आपल्या धर्मामध्ये चिकित्सेला मोठी परंपरा आहे. फलज्योतिषात विविध मतप्रवाह आहेत. पण तरीही ज्योतिष विषयाला एक गूढ वलय प्राप्त झालेले आहे. तोडगे,यंत्र, मंत्रतंत्र, दैवी उपाय, सिद्धी, उपासना या गोष्टी ज्योतिषापासून वेगळया करता आलेल्या नाहीत.
ज्योतिषी आणि जातक यांच नातं हे आपल्याकडे डॉक्टर आणि रुग्णा सारखं आहे. तिथ अपेक्षा असते समीक्षा नसते. ज्योतिषाविषयी विविध क्षेत्रातल्या लोकांची मते अजमावण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. परिवर्तनवादी चळवळीतल्या लोकांना जेव्हा आपला ज्योतिषावर विश्वास आहे का? असा प्रश्न विचारतो तेव्हा तो त्यांना अडचणीचा वाटतो. '' आमचा तसा विश्वास नाही. पण .......`` '' आपला त्यातला काही अभ्यास नाही.`` पण त्या विषयाच्या अंतरंगात डोकवावे असे काही वाटत नाही. ज्योतिष हा विषय सोपा करुन सांगावा असं खूप दिवस मनात होतं. पण कितीही सोपं केलं तरी ते लोकांना अवघडच वाटत राहीलं. मग हा विषय लोकांच्याच मनातल्या प्रश्नांमधून मांडला तर? असं मनात आल्यावर त्या चष्म्यातून उत्तरे शोधू लागलो आणि या पुस्तकाचा जन्म झाला.
माझे जेष्ठ स्नेही श्री. माधव रिसबूड यांचेशी वेळोवेळी होणारी अनौपचारीक चर्चा हा तर या पुस्तकाचा पाया आहे. ग्रहांकित मासिकाचे संपादक मा. चंद्रकांतजी शेवाळे उर्फ दादा यांचेशी गप्पा मारताना त्यांनी मर्मावर अचूक बोट ठेवले. ते म्हणाले, '' सर्वसामान्य माणसाला ज्योतिषाकडे जावंस वाटाव अशीच इथली सामाजिक परिस्थिती आहे. ती जेव्हा बदलेल त्या वेळी ज्योतिषाकडे जाणारा वर्ग आपोआप कमी होईल.``
हे पुस्तक चिकित्सकांनी सर्वसामान्य माणसांच्या चष्म्यातून वाचावे, सर्वसामान्य माणसांनी चिकित्सकांच्या चष्म्यातून वाचावे आणि ज्योतिषांनी अंतर्मुख होउन वाचावे असं अपेक्षित आहे.

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) १] कुंडली , पंचांग, राशीनक्षत्रे

१) फलज्योतिष म्हणजे काय?
जन्मवेळची ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिष.
फार पूर्वी फलज्योतिष हा शब्द प्रचारात नव्हता. ज्योतिष किंवा ज्योति:शास्त्र हा शब्द प्रचारात होता, ज्योति म्हणजे आकाशातील दीप्तीमान गोल. ज्योतिष हा शब्द मुख्यत: खगोलशास्त्र या अर्थाने वापरीत असत. त्याचा उपयोग यज्ञयागादि धर्म-कृत्ये करण्यासाठी चांगला काल कोणता ते ठरवण्यासाठी केला जात असे. त्यात अर्थातच शुभाशुभत्वाचा भाग असे. कालांतराने ज्योति:शास्त्राचे तीन स्कंध होउन त्याना सिद्धांत-स्कंध, संहिता-स्कंध आणि होरा-स्कंध अशी नावे मिळाली. पहिला सिद्धांत-स्कंध पूर्णपणे खगोलगणिताशी संबंधित होता. दुसरा संहिता-स्कंध हा ऋतूमानानुसार नागरी जीवनातील कृत्ये व कर्तव्ये केव्हा म्हणजे कुठल्या नक्षत्रावर व मुहूर्तावर करावीत हे सांगणारा होता. तिसरा होरा-स्कंध हा व्यक्तीच्या आयुष्यातील घटना वर्तवणारा होता, तो म्हणजेच आजचे फलज्योतिष .
यूरोपमध्ये वेधशाळांच्या मदतीने ज्योतिषी लोक ग्रहगतीचा अभ्यास करीत असत व ग्रहणादिकांविषयी भाकिते वर्तवीत असत. वेधशाळांना राजाश्रय असायचा. जोहानीज केपलर (इ.स. १५७१ -१६३०) या खगोलशास्त्रज्ञाला तत्कालीन परिस्थितीत फलज्योतिषावर उदर निर्वाह चालवावा लागत असे. त्याला त्या परिस्थितीचा कमालीचा उबग आला होता. तो एके ठिकाणी म्हणतो, ''फलज्योतिष ही ज्योति:शास्त्राची ( म्हणजे खगोलशास्त्राची ) बदलौकिक कार्टी आहे, पण तिच्याविना तिची बिचारी आई (म्हणजे खगोलशास्त्र ) एका वेळच्या अन्नाला देखील महाग होते ! `` पुढे काही कालानंतर ज्योति:शास्त्राला खगोलशास्त्र असे नाव पडले आणि ज्योतिष हा शब्द फक्त फलज्योतिष या अर्थाने वापरला जाऊ लागला.

२) पंचांग म्हणजे काय? त्याचा उपयोग काय?
कालगणनेची पाच अंगे आहेत. ती म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग व करण. या पाच अंगांची माहिती ज्यात असते ते पंचांग. भारतीय कालगणनेसाठी ज्योतिर्गणित हे पृथ्वी हे स्थिर केन्द्रबिंदू मानून केलेलेे आहे. त्यामुळे सूर्य हा तारा असूनही त्याला ग्रहाचे स्थान देउन तो चल झालेला आहे. चंद्र व सूर्य यांच्यामध्ये बारा अंशांचे कोनात्मक अंतर पडण्यासाठी जो अवधी लागतो त्याला तिथी म्हणतात.
नक्षत्र म्हणजे अवकाशातील विशिष्ट पटटयातील ठळक तारका समूह. अवकाशगोलात ३६० अंशाचे बारा भाग पाडून जशा राशी झाल्या तसे २७ भाग पाडले तर २७ नक्षत्र होतात. म्हणजे एक भाग हा १३ अंश २० कलांचा झाला.
वार हे अंग उशीरा प्रचारात आले. वार हे मूळ भारतीयांचे नव्हेतच. ते खाल्डियन कदाचित इजिप्शियन वा ग्रीक संस्कृतीतून आपल्याकडे आले असावेत. कारण महाभारतात वारांचा उल्लेख नाही असे भारतीय ज्योतिषाचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास कर्ते शं. बा. दिक्षीत सांगतात.
योग व करण हे व्यवहारोपयोगी नसल्याने आता व्यवहारात योग व करण ही अंगे प्रचारात नाहीत. पंचांगात मात्र ती दिलेली असतात.
या व्यातिरिक्त पंचांगात नित्योपयोगी व उपयुक्त धार्मिक माहिती दिलेली असते. विवाह मुंज मुहूर्त वधूवरांचे गुणमेलन कोष्टक, अवकहडा चक्र, व्रते, धार्मिक सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी, ज्योतिषांना लागणारी पहाटे ५.३० रोजची ग्रहस्थिती, ग्रहणांची माहीती, धार्मिक कृत्याविषयीचे निर्णय वगैरे वगैरे. औषधाची जशी प्रथमोचाराची पेटी असते तसे हे धार्मिक प्रथमोचाराचे अंग म्हणून घरात टांगलेले असते.

३) जन्मकुंडली म्हणजे काय?
तुमच्या जन्मवेळी तुमच्या जन्मस्थळावरून दिसलेली ग्रह-राशींची स्थिती दाखवणारा सांकेतिक पद्धतीचा आराखडा म्हणजे तुमची जन्मकुंडली. कुंडलीत जे आकडे असतात ते राशींचे अनुक्रमांक दाखवणारे आकडे असतात. स्थानांचे म्हणजे घरांचे अनुक्रमांक तिच्यात लिहीत नाहीत. आपल्याकडे ती चौकटीत मांडलेली असते पण वर्तुळाकार कुंडली मांडण्याची पद्धत पाश्चात्यात आहे.दक्षिण भारतात चौकटीतच परंतु थोडी वेगळया पद्धतीने मांडलेली असते. कुंडली ही खगोलशास्त्रावर आधारलेली असते पण तिच्यावरुन भाकीत सांगणे हा फलज्योतिषाचा भाग आहे.

४) जन्मरास म्हणजे काय? जन्मनक्षत्र म्हणजे काय?
पृथ्वी सूर्याभोवती ज्या वर्तुळात फिरते ते वर्तुळ जर कल्पनेने मोठे-मोठे करीत नेले व तारांगणाच्या घुमटाला भिडवले तर तेथे जे काल्पनिक महा-वर्तुळ तयार होईल त्याला अयनवृत्त किंवा क्रांतीवृत्त म्हणतात. या महा-वर्तुळावर एक आरंभ-बिंदू ठरवायचा आणि तिथून सुरुवात करून महा-वर्तुळाचे १२ समान भाग मानायचे. दरएक भाग तीस अंशाचा होतो. त्यालाच रास म्हणतात. मेष ते मीन अशा बारा राशी आहेत.तुमच्या जन्माचे वेळी चंद्र ज्या राशीत असेल ती तुमची जन्मरास मानली जाते.
आता याच महा-वर्तुळाचे २७ समान भाग केले तर एकेक भाग १३ अंश व २० कलांचा होईल. एक भाग म्हणजे एक नक्षत्र. तुमच्या जन्माचे वेळी जर चंद्र मृग नक्षत्रात असेल तुमचे जन्मनक्षत्र मृग असे म्हणायचे. ही सत्तावीस नक्षत्रे बारा राशींमध्ये वाटलेली आहेत म्हणून एकेका राशीत सव्वादोन नक्षत्रे बसतात. प्रत्येक नक्षत्राचे चार भाग करतात त्या प्रत्येक भागाला चरण असे म्हणतात.
अंतरिक्षाच्या कल्पनातीत अफाट पार्श्वभूमीवर दिसणारे हे राशी-नक्षत्रांचे चित्र आपल्या तोकड्या कल्पनाशक्तीच्या आवाक्यात येईल अशा रितीने मांडता येईल का? येईल. अशी कल्पना करायची की, सूर्यापासून प्लूटोपर्यंत पसरलेली आपली संपूर्ण सूर्यमाला एका रुपयाएवढ्या लहानशा वर्तुळात मावेल एवढी लहान केली आहे. ही रुपयाच्या आकाराची सूर्यमाला एका विस्तीर्ण मैदानात मध्यभागी ठेवली आहे. आता या प्रमाणावर, म्हणजे स्केलवर, राशी-नक्षत्रांच्या ताऱ्यांची मांडणी मैदानात करायची आहे. त्यासाठी त्या रुपयाच्या भोवती ३०० फूट त्रिज्येचे एक वर्तुळ काढायचे. या वर्तुळाच्या आत एकही तारा नाही. त्याच्या बाहेर पसरलेल्या विस्तीर्ण मैदानात मैलभर अंतरापर्यंत डोळ्यांना दिसू शकणारे राशी-नक्षत्रांचे तारे विखुरलेले आहेत. मृग नक्षत्रातला व्याधाचा तारा ५५० फूट अंतरावर आहे. काही नक्षत्रांचे तारे दीड-दोन हजार फूट अंतरावर आहेत. आता जरा आपल्या रुपयाकडे पहा. त्यावर कुठेतरी आपली पृथ्वी व चंद्र एका तिळाएवढ्या लहानशा जागेत आहेत असे समजायचे. पृथ्वीवर उभे राहून चंद्राकडे पहाणारा म्हणत असतो की मला चंद्र आत्ता मृग नक्षत्रात दिसतो आहे, वास्तविक तो बापडा चंद्र कुठे असतो आणि ते मृग नक्षत्र कुठे असते! तरी पण फलज्योतिषात असे म्हणायचे असते की माझ्या जन्मवेळी चंद्र मृग नक्षत्रात दिसत होता म्हणून माझे जन्मनक्षत्र मृग. या नक्षत्राचा मालक कोण तर मंगळ, म्हणून मला जन्मत: मंगळाची महादशा चालू झाली! हे सगळे बघून विज्ञाननिष्ठ माणसाला असे वाटू लागते की ज्योतिष्यांची दुनिया म्हणजे वेड्यांचा बाजार आहे !

५) नावावरून जन्मरास व जन्मनक्षत्र कसे ओळखतात ?
खेडेगावात मूल जन्माला आल्यावर गावच्या जोशाकडून त्याचे जन्म-नांव काढून घेतात. पूर्वी गावात भिक्षुकी करणाराच ज्योतिषीही असायचा. तो पंचांगातून त्या दिवशीचे नक्षत्र पाहून अवकहडा चक्रावरून नावाचे आद्याक्षर सांगायचा. चू, चे, चो, ला, ली, लू, डा, डी अशा अक्षरातून तो एखादे अक्षर सुचवायचा. मग त्या अक्षरावरून डामदेव, चोमदेव अशी निरर्थक नांवे किंवा साधी नावे सुद्धा जन्मनांव म्हणून ठेवली जायची. या पद्धतीमुळे जन्मतारीख किंवा जन्मवेळ कुठेही नोंदलेली नसली तरी जन्मनांव पक्के लक्षात रहात असल्यामुळे त्या नावावरून अवकहडा चक्रातून जन्मनक्षत्र व जन्मरास कोणती ते कळते.

६) प्रश्नकुंडली म्हणजे काय? ती मांडून उत्तरे कशी देतात?
जेव्हा जातकाच्या मनात काही प्रश्न असतात, उदाहरणार्थ, मला प्रमोशन कधी मिळेल? घर कधी बांधून होईल? हरवलेली वस्तू सापडेल का? मॅचमध्ये भारत जिंकेल का? जेव्हा असा एखादा प्रश्न कुणी ज्योतिष्याला विचारतो तेव्हा ज्योतिषी लगेच किती वाजले आहेत ते पाहून त्यावेळेची कुंडली मांडतो. तिला प्रश्न कुंडली म्हणतात. फलज्योतिषात कृष्णमूर्ती किंवा नाक्षत्रज्योतिष नावाची पद्धत आहे. या कृष्णमूर्तीचा तत्वज्ञ जे. कृष्णमूर्तीशी काही संबंध नाही. या पद्धतीत प्रश्नकुंडलीला विशेष महत्व आहे. असे समजा की एका निवडणुकीतले दोन प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच वेळी एका ज्योतिष्याकडे गेले. दोघांनी ज्योतिष्याला विचारले की मी निवडणूक जिंकेन का ? आता पंचाईत आली! दोघांच्या प्रश्नाची वेळ एकच म्हणून दोघांची प्रश्नकुंडली एकसारखीच येणार. दोघांनाही एकच भविष्य कसे सांगायचे ? मग अशा वेळी ज्योतिषी काय युक्ती करतो तर त्या दोघांना १ ते २४९ पैकी कुठलाही एक आकडा मनात धरायला सांगतो. दोघेही एकच आकडा धरण्याची शक्यता फारच कमी असते. मग त्या आकडयाशी संबंधीत असलेली प्रश्नकुंडली मांडून ज्योतिषी त्याना भविष्य सांगतो ! या पद्धतीवर काही ज्योतिषी असा आक्षेप घेतात की तिच्यात जन्मकुंडलीचा विचारच होत नाही. पण धंदेवाईक ज्योतिष्यांना ही पद्धत सोयीची आहे कारण, अचूक जन्मवेळ तर राहोच पण जन्मवर्ष सुद्धा ज्यांना माहित नाही असे खूप लोक असतात. त्यांची जन्मकुंडली कुठून असणार ? मग तशा लोकांचे भविष्य कसे सांगायचे ? पण प्रश्नकुंडलीच्या पद्धतीमुळे अशा लोकांची - व ज्योतिष्यांचीही - सोय झाली आहे.
या पद्धतीबाबत पं महादेवशास्त्री जोशी यांनी त्यांच्या 'आत्मपुराण` पुस्तकात सांगितलेला एक मजेदार किस्सा विचार करायला लावणारा आहे. गुरु-शिष्य परंपरेतून शिकलेल्या महादेवशास्त्रींनी पणजीत दारावर पाटी लावून भविष्य सांगणे चालू केले. तिथल्या लोकांचे प्रश्न काय असणार तर आमची गाय हरवली आहे, ती केव्हा सापडेल ? बाहेरगावी गेलेला पाहुणा कधी परत येईल? असले प्रश्न. महादेवशास्त्री मारे प्रश्नकुंडली मांडून उत्तरे देत. पण गंमत काय व्हायची की गाय दोन दिवसांनी सापडेल असे सांगावे तर ती संध्याकाळीच गोठयात हजर व्हायची! पाहुणा पंधरा दिवसानी येईल असे सांगावे तर तो दुसऱ्याच दिवशी टपकायचा! त्यांची भविष्यवाणी खरी ठरेना. तेव्हा त्यांनी त्याच गावातील एका ज्येष्ठ ज्योतिषाचे शिष्यत्व पत्करले. मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे महाशय पृच्छकालाच बोलायला लावीत. त्याच्याच कडून इतिहास-वर्तमान वदवून घेत. 'आशां कालवती कुर्यात्।` व 'कालं विघ्नेन योजयेत्।` अशा द्विसूत्रीचा वापर करून जातकाला संदिग्ध भाषेत भविष्य सांगत. ही त्यांची पद्धत पाहून, तिच्यात जातकशास्त्र कुठ आलं अशी भाबडी शंका महादेवशास्त्रींनी विचारली. '' जातकशास्त्र? तुम्ही ग्रंथाचे आधारे भविष्य सांगायला गेलात की मेलात. इथं शब्दजंजाळ कामाला येतं. समोरच्या माणसाचं सूक्ष्म निरीक्षण करून भविष्य सांगायचं ते बरं असंच सांगायचं अन् त्याला आशेच्या घोडयावर बसवून पाठवून द्यायचं. तुमच वाक्चातुर्य जेवढं प्रभावी तेवढं तुमचं भविष्य बरोबर........`` शेवटी महादेवशास्त्रींनी विचार केला. किती दिवस मी स्वत:ला व लोकांना फसवत राहू? त्यांनी आपलं चंबू गबाळ आवरलं व पणजीहून आंबेडयाला परत आले.

७) अमावस्या अशुभ दिवस आहे काय?
एखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल असेल तर अशुभ अशी ढोबळ संकल्पना आहे. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात एखाद्या दिवशी भारत हरला तर तो दिवस त्या अनुषंगाने भारताला अशुभ व पाकिस्तानला शुभ झाला. हीच गोष्ट उलट घडली तर तो दिवस भारताला शुभ व पाकिस्तानला अशुभ. सौद्यांमध्ये वा सट्टेबाजी मध्ये एखाद्याचा फायदा हा दुसऱ्याचा तोटाच असतो. त्यामुळे एखाद्याचे शुभ हे दुसऱ्याचे अशुभ असू शकते.
तुका म्हणे हरिच्या दासा । शुभकाळ दाही दिशा ।। अमावस्याच काय पण कुठलाही दिवस अशुभ नाही. दक्षिण भारतात अमावास्या शुभ मानली जाते. कारण अमावस्या म्हणजे सूर्य चंद्र युती. सूर्य चंद्र बरोबरच उगवतात व बरोबरच मावळतात. युतीत ग्रहांची फले वृद्धिंगत होतात. अशी ज्योतिषशास्त्रात संकल्पना आहे. आपल्याकडे मात्र अमावस्या अशुभ मानतात. अजून गमतीची गोष्ट अशी की दिवाळीत लक्ष्मीपूजन मात्र अमावस्येच्या दिवशी असते. म्हणजे एकच दिवस स्थलसापेक्षतेने, व्यक्तिसापेक्षेने शुभ किंवा अशुभ होतो.

८) अमावस्येला -पौर्णिमेला शस्त्रक्रिया केल्यास रक्तस्त्राव जास्त होतो हे कितपत सत्य आहे?
ही समजूत खरी आहे की नाही या विषयावर शल्यविशारदांमध्येच मतभेद आहेत. डॉ. भा. नी. पुरंदरे यांनी १९८५ साली झालेल्या ज्योतिष अधिवेशनात स्पष्ट सांगितले की त्यांना असा काहीही अनुभव आलेला नाही. याच्या अगदी उलट काही डॉक्टरांचे मत आहे. त्यांच्या मते अमावास्येला रक्तस्त्राव जास्त होतो. ज्योतिष्यांना या मताचा मोठाच आधार मिळाला. ते म्हणू लागले की अमावास्येला समुद्राला मोठी भरती येते. माणसाच्या शरिरातील रक्तालाही तशीच भरती येत असल्यामुळे रक्तस्त्राव जास्त होत असावा. त्यांचा हा तर्क खुळचटपणाचा आहे. कसा ते पहा. समुद्राला जेव्हा एका ठिकाणी भरती येत असते तेव्हा त्या ठिकाणापासून ६००० मैल अंतरावर ओहोटी चालू असते. तिथले पाणी इकडे खेचले जात असते म्हणून इथे भरती येत असते. तळ्यात किंवा हौदात भरती-ओहोटी होत नसते! मग माणसाच्या एवढ्याशा शरीरातल्या रक्तात भरती-ओहोटी येणे तर दूरच. दुसरी गोष्ट अशी की अमावास्येला काय किंवा दुसऱ्या कोणत्याही दिवशी काय, ६ तास भरती असते तर ६ तास ओहोटी असते. अमावास्येला सकाळपासून मध्यान्हापर्यंतच भरती असते, दुपारी ओहोटी असते. आता प्रश्न असा की सदरहु डॉक्टरमहाशयांनी जो काय अनुभव घेतला तो कोणच्या वेळी घेतला ? हा प्रश्न त्यांना कुणी विचारीत नाही कारण कुणालाच धड काही माहिती नसते. ग्रहांचा मानवी जीवनावर काहीतरी परिणाम होत असावा या मताला दुजोरा म्हणून हे असले उदाहरण हमखास उगाळले जाते. डॉक्टर ज्योतिषाशी लगट करू लागले की काय गोंधळ करतात ते महाराष्ट्र विज्ञान परिषदेच्या २००१ दिवाळी अंकात डॉ. श्रीखंडे यांनी छान दाखवले आहे.

९) अमावस्या पौर्णिमेला वेडाचे झटके , अपघाताचे प्रमाण जास्त का असते?
ही मुळातच चुकीची माहिती आहे. काही गूढवादाकडे झुकलेल्या नियतकालिकांत असली चुकीची माहिती काहीतरी सनसनाटी असावं म्हणून दिलेली असते. त्यासाठी दाखले म्हणून जे संदर्भ वा सर्व्हे दिलेले असतात ते मुळातच शास्त्रीय नसतात. पण मनोरंजनासाठी वाचणारे वाचक मात्र त्यावर विश्वास ठेवतात आणि चिकित्सक लोक त्या नियतकालिकाच्या प्रकृतीनुसार त्याकडे काणाडोळा करतात. त्यामुळे असे समज फोफावतात.
आपल्याकडे येरवडा मनोरुग्णालयात असा अभ्यास तेथील डॉ. देव यांनी केला असता या समजूतीत काडीमात्र तथ्य नसल्याचे त्यांना आढळले. अंगात येणाऱ्या लोकांच्यात धूप किंवा उद यांचा वास, घागरी फुंकणे, विशिष्ट वाद्ये हे वातावरण व आज मंगळवार आहे किंवा गुरुवार आहे या स्वयंसूचनेचा अंतर्भाव हा जसा महत्वाचा घटक असतो तसा काहीसा प्रकार म्हणून वर्तणूकीतील बदल हा भाग काही मनोरुग्णांचे बाबत असू शकतो. पण वेडाचा झटका, आत्महत्या वा तसा प्रयत्न, इपिलेप्सी या गोष्टीचा चंद्राच्या कलांशी काहीही संबंध नाही. अपघातांचे प्रमाण या वेळेस वाढते या दाव्यात तर काहीच तथ्य नाही. या साठी हवा असलेला सर्व्हे हा तुम्ही आम्ही केवळ वर्तमानपत्रातल्या बातम्यांवरुन संकलित केला तरी आपल्या सहज लक्षात येईल.
या बाबत श्री. रा.ज. गोखले यांनी मुंबई मुन्सिपाल्टी च्या १९२७ च्या रजिस्टर वरुन सर्वेक्षण केले होते. 'रत्नाकर` या नियतकालिकाच्या जानेवारी १९३१ च्या अंकात '' लौकिक समजूतींविषयी शास्त्रज्ञ साशंक का?`` या लेखात त्यांनी आकडेवारी दिली आहे. त्यांनी अमावस्या पौर्णिमा या तिथीच्या अलिकडे व पलिकडे दोन दिवस घेउन एकूण ११७ दिवसातील ८७४३ मृत्यूसंख्या विचारात घेतली. त्यात त्यांना या विशिष्ट तिथीतील रोजची सरासरी ही ७४.७२ आढळली. आणि एकूण वर्षातील रोजची सरासरी ही ७५.४८ आढळली. ( संदर्भ :- 'लोकभ्रम` लेखक रा. ज. गोखले, सन १९३५ )
१९६९ ते १९७३ या काळातील न्यूयॉर्क शहरातील आत्महत्येच्या एकूण ३११ केसेस चा अभ्यास मायकेल्सन, रसेल व इतर शास्त्रज्ञांनी केला. संगणकाच्या मदतीने १ लाख वेगवेगळे फलज्योतिषकीय घटक व ६२२ कुंडल्या, तीन गट, नियंत्रित घटक, मुक्त घटक यांच्या आधारे संख्याशास्त्रीय दृष्टया त्यांना आत्महत्या व कुंडलीतील फलज्योतिषकीय घटक यांचा कुठलाही परस्पर संबंध आढळला नाही. ( संदर्भ :- जर्नल ऑफ जिओकॉस्मिक रिसर्च, सन १९७८ )

१०) हिंदू धर्मात पावसाळयाची जी नक्षत्रे सांगितली आहेत त्याच्या गुणधर्माप्रमाणे पाउस पडतो असा अनुभव येतो. मग नक्षत्रे आणि मौसमी पाउस यांचा काही संबंध आहे का?

खरं तर हा भाग पूर्णपणे भूगोलाचा आहे. पृथ्वीचा आस हा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेशी पूर्णपणे काटकोनात नाही. तो २३.५ अंश कलता आहे. तो तसा नसता तर विषुववृत्तावर बारमाही उन्हाळाच राहिला असता. उत्तर गोलार्धात जेव्हा उन्हाळा असतो त्यावेळी दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. त्यामुळे ऋतू हा काळ व स्थळ या दोन्हीशी निगडित आहे. मृगनक्षत्र हे पावसाचे पहिले नक्षत्र म्हटले जाते. ७ जूनला मृगनक्षत्र हे पावसाचे पहिले नक्षत्र लागते याचा अर्थ असा कि सूर्य आकाशात असताना आकाशातील तारे दिसतील अशी कल्पना केली तर सूर्य हा त्या वेळी आकाशातल्या मृग नक्षत्राजवळ दिसेल. म्हणजे या ठिकाणी नक्षत्रांचा उल्लेख हा कालनिर्देशक आहे. ७ जूनला मृग नक्षत्रात प्रवेश सर्व पृथ्वीच्या संदर्भाने आहे. पण पावसाळा जून महिन्यात फक्त आपल्याकडे चालू होतो. सर्व जगभरात नाही. मे महिन्यात उन्हाळा असणे हा काही मे महिन्याचा गुणधर्म नव्हे. तसे मृगनक्षत्रात पाऊस पडणे हा काही मृगनक्षत्राचा गुणधर्म नव्हे. २१ मार्च, २२जून, २३ सप्टेंबर व २२ डिसेबर या पृथ्वीची स्थिती दर्शवणाऱ्या भूगोलातील आकृत्या पाहिल्या तर आपल्या ऋतूमान व कालनिर्देशन यांचा परस्पर संबंध लक्षात येईल. पूर्वीच्या काळी कालनिर्देशनासाठी पंचांगच वापरले जात. कुठल्या नक्षत्रावर काय धर्मकृत्ये करावीत या गोष्टी ज्योतिषाच्या संहिता या स्कंधाशी संबंधीत आहे. ही धर्मकृत्ये वा शेतीसंबंधीत कामे ही ऋतूमानाशी निगडित आहेत. ती पंचांगाचे आधारे सांगितली जात असत आणि पंचांग हे फलज्योतिषाशी संबंधीत असल्याने पावसाचा नक्षत्राशी संबंध ही बाब ज्योतिषाशी जोडली गेली.

११) तेरावी रास नवीन आल्यामुळे ज्योतिषातली सगळी गणित बदलली का?

समजा तुमचा ८०० स्केअर फूटचा तीन खोल्यांचा बंगला आहे. त्यातली एक भिंत तुम्ही पाडून सरकविली आणि एक भिंत टाकून चार खोल्या केल्या मुळे तुमच्या घराचे क्षेत्रफळ बदलले का? की तुमचा पोस्टल पत्ता बदलला? नाही ना! मग तेरावी रास हा असाच प्रकार आहे. लंडनच्या रॉयल ऎस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने ही तेरावी ऑफियूचस नावाची रास प्रसिद्ध केली आहे. वृश्चिकेचा तुकडा काढून या राशीला जागा दिली. ज्योतिषशास्त्राला याचा काहीही उपयोग झाला नाही. थोडी सनसनाटी बातमी झाली एवढीच. लोक आता तेरावी रास विसरले सुद्धा.

१२) जन्मवेळ चुकली तर भविष्य चुकते का?
समजा आम्ही उलट असा प्रश्न विचारला की, जन्मवेळ बरोबर असेल तर भविष्य बरोबर येईल याची खात्री ज्योतिषी देईल का ? काय उत्तर मिळेल ? मुळात, खरी जन्मवेळ कुठली मानावी या मुद्यावर ज्योतिषीलोकांतच वाद होते. तर्कदृष्टीनं विचार केला तर ज्या क्षणी गर्भधारणा होते ती खरी जन्मवेळ मानली पाहिजे. पण ती वेळ खुद्द आईबापांनासुद्धा माहीत नसते! बालक रडते म्हणजे पहिला श्वास घेते ती जन्मवेळ मानावी, असे आता मान्य केले आहे. पूर्वी बालकाचे डोके दिसणे, मूल पूर्णपणे बाहेर येणे, नाळ कापणे, अशा अनेक गोष्टीवरून जन्मवेळ ठरवीत असत. एक गोष्ट खरी की जन्मवेळ ही मिनिटांच्या हिशोबात अचूक सांगणे जवळजवळ अशक्य आहे. अचूक जन्मवेळेवर कुंडलीचा अचूकपणा अवलंबून असतो. अचूक कुंडलीवर भविष्यकथनाचा अचूकपणा अवलंबून असतो. त्यामुळे भाकीत खरे ठरले नाही तर जन्मवेळ चुकीची असेल हे निमित्त लगेच पुढे केले जाते व ते पटण्यासारखेही असते. आपण जेव्हा किती वाजले हा प्रश्न विचारतो तेव्हा "३ वाजून ५८ मिनिटे ५० सेकंद " असे काटेकोर उत्तर अपेक्षित नसते, तर "चार वाजले " असे उत्तर पुरेसे असते. डिजीटल घडयाळात ३.५९ नंतर ४.०० हा आकडा येतो. तिनाच्या ऐवजी चाराचा आकडा तिथे दिसू लागतो. प्रत्यक्षात एक मिनिटच उलटलेलं असतं पण तासाचा आकडा एकाने वाढतो. हे जसे घड्याळाच्या बाबतीत होते तसेच कुंडलीतही एखादे वेळी होते. अशा "बॉर्डर "वरची जन्मवेळ असेल तर ५-१० मिनिटांच्या अंतराने प्रथमस्थानातील राशीचा आकडा बदलू शकतो. पण ज्योतिषी लोक मात्र असा समज करून देतात की तेवढ्या थोडयाशा फरकामुळे कुंडलीत काहीतरी मोठी उलथापालथ होते. सामान्यत: भविष्यकथनासाठी ज्योतिषीलोक ठोकळा कुंडली वापरतात. दहा-पंधरा मिनिटांच्या फरकामुळे कुंडलीतला जो घटक बदलणार असतो तो घटक या ठोकळा कुंडलीत टिपलेला नसतोच. आणि जरी सूक्ष्म कुंडली वापरली तरी सर्वसाधारण भविष्यकथनासाठी ज्योतिषी तो घटक विचारात घेत नाहीतच. एकंदरीत काय तर जन्मवेळेच्या अचूकपणावर भविष्य फारसे अवलंबून नसते.

१३) जुळ्या मुलांच्या कुंडल्यात फरक का असतो ?
सर्वसाधारणपणे जुळ्या मुलांच्या जन्मवेळेमध्ये १५-२० मिनिटांचे अंतर असते. काही केसेस मध्ये ते काही तासांपर्यंत जाते. १५-२० मिनिटांच्या फरकामुळे ठोकळाकुंडलीतल्या ग्रहांची स्थाने व राशींचे आकडे यात सहसा काही फरक पडत नाही. वर सांगितल्या प्रमाणे बॉर्डर वेळेचा जन्म असेल तर उपरोक्त उदाहरणात जसे तीनचे चार झाले तसा प्रथम स्थानातल्या राशीच्या आकड्यात एका आकड्याचा फरक पडू शकतो, आणि त्याचबरोबर नक्षत्रही बदलू शकते. या बाबत प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व ज्योतिषसमर्थक कै. डॉ.भा.नि. पुरंदरे यांनी एक किस्सा पुण्यातील ज्योतिष संमेलनात सांगितला होता. तो असा:- त्यांच्या कडे प्रसूती साठी आलेल्या एका केसमध्ये पंधरावीस मिनिटांच्या अंतराने जुळ्या मुली जन्माला आल्या. त्या एकाच वारेवरच्या होत्या. परंतु एक काळसर होती व एक उजळ होती. त्यांनी जेव्हा मुलींच्या पत्रिका केल्या तेव्हा त्यांना असे आढळून आले की त्या पंधरावीस मिनीटांमध्ये एकीचे जन्म-नक्षत्र बदलले होते. त्या मुळे एक मुलगी सावळी व एक उजळ असा त्यांच्या वर्णात फरक पडला असे त्यांचे म्हणणे होते.
त्यांच्या विधानाचा अर्थ असा होतो की दोन्ही मुली या एकाच फलित गर्भपेशीचे विभाजन होउन झालेल्या जुळ्या मुली ( युनिओव्ह्यूलर ) होत्या कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या एका वारेवरच्या होत्या. परंतु, तरीही त्यांच्या वर्णात फरक पडला तो केवळ १५ मिनिटात एकीचे नक्षत्र बदलल्यामुळे पडला. आम्हाला त्यांच्या या विधानाच्या सत्यतेबद्दलच शंका वाटते. ती शंका अशी:- असा वर्णातला फरक फक्त माता-पित्यांच्या जनुकांच्या जोडणीत होणाऱ्या फरकामुळे पडू शकतो असे जनुक-शास्त्र सांगते. युनिओव्ह्यूलर केस मध्ये असा फरक पडणे शक्य नाही. कारण तशा केसमध्ये जनुकांच्या जोडणीत फरक पडलेला नसतो. पण जर डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे केवळ नक्षत्र-बदलामुळे हा फरक पडला असेल तर ती गोष्ट या शास्त्रात मूलभूत क्रांति घडवणारी ठरेल. ती केस वास्तविक एखाद्या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध होण्याच्या योग्यतेचीच ठरेल. ती काही एखाद्या ज्योतिष-संमेलनात सांगून सोडून देण्यासारखी किरकोळ गोष्ट नव्हे!
आता प्रश्न असा आहे की हे त्यांचे संशोधन एखाद्या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध होउन त्याला मान्यता मिळाली आहे का ? एवढया मोठया तज्ज्ञ डॉक्टराने सांगितले ते खरे असलेच पाहिजे असे सामान्य माणूस मानणारच. दुसऱ्या तज्ज्ञांची मते या बाबतीत काय आहेत हे पहाण्याच्या भानगडीत तो पडत नाही. यावरून एवढे मात्र दिसते की जेव्हा एखादा मोठा डॉक्टर स्वत:च ज्योतिषी बनतो तेव्हा तो त्या शास्त्राच्या समर्थनासाठी दिशाभूल करणारी विधाने करू शकतो. पुढे २४ व्या प्रश्नाच्या उत्तरात आम्ही हेच दाखवून दिले आहे.
या ठिकाणी हस्तरेषातज्ज्ञ पुढे येतात. ते म्हणतात, ''जुळया मुलांची कुंडली एकवेळ सारखी असेल पण हस्तरेषा मात्र वेगळया असतात. अहो, हा निसर्गाचा आरसा आहे! तुमची जन्मवेळ चुकू शकते. पण हा आरसा काही बदलत नाही. तुम्ही आमच्याकडे या.``

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) २] काही सामान्य शंका

http://mr.upakram.org/node/777 हे नवीन वाचकांनी प्रथम वाचावे. आता भाग १ मधिल "काही सामान्य शंका "पुढील प्रकरण. फलज्योतिष हा विषय हा तसा अघळपघळ आहे. काही मुद्द्यांची पुनरावृत्ती आढळल्यास ती काही वाचकांची सोय आहे असे मी मानतो. विशेष करुन ज्यांना अनुक्रमे वा शिस्तबद्ध पद्धतीने वाचन करता येणे शक्य नाही त्यांच्या साठी. प्रश्न् विचारण्याची उस्फुर्तता मात्र दाबून ठेवु नये.

१४) साडेसाती काय प्रकार आहे?
शनीने पिडलेली साडेसात वर्षे म्हणजे साडेसाती. ही साडेसात वर्षे तीन अडीचक्यांमध्ये विभागलेली असतात. आयुष्यातला बॅड पॅच या अर्थानेही साडेसाती शब्द वापरला जातो. कोणत्याही काळी बारा पैकी कोणत्या ना कोणत्या तरी तीन सलग राशींना एकाच वेळी साडेसाती चालू असतेच. याचा अर्थ, शंभरातल्या २५ जणांना साडेसाती चालूच असते. एकेका राशीत अडीच वर्षे राहात शनी ३० वर्षात बारा राशीतून प्रवास करतो. माणसाच्या जन्म-वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्याची रास मानतात. समजा एखाद्याची वृषभ रास असेल तर शनी जेव्हा त्या राशीच्या 'अलिकडे` म्हणजे मेष राशीत येतो तेव्हा त्याला साडेसातीची पहिली अडीचकी चालू होते. जेव्हा शनी प्रत्यक्ष 'त्या` म्हणजे वृषभ राशीत प्रवेश करतो तेव्हा मधली अडीचकी चालू होते व जेव्हा तो 'पलिकडे` म्हणजे मिथुन राशीत प्रवेश करतो तेव्हा शेवटची अडीचकी चालू होते. अशी ही साडेसाती.
साडेसातीच्या काळात माणसाच्या प्रयत्नांना यश येत नाही, त्याची व्यावहारिक गणितं चुकतात, त्याला दुर्बुद्धी सुचते, त्याच्यावर संकटं कोसळतात अशी समजूत आहे. खरंतर अशा गोष्टी आपल्या आयुष्यात इतर वेळीही होत असतात. पण साडेसातीच्या काळात घडल्या तर त्यांचा संबंध लगेच शनीशी जोडला जातो. या काळात शनीची अवकृपा होउ नये म्हणून शनिवारी, अमावस्येला शनीला तेल वहाणे, रूईची माळ वहाणे, शनीमहात्म्य वाचणे इ. गोष्टी पीडाशामक म्हणून ज्योतिषी सुचवतात अन् माणूस त्या गोष्टी करतो. समजा शनीने जाहीर केले की, बाबांनो मी काही तुम्हाला त्रास देणार नाही, तर मग कोण कशाला करील या गोष्टी ? म्हणजे या सर्व गोष्टी शनीच्या भीतीपोटी केल्या जातात, भक्तीपोटी नव्हे. साडेसाती बाबत विष्णुशास्त्री चिपळूणकर आपल्या १८७५ साली प्रसिध्द झालेल्या निबंधमालेतील 'लोकभ्रम` या निबंधात म्हणतात, '' येथे कोणाच्या राशीवर शनिमहाराजांची स्वारी वळली की, त्याच्या प्रीत्यर्थ लोहदान, तिलदान वगैरे हजारो धर्मकृत्ये केली तरी त्यांचा रोष कमी होत नाही; पण तीच स्वारी इंग्लंडातल्या वगैरे मनुष्यांच्या बिलकुल वाटेस न जाता खुशाल आपल्या वाटेने चालती होते. तेव्हा या त्यांच्या पंक्तीप्रपंचाचे काय बरे चीज असावे.? ज्या अत्युग्र ग्रहाने प्रत्यक्ष शंकरावरही दोन तीन घटिका प्रभाव गाजवला, ज्याची दृष्टि लंकापतीच्या सिंहासनावर सारखी लागली असता लवकरच चौदा चौकडयांचे राज्य फडशा होऊन गेलेे, त्याचेच सामर्थ्य य:कश्चित परदीपस्थ मनुष्यांवर चालू नये हे केवढे आश्चर्य! ``
ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे आपण उपाय करतोय् ना, मग आता आपल्याल त्रास होणार नाही, या स्वयंसूचनेनेच माणसाला बळ येते. त्याचा उपयोग संकटांशी सामना करण्यासाठी होतो. "आपल्या अपयशाला आपण जबाबदार नसून ग्रहस्थितीमुळे तसे घडतंय्, देवादिकांना सुद्धा जिथं साडेसाती चुकली नाही तिथं तुमची आमची काय कथा?" हा विचार माणसाला धीर देतो.

१५) कालसर्पयोग म्हणजे काय?
कुंडलीत राहू व केतू हे नेहमी समोरासमोर असतात व त्यांच्यामध्ये ६ घरांचे म्हणजेच ६ स्थानांचे अंतर असते. या ६ घरात बाकीचे सर्व ग्रह आलेले असले म्हणजे कालसर्पयोग होतो. पैसे मिळवण्यासाठी ज्योतिषी लोक ज्या अनेक युक्त्या करतात त्यापैकीच ही एक युक्ती आहे. तुमच्या कुटुंबावर कुणाचा तरी शाप आहे असे हा कालसर्पयोग सांगतो असे ज्योतिषी सांगतात व भीती निर्माण करतात. शुभग्रह कालसर्पऱ्योगाच्या विळख्यात सापडले की त्यांची शुभ फले द्यायची ताकद कमी होते त्यामुळे कुंडलीत गुरु, शुक्र बलवान असले तरी त्यांची शुभ फले मिळत नाहीत. या सापाने आपल्या विळख्यात माणसाला आवळून धरले आहे तो त्याला चावतही नाही व सोडतही नाही. असा योग जर कुंडलीत असला तर काही तरी अनिष्ट गोष्टी घडतात. वेड, अपमृत्यू, कर्जबाजारीपणा, अशांतता, भांडणे, वास्तुबाधा, पिशाच्चबाधा, संतती न होणे, झालीच तर त्यापासून मन:स्ताप होणे अशी ही लांबलचक यादी आहे. काही ज्योतिष्यांनी आपला धंदा तेजीत आणण्यासाठी केलेला हा लुच्चेगिरीचा प्रचार आहे.
या विषयी प्रसिद्ध ज्योतिषी व.दा. भट म्हणतात की हा योग इतका महत्वाचा असता तर त्याचा उल्लेख जुन्या ग्रंथात मिळाला असता. हा योग ५०-६० वर्षापूर्वी कुणासही ठाऊक नव्हता हे आता कुणास खरेही वाटणार नाही. ज्योतिष जगतात याचा उगम प्रसिद्ध ज्योतिषी अजन्ता जैन व इंदुमती पंडित यांच्या वृत्तपत्रीय लेखनात १९५४ मध्ये झाला. तेथे वाचकांना आकर्षित करण्यासाठी तंत्र वापरावे लागते. त्यांच्या लेखनाने असा योग असतो असा साक्षात्कार झालेले सामान्य ज्योतिषी गि-हाईकावर छाप पाडण्यासाठी याचा वापर करू लागले. शिवाय कालसर्प या भीतिदायक शब्दाचीही दहशत माणसाला वाटते. कितीतरी कर्तृत्ववान व्यक्तींच्या कुंडलीत हा योग आहे. पंडीत नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कुंडल्यांतही हा योग होता.

१६) नारायण नागबली विधी काय आहे? तो कशासाठी करतात?
आपण वर कालसर्पयोग हा काय आहे व त्याची फळे कशी घाबरवून टाकतात हे बघितलं? साहजिकच मग आता यावर परिहारक उपाय, तोडगा काय? असा प्रश्न असणारच. कालसर्प योगाचे निवारण करण्यासाठी नारायण नागबली विधी सांगितला जातो. सर्पशाप, नागपूजा वगैरे गोष्टींंचा कालसर्पयोगाशी बादरायण संबंध लावून परिहार म्हणून असे विधी सांगितले जातात. हिंदू धर्मात नाग, साप यांचा देवादिकांशी संबंध असल्याने त्यांना फार धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. हल्लीच्या काळात प्रत्येक क्षेत्रात जशा अनिष्ट प्रथा येतात तशा त्या ज्योतिषशास्त्रातही आलेल्या आहेत. ज्योतिषी व तीर्थक्षेत्रातले भिक्षुकवर्ग यांचेही लागेबांधे वाढले आहेत. त्यांची 'कट प्रॅक्टिस` चालू झाली आहे. परिस्थितीने गांजलेला माणूस मनाने हळवा बनतो. ज्योतिषी सांगतो म्हणून नारायण-नागबली विधीसाठी दोनचार हजार रूपये खर्च करायलाही तयार होतो. एवढं सगळ केलंय् तर हेही करुन बघू असा तो विचार करतो. हा विधी त्रिंबकेश्वरला घाउक प्रमाणावर केला जातो.

१७) ग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते ?
ग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र म्हणते. शनीमहाराजांच्या नजरेचा लोकांना केवढा धाक असतो. शनी 'वक्री` असतांना, म्हणजे मागेमागे उलटा चालत असतांना जर का त्याची नजर तुमच्या कुंडलीतल्या एखाद्या मोक्याच्या स्थानावर पडली तर मग काही खरे नाही! 'बुरी नजरवालेे तेरा मुॅंह काला` अशी दूषणं देण्याचीही सोय नाही कारण एक तर तो स्वत:च काळा आहे आणि दुसरं म्हणजे त्याची दहशत. या शनीला सात नजरा असतात, त्यातल्या तीन पूर्ण शक्तीच्या, दोन अर्ध्या शक्तीच्या आणि दोन पाव शक्तीच्या असतात म्हणे. इतक्या सगळ्या नजरांसाठी त्याला डोळे किती आहेत ते कुणालाच ठाऊक नाहीे, पण डोळे असल्याखेरीज का दृष्ट्या असणे शक्य आहे? खरी मौज तर पुढेच आहे:- राहू आणि केतू हे काही खरोखरीचे ग्रह नव्हेत. ते म्हणजे चंद्राच्या वर्तुळाकार रस्त्यावर रोवलेले दोन काल्पनिक खुंट आहेत. ग्रहणाच्या वेळी चंद्र यापैकी कोणत्या तरी एका खुंटापाशी आलेला असतो. या काल्पनिक खुंटांना सुद्धा डोळे आणि नजरा आहेत म्हणे. राहूला सर्वात जास्त म्हणजे आठ नजरा आहेत तर केतूला फक्त एकच नजर आहे! गुरु व मंगळ यांना प्रत्येकी सात नजरा, बुध शुक्र, चंद्र आणि सूर्य यांना प्रत्येकी एकेक नजर असते. बिचारा सूर्य! सगळ्या ग्रहांचा राजा, पण त्याला नजर फक्त एकच! आपल्या पूर्वजांनी लावलेले हे अजब 'शोध` आहेत. आणि विचित्र सत्य हे आहे की या अजब शोधांच्या पायावरच ग्रहांच्या दृष्टीचा सिद्धांत उभा आहे.

१८) ग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे?
दशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे प्रकरण आहे. कारण, फलज्योतिष हे ग्रहांशी संबंधित शास्त्र आहे असा ज्योतिष्यांचा दावा असतो पण या प्रकरणाचा आकाशातल्या सद्यस्थित ग्रहांशी काहीही संबंध नसतो ! ग्रहांची नावे फक्त या पद्धतीत वापरतात.
प्रत्येक ग्रह ( म्हणजे खरे तर त्याचे नाव ) काही ठराविक मुदतीत तुमच्या आयुष्यावर आपला प्रभाव गाजवतो. उदाहरणार्थ, माणसाचे आयुष्य १२० वर्षे आहे असे गृहीत धरून जी दशा पद्धती मानली आहे तिला विशोत्तरी दशापद्धती म्हणतात. त्यामध्ये शुक्राचा प्रभाव २० वर्षे असतो. त्याला शुक्राची दशा असे म्हणायचे. शुक्राप्रमाणे बाकीच्या सर्व ग्रहांच्यासुद्धा दशा असतात व त्यात पुन: अंतर्दशा असतात. या दशेचे एका विशिष्ट पद्धतीने ९ भाग पाडायचे. त्या भागांवर ९ ग्रहांचे आधिपत्य क्रमा-क्रमाने असते असे मानायचे. त्या भागांना त्या-त्या ग्रहाच्या अंतर्दशा असे नाव आहे. अष्टोत्तरी महादशेत १०८ वर्षे आयुष्य मानून याच प्रकारात दशा अंतर्दशा विभागल्या आहेत. यात केतूला वगळले आहे. कुठल्या ग्रहाला किती वर्षे याचे वाटप लॉटरी पद्धती सारखे आहे. जन्मत: कुठल्या ग्रहाची दशा आहे हे केवळ जन्मनक्षत्रावरुन ठरविले जाते. उदा. रोहिणी, हस्त वा श्रवण नक्षत्रावरचा जन्म असेल तर त्याला जन्मत: चंद्र महादशा चालू होते. आणखी जवळ जवळ ४० प्रकारच्या दशा फलज्योतिषात आहेत.
विशोत्तरी महादशा:- चंद्र १० वर्षे, मंगळ ७ वर्षे, राहू १८ वर्षे, गुरु १६ वर्षे, शनी १९ वर्षे, बुध १७ वर्षे, केतू ७ वर्षे, शुक्र २० वर्षे, रवि ६ वर्षे - एकूण १२० वर्षे
अष्टोत्तरी महादशा :- चंद्र १५ वर्षे, मंगळ ८ वर्षे, बुध १७ वर्षे, शनी १० वर्षे, गुरु १९ वर्षे, राहू १२ वर्षे, केतू - शुक्र २१ वर्षे, रवि ६ वर्षे - एकूण १०८ वर्षे

१९) ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो हे खरे आहे काय?
सूर्य व चंद्र हेही ग्रहच आहेत असे हे शास्त्र मानते. या दोन ग्रहांचे भौतिक परिणाम सर्व सृष्टीवर होतात. बाकीच्या ग्रहांचे भौतिक परिणाम होत असल्याचे आढळलेले नाही. राहू व केतू हे काल्पनिक बिंदू असल्याने त्यांचे भौतिक परिणाम अशक्य आहेत. भौतिक परिणाम हे सामूहिक स्वरूपाचे असतात.
ग्रहांचे ज्योतिषीय स्वरूपाचे परिणाम मानवी जीवनावर होतात असे निश्चितपणे दाखवणारा पुरावा आजवर तरी मिळालेला नाही. गॉकेलिनचा गाजलेला मार्स इफेक्ट वादग्रस्त पुरावा आहे. त्या पुराव्यात सिलेक्शन बायेस हा दोष आहे असे कार्ल कोप्पेनशार नावाच्या एका शास्त्रज्ञाने दाखवून दिले आहे. ( यूरो स्केप्टिक-९१ या नियतकालिकात त्याचा लेख आला आहे )
या संदर्भात एका मुद्याचे विवेचन करणे आवश्यक आहे. गेली पन्नास-साठ वर्षे ज्योतिषाचे विरोधक आणि समर्थक यांच्यात वादाची जी रणधुमाळी चालली होती तिचा केंद्रंबिंदू हा होता की माणसावर ग्रहताऱ्यांचे परिणाम होत असणे शक्य आहे की नाही. 'ग्रह व तारे पृथ्वीपासून प्रचंड अंतरावर असल्यामुळे त्यांचे परिणामकारक असे प्रभाव माणसावर पडणे शक्य नाही`, अशी भूमिका विरोधकांची होती, आणि 'तसे प्रभाव पडणे शक्य आहे- नव्हे ते पडतातच` , अशी भूमिका समर्थकांची होती. त्यांच्या भूमिकेच्या समर्थनासाठी विद्युत्चुंबकीय प्रारणे म्हणजे ऊर्जालहरी, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय आकर्षण, भरती-आहोटी, सजीव सृष्टीवर होणारे सूर्य-चंद्राचे परिणाम इत्यादि प्राकृतिक तत्वांचा उपयोग तर त्यांनी केलाच आणि वर 'भौतिक शास्त्रांना अद्याप न उलगडलेली अशी कितीतरी तत्वे या विश्वात आहेत,` असे टोमणेही विज्ञान-मागध् लोकांना उद्देशून मारले, -जणू काही तसली काही तत्वे फलज्योतिषाच्या पाठीशी खरोखरच उभी आहेत! डॉ. मिशेल गॉकेलिन यांनी प्रचंड संशोधन करून असे दाखवून दिले होते की अगदी सूक्ष्म प्रमाणात का होईना पण ग्रहांचा माणसावर परिणाम होतो. ते संशोधन त्यांच्या मृत्यूनंतर वादग्रस्त ठरले तो भाग वेगळा, पण कित्येक वर्षे त्या संशोधनाने शास्त्रीय जगतात धमाल उडवून दिली होती, आणि तिचा भरपूर फायदा ज्योतिष-समर्थकांना मिळाला यात शंका नाही. त्यांच्या काही युक्तिवादात थोडेफार तथ्यही होते त्यामुळे सर्वसामान्य माणसाला असे वाटू लागले की शास्त्रज्ञ मंडळींची टीका केवळ हटवादीपणाची असून ज्योतिष-समर्थकांची बाजूच बरोबर आहे.
ग्रह-नक्षत्रादिचे मानवी जीवनावर परिणाम होत असावे कि नाही हा बुद्धिमंतांना दीर्घकाळ पुरणारा विषय आहे.

२०) काही ज्योतिषी आयुष्यातील काही घटना अचूक सांगतात ते कसे?
तुम्हाला स्वत:ला असा काही अनुभव आला आहे का ? की ऐकीव गोष्टींवरून तुम्ही हा प्रश्न विचारीत आहात ?
ज्यांना असे मन:पूर्वक वाटते की या शास्त्रात काहीतरी तथ्य असलेच पाहिजे, त्यांनी पुढील चाचणी करून पहावीे :- तुमच्या आयुष्यात आजपर्यंत घडून गेलेल्या सर्व घटना तुमच्या जन्मवेळी भविष्य काळातल्या घटना होत्या हे तर खरे ना ? त्या वेळी तुमच्या जन्मकुंडलीवरून एखाद्या जाणकार ज्योतिषाला त्या अचूक वर्तवता आल्या असत्या अशी तुमची श्रद्धा आहे ना ? मग त्याच जन्मकुंडलीवरून त्या घटना आजही ओळखता आल्या पाहिजेत. जर कुणा जाणकार ज्योतिषाने त्या बरोबर ओळखून दाखवल्या तर हे शास्त्र खरे आहे हे तात्काळ सिद्ध होईल की नाही ? म्हणून असे करा की, तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेल्या ३-४ नि:संदिग्ध टळक घटना आठवून त्या घटना कोणत्या वर्षी घडल्या ते टिपून ठेवा. एखाद्या जाणकार ज्योतिषाला तुमची जन्मकुंडली द्या व त्याला फक्त त्या घटनांचे स्वरूप सांगा ( त्यायोगे त्याचे निम्मे काम सोपे होईल.) त्या घटना निदान कोणत्या वर्षी घडल्या हे तरी त्याला सांगता येते का पहा. किंवा असे करा की, त्याला घटनांची वर्षे सांगून त्यांवरून घटनांचे स्वरूप ओळखता येते का ते पहा. आमचा अनुभव असा आहे की भले-भले ज्योतिषी अशी चाचणी द्यायला तयार होत नाहीत. काही ज्योतिषी अशी प्रौढी मारतात की त्यांना मृत्यूचे भाकीत अचूक वर्तवता येते. अशा ज्योतिषाला गेल्या दोनतीन वर्षात दिवंगत झालेल्या एखाद्या व्यक्तीची कुंडली देऊन त्या व्यक्तीच्या मृत्यूचे वर्ष ओळखायला सांगा. अशी चाचणी द्यायला कुणीही ज्योतिषी तयार होणार नाही. यावरून, या शास्त्रात खरोखर काही तथ्य नाही हेच सिद्ध होत नाही का ?

२१) हिरोशिमा वा नागासाकी शहरात अणुबॉम्ब पडला त्या वेळी लाखो लोक मेले, विमान अपघात, रेल्वे दुर्घटना वा भूकंप या सारख्या घटनांमध्ये शेकडो लोक मरतात मग त्या सर्वांच्या कुंडल्यात काय एकाच वेळी मृत्यूयोग होता असे म्हणायचे का?
असा प्रश्न आपल्या मनात येणे हे शोधक वा चिकित्सक वृत्तीचे लक्षण आहे. पण ज्योतिषांना हा प्रश्न जेव्हा आपण विचारतो तेव्हा ते म्हणतात, ''अशा पन्नास कुंडल्या तरी आमच्या समोर आणा मग आम्ही त्यातले मृत्यूयोग दाखवू.`` हे प्रतिपादन वरकरणी रोखठोक वाटले तरी ते व्यवहार्य नाही हे कुणाही सूज्ञास समजेल. एकाच वेळी सर्वांच्या कुंडल्यात मृत्यूयोग असणे ही बाब कॉमनसेन्सला पटत नाही. मग ज्योतिषी 'सर्व प्रवाशांची जबाबदारी ही वैमानिकावर नसते का? त्याला जर काही झाले तर सर्वांचा जीव धोक्यात नाही का?` असला बालिश युक्तिवाद करतात. मग भूकंपाबाबत काय? तिथ मेदिनिय ज्योतिष उपयोगाला येते. मेदिनीय ज्योतिषात त्या प्रांताला पत्रिका असल्या मुळे व ती व्यक्तिंच्या पत्रिकेपेक्षा प्रभावी असणार. त्यात जर दुर्घटना असेल तर साहजिकच अनेकांना त्याचा फटका बसणार. काही ज्योतिषांच्या मते प्राक्तन हे जर आम्हाला सर्व कळालं असतं तर आम्ही ब्रम्हदेव झालो नसतो का? शेवटी प्राक्तन कुणाला टळलं आहे का? श्रद्धाळू माणसांना हे युक्तिवाद बिनतोड वाटतात. हजारो मरताना एखादा जगला तर ते प्राक्तन व हजारो जगताना एखादा मेला तर तेही प्राक्तनच. खरंतर वैज्ञानिक दृष्टिकोणात हीच बाब प्रोबॅबिलीटीच्या भाषेत सांगितली आहे. हजारो मरताना एखादा जगण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच हजारो जगताना एखादा मरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्योतिषाला आधुनिक विज्ञानाचा आधार शोधणारी माणसे सुद्धा अशा वेळी अध्यात्माचा आधार घेतात.

२२) ज्योतिषांवर दुटप्पी पणाचा आरोप केला जातो. ज्योतिषी लोक खरोखरीच दुटप्पी आहेत का?

हा दुटप्पीपणा खरं तर फलज्योतिष या विषयातील अंतर्विसंगतीतून तसेच त्याविषयीच्या अतिरेकी अभिमानातून निर्माण होतो. मुद्यांचा प्रतिवाद करताना आपल्याला अनुकूल असे संदर्भ वा मुद्दे ज्योतिषी घेतात आणि प्रत्यक्ष जनसंपर्कात मात्र वेगळेच युक्तिवाद वापरतात. या विषयाबाबत ज्योतिषांच्यात अनेक अंतर्गत मतप्रवाह आहेत. काही ज्योतिषी सतत दुटप्पी किंवा दुहेरी विधाने करीत असतात. खोटयाचे खरे व खऱ्याचे खोटे करणे यात त्यांचा स्वार्थ साधला जात असतो. त्यामुळे त्यांना पळवाट पण मिळते. उदाहरणे देउन हे स्पष्ट करतो :-
ग्रह व तारे हे माणसाच्या जीवनावर परिणाम करतात, म्हणजेच त्यांच्या अंगी कारकत्व असते असे ते एकीकडे सांगतात, तर दुसरीकडे सांगतात की ग्रह व तारे हे फक्त भविष्याची सूचना देतात, त्यांच्या अंगी कारकत्व नसते.
एकीकडे ते प्रौढीने सांगत असतात की ज्योतिष हे सर्वात जुने व परिपूर्ण शास्त्र आहे. तर दुसरीकडे सांगत असतात की हे शास्त्र अद्याप अपरिपूर्ण आहे, त्यात संशोघन करण्याची गरज आहे. पण काय करणार, आमच्याकडे साधनसंपत्तीची वाण आहे!
राशी-भविष्याशिवाय वृत्तपत्रांचे व मासिकांचे पानही हालत नाही. शेकडो ज्योतिष्यांचे ते एक निर्वाहाचे साधन असते. लोक त्यामुळे फलज्योतिषाकडे आकृष्ट होतात. हे चित्र एकीकडे दिसते तर दुसरीकडे ज्योतिष-प्रवक्ते राशी-भविष्ये ही ढोबळमानाने लिहिलेली असतात ते खरे फलज्योतिष नव्हेच असे आवर्जून सांंगतांना दिसतात.
एकीकडे ते सांगत असतात की कुंडली जिवंत व्यक्तीची आहे की मृत व्यक्तीची आहे, तसेच ती कुंडली स्त्रीची की पुरुषाची आहे ते आम्ही सांगू शकत नाही. दुसरीकडे प्रौढीने सांगत असतात की जातक स्त्री का पुरुष ते आम्ही अचूक ओळखू शकतो. मृत्यूचे भाकीतही आम्ही वर्तवू शकतो.
एकीकडे ते सांगत असतात की आम्ही फक्त भविष्यकाल अनुकूल आहे की प्रतिकूल आहे ते वर्तवू शकतो. अचूक भविष्य फक्त ब्रम्हदेवालाच माहीत असते. दुसरीकडे हेच ज्योतिषी आपली किती भाकिते अचूक लक्ष्यवेधी ठरली त्याची यादी देत असतात.
ज्योतिषशास्त्र हे भौतिक शास्त्रापलीकडचे म्हणजेच विज्ञानापलीकडचे असे स्वतंत्र व निराळेच शास्त्र आहे असे एकीकडे सांगणारे ज्योतिषीच फलज्योतिषाने गृहीत धरलेल्या ग्रह-प्रभावांचे समर्थन करण्यासाठी अल्फा-बीटा-गॅमा किरण या तद्दन भौतिक शास्त्रीय संकल्पनांचीच चर्चा करतात.
एकीकडे प्रारब्ध अटळ आहे असे म्हणतात तर दुसरी कडे जपजाप्य, शांती, दान, खडा, मंत्रतंत्र, पूजा, उपासना इ. उपायांनी अनिष्ट भाग काही अंशी का होईना पण टाळता येतो असेही म्हणतात.

२३) ग्रहांना दैवी शक्तीची प्रतीके मानून त्यांना मानवी गुणधर्म माणसाने चिकटवले आहेत. डोळयांना न दिसणाऱ्या परमेश्वराचे प्रतीक हवे म्हणून माणूस मूर्तीची स्थापना करतो व तिची आराधना करतो. तसेच ग्रहांच्या बाबतीत केले तर काय बिघडले ?
आम्ही पण हेच म्हणतो. ग्रहांना मानवी गुणधर्म माणसाने चिकटवले आहेत पण वास्तविक ते त्यांच्या अंगी नाहीत. पण हे शास्त्र असे मानते की असे गुणधर्म ग्रहांच्या अंगी प्रत्यक्ष आहेत.या शास्त्राची श्रद्धा अशी आहे की ग्रहांना बुद्धी असते. हे कशावरून ते कळण्यासाठी या शास्त्रातली ग्रहांची वर्णने वाचावीत. ब्राम्हण-क्षत्रिय वगैरे वर्णभेद, स्त्री-पुरुष-नपुंसक हे लिंगभेद, स्वभावभेद, आवडीनावडी, आपसातील सख्य व वैमनस्य, असे सगळे मानवी गुण या ग्रहांना असतात असे या शास्त्रात सांगितले आहे. त्या स्वभावानुसार ते जातकांना फळ देतात. ग्रहांना बुद्धी असते ही श्रद्धाच इथे उघड दिसते. बहुसंख्य श्रद्धाळू लोक ग्रहांची शांती, ग्रहजप, ग्रहमख, या गोष्टी मनापासून करतात, शिंगणापूरच्या शनीचा चमत्कार चवीने सांगतात, शनीमहात्म्य भक्तिभावाने वाचतात, ते लोक अशा श्रद्धेशिवायच का या सर्व गोष्टी करतात ? म्हणजे ग्रहांना केवळ बुद्धी नाही तर ते भक्तवत्सल व करूणाघनही आहेत. जपामुळे, होमहवनामुळे ते शांत होतात. शनि आपल्या भक्तांना कमी त्रास देतो. होय! कमी त्रास देणे ही त्याची कृपाच आहे. पुराणातील ग्रहांच्या कथा तुम्ही ऐकल्यात तर एकसे बढकर एक अशा आहेत.
या संदर्भात एक ज्योतिषालंकार अशी मखलाशी करतात की, ग्रह हे पदार्थ आहेत आणि जसे निसर्गात प्रत्येक पदार्थाला गुणधर्म असतात तसेच ते ग्रहांनाही आहेत. पूर्वीचे लोक शास्त्रीय सत्ये लाक्षणिक किंवा अलंकारिक भाषेत सांगत असत, त्याला अनुसरून त्यांनी ग्रहांचे गुणधर्म अलंकारिक भाषेत ग्रंथात लिहून ठेवले आहेत, परंतु हे सर्व पूर्वीच्या थोर प्रज्ञावान लोकांचे पदार्थविज्ञानच आहे. वाहव्वा! राहू-केतू हे काल्पनिक बिंदू पदार्थच आहेत म्हणून त्यांनाही गुणधर्म आहेत, बुध-शनी हे पदार्र्थ असले तरी नपुंसक आहेत, चंद्र हा पदार्थ स्त्री आहे, मंगळ शनीला शत्रू मानतो पण शनी मंगळाला शत्रू मानत नाही, तरीपण दोघेही पदार्थ आहेत! काय हे पूर्वीच्या ज्योतिर्विदांचे अचाट पदार्थविज्ञान!

२४) ग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय?
फायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना बुद्धी असते ही गोष्ट मान्य करावी लागेल. कारण ती असल्याशिवाय त्यांची शांती कशी होणार ? ग्रहांना मानवी भाव-भावना, राग-लोभ वगैरे असतात अशा श्रद्धा पूर्वीपासूनच लोक बाळगत आलेले आहेत. ग्रहांना देवताच मानत असत. अनिष्ट ग्रह बिघडलेले ( म्हणजे रागावलेले ) असले तर त्यांना शांत करण्यासाठी ग्रह-जप, दानधर्म, शांति-कर्मे यांची योजना पूर्वीपासून हे लोक करत आले आहेत. ग्रहांना माणसाप्रमाणे मन व बुद्धी आहे हे गृहीत धरूनच हे उपाय करण्यात येतात की नाही? नेमाने शनीमहात्म्य वाचल्याने, शनिवारी तेल व रुईची फुले शनीला वाहिल्याने शनी त्याची पीडा सौम्य करतो अशी श्रद्धा हे लोक ठेवतातच ना ? शनीला मन व बुद्धी असल्याशिवाय त्यांनी ही श्रद्धा ठेवली असती का ? वेदकाळापासून गायत्री मंत्र लोक कशासाठी जपत आले आहेत ? सूर्याने त्यांच्या बुद्धीचे प्रचोदन करावे म्हणूनच ना? सूर्याला बुद्धीच नसेल तर तो माणसांच्या बुद्धीला कशी प्रेरणा देईल ? म्हणून, परंपराभिमानी लोक जर प्रामाणिक असतील तर ग्रहांना बुद्धी असते हे विधान त्यांनी मान्य करायलाच हवे. हे विधान तुमच्या बुद्धीला पटते का ते प्रथम विचारा. श्रद्धाळू लोकांना असे वाटते की फायदा झाला तर शांती उपासना केल्याने झाला. जर फायदा-नुकसान काहीच झाले नाही तर 'नुकसान झाले नाही हा फायदाच म्हणायचा नाही का?` अशी समजूत करून घेतात. नुकसान झाले तर आपली श्रद्धा वा उपासना कमी पडली किंवा आपला कर्मभोग असे समजतात. एकूण काय तर फायदा-तोटयाची परिमाणे लोकांच्या श्रद्धाळूपणातच दडलेली असतात.

२५) ग्रहांचे खडे वापरल्याने अनिष्ट प्रभाव कमी करता येतात का?
ग्रहांच्या खड्यांना रत्ने असा गोंडस शब्द वापरतात. एखाद्याच्या पत्रिकेत एखादा ग्रह बलहीन असेल तर त्याचे रत्न वापरून त्याचे बल वाढवणे हा एक प्रकार किंवा सर्वात बलवान ग्रहाचे रत्न वापरून त्याच्या गुणात अधिक भर घालणे हा दुसरा प्रकार. अशा प्रकारचे तर्क लढवून या रत्नांची शिफारस केली जाते. चुकीच्या शिफारसीमुळे फायदा होण्याऐवजी तोटा पण होतो ही अजून एक भीती निर्माण केली जाते. कॉस्मिक रेडिएशन, ग्रहांपासून निर्माण होणारी व्हायब्रेशन्स,कलर स्त्रोत असे वैज्ञानिक मुलामा असणारे शब्द वापरून त्याला एक प्रतिष्ठा दिली जाते. त्यामुळे रत्नातून जणु काही रेडिओ ऎक्टीव्ह किरणे बाहेर पडत असतात असं काहीतरी चित्र सामान्य माणसाच्या मनात तयार होतं.
खरं तर तो मानसोपचाराचा एक प्रकार आहे. खडे वापरल्यामुळे अनिष्ट प्रभाव कमी झाले की नाही हे ठरवायचे कसे ? खडा वापरला नसता तर काय झाले असते असा प्रयोग करून पहाणे अशक्य आहे. खड्यांच्या परिणामांना विज्ञानाचा दिखाऊ मुलामा जो दिला जातो तो गैर आहे. कसे ते पहा. ही गोष्ट सर्वांना ठाऊक आहे की राहू हा एक मानीव बिंदू आहे. त्याच्यापासून कसलेही किरण निघणे अशक्य आहे. मग राहूचे दुष्परिणाम टाळण्यासाठी लसण्या खडा वापरण्याने त्यातून कोणते किरण तुमच्यावर पडणार किंवा कोणते किरण त्यात अडवून धरले जाणार ? अमुक रंगाच्या खड्यातून अमुक किरण परावर्तित होतात हे म्हणणे एकवेळ समजण्यासारखे आहे. पण ते अनिष्ट किरण त्या खड्यात अडवून कसे धरले जातात हे समजत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे खडयावर ग्रहांचे जे काही किरण पडतात ते फक्त ग्रह डोक्यावरच्या आकाशात असतांनाच पडतात, ग्रह मावळून पृथ्वीच्या खाली गेल्यावर त्याचे किरण इथे कसे पोचणार ? मग तशा वेळी खड्याचा काय उपयोग ? बरे, ग्रह डोक्यावरच्या आकाशात असतांना त्याचे किरण थेट आपल्यावर पडत असतातच ना? मग त्या वेळी त्या चिमुकल्या खड्यावर पडणारे किरण आणखी काय जास्त परिणाम करणार ? एकूण काय तर वैज्ञानिक कारणे दाखवून खडे वापरणे हे वेडगळपणचे आहे. हौस म्हणून खुशाल वापरावेत. खडे प्रकाश-किरण आकर्षित करतात ही कल्पना साफ खोटी आहे. खडे एवढेच काम करतात की पडलेले प्रकाश-किरण परावर्तित करतात. त्यांना पाडलेल्या पैलूमुळे प्रकाशाचे परावर्तन खूप चांगले होते, त्यामुळे ते चमकतात. पूर्ण अंधारात हिरासुद्धा चमकणार नाही हे लक्षात घ्यावे. रत्ने हा पूर्णपणे दागदागिने, सौंदर्यप्रसाधने या प्रांताचा भाग आहे. आणखी एक अशीच वैज्ञानिक मुलामा असलेली पण लुच्चेगिरीची मांडणी म्हणजे ''ग्रहांपासून निर्माण होणारी रेडिएशन्स ही नेहमीच ऋण भाराची असतात व रत्नांची जी शक्ती असते ती नेहमीच धन भाराची असते त्यामुळे ग्रहांपासून निघणारी व्हायब्रेशन्स रत्नांपर्यंत पोहोचताच 'न्यूट्रलाईज` होतात.`` सगळया थापा!
तुम्हाला बडोद्याच्या पटवर्धनांचा बोलका पत्थरविषयी माहिती असेल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याविरूद्ध जोरदार मोहीम उघडली होती. वीस पैशाचा अॅगेटचा खडा ते 'बोलका पत्थर` म्हणून वीस रूपयांना विकत. त्यांचा दावे असे असतात :-
" बोलका पत्थर हे अॅस्टॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिटयूटचे अनमोल संशोधन आहे. खडयातून दैवी किरण बाहेर पडतात त्यामुळे माणूस तणावमुक्त होतो. हे एक संरक्षण कवच असून अनिष्ट ग्रहांपासून तुमचे रक्षण करते. हा जन्मराशीवर आधारित असल्याने आयुष्यभर वापरता येतो. खड्याचे गुण न आल्यास पैसे परत. " त्यामुळे येथे फसवणूक होत नाही असे लोकांना वाटते. आता यात गोम अशी आहे की, गुण न आल्यास पैसे परत मागायचे ते खडा घेतल्यापासून ३० ते ४५ दिवसाच्या आत. पण हे कसे शक्य आहे ? कोर्टकचेरीतले काम, जुनाट रोग, परिक्षेचा निकाल, संतती-प्राप्ती या गोष्टीं काही ४०-४५ दिवसाच्या आत होत नाहीत. बरे, पैसे परत मागायचेच झाल्यास बडोद्याच्या ऑफीसला व्हीपी पाठवून पैसे परत घेण्याचा खर्च व्हायचा सात रुपये. " आता खडा घेतलाच आहे वापरून बघू काही दिवस " असे माणसाला वाटते. अशा अनेक कारणामुळे सहसा कुणी पैसे परत मागत नाहीत. पण हा काही खडा लाभल्याचा पुरावा नव्हे. खडयांच्या वापराला काही ज्योतिषांचाही विरोध होता. त्यांच्या मते असंख्य माणसे एकाच राशीची असतात सगळयांच्या अडचणीवर एकच उतारा कसा असेल? त्यामुळे राशीवरून खडा कोणचा वापरावा ते ठरवणे ही चुकीची व अत्यंत ढोबळ पद्धत आहे असे ते म्हणत. या खडे व्यापाऱ्यांची महत्वाची अट अशी की रत्ने वापरणाऱ्याची त्यावर श्रद्धा असायला पाहिजे नाही तर रत्नांचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला रत्नामुळे फायदा झाला नाही तर तुमची श्रद्धा कमी पडली असे समजून स्वस्थ बसावे ! रत्नांचा खरा फायदा कुणाला होत असेल तर तो रत्ने विकणाऱ्यांना होतो !

२६) प्रयत्नाने भविष्य बदलता येते का?
समजा मी प्रयत्न केला नसता तर माझ्या भविष्यात मी अमूकअमूक होणार होतो पण मी प्रयत्न केला म्हणून मी तमूकतमुक झालो हे तपासणार कसे? भविष्यात असणाऱ्या घटनेविषयी ज्योतिषांचे विविध मतप्रवाह आहेत. जहाल पंथ असा म्हणतो की प्रारब्ध अटळ आहे. यदृच्छेशिवाय झाडाचे पानही हलू शकत नाही. म्हणजे तुमच्या हातात काही नाही. जे काही घडणार आहे ते ठरलेले आहे तुम्ही निमित्तमात्र असता. दुसऱ्या प्रकारचे लोक असे म्हणतात की, प्रयत्नांशिवाय यश नाही हे खरेच आहे. तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही प्रारब्ध बदलू शकता. पण ते स्वातंत्र्य तुम्हाला किती? एखाद्या गायीच्या वासराला दोरखंडाने खांबाला बांधलेले असते. त्याला जेवढी दोरी लांब तेवढे त्याचे स्वातंत्र्य. त्या दोरीने निर्माण केलेला परीघ ही त्याची प्रयत्नांनी केलेल्या वर्तुळाची सीमारेषा. तुमच्या पूर्वसंचित व प्रारब्ध यानुसारच तुमच्या आयुष्यातल्या घटना घडत असतात. ग्रहांचे काम एवढेच आगामी घटनांची सूचना देणे. म्हणजे ग्रह हे फक्त सूचक वा निर्देशक आहेत. ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर म्हणतात, ''ज्योतिष हे फक्त तुमचा एक पंचमांश भाग नियंत्रित करतं. बाकी चारपंचमांश हे इतर गोष्टी प्रभाव टाकत असतात.`` म्हणजे प्रयत्न ही बाब या चार पंचमांश मध्ये मोडते. आपल्याला जिचा शोध घ्यायचाय् त्या बैठकीविषयी एवढे भिन्न मतप्रवाह आहेत. धूर्त ज्योतिषांची डायलॉगबाजी बघा. ते म्हणतात, ''दैवगतीच्या रुळावरुन प्रयत्नांचे स्टेअरिंग ( ? )हातात घेऊन आपल्या आयुष्याची गाडी जेव्हा मार्गक्रमण करत असते त्यावेळी ज्योतिष हे मार्गदर्शक बोर्डाप्रमाणे काम करतं.`` काही ज्योतिषी म्हणतात, ''तुम्हाला प्रयत्न करण्याची बुद्धी झाल्याशिवाय तुमच्याकडून कसे प्रयत्न होणार. आणि प्रयत्न केल्याशिवाय यश तरी कसे मिळणार? यासाठी तर ज्योतिषाचं मार्गदर्शन घ्यायचं.`` आता बोला!

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) प्रकरण ३] विवाह पत्रिका आणि ज्योतिष

http://mr.upakram.org/node/777 हे नवीन वाचकांनी प्रथम वाचावे. आता भाग १ मधिल "काही सामान्य शंका "पुढील प्रकरण. फलज्योतिष हा विषय हा तसा अघळपघळ आहे. काही मुद्द्यांची पुनरावृत्ती आढळल्यास ती काही वाचकांची सोय आहे असे मी मानतो. विशेष करुन ज्यांना अनुक्रमे वा शिस्तबद्ध पद्धतीने वाचन करता येणे शक्य नाही त्यांच्या साठी.

७) पत्रिकेचे गुणमेलन म्हणजे काय?
वधूवरांच्या पत्रिका या विवाहाच्या अनुषंगाने एकमेकींशी किती जुळतात हे पहाणे म्हणजे गुणमेलन. पत्रिका-गुणमेलन करताना वर्णगुणाला १, वैश्यगुणाला २, तारागुणाला ३, योनिगुणाला ४, ग्रहमैत्री गुणाला ५, गणगुणाला ६, राशीकूटगुणाला ७ आणि नाडीगुणाला ८ अशा चढत्या क्रमाने गुण दिलेले असून सर्व गुणांची बेरीज ३६ होते. हे सर्व गुण वधू-वरांच्या पत्रिकेत चंद्र कुठल्या नक्षत्रात कितव्या चरणात आहे यावर ठरलेले असते. त्यासाठी पंचांगात रेकनर सारखे कोष्टक असते. ते पाहून ३६ पैकी १८ पेक्षा अधिक गुण जमले तर विवाह जमवण्यास हरकत नाही असा निकष असतो. खरं तर या गुणमेलनात फक्त चंद्राचाच विचार होतो म्हणून ते परिपूर्ण किंवा ' शास्त्रीय ` नाही असे काही ज्योतिष्यांचंच म्हणणं आहे. एकंदरीत, परीक्षेसाठी असलेल्या अभ्यासक्रमात कुठल्या टॉपिकला किती गुण हे जसे दिलेले असते तसाच इथे प्रकार आहे. गुणमेलन ही संकल्पना वैवाहिक जीवनासाठी वधू-वर एकमेकास अनुरूप आहेत किंवा नाहीत हे ठरवण्यासाठी निर्माण झाली असावी. प्रेम, त्याग, सांमजस्य, या गोष्टी सुखी वैवाहिक जीवनास पोषक असतात. दोन भिन्न प्रकृतीची माणसं जर एकत्र आली तर वैवाहिक जीवनाचा समतोल ढासळतो. तसे होउ नये म्हणून त्यांच्या प्रकृतीचे मूल्यमापन पत्रिकेच्या माध्यमातून करून त्याचा निष्कर्ष सांगण्याचा प्रयत्न गुणमेलनाद्वारे केला गेला असावा.

२८) विवाह जुळवण्याचे वेळी पत्रिका बघावी का?
महात्मा फुल्यांनी गेल्या शतकात एक प्रश्न केला होता की 'आपल्याकडे पत्रिका पाहून लग्न करूनही बालविधवांचे प्रमाण जास्त का ? इंग्लंड, अमेरिकेत तर पत्रिका वगैरे न बघता विवाह करतात तरी तिकडे हे प्रमाण जास्त नाही.` याचे कारण साधे आहे. आपल्याकडे बालविवाहाची प्रथा व बालमृत्यूचं प्रमाणही जास्त असल्यामुळे साहजिकच बालविधवांचे प्रमाण जास्त होतं. पण त्याचा संबंध ज्योतिषाशी नाही. पत्रिका न पहाता लग्ने झाली असती तरी हेच प्रमाण राहिले असते. प्रश्न हा आहे की पत्रिका पाहून लग्न झालेल्या मुलींच्या नशिबी वैधव्य येत नाही असे दिसते का ?
कालानुरूप पत्रिका गुणमेलनाची चिकित्सा होत गेली व त्यातील निष्फळता सुजाण लोकांच्या ध्यानात येवू लागली. छत्तीस गुण जुळूनही मने न जुळल्याने अयशस्वी ठरलेल्या वैवाहिक जीवनाची उदाहरणे दिसू लागली. उलट, पत्रिका न जुळताही समाधानी वैवाहिक जीवन जगणारी माणसं दिसू लागली. या संदर्भात सुप्रसिद्ध लेखक डॉ अनिल अवचट एकदा म्हणाले, ''सुनंदाशी माझं लग्न होण्यापूर्वी घरच्या मंडळींनी पत्रिका जुळते का नाही हे परस्परच बघितलं. वडिलांना एका ज्योतिषाने सांगितलं कि मुलीची पत्रिका जुळत नाही, तुम्ही हे लग्न जुळवू नका, अरिष्ट आहे. परंतु घरच्यांचा विरोध पत्करून मी हे लग्न केलं. आता मला असं वाटतं की मी आयुष्यातला एकमेव महत्वाचा योग्य निर्णय घेतला होता.``
परंतु आजही समाजात उच्च शिक्षित वर्गातही पत्रिका जुळण्याचे फॅड गेलेले नाही. "त्या रावनं बघा पत्रिका न बघता लग्न केलं, प्रेमविवाह ना! बसलाय आता बोंबलत. बुद्धीवादी ना! " तो जाडया माहीतीये का? अरे त्याने रूपावर भाळून लग्न केलं, तरी आई सांगत होती चांगल्या ज्योतिषाला पत्रिका दाखव म्हणून ! पण नाही, अरे जवानी में तो गधी भी सुंदर दिखती है । आता म्हणतोय आईच ऐकलं असतं तर बरं झालं असतं. 'वालावालकरांच्या मुलाच्या लग्नाचे वेळी ज्योतिषाने सांगितलं होत कि हे लग्न ठरवू नका. कुटुंबातील व्यक्तिच्या जीवाला धोका आहे. वालावालकरांनी दुर्लक्ष केले व लग्न ठरवले. आणि काय सांगू लग्नाच्या ऐन मुहूर्तावर नवऱ्या मुलाचा सख्खा भाऊ अपघातात गेला. मी स्वत: डोळयांनी बघितलेली हकिगत आहे.` 'अहो मुलगी लग्नानंतर आपल्या बॉयफ्रेण्डबरोबर पळून गेली.` 'थोडक्यात वाचलो! ज्योतिषानं सांगितलं होतं मुलीचं कॅरॅक्टर बघा. नीट चौकशी केली तेव्हा कळलं की तिचं कॉलेजमधल्या मुलाबरोबर लफडं आहे म्हणूनं.` 'मुलगा दिसायला वागायला स्मार्ट उच्चशिक्षित, पण ज्योतिषानं सांगितले की मुलगा बाहेरख्याली वाटतो आणि तस्सच निघालं.` अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्या कानावर पडत असतात. ती खोटी असतात अशातला भाग नसतो.
अयशस्वी वैवाहिक जीवनाचं वाढलेलं प्रमाण, घटस्फोट इ. गोष्टी मनावर ताण निर्माण करतात. पत्रिका-मेलन मनाला आधार देतं. तो आधार तर्कबुद्धी किंवा विज्ञान देत नाही. पत्रिका-मेलन करूनही वैवाहिक जीवन अयशस्वी झालं तर ' आपण आपल्याकडून काळजी घेतली होती शेवटी नियतीची इच्छा! ` असं म्हणून मानसिक आधार मिळवला जातो. लग्नाच्या गाठी म्हणे स्वर्गात बांधल्या जातात. एक प्रथितयश ज्योतिषी श्री.श्री. भट हे आपल्या 'ज्योतिषाच्या गाभाऱ्यात` या पुस्तकात म्हणतात, '' विवाह पहाताना ठरविताना पत्रिका पाहणार नाही असा प्रचार केला जातो. तरुणांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये. वैवाहिक जोडीदार कोण असणार हे अटळ प्रारब्ध असते त्यात ज्योतिष हे निमित्त असते. `` तर दुसरे मान्यवर ज्योतिषी श्री. व.दा.भट म्हणतात, '' मी स्वत: ज्योतिषी असलो तरी एक गोष्ट प्रंाजलपणे कबूल केली पाहिजे की वधूवरांची कुंडली जुळते अगर जुळत नाही या बद्दल हमखास अनुभवास येतील असे, ज्यावर पूर्ण विसंबून रहावे असे कोणतेही नियम नाहीत. पत्रिका जुळते अगर जुळत नाही या शब्दांना वास्तविक अर्थ नाही.`` ( संदर्भ 'भाग्य` दिवाळी ९७ )
पत्रिका कुठल्या कारणासाठी बघितली जाते ते आपण पाहिले. पण पत्रिकेवरून वजन, उंची, छाती, शिक्षण, विचारश्रेणी, अर्थिक क्षमता, रक्तगट, आरोग्य इत्यादि गोष्टी अजिबात समजत नाहीत. त्यामुळे पत्रिका बघण्यात काही अर्थ नाही. मात्र विवाह जुळवण्याची पद्धत जरूर विचारात घ्यावी. कारण प्रेमविवाहांची संख्या जशी वाढलीय् तशी घटस्फोटांची संख्याही वाढलीय्. शारिरिक आकर्षणातून निर्माण झालेलं प्रेम हे तकलादू असतं. त्यात विवेकापेक्षा भावनेचा पगडा जास्त असतो. तर दुसरीकडे सध्या प्रचलित असलेली विवाह जमवण्याची रीत ही एक प्रकारच्या जुगारासारखी आहे. तिच्यात केवळ व्यावहारिक गोष्टींसाठी बायोडाटा देतात व 'स्थळ बघण्याचा` कार्यक्रम होतो. त्यात मुलगा-मुलगी एकमेकांना थोडेबहुत प्रश्न विचारतात.यातून एकमेकाच्या व्यक्तिमत्वाचा काय अंदाज येणार? तसं ही 'माण्ूास` ओळखणं हे अवघडच काम. एकमेकाच्या सहवासात जन्म काढूनही परस्परांची खऱ्या अर्थानं ओळख न झालेली माणसं आढळतात. तिथं आपल्या आयुष्याचा साथीदार इतक्या तकलादू पद्धतीने निवडणे कितपत उचित होईल ? परिचयोत्तर विवाह हा एक चांगला पर्याय होउ शकेल. मैत्रीतून स्वभावाविषयी थोडाफार तरी अंदाज आलेला असतो. त्यामुळे अशा रितीने होणारा विवाह हा जुगार ठरण्याची शक्यता कमी. पण शेवटी, मैत्री आपल्या जागी रहाते व विवाह आपल्या जागी रहातो. विवाह ही व्यावहारिक बाब आहे. नुसत्या उदात्त कल्पनेने वैवाहिक जीवन काही जगता येत नाही. सांपत्तिक स्थिती, स्थावर, मानलौकीक, कौटुंबिक स्थिती या गोष्टी वा व्यावहारिक गरजा ही महत्वाच्या आहेत. फिल्मी स्टाईल प्रेमाच्या व त्यागाच्या बाता व्यवहारात कुचकामी ठरतात हे ध्यानात आल्यावर भ्रमनिरास होउन विवाह अयशस्वी ठरतात. म्हणूनच 'घटस्फोट मिळेल का?` असे ज्योतिषाकडे विचारायला जाणारा वर्ग वाढलाय. विवाह हा संस्कार न ठरता सोपस्कार व्हायला लागला आहे. आमच्या मते विवाह जुळवण्यासाठी पत्रिका पहाणे निरर्थक आहे.

२९) मंगळदोष म्हणजे काय?
जन्मकुंडलीत १, ४, ७, ८, १२ यापैकी कुठल्याही स्थानात मंगळ असेल तर तो मंगळदोष आहे असे समजले जाते. ताऱ्यांच्या तेजाची जशी प्रतवारी असते तशी या मंगळाच्या कडकपणाचीही प्रतवारी आहे. कडक मंगळ, सौम्य मंगळ, क्षम्य मंगळ ही प्रतवारी कशी ठरवतात तर पत्रिकेतला मंगळ राशीबल व स्थानबळ यांच्यामुळे किती पॉवरफुल आहे यावरून ठरवतात.
सांगून आलेल्या मुलाची / मुलीची पत्रिका मंगळाची आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी हल्ली ज्योतिषाची गरज भासत नाही. किरकोळ आजारासाठी आपण लगेच डॉक्टरकडे धावतो का? आपल्याला घरगुती वा प्राथमिक उपचार माहीत असतात. तद्वत हा मंगळाचा प्रथमोपचार हल्ली पुष्कळ लोकांना - बायकांना सुद्धा - माहीत असतो. मंगळ दिसल्याबरोबर नकार देण्यात येतो!
बापाला मुलगी म्हणजे एक भार त्यातून मुलीला मंगळ असला की विचारायलाच नको. अशावेळी एखादे गुरुजी-कम-ज्योतिषी-कम मध्यस्थ अशी मंगळी मुलगी खपवायचं काम कुशलतेनं करीत असतात. मुलीच्या मंगळाला जाब विचारणारे राहू, केतू शनी यांना पुढे करून मंगळदोषाचा परिहार होतोय् असे मुलाकडच्यांना पटवून ते ही मुलगी खपवतात. अशा मध्यस्थीतून त्यांना आर्थिक लाभही होत असतो. साहजिकच मंगळाचा बागुलबुवा ज्योतिषीलोक जोपासतात. विवाहाच्या सौदेबाजीत मंगळ हा एक हुकमी पत्ता ठरतो.
मंगळदोष म्हटला की वैवाहिक सौख्याचा बोऱ्या, वैधव्य असा समज आहेे. उगीच विषाची परिक्षा कशाला घ्या असे म्हणून लोक मंगळ असलेल्या मुलीला नकार देतात. पण त्यातही गंमत अशी आहे की 'मंगळ्या` मुलाला मंगळ नसलेली मुलगी एकवेळ चालते पण मंगळ असलेल्या मुलीला मात्र मंगळ्याच नवरा लागतो कारण तो तसा नसेल तर तिला कायमच्या वैधव्याची भीती असते. मुलांना विधुरावस्थेची भीती निदान पूर्वीच्या काळी तरी वाटत नसावी. कारण त्यांना पुन: पुन: लग्ने सहज करता येत असत ! जन्मकुंडलीत बारा स्थाने असतात त्यातल्या पाच स्थानात मंगळ असण्याची शक्यता जवळजवळ चाळीस टक्के असते. म्हणजे शेकडा ४० टक्के कुंडल्यात हा पीडादायक मंगळ असणारच! त्यामुळे विवाह जुळवणे फार मुश्कील व्हायचे म्हणून पूर्वाचार्यांनी काही अपवाद शोधून काढले. सौम्य मंगळ, क्षम्य मंगळ असे ते अपवाद आहेत. मंगळ-दोषाचा हा इतिहास काही फार प्राचीन नाही, अलीकडचाच म्हणजे १७ व्या शतकापासूनचा आहे पण त्याचा जबरदस्त पगडा लोकांच्या मनावर बसला आहे. मंगळदोषाचे उल्लेख हे मुहूर्त गणपती, मुहूर्त चिंतामणी, भाव चिंतामणी, ज्योतिर्महार्णव अशा ग्रंथांमध्ये आढळतात.
मुहूर्तचिंतामणी या ग्रंथामध्ये मंगळदोषासाठी अपवादही सांगितले आहेत. वधूच्या पत्रिकेत जर वरील स्थानापैकी एकात मंगळ असून वराच्या पत्रिकेतही तशाच स्थानात असेल तर मंगळाने मंगळास जाब पाहिला असे म्हटले जाते. आखाड्यातील पहिलवान जशी एकमेकाची ताकद अजमावत असतात त्या पद्धतीने वधूवरांच्या पत्रिकेत मंगळ एकमेकांना जाब विचारतात म्हणे! अंगात आलेल्या बायकांच्या देव्या सुद्धा एकमेकीला श्रेष्ठत्वाबद्दल जाब विचारतात. अर्थात याचा शेवट प्रत्येकजण आपापल्या जागी श्रेष्ठ अशा समन्वयात होतो. तद्वत मंगळ्याला मंगळी जमून जाते. नंतरच्या ग्रंथकारांनी जाब विचारण्याचे हे अधिकार शनी, राहू, केतू यांना दिले आहेत. पत्रिकेतील गुरु, शुक्र हे ही शुभ ग्रह आपापल्या स्टेटस नुसार नैतिक दबाव आणू लागले. मेष, कर्क, वृश्चिक, धनु, मीन या राशीही मंगळाला आंजारू गोंजारू लागल्या. पत्रिका गुणमेलनात जर २७ किंवा त्यापेक्षा अधिक गुण झाले तर मंगळाकडे काणाडोळा करू लागले. अशा रितीने मंगळाचे अपवाद वाढू लागले. अनेक मान्यवर ज्योतिषांनी सुद़्धा मंगळ-दोष हे खूळ आहे अशी सडेतोड भूमिका घेतली. वि.गो.नवाथे, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, द्वा.ना. राजे, ज्योतिषाचार्य सुंठणकर इत्यादि मोठमोठ्या लोकांचा त्यात समावेश आहे. ज्योतिषाचार्य महामहोपाध्याय शां. श्री. सुंठणकरांनी तर मंगळदोषाचे स्तोम ज्योतिष्यांनीच माजवले आहे असे म्हणून 'विवाह मंगळाची अनावश्यकता` या १९६६ साली लिहिलेल्या पुस्तकात ज्योतिष्यांंचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यात त्यांनी मंगळदोषाला १०७ अपवाद दिले आहेत. ते म्हणतात, '' जगात अगणित विवाह होत असतात. भारत सोडल्यावर सर्व जगभर मंगळ पद्धती विचारात न घेता विवाह जमत असतात. मंगळ पद्धती सर्व जगातल्या लोकांना कशी भोवत नाही? का फक्त भारतीय जनतेच्या बोकांडी बसण्याचा तिचा हेका आहे? सदा सर्वदा पृथ्वीतलावर थोडयाशा लोकांना वैवाहिक जीवन विफलतेचा फटकारा बसत राहणार या निसर्गक्रमास थांबवण्याची ताकद मंगळाच्या कुवतीच्या बाहेरची आहे.`` मंगळाच्या बाबतीत ज्योतिर्विद मंडळी लुच्चेगिरी करतात असे खुलेपणाने सांगण्याचे धाडस त्यांनी केले आहे. पुस्तकातली आणखी काही निवडक वाक्ये उद्धृत करतो:- 'यदाकदाचित् मंगळाच्या पद्धतीचा बाष्कळपणा समाजास उकलला तर ज्योतिषी लोकांचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात मार खाईल अशी साधार भीती त्यांना वाटत असल्यास न कळे! ज्योतिष कार्यालयांच्या उत्पन्नाचा फार मोठा वाटा या मंगळाने उचललेला असल्याने ज्योतिर्विद मंडळी या पद्धतीच्या भंपकपणाकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष करीत असतील असे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही.` आम्ही तरी यापेक्षा अधिक परखड काय म्हणू शकणार ? लोकांना हे उमजेल तेव्हा खरे !

३०) एकनाड असल्यास रक्तगट एक येतो व संतती होत नाही अथवा अडचणी येतात यात तथ्य काय?
आमच्या मते या समजुतीत काहीही तथ्य नाही. फलज्योतिषात नाडी या शब्दाचा नेमका अर्थ काय ते कुठेही स्पष्ट सांगितलेले नाही. एकनाड-दोषामुळे होणारे दुष्परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सांगितले आहेत. नाडीग्रंथात नाडी म्हणजे एक पळाचा अवधी. शरीरशास्त्रात नाडी म्हणजे रक्तवाहिनी. फलज्योतिषात अमुक नक्षत्रावर जन्मलेल्या माणसाची नाडी अमुक एवढेच सांगितले आहे. अंत्य, आद्य, मध्य अशा तीन प्रकारच्या नाड्या सांगितलेल्या आहेत. जगातला प्रत्येक माणूस या तीनपैकी कोणत्या तरी एका नाडीचा असतोच. पंचांगात अवकहडा चक्र नावाचे एक कोष्टक असते. त्यावरून जन्मनक्षत्राच्या आधारे तुमची नाडी कोणती ते कळते. उपवर मुलगा व मुलगी या दोघांची नाडी एकच आहे असे दिसले तर तिथे एकनाडीचा दोष आहे म्हणून त्या दोघांचे लग्न करू नये कारण अशा जोडप्याला संतती होत नाही अशी वेडगळ श्रद्धा प्रचलित आहे. पत्रिका-गुणमेलनात नाडीला सर्वात जास्त म्हणजे आठ गुण दिले आहेत. नाडीचा संबंध रक्तगटाशी जोडण्याचा प्रयत्न काही ज्योतिषीलोक करतात पण तो त्यांचा कावेबाजपणा आहे. का? ते पहा. रक्तगट हे अे, बी, अेबी, ओ, आरएच पॉझिटीव्ह व निगेटीव्ह असे एकूण आठ प्रकारचे आहेत. तीन नाडया व आठ प्रकारचे रक्तगट यांचा कुठेही ताळमेळ बसत नाही. पत्नीचा रक्तगट आरएच निगेटिव्ह व पतीचा रक्तगट आरएच पॉझिटिव्ह असल्यास एक प्रॉब्लेम निर्माण होतो तो असा की, त्या जोडप्याच्या पहिल्या अपत्याला जरी काही त्रास झाला नाही तरी नंतरच्या अपत्याला धोका संभवतो. पण यावरही आता डॉक्टरी उपाय निघाला आहे. एकनाड-दोषामुळे जोडपे निपुत्रिक रहाते ही समजूत जर खरी असती तर संभवनीयतेच्या नियमानुसार जगातली एक-तृतीयांश जोडपी निपुत्रिकच राहिली असती! पण तसे काहीच आढळत नाही. यावरून उघड दिसते की ही समजूूत म्हणजे एक खुळचटपणा आहे. एकनाड-दोषाला काही अपवाद गर्गसंहितेमध्ये दिले असले तरी पूर्वीच्या - व आजच्याही -ज्योतिष्यांच्या अडाणीपणामुळे म्हणा किंवा अंधानुकरणाने म्हणा एकनाडीचे फालतू स्तोम माजले आहे.
एकनाड-दोषावर आजवर झालेल्या टीकेचा एक परिणाम असा झालेला दिसतो की आता दाते पंचांगात पृष्ठ ८६ वर नाडी-दोषाचे वेगळेच परिणाम सांगण्यात आले आहेत. तिचा संबंध आता संततीशी नसून माणसाच्या स्वभावाशी जोडण्यात आला आहे, संतती बाबत मौन पाळण्यात आले आहे, पण एकनाडीमुळे मृत्यूदायक दोष निर्माण होतो अशी दहशत आता पृष्ठ ९० वर घातली आहे ! दुसरा महत्वाचा बदल म्हणजे एकनाड -दोष ठरवण्यासाठी आख्ख्या नक्षत्राऐवजी त्याचा फक्त एक चरणच विचारात घ्यावा असे नरपतिजयचर्या स्वरोदय या ग्रंथाचा आधार देउन सांगितले आहे. या बदलामुळे एकनाड -दोषाच्या केसेसचे प्रमाण एकदम खाली येउन ते फक्त २५ टक्क्यावर येते असा दावा केला आहेे. पण या प्रकाराचा खरा अर्थ काय होतो ते पहा. गेली शेकडो वर्षे चालत आलेल्या रूढीमुळे ७५ टक्के केसेस मध्ये निष्कारणच एकनाड-दोष मानून स्थळे नाकारली गेली असाच याचा अर्थ होत नाही का ? आम्ही तर म्हणतो की एकनाड-दोष ही कल्पनाच मुळी मूर्खपणाची असल्यामुळे तिच्याकडे सरळ दुर्लक्ष करावे.

३१) मृत्यूषडाष्टक काय आहे?
समजा तुमची जन्मरास मेष आहे व तुम्हाला सांगून आलेल्या जोडीदाराची रास कन्या आहे. मेषेपासून कन्या रास ६ वी येते. कन्येपासून पुढे मोजल्यास मेष रास आठवी येते. सहा-आठ म्हणजे षडाष्टक. असा योग असलेल्या जोडीदारांचे एकमेकाशी पटत नाही अशी समजूत आहे. षडाष्टक शब्दामागे मृत्यू हा शब्द जोडला म्हणजे एकदम दहशत निर्माण होते. ज्योतिषांना तेच हवे असते. ते अशी समजूत घालतात की मृत्यू शब्दाचा अर्थ वैवाहिक सुखाचा मृत्यू असा घ्यायचा. हाच अर्थ शास्त्रकारांना अभिप्रेत आहे. ज्योतिष्यांचे एकूण धोरण काय तर विवाह या गोष्टीसंबंधात मंगळ, मृत्यूषडाष्टक, एकनाड असे काहीतरी प्रश्न वा अडचणी आपणच आधी निर्माण करायच्या व आपणच त्याला 'शास्त्राधार` देउन मार्गदर्शन करण्याचा आव आणायचा व स्वत:च्या तुमड्या भरायच्या.

३२) मुहूर्त पहाणे योग्य का अयोग्य?
मुहूर्त म्हटले की भास्कराचार्य-लीलावतीची गोष्ट हमखास सांगितली जाते. लीलावती ही भास्कराचार्यांची लाडकी लेक. तिच्या कुंडलीत वैधव्ययोग होता. पण भास्कराचार्यांनी असा विवाहाचा मुहूर्त शोधून काढला की तिचा वैधव्ययोग टळेल. पण विवाहाचे वेळी अक्षतेचा दाणा का मणी घटिकापात्रात पडलेने तो तळाशी जावून भोकात अडकला व मुहूर्त चुकला व शेवटी व्हायचे तेच झाले. या दंतकथेच्या छटा बदलतात पण आशय तोच. मुहुर्ताची महती. थोडा इकडेतिकडे झाला की काय उलथापालथ?
मे महिना म्हणजे सुट्टी,लग्नसराईचे दिवस. आता या काळात लग्नाचा मुहूर्त नाही म्हणजे गैरसोयच नाही का? कार्यालयाची उपलब्धता हा पण हल्ली एक महत्वाचा मुद्दा झाला आहे. मुहूर्त असलेल्या तारखांना कार्यालय मिळणे हे देखील भाग्यच मानायची वेळ आली आहे. पंचांगात रेडीमेड मुहूर्त दिलेले असतात. पण हे रेडिमेड मुहूर्त सुद्धा 'लाभतात` की नाही हे बघावे लागते. जसे रेडिमेड कपडे सर्वांनाच 'फिट` होतील असे नसतात कधी कधी ते 'अल्टर` करावे लागतात तसेच मुहूर्ताचे आहे. एखादी वेळ ही कुणासाठी आनंदाची असते तर कुणासाठी दु:खाची असते, कुणासाठी कसोटीची असते तर कुणासाठी निवांतपणाची असते, कुणासाठी जोडायची असते तर कुणासाठी तोडायची असते, कुणाची जन्माची असेल तर कुणाची मृत्यूची असेल. कुणाची कशीही असो ती ग्रहांच्या सोयीची असते म्हणून तिला मुहूर्त म्हणायचे. एकदा पेपरमध्ये बातमी आली होती की इ.स. २००० मे,जून मध्ये मुहूर्त नाहीत म्हणून. कारण त्या काळात गुरु,शुक्राचा अस्त होणार होता. विवाहासारख्या महत्वाच्या संस्काराचे वेळी गुरु शुक्रासारख्या शुभ ग्रहांची उपस्थिती नाही म्हणजे त्यांचे आशिर्वाद, नैतिक बळ नाही. मग मंगळ शनी सारख्या दुष्ट ग्रहांचे चांगलेच फावले की? कुणाला वैधव्य दे, कुणाचे सासू-सासरे मार, कुणाला अपघात कर, कुणाला सासुरवास कर असा धुडगूूस ते घालतील. मग काही नडलंय का मुहूर्त नसताना लग्न करायला ? मुहूर्त म्हणजे खरं तर कार्याच्या सोयीची पूर्वनियोजित वेळ. पण तिला शुभाशुभत्वाची कल्पना एवढी घट्ट चिकटली आहे की बोलता सोय नाही. पंचांगात दिलेले रेडिमेड मुहूर्त खरं तर अंदाजपंचे असतात. पण गुरुजींनी स्वत: काढून दिलेला मुहूर्त केवळ पंचांगात दिसत नाही म्हणून लग्नाची ठरलेली तारीख बदलण्याचा प्रसंग मी पाहिलेला आहे. तारीख ठरली, कार्यालय ठरलं, पण मुलाच्या ज्योतिष-शिक्षित भावजयीच्या लक्षात आलं की ठरवलेला मुहूर्त पंचांगात दिलेला नाही. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना हेही सांगितलं की गुरुजींनी वधूवरांच्या पत्रिका पाहून मुहूर्त काढलाय्. तो पंचांगात नसेना का? पण नाही. मग काय? तारीख बदला. आता आली का पंचाईत? दुसऱ्या तारखेला हॉल बुक करा. नशीबानं म्हणजे योगायोगानं ती तारीख त्याच हॉलसाठी उपलब्ध झाली म्हणून ठीक नाहीतर मुलीकडच्यांचे पैसे पाण्यात !
आता, पंचांगात लग्नाचे मुहूर्त नाहीत म्हणून लग्न व्हायची थोडीच रहाणार आहेत! ज्यांना कसंही करून लग्न करायचचं आहे ते कशाला कशाला मुहूर्तासाठी अडून बसतील ? ज्यांना मुहूर्त न पहाता लग्न केल्याची रुखरुख वाटणार असेल त्यांच्या सोयीसाठी कुठला तरी 'शास्त्राधार` देउन मुहूर्त दिले जातात. एखादे धर्म-संकट कोसळले की शास्त्राधार शोधले जातात व ते मिळतातही. या फलज्योतिषाचं अगदी कायद्यासारखं आहे. वाटा तेवढया पळवाटा. पण एवढा द्राविडी प्राणायम करीत बसण्यापेक्षा आपल्या सोयीची तारीख-वेळ घेतली तर काय वाईट?
समजा एवढं सगळं करून मुहूर्तावर लग्न केलं आणि संसार विसकटला तर मग ? त्यालाही उत्तर आहे. जर तुमच्या जन्मकुंडलीतच विवाहसौख्य नाही तर कितीही चांगला मुहूर्त पाहिला तरी काय उपयोग ? जे आडातच नाही ते पोहऱ्यात कुठून येणार? एका ज्योतिषाला एकदा मी विचारल, '' काहो, आता डॉक्टरी शास्त्रामुळे प्रसूतीची वेळ पुढे मागे करता येते. म्हणून चांगल्या मुहूर्तावर मूल जन्माला घालणे डॉक्टरांना सहज शक्य आहे. म्हणजे भविष्य ठरवणं त्यांच्या हातात आलं की नाही ? `` त्यावर त्यांनी शांतपणे सांगितलं की, '' अस जन्माला येणे हे निसर्गाला धरून नसल्यानं जन्मकुंडलीचे नियम तिथे लागू होत नाहीत.`` मुहूर्ताची महती काय सांगावी. निवडणुकीचे फॉर्म सुद्धा मुहूर्तावर भरणे जरूरीचे मानतात. उगाच पनौती नको. प्रचाराचा प्रारंभसुद्धा मुहूर्तावरच होतो. कुणीतरी एकच उमेदवार निवडून येणार हे सर्वांना जरी माहीत असले तरी आपण आपल्या बाजूने काळजी घ्यावी. त्यातूनही अपयश आलंच तर नशीब, प्राक्तन आहेच.
वरील विवेचनावरून आपल्या लक्षात आले असेल की मुहूर्ताना महत्व देणं - न देणं हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे.

३३) गुरुबल कशासाठी बघतात?
विवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या शुभ ग्रहाची साथ आहे की नाही हे पहातात. हे मंगल प्रसंग असतात त्यामुळे अशा प्रसंगी अमंगल ग्रहांची वाकडी नजर पडून काही अमंगळ होउ नये म्हणून गुरुबळ बघितले जाते. गुरु हा ग्रह नैतिक बळ देतो, चांगले गुण वृद्धिंगत करतो. गुरु जर अनुकूल नसेल तर गुरुच्या सुवर्ण प्रतिमेचे पूजन करून तो अनुकूल करून घेता येतो.
एकूण हा प्रकार पुतळयाचे अनावरण, संस्थेचे उदघाटन, भूमीपूजन, वृक्षारोपण या वेळी मंत्री, पुढारी जसे उपस्थित लागतात त्या प्रकारचा आहे. जेवढा मंत्री पॉवरफूल तेवढा सोहळा जंगी. त्याच्या सोयीसाठी प्रसंगी वेळा पुढे मागे ढकलल्या जातात.

३४) मूळ नक्षत्रावर जन्मल्यावर शांंती करावयास का सांगतात?
मूळ नक्षत्र हे तमोगुणी, दारूण, अनिष्ट मानले गेले आहे. त्यामुळे मूळ नक्षत्रावर मूल जन्मले तर ते आईबापाच्या मूुळावर आले आहे असा समज निर्माण झाला. त्यातला अनिष्ट भाग काढून टाकण्यासाठी त्याची शांती करण्याचे प्रकार अर्थातच भीतीपोटी निर्माण झाला. संत एकनाथ मूळ नक्षत्रावर जन्मले. त्यांनी एके ठिकाणी लिहून ठेवले आहे.
मूळीच्या मूळी एका जन्मला । मायबापे घोर धाक घेतला ।
कैसे नक्षत्र आले कपाळा । स्वये लागला दोहोच्या निर्मूळा ।
शांती हे कर्मकांड भट भिक्षुकांच्या उपजिविकेचे साधन होते. त्यामुळे अशा प्रकारची कर्मकांड जाणीवपूर्वक जोपासली गेली व गतानुगतिकतेचा भाग म्हणून त्याचे अंधानुकरण झाले.

३५) मूळ नक्षत्र सासऱ्यास वाईट आश्लेषा नक्षत्र सासूस वाईट असे म्हणतात ते कितपत बरोबर आहे?
वर आपण मूळ नक्षत्राच्या इतिहासात जे बघितले त्याचीच ही पुढची मालिका आहे. जेष्ठा नक्षत्र दीरास वाईट वगैरे वगैरे. मुलगी सासरी आल्यानंतर जर काही दुर्घटना घडली तर त्याचे खापर लगेच मुलीच्या पायगुणाशी जोडून काहीतरी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच कुठतरी नक्षत्राशी संबंध जोडून काहीतरी बादरायण संबंध प्रस्थापित केला जातो.

३६) सिंहस्थात विवाह करू नये असे का म्हणतात?
सिंहस्थ याचा अर्थ असा की, गुरु जेव्हा सिंह राशीत असतो तो काळ. गुरु एका राशीत वर्षभर असतो. गुरु हा संततीचा कारक ग्रह असला तरी सिंह रास ही वंध्या रास मानली गेली आहे त्यामुळे या काळात विवाह केल्यास संतती होत नाही असा समज दृढ झाला. परंतु प्रसिद्ध ज्योतिषी श्री. के. केळकर यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कुंडल्यांवरून जो सर्व्हे केला त्याचे निष्कर्ष मात्र या समजुतीच्या विरुद्ध आहेत. आक्टोबर १९४३ ते सप्टेंबर १९४४ या सिंहस्थ-काळात विवाहित झालेल्या १०२ दांपत्यांपैकी ९३ दांपत्यांना संतती झाली, तसेच आक्टोबर १९५५ ते आक्टोबर १९५६ या सिंहस्थ-काळात विवाहित झालेल्या १७४ दांपत्यापैकी १६५ दांपत्यांना संतती झाली, असे त्यांना आढळून आले. यावरून वरील समज बिनबुडाचा आहे हे सिद्ध होते. (संदर्भ :- ग्रहांकित जाने १९९१.)

३७) गुरु संततीकारक ग्रह का मानतात?
गुरुलाच संतती देण्याचा मक्ता कुणी दिला याविषयी खुलासा सापडत नाही. तसे सर्वच ग्रहाचे कारकत्व कुणी ठरविले यालाही समर्पक उत्तर नाही. केवळ ग्रंथप्रामाण्य हेच त्याचे उत्तर आहे. पण गुरु हा संततीकारक ग्रह आहे याविषयी मात्र ज्योतिषांचे एकमत आहे. त्याविषयी एक किस्सा सांगतो. आक्टोबर १९९३ ते आक्टोबर १९९४ या काळात गुरु तुला राशीत होता. त्यावेळी प्रख्यात ज्योतिषी श्री. श्री. भट यांनी १ एप्रिल १९९४ च्या साप्ताहिक लोकप्रभेत असे म्हटले होते की, गुरु तूळ राशीत असल्याने तुला-प्रधान व्यक्तींना व गुरुच्या दृष्टीमुळे मिथुन मेष व कुंभ या राशी-प्रधान व्यक्ंतिनाही या वेळी संततीयोग आहे. त्यांनी असे आवाहन केले होते की कोणत्याही प्रसूतीगृहात सध्या दाखल झालेल्या स्त्रियांच्या व त्यांच्या पतींच्या पत्रिकेवरून या ज्योतिषनियमाची सत्यता कोेणालाही ताडून पहाता येईल. आता वरकरणी बिनतोड वाटणारे हे आवाहन कसे दिशाभूल करणारे आहे ते पहा :- "राशीप्रधान " या शब्दाची त्यांची व्याख्या अशी :- लग्नरास, किंवा ज्या राशीत चंद्र, रवि वा अनेक ग्रह असतील ती रास. राशीप्रधान शब्दाची ही व्याख्या एवढी ऐसपैस आहे की ती प्रसूतीसाठी आलेल्या प्रत्येक स्त्रीला लागू पडेल, आणि नाहीच लागू पडली तर तिच्या नवऱ्याला तरी नक्कीच लागू पडेल ! असल्या होल्डॉल-टाईप भोंगळ नियमांचा पडताळा घ्यायचा तरी कशासाठी ?

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) प्रकरण ४ फलज्योतिषाच्या विविध पद्धती

३८) मेदिनीय ज्योतिष काय प्रकार आहे?
मेदिनीय ज्योतिष म्हणजे देश, प्रांत यांचे भवितव्य सांगणारी ज्योतिष शाखा. यात हवामान, राजकीय बदल, सामाजिक स्थित्यंतरे, सृष्टी-चमत्कार, क्रांती, भूकंप, युद्धे, दंगली इ. गोष्टींचा मागोवा घेतात. यात देश, प्रांत, शहर, राजकीय पक्ष यांना सुद्धा राशी बहाल केल्या आहेत. यात पानशेतच्या धरणफुटीची कुंडली, मंत्रीमंडळाच्या शपथविधीची कुंडली, वास्तुप्रवेशाची कुंडली इ. बाबींचा सामावेश असतो.

३९) राजकीय भाकिते कशी वर्तवली जातात?
मेदिनीय ज्योतिषाच्या आधारेच ही भाकिते वर्तवली जातात. उदा. आधुनिक भारताची रास मकर आहे. आता ही सुद्धा कशी? १ नोव्हे.१८५८ रोजी इंग्लंडच्या ईस्ट इंडिया कंपनीचे भारतावरील वर्चस्व संपून राणीच्या राजसत्तेचे वर्चस्व चालू झाले. या अर्थाने आधुनिक भारताचा जन्म झाला. मग अगोदर भारत नव्हता का? हा प्रश्न इथे निरर्थक आहे. भारताचे भाकीत वर्तवताना आधुनिक भारताची पत्रिका, १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला म्हणून स्वतंत्र भारताची पत्रिका, २६ जाने १९५० ला भारत प्रजासत्ताक झाला म्हणून ती पत्रिका, सत्तेवर असलेल्या पक्षाची पत्रिका, पंतप्रधानांची पत्रिका वगैरे अनेक पत्रिका विचारात घेवून भाकीत वर्तवले जाते. कॉंग्रेसची पत्रिका कुठली तर २८ डिसेंबर १८८५ म्हणजे पक्षस्थापनेची. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला कॉंग्रेसमध्ये विभाजन होत गेले तरी पत्रिका तीच. पोर्तुगीजांनी ब्रिटीशांना मुंबई बेट आंदण म्हणून दिले ती मुंबईची पत्रिका. असे प्रातांचे जन्म धरून त्यांच्या पत्रिका तयार केल्या आहेत. इंदिरा गांधी १९७७ ची निवडणूक हरल्या कारण त्यांनी अमावस्येला फॉर्म भरला होता असं अजंता जैन या राजकीय भाकीत वर्तवणाऱ्या ज्योतिषाने सांगितले होते. १९९१ च्या निवडणूका व राजीव गांधींची हत्या ही कोणालाही सांगता आली नाही. बहुसंख्य ज्योतिषांनी राजीव गांधींच पंतप्रधान होणार असे सांगितले होते. ( पहा साप्ताहिक सकाळ २७ एप्रिल १९९१. व इलस्ट्रेटेड विकली २५-३१ मे १९९१) एकंदरीत राजकीय भाकितांची भाषा बघता राजकीय अंदाजच फलज्योतिषाच्या आवरणातून भाकीत म्हणून सांगितले जातात. 'सरकारला फारच दिव्यातून जावे लागेल` 'मंत्रिमंडळाचा एकोपा राखणे हीच एक बाब पंतप्रधानांची डोकेदुखी असेल` 'सरकार अस्थिर राहील.` 'देशात गंभीर स्वरुपाचे पेचप्रसंग उद्भवतील` 'अर्थिक परिस्थिती नाजूक होईल` 'धोका संभवतो जरा जपूनच` अशा संदिग्ध शब्दांची पेरण करीत बदलत्या राजकीय परिस्थितीचा मागोवा घेत भरमसाठ अंदाज लिहायचे व काहीही झाले तरी आम्ही याचे भाकित अगोदरच वर्तवले होते. समजा नाही तसं काही झालं तर आहेच गाजराची पुंगी! वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. पत्रिके वरून कुठल्या पक्षाला किती सीट मिळतील हे सांगण्यापर्यंत ज्योतिषांची मजल गेली. तसेही एक्जीट पोल, ओपिनियन पोल वगैरे अंदाज घेण्याचे प्रकार असतातच की. मग तुम्ही पण सांगू शकता की भाकीत. अं हं! तुम्ही आम्ही सांगतो तो अंदाज व ज्योतिषी सांगतो ते मात्र भाकीत.

४०) भूकंपाचे भाकीत वर्तवता येणे शक्य आहे काय?
हा पण मेदिनीय ज्योतिषाचाच प्रकार. कोयनेच्या भूकंपापासून अशा भाकितांची चलतीच झाली. सूर्यचंद्र ग्रहणे व ग्रहयोग यांचा पत्रिकेशी संबंध जोडून अशी भाकिते वर्तवतात. या बाबत ज्योतिषी कै. श्री.के. केळकर यांचा बराच गवगवा होता. कोयनेचा १९६७ चा भूकंप तारीखवार वर्तवला होता असे ते सांगत. त्याबाबतचा पुरावा म्हणून ते 'भारतज्योती` फ्री प्रेस २९ नोव्हे १९६७ चा लेखाचा संदर्भ देत. संदर्भ देउन एखादी गोष्ट सांगितली की लोकांचा विश्वास ठेवण्याचा कल वाढतो. एकतर तो संदर्भ सहज उपलब्ध नसतो व त्यांना तो तपासण्यची गरजही वाटत नाही. साहजिकच अशा गोष्टींचा बोलबाला होतो. आम्ही जेव्हा तो संदर्भ तपासून पाहिला त्यावेळी त्यात असे लिहीले होते, ' ....या सर्व गोष्टी अशा सूचित करतात की, हवामानात आत्यंतिक बदल होतील. वादळ, अतिवृष्टी, विजांचा कडकडाट, भूकंप यासारख्या घटना घडतील. वादळे किनारपट्टीवर होतील. वरील परिणामांची शक्यता २ नोव्हेंबर पूर्वीचा किंवा नंतरचा आठवडा किंवा डिसेबरचा दुसरा आठवडा किंवा कदाचित जाने ६८ मध्ये दिसेल.` ( मूळ इंग्रजी लेखातील वाक्यांचा मराठी अनुवाद ) आता यात कुठे तारीखवार, स्थलनिश्चिती आली. अत्यंत मोघम स्वरूपात लिहीलेले हे भाकीत लोकांच्या समोर अचूक भाकीत या सदरांत आले. दरवर्षी ७- ८ रिश्टरचे भूकंप चारपाच तरी होतात. बहुसंख्यवेळा ते समुद्रात होत असल्याने जीवित वा वित्तहानी होत नाही. पण केळकरांच्या थिअरीत ग्रहणांची दिप्ती आणि व्याप्ती एवढी मोठी आहे की कुठलाही भूकंप त्या तावडीत सापडतो. या बाबत भूकंपतज्ज्ञ सांगतात की, आधुनिक विज्ञानालाही अजून भूकंपाची अचूक पूर्वसूचना देता येत नाही. भूकंपप्रवण क्षेत्रे सांगता येतात. पण केव्हा होईल हे सांगता येत नाही. किल्लारीचा व गुजरातचा भूकंप कुणाला सांगता आला का? पण झाल्यानंतर हे कुणीतरी अगोदरच वर्तवले होते अशी उदाहरणे दरवेळी नंतर उगाळली जातात. एकूण काय भूकंपाचे भाकीत सुद्धा राजकीय भाकितासारखाच गोलमाल.

४१) भृगुसंहिता हा काय प्रकार आहे? भृगुसंहितेमध्ये जगातल्या सर्वांच्या कुंडल्या सापडतात कशा?
हजारो वर्षांपूर्वी त्रिकालज्ञ ऋषिमुनींनी हिमालयाच्या पायथ्याशी एकत्र येवून आपल्या दिव्य दृष्टीच्या सहायाने पृथ्वीवर जन्माला येणाऱ्या मानवजातीचे भविष्य पाहिले व ते भूर्जापत्रावर लोककल्याणार्थ लिहून ठेवले. त्यापैकी भृगु ऋषींनी जे लिहिले आहे ते भृगुसंहिता अशी भृगुसंहितेची कथा सांगितली जाते.
उत्तर भारतात अनेक लोकांकडे वेगवेगळया भृगुसंहिता आहेत. त्यावरुन ते भविष्यकथन करत असतात. आपल्याकडे ढवळे प्रकाशनने सुबोध भृगूसंहिता नावाचा खंड प्रकाशित केला. त्यामुळे भृगूसंहिता मराठी लोकांपर्यंत पोहोचली. यात सन १९०१ ते २००० या शंभर वर्षात जन्माला आलेल्या लोकांच्या कुंडल्या आहेत. खरं तर ती कुंडली नव्हेच तो कुंडलीसदृश आराखडा असतो. कारण तिच्यात चंद्र दाखवलेलाच नसतो. तसेच मेष रास प्रथमस्थानात असे गृहीत धरून तो आराखडा बनविलेला असता.े असे एकूण ४८८६ आराखडे त्या कुंडली खंडात दिलेले आहेत. त्या सर्वांचे भाकित हे ३०० प्रकारच्या वर्णनात बसवून ते फलित खंडात दिलेले आहे. म्हणजे एका प्रकारचे वर्णन हे सरासरी १६ प्रकारच्या विविध आराखडयांना लागू होते. हे १६ आराखडे विविध कालखंडातील असणार हे उघड आहे. या विविध कालखंडात जन्मलेल्या कोटयावधी लोकांना ते भाकीत लागू. स्त्रियांसाठी स्त्री खंड अशाच प्रकारचा आहे. त्यात शंभर प्रकारची भाकिते वर्णन केलेली आहेत. यावरून आपल्या आता लक्षात आले असेल की भृगूसंहितेत कुणाचीही कुंडली सापडते म्हणजे काय प्रकार आहे.
भृगुसंहितेत सरासरी आठ ते दहा दिवसांच्या अवधीत जगात जन्माला येणा या प्रत्येक जातकाच्यासाठी एकच एक कुंडली असते. तसल्या अपु या कुंडलीवरून वर्तवलेले भविष्य हजारो जातकांना बरोबर लागू पडते असे श्रद्धाळू लोक मानतात. जगभरातले लोक जसे बारा राशीत विभागले आहेत तसाच काहीसा हा प्रकार आहे.
चिं.वि. वैद्य १९२१ साली जुलै च्या 'चित्रमय जगत` अंकातील 'फलज्योतिषाचे निष्फळत्व` या लेखात लिहितात - म. गांधींची कुंडली एका राजकीय चळवळीतल्या सुशिक्षिताने भृगूसंहितेतून मिळवून आणली. त्याने असे सांगितले, ''त्यात असे सापडले की हिंदुस्थानास स्वराज्य १९२१ साली जरी मिळाले नाही तरी १९२५ साली मिळेल आणि महात्मा गांधी हे पहिले प्रेसिडेंट होतील, परंतु ते ती जागा पत्करणार नाहीत.`` वगैरे. तेव्हा मला मोठे आश्चर्य वाटले. भृगूसंहिता अमुक वर्षी हिंदुस्थानास स्वातंत्रय मिळणार म्हणून सांगणार आणि त्या प्रोत्साहनाने आमचे लोक स्वराज्याचा प्रयत्न करणार! भृगूसंहिता हे एक प्रचण्ड थोतांड असून त्याचा आमच्या सुशिक्षित आणि कर्तव्यदक्ष मंडळींवर अजून पगडा आहे हे आश्चर्य आहे.

कै. शं.बा.दिक्षित ( इ.स. १८९६ ) आपल्या ' भारतीय ज्योतिषशास्त्र अथवा भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास ` या ग्रंथात म्हणतात- भृगुसंहिता हा ग्रंथ प्राचीन नसावा. कारण त्याविषयीचा उल्लेख वराहमिहिर ( ७ वे शतक ) व भटोत्पल ( ९ वे शतक ) यांच्या ग्रंथात नाही. कुठलीही जन्मकुंडली यात सापडते असे मानले तर निरनिराळी लग्नराशी व भिन्न भिन्न स्थानगत ग्रह यांच्या मानाने ७,४६,४९,६०० कुंडल्या पाहिजेत. एकेका कुंडलीचे दहा दहा श्लोक जरी धरले तरी ७५ कोटी श्लेाक पाहिजेत. भृगुसंहितेचा काही भाग ज्यांच्यापाशी असेल ते प्रसंगवशात लबाडी करत असतील. म्हणजे एखाद्या मनुष्याची पत्रिका नवीन करुन ती भृगुसंहितोक्त म्हणून देत असतील.

४२) नाडी म्हणजे काय? नाडी भविष्य हा फलज्योतिषाचा प्रकार आहे का?
वैद्यकशास्त्रातल्या नाडीचा इथं काहीही संबंध नाही. ही एक कालमापक संज्ञा आहे. नाडी म्हणजे एका पळाचा अवधी. एक पळ म्हणजे २४ सेकंद. एका अहोरात्रात, म्हणजे २४ तासात, ३६०० पळे बसतात. दरेक पळाचे भाकीत कुणी वर्तवल्यास एका दिवसाची ३६०० भाकिते तयार होतील. तिकडे आकाशात राशी-चक्राचे जे ३६० अंश असतात त्यांचे प्रत्येकी १० विभाग केल्यास ३६०० विभाग होतात. एकेक विभाग पूर्वेस उगवून वर यायला एक पळ लागते. (३६०० पळात म्हणजे २४ तासात राशीचक्राची एक फेरी पुरी होते.) या ३६०० पळांच्या भाकितांची सांगड ३६०० राशी-विभागांशी घातलेली असते. मेष राशीच्या पहिल्या अंशाचा पहिला एकदशांशावा भाग ज्या पळात उगवून वर येतो ते पळ पहिल्या क्रमांकाचे मानून त्याचे भाकीत एका पट्टीवर लिहायचे, व याप्रमाणे पुढे अनुक्रमाने ३६०० नाडी-पट्ट्या तयार करून ठेवायच्या. हे नाडी भविष्याचे भांडवल.
नाडी-ज्योतिष हा फलज्योतिषाचाच एक प्रकार असला तरी प्रचलित फलज्योतिषात आणि नाडीज्योतिषात एक मूलभूत फरक आहे. तो असा की फलज्योतिषातली भाकिते जन्माच्या वेळच्या संपूर्ण ग्रहस्थितीचा विचार करून वर्तवायची असतात, पण नाडीज्योतिषातली भाकिते राशीचक्राच्या कितव्या अंशाचा कितवा भाग जन्मवेळी उगवत होता याचा विचार करून पूर्वीच कुणीतरी वर्तवून ठेवलेली आहेत! म्हणजे, नाडी-ज्योतिष हे भृगुसंहितेप्रमाणेच जणू काही एखादे रेडीमेड भाकितांचे स्टोअरच आहे. भोंदूंनी फसवावे आणि दुधखुळ्यांनी फसावे या सहकारी तत्वावर ही रेडीमेड भाकितांची दुकाने जोरात चालत असतात.

४३) दक्षिण भारतात केवळ तुमच्या अंगठयाच्या ठशावरून काढलेल्या नाडीपट्टीत तुमचे नांव, तुमच्या बायकोचे नांव, तुमची कुंडली, तुमचा वर्तमान काळ, भूत, भविष्य सर्व काही सापडते ते कसे?
आता हे नाडीग्रंथ महाराष्ट्रातही आले आहेत. २०-२२ ठिकाणी ही नाडीकेंद्रे जोरात चालू आहेत. उपलब्ध माहितीनुसार गेल्या एक वर्षात दक्षिणेकडून आलेली अशी पाच केंद्रे पुण्यात कार्यान्वित झाली आहेत. प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तेथे भेट दिली असता तेथील माहितीपत्रकानुसार अंगठयाचा ठसा वा पत्रिकेवरुन नाडी पटटी शोधून व्यक्तीचे नांव, आईवडिलांचे नांव, पति/पत्नी, व्यवसाय, भावंड, संतती इ. खुलासा केला जातो. नाडी पट्टीतील मजकुर हा कूट तामिळ लिपीत असतो असे सांगितले जाते. त्याअनुषंगाने ते हिंदीत प्रश्न विचारतात. नाडीपट्टी शोधण्यासाठी असे प्रश्न विचारावे लागतात असे नाडीवाचक सांगतात. सर्वांच्याच पट्टया सापडतात असे नाही असे नाडी केन्द्रात अगोदरच सांगितले जाते. पट्टी सापडल्यास वाचनाचे रूपये तीनशे आकारले जातात. ( हा रेट नाडी केंद्रानुसार बदलतो.)
माझी पत्नी मंजिरी ता. २३-२-२००१ रोजी श्री रिसबूड व श्री प्रकाश पेंडसे यांच्या समवेत पुण्यातल्या नाडी-केंद्रात गेली. तिने तिच्या अंगठयाचा ठसा, पूर्ण नाव व जन्मतारीख सांगितली पण जन्मवेळ मात्र माहीत नाही असे सांगितले. काही काळानतंर ज्योतिष्याने नाडी-बंडलातली एकेक पट्टी भराभर उलटत तिला बरेच प्रश्न विचारले. तिची रास धनू आहे हे दरम्यानच्या काळात तिच्या जन्मतारखेवरून पंचांगातून त्याने काढले असावे, म्हणून एक पट्टी समोर धरून व तिच्यात वाचल्यासारखे करून त्याने तिला विचारले की तुमची रास धनू आहे का ? मंजिरी म्हणाली की तिला माहीत नाही. श्री. रिसबूड शेजारीच बसले होते, त्यांनी त्याला विचारले की पट्टीवर धनू रास लिहिली आहे काय ? तो होय म्हणाला. त्यावर रिसबुडांनी म्हटले की मग त्या पट्टीत लग्न कोणते लिहिले आहे ते सांगा. तो जरासा घुटमळला व म्हणाला की ते आत्ता कळणार नाही, वो तो बाद मे आयेगा. आणखी काही प्रश्न विचारून झाल्यावर त्याने सांगितले की तुमची पट्टी सापडत नाही. हा त्याचा हुकुमी एक्का होता. पट्टी सापडत नाही असे म्हटले की खेळ खलास. पट्टी सापडली असे म्हणायची सोय नव्हती कारण जन्मवेळ दिलेली नसल्यामुळे लग्न-रास काढता येत नव्हती, ती काय सांगायची हा पेच त्याला पडला असता. त्यातून त्याने अशी सुटका करून घेतली.
मंजिरीच्या वडिलांचे नाव लक्ष्मण. ज्योतिष्याने अनेक प्रश्न विचारून ते नाव कसे काढून घेतले ते मंजिरीने समक्ष अनुभवले आहे. त्याने विचारलेले प्रश्न असे :- नाव तीन अक्षरी की दोन अक्षरी आहे ? नाव देवाचे आहे का ? ते नाव य र ल व यापैकी कोणत्या अक्षराने सुरू होते ? पहिल्या प्रश्नाचे उत्तर देतांना मधले अक्षर एकच समजायचे की दीड अक्षर समजायचे असा संभ्रम तिला पडला म्हणूने तीन अक्षरातले मधले अक्षर जोडाक्षर आहे असे तिने सांगितले. तिच्या वडलांचे नाव पट्टीत निघाले असे नंतर सांगायची तयारी त्याने केली असावी यात आम्हाला शंका नाही.
नाडी-पट्टीत कुंडलीची माहितीच कोरलेली नसावी असा तर्क वा संशय आम्ही वरील प्रयोगावरून बांधला. तो बरोबर आहे की नाही ते पहाण्यासाठी रिसबुडांनी इथल्या नाडी-केंद्राला एक पत्र पाठवले. त्यात संशोधनासाठी हा प्रयोग करण्याचे आवाहन केले होते. त्यात असे म्हटले होते की, आम्ही आपणास जन्मतारीख व वेळ सोडून व्यक्तीच्या ठशाबरोबर व्यक्तीचे नांव, व्यक्तीचे जन्मसाल, महिना, आठवडा, व्यक्तीच्या आईचे नांव, वडिलांचे नाव, पती/ पत्नीचे नांव, स्वत:चा व्यवसाय, शिक्षण, भावंडाची माहिती, संततीची माहिती देउ. सोबत सील केलेली कुंडली देउ. ठसा व माहितीवरून नाडीपटटीतील कुंडली केंद्राने शोधावी. ती जर सील केलेल्या कुंडलीशी जुळली तर आपल्या नेहमीच्या फीच्या दुप्पट फी आम्ही देउ. हा प्रयोग दि.१३ एप्रिल २००१ रोजी सायंकाळी करण्याचे ठरले. प्रत्यक्ष प्रयोगात तुमची माहिती तुमच्या जवळच ठेवा आम्हाला तिची गरज नाही असे सांगून तुमचे फक्त ठसे आम्ही घेतो असे सांगितले. आम्ही तिघांचेही ठसे त्याला दिले. आता पट्टी सापडेपर्यंत थांबा असे त्याने आम्हाला सांगितले. दरम्यानच्या काळात मुंबईहून आलेल्या एका दांपत्याची नाडीपट्टीही सापडली व नाडीवाचनही झाले. अर्ध्या तासानंतर तुम्हा तिघांच्याही नाडी पट्टया या केंद्रात नाहीत. आम्ही त्या मद्र्रासवरुन मागवून घेउ व तुम्हाला फोन करु असे सांगून आम्हास वाटेला लावले. त्यानंतर आजतागायत अनेकदा फोन करुनही आमच्या पट्टया सापडल्या नाहीत यावरुन सूज्ञ वाचक काय ते समजून घेतील.

४४) नॉस्टॅ्रडॅमस ने जगातील महत्वाच्या घडामोडींची भाकिते पूर्वीच वर्तवून ठेवली आहेत. त्यात भारत हे हिंदू राष्ट्र म्हणून जगभरात बलशाली राष्ट्र होईल असे म्हटले आहे. ते खरे आहे का?
नॉस्ट्राडॅमस हा सोळाव्या शतकात होउन गेलेला फ्रेंच ज्योतिषी. खरंतर तो वैद्यकी करणारा होता. त्याने सेन्च्यूरीज नावाचा लॅटिन फ्रेंच अशा किचकट भाषेतला काव्यमय ग्रंथ लिहीला. शंभर कडव्यांचे एक शतक अशी दहा शतके त्याने लिहीली. ही कडवी म्हणजे आपल्याकडचा चारोळी हा जसा काव्यप्रकार आहे अगदी तस्सा. जगभरात नॉस्ट्राडॅमस पोहोचला तो एरिका चितम च्या 'प्रोफसिज ऑफ नॉस्ट्राडॅमस` या बेस्ट सेलर पुस्तकामुळे. याच्या अनेक आवृत्त्या अल्पावधीत निघाल्या. त्यात नॉस्ट्राडॅमसचे मूळ श्लोक वा कडवी व त्याचा इंग्रजी अनुवाद. आपल्याकडे नॉस्ट्राडॅमस लोकप्रिय झाला तो जी एम हिरण्यप्पामुळे. त्याने नॉस्ट्राडॅमसच्या भाकितांचे अर्थ काढले ते असे:- ''भारत हिंदू राष्ट्र म्हणून उदय पावणार. दक्षिणेतून भारताला असा नेता लाभणार की जो भारताला अध्यात्मिक प्रकाश देईल. १९९४ मध्ये भारत हे जगात बलशाली राष्ट्र म्हणून मान्यता पावेल. १९९८ मध्ये तिसरे महायुद्ध होईल ते सात वर्षे चालेल. २०२६ पर्यंत त्याचे पडसाद उमटतील. त्यानंतर हजार वर्षे मानवजातीला सुखाची आहेत.`` ही वर्ष पुढे वाढवता येतात व घटनाही बदलता येतात.
मुळात नॉस्ट्राडॅमसने जे लिहीलय ते पद्यात व संदिग्ध भाषेत त्यामुळे त्याचे हवे तसे अर्थ काढले जातात. एकाच श्लोकाचे अर्थ वेगवेगळया घटनांशी जोडले गेले आहेत. भाकितातून व्यक्त होणाऱ्या घटनांचे काळ, वेळ, ठिकाणं काहीही दिलेले नाही. नॉस्ट्राडॅमसचे समर्थक मात्र म्हणतात की हे त्याने जाणीवपूर्वक गूढ व संदिग्ध भाषेत लिहीले होते. कारण श्लोकानुसार भाकीत खरे ठरते असे जर चर्चच्या लक्षात आले असते तर त्यावर सैतानाच्या जादूचा प्रकार म्हणून खटला भरला असता. ऑगस्ट १९९० मध्ये जेव्हा आखाती युद्ध झाल तोपर्यंतच्या आवृत्त्यांमध्ये त्याचा उल्लेख नव्हता. नंतरच्या आवृत्त्यामध्ये मात्र त्याचे उल्लेख येवून हे नॉस्ट्राडॅमसने अगोदरच सांगितले होते असे सांगितले जाउ लागले. ११ सप्टेम्बर २००१ ला न्यूर्यार्कला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जो विमान हल्ला झाला तोही नॉस्ट्रडॅमसने सांगितला होता असे नॉस्ट्रॅडॅमसचे समर्थक म्हणू लागले. त्यावर वर्तमानपत्रात लगेच चौकटी, रकाने भरुन मजकूर वाहू लागला. एरिका चितमने जे श्लोक संदर्भ निरो व फ्रेंच राज्यक्रांतीसाठी दिले तेच संदर्भ हिरण्यप्पाने नेहरु व भारताच्या फाळणीसाठी दिले. जिथं त्यांची राणी एलिझाबेथ होती तिथ आपल्या इंदिरा गांधी आल्या. नॉस्ट्राडॅमसचे हिरण्यप्पाने आपल्या सोयीनुसार भारतीयीकरण करून टाकले.
अदभुत, गूढ गोष्टी माणसाला गुंगवून टाकतात. अशा गोष्टी सनसनाटी झाल्या की त्या माणसाला भुरळ पाडतात. त्यामुळे या बाबी निरर्थक ठरल्या तरी त्यांची लोकप्रियता कमी होत नाही. सर्वसामान्य माणसाचा कल अशा अद्भूत व गूढ गोष्टींवर विश्वास ठेवण्याकडे असतो.

४५) लोकमान्य टिळक यांचा ज्योतिषाचा चांगला अभ्यास असून त्यांचा त्यावर विश्वास होता असे म्हणतात ते खरे का?
लोकमान्य टिळकांचा ज्योतिर्गणिताचा अभ्यास होता. फलज्योतिषाचा नव्हे. त्या अनुषंगाने त्यांनी ओरायन व आर्क्टिक्ट होम इन वेदाज असे दोन ग्रंथ ही लिहिले आहेत. या ग्रंथात त्यांनी ज्योर्तिगणिताधारे आर्यांच्या मूळ वसतिस्थानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पंचांगातील गणितात एकवाक्यता यावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. रेवती नक्षत्रातील झीटा ताऱ्यापासून राशीचक्राचा आरंभ मानावा असे मानणाऱ्या गटाला त्यांनी मान्यता दिली होती. त्यामुळे त्या गणिताने निर्माण झालेल्या पंचांगाला टिळक पंचांग असे संबोधण्यात येते. वस्तुत: ते टिळकांनी निर्माण केलेले नव्हे. ते केरूनाना छत्रे व आबासाहेब पटवर्धन यांनी शुद्ध पंचांग म्हणून तयार केले होते. टिळकांना या विषयात रस होता. टिळकांनी आपल्या भविष्याला मान्यता द्यावी असे काही ज्योतिषांना वाटे. त्यावेळी महाडकर नावाचे ज्योतिषी चेहरा पाहून तंतोतंत कुंडली मांडत व अदभूत भाकिते सांगत अशी त्यांची ख्याती होती. टिळकांना अमूकवेळा शिक्षा झाल्या हे महाडकरांनी अचूक सांगितले होते असे काही वर्तमानपत्रात आले होते. त्याच्या खरेपणा विषयी खुद्द टिळकांनाचा विचारले असता ते म्हणाले, '' वर्तमानपत्रातील बातमी खोटी आहे. महाडकर ज्योतिषांना या वर्षी काय घडणार ते सांगा असे विचारीत असे. परंतु त्यांनी सांगितलेल्या गोष्टी अनुभवास न आल्याने मी त्यांना विचारणे सोडून दिले.`` टिळकांचे विश्वनाथ नावाचे चिरंजीव त्या वर्षी प्लेगने वारले. ते कुठल्याही ज्योतिषाला सांगता आले नाही. (संदर्भ :- लो.टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका, खंड दुसरा, संग्राहक - सदाशिव विनायक बापट, सन १९२५) टिळकांना या विषयात रस असल्याने समर्थकांनी टिळकांचा विश्वास फलज्योतिषाला चिकटवला. टिळक हे कर्मवादी होते. ज्योतिषांनी भाकीत सांगितल्यानंतर टिळक म्हणत, 'ठीक आहे! ग्रहांना ग्रहांचे काम करू द्यात. मला माझे..`

४६) वास्तूज्योतिष हा काय प्रकार आहे?

वास्तूशास्त्रात घुसलेले ज्योतिष याला वास्तूज्योतिष असे म्हणणे वावगे ठरु नये. विशिष्ट वेळ ही एखाद्या व्यक्तिला अनुकूल वा प्रतिकूल आहे हे जसे मुहूर्त प्रकारात पाहिले जाते. तसे विशिष्ट वास्तू ही त्या व्यक्तिला अनुकूल वा प्रतिकूल आहे का? हे वास्तूशास्त्रात बघितले जाते. हे अनुकूलत्व वा प्रतिकूलत्व हे शुभाशुभत्व कल्पनेशी जोडले आहे. ज्योतिषशास्त्रात वास्तूशांत, मुहूर्त, बाधित वास्तू यांचा विचार केला आहे. दिशांचे कारकत्व हे राशींनाही दिले आहेे. दिशांचे ग्रहाधिपती आहेत. मानवी जीवनावर ग्रहांप्रमाणे गृहाचाही प्रभाव पडत असतो असे वास्तूशास्त्रात मानले गेले आहे. अशा रितीने वास्तूशास्त्र व ज्योतिषशास्त्र यांची सांगड घातली आहे. जन्मकालीन ग्रहयोग बदलणे आपल्या हातात नसते परंतु वास्तू निवडणे आपल्या हातात असते. वास्तू शास्त्रानुसार जर वास्तू 'शास्त्रोक्त` असेल तर त्या वास्तूत राहणाऱ्यांचे आरोग्य, संतती, संपत्ती, यावर त्याचा शुभ परिणाम होतेा व तसे नसेल तर अशुभ परिणाम होतो. वास्तू शास्त्रानुसार वास्तु कितीही शास्त्रशुद्ध असेल परंतु त्यात राहणाऱ्या व्यक्तिच्या कुंडलीतच जर वास्तुसौख्याचा योग नसेल तर काय उपयोग? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? त्यामुळे काही वास्तुज्योतिषी अशी जाहिरात करतात, आम्ही वास्तू शास्त्रही जाणतो व फलज्योतिषही जाणतो. त्यामुळे तुम्ही आमच्या कडे या. तुमच्या पत्रिकेत वास्तुसौख्याचा योग असेल तर आम्ही तुम्हाला योग्य ते अनुकूल बदल वास्तूत करुन देतो. विनाकारण खर्चात पाडत नाही. फलज्योतिषात ग्रहांची शांती करुन त्यांना अनुकूल करुन घेता येते तसे वास्तूशास्त्रात वास्तुशास्त्रानुसार अनुरुप बदल करुन, वास्तुशांती करुन वास्तू अनुकूल करुन घेता येते. एकूण काय व्यक्तिच्या आयुष्यातील सुखदु:खाच्या घटनांचा संबंध कधी ग्रहयोगांशी जोडला जातो तर कधी वास्तूशी जोडला जातो.

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) प्रकरण ५ - फलज्योतिष शास्त्र , प्रवाद ,समजुती

४७) फलज्योतिष हे शास्त्र आहे काय?
प्राचीन काळापासून आपल्याकडे शास्त्र हा शब्द फार सैलपणे वापरला गेला आहे. कोणत्याही विषयावरच्या ग्रंथगत माहितीला शास्त्र म्हटले जात असे. आपापल्या मताला शास्त्राचा आधार आहे हे दाखवण्याची धडपड चालत असे. शास्त्र म्हणजे काय तर आधीच्या लोकांनी लिहून ठेवलेला एखादा बहुजन-मान्य ग्रंथ. विधवांच्या पुनर्विवाहाला शास्त्राधार आहे का नाही, किंवा संन्यास घेतल्यावर पुन: संसार करण्यास शास्त्राधार आहे का नाही याची चर्चा करणाऱ्या पंडितांनी आधार म्हणून कोणती शास्त्रे घेतली असावीत ? आणि मुळात त्या शास्त्रांना आधार कशाचा होता ? हा विचार केला म्हणजे आमचा मुद्दा लक्षात येईल. सायन्स या शब्दाचा ऑक्सफर्ड डिक्श्नरी मध्ये दिलेला अर्थ निरिक्षण आणि पडताळा यातून प्राप्त होणारे ज्ञान, विज्ञान, शास्त्र, असा आहे. शास्त्र आणि विज्ञान या शब्दांच्या सुस्पष्ट अर्थांबाबत मतभिन्नता आहे. तरीपण आपण विज्ञान म्हणजे फिजिकल सायन्स या अर्थाने फलज्योतिष हे विज्ञान आहे का नाही? असा प्रश्न जर विचारला तर त्यास नाही हेच उत्तर द्यावे लागेल.
विज्ञान या संज्ञेस पात्र ठरण्यासाठी काही पद्धती अवलंबावी लागते. त्यात १) निरीक्षण २) संरचना ३) प्रश्न ४) संयोजन ५) सामान्यीकरण ६) गृहीत प्रमेय ७) पुनर्मूल्यांकन ८) निष्कर्ष या गोष्टी अपरिहार्य आहेत. म्हणजे सामान्यपणे निरीक्षण, अनुमान, प्रयोग व निष्कर्ष हे ते प्रमुख टप्पे होत. विज्ञानाच्या अनेक शाखा या कारणे व परिणाम हे शोधण्यासाठी अनुभवाधिष्ठित अवस्थेतून गेलेल्या आहेत. जेव्हा त्या शाखांचे मूळ नियम हे प्राथमिक स्वरूपात सुद्धा निश्चित केले नव्हते त्यावेळी प्रयोग व निरीक्षण यांच्यातून दिसून येणाऱ्या अनुभवातून हे शोधण्याचे काम सुरू होते. हे प्रयोग पुन:पुन: व वेगवेगळया व्यक्तिंद्वारा केले जात. त्यातून काही आकृतीबंध तयार होई व त्यावरून त्याच्या मुळाशी असलेले नियम शोधले जात. फलज्योतिषात तपासता येतील असे नि:संदिग्ध नियम नाहीत. सर्वांचा साकल्याने विचार म्हणता म्हणता त्या नियमांना अर्थ राहत नाही.
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ कै. वि. म. दांडेकर हे फलज्योतिषात रस असणारे परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह धरणारे. कै. डॉ.वि.म. दांडेकर यांनी ३०० घटस्फोटित युगुलांच्या कुंडल्या संगणक व ज्योेतिषांच्या मदतीने अभ्यासल्या. या अभ्यासात त्यांना फलज्योतिषीय नियमांचे लक्षणीय सातत्य कोठेच आढळले नाही. ( पहा:-आजचा सुधारक मार्च १९९९, पृष्ठ ३७५. पत्रलेखिका- कुमुदिनी दांडेकर.) पत्रलेखिकेने असे म्हटले आहे की, ज्या समंजस वाटणाऱ्या ज्योतिषाच्या मदतीने त्यांनी हा अभ्यास केला त्यालाही ही गोष्ट कबूल करावी लागली. यावरून हे लक्षात येईल की फलज्योतिष म्हणजे अंदाजपंचे दाहोदरसे अशा त-हेच्या नियमांचा व ठोकताळ्यांचा एक संग्रह आहे. त्यांचा अनुभव येणे न येणे ही योगायोगाची बाब आहे. साप्ताहिक सकाळ ता ८ जुलै १९८९ च्या भविष्य विशेषांकात ते म्हणतात, '' शंभर मतिमंद मुलांच्या कुंडल्या व शंभर सर्वसामान्य मुलांच्या कुंडल्या घेतल्या तर त्यात फलज्योतिषाच्या काही योगांबाबत तरी फरक दिसावयास हवा, तसेच शंभर घटस्फोटितांच्या पत्रिकांमध्ये काही योग प्रामुख्याने दिसावयास हवे. पण माझयाजवळ ज्या कुंडल्या गोळा झाल्या त्यावरुन तरी हा फरक दिसून येत नाही.`` भारत इतिहास संशोधन मंडळातील ज्योतिषांच्या कार्यक्रमातील भाषणात त्यांनी म्हटले, ''जर शंभर कुंडल्यांसाठी शंभर नियम असतील तर तो नियम कसला?``
फलज्योतिषातील शास्त्रत्व तपासण्यासाठी एम्पीरिकल संशोधन करुन या वादाचा निर्णय लावता येईल अशी आशा पुष्कळ बुद्धीवादी लोकांना वाटते. परंतु हे शास्त्र अशा संशोधनासाठी निरुपयोगी आहे असे आम्हास वाटते. याची कारणे :-
१) या शास्त्रातल्या फलित दर्शवणाऱ्या पॅरामीटर्सची संख्या अगणित बनत जाते. शिवाय पूर्वसंचितासारखे अज्ञेय पॅरामीटर्स त्यात आहेत.
२) ग्रहस्थितीची आयडेंटीकल पुनरावृत्ती कधीच होत नसते. त्यामुळे पुन:प्रत्यय घेणे शक्य नसते. म्हणजे हे संशोधन प्रत्यक्षात आणणे शक्य नाही.
३) सौख्य व स्वभाव विश्लेषण या गुळमुळीत अथवा सापेक्ष बाबींमध्ये एम्पीरिकल संशोधन कसे आणणार? त्यासाठी निसंदिग्ध बाबी घेतल्या पाहिजेत उदा. मृत्यू, मोठे आजारपण, मोठा अपघात, शारिरिक व्यंग, इ.
४) पुरेसा डाटा मिळणं व्यक्तिगत पातळीवर शक्य होत नाही. वि.म दांडेकरांनी संख्याशास्त्रीय निष्कर्ष काढण्याइतपत डाटा मिळाला नाही असे सांगितले होते. परदेशात पुन:पुन: एम्पीरिकल संशोधने केली गेली. पण त्यातून फारसे काही हाती आले नाही. फलज्योेतिषाच्या समर्थन करणाऱ्यांविरुद्ध ते निष्कर्ष गेले की ते संशोधनात त्रुटी काढतात. गोकॅलीनच्या संशोधनाचा प्रचलित फलज्योतिष, शास्त्र म्हणून सिद्ध होण्यास काहीही उपयोग झाला नाही.
त्यानंतरही अनेक फलज्योतिषी व संशोधक यांच्यात बऱ्याच चर्चा झाल्या. प्रयोगही झाले. हे प्रयोग कुठल्याही भाकितांशी संबंधीत नव्हते. कारण संंशोधनासाठी घेतलेले पाश्चात्य फलज्योतिष हे भाकितांशी संबंधीत नसतेच. ते स्वभाव विश्लेषण, प्रवृत्ती, नैसिर्गिक कल वा पिंड यांचा पत्रिकेशी परस्पर संबंध या अनुषंगाने असते. अगदी अलिकडे गॅरी फिलिप्सन या ब्रिटीश पत्रकाराने लिहिलेल्या ' अॅस्ट्रॉलॉजी इन द ईयर झिरो ` या सप्टेम्बर २००० साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले. डेनिस एल्वेल या ब्रिटीश ज्योतिषाने भले थोरले लेख लिहून प्रतिवाद केले. त्याचे खंडन ज्योतिष चिकित्सक जॉफ्रे डीन, प्रो. इव्हान केलि, आर्थर माथर व रुडॉल्फ स्मिट यांनी केले. अखेर हा वाद जाने २००२ मध्ये संपला. डेनिस तपासता येईल अशी कुठलीही टेस्ट सुचवण्यास असमर्थ ठरला. त्याच्या मते जातकाचे समाधान हे महत्वाचे तसेच ग्रहयोगाचा साकल्याने विचार झाला पाहिजे. अशी सर्वसमावेशक संख्याशास्त्रीय चाचणी घेणे संशोधकांना अशक्य आहे. म्हणजे पुन्हा जैसे थे परिस्थिती.

४८) हे गोकॅलीनचे संशोधन नेमकं काय आहे?
डॉ. मिशेल गॉकेलिन या फ्रेंच मानसशास्त्रज्ञाने जे प्रचंड संशोधन केले तसे संशोधन दुसऱ्या कुणीही केलेले नाही. साधारण १९६० ते १९७५ या काळात हे त्यांनी हे संशोधन केले. या संशोधनाचा सुरुवातीचा जो निष्कर्ष निघाला तो मार्स इफेक्ट या नावाने गाजला. लढाऊ प्रवृत्तीचा आणि मंगळाचा काहीतरी संबंध आहे असे त्यावरून दिसत होते. सर्वसाधारण म्हणजे अॅव्हरेज लढाऊ माणसांना हे तत्व लागू नाही असे गॉकेलिनचे म्हणणे होते. उच्च श्रेणीच्या म्हणजे शौर्य-पदके मिळालेल्या जवानांनाच फक्त ते लागू आहे, आणि ते सुद्धा त्यांच्यातल्या फक्त पाचसहा टक्के लोकांनाच लागू आहे असे त्यांचे म्हणणे! आम्हाला हे सगळे अगदी विचित्र वाटते. गॉकेलिनने अपार कष्ट करून त्याचे निष्कर्ष काढले यात वादच नाही. पण त्याचा अन्वयार्थ ज्योतिष-समर्थकांनी जो लावला आहे तो आम्हाला पटत नाही. मंगळाच्या गूढ परंतु नैसर्गिक प्रभावाचा हा परिणाम आहे असे आम्हाला बिलकुल वाटत नाही. मंगळाला बुद्धी आणि इच्छाशक्ती असेल तरच हे सगळे शक्य आहे. साधी गोष्ट आहे, ज्यांनी रणांगणावर आपल्या प्राणांची बाजी लावली पण ज्यांना फक्त कसलेही किताब मिळाले नाहीत अशा लाखो जवानांचा मंगळाशी काही संबंध नाही, फक्त काही मूठभर लोकांच्यावरच मंगळाचे नैसर्गिक प्रभाव पडतात ही गोष्ट तर्कशक्ती कितीही ताणली तरी मनाला पटत नाही. अर्थात्, मंगळाला जर चोखंदळपणे निवडानिवड करता येत असेल तर मात्र गोष्ट वेगळी!
याचा सरळ अर्थ असा होतो की गॉकेलिनने जो डाटा जमवला, जी सांख्यिकी पद्धत वापरली, तिच्यातच काही तरी गडबड घोटाळा नकळत का असेना पण शिरला असावा. कार्ल ई. कोप्पेनशार नावाच्या शास्त्रज्ञाने नेमके हेच दाखवून दिले. यूरो स्केप्टिक ९२ या नावाच्या नेदरलॅण्ड मधून प्रकाशित झालेल्या शास्त्रीय नियतकालिकात 'मार्स इफेक्ट अनरिडल्ड` या शीर्षकाच्या लेखात त्याने गॉकेलिनच्या संशोधनात 'सिलेक्शन बायस` हा दोष असल्याचे निदर्शनास आणले. दुर्दैवाने गॉकेलिन त्यापूर्वीच मृत्यू पावला होता, त्यामुळे हा वाद पुढे अनिर्णित राहिला. आता शास्त्रीय जगतात गॉकेलिनच्या संशोधनाचे महत्व उरलेले नाही. फलज्योतिषालाही या संशोधनाचा प्रत्यक्ष असा काहीच उपयोग झाला नाही. अप्रत्यक्ष उपयोग एवढाच झााला की ग्रहांचे प्रभाव माणसावर पडतात या मूलभूत कल्पनेला सलाईनचे एक इंजेक्शन मिळाले!

४९) चंद्र सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम म्हणून भरती ओहोटी हा दृश्य परिणाम होतोच ना ? मग त्याचप्रमाणे ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण, चुंबकीय आकर्षण अशा शक्तींचा परिणाम आपल्यावर कशावरून होत नसेल ?
गुरुत्वाकर्षणाचा फलज्योतिषाशी काहीही संबंध नाही. हे कशावरून म्हणायचे तर गुरुत्वाकर्षण दोन वस्तूमधल्या अंतराशी निगडित असते. पृथ्वीपासूनची ग्रहांची अंतरे सतत बदलत असतात त्या बदलांची दखल हे शास्त्र घेत नाही आणि विशेष म्हणजे राहू-केतूंना गुरुत्वाकर्षणच नाही. त्याचप्रमाणे चुंबकीय शक्तीचाही या शास्त्राशी काही संबंध नाही, कारण चुंबकीय क्षेत्रे अगदी मर्यादित अंतरापर्यंत प्रभाव टाकू शकतात. ग्रहांच्या ज्योतिषीय प्रभावांचा संबंघ जर गुरुत्वाकर्षणाशी असता तर हे शास्त्र निर्माणच झाले नसते कारण एकट्या चंद्राचे पृथ्वीवरचे आकर्षण बाकी सर्व ग्रहांच्या एकत्रित आकर्षणाच्या पाच लक्ष पटीहून अधिक असते असे डॉ. नारळीकरांनी अष्टग्रहीवर बोलतांना म्हटले आहे. म्हणून जेव्हा च्रंद्र पृथ्वीच्या एका बाजूला आणि विरुद्ध बाजूला एक किंवा अनेक ग्रह असतील तेव्हा त्यांचे गुरुत्वाकर्षण नगण्य होईल व जर त्यांचे ज्योतिषीय प्रभाव गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असतील तर तेही नगण्य होतील. पृथ्वीपासून हजारो अब्ज मैल दूर असलेल्या राशी-ताऱ्यांचे चुंबकीय आकर्षण पृथ्वीवर पोचणे अशक्य आहे, आणि राहू-केतूंना व चंद्राला तर चुंबकीय आकर्षणच नाही. फलज्योतिषाला वैज्ञानिक प्रतिष्ठा देण्याच्या प्रयत्नांत हा वैज्ञानिक मुलामा लावण्याचा प्रयत्न झालेला आहे.

५०) हे शास्त्र विज्ञानावर आधारित आहे का ?
मुळीच नाही. फिजिकल सायन्स या अर्थाने विज्ञान हा शब्द वापरला तर कोणत्याही शास्त्राला विज्ञानाचा दर्जा मिळण्यासाठी ज्या ८ कसोट्या पार कराव्या लागतात त्या फक्त भौतिकी शास्त्रांना म्हणजे फिजिकल सायन्सेसनाच लागू करता येतात. त्या कसोट्याना हे शास्त्र उतरत नाही. फलज्योतिष ज्या प्रकारचे ज्योतिषीय प्रभाव गृहित धरते ते भौतिकी शास्त्रात बसत नाहीत.
विद्युत चुंबकीय लहरी, गुरुत्वाकर्षण किंवा चुंबकीय आकर्षण अशा तीन प्रकारचे उर्जा-स्त्रोत भौतिकी शास्त्राला किंवा विज्ञानाला माहीत आहेत, त्यापैकी एकाचेही साधर्म्य ज्योतिषीय प्रभावाशी नाही. इथूनच फलज्योतिषाची विज्ञानाशी फारकत होते म्हणून ते विज्ञानावर आधारित असणे अशक्य आहे. फलज्योतिषाचे 'शास्त्रत्व` लोकांच्या मनावर ठसविण्यासाठी काही ज्योतिषी विज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न करत असतात. तसे केले नाही तर आपल्या शास्त्राला काही न्यूनत्व येईल असे त्यांना वाटत असते. फलज्योतिष हे विज्ञान नाही असे श्री. व. दा. भट यांनी पत्रिका या मराठी विज्ञान परिषदेच्या दिवाळी २००१ या अंकात, तसेच सोलापूरच्या अ.भा. ज्योतिषसंंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात स्पष्टपणे म्हटले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने त्याला बळेबळे विज्ञान ठरवले आहे. वास्तविक पहाता, ज्योतिर्विज्ञान हे अर्थाच्या दृष्टीने खगोलशास्त्राला उचित ठरणारे नाव आहे. परंतु यूजीसीने दडपेगिरी करून ते नाव फलज्योतिषासाठी वापरले आहे. या विषयाला वैज्ञानिक मुलामा देण्याचा हा प्रयत्न आहे. वैज्ञानिकांनी हा विषय विज्ञान शाखेत समाविष्ट करण्यासाठी तीव्र विरोध केल्याने त्याला आता कला-शाखेत ढकलले आहे.

५१) हे शास्त्र विज्ञानावर आधारित नाही तर वैज्ञानिकांनी त्याविरूद्ध ठोस भूमिका का घेतली नाही?
घेतली ना! पण त्याचा परिणाम उलटाच झाला. 'दी हयूमॅनिस्ट` या अमेरिकन मासिकाच्या सप्टेंबर १९७५ च्या अंकात 'ऑब्जेक्शन्स टू दी अस्ट्रॉलॉजी` अशा शीर्षकाचे एक निवेदन प्रसिद्ध झाले. त्या निवेदनावर युरोप अमेरिकेतल्या नामवंत १८६ शास्त्रज्ञांच्या सहया होत्या. ( सुरुवातीला ते १९२ होते नंतर त्यातील ६ गळाले ) यात काही नोबेल पारितोषिक विजेते सुध्दा होते. हे निवेदन डॉ. बार्ट जे बोक यांनी तयार केले होते. त्यात त्यांनी असे म्हटले होते की, ग्रहतारे हे पृथ्वीपासून प्रचंड अंतरावर असल्याने त्यांचे गुरुत्वाकर्षणादि परिणाम ते पृथ्वीवर पोहोचे पर्यंत अगदी क्षीण होतात. अशा क्षीण प्रभावाने माणसाचे नशीब घडवले जाते असे मानणे बरोबर नाही.
या निवेदनावर विख्यात खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन यांनी सही देण्यास नकार दिला. झाले! ज्योतिषसमर्थकांना जणू कार्ल सेगनचा पाठिंबाच मिळाला. त्यांनी याचा डांगोरा पिटण्यास सुरवात केली. सौर डाग, कॉस्मिक रेडिएशन, चुंबकीय वादळे, कॉस्मो बायोलॉजी वगैरे भौतिक गोष्टींना पिंडी ते ब्रम्हांडी अशा तत्वज्ञानात अध्यात्मिक पातळीवर नेउन पचवून टाकले. सामान्य माणसांचा संभ्रम त्यामुळे अजूनच वाढला.
कार्ल सेगनचा नकार का?
निवेदनात फलज्योतिषातील तत्वे व संकल्पना ही निरर्थक कशी आहेत? केवळ भौतिक परिणामाचा भाग न घेता त्यांचा योग्य तो समाचार त्यात घेवून त्यावर का विश्वास ठेवू नये अशी मांडणी त्यात नव्हती. केवळ वैज्ञानिक सांगतात म्हणून ते खरे असा काहीसा सूर त्या निवेदनात होता. केवळ याच कारणासाठी कार्ल सेगनचा नकार होता. हे त्याने स्पष्टही केले होते. पण समर्थकांनी आपल्याला हवा तसा अर्थ त्यातून काढला.
मिशेल गॉकेलिन या फ्रेंच शास्त्रज्ञाने अशा संशोधनातून जे निष्कर्ष काढले ते सकृत् दर्शनी जरी फलज्योतिषाला अनकूल वाटत असले तरी एकतर त्याचे संशोधन वादग्रस्त ठरले आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज प्रचलित असलेल्या फलज्योतिषात भविष्य वर्तवण्यासंबंधीचे जे सिद्धांत किंवा ठोकताळे आहेत त्यांना या निष्कर्षांचा काहीएक उपयोग नाही. दुसऱ्या अनेक संशोधकांनी जे संशोधन केले आहे त्यातून फलज्योतिषाला अनुकूल असे निष्कर्ष निघालेले नाहीत. तरीपण तेवढ्यामुळे हे शास्त्र खोटे आहे असे स्पष्ट म्हणायची तिकडच्या संशयवादी म्हणजे 'स्केप्टिकल` तज्ज्ञांची अजून तयारी नाही. त्यांच्या मते एम्पीरिकल संशोधन अजूनही चालूच ठेवले पाहिजे, त्याच्यामुळेच सत्य काय आहे ते कळले तर कळेल, दुसरा काही मार्ग नाही. 'एन्सायक्लोपिडिया ऑफ द पॅरानॉर्मल` नावाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्य ग्रंथात जॉफ्रे डीन या ज्येष्ठ शास्त्रज्ञाने ऎस्ट्रॉलॉजी या सदराखाली लिहिलेल्या परिच्छेदात हे मत व्यक्त केले आहे. ज्योतिषसमर्थकांना ही परिस्थिती सोयीस्कर अशीच आहे.

५२) जर ज्योतिष हे शास्त्र नाही तर वर्तमानपत्रे व नियतकालिके राशीभविष्ये का छापतात?
तो एक केवळ लोकप्रियतेचा भाग असतो. केवळ तुमची जन्मरास एवढाच निकष लावून राशी भविष्य वर्तवणे हे 'फलज्योतिषकीय` दृष्टया सुद्धा 'अशास्त्रीय`च असतं. कारण त्यात लग्नराशी, ग्रहयोग, स्थानबल यांचा विचार नसतो. भारताची लोकसंख्या ९६ कोटी मानली तरी एका राशीचे सरासरी आठ कोटी लोक असतात. मग राशी भविष्यात अगदी वाट्टेल ते लिहीलं तरी ते कुणाना कुणाला अगदी अचूक लागू पडत असतं. कुणाचं तरी प्रमोशन असतं, कुणाचा तरी अपघात असतो, कुणाचा विवाह ठरत असतो, कुणाला सौद्यात फायदा किंवा तोटा होत असतो. निरनिराळया नियतकालीकातलं एकाच राशीचं भविष्य अगदी वेगळं असतं, अगदी परस्पर विरोधी सुद्धा असतं. वस्तुत: पुरोगामी समजणारी नियतकालिके सुद्धा राशी भविष्ये छापतात. कारण आपण ती छापली नाहीत तर खपावर काय परिणाम होईल हे त्यांना माहीत असते. केवळ प्रबोधन वा तत्वनिष्ठा बाळगून चालत नाही. अर्थकारणही बघावं लागतं. राशी भविष्य न छापणारी नियतकालिके अगदी कमी. न्यूयॉर्क टाईम्स वा अन्य पाश्चात्य नियतकालिकं सुद्धा राशी भविष्य छापतात. पण सिगारेटच्या पाकिटावर जसा ' सिगारेट ओढणे आरोग्यास अपायकारक आहे.` असा वैधानिक इशारा लिहीलेला असतेा तद्वत त्यावर तो एक करमणुकीचा भाग आहे. अशी टीप असते. ज्योतिषी म्हणतात कि 'भविष्यावर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे` असा छापील इशारा कुंडलीवर छापण्यास आमची हरकत नाही. सिगारेटच्या पाकिटावरील इशारा वाचून सिगारेट ओढण्याचे सोडून दिले अशी उदाहरणे किती सापडतात? असा प्र्रतिप्रश्न ते उपस्थित करतात. शिवाय अंकात छापलेल्या सर्व गोष्टींशी संपादक सहमत असतीलच असेही नव्हे. श्री. माधव गडकरी यांनी ते संपादक असताना राशी भविष्य हे सदर स्वत:च आलटून पालटून मजकून टाकून एकदा चालवले होते असे प्रतिपादन केले होते.

५३) आमचा फलज्योतिषाचा अभ्यास नाही, तरी पण ते शास्त्र भ्रामक आहे हे आम्हाला कसे कळावे ?
अशिक्षित भाजीवाल्या बाईला गणिताचा पुस्तकी अभ्यास असावा लागतो का? पाच अधिक पाच बरोबर दहा हे समजायला रॅन्गलर व्हावे लागते का? शितावरुन भाताची परीक्षा घ्यायला काय बल्लवाचार्य व्हायला लागते? सर्वसाधारण तर्कबुद्धी जागृत ठेवली तरी या शास्त्राचा भ्रामकपणा समजू शकतो. प्रयोगशिलता असेल तर उत्तमच.
या बाबत ज्योतिष विज्ञान मंडळातला एक किस्सा सांगतो. एका ज्येष्ठ ज्योतिषप्रेमी व्यक्तीने एक कुंडली आणली. स्पष्टग्रह, भावचलित या सूक्ष्म बाबींसह ती फळयावर मांडली. 'या व्यक्तीला मी ओळखतो, तसेच कुंडलीच्या खरेपणाबाबत शंका नको.` असे सांगितले. या जातकाचा सामाजिक, आर्थिक, बोैद्धिक दर्जा काय असेल? असा प्रश्न विचारला. प्रत्येकाने विश्लेषण करून हा आलेपाकवाला असेल, शिपाई असेल, कारकून असेल अशा प्रकारचे काहीतरी सांगितले. कारण कुंडलीत कुठलाही ग्रह स्वगृही, उच्चीचा नव्हता. नवपंचम योग नव्हता. अतिसामान्य अशी कुंडली होती. पण वस्तुस्थिती म्हणजे ती व्यक्ती रिटायर्ड उच्चपदस्थ, सामाजिक कार्यात पुढाकार घेणारी, दोन्ही मुले अमेरिकेत सुस्थितीत. बंगला, गाडी, नोकरचाकर, मानसन्मान लाभलेली अशी होती. मग आता वस्तुस्थितीचा अन्वयार्थ ग्रहयोगाशी लावण्याचे प्रकार सुरू झाले. भाकीत तर सोडाच. पण साधा वर्तमान काळ सुद्धा जर सांगता येत नाही तर जातकाचे भविष्य काय डोंबलं सांगणार? जन्मकुंडली ही जन्माच्या वेळच्या ग्रहस्थितीवर जर आधारित असेल तर 'वर्तमान काळ` हे त्यावेळच्या संदर्भाने भविष्यच असतं. त्याच तर्काने भूतकाळ हा सुद्धा तपासता येईल असा ताळा ठरतो.
तुम्ही सुद्धा ज्योतिषांच्या मदतीने याबाबत एक ब्लाईंड टेस्ट करून पाहू शकता. प्रश्न जोडया लावा. अ गटात १५ प्रकारचे पेशे- डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक, कलाकार, राजकारणी वगैरे वगैरे. डॉक्टर म्हणजे वैदू पासून ते सर्जन पर्यंत जो औषध देतो तो. शिक्षक म्हणजे प्राथमिक, माध्यमिक, प्राध्यापक, अगदी खाजगी शिकवणी घेणारासुद्धा, इतका साधा निकष. ब गटात ३० कुंडल्या त्यापैकी पंधरा त्या अ गटातील संबंधित व्यक्तिंच्याच आणि पंधरा या केवळ अतिरिक्त. सर्व डाटा अस्तित्वात असलेल्या व्यक्तिंचाच व खरा. ज्योतिषांच्याच संग्रहातील डाटा घ्या. व तुम्हीच प्रयोग करा. ८० टक्के जोडया जमल्या पाहिजेत. २० टक्के टॉलरन्स. बघा ज्योतिषी कुणी अशा प्रयोगांना तयार होतात का?
कुंडलीवरुन स्त्री का पुरुष? जिवंंत का मृत? विवाहित का अविवाहित? या साध्या वर्तमान काळातल्या गोष्टी सुद्धा जर सांगता येत नाहीत तर ते शास्त्र भविष्य काय सांगणार? वर्तमानाच्याच मर्यादा असणारे हे शास्त्र भविष्यात घडणाऱ्या घटना सांगते हे आपल्या तर्कबुद्धीला पटते का?

५४) राजकारणी सिनेनट व्यावसायिक हे वेळोवेळी ज्योतिषाचा सल्ला घेतातच की?
राजकारण, सिनेनाटय, व्यवसाय-धंदा या सर्व प्रकारात अनिश्चितता, चढ-उतार हे नेहमीच असतात. राजकारणात प्रतिस्पर्ध्याचे वर्चस्व, पक्षनिष्ठा, तुमच्या मागे असणारे पाठबळ, बंडखोरी, मंत्रीमंडळात वर्णी लागण्यासाठी केलेले प्रयत्न, स्वकीयांची नाराजी, गटबाजी असे कितीतरी घटक हे तुमच्या कर्तबगारीवर परिणाम करणारे असतात. सिनेक्षेत्रात सुद्धा लोकप्रियता, ग्लॅमर, संधीची उपलब्धतता हे घटक अनिवार्य असतात. एखादा चित्रपट सपाटून आपटतो तर एखादा गल्लाभरू चित्रपट सुद्धा बाजी मारून जातो. रात्रीतून एखादा स्टार बनतो तर एखादा गुणवत्ता असूनही बाजूला फेकला जातो. व्यवसायात सुद्धा कधी तुम्हाला अचानक संधी उपलब्ध होवून तुम्ही टॉपला जाता तर कधी तुमची चूक नसतानाही गाळात जाता. अशा गोष्टी मनाला अस्थिरता निर्माण करतात. भविष्य हे अज्ञात असल्याने कुठलाही अंदाज येत नाही. मग दिलासा मिळण्यासाठी पाहू या ग्रहांची साथ काय म्हणते? असे करत ज्योतिषाला जवळ केले जाते. प्रोडयूसर तर चित्रिकरणाच्या मुहूर्तापासून ते चित्रपटाचे नांव 'अ` ने सुरूवात असणारे असावे की 'क` ने इथपर्यंत ज्योतिषाचा सल्ला घेतो. काही पंतप्रधान वा राष्ट्रपती सुद्धा मुहूर्तावर शपथविधी, मंत्रिमंडळविस्तार, वास्तुप्रवेश करतात. शिवाजी महाराज जर मुहूर्तावर लढाई करत बसले असते तर छत्रपती झालेच नसते.

५५) लोकांना अनुभव येतो म्हणूनच हे शास्त्र टिकले ना? नाहीतर ते एक निरूपयोगी शास्त्र म्हणून फेकले गेले नसते का?
संभाव्यताशास्त्र म्हणजे सायन्स ऑफ प्रॉबेबिलिटी. याचा मोठा उपयोग भाकिते वर्तवणाऱ्यांना होतो. याचे नित्य परिचयातले उदाहरण म्हणजे मुलगा होईल की मुलगी होईल याचे भाकीत. ते भाकीत पन्नास टक्के बरोबर येणारच असते, पण सामान्य लोक मात्र भाकीत बरोबर ठरल्याचे श्रेय ज्योतिषाला देतात. असे संभवनीयतेचे कितीतरी अनुभव तुमच्या दैनंदिन जीवनात येत असतात. उदा. तुम्ही एखाद्याची आठवण काढायला आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटायला किंवा फोन यायला, तुम्ही एखादे गाणे गुणगुणायला आणि नेमके तेच गाणे रेडिओवर लागायला. एखाद्या घटनेची भीती व्यक्त करायला व ती घटना घडायला एकच वेळ येते. पण हीच संभवनीयता जर ज्योतिषाकडून व्यक्त झाली आणि त्याप्रमाणे घटना घडली तर मात्र ते प्रत्यंतर वा प्रचिती. या संभवनियतेविषयी दीड हजार वर्षांपूर्वी भट्ट नारायण लिखित 'वेणीसंहार` नाटकात दुर्योधनाच्या तोंडी एक वाक्य घातले आहे. ते म्हणजे-
ग्रहाणां चरितं स्वप्नो निमित्तान्युपयाचितम् ।
फलन्ति काकतालीयं तेभ्य: प्राज्ञा न बिभ्यति ।।

अर्थ :- ग्रहांंच्या गती, स्वप्न, शकुन, नवस हे काकतालीय न्यायाने फळतात. शहाणे लोक त्यांना घाबरत नाहीत.
भविष्यात काय वाढून ठेवलेले आहे ते जाणून घेण्याची उत्कंठा प्रत्येकालाच असते. ती उत्कंठा भागवणारा कुणीही माणूस दिसला की लोक त्याच्यामागे लागतात. समजा, तुम्हाला हस्तरेषांतले काहीही कळत नाही, तरी पण तसा आव आणून व थोडी हुषारी वापरून तुम्ही जरा थापा मारायला सुरुवात करा. लगेच तुमच्या परिचयातले लोक, मुलं, मुली सुद्धा हात पुढे करतील, याचा अनुभव घेऊन पहा! तुम्हाला ज्योतिषातले थोडेफार कळते एवढा सुगावा लागायचाच अवकाश की तुमच्या आप्त परिवारातले लोक तुम्हाला आपले भविष्य सांगायचा आग्रह धरतात की नाही ते पहा. एवढे लांब कशाला, पेपरात येणा या राशी-भविष्याचा तुमचा स्वत:चा काय अनुभव आहे त्याचा विचार करा. त्या भविष्यात काही अर्थ नसतो हे ठाऊक असूनही तुम्ही अधूनमधून का होईना पण तुमच्या राशीचे भविष्य वाचताच ना! "राशीचक्र" चा प्रयोग पाहून आलेल्या प्रेक्षकांना त्यांचे मत विचारा, करमणूक भरपूर झाली, राशींची वर्णने काही पटली, काही नाहीत असेही म्हणतील, तरीपण प्रयोगाची लोकप्रियता काही कमी व्हायची नाही!
हे शास्त्र जर भ्रामक असेल तर त्याचे अनुभव लोकांना कसे येतात ? या शंकेचे उत्तर असे आहे की, नरबळी देणे, चेटूक, जारणमारण, भानामती, भूत काढणे, जट येणे, शुभ-अशुभ शकुन, गणपती दूध प्याला अशा कितीतरी वेडगळ अंधश्रद्धांंचे अनुभव लोकांना येत असतात म्हणून तर त्या आजवर टिकून राहिलेल्या आहेत. फलज्योतिषाचेही असेच अनुभव लोकांना येत असतात, पण त्या अनुभवांच्यामुळे हे खरे शास्त्र आहे असे सिद्ध होत नाही. वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन शक्यतेच्या आधारे वर्तवलेली 'भाकिते` वेगळी व फलज्योतिषाच्या आधाराने वर्तवलेली भाकिते वेगळी, पण दोन्हींची गल्लत लोक करतात. भाकिते खरी ठरली तरी त्यामागचा कार्यकारणभाव न तपासताच खरी ठरलेली भाकिते जणू काही ज्योतिषाचा वस्तुनिष्ठ पुरावा म्हणून गणले जाते. आता हे भाकीत पहा :- ' तुमच्या मुलाला लवकरच नोकरी लागेल व ती यंत्राशी संबंधीत असेल.` आता कुठेही नोकरी लागली तरी या यंत्रयुगात यंत्राशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध येतोच. खऱ्या ठरलेल्या भाकितांची यादी जशी देता येते तशी खोटया ठरलेल्या भाकितांची यादी पण देता येते. चुकलेली भाकिते लोक विसरून जातात पण खरी झालेली भाकिते मात्र पक्की लक्षात ठेवतात. अशा अनेक कारणांमुळे फलज्योतिषाला एक फसवी प्रतिष्ठा लाभते.

जे का रंजले गांजले ...!
सतत प्रतिकूल परिस्थितीशी झगडता झगडता मेटाकुटीस आलेल्या माणसाला कुणीतरी धीर देणारा माणूस हवा असतो. ज्योतिषी ती गरज भागवतो. अमुक अनिष्ट ग्रहाची दशा दोन महिन्यांनी संपून तमुक शुभ ग्रहाची दशा सुरू होईल, असे काहीतरी ज्योतिषाच्या तोंडून ऐकले म्हणजे त्या बिचाऱ्याला हुरूप येतो. ज्योतिषी त्याला काही तरी दैवी उपाय करायला सुचवतो, त्याचा तरी निदान उपयोग होईल अशी आशा त्याला वाटते.
माणसाच्या स्वभावाची एक गंमत आहे. देव नवसाला पावला तर ती देवाची कृपा, नाही पावला तर आपलेच नशीब वाईट, असे स्वत:चे समाधान माणूस सहज करून घेतो. ज्योतिषाचे तसेच असते. एखादे चांगले भाकीत बरोबर ठरले की ती ज्योतिषशास्त्राची किमया, खोटे ठरले तर तुमचे नशीबच फुटके! चुकलेली दहावीस भाकिते कुणाला आठवायची नाहीत, पण एक बरोबर ठरलेले भाकीत मात्र लोकांच्या लक्षात पक्के रहाते, आणि त्याची तोंडोतोंडी प्रसिद्धी होत जाते. चुकला तर ज्योतिषी चुकला कारण तो माणूस आहे त्याच्या ज्ञानाला मर्यादा आहेत पण बरोबर आलं तर फलज्योतिष बरोबर आलं ही मानसिकता ज्योतिषांनीच रूजविली आहे.
फलाण्या थोर माणसाने आपल्या मृत्यूचा दिवस कुंडलीवरून आधीच वर्तवून ठेवला होता, आणि बरोबर त्याच दिवशी त्याला मृत्यू आला, असे किस्से अनेकदा ऐकायला मिळतात. ज्याला आपल्या मरणाचा दिवस किंवा वेळ आधीच अचूक कळली तो माणूस थोर, अशी समजूत प्रचलित आहे. ते किस्से खरे असतील तर त्याचा अर्थ असा होतो की कुंडलीवरून मृत्यूची तारीख बरोबर सांगता येते. तसे असेल तर मेलेल्या माणसांच्या पाच-दहा कुंडल्या ज्योतिषाला दिल्या तर निदान एका तरी कंुडलीवरून त्या माणसाच्या मृत्यूची तारीख बरोबर सांगता यायला पाहिजे, पण तसे होत नाही. हा तिढा टाकल्यावर ज्योतिषी कबूल करतात की कुंडलीवरून मृत्यू अचूकपणे वर्तवता येत नाही, पण मृत्यूची शक्यता मात्र वर्तवता येते! 'शक्यता` या शब्दाच्या प्रांतात एकदा शिरल्यावर मूळ प्रश्नाला अनेक फाटे फुटतात, आणि त्यात उत्तर हरवून जाते. सांगायचा मुद्दा हा की, मृत्यूची अचूक भाकिते कुंडलीवरून वर्तवल्याच्या कथा कर्णोपकर्णी फैलावत जातात, पण त्यांची शहानिशा करणे दुरापास्त असते. लोकांना मात्र वाटत रहाते की ज्योतिष किती महान शास्त्र आहे! थोडक्यात संभवनियतेनुसार खरी ठरलेली भाकिते आणि जातकाला मिळालेले मानसिक समाधान वा आधार यालाच तो 'अनुभव` म्हणतो.

५६) फलज्योतिषाचा मानसिक आधार म्हणून वापर होत असेल तर त्यात वाईट काय?
केवळ तशी परिस्थिती नाहीये. सुखासुखी ज्योतिषाकडे जाणाऱ्या माणसांचे प्रमाण फारच कमी. काही ज्योतिषी लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेतात. प्रथम मानसिक खच्चीकरण करून, भीती निर्माण करून त्यानंतर ग्रहशांती, जपजाप्य, नारायण नागबळी सारखे विधी सांगून दक्षिणा घ्यायची व मानसिक समाधान वा आधार द्यायचा. हा कुठला आधार? ग्रहांचे खडे घातल्याने अनिष्ट ग्रहांच्या प्रभाव लहरी थोपवल्या जातात असा समज पसरवून धंदा करणारे ही ज्योतिषी भरपूर आहेत. बोलका पत्थरवाले पटवर्धन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. विधीपूर्वक पूजा करून श्रद्धेने तोडगे केल्यास फायदा होतो. समजा नाही झाला तर तुमची श्रद्धा कमी पडली किंवा तुमच्या कडून विधी पाळले गेले नसतील ही पळवाट आहेच. विवाह जुळवताना पत्रिका बघताना सुद्धा आयुष्यातला महत्वाचा निर्णय हा ज्योतिषांवर सोपवला जातो. गुणमेलन, मंगळ, एकनाड या सारख्या गोष्टींना भीतीपोटी महत्व दिले जाते. विषाची परिक्षा कशाला घ्या? वैवाहिक जीवनात घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींचा संबंध मंगळाशी पत्रिकेशी जोडला जातो. वैधव्याचा योग आहे, आश्लेषा नक्षत्र सासूस वाईट आहे, कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला धोका आहे. वगैरे भीती घालून व्यावहारीक दृष्टया सुयोग्य अशी स्थळं सुद्धा नाकारली जातात. व्यावसायिक, सट्टेबाज, राजकारणी हे लोक फलज्योतिषाचा आधार घेताना दिसतात कारण त्यांच्या जीवनात चढ-उतार सतत असतात. जिथे अनिश्चितता आहे त्या ठिकाणी माणसाला आधाराची गरज निर्माण होते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक विवंचना असतात त्यावेळी रंजल्या गांजल्यांचा आधार म्हणून फलज्योतिषाकडे बघितले जाते. मग काही लोक विचारतात जर फलज्योतिषाचा मानसिक आधार म्हणून वापर होत असेल तर त्यात वाईट काय? दारू, गांजा, अफू यामुळे माणूस आपली दु:खं काही काळ का होईना विसरतो म्हणून त्याने व्यसनात बुडून जाणे हा काय त्यांच्या दु:खावरचा ईलाज झाला का? आमच्या परिचयात एक गृहस्थ आहेत. त्यांना एका ज्योतिषाने मृत्यूचे भाकीत सांगून हादरवून टाकले. त्यानंतर त्यांनी अनेक ज्योतिषांकडे हा फीडबॅक घेवून चकरा टाकल्या. सर्वांचे खिसे भरले. काहींनी त्यांना चारसहा महिने काहींनी वर्ष दोनवर्ष मुदतवाढ दिली. अत्यंत मानसिक तणावात त्यांनी काही वर्ष काढली. त्यातील फोलपणा आम्ही समजावून द्यायचा प्रयत्न केला. पण त्यासाठी सुद्धा काही वर्ष जावी लागली. सात आठ वर्ष उलटून गेली तरी त्यांना काही झाले नाही. मग मागे वळून पहाताना आता त्यांना वाटतं उगीच आपण हा काळ तणावात घालवला. मनुष्य अमर थोडाच आहे?
उठसूट ज्योतिषाकडे जाउ नये असे काही जेष्ठ ज्योतिषांनीच सांगितले आहे. कमकुवत मनाला सतत आधाराची गरज लागत असते. 'बुडत्याला काडीचा आधार` या म्हणीतच एक प्रश्न लपलेला आहे. बुडणाऱ्या माणसाला आधारासाठी काडी पुरेल का? माणसाचं मन कमकुवत झालं की त्याला कशाचाही आधार पुरतो. बहिणाबाईंच्या 'मन वढाय वढाय` कवितेत मनाच सुंदर वर्णन आहे. मनाला तार्किक, बुद्वीप्रामाण्य कसोटया लावता येत नाही. मन खंबीर करण्यासाठी आवश्यक अशी उपाययोजना केली तर सतत उठसूट ज्योतिषाचा आधार लागण्याची मानसिकता निर्माण होणार नाही. लहान मूल सुद्धा स्वत:च्या पायावर उभे रहाण्यासाठी आवश्यक तेवढाच आईचा आधार घेतं. नंतर आईचा हात सोडूनच चालायला शिकतं ना? खाचखळग्याच्या रस्त्यावर, अवघड ठिकाणी गिर्यारोहक सुद्धा काठीचा, दोराचा आधार घेतातच ना! पण तो तेवढयापुरताच. आधार घ्यावा लागणं ही गोष्ट स्वाभाविक आहे. पण हा आधार विवेकपूर्ण असावा.

५७) मग ज्योतिषाकडे जाणाऱ्या माणसाला तुम्ही काय पर्याय द्याल?
फलज्योतिषाकडे येणारे लोक विविध प्रकारचे असतात. कुणी हताश होवून येतो. कुणी मार्गदर्शनासाठी येतो. कुणी उत्सुकतेपोटी येतो. भविष्यात काय होण्याची शक्यता आहे या एकाच प्रश्नाचे उत्तराभोवती सर्व जण येवून ठेपतात. नैराश्यापोटी आलेल्या लोकांना मन व मनाचे आजार याविषयी योग्य माहीती दिली गेली पाहिजे. चिंता, नैराश्य हे मनाचे आजार आहेत. मानसोपचार तज्ञांचा सल्ला व मानसोपचारावरील योग्य औषधांनी ते बरे होतात. शिवाय कौन्सिलिंग सेन्टर्स हे पण तुमच्या समस्या समजावून घेवून त्यावर कायदेशीर व व्यावहारिक उपाययोजना सुचवतात. सर्वांचे सर्व प्रश्न सुटतीलच असं नाही. वैज्ञानिक दृष्टिकोणाचा अवलंंब केला तर तर्कबुद्धी, विवेक व आत्मनिरीक्षण यांच्या सहायाने आपले काही प्रश्न सुटू शकतात. अनिश्चितता ही सर्वांसाठी आहे. ती पचवायला शिकलं पाहिजे. जी गोष्ट आपल्या हातात नाही त्या पेक्षा जी गोष्ट आपल्या हातात आहे तिचा विचार केला पाहिजे. प्रयत्न ही आपल्या हातातली बाब आहे. अपयश ही यशाची पायरी आहे.
सद्यस्थितीत विवाह जुळवण्याची पद्धत ही सदोष आहे. एकमेकाचे व्यक्तिमत्वाचा अंदाज न घेता केवळ पत्रिकेचा आधार घेणे हे तर्कशुद्ध नाही. विवाहाचे बाबतीत कुंडल्यांवरून निर्णय घेण्याच्या ऐवजी जर परिचयोत्तर विवाह ही संकल्पना स्विकारली तर एकमेकाला पूरक असे व्यक्तिमत्व जुळून विवाह यशस्वी होण्याची शक्यता अधिक वाढेल. सध्या काही सामाजिक संस्था असे वधूवर सूचक केंद्रे चालवतात. मेळावे आयोजित करतात. पुण्यात 'मिळून साऱ्या जणीं` ची साथ साथ ही एक अशीच संस्था आहे. यशस्वी वैवाहिक जीवनासाठी तडजोड ही बाब अत्यंत आवश्यक आहे. भविष्याविषयी उत्सुकता असणे स्वाभाविक असले तरी त्यासाठी फलज्योतिषाचा आधार घेवून त्यावर निर्णय घेणे हे संयुक्तिक नाही. फलज्योतिषाकडे वळण्याचे मूळ कारण तपासून पाहिले तर आपल्याला अदृष्टाची भीती व अज्ञाताविषयी वाटणारे गूढ हेच आहे. त्याला व्यवहारोपयोगी असे पर्याय दिले तर नक्कीच हा ओढा कमी होईल.
लहानपणापासून मनावर झालेल्या संस्कारांचे जोखड फेकून देणे अवघड असते. ज्योतिषांची भाकिते खरी ठरल्याच्या गोष्टी नेहमी कानावर पडत असतात. दोन-अडीच हजार वर्षांच्या या पुराण्या शास्त्राला एकदम बोगस कसे म्हणावे अशी धास्ती वाटते. पण जुना धोपटमार्ग सोडून नव्या वाटेने जायला जे धैर्य लागते ते सुशिक्षित लोकांनी दाखवावे, कारण त्यात समाजाचे हित आहे असे आम्हाला वाटते.

५८) दोन तज्ज्ञ डॉक्टरांची तरी कुठे एकसारखी मते असतात मग दोन ज्योतिषांची भाकिते सारखीच असली पाहिजेत असा आग्रह का?
मूळातच ज्योतिषी व डॉक्टर यांची तुलनाच चुकीची आहे. रोग्यावर औषध, उपाय योजना करताना अनेक तपासण्या व आवश्यक ती सावधगिरी बाळगावी लागते. कारण हा एखाद्या व्यक्तिच्या जीवाचा प्रश्न आहे. ज्योतिषाचे भाकीत चुकले म्हणून काही कोणाचा जीव जात नाही. वैद्यकीय क्षेत्रात जी प्रगती झाली आहे त्यामुळे माणसाचे सरासरी आयुर्मान वाढले आहे हे सत्य नाकारता येत नाही. मधुमेह, हृदयविकार, कर्करोग या सारख्या रोगांवर अत्याधुनिक तपासण्यांवरुन रोगनिदानात एकमत होण्यात अडचण येत नाही. त्यावरील उपाययोजनांच्या बाबत कदाचित मत भिन्नता असू शकते. सर्वच रोगांवर रामबाण ईलाज झाले असते तर मनुष्य अमर झाला असता. तज्ज्ञ डॉक्टरांचे पॅनेल नेमून त्यांना रोगनिश्चिती साठी मधुमेह, कर्करोगी, मेंदूज्वर, हृदयविकार, अल्सर वगैरे निश्चित आजाराचे भिन्न रुग्ण तपासणी साठी दिले तर आधुनिक तपासण्यांच्या सहायाने रोगनिदान नक्की करता येते. तसे ज्योतिषांचे पॅनेल तयार आहे का? वैद्यकशास्त्रात संशोधन व विकास सतत चालू असतो तसे ज्योतिषशास्त्रात आहे का? अहो, ज्योतिषसमर्थकच असे म्हणतात की, हे दैवी शास्त्र असल्याने याला आधुनिक विज्ञानाचे निकष लागू होत नाहीत. मग तुम्हीच सांगा कशी तुलना करायची?

५९) विज्ञान तरी कुठे परिपूर्ण आहे? मग ज्योतिषशास्त्र तरी कसे परिपूर्ण असेल?
ज्योतिषशास्त्र परिपूर्ण असावे असे आमचे म्हणणे नाही. पण किमान अपूर्ण असण्याची तरी पात्रता त्यात आहे का? मूळात विज्ञानाची परिपूर्णता वा अपूर्णता याचा संबंध ज्योतिषशास्त्राशी जोडणे हाच एक कांगावा आहे. अहो जी गोष्ट शास्त्राच्या निकषांवर उभीच राहू शकत नाही तिची तुलना तुम्ही विज्ञानाशी करता कशाला? ज्योतिषाच्या मर्यादा मान्य करुनसुद्धा त्या मर्यादेपर्यंत तरी आम्ही अमूक गोष्टी सांगू शकतो असे म्हणण्यात सुद्धा एकवाक्यता नाही. आम्ही याविषयी प्रयोग केले आहेत. एका गृहस्थाच्या मुलाने तरुणवयात अमेरिकेत आत्महत्या केली. आम्ही त्याची प्रथितयश ज्योतिषाने बनविलेली कुंडली एका ठाण्याच्या ज्योतिषाला त्याच्या मागणीवरुन पाठविली. त्यासोबत जन्मवेळ, जन्मस्थळ व जन्मतारीख ही पाठविली. आम्ही सगळी माहिती खरी दिली व फक्त मृत्यू हा कसा व १९८० ते १९९० या काळात कुठल्या वर्षी झाला असेल एवढेच विचारले. त्याला ज्योतिषाने तयार केलेली कुंडली पाठविली. ती कुंडलीसुद्धा चुकीची निघाली. त्याने ती स्वत: तपासून नवीन बनविली व त्यावरुन एक वर्ष दिले ते मृत्यू वर्षाच्या जवळपाससुद्धा नव्हते. सदर आवाहन हे धनुर्धारी मे २००० चा अंक या ज्योतिषांच्या व्यासपीठावरच मांडले गेले होते. आता कुणी म्हणेल की एखादा ज्योतिषी चुकला म्हणून काय शास्त्र चुकीचे का?
आपल्या सोयीप्रमाणे कधी ज्योतिषाला कधी आधुनिक विज्ञानाच्या पंक्तीत आणून बसवायचे तर अडचण आली की दैवी शास्त्र म्हणून मोकळे व्हायचे. हा दुटप्पीपणा जनतेला इतके दिवस खेळवतो आहे. विज्ञान हे चिकित्सेला सतत खुले असते. ते व्यक्तीसापेक्ष नसते. अमुकएक गोष्ट प्रमाण असे प्रामाण्य त्यात अजिबात नसते. त्यात निष्कर्षांना पुष्टी मिळाल्यावर बदलही होत असतो. सर्व प्रश्नांची उत्तरे विज्ञानाच्या चौकटीत बंद नसतात. तसे असते तर तर वैज्ञानिक प्रगती झालीच नसती. काही प्रश्नांची उत्तरे मिळताना काही नवे प्रश्न निर्माण होतच असतात. विज्ञान म्हणजे अंतिम सत्य असा विज्ञानाचा कधीही दावा नव्हता व नाही.

६०) फलज्योतिष हे विज्ञान नसेना का पण उपयुक्त तर आहे?

त्याची उपयुक्तता कोणास व कशी यावर ते अवलंबून आहे. दारुच्या आहारी गेलेल्या माणसाला दारु ही त्याच्यासाठी उपयुक्तच नव्हे तर उपकारकही वाटत असते!
प्रथम, ते उपयुक्त का नाही, इतकेच नव्हे तर ते उपद्रवकारक का आहे ते पाहू. एक सश्रद्ध गृहस्थ ज्योतिषाकडे कधीही जात नसत. त्याचे कारण सांगताना ते म्हणाले, ''हात दाखवून अवलक्षण का करून घ्यायचे?`` याचा अर्थ असा की भविष्यात घडणार असलेल्या प्रतिकूल घटना आधी कळून घेउन उगीच मन:स्ताप कशाला करून घ्यायचा ? जे होणार आहे ते अटळ आहे हे जर खरे असेल तर ते आधी कळण्याने काय फायदा ? नसत्या विवंचनेला आपण होउन का आमंत्रण द्यायचे ?
यावर ज्योतिषीलोक जो युक्तिवाद नेहमी करतात तो असा. चक्रीवादळ टाळता येत नाही म्हणून वेधशाळेने ते वर्तवूच नये का? पुढे येणार असलेल्या प्रतिकूल परिस्थितीची आधी कल्पना आली तर माणूस त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करू शकतो. प्रतिकूल परिस्थितीची तीव्रता कमी व्हावी यासाठी व्यवहारी किंवा दैवी उपाय योजू शकतो. उन्हाळा आहे कडकडीत उन थोपवणे काही आपल्या हातात नाही पण चपला घालणं, टोपी घालणं, छत्री घेणं हे तर आपल्या हातात आहे ना! त्यामुळे उन्हाचे चटके तर बसत नाहीत ना.
या युक्तिवादात हे गृहीत धरण्यात आले आहे की ज्योतिष्यांना आगामी घटनांची कल्पना आधी निश्चितपणे येउ शकते. आणखीही एक गोष्ट नकळत गृहीत धरली आहे ती म्हणजे जे होणार आहे ते पूर्णपणे अटळ नाही. त्यात माणसाच्या प्रयत्नाने थोडाफार फेरबदल होउ शकतो. ही दोन्ही गृहीतकृत्ये वादग्रस्त आहेत. चक्री वादळाचे उदाहरण इथे गैरलागू आहे. वेधशाळेने चक्रीवादळ वर्तवल्यामुळे ते टाळता आले नाही तरी त्याची सत्यता तपासता येते. उपग्रहाद्वारे त्याचे चित्रण बघता येते. चक्रीवादळांचे अंदाज तपासता येतात कारण त्यांचा संख्यात्मक अभ्यास उपलब्ध असतो. परंतु ज्योतिषांच्या भााकितांबाबत असा अभ्यास केला जात नाही. फलज्योतिषाचे अनिष्ट भाकित योगायोगाने खरे ठरले तर 'बघा! सांगितले होते. पण ऐकले नाही.` असे म्हणता येते. खोटे ठरले तर 'योग्य ते उपाय, तोडगे केले म्हणून अरिष्ट टळले` असेही म्हणण्याची सोय आहे.
प्रतिकूल परिस्थितीने हैराण झालेला माणूस ज्योतिष्यांचा सल्ला घेण्यासाठी पैसे खर्च करीत असतो. चांगल्या गोष्टी घडणार असल्याचे भाकीत सांगून ज्योतिषी त्याला दिलासा व आधार देउ शकतो, किंवा आताचे वाईट दिवस लवकरच संपणार आहेत अशी मनाला उभारी देउ शकतो हे जरी खरे असले तरी त्यासाठी त्या बिचााऱ्याचा आधीच हलका झालेला खिसा आणखी हलका होत असतो. भरल्या गाडीला सुपाचे काय ओझे? या विचाराने दैवी उपाय करण्यासाठी प्रसंगी माणूस कर्जसुद्धा काढतो. फलज्योतिष हे जर खरोखरीच विश्वसनीय शास्त्र असते तर हा खर्च कारणी लागला असे म्हणता आले असते. पण तशी वस्तुस्थिती नाही, आणि हेच तर आम्हाला पुढे सांगायचे आहे.
पत्रिका पहाण्याच्या प्रथेमुळे लग्ने जुळवण्यात येणाऱ्या अडचणीत आणखीच भर पडते. पत्रिका जुळून केलेले विवाह सुखाचे ठरतात असे जर हमखासपणे सिद्ध झाले असते तर ही अडचण सोसायलाही हरकत नाही असे म्हणता आले असते. पण वस्तुस्थिती तशी नाही हे सर्वांना माहीत आहे.
आता उपयुक्ततेबद्दल विचार करू. कुंडलीवरून माणसाचा नैसर्गिक कल कोणत्या गोष्टीकडे आहे ते कळते असे ज्योतिषी म्हणतात. तसे खरोखरीच कळत असेल तर ती फार चांगली गोष्ट आहे. पाशात्य देशात या अंगाने खूप संशोधन झालेले आहे. त्याचे निष्कर्ष फलज्योतिषाला बहुतांशी प्रतिकूल असेच निघालेले आहेत. म्हणजे त्याची उपयुक्ततासुद्धा वादातीतपणे सिद्ध झालेली नाही. आता ते मनोरंजन म्हणून उपयुक्त आहे असा दावा कुणी केला तर मात्र त्याची उपुक्तता आम्ही मान्य करु. कारण जगात शास्त्रज्ञांची चलती झाली म्हणून कवी लगेच ओस पडले असे दिसून येत नाही. उपयुक्ततेच्या मुद्याचेे यश हे ज्योतिषाच्या सामर्थ्यात नसून जातकाच्या मानसिकतेमध्येच आहे.

६१) अहो ज्योतिष विषय विद्यापीठात सुद्धा शिकवला जातो ते काय उगीच का?
विद्यापीठात तुम्हाला वेद, उपनिषद, पुराण या विषयांवर अभ्यास करुन डॉक्टरेट सुद्धा मिळवता येते. साहित्य, लोककला, इतिहास, संस्कृती, असे अनेक विषय विद्यापीठात घेतले जातात. त्यात अनेक उपविषय येतात. त्यात ज्योतिष हाही भाग आलाच. पण तो खगोल वा भौतिक विज्ञान या स्वरुपात नव्हे किंवा विद्यापीठाचा या विषयाशी संबंध आला म्हणजे त्याला विद्यापीठाची विज्ञान म्हणून मान्यता मिळाली असाही नव्हे. ज्योतिष हे वेदाचे अंग मानल्याने त्या अंतर्गतही तुम्हाला तो विषय पीएचडी साठी घेता येतो. विद्यापीठात असो वा नसो शैक्षणिक या अर्थान हा विषय खाजगी ज्योतिष संस्थांमध्ये पूर्वापार शिकविला जातो. त्यात ज्योतिष विशारद, ज्योतिष शास्त्री, होरा मार्तंड, ज्योतिष चंद्रिका, ज्योर्तिभूषण, ज्योतिर्भास्कर वगैरे पदव्या त्या त्या संस्थेमार्फत दिले जातात. हे अभ्यासक्रम पत्राद्वारे पण पूर्ण करता येतात. लंडनमध्ये सुद्धा डिप्लोमा ऑफ फॅकल्टी ऑफ अॅस्ट्रॉलॉजिकल स्टडीज असा एक डिप्लोमा आहे. शिवाय सध्या अनेक मुक्त विद्यापीठे आहेत. त्यातून काही ज्योतिषांनी डॉक्टरेट सुद्धा मिळवल्या आहेत.
फलज्योतिषाची पाश्चात्य देशातील स्थिती बाबत १९३५ साली प्रकाशित झालेल्या रा.ज.गोखलेे यांच्या 'फलज्योतिष चिकित्सा` या पुस्तकात ते म्हणतात:-
'अमेरिकेत स्मूमससलद येथे फलज्योतिषाचे कॉलेज आहे.` वगैरे विधानावरुन हे कॉलेज किंवा अशा दुसऱ्या संस्था ऑक्सफर्ड, केंब्रिज येथील कॉलेजसारख्या असतील असे कोणाला वाटेल; पण वस्तुस्थिती तशी नाही. ह्या विषयाचे शिक्षण देण्याकरीता काही संस्था काही लोकांनी काढल्या आहेत व पाश्चात्य देशात मतस्वातंत्र्याचे तत्व मान्य असल्याने काही मर्यादेपर्यंत कोणासही मान्य असणारी गोष्ट करू देतात. या तत्वास अनुसरून अशा संस्थेस सरकारने मनाई केली नाही एवढेच. पण अशा संस्थांना तिकडे शास्त्रज्ञात मान्यता नाही.
पाश्चिमात्य देशात काही तोतया युनिव्हर्सिटयाही असतात हे ध्यानात ठेवावे. इकडील काही लोकांना डॉक्टरेटची पदवी देणारी अमेरिकेतील 'ओरिएंटल युनिव्हर्सिटी` अशापैकीच होय. काही अडचणीमुळे ती सरकारास बंद करता आलेली नाही; पण तिचा पत्रव्यवहार पोस्ट ऑफिसने घेउ नये असा नियम तेथील सरकारने केला असल्याचे ऐकिवात आहे. सांगण्याचा अर्थ हा की पाश्चात्य देशातील 'कॉलेज` 'अकॅडमी` अथवा 'युनिव्हर्सिटी` एवढया नावावरून ती संस्था विद्वन्मान्य आहे असे मुळीच होत नाही.`
आजही अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट मध्ये केप्लर कॉलेज ऑफ अस्ट्रॉलॉजीकल आर्टस अॅण्ड सायन्सेस मध्ये फलज्योतिषाचे एम.ए व बी.ए चे पूर्ण अभ्यासक्रम आहेत. त्यात फलज्योेेतिष- मानसशास्त्र व समुपदेशन कला, फलज्योेतिष व आरोग्य, वैदिक परंपरा व फलज्योतिष, खगोलशास्त्र -फलज्योेतिष व संगणकविज्ञान, फलज्योतिष व नवविज्ञान, फलज्योतिषाचे तत्वज्ञान व आधुनिक सिद्धांत यासारखे विषय शिकवले जातात.
ज्योतिष हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कुठलीही डिग्री लागत नाही तसेच ज्योतिषातील सुद्धा पदवी लागत नाही. तुमचे भविष्य चुकले म्हणून तुमच्यावर कायदेशीर कारवाईही करता येत नाही. पण विद्यापीठातून वकिल, डॉक्टर अशी डिग्री घेवून व्यवसाय करणाऱ्यांवर मात्र चुकीच्या उपाययोजनेबाबत कायदेशीर कारवाई होउ शकते व त्यांची सनद रद्द होउ शकते.

६२) परदेशातील फलज्योतिष संशोधनावरची उदाहरणे नेहमी उगाळली जातात मग आपल्याकडे या विषयावर संशोधन का केले जात नाही?

संशोधनासाठी लागणारा पैसा हा सहजपणे उपलब्ध होत नाही. माहिती संकलन वा संपादन हा मूलभूत संशोधनासाठी आवश्यक असणारी बाब आपल्याकडे अपवादाने आढळते. अशासकीय संस्थांकडून सर्वेक्षण उपलब्ध करुन मग त्यावर संशोधन हा उपाय आहे पण मूळ प्रश्न असा की संशोधन कशासाठी? कुणासाठी? आणि करणार कोण? फलज्योतिष समर्थक म्हणतात हे शास्त्र आहे हे सिद्ध करण्यासाठी म्हणून जर संशोधन असेल तर त्याची आम्हाला गरज नाही. बहुसंख्य लोकांचा विश्वास, श्रद्धा व अनुभव हीच आमची सिद्धता. विरोधक म्हणतात कि जे शास्त्रच नाही त्यावर संशोधन करण्यात वेळ, श्रम व पैसा घालण्याची काय गरज आहे? फलज्योतिष हे शास्त्र आहे असे म्हणणाऱ्यांची आपले विधान सिद्ध करण्यासाठी संशोधन करणे ही जबाबदारी ठरते.
वि.म. दांडेकरांनी जेव्हा हा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना विश्वासार्ह डाटा मिळण्यात सुद्धा अडचणी आल्या. फलज्योतिषावरील संशोधन करण्यासाठी जन्मवेळ, जन्मतारीख व जन्मठिकाण हा महत्वाचा डाटा आहे. तो विश्वासार्ह मिळण्यासाठी हॉस्पिटल मधील बिनचूक नोंदणी असणे आवश्यक आहे. आपल्याकडे कुटुंबात सुद्धा व्यक्तिची ही माहिती बिनचूक असेल अशी खात्री नसते. समजा हा डाटा मिळाला तरी ग्रहयोग व मानवी जीवन यांचा परस्पर संबंध ही बाब तपासण्यासाठी कुठले मॉडेल सॅम्पल म्हणून निवडावे ? या विषयी एकवाक्यता नाही. चिकित्सक बुद्धीच्या विवेकवादी लोकांना असे वाटते की जर हे शास्त्र इतके लोकप्रिय आहे तर त्याच्यात खरोखरी काही तथ्य आहे की नाही ते आपणच तपासून पाहिले पाहिजे. ते तपासून पहाण्यासाठी त्यांच्यापुढे काही मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे या शास्त्राचा मुळापासून चिकित्सकपणे अभ्यास करुन त्यात काही तथ्य असू शकेल का ते ठरवायचे. हा मार्ग आम्ही निवडला व या शास्त्रात वैज्ञानिक दृष्टया तथ्य असणे का अशक्य आहे ते अन्यत्र दाखवून दिले आहे. दुसरा मार्ग असा की एखादे समान लक्षण असलेल्या शेकडो माणसांच्या कुंडल्या जमवायच्या आणि त्या कुंडल्यात काही समान ग्रहस्थिती आढळते का व ती किती प्रमाणात आढळते ते पहायचे, किंवा असे करायचे की एकाच प्रकारची ग्रहस्थिती असलेल्या पुष्कळ कुंडल्या घेउन त्या कुंडल्यांच्या माणसांत काही समान लक्षणे आढळतात का व ती किती प्रमाणात आढळतात ते पहायचे, व त्यावरुन हे शास्त्रातील तथ्य ठरवायचे. तिसरा मार्ग असा की घडून गेलेल्या निसंदिग्ध घटना व त्याचा काळ यापैकी एकच माहिती ज्योतिषांना पुरवायची व उर्वरित दुसरी माहिती ज्योतिषांनी वर्तवायची हा प्रयोग करणे. एखादा निष्कर्ष हा जेव्हा आपल्याला प्रतिकूल ठरतो त्यावेळी डाटा पुरेसा नव्हता अथवा विश्वासार्ह नव्हता. असे म्हणण्याची सोय आहे. अशा प्रकारचे संशोधन पाश्चात्य देशात मुबलक प्रमाणावर झालेले आहे. त्याचे निष्कर्ष बहुतांशी या शास्त्राला प्रतिकूल असेच निघाले आहेत. पण त्यांचा विशेषसा परिणाम सामान्य लोकांवर झालेला दिसत नाही. अशा संशोधनात ज्योतिष्यांची मदत घ्यावी लागते. आपल्याकडचे ज्योतिषी अशी मदत करण्यास कधीच पुढे येणार नाहीत. हात दाखवून अवलक्षण कोण करुन घेईल ?
आपल्याकडे यूजीसीने विद्यापीठात फलज्योतिष हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्याच्या अगोदर या विषयात काही तथ्य आहे काय? हे तपासण्यासाठी जर एखाद्या विद्यापीठास पायलट प्रोजेक्ट म्हणून संशोधन करण्यास अनुदान दिले असते तर ते अधिक उचित ठरले असते.

६३) आतापर्यंत ज्योतिषांना काय आव्हाने दिली गेली? ती कोणी स्वीकारली अगर कसे?
डॉ. अब्राहम कोवूर या भारतात जन्मलेल्या व श्रीलंकेत स्थायिक असलेल्या बुद्धीप्रामाण्यवादी चळवळीचा जनक असलेल्या माणसाने बुवाबाजी चमत्कार यांच्या वर हल्ला करण्यासाठी जगभरात जाहीर आव्हान दिले. त्यात फलज्योतिषाविरुद्धही आव्हान होते.
१ ते ३ डिसेंबर १९८५ मध्ये तिसरे आखिल भारतीय ज्योतिष संमेलनात हेच आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाच सहाशे ज्योतिषांसमोर मांडले होते. आव्हान खालील प्रकारचे होते.
१) दहा अचूक जन्मवेळांची माहिती वा कुंडल्या दिल्या जातील. तसेच दहा हातांचे ठसे दिले जातील त्यातून संबंधीत 'व्यक्ति स्त्री आहे की पुरुष?` व 'जिवंत आहे की मृत?` एवढेच अचूक सांगायचे.
२) वरीलप्रमाणे दहा कुंडल्या वा हाताचे ठसे दिले जातील त्या आधारे संबधीत व्यक्तीचे शिक्षण, विवाह, अपत्य, अपघात, व्यवसाय व उत्पन्न याबाबत भविष्यकथन करावे. ऐशी टक्के अचूक उत्तरे आल्यास आम्ही ज्योतिष हे शास्त्र मानू.
३) वरीलप्रमाणे कुंडल्या वा हाताचे ठसे पाच नामवंत ज्योतिषांना भविष्य पहाण्यासाठी देउ ( या पाच ज्योतिषांची निवड ही महामंडळानेच करावी) त्यांना वेगवेगळया खोलीत बसविले जाईल. त्यामुळे नामवंत ज्योतिषांची शास्त्रीय भविष्ये सत्यापासून व एकमेकापासून कशी दूर जातात याची जाणीव समाजाला होईल. असे होते की नाही याची तपासणी महामंडळानेच करावी.
या आव्हानांवर बरेच अकांडतांडव करण्यात आले. पण आव्हान स्वीकारण्यास कुणी होकार दिला नाही. या आव्हानानिमित्ताने वादविवाद अनेक लोकांशी झाले. त्यात मुंबईतील दिवंगत अभिनेते शाहू मोडक, सांगलीचे बॅंक अधिकारी गिरीश शहा, पुण्याचे अंकज्योतिषी एम कटककर, कोल्हापूरच्या डॉ. भावना मेहता (एम.बी.बी.एस.) यांचा सामावेश होता.
डॉ. बी. एन. पुरंदरे यांनी १९८५ च्या ज्योतिषसंमेलनात वैद्यक ज्योतिषाच्या सेमिनारमध्ये खालील विधाने केली होती :-
१) समाजातील सात टक्के व्यक्ति धनभारित असतात. २८ टक्के व्यक्ति ऋणभारित असतात व बाकीचे उदासिन असतात. व्यक्ति कोणत्याप्रकारची आहे हे त्याच्या तळहातावर रुद्राक्ष धरुन ठरवता येते. धनभारित व्यक्तिमधे आत्मिक सामर्थ्याने रोग बरा करण्याची, अंतर्ज्ञानाने भविष्य बरोबर सांगण्याची शक्ती असते. अशा व्यक्तिंनी पाणी दिले तरी त्याचे औषध बनते.
२) गरोदर स्त्रीच्या पोटावर रुद्राक्ष धरुन मुलगा की मुलगी होणार हे आधी कळते.
३) डॉ. पुरंदरेंनी ऑपरेशन करुन एक जुळे काढले. त्यांचे पोषण करणारी वार एकच होती. वैद्यकशास्त्र सांगते की अशी जुळी भावंडे अगदी एकसारखी असतात. परंतु तेवढया वेळात चंद्राने नक्षत्र बदलल्याने त्या मुली पूर्णपणे वेगळया रंगरुपाच्या, गुणाच्या झाल्या.
हे दावे सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांचेवर येते असे आव्हान लोकसत्तेच्या १९.१.८६ च्या अंकात डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी 'भविष्याचे भ्रमजाल` या लेखातून दिले. परंतु या बाबत त्यांचा कुठलाही प्रतिसाद आलेला नाही.
पत्रिकेतील ग्रहस्थितीवरुन रोगनिदान हे जवळजवळ ८० ते ८५ टक्के बरोबर येते. परदेशात जवळजवळ ६० ते ६५ टक्के डॉक्टर मंडळी याचा आपल्या वैद्यकव्यवसायात उपयोग करुन घेतात. असे विधान कोल्हापूरच्या डॉ.भावना मेहता यंानी केले होते. त्यावर त्यांना असे जाहीर आव्हान दिले होते:-
१) परदेशात ६० ते ६५ टक्के डॉक्टर याचा वापर करतात यासाठी सबळ पुरावा सादर करावा. कुठल्या मेडिकल जर्नल मध्ये हे प्रसिद्ध झाले आहे?
२) सोयीच्या कुठल्याही हॉस्पिटल मधले २० रुग्ण आम्ही देउ. त्यांच्या कुंडल्या पाहून त्यांनी रोगनिदान करावे. त्यासाठी ते डॉ.बी.एन. पुरंदरे, दिल्लीचे डॉ. जे.एन.राव यांची मदत घेऊ शकतात. ते सीलबंद पाकिटात ठेवले जाईल. तसेच त्यानंतर पाच तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पॅनेल आधुनिक वैद्यकीय चाचण्या करुन आपल रोगनिदान देईल. तेही सीलबंद पाकिटात ठेवले जाईल. दोन्ही पाकिटे डॉक्टर व माजी न्यायमूर्ती यांच्या तटस्थ पॅनेलसमोर उघडली जातील. डॉ. भावना मेहतांनी ८० टक्के जरी अचूक रोगनिदान केलेले आढळले तरी त्यांचा दावा आम्ही मान्य करु.
यावर कुठलेही आव्हान स्वीकारले गेले नाही. ही आव्हाने सुरवातीला एक लाख, त्यानंतर दोन लाख व आता पाच लाख अशा रक्कमेपर्यंत गेली आहेत. ज्योतिषांच्या दाव्यानुसार त्यात थोडाफार बदल केला जातो.ही आव्हाने वेळोवेळी दिली जातात. पण एकूण ढाचा याच पद्धतीचा असतो. आव्हान देण्यात केवळ हेतू हा की लोकांचे लक्ष या निमित्ताने वेधले जाते व लोक त्यावर चिकित्सकपणे विचार करू लागतात. आव्हानाच्या निमित्ताने लोकांच्यासमोर महत्वाची गोष्ट आली की, पत्रिकेवरुन व्यक्ती स्त्री आहे का पुरूष? जिवंत आहे की मृत ? या साध्या गोष्टी सुद्धा सांगता येत नाहीत. अहो, तुम्हाला वर्तमान काळ नीट सांगता येत नाही तर तुम्ही भविष्य काळ काय सांगणार? या साध्या तर्कशुद्ध प्रश्नावर ज्योतिषाचे पितळ उघडे पाडण्यास मदत झाली. नंतरनंतर या ज्योतिषाच्या मर्यादा आहेत. ज्योतिषाचा वापर मार्गदर्शक म्हणून होतो. ते दैवी शास्त्र आहे. ते धर्माचे अंग आहे. त्याला भौतिक कसोटया लागू करता येत नाहीत. अशी भूमिका घ्यायला सुरवात केली. आव्हानाकडे दुर्लक्ष केले तरी आपल्या कडे येणाऱ्या गि-हाईकावर याचा काही परिणाम होणार नाही याची त्यांना खात्री असल्याने त्यांनी आव्हानाची दखल घेणे सोडून दिले.
आव्हान या प्रकाराशिवाय फलज्योतिषाची सत्यासत्यता पडताळणीसाठी काही प्रयत्न पूर्वीही झाले. सन १९३५ साली रा.ज.गोखले या पुणे येथील शिक्षक गृहस्थाने 'फलज्योतिषचिकित्सा` नावाचे एक पुस्तक लिहून त्याची सविस्तर चिकित्सा केली आहे. फलज्योतिषाची सत्यासत्यता तपासण्यासाठी एक निर्णायक समितीची स्थापना केली. भविष्यज्ञान प्राप्त करुन घेण्याच्या पद्धतीच्या पुरस्कर्त्यांस व तज्ज्ञास एक विनंती केली, आपली वर्तवलेली भविष्ये त्यांनी निर्णायक समितीकडे पाठवावी. त्यासाठी यथोचित पारितोषकही देण्याची तयारी ठेवली होती. पण त्यासाठी त्यांनी फलासंदर्भात अटी घातल्या.
१) ज्या गोष्टी करणे व्यक्तिच्या हातात आहे ( उदा. प्रवासास जाणे ) त्या संबंधी भविष्ये समिती विचारात घेत नाही.
२) भविष्य स्पष्ट म्हणजे निश्चितार्थक असले पाहिजे. अर्थात त्याचे स्वरुप व त्याचा काल नियमित पाहिजे.
३) भविष्य एका वर्षाचे आत व फार तर दोन वर्षाचे आत घडणारे असावे
४) कोणताही सिद्धांत अनेक उदाहरणांवरुनच सिद्ध होणे जरुरी आहे. यास्तव फले पुरेशी न मिळता बरीच मिळाल्यास, मिळालेल्या उदाहरणांवरुन होणारा निर्णय 'तात्पुरता खरा` असेच मानण्यात येईल.
५) भविष्य व्यक्तिस अनिष्ट ( उदा. आजार, मृत्यू, इ. स्वरुपाचे ) असल्यास ते गुप्त ठेवले पाहिजे.
६) भविष्य साधार म्हणजे नियमासह द्यावे.
या आवाहनात्मक प्रकाराचा फारसा परिणाम जनमानसावर झाला नाही.

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) ......

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वीचा भाग २ सुरु करत आहोत.
Jyotishakade Janyapurvee
image001


दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने


आपल्याला जे पटत नाही ते सर्व त्याज्य अशी भूमिका न घेता बहुविध दृष्टिकोणातून या विषयाकडे बघण्याची दृष्टि ही मला माझया ज्योतिष प्रवासातूनच मिळाली. अनेक बुद्धिप्रमाण्यवादी फलज्योतिष विरोधक आपल्या मताशी जो पूर्णत: सहमत नाही तो फलज्योतिष समर्थकच आहे असे मानणारे आहेत. तसेच अनेक फलज्योतिष समर्थक हे आपल्याशी सहमत नसणारा तो विरोधक असे मानणारे आहेत. हे पुस्तक फलज्योतिषाचे समर्थन करते की विरोध असाही प्रश्न काही लोकांना पडला. एखाद्या गोष्टीला समर्थन वा विरोध यो दोनच बाजू नसून चिकित्सा नावाची वेगळी बाजू पण आहे. चिकित्सा ही दोन्ही पातळयांची करावी लागते. फलज्योतिष समर्थक वा विरोधक हे आपापल्या व्यासपीठावरुन एकमेकाविरुद्ध आग्रही मतं मांडत असतात. या दोन्ही भूमिका लोकांना एकाच वेळी ऐकायला मिळाव्यात या हेतूने पहिल्या आवृत्तीचे समारंभपूर्वक प्रकाशन केले. त्यात डॉ.नरेन्द्र दाभोलकर यांनी आपला फलज्योतिष विरोधी आणि ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार यांनी आपली समर्थक भूमिका मांडली. तसेच श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची दोघांनीही उत्तरे दिली. उत्तरे पटणे वा न पटणे हा भाग निराळा. पण या निमित्ताने एक विचार प्रक्रिया तर चालू झाली. आतापर्यंत फलज्योतिष हा विषय वा ज्योतिषी ही व्यक्ती केन्द्रबिंदू धरुन विरोध वा समर्थन झाले आहे. हा विषय मुख्यत: ज्योतिषाकडे जाणारी व्यक्ती म्हणजेच जातक यांच्या करता आहे. परंतु यांना केन्द्र बिंदू मानून चिकित्सा केली जात नाही. जातक हा चिकित्सकही बनू शकतो अशी भूमिका मांडताना त्याची मानसिक जडणघडण विचारात घेतली आहे. फलज्योतिष हा श्रद्धेचा विषय झाला की चिकित्सेच्या वाटाच बंद होतात. चिकित्सेला प्रवृत्त करण्यासाठी काही तडजोड करणे ही आवश्यक असते. ती तडजोड म्हणजे जातकाला वेळोवेळी समजून घेण्याचा प्रयत्न करणे.
फलज्योतिषातील समर्थक वा विरोधी मते यातील विविध अंतर्प्रवाह मला जवळून पहायला मिळाले. अत्यंत तटस्थ राहून मी फलज्योतिष चिकित्सा केली आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही. टीकाकार या नात्याने अंतर्विसंगती मांडायच्या झाल्या तर त्या फलज्योतिषीय परिभाषेत मांडाव्या लागतील. त्या फक्त अभ्यासकांनाच समजतील सर्वसामान्य माणूस चिकित्सेपासून पुन्हा वंचितच राहिल म्हणून तो विषय फलज्योतिषीय पातळीवर फारसा मांडला नाही. चिकित्सा करताना दोन्ही बाजू अभ्यासक या नात्याने समजावून घेताना कधी सुसंगतीतही विसंगती आढळली तर कधी विसंगतीतही सुसंगती आढळली. हेच तर मानवी स्वभावाचे वैशिष्टय आहे. मनुष्य हा काही विवेकवाद, मानवतावाद, बुद्धीप्रामाण्यवाद यांचे प्रोग्रामिंग फीड केलेला जैवरासायनिक यंत्रमानव नव्हे. त्याला केवळ बुद्धी नाही तर भावनाही आहेत हे भान ठेवून चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला आहे.
दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने वाचकांना काही अधिक माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

प्रकाश घाटपांडे

~

प्रतिसाद देण्यापुर्वी खालील् गोष्टी मी गृहीत धरल्या आहेत.
१) http://mr.upakram.org/node/777 वाचले असेल .
२) भाग १ आपण उपक्रमावर वाचलाच असेल.
३) आपली प्रतिसाद मला मोलाचा वाटतो. पुस्तक निर्मिती ही अशाच शंका, प्रतिसाद, सूचना यातूनच झालेली आहे.
४) मनात असलेल्या काही शंकांचे कदाचित पुढच्या पोस्ट मधून निराकरण अंशतः तरी होईल असे वाटते. नवीन वाचकांसाठी असलेल्या शंकांचे भाग १ मध्ये कदाचित अंशतः निराकरण झाले असेल.
५) हे पुस्तक परिपुर्ण आहे असा दावा नाही. तो तसा असूही नये.
६) पुस्तकात दिलेले संदर्भ उपलब्ध करुन देणे किमान तसा प्रयत्न करणे हे माझे नैतिक कर्तव्य समजतो.
७) व्यक्तिगत शंकांना उत्तरे देणे प्रत्येकवेळी शक्य आहे असे व्यावहारिक दृष्ट्या वाटत् नाही. कृपया गैरसमज नसावेत.
८) यात व्यवसायाचा कुठलाही उघड वा छुपा हेतु नाही. कारण ज्योतिष हा माझा व्यवसायच नाही.
९) लेखनातून कळत नकळत जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास त्यांनी मनापासून क्षमा करावी.
प्रकाश घाटपांडे

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) प्रकरण १- फलज्योतिष:- एक प्राथमिक चिकित्सक दृष्टीकोण

फलज्योतिष:- एक प्राथमिक चिकित्सक दृष्टीकोण

फलज्योतिषातला वैज्ञानिक मुलामा असलेला भाग लोकांच्यासमोर आला की मती कुंठीत होते. म्हणूनच हा विषय समजून घेण्यास सुलभ व्हावे यासाठी आपण चार टप्प्यात त्याची चिकित्सा करू.
टप्पा पहिला:-
फलज्योतिषाची मूळ संकल्पना काय आहे:- ग्रह व तारे यांच्या अंगी काहीतरी गूढ असे गुणधर्म आहेत. त्या गुणधर्मांचे प्रभाव पृथ्वीवर येतात, जन्माला येत असलेल्या बालकावर पडतात, आणि त्यामुळे बालकाच्या एकूण आयुष्याची रूपरेखा ठरते, अशी या शास्त्राची संकल्पना आहे. म्हणजे भावी आयुष्यातील घटना या एखाद्या चित्रपटाच्या रीळाप्रमाणे अगोदरच चित्रित झालेल्या असतात. ही संकल्पनाच ज्यांना मान्य नसेल त्यांनी पुढचे विवेचन वाचायची जरूर नाही, कारण त्यांच्या दृष्टीने हे शास्त्र भ्रामक आहे असे इथेच ठरते. पण आपण ही संकल्पना वादापुरती का होईना मान्य करून पुढे जायचे आहे.
टप्पा दुसरा:-
आता पुढचा प्रश्न असा की ग्रहांचे गूढ प्रभाव पृथ्वीपर्यंतचा प्रवास कोणत्या स्वरूपात करतात ? प्रकाशकिरणांच्या ( म्हणजेच उर्जा-लहरींच्या ) स्वरूपात, की गुरुत्वाकर्षणाच्या स्वरूपात, की चुंबकीय आकर्षणाच्या स्वरूपात ? वाचकांचा काय तर्क चालतो? इथे एक गोष्ट वाचकांनी ध्यानात ठेवावी ती ही की, या शास्त्रात राहू व केतू या काल्पनिक बिंदूंना ग्रह मानलेले आहे व त्यांना इतर ग्रहाएवढेच महत्व दिलेले आहे. त्यांच्या अंगीसुद्धा गूढ गुणधर्म आहेत असे हे शास्त्र मानते. पण त्यांच्या बाबतीत अडचण अशी आहे की काल्पनिक बिंदूमध्ये उर्जालहरी, गुरुत्वाकर्षण, किंवा चुंबकीय आकर्षण यापैकी कोणतेही तत्व असणे अशक्य आहे, आणि या तीन तत्वाव्यतिरिक्त चौथे तत्व ( जे दूर अंतरावर प्रभाव टाकू शकेल असे ) भौतिक शास्त्राला ठाउक नाही. मग राहू-केतूंचे प्रभाव पृथ्वीवर कोणत्या स्वरूपात येतात? त्यांच्यासाठी कोणते तत्व लागू करायचे? या राहू-केतूंना वगळून तर बिलकुल चालणार नाही. मग काय करायचे? राहू-केतूसह सर्व नवग्रहांसाठी एकच असे काही तरी समान तत्व लागू असले पाहिजे, हे तर कोणीही मान्य करील. इथे भौतिक विज्ञानातले कुठलेही तत्व कामी येणार नाही ही महत्वाची गोष्ट वाचकांनी ध्यानात घ्यावी. म्हणून शेवटी अपरिहार्यपणे असे गृहीत धरावे लागते की विज्ञानाला ठाउक नसलेल्या अशा काही गूढ प्रकारच्या तरंग-लहरींच्या द्वारे ग्रहांचे प्रभाव पृथ्वीवर येतात! राहू-केतूंनाही हे तत्व लागू करण्यात काही प्रत्यवाय येत नाही! ज्यांना या गृहीतकृत्यावर विश्वास ठेवायचा नसेल त्यांनी इथेच थांबावे, पुढचे विवेचन त्यांच्यासाठी नाही! ज्यांची या गृहीतावर विश्वास ठेवायची तयारी असेल त्यांनी एक खूणगाठ मनाशी बांधावी की, इथे फलज्योतिषाने भौतिक विज्ञानाशी फारकत घेतली आहे. तरीपण आपण असा विचार करू की भौतिक विज्ञानाच्या कक्षेत न येणारी अशी काही रहस्ये या दुनियेत असू शकतील! म्हणून 'जे विज्ञानास मान्य नाही ते सगळे खोटे,` अशी अतिरेकी भूमिका न घेता वादापुरते का होईना, 'ग्रहांच्यापासून गूढ अशा ज्योतिषीय प्रभाव-लहरी इतर उर्जालहरींच्या प्रमाणेच सरळ रेषेत पृथ्वीकडे येत असतात`, असे गृहीत धरून आपण पुढे जायचे आहे. जाता जाता इथे एका गोष्टीचा उल्लेख करतो. अंतरिक्षातून येणारे कॉस्मिक किरण, विद्युच्चुंबकीय लहरी, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय आकर्षण, इत्यादि वैज्ञानिक शब्दांचा वापर लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी ज्योतिष-समर्थकांनी केला आहे. फलज्योतिषाशी त्यांचा काहीही संबंध नाही. पुढच्या टप्प्यात ही गोष्ट आणखी स्पष्ट होईल.
टप्पा तिसरा:-
फलज्योतिषाचे यापुढील गृहीतकृत्य मान्य करणे मात्र फार अवघड आहे. हे शास्त्र असे गृहीत धरते की, मुलाच्या जन्मवेळी ग्रह आकाशात कुठेही असोत, त्या सर्वांच्या प्रभावलहरी एकाच क्षणी मुलावर पडतात व आपापले परिणाम त्याच्यावर करतात. जे ग्रह त्यावेळी डोक्यावरच्या आकाशात म्हणजे उदित गोलार्धात असतील त्यांच्या प्रभावलहरी मुलावर पडतात हे सहज समजण्यासारखे आहे, पण जे ग्रह त्यावेळी मावळून जाउन पृथ्वीच्या आड गेलेले असतात म्हणजे अनुदित गोलार्धात असतात त्यांच्या प्रभावलहरी त्या मुलापर्यंत कोणत्या मार्गाने जाउन पाहोचतात ? त्यांना पृथ्वीच्या पोटातून आरपार जाउनच मुलापर्यंत पोहोचणे त्यांना भाग आहे, दुसरा मार्ग नाही, ही गोष्ट ध्यानात घ्यावी. पृथ्वीचा गर्भ प्रचंड आकाराचा आणि धगधगत्या लाव्हा रसाने भरलेला असतो, त्यातून हजारो मैलांचा प्रवास निर्वेधपणे करू शकणाऱ्या गूढ लहरी खरोखरीच अस्तित्वात असतील का? ( भौतिक शास्त्राला अशा कोणत्याही लहरी माहीत नाहीत.) या प्रभावलहरींचे स्वरूप गूढ आहे, त्यांना भौतिक शास्त्राचे नियम लागू नाहीत, असे एकदा मान्य केल्यावर मग त्या प्रभावलहरी पृथ्वीच्या पोटातून आरपार कशा जातात हा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! अर्थात् ज्यांना ही भन्नाट कल्पना पटणार नाही त्यांनी इथेच थांबावे हे बरे, कारण फलज्योतिषाचा भ्रामकपणा शोधायला त्यांना आणखी पुढे यायची जरुरी नाही.
टप्पा चौथा:-
वरील गृहीतकृत्याची अपरिहार्य परिणती काय होते ते सांगतो: पृथ्वीच्या पोटातून आरपार जाउ शकणाऱ्या या प्रभावलहरी पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावर एकाच वेळी कुठेही पोहोचू शकतात, असे हे शास्त्र मानते. याचाच अर्थ असा होतो की प्रत्येक ग्रह एकाच वेळी पृथ्वीच्या पाठीवरील सर्व ठिकाणी, कुठेही, आपला प्रभाव टाकू शकतो. वाचकांनी ही वस्तुस्थिति खास करून ध्यानात घ्यावी. 'एकाच वेळी जगात निरनिराळया ठिकाणी जेवढी म्हणून मुले जन्माला येतात तेवढया सर्व मुलांच्या कुंडल्यात कोणत्यातरी एका स्थानात-म्हणजे घरात- तो ग्रह हजर असतो, आणि त्याच्या प्रभावाचे परिणाम प्रत्येक मुलावर होतात,` हा या वस्तुस्थितीचा अर्थ आहे. हे परिणाम अर्थातच प्रत्येक ठिकाणी निराळे असतात अशी या शास्त्रावी धारणा आहे, आणि ही धारणाच या शास्त्राचे 'वर्मस्थान` आहे. त्याच्यावर आजपर्यंत कोणी घाव घातलेला नाही. हे शास्त्र खोटे आहे असे का म्हणावे लागते ते या वर्माचे विश्लेषण केले म्हणजे कळते, म्हणून त्याचे विश्लेषण आपण पुढे केले आहे.
आधीच्या तीन टप्प्यात जी गृहीते आपण वादापुरती का होईना पण मान्य केली पण आता इथे जे गृहीतकृत्य ज्योतिष-प्रवक्त्यांना अभिप्रेत आहे ते वेगळ्या प्रकारचे आहे: 'अचेतन जडवस्तूंनी बनलेल्या ग्रहांच्या अंगी इच्छाशक्ति आणि दैवी कार्यशक्ति असते (कारकत्व), तिच्यामुळे ते वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळे परिणाम करू शकतात ( फलित) ` असे ते गृहीतकृत्य आहे. ज्यांची श्रद्धा आंधळी आहे त्यांना ते मान्य होईल पण ज्यांची श्रद्धा 'डोळस` आहे त्यांनाही ते मान्य होणार नाही, आणि बुद्धीवादी लोकांना तर ते गृहीतकृत्य हास्यास्पदच वाटेल.
वरील प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी काही ज्योतिष-प्रवक्ते पृथ्वीच्या गोल आकाराचा आधार घेउ पहातात. फलज्योतिषाला भौतिक विज्ञानाचा आधार आहे असे सांगण्याची त्यांना फार हौस असते. पण पृथ्वीचा गोल आकार हा एक भौतिक घटक आहे, तो काही गूढ किंवा दैवी घटक नव्हे, त्याचे परिणाम भौतिक नियमांना अनुसरूनच होणार, तिथे गूढ परिणामांना थारा नाही ह्या गोष्टीकडे ते डोळेझाक करतात. ते कसा युक्तिवाद करतात ते पहा. ते म्हणतात, ''पृथ्वीचा आकार गोल असल्यामुळे सूर्याचे किरण जसे कुठे सौम्य तर कुठे तीव्र असतात, सर्व ठिकाणी ते सारखे नसतात, तसेच या गोल आकारामुळे त्याचे फलज्योतिषीय प्रभावही सर्व ठिकाणी सारखे पडत नाहीत, वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांचे पडतात.`` हा युक्तिवाद कसा फसवा आहे ते पहा:- पृथ्वीच्या गोल आकाराच्या अडथळ्यामुळे सूर्याच्या प्रकाशलहरी तिच्या अर्ध्या भागावर पोहोचूच शकत नाहीत हे आपल्याला माहीत आहे, पण त्याच्या ज्योतिषीय प्रभावलहरी मात्र या गोल आकाराच्या अडथळ्याला न जुमानता एकाच वेळी पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावर पोहोचू शकतात असे हे ज्योतिष-प्रवक्ते मानतात. याचा सरळ अर्थ असा होतो की ज्योतिषीय प्रभावलहरींवर पृथ्वीच्या गोल आकाराचा भौतिक परिणाम काहीही होत नाही. अर्थातच ज्योतिष-प्रवक्त्यांचा वरील युक्तिवाद खोटा ठरतो.
सांगायचा मुद्दा असा आहे की, ग्रह-प्रभावांचे फलज्योतिषीय परिणाम प्रत्येक ठिकाणावर वेगळे होण्याला निसर्गातले कोणतेही कारण जबाबदार असल्याचे दिसत नाही. ग्रहांच्या गूढ गुणधर्मांचाही इथे काही संबंध दिसत नाही कारण ग्रहांच्या प्रभावलहरी एकदा पृथ्वीकडे जायला निघाल्यानंतर त्यांच्या परिणामात फेरफार करणे हे ग्रहांना अशक्य आहे. साधी तर्कबुद्धी वापरणारा कोणीही मनुष्य असेच म्हणेल की ''ग्रहांचे परिणाम स्थानानुसार वेगवेगळे होतात``, ही समजूतच मुळी खोटी असली पाहिजे. ग्रहांच्या प्रभावांचे परिणाम एकाच वेळी निरनिराळ्या ठिकाणावर निरनिराळे कसे होतात या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर असे आहे की असे काहीही घडत नसते, आणि घडणे शक्यही नसते! हे केवळ एक भ्रामक कल्पनारंजन आहे..या खोट्या समजुतीवर पुढचे सगळे शास्त्र आधारलेले असल्यामुळे ते शास्त्र खरे असणे अशक्य आहे म्हणजेच ते खोटे आहे.
अर्थात् ज्योतिषांच्या चरितार्थासाठी आणि लोकांच्या भविष्य जाणण्याच्या उत्कंठेपायी हे शास्त्र (?) असेच चालू राहील, पण जे वाचक आपली कॉमनसेन्स वापरू शकतात त्यांना हे शास्त्र खोटे का आहे याची कल्पना हे चार टप्पे वाचल्यावर यावी.

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) प्रकरण २ - नाडी ज्योतिष आणि फलज्योतिष

नाडी-ज्योतिष आणि फलज्योतिष

नाडी ज्योतिष हे नेमके काय शास्त्र आहे याचा ओझरता उल्लेख सुद्धा जुन्या ज्योतिषग्रंथात आढळत नाही. आम्ही नाडी ज्योतिषाकडे या बाबत विचारणा केली असता त्याला काहीही सांगता आले नाही. प्रत्यक्षात असे दिसते की ताडपट्टीवर कोरुन ठेवलेल्या भाकितांचा संग्रह म्हणजेच नाडी ज्योतिष!
तुमची जन्म-तारीख, वेळ व ठिकाण इतक्या गोष्टी घेऊन पारंपारिक ज्योतिषी कुंडली बनवतो आणि तिच्यावरून फलज्योतिषशास्त्राच्या आधारे तुमचे भविष्य सांगतो. नाडी-ज्योतिषी सुद्धा अगदी हेच करीत असतो, पण आव मात्र असा आणतो की तुमचे भविष्य पाच हजार वर्षापूर्वी कुणा एका त्रिकालज्ञानी महर्षींनी नाडी-पट्टीवर कोरून ठेवलेले आहे आणि तो ते फक्त वाचून दाखवत आहे. तो प्रथम तुमची नाडी-पट्टी शोधण्याचे नाटक करतो आणि नंतर पट्टीवरील भाकीत वाचण्याचे नाटक करतो. ही या नाडी-ज्योतिषाची खासीयत व वेगळेपण आहे. दुसरा फरक असा आहे की जन्मकुंडलीवरून तुमचे नाव, तुमच्या आईबापांची नावे, तुमच्या मुलांची संख्या, त्यांची नावे, असली माहिती पारंपारिक ज्योतिष्याला सांगता येत नाही पण नाडी-ज्योतिषी मात्र असा दावा करतो की अशा प्रकारची माहिती नाडी-पट्टीत पूर्वीच लिहून ठेवलेली असते, इतकेच नव्हे तर तुमच्या जन्मकुंडलीचा तपशील सुद्धा तुमच्या पट्टीत लिहिलेला असतो असेही तो सांगतो. नाडीज्योतिषाचे हे दावे कसे खोटे आहेत ते आम्ही पुढील विवेचनात दाखवणार आहोत.
कूट लिपीचा अडथळा.
नाडी-ज्योतिषाच्या बाबतीत वस्तुस्थिती अशी आहे की, तामीळ भाषेच्या प्राचीन गुप्त किंवा कूट लिपीत पट्ट्या लिहिलेल्या असतात असे नाडीवाले लोक म्हणतात. मराठी माणसाच्या दृष्टीने हे म्हणजे आवाळूवर गळू व्हावे तसे आहे. तो मजकूर खुद्द तामिळी लोकांना सुद्धा जिथे वाचता येत नाही तिथे मराठी लोकांना तो काय कळणार! त्यामुळे नाडीवाले जे काय सांगतात ते प्रमाण समजून चालावे लागते. नाडी-पट्टीवरील मजकूर नाडी-ज्योतिषी सांगतो तसा खरोखरी आहे की नाही याची डायरेक्ट शहानिशा करणे या कूटलिपीच्या अडथळ्यामुळे अशक्य आहे. नाडी-पट्टीत तुमच्या आईचे नाव लिहिलेले आहे, किंवा तुमची जन्मरास आणि लग्न-रास पट्टीत लिहिलेली आहे असे नाडीज्योतिष्याने म्हटले तरी त्याच्या म्हणण्याची खात्री कशी करून घ्यायची ? जर काही मार्गाने तुम्हाला तशी खात्री करून घेता आली तर मग तुम्ही नाडी-भविष्यावर खुशाल विश्वास ठेवा असे आम्ही म्हणतो.
पट्टी शोधण्याचे नाटक.
तुमची पट्टी शोधत असल्याचे नाटक करतांना नाडीज्योतिषी तुम्हाला अनेक सूचक प्रश्न विचारत जातो व भराभर पट्ट्या उलटत जातो. उदाहरणार्थ, तुम्हाला दोन मुले आहेत ना ? पहिली मुलगी आहे, दुसरा मुलगा आहे ना ? तुम्हाला आश्चर्य वाटते की हे त्याने कसे बरोबर ओळखले असेल ? पण हे लक्षात घ्या की हे प्रश्न जेव्हा तो विचारत असतो तेव्हा तुमची पट्टी अजून त्याला सापडायचीच असते. तो हे जे सूचक प्रश्न विचारत असतो ते केवळ त्याच्या व्यवहार-चातुर्यामुळे विचारत असतो,--तुमची पट्टी वाचून विचारत नसतो ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या पट्टीत हे तपशील खरोखरीच आहेत की नाहीत ते तुम्हाला कधीच समजणार नाही.
नाडीकेंद्रात तुमच्या अंगठयाचा ठसा घेतल्यावर तुमचे नाव, वडिलांचे नाव आणि मुख्य म्हणजे तुमची जन्मतारीख-वेळ-ठिकाण इतक्या गोष्टी नाडीज्योतिषी तुम्हाला सुरुवातीलाच विचारून घेतो. संबंधित वर्षाचे पंचांग त्याच्या हाताशी असतेच. जन्मतारखेवरून तुमची रास व नक्षत्र आणि जन्मवेळेवरून तुमची लग्नरास त्याला लगेच कळते. आता असे पहा की, या इतक्या सर्व गोष्टी जर तुमच्या नाडी-पट्टीत पूर्वीच लिहून ठेवलेल्या असतील तर अमुक एक पट्टी तुमचीच आहे किंवा नाही हे सांगणे त्याला अगदीच सोपे नाही का ? तुमची पट्टी ओळखण्यासाठी आणखी खाणाखुणांची खरे तर त्याला काहीही आवश्यकता नाही. अगदी एकसारखी संपूर्ण नावे असलेली अनेक माणसे असू शकतात हे जरी खरे असले तरी जन्मतारीख-वेळ-ठिकाण एकच असलेली व नावेही सारखीच असलेली माणसे सापडणे अशक्यप्राय आहे. शिवाय, अंगठयाच्या ठशाचे शास्त्रीय वर्णन पट्टीत लिहिलेले असते असेही नाडीवाले लोक सांगतात, म्हणजे तीही आणखी एक व्यवच्छेदक खूण त्याला उपलब्ध असते. सांगायचा मुद्दा हा की एवंगुणविशिष्ट अशा त्या व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती अस्तित्वात असणे अशक्य आहे, म्हणून तिची पट्टीही एकमेवाद्वितीय असणार. पण, गंमत अशी की, इतक्या सगळया खाणाखुणा हाताशी असूनही तुमची पट्टी शोधत असल्याचे नाटक करीत असलेला नाडी-ज्योतिषी पट्टी शोधण्याच्या मिषाने तुम्हाला अनेक प्रश्न विचारतो व त्यातून तुमच्या तोंडूनच तुमच्याबद्दलची पुष्कळशी माहिती काढून घेतो. किंबहुना तोच त्याचा खरा उद्देश असतो. पुरेशी माहिती हातात आली की तुमची पट्टी सापडली असे तो म्हणतो, नाहीतर पट्टी सापडत नाही असे म्हणतो. वास्तविक, त्याच्या दृष्टीने कुठलीही पट्टी तुमची पट्टी ठरू शकते. म्हणून तर अगदी मोजक्या पट्ट्यांच्या भांडवलावर हा धंदा वर्षानुवर्षे चालू शकतो. या धंद्यातली खरी मख्खी हीच आहे.
नावे शोधण्याची युक्ती.
तुमच्या आईचे नाव काय? असा सरळ प्रश्न तुम्हाला विचारायच्या ऐवजी ते नाव किती अक्षरी आहे, त्याचे आद्याक्षर य र ल व यापैकी आहे का, ते नाव देवीचे आहे का, असे प्रश्न नाडीज्योतिषी भाबडेपणाचा आव आणून धूर्तपणे विचारतो. भोंडल्याची आजची खिरापत काय आहे ते ओळखण्यासाठी मुली असेच प्रश्न पूर्वीच्य काळी विचारत असत! जर पट्टीत नावे खरोखरीच लिहिलेली असती तर असे चाचपडत प्रश्न त्याने कशाला विचारले असते ? सरळ नावे वाचली नसती का ? तुम्ही दिलेल्या उत्तरावरून ते नाव काय असावे हे ओळखण्याइतका तो चाणाक्ष असतो. हा चाणाक्षपणा हे त्याच्या धंद्याचे भांडवल आहे. ते नाव लक्षात ठेवून नंतर तो ते नाव वाचून दाखवतो ! पट्टीत नावे असणे अशक्य का आहे ते पुढील चर्चेवरून कळेल :-
व्यक्ती-गणिक तयार भाकित-पट्ट्या -- एक थोतांड.
व्यक्तीचे पूर्ण नाव व तिच्या जन्मकुंडलीची माहिती जिच्यावर लिहिलेली आहे अशी एखादी नाडीपट्टी जर खरोखरीच अस्तित्वात असेल तर ती पट्टी त्या व्यक्तीच्या मृत्यूबरोबरच निरुपयोगी होईल कारण तिचा पुन: उपयोग कुणालाही होणार नसतो. आमच्या विवेचनातला हा मुद्दा फार महत्वाचा आहे, का ते सांगतो. नाडीज्योतिषाचा उगम किमान ५००० वर्षांपूर्वी झाला असे नाडीवाले लोक सांगतात म्हणून गेल्या पाच हजार वर्षात निकामी झालेल्या पट्ट्यांची संख्या किती होते याचा जरा अंदाज करून पाहू. सन १९०१ या वर्षात अगस्त्य नाडीच्या सर्व ठिकाणच्या शाखात मिळून दररोज सुमारे ५० लोक आपापल्या पट्ट्यांचे वाचन करून घेऊन गेले असे समजू. म्हणजे त्या एका वर्षात सुमारे १८००० लोक त्यांच्या पट्ट्या पाहून गेले. आज त्यांच्यापैकी कुणीही माणूस हयात नसेल. म्हणजे इतक्या पट्ट्या आता निकामी झाल्या आहेत. हाच हिशोब सन १९०० च्या आधीच्या प्रत्येक वर्षाला लावला तर ५००० वर्षांच्या काळात पाच हजार गुणिले १८००० म्हणजे ९ कोटी पट्टया आजवर निकामी झाल्या आहेत. आणि शिवाय, आजपासून पुढे जेवढ्या पट्ट्या लागणार आहेत त्यांचा हिशोब वेगळाच केला पाहिजे! म्हणजे पट्ट्यांचा सुरुवातीचा स्टॉक कमीत कमी ९ कोटी एवढा होता हे तर मान्य केलेच पाहिजे. आता यापुढची गंमत पहा. प्रत्येक मूळ पट्टीच्या सोबत आणखी अकरा पुरवणी-पट्ट्या असतात व एकेका पट्टीवर एकेका स्थानाचे भाकित लिहून ठेवलेले असते, याशिवाय आणखी चार प्रकारच्या पुरवणी-पट्ट्या असतात, अशा एकूण १६ पट्ट्या दरएक व्यक्तीसाठी लिहिलेल्या असतात असे या नाडीकेंद्राच्या माहिती-पत्रकावरून दिसते. ते खरे असेल तर, ९ कोटी गुणिले १६ म्हणजे १ अब्ज ४४ कोटी इतक्या पट्ट्यांची भाकिते वर्तवून महर्षींनी त्या पट्ट्या आपल्या शिष्यांच्याकडून लिहवून घेतल्या, आणि आता त्या सर्व पट्ट्या निकामी झाल्या आहेत हे मान्य केलेच पाहिजे. आणि असे असूनही आज प्रत्येक नाडीकेंद्रात भरपूर पट्ट्या आगामी काळासाठी शिल्लक आहेत असे नाडीवाले लोक सांगतात! म्हणजे, त्या महर्षींनी पट्ट्या लिहिल्या तरी किती ? दीड अब्ज पट्ट्या लिहायच्या हेच आधी केवढे प्रचंड काम! स्वत: महर्षी दररोज ५००० भाकिते वर्तवत होते व त्यांचे पन्नास-एक शिष्य दररोज प्रत्येकी शंभर पट्ट्या लिहीत होते असे मानले तरी एवढे प्रचंड काम पुरे करायला त्या सर्वांना ७५ वर्षे सतत राबावे लागले असले पाहिजे. धन्य ते महर्षी आणि धन्य तो त्यांचा शिष्यगण, ज्यांनी वेदाध्ययन व यज्ञयागादि आपली विहित कर्मे बाजूला ठेवून आख्खी हयात फक्त नाडीपट्ट्या कोरून लिहिण्यातच घालवली! याचा इत्यर्थ इतकाच की व्यक्तीचा नामनिर्देश व जन्मकुंडलीचा निर्देश केलेल्या भाकित-पट्ट्या हे एक थोतांड आहे. त्यावर विश्वास ठेवणारे एकतर भोळसट आहेत किंवा चलाख आहेत.
विंग कमांडर ओक म्हणतात की नाडीभविष्याचा आवाका मानवी विचारांच्या कुवतीपलीकडे जाणारा आहे. ( आम्ही म्हणतो की, असेलही कदाचित् ) पण एखाद्या नाडीकेंद्राच्या खोलीत जास्तीत जास्त किती बंडले मावू शकतील याचा अंदाज करणे हे तर मानवी कुवतीच्या पलीकडचे नाही ना ? एवढया पट्ट्या खरोखरीच पूर्वी कुणी लिहिल्या असतील का, एकेका केंद्राच्या एवढयाशा जागेत एवढया पट्ट्या मावलेल्या असतील का, त्यांचे सॉर्टिंग कसे झाले असेल, आयत्या वेळी हवे ते बंडल कसे सापडत असेल, असल्या फालतू शंका अश्रद्ध लोकांनी घ्याव्यात, ओकांना असल्या शंका येतच नाहीत. येणार कशा ? अंधश्रद्धा एकदा मानगुटीस बसली की शहाणासुर्ता माणूससुद्धा कसा मॅड होतो त्याचे हे उदाहरण पहा: बोध अंधश्रद्धेचा पृष्ठ १२१ वर ते म्हणतात "या पट्ट्यातील मजकूर दर वेळी बदलत असल्याने .... पट्ट्या संख्येने कमी वाटल्या तरी यापुढेही असंख्य वर्षे मानवतेला मार्गदर्शन होत राहील यात शंका नाही. "
( म्हणजे मग मजकुराबरोबर नावेही बदलत असली पाहिजेत? ) आम्हीसुद्धा तेच म्हणतो: पट्ट्या मोजक्याच असतात, त्या पुन्हा-पुन्हा वापरल्या जातात, तथाकथित कूट लिपीमुळे ही लबाडी कुणाच्या ध्यानात येत नाही. हे उघड सत्य खुद्द ओकांनीच इथे सांगितले आहे! आता आणखी काय पाहिजे ?

नाडी-पट्टीत जन्मकुंडलीचा निर्देश असणे अशक्य.
जन्मकुंडलीचा निर्देश का अशक्य आहे ते आम्ही आकडेवारीच्या मदतीने वर दाखवले. आमच्या या म्हणण्याची शहानिशा अप्रत्यक्ष मार्गानेही करता येते. तो मार्ग असा : तुमची जन्मतारीख-वेळ-ठिकाण या बाबी नाडी-ज्योतिष्याला तुमच्या तोंडून काढून घेता येत नाहीत. जर तुम्ही म्हणालात की बाकी सगळी माहिती मी देतो पण जन्मवेळ सांगत नाही, तर तो उघडपणे म्हणू शकत नाही की जन्मवेळ दिली नाहीत तर तुमची पट्टी सापडणार नाही. कारण, त्याचा दावा असा असतो की अंगठ्याच्या ठशाच्या मदतीने किंवा कुंडलीच्या मदतीने तो तुमची नाडीपट्टी शोधणार आहे. जन्मवेळ नाही म्हटल्यावर नाडीवाल्याची गाडी अडते, कारण जन्मवेळेशिवाय त्याला तुमची कुंडली बनवता येत नाही, आणि कुंडलीशिवाय भाकिते सांगता येत नाहीत. म्हणून अशा वेळी तो थोडेफार प्रश्न विचारल्याचे नाटक करून सन्माननीय माघार घेतो - म्हणजेच पट्टी सापडत नाही असे सांगतो. इथे काय घडते ते पहा. तुमच्या अंगठ्याचा ठसा तुम्ही दिलेला असतोच, आणि शिवाय तुमचे नाव, वडलांचे नाव व जन्मतारीख हेही सांगितलेले असते, फक्त जन्मवेळ लपवलेली असते. तुम्हाला अनेक प्रश्न विचारून तुमच्याकडून तुमचे वैयक्तिक तपशील त्याने मिळवलेले असतात. तेवढ्या माहितीवरून त्याला खरे तर पट्टी सापडायला हवी. पण ती सापडत नाही असे तो म्हणतो त्याचे खरे कारण हेच की जन्मवेळ माहीत नसल्यामुळे त्याला कुंडली बनवता येत नाही व भाकीत वर्तवता येत नाही. पट्टी सापडत नाही असे सांगण्यात त्याचा दुसराही एक हेतु असतो तो असा की तुमच्या पट्टीतला कुंडलीचा तपशील सांगण्याची वेळ त्याच्यावर येणार नाही, व त्यामुळे पट्टीत कुंडलीचा काहीही तपशील नसतो हे त्याचे बिंग फुटणार नाही. परंतु ही युक्ती जर तो अशा प्रत्येक प्रसंगी वापरील तर अप्रत्यक्षपणे हेच सिद्ध होईल की पट्टीत कुंडलीचा तपशील नसतो. आम्ही अनेकदा हा प्रयोग केला आहे व अनुभव घेतला आहे. ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनीही हा प्रयोग करून पहावा. वस्तुस्थिती अशी आहे की, नाडी-ज्योतिषी स्वत:च कुंडली बनवतो व भाकिते वर्तवून ती महर्षींच्या नावावर खपवतो. ज्यांना नावाबाबत प्रयोग करायचा असेल त्यांनी जन्मवेळ सुद्धा सांगावी. तुमच्याा आईचे नांव पट्टीत लिहिलेले आहे असा दावा नाडी ज्योतिषी करतो. म्हणून जेव्हा तो तुमच्या आईचे नांव किती अक्षरी आहे, वगैरे प्रश्न विचारु लागेल तेव्हा त्याला सांगावे की, मी या प्रश्नांची उत्तरे देणार नाही. ते नांव पट्टीत असेल तर त्याने ते वाचून दाखवावे.
पट्टीत कुंडलीचा तपशील नसतो असे आम्ही म्हणण्याचे दुसरे कारण असे आहे की, नाडीपट्टीतली भाकिते महर्षींनी अंतर्ज्ञानाने लिहिली असे जर नाडीवाले म्हणतात तर भाकिते वर्तवण्यासाठी जन्मकुंडल्यांची महर्षींना काहीच गरज नव्हती हे ओघानेच आले. म्हणजे, नाडीपट्टीत कुंडल्यांची माहिती असण्याचे काहीच सबळ कारण दिसत नाही.
तिसरे कारण असे की, नाडीवाल्यांची भाकिते कुंडलीतल्या १२ स्थानानुसार वर्तवलेली असतात असे त्यांच्या माहिती-पत्रकातच म्हटलेले आहे. अशा पद्धतीचे फलज्योतिष महर्षींच्या काळात म्हणजे ५००० वर्षांपूर्वी अस्तित्वातच नव्हते, मेषादि १२ राशीही तेव्हा प्रचारात नव्हत्या हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यामुळे सध्या प्रचलित असलेल्या कुंडलीचा तपशील पट्टीत असणे शक्य नाही. या तीन कारणांमुळे पट्टीत कुंडलीचा तपशील असतो हा नाडी-ज्योतिष्यांचा दावा खोटा ठरतो.
इथे एका गोष्टीचा खुलासा केला पाहिजे: तुम्ही जन्मतारीख बिनचूक सांगून जन्मवेळ अंदाजे सांगितलीत तरी ढोबळ मानाची कुंडली नाडी-ज्योतिषी बनवील व तिच्यावर वेळ भागवून नेईल. जन्मठिकाण ही बाब ढोबळ कुंडलीत कमी महत्वाची असते.
मग लोक खोटे बोलतात काय?
नाडीकेन्द्रात आपल्याला काय काय अनुभव आले याचे रसभरीत वर्णन करताना लोक नकळत खोटे बोलतात व अतिशयोक्ती करतात असे अनुभव आम्हाला आले आहेत. ''आम्ही नुसता अंगठा दिला, बाकी काही माहिती दिली नाही. तरी सुद्धा ही माहिती पट्टीत आली!`` असे कौतुकाने सांगतात. परंतु नाडीवाल्याच्या प्रश्नांची उत्तरे देताना या बाबतची पुष्कळशी माहिती त्यांनी दिलेली असते हे त्यांना आठवतही नाही. परंतु त्यांच्या सोबत गेलेल्या माणसांना आम्ही खोदून प्रश्न विचारले असता आम्हाला असे आढळून आले की तशी माहिती नाडीवाल्याने आडवळणाने प्रश्न विचारून त्यांच्याकडून काढून घेतलेली होती.
धूळफेक करणारा प्रचार.
नाडीज्योतिष हा एक चमत्कार आहे असा प्रचार काही लोक करीत असतात. लोकांच्या मनातल्या अंधश्रद्धा हे नगदी पीक आहे हे त्यांच्या लक्षात आले आहे. ते पीक जोपासणे व वाढवणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. अशा प्रचारावर सूज्ञ वाचकांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत.

सारांश :- नाडी-पट्टीत व्यक्तींची नावे व जन्मकुंडलीचा तपशील असणे शक्य नाही हे आम्ही दाखवले. नाडी-ज्योतिषी स्वत:च भाकिते वर्तवतात व ती महर्षींच्या नावावर खपवतात हेही आम्ही दाखवले. अर्थात्, या सर्व गोष्टी अप्रत्यक्ष रितीने परिस्थितीजन्य पुराव्यावरून व तर्काचा उपयोग करून सिद्ध होतात. नाडीज्योतिषाला कूट लिपीची तटबंदी आणि 'नाडी पट्टी सापडत नाही` ही पळवाट उपलब्ध असल्यामुळे त्याच्याविरुद्ध थेट पुरावे देणे शक्य होत नाही. नाडी-ज्योतिषाची भाकिते किती खरी ठरतात व किती खोटी ठरतात, हा मुद्दा इथे अप्रस्तुत आहे.

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) प्रकरण ३ - फेंग शुई! वास्तूशास्त्राला चिनी चॅलेंज

फेंग शुई! वास्तूशास्त्राला चिनी चॅलेंज

''कमाल आहे फेंग शुई माहीत नाही?`` बहुतेक त्याला 'व्यर्थ आहे जीवन` असं म्हणायचं असावं. पण अज्ञानाची कीव करण्याची संधी मिळाली हे काय थोडं झालं का? जागतिकीकरणाच्या लाटेत केवळ वस्तुंची देवाणघेवाण झाली नाही तर त्याच्याशी निगडीत असलेल्या कल्पना वा माहिती व तंत्रज्ञानाची पण आयात निर्यात झाली. अन्यथा त्या वस्तुंची उपयोगिता जर माहिती झाली नाही तर ग्राहक ती कसा घेणार? दिवाणखान्याची शोभा वाढवणाऱ्या पवनघंटी, हसऱ्या बुद्धाच्या मूर्ती, चिनी बदकांची जोडी, ड्रॅगॉनचे डोके असलेला कासव, फिनिक्स, तीन पायांचा बेडूक, चिनी लिपीच्या नाण्यांची माळ, फिश टॅंक या चित्रमय वस्तू हा केवळ उच्च अभिरुचीच्या वास्तूसौंदर्यशास्त्राचा भाग आहे हा माझा समज ही त्या अज्ञानाचा भाग होता. पूर्वी गांधीजींच्या तीन माकडांची चित्रे दिवाणखान्यात किंवा एखाद्या दुकानात असायची त्याऐवजी आता चिनी चेहऱ्याच्या विरळ अधोदिशी दाढीमिशा असलेल्या तीन माणसांच्या चित्रवस्तू दिसू लागल्या. एकमेकात गुंतलेले चौकोनांचे भौमितिक चित्र वाटणारे कशीदाकाम, स्फटिकांचा गोळा दिवाणखान्यात टांगले जाऊ लागले. देवळाच्या प्रवेशद्वाराजवळची संगमरवरी कासवे छोटे पितळी रुप घेऊन दिवाणखान्यात आली. म्हणजेच थोडक्यात आपल्या घराची फेंग शुई झाली.
फेंग शुई म्हणजे काय?
चिनी खाद्य हे 'चायनीज् फूड` म्हणून अल्पवधीत लोकप्रिय का झाले? भारतात काय विविध पाककलाकृती संपल्या की काय? एरवी झुरळांच लोणचं, भरल्या वांग्यासारखा भरला साप, बेडकाची तंगडी फ्राय अशा कल्पना असलेलं चायनीज फूड भारतात वेगळचं रुप घेउन आलं आणि रसिक खादाडांच्या पोटाचा कब्जा घेतला. रुचीचा आस्वाद ही सुद्धा एक संपन्न होणारी प्रक्रिया आहे. सुरवातीला गोमूत्रासारखी लागणारी बिअर ही नंतर अमृतासमान वाटायला लागते. कारण तशी ती वाटली नाही तर गाढवाला गुळाची चव काय? हा शिक्का बसायची भीती. त्यामुळे तुमच्या चवीत आपोआप बदल होत असतो. तसं चायनीज फूडला तोंड वेंगाडणारी लोक आपोआप लाळ गाळू लागली आणि चायनीच रेस्टॉरंटची संख्या वाढली.
फेंग शुईच तसचं झालं.फेंग शुई ही एक चिनी व्यक्ती आहे इथपासून ते तो एक धर्म वा पंथ आहे इथपर्यंत अनेक समज लोकांमध्ये आहेत. फेंग शुई म्हणजे चिनी वास्तू शास्त्र. फेंग शुई चा शब्दश: अर्थ हवा आणि पाणी. फेंग शुई हे पर्यायी विज्ञान आहे असे फेंग शुई तज्ज्ञ सांगतात. ते पाच हजार वर्षांचे जुने आहे. फेंग शुई हे वास्तूतील उर्जेच्या संतुलनाचे काम करते. एखाद्या तिखट पदार्थाचा तिखटपणा कमी करण्यासाठी आपण जसे लिंबू पिळतो तसे त्या वास्तुत उर्जेचा प्रभाव कमी जास्त करण्यासाठी वेगवेगळया वस्तूंचा वापर करुन ती उर्जा आपल्याला अनुकूल करुन घ्यायची अशी ती कल्पना आहे. ज्या प्रमाणे शेतकरी आपल्या शेतीची मशागत करुन भरघोस पीक काढतो त्याप्रमाणे फेंग शुई तज्ज्ञ वास्तूच्या उर्जेची मशागत करुन घरधन्याला समृद्धीचा लाभ करुन देतात. फेंग शुई च्या तत्वानुसार यिन आणि यांग या दोन मूलभूत शक्ती स्त्री आणि पुरुष या सारख्या असून त्यांच्या संयोगातून 'ची` ही उर्जा तयार होते. आपल्याकडच्या प्राण या घटकासारखी. याचाच आधार फेंग शुई मध्ये घेतला आहे. फेंग शुई ला चिनी ज्योतिषशास्त्राची जोड आहे. ते भाग्य व कर्म याचाही विचार करतं. त्यातं अंत:प्रेरणेचाही भाग आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने कोणतीही एक गोष्ट फेंग शुई नुसार सर्वाना सारखी नसते.

वास्तू शास्त्र म्हणजे इंडियन फेंग शुई
आपल्या कडचे वास्तूशास्त्र कमी पडले की काय त्यामुळे त्यामुळे फेंगशुई ची गरज पडावी? असा सवाल काही देशाभिमानी जरुर करतात. आमचंही वास्तूशास्त्र तितकच प्राचीन आहे. इथं प्राचीनता कुठंतरी अस्सलपणाशी निगडीत आहे. स्कॉच जेवढी जुनी तेवढी अस्सल.जितकं प्राचीन तितकं ते विश्वासार्ह. आधुनिकतेचा पुरस्कार हा जसा अहंकाराचा भाग असू शकतो तसाच प्राचीनतेचा वारसा हा सुद्धा असू शकतो. मोहेंजोदडो व हडप्पा संस्कृतीचे उत्खननाचे अवशेष हा उत्कृष्ठ नागरी रचनेचा नमुना आहे. म्हणजे बघा आमची संस्कृती त्याकाळातही किती पुढारलेली होती. चिनी बॅबिलीऑन, ईजिप्शियन, ग्रीक, खाल्डियन या ही प्राचीन होत्या. इथं प्राचीनतेच्या अहमअहमिकेचा मुद्दा नसून सद्यस्थितीतील उपयुक्ततेचा आहे.
आपल्याकडे वास्तूशास्त्र हे एवढं प्राचीन असून ही अचानक या आठ-दहा वर्षात कसं काय उदयास आलं? त्या अगोदर त्याचा बोलबाला का नव्हता? नवीन मार्केटिंग मॅनेजमेंटने वस्तुच्या मार्केटिंग चा केवळ अभ्यास न करता ती वापरणाऱ्या ग्राहकाची संस्कृती, मानसिकता, समाजव्यवस्था अशा अनेक घटकांचा अभ्यास करुन परंपरागत मार्केटिंग न करता आधुनिक तंत्रप्रणाली वापरण्यास सुरवात केली. कोंदट वास्तूत मन प्रसन्न रहाणार नाही हे सांगायला कोणत्याही वास्तू तज्ज्ञाची गरज नाही. मोकळी हवा, स्वच्छ प्रकाश या गोष्टी मनाच्या प्रसन्नतेत भर टाकतात. वास्तूरचनेचा तुमच्या मनोव्यापाराशी संबंध आहे हे एकदा सिद्ध झाले की पुढे शुभाशुभत्व, यशापयश, आरोग्य, उत्कर्ष वगैरे गोष्टींशी जोडला गेलेला संबंध हा मान्य करण्यास अडचण येत नाही. आपल्या अपयशात,संकटात वास्तूचा काही संबंध तर नाही ना? वास्तूत योग्य ते अनुरुप बदल करुन जर आपल्या अडचणी दूर होत असतील तर करुन बघायला काय हरकत आहे ही मानसिकता हेच वास्तुशास्त्राचे मोठे यश. शिवाय त्याला आता समाजात प्रतिष्ठाही मिळू लागली आहे. पूर्वी दारु पिणाऱ्या माणसाला तो कर्तृत्ववान असला तरी समाजात प्रतिष्ठा नसे. आता त्याच्या दारु पिण्यलाही प्रतिष्ठा, ग्लॅमर मिळाले आहे. वास्तूशास्त्राचेही असेच झाले आहे. उच्चशिक्षित व नवश्रीमंत वर्गाला आपला वास्तूशास्त्रावरचा विश्वास ही अंधश्रद्धा आहे असे कुणी म्हटल्यास त्याला ते कसे आवडेल? त्यामुळे वास्तूशास्त्राला प्राचीनतेची, वास्तूसौंदर्यशास्त्राची, वैज्ञानिक परिभाषेची, प्रयोगशीलतेची, अध्यात्माची, संस्कृतीची, समाजमान्यतेची, जोड दिली. सुशिक्षित नवश्रीमंत वर्गाला वास्तूशास्त्र हे अदृष्टाच्या भीतीचा बागूलबुवा करुन स्वीकारायला लावायच्या ऐवजी जर त्याला "ग्लॅमर" दिलं तर त्याला ही "भीती "पण "एन्जॉय" करता येईल. वास्तूशास्त्र हे प्रतिकूल परिस्थितीत वापरावे असे थोडेच आहे. प्रतिकूल परिस्थिती येऊ नये म्हणून प्रतिबंधक म्हणून ही वापरता येते.त्यातूनही वास्तूत अनुरुप बदल करुन ही जर अनुकूल बदल झाला नाही तर ते वास्तूशास्त्राचे अपयश नसून तो तुमच्या पूर्वसंचिताचा भाग आहे हे मानायला आपली तयारी होते.

फेंग शुईचा बोलबाला कशासाठी?
एखादा धार्मिक विधी जर शास्त्रवत करायचा झाल्यास त्यात सहसामुग्री ते नियम पालन यात अनेक व्यावहारिक अडचणी यायच्या. खेडेगावात ग्रामजोशी पूजा घालताना रेशीम वस्त्र, अत्तर, चंदन, बदाम अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्याकडे करु लागला तर कसे जमायचे? कारभारणीला जर मम, आत्मना, स्मृतीश्रुती, पुरोणोक्त, फलप्राप्त्यर्थम् असे जर म्हणायला सांगितले तर ते परिस्थितीशी कसे बर सुसंगत होईल? मग ''काका! घ्या चालतं करुन!`` साहजिकच त्यावर तोडगे निघाले. सुपारी कारभारनीचं काम करु लागली. धूतलेलं कापडं पीतांबराच काम करू लागला. खारीक खोबर चालायला लागलं. असे धूप दीप नैवेद्यांना विविध पर्याय निघाले. कायद्यात जर "पळवाटा " सापडतात तर धार्मिक विधीत का बरं "तोडगे "निघू नये? कालपरत्वे तोडगेच अधिक सामर्थ्यशाली व्हायला लागले. वास्तूशास्त्रानुसार बदल करण्यासाठी तोडफोड करावी लागण्या ऐवजी जर तोडगे निघाले तर कुणाला नको आहेत? फेंगशुईने नेमके हेच केलं.दक्षिणाभिमुख घराची धास्ती अजिबात नको! फेंग शुई मध्ये दक्षिण दिशा ही चक्क शुभ आहे.ती मानमर्यादा व प्रतिष्ठा वाढविणारी आहे. आग्नेय दिशा ही भारतीय वास्तूशास्त्रापमाणे अग्निची आहे तर फेंग शुई प्रमाणे ती संपत्तीची असून लाकूड या तत्वाची आहे.त्यामुळे फेंग शुई प्रमाणे तोडगे केल्यास ते भारतीय वास्तूशास्त्राच्या नेमके विरोधात जातात. काही तोडग्यांमध्ये मात्र समान धागे आहेत. उदाहराणार्थ घोडयाचा नाल प्रवेशद्धाराजवळ लावणे, फुटका आरसा न वापरणे, केरसुनी कोपऱ्यात न दिसेल अशी ठेवणे वगैरे वगैरे. फेंग शुई मध्ये नीटनेटकेपणा, स्वच्छता, सुशोभीकरण, शांतता यांना फार महत्व आहे. घरात लग्न जुळण्यात अडचणी येत असतील तर चिनी बदकाची जोडी, डबल हॅपीनेस सिम्बॉल, फिनिक्स पक्षाची जोडी यांची चित्रे व चित्रवस्तु घरात ठेवा. वंशवृद्धी साठी ड्रॅगन आणि फिनिक्स यांच एकत्रित चित्र, मुले अंगावर खेळवणारा हसरा बुद्ध यांची चित्रकृती घरात ठेवा. असे अनेक छोटे छोटे तोडगे फेंग शुई मध्ये आहेत. यातील चित्र वस्तुंच्या किमती ही २०० ते ५०० रूपयांपर्यंत असून त्या बाजारात सहज उपलब्ध आहेत. वास्तू शास्त्रानुसार वास्तू शास्त्रशुद्ध करुन घेण्यासाठी मूलभूत बांधकामात बदल करावे लागू शकतात. तर फेंग शुई मध्ये वस्तुंची रचना ही योग्य दिशेला करुन चांगल्या वाईट उर्जेचे संतुलन केले जाते. अडचणीत आलेल्या माणसाला तोडगे करणे हेच जर फार अडचणीचे असेल तर तो करणार नाही. जे व्हायचं ते होईल अशी 'रिस्क' घ्यायला नाईलाजाने तो तयार होतो. पण त्याला नुकसानाच्या मानाने तुलनेने कमी खर्चाचे तोडगे जर उपलब्ध करुन दिले तर तो 'प्रयत्नांचा भाग` म्हणून करण्यास प्रवृत्त होतो. फेग शुई मध्ये 'अर्थ लक` व 'हेवन लक` अशी संकल्पना आहे. हेवन लक म्हणजे तुमचे भाग्यसंचित. हे घेऊन जे लोक आलेले असतात त्यांचा गाडा सुरळीत चाललेला असतो. पण ज्यांचं तसं नसतं त्यांना अर्थ लक म्हणजे वास्तूद्वारे प्राप्त झालेले भाग्य. हे बदलणं आपल्या कक्षेत बसतं. फेंग शुई म्हणजे ते भाग्य अनुकूल करुन घेण्याचा प्रयत्न हा पर्याय रहातो. ही गाजराची पुंगी असते. वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. माणसाला विविधता हवी असते. ती तो प्रयत्नांमध्ये पण शोधतो. क्रिकेटला जी लोकप्रियता मिळाली त्यात ग्लॅमर टिकवून ठेवण्यासाठी ही विविधता उपयोगाला आली. पाच दिवसांचे कसोटी सामने ग्लॅमर ची झालर असली तरी लोकांना कंटाळवाणे वाटू लागले होते. मग ही कोंडी फुटली आणि वन डे सामने, डे-नाईट सामने आले. तसे भारतीय वास्तू शास्त्र हे लोकांना कंटाळवाणे व महागडे वाटू लागले होते. काहीतरी शॉर्ट कट पाहिजे होता. फेंग शुईने ती कोंडी फोडली.
भारतीय वास्तू शास्त्र ही काही बदल करुन लोकांच्या समोर वास्तुज्योतिषाच्या रुपात पुढे आले. एखादी वास्तू सर्वांसाठी कशी शुभ असेल? त्या व्यक्तिचे पत्रिकेत जर वास्तुसौख्याचा योग नसेल तर त्याने कितीही वास्तूशास्त्रानुसार बांधकाम केले तरी वास्तुसौख्य कसे मिळेल? आडातच जर नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? त्यामुळे वास्तुज्योतिषी पुढे आले आणि म्हणू लागले की आम्ही लोकांना विनाकारण खर्चात पाडत नाही. आम्ही वास्तू शास्त्रही जाणतो आणि ज्योतिषही जाणतो. आम्ही तोडफोड न करावयाला लावता योग्य ते तोडगे सुचवू भारतीय वास्तूशास्त्र काही भोंदू वास्तूशास्त्रींमुळे बदनाम झाले आहे. ज्योतिष आणि वास्तूशास्त्र हे स्टेशनरी व कटलरी, किराणा व भुसार, एसटीडी आयएसडी व झेरॉक्स, शेती व कुक्कुटपालन यासारखे एकमेकांना पूरक असे व्यवहार्य व्यवसाय आहेत. त्यामुळे ज्योतिषी कम फेंग शुई तज्ज्ञ हे आपल्याला दिसतात.
जागतिकीकरणाच्या लाटेवर आरुढ होऊन फेंग शुई भारतात आले तसे इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इथं ही फोफावले रेस्टॉरंट, बॅंका, व्यापारी संकुल या ठिकाणचे ही फेंग शुई करण झाले. फेंग शुईच्या भरपूर वेबसाईट नेटवर आहेत. शिकागोला फेंग शुईच प्रशिक्षण देणारी संस्था आहे. त्यांच्या सेमीनार च्या फी ३०० डॉलर पासून ९०० डॉलरपर्यंत आहेत. भोंदू फेंग शुई तज्ज्ञांपासून सावध रहा असा जनहितार्थ इशारा देणाऱ्या जाहिराती आहेत. अर्थात भोंदू कुठला व खरा कुठला हे ओळखण्यासाठी आपल्याला काही किंमत मोजावी लागते. फेंग शुई विरुद्ध वास्तूशास्त्र अशीही जुगलबंदी पहायला मिळते. मागणी तसा पुरवठा या न्यायाने कुणाला वास्तूशास्त्र पाहिजे असेल तर वास्तू शास्त्र, कुणाला फेंग शुई पाहिजे असेल तर फेंग शुई असा पुरवठा करणारे कन्सलटंटही एकाच ठिकाणी भेटतात. ग्राहक देवो भव । शेवटी उद्दीष्ट तर सारखं आहे ' वास्तुसौख्य` !

पूर्व प्रसिद्धी :- 'अनुभव` सप्टेम्बर २००१

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) प्रकरण ४- युजीसी आणि फलज्योतिष

यूजीसी व फलज्योतिष

फलज्योतिषाचे 'ज्योर्तिविज्ञान` असे गोंडस नामकरण करुन यूजीसीने त्याचा अंतर्भाव विज्ञान शाखेत सुरुवातीला केला होता. बीएस्सी अस्ट्रॉलॉजी, एमेस्सी अस्ट्रॉलॉजी यासारखे कोर्सेस सुरु करण्याचा प्रस्ताव होता. त्यामुळे फलज्योतिषाला खगोलशास्त्रापासून दूर ठेवणारी रेषा पुन्हा एकदा धूसर केली गेली. त्यासाठी आपल्याला किमान पाच शतके मागे नेणारा अभ्यासक्रम अक्षरश: लादला होता. परंतु जनमताच्या रेटयामुळे हा विषय आता किमान विज्ञान शाखेतून वगळला आहे.
यूजीसीने १९९० मध्ये फलज्योतिषाला शिष्यवृत्ती देण्यासाठी असलेल्या विषयात समाविष्ट केले. हा चंचुप्रवेश होता. त्यावेळी एसएनडीटी विद्यापीठात ज्योतिषशास्त्र व हस्तसामुद्रिक हे अभ्यासक्रम सुरु करण्याचे घोषित करण्यात आले. परंतु त्याविरुद्धही असाच गदारोळ होउन विद्यापीठाला प्रस्ताव मागे घ्यावा लागला होता. यूजीसीच्या आत्ताच्या प्रस्तावाबाबत ३१ मार्च २००१ च्या इंडियन एक्सप्रेस या मान्यवर वृत्तपत्राने पुढील प्रमाणे बातमी प्रसिद्ध केली - यूजीसी चे चेअरमन हरी गौतम म्हणाले, 'बी. एस्सी. व एम. एस्सी. इन ऎस्टा्रलॉजी हा व्यावसायिक अभ्यासक्रम असून तो विवक्षित विद्यापीठात उपलब्ध असेल. तेथे 'ज्योतिर्विज्ञान` या नांवाने हा विषय शिकविला जाईल. अधिक तपशील लौकरच जाहीर होईल. वेगवेगळया विद्यापीठाच्या तज्ज्ञ लोकांचे पॅनल याचा अभ्यासक्रम निश्चित करेल.` यावर साहजिकच वादळ उठले. त्यानंतर यूजीसी ने आपल्या निर्णयाच्या पुष्टयर्थ खालील मुददे मांडले :-
१) वैदिक फलज्योतिष हा आपल्या पारंपारिक ज्ञानाचा एकमेव मुख्य विषय नाही. परंतु ही शाखा मानवी जीवनात घडणाऱ्या घटना व विश्व यांचे कालसापेक्ष ज्ञान देते.
२) या शाखेचे वैशिष्टय असे की यात काळ, त्याचे स्वरूप व मानवी जीवनावर हाणारा परिणाम यांची उपयुक्तता अभ्यासता येते.
३) अचूक अंदाज व्यक्त करण्या साठी सर्वोत्कृष्ट पद्धतीचा वापर केला असून सुद्धा प्रत्यक्षात घटना मात्र वेगळयाच प्रकारे घडतात, ही एक दृष्टिस पडणारी बाब आहे आणि त्यातूनच आयुष्यातील तणाव, चिंता, नैराश्य वाढत जाते. याठिकाणी अज्ञाताचा वेध घेण्यासाठी वेदिक फलज्योतिष उपयुक्त ठरु शकेल कारण हा कालाशी निगडीत असलेला विषय आहे.
४) या कोर्समुळे केवळ ज्ञान लोकांपर्यंत पोहोचणार नसून वैदिक गणित, वास्तुशास्त्र,
हवामानाचे अंदाज शेती, खगोल आदि विषयांच्या संशोधनाला नवी दिशा मिळेल.

परंतु तरीही वादळ शमले नाही. त्यानंतर ६ ऑगस्ट २००१ रोजी हिंदुस्तान टाईम्स ने प्रसिद्ध केलेली बातमी होती - 'यूजीसीने ज्योतिर्विज्ञान हे विद्यापीठाने विज्ञान शाखेतच सामाविष्ट केले पाहिजे असा आग्रह धरला नसून बी.ए. एम.ए. अशा अभ्यासक्रमातही हा विषय सामाविष्ट केला जाउ शकतो असे म्हटले आहे. तसेच २२ विद्यापीठांना अशी परवानगी देण्यात आली आहे.` अखेरीस यूजीसीने पलटी मारलीच!
तत्पूर्वी शास्त्रज्ञ डॉ. पी.एस.भार्गव, प्रो. के. सुभाषचंद्र रेड्डी व चंदन चक्रवर्ती यांनी या निर्णयाविरुद्धची याचिका आंध्र प्रदेश न्यायालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली. ज्योतिष हे विज्ञान म्हणून सिद्ध झालेले नाही. किंवा तशी चाचणीही घेण्यात आली नसताना हा विषय थेट विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करणे हे अतार्किक असून सद्सद विवेकाचे नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.
त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व बॅंक कर्मचारी प्रबोधिनी लातूर, यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात या विषयासंबंधी याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी धर्मावर आधारित असलेले शिक्षण हे नागरिकांच्या पैशाने विद्यापीठातून देणे हे भारतीय राज्य घटनेच्या कलम २८ प्रमाणे चूक आहे, विद्यापीठ अनुदान आयोगाने ज्योतिर्विज्ञान हा विषय विद्यापीठात सुरु करणे बाबत अध्यक्ष हरी गौतम यांच्या सहीने पाठविलेली पत्रे ही बेकायदेशीर आहेत अशी भूमिका मांडली आहे.
भारतातील काही राजकीय पक्षांनी मात्र शिक्षणाच्या भगवेकरणाला किंवा ब्राम्हणी वर्चस्वाच्या सुप्त शक्यतेला विरोध म्हणून यूजीसीच्या या निर्णयाला विरोध केला आहे.
परंतु एक प्रश्न तरीही उरतोच, ज्ञान सागरातले शिंपले इकडून तिकडे जाण्यासाठी यु.जी.सी. च्या संमतीची काय गरज आहे? यूजीसीनेच आपल्या उपसचिव डॉ. पंकज मित्तल यांच्या सहीने वेदिक ऎस्ट्रॉलॉजी विभाग सुरु करु इच्छिणाऱ्या विद्यापीठांना पाठवलेल्या २३ फेब्रूवारी २००१ च्या पत्रा सोबत पूर्वी पासून हा विषय शिकवणाऱ्या विद्यापीठांची यादीच माहीतीपत्रकात जोडली आहे. यात राजस्थान विद्यापीठ उदयपूर, विक्रम विद्यापीठ उज्जैन, एम.एस. विद्यापीठ बडोदा, पी.एस. तेलगु विद्यापीठ हैदराबाद या सारख्या १६ विद्यापीठांची यादीच जोडली आहे. म्हणजे यूजीसीच्या संमतीविनाही हा विषय भारतात शिकवला जात होता हे खुद्द यूजीसीनेच कबूल केले आहे.
विविध तज्ज्ञांची मते
भविष्यातील घटना जाणून त्याद्वारे तणाव, चिंता, नैराश्य या अडचणी सोडवता येतात असे यूजीसीचे शिक्षणतज्ज्ञ गांभीर्याने कसे म्हणू शकतात? अशी शंका इतिहासतज्ज्ञ रोमिला थापर यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते 'अहो, ज्योतिषाचे समर्थक सुद्वा असे म्हणणार नाहीत. फलज्योतिषाला शास्त्रीय ज्ञान म्हणणे व ते ज्ञान जगाला प्रदान करायचे आहे असे म्हणणे म्हणजे विज्ञानाची थट्टा करण्यासारखे आहे.`
प्रा.यशपाल खगोल भौतिकतज्ञ व माजी चेअरमन यूजीसी यांच्या मते ज्या काळात फलज्योतिषाचा उगम व विकास झाला त्या काळातील समाजशास्त्र व मानव्यविद्या यांचा अभ्यास करण्यास काहीच हरकत नाही. पण त्याला विज्ञान शाखेत टाकणे ही घोडचूक ठरेल.
जगद्विख्यात खगोलशास्त्रज्ञ प्रा.जयंत नारळीकर यांनी हा निर्णय देशाला मागे नेणारा आहे असे म्हटले आहे. त्यांच्या मते ज्या विषयाचे दावे विज्ञानाच्या कसोटीवर हास्यास्पद ठरतात असा विषय विज्ञान म्हणून शिकवणे हा विरोधाभास आहे. अशा त-हेने छद्मविज्ञानाला दिलेला पाठिंबा हा जगात भारताची चुकीची प्रतिमा निर्माण करेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
काहींना ही बाब मुरलीमनोहर जोशी यांचा कावेबाजपणा असून त्यात त्यांना हिंदुत्वाचा छुपा अजंडा दिसतो.
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी अर्थातच या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणतात, ''यामुळे फलज्योतिष या विषयावर संशाधन होउन प्रगती होईल. प्रत्येक व्यवसायात जशा अनिष्ट प्रवृत्ती असतात तशाच त्या ज्योतिषातही आहेत. त्यामुळे हा विषयच अंधश्रद्धा म्हणून टाकून देणे योग्य नव्ह.``
डॉ. वसंत गोवारीकर यांनी म्हटले आहे, '' विज्ञानाची आजची परिमाणे फलज्योतिषाला लागू पडत नाहीत. म्हणून फलज्योतिष हे मी विज्ञान म्हणून मानत नाही. त्यामुळेच फलज्योतिषाचा अंतर्भाव अभ्यासक्रमात करावा असा यूजीसी आदेश मला चुकीचा वाटतो. फलज्योतिषाचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करावा हा निर्णय घातक व बुद्धीभेद करणारा आहे.
एकवीसाव्या शतकात प्रवेश करताच भविष्याकडे पाठ फिरवून भूतकाळात जाण्याचा हा प्रयत्न आहे, प्राचीन परंपरेच्या दुराभिमानातून, वैदिक वारसाच्या भावनातिरेकातून घेतलेला हा निर्णय आहे, असे मत डॉ. जनार्दन वाघमारे यांनी व्यक्त केले आहे.
डॉ.चित्रा नाईक यांनी म्हटले आहे, '' भारतीय संस्कृतीच्या अभ्यासकांसमोर ज्योतिषशास्त्र, प्राचीन वाटणारे वास्तूशास्त्र यांना विज्ञान म्हणावे असे पुरावे प्रथम आले तरच उच्च शिक्षणांत या विषयांना स्थान देतो येईल.``
'विद्यापीठे ही समाजाची, समाजासाठी त्याच्या गरजेनुसार ज्ञानदान करणारी केंद्रे आहेत. ती काही विशिष्ट शास्त्रासाठी, केवळ बुद्धीमंतांची गरज भागवण्यासाठी नाहीत. समाजाला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे. त्या त्या संबंधीचे ज्ञान सुव्यवस्थितपणे मिळालेच पाहिजे. समाजाला ज्योतिषशास्त्राची गरजच का वाटते? याचे सोपे उत्तर सोडून अंधश्रद्धा वगैरे प्रश्न निर्माण करण्याचे कारण नाही. अज्ञाताचा पडदा दूर सारुन भविष्यात काय दडले आहे. हे जाणून घेण्याची माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्याला त्यासंबंधी सतत उत्कंठा आहे. आणि त्यामुळे समाज वैज्ञानिक दृष्टया जरी अत्यंत प्रगत झाला तरी तो भविष्य शास्त्राचा कानोसा घेणारच असे असल्याने त्यासाठी उत्तम अभ्यासक्रम करुन विद्यापीठाने समाजाची मानसिक गरज पुरी करणे आवश्यक आहे. नवीन स्पर्धात्मक युगात ही गरज जास्त तीव्रतेने वाटणार आहे कारण नशीबवान तोच पुढे जाणार आहे! ` असे मत प्रसिद्ध ज्योतिषी व.दा.भट यांनी व्यक्त केले आहे
अभ्यासक्रम ठरविण्यातच खरी अडचण
अकरा वेगवेगळया तज्ज्ञांच्या समोर सर्वानुमते मान्य होणारी गृहीतके, सिद्धांत, नियम तयार करताना त्यांना अंतर्विसंगतीला मोठे तोंड द्यावे लागणार आहे. काही ज्योतिषी फलज्योतिषाला आधुनिक विज्ञानाच्या पंक्तीत बसविण्यास उत्सुक आहेत. त्याला विद्या म्हणणे त्यांना आधुनिक युगात कमीपणाचे वाटते. त्या उलट ज्योतिषाला आधुनिक विज्ञानाचे निकष लागू होत नाहीत. दोन अधिक तीन बरोबर पाच असे गणित येथे लागू पडत नाही. तो अनुभूती वा श्रद्धेचा भाग असून त्याचे अनुभव ही व्यक्तीसापेक्ष बाब आहे असे मानणारेही ज्योतिषी आहेत. ज्योतिषातला एक कट्टर पंथ असे मानतो की यदृच्छेशिवाय झाडाचे पान सुद्धा हलू शकत नाही. तुमच्या आयुष्यातल्या सर्व घटना ठरलेल्या असतात. तुम्ही निमित्तमात्र असता. दुसरा पंथ असे मानतो की एक पंचमांश दैवाचा भाग आहे व चार पंचमांश भागावर इतर गोष्टी प्रभाव टाकत असतात. त्या अर्थाने तुम्हाला मर्यादित स्वातंत्रय आहे.
या मूलभूत संकल्पनांमधील या विसंगतीनंतर ज्या गणितावर कुंडली हा नकाशा तयार होतो त्यातील निरयन व सायन पंथ. निरयन गणित हे राशी चक्राचा आरंभ बिंदू स्थिर मानते. पारंपारिक ज्योतिष हे निरयनवादी आहे. त्यात पुन्हा ते आरंभ स्थान कुठले मानावे या विषयीचे वाद. त्यामुळे पंचागऐक्या विषयी टिळकांच्या काळात बरेच वादंग निर्माण झाले होते. पाश्चात्य पद्धती ही सायन म्हणजे राशीचकाचे आरंभस्थान हा चल बिंदू आहे असे मानतो. हे सर्व गणित करण्याच्याच इतक्या विविध पध्दती आहेत. त्यानंतर या गणितावरून तयार होणाऱ्या कुंडलीतील फलिताच्या नियमाबाबतच्या अंतर्विसंगती हा तर अजून पुढचा टप्पा आहे. या सर्व अडचणींचा विचार करता सर्वमान्य प्रमाणित अभ्यासक्रम तयार करणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. न जाणो, त्यावर ही ते मार्ग काढतील. वैद्यकीय पॅथी जशा एकमेकावर टीका करत का होईना आनंदाने मार्गक्रमणा करीत आहेत त्या पद्धतीने जर हे अभ्यासक्रम तयार झाले तर एकमेका सहाय करू अवघे धरू सुपंथ या उक्ती प्रमाणे चालतील. मुळात या सर्व अभ्यासक्रमांचे थेट परिणाम भोगावे लागणारा 'जातक` हाच जर भाबडा व अंधश्रद्धाळू राहिला तर अशा अभ्यासक्रमांची वैधता ही बाबच नंतर गौण ठरेल.

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) प्रकरण ५ - फलज्योतिषचिकित्से विषयी एरिक रेग यानी संकलित केलेले प


फलज्योतिषचिकित्से विषयी एरिक रेग यानी संकलित केलेले पाश्चिमात्य विचार

दुर्दैवाने अनेक खगोलशास्त्राच्या पुस्तकात फलज्योतिषाच्या अस्तित्वाचा उल्लेखही नसते. अनेक खगोलशास्त्रज्ञ हा विषय अनुल्लेखाने मारतात. प्रश्न न विचारता स्वीकारलेल्या पूर्वीच्या काही खगोलशास्त्रीय संकल्पना या इतिहासात खोटया ठरल्या आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.

अनेक संशयवाद्यांना फलज्योतिषाविषयी माहित नसलेल्या गोष्टी

१) फलज्योतिषाने बहुधा खगोलशास्त्राला जन्म दिला असावा. पत्रिका तयार करणे हा गणिती तत्वांचा व खगोलशास्त्रीय संकल्पनेचा भाग आहे. त्यात दैवी वा अतिनैसर्गिक असे काहीच नाही.

२) अनेक प्रसिद्ध शास्त्रज्ञ फलज्योतिषाशी संबंधीत होते. उदा. टायको ब्राहे, कार्ल जुंग, केप्लर, हक्सले, कोपर्निकस आणि इतरही अनेक.

३) ज्योतिषी दैवावर विश्वास ठेवतातच असे नाही. 'ग्रह हे एखाद्या गोष्टीसाठी प्रवृत्त करतात. ती गोष्ट घडवून आणत नाहीत, ` असे ते मानतात.

४) सध्या सुमारे १०००० लोक ज्योतिषाचा व्यवसाय करणारे तर लाखो ज्योतिषप्रेमी आहेत. या विषयावर शेकडो पुस्तके आहेत. अमेरिकेच्या जनतेतील फक्त १० टक्के लोकांचा असा विश्वास आहे कि यात काही तथ्य नाही.

५) फलज्योतिषामध्ये वस्तुनिष्ठता वा प्रत्यक्ष कार्यकारण भाव असणे अभिप्रेत नाही. अनेक ज्योतिषी असे मानतात की घटना व ग्रहयोग यांच्यात एक प्रकारचा नैासर्गिक ताळमेळ आहे. इतर देशांमध्ये या संकल्पने बाबत काही भर टाकली जाते.

६) ग्रहांचे मोजता येईल असे चुंबकीय, गुरुत्वाकर्षर्णीय, विद्युत चुंबकीय असे प्रभाव पृथ्वीवर पडतात. हे वैज्ञानिक तथ्य वादातीत आहे. पौर्णिमेला मानवी विक्षिप्त स्वभावाचा परमोच्च बिंदू गाठला जातो. यावर अनेक लोकांचा विश्वास आहे.

७) फलज्योतिष हे फक्त जन्मकुंडली पुरते मर्यादित नसून निवडणूक, चराचर सृष्टीतील घटना, प्रश्न विषयक, वैद्यक, हवामान इ. भागही त्यात येतो.

८) पत्रिकेवरुन ज्योतिष बघणाऱ्या ( केवळ दैनिकातील भविष्य बघून नव्हे ) बहुतेकांना आपल्या भाकितांचे आश्चर्यकारक व अदभूत अनुभव येतात.

९) नैसर्गिक घटनांची कालबद्धता अनेक ठिकाणी दिसून येते.

खालील गोष्टींमुळे फलज्योतिष असिद्ध होत नाही.

चुकीची भाकिते
बहुसंख्य शास्त्रज्ञांची दूषणे
चांगल्या कार्यकारण सिद्धांतांचा अभाव
फलज्योतिषाच्या नियमातील पक्क्ेपणाचा अभाव
न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे ग्रहांचे दिलेले स्पष्टीकरण

खालील गोष्टींनी फलज्योतिष सिद्ध होत नाही.

आश्चर्यकारकरित्या बरोबर आलेली भाकिते
ज्योतिषावर विश्वास ठेवणारे शास्त्रज्ञ
चंंद्राच्या प्रभावाचे ज्ञात परिणाम
सौरडागांचा परिणाम
फलज्योतिष हे अनुभवास येते असे मानणारे लोक
जगात मान्यताप्राप्त असलेल्या नियमाद्वारे फलज्योतिष सिद्ध होईल असे मानणे
डबल ब्लाईंड टेस्ट ने केलेले वस्तुनिष्ठपणे पुन:पुन: करता येणारे प्रयोग, संख्याशास्त्रीय चाचण्या

फलज्योतिषाविषयी थोडक्यात
फलज्योतिषाचा पाया हा पुष्कळ गूढ दैवी संकल्पच्या समजूतीवर आधारलेला होता. हा विषय दीर्घकाळ विसंगत स्वरुपात राहिला. हा विषय स्त्रियांमध्ये अधिक लोकप्रिय राहिला. कारण अचूक ठरलेली भाकिते लक्षात ठेवण्याची मानसिकता व स्तुतीप्रियता ही त्यांच्याकडे अधिक आहे. फलज्योतिष हे शास्त्रीय संशोधनांती स्वभाव विश्लेषण, वैवाहिक यशापयश, मृत्यू याबाबतची भाकिते सांगण्यात असमर्थ ठरले आहे.

संशयवाद्यांना फलज्योतिषांमध्ये सापडलेल्या त्रुटी

१) फलज्योतिषाचा विकास हा भूकेंद्री संकल्पना व बहुदैविक धर्माच्या गोतावळयावर आधारित होता.
२) फलज्योतिषातील राशी या त्यासंबंधीत तारकासमुहाशी जुळत नाहीत.
३) सर्वमान्य संकेतांचा अभाव
अ) ६ १२ १४ २४ किंवा २८ सौर राशी
ब) खगोलिय व सांपातिक सौर राशी
क) स्थानांच्या विभागातील फरक
ड) वेेगवेगळया स्थानां साठी वेगवेगळे अर्थ
इ) तारकासमूहाच्या खगोलीय स्थान निश्चितीसाठी बहुविध संज्ञा वा व्याख्या

४) ग्रह बालकाच्या जन्माचे वेळी प्रभाव टाकू शकतील यासाठी काही नैसर्गिक स्पष्टीकरण असेल असे काही वाटत नाही. गुरुत्वाकर्षण व विद्युतचुंबकीय प्रभावांचे बाबत बोलायचे झालेे तर हातांतील घडयाळाचा हा प्रभाव हा ग्रहापेक्षा अधिक असेल.

५) समजा ग्रहाचे ज्ञात वा अज्ञात बल मानवावर पडते आहे असे जरी गृहीत धरले तरी ते बळ एखाद्या ठिकाणी विशिष्ट वेळी जन्मलेल्या मुलाची निवड करुन त्यावर परिणाम करेल हे कसे ?

६) गर्भधारणेची वेळ ही जन्माचे वेळे पेक्षा योग्य नव्हे काय? वस्तुस्थिती अशी आहे की गर्भाची पूर्ण वाढ ( जेव्हा त्याला सर्व ज्ञानेंद्रिये येतात ) गर्भाशयात ही आठ महिन्यानंतर होत असते. मग तीच त्याची जन्मवेळ का पकडू नये? गर्भाशयामध्ये असे कोणते गुणधर्म आहेत की जे फलज्योतिषाचा प्रभाव थोपवू शकतील. एकाच वेळी जन्माला आलेल्या दोन माणसांमध्ये आढळणारा मुख्य फरक हा अनुवंशिकता, संस्कृती, धर्म, आरोग्य यामुळे असत नाही काय?

७) अंटार्टिका व आर्टिक्ट प्रदेशात जन्माला येणाऱ्या माणसाची जन्म पत्रिकाच नसते मग त्यांचे काय?

८) जर ग्रह आपल्यावर प्रभाव टाकत असतील तर पुरातन देवांच्या गुणात्मक प्रतिमांवरुन ग्रहांना जोडले गेेलेले गुणधर्म हे बरोबर आहेत हे कशावरुन ?

९) हर्षल नेपच्चून प्लूटो यांचे प्रभाव विचारत न घेता जुन्या ज्योतिषांना त्यांच्या निरिक्षणात त्रुटी कशा आढळल्या नाहीत?

१०) जन्मटिप्पणीतील भेद हा वांशिक, लिंग, वय, राष्ट्रीयत्व यातील भेदाइतका वाईट असतो काय?

११) ग्रहांचे अंतर विचारात न घेणारे अज्ञात फलज्योतिषीय प्रभाव आहेत काय? तसे असेल तर अतिदूर असणारे नेब्यूला, तारे व ग्रह फलज्योतिषाने विचारात घ्यायला नको काय? लघुग्रहांचा पटटा, अवकाश यान, उपग्रह, इतर ग्रहांचे ६२ हून अधिक चंद्र , धूमकेतू, सूर्यज्वाला यांचेही काही फलज्योतिषीय प्रभाव आहेत काय?

१२) ज्योतिषांनी मानलेला बहुसंख्य वैज्ञानिक पुरावा हा चुकीचा आहे. गोकॅलीनच्या अभ्यासातून पारंपारिक ज्योतिष हे असिद्ध झाले आहे. पौर्णिमेच्या दिवशी विक्षिप्त व अनोख्या घटना घडतात याला काही पुरावा मिळाला नाही.
जर अशा प्रकारचे परामानसशास्त्राच्या दाव्यासांरखे हे दावे खरे असतील तर मानवी जीवनाला उपयुक्ततेसाठी अधिक संशोधन व्हायला हवे. खोटे असतील तर मात्र लोकांनी आपला बहुमूल्य वेळ वाया घालवला आहे व चुकीचे निर्णय घेतले आहेत घेत आहेत. असे म्हणावे लागेल.

फलज्योतिषाबाबत खालील बाबी अभ्यासनीय आहेत
बॉब ग्लिकमन याने फलज्योतिषाच्या नवीन पद्धतीचा अभ्यास केला जो लोकांच्या स्वयंनिवडीवर आधारित होता.( यात राशीचक्राधारे चुकीच्या निवडी बरोबर येण्याच्या शक्यतेवर दक्ष रहावे लागते.)
गोकॅलिन याने हजारो वेगवेगळया प्रकारचे नमुने घेऊन त्यात काही तथ्य सापडते का हे पाहिले होते. त्याला मंगळाच्या स्थानाची सुसंगती ही २२ टक्के आढळली. जी जुळण्याची शक्यता संख्याशास्त्रीय दृष्टया प्रत्यक्षात १७ टक्के होती. अर्थात हे सर्वेक्षण त्याने एकूण लोकसंख्येच्या फार कमी भाग घेउन केले होते.

डेनिस रॉलिंग्ज असा दावा करतो की, कमिटी फॉर द सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन ऑफ द क्लेम्स ऑफ द पॅरानॉर्मल ( सीएसआयसीओपी ) ने गोकॅलीनच्या संशोधनाचा अन्वयार्थ चुकीचा लावला.

क्ल्वर व इन्ना यांना सूर्यराशी व भौतिक, शारिरिक गुणधर्म, व्यावसायिक सफलता, मृत्यू, आजारपण, व्यक्तिमत्व, यात कुठलाही संबंध आहे असे दिसून आले नाही.

जॉफ्रे डीन यांनाही घटस्फोटासंबंधी जी भाकिते केली गेली त्यात सुसंगती दिसून आली नाही.

लेखकाला फलज्योतिषाचा समर्थनाचा योग्य युक्तीवाद इंटरनेटच्या प्रचंड माहितीजाल शोधल्यानंतरही कुठेही दिसून आला नाही. फलज्योतिषातील तत्वे जो कोणी सिद्ध करेल त्याला बक्षीसाची मोठी रक्कम जाहीर करण्यात आली आहे. पण आतापर्यंत एकही जण हे आव्हान स्वीकारायला पुढे आला नाही.

मानवी मनाच्या खालील कमकुवत बाबी या फलज्योतिषाचे समर्थन करतात.

१) प्रशंसा कुणाला नको असते? स्त्रियांना तर ती विशेष आवडते. त्यामुळे ज्योतिषी त्याचा वापर करतात.
२) आपल्याला सहजगत्या सत्यशोधनासाठी एखादाच सोपा मार्ग हवा असतो.
३) आपल्या भविष्यात काय घडेल याची उत्सुकता असते. त्यासाठी मोठे नियोजन करायला पाहिजे असे आपल्याला वाटते. परंतु योगायोगाने काही गोष्टी घडतील असे आपल्याला वाटत नाही.
४) घटनेच्या योगायोगातील अर्थपूर्ण सुसंगती आपल्याला चटकन लक्षात रहाते. चुकीच्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो.
५) आपल्याच वाटयाला हे भोग येतात असे आपल्याला गांभीर्याने वाटते.
६) आपल्याला रोमांचकारी स्मृती वचने आवडतात. त्याचे अवघड बोजड वर्णन नकोसे वाटते.
७) एखाद्या ठिकाणी आपण गुंतवणूक केली असेल तर तेथे आपली चूक पचवायला जड जाते.
८) पहिल्या प्रयत्नातील अपयशानंतर दुसऱ्या वेळी प्रयत्नात योगायोगाने आलेले 'कमी अपयश` हे सुद्धा सुखद असते.
९) आधुिनिक विज्ञान व तंत्रज्ञानातील जगात गोंधळलेल्या काही जणांना हा 'मानवी` दिलासा कोरडया बुद्धीवादापेक्षा प्रेरणादायी वाटतो.
१०) आपल्याला बुद्धीवादापेक्षा गूढ व अदभूत गोष्टी अधिक आवडतात. ( अशा पुस्तकांचा खप पहा)
११) व्यक्ती आपल्याला समाधानकारक ठरेल अशा भाकितांना बळी पडत असते. व्यक्तीला जर वाटले काहीतरी घडेल तर ती गोष्ट नकळत कशी घडेल हेच पहात असते.
१२) आपण सूचनाबर हुकूम काम करत असतो असे अनेक अभ्यासात दाखवून दिले गेले आहे.

फलज्योतिषाने काय असे घोडे मारले आहे?

ती एक निखालस करमणूक आहे. धमकी तर नाही ना? जोडीदार शोधण्यात काही दुर्मिळ संधी असतात. अनेक संधींमधील छापा काटा करत बसण्यापेक्षा हे काय वाईट आहे? चिकित्सक पद्धतीने निर्णय घेण्याची प्रक्रिया ही गुंतागुंतीची असते. आणि तसेही आपले हजारो रुपये खर्च होतच असतात. त्यापेक्षा झटकन निर्णय घेऊन निवांत बसलेले बरं.

आपले फलज्योतिषाने केलेले वर्णन

आपण संवेदनाशिल व विनोदाची जाण असणारे गृहस्थ आहात. इतर लोक आपल्याकडे कसे बघतात याची पूर्ण कल्पना आपल्याला आहे. आपण भरपूर प्रयत्न करता तरी पण आपल्याला भविष्याची कधी कधी चिंता वाटते. काही कजाग लोक आपल्याला पाण्यात पहातात. पण वेळ आल्यावर आपण त्यांना त्यांची जागा बरोबर दाखवून देता. आपण काही व्यक्तिगत समस्या किंवा बाबी कुणाला सांगत नाही.

काहीवेळा आपल्याला या ठिकाणाचा एवढा कंटाळा येतो की कुठंतरी लांब जावेसे वाटते. अनेक लोक आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतात. कधी कधी या सगळया जंजाळाच्या बाहेर पडून आपल्याला मस्तपैकी आराम करावासा वाटतो. ज्यांनी मागच्या आठवडयात आपल्याला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला त्यांची थोबाडे लवकरच बंद होतील.आपल्याला आवडणारे काही टी.व्ही शो हे शुक्रवारी रात्री असतात. खरं तर या सर्व गोष्टींचा आपल्याला जाण आहेच. अजूनही काही गुपीते आपण आपल्या जीवलग मित्रांना सुद्धा सांगत नाही.
आपल्याला कधी आपण खड्डयात पडतोय अशी विचित्र स्वप्ने पडतात. आपल्या मनात शंका असली तरी आपल्याला भवितव्य उज्वल आहे.

चिकित्सकांसाठी काही कानगोष्टी

१) पुरावा देण्याची जबाबदारी दावा करणाऱ्यांवर आहे.
२) असामान्य दाव्यांसाठी पुरावाही असामान्यच पाहिजे.
३) पूर्व दूषित ग्रह टाळा व खुल्या मनाने पहा.
४) वादासाठी वाद वा व्यक्तिगत चारित्रय हनन करणारे मुद्दे नसावेत.
५) निर्विवाद मुद्यांशी सहमत होण्यास तयार व्हा, संख्याशास्त्रीय बाबी विचारात घ्या.
६) वैध कारणेच विचारात घ्या. वेड, भ्रम, उन्माद, लबाडी यापासून सावध रहा. अनुभवांच्या आधारे जनमताचा रेटा कितीही असला तरी डबल ब्लाईंड टेस्ट सारख्या सुनियंत्रित प्रयोगांचा निष्कर्षासाठी वापर करा. त्यानंतर आपल्या मताशी प्रामाणिक रहा.


पाश्चिमात्य जगतातील काही मान्यवर फलज्योतिष संशोधकांची माहीती

डॉ. जॉफ्रे डीन व आर्थर माथर :- रिसेंट अडव्हान्सेस इन नेटल ऎस्ट्रॉलॉजी अ क्रिटीकल रिव्हयू : १९०० -१९७६ या पुस्तकाचे लेखक. पुस्तकातील पहिला भाग हा फलज्योतिषावरील टीकात्मक व वैज्ञानिक संशोधनावर आधारित आहे. लेखकद्वय हे १९७५ पासून या विषयावर असलेल्या विविध टीकात्मक लेख, चर्चा, परिसंवाद प्रयोग, स्पर्धा यातील सहभागी आहेत. डीन हे पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ या ठिकाणी मुक्त तांत्रिक लेखक व सल्लागार तसेच संपादकही आहेत. माथर हे लिव्हिंग्स्टन, स्कॉटलंड येथील तंत्र प्रशिक्षण केंद्राचे विभाग प्रमुख आहेत.

प्रा. डॉ. सूटबर्ट अर्टेल :- गोकॅलीनच्या ग्रहयोग परिणाम विषयाचे अभ्यासक. गॉंटिजीन, जर्मनी येथील जॉर्ज ऑगस्ट विद्यापीठातील मानसशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत. टेनॅशियस मार्स इफेक्ट या पुस्तकाचे सहलेखक आहेत.

प्रो. इव्हान केलि :- हे अमेरिकेतील कमिटी फॉर द सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्लेम्स ऑफ पॅरानॉर्मल च्या फलज्योतिष उपसमितीचे चेअरमन आहेत. अनेक टीकात्मक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. विशेषत: चंद्राचा मनावरील परिणाम या विषयाचा त्यांचा अभ्यास आहे. ते कॅनडातील सस्काटून येथील सस्कॉचिवान विद्यापीठात शैक्षणिक मानसशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत.यांनी कन्सेप्ट ऑफ मॉडर्न अॅस्ट्रॉलॉजी - ए क्रिटिक हा 'सायकॉलॉजीकल रिपोर्ट्स १९९७ ` मध्ये प्रकाशित हा शोधनिबंध महत्वाचा ठरला आहे.

रुडॉल्फ एच. स्मिट :- हे दिवंगत प्रा. एच. जे. आयसेंक फलज्योतिष संशोधन कमिटीचे सचिव आहेत. ऎस्ट्रॉलॉजी अंडर स्क्रुटिनीचे संपादक १९९२ ते १९९९ या कालावधीतील 'कोरिलेशन` या फलज्योतिषावरील संशोधन करणाऱ्या पत्रिकेचे संपादक होते. नेदरलॅंडमधील प्रमुख वैज्ञानिक संशोधन केंद्रात संपादक व भाषांतरकार म्हणून त्यांनी काम केले.

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) प्रकरण ६ - अखिल भारतीय ज्योतिष संमेलन, सोलापूर २००१ च्य निमित्ता

अखिल भारतीय ज्योतिष संमेलन, सोलापूर २००१ च्य निमित्ताने

सोलापूरला दि. २५, २६ व २७ डिसेम्बर २००१ ला झालेले आखिल भारतीय ज्योतिष संमेलन हे अत्यंत महत्वाचे व आगळे वेगळे ठरले. फलज्योतिष हा विषय विद्यापीठ स्तरावरील अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा यूजीसीचा निर्णय हा विषय बहुचर्चित झालेला होता. त्या पार्श्वभूमीवर संमेलनाध्यक्ष काय भूमिका मांडतात यावर सर्वांचेच लक्ष होते. संमेलनात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष व फलज्योतिष विरोधक श्री. दादा चांदणे यांना सन्मानाने व्यासपीठावरुन आपली भूमिका मांडण्याची संधी दिली गेली. ही गोष्ट विरोधाची दखल व आदर दोन्हीची सूचक आहे. संमेलनाध्यक्ष श्री. व.दा. भट हे पुण्याचे ज्येष्ठ जाणकार व प्रथितयश ज्योतिषी आहेत. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अनेक महत्वाच्या मुद्दयांना स्पर्श केला. त्यांच्या भाषणात दोन महत्वाचे भाग होते. एक म्हणजे ज्योतिषांनी आता काय टाकून द्यायला पाहिजे व काय स्वीकारले पाहिजे आणि दुसरा म्हणजे शास्त्राचे वेगळे स्वरुप व टीकाकारांचे आक्षेप.
श्री. व.दा. भट यांच्या भाषणाचा सारांश व त्यावरील आमचे भाष्य

१) समाजजीवनावर नको तितका परिणाम :- ज्योतिषशास्त्राचा समाजजीवनावर नको तितका परिणाम भारतात झाला आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. धर्माचा समाजजीवनावर परिणाम आपण समजू शकतो पण त्याचा अतिरेक झाला तर काय परिणाम होतात हे आपण अनुभवतो आहेात. आश्लेषा नक्षत्राची मुलगी सासूस वाईट, मंगळाची कुंडली, मूळ नक्षत्रावरचा जन्म, साडेसाती या गोष्टी समाजात जास्त पसरल्या. अशा गोष्टी पंचांगात छापू नयेत. क्षुल्लक, किरकोळ, एकांगी ज्योतिषतत्वाची एवढी लोकप्रियता, समाजभिसरण निश्चितच चांगले नाही.
भाष्य :- चला! या निमित्ताने तरी ज्योतिषशास्त्रातल्या 'बागुलबुवा` संकल्पना पुसट होण्यास भरीव मदत होईल. या कामाची जबाबदारी आता ज्योतिषांवरच आली आहे.

२) ऋषीमुनींचे अंधानुकरण कशाला? :- पंधरावे ते विसावे शतक या दरम्यान प्राचीन ग्रंथाशिवाय नवीन विचारांचे ग्रंथ नव्हते. बाबा वाक्यम् प्रमाणम् हे आतापर्यंत चालू शकले ऋषीमुनींनी सांगितलेल्या सर्वच गोष्टी शिरोधार्य मानाव्या अशा नाहीत. त्या परिस्थितीला अनुरुप असे शास्त्र, नियम तयार केले गेले. सध्या समाजात ज्योतिषशास्त्राच्या अनेक गोष्टींबद्दल गैरसमज आहेत आणि सुमार बुद्धीच्या ज्योतिषांनी त्याला खतपाणी घातले आहे. स्वार्थ साधण्यासाठी कालसर्प योगाचा उपयोग केला जातो.
भाष्य :- फलज्योतिषाची विश्वासार्हता किंवा प्रामाण्य ठरविण्यासाठी प्राचीनत्वाचा,ऋषीमुनींचा आधार घेणाऱ्यांनी आता याचा विचार करावा. फलज्योतिषाच्या बदनामीला विरोधक कारणीभूत आहेत की हे तथाकथित ज्योतिषीच कारणीभूत आहेत हे तरी आता स्वच्छ कळाले. लोकांच्या कुंडलीतला कालसर्प येाग हा त्रिंबकेश्वरला विधी करणाऱ्या पुरोहित कम ज्योतिषांच्या कुंडलीतला धनयोगच ठरला आहे. आतातरी ज्योतिषांनी आपल घर साफ करायला सुरुवात करावी.फलज्योतिषातील अनिष्ट प्रवृत्तींना खतपाणी घालणाऱ्या घटकांचा बीमोड हा ज्योतिषांनीच केला पाहिजे.

३) धर्मशास्त्र व ज्योतिषशास्त्र गल्लत नको. :- भारतीय ज्योतिषशास्त्रावर धर्मशास्त्राचे प्रचंड प्रमाणात आक्रमण आहे. ज्योतिष हे धर्मशास्त्राशी सुसंगत असावे हे विशिष्ट मर्यादेपर्यंतच योग्य आहे. मुसलमान ख्रिश्चन या धर्मांसाठीही ज्योतिषशास्त्र आहे. पितृपंधरवडा हा ज्योतिषशास्त्रदृष्टया अशुभ नसतोच. गोदावरीच्या दक्षिणेला एक नियम व उत्तरेला एक नियम करता येणार नाही. रत्नधारण, तोडगे, उपाय यांना जास्त किंमत देउ नये, त्याचे स्तोम माजवू नये. अचूक भविष्यासंबंधी शास्त्राच्या कुवतीपेक्षा जास्त दावे करणाऱ्या काही ज्योतिष पद्धती लोकांच्या या शास्त्रासंबंधी अनाठायी अपेक्षा वाढवत आहेत. तसेच व्यावसायिक ज्योतिषांकडून करण्यात येणाऱ्या अवास्तव जाहीराती या शास्त्रासंबंधी गैरसमज पसरवित आहेत. याची दखल ज्योतिषमासिकांतून घेतली गेली पाहिजे.
भाष्य :- साताऱ्यात १९९५ साली झालेल्या अधिवेशनात त्यावेळचे संमेलनाध्यक्ष कृष्णराव वाईकर यांनी ज्योतिषाला धर्मशास्त्राचा अपरिहार्य भाग मानले होते. ज्योतिषाला विरोध करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला वठणीवर आणण्यासाठी त्या आधारे शिवसेना, विहिंप सारख्या संघटनांना हाताशी धरुन 'कुंकवाची उठाठेव` केली होती. ( संदर्भ म.टा अग्रलेख ३१-१०-९५ ) धर्माशी फारकत घेतली नाही तर फलज्योतिष हे कालसुसंगत राहणार नाही तसेच ते संकुचित राहील याचे भान या वेळेच्या संमेलनाध्यक्षांना आहे. बऱ्याच पोटार्थी ज्योतिषांना ही बाब रुचणारी नाही. मात्र पाश्चात्य देशात फलज्योतिष हे धर्माशी निगडीत नाही.
ज्योतिषमासिकांनी शास्त्रासंबंधी गैरसमज पसरणाऱ्या गोष्टी वा अवास्तव जाहिराती यांची दखल घ्यायची म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा कि काय? जातक लोक जेवढे अज्ञानी व अंधश्रद्ध राहतील तेवढे ज्योतिषांना सोयीचे असते. ते जर चिकित्सक बनले तर व्यावसायिक ज्योतिषी लोकांचे कसे फावणार?

४) ''फलज्योतिष हे शास्त्र नाहीच असे म्हणणाऱ्या व्यक्तिंचा वैचारिक गोंधळ स्पष्ट होतो. वास्तविक त्यांना हे 'भौतिक` शास्त्र नाही असे म्हणायचे असते. पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र वगैरे प्रकारच्या भौतिक शास्त्रांचा एक गट व मानवी जीवनाशी शरिराशी, मनाशी निगडीत शास्त्रांचा एक गट कल्पिला तर ज्योतिषशास्त्र हे पहिल्या गटाशी संबंधीत शास्त्र निश्चित नाही.``
भाष्य :- हे सर्व ज्योतिषांना मान्य असेल तर वादाचा एक मोठा तुकडा पडतो. फलज्योेतिषाचे समर्थन करताना ज्योतिष समर्थक हे भौतिक शास्त्रांचाच आधार घेउ पहातात. उर्जा, कॉस्मिक रेडिएशन, गुरुत्वाकर्षण, भरती ओहोटी, सौरडाग, चुंबकीय वादळे, यांचा फलज्योतिषाशी संबंध जोडून ते आधुनिक विज्ञानाच्या पंक्तीला बसवण्याचा प्रयत्न काही ज्योतिषी लोकच करत असतात. समजा फलज्योतिष हे इतर शास्त्रात जरी टाकले तरी इतर शास्त्रांना गृहीतके,प्रमेय नाहीत काय? इथे गृहीतकांमध्येच प्र्रचंड मतभिन्नता व अंतर्विसंगती आहे त्यामुळे ती स्पष्टपणे मांडता येत नाहीत ही वस्तुस्थिती नव्हे काय?

५) ''ज्योतिषशास्त्रा बद्दल जे काही आक्षेप, शंका, गैरसमज आहेत त्याचे मूळ कारण एखाद्या नवीन गोष्टीकडे पाहताना आपण ज्ञात ज्ञानाशी त्याची तुलना करतो त्यात आहे. माझया दृष्टिने इथेच खरी चूक होते. ज्योतिषशास्त्राला संपूर्णपणे वेगळा, स्वतंत्र असा आकृतीबंध आहे. इतर कोणत्याही शास्त्राच्या जवळ असे ते नाही. आपल्या पूर्वीच्या संकल्पना, परिमाणे, कसोटया या शास्त्रास लागू करण्याचा खटाटोप करणे चूक ठरेल.``
भाष्य :- ज्योतिषांनी हा वेगळा, स्वतंत्र आकृतीबंध मांडताना त्यांच्या संकल्पना, परिमाणे, वा कसोटया या तरी सुस्पष्ट असाव्यात. त्यात अंतर्विसंगती असू नये. तो तपासता येईल असा तरी असावा. त्या आकृती बंधाला जर श्रद्धा हे नाव दिलं तर ती व्यक्तिसापेक्ष बनते. ती तपासता येत नाही.

६) ''ज्योतिष हे बीजगणित आहे. अ + ब = क हे समीकरण बरोबर आहे. अ व ब च्या किमती स्थळ, काल परिस्थितीनुसार ठरवायच्या आहेत आणि असे करण्यात काही वावगे नाही.``
भाष्य :- मान्य! पण अ व ब च्या किमती नेमक्या कोणत्या? त्या केवळ स्थलकाल सापेक्ष आहेत की ज्योतिषी आणि जातक या नुसार बदलतात ? बीजगणिताला ही नियम असतातच की! शिवाय काही ज्योतिषी फलज्योतिषाला बीजगणित म्हणायला तयार नाहीत. त्यांच्या मते ज्योतिषाला अध्यात्म व उपासनेची जोड असावी लागते. नाही तर पुस्तकी पद्धतीने फलज्योतिष बीजगणितासारखे शिकता आले असते.

७) ''ज्योतिषशास्त्राचा मूळ प्रश्न गहन आहे. सूर्यमालेतील ग्रहांच्या परिणामाची अनुभूती तर येते पण नक्की कारणमीमांसा करता येत नाही. परिणाम नक्की कसे व कशामुळे होतात.? अल्फा बीटा किरणांमुळे? चुंबकीय लहरींमुळे? गुरुत्वाकर्षणामुळे? शरीरातील पेशी, मेंदूच्या पेशींवर परिणाम होतो काय? नदी वाहताना दिसते पण उगमाचा नक्की स्त्र्रोत कळत नाही. कारण अनेक स्त्रोत एकत्र येउन मिळत आहेत. उगमाचा शोध लागत नाही म्हणून नदीचे अस्तित्व नाकारायचे काय? आज जरी हे कोडे उलगडले नसले तरी भविष्य काळातही ते उलगडणारच नाही असे समजायचे का?``
भाष्य :- अनुभूतीत सापेक्षता आणून ते कोडेच ठेवण्याचा प्रयत्न ज्योतिष समर्थकांना नेहमीच फायद्याचा ठरला आहे. एकदा भौतिक विज्ञान नाही असे सांगितल्यावर भौतिक विज्ञानाच्या संकल्पनांचा आधार कशाला घ्यायचा? नदीचे उदाहरण इथे गैरलागू आहे कारण अनेक स्त्रोतातून ही नदी तयार होते हे विधानातच नमूद केले आहे. तो उगम काही एकच असणार नाही. ऋषीचे कूळ व नदीचे मूळ विचारु नये असे म्हणून भाबडया जातकावर वाक्चातुर्याचा प्रभाव फार तर टाकता येईल.

८) भविष्य पाहणे ही अंधश्रद्धा तर मुळीच नाही. अंधश्रद्धा म्हणणाऱ्या लोकांचा मानवी मनाचा अभ्यास कमी आहे. बुद्धीची अपरिपक्वता आहे. अज्ञाताचा पडदा दूर सारुन भविष्यकाळात काय दडले आहे. हे डोकावून पाहण्याची मानवी मनाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मानवाला भविष्यकाळाबद्दल नेहमीच उत्कंठा कुतुहल असते.
भाष्य :- या मानवी मनाच्या नैसर्गिक प्रवृत्ती मुळेच फलज्योतिष टिकून आहे व भविष्यातही ते या ना त्या स्वरुपात टिकून राहणारच आहे. परंतु भविष्यकाळात काय दडले आहे हे आम्ही फलज्योतिषशास्त्राच्या आधारे निश्चितपणे सांगू शकतो असे मानणे ही अंधश्रद्धा आहे. संमेलनातच श्री. मोहन दाते यांनी सांगितले आहे , 'फलज्योतिष हे विज्ञान नसून श्रद्धा आहे.` प्रा. जयंत नारळीकर यांनी पण हेच तर सांगितले आहे. बहुसंख्य ज्योतिषी याच्याशी सहमत असतील तर उत्तमच! श्रध्दा ही व्यक्तिसापेक्ष असते हे सर्वमान्यच आहे.

_____________________समाप्त________________________

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद - संदर्भसूची

संदर्भ सूची

१) भारतीय ज्योतिषशास्त्र - शं.बा.दिक्षित
२) विवाह मंगळाची अनावश्यकता - शां.श्री. सुंठणकर
३) ज्योतिर्वैभव - त्य्रं. गो ढवळे
४) नक्षत्रलोक - पं महादेवशास्त्री जोशी
५) आत्मपुराण - पं. महादेवशास्त्री जोशी
६) निबंधमाला- विष्णुशास्त्री चिपळूणकर
७) फलज्योतिषचिकित्सा - रा. ज. गोखले
८) लोकभ्रम - रा.ज.गोखले
९) अमृततुषार - आत्मानंद
१०) विवाहयोग- वि.श्री.देशिंगकर
११) गृहिणीजातक - द्वा.ना.राजे
१२) ज्योतिषाच्या गाभाऱ्यात - श्री.श्री.भट
१३) फलज्योतिषाचा बोजवारा- जगदीश काबरे
१४) नाडी भविष्य चक्रावून टाकणारा चमत्कार - शशिकांत ओक
१५) बोध अंधश्रद्धेचा - शशिकांत ओक
१६) सुलभ ज्योतिषशास्त्र - कृ. वि. सोमण
१७) प्राचीन ज्योतिषाचे तीन तेरा - अंनिस
१८) सहज समजेल फलज्योतिष काय आहे काय नाही? - मा. श्री. रिसबूड
१९) फलज्योतिषशास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळयांचे भारुड - मा. श्री. रिसबूड
२०) पंचांग म्हणजे काय व संक्षेपात पंचांगवाद - र.वि.वैद्य
२१ नाडी ग्रंथ एक अभ्यास - शांताराम आठवले
२२ पाश्चात्य ज्योतिषकाचा वैचारिक इतिहास - त्य्रं. गो. ढवळे
२३) वधूवर पत्रिका गुणमेलन - गं. बा. ओक
२४) मायकेल गोकॅलिनचे ज्योतिषशास्त्रीय संशोधन - यशोदा भागवत
२५) Astronomy The Evidence Of Science - Percy Seymour
२६) Astrology & Hoax of Scientific Temper - Gaytridevi Vasudev
२७) Astrology Beleive It or Not ? - Dr S. Balchandra Rao

प्रो.जयंत नारळीकर यांनी लिहिलेले परीक्षण

लोकसत्ता रविवार दि.१३ एप्रिल २००३ लोकरंग पुरवणी त "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...........प्रश्नोत्तरातून सुसंवाद" या पुस्तकाचे प्रो.जयंत नारळीकर यांनी लिहिलेले परीक्षण
-------------------------------------------------------------------------------

right
मुखपृष्ठ
अंधश्रद्धांकडे पाहण्याची चिकित्सक दृष्टि

भारत हा अनेक दृष्टीने वैधर्म्यांचा देश समजला जातो. बैलगाडी पासून जेट विमाने, मातीच्या झोपड्यांपासून गगनचुंबी आलिशान इमारती, वीज आणि पाणी दुर्मिळ असलेल्या खेड्यांपासून रात्रिचा दिवस करु शकणा-या रोषणाईत,खाद्यपेयात पैसा पाण्यासारखा खर्च करणा-या महानगरांपर्यंत मानवी जीवनाची दोन टोके आपण पहातो, पचवतो आणि दृष्टीआड करतो. पण या सर्व वैधर्म्यांइतकेच एक वेगळे वैधर्म्य देशात वाढत आहे.याची आपल्यापैकी बहुतेकांना जाणिवदेखील नसावी.

हे वैधर्म्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन आणि अंधश्रद्धा यांच्यातले! स्वातंत्र्यपूर्व काळात 'डिस्कव्हरी ऒफ इंडिया' पुस्तक लिहिताना जवाहरलाल नेहरुंनी अशी आशा व्यक्त केली होती, की स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीय जनता केवळा परंपरांचे अंधानुकरण न करता त्यातील युक्तिसंगत सार तेवढे घेईल आणि जीवनातले निर्णय घेताना वस्तुस्थितीची सप्रमाण दखल घेईल. परंतु आज स्वातंत्र्य मिळुन पाच दशके उलटली तरी अंधश्रद्धांचा पगडा होता तसाच आहे- नव्हे वाढतो आहे.असे विदारक दृश्य आज दिसते आहे.

काळ्या ढगांना चंदेरी किनार आहे, ती अशा काही निवडक संघटनांची आणि व्यक्तिंची ज्यानी काळाची गरज ओळखून आपापल्या परीने अंधश्रद्धांविरुद्ध मोहिमा उघडल्या आहेत. अंधश्रद्धांमागची कारणे शोधुन ती निराधार आहेत हे दाखवणे, तथाकथित चमत्कारांचे 'रहस्य' उलगडून दाखवणे,प्रत्यक्ष कृतिने आपले मत सिद्ध करणे आदि प्रकारांनी अंधश्रद्धांची जनमानसावरची पकड दुर करण्याचे प्रयत्न चालू आहेत. अशा प्रयत्नांची चर्चा करणारी पुस्तकेपण बाहेर येत आहेत, ही जमेची गोष्ट आहे.

अशा पुस्तकांत प्रकाश घाटपांडे यांच्या 'ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी' या पुस्तकाचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. मे २००१ मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाची दीड वर्षात दुसरी आवृत्ती निघावी, ही आनंदाची गोष्ट आहे. कारण या पुस्तकात घाटपांडे यांनी भारतातील सर्वाधिक प्रसार झालेल्या अंधश्रद्धेवर प्रकाश टाकला आहे.

'फलज्योतिष ही एक अंधश्रद्धा आहे' हे समजावून सांगायला लागणे आणि तेही निरक्षरांना नव्हे तर डिग्री विभूषितांना, उच्चपद्स्थांना, समाजधुरिणांनादेखील, इथेच खरी शोकांतिका आहे. अशा वेळी तुम्ही अंधश्रद्ध आहात, फसव्या विचारसरणी मागे धावून आपले हसे करुन घेत आहात.' वगैरे आक्रमक प्रचार योग्य ठरत नाही. लहानपणी सूर्य आणि वार्‍याच्य़ा चढाओढीची गोष्ट वाचली होती, त्याचा प्रत्यय येथे येतो. वारा आणि सूर्य दोघांपैकी कोण एका पादचार्‍याचा कोट त्याच्या अंगावरुन काढून दाखवेल, अशी स्पर्धा होती. वारा वेगाने वाहू लागला, तसे पादचा-याने कोट आवळून धरला. अखेर वाराच थकला. मग सूर्य पुढे आला. त्याने संथपणे प्रकाशणे चालू ठेवले आणि काही वेळाने पादचार्‍याने फार उकडायला लागले, म्हणून कोट काढला.

आक्रमक प्रचाराने अंधश्रद्धेचा कोट आणखी आवळुन धरला जातो. पण त्या व्यक्तिला सौम्य शब्दात पटवून दिले आणि त्याने स्वत:हून तो कोट काढून फेकून दिला तर ते जास्त प्रभावी ठरणार नाही का? घाटपांडे यांचा मार्ग वार्‍याचा नसुन सूर्याचा आहे.

१०२ पानांच्या या छोटेखानी पुस्तकात लेखकाचे मनोगत वाचले की त्याची शैली स्पष्ट होते. पुस्तकाच्या पहिल्या भागात ज्योतिषाबद्दल पुष्कळदा विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे दिली आहेत, तर दुसर्‍या भागात आधुनिक पार्श्वभूमीवर आधारित काही माहितीपूर्ण लेख आहेत. लोक कुठल्या कारणांनी फलज्योतिषाकडे जातात? त्यांना ज्या गरजा भासतात त्यांची पूर्ती करण्याचे सामर्थ्य या विषयात आहे का? फलज्योतिषाकडे जाणार्‍या 'जातका'ने ही प्रश्नोत्तरी वाचून मगच जावे कि नाही हा निर्णय घ्यावा असे लेखकाचे आवाहन आहे. हे प्रश्न कुठल्या प्रकारचे आहेत याची कल्पना खालील काही नमुन्यातून स्पष्ट होईल.
१) फलज्योतिष म्हणजे काय?
२) जन्मरास/जन्मनक्षत्र म्हणजे काय?
३) अमावस्या अशुभ दिवस आहे काय? अमावस्येला पौर्णिमेला वेडाचे/अपघाताचे प्रमाण जास्त का असते?
४) जुळ्या मुलांच्या कुंडल्यात फरक का असतो?
५) साडेसाती/कालसर्प योग/ ग्रहदशा म्हणजे काय?
६) ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो हे खरे आहे काय?
७) ग्रहांची शांती केल्याने फायदा होतो काय? ग्रहांचे खडे वापरुन अनिष्ट टळते का?
८) विवाह जुळण्याच्या वेळी पत्रिका बघावी का?
९) मंगळदोष म्हणजे काय?
१०) सिंहस्थात विवाह करु नये असे का म्हणतात?
११) फलज्योतिष विज्ञान आहे का?

अशा सुमारे ६० प्रश्नांची चर्चा आणि उत्तरे यात आहेत. भृगुसंहिता,वास्तुज्योतिष नाडी आदींचीही थोडक्यात माहिती दिली आहे.प्रत्यक्ष दावे काय असतात आणि वस्तुस्थिती काय असते, याची पुराव्यानिशी माहिती लेखकाने दिली आहे.वाचकाला त्यातून एक संदेश मात्र स्पष्ट शब्दात मिळतो. आजवर फलज्योतिषाला विज्ञान म्हणण्याजोगे त्यात काहीही आढळले नाही.मोघम भविष्यवाणीत भाकित करण्याची शक्ती नाही. भाकित म्हणजे स्पष्ट शब्दात अमुक वेळी, अमुक स्थळी, अमुक घडेल हे सांगु शकणे. हे प्रश्न व त्यांची उत्तरे वाचून प्रत्येकाने ठरवावे, की ज्योतिषाकडे जावे का?

दुसर्‍या भागात स्फुट लेखात प्रथम फलज्योतिषाकडे वैज्ञानिक चिकित्सक दृष्टीकोनातून पाहिले आहे. त्यात फलज्योतिषांकडून वेळोवेळी केल्या जाणार्‍या युक्तिवादांचे खंडन केले आहे. इथे लेखकाला आणखी पुष्कळ सांगता आले असते. उदाहरणार्थ, मोठ्या प्रमाणात नमुने गोळा करुन, त्यांना संख्या शास्त्राचे निकष लावून भाकितांची तपासणी करण्यात आली आहे, पण ती मुख्यत्वे करुन पाश्चात्य देशात. अशा उदाहरणांत फलज्योतिषाला स्पष्ट भाकित करता येत नाही.( म्हणजे भाकित चुकिचे ठरते) हे सिद्ध झाले आहे. तसेच काही विशिष्ट प्रसंगी त्याची मानसिक परिस्थिती त्याला फलज्योतिषाकडे कशी आकर्षित करते, याची मानसशास्त्रज्ञांनी केलेली चिकित्सादेखील वाचनीय ठरली असती.

नाडी ज्योतिष, फेंग शुई वगैरेंवर वेगळ्या लेखात आणखी चर्चा आहे. विद्यापीठ अनुदान मंडळाने फलज्योतिषाचे अभ्यासक्रम चालवण्याचा निर्णय २००१ मध्ये घेतला व त्यानंतर वादाचे वादळ निर्माण झाले. 'वेदिक ऍस्ट्रॉलॉजी' म्हणुन या विषयाची केलेली भलावण वास्तविक किती निरर्थक आहे हे विरोधकांनी दाखवून दिले. उलट ग्रीस-बॅबिलॉनकडून आलेले हे 'इंपोर्टेड' लोण आपण 'वेदातून निर्माण केलेले ज्ञान' म्हणुन मिरवावे या सारखी हास्यास्पद ( की शोकास्पद?) गोष्ट कुठली असणार? या विषयावर काही ऐतिहासिक संदर्भ देउन हा लेख आणखी रोचक करता आला असता.

वरील काही बाबतीत सुधारणेला वाव असूनही हे पुस्तक वाचनीय आणि संग्रहणीय झाले आहे, यात शंका नाही. सर्वसामान्य वाचकांनी हे वाचून अंतर्मुख होण्याची गरज आहे. 'मानव हा बुद्धीसंगत विचार करणारा जीव आहे' हे वचन सार्थ करायला आपण सर्वांनीच आपल्या विविध अंधश्रद्धा चिकित्सक दृष्टीकोनातून पाहायला नकोत का?

'ज्योतिषाकडे जाण्यापूर्वी..." प्रकाश घाटपांडे; संज्ञा सर्व्हिसेस, पुणे मुल्य- ६० रु.
- जयंत नारळीकर