गूढ, थरार आणि रहस्यांचा बादशहा

आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला कधीनाकधी काही बंद दरवाजांसमोर उभे राहावे लागते. या दरवाजांच्या चाव्या आपल्या हातात असाव्या असे वाटणे; किमानपक्षी, या दरवाजांमागे काय दडले आहे ते जाणून घेण्याची इच्छा माणसाला होतेच होते. गूढ, थरार आणि रहस्य यांचे सुप्त आकर्षण फार पूर्वीपासून मानवी मनाला वाटत आले आहे. रहस्य उकलण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीमुळेच अनेक शोध लागले आणि संशोधने केली गेली.

गूढ आणि रहस्य हे शब्दांचा भीतीशीही अतिशय घनिष्ठ संबंध आहे. केवळ गूढ या शब्दाचा आयाम पाहिला तर अज्ञात, अनैसर्गिक, अमानवी, अथांग, गहिरे असे अनेक शब्दार्थ डोळ्यासमोर तरळतात. एक प्रसिद्ध वाक्प्रचार म्हणून असं म्हणता येईल की जगात दोन प्रकारची माणसं असतात -- एक, ज्यांना गूढाची उकल करायला आवडते आणि दुसरे, जे या अज्ञातापासून चार हात दूर राहणे पसंत करतात आणि या दोहोंचा संबंध भीतीशी जोडता येतो. पहिल्या प्रकारची माणसे आपली आणि आप्तांची भीतीपासून मुक्तता व्हावी म्हणून रहस्याची उकल करायला धजतात तर दुसर्‍या प्रकारची माणसे अज्ञाताच्या भीतीने रहस्यापासून लांब राहायचे ठरवतात.

गूढकथा लिहिताना मला नेहमी जाणवते की वाचक कथेतून अगदी सहजपणे एका अनैसर्गिक, अमानवी घटकाची अपेक्षा करतात. बर्‍याच लेखकांतर्फे रहस्य, थरार आणि गूढ हे ओंगळ, हिडीस आणि बटबटीत स्वरुपात समोर ठेवले जाते आणि वाचकही प्रत्येक कथासूत्रातून अशाच गोष्टींची अपेक्षा ठेवू लागतो. खरे पाहायला गेले तर भीती ही आपल्याच मनाचा एक भाग असते. तिचा अनुभव घ्यायला पडक्या हवेल्या, स्मशाने, धुक्याने आच्छादलेले रान गाठण्याची काही एक गरज नसते. भीती ही माणसाच्या मनातच वसलेली असते आणि आयुष्यात कधीतरी अचानक ती दत्त म्हणून समोर उभी ठाकते. माणसाला वाटणारी भीती किती प्रकारची असते बघा -- उंचीची भीती, पाण्यात बुडण्याची भीती, अंधाराची भीती, कोंडून घातल्याची भीती, गर्दीची भीती तर कधी एकांताची भीती. एखाद्या लहानशा प्राण्याची किंवा किटकांची भीती तर आपण सर्वच अनुभवून असतो. कधीतरी हे भय मूर्त स्वरुप घेऊन समोर येते आणि त्यातून थरार, रहस्य निर्माण होत जाते.

गूढपटांचा विचार करताना एक ठळक नाव डोळ्यासमोर उभे राहते ते आल्फ्रेड हिचकॉकचे. अतिशय संयत, ओंगळ होऊ न देणारे, क्लासिक चित्रपट निर्माण करणारा सुप्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून हिचकॉक आजही सर्वश्रेष्ठ गणला जातो. प्रणय, रहस्य आणि विनोद यांचे अप्रतिम मिश्रण हिचकॉकच्या चित्रपटांतून उभे राहते. सर्वसामान्य थरारपटांतून येणारे धक्कातंत्र हिचकॉकच्या चित्रपटात सहसा दिसत नाही. अंगावर काटा उभा राहणे, डोळे गप्पकन बंद करावेसे वाटणे, किळस आणि बीभत्स या अनुभूती हिचकॉकपटांत सहसा अनुभवायला मिळत नाहीत. उलटपक्षी, या रहस्यपटांत प्रेक्षक हे केवळ प्रेक्षक न राहता चित्रपटाचा हिस्सा बनतात. त्यांना चित्रपटात काय शोधायचे याची जाणीव करून दिली जाते. बरेचदा चित्रपटातील रहस्य पात्रांना लक्षात येणार नाही परंतु प्रेक्षकांना सहज दिसेल असे मांडले जाते आणि पात्रांकडून रहस्याची उकल कशी होणार या उत्कंठेवर संपूर्ण चित्रपट तरून जातो.

आल्फ्रेड हिचकॉक

स्वत:च्या बायकोच्या खुनाचा कट रचणारे "डायल एम फॉर मर्डर" आणि "स्ट्रेंजर्स ऑन अ ट्रेन"मधील नवरे. चुकीची ओळख पटल्याने गोत्यात आलेले "द रॉंग मॅन" आणि "नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट" मधील कथानायक. स्मृतीभ्रंश झालेल्या गुन्हेगाराच्या प्रेमात पडून त्याला मदत करणारी "स्पेलबाऊंड"मधील मानसोपचारतज्ज्ञ. आपल्याच मित्रांवर हेरगिरी करताना गोत्यात आलेली "नटोरिअस"मधील स्त्रीहेर. उंचावर जाण्यास भिणारा आणि प्रेमात फसवला गेलेला "वर्टिगो"मधील निवृत्त पोलिस अधिकारी, पक्ष्यांच्या भयंकर हल्ल्याने भयचकित झालेले "द बर्डस"मधील कॅलिफोर्नियातील रहिवासी अशा अनेक हिचकॉकिअन अस्सल कथाबीजांवर अगणित हॉलिवूड आणि बॉलिवूडपट येऊन गेलेले आहेत, येतात आणि येत राहतील.

सशक्त कथासूत्रांवर निर्माण केलेले हे चित्रपट आजही मनाला भुरळ घालतात. ज्यांना क्लासिक किंवा मास्टरपीसेस म्हणावं अशा मला आवडणार्‍या काही खास हिचकॉकपटांबद्दल या लेखात थोडी माहिती पुरवायला आवडेल.

१. रिबेक्का: अचानक एका धनाढ्य बिजवराच्या प्रेमात पडून त्वरित लग्न करून मोकळी झालेली एक गरीब, अल्लड युवती आपल्याला या नव्या ऐश्वर्यसंपन्न आयुष्यात सामावता येईल का या शंकेने भयग्रस्त असते. नवरा पहिल्या बायकोला विसरू शकत नाही, नोकरचाकर या पहिल्या पत्नीची अद्याप मनात पूजा करतात आणि संपूर्ण घरावर या मृत स्त्रीचा छाप आहे, एक विलक्षण पगडा आहे हे लक्षात आल्याने ही युवती आपल्या वैवाहिक आयुष्यात दु:खी होऊ लागते आणि त्यात तिला या प्रथमपत्नीचा खून झाल्याचा उलगडा होतो आणि एका दु:खद रहस्याला सुरुवात होते.

१९४० सालच्या या चित्रपटाला ऑस्कर पुरस्काराने मानांकित केले होते. आजही हा चित्रपट एका जागी बसून पाहावासा वाटतो. या चित्रपटावर हेमंतदांनी विश्वजीत आणि वहिदा यांना घेऊन "कोहरा" हा चित्रपट निर्माण केला होता.

२. द मॅन हू न्यू टू मच: सुट्टी घालवायला आफ्रिकेचा वारीवर निघालेल्या कथानायकाच्या कुटुंबाला बसमध्ये एक अनोळखी माणूस भेटतो आणि त्यांची मैत्री जमते. दुसर्‍या दिवशी भर बाजारात या माणसाचा खून होतो आणि त्याला माहित असलेले रहस्य त्याने नायकाकडे उघड केले असावे या समजूतीतून नायकाच्या मुलाचे अपहरण केले जाते. मुलाला वाचवायला धडपडणारे आणि त्याचवेळी रहस्याचा उलगडा करायचा प्रयत्न करणार्‍या आई-वडिलांची ही कथा अतिशय उत्कंठावर्धक आहे. डोरिस डेच्या खणखणीत आवाजातील "के सेरा सेरा" हे गाणे या चित्रपटाची शान वाढवते.

३. रिअर विंडो: तार्किकदृष्ट्या हा भयपट नाही पण तरीही भीतीशी निगडीत आहे. अतिशय सुस्वरूप प्रेयसी (ग्रेस केली) असणारा आणि तात्पुरते अपंगत्व आलेला एक छायाचित्रकार लग्नाला आणि त्यातून येणार्‍या जबाबदारीला मनातून घाबरत असतो. पाय फ्रॅक्चर झाल्याने दिवसभर खिडकीशेजारी बसून इमारतीतील इतर व्यक्तींना न्याहळण्याची त्याला सवय लागते आणि त्यांचे प्रेमआयुष्य किंवा वैवाहिक आयुष्य कसे कंटाळवाणे आहे यावर तो विचार करत बसतो. लोकांना न्याहाळण्याच्या वेडातून इमारतीतील एका इसमाने आपल्या बायकोचा खून करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे असा त्याचा ग्रह होतो आणि तो आपला आणि आपल्या प्रेयसीचा जीव धोक्यात घालतो.

या चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे प्रसंग मुख्य पात्रांवर चालला असला तरी पार्श्वभूमीवर इमारतीतील दृष्ये प्रेक्षकांना दिसतात आणि नायकासह प्रेक्षक रहस्य शोधण्यात गुंततात, किंबहुना रहस्य उलगडण्यात नायकापेक्षा आपण दोन पायर्‍या वर आहोत ही अनुभूती नक्कीच मिळते.

४. सायको: या चित्रपटाशिवाय हिचकॉकविषयीचा लेख पूर्ण करणे केवळ अशक्य आहे. १९६० साली बनलेला हा चित्रपट आजही पाहताना हृदयाची धडधड वाढते.

सायकोमधील प्रसिद्ध दृश्य

कार्यालयात अफरातफर करून पळालेल्या एक युवतीला एका अंधार्‍या पावसाळी रात्री एक जुनाट मोटेल दिसते. रात्रीपुरता आसरा मिळावा म्हणून ती तेथे एक खोली घेते आणि तिची ओळख नॉर्मनशी, मोटेलच्या मालकाशी होते. नॉर्मनचे या युवतीकडे लक्ष पुरवणे त्याच्या आजारी आईला खपत नाही आणि त्यातून चमत्कारीकरित्या या युवतीचा खून होतो. हा खून आपल्या आईने केल्याचे नॉर्मनच्या लक्षात येते आणि तो खुनाचे पुरावे नष्ट करतो. पुढे या युवतीचा तिच्या कुटुंबीयांकडून शोध सुरु होतो आणि आईला घाबरणारा नॉर्मन गूढात गुरफटत जातो. यातून खून, रहस्याचा अप्रतिम थरार प्रेक्षकांसमोर उभा ठाकतो.

आईच्या संपूर्ण कह्यात असलेल्या आणि सतत तिला भिऊन जगणार्‍या मुलाची ही कथा आणि विशेषत: या चित्रपटातील युवतीचा शॉवर घेताना केला गेलेला खून हा भविष्यातील अगणित चित्रपटांचा भाग बनून राहिला आहे.

स्वत: हिचकॉकबद्दल असं सांगितले जाते की लहानपणी एकदा त्याच्या वडिलांनी त्याला एक पत्र घेऊन पोलिसस्टेशनला पाठवले. ते पत्र वाचून तेथील अधिकार्‍याने त्याला १० मिनिटांसाठी तुरुंगात डांबले आणि त्यानंतर सोडून दिले आणि सांगितले की "वाईट कामांची परिणिती ही अशी होते.” या प्रसंगाचा त्याच्या मनावर इतका खोल परिणाम झाला की आयुष्यभर पोलिसांची त्याला भयंकर भीती वाटत असे. या खेरीज, एक विचित्र भीती त्याच्या मनात कायम राहिली आणि ती होती अंड्याची भीती. हिचकॉकच्या शब्दात सांगायचे तर "गुळगुळीत, वर्तुळाकार अंड्यांची मला अतिशय किळस वाटते. रक्त तरी लाल दिसतं पण अंड्याच्या पिवळ्या बलकाची मला इतकी किळस वाटते की मी आयुष्यात तो कधी चाखला ही नाही."

आपल्या गरोदर पत्नीच्या वाढलेल्या पोटाचीही त्याला किळस वाटत असे. हिचकॉकला अंड्याची भीती होती की गुळगुळीत, चकचकीत गोलाकारांची ते कळण्यास मार्ग नाही. या ठीकाणी हिचकॉकचे तुळतुळीत टक्कल डोळ्यासमोर उभे राहते.

रहस्यपटांच्या बादशहाचा शिक्का आपल्या कपाळावरून हिचकॉकला कधीही पुसता आला नाही. त्याच्याच शब्दांत सांगायचे झाले तर "मी सिंड्रेला चित्रपट निर्माण केला तरी प्रेक्षक कोचावर मृतदेह दिसतो का ते धुंडाळतील.” युद्ध, दहशतवाद आणि प्रगतीच्या वाटेवरील प्रचंड स्पर्धा या सर्वांनी बोथट झालेल्या आजच्या युगातील मानवी संवेदनांना हिचकॉकचे "क्लासिक मास्टरपीसेस" भुरळ पाडतील का हा प्रश्न या चित्रपटांच्या आजवर होणारी नकलेने निकालात निघतो. सर्वश्रेष्ठ गणल्या जाणार्‍या ऑस्कर पुरस्काराचा मानकरीही हिचकॉक कधी ठरला नाही पण रहस्यपटांचा बादशहा म्हणून आजही तो जनमानसांच्या हृदयात स्थानापन्न आहे.

Comments

मस्त !

मांडलेल्या विषयाचे प्रास्ताविक विशेष आवडले, रहस्यपटांच्या बादशहाचा शिक्का पुसु न शकणारा हिचकॉक, त्याचे चित्रपट आणि त्याच्या आयुष्यातील प्रसंग, ही सर्वच माहिती आमच्यासाठी नवीन आहे, आणि ती आवडली !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मेजवानी

प्रियाली ताई,
आम्हाला ही नवीन माहिती, ती सुद्धा चार-चार चित्रपटांच्या (संक्षिप्त) कथानकांसमवेत दिलीत... आभार!
लेख नेहमी प्रमाणे खुपच छान जमला आहे. त्यामुळे वाटते की जर याची लांबी वाढवली असती अथवा दोन-चार भागांत विभागला असता तर मेजवानी जास्त वेळ मिळाली असती.

आणखी येऊ द्यात.

रिअर विंडो

रिअर विंडो हा सिनेमा मला हिचकॉकच्या सिनेमांपैकी खूप आवडलेला सिनेमा. पाय फ्रॅक्चर झालेल्या आपल्या हिरोला, व्हीलन बघतो व मारायला येतो तेव्हा आपली बघताना जी धडपड् होते जी भीती वाटते ती एकदम नैर्सगीक. कूठले भूत नाही, बाहूली नाही, स्पेशल इफेक्टस नाही. हेच त्या कथेच, दिग्दर्शकचे यश.
ग्रेस केली बघताना कलीजा खलास् झाला!!! असा एक प्रेक्षक नसे की ज्याला तिने घायाळ केले नसेल.

हिचकॉकला त्याच्या हिरोइन्स नेहमी ब्लॉन्डच (सोनेरी केस) पाहीजे असायच्या. :-)

मस्त लेख जुन्या काही आठवणी ताज्या झाल्या. :-)

स्ट्रेंजर ऑन अ ट्रेन/ इजिप्शियन देखावे

ह्यावरून ऐतबार नावाचा हिंदी चित्रपट होता (राज बब्बर, सुरेश ओबेरॉय, नायिकेचे नाव आठवत नाही, आणि इन्स्पेक्टर म्हणून डॅनीने छान काम केले होते.)

बरोबर! ऐतबार डायल एम वर आधारित आहे तसाच स्ट्रेंजर ऑन अ ट्रेनवरही हिंदी चित्रपट आहे असे वाटते की नवा इंग्रजी चित्रपट आहे ते आठवत नाही. (मी तुझ्या बायकोचा खून करतो बदल्यात तू मला एक खून करून दे अशी पार्श्वभूमी असलेला.)

मॅन हू न्यू टू मच मधले मूळ कथानकावरून डिस्ट्रॅक्ट करणारे इजिप्शियन (?) देखावे नाहीत.

हिचकॉकला आऊटडोअर शूटींग पसंत नसे. स्टुडिओ आणि बंदिस्त जागी चित्रिकरण करण्यावर त्याचा अधिक कल असे. हेच कारण मॅन हू न्यू टू मचमध्ये देखावे नसल्याचे असावे...पण मॅन हू न्यूमध्ये मोरोक्कोचे वर्णन आहे... इजिप्तचे नाही हे ही एक कारण पिरॅमिड्स दाखवले नसण्याचे असावे. ;-) (ह. घ्या)

बाकी, सायको आणि द बर्डस् हे दोन्ही इतर हिचकॉकपटांपेक्षा मलाही बरेच भडक वाटतात.

रिअर विंडो..

... पाहिला नाही पण नुकताच त्यावर आधारलेला 'डिस्टर्बीया' हा बाळबोध चित्रपट पाहिला. एकच कथानक वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या कुवती प्रमाणे वेग वेगळा परीणाम करून जाते!

नायिकेचे नाव आठवत नाही?

नायिकेचे नाव आठवत नाही
डिंपल.
'किसी नजर को तेरा इंतजार आज भी है' हे सुरेख गाणे.
सन्जोप राव

अगदी झक्कास

अगदी झक्कास झाला आहे लेख ताई, चला आता तू परत् कामाला लागली आहेस म्हणजे मस्त गूढ कथा वाचायला मिळेल.
द रोप : महाविद्यालयातले तीन विद्यार्थी, मित्राच्या घरी जमतात. खून करताना व् खून् केल्यानंतर् खुन्याच्या मनाची अवस्था काय् असेल् हे पडताळण्यासाठी ते त्यांच्यातल्या एका मित्राला दोरीने आवळून् मारतात. सायको आणि "द रोप" चित्रपट "वर्ल्ड् १००" ह्या जागतिक १०० सर्वोत्तम् चित्रपटां मध्ये गणले जातात.

सुमीत, नावा प्रमाणेच असलेला "चांगला मित्र"

हिचकॉकच्या नावाखाली रहस्यकथांची पुस्तके

हिचकॉक यांच्या नावाखाली "थ्री इन्व्हेस्टिगेटर्स" म्हणून मुलांसाठी रहस्यकथांची पुस्तके मी लहानपणी वाचलेली आहेत. ती छान होती - पण त्यांचा हिचकॉकशी काय संबध होता कोणाला माहिती आहे का?

संबंध

धनंजय,
थ्री इन्वेस्टिगेटर्सशी संबंध हा असा होता.

बिरुटेसर,
हिचकॉकचे चित्रपट पाहण्यासारखे असतात. प्रत्यक्ष चित्रपट पाहिले नसले तरी कोहरा, ड...ड..डर, सैलाब आणि इतर अनेक चित्रपटांतून हिचकॉकिअन कल्पनांचा उपयोग केला गेला आहे. रामसेपटांनी तर किती केला असावा याची गणती नाही.

सुमीत,

चला आता तू परत् कामाला लागली आहेस म्हणजे मस्त गूढ कथा वाचायला मिळेल.

गूढ कथा नाही पण माझ्या ब्लॉगवर कथा वाचायला मिळतील. टाइपकास्टचा धोका वाटल्यानेच बहुधा हा लेख लिहायला सुचले. :)

सहज,

रिअर विंडो हा सिनेमा मला हिचकॉकच्या सिनेमांपैकी खूप आवडलेला सिनेमा.

रिअर विंडो पहिल्यांदा पाहताना मला थोडा अपेक्षाभंग वाटला पण नंतर त्यावर विचार केला, थोडी शोधाशोध केली आणि त्याचे वेगळेपण लक्षात आले. मलाही हा चित्रपट आवडतो. बाकी, ग्रेस केलीविषयी संपूर्ण सहमती. हिचकॉक चित्रपटात ब्लाँड्स वापरायचा हे ही खरेच. डॅमजेल इन डिस्ट्रेस दाखवण्यासाठी इतर चालत नसाव्यात. ;-)

भास्कर,
लेख टाकावा असे सहजच मनात आले आणि घाईघाईत लिहिला. कथानक संक्षिप्त आहे कारण हे चित्रपट पाहण्याजोगे आहेत. रहस्यभेद केला तर मजा नाही.

तुम्हा सर्वांच्या प्रतिसादांबद्दल आभारी आहे.

सस्पेन्स

मनोरंजक विषयावरचा सहजसुंदर लेख. रहस्यपटांच्या हाताळणीमध्ये हिचकॉकचे नाव सर्वात पहिले घ्यावे लागेल. त्याकाळच्या तंत्राच्या मानाने त्याचे चित्रपट काळाच्या बरेच पुढे होते. त्याच्या चित्रपटांची अनेक वैशिष्टये होती. चित्रपटात कुठल्यातरी नगण्य पात्राच्या रूपाने एकदा दर्शन द्यायचे ही त्याची खास खुबी*. माझे विशेष आवडते म्हणजे द मॅन हू न्यू टू मच, सायको. रिबेका मूळ डॅफनी डी मॉरियरच्या पुस्तकावर आधारित आहे हे कळाल्यावर आणखी आवडला. व्हर्टिगोही छान होता. तसे म्हणयला गेलो तर हिचकॉकचा कुठलाही चित्रपट कधीच कंटाळवाणा वाटत नसे.

*याच्या देखादेखी आपल्या सुभाष घईने हीच परंपरा चालू केली होती. फरक इतकाच होता की घईच्या चित्रपटांमध्ये स्वत: सुभाष घईच दिसत असे, दिग्दर्शकाचा कुठेही पत्ता नसायचा.
(काही अपवाद वगळता. सुभाष घईचे कर्जसारखे चित्रपट बरेच सुसह्य होते.)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

रिबेका

रिबेका मूळ डॅफनी डी मॉरियरच्या पुस्तकावर आधारित आहे हे कळाल्यावर आणखी आवडला.

पुस्तकही वाचले नसल्यास जरूर वाचा. आवडेल असे वाटते.

प्रियाली, हिचकॉकची आठवण आली बर्‍याच दिवसांनी, आता त्याचा एखादा चित्रपट बघायला पाहिजे लवकरच.

ए एम् सीवर हिचकॉकपट

दोन आठवड्यांपूर्वी ए एम् सीवर आठवडाभर हिचकॉकपट दाखवले होते. लेखाची प्रेरणा तेथूनच झाली. :)

सर्वच पाहायला वेळ नाही झाला पण वर्टिगो, द बर्डस आणि सायको पाहता आले.

धन्यवाद! हे पुस्तक मी वाचले नाही. राजेंद्रने उल्लेख केल्यावर लायब्ररीचा कॅटलॉग चाळला तर या लेखिकेची बरीच पुस्तके दिसली. आता वाचायलाच हवे.

सुरुवात

पुस्तकाची सुरूवात फारच लक्षवेधी आहे. पुस्तक वाचताना चित्रपट डोक्यातून बाजूला काढून ठवला तर ते काल्पनिक वातावरण अजूनच वेगळ्या जगात घेऊन जाते.

अद्याप नाही

पुस्तकही वाचले नसल्यास जरूर वाचा. आवडेल असे वाटते.

रिबेका वाचलेले नाही. डॅफनी डी मॉरियरचे स्केपगोट वाचले आहे. ते आवडले होते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

रिबेका आणि सायको

हे दोन अतिशय आवडते चित्रपट. :) रिबेका तर अप्रतिमच. हिचकॉकला भूतपटांचा बाप असे म्हणता येईल.
हवेली, घार्‍या डोळ्यांची काळी मांजर, रात्री पडणारे घड्याळाचे टोल वगैरे कल्पना त्याच्याच असाव्यात. (हिंदी पिच्चरमध्ये पण हे टोल पडताना दाखवतात... पण घड्याळ कधी दिसत नाही)

उत्तम लेख

सायको आणि रिअर विंडो पाहिलेत, आता इतर पाहण्याची उत्सुकता लागली आहे. सॉ (पहिला भाग वगळता), होस्टेल इ. सारखे चित्रपट पाहिल्यानंतर हिचकॉकच्या चित्रपटांतील संयतपणा अधिक जाणवतो.

आभार

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार!

छे!

छे!
भयकथा वगैरे विषय आपला नाहीच!
गुंडोपंत थेटरातल्या अंधारालाही घाबरायचे तर त्या अंधारात बसून गूढ चित्रपट कुठून पहाणार? ;)

मागे कधी तरी लिविन्ग् डेड की असलाच कसला सिनेमा पाहिला, (सगळ्यांबरोबर बसून, चांगले झगझगीतपणे दुपारी ३ वाजताच सगळ्या घरातले दिवे लावून बरं का! शिवाय एक पुस्तक ठेवले होते जोडीला, म्हणजे भयंकर संगीत वाजायला लागले की पुस्तकात डोके घालायचे अशी आयडीया!) तरीही मग रात्री शू ला जायचीही भीती वाटत राहीली खुप दिवस... रात्रभर शू दाबून जागून बसावं लागलं.
अगदी अति तुंबणे झाल्यावर गुंडोपंत शू ला गेलेही पण त्यांना सारखा 'मागे कोण नुसताच रक्ताळलेला पंजा सरपटत येतोय की काय' हा भास! इतकेच काय सकाळी देवासमोरच्या गंधातही रक्ताचाच भास!

मग नकोच ती भलतीच मानसीक लचांडे मागे लागायला, म्हणून बंदच करून टाकले असले काही बघणे! शिवाय गुंडोपंताना बरेचदा एकटेपणा आवडतो. मग हे काँबीनेशन कसे जमायचे?

आता हे काही बघितलेच नाहीये तर गुंडोपंत प्रतिसाद कसा देणार म्हणून आपले सांगुन टाकले जे काय आहे ते! :))

कसलेसे भयंकर चित्र पाहण्यापेक्षा, दोन तास मस्त एकांतात ध्यानाला बसावे अशा मताचा!

आपला
गुंडोपंत

लेख वाचलाच नाहीत बॉ!

गुंडोपंत,

रक्त बिक्त, हिडीस, ओंगळपणा यावर लेख नाही हो! वाचलात तर कळेल बॉ! ;-)

असो. इविल डेड, नाईट ऑफ द लिविंग डेड, एक्झॉर्सिस्ट असे चित्रपट झेपत नसतील तर नकाच बघू पण त्यांची तुलना हिचकॉकशी तरी नका करू बॉ! :)

नाही हो!

नाही हो!
अशी तुलना मी केलीच नाहीये!
आता एका स्त्री चा गूढपणे खून न्हाणीघरात होतांना पाहिला तर गुंडोपंत आंघोळच उघड्यावर करायला लागतील... इतकी गंभीर परिस्थीती आहे हो. ;))

आपण परत पाहीलेत तर मी हीचकॉक विषयी एक शब्दही लिहीला नाहीये. निव्वळ साध्याशा इनहाऊस सेट अपवर हजारो लोकांना खिळवून ठेवणारे रोमांचक रहस्य नाट्य उभे करणार्‍या या महान माणासावर काही लिहावे इतकी या गुंड्याची लायकी कुठे हो?

मी आपला माझा 'रहस्यमय अनु-भाव' लिहीला आहे इतकेच.
विषयांतर झाले असेल तर एक डाव माफी द्या!

आपला
अतिंद्रीय शक्तींना घाबरणारा
गुंडोपंत

काय?

काही कळले नाही बॉ?
आता यात अल्ला कसा काय आला? मी तरी अजून इस्लामीक जगतातही असे गूढ चित्रपट बनतात असे ऐकले नाही? युरोपात इस्लामीक चित्रपट बनतात काय?

नाही नाही बघायचे नाहीयेत हो!!! उगाच नवीनच कळले म्हणून उत्सुकता.

आपला
गुंडोपंत

एक्झॉर्सिस्ट, ब्लेअर विच प्रोजेक्ट

एक्झॉर्सिस्ट चांगला होता हो. नाईटमेअर सिरीज पण जबरी. ;) इव्हिल डेड मात्र पांचट वाटला.

"व्हॉट लाईज बिनीथ" थेटरात बघितला तेव्हाही प्रचंड घाबरलो होतो. मिशेल फायफर जबरी. बाथटबमध्ये तिला आपल्या प्रतिबिंबाशेजारी दुसराच एक चेहरा दिसतो तेव्हा हृदयाचे ठोके चुकले होते.

भूतपटांमधला आमचा सगळ्यात आवडता "द ब्लेअर विच प्रोजेक्ट. ". बघितला असेल तर त्याबद्दलही लिहा!

याशिवाय ओमेन, द अदर्स हे देखील सुरेख.


आम्हाला येथे भेट द्या.

एक्झॉर्सिस्ट, ब्लेअर विच प्रोजेक्ट आणि वॉट लाईज...

एक्झॉर्सिस्ट चांगला होता हो.

एक्झॉर्सिस्ट तसा चांगलाच आहे. तो ही सत्यघटनेवर आधारित आहे पण जरा उगीच भडक दाखवला आहे. ३६० डिग्रीत फिरणारं मुंडकं, हिरव्या जांभळ्या ओकार्‍या. इइइइ! :))

द ब्लेअर विच प्रोजेक्ट मात्र मला आवडतो. दिग्दर्शकाच्या कल्पनेला दाद द्यावी तेवढी थोडीच. ओमेन आणि द अदर्स तर पुन्हा पुन्हा पाहावे असे. (ग्रेगरी पेकच्या ओमेन-१ ची सर पुढच्या भागांना नाही मात्र.) तसाच वॉट लाईज बिनिथ - अगदी मस्त आणि संयत चित्रपट. द रिंग आणि ग्रज हे ही तसे बरे आहेत पण ते पांढरे फटक चेहरे, काळे डोळे, केसांच्या झिंज्या याबाहेर येतच नाहीत.

मिशेल फायफर जबरी

ती नेहमीच जबरी असते बॉ! मला फार आवडते.

असो. विषयांतर जरा जास्तच झाले.

रामू

व्हॉट लाइज बिनिथ जबरीच होता. अचानक ती मुलगी दिसते तेव्हा काळजाचा ठोका चुकतो. तसा आपल्या रामूचा भूतही छान होता. आरशातून जाणारी बाई पहिल्यांदा दिसते तेव्हा जाम टरकायला होते. फक्त या सिनेमात रामूने क्यामेरा अगदी पायाजवळ का ठेवला होता कळाले नाही, त्यामुळे थोडा रसभंग होत होता.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

अवांतर

हिचकॉक म्हणून मी इतर काही बोललो नाही पण मूळ चर्चाप्रस्तावीकाजी बोलल्यामूळे आता ब्रूस ली च्या धाकलींनी मारले तरी न्यायालयात दाद मागता येईल म्हणून :-)

मला "सिक्स्थ सेन्स" प्रचंड आवडला. जरा घाबरलो होतो. "द अदरस्" देखील आवडला पण तो रहस्यपट जास्त, "भितिदायक" नाही वाटला. शामलनअण्णाचे नंतरचे सिनेमे तेवढे जमले नाही ("रेशमाच्या बाबांनी" नंतर तसाच हीट अजून यायचाय. बहूतेक काही कलाकृती एकदमच भारी असतात व त्यामूळे आपल्या अपेक्षापणा)

पण स्टूअर्ट लिटील ची पटकथा पण शामलनअण्णा लिहू शकतो तर त्याने असेच वेगळे (गूढकथेपेक्षा) चित्रपट काढावेत असा ठराव आपण पास करून त्यांना निवेदन पाठवावे काय?

इव्हील डेड, एक्झॉर्सिस्ट आदी अमेरिकन रामसेपट शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुटीत, कॅसेट आणून् मित्रांनी बघीतले. एक मित्र इतका टरकला होता की दोन्ही पायात डोके, त्यावर उशी घेऊन अधून् मधून स्क्रीन कडे बघत होता. पार्श्वसंगीत जरा जड झाले की परत् डोळे बंद, भीमरूपी सूरू. अजूनही ह्या सिनेमाचे नाव काढले की आम्हा काही मित्रांना इतके हसायला येते एखाद्याचा समज व्हायचा ते दोन्ही सिनेमे कॉमेडी आहेत.

बहुधा

तुम्ही स्केरी मूवी - २ बघितला असावा. ;) श्यामलनचा साईन्स आणि द व्हिलेज सुद्धा आवडले. काय आहे इकडे हिंदी चित्रपट बघून संवेदना बधीर होतात त्यामुळे एखादा बरा इंग्रजी चित्रपट बघितला तरी तो अत्युत्कृष्ट वाटत असावा.

- चक दे कर्ण


आम्हाला येथे भेट द्या.

गुंडोपंत आणि सरदार

तुमच्या अनुभवारून आठवले.

एक सरदार असाच घाबरट होता, भुताचा पिच्चर बघून आल्यावर त्याला शू ला जायला भीती वाटायला लागली. पण जायला तर पाहिजेच ना!
तुम्हाला जसे गंधात रक्ताचे भास होतात तसे त्याला घरात फिरणारे पंखे वगैरे बघून वटवाघळांचे भास व्हायला लागले. पण धीर करून त्याने टॉयलेटचा दरवाजा उघडला तर लाईट आपोआप चालू झाली.
घाबरून पळत बायकोकडे आला. आणि तिला हा किस्सा सांगितला.
बायको म्हणाली काय घाबरू नका. एवढे मोठे झालात तरी भुताला घाबरता. काय लाजबिज वाटते की नाही.
मग परत टॉयलेट जवळ गेला. डोळे मिटून घेतले. आणि दरवाजा उघडला.
डोळे थोडे किलकिले करुन पाहिले तर लाईट चालू झाली होती. पटकन काम उरकून हॉल मध्ये आला आणि बायकोला म्हणाला की आपल्याला आता हातात कवटी आणि हाडे घेऊन फिरणारे मांत्रिक आणायला पाहिजे टॉयलेटमधलं भूत घालवायला.
बायको म्हणाली काय झालं?
तर सरदारानं सांगितलं की आपलं टॉयलेट झपाटलेलं आहे. दार उघडलं की लाईट आपोआप चालू होते.

बायको म्हणाली, यावेळी ठीक आहे. पण पुढच्य वेळी फ्रीजचा वापर केला तर बघा.

(ह.घ्या.)


आम्हाला येथे भेट द्या.

मला असं म्हणतोस् काय...

:((
मला असं म्हणतोस् काय...
घरी आलास की आता आवर्जून फ्रीज मधले गारेगार लिंबाचे सरबत देईन प्यायला!
;))
आपला
गुंडोपंत

गॉथिका

हेचबीओ च्या कृपेने कालपरवाच "गॉथिका" बघितला. मध्यंतरांपर्यंत छान पकड घेतो. पण हॅले बेरीने अप्रतिम काम करूनही नंतर तिने वाचवण्याच्या क्षमतेपलीकडे भेलकांडत गेला आहे.


आम्हाला येथे भेट द्या.

सुरेख आणि माहितीपूर्ण

सुरेख आणि माहितीपूर्ण लेख. लेखाचे शीर्षक तर फारच समर्पक.
मी हिचकॉकचे फक्त सायको आणि रिबेका पाहिलेले आहेत आणि दोन्ही खूप आवडले आहेत. बाकीच्यांची नावे ऐकली आहेत पण बघायचा योग आला नाही.

अवांतर : रिबेका कादंबरी पण मला खूप आवडलेली आहे. कादंबरीतल्या एकदोन गोष्टी चित्रपटात नाहीत. त्या असणे शक्यही नाही! त्या गोष्टी म्हणजे लेखिकेची शैली आणि तिने केलेले नायिकेचे मनोविश्लेषण! ह्या दोन्ही साठी मी हे पुस्तक अनेकदा वाचले आहे.

छान लेख

स्टेंजर ऑन द् ट्रेन पाहिला होता. अफलातून आहे. तो आवडला आणि त्यामुळे बाकी चित्र्पटांच्या ही सीडीज घेऊन ठेवल्या.

आता परत पाहतो एकदा.

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

बादशहा

हिचकॉक खरच बादशहा होते. लेख उपयुक्त आहे.

जर्दाळू - एक मित्र!

 
^ वर