बीबीसीचे भारतप्रेम

गेल्या महिन्यात भारतीय स्वतंत्रतादिनाला ६० वर्षे पूर्ण झाली. इतकी वर्षे भारतातील वाहिन्या स्वतंत्रतादिवस कसा साजरा करतात हे जवळजवळ तोंडपाठ झाले होते. दोन-एक दिवस आधी जागे होउन दिल्लीतील सुरक्षाव्यवस्थेच्या बातम्या द्यायच्या, भाभूपासून ऋतिकपर्यंत सर्वांची देशभक्तीची गाणी दाखवायची आणि शेवटी ब्रह्मास्त्र म्हणजे मनोजकुमारचा उपकार (महाराज, एक डाव तरी माफी द्या!) लाखाव्या वेळेला दाखवायचा. (नाही म्हणायला कुठल्यातरी वाहिनीवर सिंहासन असायचा हाच एक दिलासा.) दुसर्‍या दिवशीपासून परत जैसे थे.

गेली काही वर्षे भारताबाहेर काढल्यावर एक गोष्ट लक्षात आली की परदेशी वाहिन्यांवर भारताला मिळणारी प्रसिद्धी फार थोडी असायची. सुनामी, पूर, बॉम्बस्फोट या आपल्या प्रसिद्धीच्य़ा बातम्या. अशी पार्श्वभूमी असताना ऒगस्ट उजाडण्याआधीच बीबीसीने हा महिनाभर भारत आणि पाकिस्तान यांच्यावर विविध कार्यक्रमांची घोषणा केली तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. आणि कार्यक्रम बघताना हे आश्चर्य कायम होते. या सर्व कार्यक्रमांमध्ये भारतातील सर्व थरांमधील राहणीमान जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता. यात पुण्याच्या दोन शाळांवर इंडियन स्कूल या नावाची कार्यक्रम मालिका होती. विद्यार्थी, शिक्षक यांच्या मुलाखती, त्यांचे रोजचे वेळापत्रक या सर्वांचे दर्शन या कार्यक्रमातून होत होते. मुंबईच्या लिज्जत पापडवरील कार्यक्रमात एका कामगार महिलेची मुलाखत होती. भारतातील लग्नसराईवर एक दीर्घ मालिका होती. यात लग्न जमण्यापासून मांडव, खरेदी, मेजवान्या या सर्व गोष्टी बारकाईने दाखवल्या होत्या. याशिवाय भारतातील अनेक लोकप्रिय व्यक्तींच्या मुलाखती, यात देव आनंद, चार्लस कोरिआ, नेस वाडीया, जावेद-शबाना, अमजद अली खान अशा अनेक मंडळींचा समावेश होता. याशिवाय हल्ली इंडिया बिझनेस रिपोर्ट हा कार्यक्रम खास भारतीय उद्योगक्षेत्रातील घडामोडींवर असतो.

हे सर्व बघताना असा प्रश्न पडला की असे अचानक भारतप्रेम उतू जाण्याचे कारण काय? मग लक्षात आले यामागे एकाहून अधिक कारणे आहेत. भारत-अमेरिका यांच्यातील अणुकरारामुळे भारताला जागतिक व्यासपीठावर कायदेशीररीत्या अणुशक्ती वापरण्याचा अधिकार मिळतो आहे. भारताच्या दृष्टीने दुसरी जमेची बाजू म्हणजे आणिबाणीचा अपवाद वगळता आपल्याकडे लोकशाही टिकून राहिली आहे. गेल्या सहा महिन्यातील भारताची आर्थिक वाढ कुठल्याही ९% होती. भारतातील ५०% जनता वयोगट २५ च्या खाली आहे. संगणकाच्या आउटसोर्सिंगमध्ये सध्या भारत एक अग्रगण्य देश आहे. याशिवाय भारतातील संगणक कंपन्या जगभर पसरत आहेत. नुकतीच इन्फोसिसने अमेरिकेत त्यांची शाखा उघडली. ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती मित्तल स्टील्सचे मालक मित्तल हे आहेत. जगातील १०% स्टीलचे उत्पादन त्यांच्या कंपनीमध्ये होते. परदेशी कंपन्यांसाठी भारत ही एक प्रचंड मोठी बाजारपेठ बनली आहे. एकूणात जगाला भारताची दखल घेण्यावाचून गत्यंतर नाही.

जावेद-शबानाची मुलाखत घेताना मुलाखतकाराने विचारले, "हल्लीची भारताची प्रचंड आर्थिक वाढ बघता असे म्हटले जाते की येत्या काही वर्षांमध्ये युरोप-अमेरिकेमधून लोक इथे काम शोधण्यासाठी येतील. तुम्हाला काय वाटते?" जावेद त्याच्या खास शैलीमध्ये मंद हसला आणि म्हणाला, "यू आर ऑलरेडी हिअर."

Comments

हम्म

एकूणात जगाला भारताची दखल घेण्यावाचून गत्यंतर नाही.
खरे आहे. तुम्ही दिलेला बीबीसीचा दुवा चांगलाच रंगीबेरंगी वाटला- कदाचित भारतासारखाच. एकीकडे बरेच वाटते असे काही वाचले की.

तुम्ही म्हणता तसे भारताचे चित्रण (कधीकधी अचंबित होऊन) ब्रिटीश आणि अमेरिकन प्रसारमाध्यमे करीत असतात. पण हा त्यांच्या साम्राज्यवादाचाच एक पैलू आहे असे काहीसे मला वाटते- दुसर्‍या देशाची माहिती काढणे आणि मग शिरकाव करणे हे अनेक वर्षे ते करीत आले आहेत. दुसरीकडे प्रामाणिकपणे आपल्या पुढच्या पिढ्यांना दुसर्‍या देशांची माहिती मिळून त्यांची घडवणूक करण्याचे कामही हे लोक इमानेइतबारे करीत असतात - भारतात असताना मला नाही आठवत असे दुसर्‍या देशांचे काही वर्णन केलेले कार्यक्रम पाहिल्याचे!

सहमत

भारतात असताना मला नाही आठवत असे दुसर्‍या देशांचे काही वर्णन केलेले कार्यक्रम पाहिल्याचे!

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मलाही असे कार्यक्रम पूर्वी पाहिल्याचे आठवत नाही. ह्या वेळच्या कार्यक्रमांमध्ये विशेष हे होते की भारताचा उल्लेख इकॉनॉमिक सुपरपॉवर असा केला जात होता. म्हणजे पूर्वी भारत फक्त आत्मशुद्धी (स्पिरिच्युअल एन्लायटनमेंट वगैरे) साठी प्रसिद्ध होता ते चित्र हळूहळू बदलते आहे असे वाटते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

खरे आहे

उगवत्या सूर्याला नमस्कार करावा हे तर सामान्यज्ञान झाले आणि त्यांच्याकडे ते (अजूनही) आहे ही आनंदाची गोष्ट आहे.

परदेशी कंपन्यांसाठी भारत ही एक प्रचंड मोठी बाजारपेठ बनली आहे.

हम्म ... खरी गोम इथे आहे. अणुकरारापासून इतर छोट्यामोठ्या गोष्टींमगील 'गवर्निंग डायनॅमिक्स' हेच आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही (म्हणजे आकाराने हो!) आणि आतंकवादाने पोळलेला देश म्हणून सहानुभूतीने अमेरिकेने हा करार केला नाही.

मनी (माऊ :) )

इथे सामान्यज्ञान याचा अर्थ कॉमन सेन्स असा घेतला आहे. यावरून आठवले आमच्या एका शिक्षकांचे एक आवडते वाक्य होते, कॉमन सेन्स इज वेरी अनकॉमन :)

अणुकरारापासून इतर छोट्यामोठ्या गोष्टींमगील 'गवर्निंग डायनॅमिक्स' हेच आहे.
खरे आहे. दुसर्‍या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे सर्व गोष्टींची किल्ली मनी म्याटर्स मधे आहे :) आणि अमेरिकेचे म्हणाल तर अमेरिका कुठ्लीही गोष्ट सहानुभूतीने करत असेल यावर विश्वास बसत नाही. असो. प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

हिन्दी सेवा

वरील सर्व मुद्दे पटतात. अजून एक गोष्ट म्हणजे बीबीसी हिन्दी सेवेने पण त्यांच्या संकेतस्थळावर फाळणिच्या वेळची आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील दुर्मिळ छायाचित्रे ठेवली आहेत.

त्याच पद्धतीने त्यांनी मे महीन्यात १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धास १५० वर्षे झाल्या निमित्ताने लखनौला झालेल्या प्रदर्शनातील छायाचित्रे देखील ठेवली होती. ती दुर्मिळ होती म्हणून मी ती जतन केलीत. खालील दुवा बीबीसीचा नाही पण ती छायाचित्रे त्यांच्यामुळे मिळाली:

या छायाचित्रांची माहीती समजण्यासाठी हा दुवा पहा. असा उपक्रम भारतीय माध्यमांनी त्यांच्या संकेत स्थळांवर केल्याचे ऐकीवात नाही

मधे अविनाश धर्माधिकारींची व्याख्याने ऐकत होतो. त्यात त्यांनी कोणकोणत्या ब्रिटीश सनदी अधिकार्‍याने भारतीय संस्कृतीतील कुठल्या लूप्त झालेल्या गोष्टी "येथे नेटिव्हांवर राज्य करायचे आहे" म्हणून अभ्यास करताना शोधल्या यावर आश्चर्यकारक माहीती दिली होती. त्यांची नावे ल़क्षात नाही पण सांगायचा नंतर प्रयत्न करीन. परंतू थोडक्यात मला इतकेच म्हणायचे आहे की इतरांवर राज्य करायचे असले तर त्यांना आधी नीट समजून घेणे महत्वाचे या बाबतीत ब्रिटीशांचा गूण घेण्यासारखा आहे हे आधी माहीत होते पण ते ऐकून जास्तच वाटले... आज ब्रिटीश माध्यमे अशी माहीती गोळा करून ठेवत आहेत उद्या त्याचा उपयोग कसा करायचा हे ठरवतील.. आपण त्यातून काही तरी शिकण्याची गरज आहे असे वाटते.

हिटलर

इतरांवर राज्य करायचे असले तर त्यांना आधी नीट समजून घेणे महत्वाचे या बाबतीत ब्रिटीशांचा गूण घेण्यासारखा आहे हे आधी माहीत होते पण ते ऐकून जास्तच वाटले

प्रवासादरम्यान हिटलरसुद्धा हिंदू व इतर धर्मांचा अभ्यास करायचा हे वाचल्याचे स्मरते. बहुतेक वॉर्सा ते हिरोशिमा पुस्तकात असावे.

त्र्यं. शं. शेजवलकरांनी आपल्या 'पानिपत १७६१' पुस्तकात शत्रूच्या सामरिक डावपेचांचा आणि तांत्रिक प्रगतीचा अभ्यास न करणे हे पराभवाचे एक मुख्य कारण दिले आहे.

तेव्हा यो यो , हेय बेबी, हाय ड्युड, कूल, हॉट, चिल करणार्‍या आजच्या भारतीय पिढीला परदेशी कंपन्यांनी लक्ष्य केले तर नवल काय?

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

सहमत

तेव्हा यो यो , हेय बेबी, हाय ड्युड, कूल, हॉट, चिल करणार्‍या आजच्या भारतीय पिढीला परदेशी कंपन्यांनी लक्ष्य केले तर नवल काय? हे मात्र खरे आहे.





मराठीत लिहा. वापरा.

हम्म

तेव्हा यो यो , हेय बेबी, हाय ड्युड, कूल, हॉट, चिल करणार्‍या आजच्या भारतीय पिढीला परदेशी कंपन्यांनी लक्ष्य केले तर नवल काय?

काही अंशी खरे आहे. काही अंशी यासाठी म्हणतो की संपूर्ण बाजारपेठेमध्ये एमटीव्ही जनरेशनचे प्रमाण तुलनेने कमी असावे. समजून घेण्यात आपण कमी पडतो हे मात्र पटते. आपला इतिहास बघता याचे पुरावे जागोजागी मिळतात.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

पानिपत १७६१

त्र्यं.शं. शेजवलकरांनी आपल्या 'पानिपत १७६१' पुस्तकात शत्रूच्या सामरिक डावपेचांचा आणि तांत्रिक प्रगतीचा अभ्यास न करणे हे पराभवाचे एक मुख्य कारण दिले आहे.

हे पुस्तक म्हणजे कटू सत्य आहे पण झण़़झणीत अंजन डोळ्यात घालू शकते...

तेव्हा यो यो , हेय बेबी, हाय ड्युड, कूल, हॉट, चिल करणार्‍या आजच्या भारतीय पिढीला परदेशी कंपन्यांनी लक्ष्य केले तर नवल काय?

हे पण अचूक आणि कटू सत्याचेच वर्णन आहे. त्याचे परीणाम काय होणार हे २०२० साली (जेंव्हा ही पिढी मोठी होईल) तेंव्हा कळतील.

मस्त

विकासराव,
दुवा छानच आहे, अनेक धन्यवाद. दुर्दैवाने भारतीय माध्यमे जास्त करून अतिरंजकतेच्या मागे असतात असे वाटते (सनसनीखेज समाचार वगैरे). शिवाय तुम्ही म्हटल्याप्रमाणे कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जाउन समजून घेण्याचा ब्रिटीशांचा गुण विशेष आहे आणि हा बर्‍याच क्षेत्रांमध्ये दिसून येतो. माझ्या मते या सर्वांच्या मुळाशी आपली प्रबळ होणारी अर्थव्यवस्था आहे. शिवाय परदेशी कंपन्यांसाठी बाजारपेठीचा मुद्दा आहेच. यावरून मेहमूदचे जुने गाणे आठवते, "ना बापू न भैया मैय्या, द होल थिंग इज दॅट के भय्या सबसे बडा रुपय्या". आणि डॉलरची घसरण आणि रूपयाची बळकटी बघता हे गाणे शब्दशः खरे ठरण्याची वेळ आली आहे. :)

अवांतर : आधीचे दोन दुवे काम करत नाहीत असे दिसते, काहीतरी गडबड असावी.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

उपक्रम

असा उपक्रम भारतीय माध्यमांनी त्यांच्या संकेत स्थळांवर केल्याचे ऐकीवात नाही.

काहीसा असाच उपक्रम जून मध्ये केला गेलेला इथे पाहण्यात/वाचनात आला. हा पूर्ण अंक मुख्यत्वे १८५७ च्या स्वातंत्र्यसमराला वाहिलेला होता.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

धन्यवाद

धन्य्वाद, हा लेख मी पाहीला नव्हता.

दुवा

दुवा छान आहे आणि चित्रांबरोबर दिलेली माहिती विस्तृत आहे. त्याला धन्यवाद.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

वा !

चर्चा प्रस्ताव, दुवे आणि प्रतिसाद चांगले आहेत.
प्रत्येक गोष्टीची तपशीलवार माहिती काढणे, ती जतन करणे आणि दुसर्‍याला देणे (समान उद्देश असणार्‍या सहकार्‍याला) या गुणांमुळे पाश्चात्य देशांतले लोक हजारो मैल दूर असलेल्या भूभागांवर लिलया संचार करतात, व्यापर करतात आणि प्रसंगी राज्य सुद्धा करतात असे दिसते.

विषय निघाला आहे म्हणून सांगतो. हिमालयात पदभ्रमण करताना, नव्या जागा शोधणे, त्यांचे नकाशे आणि माहिती मिळवणे हे अवघड काम असते. अनेकांना भेटून त्यांचे अनुभव लक्षात घेवून मग थोडी-बहुत माहिती मिळते. एकदा मी स्वतः असा अनुभव घेतला आहे की अश्याच एका पदभ्रमणात मला दोन स्वीस तरुण भेटले. त्यांच्याकडे, त्यांच्या आधी तेथे येवून गेलेल्या स्नेह्यांनी इतके तपशीलवार रेखाटणे आणि नकाशे दिले होते की आश्चर्य वाटावे. फिरताना कोठून कोठले शिखर दिसायला लागेल, आता उभे आहोत ती जागा किती मिनिटे चालल्यावर आली आहे, येथे गुहा-निवारा-पाणी आहे की नाही, इत्यादी अनेक तपशील, जे फक्त आमच्या वाटाड्याला ठावून असतील, ते त्यांच्या टिपणांमध्ये होते आणि ते दोघे चालताना त्यात भर घालत होते. सांगायचा मुद्द इतकाच की अशा पद्धतशीर नोंदी करण्याचा स्वभाव त्यांना अनेक फायदे मिळ्वून देतो.
(वरील प्रतिसाद विषयांतर तर नाही ना अशी आता शंका येत आहे. तसे असल्यास क्षमा असावी.)
--लिखाळ.

नेहमी फॉरिनच्या देशांत टूर चे दौरे करित असल्याने मी मराठी फारसे वाचत नाही :) (वार्‍यावरची वरात-पुल)

सहमत

प्रत्येक गोष्टीची तपशीलवार माहिती काढणे, ती जतन करणे आणि दुसर्‍याला देणे (समान उद्देश असणार्‍या सहकार्‍याला) या गुणांमुळे पाश्चात्य देशांतले लोक हजारो मैल दूर असलेल्या भूभागांवर लिलया संचार करतात, व्यापर करतात आणि प्रसंगी राज्य सुद्धा करतात असे दिसते.

सहमत आहे. किंबहुना पाश्चात्य देशातील प्रगती याच कारणांमुळे झालेली आहे. तुम्ही वर्णन केलेला अनुभव पुरेसा बोलका आहे. पाश्चात्य देशात हमखास मिळणारी आणि भारतात क्वचित दिसणारी आणि वापरली जाणारी गोष्ट म्हणजे कुठल्याही शहराचा सर्व रस्ते दाखवणारा नकाशा. आपल्याकडे पत्ता शोधताना काय गत होते त्याचे वर्णन पुलंनी केलेच आहे. असो. आता गूगल म्यापमुळे भारतातील परिस्थिती बदलेल अशी आशा करायला हरकत नाही.
प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

भारतीयांचे बीबीसी वरचे प्रेम

हे सगळ आर्थीक आहे हे नव्याने सांगायला नकोच

शिवाय यो यो , हेय बेबी, हाय ड्युड, कूल, हॉट, चिल करणार्‍या आजच्या शहरी भारतीय पिढीला पण फक्त बीबीसी, सी एन एन च दिसते भारतीय माध्यमे बहूदा दिसत नाहीत त्याचे काय?

तो च्या ह्या दुव्यावरून प्रेरीत होऊन लिहावेसे वाटले ;-)

ह.घ्या. पण विचार करा.

असे नाही

बीबीसी, सी एन एन च दिसते भारतीय माध्यमे बहूदा दिसत नाहीत त्याचे काय?

मला स्वतःला सीएनएन विशेष आवडत नाही, पण नॅशनल जिओग्राफिक, डिस्कव्हरी या परदेशी वाहिन्या आवडतात. आपल्या मतानुसार चांगली भारतीय वाहिनी असेल तर सांगा तीही बघू. इथे झी चॅनेल दिसते पण त्यावरच्या सासूसुना बघवत नाहीत. ;)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

चांगली वाहिनी

आपल्या मतानुसार चांगली भारतीय वाहिनी असेल तर सांगा तीही बघू.

त्यातल्यात्यात एन.डी टि.व्ही. चांगली आहे. सी.एन. बी. सी ची हिंदी वाहिनी उत्तम आहे (हिला भारतीय म्हणवे ना?). मालिका वगैरे साठीच्या वाहिन्या धन्य आहेत, न पाहिलेल्याच बर्‍या ;). तुलनेने सहारा (?) वरच्या मालिका (?) (सफर, स्वराज) उजव्या वाटायच्या.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

सहमत

एन.डी टि.व्ही. चांगली आहे.

सहमत आहे. मागे विनोद दुआ यांनाही या वाहिनीवर बघितल्याचे आठवते. (चूभूद्याघ्या). याशिवाय काही वाहिन्यांवरचे काही कार्यक्रम आवडतात, उदा. स्टारप्लसवरचा ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज किंवा देशी वाहिनी आणि परदेशी मालिका असे घेतल्यास स्टारवरचेच साइनफेल्ड. सफर, स्वराज बघण्याचा योग आला नाही.

अवांतर : लेखाच्या शीर्षकातच वाहिनीचे नाव असल्याने हे विषयांतर झाले नसावे असे वाटते. तरीही झाले असल्यास क्षमस्व.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

बी बी सी चे सर्वेक्षण

भारत म्हणजे गांधी, गरिबी आणि ताजमहाल

[ Friday, September 14, 2007 01:49:29 pm]

नवी दिल्ली
मटा ऑनलाइन प्रतिनिधी
भारत म्हटले की पाश्चिमात्यांच्या डोळ्यासमोर काय येते ? तर त्यांच्या मते भारत म्हणजे गांधी, गरिबी आणि ताजमहाल.

भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्याला ६० वर्षे पूर्ण झाली. या देशांची जगात काय ओळख आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसीने एक सर्व्हे केला. सामाजिक आणि आर्थिक स्तराच्या आधारावर केलेल्या या सर्व्हेतील रिपोर्टनुसार भारत, गांधी. गरिबी आणि ताजमहाल या तीन गोष्टींसाठी जगभरात ओळखला जातो तर पाकिस्तान न्यूक्लिअर, गरिबी आणि क्रिकेटसाटी जगात ओळखला जातो.

बीबीसीने आंतराराष्ट्रीय कंपनी सेनोवटाच्या सहकार्यांने युरोप, उत्तर आणि दक्षिण अमेरिकी, आशिया तसेच ऑस्ट्रेलिया अशा २० देशांमधल्या सुमारे १२ हजार ६७० लोकांना भारत आणि पाकिस्तानविषयी त्यांचे मत विचारण्यात आले.

फ्रान्स आणि इटालीसारख्या देशांमध्ये भारताला गरिबीत देशांमध्ये सर्वात आघाडीवर असलेला देश असे सांगितले तर पूर्वेकडच्या देशांनी भारत एक आधुनिक देश असल्याचे सांगितले.

ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातली देशांनी भारताची ओळख बॉलिवूड आणि आऊटसोर्सिंगसाठी ओळखला जात असल्याचे सांगितले. तर, अनेक लोकांनी भारतात हिंदू धर्म हा प्रमुख धर्म असून दुस-या स्थानावर बौद्ध धर्म असल्याचे सांगितले.

मनोरंजक

माहिती मनोरंजक आहे. बीबीसीसारख्या प्रसारमाध्यमांनी नव्या दिशेने केलेला विचार जनमानसांमध्ये रुजायला थोडा वेळ जाईल असे वाटते. पाकिस्तान क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे हे वाचून अजून गंमत वाटली :)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

यू आर ऑलरेडी हिअर

जावेद-शबानाची मुलाखत घेताना मुलाखतकाराने विचारले, "हल्लीची भारताची प्रचंड आर्थिक वाढ बघता असे म्हटले जाते की येत्या काही वर्षांमध्ये युरोप-अमेरिकेमधून लोक इथे काम शोधण्यासाठी येतील. तुम्हाला काय वाटते?" जावेद त्याच्या खास शैलीमध्ये मंद हसला आणि म्हणाला, "यू आर ऑलरेडी हिअर."

हे मात्र खरे!

आभार

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

अपडेट

१. भारतीय शाळांवरील कार्यक्रमांची मालिका ऑगस्ट संपला तरीही बीबीसीवर अजूनही चालू आहे.
२. कालच ऐकले की पॅरामाउंट, ट्वेंटिएथ सेंच्युरी फॉक्स, सोनी पिक्चर्स यासारखे बडे हॉलीवूड स्टुडिओ बॉलिवूडमध्ये चित्रपट निर्मिती करण्यासाठी उतरत आहेत. भीती एकच आहे, गोर्‍यांनाही शाहरुख आवडायला लागला तर आम्ही क..क..क..कुठे जायचे? :)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

 
^ वर