लेखन करताना

लेखन करताना

अनेकदा चर्चा प्रस्ताव, लेख वाचताना, काही गोष्टी हव्यात नि नकोत असे जाणवत राहते. लेखन करताना खालील काही गोष्टी मला महत्त्वाच्या वाटल्या. मात्र फक्त याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत असे नाही, आपणही यात भर घालू शकता. (माझा हेतू सदस्यांना अक्कल शिकवायचा नाही! बहुतेक सदस्य लेखनात बाप (नि आई पण ;) )माणसे आहेत. पण तरीही यातल्या काही गोष्टींचा उपयोग व्हावा असे वाटले म्हणून हा प्रपंच)

आपण कुणासाठी लिहिता आहात?

आपण नक्की कुणासाठी लेख करत आहोत हे पक्के करणे योग्य ठरते. म्हणजे आपले वाचक ओळखता यायला हवेत. आपले लेखन त्यांना आवडण्याजोगे असायला हवे. (हे दरच वेळी शक्य असेल असे नाही.)

काय म्हणायचे आहे?

आपल्याला काय मुद्दा चर्चेत लेखात मांडायचा आहे ते स्पष्ट असायला हवे. उगाच इतर घुळघुळ नको. पुणेरीपणे 'आपले म्हणणे थोडक्यात सांगा' हा भाग काहीसा असायला हवा.

असे शक्य नसल्यास, मुद्दे क्रमवार घालून टाकायलाही हरकत नाही. चर्चेमध्ये क्रमवार मुद्द्यांना क्रमवार उत्तरे देणे सोपे जाते असे वाटते.

कसं म्हणायचे आहे?

आपल्याला जे काही म्हणणे मांडायचे आहे, ते कसे मांडायचे आहे हा एक कळीच मुद्दा आहे. आपल्या लेखनात एक लय यायला हवी, जी काही प्रयत्नाने येत जाते. वाचकाला या लयीमुळे वाचन करणे सोपे जाते. (असे मला वाटते!)

वाद प्रतिवाद कसा?

महाजाल या नवीन माध्यमाचा विचार करता, चर्चा नुसती टाकून भागत नाही. त्यावर येणाऱ्या प्रतिसादांना उत्तरे द्यावीत अशी सदस्यांची अपेक्षा असते. आजही आपण पाहाल तर जे सदस्य इतर सदस्यांना उत्तरे देतात त्यांच्या चर्चा रंगलेल्या दिसतात. इतर चर्चा काही प्रतिसादां नंतर मरतात.

काही मुद्दे:

१. साधी भाषा वापरा

२. छोटी वाक्ये लिहिण्याचा प्रयत्न करा.

३. लेखाचे चर्चेचे शीर्षक लक्षवेधक द्या

४. लेख शैली एकच ठेवा

५. अवघड शब्द टाळा (वापरावेच लागले तर समानार्थी शब्दही द्या)

आशा आहे यावर आपण अजूनही मुद्दे सुचवू शकाल.

आपला
गुंडोपंत

Comments

मुद्देसूद

मुद्द्याचा मुद्दा पटला बरका..

तसेच खूप मोठाले प्रतिसाद वाचायचा कंटाळा येतो. एकदाच मोठ्ठा प्रतिसाद देण्यापेक्षा थोडं लिहून चर्चेत त्यावर येणार्‍या प्रतिक्रियानुसार चर्चेत अधिक वेळ सहभाग घ्यावा.

पण आज गुंडोपंत गुद्द्यावरून मुद्द्यावर कसे?? ह्. घ्या. बरका. :-)

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

हो रे

खूप मोठाले प्रतिसाद वाचायचा कंटाळा येतो

हो रे आणी एकच प्यारा तिन तिन वेळा वाचायचा पण्!

गुंडो

सत्य !

खूप मोठाले प्रतिसाद वाचायचा कंटाळा येतो

हे तर तिकालाबाधित सत्य आहे.काहींचा असा समज आहे की मोठा प्रतिसाद म्हणजे अभ्यासू प्रतिसाद बरे मोठा प्रतिसाद वाचूनही त्यात फारसे काही विशेष असत नाही तेव्हा मात्र वाचकांचा नसेल पण माझा तरी अपेक्षा भंग होतो !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सही!

त्यात फारसे काही विशेष असत नाही तेव्हा
हा हा हा!!!

हे सही!

आपला
गुंडोपंत

शाब्बास रे गुंड्या..

छान लिहिलं आहेस हो! आता मेल्या कसं लिहायचं ते तूच आम्हाला शिकव! :)

तात्या.

आजोबा

आता मेल्या कसं लिहायचं ते तूच आम्हाला शिकव! :)

मी कोण शिकवणार तात्या?

आमचा तात्या बाप माण्सात नाही; तर आजोबा माणसात बरं का! :)

आपला
गुंडोपंत

काही मुद्दे

साधी भाषा वापरा

To make the things simple is most difficult thing.

छोटी वाक्ये लिहिण्याचा प्रयत्न करा.

छोटी वाक्ये करताना अर्थाचे तुकडे झाले तर्?

लेखाचे चर्चेचे शीर्षक लक्षवेधक द्या

लेबल आकर्षक पाहिजे कंटेंट काही असला तरी एकवेळ चालेल. किमान पक्षी वाचकांचे लक्ष तर वेधून घेईल.

लेख शैली एकच ठेवा

एकसुरी होउ नये म्हणून मध्येच सांधा बदलला तर काय हरकत आहे. अर्थात वाचकांना भावेल की नाही हा मुद्दा येतोच. गांभिर्यातून थोडा हलका नर्म विनोदाकडे.

अवघड शब्द टाळा (वापरावेच लागले तर समानार्थी शब्दही द्या)

इथेच गोचि होते. आपल्याला अभिप्रेत असलेल्या शब्दाला समानार्थी सोपा शब्द देताना "आशयहानी" वा " अर्थहानी होईल कि काय ही भीती. अहो उच्चारावर सुद्धा शब्दाचा अर्थ बदलत असेल तर."शहाणा आहेस" हे वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या टोन मध्ये म्हणून बघावेत. शब्दोच्छल करायला इतरांना संधी नको का? 'महाराणी प्रसूत होउन त्यांना कन्यारत्न झाले 'आणि 'गंगी बाळंत होउन तिला मुलगी झाली.'

प्रकाश घाटपांडे

तेच तर्!

To make the things simple is most difficult thing.
अगदी खरं बोललात!

अर्थाचे तुकडे झाले तर्?
ते होवू नयेत याची काळजी घेतलीच पाहिजे पण अवघड भाषेने अर्थच पोहोचला नाही तर काय उपयोग लिखाणाचा?

अर्थात वाचकांना भावेल की नाही हा मुद्दा येतोच. गांभिर्यातून थोडा हलका नर्म विनोदाकडे.

'भावणे' हाच मुद्दा महत्वाचा आहे अगदी; हो पण विनोद दर वेळी जमून येतोच असे नाही हो! :(

शब्दोच्छल करायला इतरांना संधी नको का?
हे बाकी सही! जियो! यासाठीच तर आपण येथे जमतो. शब्दांवर शब्द लिहायला ;)))))

आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

अवांतर..

'महाराणी प्रसूत होउन त्यांना कन्यारत्न झाले 'आणि 'गंगी बाळंत होउन तिला मुलगी झाली.'

च्यामारी यातली गंगी आम्हाला अधिक जवळची वाटते! :)

आपला,
(गंगीवर खुश असलेला) तात्या.

आम्हालाही!

च्यामारी यातली गंगी आम्हाला अधिक जवळची वाटते! :)

वा तात्याबा आम्हालाही अशुद्ध नि साधी-सुधी बोलणारी गंगीच जवळची वाटते!

तेंव्हा आता गंगीच्या भाषेत येवू द्या बॉ काहीतरी लिखाण!

आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

गंगी

गंगी कोलीन हाय की काय?
नायतर तसा तात्यांना गंगी जवलची वाटण्याचा काय कारण?

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

आणखी काही मुद्दे

१) लिहितांना वाचकांनाही बर्‍याच गोष्टी माहीत असतात हे लक्षांत ठेवावे.
२) वाचकांना सहज सुचतील अशी वाक्ये / वाक्प्रचार वापरायचे टाळावे.
३) आपले लिखाण चाखून पाहतांना आपण वाचकाच्या जागी आहोत असे समजावे.

महत्वाचे मुद्दे!

१) लिहितांना वाचकांनाही बर्‍याच गोष्टी माहीत असतात हे लक्षांत ठेवावे.

महत्वाचा मुद्दा आहे! प्रतिसादांनी अनेकदा लेखकाचा अपेक्षा भंग होवू शकतो. मागे काही तथाकतथीत पत्रकारांचा असाच भंग झाला होता.

२) वाचकांना सहज सुचतील अशी वाक्ये / वाक्प्रचार वापरायचे टाळावे.

हे काही कळले नाही बॉ! का नाही वापरायचे सहज सुचणारे वाक्प्रचार?
उलट रोजच्या वापराच्या भाषेने लिखाण जवळचे वाटणार नाही का? उलट वाचकांना कळणारीच भाषा वापरावी असे मला वाटते. महाराणी प्रसूत होण्यापेक्षा 'गंगी बाळंत होणे' जास्त साधे सोपे आहे असे वाटते.

३) आपले लिखाण चाखून पाहतांना आपण वाचकाच्या जागी आहोत असे समजावे.

वा क्या बात है! अतिशय योग्य मुद्दा! हा मुद्दा अनेकदा शास्त्रोक्त लेखनातही वापरण्याचा प्रयत्न करतात म्हणे!

(खरं तर मीच हे करुन बघायला हवं होतं... ;))) पण इतका धांदरट पणा न करेल तो गुंड्या कसा!)

आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

बिंदुगामी (मुद्देसूत) लेखन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. गुंडोपंत यांनी लेखनासंबंधी चांगले उपयुक्त लेखन केले आहे. अर्थात त्याकडे गांभीर्याने पाहून तदनुसार प्रत्येकाने आपापले लेखन तपासले पाहिजे. आपल्याला जो काही विचार मांडायचा असेल तो सुस्पष्ट असावा. त्यात संदिग्धता नसावी.भाषा सोपी असावी,वाक्ये लहान असावी ही गुंडोपंतांची मते पटण्यासारखी असली तरी इथे वाचणारे सदस्य आणि पाहुणे उच्चशिक्षित अभिजन(एलिट) असतात हेही ध्यानात घ्यावे. त्यामुळे संस्कृतप्रचुर प्रौढ मराठी निषिद्ध मानू नये.

संस्कृतप्रचुर बोजड मराठी :)

तरी इथे वाचणारे सदस्य आणि पाहुणे उच्चशिक्षित अभिजन(एलिट) असतात हेही ध्यानात घ्यावे. त्यामुळे संस्कृतप्रचुर प्रौढ मराठी निषिद्ध मानू नये.

बस काय यनावालाशेठ, अहो इथे काही आमच्यासारखे 'उच्चशिक्षित अभिजन' या व्याख्येत न बसणारेही काहीजण असतात हेही ध्यानात ठेवायला नको का? :) असो..

'संस्कृतप्रचुर प्रौढ मराठी' च्या ऐवजी आपल्याला 'संस्कृतप्रचुर बोजड मराठी' असे तर म्हणायचे नाही ना? :) कारण आम्हाला त्यात बोजडपणाच अधिक दिसतो. अर्थात हे आमचं मत! उच्चशिक्षित अभिजनांची मते वेगळीही असू शकतील आणि त्याचा आम्ही आदरच करतो..

आपला,
(बोलीभाषाप्रचुर मायमराठीवाला!) तात्या.

धन्यवाद!

भाषेचा सखोल अभ्यास असलेल्या यनावाला साहेबांनी
आमचे कौतुक केल्याने आम्हाला गुदगुल्या होत आहेत. :)

त्यामुळे संस्कृतप्रचुर प्रौढ मराठी निषिद्ध मानू नये.

आजिबात निषिद्ध नाही! आपला मुद्दा ग्राह्यच आहे. किंबहुना जितके असे लेखन येथे येईल तितका सदस्यांचा लेखनाचा, भाषेचा व्यासंग वाढेलच. मात्र असे करतांना त्याविषयी लेखनाच्या सुरुवातीलाच जरा ओळख करून देणे (प्रिअँबल?) योग्य राहील, नाही का?

आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

बोजड मराठी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अहो, तात्यासाहेब, सर्वांना समजेल अशी सोपी भाषा लिहावी हे मान्य. पण वर्तमानपत्रांतील लेखन तसेच सर्वसामान्य वाचकांसाठी केलेले पुस्तकी लेखन आणि 'उपक्रमा'वरील लेखन यात भेद असण्यास हरकत नसावी.(इथे 'प्रत्यवाय नसावा' असे लिहिणार होतो. पण तात्या रागावतील म्हणून हरकत शब्द वापरला.) "सोपे लिहा, सोपे लिहा" असा हट्ट धरून बसले तर भाषेचा विकास कसा व्हावा? एवढे चांगले चांगले शब्द आहेत त्यांचा लोकांना परिचय कसा व्हावा?. लांब पल्लेदार वाक्ये वाचून ती समजण्याची क्षमता सर्व सामान्य वाचकात कशी निर्माण व्हावी? "अवघड शब्द वापरला तर त्याचा अर्थ द्यावा" असे समन्वयाचे धोरण श्री. गुंडोपंत सुचवतात ते योग्यच आहे. नाही तर अनेक शब्द केवळ कोशातच पडून रहातील. लेखकांनी ते वाचकांपर्यंत पोचवायला हवेत.
विष्णुशास्त्री चिपळूणकर(मराठी भाषेचे शिवाजी), शि.म. परांजपे इत्यादींनी प्रौढ मराथी लिहिली म्हणूनच माझ्या सारख्याला चार शब्द समजले ना ?

खोडीसदृष पिंक :)

.(इथे 'प्रत्यवाय नसावा' असे लिहिणार होतो. पण तात्या रागावतील म्हणून हरकत शब्द वापरला.)

रागावलो नक्कीच नसतो हो! कारण मला तो शब्दच समजला नसता/नाहीये! :) च्यामारी, भाषा समजली तर रागलोभ धरणार ना? :))

सोपे लिहा, सोपे लिहा" असा हट्ट धरून बसले तर भाषेचा विकास कसा व्हावा? एवढे चांगले चांगले शब्द आहेत त्यांचा लोकांना परिचय कसा व्हावा?. लांब पल्लेदार वाक्ये वाचून ती समजण्याची क्षमता सर्व सामान्य वाचकात कशी निर्माण व्हावी?

हम्म्! आपले वरील मुद्देही खरे आहेत!

असो, क्षमा करा वालावलकरशेठ, मी आपली अशीच खोडीसदृष पिंक टाकली होती! :)

तात्या.

महत्वाची

असो, क्षमा करा वालावलकरशेठ, मी आपली अशीच खोडीसदृष पिंक टाकली होती! :)

वा तात्याबा! हा ही एक महत्वाचाच मुद्दा आहे. चर्चे मध्ये आपले मुद्दे योग्य नसल्यास, आपली माहिती अपुर्ण असल्यास व तशी जाणीव इअतरांनी करून दिल्यानंतर दिलदारपणे माफीही मागता यायला हवीतर्थातच आपण अनेक चर्चांमध्ये पाहतोच की, हे काम सगळ्यांनाच जमते असे नाही.

या चर्चे दरम्यान आपण असे करून एक आदर्शच घालून दिला आहे असे मला वाटते.

आपला
गुंडोपंत
~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

नव-नवीन शब्द हवेतच

नाही तर अनेक शब्द केवळ कोशातच पडून रहातील. लेखकांनी ते वाचकांपर्यंत पोचवायला हवेत.

नव-नवीन शब्द (म्हणजे मुळचे जुनेच, पण काही वेळ नवीन अर्थानेही!) यायला हवेतच. त्यामुळे वापर वाढतो. अगदी खरं सांगायचे तर मी पुर्वी संकेतस्थळ, महाजाल, दुवा हे शब्द या स्थळावर अभिप्रेत असलेल्या अर्थाने कधीच वापरले नाहीत. पन हळूहळू त्याची सवय झाली. आता तर ते वापरलेले दिसले नाहीतर चुकल्यासारखे वाटते. :)

आपल्या प्रतिसादाने आम्ही पुलकीत झालो आहोत :)
आपला
(तसा जरा अडाणीच)
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

मराठी असे आमुची मायबोली


यनावाला साहेब,
तात्यांनी जरी पिंक टाकली असली तरी ते खरेच आहे की सामान्य अभिजनांसाठी आणि सर्वांना समजेल अशी जी भाषा असते तेव्हा ती सर्वांची मायबोली होते.दैनिकातील लेखांचा आणि बातम्यांचा उद्देशही सर्वसामान्यांना ते वाचता यावे हाच उद्देश असतो असे आम्हाला तरी वाटते.सुदैवाने ज्या मुद्यावर अधिक चर्चेस वाव आहे तो मुद्दा म्हणजे सोपे लिहा आणि सोपे बोला असे केल्यानेच भाषेचा विकास होतो.
ज्यांचा आपण उल्लेख केला आहे त्या लेखकांनी भाषेला सोपे पर्याय दिले आहेत मात्र त्यावेळस वापरात येत असलेली भाषा ही विद्वताप्रचूर,अलंकारिक,आणि लांब पल्लेदार अशा स्वरुपाची होती (जी आपण वापरता)ती अभिजनांची भाषा कधीच नव्हती,म्हणून तर अत्रे लोकप्रिय ठरतात,सरसेनापती लोकप्रिय ठरतात कारण ते अभिजनांची भाषा बोलतात असे आमचे मत आहे.

गुंडोपंत आपण एक उत्तम चर्चाप्रस्ताव टाकला आहे ,आम्ही आपले अभिनंदन करतो !

अवांतर :-यनावाला साहेब, आपण जाणकार आहात विद्वान आहात आम्ही आपल्याशी चर्चेला पासंगालाही पूरणार नाही आपणाबद्दल आम्हाला अधिक आदर आहेच,पण त्या लेखकांच्या काळातील भाषा सोप्पी कधीच नव्हती यावर मात्र आम्ही ठाम आहोत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हास्यास्पद

वाद प्रतिवाद कसा?

महाजाल या नवीन माध्यमाचा विचार करता, चर्चा नुसती टाकून भागत नाही. त्यावर येणाऱ्या प्रतिसादांना उत्तरे द्यावीत अशी सदस्यांची अपेक्षा असते. आजही आपण पाहाल तर जे सदस्य इतर सदस्यांना उत्तरे देतात त्यांच्या चर्चा रंगलेल्या दिसतात. इतर चर्चा काही प्रतिसादां नंतर मरतात.

उपरोल्लिखित भाग वगळता ही चर्चा हास्यास्पद वाटते. प्रत्येक लेखकाची लिहिण्याची वेगळी शैली असते. विचार करण्याची स्वतःची वेगळी एक पद्धत असते. भले ती चांगली असो वा वाईट.

उगाच साच्यातल्या गणपतीप्रमाणे सर्वांनी डाव्या बाजूला सोंड ठेवावी असा आग्रह कशाला?

- (उजव्या सोंडेच्या गणेशाचा भक्त) आजानुकर्ण

उजव्या की डाव्या!

उगाच साच्यातल्या गणपतीप्रमाणे सर्वांनी डाव्या बाजूला सोंड ठेवावी असा आग्रह कशाला?
असा आग्रह नाहीये! शैली असणारच... नव्हे ती असावीच!
म्हणणे इतकेच होते की, 'आपल्या वाचक वर्गाला समजेल असे लिहीले' की झाले. लेखकाचे म्हणणे पोहोचावे. मग ते उजव्या की डाव्या सोंडेचे ते त्या त्या भक्तगणावर आहे.
उदा.
'सर्व गणेश भक्तांनी तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा'
च्या ऐवजी
'सब भईजान लोगोंने तिरथ परसाद लेकेच जाने का भला क्या'

असे टाकले तर कसे असेल हा प्रश्न आहे. आपला मुद्दा वाचक वर्ग ओळ्खुन, आपल्या वाचकांपर्यंत त्या त्या भाषा/शैलीत पोहोचवणे महत्वाचे असे वाटते.

आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

चांगला लेख

गुंडोपंतांनी मांडलेले मुद्दे महत्वाचे आहेत. ते मला पटले. आचरणात किती आणू शकेन ते माहीत नाही कारण सवय...

आजही आपण पाहाल तर जे सदस्य इतर सदस्यांना उत्तरे देतात त्यांच्या चर्चा रंगलेल्या दिसतात. इतर चर्चा काही प्रतिसादां नंतर मरतात.

मला हा मुद्दा चर्चेसंदर्भात महत्वाचा वाटतो. अजून एक गोष्ट चर्चेसंदर्भात (आधी चर्चा झाली असली तरी पुन्हा) सांगाविशी वाटते: प्रतिक्रीया य चर्चेसंदर्भात असाव्यातच. त्यात आपण जर काही थट्टा मस्करी करणार असलो तरी ती समोरच्या विशेषतः नवख्यास समजणे शक्य नसते कारण हे हवेतील शब्द नसतात की समोर ते लिहीणार्‍याचा हावभाव दिसतो, तेंव्हा "ह. घ्या." या वाक्याचा अशा वेळेस आवर्जून वापर करावा. चर्चेच्या बाजूचे अथवा विरुद्धचे मुद्दे हे भावनाप्रधान असावेत (थोडक्यात एकमेकांचा शिष्ठाचारासंमत मान ठेवणारे) - भावनाविवश अथवा भावनाशून्य (किंवा भावनामायनसदहा..:)) नसावेत असे वाटते.

याहून जास्त लिहीत नाही, नाहीतर गुंडोपंतांच्या चर्चा सुरू करताना चर्चेच्या रूपातून असलेल्या भावनेचा अवमान केल्यासारखे होईल! (हे वाक्य अंमळ मोठे झाले!) - ह.घ्या.

पण

प्रतिक्रीया य चर्चेसंदर्भात असाव्यातच.
इथेच आपली गोची होते ना!! तडकाफडकी लिहुन मोकळे... मग मागा माफ्या! :)))

बाकी आपले 'भावनाप्रधान' मुद्याचे विवेचन छानच आहे. आवडले त्यात आपण अजून फोड करून लिहिलेत तरी आवडले असते.

याहून जास्त लिहीत नाही,

लिहा हो विकास राव, आपले लिखाण सर्वांनाच आवडते. त्यात माहितीही उत्तम प्रतीची असते.

भावनेचा अवमान केल्यासारखे होईल!

छे छे!! अहो कसला अवमान? असे काही नाही हो! मी इतका सामान्य वकुबाचा, सुमार बुद्धीचा, एक साधी व्यायामशाळा चालवणारा माणूस आहे... आपल्या सारखे विचारवंत, थोर माणसे माझ्या चर्चेला प्रतिसाद देतात यातच माझा बहुमान आहे.

(नि समजा काही चुकले माकले व आपण माझे कान उपटले तरी काही हरकत नाही माझी! :)) )

आपला
सामान्यसा, साधा नि भोळा भाबडा
गुंडोपंत

उत्तम मुद्दे

छान मुद्दे मांडलेत, सर्व पटले सुद्धा! असेच अजून मार्गदर्शन येऊद्या.

एक गोष्ट मला दर वेळेला लिहिताना अडते म्हणजे योग्य मराठी शब्द कुठे सापडतील? मराठी थिसॉरस कुठे उपलब्ध आहे का?

मानवी थिसॉरस

उपक्रमावर इतके मानवीय थिसॉरस उपलब्ध असताना इतरत्र कशाला पाहा. ;-) मी मला शब्द अडला की व्य. नि. किंवा खरड पाठवून कोणाला तरी विचारते. किंवा मोल्जवर्थवर इंग्रजी शब्द टाकून उलटा शोध घेते.

मस्त! 'रिड बाय इन्विटेशन ओन्लि'

उपक्रमासारख्या संकेतस्थळावर एखादा लेख किंवा चर्चा प्रस्ताव टाकताना आधी माझ्या कंपूतीला सदस्यांनाच तो वाचता येऊन सुधारणा करता आल्या,
हे तर खुपच मस्त!
खरं तर अशा सुवीधे मुळे अनेक अभ्यासपूर्ण लेखांचे योग्य ते संपादन होवून चांगले साहित्य वाचकांना मिळेल.
शिवाय अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे निबंध वाचून घ्यायलाही कदाचित व्यासपीठ मिळेल. (मराठीत शोध निबंध लिहितो कोण म्हणा!???)
उत्तम कल्पना. 'रिड बाय इन्विटेशन ओन्लि'

फक्त मला कल्पना नाही की तंत्र दृष्ट्या हे कसे शक्य आहे.

आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

फक्त

उपक्रमासारख्या संकेतस्थळावर एखादा लेख किंवा चर्चा प्रस्ताव टाकताना आधी माझ्या कंपूतीला सदस्यांनाच तो वाचता येऊन सुधारणा करता आल्या,

फक्त त्याप्रकारात नंतर प्रतिक्रीया देणारे कमी होऊ शकतात (जर त्यांनी आधीच सुधारणा सुचवल्या असल्यातर..)

लेखनाचा उद्देश

सर्वप्रथम लेखाचा विषय आवडला. लेखकाने लेखाचा उद्देश ठरवणे हे महत्त्वाचे असते. वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाची शैली आणि विचार करण्याची पद्धत असते परंतु त्याचबरोबर लेख कोठे आणि कोणासाठी लिहिला आहे हे देखील महत्त्वाचे.

उदा.१ : वर यनांनी म्हटल्याप्रमाणे हरकत या शब्दाऐवजी प्रत्यवाय हा शब्द वापरता येईल. दोन्ही शब्द मराठी परंतु पहिल्याचे मूळ अरबी तर दुसर्‍याचे संस्कृत. सर्वसामान्यांना सहज कळेल असा शब्द मला वाटतं हरकत असावा कारण तो अधिक प्रचलीत वाटतो. चू. भू. दे. घे. (अर्थात, कोणी कोणता शब्द वापरावा याबद्दल वाचक म्हणून माझे काही म्हणणे नाही. लेखक म्हणून मी हरकत हाच शब्द वापरेन. जो शब्द वापरला त्यातून अर्थबोध नेमका व्हायला हवा हे महत्त्वाचे.)

उदा. २: उपक्रमाचे उदाहरण घ्यायचे झाले तर उपक्रमावर लेख फक्त केवळ काही मोजक्या सदस्यांसाठी लिहिला तर बाकीच्या सदस्यांना त्यात स्वारस्य असेलच असे नाही. या ठिकाणी, (येथे केवळ लेखकाचा संबंध असल्याने वाचकांवर टिप्पणी करत नाही.) लेखकाला समजायला हवे की, आपण लिहिलेल्या लेखाला तो उत्कृष्ट असेल तरी उचलून धरले जाईल असे नाही. त्या विषयात स्वारस्य असलेल्या लोकांच्या प्रतिसादांत त्याला समाधान मानणे किंवा आनंद मिळवणे प्राप्त आहे. उलटपक्षी, लेखकाला जर अधिक प्रतिसाद यावेत असे वाटत असेल किंवा आपला लेख सर्व सदस्यांना समजावा असे वाटत असेल (जे व्यक्तिश: मला महत्त्वाचे वाटते.) तर सोप्या भाषेत सर्वांना कळेल असे प्रचलीत (मराठी) शब्द वापरून, तो लेख फुलवत नेऊन, सर्वांना आपल्याबरोबर घेऊन नंतर तो किचकट विषय त्यांना समजावता येईल.

बाकी, ज्याला जसे वाटते तसे त्याने लिहावे. वाचकांच्या प्रतिक्रिया वाचून किंवा वाचकांनी लेख अव्हेरला म्हणून लेखनात सुधारणा/ बदल करायचे असतील तर ती जबाबदारी लेखकाची असेल/ असते असे मला वाटते.

हे लेखन लेख म्हणून न टाकता चर्चा म्हणून यावयास हवे होते. (असो. त्याने फार मोठा फरक पडला असे नाही, प्रतिसादात चर्चा केली की चर्चा होते.)

व्यक्तिशः मला मराठी भाषेत विनाकारण संस्कृत शब्द घुसडण्याचा तिटकारा वाटतो.

अगदी पर्फेक्टली माझ्या भावना शब्दबद्ध!

त्याचबरोबर लेख कोठे आणि कोणासाठी लिहिला आहे हे देखील महत्त्वाचे.

वा! हेच मला म्हणायचे आहे!
सर्वसामान्यांना सहज कळेल असा शब्द मला वाटतं हरकत असावा कारण तो अधिक प्रचलीत वाटतो.

मलाही (रोजच्या वापरामुळे?) अरबी हरकतच बरा वाटतो बॉ!

जो शब्द वापरला त्यातून अर्थबोध नेमका व्हायला हवा हे महत्त्वाचे अगदी! हेच तात्याही म्हणाले... 'कळले' तर रागवेन ना! :))

आपण लिहिलेल्या लेखाला तो उत्कृष्ट असेल तरी उचलून धरले जाईल असे नाही.
वा! अतिशय महत्वाचा मुद्दा! काही वेळा उत्कृष्ठ लेखनही अत्यंत मोजके प्रतिसाद आलेले पाहतो. म्हणजे लेख अवडला नाही असे नाही, तर ज्यांना विषयात गती आहे त्या मोजक्यांनी प्रतिसाद दिला, ज्यांना गती नव्हती, त्यांना ओळख मिळाली - आत कदाचित पुढील लेखावर जास्त प्रतिसाद येतीलही अशी आशा ही लेखकाला ठेवता येईल!

लेखकाला जर अधिक प्रतिसाद यावेत असे वाटत असेल किंवा आपला लेख सर्व सदस्यांना समजावा असे वाटत असेल (जे व्यक्तिश: मला महत्त्वाचे वाटते.) तर सोप्या भाषेत सर्वांना कळेल असे प्रचलीत (मराठी) शब्द वापरून, तो लेख फुलवत नेऊन, सर्वांना आपल्याबरोबर घेऊन नंतर तो किचकट विषय त्यांना समजावता येईल.

जियो! !!
अगदी पर्फेक्टली माझ्या भावना शब्दबद्ध केल्या बद्दल आभार अभिनंदन!
अहो, पण काय अवघड असते हे काम! असो, पण असे करायला मजा येते हे नक्की!

मला वाटते कधी कधी लेखकाने आपल्या आनंदासाठी ही लिहावे, कुणी वाचो न वाचो! कुणी समजो न समजो! त्यात एक्प्रकारचे स्वातंत्र्यही आहे.(पण मग प्रतिसादच न येण्याचा धोकाही घ्यायची तयारी हवी! ;) )
अर्थात हे म्हणणे कदाचित 'या स्थळावर' (काहीसे) गैर-लागू ही असु शकेल, कारण लेखनाचा उद्देश माहिती देणे असा आहे. तशी माहिती देण्यात आनंद असेल तर गोष्ट निराळी!

हे लेखन लेख म्हणून न टाकता चर्चा म्हणून यावयास हवे होते.

खरंय हो! वर म्हंटल्या प्रमाणे असा धांदरटपणा न करेल तो गुंडोपंत कसला?
आता पुढील वेळी असे करेन!

आपले सविस्तर प्रतिसाद आल्याने मुद्दे कळले त्यावर वाद, प्रतिवाद, प्रतिसाद, साद देणे सोपे गेले असे वाटले!

आपला
गुंडोपंत

मोल्ज़वर्थ म्हणतो

लहानपणी एक खेळ असे शिवाजी म्हणतो...

त्या धर्तीवर

मोल्ज़वर्थ म्हणतो -> हरकत.

संदर्भ?

सायमन् सेज् ह्या खेळातला सायमन् कोण होता? संदर्भ कळला नाही. मला तर् इतिहासातला भारताला केवळ लिमिटेड माणुसकी दाखवणारा "सायमन् परत जा" मधलाच सायमन् माहित आहे...

मोल्ज़वर्थ म्हणतो

मोल्ज़वर्थ म्हणतो की: हरकत या अरबी शब्दाचा खरा अर्थ -गति, चाल, हालचाल,; क्रिया, प्रयत्‍न; दुष्ट वागणूक; खट्याळपणा.
'हरकत' हा शब्द आपण जसा समजतो आणि ज्या हेतूने वापरतो ते अर्थ --आक्षेप; विरोध; मनाई. आता ठरवा. प्रत्यवाय अधिक योग्य की हरकत?--वाचक्‍नवी

पण प्रत्यवाय

चा अर्थ मोल्ज़वर्थ असा दाखवतो. हरकत घेणे म्हणजे विरोध करणे - अपोझ करणे हा शब्दच योग्य वाटतो.

मान्य!

प्रत्यवाय नाही याचा अर्थ हरकत नाही. पण 'प्रत्यवाय आहे' म्हणजे 'हरकत आहे ' असे नाही. प्रत्यवाय चा होकारार्थी अर्थ पापयुक्त वगैरे. त्यामुळे हरकत हाच शब्द योग्य, केवळ अरबी आहे म्हणून त्याला विरोध नको आणि त्याच्या ऐवजी दर वेळी प्रत्यवाय चालेलच असे नाही.
मोल्ज़वर्थ खरे बोलतो.--वाचक्‍नवी.

तंत्र विषयक

नवीन टेक्नॉलॉजीविषयी लिखाण करतांना मराठी शब्द किती आणी कसे वापरायचे यासाठी तारेवरची कसरत करावी लागली आहे.
संस्कृत शब्द दरच वेळी वापरता येतात असेही नाही. जुने शब्द समजत नाहीत. अशावेळी अनेकदा मिंग्लीश वापरणेच योग्य राहीले आहे असे वाटते.

डातासाठी विदा हा शब्द मनोगत या स्थळावर वापरलेला पाहिला आहे. पण तो खरच किती लोकांना कळेल हा प्रश्नच आहे?
असो.

-निनाद

लेखन करताना

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
लेखन करताना त्याचा वाचकवर्ग कोण याचे भान ठेवावे,त्यांना समजेल असेच लिहावे, हे खरे.पण वाचकांचे अवमूल्यमापन करू नये. त्यांना कमी लेखू नये.अपरिचित असे नवनवीन शब्द जाणून घेऊन त्यांचा योग्य वापर करण्याची क्षमता सामान्य वाचकांतही असते.पूर्वी प्रचलित नसलेले : निविदा, समुपदेशक, टंकलिपिक, एकात्मिक(इंटिग्रल), सिंचनक्षेत्र, प्रकल्पग्रस्त,
अभिकर्ता (एजंट), स्वयंचलित, निगम (कार्पोरेशन) , जैववैविध्य
असे कितीतरी शब्द आता वाचकांच्या अंगवळणी पडले आहेत.नवीन शब्द वाचनात आले तर रूढ होतात.म्हणून लेखकांनी जाणीवपूर्वक नवननीन शब्द योजावे.त्यांचा अर्थ संदर्भाने समजतो. आवश्यक वाटल्यास अर्थ द्यावा.पण वाचकांना शब्द समजणारच नाही अशा समजुतीने तो वापरायचा टाळू नये.
मात्र वक्यरचना आकलन सुलभ (समजण्यास सोपी) असावी.
संस्कृत प्रचुर प्रौढ मराठी उपक्रमाच्या वाचकांसाठी चालण्यासारखी असली तरी वृत्तपत्रीय लेखनासाठी न वापरणेच योग्य.

लेखन:एक नमुना चिपळूणकरशैलीचा !

"वाक्यरचना सरळ असावी,अर्थ चांगला खुलासेवार मजेदार रीतीने लिहिला असावा- असा की तो सहज मनात भरुन वाचण्याची सारखी हौसच वाटत जावी-आणि एकंदर लिहिण्यात आवेश किंवा झोकदारपणा असावा" - विष्णुशास्त्री चिपळूणकर( आधुनिक मराठी वाडःमयाचा इतिहास भाग पहिला- अ. ना. देशपांडे पृ.क्र.४५)

चिपळूणकर लेखनशैली.

"कोणत्याही प्रतिपक्ष्यास आम्ही आजपर्यंत विमुख झालो नाही....सध्या चालू असणा-या विषयावर आजपर्यंत जे चोहोकडे सामसूम होते तो प्रकार मोडून या खेपेस प्रतिपक्ष्यास उत्तरे देण्याचा प्रसंग आला आहे या गोष्टीचा आम्हास संतोष वाटतो.त्यातून आमच्या मित्रांच्या आक्षेपांचे निरसन करणे तर विशेषच उत्साहप्रद होय.यातील मजकूराच्या तर्फेनेही विनंती करणे अवश्य वाटते ती इतकीच की,तो कोणाच्या द्बेषबूध्दीने आम्ही कधीही लिहिणार नाही जर त्यात कोणास काही गैर दिसून आम्हांस कळविण्यात येईल तर आमची चुकी आम्ही मोठ्या संतोषाने पदरात घेऊ.तसेच त्यात जे जे काही अंहकारोक्तीसारखे कोणास दिसेल त्यात सत्यनिरुपणाखेरीज दुसरा उद्देश कधीही असणार नाही हेही आम्ही एकवार खात्रीने सांगून ठेवतो "

सारांशः- लेखणात साधेपणा असावा नवनवीन शब्द असावेत मात्र तेही वाक्याच्या अनुषंगाने अभिजनांसाठी समजणारे असावेत !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सार

"कोणत्याही प्रतिपक्ष्यास आम्ही आजपर्यंत विमुख झालो नाही....सध्या चालू असणा-या विषयावर आजपर्यंत जे चोहोकडे सामसूम होते तो प्रकार मोडून या खेपेस प्रतिपक्ष्यास उत्तरे देण्याचा प्रसंग आला आहे या गोष्टीचा आम्हास संतोष वाटतो.त्यातून आमच्या मित्रांच्या आक्षेपांचे निरसन करणे तर विशेषच उत्साहप्रद होय.यातील मजकूराच्या तर्फेनेही विनंती करणे अवश्य वाटते ती इतकीच की,तो कोणाच्या द्बेषबूध्दीने आम्ही कधीही लिहिणार नाही जर त्यात कोणास काही गैर दिसून आम्हांस कळविण्यात येईल तर आमची चुकी आम्ही मोठ्या संतोषाने पदरात घेऊ.तसेच त्यात जे जे काही अंहकारोक्तीसारखे कोणास दिसेल त्यात सत्यनिरुपणाखेरीज दुसरा उद्देश कधीही असणार नाही हेही आम्ही एकवार खात्रीने सांगून ठेवतो "

अरेरे! मराठी माध्यमातील विद्यार्थ्याला डोक्यावरून गेले हो! इंग्रजी माध्यमांत शिकणार्‍यांचे काय? भाषा कालानुपरत्वे नाही नाही, काळानुसार बदललीच पाहिजे... नाहीतर तिची संस्कृत होते.

- राजीव.

ता. क. सर, द्बेषबूध्दीने - इतकीही भाषा बदलू देऊ नका हो. तुमचे प्रतिसाद आवडतात पण थोडंसं लक्ष शुद्धलेखनावर..... पळतो नाहीतर पुन्हा सगळे काठ्या उगारायचे.

- राजीव.

चिपळूणकरलेखनशैली

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रा.( डॉ). दिलीप बिरुटे यांवे परिसाद अभ्यासपूर्ण असतात. ते परिश्रमपूर्वक योग्य संदर्भ शोधतात. चिपळूणकर यांच्या संस्कृत प्रचुर प्रौढ मराठी विषयी जे मी लिहिले त्याला निरुत्तर करणारा संदर्भ त्यांनी दिला आहे. त्यांचा मराठी भाषेचा व्यासंग प्रशंसनीय आहे.

धन्यवाद ! यना...

प्रा.( डॉ). दिलीप बिरुटे यांवे परिसाद अभ्यासपूर्ण असतात. ते परिश्रमपूर्वक योग्य संदर्भ शोधतात. चिपळूणकर यांच्या संस्कृत प्रचुर प्रौढ मराठी विषयी जे मी लिहिले त्याला निरुत्तर करणारा संदर्भ त्यांनी दिला आहे. त्यांचा मराठी भाषेचा व्यासंग प्रशंसनीय आहे.

यनावाला साहेब,
कौतुकाबद्दल आभारी. :)

अवांतरः) शुद्धलेखनातील चुका व्य. नि. पाठवाव्यात असे म्हटल्यापासून व्य.नि.चा ओघ वाढला आहे. त्यात फक्त 'वाचक्नवी 'यांचे शुद्धलेखनविषयक विचार योग्य वाटतात. पण इतके शुद्ध उपक्रमावर कोणी लिहीत नाही असे वाटते. इतर एका निरोपात शुद्धलेखनविषयक विचारात एका उपक्रमीने म्हटले आहे, आपण जो अक्षराला निळा रंग देता तो चूक आहे. :))))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हसून हसून पुरेवाट

आपल्याला चूक वाटत आहे तो उतारा माझा नाही. तो आहे मराठी भाषेचा शिवाजी यांचा म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा, तोही आम्ही एका पुस्तकातून उचलला आहे.'मोरोपंतांच्या कविते'च्या निमित्ताने त्यांचा जो नागपूरकर ओकांशी वादप्रसंग झाला होता त्याला उद्देशून त्यांनी लिहिले "कोणत्याही प्रतिपक्ष्यास आम्ही आजपर्यंत विमुख झालो नाही....सध्या चालू असणा-या विषयावर आजपर्यंत जे चोहोकडे सामसूम होते तो प्रकार मोडून या खेपेस प्रतिपक्ष्यास उत्तरे देण्याचा प्रसंग आला आहे या गोष्टीचा आम्हास संतोष वाटतो.त्यातून आमच्या मित्रांच्या आक्षेपांचे निरसन करणे तर विशेषच उत्साहप्रद होय''. आणि दुसरे 'निबंधमालेच्या' पहिल्या अंकाच्या अखेरीलाच त्यांनी आपली सत्यनिरुपणाची भूमिका स्पष्ट मांडली त्यांनी लिहिले ''यातील मजकूराच्या तर्फेनेही विनंती करणे अवश्य वाटते ती इतकीच की,तो कोणाच्या द्बेषबूध्दीने आम्ही कधीही लिहिणार नाही जर त्यात कोणास काही गैर दिसून आम्हांस कळविण्यात येईल तर आमची चुकी आम्ही मोठ्या संतोषाने पदरात घेऊ.तसेच त्यात जे जे काही अंहकारोक्तीसारखे कोणास दिसेल त्यात सत्यनिरुपणाखेरीज दुसरा उद्देश कधीही असणार नाही हेही आम्ही एकवार खात्रीने सांगून ठेवतो ''

ही दोन वेगवेगळी वाक्य आम्ही एकत्र करून चिपळूणकरांची लेखनशैली कशी होती ते दाखवण्याचा प्रयत्न केला.अर्थात योगायोगाने त्यांची दोन्हीही मते सदरील चर्चेस पूरक ठरली आणि नेमके आपले आगमन झाले आणि आपण---

अरेरे! मराठी माध्यमातील विद्यार्थ्याला डोक्यावरून गेले हो! इंग्रजी माध्यमांत शिकणार्‍यांचे काय? भाषा कालानुपरत्वे नाही नाही, काळानुसार बदललीच पाहिजे... नाहीतर तिची संस्कृत होते.

- राजीव.

ता. क. सर, द्बेषबूध्दीने - इतकीही भाषा बदलू देऊ नका हो. तुमचे प्रतिसाद आवडतात पण थोडंसं लक्ष शुद्धलेखनावर..... पळतो नाहीतर पुन्हा सगळे काठ्या उगारायचे.

हा प्रतिसाद दिला खरे तर त्या काळात म्हणजे १८७४ ला त्यांची ही भाषा सोपी होती.त्यापूर्वीची कशी होती त्याच्यावर आता चर्चा करत नाही. बाकी त्यांच्या शुद्धलेखनाचे म्हणाल तर आम्ही जेव्हा केव्हा स्वर्गात जाऊ आणि विष्णुशास्त्री चिपळूणकरांची जर भेट झाली तर आपला शुद्धलेखनाचा निरोप त्यांना नक्की देईन.:)))))))))))

अवांतर :) तरीही आमच्या लेखनात चूक आहेच "लेखणात"यातील 'णा'च्या ऐवजी नारळाचे 'ना'पाहिजे पण आपण इतकी सूक्ष्म चूक पाहणार असाल तर आमच्याकडून संकेतस्थळावर लेखनच होऊ शकणार नाही :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय बोलू यावर? मी ही हसतो.

अहो मा.सर,

मला कळलं हो कोणाची कोणती वाक्ये ते. मी "द्वेषबूध्दी" या शब्दाबद्दल म्हणत होतो.

तुम्ही हा चुकीचा शब्द विष्णूशास्त्रींना लावत असाल तर स्वर्गात त्यांना भेटू नका. धोपटून काढायचे.

द्वेषबूध्दी हा शब्द द्वेषबुद्धी असा लिहावा.

- राजीव.

फिट्टमफाट :)

विष्णुशास्त्रींना हेही सांगेन उपक्रमावर आमच्या शुद्धलेखनाची काळजी घेणा-या आमच्या मा.राजीव साहेबांनी
विष्णूशास्त्री हा शब्द विष्णुशास्त्री असा लिहावा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सही!

वा,
आमचा राजू म्हणजे अगदे चुणचुणीत मुलगा,
सरांच्या चुका काढायलाही मागे नाही!

पण आमचे बिरुटे सर काही असे तसे नाहीत.
शेवटी 'सर' आहेत ते! रोजचे पाच पन्नस असली पोरे कोळून पितात!

दिसली की नाही चुणुक!

आपला
गुंडोपंत

अर्थावाही आणि नेटके

नमस्कार,
आपण जो लेख लिहिलात त्यातील मते आम्हांस पटली.
चर्चा विषय हा नेटकाच असावा.

आमचा सुद्धा यापुढे लेखन करताना ते सर्व जनांस सहज आकळेल आणि त्यात रसनिष्पत्ती होवून वाचकांस त्याचा आस्वाद घेता येईल असा प्रयत्न राहील. (पण आम्ही लिहितोच इतके कमी की हे सर्व कधी साधणार हा एक प्रश्नच आहे. :)

परंतू या समयी हे सुद्धा नमूद करावेसे वाटते की यनावाला म्हणतात त्याबरहुकूम (घतला की नाही बिगर संस्कृत शब्द !) काही नवे शब्द, जूने जड अप्रचलित शब्द, लांब पल्लेदार वाक्ये सुद्धा लेखकाने लिहूनच वाचकाच्या अंगवळणी पडतात असे आम्हांस वाटते.
--(तेवढाच ज्ञानप्रकाशात) लिखाळ.

मला फ्लोरिष्टाच्या शॉपामधल्या मुलिगत होयाचे हे ! (ती फुलराणी-पुल)

आवश्यक कि पुरेसे

'गर्भवती महाराणी गंगादेवी प्रसूत होऊन त्यांना कन्यारत्न झाले' विरुद्ध 'गरोदर गंगी बाळंत होऊन तिला मुलगी झाली'.

गरोदर किंवा गर्भवती या गृहितकाशिवाय पुढिल प्रक्रिया अशक्य मग ती गंगी असो कि महाराणी. पण गंगी मात्र गरोदर आणि महाराणी मात्र गर्भवती काय? हा अर्थ ध्वनित करण्यासाठी गृहितकाची मांडणी आवडली.म्हणजे पुढिल गाभण व व्याली ही प्रक्रिया समजावून घेणे अधिक सोयिस्कर.
आता 'बाई' या एकाच शब्दाचे सामाजिक चालीरिती व संदर्भानुसार अर्थ बदलतात. सांस्कृतिक संघर्ष देखिल होउ शकतो.
प्रकाश घाटपांडे

वाखाणण्याजोगी

टग्याराव,
आपली भाषेची जाण ही वाखाणण्याजोगी आहे यात शंका नाही.
आपण छानच मुद्दे मांडले आहेत.
कालवडीचा मुद्दा योग्यच आहे. भाषा किती वाकु शकेल याला मर्यादा नक्कीच आहे.

आता ५० प्रतिसाद झाल्याने पुढील भाग २ सुरु करीत आहे. कृपया पुढे चर्चा त्या भागावर आणावी ही विनंती.

आपला
गुंडोपंत

आमच्या मनातले बोललांत!

प्रा.( डॉ). दिलीप बिरुटे यांवे परिसाद अभ्यासपूर्ण असतात. ते परिश्रमपूर्वक योग्य संदर्भ शोधतात. चिपळूणकर यांच्या संस्कृत प्रचुर प्रौढ मराठी विषयी जे मी लिहिले त्याला निरुत्तर करणारा संदर्भ त्यांनी दिला आहे. त्यांचा मराठी भाषेचा व्यासंग प्रशंसनीय आहे.-यनावाला
श्री. यनावालांनी अगदी आमच्या मनातले विचार व्यक्त केले.--वाचक्‍नवी

 
^ वर