भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 2/3)


इलेक्ट्रिक गो-सायकल


सायकलीच्या इतिहासाची पाने उलटल्यास 1818 ते 1885 पर्यंतच्या काळात सायकली टप्प्या- टप्प्याने विकसित होत गेल्या व आधुनिक म्हणवून घेणारी रोव्हर सायकल1885 साली बाजारात आली व हे मॉडेल पुढील शंभरेक वर्षे टिकून होती. गेल्या 20 -30 वर्षात computer aided model, कमी वजनाच्या परंतु दणकट अशा धातू - अधातू वापरून सायकलींचे उत्पादन झाले.स्टीअरिंग, ब्रेक्स, ट्यूब - टायर्समध्ये भरपूर सुधारणा झाल्या. शॉक अब्सॉर्बर्स बसवण्यात आल्या. वेग नियंत्रण व संवेग यांचा ताळमेळ राखण्यासाठी सायकलींच्या मूळ फ्रेममध्ये सूक्त बदल करण्यात आले. शारीरिक श्रम कमी करणाऱ्या गीअर्ड सायकली आल्या. कारमध्ये मावणाऱ्या फोल्डेबल सायकली आल्या. व याचाच पुढचा टप्पा म्हणजे शारीरिक श्रमाऐवजी इलेक्ट्रिक मोटरचा वापर करणाऱ्या मोटाराइज्ड - इ - सायकली आल्या (व येत आहेत).

मुळात मोटराइज्ड सायकलीसाठीचे पहिले पेटंट 1895 साली घेण्यात आले होते. 1897च्या अजून एका पेटंटमध्ये दोन मोटर्स वापरण्याचा प्रस्ताव होता. पुढील 100 वर्षानंतर याच पेटंटचा वापर करून 1990 साली काही इ - सायकलींचे उत्पादन करण्यात आले. 30 - 40 वर्षापूर्वी पुण्यातसुद्धा काही उत्साही उद्योजकांनी मोटराइज्ड सायकलींचे प्रयोग करून स्कूटरला पर्याय देण्याचा प्रयत्न केलेले काहींना आठवतही असेल. परंतु त्यात डिजाइनचा मागमूसही नव्हता. वापरण्यास त्रासदायक, खर्चिक व देखभालीसाठी किचकट असलेल्या या 'गरीबांच्या बाइक्स' कुठे धूळ खात पडल्या हे कळलेच नाही.

खरे पाहता सायकलीचा वापर मुख्यत्वेकरून कमी अंतरावर असलेल्या कामाच्या ठिकाणी ये - जा करण्यासाठी होतो. यात थोडा फार शारीरिक श्रम व थोडासा वेळ गेला तरी चालण्यासारखा असतो. परंतु प्रचंड शक्तीचे बाइक्स व स्कूटर्स रस्त्यावर पळू लागल्यामुळे सायकलींचा वापर हळू हळू कमी होऊ लागला. आता सायकली फक्त हौस म्हणून, छंद जोपासण्यासाठी गंमत म्हणून, व्यायामासाठी म्हणून 15 -20 वर्षांच्या मुलामुलींच्या हातात दिसतात. कार्स व बाइक्स-स्कूटर्समुळे शहरातील बहुतेक रस्ते त्यांच्या हवाली केल्यासारख्या झाल्या आहेत. सायकलस्वाराच्या सुरक्षिततेची कुठल्याही प्रकारची खात्री नाही. ऊर्जाबचत वा प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नात आहोत याचा तोंडदाखल्या देखाव्यासाठी काही थातुर मातुर उपाय म्हणून काही शहरात सायकलीसाठी स्वतंत्र ट्रॅक्स आहेत. परंतु त्याचा वापर बहुतेक ठिकाणी पार्किंगच्या सोयीसाठी होत असते. प्रशासनाला खरोखरच यासाठी काही करायचे असल्यास BRTS साठी ठेवल्याप्रमाणे मुख्य रस्त्याचा काही भाग सायकलीसाठी राखीव ठेवायला हवे. परंतु कार व बाइक्स कंपन्यांचे हित जपणारे प्रशासन अशा सूचनांना केराची टोपली दाखवेल.

इ(लेक्ट्रिक)सायकलीसाठींची सर्वात मोठी अडचण ऊर्जा पुरविणाऱ्या बॅटरीची आहे. बघता बघता बॅटरी ड्रेन होत असल्यामुळे पॅडल मारत सायकल हाकण्याचा प्रसंग सायकलस्वारावर येतो. सायकलीच्या पुढच्या चाकाच्या हबवर मोटर बसवल्यास पुढच्या चाकाचे वजन वाढते. पंक्चर काढताना अडचणी येतात. गीअर्स बसवल्यास चाक जोडताना/काढताना भरपूर वेळ जातो. काही वेळा मोटराइज्ड सायकलीसाठी पुढील चाकाचा व्यास मोठा ठेवावा लागतो. डिस्क ब्रेक मोटर हबवर बसत नाहीत. अशा प्रकारे इ - सायकलीच्या अडचणीचा पाढा आणखी वाढवता येईल. म्हणूनच स्कूटरमधील स्टेपनीच्या चाकासारखे याचेही अजून एक चाक सांभाळावे की काय असा प्रश्न उभा राहतो.

तरीसुद्धा मोटराइज्ड सायकलींचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या जगभर पसरल्या आहेत. यासंबंधात गो-सायकलीने केलेली प्रगती आश्चर्यकारक ठरेल. रिचर्ड थॉर्प या रेस कार्सच्या डिझायनरने 2004 साली फोल्डेबल सायकलीचे पेटंट घेतले व 2007 साली इ-सायकलीचे पेटंट घेऊन उत्पादन सुरू केले. गो-सायकलने इ-सायकलीच्या बहुतेक उणीवावर मात केली आहे असा उत्पादकांचा दावा आहे. पूर्ण चार्ज केलेली बॅटरी 25 कि.मी अंतरासाठी पुरेसे ठरते. बॅटरी 3 तास रिचार्जविना चालू शकते. रिचार्जसाठी कमी ऊर्जा लागते. (100 वॅटचा बल्ब 2 तास वापरल्यास लागणाऱ्या ऊर्जेइतकी) सायकल ताशी 20 कि.मी वेगाने पळू शकते. सायकलीची घडी करता येत असल्यामुळे कार्सच्या डिकीत ठेवता येते. सायकलीचा सांगाडा मॅग्नेशियम अ‍ॅलाय वापरल्यामुळे वजन हलके झाले आहे . (फक्त 16 किलो) पुढच्या चाकासाठी single leg front fork वापरल्यामुळे जोडणीस वेळ कमी लागतो. सायकलीचे हॅंडल, कारमधील डॅशबोर्डसारखे वेग, गीअर्सची स्थिती, बॅटरीतील ऊर्जा इत्यादी सर्व माहिती देते. इलेक्ट्रॉनिक्स वापरून एका क्लिकने गीअर बदलता येते.

श्रीमंत राष्ट्रातच याची किंमत न परवडण्याइतकी असल्यामुळे आपल्या देशात ही सायकल यायला बराच काळ लागेल.

अधिक माहितीसाठी


हीलीज शूज


मनोवैज्ञानिक, रॉजर अ‍ॅडम्स मिड् लाइफ क्रायसिसच्या फेऱ्यातून जात होता. कंटाळा घालवण्यासाठी एका प्रेक्षणीय ठिकाणी वेळ घालवत असताना समोरच्या मैदानातील मनसोक्तपणे स्केटिंग करत असलेल्या मुला-मुलींनी त्याचे लक्ष वेधले. त्याला बालपणीची आठवण झाली. आता आपण स्केटिंग करू शकत नाही याबद्दलही वाईट वाटू लागले. परंतु मुळातच त्याला गॅजेटशी दंगामस्ती करण्यात रस असल्यामुळे स्वत:च्याच स्पोर्टस् शूजचा तळवा उघडून स्केटिंगची चाकं बसविण्याचा प्रयत्न करू लागला. एक लांब तार घेऊन त्याच्यात रोलर बेअरिंग्ससकट चाक बसवण्यासाठी खालच्या सोलमध्ये आरपार भोक करून कसेबसे त्यानी चाक बसवले. भरपूर झटापटीनंतर (व 15 -20 शूज खराब केल्यानंतर )स्केटिंग करू शकणाऱ्या स्पोर्टस् शूजचे प्रोटोटाइप बनवण्यात त्याला यश मिळाले.

संकल्पना कितीही चांगली असली तरी माल बाजारात आणण्यासाठी भांडवलीला पर्याय नाही. त्यामुळे त्यानी ही संकल्पना पुढे नेण्यासाठी तेवढा उत्साह दाखवला नाही. फक्त प्रोटोटाइपच्या चाचणीची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवली होती व गंमत म्हणून मित्रमंडळीत ते दाखवत होता व त्याचे पेटंटही त्यानी घेऊन ठेवले. मार्च 2000 साली पॅट्रिक हॅमर या व्हेंचर कॅपिटॅलिस्टच्या मुलाने हा व्हिडिओ पाहून वडिलांना त्याची हकीकत सांगितली. हॅमरला या उत्पादनात फायदा दिसू लागला. हॅमरने रॉजर अ‍ॅडम्सच्या पेटंट अ‍ॅटॉर्नीला भेटून 25 लाख डॉलर्स गुंतवण्याची तयारी दाखवली. बाजारात उत्पादन कसे आणायचे, कधी आणायचे, कुठल्या वयाला टार्गेट करायचे इत्यादी गोष्टींचे नियोजन करून 2001 साली स्पोर्टस् साधनांच्या एका प्रदर्शनात हीलीज शूज लाँच करण्यात आल्या व बघता बघता या शूजला चांगला प्रतिसाद मिळाला व ऑर्डर्स मिळू लागल्या.

दक्षिण कोरियात प्रत्यक्ष उत्पादन होत असलेल्या हीलीज शूजनी बाजारात चांगला जम बसवला आहे. शूजच्या तळव्याचा मागील भागात बेअरिंगसकट एक वा दोन चाकं बसवण्याची सोय यात आहे. या शूज स्केटिंग म्हणून वापरताना शरीराचे वजन मागे घेऊन बॅलन्स करत पुढे जावे लागते. स्केटिग नको असल्यास नॉर्मल शूज म्हणूनही याचा वापर होऊ शकतो. उत्पादकांचे लक्ष्य 8 ते 14 वर्षाच्या मुलं - मुली होत्या. व हे शूज त्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

स्केटिंग हे मुळातच स्नो सर्फिंग सारखे साहसी खेळ आहे, हे मान्य करायला हवे. तोल संभाळून वेगाने पळणे हे येरा गबाळाचे काम नव्हे. भरपूर प्रॅक्टीस हवी. मार्गदर्शन हवे. उत्पादकांनी त्यांच्या सुरक्षिततेबद्दल कितीही दावे केलेले असले तरी हे शूज वापरणाऱ्यात अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. व या अपघातातून बरे होण्यासाठी अस्थितज्ञांची गरज भासत आहे. सुरक्षिततेसाठी हेल्मेटसारख्या उपायाविना शूज वापरणे धोक्याचे ठरेल. म्हणूनच 'जरा जपूनच' असे यासंबंधी म्हणावे लागेल.

अधिक माहितीसाठी

Comments

बॅट्री

बॆट्रीच्या तंत्रज्ञानात काही सकारात्मक बदल झाले तर ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती होईल.अधिक माहिती त्या क्षेत्रातील तज्ञच सांगु शकतील.

हा पण भाग छान...

सायकलस्वाराच्या सुरक्षिततेची कुठल्याही प्रकारची खात्री नाही. ऊर्जाबचत वा प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नात आहोत याचा तोंडदाखल्या देखाव्यासाठी काही थातुर मातुर उपाय म्हणून काही शहरात सायकलीसाठी स्वतंत्र ट्रॅक्स आहेत. परंतु त्याचा वापर बहुतेक ठिकाणी पार्किंगच्या सोयीसाठी होत असते.

अजुन एक कारण म्हणजे चोरी. बंगळुरूमध्ये माझ्या सहकार्‍याने दहा हजार दमड्या मोजून एक चांगली हलक्या अलॉयची सायकल घेतली होती. ती दुसर्‍याच दिवशी दहा मिनिटे एका दुकानासमोर उभी केल्यावर चोरीला गेली.

पण इ-सायकलींना पुढील वर्षात पाशात्य देशांत बरंच 'मार्केट' आहे.

ही सायकल चालवायला मजा येते. पॅडल (मराठीत पायडल) वर दाब मोजण्याचे सेंसर्स लावलेले असतात. तुम्ही जेव्हडा जास्त दाब द्याल तेव्हडी जास्त पॉवर बॅटरीतून दिली जाते.

सायकलीसाठी स्वतंत्र ट्रॅक्स

आपल्याकडे सायकलीसाठी स्वतंत्र ट्रॅक्स हा निव्वळ मुर्खपणा आहे. लंडन मध्ये सायकलीसाठी स्वतंत्र ट्रॅक्स बघितले. तिथे आपल्या तुलनेने मोजून हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोक सायकलने जाताना दिसतात. आपल्यासारखे झुंडक्याने लोक चक्क मुख्य रस्त्यावरूनच जातात. त्यामुळे हे आपल्याकडे जरा कठीणच आहे. जागोजागी सायकल लॉकने लावायला लोखंडी खांब किंवा स्वतंत्र सायकल पार्किंग असते. आपल्याकडे हे सगळे म्हणजे चोचले वाटतील.

पहिल्या भागातील बरेच काही "खटकले"

उत्तम लेखमाला, पण पहिल्या भागातील बरेच काही "खटकले", विशेषत: तुमच्या कडून आले म्हणून. (i. e. तुमच्या कडून हे अपेक्षीत नव्हते).

कार्पोरेट्सचा अधाशीपणा, नफेखोरी व आक्रमक मार्केटिंग . . . . . नफा घेणे हे तर कार्पोरेट् क्षेत्राचे raison de etre (reason for existence) आहे. नफा घ्यायचा ज्यांचा उद्देश नसतो ते companies act ऐवजी charitable trust किंवा society act मध्ये registration करतात. हे संकेत स्थळ वाचणार्या पैकि कोणी अपवादच असेल (किंवा अपवाद पण नसेल) जो mutual फंड/ बँक FD यात पैसे गुंतवत नसेल. बरेच जण तर थेट शेयर बाजारात पण पैसे गुंतवत असतील. लहान गुंतवणूकदाराला जो नफा मिळतो तो त्याने MF / FD मध्ये गुंतवलेले पैसे कार्पोरेट् क्षेत्रात गुंतवून त्यावर मिळालेल्या नफ्यातून असतो. तेंव्हा, आपण पैसे गुंतवताना मात्र जास्तीत जास्त परतावा मिळेल असा शेयर/ MF / FD हुडकायचा व इतर वेळी कार्पोरेट्सचा अधाशीपणा, नफेखोरी या वर टीका करायची हे बरोबर नव्हे.

या वर असे म्हणता येईल कि नफा घेणे वाईट नाही पण नफेखोरी वाईट. या वरकरणी सुंदर दिसणार्या वाक्यात problem असा आहे कि योग्य नफा व नफेखोरी यातली सीमारेषा कशी ठरवायची? पण ती जेंव्हा कोणी ठरवेल तेंव्हा बघू. सध्या तरी अधाशीपणा, नफेखोरी, हे परिभाषा नसलेले, म्हणून अर्थहीन शब्द आहेत.

श्रीमंत देशानी कंटाळा येऊन फेकून दिलेल्या वस्तू आपल्याकडे येतात" असे काही प्रॉडक्ट्सच्या-बाबतीत म्हणावेसे वाटते. For Example ? बाजारात आलेली प्रत्येक नवीन वस्तू जास्त कार्यक्षम असतेच असे नव्हे. खरोखरीची quantum jump in technology क्वचितच होत असते. अनेकदा केवळ बाजारपेठ कह्यात ठेवण्या करता superficial बदल केलेले असतात. याची उत्तम उदाहरणे म्हणजे अमेरिकेत दर वर्षी कार ची नवीन मोडेल्स, किंवा XP नंतर Windows 7.

शिवाय मनुष्यबळ मुबलक प्रमाणात व स्वस्त . . . . . मनुष्यबळ मुबलक प्रमाणात आहे म्हणून स्वस्त आहे. आणी ते आपण वापरतो म्हणून कोट्यावधी लोकांना रोजगार मिळतो व असमानता जरा कमी होते, वगैरे. डिश वाशिंग मशीन आपल्या देशात येऊ नाही हेच चांगले. स्वस्त, टिकाउ वगैरे डिश वाशिंग मशीन आपल्याकडे आले, तर त्याने जितके "रामागडी" बेरोजगार होतील त्याचा समाजावर काय परिणाम होईल?

आणि त्यांना गुलामासारखे रात्रंदिवस राबविण्याची कसबही . . . . .
हे कोणा बद्दल आहे ते कळले नाही. organized sector मध्ये तर कोणाला गुलामासारखे राबविण्याचा प्रश्नच येत नाही, पण unorganized sector मध्ये पण आता तसे फार कमी होते. घरी काम करणारे असोत किंवा शेत कामगार असोत, सगळे त्यांच्या skill व responsibility च्या तुलनेत भरपूर पैसे घेतात.

चेतन पन्डित

अनएथिकल वर्तन

कार्पोरेट्सचा अधाशीपणा, नफेखोरी व आक्रमक मार्केटिंग . . . . .

कार्पोरेट्सच्या अनएथिकल वर्तनावर भरपूर मटिरिअल नेटवर नक्कीच सापडेल. याचा अर्थ, सर्व कार्पोरेट्स असेच वागतात, असे नाही. शेरहोल्डर्स व स्टेकहोल्डर्सचा अंकुश असल्यास नफेखोरीवर व अनैतिक बिजिनेस प्रॅक्टीसवर बंधनं घालता येते. नफा कमी झाला तरी चालेल, परंतु अनैतिकता नको हा नियम पाळणारे (संख्येने कमी असले तरी) अजूनही आहेत. MF/FD वा shareमध्ये गुंतवणूक करणारेसुद्धा reasonable परतावा मिळत असल्यास अशा कंपन्यामध्ये नक्कीच पैसै गुंतवतील. (विजय मल्य यांच्या युनायटेड ब्रुअरीजचे समभाग घेण्यापेक्षा टाटा मोटर्सचे समभाग घेणे केव्हाही बरे!) BEL, BHELसारख्या सार्वजनिक कंपन्या 10 - 15 टक्के नफा घेवून आपले व्यवहार करतात. (चू.भू. दे. घे.) जरी अशा कंपन्यांचा कारभार भोंगळ या सदरात मोडत असला तरी ते अजूनही टिकून आहेत, हेही नसे थोडके. नफेखोरीचेच उदाहरण हवे असल्यास रिलायन्सचे देता येईल. कंपनी कायदा व इतर कायदे - नियम या प्रमाणे कंपनीचे व्यवहार असले तरी ते जे काही करतात त्याला अनैतिकच म्हणावे लागेल. (सहारासुद्धा याच मालिकेतील अजून एक कंपनी!)

आणि त्यांना गुलामासारखे रात्रंदिवस राबविण्याची कसबही . . . . .

मुंबई उपनगरातील अनेक उच्चभ्रू फ्लॅट्समध्ये रात्रीच्या 10 - 11 नंतर मोलकरणी येवून खरकटी भांडी घासून जातात. कारण जेठाणींना वाशबेसिनमध्ये खरकटी भांडी ठेवणे आवडत नाही. पगार जास्त देत असले तरी हे अमानुष आहे, असे मला वाटते. पैशाच्या जोरावर गुलामासारखे राबवून घेणे याची अशाप्रकारची अनेक उदाहरणं अवती भोवती नक्कीच सापडतील. Organised Sectorमध्ये Hire and Fire ची छडी उगारत असल्यामुळे middle management गुलामासारखा राबत असतो. जरी याची कल्पना त्याला नसली तरी इतराना नक्कीच हे कळते.

संबंध

मुंबई उपनगरातील अनेक उच्चभ्रू फ्लॅट्समध्ये रात्रीच्या 10 - 11 नंतर मोलकरणी येवून खरकटी भांडी घासून जातात. कारण जेठाणींना वाशबेसिनमध्ये खरकटी भांडी ठेवणे आवडत नाही. पगार जास्त देत असले तरी हे अमानुष आहे, असे मला वाटते.

काही लोक याकडे उपभोक्ता व सेवादाता अशा संबंधाने पहातात. शोषण विरहीत समाज ही मला कविकल्पना वाटते. सर्वेपि सुखिनः संतु या सारखे सुवचन वाटते. मनातुन असा समाज असावा असे मात्र वाटते.

सहमत

शोषण विरहीत समाज ही मला कविकल्पना वाटते

वाटते काय? अहो आहेच हि कवि कल्पना. उबंटूच्या चर्चेत सुद्धा एथिक्सचा मुद्दा आला होता. एथिक्स हे रिलेटिव आहे. महाभारतातल्या प्रसंगांप्रमाणे. बाकी ज्याचा त्याचा विचार आहे.
@ नानावटी,
तुम्ही एथिक्सच्या विचारांनी टाटाचे शेअर घेण्याचा विचार कराल. पण ज्याला एथिक्सपेक्षा परतावा महत्वाचा आहे तो रिलयन्सचेच घेणे पसंत करेल. हे विषयांतर आहे. पण आपल्याकडे एथिक्सला कवडीमोल किंमत आहे हे आपण वर्तमानपत्रातल्या बातम्या आणि राजकिय वक्तव्ये यावरुन पाहतोच.
अनेकवर्षे टाटा कंपनीमधे काम करुन बाहेर काम करायची इच्छा नसलेले लोक पाहिले आहे. कारण एथिक्स. या उलट सुद्धा पाहिले आहे. एथिक्स काय करायचे? त्यापेक्षा पगार जास्त हवा म्हणून टाटा सोडणारे खुप आहेत. थोडक्यात काय? एथिक्स इज रिलेटिव. डोन्ट रिलेट इट टू ऑल.

लिंक

लेखनात अगोदरच्या भागाचा दुवा दिल्यास वाचकांना ते सोयीचे जाते.
भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा भाग १

पचायला कठीण

शेरहोल्डर्स व स्टेकहोल्डर्सचा अंकुश असल्यास नफेखोरीवर व अनैतिक बिजिनेस प्रॅक्टीसवर बंधनं घालता येते. नफा कमी झाला तरी चालेल, परंतु अनैतिकता नको हा नियम पाळणारे (संख्येने कमी असले तरी) अजूनही आहेत. अमान्य. हा नियम पाळणारे कम्पनी व्यवस्थापनात असतील, जसे वीप्रो किंवा इन्फोसिस. पण कमी गुंतवणूक करणारे पण संख्येने खूप जास्त असणारे तुमच्या आमच्या सारखे शेरहोल्डर्स असा काही नियम पाळत असतील असे मला वाटत नाही. अनेकदा आपल्याला अनैतिक / नैतिक बिजिनेस प्रॅक्टीस बाबत काही माहीत पण नसत. असतात ती केवळ perceptions. आपण गुंतवणूक फक्त आर्थिक मुद्दे बघूनच करतो. आणि MF / FD मध्ये तर आपले पैसे नेमक्या कोणत्या कंपनीत गुंतवले जातील जातील हे ना आपल्याला माहीत आणी ना त्यावर आपले काही नियंत्रण असते. मी सहारा सारख्या कम्प्नीत पैसे गुंतवनार नाही कारण ते मला unsafe वाटते म्हणून, नैतिकतेच्या मुद्द्यावरून नव्हे.

मुंबई उपनगरातील अनेक उच्चभ्रू फ्लॅट्समध्ये रात्रीच्या 10 - 11 नंतर मोलकरणी येवून खरकटी भांडी घासून जातात. कारण जेठाणींना वाशबेसिनमध्ये खरकटी भांडी ठेवणे आवडत नाही. पगार जास्त देत असले तरी हे अमानुष आहे, असे मला वाटते.

अ) अग्नी शमन दल, पोलिस, रेल्वे, कॉल सेंटर, विमानतळ, व इतर अनके ठिकाणी लोक रात्री उशिरा पर्यंत किंवा चक्क २४ तास काम करतात. हे पण तुम्हाला अमानुष वाटते का?
ब) रात्रीच्या 10 - 11 नंतर मोलकरणी काम करतात ते आपल्या मर्जीने का जबर्दस्तीने ? कदाचित पैसे इतके असतील कि त्या तसे खूशीने करत असतील?

मालिका वाढवा

हि मालिका 3 भागात न संपवता जेवढे जास्त भाग होतील तेवढ बरं अर्थात योग्य शेवट हा हवाच.

 
^ वर