भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 1/3)

कार्पोरेट्सचा अधाशीपणा, नफेखोरी व आक्रमक मार्केटिंग आणि उद्योगविश्वात रूढ होत असलेले बिल् गेट्स मॉडेल - नवीन सॉफ्टवेर ऍप्स शोधल्या शोधल्या मायक्रोसॉफ्टला विकून पैसे कमावण्याची पद्धत - इत्यादीमुळे बाजारात कुठलेही नवीन उत्पादन येण्यास प्रचंड वेळ लागतो. बौद्धिक संपदा स्वामित्व हक्क प्रस्थापित करून आपली खुंट बळकट केल्याशिवाय एकही पाऊल पुढे ठेवता येत नाही. आपण शोधलेल्या उत्पादनात बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करत असल्यास त्यासाठीच्या पेटंट्सला वाटेकरी करून घेतल्याशिवाय उत्पादन बाजारात आणता येत नाही. तरीसुद्धा एवढ्या जंजाळातून सुटका करून घेतलेली नवीन नवीन उत्पादनं बाजारात येतात, नफा कमावतात, व त्यांना पर्यायी असे काहीतरी बाजारात आल्यास बघता बघता लुप्तही होतात. काही वेळा उत्पादनाला उठाव आहे हे लक्षात आल्यावर ग्रे मार्केटचे दलाल मूळ उत्पादकाला जीव नकोसा करून टाकतात.

परदेशात गाजलेली उत्पादनं आपल्या देशातील बाजारात पोचण्यास (मोबाइलसारख्या काही उत्पादनांचा अपवाद वगळता) किमान 5-7 वर्ष तरी लागत असावीत. " श्रीमंत देशानी कंटाळा येऊन फेकून दिलेल्या वस्तू आपल्याकडे येतात" असे काही प्रॉडक्ट्सच्या-बाबतीत म्हणावेसे वाटते. याची कारणं शोधताना (श्रीमंतांना) परवडणारे, भारतीय मानसिकतेला पटणारे, दीर्घकाळ टिकणारे, दुरुस्त करता येऊ शकणारे, देखभालीची अट नसणारे - अशा आखुडशिंगी, बहुदुधी म्हशीसारख्या परस्पर विरोधी गुणधर्मांची अपेक्षा करणारे - तंत्रज्ञानच आपल्या येथे खपते. शिवाय मनुष्यबळ मुबलक प्रमाणात व स्वस्त आणि त्यांना गुलामासारखे रात्रंदिवस राबविण्याची कसबही आपल्यात असल्यामुळे वेळ व श्रम वाचविणाऱ्या सुविधा - परवडत असले तरी - नकोसे असतात. उदाहरणार्थ, डिश वाशिंग मशीन आपल्या देशात येऊच शकत नाही. ऑटोमॅटिक वाशिंग मशीनमधील कपडे वाळविणाऱ्या ड्रायरचाच वापर फक्त होत असतो. याचबरोबर तंत्रज्ञान सुविधेतील प्रत्येक घटकाला स्वस्त पर्याय शोधण्याच्या मानसिकतेमुळे उल्हासनगर व लुधियानाची उत्पादनं व्यवस्था बाजारपेठ काबीज करत मोठ्या प्रमाणात नफा कमावते. यांच्या जोडीला आता चायनीज उत्पादनांची रेलचेलही वाढत आहे.

ही सर्व प्रतिकूल परिस्थिती असूनसुद्धा जागतिकीकरणामुळे इतर देशात कुठल्या सोई सुविधा आहेत व त्या आपल्यासाठी कितपत उपयोगी आहेत याचा आढावा घेतल्यास काही सुविधा आपल्या देशात पुढील 10 -15 वर्षात येण्याची चिन्ह आहेत. अशाच काही तंत्रज्ञान सुविधांची थोडक्यात माहिती देण्याचा हा एक प्रयत्न आहे.

स्मार्ट व्हीलचेअर


माइक स्पिंडल 2000 सालच्या त्या दिवशी ल्युटन एअरपोर्टवर विमानाची वाट बघत होता. त्याच्यासमोरून विशीतील एक स्मार्ट तरुण ओबड धोबड असलेल्या व्हीलचेअरवर बसून जात होता. स्पिंडलला ती व्हीलचेअर काही आवडली नाही. तेथेच बसल्या बसल्या बोर्डिंग पासच्या पाठीमागे स्पिंडल काही रेखाटने काढत त्याच्या मनातील व्हीलचेअरला आकार देऊ लागला. मुळात आता व्यवहारात असलेल्या व्हीलचेअरच्या गुणदोषाबद्दल विचार न करता अत्याधुनिक व्हीलचेअर कसे असायला हवे ते आकृतीतून उतरवत होता. स्पिंडलची स्वत:ची एक कंपनी होती. त्यातील टूल्सचा व स्वत:च्या इंजिनीअरिंग कौशल्याचा वापर करून व्हीलचेअर कसे बनविता येईल याचाच विचार त्याच्या डोक्यात होता.

डोक्यातील विचार व कल्पना कागदावर उमटेपर्यंत 6 वर्ष गेली. ट्रेकायनेटिक हे ट्रेड मार्क व व्हीलचेअरच्या पेटंट्स हक्कासाठी त्यानी पेटंट्स ऑफीस गाठले. 42 पानाचे टेक्स्ट व 16 पानभर आकृत्या असलेल्या अहवालावरून आपल्याला काय हवे आहे ते, पेटंट्स ऑफीसमधील त्या तज्ञाला कळेल अशी अपेक्षा तो करत होता.

नवीन उत्पादनासाठीचा अहवाल पेटंट ऑफीसला पाठवताना अहवालात उत्पादन कुठल्या कुठल्या समस्यावर मात करू शकते याचा उल्लेख करावा लागतो. स्पिंडल यानी प्रचलित व्हीलचेअरमधील उणीवावर बोट ठेऊन त्याचे ट्रेकायनेटिक व्हीलचेअर उत्कृष्टपणे कसे काम करू शकते यावर अहवालात भर दिला होता. पारंपरिक व्हीलचेअरमध्ये मोठ्या आकाराची चाकं सीटच्या पाठीमागे असतात. व पुढील कॅस्टर व्हील्स व्हीलचेअरला फक्त दिशा देण्याचे काम करतात. या डिझाइनमुळे कच्च्या रस्त्यावर वा चढावर व्हीलचेअर पुढे नेण्यास जास्त श्रम घ्यावे लागतात. स्पिंडल यानी हेच डिझाइन उलटे करून मोठी चाक सीटच्या पुढे व कॅस्टर व्हील्स सीटच्या मागे लावणार होता. तरीसुद्धा या चार चाकी रचनेमुळे ओबडधोबड जमिनीवर व्हीलचेअरला stability मिळाली नसती. म्हणूनच स्पिंडल एकाच चाकाची कॅस्टर व्हील वापरणार होता. तीन चाकामुळे असमतोल जमिनीवरसुद्धा व्हीलचेअर स्थिर राहू शकते. परंतु तीन चाकी चेअरचा एक मोठा तोटा असतो. व्हीलचेअर सरळ रेषेत नेणे अवघड होऊन जाते. परंतु याच्या डिझाइनमध्ये spring loaded catch वापरून या अडचणीवर मात केली आहे.

या व्हीलचेअरच्या सीटसाठी कार्बन फायबर वापरल्यामुळे सीटच आघात शोषकप्रमाणे (shock absorber) काम करू शकते. वेग नियंत्रणासाठी भक्कम ड्रम ब्रेक्सची सोय यात केलेली आहे. इतर व्हीलचेअरमध्ये वेल्डिंगने जोडणी केल्यामुळे व्हीलचेअरची घडीचे डिझाइन शक्य नव्हते. परंतु स्पिंडलचे नट - बोल्टचे डिझाइन असल्यामुळे घडी करून कारमध्ये ठेवणे सुलभ ठरले आहे. सीटच्या पाठीमागील shock absorberमुळे सीट मागे पुढे करत आरामशीर बसणे शक्य झाले आहे. चाकांच्या टायरची जाडी जास्त ठेवल्यामुळे कच्या रस्त्यावर चेअर सुलभपणे जाऊ शकते. चेअरची रुंदी 870 mm पासून 710 mm करता येत असल्यामुळे लहान दरवाज्यातून जाणे शक्य झाले आहे.

अशा प्रकारचे व्हीलचेअर्स जागतिक बाजारात आलेले असून आपल्या येथेही त्या येण्याची शक्यता आहे.

अधिक माहितीसाठी


ब्लेडलेस फॅन


2009 साली बाजारात आलेल्या डायसन एअर मल्टिप्लायर फॅन्समध्ये नेहमीच्या ब्लेड्सच्या जागी बांगडीसारखे दिसणारे एक जाड चाक आहे. व चाकाच्या खालच्या गोल तळभागात मोटर ठेवण्याची सोय केलेली आहे. हा एक टेबल फॅन आहे. सर् जेम्स डायसन यांची मुळात व्हक्यूम क्लीनिंगची साधनं बनविणारी कंपनी आहे. वाऱ्याचा झोत वापरून धूळ, कचरा साफ करणाऱ्या क्लीनर्सवरून ब्लेडलेस फॅनची कल्पना त्यांना सुचली. व त्याचे पेटंटही त्यानी घेतले आहे.

या फॅनच्या स्ट्यँडमध्येच ब्रशलेस मोटर ठेवलेला आहे. मोटर फिरताना एरोफॉइल आकाराच्या फटीतून वारा बाहेर फेकला जातो. एका सेकंदाला 405 लिटर वारा बाहेर फेकण्याची क्षमता या फॅनमध्ये आहे. मोटरच्या चलनातून बाहेर पडणाऱ्या वाऱ्याच्या 15 पट वारा सर्क्युलेशनसाठी उपलब्ध होऊ शकतो.

डायसनच्या कंपनीतील फ्ल्युइड डायनॅमिक्स इंजिनियर्सनी या फॅन्स च्या वेगवेगळ्या घटकांचे डिझाइन केले आहे. हेल्मेट्स व कार बंपर्ससाठी वापरात असलेल्या विशिष्ट प्रकारच्या दणकट (acrylontride butadiene styrene) थर्मोप्लास्टिक पासून स्ट्यँडची बॉडी तयार केली आहे. मोटारीच्या वेग नियंत्रणासाठी डिमर स्विचचा वापर केला आहे. वाऱ्याची झोत कमी - जास्त वा वर - खाली - बाजूला करण्याची सोय यात आहे. वापरण्यास सुलभ, फिरणारे ब्लेड्स नसल्यामुळे अधिक सुरक्षित अशी ही यंत्रणा आहे.

जपानच्या एका कंपनीनीसुद्धा अशाच प्रकारच्या फॅनसाठी त्या देशाचे पेटंट घेतले आहे. परंतु डायसनत्या फॅनमध्ये एरोडायनॅमिक्स तत्वाचा योग्य प्रकारे वापर केल्यामुळे हा फॅन बाजारात सरस ठरत आहे.

अधिक माहितीसाठी

लेखनविषय: दुवे:

Comments

छान!

मस्त लेख. दुसर्‍या परिच्छेदातल्या मजकुराशी दुर्दैवाने सहमत आहे.

फिरतीवरची नोकरी असल्याने वेळ मिळाला की मी मोठमोठ्या दुकानात चक्कर मारून नविन काय काय आलय ते बघत असतो. त्यातल्या जवळ जवळ सगळ्या गोष्टी आपण म्हणता त्या कारणांमुळे भारताच्या बाजारात निरुपयोगी असतात.

काही काही वस्तूत केलेला इन्होवेटीव बदल बघून , 'अरेच्चा, हे आपल्याला कसं सुचलं नाही?' असं वाटतं!

पुढच्या भागाच्या प्रातिक्षेत.

नवे तन्त्राज्ञान

ब्लेड्लेस फेन हि सन्कल्पना आवडलि पण तुलनात्मक द्रुश्ट्या प्रचलित फेनच्या तुलनेत कमि वाटली तरि अधिक विश्लेशण देता येईल का?

ब्लेडलेस फॅन: तुलनात्मक माहिती

'ब्लेडलेस फॅन' लेखाच्या शेवटच्या परिच्छेदाच्या खाली उल्लेख केलेल्या संदर्भामध्ये (अधिक माहितीसाठी) तुलनात्मक माहिती दिलेली आहे. कृपया वाचावे.

'ब्लेडलेस फॅन'

माहिती बद्दल धन्यवाद.माहितीचा स्त्रोत उत्तम आहे अगोदर घाईत वाचल्याने कदाचित तुलनात्मक फरक नीट समजला नव्हता.

 
^ वर