मराठी वृत्त वाहिन्यांवरील भाषा थोडी सुधारता येईल का?
प्रचंड लोकप्रिय (!) असलेल्या मराठी वृत्तवाहिन्या आपले वार्ताहर नेमतांना त्यांचे भाषेवरील प्रभुत्व बहुतेक पाहत नसावेत.
त्यांचे मराठी उच्चार नेहमीच चुकत असतात आणि त्यांना ते उच्चार बरोबर आहेत असेच वाटते. जसे 'च' ह्याचा उच्चार 'च्य' करणे, 'ज' चा उच्चार 'ज्य' करणे. उदाहरणर्थ - नरेंद्र ज्यादव (जाधव), विठूनामाचा गज्यर (गजर).
त्याचप्रमाणे मराठी वाक्प्रचार आणि समर्पक शब्द माहित नसल्याने हिंदी वाक्प्रचार वापरणे. जसे - काट्याची टक्कर (हसू नका, हे नेहमी वापरले जाते), चार चांद लागले, इत्यादी.
मुंबई आणि पुणे येथे राहणारे लोक अमराठी भाषिक ह्यांच्या ओझ्याखाली दबले गेले असल्याने त्यांची भाषा अशी झाली असेल काय?
ह्यावर सोपे उपाय करता येतील, (ते केलेहि जातात पण मराठी वृत्तपत्रांमध्ये).
कार्यशाळा आयोजित करता येतील, २ वीक च्या ( इथे मला पण मराठी लिहिता येत नाहीये).
नेहेमी वापरल्या जाऊ शकतील अशा म्हणी, वाक्प्रचार, जोमदार आणि समर्पक शब्द ह्यांची सूची बनवली जाऊ शकते.
कुणी ह्या कमी वेळ देऊ शकेल काय?
Comments
०
तुमचा आय डी आधी मराठीत करा. नाहीतर आपण हसे लोकाना, शेंबूड आपल्या नाकाला .... असे होइल.
इंग्रजी दिसल्याबरोबर घाबरून जाऊ नये
@ आंबा ह्यांनी हे लक्षात घ्यावे के इंग्रजी दिसल्याबरोबर 'आया साब' असे म्हणण्याची त्यांची सवय इथे अप्रस्तुत आहे.
०
अप्रस्तुत कशी? तुम्ही दुनियादारीला भाषेचं शानपन शिकवणार, आधी तुम्ही नको का बदलायला? तुमचा इंग्रजी शेंबुड आधी पुसा.
मूळ प्रस्ताव बाजूला राहू नये.
अजून मराठी मध्ये टाईप करणे जमत नाहीये ह्या संकेत स्थळावर म्हणून इंग्रजीचा वापर करत आहे. एकदा जमल्यावर ते बदलून घेईन.
वैयातिक टीका नसावी.
गझर मराठीचा?
आपण गजर शब्दाचा गज्यर हा उच्चार चुकीचा मानून ग़़जर हा खरा उच्चार कंसात दिला आहे. तो गझर असा साधारणतः तुम्हाला अभिप्रेत असावा असे समजावे काय? तसे असेल तर हा समज चुकीचा आहे. कारण गजरचा गज्यर हाच उच्चार बरोबर मानला जातो.
सर्वच प्रसारमाध्यमांची आणि माध्यमांतली भाषा भराभर बदलते आहे हे मात्र खरे. हिंदीबाबतही संबंधित लोकांकडून असेच बोलले जाते.
थोडे गंभीरपणे : कालच एका चर्चासत्रात 'भाषा आणि जीवन' वगैरेसारख्या विषयांवर बराच ऊहापोह झाला. फॉर्म महत्त्वाचा मानावा की आशय? आशय शाश्वत असतो, फॉर्म बदलता असू शकतो.कलाकृतीची भाषा (म्हणजे शब्द, धाटणी,शैली वगैरे) ही फॉर्म मध्ये मोडते. त्यामुळे ती कालसुसंगत किंवा बदलती असणे काही प्रमाणात स्वीकारार्ह असावे. अर्थात सध्याचे माध्यमकार योग्य शब्द आठवण्यासाठी क्षणभरही वाट पहाण्यास तयार नसतात, त्यातल्या त्यात जवळचे असे चटकन सुचतील ते शब्द बिनधास्त वापरून टाकतात. कदाचित माध्यमांचा तात्कालपणा आणि गतियुक्तता याला थोडाफार कारणीभूत असावा. आणि सध्याच्या युगाचीही तीच शैली आहे. 'थांबला तो संपला'. विचार करण्यासाठी पळभर थांबण्याऐवजी जवळ आहे त्या तुटपुंज्या शब्दपुंजीनिशी 'ब्रेकिंग न्यूज'च्या मूषकस्पर्धेत धावत सुटणे हे महत्त्वाचे.
तसे ते असावे किंवा नाही हा वेगळ्या चर्चेचा विषय.
ढोबळ नियम
ज/ज्य.. च/च्य या उच्चारांचा ढोबळ नियम मागे (बहुदा) उपक्रमवरच (बहुदा) श्री. वाचक्नवी यांनी सांगितला होता. (चुभुदेघे) जर एखादा शब्द इतर भाषांमधून आलेला तत्सम / तद्भव शब्द असेल तर च्य/ज्य असे उच्चार करावेत, मात्र जर तो मुळ मराठी शब्द असेल तर च/ज असे.
जसे, जर, चमचा, चकली, चावट साठी च/ज वापरावे तर चमत्कार, चंद्र, जादा वगैरेसाठी ज्य योग्य (अर्थात काही पवाद असावेत असे वाटते.. जसे चार).
कोणाला नक्की नियम आठवत असेल तर तो इथे द्यावा ही विनंती
ढोबळ नियम
मराठमोळ्या शब्दांकरिता :
बाराखडीप्रमाणे उच्चार बदलतो.
च चा चु चू चो चौ - दंततालव्य उच्चार (चकली, चाफा, चुका, चूक, चोच, चौथा)
चि ची चे चै च्य्- तालव्य उच्चार (चिमटा, चीड, चेटूक, चैन, त्याच्या)
नियम ढोबळ आहे. काही महत्त्वाचे अपवाद आहेत :
चार (४ ही संख्या; नियमाप्रमाणे दंततालव्य व्हायला पाहिजे, पण तालव्य उच्चार होतो), त्याचे (नियमाप्रमाणे तालव्य व्हायला पाहिजे, पण दंततालव्य उच्चार होतो), वगैरे
वरील बाराखडीचे ढोबळ नियम मराठमोळ्या "ज" आणि "झ" करिता लागू आहेत.
जड, जाड, जुगार, जून, जोड ; झड, झाड झुकव, झूल, झोड - दंततालव्य
जिकर जीभ जेमतेम ज्या ; झिपरी, झीट, झेप तुझ्या- तालव्य
संस्कृत-तत्सम शब्दांमध्ये उच्चार नेहमीच तालव्य उच्चार होतो - चरित्र, चारित्र्य, ...चौर्य ... जग(त्), जातक, ...
छ नेहमीच तालव्य असतो :
छत, छाट, छी, ...
आणखी
आणखी काही अपवाद : चहा,चाळीस,चाळिशी
चकली चुकले?
चकली हा शब्दही जास्तकरून च्यकली असाच उच्चारला जातो. चकली हा उच्चार ऐकला आहे, पण खूप कमी वेळा. तसेही चकली (चकलें) हा चक्र या संस्कृत शब्दापासून निघालेला तद्भव शब्द आहे म्हणून उपरोल्ल्रेखित नियमानुसार च्यकलीच योग्य ठरतो.
पण हा तत्सम-तद्भवचा नियम थोडासा स्थूलमानानेच घ्यावा. उदा. संस्कृतमध्ये च्योर पण मराठीत चोर.
चकली
कल्पना नाही.. घरी चकली असेच ऐकले आहे.
मात्र काही व्यक्तींकडून च्यकली सुद्धा ऐकले आहे. (सवयीमुळे की काय माहित नाही पण) चकली कानाला योग्य वाटते.
@धनंजय.. अनेक आभार!
सर्वांचे आभार..पण 'उपक्रम' साठी कुणी पुढाकार घेईल काय?
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण सगळेच ह्या क्षेत्रात रुची आणि knowldge बाळगणारे आहात. (मराठी शब्द लिहिता आला नाही. क्षमस्व.)
पण माझी अपेक्षा आहे कि काही जणांनी पुढाकार घेऊन छोटासा कोर्स तयार करावा आणि वार्ताहर लोकांसाठी कार्यशाळा आयोजित करावी.
शेवटी वाहिन्यांच्या तुलनेत आपले बोलणे लोक कमी ऐकतात. त्यांची भाषा सुधारण्याचा हा छोटा प्रयत्न करावा. मला खात्री आहे आपल्याला यश नक्कीच मिळेल.
०
मुंबई आणि पुणे येथे राहणारे लोक अमराठी भाषिक ह्यांच्या ओझ्याखाली दबले गेले असल्याने त्यांची भाषा अशी झाली असेल काय?
किती हसावं समजेना....
मराठी माणसं ७० % आणि अमराठी ३० % पकडले, तरीही मायनॉरिटी लोकांमुळे मेजॉरिटीची भाषा बदलली असे म्हणणं म्हणजे गंमतच नै का??? त्यांची भाषा आपल्या संगतीने का नाही बिघडली?
हा आंबा पेटी सडवेल असे वाटते...
अरे तुम्ही इंग्रजी दिसल्याबरोबर ''आया साब' केलेच. जाऊ देत जुनी सवय जाणार नाही.
असले शब्दप्रयोग बहुतेक भावार्थ दिपिकेतून आले आहेत असे तुम्हाला वाटते का? "काट्याची टक्कर, चार चांद लागले".
मुंबई मध्ये ७०% मराठी लोक उरले आहेत?