गावच्या वाटेवर... इकासाच्या लाटेवर... संवाद-मंथन!!!
स्वत:च्या बळावर, कोणाच्या तरी प्रेरणेने, सरकारी योजनांच्या आधारे महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये सुधारणेची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याला खरा विकास म्हणायचा, की विकासाची प्रक्रिया? यासारख्या प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न, छोट्याशा संवाद-मंथनातून...
त्या गावाची परिस्थिती फारच वाईट होती. पाऊस कमी होता त्यामुळे शेतीही तशी पिकत नव्हती. लोकांची परिस्थिती हलाखीची होती. त्याला कंटाळून गावातील बऱ्याच जणांनी रोजगारासाठी शहरात स्थलांतर केले होते. गावात बऱ्याच समस्या होत्या. शिक्षणाच्या सोई नव्हत्या. आरोग्याच्या सुविधा नव्हत्या. चांगले रस्ते नव्हते, वीज नव्हती. या सर्वांना वैतागून लोक व्यसनी बनले होते. लोकांमध्ये अंतर्गत मतभेद, भाऊबंदकी पराकोटीला पोचल्या होत्या. सर्वत्र अस्वच्छता, रोगराई, भूक आणि भांडणे यांचे साम्राज्य होते. एक दिवस गावात एक भला माणूस आला. गावातल्या समस्या त्याने जाणून घेतल्या, लोकांशी संवाद साधला, त्यांना एक केले. श्रमदान, सामूहिक प्रयत्न यांचे महत्त्व समजावले. लोकांना ते पटले. आळस झटकून लोक कामाला लागले. आपला प्रश्न आपणच एकत्र सोडवू शकतो असा लोकांना विश्वास वाटला आणि जादूची कांडी फिरावी तसा गाव बदलला. सामूहिक कामामुळे लोकांच्या एकीची आवश्यकता गावाला पटली. पिढ्यान्पिढ्याचे वाद संपुष्टात आले. सर्वजण कसे गुण्यागोविंदाने राहू लागले. आता गावात कसलीच टंचाई नाही. सर्व सुखसोयी आहेत. लोक आपल्या प्रश्नांसाठी एकत्र येतात. गावातल्या निवडणुका बिनविरोध होतात. त्याबद्दल गावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. चांगल्या कामाबद्दल गावाला पुरस्कारही मिळाला आहे. गावात सर्व काही आलबेल आहे. गावाचा विकास होत आहे.
आपल्या देशातील विकास झालेल्या बहुतेक गावांची ही आहे प्रातिनिधिक कथा. यामध्ये फक्त प्रेरणा देणारे लोक आणि त्यांची प्रेरणास्थाने बदलतात. बाकी सर्व काही समान राहते. गावांचा विकास होतोय ही चांगली घटना आहे, पण तरीही एका प्रश्नाचे उत्तर कुठेतरी अनुत्तरितच राहते. गावात खऱ्या अर्थाने, पूर्णपणे विकास झाला असे म्हणायचे, की विकासाची प्रक्रिया सुरू आहे, असे म्हणायचे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गावाचा विकास घडविताना ज्यांचा ज्यांचा थेट संबंध आला आहे, अशा अनुभवी लोकांशी संवाद साधला.
पूर्वीची समाजरचना आदर्श
महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला, तर आता होऊ घातलेल्या गावातील विकासकामांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी आणि त्यानंतर हिवरेबाजार ही दोन गावे आदर्शवत मानली जातात. इच्छाशक्तीतून समूहशक्ती आणि समूहशक्तितून श्रमाधारित विकासकार्य यासाठी ही दोन गावे उत्कृष्ट नमुने ठरावीत. अशा या गावांपैकी हिवरेबाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी गावाच्या विकासासाठी गावातील लोकांच्या एकीला महत्त्व असल्याचे सांगितले आहे. त्याबरोबरच लोकांचे आंतरिक सहकार्य आणि सद्भावना यांचाही गावाच्या विकासात मोलाचा वाटा असल्याचे पोपटरावांचे अनुभवी मत आहे.
याविषयी ते जुन्या काळचा दाखला देतात, फार पूर्वीच्या काळी जी समाजव्यवस्था होती, ती खूप चांगली होती. त्या वेळी लोकांच्या गरजा कमी असत. एक-दुसऱ्यांबद्दल प्रेम आणि सहकार्याची भावना असायची, त्यामुळे ही सर्व गावे गुण्यागोविंदाने नांदायची. परंतु नंतरच्या तांत्रिक सुधारणांच्या काळात माणूस माणसाला पारखा झाला. पैशाला महत्त्व आले. स्वत:कडेच जास्त लक्ष पुरवले गेले आणि त्यानंतर समाज, समूह, गाव या गोष्टींना दुय्यम महत्त्व दिले गेले. त्यातूनच पूर्वी आदर्श असणारी समाजव्यवस्था ढासळली आणि पुन्हा गावांच्या विकासासाठी नव्याने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली. अर्थात यामागे काही दुष्काळ, अतिवृष्टी यांसारखी नैसर्गिक कारणेही आहेत, असे असले तरी संकटांच्या काळात एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती गावच्या उभारणीस नेहमीच हातभार लावत असते, म्हणूनच गावच्या विकासासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे पोपटराव पवार सांगतात.
महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानासारख्या योजना राबविल्यामुळे खेडेगावातील जनमानसावर त्याचा निश्चितच चांगला परिणाम झाला. केवळ झाडू आणि लोकांची श्रमशक्ती एवढ्या कमी भांडवलावर राज्यातील गावंच्या गावं भविष्यातील विकासासाठी होत आहे. पैकी काही सुधारलीही आहेत.
सुधारणेच्या प्रयत्नात सातत्य हवेच
गाडगेबाबा स्वच्छता अभियानातून विकास केलेल्या गावांना बक्षिसे दिली जातात, त्यामुळे गावागावांत स्पर्धा निर्माण होते. कधी कधी ही स्पर्धा इतकी पराकोटीला जाते की "बक्षीस देत असाल तरच अभियानात उतरतो' अशी काही गावांची मानसिकता तयार होते. त्यातूनच त्यांच्या सुधारणांच्या कामाला कुठेतरी खीळ बसते. अशी बरीच गावं बघण्यात आली. तेथील गावकऱ्यांचे म्हणणे असते की "मागच्या खेपेला थोडक्यात आमच्या गावाचा "नंबर' हुकला. शेजारच्या गावालाच बक्षीस मिळालं, मग आम्ही का म्हणून प्रयत्न करायचे?' या ठिकाणी विकास खुंटतो. बक्षीस मिळवण्यापुरते गावकरी झटून कामाला लागतात व बक्षीस मिळाले किंवा नाही मिळाले तरी नंतर या ना त्या कारणाने शिथिल होतात, त्यामुळे पुन्हा प्रश्न येतो तो खरा विकास झाला का?
सातारा जिल्ह्यातील बेबलेवाडी या गावचा आपल्या इच्छाशक्ती आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर संपूर्ण कायापालट घडविणारे डॉ. अविनाश पोळ यांचे मात्र बक्षिसांच्या बाबत पूर्णत: भिन्न मत आहे. बक्षीस हे त्या-त्या गावाला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याच्या पाठीवर थाप मारण्यासाठी दिलेले असते. त्यामागे रकमेचा तसा काही संबंध नसतो. उद्देश हा असतो की त्या गावाने आपले हे विकासकाम भविष्यातही असेच पुढे सुरू ठेवावे. इतकेच नाही तर आजूबाजूच्या चार गावांनाही आपल्या कामाद्वारे प्रेरणा द्यावी, म्हणूनच गावाच्या विकासात सातत्य महत्त्वाचे आहे. हे सातत्य राखले तरच ते गाव खऱ्या अर्थाने विकसित होऊ शकते, असे डॉ. पोळ यांना वाटते. अर्थात ग्रामस्वच्छता अभियानामुळे अनेक गावांमध्ये बराच मोठा बदल होतो आहे, लोक एकत्र येतात, आपल्या प्रश्नावर चर्चा करतात आणि त्यांची सोडवणूक स्वत:च करतात. त्यासाठी दुसऱ्याच्या मदतीवर किंवा सरकारच्या मदतीवर त्यांचे अवलंबित्व कमी होते. अशा या संघटित श्रमशक्तितूनच विकासाला दिशा मिळत असते. म्हणूनच गावांचे स्वावलंबन हा महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेला विचार या ठिकाणी कुठेतरी प्रत्यक्षात अमलात येतो. ही खरेच गावाच्या विकासाच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. याचाच अर्थ एखाद्या गावचा विकास मोजताना डॉ. पोळ यांनी सांगितलेल्या, तसेच प्रत्यक्ष अनुभवलेल्या "सहकार्य आणि स्वावलंबन' या फूटपट्टीचा वापर आवश्यक ठरतो.
गावची सुधारणा ही दीर्घकाळची प्रक्रिया
बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वकाना हे ठरलेले गाव. गावात आतापर्यंत झालेल्या विकासकामांमुळे गावाला सातत्याने जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. श्रमदानातून बांधलेले बंधारे आणि त्यातून यशस्वीरीत्या सोडविलेला पाण्याचा प्रश्न हे या गावाने केलेले महत्त्वाचे काम. याशिवाय रस्ते, सौरदिवे, सेंद्रिय शेती, बचत गट, समाजमंदिर, वाचनालय. बिनविरोध निवडणुका, खतोत्पादक शौचालये अशी कितीतरी कामे या गावांत झाली आहेत. गावात पाऊल ठेवल्यावरच प्रसन्न वाटते. सगळे काही जिथल्या तिथे चकाचक. विशेष म्हणजे गावाने हे करताना सातत्य ठेवले आहे. गावातल्या या सर्व सुधारणांचा परिणाम असा झाला, की आजूबाजूच्या गावांनीही प्रेरणा घेऊन सुधारणा केल्या आणि बक्षिसे मिळविली.
आता हे सर्व गाव मिळून जलसंधारणासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढत आहेत. अर्थात या गावांना सुधारणेची प्रेरणा देणारे हात वेगळेच आहेत. समाजकामाची खऱ्या अर्थाने आस असलेली बुलडाणा येथील ही सर्व तरुण मंडळी आहेत. त्यांच्यापैकीच एक असलेले आशुतोष देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार गावाचा विकास ही काही रातोरात होणारी गोष्ट नाही. विकास ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. केवळ भौतिक सोयी केल्या म्हणजे विकास झाला असे नाही तर लोकांच्या दृष्टिकोनात बदल होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. गावच्या विकासामध्ये या तरुणांनी पुढील पैलूंना महत्त्व दिले आहे. अन्न स्वावलंबन, वस्त्र स्वावलंबन, जल स्वावलंबन, शिक्षण स्वावलंबन, आरोग्य स्वावलंबन आणि त्याच्या जोडीला श्रमदान. गावाच्या विकासात या सर्व गोष्टींचे महत्त्व असते असे त्यांचे मत आहे.
शिवारात वावरताना
गावाचा विकास केवळ गावातील उंबरठ्यांभोवतीच केंद्रित करून चालणार नाही, तर तो गावठाणाबाहेर शिवारापर्यंत झाला पाहिजे. म्हणजेच गावठाणाबरोबर शेतीचाही विकास व्हायला हवा, कारण ग्रामीण अर्थव्यवस्था जवळजवळ शेतीवरच अवलंबून असते. शिंगवे-तुकाई हे नगर जिल्ह्यातील असेच एक शेतीनिष्ठ गाव. श्रमदानाने जल व मृद्संधारणाची कामे करून शेतीच्या बाबतीत या गावाने वेगळीच क्रांती केली. गावात आज कांदा व गाजर यांचे एकत्रित उत्पादन घेतले जाते व सर्व शेतकऱ्यांचा माल एकाच बाजारपेठेत विकला जातो. बाजारपेठेच्या बाबतीत इथल्या शेतकऱ्यांनी थेट बंगळूरपर्यंत मजल मारली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जानेफळ हेही असेच एक गाव. सीताफळ, टोमॅटो आणि साग या पिकांबाबत गावाची आघाडी आहे. पारंपरिक पीकपद्धतीत बदल हे या गावाचे वैशिष्ट्य आहे. या दोन्हीही गावांनी प्रयत्नपूर्वक मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे.
याच अनुषंगाने शेती या दृष्टीने गावाचा विकास कसा असावा, किंवा गावाच्या विकासात शेतीचे, पर्यावरणाचे स्थान काय, असा प्रश्न अमरावती जिल्ह्यातील रवाळा गावचे सेंद्रिय शेतीतज्ज्ञ वसंत फुटाणे यांना विचारला. श्री. फुटाणे यांनी स्वत:ला "शाश्वत शेती'च्या कामासाठी वाहून घेतलेले आहे. "संवाद' या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे काम चालते. या प्रश्नावर उत्तर देताना वसंत फुटाणे, पिकांच्या जैवविविधतेवर भर देतात. त्याबरोबरच मातीचा कस आणि उत्पादकता टिकविणे याला ते प्राधान्य देतात. एकाच पद्धतीच्या पिकाच्या मागे न लागता आपल्या गरजांसाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या पिकांचा विचार शेतीमध्ये व्हावा असे त्यांना वाटते. आपल्या सर्वच अन्नधान्याच्या गरजा शेतीतून भागविल्या जाव्यात. आधी आपल्याला व लेकराबाळांना पुरेसे अन्न मिळावे आणि मग त्याच्या विक्रीचा, निर्यातीचा विचार व्हावा, असे श्री. फुटाणे यांना वाटते. त्यासाठी जैवविविधता हा उपाय असू शकतो असे त्यांचे मत आहे. थोडक्यात विकास म्हणजे काय? तर आपल्याकडे असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती उदा. माती, पाणी, वेगवेगळी पिके यांचा ठेवा पुढच्या पिढीसाठी जतन करणे असा त्यांचा दृष्टिकोन आहे.
सक्ती किती परिणामकारक?
"गावचा विकास' हा विषय डोळ्यापुढे ठेवून सहकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चेदरम्यान कुणी गावात सर्व सोयी असणे म्हणजे विकास असे मत कुणी मांडले, तर शेतीसंबंधी बदल असे मत कुणी मांडले. गावातच रोजगाराची निर्मिती व्हावी असे कुणी मांडले. तर एकत्र येऊन नैतिक मूल्यावर आधारित विकास असेही मत या चर्चेमध्ये मांडले गेले. आम्ही सर्व मित्र अशी चर्चा करत असतानाच फोन खणखणला.
"हॅलो, मी रत्नागिरीच्या अमूक गावाहून अमूक-अमूक बोलतोय ' पलीकडून आवाज आला.
"अच्छा! बोला,'
अहो, झालं काय, की ती हागणदारीमुक्त गाव योजना आहे ना? ती आमच्यावर लादली जातेय!'
ती कशी?
अहो, अधिकारी मंडळी सक्काळीच आमच्या गावात येतात आणि आमच्यामागे शौचालयं बांधा असा लकडा लावतात. आता इथं पाऊस चालू आहे. आम्ही म्हणतो पाऊस थांबू देत, मग करू संडास बांधण्याची कामं...!
..., बरं मग?
अहो, गावाच्या स्वच्छतेसाठी संडास बांधणं बरोबर आहे, पण त्यासाठी बळजबरी कशाला? आता पावसाळा आहे. बांधकामाच्या विटांचे भाव अडीच हजारावर गेलेत. ते परवडत नाही हो. शिवाय शौचालय बांधल्यावर त्याच्या ड्रेनेजची नीट व्यवस्था व्हायला पाहिजे ते असं घाईत कसं होणार? आणि मग अशा घाईमुळे ही कामं चांगली होतील का? शिवाय हागणदारीमुक्त गावाचा मूळ उद्देशच त्यामुळे सफल होणार नाही...'
असं बरेच ते काही सांगत होते....
हे ऐकल्यावर विचार आला, की अनेक गावे तशी सुधारणेकडे वाटचाल करत आहेत. गावांचा विकास होत आहे. बऱ्याच गावांना पुरस्कार मिळाल्याचेही आपण ऐकतो, लिहितोही. त्यामागे त्या-त्या गावातील लोकांचे, खरेच प्रामाणिक प्रयत्न असतात. लोक एकत्र येतात आणि गावच्या विकासास हातभार लावतात. यामागे कधी पोपटराव पवार नावाच्या जागरूक आणि शिकलेल्या तरुणाची प्रेरणा असते, तर कधी मनीषा म्हैसकरांसारख्या जबाबदार अधिकाऱ्याचा सहभाग असतो. प्रेरणा आणि प्रयत्न कोणाचेही असोत, योजना काहीही असो पण गावाचा विकास होतोय हे मात्र जाणवते. परंतु तरीही अशा प्रकारच्या फोननंतर योजनांच्या माध्यमातून होणाऱ्या विकासाबद्दल कुठेतरी किंतु निर्माण होतोच. अर्थातच त्याचे निरसन कोणा तज्ज्ञांमार्फतच व्हायला हवे.
गावकऱ्यांची मानसिकता बदलायला हवी
गाव सुधारावे म्हणून संबंधित योजना त्या गावावर लादणे योग्य आहे का? असा प्रश्न गोवर्धन, नाशिक येथील श्रीकांत नावरेकर यांना विचारला. केवळ "सफाई' या विषयावर प्रबोधन, प्रयोग, प्रशिक्षण आणि प्रसार या माध्यमांतून समाजासाठी वाहून घेतलेल्या "निर्मल ग्राम निर्माण केंद्र' या संस्थेच्या माध्यमातून ते काम करतात. मोठ्या भगिनी नीलूताई , पत्नी सौ. संध्या आणि स्वत: श्रीकांत नावरेकर यांनी स्वच्छतेविषयीच्या बहुमोल कार्यासाठी वाहून घेतले आहे. आतापर्यंत अनेक शासकीय अधिकारी, शिक्षक, शेतकरी, गवंडी, विद्यार्थी आणि वैयक्तिक नागरिकांच्या गटांनी संस्थेकडून सफाईचे धडे घेतले आहेत. सध्या केंद्र शासनातर्फे सुरू असलेल्या निर्मल ग्राम योजनेच्या कामांच्या मूल्यमापनाची काही जिल्ह्यांसाठीची जबाबदारी नावरेकरांकडे आहे.
यासंबंधी प्रश्नावर उत्तर देताना नावरेकर म्हणतात, की योजना योग्य असली तरी लोकांचे पूर्णपणे प्रबोधन झाल्याशिवाय त्याची अंमलबजावणी संबंधित गावावर करू नये. लोकांच्या इच्छेविरुद्ध केलेल्या गोष्टी नंतर टिकतीलच असे नाही, याबाबत गावांच्या मूल्यमापनातील आपले अनुभव ते सांगतात. ज्या-ज्या ठिकाणी अधिकारी, पुढारी वगैरेंच्या माध्यमातून "हागणदारीमुक्त गाव' या सारखी योजना गावावर लादली गेली आहे. त्या ठिकाणी सुरवातीला चित्र बरे दिसत असले, प्रत्यक्षात शौचालयांची बांधकामे दिसत असली, तरी नंतर मात्र त्यांच्या वापराबद्दल संबंधित गावकरी उदासीन असतात. अनेकांनी वर्षभरातच अशा शौचालयांचे "न्हाणीघरात' रूपांतर केले, तर काहींनी कोंबड्या, सरपण वगैरे ठेवण्यासाठी त्याचा वापर केला. या शिवाय सध्या जी काही शौचालयांची कामे सुरू आहेत, त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या अजिबात शास्त्रशुद्धपणा नाही, खरे तर या सर्व शौचालयांपासून उत्तम प्रकारचे "सोनखत' मिळू शकते. त्याचा उपयोग शे तीसाठी होऊन गावातील शेतीच्या खताची गरज गावातूनच भागू शकते, परंतु या योजनेअंतर्गत असे चित्र कुठल्याच गावात बघायला मिळाले नसल्याचा नावरेकरांचा अनुभव आहे.
मग या योजनेचा गावोगावच्या विकासासाठी काय हातभार लागला? असा प्रश्न नावरेकरांना विचारला असता त्याचे उत्तर फारच सकारात्मक मिळते. मुळात "निर्मल ग्राम योजना' किंवा "हागणदारीमुक्त' गाव या अभियानामुळे स्वच्छतेबद्दल गावांमध्ये जागृती येत चालली आहे. विशेषत: महिलांच्या दृष्टीने ही योजना फारच उपयोगी आहे, कारण पूर्वी बहुतेक गावांत शौचालयांची सोय नसल्याने महिलावर्गाची फारच कुचंबणा व्हायची ती आता कमी होतेय. शिवाय ही योजना राबवीत असताना महिला आणि तरुणांचाही चांगला सहभाग लाभतो आहे. पूर्वी गावागावांमध्ये विकासासाठी स्पर्धा असत, निर्मल ग्राम योजनेमुळे आता ती पुढारी आणि अधिकाऱ्यांत निर्माण झाली आहे. साहजिकच त्याचा लाभ अप्रत्यक्षपणे आपसुकच संबंधित गावाला मिळतो आहे, असे असले तरी गावचा विकास हा पैलू लक्षात घेता त्या दृष्टीने होणारी विकासकामे ही दीर्घकाळ टिकणारी, तंत्रदृष्ट्या अचूक असणारी आणि लोकांना त्याबद्दल ज्ञान असणारी असतील, तर विकासकामात त्याचा निश्चितच सकारात्मक बदल होईल असा विश्वास श्रीकांत नावरेकरांना वाटतो.
स्त्रियांचे सबलीकरण आवश्यक
गावचा विकास होत असताना इतर सर्व पैलूंबरोबरच स्त्रीशक्ती हा सुद्धा एक महत्त्वाचा पैलू आहे. गावचा विकास मोजताना त्या गावातील स्त्रियांचे स्थान काय? ही गोष्ट आधी लक्षात घ्यावी असा विचार सामाजिक कार्यकर्त्या रत्नाताई कांबळे मांडतात. नगर जिल्ह्यातील भंडारदरा, राजूर या ठिकाणच्या आदिवासी गावांत स्त्रिया आणि आरोग्य या गोष्टींना केंद्रस्थानी ठेवून रत्नाताई कांबळे आणि त्यांचे सहकारी काम करतात. आज एकविसाव्या शतकातही खेडेगावातील स्त्रियांची परिस्थिती बदललेली नाही, त्यामुळे गावच्या विकासाबद्दल भाष्य करताना स्त्रियांच्या सबलीकरणालाही तेवढेच महत्त्व दिले पाहिजे, असे रत्नाताईंना वाटते.
गावांमधील सार्वजनिक स्वच्छतेपासून महिला सबलीकरणापर्यंत व शेतीवाडीपासून आरोग्यापर्यंतचे अनेक प्रश्न सोडवणे, ग्रामस्थांचे जीवन आधीपेक्षा सुसह्य करणे म्हणजे गावाचा विकास असे ढोबळ मानले जाते. तरीही या क्षेत्रात वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या तज्ज्ञांशी आपण या लेखातून बोललो. खरे तर गावचा विकास आणि त्याचे पैलू हा विषय फारच मोठा आहे. एका लेखामध्ये तो बंदिस्त करणे शक्यच नाही, अनेक विषय हाताळून झाले तरीही काहीतरी राहिले असे या ठिकाणी वाटत राहील.
Comments
विकास
पंकज, लेख चांगला आणि चांगल्या विषयावरचा आहे. मला वाटत या विषयावर चर्चा सुरू करायला हरकत नाही. गावे विकसीत झाली, नवी शहरे उभी राहिली तर आजचा सामाजिक असमतोल नक्किच कमी होइल.
मराठीत लिहा.
अतिशय सुंदर लेख
पंकज, ग्रामीण विकासासारख्या महत्त्वाच्या विषयाचा अभ्यासपूर्ण उहापोह आवडला. असे अनुभवाधारित आणि सामाजिक लेख अधिकाधिक संख्येने लिहिले/वाचले जाणे आवश्यक आहे असे वाटते. या आणि अश्या विषयांवर आणखीही लिहावे ही विनंती.
सामाजिक आशय!
शशांकराव,
असे अनुभवाधारित आणि सामाजिक लेख अधिकाधिक संख्येने लिहिले/वाचले जाणे आवश्यक आहे असे वाटते.
असेच काही अनुभवाधारित आणि सामाजिक लेख येथून अवघ्या एका मिनिटात उडवले गेले आहेत असे खेदाने म्हणावेसे वाटते!
त्याबाबत आपल्याला काय म्हणावयाचे आहे? उत्तराची अपेक्षा आहे, पण आग्रह नाही. जमल्यास उत्तर द्या!
आपला,
(मुंबईचे समाजजीवन खूप जवळून पाहिलेला!) तात्या.
लेख की कथा?
लेख की कथा?
स्वानुभवावर आधारित सामाजिक आशय असलेली कथा!
लेख की कथा?
लेख हा शब्द मागे घेतो. 'कथा' हा शब्द अधिक योग्य आहे. त्या कथेत स्वानुभवावर आधारित सामाजिक आशय होता असे वाटते! आपलं मौलिक मत माहीत नाही!
सदर कथेला येथून एका क्षणात कचर्याची टोपली दाखवली गेली याची तीन कारणे असावीत!
१) त्यात कोणताही सामाजिक आशय नसून ते केवळ एक करमणूकप्रधान विनोदी लेखन असावे असे सन्माननीय उपक्रमरावंना वाटले असावे!
२) सदर कथेतील गंभीर सामाजिक आशय कदाचित उपक्रमरावांच्या लक्षात आला नसावा. 'सामाजिक आशय' ह्या शब्दाची व्याप्ती किती आहे हे उपक्रमरावांना कदाचित माहीत नसावे आणि म्हणून ते येथून उडवले गेले असावे!
३) इरिस्पेक्टिव्ह ऑफ 'धोरणे आणि तत्वे', येथे काय प्रसिद्ध करायचे आणि काय प्रसिद्ध करायचे नाही यासंबंधीचा मालकी हक्काचा अंतिम व्हेटो उपक्रमरावांनी वापरला असावा! आणि एकदा मालकी हक्क म्हटला की त्यापुढे चुपचाप मान झुकवणे हे आलेच!
असो!
येथून एका क्षणात कचर्याची टोपली दाखवून अक्षरशः पायदळी तुडवले गेलेले लेखन आज सुदैवाने दुसर्या एका मराठी संकेतस्थळावर तेथील बहुश्रुत आणि म्यॅच्युअर(!) सदस्यांच्या बर्यावाईट प्रतिक्रियांसोबत मानाने विराजमान आहे!
आपला,
(एखादे लेखन वाचताना त्याचे स्वरूप काय आहे त्यापेक्षा त्यातील आशय काय आहे, एवढेच लक्षात घेणारा उपक्रमाच्या दारातला एक उपरा सभासद!) तात्या.
ता क - आदरणीय शशांकरावांच्या मौलिक मताची आम्ही वाट पाहात आहोत!
सामाजिक आशय
माफ करा पण आपल्या लेखमालेतल्या सामजिक आशयाबद्दलची कल्पना दोन्ही भाग वाचल्यावर देखील आली नाही. (बहूश्रुत व म्यॅचुअर सदस्यांना आली असल्यास नवल नाही.) ती एकच भाग वाचून उपक्रमरावांना यावी अशी फाजिल अपेक्षा मात्र तो करणार नाही.
अर्थ
ती एकच भाग वाचून उपक्रमरावांना यावी अशी फाजिल अपेक्षा मात्र तो करणार नाही.
विकिपिडियावर 'फाजिल' या शब्दाचा अर्थ शोधण्याचा बराच प्रयत्न केला. कुणाला सापडल्यास विकिपिडियाचा संबंधित दुवा अवश्य द्यावा!
आपला,
(विकिपिडियावरचा पढंतमूर्ख) तात्या.
दुवा
तात्या, त्यासाटी इकिपिडिया न्हाई!
शब्दाचा अर्थ लावाया राव "डि क्श न री" मंदी बगत्यात!
ह्या अडान्याला ज्येवड कळतय त्ये तुमच्यावानी ल्येखकाला कळू नये राव?
मजकूर संपादित.
फारच छान !
बर्याच दिवसांनी एका वेगळ्या विषयावरचा लेख वाचायला मिळाला.
अभ्यासपूर्ण लेख !!
विकासाची प्रबळ इच्छा.
पंकजराव,
चांगलाच लेख आहे.पण विकासासाठी काही प्रेरणा असाव्या लागतात,त्यांचा अभाव.आणि स्वातंत्र्यानंतर अजुनही विकास योजना गावागावात पोहचल्याच नाहीत.पुढारी आणि अधिकाऱ्यात जो पर्यंत ख-या अर्थाने विकासाची प्रबळ इच्छा निर्माण होत नाही,तो पर्यंत विकासाला वेग येणार नाही. पंतप्रधानाची ग्राम सडक योजना हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.त्याच विचाराची एक कविता आहे, यशवंत मनोहर म्हणतात-
'कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही,
सदरहु पीक आम्ही आसवांवर काढले. '
वास्तवदर्शी
बिरुटेसाहेब,
आणि स्वातंत्र्यानंतर अजुनही विकास योजना गावागावात पोहचल्याच नाहीत.पुढारी आणि अधिकाऱ्यात जो पर्यंत ख-या अर्थाने विकासाची प्रबळ इच्छा निर्माण होत नाही,तो पर्यंत विकासाला वेग येणार नाही.
हेच म्हणतो..
'कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही,
सदरहु पीक आम्ही आसवांवर काढले. '
बिरुटेसाहेब, आपला प्रतिसाद आणि वरील ओळी स्वप्नरंजन करणार्या नसून वास्तवदर्शी आहेत!
तात्या.
मुद्देसूद लेख
मुद्देसूद लेख आवडला. प्रत्येक मुद्दा पुढे करून त्यावर विस्तृत भाष्य करण्याची शैलीही आवडली. लेखाच्या निमित्ताने काही अनोळखी व्यक्तिमत्त्वांची ओळख झाली, त्याबद्दल धन्यवाद.
विकासाची प्रबळ इच्छाही आपल्याकडे असलेली कमतरता दूर करण्याच्या प्रबळ इच्छेतून होत असावी असे वाटते. नावेरकरांनी सांगितल्याप्रमाणे गावाची आणि गावकर्यांची मानसिकता बदलणे गरजेचे. या गावांना विकासाची निकड भासवून देणारे, आपला वेळ, कष्ट, प्रयत्न विकासासाठी लावणारे काही गुणी लोक मिळाल्याने हे शक्य झाले.
कुटुंबनियोजनाचे काय?
स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे होऊन गेली तरी तुम्ही आम्ही विकासाच्याच गोष्टी करत आहोत! आजही आठ आठ दहा दहा तास खेडोपाडी साधी वीज नाही. गावंच्या गावं अंधारात आहेत. शेतकर्यांच्या आत्महत्त्यांचे काय?
माझ्या मते 'प्रचंड लोकसंख्या' हे कुठल्याही गावच्या विकासाच्या आड येणारे हे प्रमुख कारण आहे.
गावांमधील सार्वजनिक स्वच्छतेपासून महिला सबलीकरणापर्यंत व शेतीवाडीपासून आरोग्यापर्यंतचे अनेक प्रश्न सोडवणे, ग्रामस्थांचे जीवन आधीपेक्षा सुसह्य करणे म्हणजे गावाचा विकास असे ढोबळ मानले जाते.
विकासाच्या संदर्भात ज्या ज्या व्यक्तिंचे मनोगत वाचले त्यापैकी एकाही व्यक्तिने गावातील कुटुंबनियोजन आणि त्याबाबतच्या लोकशिक्षणाबद्दल काहीच म्हटलेले नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटले!
पंकजराव, आपल्या लेखाचा आवाका निश्चितच खूप मोठा आहे. आपले लेखन अभ्यासपूर्ण आहे. पण कुटुंबनियोजन आणि त्याबाबतचे लोकशिक्षण ह्या मुद्द्याचा सबंध लेखात कुठेही उहापोह केलेला दिसला नाही! आणि जो पर्यंत कुटुंबनियोजनाचे महत्व खेड्यातील घराघरात पोहोचत नाही तो पर्यंत अजून ५० वर्षांनी देखील आपण विकासाबद्दलच फक्त बोलतच राहू असं माझं मत आहे.
तात्या.
लोकसंख्या
लोकसंख्या हे तर भारतातल्या सर्व समस्यांचे मुळ आहे. तात्या, लोकसंख्येमुळे हा विषय आता लवकरच धर्माकडे वळेल..
मराठीत लिहा.
लोडशेडींग
आठ दहा दहा तास खेडोपाडी साधी वीज नाही. गावंच्या गावं अंधारात आहेत.
जय हरी !
खरं आहे..
अन कुटंब नियोजनाचं म्हणता न त पहा देव बी असा, थोरल्याला तीन पोरीच,वंशाला दीवा नकू का ?धाकला सिकला तेला नोकरी नही.अन शेती कराची लाज वाटती
जय हरी !
वरील तीनच ओळी, परंतु अत्यंत वास्तववादी चित्र उभं करतात. धन्यवाद बच्चन साहेब!
आपला,
(कोकणातील एक गरीब आंबा व्यापारी!) तात्या.
सुंदर
मुद्देसूद आणि विकासाचे खरे स्वरुप दर्शवणारा लेख. यावर चर्चेला बरेच मुद्दे आहेत.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
मुद्देसूद आणि विकासाचे खरे स्वरुप दर्शवणारा लेख. यावर चर्चेला बरेच मुद्दे आहेत.
आर्थिक बळ
पंकज,
लेख अतिशय आवडला. ही विकास प्रक्रिया आहे हे जास्त खरे वाटते. तुम्ही ठळक शब्दांत जे लिहीले आहे ती सूत्रे गावाच्या विकासासाठी महत्त्वाचीच आहेत. किंबहुना शहरातही थोड्याफार फरकाने हीच सूत्रे उपयुक्त होतील असे वाटते. तसेच अजून एक मुद्दा - सर्वांगीण शिक्षण (शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण + जनप्रबोधन) - महत्त्वाचा आहे. परंतु तुम्हीच म्हटल्याप्रमाणे विकासाचे अनेक पैलू आहेत, आणि ते बंदिस्त करणे शक्य नाही.
तरीही यासंदर्भात अजून एका गोष्टीचा विचार होणे आवश्यक आहे ते म्हणजे या विकासासाठी लागणारा पैसा. बुलडाणा जिल्ह्यातील वकाना या ठिकाणचे आपण जे वर्णन केले आहे, त्या गावाने हा पैसा कसा उभारला हे कळले तर ते इतर गावांनाही मार्गदर्शक ठरेल असे वाटते. याची आपल्याला काही माहिती असल्यास ती देखील येथे सांगावी अशी विनंती. तसेच अनेक ठिकाणी विविध NGO (बिगर सरकारी) संस्था कार्यरत असताना दिसतात. NGO संस्थांना आर्थिक बळ अनेकदा स्वदेशी आणि परदेशी संस्थांकडून मिळत असते. अशी एखादी संस्था या गावात कार्यरत आहे का हे काम गावकर्यांनी केवळ त्यांना उपलब्ध असलेल्या जिल्हा विकासयोजनांमधून केले आहे? याबद्दल आपल्याला काही माहिती असल्यास ती येथे देण्याची विनंती.
चित्रा
महत्वाचा प्रश्न
प्रश्न महत्वाचा आहे खरा!
भूतान मध्ये जीडीपी/दरडोई उत्पन्न ला बाजूला सारत विकासाचे मोजमाप सर्वंकष समाधान निर्देशांका नुसार करावे अशी संकल्पना उदयास आली.
'हे सारे कशासाठी?' हा तत्वज्ञानातील न उकललेला प्रश्न देखील विकासाच्या सर्वमान्य व्याख्येस आडथळा आणण्यास कारणीभूत आहे. :)
विकास म्हणजे काय? तर प्रत्येकाला (त्याच्या कर्तव्यांच्या, व इतरांच्या अधिकारांच्या मर्यादेत) आपले आयुष्य हवे तसे व्यतीत करण्याचे स्वातंत्र्य. ज्यांना वडापारंब्याच्या कट्ट्यावरच्या गप्पा आवडतात त्यांसाठी कट्टे व ज्याना मॅक्डोनाल्ड हवे त्यांना मॅक. सर्वंकष विकास म्हणजे समाधानाचे क्षितीज विस्तारत नेणे.
अविकसित समाजात विकास हा लघुत्तमाच्या (मी च्या) अवतीभवती मर्यादित असतो. माझ्या सुखाची झळ (पर्यावरण तर सोडाच) पण इतरांना पोहोचते ही जाणीव अशा समाजात नसावी. (माझे घर स्वच्छ असले की झाले, तोच कचरा रस्त्यावर का असेना!).
पुढचा टप्पा म्हणजे देशाचा/समाजाचा अंतुलित विकास. समाजाच्या एका अंगाच्या पिळवळुकीतून/शोषणातुन केला गेलेल्या दुसर्या अंगाचा विकास.
पुढे सारे मानव एक वगैरे.. मानव जातीच्या भल्यासाठी (कायद्याच्या जाचाने का असेना) पर्यावरणाला हवी तशी हानी पोहोचवत केला गेलेला विकास.
पुढे पर्यावरणाला कमीत कमी/न हानी पोहोचवता मानवाच्या अत्यावश्यक गरजा पुरवणे.
खोलवर पाहता माणसाच्या कित्येक गरजा, मुलभूत नसून एका गरजेसाठी दुसरी.. त्यासाठी तिसरी असे करत मूळ गरजेला झाकोळून टाकतात असे दिसते.
(उदा. संवाद साधण्याची गरज... दूरध्वनी.. काही अधिक सोपी..काही आणखी सोयी... आणखी चांगला, आणखी सुबक ...वेगळा अगदी आजच्या जमान्यातला दूरध्वनी..)
विनोद
कालंच कोणत्यातरी मराठी वृत्तपत्रात एक विनोद वाचला. व्यंगचित्र होतं बहुतेक.
एक भिकारी दुसर्या भिकार्याला "डॉलरच्या तुलनेत रुपाया वधारला" ही बातमी वाचून दाखवतो.
दुसरा त्याला विचारतो,"म्हणजे कुणी आपल्याला आठ आणे दिले की एक रुपया दिलाय असं समजायचं का?"
विकासाची परिमाणे सामान्य माणसाचं राहणीमान प्रतिबिंबित करतील तर उपयोग. जीडीपी-फिडीपी आणी इन्फ्लेसनचं आन् आमच्या शेतकर्याचं सूत कसं जुळायचं?
(येरागबाळा) अभिजित
लेख चांगला
लेख चांगला आहे.
गावाचा अभ्यास करणारे खुप कमी आहेत्.
शिल्पा दातार जोशी
उपयुक्त लेख
पंकज .ग्रामीण विकास विषयी लेख आवडला .
चांगल्या विषयाला वाचा फोडलीत.
विषय मांडणारे आणि त्यावर चर्चा करणारे ,
सर्वाना धन्यवाद् ! खरोखरीच एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडली जातेय . ग्राम-विकास म्हणजे नेमके काय ? त्याची व्याख्या काय? त्याचे मार्ग कोणते ? आदर्शाची ठिकाणे कोणती? त्यातील अडचणी कोणत्या ? राजकीय पुढारी आणि सरकारी अधिकारी यांची नक्की भुमिका काय ? ........... खूप खूप प्रश्न ऊभे रहातात .
' आदर्श गाव ' म्हणून ज्या गावांचा सत्कार झाला त्या गावातील प्रत्यक्श स्थिती काय असते हे सुध्दा बघायला हवे का ? संत गाडगेबाबा ग्राम स्वछता अभीयानात वशीलेबाजी झालीच नाही असे म्हणू शकतो का ? मग या वेग वेगळ्या अभियानातुन खरोखरच विकास साधला जातो का ? त्या पलिकडे जाउन विकास साधता येणार नाही का ? अण्णा हजारें सारख्या महा मानवांनी जे काही केले ते कोणत्याही कुबड्या वापरल्या नाहीत. ग्राम विकास साधताना मनो विकास प्रथम हे अवलंबायला हवे. ' मी ' स्वता:चा प्रथम विकास करेन , गावाचा विकास आपोआप होइलच. नाहीतर गावात रस्त्याचे डांबरीकरण होते आणि गावातल्या बायका त्यावर कपडे धूतात , भांडी घासतात . असे चीत्र दिसत नाही का ? मग सुधारणा भौतिक कि बौध्दीक हव्या ? ग्राम स्वच्छतेसाठी केरसुण्या उपलब्ध करून देणे महत्वाचे कि स्वच्छतेचे महत्व पटवुन देणे महत्वाचे ? वनमहोत्सवात झाडे लावणे महत्वाचे कि ती झाडे वाढविणे महत्वाचे ?
एकुणच मानसिकता बदलायला हवी.
अधिक चर्चा होणे आवश्यक आहे
या विषयावर अधिक चर्चा होणे आवश्यक आहे.
एकीकडे गावे गावपण हरवू लागली आहेत आणि दुसरीकडे शहरामधली जागा सम्पल्यामुळे शहरी विकसकही विकासाच्या नावाखाली गावाचे तुकडे मोडू लागले आहेत.
एकीकडे बेभरवशाची शेती, वाईट साम्पत्तिक स्थिती आणि दुसरीकडे शिक्षण कमी, आधुनिक जगात गावकर्यानी जगायचे कसे?