महाराष्ट्राचे वैभवः हेमाडपंती मंदिरे

सदर लेख सुमारे ४-५ वर्षे जुना असून प्रथमतः मनोगत दिवाळी अंकात प्रकाशित झाला होता. या विषयावर वाचन मर्यादित झाल्याने सध्या सर्व प्रश्नांची उत्तरे देता येतीलच असे नाही. परंतु मन यांच्या हेमाडपंती मंदिरे म्हणजे काय या प्रश्नाच्या अनुषंगाने हा तयार लेख येथे टाकत आहे.


प्राचीन भारतात दैवतांची भव्य देवळे बांधण्याची प्रथा गुप्त राजवटीत (इ.स.३२० ते ५५०) सुरू झाली असे मानले जाते. गुप्त कालापासून आजतागायत भारतातील विविध प्रांतात विविध धाटणीची देवळे उभी राहिल्याचे दिसून येते. स्थानिक स्थापत्यशास्त्र, शिल्पकला, कलाकुसर वगैरेंचा या देवळांच्या बांधकामावर मोठा प्रभाव दिसतो. स्थापत्यशास्त्राचे हे पुरावे तत्कालीन संस्कृतीची ओळख आणि माहिती करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. खजुराहो, कोणार्क, हम्पी आणि चालुक्यांची बदामी येथील मंदिरे त्यांच्या स्थापत्य आणि शिल्पकामांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत आणि पर्यटनस्थळेही गणली जातात।

महाराष्ट्रातही अतिशय सुंदर, घडीव आणि अप्रतिम शिल्पकामाने सजवलेली प्राचीन मंदिरे अस्तित्वात आहेत याची माहिती अनेकांना नसते. महाराष्ट्रात प्रामुख्याने दगडी बांधकामाची आणि अप्रतिम कोरीव नक्षीकामाने सजवलेली जी देवळे दिसतात ती बरेचदा हेमाडपंती या नावाने ओळखली जातात. वेरूळचे घृष्णेश्वराचे मंदिर, अंबरनाथचे शंकराचे मंदिर, नाशिकजवळील गोंदेश्वर मंदिर, गोदावरीच्या तीरावरील मंदिरे, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा कळस, ज्योतिबाच्या डोंगरावरची देवळे, शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव, रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, तुळजापूरचे मंदिर, त्र्यंबकेश्वराचे मंदिर इत्यादी. हेमाडपंती पद्धतीत थोडा बदल करून सासवडचा संगमेश्वर व वटेश्वर, धावडशी येथील परशुरामाचे आणि पालीचे खंडोबाचे देऊळ इ. मंदिरे बांधली आहेत. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांत हेमाडपंती मंदिरे आहेत. हयहैय, यादव, चालुक्य हे तत्कालीन राजे शिवभक्त असल्याने महाराष्ट्रात हेमाडपंती बांधणीची शिवमंदिरे प्रामुख्याने दिसतात.sangameshwar

चुन्याचा दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. बांधकाम करण्यासाठी चुना, माती न वापरल्याने या मंदिरांचे बांधकाम कोरडे आहे. दगडांवरील सुबक शिल्पकला आणि पटईची छते या मंदिरांना एक आगळे रूप प्रदान करतात. या मंदिरांची बांधकामे यादव काळात सुरू झाली असावी असा सर्वसाधारण समज दिसतो. तज्ज्ञांच्या मते यादव काळापूर्वीही अनेक वर्षे असे बांधकाम झाल्याचे आढळते. उत्तरेत कोरड्या बांधकामाची मंदिरे बांधण्याची प्रथा पूर्वापार होती आणि बदामीच्या चालुक्यांच्या काळातही अशी मंदिरे बांधली गेल्याचे सांगितले जाते. पण हे बांधकाम फार मोठ्या प्रमाणात झालेले नसावे आणि महाराष्ट्रात त्याचा प्रसार झालेला नसावा असे मानले जाते. परंतु यादव काळात आणि त्या नंतर हेमाडपंती बांधकामाचा मोठ्याप्रमाणात प्रसार झाल्याचे दिसते. याचे एक मुख्य कारण मूर्तिभंजक मुसलमानांचा महाराष्ट्राला होणारा उपद्रव हे असावे. हेमाडपंती मंदिरे पक्क्या बांधकामाची नसल्याने ही मंदिरे झटकन उभारणे शक्य होत असावे. अर्थातच, दर्जा भरून पक्के बांधकाम नसल्याने सद्यस्थितीत ज्या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला नाही ती मोडकळीला आलेल्या अवस्थेत दिसतात. भूकंप, पूर, पावसाच्या मार्‍याने होणारी झीज, दगडांच्या भेगांतून पसरत जाणार्‍या झाडाझुडपांनी मंदिरांची दुर्दशा केली आहे.
Amruteshwar

यादव राजे कलाप्रेमी असल्याने हेमाडपंती धाटणीची अनेक मंदिरे या काळात निर्माण झाली. त्यांची धाटणी, शिल्पकाम, बांधकाम यांत कमालीचे साम्य आढळते आणि तरीही प्रत्येक मंदिराचे आपले स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य दिसून येते. या मंदिराचे स्थापत्यकार हेमाडपंत यांच्या अभियांत्रिकी कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडे असले तरी या युगपुरुषाबद्दल फारशी माहिती महाराष्ट्राला नाही.

हेमाडपंत

हेमाडपंत हे हेमाद्री पंडित या नावानेही ओळखले जातात. हेमाडपंतांविषयी अनेक स्थानिक लोककथा प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक अशी:

हेमाडपंतांच्या जन्माच्या वेळेस त्यांच्या आईचा बाळंतपणात मृत्यू झाला. पोरका हेमाद्री अतिशय प्रतिभावान आणि विद्वान होता. त्याने भाषा आणि विविध शास्त्रांत प्रावीण्य प्राप्त केले. वैद्यकशास्त्रात त्याचा हात धरणारा दुसरा कोणी नव्हता. असे सांगतात की रावणाचा भाऊ बिभीषण आजारी असताना हेमाद्रीने त्याची शुश्रूषा केली आणि त्याच्या बदल्यात प्रसन्न होऊन बिभीषणाने हेमाद्रीला वर मागण्यास सांगितले. लंकेच्या समृद्धीवर भाळलेल्या हेमाद्रीने लंकेसारखी मंदिरे राक्षसांकरवी आपल्या प्रदेशात बांधण्याचा वर मिळवला आणि बिभीषणाने तो आनंदाने देऊ केला. मात्र त्याने एक अट घातली. ती अशी की राक्षस फक्त एकच रात्र काम करतील. दर्जा भरून केलेले बांधकाम नसल्याने हेमाडपंतांनी एका रात्रीत सर्व मंदिरे उभी केली. या आख्यायिकेबरोबरच हेमाडपंत श्रीलंकेतून लिपी शिकून आल्याची दुसरी एक आख्यायिका ऐकायला मिळते. हीच लिपी मोडी म्हणून प्रसिद्ध झाल्याचे कळते. परंतु मोडी ही शिकस्ता या फारशी लिपीवरून अस्तित्वात आल्याचा दुसरा मतप्रवाहही दिसतो।

आख्यायिका बाजूला सारून ऐतिहासिक हेमाडपंतांचा शोध घेतला असता हेमाद्री पंडित हे यादवांच्या काळातील मुख्य प्रधान होते असे दिसून येते. यादव राजे महादेव (इ. स. १२६०-७०) आणि रामचंद्र (इ. स. १२७१-१३०९) यांच्या काळातील हे अतिशय विद्वान मंत्री असावेत. यादव साम्राज्याचे ते प्रधान, मुख्य सचिव असल्याने आणि याचबरोबर जमिनीची पाहणी करून महसूल ठरवणे, तो वसूल करणे, उत्पन्न ठरवणे इ. हेही करत असल्यामुळे त्यांना "श्रीकरणाधिप" (जमाबंदीचे प्रमुख) या पदवीनेही ओळखले जाते.

हेमाडपंतांचा जन्म द. कर्नाटकात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कामदेव होते. पुढे ते कर्नाटक सोडून महाराष्ट्रात स्थायिक झाल्याचे कळते. हेमाडपंत संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक तर होतेच, परंतु लेखक, कवी, स्थापत्यशास्त्रज्ञ आणि धन्वंतरीही होते. यादवांच्या दरबारातील एक विद्वान मुत्सद्दी म्हणून त्यांची गणना होते. धर्मशास्त्रावरील चर्तुर्वग चिंतामणी हा ग्रंथ, आयुर्वेदरसायन हे वाग्भटाच्या अष्टांगहृदय या ग्रंथावरील भाष्य, आणि इतरही अनेक साहित्यनिर्मिती त्यांनी केल्याचे सांगितले जाते. मराठी भाषेसाठी देवनागरीपूर्वी वापरण्यात येणार्‍या मोडी लिपीचा शोधही त्यांनी लावल्याचे सांगितले जाते. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे व डॉ. भांडारकरांच्या मते ही लिपी हेमाडपंत श्रीलंकेतून घेऊन आल्याचे सांगितले जाते, परंतु इतर तज्ज्ञ ते ग्राह्य मानत नाहीत।

स्थापत्यशास्त्रात हेमाडपंतांनी चुना किंवा मातीचा दर्जा न भरता मध्यम आकाराचे दगड कापून, खालच्या दगडात खड्डा करून वरील दगडाची खुंटी एका विशिष्ट कोनात खालच्या दगडाच्या खड्ड्यात बसवून घडीव वास्तू बांधण्याची कलाही प्रसिद्ध केली. हे दगड तासून त्यावर कोरलेल्या शिल्पाकृती तत्कालीन संस्कृतीचे आणि कलाविष्काराचे उत्तम नमुने आहेत. थोड्याशा परावर्तित प्रकाशातही मंदिराच्या वास्तुयोजनेतील सौंदर्य कायम ठेवल्याचे दिसते आणि संपूर्ण वास्तूच्या उंचीचा किंवा वर झेपावत जाणार्‍या स्थापत्याच्या प्रभाव पडणे हे या मंदिर रचनांचे वैशिष्ट्य मानले जाते।

अशा अनेक मंदिरांच्या निर्मितीमुळे यादव साम्राज्याच्या आधीही अस्तित्वात असणाऱ्या या स्थापत्यकलेला हेमाडपंतांच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसते. या शैलीचे प्रसिद्ध उदाहरण म्हणून वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचे नाव घेता येईल आणि हेमाडपंती स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून नाशिकजवळील गोन्देश्वर मंदिराचे नाव घेता येईल.

घृष्णेश्वर मंदिर

औरंगाबादजवळील दौलताबादेपासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर असणारे घृष्णेश्वराचे शिवमंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांतील एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग गणले जाते. लाल पाषाणात अप्रतिम कोरीव काम केलेले हे मूळ मंदिर पुरातन असून, सोळाव्या शतकात शिवाजीराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले आणि त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याने ते अद्यापही चांगल्या अवस्थेत आहे.DSC_1253_resize
घृष्णेश्वराचे प्राचीन मंदिर कसे अस्तित्वात आले याबद्दलही अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार, घृष्मा (किंवा घृष्णा) नावाची एक शिवभक्त स्त्री दरदिवशी शिवलिंग बनवून नंतर ते भक्तिभावाने शिवतीर्थात विलीन करत असे. या बाईला घरात आपल्या सवतीकडून बराच जाच होता. एके दिवशी सवतीने घृष्मेच्या मुलाला कपटाने ठार केले. दु:खाने वेडीपिशी झालेली घृष्मा शिवतीर्थावर येऊन शंकराची पूजा करून आळवू लागली आणि त्याच शिवतीर्थातून तिचा मुलगा पुनर्जीवित होऊन परतला. यावेळेस शंकराने तिथे उपस्थितांना दर्शन दिले आणि गावकऱ्यांनी शंकराचे मंदिर त्या ठिकाणी बांधले, जे घृष्णेश्वराच्या नावाने प्रसिद्ध झाले।
DSC_1256_resize

अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख येथे आढळून येतो. त्यानुसार ' श्री शके १६९१ विरोधी वत्सरी माघ सुरी नाग बुध दिनी होळकर कुलाल वाल कल्पवल्ली श्री अहिल्याबाईने श्री तीर्थराज शिवालयाचा जीर्णोद्धार केला असे श्रीरस्तू शिवमाकल्पं' हे कोरलेले आढळते. आज सुमारे एक एकर क्षेत्रफळात वसलेले हे मंदिर मालोजीराजे आणि अहिल्याबाईंनी केलेल्या जीर्णोद्धारामुळे सुस्थितीत आहे. मंदिराच्या चार दिशांना चार महादरवाजे असून चौरसाकृती शिवतीर्थासभोवती अष्टतीर्थांची आठ सुंदर आणि सुबक देवालये येथे आहेत. शिवमंदिराचे गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप असे तीन मुख्य भाग असून मंदिराचा आकाशाच्या दिशेने झेपावाणारा उंच कळस आणि त्यावरील अप्रतिम कोरीव काम लक्षवेधक आहे.

गोन्देश्वर मंदिर

नाशिकपासून सुमारे २६ कि.मी. अंतरावर सिन्नर येथील गोन्देश्वराचे मंदिर हा हेमाडपंती स्थापत्यकलेचा आणखी एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. मध्ययुगीन काळातील अतिशय सुंदर आणि सुबक कारागिरीचा आविष्कार म्हणून गोन्देश्वर प्रसिद्ध आहे. या मंदिराचे मूळ नाव गोविंदेश्वर असल्याचे सांगितले जाते. सुमारे सातशे वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. त्यांच्या कारकिर्दीत या मंदिराची निर्मिती झाल्याचा इतिहास कळतो. या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर पडले असावे असा अंदाज बांधला जातो तर काही तज्ज्ञांच्या मते इ.स. ११६० मधील यादव राजा गोविंदराज याच्या नावावरून या मंदिराचे नाव गोन्देश्वर (गोविंदेश्वर) पडले असावे असाही कयास बांधला जातो. महाराष्ट्रात आढळणार्‍या मध्ययुगीन वास्तूंपैकी अत्युत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून गोन्देश्वर मंदिराची गणती होते.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराची वास्तू पायर्‍या पायर्‍यांनी बनलेल्या १२५ फूट x ९५ फूट मापाच्या ओट्यावर उभी आहे. मंदिराची बांधणी अतिशय प्रमाणबद्ध आणि सममितीत असून स्थापत्य अतिशय मोहक आहे. संपूर्ण मंदिराचा परिसर सुमारे आठ हजार चौरस फुटांचा आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून दक्षिणेकडूनही त्याला दरवाजा आहे.

हे मंदिर इतर हेमाडपंती मंदिरांपेक्षा किंचित वेगळे असून उत्तरेकडील नागरी मंदिरांची झाक त्यावर दिसते. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोन्देश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. इतर मंदिरांपेक्षा मुख्य मंदिर थोडे उंचावर असून मंदिराचे सभामंडप आणि गर्भगृह असे भाग आहेत. गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पट्टईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीव कामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्‍या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते।

नैसर्गिक उत्पात आणि मानवी औदासिन्यातून टिकून राहिलेली ही मंदिरे काही स्थानिकांच्या आस्थेतून अद्याप सुस्थितीत आहेत. कला, शिल्प आणि स्थापत्याचा हा समृद्ध वारसा असल्याचे ध्यानात आल्यावर पुरातत्त्वखात्यानेही या मंदिरांकडे लक्ष पुरवण्यास सुरुवात केली आहे. शासनाने या स्थळांचा पर्यटन विकास केल्यास आणि स्थानिकांनी योग्य काळजी घेतल्यास सर्वांच्या अथक प्रयत्नांतून आणि श्रद्धेतून महाराष्ट्राला हेमाडपंतांनी दिलेला हा वैभवशाली वारसा टिकून राहील याची खात्री वाटते।

आभार: या लेखाला माहितीचा हातभार लावण्याबद्दल चित्तरंजन भट आणि शुद्ध मराठी यांची आभारी आहे. संगमेश्वर, अमृतेश्वर आणि घृष्णेश्वर मंदिरांची प्रकाशचित्रे उपलब्ध करून दिल्याबद्दल ध्रुव मुळे यांची आणि गोन्देश्वर मंदिराचे प्रकाशचित्र उपलब्ध करून दिल्याबद्दल पराग पुरंदरे यांची अतिशय आभारी आहे.

Comments

वा....

छान. उपयुक्त. संक्षिप्त; पण बरेच माहितीपूर्ण.
पूर्वीच्या शंका मिटल्या . आता नवीन शंका आहेत. वेल मिळाला की/तर पुन्हा येउन टंकतो.

उत्तम लेख

माहितीपूर्ण लेख.

बाकी लेखामध्ये शिलाहारांचा उल्लेख नसल्याने आश्चर्य वाटले.
९ व्या शतकात शिलाहार राजांनी कोकण आणि घाटमाथ्यावर अनेक हेमाडपंथी बांधणीची मंदिरे बांधली.
शिलाहार राजा झंझ याने रतनवाडीतील अमृतेश्वर, खिरेश्वरचे नागेश्वर, पूरचे कुकडेश्वर, हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वर अशी एकाहून एक सरस मंदिरे बांधली.

धन्यवाद

लेख हेमाडपंत, प्रचलित आख्यायिका आणि काही प्रसिद्ध बांधकामांवरून शैलीची ओळख अशा प्रकारे लिहायचा असल्याने बहुधा त्यावेळी शिलाहार राजांकडे लक्ष गेले नसावे. तसेच त्यावेळी जेवढी माहिती उपलब्ध झाली त्यावर लेख बेतला.

अमृतेश्वराचा फोटो वर दिला आहेच. अतिशय सुरेख मंदिर आहे हे. या प्रतिसादात मोठा फोटो पुन्हा एकदा लावते. तुमच्या अधिकच्या माहितीबद्दल धन्यवाद. अशी अजूनही माहिती असेल तर कृपया, येथे द्यावी.

Amruteshwar

अवांतर :- शिलाहार

प्रतिसाद उत्तम.
शिलाहर ह्या शब्दाबद्दल अवांतर.
शिलाहरांचे आजचे वंशज शेलार आडानावाची पब्लिक आहे म्हणे.
शिलाहार राज्य आकाराच्या दृष्तीने सातवाहन वगैरेंइतके मोटेह बलाढ्य नव्हते. पण कला, बाम्धकाम ह्यात त्यांनी बरेच काही केलेले आहे.
महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, कोकण किनारपटीवर काही ठिकाणी आणि गोव्यात, उत्तर कर्नाटकात ह्यांचा वट असावा.
बलाढ्य पन्हाळा किल्ला शिलाहरांनीच बांधल म्हणतात.
कदंबांनी ह्याम्ना हरवून सत्ता ताब्यात घेतली . कदंबांना हरवून यादवांनी प्रभावक्षेत्र वाढवलं.

शिलाहारकालीन मंदिरे

अमृतेश्वराचे मंदिर पाहण्याचा योग आतापर्यंत ४/५ वेळा येऊन गेला.

शिलाहारकालीन सर्व हेमाडपंथी बांधणीच्या मंदिरांच्या स्तंभांवर भारवाहक यक्ष/यक्षिणी/योगिनी आढळतात. बौद्ध लेण्यांत असलेल्या भारवाहक यक्षांच्या शिल्पांवरून कदाचित ही संकल्पना हिंदू मंदिरांमध्येही आली असावी.

शिलाहार साम्राज्य उत्तर कोकण, द़क्षिण कोकण व घाटमाथ्यानजीकचा परिसर इथपर्यंत सिमीत होते.
फक्त पन्हाळाच नव्हे तर चंदन-वंदन, केंजळगड, वैराटगड, कमळगड, रोहिडा, कल्याणगड, पांडवगड, रांगणा, अजिंक्यतारा, विशाळगड, भूदरगड हे गिरीदुर्ग तर जयगड, विजयदुर्ग जलदुर्ग हे पण शिलाहारांचीच निर्मिती.

शिलाहार राजे

शिलाहार राजे हे सार्वभौम राजे नसून राष्ट्रकूट साम्राज्याचे मांडलिक किंवा संस्थानिक राजे होते. त्यामुळे त्यांची सत्ता उत्तर कोकण,दक्षिण कोकण व कोल्हापूर एवढीच मर्यादित राहिली. यापैकी कोल्हापूरचा राजा हा कोकणातील संस्थानिकाशी संलग्न नसून स्वतंत्र होता. या कारणांमुळे शिलाहार राज्यातील मंदिरे, किल्ले वगैरे बांधकामे फक्त याच भागात (कोकण व कोल्हापूर) केली गेली.

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर

आमच्या कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर ही हेमाडपंती आहे.
प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी केलेली आहे, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात (अडक पद्धतीने) करण्यात आलेली आहे. देऊळ पश्चिचमाभिमुख आहे, मात्र हे महालक्ष्मीचे मंदिर कोणी बांधले हे निश्चिततपणे सांगता येत नाही.

देवळात एकूण चार शिलालेख दिसतात. हे शिलालेख देवनागरी तत्सम भाषेत आहेत असे जाणकार म्हणतात. त्यापैकी पहिला मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. हा शिलालेख आपल्याला पूर्वेकडे असलेल्या दरवाजामधून प्रवेश करताना लागतो. दुसरा शिलालेख मंदिराच्या परिसरातच असणाऱ्या दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरेश्वगराच्या देवळाच्या भिंतीवर असून त्यावर शके ११४० मध्ये कोरलेला आहे असा उल्लेख सापडातो. तिसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या एका खांबावर असून तो शके ११५८ चा आहे. आणि चौथा शिलालेख मंदिराच्या डाव्या बाजूला (घाटी दरवाजाच्या शेजारी) असलेल्या नवग्रहांच्या छोटया देवळातील एका खांबावर आहे.

माझ्याकडे महालक्ष्मी मंदिर माहितीचे छोटे पुस्तक आहे त्यानुसार व विकिपीडियातील माहितीनुसार सध्याच्या मंदिराचा मुख्य भाग इ. स. 600 ते 700 या शतकातले असल्याचे दाखले मिळतात, परंतु प्रत्यक्ष उपलब्ध पुरावे पुढीलप्रमाणे – राष्ट्रकुल राजा पहिला अमोघवर्मा याचा इ. स. 793 मधला ठाणे जिल्ह्यात संजान गावी मिळालेला ताम्रपट या ताम्रपटात राष्ट्रकूट नॄपती प्रथम अमोघवर्ष याने काही सार्वजनिक आपत्तीच्या निवार्णार्थ आपल्या डाव्या हाताची अंगुली महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख आला आहे. सन 980 मध्ये शिलाहाराने दिलेला ताम्रशासन (म्हणजे काय? याचा फक्त उल्लेखच जागोजागी आढळतो) हे दोन प्राचीन पुरावे.
आठव्या शतकात भूकंपामुळे हे मंदिर खचल्यामुळे नवव्या शतकाच्या कालावधीत राजा गंडवादिक्ष याने मंदिराचा जीर्णोद्धार व विस्तार केला. त्याने नवीन महाकालीचे मंदिर बांधले तर सन 1178 ते 1209 या काळात शिलाहार राजा जयसिंग व राजा सिंघल यांच्या कारकीर्दीत दक्षिण दरवाजा व अतिबलेश्वार मंदिर बांधले. सन 1218 मध्ये यादव तौलम याने पश्चिम द्वार (महाद्वार) बांधले. याच राजाने देवीला जडजवाहीर अर्पण करून द्रव्य दिल्याचा उल्लेख मंदिरातील गारेचा गणपती श्री सिद्धिविनायक मंदिरातील खांबावर आढळतो.


मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे कार्तिक आणि माघ महिन्यात ठराविक तीन दिवशी संध्याकाळी सूर्यकिरणे महाद्वारातून (पश्चिम दरवाजा) प्रवेश करून गाभाऱ्यापर्यंत पोहचतात आणि तेथून ती महालक्ष्मीच्या मूर्तीवर पडतात. ही किरणे पहिल्या दिवशी प्रथम महालक्ष्मीच्या पायावर पोहचतात, दुसऱ्या दिवशी देवीच्या कमरेपर्यंत पोहोचतात आणि तिसऱ्या दिवशी तेथून हळूहळू तिच्या मस्तकापर्यंत जातात. हा वास्तुशास्त्रातला वैशिष्टपूर्ण खेळ तीन दिवस फक्त पाच मिनिटेच चालतो. याला किरणोत्सव असे म्हणतात.
देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत आणि त्याची बांधणी कोल्हापूरातच मिळणाऱ्या काळया दगडात केली आहे. कोल्हापुरातील प्रसिद्ध रंकाळा तलावाचा शाहू महाराजांनी विकास करण्याआधी तिथे असणारी खण म्हणजे महालक्ष्मीच्या देवळासाठी लागणारा दगड काढलेली खाण असे मानले जाते. महालक्ष्मीच्या मूर्तीच्या बरोबर वर दुसऱ्या मजल्यावर शिवलिंग आहे आणि ते मातुलिंग म्हणून ओळखले जाते. महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात उभारले असता दुसरा वर मजला असेल असे वाटत नाही.
याखेरीज महालक्ष्मी मंदिर संदर्भात बाकी विशेष काही स्थापत्यसंबंधीचीची मला माहिती मिळत नाही / मिळाली नाही.

मस्त!

सुरेख प्रतिसाद.

अशाच प्रकारे इतर मंदिरांची थोडी फार माहिती येथे प्रतिसादांतून मिळत गेल्यास बरीच माहिती गोळा होईल.

मंदिरातील शिलालेखांविषयी काही सांगता येईल का?

तसेच,

सन 980 मध्ये शिलाहाराने दिलेला ताम्रशासन (म्हणजे काय? याचा फक्त उल्लेखच जागोजागी आढळतो)

हे म्हणजे काय? ते नेमके कळले नाही. काही अधिक प्रकाश पाडता येईल का?

ताम्रशासन

सन 980 मध्ये शिलाहाराने दिलेला ताम्रशासन

ताम्रशासन म्हणजे ताम्रपट.

शिलालेख एकाकडून दुसरीकडे घेऊन जाणे अवघड झाल्यामुळे ताम्रपटांचा वापर सुरु झाला. वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, शिलाहार यांचे शिलालेख आणि ताम्रपट दोन्ही आढळतात.
सर्वसाधारणपणे ताम्रपटाचे एकूण तीन पत्रे असतात. पहिल्या पत्र्याची दर्शनी बाजू कोरीव असे व त्यावर लेख नसे. त्याच्या आतील बाजूस लेखाची सुरुवात होई. मधल्या पत्र्याच्या दोन्ही बाजूवर लेख कोरला जाई व तिसर्‍या पत्र्याच्या आतील बाजूवरही लेख कोरला जात असे. तिसर्‍या पत्र्याची बाहेरील बाजूही कोरीच असे. तिन्ही पत्र्याच्या कडा उंचावलेल्या व मधली बाजू खोलगट त्यामुळे पत्रे एकमेकांवर ठेवल्यावर पेटीसारखे दिसत व आतील मजकूर घासला न गेल्यामुळे सुरक्षित राही. तिन्ही पत्र्यांच्या कडेला भोक पाडून त्यातून धातूची तार ओवली जाई व तारेची दोन्ही टोके एकत्र करून त्यावर राजमुद्रा ठोकली जाई. राजेलोक दानधर्म करत हे दान ताम्रपटावर नोंदवून दात्याला दिले जाई व तो एक कायदेशीर दस्तावेज असे.

दिवेआगरचा ताम्रपट महाराष्ट्रातला सर्वात प्राचीन समजला जातो.

धन्यवाद!

हे ताम्रपट कुठे पाहायला मिळतील का? (म्हणजे फोटो वगैरे चढवता येतील का?)

भटक्या, माहितीकरता अनेक धन्यवाद. तुमचे सर्वच प्रतिसाद अतिशय वाचनीय असतात असे या निमित्ताने लिहिते.

ताम्रपटांचे फोटो

धन्यवाद प्रियाली.

आंतरजालावर काही ताम्रपटांचे फोटो उपलब्ध आहेत.

दिवेआगर ताम्रपटाचे वाचन आणि भाषांतर द्यायचा लवकरच प्रयत्न करतो.

स्वतंत्र लेख लिहा

दिवेआगर ताम्रपटाचे वाचन आणि भाषांतर द्यायचा लवकरच प्रयत्न करतो.

नक्की करा. किंबहुना, स्वतंत्र लेख लिहाच ही विनंती.

ताम्रपट्...आंतरजाल....

ताम्रपट, दिवेआगर ह्या शब्दावरून मराठी आंतर्जलावरचे काही धागे आठवले. आधी ते बघावेत. लागल्यास त्यात भर घालावी.
http://mr.upakram.org/node/3732 (दिवेआगर)
http://mr.upakram.org/node/3729 (दिवेआगरचा गणपती)
http://www.misalpav.com/node/21649 (वीरगळ आणि गधेगाळ)

दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही दहा टक्क्याची मर्यादा अजून गेलेली नाही

हेमाडपंती मंदिरे.

"हेमाडपंती म्हणजे काय" ह्या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे द्यावे असे मला काही माहीत नाही. 'A survey of Hemadpanti temples in Maharashtra' by Omkar Prasad Verma, 1973, Nagpur University असे एक छोटेखानी पुस्तक मला जालावर दिसले पण ते केवळ नावाच्या स्वरूपात. त्या पुस्तकात काही निश्चित माहिती असेल असे त्याच्या नावावरून वाटते.

पु.ग.सहस्रबुद्धेलिखित 'महाराष्ट्र संस्कृति' ह्या पुस्तकाच्या पृ. २३८ वर पुढील त्रोटक माहिती आहे. 'रामदेवराव यादवाचा प्रधान हेमाडपंत ह्याने एका विशिष्ट पद्धतीने महाराष्ट्रात अनेक देवळे बांधली म्हणून ह्या पद्धतीस 'हेमाडपंती 'असे नाव पडले. हेमाडपंती पद्धतीच्या मंदिरांची रचना चुना किंवा माती न घेता फक्त एकावर एक दगड ठेऊन केली जाते. देवालयाच्या पायाची आखणी ज्या आकाराची असेल त्याच आकाराची पण लहान अशी शिखराची बैठक असते. प्रमुख दिशांना कोन येतील असा चौकोन कल्पून एका कोनासमोर प्रवेशद्वाराची व्यवस्था केलेल्या ह्या इमारतीच्या पायाची आखणी कोनबद्ध असते. ह्या पायावर उभारलेल्या भिंतींनी जे कोन बनतात त्या सर्व कोनांच्या रेषा जमिनीपासून कळसापर्यंत गेलेल्या असतात.' पुढे अंबरनाथ येथील शिवमंदिर, सिन्नर येथील मंदिर अशी काही उदाहरणेहि उल्लेखिलेली आहेत.

'महाराष्ट्र संस्कृति -घडण आणि विकास' ह्या प्रा. ह.श्री. शेणोलीकर/प्र.न.देशपांडेलिखित पुस्तकात प.१०९ वर असा उल्लेख आढळतो की ही मध्यभारतीय शैली हेमाडपंताने महाराष्ट्रात प्रचलित केली. महेश्वर/मेहेकर/सिन्नर/अंबरनाथ/औंढे नागनाथ अशा मंदिरांचा ह्या शैलीची मंदिरे म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

शाळेत ऐकल्याप्रमाणे आणि तसेच जालावर मिळालेल्या काही त्रोटक उल्लेखांवरून असे वाटते की अशा मंदिरांची वैशिष्टये पुढीलप्रमाणे मानता येतील. ही मंदिरे काळ्या पाषाणाचे मोठे चिरे एकमेकांवर वजनाच्या दडपणाने बसविलेले असतात. त्यांच्या जोडणुकीत चुना वा तत्सम बंधकाचा उपयोग नसतो. (बांधकामाच्या टिकाऊपणाला केवळ वजन पुरेसे पडेल काय?) बांधकामात लाकडाचा उपयोग जवळजवळ नसतो आणि दारे खिडक्याहि अगदी कमीतकमी असतात. मंदिरावर विटा वापरून बांधलेला आणि निमुळता होत गेलेला कंगोरेदार कळस असतो. त्याच्या आधारासाठी त्याच्या खाली एकमेकांशी ४५ अंश कोन करून बसविलेले आणि लहान होत जाणारे लांब चिर्‍यांचे चौरस असतात.

ह्या शैलीस 'हेमाडपंती' हे नाव केवळ महाराष्ट्रातच प्रचलित आहे असे दिसते. 'History of Indian and Eastern Architecture' ह्या सर जेम्स फर्ग्युसनलिखित पुस्तकात हेमाडपंताचा उल्लेखहि नाही आणि त्याच्या नावाच्या काही शैलीचाहि नाही. 'Encyclopaedia of Indian temple architecture' ह्या १९९१ साली प्रकाशित झालेल्या मायकेल माइस्टर/मधुसूदन ढाकीलिखित पुस्तकातहि अशा शैलीचा काही उल्लेख मिळत नाही.

हेमाडपंताच्या पूर्वी होऊन गेलेल्या शिलाहार राजांनी ठिकठिकाणी बांधलेली मंदिरेहि 'हेमाडपंती' आहेत असे म्हणण्याचा प्रघात आहे. ह्या सर्व गोष्टींचा आणि माहितीच्या अभावाचा विचार करता असे वाटते की अन्यत्र आधीच वापरात असलेली एक शैली हेमाडपंताच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात पसरली आणि कोठेतरी (केव्हा आणि कोणामुळे हे माहीत नाही) तिला हेमाडपंताचे नाव चिकटले. महाराष्ट्रापुरते ते नाव रूढ झाले आणि एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे असे संक्रमित होत गेले. महाराष्ट्रात तिला 'हेमाडपंती' म्हणता ही बाब महाराष्ट्राबाहेर कधीच प्रसारित झाली नाही. 'हेमाडपंती शैली' हा एक मराठी सांस्कृतिक प्रघात निर्माण झाला.

धन्यवाद

अशाप्रकारची मंदिरे कोणी जवळून पाहिली असतील तर त्यांचे फोटो आणि माहिती या धाग्यात किंवा स्वतंत्र दिली तरी आवडेल.

कोल्हापूर जवळ

कोल्हापूरजवळ राधानगरीला जाताना पळसंबे म्हणून एक गाव आहे, तेथे अशीच काही मंदिरे आहेत जंगलात. एकाच शिळेत कोरलेली. सापडली तर फोटो नक्की टाकतो.

पळसंबे काही चित्रे

या दुव्यावर काही चित्रे आहेत.

पळसंबे

 
^ वर