दिवेआगर

दिवेआगरातील सोन्याच्या गणेशमूर्तीच्या चोरीच्या संदर्भात 'उपक्रमा'त ह्या धाग्यावर बरेच लिहिले गेले आहे. त्यावरून सुचले की दिवेआगर ह्या प्राचीन गावाला महाराष्ट्राच्या, मराठी भाषेच्या आणि देवनागरी लिपीच्या इतिहासातहि विशेष जागा आहे. ह्याचे कारण म्हणजे ह्या जुन्या पण समृद्ध गावात सापडलेले तीन ताम्रपट आणि शिलालेख. त्यांचे वर्णन पुढे देत आहे.

ह्यांपैकी पहिला लेख म्हणजे शके ९८२ (इसवी १०६०) मध्ये कोरलेला एक ताम्रपट, जो दिवेआगरात मिळाला आणि ज्याच्यामध्ये दिवेआगराचा उल्लेख आहे. हा मराठीमध्ये लिहिलेला आहे असे वाचताक्षणी कळते आणि मराठी लेखांमध्ये तो श्रवणबेळगोळाच्या लेखानंतर (इसवी ९८१) लगेचच येतो. मराठीतील दुसर्‍या क्रमांकाचा जुना असा हा लेख असावा आणि त्यामुळे मराठी भाषेच्या इतिहासातील तो एक महत्त्वाचा दुवा आहे. (*टीप पहा.)

हा ताम्रपट आणि त्याचे वाचन असे आहे:

इ.स. १०६०चा ताम्रपट
इ.स. १०६०चा ताम्रपट

ताम्रपटातील लेखाचा स्पष्ट अर्थ मला कोठे सापडला नाही पण त्याबाबतचा माझा तर्क नोंदवितो: शके ९८२ मध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी वासुदेवभट्ट आणि शिव घैसास ह्यांनी दोन शासने (वतनपत्रे?) मावलभट्टापाशी ठेव म्हणून जमा केली. तसेच सात, वीस आणि शंभर (१२७) सुवर्ण(नाणी?) योगक्षेमासाठी ठेविली. ह्याला दिवेआगरचे पौवदेव, तिकै (?), जीवण, नागरुद्रभट्ट, मधुवै आणि मधुवै देवल हे साक्ष आहेत. (षडंगवि हे आडनाव आहे का सहा वेदांगे जाणणारा विद्वान् ब्राह्मण असा त्या शब्दाचा अर्थ आहे? डॉ. तुळपुळे-संपादित ’मराठी कोरीव लेख’ ह्या पुस्तकात स्पष्ट अर्थ दिला असेल असे वाटते पण ते पुस्तक मला उपलब्ध नाही. कोणाला ते उपलब्ध असल्यास त्यातील अर्थ येथे आणावा अशी विनंति आहे.) ह्या ताम्रपटाबाबत हे ध्यानात घ्यायला हवे की तो कोणा राजाच्या वा मोठया अधिकार्‍याच्या आज्ञेवरून लिहिला गेलेला नाही तर काही खाजगी व्यवहाराची पक्की नोंद ठेवण्यासाठी लिहिला आहे.

(थोडे अवान्तर. श्रवणबेळगोळा येथील बाहुबली मूर्तीच्या पायाशी कोरलेला लेख (इ.स. ९८१) असा आहे.

मराठीतील आद्य लेख
मराठीतील आद्य लेख

त्याचे वाचन 'श्री चावुंडराये करवियले श्री गंगराये सुत्ताले करवियले' असे आहे.)

Corpus Inscriptionum Indicarum मालेचा ६वा भाग म.म.वा.वि.मिराशीसंपादित असून तो शिलाहार राजांच्या लेखांबद्दल आहे. त्यातील छापील पाने ६० आणि १७२ येथील लेख दिवेआगराशी संबंधित आहेत. त्यांची चित्रेहि तेथे पाहता येतील. (हा ग्रंथ archive.org येथे उपलब्ध आहे.)

ह्यांपैकी पान ६० येथील ताम्रपटाचे महत्त्व असे की त्यामुळे उत्तर कोंकणात राज्य करणार्‍या शिलाहार वंशाच्या पहिल्या ११ राजांची नावे स्पष्ट झाली, ज्याबद्दल मिराशींनी म्हटल्याप्रमाणे थोडा संदेह होता. उत्तर कोकणात तीन-साडेतीनशे वर्षे राज्य केलेल्या ह्या वंशाबाबतचा असा स्पष्ट उल्लेख हे ह्या ताम्रपटाचे ऐतिहासिक महत्त्व. हा संस्कृत भाषेतील लेख दिवेआगरात चंद्राबाई रामचंद्र नकटी ह्यांच्या स.नं. ८८ ह्या शेतात सापडला. शक ९४९ प्रभव संवत्सरामध्ये (सन १०२७) मकरसंक्रांतीच्या दिवशी छित्तपैय्य (११वा शिलाहार राजा) ह्याने वेलासिवागारातील (वेळास गाव, जे जवळच आहे) काही झाडांवरील कर मुक्त करण्याबाबत दीपकागारनिवासी ब्राह्मण गोविंद ह्यास हा ताम्रपट लिहून दिला. दिवेआगरास ह्या लिखात दीपकागार असे म्हटले आहे.

दुसरा छापील पृष्ठ १७२ येथील लेख महामंडलाधिपति अनंतदेव (अखेरीच्या दिवसातील शिलाहार राजा?) ह्याच्या काळात आषाढ कृष्ण अष्टमी शक ११७६ (जुलै ९, १२५४) ह्या दिवशी राजाचा एक मांडलिक राम ह्याने दीपक गावातील गणपति नायक नावाच्या ब्राह्मणाला एक वाटिका दान केली हे नोंदविणारा शिलालेख आहे. हा लेख अजूनहि दिवेआगरातच आहे. लेख अशुद्ध संस्कृतात असला तरीहि त्यामध्ये ’शकु संवतु’ असा स्पष्ट मराठी प्रयोग आहे.

ह्या लेखाच्या प्रारंभी ’यावच्चन्द्रदिवाकरौ’ अशा अर्थी सूर्यचंद्रांचे आणि तळाशी ’गद्धेगाळी’चे चित्र आहे. ह्या दुसर्‍या चित्राचा अर्थ असा. लेखाद्वारे दिलेल्या देणगीत नंतरच्या काळात कोणीहि ढवळाढवळ करू नये अशी स्पष्ट तंबी लेखातच लिहिण्याची पद्धत होती आणि ती तंबी न मानणार्‍यावर काय आपत्ति येईल हेहि लिहून ठेवत. कधीकधी रौरवासारख्या नरकात पडण्याची भीति घातली जाई. पुष्कळदा त्यापलीकडे जाऊन नियम मोडणार्‍याच्या आईवर गाढव अत्याचार करेल असाहि शाप असे आणि त्या शापाचे चित्र - एक गाढव आणि बाई - शेवटी कोरत असत. हेच ते ’गद्धेगाळी’चे चित्र. ह्या लेखाचे अधिक वर्णन येथे पहा. ह्याच संदर्भात ’तेहाची माय गाढवे ***’ असेहि शब्द एका मराठी शिलालेखाखाली आहेत असे डॉ. कोलते ह्यांच्या पुस्तकात वाचल्याचे स्मरते.

हे तीनहि लेख देवनागरीमध्ये आहेत. साधारणतः ह्या लेखांच्या काळाच्या थोडे आधी ब्राह्मी लिपीचे सिद्धमातृका लिपीत, आणि त्या लिपीतून देवनागरी, गुजराथी, बंगाली अशा लिप्यांमध्ये रूपान्तर झाले असा तज्ञांचा समज आहे. मराठीच्या बाळबोध लिपीचा हा उगम आहे.

(*टीप - दिवेआगरात सापडलेला ताम्रपट श्रवणबेळगोळा येथील मराठी लेखानंतर दुसर्‍या क्रमांकाचा असावा हे विधान मी जरा भीतभीतच करत आहे कारण डॉ.तुळपुळे, डॉ.कोलते, डॉ.देव वा कोणी अन्य विद्वानाने संपादन केलेले मराठी लेखांविषयीचे अधिकृत पुस्तक मजजवळ नाही. जंजिर्‍याजवळच्या अक्षी नावाच्या छोटया गावात मिळालेला एक लेख ह्याच ग्रंथात छापील पान १६७ वर आहे. तुळपुळ्यांच्या वाचनानुसार तो शक ९३४ (सन १०१२) चा आहे म्हणजेच श्रवणबेळगोळाच्या थोडाच नंतरचा आहे. हे वाचन जर बरोबर असले तर त्याला मराठी लेखांपैकी क्र. २ चा असे म्हणता येईल. पण अन्य विद्वान हा लेख वेगळ्या प्रकारे वाचतात. वाचनभेदामुळे मिराशी त्याला शक ११३१ (सन १२०९) मध्ये तर मो.ग.दीक्षित शके ११३२ (सन १२१०) मध्ये टाकतात. विद्वानांमधील ह्या मतभेदाला अन्तिम उत्तर मिळणे अवघड आहे.

अक्षीचा लेख जर दुसर्‍या क्रमांकावर नसला तर मात्र दिवेआगरमध्ये सापडलेला इ.स. १०६० चा ताम्रपट त्या क्रमांकावर ठेवता येईल असे दिसते.

थोडे अवान्तर. वर उल्लेखिलेला अक्षीचा लेख आणि त्याच्याजवळचा अन्य एक लेख हे दोघेहि आज दुर्लक्षित अवस्थेत अक्षी गावातच उन्हातान्हात पडून आहेत असे ह्या वार्तेवरून दिसते. अशा ठेव्यांची नीट काळजी का घेतली जाऊ नये? पुढेमागे हे लेख तेथून नाहीसे होऊन देशातील वा बाहेरील कोणा संग्राहकाच्या संग्रहात जाऊन पोहोचले आहेत अशी बातमी वाचायला मिळाली तर आश्चर्य करण्याचे कारण नाही!)

गावातील मुस्लिम काळातील एक शिलालेख आणि अन्य प्राचीन अवशेष ह्यांची माहिती येथे आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

गधेगाळ

जालावर शोधल्यावर अक्षीच्या शिलालेखाचे चित्र आणि माहिती येथे सापडली. या लेखात श्रवणबेळगोळच्या लेखाला नंतरचे ठरवले आहे. कसे ते मात्र कळले नाही.

असो.

अश्वमेध यज्ञ करताना राणीचा संबंध घोड्याशी केला जाई आणि ही एक विधी समजली जाई. कदाचित, राजासाठी राणीने असा विधी करणे वरदानही (पक्षी: फायद्याचे) असावे. ते परिमाण बदलून गधेगाळ हा शाप कधी व का निर्माण झाला असावा? असो. संस्कृतीत अशी परिमाणे बदलत असतातच.

अवांतरः जालावर शोधताना एक गोष्ट लक्षात आली. इंग्रजी विकिपिडीयावरील अनेक पानांवर; मी शोध घेतलेली पाने मराठी भाषा, मराठी साहित्य, श्रवणबेळगोळ, बाहुबली इ. इ. 'श्री चावुंडराये करवियले श्री गंगराये सुत्ताले करवियले' या शिलालेखाला चाट दिली गेलेली आहे. तेथील मराठी भाषा लेखात अक्षीच्या लेखाला आद्य ठरवले आहे. मराठी विकिवर मात्र चावुंडरायेविषयी लेखन आहे. परंतु, तेथे "सर्वांत जुना मराठी लेखनाचा पुरावा सातारा येथे विजयादित्य काळातील ताम्रपट्टीवर आहे (इ.स. ७३९) येथे आहे." अशी नोंद आहे. हा सातार्‍यातील लेख कोणता?

बाकी, लेख आवडला हे वेगळे सांगायला नको.

हे विधान तर्कबुद्धीस पटत नाही...

<<अश्वमेध यज्ञ करताना राणीचा संबंध घोड्याशी केला जाई आणि ही एक विधी समजली जाई.>>

वेदांमधील अश्वमेधाशी संबंधित सूक्त वाचताना त्यात हे उल्लेख आढळले. पण हा भाग घोड्याचा बळी दिल्यानंतर त्याच्या मृत शरीरासमवेत करायच्या विधींमध्ये मोडतो. 'राणीचा घोड्याशी संबंध, हे चुकीचे भाषांतर असून राणीने मृत घोड्याच्या सहवासात काही कालक्रमणा करावी', असा अर्थ अभिप्रेत असल्याचे मतांतर काही विद्वानांनी मांडले होते. (अवांतर - वेदांतील अनेक सूक्ते व ऋचा या वरकरणी वाचताना अश्लील व अर्थ उच्चारण्यास लज्जा वाटेल, अशाच आहेत. वेदातील अशा संकेतांमागे गूढ अर्थ काय आहेत, हे अद्याप उकललेले नाही. असो. )

घोडा जिवंत असताना काय किंवा बळी दिल्यानंतर काय केव्हाही मानवी शरीराशी त्याचा संबंध घडवणे किंवा घडवून आणणे ही हास्यास्पद कल्पना आहे, याचा विचार पुढे कुठल्याच टीकाकारांनी केलेला नसावा, असे मला ऋग्वेद वाचताना जाणवले.

१) घोड्याला अनैसर्गिक (सर्कसमधील तोल सांभाळण्याच्या काही कसरतीही त्यात येतात) अशी कोणतीही गोष्ट करण्यास शिकवण्यासाठी बराच काळ लागतो. ती करवून घेण्यासाठी समोर मार्गदर्शक लागतो किंवा स्वाराच्या इशार्‍याने घोडा ती करु शकतो. अश्वमेधाचा घोडा हा लहानपणापासून प्रशिक्षित केलेला नसे. शोध घेताना तो तरुण व विशिष्ट अंगलक्षणांनी युक्त असावा लागे. घोडा बळी देण्यापूर्वीचे सर्व विधी जाहीरपणे (राजा/प्रजाजन/यज्ञ करणारे शेकडो ब्राह्मण यांच्या उपस्थितीत) होत असत. अशावेळी राणीचा घोड्याशी संबंध कसा करता येईल? त्यातून अट्टहासाने घडवून आणला तरी त्यासाठी घोड्याचा मार्गदर्शक/स्वार आणि इतरही बरेच सहाय्यक मनुष्यबळ हवे. (इथे मर्यादेबाहेर चर्चा करणे मला प्रशस्त वाटत नाही. प्रॅक्टिकल विचार वाचकांनी करावा) संकेतानुसार अश्वमेधाच्या घोड्यावर अगदी राजाही बसू शकत नसे. अश्वाला मोकळा सोडावा लागे. त्याच्यामागून साम्राज्याची सेना जात असे. अलंकृत घोड्याच्या पाठीवर केवळ साम्राज्याचा ध्वज असे. दिग्विजय केल्यानंतर या घोड्याचा यज्ञात बळी दिला जाई. कुर्‍हाडीने घोड्याचे मस्तक कापणारा वेगळा असे आणि नंतर मृत शरीराचे ३६ छेद देऊन अवयव कापून काढणारा वेगळा असे.

२) मृत घोड्याच्या शरीरासमवेत करावयाचे काही विधी असत त्यात राणीचा उल्लेख येतो. पण एकदा घोडा मस्तक तोडून ३६ अवयवांत विभाजित केल्यानंतर त्याचा संबंध कसा घडवता येईल? फार फार तर प्रतिकात्मक कृती करता येईल, पण मग त्याला महत्त्वच उरत नाही. हे अवयव पुढे (सर्वच्या सर्व )यज्ञात हविर्भाग म्हणून जाळावे लागत. घोड्याचा बळी दिल्याच्या पातकातून प्रायश्चित्त घेण्यासाठी राणीने यज्ञाचा 'होता' असलेल्याशी अश्लील संभाषण करावे, घोड्याने आपल्या वंशात पौरुषवान् संतती उत्पन्न होण्याचे वरदान द्यावे, असेही पुढील ऋचांत म्हटले आहे. त्याचाही अर्थ उमगत नाही.

म्हणजे ज्याचा संदर्भ दिला जातो ते विधान आपल्या तर्काच्या कसोटीवर खरे ठरत नाही किंवा त्याचे चुकीचे इंटरप्रिटेशन रुढ झाले असावे, असे मानण्यास जागा आहे.

तर्कबुद्धीला न पटणारी विधाने

तर्कबुद्धीला न पटणार्‍या अनेक गोष्टी प्रत्येक धर्मांत आणि विधींत केल्या जातात. तेव्हा त्याला अनुसरून केलेली विधाने तर्कबुद्धीला पटत नाहीत असे म्हणण्यामागील हेतू कळत नाही.

घोडा बळी दिल्यावर त्या रात्री राणीने त्याच्या शेजारी झोपून पुढे करावयाचे विधी ऋग्वेदानंतर यजुर्वेदातही दिलेले आहेत. विकीनुसार शतपथ ब्राह्मणातही आहेत. या रात्री घोड्याच्या शरीराचे भाग केले जात नसत असे वाटते. ते बहुधा पुढल्या दिवशी होत. घोडा आणि राणीचा संबंध येत होता हे सत्य आहे; कसा याबद्दल अधिक माहिती येथे देण्यापेक्षा जालावर शोधून विस्तृत माहिती मिळेल. 'संबंध' हे चुकीचे विधान नसून घोड्याच्या गुप्तांगाचा स्पर्श राणीच्या गुप्तांगाला करावा असा स्पष्ट उल्लेख मी अनेक ठिकाणी वाचले आहे. किंबहुना, याला पुष्टी देणारी शिल्पेही मंदिरांवर आढळतात. (संदर्भः ऍनिमल्स इन स्टोन - हे भारतातील प्राण्यांच्या शिल्पांवर पुस्तक आहे) भारतीय विवाह संस्थेचा इतिहास उघडले तर अधिक चांगला संदर्भ देता येईल पण ते आत्ता हाताशी नाही. ज्या संबंधाबद्दल आपण बोलत आहात तो मला अपेक्षित नाही. बहुधा गद्धेगाळातील शापवाणी एखाद्याने खरी करून दाखवायची ठरवली तरी ते त्या गाढवाला शक्य असेलच असे नाही तेव्हा घोडा किंवा गाढव काय करू शकतात हा संदेह नसून अशी प्रथा पाळली जात होती एवढेच.

वेदातील अशा संकेतांमागे गूढ अर्थ काय आहेत, हे अद्याप उकललेले नाही.

यात मला काहीही गूढ वाटत नाही. प्रत्येक आदिम समाजांत अशा चालीरिती आढळतात. आपले वेद आणि विधी त्यापेक्षा वेगळे नाहीत.

फार फार तर प्रतिकात्मक कृती करता येईल, पण मग त्याला महत्त्वच उरत नाही.

महत्त्व उरत नाही म्हणणारे आपण कोण? जे हे विधी करत त्यांच्या दृष्टीने त्याचे महत्त्व निश्चितच मोठे आहे/ होते असे दिसून येते.

बळी दिल्याच्या पातकातून प्रायश्चित्त घेण्यासाठी राणीने यज्ञाचा 'होता' असलेल्याशी अश्लील संभाषण करावे, घोड्याने आपल्या वंशात पौरुषवान् संतती उत्पन्न होण्याचे वरदान द्यावे, असेही पुढील ऋचांत म्हटले आहे.

हे विधान योग्य आहे. घोड्याला पौरुष समजले जाते, वीर आणि वीरश्री त्याच्या ठायी असल्याचे समजले जाते. (यज्ञयाग किंवा बळी वगैरे हे पाळीव प्राण्यांचेच दिले जात आणि या पाळीव प्राण्यांत घोडा सर्वात जास्त पुरुषी समजला जात असावा.) या घोड्यासारखी पौरुषवान् संतती आपल्या कुळात जन्माला यावी यासाठीच वरील विधी केला जात असल्याचे वाचल्याचे आठवते.

असो.

ठीक आहे. मग अधिक चर्चा करत नाही..

<<ज्या संबंधाबद्दल आपण बोलत आहात तो मला अपेक्षित नाही.>>

असे असेल तर मी त्यावर पुढे चर्चा करत नाही. मंदिरांवरील शिल्पे हा तशी प्रथा असल्याचा पुरावा म्हणून सहजासहजी स्वीकारता येत नाही. शिल्पकारांनी अनेक शिल्पे पौराणिक कथांच्या अनुषंगाने कोरली आहेत. तशी ती खोदायला सांगणारी/कल्पना सुचवणारी व्यक्ती चुकीच्या प्रसृत पारंपरिक माहितीच्या पगड्याखाली असू शकते. (जसे शेषाने पृथ्वी फण्यावर तोलल्याचे किंवा वराह अवतारात डुकराच्या सुळ्यावर पृथ्वी धारण केल्याचे शिल्प कितीही प्राचीन असले तरी 'त्या काळी तसेही असू शकेल' असे मानता येत नाही. तर्कबुद्धीला पटत नाही, म्हणण्यामागे हा हेतू.

'संबंध' हे चुकीचे विधान नसून '..............................................', असा स्पष्ट उल्लेख मी अनेक ठिकाणी वाचले आहे.
मग ती प्रतिकात्मक कृतीच ठरते आणि व्यक्तीशः मला ती निरर्थक वाटते. (आकाशाच्या दिशेने प्रोक्षण केलेले अर्घ्य देव/पितरांकडे पोचते म्हणून पाणी उडवणे हे जितके निरर्थक तितकेच हे.)

वेद हे आदिम समाजातील चालीरीतींचा इतिहास इतकेच मानून त्याकडे बघितले तरी अनेक गोष्टींचे गूढ उकलत नाही. वेदावर भाष्य लिहिणार्‍या सायणाचार्यांनांही कित्येक शब्दांचा/ऋचांचा अर्थ लागलेला नाहीच.

असो. सध्या इथेच थांबू. धाग्याच्या मूळ विषयाकडे वळतो. मराठीतील पहिला शिलालेख 'चामुंडराये...' नसून सोलापूर जिल्ह्यात सापडलेला वाचनाचे महत्त्व अधोरेखित केलेला शिलालेख असल्याचा दावा कुणीतरी केला होता. त्याबद्दल श्री. कोल्हटकर किंवा प्रतिसादकांना काही माहीत आहे का?

किंवा

शिल्पकारांनी अनेक शिल्पे पौराणिक कथांच्या अनुषंगाने कोरली आहेत. तशी ती खोदायला सांगणारी/कल्पना सुचवणारी व्यक्ती चुकीच्या प्रसृत पारंपरिक माहितीच्या पगड्याखाली असू शकते. (जसे शेषाने पृथ्वी फण्यावर तोलल्याचे किंवा वराह अवतारात डुकराच्या सुळ्यावर पृथ्वी धारण केल्याचे शिल्प कितीही प्राचीन असले तरी 'त्या काळी तसेही असू शकेल' असे मानता येत नाही. तर्कबुद्धीला पटत नाही, म्हणण्यामागे हा हेतू.

पण याचबरोबर, शिल्पकार तत्कालीन पद्धती, राहणीमान, समाजमन, प्रसंग शिल्पातून दाखवतो असेही म्हणता येते. मंदिरांवरील शिल्पे फक्त पौराणिक नसून ऐतिहासिकही असू शकतात. उदा. स्तुपावरील अशोकाच्या चित्राकडे सम्राट अशोक कसा दिसत असावा याचा पुरावा म्हणून बघितले जाते. त्यामुळे चटकन तर्कबुद्धीला न पटणे असे विधान करणे मला एखाद्या गोष्टीकडे ती सोइस्कर नाही म्हणून डोळेझाक केल्यासारखी वाटते पण येथेच थांबू हे उत्तम.

मग ती प्रतिकात्मक कृतीच ठरते आणि व्यक्तीशः मला ती निरर्थक वाटते.

हे व्यक्तिगत मत असल्याचे मान्य केल्याबद्दल धन्यवाद.

असो. सध्या इथेच थांबू. धाग्याच्या मूळ विषयाकडे वळतो. मराठीतील पहिला शिलालेख 'चामुंडराये...' नसून सोलापूर जिल्ह्यात सापडलेला वाचनाचे महत्त्व अधोरेखित केलेला शिलालेख असल्याचा दावा कुणीतरी केला होता. त्याबद्दल श्री. कोल्हटकर किंवा प्रतिसादकांना काही माहीत आहे का?

चर्चेत खाली कोल्हटकरांनी खुलासा केला आहे.

चावुंडराजें/रायें : एक कुतूहल

त्याचे वाचन 'श्री चावुंडराये करवियले श्री गंगराये सुत्ताले करवियले' असे आहे.

हा शिलालेख मी "श्री चावुंडराजें करवियलें" असा वाचतो. "करविलें" येथे "य"चा आकार दिसतोच आहे, त्यामुळे शिलालेखाचा लेखनिक "ज"/"य" एकसारखा लिहीत असे, असे म्हणता येत नाही.

पण शिलालेखाचा फोटो बघण्यापूर्वी मीसुद्धा "...चावुंडरायें..." असे कुठल्याशा पुस्तकात वाचले होते.

छान!

अरे वा! तुमचं निरिक्शण छान आहे. कदाचित सगळेच पहिल्यावेळी पाहताना इतकं निरिक्शण करीत पाहत नसावे. मी देखील आत्तापर्यंत तो केवळ एक फोटो म्हणूनच पाहात आलो आहे. नॉट गोन इन टू डिटेल. पण तुमचा प्रतिसाद वाचला आणी भेद कळला. गंमत म्हणजे,
'गंगाराये' असा समजलेला शब्द देखील 'गंगाराजे' असा स्पश्ट दिसत आहे.

यात लिहीलेल्या 'र' चे वर्णरूप पाहून सावरकरांनी त्या चित्रात दाखविलेले 'र' साठीचे रूप आठवले. सावरकरांनी टंकनयंत्रात वापरण्यासाठी ते तसे कां, कशाच्या आधाराने म्हटले होते ते कळले नव्हते, ते आत्ता कळले. अर्ध्या 'र' चे रूप दाखवण्यासाठी केवळ त्यास लागून असलेला स्वरदंड काढायचा, ही ती कल्पना होती. म्हणजे 'पोर्‍या' ह्या शब्दातील अर्धा 'र' केवळ स्वरदंड काढून दर्शविणे सोपे होते. पण 'अर्' करीता (उदा. गर्व, धर्म इत्यादी) काय करायचे ते त्यांनी सुचवले नव्हते.

विजयादित्याचा सातारा ताम्रपट

< मराठी विकिवर मात्र चावुंडरायेविषयी लेखन आहे. परंतु, तेथे "सर्वांत जुना मराठी लेखनाचा पुरावा सातारा येथे विजयादित्य काळातील ताम्रपट्टीवर आहे (इ.स. ७३९) येथे आहे." अशी नोंद आहे. हा सातार्‍यातील लेख कोणता?> प्रियालि.

ही माहिती मला पूर्णपणे नवी होती तरीहि फार महत्त्वाची वाटल्याने तिचा पिच्छा पुरवायचे ठरविले.

सर्वप्रथम असे कळले की हा ताम्रपट डेक्कन कॉलेजच्या संग्रहात आहे. थोडा अधिक शोध घेतल्यावर books.google.com येथे ’Political History of the Chālukyas of Badami’ असे दुर्गा प्रसाद दीक्षितलिखित पुस्तक मर्यादित पाहणीसाठी मिळाले. सुदैवाने त्यात ह्या ताम्रपटाचा उल्लेख दिसला आणि तो एपिग्राफिया इंडिकाच्या २६ व्या भागात पृ. ३२२ ते ३२६ येथे आहे हेहि थोडे शोधल्यावर तेथेच कळले.. एपिग्राफिया इंडिकाचे फार थोडे भाग archive.org मध्ये आहेत पण अधिक शोध घेता jambudveep.wordpress.com येथे असे कळले की बरेचसे भाग DLI मध्ये आहेत. सुदैवाने थोडया शोधातच DLI मध्ये हवा तो २६ वा भाग मिळाला आणि काहीहि खळखळ न होता तो उतरवूनहि घेता आला. हे सर्व करतांना माझा एकदीड तास आनंदात गेला आणि पुढे कधी वापरता येईल अशी बरीच माहितीहि मिळाली.

२६ व्या भागात पृ. ३२२-३२६ येथे ह्या ताम्रपटाचे संपादन केलेला डॉ.सांकलियांचा लेख आणि संपूर्ण ताम्रपट वाचावयास मिळाला. तो पूर्ण संस्कृतात आहे हे पाहून संशयनिवृत्ति झाली. त्याचे मराठी विकीवरचे इ.स. ७३९ हे साल चुकीचे आहे. ताम्रपट शक ६३२ म्हणजे सन ७१० चा असून तो चालुक्य राजा विजयादित्याच्या १४ व्या राज्यवर्षात पडतो. त्याला सातारा गावाचे नाव चिकटावयाचे कारण म्हणजे सातार्‍याचे रा.सा. एस.के.दुदुस्कर ह्यांच्याकडून तो रा.ब. पारसनिसांच्या सातारा म्यूझियमला मिळाला आणि १९३८-३९ साली ते बंद झाल्यावर तेथील सर्व संग्रहासह तो नवघटित डेक्कन कॉलेजला मिळाला.

कृष्णवेणेच्या काठावरील करहाटनगरामधील शिबिरात राजाने राजपुत्र विक्रमादित्याच्या विनंतीवरून करुवा नावाच्या गावातील *** नावाचे २५ निवर्तन क्षेत्रफळाचे शेत भानु्देवशर्मा ह्यास दिले असे ताम्रपटात लिहिले आहे. कृष्णवेणा/णी नावाच्या अनेक नद्या जुन्या वाङ्मयात भेटतात पण येथील कृष्णवेणा म्हणजे सातार्‍याजवळ माहुली येथे कृष्णा आणि वेण्णा ह्यांच्या संगमातून पुढे जाणारी कृष्णा नदी आहे हे उघड आहे. डॉ. सांकलियांच्या मते करुवा गाव म्हणजे करहाटकापासून अनुक्रमे ६ आणि ४ मैलावरची कोरेगाव किंवा कर्वे ही गावे असू शकतात. त्यांचा स्वत:चा कल कोरेगावकडे आहे.

ताम्रपट संस्कृतात असल्याने मराठी भाषेच्या इतिहासाशी त्याचा काहीच संबंध नाही असे म्हणता येते.

धन्यवाद

शोधाशोध करून शंकानिरसन केल्याबद्दल धन्यवाद!

सुविधा...

वाचनखुणेची सुविधा नसल्याबद्दल पुन्हा एकदा फारच वाइट वाटले.

--मनोबा

नवा उमेदवार

हा एक मोठाच योगायोग आहे की आपण मराठीच्या पहिल्यापहिल्या लेखांचा अग्रकम काय ही चर्चा करीत असतांनाच एक नवीन ताम्रपट मे ४, २०१२ ह्यादिवशी उघडकीस आल्याचे दिसते. ह्या बातमीनुसार कल्याणमध्ये एका भंगारवाल्याकडे पोलिसांना एक ताम्रपट मिळाला जो १०१९ इसवी ह्या वर्षाचा दिसतो. अर्थात जाणकारांकडून त्याचे वाचन होऊन त्याचे अधिकृत वर्णन मिळण्यास वेळ लागेल. त्याची भाषा नक्की काय आहे हेहि तेव्हा ठरेल.

चामुंडराजें......

'श्री चामुंडराजें करवियलें...'ह्या लेखाचा उल्लेख मराठीतला आद्य शिलालेख म्हणून इंग्लिश् विकी मधल्या मराठीभाषासंदर्भातल्या लेखनात येत नाही याचे कारण ह्या लेखाची भाषा कोंकणी आहे म्हणून तो कोंकणी लेख ठरतो असे प्रतिपादन काही कोंकणी भाषक विद्वानांनी त्यांच्या सुरेख (कमीत कमी मराठीसंदर्भातल्या इंग्रजीतल्या लेखांपेक्षा अधिक चांगल्या)इंग्रजीत केले आहे आणि त्याचे खंडन चांगल्या(किंवा कशाही) इंग्रजीत अद्यापपावेतो कोणी केलेले नाही. ह्या संदर्भात विकीवर कोंकणी भाषेविषयीचा लेख पहावा. http://en.wikipedia.org/wiki/Konkani_language
गोमटेश्वर हा शब्दही त्यांनी कोंकणी मानला आहे. गोम्मट म्हणजे घुमट असे मायबोली वर मराठीसंबंधीच्या लेखात सुचवले आहे. मात्र, कोंकणीमध्ये गोमटें या शब्दाचा अर्थ 'सुंदर' असा होतो हे खरे.

कोंकणीबद्दल माहिती हवी.

प्रश्न१) कोंकणीत मुलाला/औलादीला काय म्हणतात? किंवा काय म्हणत असत?

प्रश्न २) कोंकणीत 'किंग हॅज गॉट इट डन दिस थिंग (थ्रू - वर्कर्स, हिज ओन मनी, हिज ऑफीशअल पॉवर)' वाक्य हे कसे म्हणतात? वा पूर्वी म्हटले जायचे?

श्री. धनंजय ह्यांना कोंकणी येते एवढे ठाऊक आहे.

आधुनिक गोव्याच्या कोंकणीत

आवलादीला "पूत" (मुलगा) आणि धूव (मुलगी) हे शब्द थोडेसे औपचारिक आहेत किंवा रोजच्या भाषेत "चलो/चली" शब्द आहेत. (पण "श्रीचावुंडराजें करवियलें श्री गंगराजें सुत्ताले करवियलें" या वाक्यात पुत्राचा उल्लेख नाही. फार पूर्वी "सुत्ताले"ला "सुत=पुत्र"शब्दाशी काही संबंध असेल असा माझा गैरसमज होता. परंतु "सुत्ताले" [संस्कृत शब्द "सूत्रालय"] म्हणजे प्रचंड मूर्तीच्या चहूबाजूला असलेली वास्तू, असा अर्थ समजला.)

आजच्या गोव्याच्या कोंकणीत असे म्हणतील :
"राजान्/राजानी/राजाने हें करयलें."
पूर्वीच्या कोंकणीची माझी ओळख नाही, मी शाळेत असताना शाळेत कोंकणी शिकवत नसत, त्यामुळे मित्रांच्या तोंडून, गल्लीबाजारात ऐकून जितपत शिकलो, तितपतच कोंकणी येते. आधुनिक कोंकणीची सुद्धा प्रमाणबोली आणि लेखी शैली मला येत नाही.

शिवाय कन्नडप्रचुर मंगळूर कोंकणी, मालवणीचा तिचे आपले खास शब्द हा सगळा कोंकणीचा विस्तार... श्रवणबेळगोळात साम्राज्याचा मोठा विस्तार सांगण्यासाठी चार भाषांत शिलालेख आहेत - [हल]कन्नड, तेलुगु, तमिळ आणि मराठी. साम्राज्याची प्रौढी सांगण्याकरिता मराठी/कोंकणीची कुठली बोली त्या "करवित्या" लोकांनी निवडली असेल?

आभारी आहे

आपल्या उत्तराबद्दल आभारी आहे.

श्री. चावुण्डराजें करवियलें असे लिहीताना व कोरताना क्रियापदाच्या शेवटी अनुस्वार दिला गेला आहे. नाकात हेल काढून उच्चार करणं त्यातून शिश्टसंमंत वाटते.

त्या कोरीव लेखातील कन्नड, तेलुगु, तमिळ या भाशेतील अर्थ काय असू शकेल? हेही पहावे लागेल.

आता आले लक्षात

'श्री चामुंडराजें करवियलें...'ह्या लेखाचा उल्लेख मराठीतला आद्य शिलालेख म्हणून इंग्लिश् विकी मधल्या मराठीभाषासंदर्भातल्या लेखनात येत नाही याचे कारण ह्या लेखाची भाषा कोंकणी आहे म्हणून तो कोंकणी लेख ठरतो असे प्रतिपादन काही कोंकणी भाषक विद्वानांनी त्यांच्या सुरेख (कमीत कमी मराठीसंदर्भातल्या इंग्रजीतल्या लेखांपेक्षा अधिक चांगल्या)इंग्रजीत केले आहे आणि त्याचे खंडन चांगल्या(किंवा कशाही) इंग्रजीत अद्यापपावेतो कोणी केलेले नाही.

मध्यंतरी विकिवरील कोंकणी-मराठी वादाविषयी चर्चा झाली होती खरी! (नेमकी कुठे ते सध्या आठवत नाही) आता सर्व संदर्भ लागले. :-) धन्यवाद!

दिवेआगर ताम्रपटाचे संपूर्ण भाषांतर

डॉ. तुळपुळे-संपादित "मराठी कोरीव लेख" ह्या पुस्तकात स्पष्ट अर्थ दिला असेल असे वाटते पण ते पुस्तक मला उपलब्ध नाही. कोणाला ते उपलब्ध असल्यास त्यातील अर्थ येथे आणावा अशी विनंति आहे.

शक संवत ९८२ मध्ये शार्वरी संवत्सरामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमा, शुक्रवार या मितीस दिवे गावातील वासुदेव भट्टवांय या ब्राह्मणाने आपल्याजवळील स्थितीपुरीची दोन शासने (ताम्रपट) षडंगवि रिसियप घैसास आणि शिव षडंगवि हे ज्यात प्रमुख आहेत अशा विश्वस्त मंडळात मावलभट्ट नावाच्या गृहस्थापाशी ठेविली. तसेच या विश्वस्त सभेचा योगक्षेम चालवण्यासाठी म्हणून सातावीश शत (१२७) सुवर्णगद्याणक (सोन्याची नाणी) दामोदरापाशी ठेविले. हे सर्व दिवे गावातील रिसियप पौवदेव, षडंगवि तिकै, षडंगवि जीवणै, नागरूद्रभट, मधुवै षडंगवि, मधुवय देवषु यांना ठाऊक आहे. वर जे सुवर्ण लिहिले ते एका कंठयात ओवलेले आहे.

या ताम्रपटाचे स्वरूप वैयक्तिक असले तरी त्यातून काही सामाजिक संदर्भ मिळतात. दिवेआगरसारख्या छोट्याश्या गावात त्याकाळी वेदविद्यापारंगत ब्राह्मणांची सभा अस्तित्वात होती. एका गावाची दोन ताम्रशासने दानकर्त्याने विश्वासपूर्वक विद्वत्सभेकडे ठेवली तसेच सभेच्या योगक्षेमासाठी काही सुवर्णाची एका व्यक्तीकडे ठेवली. तसेच या घटनेचे सा़क्षीदार म्हणूनही काही व्यक्तींची नावे आली आहेत.

षडंगवि म्हणजे सहा वेदांगांचा किंवा सहा शास्त्रांगाचा जाणकार.

दिवेआगरसारख्या छोट्याश्या गावात त्याकाळी वेदविद्यापारंगत ब्राह्म

दिवेआगरसारख्या छोट्याश्या गावात त्याकाळी वेदविद्यापारंगत ब्राह्मणांची सभा अस्तित्वात होती.
आज लहान वाटानारी सर्वच गावे त्याकाळी लहान नसावीत्.त्यांचं काहीके महत्व असावं.(ऑक्सफर्ड वगैरे आधी लहान लहान गावेच होती. पण अभ्यस्त लोकांच्या समूहाने पुढे आली. तसेच.)
नांदगाव, बाभुळगाव, भोकरदन्,बुर्‍हानपूर्,दाभोळ,मांडू(एम प्[ई मधील धार नजीक) ,बारदेश, तिस्वाडी, खामगाव, धामणगाव, जुन्नर ही सर्व आज फार तर तालुक्यची ठिकाणे आहेत, मुंबै, भोपाळ ह्यासारखी मोठी गावे नाहीत. पण कोणे एके काळी ह्यांचे महत्व होते.
राजगिर्/राज्गृह,कनौज आजच्य शहरांच्या मानाने लहान आहेत, पण ही त्या त्या काळात माह्त्वाची केंद्रे होती.
बाकीचे फुरसतीत.

धन्यवाद!

ताम्रपटाच्या भाषांतरासाठी अनेक धन्यवाद.

षडङ्गविद

षडङ्गविद हा मूळ शब्द. त्याचा अर्थ सहा वेदांगे जाणणारा, हे झालेच.
त्यापुढची किंचित अवांतर माहिती म्हणजे उत्तर कन्नड, कारवार,गोवा,दक्षिण कोंकण इत्यादि प्रांतांत सापडणारे शणै हे आदरार्थी संबोधन, शेणई, शेणॉय ही आडनावे आणि शेणवी हे जातिवाचक नावही या षडङ्गविद वरूनच आले आहे असे ते लोक मानतात. तसे असेल तर मराठीतल्या 'शहाणा' या शब्दाचा उगमही हाच असावा.

शेणवी = सेनवई...

शेणवी = सेनवई असे ऐकून होतो.
सेनवई = थोडीफार का असेना पण सेना पदरी बाळगून असलेले लोक.

दिवे

माझी सासुरवाडी दिवेआगरची आहे. मात्र त्यांनापण इतकी माहिती नसेल. हा हा हा

 
^ वर