दिवेआगरचा गणपती

केवळ एका बातमीच्या आधारे हा चर्चाप्रस्ताव मांडतो आहे: दिवेआगरमध्ये आता चांदीचा गणपती? या बातमीत असे नमूद केलेले आहे की "घोडके सराफ यांच्यातर्फे मूळ मूर्तीची चांदीची प्रतिकृती दिवेआगर देवस्थानला दिली जाणार आहे. ... मूळ मूर्ती १८ इंची होती, तर ही मूर्ती ११ इंचांची आहे. मात्र, त्याचे वजन पूर्वीच्या मूर्तीएवढेच १३२० ग्रॅम आहे."
(अवांतरः ग्रामस्थांनी मूर्ती स्वीकारण्यास नकार दिला अशीही बातमी प्रसिद्ध झाली आहे.)

काही तथ्थ्ये

पदार्थ सापेक्ष घनता
सोने १९.३
चांदी १०.५
तांबे ८.९
ऍल्युमिनियम २.७
लाकूड ~०.८५
बेसॉल्ट २.८-३
संगमरवर ~२.७६
पितळ ~८.५

मूळ मूर्तीच्या तुलनेत नव्या मूर्तीची उंची १८:११ प्रमाणात आहे आणि ती 'प्रतिकृती' आहे, त्यामुळे त्यांची आकारमाने ५८३२:१३३१ = ४.३८ प्रमाणात असावीत. नव्या मूर्तीची घनता १०.५ आहे परंतु वस्तुमान जुन्या मूर्तीप्रमाणेच १३२० ग्रॅम आहे. त्यामुळे, जुन्या मूर्तीची सापेक्ष घनता २.४ होती असे दिसते.

मूर्तीचा आकार समद्विभुज त्रिकोण मानू. उंची १८ इंच असेल तर, गूगलल्यावर सापडलेल्या छायाचित्रांनुसार मूर्तीची सरासरी रुंदी १० इंच असावी असे वाटते. त्यामुळे, द्विमिती प्रतिमेचे क्षेत्रफळ ११६० चौ. सें.मी. होते. १३२० ग्रॅम सोन्याचे आकारमान ६८. ४ घ. सें.मी. असते. त्यामुळे, मूळ प्रतिमा/मुखवटा शुद्ध सोन्याचा होता असे गृहीत धरले तर त्याची जाडी केवळ अर्धा मि.मी. होती असा निष्कर्ष निघतो आहे.

माझ्या आकडेमोडींमध्ये काही गफलती आहेत काय?

किंमत ठरविणे इ. अभ्यासासाठी, १५ वर्षांपूर्वी ती मूर्ती सापडली तेव्हापासून कधीही, ती मूर्ती तज्ञांकडे देण्यातच आली नाही असे सोन्याचा गणपती, .. बेगडी संस्कृती! या लेखात नमूद करण्यात आलेले आहे.

ती मूर्ती पोकळ होती काय? की लाकडी मुखवट्यावर दोहों बाजूंनी सोन्याचा पत्रा चढवून बनविण्यात आलेली असावी? गूगलल्यावर अशी माहिती सापडली की मूळ मूर्ती हा एक मूर्तीसारखा मुखवटा होता, म्हणजे तो किमान, मागून तरी खोलगट असावा. तसे असल्यास, तितक्याच किमतीत सोन्याचीही तशीच पोकळ मूर्ती/प्रतिमा बनविण्याचा प्रयत्न घोडके यांनी का केला नसावा? छायाचित्रे घेण्याची तेथे अधिकृत अनुमती नव्हती असेही वाचनात आहे.

या संदर्भात उपलब्ध माहिती, सुचणार्‍या आकडेमोडी, शक्यता व्यक्त कराव्या ही सर्वांना विनंती.

Comments

मुग्धा कर्णिक यांचा लेख

मुग्धा कर्णिक यांचा लेख मस्तच आहे. त्यांचे म्हणणे पटण्यासारखेच आहे. दुव्याबद्दल धन्यवाद!

बाकी, मूर्तीचा फोटो पाहिल्यास ती मला मुखवट्याप्रमाणेच वाटते आहे. बायदवे, चोरट्यांनी मूर्ती वितळवून टाकलेली आहे. तेव्हा ग्रामस्थांना आता हाती काय लागणार आहे?

एक शंका, मूळ मूर्ती शिलाहारांच्या काळातील असेल तर त्या मानाने तिचा घाट मॉडर्न वाटतो. बाकी काही नाही तरी तिला नक्कीच पॉलिश केले आहे. मूर्ती समुद्राजवळील खार्‍या वातावरणात आहे. तेव्हा नेमके कितीवेळा पॉलिश केले आहे हे कळायला हवे कारण पॉलिश करताना सोन्यात घट येते असे वाटते. चू भू द्या घ्या

अधिक माहिती

३ मे च्या लोकसत्ताच्या पुणे आवृत्तीत येथे असे नमूद केलेले आहे की चोरट्यांनी मूळ मूर्ती चोरली तेव्हाच ती पत्र्यासारखी असल्याने पार वाकवून टाकली आणि एका पिशवीत भरली.
परंतु, अर्धा मि.मी. म्हणजे खूपच पातळ पत्रा वाटतो, एक किलोहून जड पत्रा इतका पातळ असेल तर वजनानेच वाकणार नाही काय?

स्वतःच्या वजनाने वाकणे

नाही. पातळ पत्र्याचा आकार कसा केला असेल त्यावर अवलंबून आहे. खोलगट आकार असेल तर बरीच ताकद असू शकेल.

नितिन थत्ते

ह्म्म्

खरय.

१८ इंच उंची, ९.८ इंच रुंदी आणि ०.६ मिमि जाडी असल्यास (१९.३) घनतेप्रमाणे वजन १३२० ग्रॅमच्या आसपास जाईल. ०.६ मिमि जाडीचा पत्रा बसवणे शक्य आहे काय? माझी अकडेमोड तर नाही चुकली न?

गणित ठीक वाटते आहे.

गणित ठीक वाटते आहे. शाळेत "पातळ पत्रे बनावता येणारा 'मॅलिएबल' धातू" म्हणून सोन्याचे उदाहरण देत असत.

वर्ख

सोन्याचा वर्ख बनवेपर्यंत पातळ पत्रा बनवता येतोच. परंतु इथे जर त्रिमित मूर्ती असेल तर अर्ध्या मि.मि. पत्र्याची मूर्ती हजार वर्षे न वाकता मूळ आकारात राहणे कठिण आहे. याचसोबत ते किती कॅरॅटचे सोने होते? २४ कॅ. सोने मऊ असते; चटकन वाकवता येते. त्यापेक्षा हा मुखवटा असेल हे खरे असल्यास याला ठिकठिकाणी मूर्ती असे का म्हटले आहे?

दिवे आगरला भेट दिलेल्या कोणाकडून तरी खरी माहिती कळेल असे वाटते.

जाडी

हाफ एमएम इज क्वाइट थिक. अर्ध्या एमएमची त्रिमित मूर्ती बरीच मजबूत होईल. २४ कॅरट असण्याची शक्यता कमी आहे. १८ कॅरट असेल तर सहज टिकेल.

नितिन थत्ते

सहमत

सहमत आहे

पातळ शीटच्या फॉर्मिंगचे उदाहरण

उदाहरणादाखल पातळ प्लॅस्टिकच्या शीटमधून बनवलेल्या खालील वस्तू आपल्या नित्य परिचयाच्या असतात.

या वस्तूचा स्टिफनेस त्या शीटच्या स्टिफनेसपेक्षा खूऊऊऊऊप जास्त असतो.

नितिन थत्ते

मुखवटाच

मी भेट दिलेली आहे गेल्याच वर्षी. हा मुखवटाच होता, खोलगट आकाराचा. (मूर्ती म्हणतात कारण सर्व सामान्यांना देवळात मूर्ती असणेच अभिप्रेत असावे)
एखादा फोटो आहे मला वाटत माझ्याकडे. सापडला तर टाकतो.
अवांतरः दिवेआगार चा समुद्रकिनारा मात्र अतिरम्य आणि तुलनेनी बराच मोकळा आहे.

 
^ वर