सिंधू लिपी ते ब्राह्मीची वाटचाल

निवेदनः सदर लेखन चर्चा म्हणून टाकण्याचा मानस होता पण लिहिताना त्याचे स्वरूप लेखाप्रमाणे झाल्याने लेख म्हणूनच प्रकाशित करत आहे. लेखनातील मुद्द्यांबाबत साशंकता असल्यास त्यावर अवश्य चर्चा व्हावी. खाली प्रकाशित केलेली गृहितके पक्की असल्याचा दावा लेखिका करत नाही परंतु दावे खोडून काढताना योग्य पुराव्यांचा आणि संदर्भांचा वापर करावा.


श्री. चंद्रशेखर यांनी काही दिवसांपूर्वी सिंधू संस्कृतीच्या र्‍हासामागचे कोडे या लेखातून मॉन्सूनच्या पावसातील झालेल्या फरकांमुळे सिंधू संस्कृतीतील शहरांतून नागरिकांचे स्थानांतर झाल्याचे गृहितक मांडले होते. सिंधू संस्कृतीचा र्‍हास कसा झाला या विषयी अधिक रोचक संदर्भ या पुढेही मिळत राहतील आणि अधिक संशोधने होत राहतील पण चंद्रशेखर यांचा लेख माझ्या लक्षात राहिल तो खालील वाक्याने -

मोठी शहरे नष्ट झाल्याबरोबर शहरी वास्तव्यासाठी उपयुक्त अशा लेखनासारख्या कला कालौघात नष्ट झाल्या.

हे एक वाक्य फारच रोचक वाटले. सिंधू संस्कृतीची लिपी ही खरेच लिपी आहे की नाही या विषयी तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. याचे मुख्य कारण या लिपीचा अर्थ लावणे अद्याप शक्य झालेले नाही आणि लिपीचा अर्थ लावण्यासाठी ही लिपी मोठ्या प्रमाणात लिहिलेली आढळत नाही. या लिपीचा वापर करून लिहिलेली भूर्जपत्रे किंवा शिलालेख मिळालेले नाहीत. मुद्रांवर लिहिलेल्या त्रोटक लिपीतून अक्षर उकल होणे कठीण झाले आहे. सिंधू लिपीची वाढ शहरे नष्ट झाल्याने खुंटली. त्यानंतरच्या गंगा खोर्‍यातील संस्कृतींनी लेखनकलेवर लक्ष केंद्रित केले नाही. सिंधू लिपी नंतरची लिपी इ.स.पूर्व ५०० च्या सुमारास आढळते. म्हणजेच सिंधू संस्कृतीच्या र्‍हासानंतर सुमारे ६००-८०० वर्षे भारतीय उपखंडात लेखनकला वापरली जात नव्हती असे म्हणावे लागते. हा दावा किती खरा आणि किती खोटा ते पुढे पाहू.

स्वतंत्ररित्या जगात सर्वात प्रथम लेखनकला शोधल्याचा मान सुमेरियन संस्कृतीला जातो. (या लेखात मेसोअमेरिकन आणि चिनी लिपीचा विचार केलेला नाही.) युरेशियातील अनेक लिपी या सुमेरियन लिपीमुळे उदयाला आल्याचे मानले जाते. सुमेरियन कीलाकार लेखन (cuneiform writing) हे सर्वात आद्य समजले जाते. अर्माइक, ग्रीक, ब्राह्मी, खारोष्टी, इजिप्शियन चित्रलिपी, फोनेशियन, अरबी अशा अनेक लिपी या कीलाकारीवरून व्युत्पन्न झाल्याचे सांगितले जाते पण म्हणून या लिपी कीलाकारीची सख्खी अपत्ये आहेत अशातला भाग नाही. हे कसे ते पाहू. सुमेर संस्कृतीतून लेखनकला सर्वदूर पसरली ती दोन प्रकारे १. नीलप्रत (पुनरुत्पादन) आणि २. कल्पना विसरण (idea diffusion) च्या तत्त्वाने.

सुमेरियन कीलाकारी
सुमेरियन कीलाकारी

यापैकी पुनरुत्पादन प्रकाराला "नीलप्रत" (blueprint) असेही म्हटले जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणून अनेक युरोपीय भाषांनी स्वीकारलेली रोमन लिपी. परंतु युरेशियातील ग्रीक, अरबी, अर्माइक, ब्राह्मी अनेक लिपींमध्ये आणि वर्णमालेमध्ये जो फरक जाणवतो त्यावरून येथे केवळ नीलप्रत न वापरता मूळ संकल्पनेत स्वतःच्या संस्कृतीला आणि भाषेला पूरक अशी नवी लिपी निर्माण केलेली दिसते.

मनुष्य लेखनकलेच्या कित्येक वर्षे आधी भाषा बोलायला शिकला. ध्वनी, शब्द, त्यातील चढ-उतार, विराम, अखंडता, शब्दांची जोडणी, आकडे, मोजणी वगैरे प्रमाणित करून या ध्वनींना संवादाचे साधन बनवण्यासाठी माणसाने हजारो वर्षे घेतली असावी पण या सर्वासाठी त्याला लेखनाची गरज नव्हती. इथे माझ्या एका जुन्या लेखातील थॉथची कथा आठवते. ती पुन्हा येथे देते -


थॉथ हा कला आणि विद्येचा इजिप्शियन देव. त्याला नवनवीन कला शोधण्याचा छंद होता. आपले संशोधन तो अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाला आणि संपूर्ण इजिप्तच्या राजाला नेऊन दाखवत असे आणि त्याची प्रशंसा प्राप्त करत असे.

असाच एकदा थॉथला लेखनकलेचा शोध लागला. आपले नूतन संशोधन घेऊन थॉथ अमुनकडे गेला आणि उत्साहाने त्याने आपले संशोधन अमुनला सांगण्यास सुरुवात केली, “हे राजा, मी एक नवीन कला शोधली आहे. जी एकदा शिकून घेतली की समस्त इजिप्तवासी शहाणे होतील, विद्वान होतील आणि त्यांची स्मृती द्विगुणित होईल. या कलेद्वारे मी बुद्धिमत्ता आणि स्मृती यांवर अचूक तोडगा शोधला आहे.”

यावर नेहमी थॉथची प्रशंसा करणार्‍या अमुनने काही वेगळेच उत्तर दिले, “हे थॉथ! एखाद्या कलेला जन्म देणारा हा ती कला फायद्याची आहे किंवा नाही हे उत्तमरीत्या ठरवू शकत नाही. ही पारख त्या कलेच्या वापरकर्त्यांनी करावी. आता, तू या लेखनकलेचा जनक असल्याने येथे तुझे पितृवत प्रेम बोलते आहे आणि ते सत्य परिणामांच्या विरुद्ध आहे. खरंतर, ही कला तिच्या अभ्यासकांना विस्मरणाचे दान देईल. जे ही कला शिकतील ते आपल्या स्मरणशक्तीचा उपयोग करणे सोडून देतील कारण ते लेखनावर/ लिखाणावर आपली श्रद्धा कायम करतील. या चिन्हा-खुणांच्या बाह्यज्ञानामुळे माणसे आपल्या हृदयातून निर्माण होणार्‍या अंतर्ज्ञानाला विसरतील. आपापल्यापरीने वाचन केल्याने ते त्यातून आपल्याला हवा तसा अर्थ काढतील. तुझे संशोधन स्मृती वाढवण्यात कोणतीही मदत करत नाही, फक्त नोंद ठेवण्याच्या कामी उपयोगाचे आहे. हे संशोधन ऐकवल्याने (वाचून दाखवल्याने) लोकांना एकाच गोष्टीचे अनेक अर्थ कळतील. त्यांना आपण ज्ञानी झाल्याचा भास होईल परंतु प्रत्यक्षात त्यांना योग्य गोष्ट कळेलच असे नाही.”

अमुनचे म्हणणे खरे-खोटे पाडण्याच्या भानगडीत न पडता या कथेतीलही एक महत्त्वाचे वाक्य उचलते ते म्हणजे "तुझे संशोधन स्मृती वाढवण्यात कोणतीही मदत करत नाही, फक्त नोंद ठेवण्याच्या कामी उपयोगाचे आहे." यावरून अमुनला लेखनकलेचे सर्व फायदे लक्षात आले नव्हते असे म्हणावे लागेल. कदाचित, थॉथची उपलब्ध लेखनकला हे फायदे दर्शवण्याइतपत समृद्ध नसावी. परंतु या कथेत आणि वास्तवात साम्य असे की माणसाने लेखनकलेचा पहिला वापर नोंदी ठेवण्यासाठीच केला असे दिसून येते. या नोंदी मानवी भावना, काव्य, कथा, इतिहास यांसाठी नव्हत्या. या विस्तृत संवादासाठी जी मौखिक परंपरा वापरली जात होती ती तत्कालीन संस्कृतींना पसंत होती. किंबहुना, लेखनकलेचा विकास होण्यापूर्वी संवादकलेत मनुष्याने इतकी प्रगती केली होती की चटकन तो संवाद लिपीबद्ध करणे त्याला शक्य नव्हते. पुढील हजारो वर्षे माणसाने चित्रलिपी, शब्दावयव, चिन्हे-अक्षरे, विरामचिन्हे यांवर खर्च करून विस्तृत लेखनासाठी उपयुक्त अशा लिपींचा विकास केला.

लेखनाचा प्रथम वापर हा लेखांकन प्रक्रियेसाठी आणि तत्सम नोंदी राखण्यासाठी केला जाऊ लागला. सुमेरियन मृत्तिकापट्ट्यांवर अशाप्रकारच्या नोंदी आढळतात. याशिवाय, तत्कालीन राजांच्या विजयांच्या नोंदी, पिक-पाण्याच्या नोंदी, व्यापार, हुद्दे, शिक्के आणि ओळख पटवण्यासाठी वगैरे लेखनाचा वापर होत होता. पुढे तो वापर दानपत्रे आणि प्रचार, कायद्याची अंमलबजावणी यासाठी होऊ लागला. वेगळ्या शब्दांत, लोकशिक्षण, गद्य-पद्य लेखन, मनोरंजन वगैरेंसाठी लेखनकला वापरली जात नव्हती त्यामुळे लेखनाचा वापर करणारे अतिशय मोजके होते आणि लेखनाची महती न कळलेले अनेक होते.

आता या पार्श्वभूमीवर सिंधू लिपीकडे बघू.

सिंधू लिपी हे सुमेरियन कीलाकारीचे सख्खे अपत्य मानण्याबद्दल तज्ज्ञांत मतभेद आहेत परंतु कीलाकारीच्या कल्पना विसरणातून सिंधू लिपी निर्माण झाली असावी याबाबत फारसे मतभेद दिसत नाहीत. म्हणजेच, सिंधू लिपी ही स्वतंत्र लिपी नसून ती सुमेरियन किंवा आजूबाजूच्या इतर संस्कृतींकडून उसनी घेऊन आकारास आणलेली आहे. एखाद्या संस्कृतीत एखादे नवे संशोधन झाले आणि त्या संस्कृतीने ते वापरात आणले की त्या पहिल्या संस्कृतीशी साधर्म्य साधणार्‍या किंवा तिच्या जवळपास प्रगती साधलेल्या इतर संस्कृती ते संशोधन स्वीकारतात किंवा आपल्या पथ्यावर पडेल असे बदल करून स्वीकारतात. या स्वीकार करण्यात अर्थातच अनेक निकष असतात. उदा. गरज, फायदे-तोटे, सांस्कृतिक आणि धार्मिक समज वगैरे. साधारणतः कल्पना विसरणाचे पाच भाग मानले जातात. ज्ञान, मनवळवणी, निर्णय, अंमलबजावणी आणि स्थायीकरण.

सिंधू लिपीतील शिक्का
सिंधू लिपीतील शिक्का

पहिले दोन भाग ज्ञान आणि मनवळवणी सहजगत्या उपलब्ध झाले नाहीत आणि नवे संशोधन स्वीकारण्याचा निर्णय झाल्यास मिळालेले ज्ञान किंवा संशोधन जसेच्या तसे वापरणे कठीण होऊ शकते पण अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले असल्यास मूळ संशोधनाला नजरेसमोर ठेवून एक समरुपी पर्यायी पद्धत निर्माण करता येते. सुमेरियन कीलाकारीवरून व्युत्पन्न झालेल्या अनेक लिपींमध्येही हेच साम्य दिसून येते आणि म्हणूनच शेजार्‍यांकडून स्वीकारलेल्या या लिपी जशाच्या तशा न स्वीकारता थोड्याफार फरकांनी किंवा अधिकच्या संकल्पनांची भरती करून स्वीकारल्या गेल्या.

सिंधू संस्कृतीने लिपी स्वीकारायचे मुख्य कारण व्यापार हे असावे. मध्य आशियाई संस्कृतींशी व्यापार करताना त्यांना शिक्के, चलन, ओळखपत्रे यांवरून तेथील लिपीची ओळख झाली असावी. ही मर्यादित ओळख स्वीकारण्यामागे उद्देशही व्यापारात एकसूत्रता राहणे हा असावा. ज्या संस्कृती तगल्या, वाचल्या आणि फोफावल्या त्या स्थायी संस्कृतींनी लेखांकन, ओळखपत्रे, दानपत्रे यांच्या पुढे जाऊन लिपीमध्ये सुधार केले, नवे संशोधन केले, अक्षरओळख, वर्णमाला, स्वरनिश्चिती इ. मधून सुधारित लिपी जन्माला आली. सिंधू संस्कृतीच्या र्‍हासामुळे या सुधारणांना खीळ बसली आणि सिंधू लिपी उत्क्रांत झाली नाही.

काही तज्ज्ञांच्या मते सिंधू लिपीच्या खुणा ब्राह्मी लिपीत दिसतात पण याला म्हणावे तेवढे पुरावे देणे अद्याप जमलेले नाही त्यामुळे बहुतांश तज्ज्ञ ब्राह्मी लिपी ही अर्माइक लिपीवरून व्युत्पन्न झाल्याचे मानतात त्यालाच ग्राह्य धरलेले आहे. सिंधू लिपीनंतर ब्राह्मी लिपीच्या वापरापर्यंत सिंधू खोरे सोडून पूर्वेकडे वळलेली संस्कृती शेतजमीन, पशुपालन, शासन, सुव्यवस्था यांचा पुनर्विकास करण्यात व्यग्र झाली. या काळात मध्य आशियाशी असणार्‍या व्यापारावर परिणाम झाला असण्याची शक्यता वगळता येत नाही. एकंदरीत या सर्व स्थित्यंतरांमुळे सिंधू संस्कृतीत उदयाला आलेली लेखनकला खुंटली. असाच काहीसा प्रकार "लिनिअर बी" आणि ग्रीक या दोन लिपींच्या बाबत झाल्याचे दिसते. म्हणजे, भारतीय समाज या मधल्या काळात निरक्षर राहिला का? याचे उत्तर स्थलांतरित झालेल्या बहुतांश भारतीय समाजाने काही काळापुरता लेखनाला बाजूला सारले असेच द्यावे लागते आणि त्यानंतर लेखनाचे महत्त्व ध्यानात आल्यावर पुन्हा एकदा शेजार्‍यांकडून लिपी उसनी घेऊन तिला आपल्या समाजात रुळवण्याचे प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांना मूर्त स्वरूप येण्यास ६००-८०० वर्षांचा काळ लागला.

अशोककालीन ब्राह्मी शिलालेख
अशोककालीन ब्राह्मी शिलालेख

सिंधू संस्कृतींचे स्थलांतर न होते तर सिंधू लिपी उत्क्रांत होऊन सद्य भारतीय लिपींचा चेहरामोहरा वेगळा भासला असता. मात्र तसे न झाल्याने पुनश्च सेमेटिक लिपींशी संबंध आल्यावर कल्पना विसरणाच्या तत्त्वानुसार पुन्हा एकदा लेखनकलेला आपलेसे करून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि ब्राह्मी, खारोष्टीच्या रुपाने भारतीय संस्कृतीत पुन्हा एकदा लेखनकलेच्या विस्तारास प्रारंभ झाला. या मधल्या काळात जी मूळ लिपी उसनी घेतली गेली ती उत्क्रांत झाल्याने (येथे अर्माइक) तिच्यावरून बेतलेल्या ब्राह्मीचा आणि त्या पुढील लिपींचा विस्तार झपाट्याने झाला आणि लेखन केवळ शिक्के, ओळखपत्रे, रेकॉर्ड किपिंग आणि प्रचार यापुरते सिमीत न राहता महाकाव्ये, पुराणे इ. द्वारे लोकशिक्षणाच्या मार्गाने लिपींची वाटचाल सुरू झाली.


लेखातील सर्व चित्रे विकिपिडीयावरून घेतली असून लिपींची वाटचाल दर्शवण्यासाठी त्यांचा उपयोग केला आहे.

Comments

सिंधू लिपी संदर्भात राजेश राव यांनी व्यक्त केलेले मत

सिंधू लिपी संदर्भात राजेश राव यांनी व्यक्त केलेले मत... सिंधू लिपी ही लिपी आहे का? या लिपीचा अर्थ कसा लावायचा? संगणकाच्या सहाय्याने शास्त्रद्न्यांनी घेतलेला शोध आणि मिळालेले आश्चर्यकारक निष्कर्ष ... या दुव्यावर व्हिडिओ पाहता येईल.

सुरेख

राजेश राव यांनी व्यक्त केलेले मत पटण्यासारखे आहे. सिंधू लिपी ही "रिबस प्रिन्सिपल" वर आधारित असल्याचे आधीच स्पष्ट झालेले आहे पण नेमकी भाषा कोणती बोलली जात होती हेच माहित नसल्याने बाकी सर्व केवळ गृहितके आणि अंदाज ठरतात. तेव्हा "रोजेटा स्टोन" हा एकमेव उपाय शिल्लक राहतो.

विडिओसाठी धन्यवाद. आवडला.

चांगला विषय...

सिंधू संस्कृतीची लिपी ही खरेच लिपी आहे की नाही या विषयी तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत.
ब्राम्ही आणि सिंधू संस्कृतीची लिपी एकच असे समजत होतो. ते तसे नसावे असे लेखावरून् वाटते.

स्वतंत्ररित्या जगात सर्वात प्रथम लेखनकला शोधल्याचा मान सुमेरियन संस्कृतीला जातो.
इजिप्शिअन हे सुमेरिअमनांपेक्षाही प्राचीन होते. सुमेरिअन उदयास येण्याच्या काळात, स्थिरस्थावर होण्याच्या काळात त्यांनी
विकासाचा पुढचा टप्पा गाठला होता असे ऐकले आहे. इथे उलट् चित्र् दिसते आहे. सुमेरिअन इतर कुठल्याच क्षेत्रात पुढे आलेले कसे दिसत नाहित् मग? (धातूकाम, शिल्पकला, हत्यारे,दगडि बांधकाम वगैरे) त्या सर्व क्षेत्रात इजिप्शिअन् पुढे कसे?
लिखित लिपी मागाहून् शिकूनही ते पुढे कसे जाउ शकले?

चिनी लिपीचा विचार केलेला नाही.
अवांतर होइल, पण इजिप्त आणि सुमेरिअन(कदाचित सिंधू संस्कृतीही) ह्यांच्या लिपी चिनी लिपीपेक्षा नक्कीच जुन्या असाव्यात.
चिनी लिपी शोधली तो कोण शास्त्रज्ञ मुख्य सम्राट चिन् ह्याच्या कारकिर्दिच्या आसपासच होउन गेला म्हणतात. म्हणजे बुद्धाच्या , सॉक्रेटिसच्या किंवा कन्फ्युशिअसच्या मागेपुढे.

दुसरी तक्रार :_ ह्या सगळ्या गोष्टी "तिकडून् इकडे " अशाच का येत? "इकडून् तिकडे "का जात नसत?
शक-कुषाण-हूण् तिकडून् इकडे येणार, नंतर त्याच मार्गाने खैबरजवळून अजून कुणाच्या घोड्यांच्या टापांचे विजयी स्वर् येणार.
अरे हो, खुद्द् घोडेच इथे नव्हते ना, घोडेही "तिकडून इकडे येणार" ....
इतकेच नाही आपण सर्रास भारतीय समजणारी मेथी सुद्धा इसवीसनाच्या काही शतकेच आधी भूमध्य समुद्राच्या आसपासच्या लोकांनी इथे आणली म्हणतात? अरे सगळच तिकज्ञ आलय तर इथलं आहे तरी काय? (कणेकरांचा "दगडांच्या देशा" आठवला.)

तुझे संशोधन स्मृती वाढवण्यात कोणतीही मदत करत नाही, फक्त नोंद ठेवण्याच्या कामी उपयोगाचे आहे.
हे म्हणजे एखाद्याला फुकटात उत्तम प्रजातीचा प्रशिक्षित घोदाअ फुकटात भेट दिल्यावर्र त्यानं "हात्तिच्या हे जनावर गायीसारखं दूध का देत नाही" असं विचारण्यासारखं आहे.

बाकी सिंधू लिपी डावीकडून उजवीकडे आणि पुन्हा उजवीकडून् डावीकडे अशी लिहिली जायची. ब्राम्हीची लेखनशैली कशी आहे?

आपल्याकडे सिंधू संस्कृतीनंतर बराच काळ काहीच दिसत नाही, थेट वैदिक काळ किंवा बुद्ध पूर्व काळच दिसू लागतो, तद्वतच ग्रीससुद्द्धा चारेकशे वर्षे "डार्क एज" मधून गेलेला दिसतो. काही जण मानतात त्या प्रमाणे अंधार युगापूर्वीचे ग्रीक् हे अंधार युगानंतरच्या ग्रीकांचे पूर्वज् नव्हते! आपली लिपी गायबली तशीच त्यांचीही अचानक् लुप्त् वगैरे झाली होती का?

वेळेअभावी इतकेच.
--मनोबा

हम्म!

त्या सर्व क्षेत्रात इजिप्शिअन् पुढे कसे?
लिखित लिपी मागाहून् शिकूनही ते पुढे कसे जाउ शकले?

अरे तुम लेख पढ्या नहीं क्या? बाकी, इजिप्शियन पुढे कसे याचे उत्तर ७००० वर्षांपेक्षा जास्त इतिहास आणि संस्कृती असून युरोप आणि अमेरिका आपल्या पुढे कसे असा या प्रश्नाने द्यावेसे वाटते. :-) संस्कृती ही सतत बदलत असते. हवामान, जमिनीचा कस, रोगराई, हल्ले, लढाया यासर्वांमुळे संस्कृतीच्या प्रगतीवर परिणाम होऊ शकतो. तसेच, संस्कृतींनी प्रगती साधण्यात लिखित लिपीचा हात फारसा नव्हता. मोठी नगरे वसवणार्‍या सिंधू संस्कृतीतील लोकांनी नंतर मोठी शहरे का वसवली नाहीत याही प्रश्नाचे उत्तर तेच आहे.

अवांतर होइल, पण इजिप्त आणि सुमेरिअन(कदाचित सिंधू संस्कृतीही) ह्यांच्या लिपी चिनी लिपीपेक्षा नक्कीच जुन्या असाव्यात

इथे जुन्या-नव्याचा प्रश्न नसून स्वतंत्र लिपी शोधण्याचा विचार आहे.

ह्या सगळ्या गोष्टी "तिकडून् इकडे " अशाच का येत? "इकडून् तिकडे "का जात नसत?

पहिला माणूस अफ्रिकेतून का आला? या प्रश्नाच्या उत्तरावर इतर सर्व प्रश्नांची उत्तरे बेस्ड आहेत. :-) मनुष्य स्थलांतराचा नकाशा लावते. तो बरीच उत्तरे देईल.

हे म्हणजे एखाद्याला फुकटात उत्तम प्रजातीचा प्रशिक्षित घोदाअ फुकटात भेट दिल्यावर्र त्यानं "हात्तिच्या हे जनावर गायीसारखं दूध का देत नाही" असं विचारण्यासारखं आहे.

यात काहीच चुकीचे नाही. माझ्या लहानपणी घरात फोन आणि गाडी असणे हे ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाई. गाडी कशाला हवी? पांढरा हत्ती. घरातून खाली उतरलं की रेल्वे स्टेशन आहे आणि बस डेपो आहे असे माझे वडिल म्हणत. याचप्रमाणे, माणसाला ज्या गोष्टीची गरज आहे ती त्याला हवी असते, जर गरज भागवणारी इतर साधने असतील किंवा गरजच नसेल तर त्या गोष्टीचे महत्त्व नसते. प्रवासासाठी किंवा लढाईसाठी घोडा नको असेल पण मुलांना खाऊपिऊ घालण्यासाठी दूध हवे असेल तर हे जनावर गाईसारखे दूध देत नाही असा विशाद व्यक्त होईलच.

बाकी सिंधू लिपी डावीकडून उजवीकडे आणि पुन्हा उजवीकडून् डावीकडे अशी लिहिली जायची. ब्राम्हीची लेखनशैली कशी आहे?

माझ्यामते सिंधू लिपी फक्त उजवीकडून डावीकडे लिहित जात होती. सिंधू लिपीच्या ओळीच्या ओळी मिळालेल्या नाहीत. ब्राह्मी डावीकडून उजवीकडे.

ब्राह्मीविषयक थोडे.

ब्राह्मी लिपीचा विषय चालू आहे म्हणून माझ्याजवळील काही वित्रे खाली जोडीत आहे. ब्राह्मी लिपीचे वाचन कसे करायचे ह्याच्यावर थोडा प्रकाश ह्यांतून पडतो.

ब्राह्मी लिपि सूत्र १
ब्राह्मी लिपि सूत्र १
ब्राह्मी लिपि सूत्र २
ब्राह्मी लिपि सूत्र २
पितळखोरा आणि भाजे ह्यांतील लेखांचे वाचन
पितळखोरा आणि भाजे ह्यांतील लेखांचे वाचन
लुंबिनी येथील एका लेखाचे वाचन
लुंबिनी येथील एका लेखाचे वाचन

सगळे 'तिकडून'च इकडे येते हे कसे असा प्रश्न मन ह्यांनी विचारला आहे. त्याविषयी मला असे वाटते की शेती करून स्थिर होण्याची प्रक्रिया मानवजातीमध्ये स्पसुममाररे १०,००० वर्षांपूर्वी मध्य आशियाच्या प्रदेशांमध्ये सुरू झाली त्यामुळे त्या भागात साम्राज्ये आणि प्रगत संस्कृतींची निर्मिति अन्य प्रदेशांच्या तुलनेने कित्येक सहस्र वर्षे आधी सुरू झाली. साहजिकच पहिल्यापहिल्या सहस्रकांमधून लेखनकला, कालगणना अशा गोष्टी 'तिकडून इकडे' आल्याचे दिसते. त्या केवळ इकडेच आल्या असे नाही, युरोपातहि तिकडूनच त्या पोहोचल्या.

ज्याला सगळ्या जगातील पहिले प्रस्थापित देऊळ म्हणता येईल अशी जागा, (गोबेकली टेपे - तुर्कस्तानातील उर्फा शहराजवळ) मिळाली आहे अशी समजूत आहे आणि ती सुमारे ९,००० वर्षांची जुनी आहे.

तिथून इथे का?

कोल्हटकरांचे, तिकडूनच इकडे कसे येते त्याचे स्पष्टीकरण योग्य आहे. माणसाला जेव्हा शेती करण्याची उपरती झाली तेव्हा हवामान, पीक, जमीन आणि पाणी यासाठी "सुपीक चंद्रकोरीचा" मेसोपोटेमियाचा प्रदेश पथ्यावर पडला. जिथे शेती सुरू झाली तेथे गरजेपेक्षा अधिक अन्नोत्पादन झाल्याने इतर कामांना, कलांना, संशोधनांना आणि राजकीय प्रगतीला चालना मिळाली. साहजिकच, त्यांची प्रगती आजूबाजूला स्थलांतरातून पसरली किंवा शेजार्‍यांनी उसनी घेतली.

कालांतराने वेगवेगळ्या गटांनी/ संस्कृतींनी आपापली स्वतंत्र प्रगती साधली परंतु ज्यांची प्रगती अधिक झाली त्यांच्यामार्फत नवीन संशोधने जगात इतरत्र पोहोचली.

----

खरे म्हणजे ब्राह्मीविषयी स्वतंत्र चर्चा सुरू करायला हवी. कोल्हटकरांना काही लिहिणे शक्य असल्यास त्यांनी लिहावे ही विनंती.

अभ्यासपूर्ण् व वाचनीय् लेख

लेख् आवडला लेखिकेला काय् म्हणायचे आहे ते मोजक्या शब्दात् वाचकांपर्यंत पोचते आहे प्रतिसाद चांगले व विषयाला धरून वाटले.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

छान

सावकाश वाचावा लागेल लेख.

नितिन थत्ते

काही मुद्दे

या विषयाच्या संदर्भात मनात आलेले काही मुद्दे येथे मांडत आहे.अर्थात प्रियालीताईंनी लेखात जे विचार मांडलेले आहेत त्यांच्याशी मी पूर्ण सहमत आहेच.
1.सिंधू संस्कृती मधील मोहेंजोदाडो सारख्या मोठ्या शहरांचा मध्यपूर्वेमधील शहरांबरोबर मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे. हा व्यापार चालू राहण्यासाठी लिखित रेकॉर्ड स्वरूपातील, हुंड्या, पाठवलेल्या मालावर तो माल कोणाकडून आला आहे हे दाखवणारी लेबले, चलने, यासारख्या व्यापारी स्वरूपाच्या उपयोगासाठी वापरली जाणारी भाजलेल्या मातीची सील्स आढळून येतात. या शिवाय कोणतेही लिखित रेकॉर्ड मिळत नाही. यामुळे सिंधू संस्कृतीतील लेखनकला ही फक्त व्यापार नैमित्तिक होती असे म्हणावे लागते.
2.ब्राह्मी पिपीतील मूळाक्षरे कालाप्रमाणे खूप बदलत गेलेली आहेत. सम्राट अशोकाच्या शिलालेखातील ब्राम्ही मूळाक्षरे ही ग्रीक मूळाक्षरांच्या धाटणीवर लिहिलेली वाटतात. नाणेघाट ब्राम्ही आणखी निराळी आहे तर कार्ले किंवा नंतरच्या ब्राम्ही लिपीत जास्त गोलाकार वेलांट्या आल्याचे दिसते. इतिहास तज्ञ केवळ ब्राह्मी लिपीच्या धाटणीवरून त्या शिलालेखाचा काल ठरवू शकतात.
3.ब्राम्ही लिपी व प्राकृत या दोन्हींना अस्सल भारतीय म्हणता येईल असे मला वाटते. भारताचा वायव्य भाग, शिंजियांग (निया,खोतान मधील लाकडी पाट्या),अफगाणिस्तान या सारख्या कुषाणांचे वर्चस्व असलेल्या भागात भाषा प्राकृत असली तरी मुख्यत्वे शारदा आणि खरोष्टी लिपी वापरात होत्या. मात्र अशोकाच्या कालापासून भारतीय द्विपकल्पात तरी पुढे ब्राह्मी वापरात आली.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

ब्राह्मी

ब्राह्मीवर एखादा लेख यावा. विशेषतः वायव्य भागातील लिपी उजवीकडून डावीकडे लिहिल्या जात. सिंधूलिपी देखील उजवीकडून डावीकडे लिहिल्याचे दिसते. वर विडिओत राजेश राव म्हणतात की ओळ लिहिताना जागा संपली की शेवटी माणूस जी गिचमीड करतो ती गिचमीड शिक्क्यांच्या डावीकडे दिसते. (पण जर शिक्क्यांवर लिपी असेल तर ती उलट वाचायला हवी ना? [मिरर इमेज] तर मग ती डावीकडून उजवीकडे वाचायला लागेल.)

असो.

ब्राह्मी उजवीकडून डावीकडे वाचली न जाता डावीकडून उजवीकडे का वाचली जाऊ लागली (आणि हेच रोमन लिपीबाबत) हा प्रश्न मनात येतो? या शिक्क्यांनी आणि मिरर इमेज तत्त्वाचा तर यात हात नसावा?

ब्राह्मीमध्ये कसा फरक पडत गेला त्याचा चार्ट खाली लावते. या चार्टकडे पाहिले की लक्षात येते की बहुधा ठसे उमटवण्याच्या प्रक्रियेतून अक्षरे प्रवास करताना उलटी (डाव्याची उजवी आणि उलट) झाल्याचे (उदा. ग, द, प, ब) लक्षात येते.

शिक्के व सील्स्

सिंधू संस्कृतीमध्ये वापरात असलेले शिक्के व ते उमटवून काढलेली सीलींग्ज्ची प्रत (Seals and Sealings)हे दोन्ही बघण्यासाठी उपलब्ध आहेत्. दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात ही दोन्ही बघता येतात.
चन्द्रशेखर

पुन्हा काळजीपूर्वक वाचण्यालायक

पुन्हा काळजीपूर्वक वाचण्यालायक लेख आणि प्रतिक्रिया.

सहमत

धनंजय ह्यांच्याशी सहमत. लेख आवडला.

 
^ वर