ज्ञान आणि Knowledge (एक पूर्श्चात्य योग)

ज्ञान आणि Knowledge
(एक पूर्श्चात्य योग)

-- सत्त्वशीला सामंत


प्रसिद्ध भाषातज्ज्ञ आणि कोशरचनाकार सत्त्वशीला सामंत ह्यांनी 'मुक्त शब्द' च्या जानेवारी २०१२ च्या अंकात प्रसिद्ध झालेला प्रस्तुत लेख उपक्रमाच्या वाचकांसाठी आणि सदस्यांसाठी प्रकाशित करण्यासाठी सहर्ष परवानगी दिली ह्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. -- संपादन मंडळ


'मुक्त शब्द' मासिकाच्या मार्च २०११ च्या अंकात श्री. निशिकांत ठकार यांनी केलेला एका जपानी कथेचा अनुवाद वाचनात आला. ('देवाची सर्व मुले शकतात'-- मूळ लेख हारूकी मुराकामी) त्यातील एक परिच्छेद असा होता --

'योशियाला वडील नव्हते. जन्मल्यापासून फक्त आईच होती आणि तिने त्याला तो लहान असताना वारंवार असे सांगितले होते -- आपला प्रभू हाच तुझा पिता आहे --'

योशिया सतरा वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या आईने त्याला त्याच्या जन्माचे (जवळपास) रहस्य उघड करून सांगितले. ती म्हणाली की, -- 'आता सत्य कळून घेण्याइतका तू मोठा झाला आहेस -- मी माझ्या कुमारवयात गहन अंधारात वावरत होते.... तेव्हा मला प्रेम नसलेल्या वेगवेगळ्या माणसांचे ज्ञान झाले. ज्ञान होणं म्हणजे काय हे तुला माहीतच असेल, होय ना?' .... त्याच्या आयुष्यातल्या या टप्प्यापर्यंत त्याला स्वतःसच अनेक वेगवेगळ्या प्रेम नसलेल्या मुलींचे ज्ञान झाले होते...'

संपूर्ण कथेत आणखी दोन-तीन ठिकाणी 'ज्ञान घेणे', 'ज्ञानात', 'ज्ञान मिळवणे', 'ज्ञानात्म संबंध' असे उल्लेख आले होते. ते उल्लेख वाचून मी भांबावून गेले. पृ. ६० वर एका ठिकाणी "..... तुझा दुसऱ्या कुण्या पुरुषाशी संबंध आला असला पाहिजे,' असा थेट उल्लेख आहे.

त्यावरून मला छान्दोग्योपनिषदातील जबालेची समांतर कथा आठवली. जबालेचा पुत्र जेव्हा विद्या घेण्यासाठी गुरूकडे जातो तेव्हा ते त्याला कुलवृत्तान्त म्हणजे आईवडिलांची नावं विचारतात. त्याला आपल्या पित्याचं नाव माहीत नव्हतं. म्हणून मातेकडे येऊन त्याने तिला बापाचं नाव विचारलं तेव्हा जबाला उत्तरली -- 'बहृहं चरन्ती परिचारिणी यौवने त्वामलभे |' 'अनेकांची परिचारिणी म्हणून मला वावरावे लागल्याने, त्या ओघात मला तुझ्या रूपाने अपत्यप्राप्ती झाली. सबब तुझा नेमका बाप कोण हे मी सांगू शकत नाही.' 'परिचारिणी' याचा कोशगत अर्थ 'दासी' असा असून, 'दासी' या शब्दाला 'वेश्या', 'रांड' असाही एक अर्थ आहे. (दास्या: पुत्र: = रांडलेक-शिवी). वेश्याव्यवसायाच्या निमित्ताने तिचा अनेकांशी संबंध आल्याने, तिला आपल्या पुत्राचा नेमका पिता कोण हे सांगता आले नाही.

उपर्युक्त दोन कथांमध्ये विलक्षण साम्य असून, दोहोंचा भावार्थ सारखाच आहे. पण जपानी कथेच्या अनुवादातील 'ज्ञान' या शब्दाने मला बुचकळ्यात टाकले. 'ज्ञान' शब्दाला 'शरीरसंबंध' वा 'समागम' असा अर्थ आहे का याचा उलगडा होईना. अकस्मात् मला इंग्रजीतील knowledge हा शब्द आठवला. पूर्वी केव्हातरी कायद्याचे शिक्षण घेत असताना, शरीरसंभोग या अर्थाचा carnal knowledge हा शब्द वाचल्याचे स्मरत होते. त्याअर्थी 'ज्ञान' हे knowledge या शब्दाचे भाषांतर असावे असे वाटले. पण मूळ कथा तर जपानी होती. मग knowledge शब्द कुठून आला असेल? मग तत्काळ अनुवादक श्री. निशिकांत ठकार यांच्याशी संपर्क साधला. त्याच्यावरून कळले की, सदर कथा त्यांनी मूळ जपानीतून थेट भाषांतरित न करता, तिच्या इंग्रजी भाषांतरावरून अनुवादित केली होती. पण मग नुसत्या knowledge या शब्दाला 'संभोग, समागम' असा अर्थ आहे का याचा शोध घेण्यास सुरुवात झाली.

इंग्रजी अर्थपरंपरा:

सर्व प्रख्यात व प्रमाण इंग्रजी शब्दकोशांमध्ये, to know या क्रियापदाला archaic या सदराखाली to have sexual intercourse with असा अर्थ दिलेला असून, knowledge या शब्दालाही sexual intercourse असा पुराणात अर्थ दिलेला आहे. इंग्रजीतील पुराण वाङ्मय म्हणजे बायबल. म्हणून बायबलमधील महत्त्वाचे संदर्भ आणि त्यांची वेगवेगळी मराठी भाषांतरे उपलब्ध करून दिली. त्यानुसार --

१. जुना करार : Genesis Chap. 4, verse 1- And adam knew Eve his wife; and she conceived; and bare Cain,.... (King James version 1611) उत्पत्ती अध्याय ४, वचन १:

आदामाने आपली स्त्री हव्वा हिला जाणले; ती गर्भवती होऊन तिने काइनाला जन्म दिला.... (बायबल सोसायटी-- सुधारित आवृत्ती)

२. नवा करार: Mathew Chap. 1 - Verses 24-25 Then Joseph... took unto him his wife. And he knew her not till she had brought forth her first-born son: and he called his name JESUS.तेव्हा.... त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला, तरी तिला प्रथमपुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही

(बायबल सोसायटी -- सुधारित आवृत्ती)

बायबलची आजवर अनेक जणांनी भाषांतरे केली आहेत. त्यांपैकी प्रारंभीच्या काळातील रमाबाईंसकट बहुतेक अनुवादकांनी to know याचे शब्दशः 'जाणणे'असेच भाषांतर केले आहे. भाषांतरकारांना त्या शब्दाचा खरा अर्थ कळला नव्हता का? बहुतेक असे नसावे. त्यांना खरा अर्थ माहीत असूनही केवळ सभ्योक्ति (euphemism) म्हणून त्यांनी तसे केले असावे. पण पुढील काळात हिब्रू भाषेतील बायबल इंग्रजीत आणताना, काही अनुवादकांनी to know ऐवजी have relations with, have sex with, know carnally, sleep with/together (= have sexual relations with - Webster इत्यादी) अशांसारखे भाषांतरे केली, तर मराठी अनुवादकांनी 'प्रसंग करणे, -पाशी निजणे, -शी संग करणे, शरीरसंबंध करणे' इत्यादी शब्दांनी अनुवाद केलेला दिसतो. अर्वाचीन काळाबद्दल सांगायचे तर, फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या 'सुबोध बायबल'मध्ये त्यांनी 'शरीरसंबंध' असा शब्द योजला आहे (खंड २ - नवा करार - पृ. ५२३-५२४ -- राजहंस प्रकाशन), तर मंगेश पाडगावकर यांच्या 'बायबल नवा करार (भाषांतर व मुक्त चिंतन)' या स्वैर अनुवादात '... तिला वासनेने स्पर्श केला नाही', अशी शब्दयोजना केली आहे. (पृ.३२- मौज प्रकाशन)

आणखी एक गंमतीचा भाग असा की, knowledge याला conversance/ conversation (घनिष्ठ परिचय) असाही एक अर्थ असून, to converse या क्रियापदाला to have sexual intercourse (Webster's Encylopaedic unabridge Dictionary of English Language) असा एक लुप्तार्थ (Obs.) आहे. त्यामुळेच इंग्लिश कायद्यात criminal conversation म्हणजे adultery असा अर्थ अभिप्रेत असतो. intercourse या शब्दात 'पारस्परिक व्यवहार' ही मध्यवर्ती कल्पना असून, त्यालाही 'सामाजिक व्यवहार' ही मध्यवर्ती कल्पना असून, त्यालाही 'सामाजिक व्यवहारा'प्रमाणे 'sexual intercourse' हाही एक अर्थ आहेच. शिवाय, 'पारस्परिक व्यवहार' या अर्थाच्या commerce या इंग्रजी शब्दालादेखील 'सामाजिक / आर्थिक व्यवहाराच्या' जोडीला 'sexual intercourse' असाही अर्थ आहे.

संस्कृत अर्थपरंपरा: मग मी संस्कृत प्रतिशब्दांकडे मोहरा वळवला.

गम्: (प्रथम गण-परस्मै.) to know किंवा knowledge या अर्थाचे संस्कृत शब्द म्हणजे 'गमन' हे नाम होय. 'गम् /गमन' या शब्दांना 'जाणे' हा प्राथमिक अर्थ असला तरी, 'जाणणे' (अवगम्, अधिगम्, इत्यादी) असा अर्थ तर आहेच, शिवाय 'संभोग करणे' (संग, संगम, संगमन, इत्यादी --- पंचतंत्र, याज्ञवल्क्यस्मृति) हाही अर्थ आहे; हे 'वेश्यागमन', 'मात्रागमन' इत्यादी शब्दांवरून सिद्ध होते.

विद्: १) (द्वितीय गण -- परस्मै.) जाणणे, अनुभवणे

२) (षष्ठ गण - उभय.) -- १. मिळवणे २. विवाह करणे (मनुस्मृति:)

'विद्‌'वरून तयार झालेल्या 'वेत्तृ' या नामाला a husband or an espouser असाही एक अर्थ आहे. (Sanskri-English Dictionary - V. S. Apte); to espouse = to marry हे समीकरण प्रसिद्ध आहेच. पण to marry याला 'विधिवत् विवाह करणे' याव्यतिरिक्त to unite intimately, तसेच marriage या शब्दाला any close or intimate association or union असाही दुसरा अर्थ आहे. (Webster). आश्चर्याची गोष्ट अशी की, पाणिनिपूर्व वाङ्मयात, उदाहरणार्थ 'सूर्यासूक्ता'त जवळजवळ याच अर्थाने 'विद्' धातूचा प्रयोग झालेला दिसतो.

ऋग्वेद -- दशम मंडल -- सूक्त ८५ -- मंत्र क्र. ४०(९७०६)

सोमः प्रथमो विविदे गन्धर्वो विवदः उत्तर |

तृतीयो अग्निष्टे पतिस्तुरीयस्ते मनुष्यजाः || ४० ||

Soma first obtained the bride; the Gandharva obtained her next; Agni was your third husband; your fourth husband is born of man. Rigveda Samhita -- English Translation by H. H. Wilson -- pg. 403.

पण राहून राहून मला एक प्रश्न असा पडला होता की, वस्तुतः to know याच्याशी 'ज्ञा' (नवम गण -- परस्मै.) या संस्कृत धातूचा व्युत्पत्तिदृष्ट्या थेट व घनिष्ट संबंध असतानाही, 'ज्ञा' या धातूला कोणत्याही प्रचलित शब्दकोशात 'संभोग' वाचक अर्थ दिल्याचे का सापडत नाही? मग निदान पाणिनिपूर्व प्राचीन वाङ्मयात तरी असा अर्थ असावा असे माझे मन मला सांगू लागले. म्हणून मी त्या दिशेने शोध घेण्यास प्रारंभ केला.

उपसर्गरहित अवस्थेतील केवल 'ज्ञा' या धातूला मात्र असा अर्थ मला कुठेही सापडला नाही. म्हणून मी 'ज्ञा' धातूची उपसर्गयुक्त रूपे शोधली. त्यांपैकी, 'संज्ञान' व 'प्रज्ञा' व 'प्रज्ञान' अशी तीन रूपे मला संभोगार्थाशी जवळीक करणारी असल्याचे आढळून आले.

संज्ञानम्:- शुक्लयजुर्वेद (वाजसनेयि सं.) काण्वसंहिता -- अध्याय ३४, २रा अनुवाक-- मंत्र १:-

संधये जार गेहायोपपतिमार्त्यै परिवित्तं

निर्ऋत्यै परिविविदानमराध्या एदिधिषु:

निष्कृत्यै पेशस्कारी ँ् संज्ञानाय स्मरकारीम् |

प्रकामोद्यायोपसदँ वर्णायानुरुधँ बलायोपदान्||

वेगवेगळ्या देवतारूपांना वेगवेगळे बळी देण्याविषयीचा हा मंत्र आहे. त्यापैकी 'संज्ञान' देवतेसंबंधीच्या टीका पुढीलप्रमाणे:-

आनंदबोध टीका : संज्ञानाय देवतायै स्मरकारीं कामकारिणीम् |

अनंताचार्य टीका : संज्ञानाय स्मरकारीं मददीप्तिकरीम् || ४७ ||

सायणभाष्य : संज्ञानाय समानज्ञानाभिमानाने स्मरकारीं मन्त्रौषदधादिभि: भर्तृ: कामोत्पादिकाम् (पृ. २९३)

'स्मरकारी' म्हणजे 'पुरुषाची वा पतीची कामभावना चेतावणारी/चाळवणारी' (a woman exciting passions), याबाबत तीनही टीकांमधे एकमत आहे.

"संज्ञान देवतेला कामप्रेरक स्त्रीचा बलि द्यावा" असा याचा भावार्थ आहे. तथापि, 'संज्ञान' या शब्दाविषयी फक्त सायणाने भाष्य केले आहे. त्यातील 'अभिमानिने' या शब्दाने माझे लक्ष वेधून घेतले. वेगवेगळ्या कोशांत मला सापडलेले अर्थ पुढीलप्रमाणे:-

(१) अभिमानित रतिसंभोग (गीर्वाणलघुकोश)

(२) अभिमानोऽर्थादिदर्पे प्रणयहिंसयो : | (अमरकोश - २५५६)

(३) अभिमानितम् copulation, sexual intercourse (Lexicographers अमरसिंह, हलायुध, हेमचंद्र, इ.)

(Monier-William's Sanskrit-English Dictionary -pg 67.)

उपर्युक्त मंत्रातील 'जार', 'उपपति' अशांसारखे बहुतेक निर्देश 'प्रणय/शृंगार/कामक्रीडा (amour)' याच्याशीच निगडित आहेत. 'प्रणय' या शब्दालादेखील 'संघटन, सलगी' (गीर्वाणलघुकोश) असे अर्थ असून इंग्रजीतील liason (an illicit intimate relation relationship between a man and a woman) याच्याशी तो समानार्थक आहे.

डेक्कन कॉलेजमधील 'संस्कृत शब्दकोशा विभागा'च्या लेखालयात मला आणखी एक नोंद सापडली --

संज्ञानमसि कामधरणम् |

(तैत्तिरीय संहिता - IV - २.४.१, भारद्वाज श्रौतसूत्र - ५.५.२, तैत्तिरीय ब्राह्मण - १.२.१.१७)

तेथील पत्रिकांवर you are harmony, fulfilment of all desires, असा अर्थ लिहिलेला होता. पण 'शुक्लयजुर्वेदा'चा संदर्भ लक्षात घेता, वरील वचनांचा आणखीही एक अर्थ संभवतो. तो म्हणजे -- you are union, fulfilment of sex. (union = uniting in marriage, also sexual intercourse असाही एक अर्थ वेबस्टर आदी शब्दकोशांत दिलेला आहे.)

प्रज्ञा: to know या क्रियापदाचे संस्कृत अर्थ शोधताना, मोनीअर विल्यमच्या इंग्रजी-संस्कृत शब्दकोशातील एका नोंदीपाशी मी थबकले. ती नोंद अशी --

(to) know.... (carnally) प्र+ज्ञe, सम्+गम्..... संग (पृ. ४८९)

म्हणून मी मोनीअर-विल्यमच्या संस्कृत-इंग्रजी कोशात 'प्रज्ञा' ही नोंद शोधली तेव्हा तेथे पुढील मजकूर आढळला --

प्रज्ञा = the enemy of AdiBuddha, through the union with whom the latter produced all things - MWB;

Monier-William's Buddhism (MWB) या ग्रंथात पुढीलप्रमाणे उल्लेख आहे --

Sometimes, however, this Adi-Buddh is said to have produced all things through union with Prajñā in which case he is rather to be identified with personal Creator Brahmā . -pg. 204

यावरून बौद्ध तत्त्वज्ञानात 'प्रज्ञा' या शब्दाला विशेष अर्थ असल्याचे आढळले. '2500 Years of Buddhism' (संपादक: पी. व्ही. बापट, सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची प्रस्तावना; प्रकाशक: प्रकाशन विभाग, भारत सरकार - आ. १९५९) या ग्रंथातील पृ. ३६५ वरील मजकूर पुढील प्रमाणे :-

".... The process of enlightenment is therefore represented by the most obvious, most universal symbol imaginable: the union of love, in which the active element (उपाय) represented by a male, the passive element (प्रज्ञा) by a female figure..."

प्रज्ञान : 'प्रज्ञा'कडून 'प्रज्ञान'कडे वळले. 'प्रज्ञान' याचे wisdom आदी अर्थ सर्वपरिचित आहेत. पण ऐतरेय उपनिषदात एक वेगळाच अर्थ सापडला. त्यात एक श्लोक आहे --

यदेतद् हृदयं मनश्चैतत् | संज्ञानमाज्ञानं विज्ञानं प्रज्ञानं मेधा दृष्टिर्धृतिर्मनीषा जूतिः स्मृतिः सङ्कल्पः क्रतुरसुः कामो वश इति सर्वाण्येवैतानि प्रज्ञानस्य नामधेयानि भवन्ति || २ ||

विविध अंतःकरणप्रवृत्तींची यात चर्चा असून, 'प्रज्ञान' या संज्ञेच्या वेगवेगळ्या प्रतिशब्दार्थांचा उल्लेख केलेला आहे. त्यावरील 'शांकरभाष्या'त या सर्व अर्थांचे स्पष्टीकरण आहे. त्यापैकी 'काम' आणि 'वश' ह्या प्रतिशब्दांचे विवेचन करताना शंकराचार्य म्हणतात --

"..... कामो ऽ संनिहितविषयाकाङ्‍क्षा तृष्णा, वशः स्त्रीव्यतिकराद्याभिलाषः...." त्यांच्यामते 'काम' म्हणजे अप्राप्त वस्तूंबद्दलची तृष्णा, तर 'वश' याचा अर्थ स्त्रीव्यतिकराची अभिलाषा होय. 'व्यतिकर' म्हणजे 'संयो, संबंध' होय.

इतर टीकाकारांची भाष्ये:-

(१) भारद्वाज रामानुजाचार्य यांची 'प्रतिपदार्थदीपिका' --

वशः = स्त्रीसम्पर्काद्यभिलाषा;

(२) रामानंद यांचे 'आनन्दभाष्यम्' --

वशः = अङ्‍गालिङ्‍गनाद्यभिलाषा;

(ऐतरेयोपनिषद्: प्रका. संस्कृत संशोधन संसद् -- मेलकोटे १९९७ पंचम खंड -पृ.६८)

'कल्याण' या हिंदी नियतकालिकाच्या उपनिषद्‌विषयक अंकात (वर्ष २३ वे - अंक १ला) 'वश' 'स्त्रीसहवास/संसर्ग आदि की अभिलाषा' असा अर्थ दिला आहे. हिंदी भाषेत 'सहवास' म्हणजे 'मैथुन, संभोग', आणि संस्कृतमध्ये 'संसर्ग' म्हणजे 'मैथुन' होय.

थोडक्यात, 'संज्ञान', 'प्रज्ञा' व प्रज्ञान या सर्व शब्दांशी संभोग/मैथुन ही संकल्पनादेखील निगडित आहे असे म्हणता येईल.

अर्वाचीन काळातील मराठी साहित्यक्षेत्रातील एक दिग्गज म्हणजे इतिहासाचार्य (कै.) वि. का. राजवाडे होत. साहित्य अकादमीने प्रसिद्ध केलेल्या 'राजवाडे लेखसंग्रह' (1ली आ. 1958, 2री आ. 1967) या पुस्तकातील 'मगध' या लेखात (पृ. 93-94) राजवाडे म्हणतात--

".... know -जाणणे ह्या धातूचा संबंध संस्कृत 'ज्ञा' धातूशी आहे व know -स्त्रीसंग करणे ह्या धातूचा संबंध 'जन्' - उत्पन्न करणे ह्या धातूशी आहे. इंग्रजीत दोन्ही धातूंचा अपभ्रंश होऊ त्याचा उच्चार 'नो ' असा एकच झाला आहे. 'ज्ञा ' तील 'ज् ' बद्दल 'k' व 'ञ् ' बद्दल 'n '; आणि 'जन् ' तील 'ज् ' बद्दल 'k ' व 'न ' बद्दल 'n ' अशा दोन्ही धातूंतील व्यंजनांच्या खुणा इंग्रजी अपभ्रंशात एकच राहिल्यामुळे दोन्ही धातूंचा उच्चार एकच होतो. अर्थांवरून मात्र दोन निरनिराळे धातू आहेत हे ओळखता येते......"

वरील विवेचनात राजवाड्यांनी इंग्रजी व संस्कृत धातुरूपांची तुलना केली आहे. त्याप्रमाणे इंग्रजीपुरता विचार केला तरत, आपणास gnosis(Gk-gno) आणि genesis (Gk-genos, L-genus) या दोहोंमधील, व संस्कृतपुरता विचार केल्यास, 'ज्‍ञान' (ज्ञान संभोगक्रिया) व 'जनन' यो दोहोंतील निकट जैवसंबंध आणि भाषिक सगोत्रसंबंधदेखील लक्षात येईल.

कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांनी 'पूर्व ' व 'पाश्चात्य ' या शब्दांचा संयोग करून 'पूर्श्चात्य ' असा नवीनच शब्द घडवला होता असे माझ्या ऐकिवात आहे. त्याप्रमाणे 'ज्‍ञा' 'ज्ञा' व 'जन् ' या धातुरूपांत धातुरूपांच्या संयोगाने घडलेले 'ज्ञान'रूप आणि 'gno' व 'genos' यांच्या संयोगातून साकारलेले know हे रूप यांचे तादात्म्य हा एक अपूर्व असा 'पूर्श्चात्य' योगच म्हणावा लागेल!


(ऋणनिर्देश: श्री. अशोक हिवाळे, डॉ. भाग्यश्री भागवत (वैदिक संशोधन मंडळ), डॉ. ग. उ. थिटे, डॉ. मो. गो. धडफळे व श्री. सांगळे (ग्रंथपाल), आणि डेक्कन कॉलेज-संस्कृत विभाग- ग्रंथालय व भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, डॉ. न. ब. पाटील)


- सत्त्वशीला सामंत, १६, यशोदा कुंज सोसायटी, तेजस नगर, कोथरूड, पुणे - ४११ ०३८. दूरध्वनी - (०२०) २५३८३७५५

Comments

अतिशय रोचक आणि तपशीलवार लेख.

अबब इतकेच म्हणता येईल. अशी संदर्भसंपन्नता क्वचितच पहायला मिळते.

जाता जाता : जाणणे ह्याचा अर्थ संभोग करणे असा जुन्या करारात दिलेला आहे हे विट्ठलराव घाट्यांच्या "दिवस असे होते" या अप्रतिम आत्मचरित्रात दिलेले आहे, ते या निमित्ताने आठवले.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

जिज्ञासा

फारच रोचक,संदर्भपूर्ण आणि श्रीमंत लेख. एकदा वाचून सर्व संदर्भ डोक्यात आले नाहीत. अनेकदा वाचायला लागेल असा लेख. लेखिकेच्या "जिज्ञासेला" आणि शोधक वृत्तीला प्रणाम.

अभिमानणे या शब्दाचा अर्थ मोल्जवर्थ मराठी to espouse असा देतो.

अवांतर: जालिय "विदा"चा संदर्भच या लेखाने बदलून टाकला. ह. घ्या.

+१

>>फारच रोचक,संदर्भपूर्ण आणि श्रीमंत लेख. एकदा वाचून सर्व संदर्भ डोक्यात आले नाहीत. अनेकदा वाचायला लागेल असा लेख. लेखिकेच्या "जिज्ञासेला" आणि शोधक वृत्तीला प्रणाम. <<<<

हेच म्हणतो. जमेल तसा सविस्तर प्रतिसाद देईन. संशोधनपर उत्तम दर्जाचं लिखाण कसं करावं याचा वस्तुपाठ.

+१

असेच म्हणतो.

रोचक

रोचक.

लेख आवडला. नीट वाचून मग प्रश्न आहेत ते विचारते.

रोचक

रोचक. जपानी पुस्तकापासून सुरू झालेली अभ्यासपूर्ण विचारधारा वाचून गंमत वाटली.

विचारप्रवर्तकही आहे. ज्ञा आणि जन् धातूंचा व्युत्पत्तिसंबंध मी यापूर्वी कधीही ऐकलेला नाही. विचार करण्यालायक कल्पना आहे.
- - -
तरी ही कल्पना मला फारशी पटलेली नाही.

हे दोन्ही धातू ग्रीक आणि लॅटिनातही वेगवेगळेच आहेत. आणि जन्/γεννιέμαι याचा संबंध जन्म/नसलेली वस्तू असलेली होणे वगैरे यांच्याशी अधिक आहे. संभोगाशी कमी.

जर कधी हे दोन्ही धातू एका शब्दापासून दोन वेगवेगळे अपभ्रंश होऊन बाजूला पडले असतील, तर ते फार म्हणजे फारच प्राचीन काळात झाले असले पाहिजे. खरे तर त्या दोन्ही शब्दांकरिता एकच मूळ शब्द होता ही कल्पना मला जरा जास्तच रम्य वाटते आहे.

- - -

इंग्रजीचे पुराणवाङ्मय म्हणजे बेओबुल्फ वगैरे, नाही का? किंग जेम्सचे बायबल हे बर्‍यापैकी नवे म्हणायला पाहिजे.

लॅटिन वुल्गाता बायबलात ते वाक्य असे आहे :
Adam vero cognovit Havam uxorem suam ... (जेनेसिस ४:१)
येथे cognovit मध्ये "जाणणे" हाच प्रमुख अर्थ आहे.

तसेच ग्रीक सेप्टुआगिंटात :
Aδαμ δὲ ἔγνω Eυαν...
"एग्नो" म्हणजे जाणणेच.

तसेच हिब्रू बायबलात :
וְהָאָדָם, יָדַע אֶת-חַוָּה אִשְׁתּוֹ

येथे "यॉदा"="जाणले" हे महत्त्वाचे आहे.

हिब्रू ही इंडो-यूरोपीयन भाषांपैकी नाही, आणि हा शब्द "ज्-न्-" किंवा "ग्-न्" कुटुंबातला नाही. म्हणजे मुळातच "जाणणे" या अर्थाचा शब्द वापरला आहे. ही प्राचीन सभ्योक्ती (euphemism) आहे, आणि ग्रीक-लॅटिन-इंग्रजी सर्वांनी ती सभ्योक्ती परंपरेने स्वीकारलेली दिसते. Know शब्द इंग्रजीत संभोगाच्या अर्थाने वापरल्याची बायबल-भाषांतरापूर्वीची नोंद मला सापडली नाही. (फक्त इंटरनेट शोध.)

आदमाने हव्वेला जाणले, ती गरोदर झाली, आणि तिने मुलाला जन्म दिला... हा संदर्भ असल्यामुळे सभ्योक्तीचा अर्थ बर्‍यापैकी स्पष्ट वाटतो.

नाहीतरी संभोगाकरिता बहुतेक सभ्य शब्द वक्रगती/सभ्योक्तीचे शब्दच असतात. "ती त्याच्याशी जाते" असा वापर मराठीत आहे. (तेंडुलकरांच्या "सखाराम बाइंडर"मध्ये हा वापर ऐकला.) सं-गम सम्-आ-गम, हे संस्कृत शब्द लेखात दिलेलेच आहेत. लॅटिनातला "co-itus" म्हणजे "सह-जाणे" असाच आहे.

ऋग्वेदात "भोसकणे" या अर्थाने "त्रि: स्म माह्नः श्नथयो..." ऋ १०.९५.५ ("दिवसातून तीन-तीनदा भोसकत असस... हे पुरूरव्या!" असे उर्वशी म्हणते.) पण जरा जोरकस असले तरी येथेसुद्धा चित्रमय वक्रगतीचेच वर्णन आहे. त्याच सूक्तात : "अमानुषीषु मानुषो निषेवे (=राहिला/संभोग करता झाला)"१०.९५.८, "मर्तो अमृतासु पृङ्क्ते (जोडला/संभोग केला)" १०.९५.९... येथेसुद्धा स्भ्योक्तीच दिसते.

इतके वेगवेगळे शब्द सभ्योक्तीसाठी वापरत असल्यामुळे "विद्" शब्द कधीमधी सभ्योक्ती म्हणून वापरला, तर ते वैशिष्ट्य ठरत नाही.
- - -
अवांतर : लॅटिनातला futuere इंग्रजीतला f*** यांचे प्राचीन मूळ काय? मराठी/कोंकणी भाषांतील झ** शब्दांचा आणि हिंदी/फारसीमधील चो** शब्दांचा व्युत्पत्तिजन्य संबंध आहे काय? सांगता येत नाही. पण संभोगाबाबत थेट अर्थाचे हे सर्व शब्द व्रात्य आहेत.

वस् -वास - सहवास -

या सभ्योक्तीचे आणखी एक उदाहरण : वस् - वास - सहवास - बसणे- बैठना... असेही असावे.

- असे असले तरी लेखात दिलेली 'टू नो' अथवा 'जाणणे' अथवा ' ज्ञान होणे' ही सभ्योक्ती अनेक भाषांमधून (इंडो-युरोपीय तसेच हिब्रू) तशीच आहे हा योगायोग(?) महत्त्वाचा आहे. तसेच 'द ट्री ऑफ नॉलेज'चे फळ म्हणजे 'नॉलेज' हे खाल्ल्याने अडाम आणि हव्वा यांना आपल्या नग्नतेची जाणीव झाली. (ही सुद्धा सभ्योक्तीच आहे.) याचा अर्थ हे 'जाणणे' वैषयीक होते.

अवांतर :
मर्ढेकरांचा आवडता 'संज्ञा' हा शब्द पुन्हापुन्हा डोक्यात घोळतो आहे.

अधिक अवांतर

अवांतराचे अवांतर

हिंदी/फार्सीमधील चो** शब्दांविषयी माहिती नाही पण कोंकणी/मराठीतील झ** शब्दांविषयी अंदाज करता येतो. हे शब्द संस्कृत `युज्' (कर्म. भू.धा.वि. युक्त) या धातूपासून आलेले असावेत. 'युज्' म्हणजे जुळणे, जोडलेले असणे. योग शब्द 'युज्' पासूनच आलेला आहे आणि आपले `युगुल/युगल', जुगणे,झुगणे,जुगलबंदी,[दोघांची आपापसातील झटापट; (किंबहुना `झटापट'ही तसाच आलेला असावा)] झगडा,झगडणे,झूग,हेही. मला तर 'झुंज'हा शब्दही 'युध्'पेक्षा 'युज्' पासूनच आलेला असावा असे वाटते. अर्थात् जंग् हा फार्सी शब्दसुद्धा या संदर्भात दुर्लक्षिता येणार नाही.
हिंदीमध्ये जुटना,जुडना ही क्रियापदे देखील (कामाला) लागणे, (कामाशी) भिडणे या अर्थांनीच जास्त करून वापरली जातात.

रोचक आणि माहितीपूर्ण

रोचक आणि माहितीपूर्ण लेखन आहे! इथे दिल्याबद्दल अनेक आभार!

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

रशियन संदर्भ

वरील लिखाण वाचून लगेच सुचलेली शंका मांडतो. ह्यावर आणखी विचार करून नंतर वाटल्यास लिहीन.

धनंजय ह्यांचे लेखन मला अधिक पटले. To know आणि to know carnally ह्यांमधील भासमान साम्य हा सभ्योक्तीचा भाग वाटतो. Carnal संबधाच्या समयी एक भागीदार दुसर्‍याच्या अगदी निकट असतो, किंबहुना त्याचा/तिचा भाग झाल्यागत असतो आणि म्हणून he/she 'knows' the other partner असा त्या सभ्योक्तीचा अर्थ लावता येईल.

सत्त्वशीला सामंत ह्यांनी मानलेला 'ज्ञा' अणि 'जन्' ह्या धातूत संबंध असता तर तो अन्य जुन्या इंडो-युरोपीय भाषातहि दिसायला हवा होता. पण ग्रीक आणि लॅटिनमध्ये तो तसा नाही हे धनंजय ह्यांनी दाखविले आहेच. तरीहि तो कित्येक शतकांनंतर इंग्रजीत कोठून आला ह्याचे स्पष्टीकरण वरीलप्रमाणे असावे.

इंडो-युरोपीय गटापैकी स्लाव भाषांचे आणि संस्कृतचे खूप जवळचे नाते आहे. रशियन (आणि अन्य स्लाव भाषा) आणि रशियनमध्ये शेकडो शब्द असे सापडतात की ज्यांचे मूळ एकच आहे असे सरळच दिसते. तरीहि रशियनमध्ये संस्कृत 'ज्ञा' चा समानार्थी शब्द आहे 'знать' झ्नात्' आणि 'जन्' चा 'родить' रोदित्. आता 'знать' आणि 'родить' मध्ये उच्चारण आणि अर्थ ह्या दृष्टीने काहीच साम्य नाही.

अभ्यास करता येतो एवढेच कळले.

प्रस्तुत लेखाच्या लेखिकेचं वाचन दांडग आहे, संस्कृत व्याकरणाची जाण आहे, व तश्याच लोकांशी बरीच ओळख आहे एवढेच लेखातून कळले. बाकी ह्या लेखात काहीच नाही. केवळ शब्दांचे बुडबुडे उडवलेले वाटतात.

बरं लिखाणाची शैली देखील अशी आहे की -
'मी बाजारात जात होते, तिथं मुळ्येबाई भेटल्या त्या म्हणाल्या कि मागच्या गल्लीत मुळे अगदी स्वस्त मिळत आहेत. हे कळल्यावर मी मागच्या गल्लीत जात असताना आधीच घेवडेबाई भेटल्या त्या म्हणाल्या की पुढच्याच गल्लीत घेवड्यासोबत मुळ्याची जुडी फ्री मिळत्येय.'

मजकूर संपादित. सार्वजनिक शिष्टाचाराला सोडून होणारे लेखन उपक्रमावर करू नये याची कृपया नोंद घ्यावी. उपक्रमावर लेखन करताना ते विषयाशी संबंधित असावे. - संपादन मंडळ.

एकच वाक्य अयोग्य होतं.

संपादन मंडळास,

माझ्या प्रतिसादामधील इथल्या लेखावर आलेल्या प्रतिसादकांच्या प्रतिसादावर घेण्यात आलेला आक्शेप अयोग्य, अस्थानी होता. ते वाक्य काढून टाकायला हवे. माझ्याकडून झालेली ती चूक मी कबूल करतो. त्याबद्दल येथील प्रतिसादकांची मी माफी देखील मागतो.

परंतु माझ्या प्रतिसादातील इतर भाग संदर्भहीन नव्हता. तो तुम्ही पुन्हा होता तसा ठेवावा हि विनंती मी तुम्हाला करीत आहे.

'भूक लागणे' व 'पोटात कावळे ओरडणे' ह्या दोन गोश्टींचा अर्थ एकच आहे. त्यासाठी शब्दकोश कशाला पाहिजे?
पहिला शब्दप्रयोग 'आशयसूचक रूपिका' आहे तर दुसरा वाक्यप्रयोग 'कार्यसूचक रुपिका' आहे. आणी हा बेसिक भेद अशिक्शीतांना देखील माहित नसला तरी कळत असतोच. त्यासाठी वेद वाचायची गरज नाही.

प्रत्येक शब्दाचा अर्थ काय केवळ शब्दकोशातूनच मिळतो? शब्द-वाक्ये ही प्रतीके असतात. हि प्रतीके ज्या गोश्टींची असतात त्या गोश्टी आपल्या आयुश्यात घडत नाहीत का?

थक्क झालो ....!!!

लेखिकेच्या लेखाचा आवाका अन त्यावर आलेल्या तेवढ्याच तोलामोलाच्या प्रतिक्रिया.....उपक्रम सारख्या सर्जनशील व्यासपीठाचा सदस्यत्व असण्याचा अभिमान वाटला.....!!

+१

पण् धागा अजूनही नीटसा वाचू शकलेलो नाही.
फुर्सतीत वाचीन म्हणतो.
बादवे, इथले लोक "सृजनशील" आहेत. "सर्जन शील" लोक तिकडे बी जे, के इ एम मधे सापडतात सगळे एकजात लुच्चे आहेत की काय
असे वाटायला बिचार्‍या आमिरला भाग पाडतात. :)
--मनोबा

कँटरबरी टेल्स मधील उल्लेख

सेंट जेम्स बायबल १६११ सालचे. चॉसरचे कँटरबरी टेल्स ~१४००च्या थोडे आधीचे. त्यात संभोगाचे थेट वर्णन करणार्‍या या ओळी सापडतात :
Within a while this John the Clerk up leap
And on this goode wife laid on full sore;
So merry a fit had she not had *full yore*.
He pricked hard and deep, as he were mad.
- -
*for a long time*
क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांतीक्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांतीक्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांतीक्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती
क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांतीक्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांतीक्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांतीक्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती
क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांतीक्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांतीक्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांतीक्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती

 
^ वर