सार्वजनिक संवादाची पातळी खालावली आहे का?

पुरावे न सादर करता अण्णांनी पंतप्रधानांवर केलेले आरोप वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर दिसतात. त्यापैकी एक बातमी -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=229953:2012-06-01-11-18-33&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104

भ्रष्टाचार मिटवण्यासाठी केंद्र सरकार काहीच करत नाही अशी टिका करत असतानाच पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पुर्ण विश्वास दाखवणा-या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे प्रमुख समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज पंतप्रधानांवरील विश्वास उडाल्याचे सांगितले.
माझा पंतप्रधानांवर पुर्ण विश्वास होता, पण आता त्यांच्यावरही विश्वास राहिला नसल्याचे अण्णांनी आज स्पष्ट केले.

मागील पासष्ट वर्षात लोकहिताचा एकही कायदा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींद्वारे अमलात आणला गेला नाही, अनेक लोकप्रतिनिधी भ्रष्टाचारी असून लोकांना माहित नसलेल्या माहितीचा गैरफायदा घेत आहेत.

असंही ते पुढे म्हणाले पण अण्णा हे एक उदाहरण मात्र आहेत.

१. देशातील अत्युच्च पद भूषवणार्‍या व्यक्तीबद्दल असे जाहीर उद्गार काढणे म्हणजेच चुकीची माहिती प्रसारित होत आहे, असे तुम्हाला वाटते का?
२. जाहीर वक्तव्ये करणे आणि ती प्रकाशित करणे हे इंटरनेटच्या माध्यमातून सोपे झाले असल्याने ट्विटर आणि इतर एकोळी संकेतस्थळांमुळे एकमेकांविरुद्ध दर्जाहीन वक्तव्ये करण्याचे प्रमाण वाढले आहे का?
३. अशा प्रकारच्या बेछूट वक्तव्यांवर निर्बंध आणायला हवे असे तुम्हाला वाटते काय?
४. निर्बंध आणावेसे वाटत असल्यास कोणत्या उपाययोजना कराव्या?
५. तुम्हाला काय वाटते लोकप्रतिनिधींद्वारे एकही कायदा अमलात आणला गेला नाही हे खरे काय? असे कोणते कायदे आहेत जे अमंलात आले?

आमची भूमिका

Comments

हा काय गृहपाठ आहे का?

<चर्चेत भाग घेणे, मतप्रदर्शन करणे हे खबरदारचे उद्दिष्ट नाही. याचबरोबर नकारात्मक, पूर्वग्रहदुषित चर्चा सुरु करणे हा ही हेतू नाही. बातमी वाचून एखाद्या सामान्य माणसाला जे प्रश्न पडतील तेच प्रश्न चर्चेत विचारले जातील. या व्यतिरिक्त चर्चेत खबरदारचा सहभाग राहणार नाही.>

खबरदार ह्यांची भूमिका त्यांच्याच शब्दात वरील प्रमाणे आहे.

आमच्यापुढे प्रश्नांची लड टाकून आपण त्यातून नामानिराळे राहायचे हे म्हणजे शिक्षकाने वर्गाला गृहपाठ घातल्यासारखे आहे किंवा सभाधीटपणा यावा म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षक विचार करून बोलते करणारे प्रश्न टाकतो तसे आहे. ह्या पातळीवरून आम्ही बरेच वर आलेलो आहोत आणि विचार कशाचा करावा ह्याविषयी कोणाच्या मार्गदर्शनाची आम्हास आवश्यकता वाटत नाही. चर्चेला आम्ही तयार आहोत पण खबरदार स्वतः नाहीत, ते उच्चपीठावरून आम्हा ज्ञानपिपासूंना केवळ मार्गदर्शन करणार!

खबरदार ह्यांचा हफीज सईदचा धागा बिनबुडाचा आणि पोकळ असल्याचे दिसलेच आहे आणि त्यावर खबरदार ह्यांच्याकडून कसलीहि खेददर्शक प्रतिक्रिया अथवा स्पष्टीकरण आलेले नाही.

ह्या कारणांसाठी मला खबरदार ह्यांच्या क्लासात नाव घालण्याची इच्छा नाही.

आश्चर्यकारक!!

खबरदार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ते मला आवडले. निदान त्यांचा हेतू खोडसाळ नाही हे मानण्यास जागा आहे. एक धागा तुमच्या मनासारखा निघाला नसेल पण गेले काही दिवस येणारे त्यांचे अनेक धागे चांगल्या चर्चेचे मानकरी ठरलेले दिसतात. त्यांच्या पेट्रोल दराच्या आणि धारूण रवीच्या चर्चेतून अनेक चांगले मुद्दे निघाले. तेथेही "चांगली चर्चा" असे सदस्यांनी म्हटल्यावर हारतुरे स्वीकारायला किंवा धन्यवाद म्हणायला खबरदार आलेले दिसत नाहीत.

सदस्यांनी चर्चेत सहभाग घ्यावा अशी त्यांच्यावर सक्ती नसते. तसेच चर्चेचा प्रस्ताव टाकणार्‍याने सहभाग घ्यावा अशीही सक्ती नसते. खबरदार यांनीही "प्रतिसाद द्या आणि बक्षीसे मिळवा" अशी बोली लावल्याचे दिसत नाही. तेव्हा मागच्या धाग्यावर काय झाले याची चर्चा या धाग्यावर कशाला? या धाग्यात भाग घ्यायचा नाही तर घेऊ नका. तुम्हाला आक्षेप असेल तर खबरदार यांना खरडवही किंवा निरोप लिहून कळवा पण हे असे प्रतिसाद लिहून काय साधणार आहात?

खबरदार यांनी कोणालाही कसलेही मार्गदर्शन केल्याचे मलातरी दिसले नाही. त्यांनी कोणत्याही चर्चेत भाग घेतलेला नाही यावरून खेददर्शक प्रतिक्रिया येणार नाही हे स्वाभाविक आहे. तसेही हफिजच्या धाग्यावर मला खेददर्शक प्रतिक्रिया यावी असे काही विशेष वाटले नाही कारण सनसनाटी बातम्यांविषयीही लिहिण्याचे त्यांच्या प्रतिसादात आहे आणि ही बातमी तशी प्रसृत झाली होती. मला अन्य धाग्यात खबरदार यांनी येऊन माझी पाठ थोपटावी किंवा आणखी तिसर्‍याला खबरदार यांनी येऊन अमुकतमुक स्पष्टीकरण द्यावे आणि चौथ्याला त्यांनी बिनशर्त माफी मागावी आणि पाचव्याला मी चर्चेला छान म्हटले पण खबरदार मला धन्यवाद द्यायला आले नाहीत "हाउ रूड" असे वाटू लागेल आणि असे एखाद्याचे इगो सुखावायला त्यांनी चर्चेत भाग घ्यावा ही अरेरावी असेल तर मग खबरदार यांच्या भूमिकेचे बारा वाजतील असे दिसते.

गेल्या चर्चेत वैद्यांनी दिलेले ऍप मला उपयुक्त वाटले आणि मी ते वापरात आणेन. जर ती चर्चा आली नसती तर मला ही गोष्ट कळली नसती.

हीच चर्चा पाहिली तर असे कोणते कायदे आणले गेले याचे उत्तर मला माहितीचा अधिकार असावे का असे वाटते पण नेमके माहित नाही त्यामु़ळे इतर कोणी उत्तर दिले तर मला त्यातून माहिती मिळेल. हेच उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

ह्या कारणांसाठी मला खबरदार ह्यांच्या क्लासात नाव घालण्याची इच्छा नाही.

यालाच सार्वजनिक संवादाची पातळी खालावली गेल्याचे उदाहरण म्हणावे का?

असो. खबरदार ही बहुधा आयडी आहे व्यक्ती नाही याची कल्पना कोल्हटकरांना आल्यास त्यांना होणारा त्रास कमी होईल असा अंदाज आहे.

अनपेक्षित

अरविंदराव, आपणांस क्लास लावल्यासारखे का वाटावे कळत नाही. खबरदाराची भूमिका केवळ फॅसिलिटेटरची आहे. तो मार्गदर्शन करताना मला दिसलेला नाही. क्षमा असावी. पण मला तुमची विधाने बिनबुडाची वाटताहेत. खबरदाराच्या धाग्यांच्या निमित्ताने ताज्या घडामोडींवर, बातम्यांवर उपक्रमींना आपली मते मांडता येऊ शकतात. अगदी सुरुवातीपासूनच ह्या धाग्यावर हल्ला चढवणे अनपेक्षित होते. असो. त्याचेही दुःख नाही पण बाळ सोकावते ना!

आणि हफीज सईदच्या धाग्यात फार जीव नसला तरी टाकाऊ नक्कीच नव्हता. बहुतेक वृत्तपत्रांनीही त्या बातमीचे सनसनाटीकरण केले होते. अनेकदा अगदी किरकोळ धाग्यांतूनही अगदी विषयांतरांतून, अवांतरांतून चांगली माहिती मिळत असते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

ट्विटर

ट्विटरशी मी फारशी संबंधित नाही पण एकमेकांवर वार करण्यासाठी ट्वीटर हे चांगले साधन आहे असे तेथे ज्या प्रकारे "सेलिब्रिटी वॉर" चालते त्यावरून म्हणण्यास जागा आहे. बेछूट कार्यवाहीवर निर्बंध आणण्यासाठी "रिपोर्ट अब्यूज" नावाची लिंक सहसा असते पण त्यात बेछूट वक्तव्यांचा समावेश असतो का ते माहित नाही.

पण या वरून एक जुनी आठवण आली. संवादी संकेतस्थळांवर जर एखाद्याविषयी बेछूट विधाने केली असतील तर कायद्याच्या मदतीने त्यावर निर्बंध आणता येतात का? आणि त्यात कोणत्या अडचणी असाव्या?

+१

प्रतिसादाशी सहमत आहे. मलाही हेच/असेच प्रश्न/शंका आहेत

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

आपले मत मांडण्याचा हक्क आहे पण !

1. देशातील अत्युच्च पद भूषवणार्‍या व्यक्तीबद्दल असे जाहीर उद्गार काढणे म्हणजेच चुकीची माहिती प्रसारित होत आहे, असे तुम्हाला वाटते का?
आपले मत योग्य त्या पद्धतीने मांडण्याचा हक्क नागरिकांना आहे पण मांडल्या जाणाऱ्या मताला कोणत्या माहितीचा, पुराव्याचा ठाम आधार आहे त्यावर त्याचे खरे खोटेपण ठरते. कदाचित गेल्या काही महिन्यात अण्णा आणि त्यांच्या तथाकथित टीम कडून अशाप्रकारची वक्तव्ये वारंवार येत असल्याने त्यातील कोणती खरी, कोणती खोटी हे कळणे थोडे कठीण आहे. पण मला वाटते कि ह्या देशाच्या सर्वोच्च पद भूषविणाऱ्या व्यक्तीबद्दल असे उदगार वारंवार काढणे तितकेसे बरोबर नाही (जरी पंतप्रधान कोणतेही उदगार काढत नसले तरी)

२. जाहीर वक्तव्ये करणे आणि ती प्रकाशित करणे हे इंटरनेटच्या माध्यमातून सोपे झाले असल्याने ट्विटर आणि इतर एकोळी संकेतस्थळांमुळे एकमेकांविरुद्ध दर्जाहीन वक्तव्ये करण्याचे प्रमाण वाढले आहे का?
थेट संवाद नसल्याने अशी दर्जाहीन वक्तव्ये वाढली असावीत. कारण संकेत स्थळांवर कोणताही पटकन प्रतिसाद मिळत नसतो (व्यक्तिगत संवादाच्या बरोबरीने मिळतो तेवढा) किंवा प्रतिसाद मिळेपर्यंत ती व्यक्ती out of site गेलेली असते बहुतांशी अशी वक्तव्ये करणाऱ्या लोकांकडे बराचसा फावला वेळ असतो अश्या काड्या करायला. आजच्या जगात जिथे स्वस्त स्मार्ट फोनचे आणि अमर्याद इंटरनेटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत तिथे - जिकडे तिकडे वेळच वेळ सॉरी नेटच नेट, त्यामुळे हे सोपे झाले आहे.

३. अशा प्रकारच्या बेछूट वक्तव्यांवर निर्बंध आणायला हवे असे तुम्हाला वाटते काय?
असे निर्बंध घालणे सोपे नाही. एकतर आज सर्वच स्वतःच्या व्यक्तीस्वातंत्र्याबद्दल अतिजागरूक झाले आहेत त्यामुळे एखादा निर्बंध घालायचा म्हटला (मग तो चांगला असेल कि वाईट) लोक एक जात त्याचा विरोध करतील. खरेतर ज्याप्रमाणे उपक्रम सारख्या संकेत स्थळांवर प्रतिसाद संपादित केले जातात तसे प्रतिसादांचे संपादन करणे अशा संकेत स्थळांना तितकेसे कठीण नाही. पण ह्या संकेत स्थळांवर केले जाणारे एका तासातील प्रतिसादच कोटींमध्ये जातात त्यामुळे तितकेसे सोपेही नाही.

४. निर्बंध आणावेसे वाटत असल्यास कोणत्या उपाययोजना कराव्या?
एखादी porn किंवा आपत्तीजनक साईट ओपन केल्यावर Web Violation Filter जसे काम करते, किंवा Anti Virus जसा काम करतो तसेच एखादे software अश्या संकेत स्थळांवर का असू नये? किमान आपल्या account साठी, आपल्याविरुद्ध कोणी असे काही लिहू नये म्हणून असा पर्याय असायला काहीच हरकत नसावी. (इतर सदस्यांचे काय मत आहे - एक नवीन software बनवायची नामी संधी आहे किंवा असे software असल्यास त्याची माहिती दयावी)

५. तुम्हाला काय वाटते लोकप्रतिनिधींद्वारे एकही कायदा अमलात आणला गेला नाही हे खरे काय? असे कोणते कायदे आहेत जे अमंलात आले?
किती कायदे बनविले गेले किंवा नाही ह्या पेक्षा किती कायदे अमलात आणले गेले, कायदा मोडल्यावर किती शासन केले गेले हे महत्वाचे आहे.
गेल्या पासष्ट वर्षात कदाचित जास्त संख्येने कायदे बनविले गेले नसतीलही पण जे आहेत ते राबविलेही गेले नाहीत, त्यात सुधारणा केल्या गेल्या नाहीत. कायद्यांच्या नवीन आणि जुन्या संपूर्ण यादीबाबत शासन पूर्ण उदासीन आहे.
किती कायदे बनवले किंवा कोणते बनवायचे आहेत त्याची माहिती लोकांपर्यंत कधीही शासनामार्फत स्वताहून पोहोचविली गेली नाही.

शीर्षकातील प्रश्नाचे उत्तर : नाही

शीर्षकातील प्रश्नाचे उत्तर : नाही.
- - -

श्री. अरविंद कोल्हटकर यांच्याशी सहमत आहे. ("खबरदार" हे सदर असल्यास) मला खबरदार सदराची धाटणी आवडलेली नाही. व्यक्ती-आयडी असल्यास या शैलीमुळे मला चर्चा करण्याची पद्धत आवडलेली नाही. हे मी आधीच एका प्रतिसादात करड्या ठशात सांगितले होते. (चर्चेत भाग न-घेण्याचे स्वातंत्र्य मला आहेच. पण शैली न-आवडल्याचे सांगणे, हेदेखील मला सुसंदर्भ वाटते.)

प्रश्नांची धाटणी फॅसिलिटेटरची नाही. लेखातील प्रश्न उपचारमात्र (र्‍हेटॉरिकल क्वेश्चन) आहेत. किंवा त्याहून वाईट : शाब्दिक क्लृप्ती वापरून एका बाजूला उत्तर देणे सोपे, तर दुसर्‍या बाजूनचे उत्तर बोजड आणि लाजिरवाणे केलेले आहे.

उदाहरणार्थ :

३. अशा प्रकारच्या बेछूट वक्तव्यांवर निर्बंध आणायला हवे असे तुम्हाला वाटते काय?

"बेछूट" या शब्दातच "सुयोग्य-मर्यादांच्या-बाहेरचे" हा अर्थ आहे, शिवाय "घातक" असा भाव आहे.
प्रश्नात वक्तव्य "बेछूट" असल्याची अट आहे. ती अट प्रतिसादकर्ता मान्य करेल, तर मग "निर्बंध आणू नये" हे उत्तर देणे शक्यच कसे आहे? आता प्रतिसादकाला "निर्बंध आणावे" असे उत्तर द्यायचे असेल, तर काम सोपे आहे. "मर्यादेबाहेरच्या वक्तव्याला मर्यादा असावी" हा तार्किक tautology आहे. "होय, सहमत" म्हणून मोकळे व्हावे.
"निर्बंध नको" असे कोणाला म्हणायचे असेल, तर त्या व्यक्तीला भले मोठे स्पष्टीकरण द्यावे लागेल. "बेछूट" अशी वक्तव्येच नसतात, किंवा या परिस्थितीत वक्तव्ये "बेछूट" नाहीत, किंवा दंडव्यवस्थेचा जुलूम करू शकणार्‍या शासनाने निर्बंध घालण्याइतपत अशी वक्तव्ये बेछूट नाहीत... वगैरे काहीतरी बिकट व्याख्या देत बसावे लागेल. खरे तर या व्याख्या ठरवण्याची जबाबदारी दोन्ही संवादकांची असते. मात्र प्रश्नाच्या शैलीमुळे फॅसिलिटेटर जबाबदारी एका बाजूला ढकलतो. "बेछूट" हे उद्देश्य-विशेषण वापरून प्रश्नकर्त्याने आपल्या अध्याहृत व्याख्येची अव्वल नैतिकता ध्वनित करून टाकली आहे.

सोप्या-भासणार्‍या प्रश्नाला अवजड-भासणारे उत्तर दिले, तर वाद प्रश्नकर्ता "जिंकतो". सार्वजनिक वादांच्या डावपेचांबाबत हे निरीक्षण आपण कित्येकदा केलेले आहे.

(अर्थात "खबरदार" आयडीच्या चर्चा उपक्रमाच्या धोरणात पूर्णपणे बसतात. याबाबत माझी काहीही तक्रार नाही. मात्र त्यांची शैली ही फॅसिलिटेटरची नाही. आणि साधक आणि बाधक चर्चेसाठी त्यांनी लिहिलेले चर्चाप्रस्ताव मला ठीक वाटत नाहीत.)

- - -
प्रश्नातच एका बाजूचे उत्तर लाजिरवाणे करण्याची या चर्चेतील शैली आहे. ती शैली बघून आपण म्हणू शकतो काय, की "सार्वजनिक संवादाची पातळी खालावली आहे"? तर नाही. कारण ही शैलीसुद्धा प्राचीन आहे.

शैली न आवडण्याचे सांगणे

श्री. अरविंद कोल्हटकर यांच्याशी सहमत आहे.

याचे अतिशय आश्चर्य वाटले म्हणून प्रतिसाद देत आहे. खबरदार यांची वकीली करण्याचा मानस नाही.

चर्चेत भाग न-घेण्याचे स्वातंत्र्य मला आहेच. पण शैली न-आवडल्याचे सांगणे, हेदेखील मला सुसंदर्भ वाटते.)

नक्कीच आहे. वर कोल्हटकरांनाही त्यांची शैली आवडली नसल्याचे मी सांगितले आहे तसेच सर्व सदस्यांनाही तसा हक्क आहेच.

लेखातील प्रश्न उपचारमात्र (र्‍हेटॉरिकल क्वेश्चन) आहेत. किंवा त्याहून वाईट : शाब्दिक क्लृप्ती वापरून एका बाजूला उत्तर देणे सोपे, तर दुसर्‍या बाजूनचे उत्तर बोजड आणि लाजिरवाणे केलेले आहे.

मला तरी असे जाणवले नव्हते. त्यांची भूमिका पाहून त्यांना पडलेले प्रश्न ते टाकत आहेत. इतरांनी आपापली चर्चा करावी. आपापले प्रश्न विचारावे अशी इच्छा दिसली. कदाचित तुम्ही म्हणता तसेही असेल आणि खबरदार यांचा कावा माझ्या लक्षात आलेला नसेल किंवा तुम्ही अतिविचार करत असाल.

साधक आणि बाधक चर्चेसाठी त्यांनी लिहिलेले चर्चाप्रस्ताव मला ठीक वाटत नाहीत

ठीक. साधक बाधक चर्चेसाठी काय करावे हे तुम्ही सुचवाल का? जर खबरदार हे सदर असेल (तसे असेल तर माहित नाही पण हेतू उपक्रमावर चालू घडामोडीवर चर्चा व्हावी असा असेल ) तर चर्चा प्रस्तावकाला चर्चेत भाग घेण्याचे कारण नाही. फक्त टीका करत राहणे आणि चालू झालेल्या गोष्टी बंद पाडणे हा आपला आणि कोल्हटकरांचा हेतू नसेल असा मला विश्वास आहे. जर ही चर्चा या मार्गानेच वळली तर निदान खबरदार अलर्ट होतील आणि पुढील चर्चांत सुधारणा करण्याचे मनावर घेतील अशी आशा करू.

अवांतरः उपक्रमावर लेख आणि चर्चा येण्याचे प्रमाण कमी असते. ते कमी का झाले यावर मी मध्यंतरी चर्चा टाकली होती. तेव्हा काही सदस्यांनी उत्साह संपला, लिहिण्यासारखे नवे काही नाही असे सांगितले होते. ते पटण्यासारखे होते. पण म्हणून उपक्रमाचा ट्रॅकर हलूच नये किंवा कोणी प्रयत्न करत असेल त्याला खच्ची करावे, काही सकारात्मक सुधारणा न सुचवता मोडता घालावा असेही मला वाटत नाही. या उलट, जे काही येते त्यातून साधक-बाधक चर्चा होईल असे मी पाहते आणि त्या अनुषंगाने खबरदारच नाही तर इतर अनेक चर्चांतही भाग घेते. वरील प्रश्न सजेस्टिव असले म्हणून मी ते उचलून उत्तरे द्यावीतच अशी सक्ती माझ्यावर नाही. उलट मला जे पटले ते मी लिहिते. ज्या प्रश्नांची उत्तरे द्यावीशी वाटली ती देते आणि नवे प्रश्न पडले ते विचारते.

कोल्हटकर, धनंजय यांच्याशी सहमत

श्री. अरविंद कोल्हटकर यांच्याशी सहमत आहे.

+१

प्रश्नांची धाटणी फॅसिलिटेटरची नाही. लेखातील प्रश्न उपचारमात्र (र्‍हेटॉरिकल क्वेश्चन) आहेत. किंवा त्याहून वाईट : शाब्दिक क्लृप्ती वापरून एका बाजूला उत्तर देणे सोपे, तर दुसर्‍या बाजूनचे उत्तर बोजड आणि लाजिरवाणे केलेले आहे.

सहमत. मलाही असेच वाटले.

साधक आणि बाधक चर्चेसाठी त्यांनी लिहिलेले चर्चाप्रस्ताव मला ठीक वाटत नाहीत.

पुन्हा सहमत.

वर कोल्हटकरांनाही त्यांची शैली आवडली नसल्याचे मी सांगितले आहे तसेच सर्व सदस्यांनाही तसा हक्क आहेच.

+१. म्हणूनच प्रतिसाद दिला.

मला जे म्हणायचे ते इतरांनी म्हणल्यामुळे प्रतिसाद एकोळी वाटण्याची शक्यता आहे, तरी तो अप्रामाणिक वाटून डिलीट होणार नाही अशी आशा आहे.

-Nile

प्रतिसाद संपादित.

.

धनंजय यांनी येथे काय चालले आहे ते लक्षात घ्यावे ही विनंती. किंबहुना याच्यासाठीच सकारात्मक सुधारणा सुचवा असे सांगत होते.

प्रतिसाद संपादित.

अवांतर प्रतिसाद संपादित केले आहेत.

खबरदार

खबरदार ह्या आयडीने चालवलेला प्रकल्प आवडला. त्यांनी चर्चेत सहभाग घेतल्यास उत्तमच आहे, पण न घेतल्यानेही फारसे बिघडत नाही. दोन ओळींची काहीतरी निरर्थक चर्चा टाकुन ते पसार होत नाहीत. विषय हे चालू घडामोडींवर आधारीत असतात. धनंजय म्हणतात तसे विषयाची किंवा प्रश्नांची मांडणी अजून चांगली करता येईल पण मुळातली संवाद घडवुन आणण्याची कल्पना चांगली आहे. तसेच हे एक हौशी लोकांचे चर्चास्थळ आहे हे ही ल़क्षात घ्यावे. तेव्हा थोडे कमी जास्त चालुन जावे. एखादा प्रश्न बायस्ड वाटल्यास तसे निदर्शनास आणू देण्याची मुभा सदस्यांना आहेच. अगदी प्रश्नांची उत्तरेच द्यावित अशी अपेक्षा खबरदार ह्यांना नसावी. तेव्हा चर्चा घडत आहेत तर ते चांगलेच आहे.

नाही

हे हौशी लोकांचे चर्चास्थळ आहे हे मान्य, पण इथे कमी जास्त विशेष चालत नाही हे माझे ऑब्जर्वेशन आहे.
प्रत्येक संकेतस्थळाची प्रकृती म्हणून असते, तेव्हा त्यात चुकीचे काही नाही.
पण खबरदार हे सदर असल्यास ते निश्चित कळलेले नाही. सदर नसून केवळ आयडी असल्यास इतर आयडींप्रमाणे उत्तराची अपेक्षा करण्यास हरकत नसावी. सदर असल्यास ते सदर आहे असे जाहीर करण्यास हरकत नसावी.

http://mr.upakram.org/node/3748#comment-64474

मला एक सदर म्हणून ही कल्पना आवडली, पण चर्चेचे आवाहन मलाही गृहपाठाप्रमाणे किंवा क्लासमध्ये बसल्याप्रमाणे वाटले. जेव्हा ते आवाहन करतात तेव्हा त्यात खबरदार यांचे जजमेंट येते आहे असे दिसते तेव्हा ते आयडी आहेत असे वाटते. ह्यातही चुकीचे नाही, पण खबरदार आयडी असले तर त्यांनी चर्चेत भाग घ्यावा असे वाटते. नसल्यास सदर म्हणून ते उपक्रमाच्या अधिकार्‍यांनी जाहीर करावे. एवढेच!

असहमत आणि आक्षेप

सदर असल्यास ते सदर आहे असे जाहीर करण्यास हरकत नसावी.

ते सदर किंवा तसेच काहीसे आहे असे स्वतः खबरदार यांनी जाहीर केलेले आहे असे दिसते.

खबरदार आयडी असले तर त्यांनी चर्चेत भाग घ्यावा असे वाटते.

आयडीने चर्चेत भाग घ्यावा ही अपेक्षा असली तरी सक्ती नसते. या उप्पर तो निर्णय त्या आयडीवर सोडावा असे वाटते. आपली चर्चेत भाग घेण्याची इच्छा नसल्याचे एकदा सांगितल्यावर तोच मुद्दा उगाळत राहण्यात हशील दिसत नाही.

नसल्यास सदर म्हणून ते उपक्रमाच्या अधिकार्‍यांनी जाहीर करावे. एवढेच!

दोन विधानांचा संबंध काय? हा उपक्रम अधिकार्‍यांवर फुकाचा दबाव वाटतो. इतकेच नव्हे तर उगा संकेतस्थळ धोरणे आणि अधिकार्‍यांचा बादरायण संबंध जोडण्याचा प्रकार वाटतो.

कदाचित असेही असेल की ही स्वतंत्र ड्युप्लिकेट आयडी असेल आणि इतर नावांनी चर्चेत सहभाग असेल. उपक्रमावर हे सहसा होते हे या चर्चेत भाग घेणार्‍या अनेकांना माहित आहे कारण एकापेक्षा अधिक आयडी काढण्यास येथे बंदी नाही हेही सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.

!

एकापेक्षा अधिक आयडी काढण्यास येथे बंदी नाही हेही सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.

ही उपक्रमाची अधिकृत भुमिका आहे की तुमचे मत/अंदाज वगैरे?

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

अंदाज समजावा

अंदाज समजावा पण त्याहीपेक्षा निरीक्षण म्हणणे योग्य ठरावे. हा प्रश्न का पडला? इतकी वर्षे उपक्रमावर वावरल्यावर कळले नव्हते?

तेच तर

(इतके वर्षे उपक्रम वापरूनही) ही माहिती माझ्यासाठी खरोखरच नवीन आहे. इथे ड्युप्लिकेट आयडी असतील पण ते 'लपून' म्हणजे 'उपक्रमाला' अधिकृतरित्या न कळवता काढलेले आहेत असे मी समजत असे. जर एकापेक्षा अधिक आयडी 'अधिकृत'रित्या असतील तर उपक्रमावर ड्युप्लिकेड आयडीकडे बघण्याचा सदस्यांचा - किमान माझा- दृष्टीकोन बदलेल असे वाटते.

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

इज धिस ए जोक?

इथे ड्युप्लिकेट आयडी असतील पण ते 'लपून' म्हणजे 'उपक्रमाला' अधिकृतरित्या न कळवता काढलेले आहेत असे मी समजत असे. जर एकापेक्षा अधिक आयडी 'अधिकृत'रित्या असतील तर उपक्रमावर ड्युप्लिकेड आयडीकडे बघण्याचा सदस्यांचा - किमान माझा- दृष्टीकोन बदलेल असे वाटते.

उपक्रमावरच नाही तर सर्वच संकेतस्थळांवर एकापेक्षा अधिक आयडी या अधिकृतच असतात.

ड्युपलिकत्त्व अधिकृत?

आयडी अधिकृत असतात मात्र असे समजले जाते जकी ते 'वेगळ्या' व्यक्तीचे आहेत. एकाच व्यक्तीचे असणे प्रशासनालही अधिकृतरित्या माहित नसते.
थोडक्यात त्याचे ड्युपलिकत्त्व अधिकृत असलेले संस्थळ मला माहित नाही. (उपक्रमावरही एकापेक्षा अधिक आयडी चालत नसावेत असाच माझा समज होता)

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

आयडी अधिकृत?

उपक्रम किंवा अधिक संकेतस्थळांवर सोकॉल्ड अधिकृत आयडी काढताना आपण काय करता?

आपला फोन नं, पत्ता, पासपोर्ट नं देता की फक्त इमेल आयडी देता? त्या आयडीवर आपले पूर्ण नाव खरे हवे अशी अट असते का? जर हे सर्व नसेल तर आपण अधिकृत आयडी काढली म्हणण्याला काय अर्थ आहे? आणि अधिकृतच म्हणायचे असेल तर सर्वच अधिकृत होतात.

तुम्ही आयडी काढल्यावर तुमच्या खरे खोटेपणाची अधिकृतरित्या चौकशी केली जाते काय? ऋषिकेश नावाची व्यक्ती खरी की खोटी याची शहानिशा होते काय?

या मराठी संकेतस्थळांचे सोडून द्या. याहू! जीमेल हॉटमेलवरही अशी काही सुविधा नसते. आणि तेथे एकापेक्षा अधिक काढलेल्या सर्वच आयडी अधिकृत असतात. मी माझ्या सोयीसाठी जेव्हा इनबॉक्सची साइज लिमिटेड होती तेव्हा फार पूर्वी याहूवर दोन आयडी काढल्या होत्या. दोन्ही अधिकृत असून योग्य कारणांसाठी मी त्यांचा वापर करते.

+१

तेच तर मीही म्हणतो आहे. तेव्हा एकाच व्यक्तीला (याचा अर्था एकाच इमेल आयडीला - कारण इथे ही ओळख धरली गेली आहे) एकच आयडी काढता येतो. ड्युप्लिकेट आयडी अधिकृतरित्या काढता येत नाही - त्यास बंदी आहे! (अगदी उपक्रमावरही). (छुप्या मार्गाने चोरून/लपून असे आयडी काढता येतात - असे लोक आहेत हे जगजाहिर आहे)

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

नव्हे!

तेच तर मीही म्हणतो आहे. तेव्हा एकाच व्यक्तीला (याचा अर्था एकाच इमेल आयडीला - कारण इथे ही ओळख धरली गेली आहे) एकच आयडी काढता येतो. ड्युप्लिकेट आयडी अधिकृतरित्या काढता येत नाही - त्यास बंदी आहे! (अगदी उपक्रमावरही). (छुप्या मार्गाने चोरून/लपून असे आयडी काढता येतात - असे लोक आहेत हे जगजाहिर आहे)

नव्हे आपण वेगवेगळे बोलत आहोत. :-) एकाच व्यक्तीला अनेक इमेल आयडी अधिकृतरित्या काढता येतात. त्यामुळे एकाच व्यक्तीला अनेक इमेल वापरून अनेक संस्थळ आयडी काढता येतात. एक व्यक्ती एक इमेल असा नियम जालावर नसतो तसा एक व्यक्ती एक आयडी असा नियमही नसतो. (त्यामुळे ड्युप्लिकेट म्हटले गेलेले सर्व आयडी अधिकृत ठरतात.)

आता आधीच अवांतर झालेल्या या चर्चेतील अतिअवांतर वेगळ्या चर्चेत स्थलांतरित करावे का असा प्रश्न पडला आहे.

कळले

कळले. इथे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या इमेल आयडीने वेगळे आयडी काढण्यास हरकत नाही. (माझा समज विपरीत होता) आता कळले. आभार. माझ्याकडून चर्चा इथेच संपवतो.

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

:)

कूल डाऊन. माझ्या वर दिलेल्या प्रश्नाला (हे सदर आहे काय?) खबरदार यांचे उत्तर आलेले नव्हते.
अधिकार्‍यांवर दबाव वगैरे काही नाही. सदर असल्यास ते जाहीर करण्याची संकेतस्थळांवर सर्वसाधारण पद्धत असते असे मला वाटल्याने म्हटले आहे.

बाकी मला सदर असल्यास त्याची कल्पना आवडल्याचे सांगितलेच आहे. असो.

भूमिका

मला वाटते खबरदार यांनी भूमिका सांगितली त्यात नवनवीन बातम्यांवर चर्चा टाकण्याचा मानस लिहिला आहे. आता याला सदर म्हणावे का, त्याची वारंवारिता किती आहे वगैरे तेच सांगू शकतील पण हे सदरसदृश काहीतरी असावे असा अंदाज येतो आहेच की.

सदर किंवा चर्चासत्र हे मलाही आवडले होते. तसे मीही म्हटले आहे पण त्यात काही वावगे आहे असे मला वाटले नाही. तसे एखाद्याला वाटूही शकते म्हणा पण मग सकारात्मक सुचवणी करावी असेही वाटते. फरक पडतो का बघू.

नमस्कार

नमस्कार,

या चर्चेत व्यक्त केलेल्या मतांबद्दल सर्वप्रथम सदस्यांचे आभार मानतो. येथे व्यक्त केलेले लेखनातील दोष स्वीकारले आहेत. निंदाजनक आरोपांचा स्वीकार करण्याचे बंधन आमच्यावर नाही. उपक्रमावरील ज्येष्ठ सदस्य या लेखनप्रकाराला स्वीकारतील अशी आशा अद्यापही वाटते.

सद्य घडामोडींवर चर्चा प्रकाशित करणे हा खबरदार या ओळखीचा उद्देश आहे; चर्चेत सहभाग घेणे हा नाही, या आमच्या निर्णयाचा उपक्रमी आदर करतील अशी आशा व्यक्त करतो. सर्व चर्चा उपक्रमाच्या धोरणात राहूनच प्रकाशित केल्या जातील. तसे न झाल्यास आक्षेप घेण्याचा हक्क प्रशासनास आहे. या ओळखीचा, चर्चा प्रकाशित करण्याचा आणि निर्णयाचा उपक्रम प्रशासनाशी संबंध नाही. उपक्रमाचा हितचिंतक म्हणून काही करावे असे वाटल्याने हा प्रयत्न करत आहे. हे सदर आहे का या प्रश्नाचे उत्तर देण्यास आम्ही असमर्थ आहोत कारण या चर्चेत काही प्रश्न सोडता केवळ बातमीकडे निर्देश करणे एवढाच उद्देश आहे. चर्चेच्या वारंवारितेबद्दल खात्री देणे जिकिरीचे वाटते.

प्रश्न र्‍हिटॉरिकल आहेत असे एखाद्याला वाटल्यास तो दोष स्वीकारत आहे. प्रश्न देण्याचे मूळ कारण चर्चेला चालना मिळावी हे आहे. प्रश्न एका व्यक्तीने/ओळखीने विचारल्याने त्यात बायस दिसणे शक्य असावे. ही प्रश्नकर्त्याची मर्यादा समजावी. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करूनही चर्चा करता येईल. प्रश्नांशिवाय चर्चा टाकली तर "कोणती चर्चा अपेक्षित आहे?" असा प्रश्नही उपस्थित होईल.

या चर्चेतून काही दोष सुधारता आले असते तर आनंद झाला असता; अद्याप तसे झालेले नाही याचा खेद वाटतो.

उपक्रमी सदस्यांवर टीका करणे, त्यांच्याशी वाद घालणे हा खबरदारचा उद्देश नसल्याने या प्रतिसादात अधिक लिहिणे होणार नाही. उपक्रमी सुजाण आहेत, आमची भूमिका समजून घेतील अशी आशा बाळगतो.

धन्यवाद.
कळावे, लोभ असावा,
आपला,
खबरदार.

काय चाचा...

काय चाचा उत्तरं देत बसलेत, जितके जास्त बोलाल तितके अजून प्रश्न वाढतील आणि अजून उत्तरं द्यावी लागतील. आमचं बघा काय झालं बाजूच्या चर्चेत.

संवाद पातळी

१. देशातील अत्युच्च पद भूषवणार्‍या व्यक्तीबद्दल असे जाहीर उद्गार काढणे म्हणजेच चुकीची माहिती प्रसारित होत आहे, असे तुम्हाला वाटते का?

नाही. सरकार किंवा सरकारी यंत्रणासुद्धा योग्य माहिती देत नाहीत. माहिती अधिकाराच्या कायदा करावा लागला हेच बोलके उदाहरण नाही का?

२. जाहीर वक्तव्ये करणे आणि ती प्रकाशित करणे हे इंटरनेटच्या माध्यमातून सोपे झाले असल्याने ट्विटर आणि इतर एकोळी संकेतस्थळांमुळे एकमेकांविरुद्ध दर्जाहीन वक्तव्ये करण्याचे प्रमाण वाढले आहे का?

नाही. माध्यमे नसताना सुद्धा दर्जाहिन वक्तव्ये होत होतीच. माध्यमांमुळे त्याला जास्त प्रसिद्धी मिळते आहे इतकेच.

३. अशा प्रकारच्या बेछूट वक्तव्यांवर निर्बंध आणायला हवे असे तुम्हाला वाटते काय?

नाही. ज्यांना लक्ष द्यायचे ते देतात आणि ज्यांना नाही ते नाहीच.

४. निर्बंध आणावेसे वाटत असल्यास कोणत्या उपाययोजना कराव्या?

काही मत नाही.

५. तुम्हाला काय वाटते लोकप्रतिनिधींद्वारे एकही कायदा अमलात आणला गेला नाही हे खरे काय? असे कोणते कायदे आहेत जे अमंलात आले?

माहिती नाही. याचा अर्थ असा सुद्धा घेता येऊ शकतो की जर काही अंमलात येणारे असते तर कळले असते. कळने नाही याचा अर्थ कायदा नाही.






 
^ वर