ग्रेस गेले, ग्रेस गेली...

माझी आणि ग्रेसची ओळख झाली महाश्वेता मालिकेच्या "भय इथले संपत नाही...". त्यावेळी मला या कवितेतल्या बर्‍याच ओळी समजायच्या नाही. त्यानंतर जेंव्हा मला पं. ह्रद्यनाथांच्या "भावसरगम" चे वेड लागले त्यानंतर बर्‍याच ग्रेसच्या कवितांची भेट भावसरगम कार्यक्रमातुन होत गेली. मला ग्रेसची ओळख एखाद्या दृष्टीपथात आलेल्या पर्वतासारखी झाली, त्या पर्वतासारखे दुर असताना मी ग्रेसकडे दुर्लक्ष केले पण जसे जसे मी नकळत ग्रेसच्या जवळ गेलो तशी तशी मला त्यांची भव्यता जाणवली.

मला इथे प्रकर्षाने सांगावेसे वाटते कि ग्रेस च्या बर्‍याच कविता मला कळत नाही. काही कडव्यांचा अर्थ लागतो आणि काही कडवी तशीच रहातात. कधी कधी एखादा शब्द सोडुन सगळ गवसतं, अगदी ग्रेस यांनीच म्हटल्याप्रमाणे "शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतून शब्द वगळतां". पण त्याला मी माझा पराभव मानतो. लेखकाने त्याचे काम केले आहे आणि माझे काम वाचकाचे आहे. कविता लिहिण्याची जबाबदारी त्यांची आहे अन वाचुन रसग्रहण करण्याची माझी. आपल्याला एखादी कविता कळली नाही म्हणजे ती चांगली नाही हि विचारसरणी आणि अंधविश्वास या सारख्याच गोष्टी आहेत असे मला वाटते. ग्रेसला समजुन घेण्यासाठी मला वाटते त्याची एक एक ओळ मनात घेऊन आकाशात उडत राहावे आणि त्या ओळीची जागा शोधत राहाणे हेच आपल्या हातात असते. म्हणजे एखाद्या मोठ्या ग्रंथालयात एखादे पुस्तक ठेवण्यासाठी ग्रंथपाल शिडी वैगेरे लावुन एखादे पुस्तकाची योग्य जागा शोधतो अगदी तसेच.

कधी या कवितेतील साधर्म्यस्थळे लगेच गवसतात तर काही गवसायला बराच अवधी जावा लागतो. आणि गंमत म्हणजे एकाच कवितेतील साधर्म्यस्थळे माझ्यासाठी वेगळी असु शकतात आणि पुर्ण जगासाठी वेगळी.

१) उदाहरणार्थ जेंव्हा मुंबईवर हल्ला झाला त्यावेळी मला ग्रेस यांची एका कवितेतील साधर्म्यस्थळ गवसले.

"डोंगरावरी कल्लोळ अलीकडे सर्व निवांत..
नीजतात कसे हे लोक सरणाच्या खाली शांत"

२) दुसरे उदाहरण म्हणजे "भय इथले संपत नाही" हि प्रसिध्द रचना. हे कडवे गाताना मला माझ्या आईचा चेहरा समोर येतो.

"भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तु मला शिकविले जे ते"

३) अशाच प्रकारची एक कविता आणि निवडुंग मधिल एक अप्रतिम अनवट चालितील गाणे

वार्‍याने हलते रान, तुझे सुनसान हृदय गहिवरले
गाईचे डोळे करुण उभे की, सांज निळाईतले
डोळयात शीण, हातात वीण, देहात फुलांच्या वेदी
अंधार चुकावा म्हणून, निघे बैरागी

या कवितेतील पहिल्या दोन ओळी मी प्रत्येक उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या सुट्टीत अक्षरशः अनुभवल्या आहेत. संध्याकाळी शेतात वार्‍यावर हलणारी पिके, सुर्यास्ताच्या वेळचा तो सांजरंग, गाईच्या गळ्यातील तो घंटेचा आवाज आणि गाईंना गोठ्यात पाहिल्या त्यांच्या डोळ्यात दिसणारा तो प्रचंड निरागसपणा. अगदी मनावर आणि माझ्या भावविश्वावर कोरल्यासारखे वाटते.
दुसर्‍या दोन ओळीतील दोन्ही ओळी जर वेगवेगळ्या केल्या तर समजतात आणि प्रचंड आवडतात पण दोघांचा एकत्र अर्थ अजुन गवसला नाही.

३) आणखी एक नितांत सुंदर कविता म्हणजे,

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दु:खाच्या मंद सुराने
डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
दु:खाचा उतरला पारा, या नितळ उतरणीवरती

एखाद्या काळ्याकुट्ट पावसाळी रात्रीत कधी दचकुन जागे झाला आहात का? पावसाच्या आवाजाने. आणि का जागे केले म्हणुन खिडकीत येऊन पावसाला जाब विचारला आहात का? डोळ्यात अश्रुंनी आश्रय घेतल्यावर डोळे मिटुन डोळे गोलाकार फिरवले आहेत का? करुन पहा अर्थ आपोआप समजेल.

४) "ती गेली तेंव्हा व्याकुळ पाउस निनादत होता" हि त्यांनी त्यांच्या आईवर केलेली कविता. अंगावर सरकन काटे उगवुन आले. आणि अचानक मन वडाच्या दाट सावलीतुन ओढत, जमिनीवर घासत ओसाड तापलेल्या माळरानावरच्या खडकावर उघडे करुन ठेवल्यासारखे वाटते.

ग्रेस यांना भेटण्याची खुप इच्छा होती. नागपुरच्या सगळ्या मित्रांना मी विचारायचो कि एकदा ग्रेस ना भेटायचे आहे.

पण ग्रेस गेले आणि मराठी कवितेतली ग्रेसही, हे मात्र नक्की.

Comments

चांगला लेख आहे

चांगला लेख आहे. वाचण्यात आणि प्रतिसाद देण्यात उशीर झाला.

खुप खुप आभार!!

धनंजय,

प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार!!

अभिजीत राजवाडे

 
^ वर