धर्मानंद कोसंबी यांचे 'भगवान बुद्ध' पुस्तक

धर्मानंद कोसंबी (जन्म ९-१०-१८७६) गोव्याच्या साखवाळ खेड्यातले. २१व्या वर्षी त्यांनी मराठीतील एका नियतकालिकात गौतम बुद्धावरील लेख वाचला आणि ते प्रभावित झाले. उत्सुकतेपोटी पुणे,काशी, गया येथे त्यांनी संस्कृतचे शिक्षण घेतले. पुढे नेपाळ, ब्रह्मदेश आणि श्रीलंका देशात बुद्धविहारात जाऊन त्यांनी पाली भाषेतून बुद्ध वाङ्मयाचा अभ्यास केला. भिक्षू धर्माची दीक्षा घेतली. पुढे त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. (लग्न पूर्वीच झाले होते.)

देश विदेशातून त्यांनी अध्यापन केले. बुद्ध धर्मातील वाङ्मय संपादित/टीका लिहून प्रसिद्ध केले. विसुद्धीमग्ग ह्या पालि ग्रंथाचे त्यांनी संपादन केले. दामोदर धर्मानंद कोसंबी (गणितज्ञ आणि प्राच्यविद्यापंडित) हे त्यांचे पुत्र. महात्मा गांधींच्या विचाराने ते प्रभावित झाले होते. त्यांनी सत्याग्रहात भाग घेतला. त्यांचे निधन सेवाग्राम येथे १९४७ साली झाले. मराठीतील भगवान बुद्ध हे त्यांचे एक महत्त्वाचे पुस्तक.

पुस्तक दोन भागात आहे. हे पुस्तक नुकतेच 'मराठी पुस्तके' वर आले आहे. पहिल्या भागात सुरुवातीसच आलेले उषादेवीवरचे विवेचन पाहिले तर त्यांच्या अभ्यासाची ओळख होते.

लोकमान्यांच्या मतें ही आणि अशा तर्‍हेच्या दुसर्‍या ऋचा उत्तर ध्रुवाकडील उष:कालाला उद्देशून लिहिलेल्या आहेत; दीर्घकाळपर्यंत उषा वरुणगृहांत जातात, म्हणजे तिकडे सहा महिनेपर्यंत अंधार असतो, असा अर्थ असला पाहिजे. परंतु याच सूक्ताच्या बाराव्या ऋचेंत ‘अश्वावतीर्गोमती-र्विश्ववारा’ हीं उषा देवीचीं विशेषणें सापडतात. ‘ज्यांच्याकडे पुष्कळ घोडे आणि गाई आहेत, आणि ज्या सर्वांना पूज्य आहेत’ असा त्यांचा अर्थ.* (* येथे उषा बहुवचनान्त आहे.)

पुढे बाबिलोनियन इश्तर् (आजचे ईस्टर) आणि उषा यांच्यातील साम्यस्थळे ते देतात.

तम्मुज किंवा दमुत्सि (वैदिक दमूनस्) या देवावर इश्तरचें प्रेम जडतें. पण तो एकाएकी मरण पावतो. त्याला जिंवत करण्यासाठी अमृत आणण्याच्या हेतूने इश्तर पाताळांत प्रवेश करते. तेथील राणी अल्लतु ही इश्तरची बहीण. तरी ती इश्तरचा भयंकर छळ करते; क्रमश: तिचे सर्व दागिने काढून घ्यावयास लावून तिला रोगी बनवते आणि कैदेंत टाकते. चार किंवा सहा महिने अशा रीतीने दु:ख आणि कैद भोगल्यावर अल्लतूकडून इश्तरला अमृत मिळतें; आणि ती पुन्हा पृथ्वीवर येते. इश्तरच्या दुसर्यान अनेक दंतकथा आहेत, पण त्यांत ही दंतकथा प्रमुख दिसते. हिचें वर्णन सर्व बाबिलोनियन वाङ्मयांत आढळतें. ऋग्वेदांतील वरच्या सारख्या ऋचांचा संबंध या दंतकथेशीं आहे यांत संशय बाळगण्याचें कारण नाही.

दास आणि आर्य यांच्यात झालेले युद्ध आणि त्यातील जयापजयाची कारण मिमांसा त्यांनी केली आहे. बुद्ध कालीन १६ राष्ट्रांचे तपशीलवार वर्णन. विविध कुलांची माहिती. धर्माची स्थिती अशा अनेक अंगाने चरित्र पुढे जाते. जातीभेदावर त्यात विवेचन सापडते. श्रमण कसे होते, त्यांच्यातील फरक, उपनिषद कालीन ऋषी आणि श्रमण यातील साम्य इत्यादीवरून हे चरित्र पुढे जाते. बुद्धाचा जन्म, गृहत्याग, तप आणि बुद्धधर्माची स्थापना याबद्दलचा उहापोह पहिल्या भागात पाहायला मिळतो.

भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणाच्या दिवशी बुद्धाने डुकराचे मांस खाल्ले त्यात तो आजारी पडला अशी कथा आहे. या कथेचा उहापोह कोसंबी करतात्. ते दुसर्‍या भागात.

परिनिर्वाणाच्या दिवशी बुद्ध भगवन्ताने चुन्द लोहाराच्या घरी डुकरांचे मांस खाल्लें, आणि आजकालचे बौद्ध भिक्षु देखील कमी जास्ती प्रमाणाने मांसाहार करतात; तेव्हा असा प्रश्न उपस्थित होतो की, अहिंसेला परमधर्म समजणार्या बुद्धाचें आणि त्याच्या अनुयायांचे हे वर्तन क्षम्य आहे काय? या प्रश्नाची चर्चा करणें योग्य वाटतें.
बुद्धाने परिनिर्वाणाच्या दिवशी जो पदार्थ खाल्ला त्याचे नाव ‘सूकरमद्दव’ होतें. त्याच्यावर बुद्धघोषाचार्यांची टीका आहे ती अशी—.
“सूकरमद्दवं ति नातितरूणस्स नातिजिण्णस्स एक जेट्ठकसूकरस्स पवत्तमंसं। तं किर मुदुं चेव सिनिद्घं च होति। तं पटियादापेत्वा साधुकं पचापेत्वा ति अत्थो। एके भणन्ति, सूकरमद्दवं ति पन मुदुओदनस्स पञ्चगोरसयूसपाचनविधानस्स नाममेतं, यथा गवपानं नाम पाकनामं ति । केचि भणन्ति सूकरमद्दवं नाम रसायनविधि, तं पन रसायनत्थे आगच्छति, तं चुन्देन भगवतो परिनिब्बानं न भवेय्या ति रसायनं पटियत्तं ति।”
‘सूकरमद्दव म्हणजे फार तरूण नव्हे व फार वृद्ध नव्हे, पण जो अगदी लहान पोराहून वयाने मोठा अशा डुकराचें शिजविलेलें मांस. तें मृदु आणि स्निग्ध असतें. तें तयार करवून म्हणजे उत्तम रीतीने शिजवूंन असा अर्थ समजावा. कित्येक म्हणतात, पंचगोरसाने तयार केलेल्या मृदु अन्नाचें हें नावं आहे. जसें गवपान हे एका विशिष्ट पक्वान्नाचें नांव. कोणी म्हणतात, सूकरमद्दव नावांचे एक रसायन होतें. रसायनार्थी त्या शब्दाचा उपयोग करण्यांत येतो. भगवन्ताचें परिनिर्वाण होऊं नये, एतदर्थ तें चुन्दाने भगवंताला दिलें.’
या टीकेंत सूकरमद्दव शब्दाचा मुख्य अर्थ सूकरमांस असाच करण्यात आला आहे. तथापि तो अर्थ बरोबर होता, याजबद्दल बुद्धघोषाचार्याला खात्री नव्हती. कां की, त्याच वेळी ह्या शब्दाचे आणखी दोन अर्थ करण्यांत येत असत. याशिवाय दोन भिन्न अर्थ उदानअट्ठकथेंत सापडतात, ते असे—

याच भागात विविध महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा आढळते. ज्यात आत्मवाद, कर्मयोग, दिनचर्या, जातिभेद, मांसाहार अशी प्रकरणे आहेत.

अजित केसकंबलाचा उच्छेदवादावर त्यांनी असे लिहिले आहे.

उच्छेदवाद

अजित केसकम्बल उच्छेदवादी होता. तो म्हणे, “दान, यज्ञ, होम यांत कांही नाही; चांगल्या वाईट कर्मांचे फळ व परिणाम नाही; इहलोक, परलोक, मातापिता अथवा औपपातिक (देव किंवा नरकवासी) प्राणी नाहीत; इहलोक आणि परलोक जाणून नीट ओळखून दुसर्‍यास शिकवणारे तत्त्वज्ञ व योग मार्गाने जाणारे श्रमण-ब्राम्हण या जगांत नाहीत. मनुष्य चार भूतांचा बनलेला आहे. तो मरतो तेव्हा त्यांच्यातील पृथ्वीधातु पृथ्वीत, आपोधातु जलांत, तेजोधातु तेजांत व वायुधातु वायूंत जाऊन मिळतो, आणि इंद्रिये आकाशाप्रत जातात. मेलेल्या माणसाला तिरडीवर घालून चार पुरुष स्मशानांत नेतात. त्याच्या गुणावगुणांची चर्चा होते, पण अस्थि पांढर्‍या होऊन आहुति भस्मरूप होतात. दानांचे खूळ मूर्ख माणसांनी माजविले आहे. जे कोणी आस्तिकवाद सांगतात, त्यांचे ते बोलणें निवळ खोटे आणि वृथा बडबड आहे. शरीरभेदानंतर शहाण्यांचा आणि मूर्खांचा उच्छेद होतो; ते विनाश पावतात. मरणानंतर त्यांचे काहीही उरत नाही.”

प्रमोद

Comments

उलथापालथ

माहितीबद्दल आभार. हेच पुस्तक मूळरूपात उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या डिजिटल लायब्ररीतून उतरून घेतले होते. (नवभारत ग्रंथमाला OU_192184 & OU_192397).
पुस्तक वाचताना राजवाड्यांच्या 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' या पुस्तकाची प्रकर्षाने आठवण झाली.
आजमितीला सर्वसामान्य भारतीय समाज ज्या गोष्टींना त्याज्य मानतो त्या एकेकाळी याच भारतात समाजमान्य होत्या हे स्पष्ट होते.
श्रमण संघ, भगवान बुद्ध आणि अशोक यांच्यामुळे भारतीय समाजात फार मोठी उलथापालथ घडली. जातीनिर्मूलन झाले नाही हे खरे पण
समाजाचे आचार फार मोठ्या प्रमाणावर बदलले असे दिसते.

या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी कोणी केल्यास नवल वाटू नये.

उत्तम

पुस्तक जमेल तसे वाचतो. फारच उपयोगी. पुस्तकात एके ठिकाणी म्हटले आहे-

"धर्मानन्द कोसम्बी यांचे पूर्वायुष्य हे आधुनिक काळात विरलत्वाने आढळणाऱ्या सर्वोत्कृष्ट धर्मजिज्ञासेचें सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे."

खरे आहे. धर्मानंद कोसंबीसारखा घुमक्कड आणि पराकोटीचा विद्वान महाराष्ट्रात होऊन गेला ह्यावर आता विश्वास बसणार नाही. इतिहासाचार्य वि.का. राजवाडेंचेही कार्य मोठे आणि वेगळे आहे. असाच आणखी एक विद्वान म्हणजे राहुल सांकृत्यायन.

ह्या पुस्तकासाठी आणि इतर अनेक पुस्तकांसाठी बहुधा मंगल टंक वापरण्यात आला आहे. मंगलऐवजी दुसरा टंक वापरल्यास बरे राहील. मंगल ह्या टंकाशिवाय अनेक युनिकोड टंक (संस्कृत, कोकिळा, सुरेख, योगेश, अक्षर वगैरे) उपलब्ध आहेत. मुखपृष्ठांची गुणवत्ताही सुधारता येईल. संकेतस्थळ आणि पुस्तकांच्या निर्मितीत शक्य तसा हातभार लावायला आवडेल. सध्या काही पुस्तके डाऊनलोड करून वाचतो आहे.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

उपयुक्त दुवा

धर्मानंद कोसंबीसारखा घुमक्कड आणि पराकोटीचा विद्वान महाराष्ट्रात होऊन गेला ह्यावर आता विश्वास बसणार नाही. इतिहासाचार्य वि.का. राजवाडेंचेही कार्य मोठे आणि वेगळे आहे.

घुमक्कड म्हणजे? सध्या राजवाड्यांचे बौद्ध धर्म आणि वैदिक संस्कृतींबद्दल मत वाचते आहे. राजवाडे बौद्ध धर्माबद्दल आकसाने लिहितात की काय असे भासते (लेखनही थोडेसे चक्रम म्हणावे असे) एक संबोधन ते बौद्धांसाठी वापरतात ते म्हणजे व्रात्य आणि इतरत्र मला व्रात्य हा एक समूह असून भारतीय अर्थसंस्थेत त्याला महत्त्वाचे स्थान होते. पाणिनीने व्रात्य म्हणजे कोणताही एक विशिष्ट व्यवसाय न करता वेळ पडेल तसा व्यवसाय स्वीकारणारा समाज असे म्हटले आहे. पण राजवाडे त्या हेतूने व्रात्य म्हणत असावेत असे वाटत नाही. असो.

अवांतर: या पुस्तकात गौतम बुद्धाला गोतम बुद्ध म्हटल्याचे आढळते. काल विसुनानांच्या प्रतिसादातही गोतम बुद्ध असा शब्द वाचला. हे काय आहे? टायपो की मुद्दाम वापरलेला शब्द?

खरे नाव कोणते?'गोतम' की' गौतम'?

उपरोक्त पुस्तकाच्या पहिल्या भागातील पृष्ठ क्र. ७९ पहावे.
खरे नाव कोणते?'गोतम' की' गौतम'? या प्रश्नाचा उहापोह आहे.

धन्यवाद

तरीच म्हणत होते, इतके टायपो कसे झाले.

धन्यवाद

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
'मराठी पुस्तके' साठी सर्वप्रकारच्या मदतीचे आम्ही (संयोजक) स्वागत करू. या चळवळीत सुरुवातीस थोड्या जास्त प्रमाणात स्वयंसेवी पुस्तक निर्मात्यांचा हातभार लागला. गेल्या वर्षभरात हा हातभार थोडा कमी झाल्याचे जाणवते.

पुस्तके उपलब्ध करताना, संकेतस्थळ फारसे देखणे नसेल तर चालेल, पण पुस्तके भराभर मिळाली पाहिजेत असे काहीसे मत संयोजकांचे होते.

संकेतस्थळाचा, तांत्रिक दर्जा सुधारला पाहिजे, पुस्तकांचे स्वरूप हे अधिक चांगले झाले पाहिजे. मुखपृष्ठ, टंक, पीडीएफ पासून एचटीएमएल कडे वाटचाल. यात बदल हवे आहेत. अर्थात आम्हाला जेवढे शक्य तेवढे आम्ही करत राहू. इतरांचा हातभार लागल्यास अधिक चांगले.

प्रमोद

लेखाचा उद्देश

प्रमोद सहस्रबुद्धे यांचा लेख वाचला. त्यांनी कोसंबी यांच्या पुस्तकाने सुरूवात केली आहे, व नंतर तीन मुद्द्यांवर लिहिले आहे. उषा विवेचन, बुध्दाने केलेला मांसाहार (यावर एकमत किवा स्पष्टता नाही) व उच्छेदवाद.
हे कोसंबी यांच्या पुस्तकाचे रसग्रहण आहे का? त्या पुस्तकातील वरील तीन मुद्देच श्री. सहस्रबुद्धे यांना का निवडावेसे वाटले?
हे बुध्द मांसाहारी होता काय किंवा बुध्द व त्याच्या अनुयायांचे आचरण त्यांच्याच अहिंसा तत्वास धरून नव्ह्ते काय? अशी चर्चा करण्याचा हा प्रस्ताव आहे?
त्यामुळे लेखाचा उद्देश स्पष्ट केला तर बरे होईल.

असो. पण धर्मानंद कोसंबी यांनी बुध्दाच्या जीवन, तत्वज्ञान व इतिहासासंबंधी जे बहुमोल काम करून ठेवले आहे त्याने थक्क व्हायला होते. त्यांचे आत्मनिवेदन (दुवा: http://arvindguptatoys.com/ वर मराठी पुस्तके भागात) मिळाले व वाचल्यावर त्यांचा चाहताच बनलो.

- स्वधर्म

ओळख

लेखाचा मुख्य उद्देश पुस्तकाची ओळख करून देऊन, दुव्यावरील पुस्तक वाचण्यास प्रवृत्त करणे हा आहे.
हे पुस्तकाचे रसग्रहण नाही.

प्रमोद

वाचायला घेतले आहे

मराठीपुस्तके संकेतस्थळावर ठेवल्याबाबत आभारी आहे.

आभार

पुस्तक उतरवून घेत आहे.
माहितीबद्दल आभार.

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

धर्मानंद कोसंबी ह्यांचे समग्र साहित्य

धर्मानंद कोसंबी ह्यांचे समग्र साहित्य आता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने तयार केलेल्या http://dharmanandkosambi.com/ ह्या संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे.

धन्यवाद

वाचण्यासारखं बरंच काही आणि वाचायला वेळ नाही :-(.

या धाग्यावर आलेल्या सर्व दुव्यांबद्दल अनेक धन्यवाद.

धन्यवाद.

फारच छान दुवा आहे. आत्मचरित्र भराभर वाचले. :-)
माझ्याकडे त्यांची तीन पुस्तके आहेत पण त्यांची छपाई काळजीने केलेली नाही. काही ठिकाणी कोरी पानेच पुस्तकात जोडली आहेत. पुस्तक पूर्ण न तपासून घेता विकत घेतल्याचा पश्चात्ताप झाला होता. पण आता हा दुवा मिळाल्याने कोरी पाने काय सांगत होती ते कळेल :)
धन्यवाद.

धन्यवाद

दुव्याबद्दल अनेक धन्यवाद. अतिशय छान दुवा.
हे आधी माहिती असते तर बरे झाले असते. (वेळ दुसरी कडे दिला गेला असता).

प्रमोद

फारच छान

फारच छान दुवा. वाचतो आहे.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

धन्यवाद.

पुस्तकाची ओळख, दुवा आणि इतर उपयुक्त प्रतिसादांकरीता सर्वांचे धन्यवाद!

-Nile

धागा उत्तम्.

उपक्रम प्रशासन "वाचनखूण"ही सुविधा द्यायचे आता तरी मनावर घेइल काय?
एकाहून एक असे चांगले धागे सर्वच निव्वल स्मरनशक्तीच्या जोरावर लक्षात ठेवने अशक्य आहे.

--मनोबा

व्रात्य

मागे एकदा गिरीश कर्नाड यांच्याकडून ("संस्कारा" या चित्रपटासंदर्भात) ऐकले होते की जो ब्राह्मण त्याची नेमून दिलेली व्रते न पाळता ब्राह्मणाला न शोभणारे वर्तन व व्यसनादि करतो त्यास व्रात्य ब्राह्मण असे म्हणण्याची प्रथा होती.
संस्कारा मध्ये अशा एका सर्व प्रकारची व्यसने करणार्‍या व्रात्य ब्राह्मणाचे पात्र आहे - नाव नारणप्पा असावे - ज्याचे सुरुवातीलाच निधन होते व त्याचे अंत्यसंस्कार कोणी करावेत यावरून पूर्ण चित्रपट घडतो.
तुम्ही दिलेल्या विषयात असाच अर्थ असेल की नाही हे तुम्हीच ठरवा.
- दिगम्भा

पाखंडी

जो ब्राह्मण त्याची नेमून दिलेली व्रते न पाळता ब्राह्मणाला न शोभणारे वर्तन व व्यसनादि करतो त्यास व्रात्य ब्राह्मण असे म्हणण्याची प्रथा होती.

शक्य आहे, कदाचित वैदिक किंवा सनातन धर्माच्या प्रथा न पाळणार्‍यांनाही व्रात्य म्हणत असावे. अशाचप्रकारे पाखंडी हा शब्द राजवाडे वापरतात. जैन आणि बौद्ध धर्मियांबाबत व्रात्य आणि पाखंडी या दोन्ही शब्दांचा ते सातत्याने वापर करतात परंतु हे शब्द वापरण्यास सुरुवात कशी आणि केव्हा झाली याबाबत उहापोह नाही.

उत्कृष्ट पुस्तक् परिचय

एका महत्वाच्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद नकी वाचीन
आर्किऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांच्या लायब्ररीत असलेल्या २५०० इयर्स ऑफ बुद्धिझम या पुस्तकात सूकरमद्दव या शब्दाच्या अर्थाबद्दल ही एक वनस्पती असू शकेल असा उल्लेख आहे. त्यामुळे केवळ या शब्दामुळे बुद्ध मांसभक्षण करत होते असा निष्कर्ष काढणे तितकेसे योग्य ठरणार नाही असे या पुस्तकाचे म्हणणे आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

 
^ वर