महाभारत - मतमतांतराचा परंपरेचा इतिहास

महाभारतावरून उपस्थित होणारे सारे प्रश्न महाभारतामध्येच उपस्थित केलेले आहेत असे दिसते. न्याय्य आणि अन्य्याय्य अशा अनेक घटना महाभारतात जागोजागी दिसतात. एकाच घटनेकडे पाहण्याच्या अगदी परस्परविरोधी आणि आपापल्या जागी तरीही योग्य वाटणार्‍या भूमिका वेळोवेळी मांडलेल्या दिसतात.

भीष्माने अंबा, अंबिका, अंबालिकांना कुरुवंशसंवर्धनासाठी जिंकून आणल्याच्या अन्यायातून आणि त्यामागील मतभेदातून शिखंडीचा जन्म होतो.
कौतेय आणि माद्रेयांना कुरु कसे म्हणावे? त्यांना राज्य स्वीकारावे का नाही यावर पौरजनांचीही चर्चा होते. दुर्योधन हा प्रश्न उपस्थित करतो.
कर्णाला केवळ सूतपुत्र म्हणून मिळणार्‍या वागणुकीला आव्हान अनेकांनी जागोजागी दिलेले दिसते.
दुर्योधनाची मांडी फोडल्यानंतर बलराम नांगर घेऊन धाऊन जातो.
युधिष्ठिराच्या पत्नीला द्यूतात लावण्याची निर्भर्त्सना आणि बुद्धिभेद स्वतः द्रौपदीही करते.
भीष्म, द्रोण, धृतराष्ट्र् यांनी दुर्योधन, दु:शासनाच्या द्रौपदी वस्त्रहरणाला आळा कसा घातला नाही याचा जाब कृष्णही विचारतो.
युद्ध करावे की नाही ... किंवा ते करणे योग्य की अयोग्य याचा उहापोह तर जागोजागी आहे. कृष्णशिष्टाईचा प्रयत्न आणि अर्जुनकृष्ण गीतासंवाद ही याची ठळकपणे समोर येणारी उदाहरणे म्हणता येतील.
विकर्णाने द्रौपदी वस्त्रहरणास दाखविलेला विरोध आणि महायुद्ध सुरू होण्यापूर्वी काही क्षण युयुत्सुने केलेले पक्षांतर.
जातीव्यवस्थेविषयी अनेकांच्या असणार्‍या वेगवेगळ्या भूमिका - भृगु आणि भारद्वाजाचा याबद्दलचा संवाद (जन्माधिष्ठित, कर्माधिष्ठित इ.)
"सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति"...
रथीचे रथीशीच, अतिरथीचे अतिरथीशीच युद्ध आणि सायंकाळी शत्रुपक्षाकडे जाऊन विचारपूस करणे यासारखी आजच्या युद्धकाळात जवळपास दुर्मिळ वाटेल अशी नीतिमत्ता हा सहज नियम दिसतो. त्याचवेळी कर्णवध, अभिमन्युवध, पांचालांची आणि पांडवपक्षाची झोपेत झालेली कत्तल असे अनीतिचे प्रसंग...

सगळ्यात कळस सांगायचा झाला तर भगवद्-गीतेमध्ये कर्मण्येवाधिकारस्ते आणि कर्तव्य हेच श्रेष्ठ हा कृष्णसंदेश विजयी होताना दिसतो. परंतु गीता हा महाभारताचा छोटासाच भाग आहे. महत्वाचा जरूर आहे... पण गीता म्हणजे महाभारत नव्हे. गीतेसारखे रत्न महाभारत घुसळून बाहेर पडते आहे अशी कविकल्पना केली तरीही युद्धानंतर झालेला सर्वसंहार आणि करुणता पुन्हा एकदा अर्जुनाने निर्माण केलेले प्रश्नच अनेकांच्या मनात उभे करते. "माझ्या कृत्याने शेवटी काय मिळणार आहे?" ह्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर नसेल तर विजय हा पराजयाहूनही भयाण असतो ह्याची स्पष्ट जाणीव महाभारत देऊन जाते.

एक ना अनेक...

"महाभारत" हे कशाचेही उत्तर नाही... अलिकडच्या भाषेत बोलायचे झाले तर महाभारत हे प्राचीन काळी झालेल्या ब्रेनस्टॉर्मिंगचे नोंदणीकरण आहे. महाभारत हे तुम्हाआम्हा भारतीयांची/ भारतवंशीयांची मानसिकता बनविण्यास कारणीभूत ठरते. एकाच महाभारताच्या मुशीतून घडलो तरीही आम्ही एका साच्यातले मात्र वाटत नाही यांत नवल ते काय?

(महाभारत काळातील) एकलव्य

खुलासा - काही तपशील कदाचित चुकलेले असू शकतात. मनात येतील तसे विचार उतरविले आहेत. संदर्भ देण्यात आणि शोधण्यात वेळ घालविलेला नाही.

Comments

पुन्हा?

पुन्हा महाभारत??

एकलव्या, मी आता मारीन हां तुला! ;))

तात्या.

धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)

उत्तरे नाहीत

प्राचीन शास्त्रांचा माझा अभ्यास नाही. भगवद्गीता नंतर घुसडली गेली किंवा नाही हा प्रश्नच माझ्या मते महत्वाचा नाही. (इतर काहीला अभ्यासकांसाठी असू शकेल.)

युयुत्सु - आपण उभे केलेले सारे इतर सारे प्रश्न महाभारतातील पात्रांनी जागोजागी उभे केलेले आहेतच. त्याची अनेक अंगानी असलेली उत्तरेही मांडली आहेत. ... प्रत्येक काळात त्या त्या वेळची नीतीमत्तेचे निकष लावून थोर मंडळी पुन्हा पुन्हा महाभारतावर भाष्य आणि टीका करताना दिसतात. सर्व समस्या समर्थपणे मांडण्याचे ह्या महाकाव्याचे मोठेपण ज्ञानेश्वरांपासून ते टिळक, गांधी आणि टागोरांपर्यंत अनेक महापुरुषांनी दिशा देण्यासाठी वापरलेले दिसते. आपल्या पातळीवर आपणही तेच करतो.

(समाधानाने निरुत्तर) एकलव्य

सहमत

प्रत्येक काळात त्या त्या वेळची नीतीमत्तेचे निकष लावून थोर मंडळी पुन्हा पुन्हा महाभारतावर भाष्य आणि टीका करताना दिसतात. सर्व समस्या समर्थपणे मांडण्याचे ह्या महाकाव्याचे मोठेपण ज्ञानेश्वरांपासून ते टिळक, गांधी आणि टागोरांपर्यंत अनेक महापुरुषांनी दिशा देण्यासाठी वापरलेले दिसते.

एकलव्य यांच्याशी संपूर्ण सहमत आहे. गीतेचा अभ्यास केलेल्या विद्वानांची यादी पाहिली तर अवाक व्हायला होते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

महाभारत चर्चा.

महाभारत चर्चा छान आहेत.पण ती माहिती इतर ठीकाणी ही फार मिळाली आहे.

'एक फुल, दोन हाप दोन नंबर टेबल वर दे रे'

आता बास करा हो!
हा विषय कधी संपणारा आहे का?
आता या महाभारतावरिल चर्चेचे महाभारताचा कुणीतरी समारोप करा बुवा!
माझ्या कानातनं पण ही चर्चा आता बाहेर येतेय... :)

(काय भिकार वाटतंय नाही हे भाषांतर! या पेक्षा गुर्‍हाळ म्हणणं बरं वाटतं, पण युयुत्सु गल्ल्यावर बसून रसा चे पैसे घेत आहेत, आणी एकलव्याला 'एक फुल, दोन हाप दोन नंबर टेबल वर दे रे' असं म्हणतायेत असं वाटेल म्हणून नाही म्हणत!)

खरं तर हा सगळा दोष त्या 'डेड आयडी वाल्याचा' आहे.
काही तरी सुरु करुन दिलेन इथे आणी स्वतः मात्र डेड!

(कधीच न संपणार्‍या चर्चांना कंटाळलेला)
गुंडोपंत

~ उपक्रमावर चर्चा व्हाव्यात, पण कधी तरी त्याचा समारोपही व्हावा; ह्याचे मी समर्थन करतो ;) ~

ही चर्चा नाही...

~ उपक्रमावर चर्चा व्हाव्यात, पण कधी तरी त्याचा समारोपही व्हावा; ह्याचे मी समर्थन करतो ;) ~
गुंडोपंत भले शाब्बास! आमच्या परिने येथे आम्ही हा समारोपच मांडलेला आहे.

  • महाभारत चर्चेपासून (राजपुत्रांची रणधुमाळी...) एकलव्य शक्यतो दूरच राहिला आहे. (http://mr.upakram.org/node/352#comment-4508)
  • एखाद दुसरी भर सोडता त्याच त्याच प्रश्नांची तीच तीच उत्तरे देण्यात मला रस नाही. ज्यांना "कोण कोणास" या तपशीलात रस आहे त्यांच्या अभ्यासातून आम्हाला जितका फायदा होता त्यावर आम्ही नक्कीच समाधानी आहोत. इतरांनी आपली ज्ञानपीपासा जरूर चालू ठेवावी.
  • "चर्चेपलिकडे" जाउन माझ्या मनात काय आले हे चर्चेस प्रतिसाद म्हणून कसे मांडणार? त्यामुळे हे स्वतंत्र प्रगटन.
  • यनावालांच्या नीरक्षीरविवेक या कोड्यास उत्तर देताना एकलव्याने मांडलेली "मध्यंतरातील तपशीलावर आणि आकडेमोडीवर विचार न करता शेवटी काय चित्र असणार आहे ते पाहल्यास कोडे झटक्यात सुटते" हीच आमची विचारसरणी आहे. (http://mr.upakram.org/node/237#comment-2320)

पण मुळात..

भीष्म, द्रोण, धृतराष्ट्र् यांनी दुर्योधन, दु:शासनाच्या द्रौपदी वस्त्रहरणाला आळा कसा घातला नाही याचा जाब कृष्णही विचारतो.

पण मुळात पांडवांनी निर्ल्लज्जपणे द्रौपदीला द्युतात पणाला लावलीच कशी, हा जाब कृष्ण खुद्द पांडवांनाच का नाही विचारत? नंतर अर्जुनाला फुकाची गीताबिता सांगत बसण्यात काय मतलब आहे?

तात्या.

धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)

कारण...

द्युतावेळी कृष्ण तिथं नव्हता. नंतर द्रौपदीला पणाला का लावली याचा जाब विचारण्यात प्वॉयंट काय, असा विचार त्यानं केला असेल. कृष्णच तो, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशू कदाचन् (चूभुद्याघ्या) या न्यायानं नंतर गीता सांगत बसला असेल.

 
^ वर