दैववादाची होळी

काल सकाळी ११ वाजता पुण्यात महात्मा फुले स्मारका समोर दैववादाची होळी हा कुंडल्या जाळण्याचा प्रतिकात्मक कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला. कार्यक्रमाला डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. बाबा आढाव, विद्या बाळ व १००-१२५ कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रसिद्धी माध्यमातुन अगोदरच झालेली होती त्यामुळे मिडीयावाले, पोलीस उपस्थित होते. २८ फेब्रुवारीला असलेल्या विज्ञानदिनाच्या पार्श्वभुमीवर हा कार्यक्रम घेण्यात आला.समितीतील अनेक युवा कार्यकर्त्यांना आपण काहीतरी क्रिएटिव्ह करतो आहोत असा उत्साह होता. फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आज समाजाला मागे खेचणार्‍या घटना घडत आहेत असे सांगून साता‍र्‍याचे ऒनर किलिंग प्रकरण, पुण्यात झालेल्या आत्महत्या व कुटुंब हत्या ज्या शनि-मंगळ युतीच्या दहशतीतून झाले त्याचा उहापोह तिन्ही वक्त्यांनी केला. समाजातील स्त्रीचे दुय्यम स्थान, पुरुष वर्चस्व, जातीभेद, धर्माचा ब्राह्मणी चेहरा इत्यादी उल्लेख ही भाषणात येणे अपरिहार्य होते. घटनेत असलेले वैज्ञानिक दृष्टीकोनाचे कर्तव्य आम्ही पार पाडीत आहोत असे सांगून दाभोलकर म्हणाले," शासकीय व्यवस्थेत वैज्ञानिक दृष्टीकोणाचा अभाव असून ती व्यवस्था दैववादाला थारा देणारी आहे. पोलिस म्हणतात की तुम्ही कुंडली जाळू नका पण आम्ही आमची चळवळ कायद्याच्या चौकटीतच करीत आहोत. त्यांना ते बेकायदेशीर वाटत असेल तर त्यांनी आम्हाला अटक करावी. समजू देत देशाला की कार्यकर्त्यांनी स्वत:ची कुंडली जाळली तर येथे अटक होते." चळवळ म्हणल कि या गोष्टी आल्याच. समजा दाभोलकरांनी कुंडली ची पूजा जरी केली असती तरी त्याची बातमी झालीच असती. अंधश्रद्धा निर्मूलन समिती सवंग लोकप्रियतेमागे लागली आहे असा आरोप नेहमीच होतो. पण प्रबोधनात लोकसहभाग करुन घेताना काही कल्पक व रंजक कार्यक्रम राबवावे लागतात त्यामुळे असे आरोप होणे अपरिहार्य आहे.
कार्यकर्त्यांनी या निमित्त संकल्प केला. मी अमुक अमुक अमुक गांभीर्यपुर्वक असा संकल्प करतो/ते की माझ्या जन्माच्या वेळच्या ग्रहस्थितीचा माझे जीवन घडवण्यावर काहीही परिणाम होत नाही असा माझा दृढ विश्वास आहे. त्यामुळे जन्माच्या वेळची ग्रहस्थिती दाखविणारी जन्म कुंडली मी भ्रामक मानतो. ही कुंडली म्हणजे माझ्या जन्मवेळी अज्ञानामुळे माझ्या पायात अडकवलेली दैववादाची बेडी आहे. म्हणुन तिचे सामूहिकरित्या दहन करणे हे मी मानसिक गुलामगिरीची होळी मानतो. महाराष्ट्रातील सत्यशोधकी परंपरेचा मला अभिमान आहे, माझी कृती त्या विचारांशी सुसंगत आहे. भारतीय घटनेत वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्वीकार हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य सांगितले आहे. दैववादाची होळी या कार्यक्रमाने मी कृतिशील पणे हे कर्तव्य पार पाडत आहे. या कुंडली बाबत महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, म.गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर याची मतेही समितीच्या विचारापेक्षा वेगळी नव्हती या मला मोठा आधार लाभला आहे.मी आयुष्यभर वैज्ञानिक दृष्टीकोनाने जगण्याचा आणी फलज्योतिषाला दैववादाला स्वत:च्या जीवनातून दूर ठेवण्याचा संकल्प राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने करत आहे.
या निमित्ताने मला नानासाहेब गोर्‍यांची आठवण आली. एकदा त्यांनी १९८८ साली अंधश्रद्धा निर्मूलन जाहीरनामा परिषदेत एक किस्सा सांगितला होता. त्यांच्या कॉलेजजीवनात अनेक मित्रांनी प्रबोधनवादी विचारांनी भारावून जावून हुंडा घेणार नाही, पत्रिका बघणार नाही अशा प्रतिज्ञापत्रकांवर सह्या केल्या आणि प्रत्यक्षात जेव्हा पाळी आली तेव्हा हुंडाही घेतला आणि पत्रिकाही बघितल्या. ' माझी इच्छा नव्हती रे पण आमची आजी म्हणाली मी थकले आता! माझ्या डोळ्यादेखत हे कार्य अगदी धूमधडाक्यात झाले पाहिजे. मग आमच्या आईच मन मोडवेना. तिला तरी बिचारीला समाधान मिळू दे. ` अशा अनेक भावनिक पातळयांवर हे प्रबोधन बोलत्या सुधारकांसारखे राहते.बर्‍याचदा कुटुंबियांकडून भावनिक दबाव निर्माण झाला की तत्वापेक्षा व्यवहार्यतेचा पर्याय स्वीकारण्याची तडजोड होते. पाहू या आजच्या तरुण कार्यकर्त्यांचे काय होते ते? काही ही झाल तरी एक पाउल पुढ तर टाकल आहे त्यांनी. स्वागत करु या त्यांच्या निश्चयाचे!

Comments

यापेक्षा...

अंधश्रद्धा निर्मुलन समितीची उद्देश आणि वर उल्लेख झालेल्या लोकांचा हेतू याबदद्ल शंका नाही. पण दैववादाची अशी होळी करण्यापेक्षा दैववाद नष्ट होण्याकरीता सत्यनारायणाची महापूजा केली असती तरी चालले असते असे प्रामाणिकपणे वाटते.

असो. ब्राह्मणांच्या पूजारीपणातून सुटका करून घ्यायची म्हणून दलित, मराठा वगैरेंमधून पूजारी तयार करण्याच्या एका बाष्कळ प्रयत्नाची या निमित्ताने आठवण झाली.

थोडे सविस्तर

ब्राह्मणांच्या पूजारीपणातून सुटका करून घ्यायची म्हणून दलित, मराठा वगैरेंमधून पूजारी तयार करण्याच्या एका बाष्कळ प्रयत्नाची या निमित्ताने आठवण झाली.

बाबासाहेब थोडं सविस्तर लिहिले तर बरं होईल. पण मी याला बाष्कळ म्हणणार नाही. शाहू महाराजांनी सुद्धा वेगवेगळ्या जातीच्या मुलांसाठी वेगवेगळी होस्टेल तयार केली होती. त्यांच्या मते मुलांनी शिकणे हे जास्त महत्वाचे. मराठा मुलाला केवळ महार जातीच्या मुलाबरोबर सहअस्तित्व नको म्हणुन् पालक शिकायला मनाई करत असतील तर थोडी तडजोड करायला काय हरकत आहे असा त्यामागे विचार होता. ब्राह्मण नसलेल्या पुरोहिताची / भटजीची कल्पना आज ब्राह्मणेतर वर्ग सहनच करु शकत नाही. ब्राह्मण असला कितीही भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ|| ही कल्पना रुजायला ब्राह्मणेतर समाज देखील तितकाच कारणीभुत आहे. कालबाह्य कर्मकांडाची भिनलेली मानसिकता अचानक जाणार नाही त्याला काही अवधी लागणार आहे. शुद्ध उच्चार व कर्मकांडाची यथासांग माहिती असणारे माझे एक ब्राह्मणेतर स्नेह्यांना मी सांगितले कि तुम्ही रिटायमेंटनंतर भिक्षुकी करा. भिक्षुकी ही काय ब्राह्मणांचीच मक्तेदारी आहे कि काय? त्यावर ते म्हणाले कि अस करण अजुन् समाजाला पचनी पडत नाही.
ज्योतिषांमधे आज ब्राह्मणेतर लोकांची संख्या वाढु लागली आहे. तसेच पुर्वी ब्राह्मणेतर समाज लग्न जुळवताना पत्रिका पहाण्याविषयी आग्रही नव्हता तो आज आग्रही झालेला दिसून येतो आहे. ब्राह्मण समाजात पत्रिका पहाण्याचे प्रमाण एक वेळ कमी होताना दिसते आहे पण ब्राह्मणेतर समाज हे प्रतिष्ठेचे लक्षण मानू लागला आहे हे चिंताजनक आहे असे मला वाटते.

प्रकाश घाटपांडे

१००-१५०?

काय हे!!...धार्मिक सभांना लाखोंनी गर्दी होत असताना इथे फक्त १००-१५०? पण हेही नसे थोडके, अशा कुंडल्या जाळून माणूस कर्मवादी/कर्मेवीर बनत असल्यास हे उत्तमच आहे.

आदर्श वृत्तांकन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"दैववादाची होळी" या अंनिसच्या कार्यक्रमाचा श्री.प्रकाश घाटपांडे यांनी छान सविस्तर वृत्तांत लिहिला आहे.उद्याच्या वर्तमानपत्रांत या घटनेची काही त्रोटक बातमी येईल.मला वाटते प्रकाश घाटपांडे यांचे हे वृत्तांकन अनेकांच्या वाचनात यायला हवे.त्याचा निश्चित सुपरिणाम होईल. अशा वाचनाने विचारांना चालना मिळते.श्री.प्रकाश यांनी हे लेखन (वाटल्यास थोडा संक्षेप करून) कांही वृत्तपत्रांकडे पाठवावे. प्रसिद्धी मिळेल असा विश्वास वाटतो.अंनिस वार्तापत्रातही हा वृत्तांत छापतील.

"... प्रबोधनात लोकसहभाग करुन घेताना काही कल्पक व रंजक कार्यक्रम राबवावे लागतात त्यामुळे असे आरोप होणे अपरिहार्य आहे..."

हा विचार पटण्यासारखा आहे.

शंका वाटते

बर्‍याचदा कुटुंबियांकडून भावनिक दबाव निर्माण झाला की तत्वापेक्षा व्यवहार्यतेचा पर्याय स्वीकारण्याची तडजोड होते.

एवढेच नव्हे तर कठीण प्रसंगी मनुष्य अगतिक होऊन वेगळे मार्ग स्वीकारण्यास फशी पडतो. दर सकाळी टिव्ही लावल्यावर बाबा-बुवांची प्रवचने दाखवणारी चॅनेल्स पाहिली तर धक्का बसतो. भारत एकीकडे प्रगती साधत असताना दुसरीकडे अधोगती कशी साधत आहे याचे उत्तम उदाहरण डोळ्यासमोर दिसते.

तेव्हा कुंडल्या जाळून नेमका किती फरक पडेल कोणजाणे!

सहमत आहे

एवढेच नव्हे तर कठीण प्रसंगी मनुष्य अगतिक होऊन वेगळे मार्ग स्वीकारण्यास फशी पडतो.

अगदी सहमत आहे. माझ्या अंनिसतीलच एका मित्राच्या बाबतीत मी हे पाहिले आहे. जो ज्योतिषाच्या कर्मकांडाच्या विरोधात होता त्याने आपल्या वैवाहिक जीवनाच्या सौख्या बाबत एका ज्योतिषाच्या सांगण्यावरुन नदीत काळे तीळ टाकल्याचे कबूल केले होते. हे सांगताना तो म्हणाला कि तु हसशील पण मनुष्य असहाय्य झाला कि त्या॑ला दुसर काही सुचत नाही. आज तो हयात नाही.

तेव्हा कुंडल्या जाळून नेमका किती फरक पडेल कोणजाणे!

जसे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना तोडफोड, जाळपोळ अशा गोष्टी केल्या नाहीत तर आपण काही पक्षकार्य केल आहे असे वाटत नाही तसे इथे तरुण कार्यकर्त्यांना कुंडल्या जाळून काहीतरी क्रिएटीव्ह केल्यासारखे वाटते.
प्रकाश घाटपांडे

स्टारफिश थ्रोअर

स्टारफिश थ्रोअर ही कथा आठवली. समाज सुधारण्याआधी / ऐवजी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर विवेक सांभाळला तरी पुष्कळ झाले.
नववीत असताना मी माझी पत्रिका फाडून बंबात घातली होती. त्यानंतर आयुष्यात आजवर कधीही त्या वाटेने गेलो नाही. कसोटी बघणारे प्रसंग आले; बरेच आले, पण कधी तो आश्रय घ्यावासा वाटला नाही. कोणत्याही देवाला नमस्कार केला नाही, कोणत्याही देवळात दर्शनासाठी गेलो नाही, कोणताही नवस बोलला, फेडला नाही, कोणताही उपासतापास केला नाही, कुठल्याही बाबा-मातांकडे गेलो नाही, अंगारे-धुपारे, गंडे- ताईत, व्रते वैकल्ये, प्रसाद, आरत्या, स्तोत्रे, कर्मकांडे यातले काही म्हणजे काही आयुष्यात कधीही केले नाही.
मी अनिसचा कार्यकर्ताही नाही, पण मी काही स्टारफिश समुद्रात फेकले आहेत असे मला वाटते.
सन्जोप राव
हम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता

नक्कीच !

किमान एवढे धैर्य (माझ्यासारख्या) प्रत्येकात येवो, असे वाटते.
प्रतिसाद आवडला.

उत्तम लेख

+१

उत्तम लेख

उत्तम लेखन!

उत्तम लेखन!
पत्रिका जाणणे वगैरे प्रतिकात्मक उद्योग करण्याची वेळ आली नाही.. या गोष्टींवर कधिच विश्वास बसला नाही...
मात्र आकाशाचा स्नॅपशॉट एका चौकोनात मांडायची ही कल्पना मात्र मला आवडते.. एका छोट्या चौकोनातून केवढीतरी खगोलीय माहिती मिळते ती अन्यथा सांगण्यासाठी कित्यक शब्द खर्च झाले असते. या आंदोलनापमुळे कोणत्याही 'क्ष्' वेळेची (जन्माचीच हवी असे नाही) पत्रिका बनविणे ही कला नाहिशी होऊ नये असेही वाटते.

अवांतरः लग्न पत्रिका न बघताच ठरवले व केले आहे. . सुदैवाने घरच्यांचाही या गोष्टीला विरोध नव्हता.

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

सहमत

मात्र आकाशाचा स्नॅपशॉट एका चौकोनात मांडायची ही कल्पना मात्र मला आवडते एका छोट्या चौकोनातून केवढीतरी खगोलीय माहिती मिळते ती अन्यथा सांगण्यासाठी कित्यक शब्द खर्च झाले असते

मलाही आवडते. व्यंग चित्र कसे ९० टक्के गद्य असते व १० टक्केच चित्र असते. अनेक शब्दाने जे व्यक्त होणार नाही ते एका व्यंगचित्राने व्यक्त होते.

या आंदोलनापमुळे कोणत्याही 'क्ष्' वेळेची (जन्माचीच हवी असे नाही) पत्रिका बनविणे ही कला नाहिशी होऊ नये असेही वाटते.

अशा आंदोलनामुळे ही कला नाहीशी होईल हे संभवत नाही. कुंडली जाळणे हे खरे तर प्रतिकात्मक आहे. कुंडली हा खर तर खगोलशास्त्रीय आराखडा आहे. त्यावरुन भविष्य सांगणे हा फलज्योतिषाचा अवैज्ञानिक भाग झाला. खरा आक्षेप आहे तो फलज्योतिषावर आहे. कुंडली हे त्याचे प्रतिक मानून फलज्योतिषावर रोष व्यक्त केला आहे.
प्रकाश घाटपांडे

काँप्रेशन

'केवढीतरी' कशी? तारीख-वेळ (date-time) आणि अक्षांश-रेखांश सांगून जितकी माहिती (ग्रहस्थिती तक्त्यांतून/सॉफ्टवेअरकडून) मिळते त्यापेक्षा अधिक माहिती त्या चौकोनात असूच शकत नाही ;)
किंबहुना, तारीख-वेळ सांगितली तर अधिक अचूक ग्रहस्थिती मिळेल, घरांत ग्रह भरताना आत्तनाश स्वाभाविक आहे.
तारीख-वेळ सांगण्यासाठी किती जागा लागते? एक लाख वर्षांचे साधारण ३.१५ सहस्त्र अब्ज सेकंद होतात. ते नोंदविण्यासाठी मॅक पत्ताही पुरेल (६ बाईट=२.८१ लक्ष अब्ज). अक्षांश-रेखांश लिहिण्यासाठी चार बाईट पुरतील.
विकिपीडियावरील कुंडली पानावरील चौकोनात नेमकी किती माहिती आहे?
लग्न आणि ९ 'ग्रह' आणि प्रत्येकाच्या घरासाठी १ ते १२ पैकी एकएक आकडा अशा दहा जोड्या आहेत. त्यांना द्विमान लिपीबद्ध करण्यासाठी प्रत्येक जोडीसाठी फारतर ८ ठिपके लागतील. म्हणजे, फारतर दहा बाईट आत्त! सरळ माहिती साठविली तर दहा बाईट लागतील, चतुर एन्कोडिंग केले तर पाच बाईटही पुरतील.
त्यापेक्षा अधिक 'माहिती' क्विक रिस्पॉन्स फॅडमध्ये ठासलेली असते.
(अधिक माहितीवाल्या कुंडल्यासुद्धा असतात असे पाहिले आहे परंतु त्यांतही शंभर बाईटपेक्षा अगदी कमी माहिती दडविलेली असावी असे मला वाटते.)

ह्म्म्.. बदल करतो

'केवढीतरी' म्हणजे.. हा ग्रह इथे होता, हा ग्रह इथे होता वगैरे गद्यात लिहून देण्यापेक्षा हे अधिक चांगले, (निदान मलातरी) समजायला सोपे असे म्हणायचे होते. शिवाय त्यावेळी कोणते ग्रह आकाशात होते, कोणते नव्हते (मावळले होते), दिवस होती का रात्र (व साधारण वेळेची रेंज), ऋतू कोणता होता (कोणत्य ऋतूत कोणती नक्षत्रे साधारण कोणत्यावेळी आकाशात असतात त्यावरून) वगैरे वेगवेगळी माहिती कुंडली ब्नघून येते (अधिक तपशील जाणकार देऊ शकतील)

तरी या चिकित्सक प्रतिवादानंतर वाक्य बदलावे लागेल :)
एखाद्या विविक्षित वेळी, विविक्षित स्थानाहून दिसणारी बरीच खगोलीय माहिती, माहिती आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय साठवायसाठी हा उत्तम मार्ग मला वाटतो. फलज्योतिषाच्या थोतांडापायी आपल्या संस्कृतीने शोधलेली ही कला लोप पावू नये असे वाटते.

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

अवलंबित्व

ही माहिती डिकोड करण्यासाठी सिस्टीम लागेल, कुंडली थोड्याश्या ज्ञानाने/सवयीने कोणालाही कामचलाऊ वाचता येऊ शकते.

ब्राह्मणी चेहरा?

फलज्योतिष ब्राह्मणी वर्चस्वाखाली आहे/होते काय? ते सबाल्टर्नांनी थेट ग्रीकांकडून उचलले नाही?
सावरकर, आगरकर यांची छायाचित्रेसुद्धा व्यासपीठावरून टाळणे अगदीच जातीय दिसेल म्हणून त्यांची छायाचित्रेतरी अंनिस लावते असे माझे निरीक्षण आहे. अन्यथा, जयभीम, जयजिजाऊ गटांना शाहू, फुले, आंबेडकर हेच अधिक आवडतात.
कुंडली जाळण्याऐवजी पंचांग किंवा भृगूसंहिता का जाळले नाहीत?
सातार्‍याचे प्रकरण शिंदेंचे होते ना? आज अधिक जातीय जात कोणती आहे?

सूक्ष्म निरिक्षण

आपल निरिक्षण फार सूक्श्म आहे बुवा! आता चळवळ म्हटल्यावर थोडफार राजकारण आलंच!
प्रकाश घाटपांडे

ग्रीक कोण?

फलज्योतिष ब्राह्मणी वर्चस्वाखाली आहे/होते काय? ते सबाल्टर्नांनी थेट ग्रीकांकडून उचलले नाही?

मध्यंतरी आम्ही गोरे-घारे ग्रीक वंशाचे असे सांगण्याची फ्याशन काही भारतीय मंडळींत आली होती तेच ग्रीक का? ;-)

एका छोट्या चौकोनातून केवढीतरी खगोलीय माहिती मिळते

एका छोट्या चौकोनातून केवढीतरी खगोलीय माहिती मिळते ती अन्यथा सांगण्यासाठी कित्यक शब्द खर्च झाले असते. या आंदोलनामुळे कोणत्याही 'क्ष' वेळेची (जन्माचीच हवी असे नाही) पत्रिका बनविणे ही कला नाहिशी होऊ नये असेही वाटते.

सहमत. +१

अवांतर: दैववाद नष्ट करण्याच्या नावाखाली, (ज्यामध्ये बारा घरांमध्ये मिळून एका विवक्षित वेळेचा संपूर्ण ज्ञात आकाशाचा नकाशा सामावलेला असतो ती) कुंडली जाळणारे अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्य आणि काफिरांच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा नष्ट करण्यासाठी बामियानच्या (चूभूद्याघ्या) बुद्धमूर्ती फोडणारे तालिबानी यांच्यात कितपत फरक आहे?

वामन देशमुख

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार
मनुजा अंगी चातुर्य येतसे फार.

फरक

लक्ष वेधून घेणे आणि घृणा व्यक्त करणे हा दाभोळकरांचा उद्देश असल्याचे दिसते. कुंडलीचा तो नेमका कागद नष्ट करणे हा उद्देश नसावा. नेमकी ती मूर्ती फोडणे हाच तालिबान्यांचा उद्देश होता. (मात्र, 'काफिरांच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा नष्ट करणे' हा उद्देश नसावा, काफिरांची संस्कृती नष्ट करणे हा उद्देश असावा. इतिहासात येथे मूर्ती होती ही खूण नष्ट करून इतिहासाचे पुनर्लेखन करण्यात त्यांना रस नव्हता असे वाटते.)

तालिबान्यांनी काहीतरी मोठा गुन्हा केल्याचे गृहीतक दडलेले दिसते.

  1. प्रदेशाचे सरकार तेथील इमारतींविषयी काहीही निर्णय घेऊ शकते.
  2. मूर्तीपूजेला बुद्धाचाच (पैगंबराच्या मतासारखाच) विरोध होता असे वाचल्याचे स्मरते.
  3. बुद्धाच्या शिकवणीत काही आदरार्थी वाटत नसल्यामुळे त्याच्या मूर्तीविषयी मला प्रेम नाही.

फरक

दैववाद नष्ट करण्याच्या नावाखाली, (ज्यामध्ये बारा घरांमध्ये मिळून एका विवक्षित वेळेचा संपूर्ण ज्ञात आकाशाचा नकाशा सामावलेला असतो ती) कुंडली जाळणारे अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्य आणि काफिरांच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा नष्ट करण्यासाठी बामियानच्या (चूभूद्याघ्या) बुद्धमूर्ती फोडणारे तालिबानी यांच्यात कितपत फरक आहे?

मुख्य फरक आहे तो म्हणजे स्वतःच्या मालकीची वस्तू नष्ट करणे आणि दुसऱ्याचा सांस्कृतिक ठेवा नष्ट करणे हा आहे. 'माझी कुंडली मी जाळणार कारण माझा त्यावर माझा विश्वास नाही, ज्योतिषाधारित निष्कर्षात फोलपणा आहे हे मला पटलेलं आहे' हे जाहीर करण्यासाठी. वेगळं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या अल्कोहोलिकने आपल्या घरातल्या बाटल्या एकत्र करून समारंभकपूर्व फोडून नष्ट करण्याचं घेता येईल. स्वतःमधला बदल जाहीरपणे करण्यासाठी स्वतःमधल्या हीनत्वाचा नाश करणं हे नवीन इमारत बांधण्यासाठी जुनं पाडून टाकण्यासारखं आहे. ते कौतुकास्पद आहे. याउलट दुसऱ्यांचा नाश करण्यासाठी त्यांची इमारत, वास्तु, मूर्ती नष्ट करणं कौतुकास्पद नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी...

@अवांतर: दैववाद नष्ट करण्याच्या नावाखाली, (ज्यामध्ये बारा घरांमध्ये मिळून एका विवक्षित वेळेचा संपूर्ण ज्ञात आकाशाचा नकाशा सामावलेला असतो ती) कुंडली जाळणारे अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्य आणि काफिरांच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा नष्ट करण्यासाठी बामियानच्या (चूभूद्याघ्या) बुद्धमूर्ती फोडणारे तालिबानी यांच्यात कितपत फरक आहे?>>> अतिप्रचंड फरक आहे हो...''तालिबानी इस्लामचे पालन करत आहेत,त्यामुळे इस्लामनुसार जगातले बाकिचे सारे धर्म हे नष्ट करण्याच्या लायकीचे आहेत,मूर्तिपुजा करणे हे सर्वात मोठ्ठे पाप आहे,त्यापासुन मानवाला मुक्त केले पाहिजे,आणी त्याला एकमेव अल्लाच्या उपासनेकडे वळवलं पाहिजे,म्हणुनच शक्य आहे तेथे मूर्ती फोडल्या पाहिजेत,उरलेलं सर्व बिगरइस्लामी जगत इस्लाम मधे आणलं पाहिजे,,,थोडक्यात तुमचा धर्म वाइट आहे,हे इस्लामच्या पोथित आलेले अल्लाचे मत कोणत्याही पुराव्या शिवाय आंम्ही म्हणतो म्हणुन मान्य करा,आपली अक्कल चालवाल तर मार खाल'' हा तालिबानी कृत्याचा मतित-अर्थ आहे.याच्या पूर्णपणे विरुद्ध दैववादी विचारांना शरण न जाता जिवन जगण्यासाठी स्वतःच्या हिमतीवर आयुष्याचे हित साधण्यासाठी तयार व्हा,,,या जिवनक्रमाचे प्रतिक म्हणुन संस्कृतितला हिनत्वाचा सडका भाग कापायची प्रतिकात्मक गोष्ट-म्हणजे अंनिसचा कुंडली जाळा कार्यक्रम... तालिबान्यांमुळे एका प्रकारची गुलामी सोडुन दुसर्‍या प्रकारच्या गुलामीत या...म्हणजे तंबाखू सोडू नका,टपरी बदला असे होते,तर अंनिसच्या या उप क्रमामुळे माणुस अधिक निर्भय बनायची सुरवात करु शकतो, तंबाखुच सुटते,कोणत्याच टपरीची गरज पडत नाही... तुंम्हाला काय पाहिजे बोला...? http://atruptaaatmaa.blogspot.com

आवडले.

ह्या चर्चेतील बरेच मुद्दे आवडले.

लेखातीलः- प्रबोधनात लोकसहभाग करुन घेताना काही कल्पक व रंजक कार्यक्रम राबवावे लागतात त्यामुळे असे आरोप होणे अपरिहार्य आहे.
हे विधान.

दैववाद नष्ट होण्याकरीता सत्यनारायणाची महापूजा केली असती तरी चालले असते असे प्रामाणिकपणे वाटते
हा जगतापांचा मुद्द व त्याला दिलेले उत्तरही.

प्रियालींचे निरिक्षणः-
दर सकाळी टिव्ही लावल्यावर बाबा-बुवांची प्रवचने दाखवणारी चॅनेल्स पाहिली तर धक्का बसतो. भारत एकीकडे प्रगती साधत असताना दुसरीकडे अधोगती कशी साधत आहे याचे उत्तम उदाहरण डोळ्यासमोर दिसते. रोचक.
पन ह्याला दिले जाणारे टिपिकल् उत्तर म्हणजे "प्रगती म्हणजे काय ते स्पष्ट करा" किंवा "प्रगती फक्त भौतिकच असावी काय" एकदा का ह्या प्रश्नांनी चर्चा सुरु झाली दोन्ही बाजू अधिकाधिक आपापल्या ध्रुवांना अधिकाधिक जवळ करु लागतात.
.
सन्जोप रावांचा पूर्ण प्रतिसादच आवडला, पटला व व्यवहार्य तर नक्कीच वाटला.स्टारफिश कथा तर माहितच होती. पूर्ण अंधार दूर करता येइल का ह्या चिंतेने नुसतेच बसण्यापेक्षा फक्त पुढचे पाऊल दिसेल इतका उजेड सोबतीला घेउन कंदिलाच्या साह्याने हजारो मैलाचा प्रवास करणार्‍या प्रवाशाची आठवण झाली.
.
@ऋषिकेश :- फलज्योतिष व ज्योतिषगणित ह्यापैकी केवळ फल्ज्योतिषास (कालक्रमण करत भूत-भविष्य जानण्याचा दावा करण्यास) अंनिसचा विरोध आहे. ज्योतिषगणित अर्थात खगोल अध्ययनास अंनिसचा विरोध नाही. पत्रिका हे कला म्हणून ठेवावे असे म्हणत असाला चिंता नसावी. इतर दैनंदिन कामाच्या गोष्टींचे, इतिहासाचे व वैज्ञानिक गोष्टींचे झाले नसेल इतके "डॉक्युमेंटेशन"( मराठी ग्रंथीकरण??) ह्या गोष्टीचे झालेले आहे, सातत्याने होत आहे. एकदा हे झाले, की काही कुठली विद्या लोप पावत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रकाशित झालेले पुसायचे म्हटले तरी पुसले जाणार् नाही.
तसेही अंनिसलाही हे लोकांच्या डोक्यातून खोडून काढण्यात इतक्यातच मोठे यश यायची सुतराम शक्यता नाही.
निश्चिंत रहावे.
.

रिटेंचे आज अधिक जातीय जात कोणती आहे हे वाक्य भन्नाट आहे.

वामन देशमुखांचा करड्या अक्षरातील प्रश्न रोचक वाटला. त्याच्या उत्तराच्या अपेक्षेत.

--मनोबा

मग देवालाच जाळून का नाही टाकत?

मी या कुंडली जाळण्याच्या घटनेचा निषेध करतो. दैववाद नष्ट करायचा आहे ना, मग अंधश्रध्दा निर्मूलन समितीने पुण्यातली सगळी मारुती, गणपती आणि शनीची देवळे जाळून टाकावीत. आहे का हिंमत?
ज्योतिषशास्त्र हे एक शास्त्र असून त्यावर विश्वास ठेवायचा का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्योतिषशास्त्रामधल्यासुध्दा अनेक गोष्टी खर्‍या असतात, उपयोगी असतात. जर वापरणार्‍याने योग्य आणि सकारात्मक पध्दतीने वापर केल्यास या शास्त्राचा अनेक समस्यांवर उपयोग होऊ शकतो.
कुंडलीवरून माणसाचा स्वभावधर्म, आवडीनिवडी इ. अनेक गोष्टींची स्पष्ट कल्पना येते. संकटांना तोंड देण्याचे धैर्य मिळते. माझ्या बाबतीत तरी आत्तापर्यंत भविष्य अचूक ठरले आहे आणि या क्षेत्रातील काही ज्ञानी लोकांवर (आणि त्यांनी सांगितलेल्या भविष्यावर) माझा ठाम विश्वास आहे.
जर लोकांना श्रध्दा ठेवायची असेल तर ठेवू द्यात की, हे अंधश्रध्दा निर्मूलन वाले स्वत:ला कोण समजतात? प्रयत्नवाद आणि विज्ञानवाद योग्य आहे परंतु याचा अर्थ दैववाद चुकीचा आहे असा होत नाही.

निषेध

शूर शिपाई यांच्या या प्रतिसादाचा मी निषेध करतो. (नुसता निषेध करायला काय जाते?) देवळे जाळून टाकावीत असे म्हणणे बालीशपणाचे आहे. आहे का हिंमत हा प्रश्न हा शिवसेनट मस्तवालपणा आहे.
ज्योतिषशास्त्र हे एक शास्त्र असून त्यावर विश्वास ठेवायचा का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्योतिषशास्त्रामधल्यासुध्दा अनेक गोष्टी खर्‍या असतात, उपयोगी असतात. जर वापरणार्‍याने योग्य आणि सकारात्मक पध्दतीने वापर केल्यास या शास्त्राचा अनेक समस्यांवर उपयोग होऊ शकतो.
याला पुरावे द्या. 'मला अनुभव आला आहे' हा पुरावा होऊ शकत नाही. विज्ञानदिनाच्या निमित्ताने झालेल्या या चर्चांमध्ये अशा पुराव्यांना स्थान नाही.
कुंडलीवरून माणसाचा स्वभावधर्म, आवडीनिवडी इ. अनेक गोष्टींची स्पष्ट कल्पना येते. संकटांना तोंड देण्याचे धैर्य मिळते. माझ्या बाबतीत तरी आत्तापर्यंत भविष्य अचूक ठरले आहे आणि या क्षेत्रातील काही ज्ञानी लोकांवर (आणि त्यांनी सांगितलेल्या भविष्यावर) माझा ठाम विश्वास आहे.
विश्वास ठेवण्याचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. विश्वास न ठेवण्याचे इतरांना आहे. ते स्वातंत्र्य तुम्ही अडवू शकत नाही.सर्वच लोकांना संकटांना तोंड देण्यासाठी कुंडलीच्या कुबड्या लागतील असे नाही. कुंडलीवर विश्वास न ठेवताही संकटांना तोंड देता येते. निदान काही लोकांना तरी येते
जर लोकांना श्रध्दा ठेवायची असेल तर ठेवू द्यात की, हे अंधश्रध्दा निर्मूलन वाले स्वत:ला कोण समजतात? प्रयत्नवाद आणि विज्ञानवाद योग्य आहे परंतु याचा अर्थ दैववाद चुकीचा आहे असा होत नाही.
हे दैववादी, नशीबवादी स्वतःला कोण समजतात? विज्ञान पुरावे देते, म्हणून त्यावर विश्वास ठेवता येतो. तुम्ही पुरावे द्या, तुमच्यावरही विश्वास ठेवू.
सन्जोप राव
हम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता

नक्की कशावर विश्वास नाही?

तुमचा नक्की फक्त फलज्योतिषावर विश्वास नाही की दैववादावर नाही?
दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तुमच्या शेवटच्या वाक्यावरून असे दिसते कि तुम्ही पूर्णपणे दैववादाच्या विरूध्द आहात, असे असल्यास तो एक मोठा प्रांत आहे, त्याला शेकडो, हजारो वर्षांचा इतिहास आहे.
माझे म्हणणे असे आहे की जर तुमचा दैववादावर विश्वास असेल तर फलज्योतिषावरही ठेवायला काय हरकत आहे? पण जर खरेच तुम्ही पूर्णपणे दैववाद विरहीत आयुष्य जगत असाल तर मी तुमचा आणि या अंनिस लोकांचा आदर करेन, जर तसा पुरावा मिळाला तर आणि तरच !

यथायोग्य निषेध

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************

"मग अंधश्रध्दा निर्मूलन समितीने पुण्यातली सगळी मारुती, गणपती आणि शनीची देवळे जाळून टाकावीत. आहे का हिंमत?"

...शूर शिपाई.
हे वाचून आश्चर्य वाटले.देवळे जाळायला हवीत असे अंनिसने कधी कुठे म्हटले नाही.लिहिले नाही.अंनिसची चळवळ अहिंसक मार्गाने घटनेच्या चौकटीत चालू आहे. अंनिसने कधी घटनाबाह्य वर्तन केल्याचे ऐकिवात/वाचनात नाही. असे असता इतके असंबद्ध का लिहावे? या लेखनाचा निषेध करणे आवश्यक होते.श्री.सन्जोप राव यांनी हे काम यथयोग्य रीतीने पार पाडले आहे.धन्यवाद!

बदल

मी हे वाक्य मागे घेतो. क्षमस्व.

कृपया "मग अंधश्रध्दा निर्मूलन समितीने पुण्यातली सगळी मारुती, गणपती आणि शनीची देवळे जाळून टाकावीत. आहे का हिंमत?" हे वाक्य असे वाचावे-

"मग अंधश्रध्दा निर्मूलन समितीने पुण्यातल्या मारुती, गणपती आणि शनीच्या देवळांच्या प्रतिकृती जाळून टाकाव्या. आहे का हिंमत?"

धन्यवाद सन्जोपराव, यनावाला.

फरक

अंनिसच्या गिमिकी चीपनेसचे समर्थन करण्याचा माझा मुळीच हेतू नाही परंतु
त्यांनी पुण्यातील घराघरात शिरून सर्व कुंडल्या जाळलेल्या नाहीत. त्यामुळे तुमचे आह्वान गैरलागू आहे.
वास्तविक, फलज्योतिष दैववादी (फेटॅलिस्ट) असतेच असे नाही. नारायण नागबळी, कालसर्पविधी, नक्षत्र/मंगळ यांची 'शांत', इ. तोडगे देणारी विचारसरणी दैववादी म्हणता येणार नाही. "Chrysippus attempted to refute it by pointing out that consulting the doctor would be as much fated as recovering." ही (पलायनमपिमिथ्या सारखी) पळवाट उपलब्ध असेल तर तो खरा दैववाद नव्हेच.

मग जाहीरपणे का?

त्यांचा फलज्योतिषावर विश्वास नसला तर त्यांनी नको ठेवायला पाहिजे होता, त्यासाठी असा जाहीर कार्यक्रम करायची काय गरज होती? तो जाहीर कार्यक्रम केला कारण त्यांना दाखवून द्यायचे होते की फलज्योतिष ही अंधश्रध्दा आहे आणि हे निर्मूलन करण्याची त्यांची जबाबदारी आहे. (प्रतिज्ञा ठीक आहे, पण त्या लोकांनी जे भाषण केले त्यावरून हे स्पष्ट होते)

माझा प्रश्न असा आहे, की जर दैववाद नको असे त्यांचे म्हणणे आहे तर मग बाकीच्या सगळ्या श्रध्दांचे निर्मूलन पण करावे लागेल.

"नारायण नागबळी, कालसर्पविधी, नक्षत्र/मंगळ यांची 'शांत', इ. तोडगे देणारी विचारसरणी " या सगळ्यांचा फलज्योतिष शास्त्रात कुठेही उल्लेख नाही. हे सगळे व्यवसायासाठी निर्माण केले गेले आहे.

कारण

जाहीर कार्यक्रम करायची काय गरज होती?

लक्ष वेधून घेणे आणि निषेध व्यक्त करणे. फलज्योतिषाला काही लोक तरी मानत नाहीत असे पाहून काही श्रद्धाळू विचार करण्यास उद्युक्त होतील असा त्यांचा अंदाज असावा. घरात घुसून निर्मूलन करण्याचा त्यांचा उद्देश नाही असा माझा अंदाज आहे.

बाकीच्या सगळ्या श्रध्दांचे निर्मूलन पण करावे लागेल.

त्या सर्व श्रद्धांची प्रतीके वापरून समांतर प्रकारांनी शांततामय निषेध करण्यास त्यांची तयारी असेल असा माझा अंदाज आहे. नेमक्या कोणत्या श्रद्धेच्या प्रतीकांचा वापर करून निषेध करण्याचे तुमचे आह्वान आहे?

फलज्योतिष शास्त्रात कुठेही उल्लेख नाही.

म्हणजे कोणत्या ग्रंथात?
ठीक आहे, तसा काही तोडगा तुम्हाला अपेक्षित ग्रंथात उल्लेखिला नसेल तर ते खरेच दैववादी लिखाण ठरेल.

ग्रंथ

म्हणजे कोणत्या ग्रंथात?
प्रत्येक गोष्टीला ग्रंथ असावा असा हट्ट कशासाठी? एखादे शास्त्र अनुभवांतून आणि लोकांतून विकसित होऊ दिले तरी काही बिघडत नाही. तुमचा आमचा हिंदू धर्म याला तरी कुठे ग्रंथ आहे? आपण घरी रोज स्वयंपाक करतो तो सुध्दा कुठल्याही ग्रंथात लिहीलेला नाही. तात्पर्य ग्रंथात लिहिलेले तेवढे खरे बाकी सगळे झूट असे समजणे मूर्खपणाचे आहे.
तरीही या विषयावर अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. त्या ग्रंथांचा नीट अभ्यास केला जात नाही म्हणून लोक फसतात. बहुधा क्लीष्ट विषय आणि गणिती आकडेमोड करण्याचा आळशीपणा हे त्याचे कारण असावे.

हट्ट

प्रत्येक गोष्टीला ग्रंथ असावा असा हट्ट कशासाठी? एखादे शास्त्र अनुभवांतून आणि लोकांतून विकसित होऊ दिले तरी काही बिघडत नाही.

तर मग 'शास्त्रात नाही' या तुमच्या हट्टाला अर्थ नाही. ते विधी लोकांमध्येच विकसित झालेले आहेत.

तुमचा आमचा हिंदू धर्म याला तरी कुठे ग्रंथ आहे?

आमचा नाही.

आपण घरी रोज स्वयंपाक करतो तो सुध्दा कुठल्याही ग्रंथात लिहीलेला नाही.

आपण नाही, तुम्ही करीत असाल.

तात्पर्य ग्रंथात लिहिलेले तेवढे खरे बाकी सगळे झूट असे समजणे मूर्खपणाचे आहे.

तर मग 'शास्त्रात नाही' हे तुमचे विधान मूर्खपणाचे आहे.

घटनादत्त कर्तव्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
शूर शिपाई लिहितात

,"त्यासाठी असा जाहीर कार्यक्रम करायची काय गरज होती? तो जाहीर कार्यक्रम केला कारण त्यांना दाखवून द्यायचे होते की फलज्योतिष ही अंधश्रध्दा आहे आणि हे निर्मूलन करण्याची त्यांची जबाबदारी आहे.

..
हो. प्रत्येक सुबुद्ध भारतीय नागरिकाची ही जबाबदारी आहे असे मी मानतो. कारण भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत. असे मला मनापासून वाटते. माझ्या बांधवांनी अंधश्रद्धांचा त्याग करून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यात त्यांचे तसेच अंततः देशाचे हित आहे असे माझे मत आहे.माझा हा विचार विविध वैध मार्गांनी माझ्या बांधवांच्या लक्षात आणून देणे हे माझे कर्तव्य आहे.अंनिसच्या या कार्यक्रमामागे असा विचार असावा.

अंधश्रध्दा नक्की कोणती?

देवालयात जाउन देवाची पूजा करणे, नवस बोलणे, शनीला तेल वाहणे, विठ्ठल विठठ्ल करत शेकडो मैल पायी चालणे हे तुमच्या वैज्ञानिक दृष्टीकोनात बसते का? मग या तर एवढया "अंधश्रध्दा" (तुमच्या दृष्टीने) आहेत त्यापुढे फलज्योतिष काहीच नाही. कर्मसिध्दांत तर खुद्द भगवद्गीतेत सांगितला आहे. यावर का नाही अंनिस काही बोलत?
असो. माझे मत मी या आणि वरील प्रतिसादांतून मांडले आहे, त्यामध्ये बदल होण्याची सुतराम शक्यता नाही, त्यामुळे या चर्चेत माझ्याकडून इतकेच. धन्यवाद.

ठीक

माझे मत मी या आणि वरील प्रतिसादांतून मांडले आहे, त्यामध्ये बदल होण्याची सुतराम शक्यता नाही, त्यामुळे या चर्चेत माझ्याकडून इतकेच. धन्यवाद.

छान. आता चॉकोलेट खा.

शूर शिपाई

शूर शिपाई ( कालावधी १० आठवडे ६ दिवस)

कुंडलीवरून माणसाचा स्वभावधर्म, आवडीनिवडी इ. अनेक गोष्टींची स्पष्ट कल्पना येते. संकटांना तोंड देण्याचे धैर्य मिळते. माझ्या बाबतीत तरी आत्तापर्यंत भविष्य अचूक ठरले आहे आणि या क्षेत्रातील काही ज्ञानी लोकांवर (आणि त्यांनी सांगितलेल्या भविष्यावर) माझा ठाम विश्वास आहे.

उपक्रमावरील ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी ... http://mr.upakram.org/node/1065 जरुर वाचावे.
प्रकाश घाटपांडे

जरूर वाचेन

धन्यवाद.
हा संदर्भ चर्चेच्या आधी दिला असता तरी चालले असते, त्यामुळे लेखाची आणि लेखकाची पार्श्वभूमी कळण्यास मदत झाली असती.

कुंडलीचा पर्याय काय..?

अंनिसच्या सगळ्याच उपक्रमांप्रमाणे याही कार्यक्रमास आमच्या शुभेच्छा,फक्त एक प्रश्न-कुंडली ज्यांनी कुंडल्या जाळल्या त्यांची कुंडली कडे जाण्याची जी गरज आहे(ही गरज अंनिसला मान्य आहे का..?)...ती गरज भागवण्याचा प्रयत्न अंनिसने केला आहे का..? हा प्रयत्न त्यांनीच करायला हवा,तशी जबाबदारीच पडते त्यांच्यावर...म्हणुनच...फलज्योतिष शास्त्राचा योग्य आणी समग्र पर्याय अंनिसकडे उपलब्ध आहे का..?त्याची माहिती हवी आहे. http://atruptaaatmaa.blogspot.com

पर्याय?

फलज्योतिष शास्त्राचा योग्य आणी समग्र पर्याय अंनिसकडे उपलब्ध आहे का..?

फलज्योतिष शास्त्राला पर्याय असे म्हणायचे आहे काय?
प्रकाश घाटपांडे

असे अजिबातच म्हणायचे नाही...

@फलज्योतिष शास्त्राला पर्याय असे म्हणायचे आहे काय?>>> असे अजिबातच म्हणायचे नाही...माझ्या म्हणण्याचा मतितार्थ असा,की माझ्या सारखा जातक ज्योतिषाकडे ज्या कारणांनी जातो,त्या कारणांची खरिखुरी पूर्तता करणारी ज्योतिषबाह्य यंत्रणा अंनिसनीच उभी करायला हवी...त्यातुन माझ्या समस्या सुटायला लागल्या तर मी जातकतिकडे जाइनच शिवाय इतर जातकांनाही हाच पर्याय अधिक योग्य आहे,हे आत्मविश्वासाने सांगू शकेन...अशी कोणतीही यंत्रणा सध्या अंनिसकडे उभी आहे काय..?http://atruptaaatmaa.blogspot.com

पर्याय

जो पर्यंत इतर पर्यायांकडे लोक वळत नाहीत तो पर्यंत ते पर्याय सहज उपलब्ध होणार नाहीत, आणि जो पर्यंत फलज्योतिषाचा बोलबाला आणि खोटी प्रसिद्धी शाबूत राहिल तोपर्यत लोक इतर पर्यायांकडे वळणे कठीण आहे.

इतर पर्याय हे बहुधा, समुपदेशन, मानसोपचार वगैरे क्याटेगरीत मोडावे. हे करणे आजही आपल्या समाजात कमीपणाचे मानले जाते. त्या मानाने अमेरिकन समाजात सर्रास मी ट्रिटमेंट घेत आहे असे सांगितले जाते. या पर्यायांना कमीपणाचे मानणे कमी झाले की हे पर्याय आपोआप मोठे होतील.

इतर पर्यायांचे फलित..?

@जो पर्यंत इतर पर्यायांकडे लोक वळत नाहीत तो पर्यंत ते पर्याय सहज उपलब्ध होणार नाहीत, आणि जो पर्यंत फलज्योतिषाचा बोलबाला आणि खोटी प्रसिद्धी शाबूत राहिल तोपर्यत लोक इतर पर्यायांकडे वळणे कठीण आहे.>>> आपण म्हणता ते अंशात्मक सत्य आहे...मी स्वतः आजपर्यंत ज्योतिष शास्त्राची असत्यता पटल्यानंतर,माझ्या काही समस्यांकरता समुपदेशनाचा मार्ग अवलंबला होता.आणी असा मार्ग अवलंबलेल्या काहींशी मी बोललो आहे,त्यांचे अनुभवही माझ्या सारखेच आहेत...त्याचा एकंदर अर्थ पुढिल प्रमाणे-या समुपदेशकांना समस्येतुन सुटकेसाठीचे मार्गदर्शन करता येते.पण नुसता रस्ता दाखवुनही उपयोग नसतो,अनेकदा कठिण परिस्थितित ''पडलेल्याला'' हाताला धरुन बरोबर घेऊन चालवणारं कोणीतरी लागतं,तो पर्याय कोणाकडेच उपलब्घ नसतो,शिवाय या क्षेत्रातले हे डॉक्टर लोक यांना समस्यांची 'मुळात' नीट जाणीव नसते,गोळ्या औषधांचे कोरडे उपाय,अनेकदा रुग्णाची केलेली टवाळीदर्शक संभावना,या गोष्टींमुळे अनेकदा रोग परवडला पण औषध आणी विषेशतः हे काळिजहिन डॉक्टर्स नकोत,अशी रुग्णाची पक्की खात्री होते.याउलट दुसर्‍या एका समुपदेशकानी मला माझ्या समस्येकरता एका स्वमदत गटाकडे वळवले,आणी आज तो गटच माझा खराखुरा आधार झालेला आहे,मी माझ्या समस्येपासुन सुटलोच नाही,तर आज पूर्णपणे निर्भयही झालेलो आहे...खरि गरज आहे ती समस्या फेस करुन त्यातुन सुटलेल्या अश्या स्वमदत गटांची...!

रस्ता दाखवून उपयोग

या समुपदेशकांना समस्येतुन सुटकेसाठीचे मार्गदर्शन करता येते.पण नुसता रस्ता दाखवुनही उपयोग नसतो,अनेकदा कठिण परिस्थितित ''पडलेल्याला'' हाताला धरुन बरोबर घेऊन चालवणारं कोणीतरी लागतं,तो पर्याय कोणाकडेच उपलब्घ नसतो,शिवाय या क्षेत्रातले हे डॉक्टर लोक यांना समस्यांची 'मुळात' नीट जाणीव नसते,गोळ्या औषधांचे कोरडे उपाय,अनेकदा रुग्णाची केलेली टवाळीदर्शक संभावना,या गोष्टींमुळे अनेकदा रोग परवडला पण औषध आणी विषेशतः हे काळिजहिन डॉक्टर्स नकोत,अशी रुग्णाची पक्की खात्री होते.

गरजू या अनुभवांतून जात असतील याच्याशी सहमती आहेच पण ही समुपदेशन कार्याची मर्यादा झाली. अशी मर्यादा सर्वच क्षेत्रात पाहायला मिळते. उदा. शाळेत शिक्षक मार्ग दाखवू शकतात पण सतत हात धरून पुढे नेऊ शकत नाहीत. तेव्हा गरज असते ती सिस्टिम बळकट करण्याची. तुमची समस्या स्वमदत गटाने सोडवली. अशा गटांना मदत, सहकार्य झाल्यास लोक या पर्यायाकडे अधिक वळतील.

घटनेत असलेले वैज्ञानिक दृष्टीकोनाचे कर्तव्य

या प्रतिसादाचा उपक्रमींवर व्यक्तिगत रोख नाही.

...घटनेत असलेले वैज्ञानिक दृष्टीकोनाचे कर्तव्य आम्ही पार पाडीत आहोत असे सांगून दाभोलकर म्हणाले...

माझ्या बांधवांनी अंधश्रद्धांचा त्याग करून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यात त्यांचे तसेच अंततः देशाचे हित आहे असे माझे मत आहे.

माझा हा विचार विविध वैध मार्गांनी माझ्या बांधवांच्या लक्षात आणून देणे हे माझे कर्तव्य आहे.

  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आषाढी एकादशीला विठ्ठलाची सपत्नीक पूजा करतात (आणि यावर्षी चांगला पाऊस पडावा म्हणून विठ्ठलाला साकडे घालतात)
  • लाखो लोक बकरी ईदला गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या कापतात
  • लाखो लोक रमजान महिन्यात स्वतःच्या आरोग्याची आणि कदाचित प्राणाची किंमत मोजून उपवास करतात
  • जत्रा-यात्रांना शेकडो लोक गर्दी करून चेंगराचेंगरीत मारतात

अश्या वेळी या अंनिसने "घटनेत असलेले वैज्ञानिक दृष्टीकोनाचे कर्तव्य" राबवल्याची पुरेशी उदाहरणे आहेत का?

वामन देशमुख

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार
मनुजा अंगी चातुर्य येतसे फार.

नाही

तुमचा आरोप योग्य आहे.

व्यवहार्यता

कुठं कुठं म्हणुन अंनिस पुरी पडणार्? जे शक्य आहे ते तरी करत राहावे असा एक व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून अंनिस काम करते. अंधश्रद्धा व कालबाह्य कर्मकांडे असंख्य आहेत.
कुंडल्या न जाळताही व्यक्तिगत जीवनात कुंडलीवर विसंबुन आयुष्यातील निर्णय घेणार नाही असा पण जरी तरुणांनी केला तर ते अधिक श्रेयस्कर आहेच.
प्रकाश घाटपांडे

अंनिस अपुरी

कुठं कुठं म्हणुन अंनिस पुरी पडणार्?

काही विशिष्ट ठिकाणीच अंनिस अपुरी पडते हा निव्वळ योगायोग म्हणायला हवा!

वामन देशमुख

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार
मनुजा अंगी चातुर्य येतसे फार.

तुम्ही करा

अंनिसनेच् करावे असे काही नाही...तुम्हीही विरोध करु शकता..

अंनिसचे कार्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
गेली एकवीस वर्षे अंनिस महाराष्ट्रात कार्यरत आहे.त्या समितीचे हे कार्य समाजाच्या हिताचे आहे की अहिताचे? याचा विचार करावा.अंनिसने काय काय केले नाही हा मुद्दा अप्रस्तुत आहे.समाजात अनेक समस्या आहेत. एकाच संघटनेला त्या सर्व प्रश्नांत लक्ष घालणे शक्य नसते.तेव्हा समिती जो विचार मांडते, जे कार्य करते ते विधायक आहे की विघातक? समितीच्या कार्याने समाजाचे अहित होत असेल तर समितीला विरोध करावा.त्यांच्या चळवळीमुळे समाजाचे कसे नुकसान झाले आहे,होत आहे ते समजावून सांगावे.काहीतरी पूर्वग्रह ठेवून विरोध करणे निरर्थक आहे.

सहमत आहे

यनांच्या प्रतिसादाशी सहमत आहे. अंनिस एकवीस वर्षे कार्यरत असली तरी तिच्यात दरवर्षी सहभागी होणारे उत्साही किती? अंनिसला पाठींबा देणारे, तिचे कार्य समजून घेऊन अंधश्रद्धांना विरोध करणारे, स्वतः भाग घेणारे किती हे जाणून घ्यायला हवे. मला वाटतं की आपल्या समाजाची विचारसरणी पाहता अशा लोकांची संख्या खूप नसावी. तेव्हा अंनिस जे काही करते त्याला मर्यादा पडणे सहजशक्य आहे. त्यामुळे अंनिस येथे असते का? तेथे का जात नाही? अमुक आणि तमुक का करत नाही हे प्रश्न बिनमहत्त्वाचे आहेत.

 
^ वर