दैववादाची होळी

काल सकाळी ११ वाजता पुण्यात महात्मा फुले स्मारका समोर दैववादाची होळी हा कुंडल्या जाळण्याचा प्रतिकात्मक कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला. कार्यक्रमाला डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. बाबा आढाव, विद्या बाळ व १००-१२५ कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रसिद्धी माध्यमातुन अगोदरच झालेली होती त्यामुळे मिडीयावाले, पोलीस उपस्थित होते. २८ फेब्रुवारीला असलेल्या विज्ञानदिनाच्या पार्श्वभुमीवर हा कार्यक्रम घेण्यात आला.समितीतील अनेक युवा कार्यकर्त्यांना आपण काहीतरी क्रिएटिव्ह करतो आहोत असा उत्साह होता. फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आज समाजाला मागे खेचणार्‍या घटना घडत आहेत असे सांगून साता‍र्‍याचे ऒनर किलिंग प्रकरण, पुण्यात झालेल्या आत्महत्या व कुटुंब हत्या ज्या शनि-मंगळ युतीच्या दहशतीतून झाले त्याचा उहापोह तिन्ही वक्त्यांनी केला. समाजातील स्त्रीचे दुय्यम स्थान, पुरुष वर्चस्व, जातीभेद, धर्माचा ब्राह्मणी चेहरा इत्यादी उल्लेख ही भाषणात येणे अपरिहार्य होते. घटनेत असलेले वैज्ञानिक दृष्टीकोनाचे कर्तव्य आम्ही पार पाडीत आहोत असे सांगून दाभोलकर म्हणाले," शासकीय व्यवस्थेत वैज्ञानिक दृष्टीकोणाचा अभाव असून ती व्यवस्था दैववादाला थारा देणारी आहे. पोलिस म्हणतात की तुम्ही कुंडली जाळू नका पण आम्ही आमची चळवळ कायद्याच्या चौकटीतच करीत आहोत. त्यांना ते बेकायदेशीर वाटत असेल तर त्यांनी आम्हाला अटक करावी. समजू देत देशाला की कार्यकर्त्यांनी स्वत:ची कुंडली जाळली तर येथे अटक होते." चळवळ म्हणल कि या गोष्टी आल्याच. समजा दाभोलकरांनी कुंडली ची पूजा जरी केली असती तरी त्याची बातमी झालीच असती. अंधश्रद्धा निर्मूलन समिती सवंग लोकप्रियतेमागे लागली आहे असा आरोप नेहमीच होतो. पण प्रबोधनात लोकसहभाग करुन घेताना काही कल्पक व रंजक कार्यक्रम राबवावे लागतात त्यामुळे असे आरोप होणे अपरिहार्य आहे.
कार्यकर्त्यांनी या निमित्त संकल्प केला. मी अमुक अमुक अमुक गांभीर्यपुर्वक असा संकल्प करतो/ते की माझ्या जन्माच्या वेळच्या ग्रहस्थितीचा माझे जीवन घडवण्यावर काहीही परिणाम होत नाही असा माझा दृढ विश्वास आहे. त्यामुळे जन्माच्या वेळची ग्रहस्थिती दाखविणारी जन्म कुंडली मी भ्रामक मानतो. ही कुंडली म्हणजे माझ्या जन्मवेळी अज्ञानामुळे माझ्या पायात अडकवलेली दैववादाची बेडी आहे. म्हणुन तिचे सामूहिकरित्या दहन करणे हे मी मानसिक गुलामगिरीची होळी मानतो. महाराष्ट्रातील सत्यशोधकी परंपरेचा मला अभिमान आहे, माझी कृती त्या विचारांशी सुसंगत आहे. भारतीय घटनेत वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्वीकार हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य सांगितले आहे. दैववादाची होळी या कार्यक्रमाने मी कृतिशील पणे हे कर्तव्य पार पाडत आहे. या कुंडली बाबत महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, म.गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर याची मतेही समितीच्या विचारापेक्षा वेगळी नव्हती या मला मोठा आधार लाभला आहे.मी आयुष्यभर वैज्ञानिक दृष्टीकोनाने जगण्याचा आणी फलज्योतिषाला दैववादाला स्वत:च्या जीवनातून दूर ठेवण्याचा संकल्प राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने करत आहे.
या निमित्ताने मला नानासाहेब गोर्‍यांची आठवण आली. एकदा त्यांनी १९८८ साली अंधश्रद्धा निर्मूलन जाहीरनामा परिषदेत एक किस्सा सांगितला होता. त्यांच्या कॉलेजजीवनात अनेक मित्रांनी प्रबोधनवादी विचारांनी भारावून जावून हुंडा घेणार नाही, पत्रिका बघणार नाही अशा प्रतिज्ञापत्रकांवर सह्या केल्या आणि प्रत्यक्षात जेव्हा पाळी आली तेव्हा हुंडाही घेतला आणि पत्रिकाही बघितल्या. ' माझी इच्छा नव्हती रे पण आमची आजी म्हणाली मी थकले आता! माझ्या डोळ्यादेखत हे कार्य अगदी धूमधडाक्यात झाले पाहिजे. मग आमच्या आईच मन मोडवेना. तिला तरी बिचारीला समाधान मिळू दे. ` अशा अनेक भावनिक पातळयांवर हे प्रबोधन बोलत्या सुधारकांसारखे राहते.बर्‍याचदा कुटुंबियांकडून भावनिक दबाव निर्माण झाला की तत्वापेक्षा व्यवहार्यतेचा पर्याय स्वीकारण्याची तडजोड होते. पाहू या आजच्या तरुण कार्यकर्त्यांचे काय होते ते? काही ही झाल तरी एक पाउल पुढ तर टाकल आहे त्यांनी. स्वागत करु या त्यांच्या निश्चयाचे!

Comments

सहमत

वरील प्रतिसादांशी सहमत आहे. 'अंनिस' ने आपल्याला 'पोलिटिकली कन्विनियंट' अशाच गोष्टींना विरोध केला आहे असा श्री. वामन देशमुख यांनी लावलेला सूर खोडसाळपणाचा आहे.काही विशिष्ट ठिकाणीच अंनिस अपुरी पडते हा निव्वळ योगायोग म्हणायला हवा! असे नसून अंनिस सगळीकडेच अपुरी पडते ही वस्तुस्थिती आहे.
सन्जोप राव
हम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता

 
^ वर