हस्ताक्षरातील अक्षर...

‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात. याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही. तरीही यथातथा असलेल्या अक्षरातूनच ‘अक्षर’ वाङ्मय निपजते यात कुणाला शंका नसावी. हस्ताक्षर चांगले नाही वा संपादकांना वाचन सुलभ व्हावे म्हणून काही लेखक मंडळी चांगल्या हस्ताक्षराचे लिपिक पदरी बाळगून असत असेही ऐकिवात आहे. सुंदर विचार प्रसवणारे साहित्यिक अक्षरलेखनात मात्र कुडमुडे का? असा प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे. मग हस्ताक्षरावरून व्यक्तीच्या भाव-भावनांचा मेळ घालण्याचे जे शास्त्र(?) आजकाल ठासून लिहिले जाते त्याविषयी शंका घ्यायला वाव आहे.
सहीवरून स्वभाव कळतो(?) म्हणतात. ज्यांना अंगठे मारणेच जमते त्यांचा स्वभाव दिलदार आहे की संकुचित? कसे ताडावे? साक्षरता अभियानामुळे तळागाळातील लोक साक्षर झाले. मात्र ते जे लिहितात त्यातील एक अक्षर तरी वाचता येईल का? अशी काही ठिकाणी परिस्थिती असतांना हस्ताक्षरावरून व्यक्तीच्या मनातील भाव, मानसिक बैठक, भावनांची आंदोलने नोंदविणे हा प्रकार कसा तकलादू कुबड्यांवर उभा केला गेलाय ते समजून येईल.
कालच (२३ जानेवारी) राष्ट्रीय हस्ताक्षर दिन (नॅशनल हँडरायटींग डे) साजरा झाला. ‘सुंदर हस्ताक्षर हा एक सुरेख दागिना आहे,’ हा सुविचार वाचता न येण्याच्या वयापासून ऐकावा लागतो. ज्यावेळी लिहायला सुरुवात होते त्यावेळी कुत्र्याचे पाय मांजराला होणे क्रमप्राप्त असते. धाकदपटशा दाखवून अक्षर सुधारते, सुधारावता येते. म्हणजे लहानग्यांनी जे ‘चितारलेय’ ते इतरांना ‘वाचण्या’योग्य होते. खरे तर वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी वळणदार हस्ताक्षर शिकणे जाणीवपूर्वक सुरु होते. त्यानंतर मात्र स्वतःची विशिष्ट ‘लिखाण’शैली विकसित होते. चोविसाव्या वर्षी हे शिकणे पूर्ण होऊन हस्ताक्षरातून स्वत्व ठीबकू लागते. हँडरायटींगला ब्रेनरायटिंग समजण्याचा काळ या वयानंतरच सुरु होतो, असे म्हणतात.
परंतु मुख्य मुद्दा इथेच उपस्थित होतो की, या वयानंतर पेन कागद घेऊन एकाग्रतेने लिहितांना आजकाल कुणी आढळते का? टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल, इंटरनेटच्या या वेगवान जमान्यात ही ‘उत्तम हस्ताक्षर’ नामक कला एका दूर कोपऱ्यात जाऊन पडली आहे की नाही? स्क्रीनवर लागतील इतक्या संख्येने इंग्रजी-मराठी फॉन्ट उपलब्ध असतांना आणि ते विनासायास पाहिजे त्या आकारात प्रकारात प्रिंट करता येण्याची सोय असतांना कोण पठ्ठ्या कागदावर सुंदर अक्षरांचे दागिने पेरीत बसेल? आता तर म्हणे प्रत्येक शाळा संगणकीय करणार आहेत. अकरावी-बारावीच्या मुलांना स्वस्तातले लॅपटॉप मिळणार आहेत. म्हणजे उद्याची कॉलेजियन्स खिशात पेन घेऊन मिरविण्याऐवजी संगणकच ठेवून मिरवतील हे आजही दिसतेच आहे. अशावेळी सुंदर हस्ताक्षर वगैरे प्रकार फारच गौण मानला जाईल. याबाबत दुमत नसावे. ज्याचे प्रेझेंटेशन उत्तम तोच उत्तम असेही एक नवे सूत्र आमलात येईल.
सद्याच्या पिढीकडे अॅन्ड्रॉईड लोडेड मोबाईल असतांना कोण महाभाग कागदांवर वा वहीत कधी ना कधीतरी ‘संपणाऱ्या’ पेनाने नोट्स लिहीत बसेल? मग हे ‘हस्ताक्षर सुधार’ वर्ग घेणे, हस्ताक्षरावरून व्यक्तीचा स्वभाव जाणून घेणे, अक्षरांच्या उंचीवरून- फर्राटे मारण्याच्या शैलीवरून मनातील आंदोलने समजावून घेणे याचे ‘शास्त्र’ नक्कीच कालबाह्य ठरणार हे निश्चित.
मामलेदार कचेरीत जाऊन पहा. तिथे अर्ज लिहून देणाऱ्या व्यक्तींची अक्षरे त्यांनाच कळत असतील की नाही देव जाणे. कुठल्याही सरकारी कचेरीत गेलात अन् फायली चाळल्या असता काय दिसेल? हो दिसेलच ते, वाचता येणे अशक्यच असते. शिफारस वा टिप्पणी लिहितांना वरिष्ठ साहेबच जिथे कंजुषी करतो तिथे इतर लिपिकांची सुंदर अक्षर काढण्याची काय मजाल? फार फार तर चौथी पाचवीची मुलेमुलीच तेवढी काहीतरी सुंदर लिहितांना (तेही शिक्षकांनी कम्पलसरी केलं असल्याने) दिसतील. अन्यथा सगळीकडे सुंदर हस्ताक्षरांची बोंबाबोंबच दिसते. असे असतांना आजच्या पिढीसाठी आउटडेटेड ठरणारी शैली गळी उतरविण्याचा गवगवा करून त्यासाठी रान उठवायचे काहीच कारण नाहीये.
आमच्यापैकी कितीतरी डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहितांना अक्षरशः झोपा काढल्यासारखे लिहितात हे काही खोटे नाही. ते असे लिखाण असते की डॉक्टरपेक्षा तो केमिस्टच अतिहुशार म्हणावा की ज्याला ते औषध काय लिहिले असावे याचा अचूक ‘अंदाज’ लावता येतो. पण म्हणून काही डॉक्टरांच्या गिचमिड हस्ताक्षरावरून ते भणंग स्वभावाचे, विघ्नसंतोषी, गुन्हेगारी वृत्तीचे असतील असा कयास काढणारे शास्त्र ‘फसवे’ म्हणावे नाही तर काय? या पुष्ट्यर्थ अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.
एकंदर काय तर लफ्फेदार सही ठोकणारा जितका लुच्चा असू शकतो तितका जोरकस अंगठा उठविणारा कदापी नसतोच असे नेहमी आढळून येते ते काही उगाच नाही. मग गलिच्छ हस्ताक्षरावरून एवढा गदारोळ उडविण्याचे काम का म्हणून करायचे? ज्याला जशी अक्षरे लिहायचीत तशी लिहू द्या, अक्षर चांगले‘च’ असावे असा अट्टहास का? प्रत्येकाने सुंदर अक्षर काढण्यासाठी जनजागृती व्हावी (जी कधी होऊ शकणार नाही) म्हणून हस्ताक्षरदिन साजरा करणे चुकीचेच ठरेल. नाही का?

Comments

सुंदर हस्ताक्षर हा एक सुरेख दागिना

सुंदर हस्ताक्षर हा एक सुरेख दागिना आहे, पण आजकाल दागिने कोण् घालतो?

डॉक्टरपेक्षा तो केमिस्टच अतिहुशार ज्याला ते औषध काय लिहिले असावे याचा अचूक ‘अंदाज’ लावता येतो. हे वाक्य आवडले. यावर एक सुन्दर किस्सा सान्गितला जात् असे. एका डॉक्टरने आपल्या पत्नीस एक छोटा लेखी निरोप पाठविला. अक्षर न लागल्याने तिने तो जवळ्च्या केमिस्टला दाखविला व काय ते विचारले. त्यावर त्याने एक औषधाची बाटली काढून दिली! अंदाजच् तो, म्हणे चुकूही शकतो.

विनोदाचा भाग् सोडा, कारण माझ्या परिचयातील् बहुतान्श डॉक्टरान्चे अक्षर छानच आहे.

लेखाचे औचित्य आवडले व् लेख् सुद्धा...

धन्यवाद उल्हासजी

धन्यवाद!
आपला विनोदही आवडला. त्या केमिस्टने जी बाटली काढून दिली असेल त्याचा अंदाज आला बरं का!
सर्वच डॉ. गचाळ लिहीत नाहीत. आमचे काही सहाध्यायी आजही फाऊंटन पेनाने लिहितात जे की पाचवीतला मुलगाही वाचू शकेल इतके सुंदर असते.
लेखाचा उद्देश विनाकारण कोणत्याही गोष्टीचा बाऊ करुन त्याला व्यापक चळवळीचे स्वरुप देण्याविरोधात आहे.

छान लेख

हाहाहा! छान लेख पण मुद्यांशी असहमत.

हस्ताक्षर सुंदर असण्याशी माणसाच्या व्यवस्थितपणाशी बर्‍यापैकी संबंध असल्याचे माझे निरिक्षण आहे, असे असल्यास व्यवस्थित असल्याने हस्ताक्षर चांगले आहे किंवा हस्ताक्षर सुंदर काढण्याच्या सवयीमुळे व्यवस्थितपणाची सवय लागली?? करड्या रंगातील तर्क माझा आहे, त्यासाठी कुठलाही निरिक्षण विदा मजजवळ नाही.

निदान हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने हस्ताक्षर सुंदर असावे ह्यासाठी प्रयत्न होत असावेत, असे दिन वगैरे असावेत पण कायदे वगैरे होउ नयेत, ते बहुदा होणार पण नाहीत.

फारच वैतागून लेख लिहिला आहे काय?

सही-तारखे व्यतिरिक्त काहितरी स्वहस्ते

गेल्या महिन्यात अनेक दिवसांनी चेकबुक वापरताना मी काहि महिन्यांनंतर स्वतःच्या सही-तारखे व्यतिरिक्त काहितरी स्वहस्ते लिहितोय ही जाणीव मला झाली आणि (उगाच) ओशाळवाणे वाटले :(

भारतातही संगणकावर टंकणेच नव्हे तर आर्थिक व्यवहार, पत्र पाठवणे, आरक्षण करणे वगैरे सारे काहि होत असल्याने काहिच लिहावे लागत नाही :( अर्थात त्यामुळे आमचे वाचण्याइतपतच असलेले अक्षर झाकली मुठ या दर्जाचे राहते या फायदा तितकासा दुर्लक्षण्याजोगा नाही म्हणा :प्

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

बिघडलेलं हस्ताक्षर

कोणे एके काळी माझे हस्ताक्षर चांगले होते. चांगले याचा अर्थ सुरेख नव्हे किंवा पारितोषिकपात्र नव्हे पण वाचणारा आनंदाने वाचेल, कदाचित एखादप्रसंगी वाहवा करेल इतके चांगले होते. गेला काही काळ चेक, सही आणि किराणा मालाची यादी इथपर्यंत ते सीमित झाले होते. सध्या चेक आणि सही इतकेच राहिले आहे. यादी स्मार्टफोनवर टाइप करता येते.

खंत वाटते कधीतरी पण ती तेवढ्यापुरतीच.

असे होते खरे

मी यावर एक उपाय शोधला, तो असा :
कार्यालयीन पत्रं टाइप केली जातात, पण बाकीची पत्रं हातानं लिहायची. खेड्यापाड्यांमध्ये नेट नसतेच आणि कुरीयर जात नाही. व तितके पैसे खर्च करण्याची गरजही नसते. म्हणून उत्तरं पोस्टकार्डावर लिहायची.
दैनंदिन कामांची डायरी फोनवर न ठेवता डायरीतच हातानं लिहायची.
काही बारीकसं सुचलं असेल तर त्यासाठी लॅपटॉप ओपन न करता मजकूर हाताने लिहायचा. मग पीएला टाइप करायला द्यायचा.
हाताने लिहिताना जास्त जाणीवपूर्वक लिहिलं जातं.

अं?

खेड्यापाड्यांमध्ये नेट नसतेच आणि कुरीयर जात नाही. व तितके पैसे खर्च करण्याची गरजही नसते. म्हणून उत्तरं पोस्टकार्डावर लिहायची.

कुरियर नाही म्हणून पोस्टकार्ड?
हे समजले नाही...

गरज नसते म्हणून

कुरीयर जात नाही म्हणून नव्हे. तितके पैसे खर्च करण्याची गरजही नसते म्हणून पोस्टकार्ड. :-).

काही किस्से

‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात.

या विषयी पॉप्युलर प्रकाशनच्या गृहपत्रिकेत रामदास भटकळ यांनी एक किस्सा लिहिला आहे :
गंगाधर गाडगीळ यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित केला तेव्हा गाडगीळांनी ब्लर्ब लिहून दिला. अक्षर न लागल्याने "तरल" हा शब्द "सरळ" असा छापला गेला. :-).
-----------
लेखकांपैकी खूप चांगले अक्षर मी पाहिले ते 'डोह'वाल्या श्रीनिवास कुलकर्णी यांचे.
---------------
शांता शेळके यांची ह्स्तलिखिते रद्दीत विकली गेल्याची बातमी वृत्तपत्रात गाजत होती, तेव्हा मी आमच्या प्रकाशकांना म्हटले,"आमच्या बाबत तुमची सुटका झाली. कारण आमची ह्स्तलिखितेच नाहीत मुळात. :-)."

रोमँटिक विधान

लफ्फेदार सही ठोकणारा जितका लुच्चा असू शकतो तितका जोरकस अंगठा उठविणारा कदापी नसतोच असे नेहमी आढळून येते ते काही उगाच नाही.

हे विधान जरा रोमँटिक झाले. ग्रामीण भागाबाबतचे किंवा निरक्षर लोकांबाबतचा हा एक भाबडा गैरसमज आहे. लुच्चा इत्यादी असण्याचा आणि शिक्षणाचा अर्ध्या अक्षराचाही संबंध नाही.

मोठ्यांचे खोटे विनोद

अवधूत परळकर यांनी सकाळ मध्ये आणि काही दिवाळी अंकांमध्ये "मोठ्यांचे खोटे विनोद" लिहिले होते. त्यातला एक :

मेघना पेठे यांनी आपल्या नव्या कादंबरीचे हस्तलिखित दिलीप माजगावकर यांना दिले.
माजगावकर म्हणाले,"मेघनाबाई, अक्षर वाईट आहे. मजकूर जर टाइप करून दिलात तर बरे."
हस्तलिखित उचलत मेघना पेठे उत्तरल्या,"मला जर टाइप करता आलं असतं, तर मी कथा-कादंबर्‍या कशाला लिहिल्या असत्या?" :-).

------------

विनोद बाजूला ठेवून एक माहिती : मेघना पेठे यांचे अक्षरही सुंदर आहे.
दुसरी अवांतर माहिती : मराठी लेखकाला एक पान मजकूर लिहून जितकी रॉयल्टी मिळते, त्याहून जास्त एक पान टाइप करून देणार्‍या अक्षरजुळणीकाराला मिळते.

वळणदार अक्षर लिहायला मजा वाटते

वळणदार अक्षर लिहायला मजा वाटते.

पण आजकाल करमणूक म्हणूनच हस्ताक्षर लिहितो.

फाउंटनपेन सहज मिळू लागले, त्यानंतर पिसाची लेखणी बनवायचे कौशल्य लयाला गेले. (मला प्रयत्न करूनही हे नीट जमलेले नाही. बोरू बनवणे जमले आहे.) टंकनयंत्रे सहज मिळू लागल्यानंतर हस्तलेखनाचे कौशल्य लयाला जाईल.

+१

दीड वर्षांपूर्वी एके ठिकाणी फिरायला गेले होते. मित्राला पाठवण्यासाठी म्हणून एक पोस्टकार्ड घेतलं. क्ष लिहीण्यासाठी आधी क् लिहून त्याला ष जोडणार होते. तिथे खाडाखोड दिसलीच, पण पोस्टकार्डामुळे अक्षर आधी होतं तेवढंच व्यवस्थित आहे हे लक्षात आलं.

काम करताना अनेकदा आकडे, छोट्या टिपा लिहाव्या लागतात त्या हाताने लिहीणंच सोयीस्कर वाटतं. किराणासामानाची यादी अचानक आठवत नाही, आठवण होईल त्याप्रमाणे चपलांच्या रॅकच्या वर कागद चिकटवून त्यावर लिहून ठेवते. मध्यंतरी 'ऐसीअक्षरे'वर कोडी टाकलेली होती, ती कागदावर सोडवणं सोपं वाटलं.
पण हा इथे टंकलेला प्रतिसाद हाताने लिहायला सांगितला तर दोन वाक्य पूर्ण व्हायच्या आत कंटाळा येईल.

अनेक पाश्चात्य लोकांना पेन हातात धरलेलं पाहून मौज वाटायची. अशी ग्रिप् असल्यावर अक्षर विचित्रच येणार, तसंच निघतं. पण माझा एक एक्स बॉस सुंदर शाईपेन वापरायचा, ग्रिपही भारतीय पद्धतीतीच! पण एकदाही न अडता अक्षर लागलं तर त्या दिवशी त्याच्याकडून एक ड्रिंक मिळायचं.

माझ्या पुण्याच्या दोन्ही डॉक्टरांची हस्ताक्षरं मी कधी पाहिली नाहीतच. त्या सरळ टाईप करून प्रिंट-आऊट हातात द्यायच्या.

सुरेख व्यंगचित्र

प्रशांत कुलकर्णी यांचे एक सुरेख व्यंगचित्र सुमारे १५ वर्षांपूर्वी आलं होतं :
एक मुलगी संगणकावर टाइप करता-करता मागे वळून पाहत दारात उभ्या असलेल्या वडिलांना विचारतेय,"हस्ताक्षर म्हणजे काय रे बाबा?"

हस्ताक्षर अप्रचलित

हस्ताक्षर म्हणजे काय रे बाबा?

हस्ताक्षर हा शब्द आता अप्रचलित झाला आहे. (अवांतर: हस्ताक्षर हा शब्द सचित्र शब्दकोशातून हद्दपार करावा का? :) ) धनादेशावर किंवा अन्य ठिकाणी सह्या करण्यापुरताच पेनचा उपयोग होतो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हस्ताक्षराचे महत्त्व

आजही स्वतःच्या हातात पेन-पेन्सिल धरून लिहिणे हे काही कालबाह्य झालेले नाही.
विशेषतः विद्यार्थ्यांना अजूनही उत्तरे हाताने लिहावीच लागतात.
ज्या परीक्षांमध्ये योग्य पर्यायांना काळे करायचे असते (ओ.एम.आर.) अशा परीक्षांतही तो प्रश्न प्रथम हातानेच सोडवून बघावा लागतो.
'लेटेक्स' सारख्या लिपीप्रणाल्यांनी गणित विषय आता सुलभ रीतीने टंकित करता येत असला तरी कठिण समस्या सोडवताना त्या प्रथम हातानेच लिहाव्या लागत असतात.
हस्ताक्षर सुंदर असणे हा एक उत्तम गुण आहे हे मानायलाच हवे.आणि आपले विचार स्वहस्ताक्षरात लिहिणे हेही एक कौशल्य आहे. टंकनात अनेकदा खाडाखोड करून मजकूर दुरुस्त करता येतो. पण हस्ताक्षरात लिहीलेल्या मजकुरात पुष्कळ खाडाखोड केली तर तो मजकूर वाचणे अशक्य होईल. आपले विचार स्वहस्ताक्षरात लिहीण्याच्या सवयीमुळे विचारांत ससूत्रपणा आणि शब्दांची योग्य निवड यांची सवय लागते.
***
येथील अनेकांचे प्रतिसाद आवडले. कविता महाजनांचे किस्से आवडले. धनंजयांची ग्राफिटी (बोरूकला) यापूर्वी पाहिलीच आहे, त्यामुळे त्यांचे हस्ताक्षरही सुंदर असावे असा अंदाज आहे. माझ्या पाहण्यात माझे चित्रकलेचे शिक्षक (श्री. शिंदे) आणि माझा एक (नंतर एम्.डेस. झालेला) मित्र (श्री. हळबे) यांची हस्ताक्षरे अत्यंत सुंदर होती. वेगवेगळ्या वळणांची अक्षरे (फाँट्स) काढण्यात या दोघांचाही हातखंडा होता.(आजही आहे.)
***
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्या पद्धतीने पेन धरतात ते पाहून तसेही लिहिता येते याचा शोध लागला. ;) पण प्रयत्न करूनही मला तसे लिहीता आले नाही.
***
माझे हस्ताक्षर बिघडले आहे याची खंत आहे. चांगले हस्ताक्षर काढण्यासाठी खास प्रयत्न करावे लागतात.

हेच का ते?

तुम्ही हेच लेटेक म्हणत असाल तर कोणताही सुज्ञ माणूस हाताने कागदावरच गणित सोडवेल.

लॅटेक

काही वर्षांपूर्वी मी LaTeX चा थोडा सराव केला होता त्याची आठवण झाली.

हे गणित सोडवण्याचे नव्हे तर गणिती मजकूर सर्वमान्य पद्धतीने छपाईयोग्य तयार करण्याचे साधन आहे.

गणित छपाईचे अनेक नियम आहेत. (तसे अन्य शास्त्रांचेहि असतातच.) उदा. एखाद्या गणितात समीकरणांच्या अनेक पायर्‍या असल्या तर त्या सर्वांची '=' चिह्ने एकाखाली एक अशीच यावी लागतात' समीकरणांचे क्रमांक एका विवक्षित पद्धतीनेच पडावे लागतात. LaTeX वापरून हे आणि अन्य अनेक प्रकारचे formatting अतिशय सहजपणे करता येते हा त्याचा उपयोग आहे.

इतरहि अनेक प्रकारची formattings करण्यासाठी LaTeX चा खूप उपयोग होतो.

लेटेक

ओ लेटेकला काय बोलायचं काम नाय! पेपर लिहिणार्‍यांची जान आहे ती :)

जी.ए.कुलकर्णी यांचे हस्ताक्षर

"याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही."

~ अशा माननीय अपवादात बर्‍याच वरच्या क्रमांकाने श्री.जी.ए.कुलकर्णी यांचे नाव घ्यावे लागेल. अगदी रांगोळीचे ठिपके वाटावेत अशा सुरेख अक्षरात त्यांची पत्रे आहेत. स्वत: लिहिलेल्या पत्रांना ते 'अस्ताव्यस्त पत्रे' म्हणत. छोटीशी "धमकी" ही असे "आज तुम्हाला ५ नाही तर किमान ८ पानांची शिक्षा मिळणार आहे". निळ्या शाईपेक्षा त्याना टर्क्वाईझ ब्ल्यूचे फार आकर्षण. हिरव्या शाईतीलदेखील त्यांची पत्र आहेत. बॉल-पॉईन्ट पेन ते कधी वापरत नसत.

पत्र कितीही दीर्घ असो (जी.एं.च्या बाबतीत 'एक पानी पत्र दखलपात्र गुन्हा' ठरे) अगदी पहिले अक्षर आणि शेवटची ओळ, मोजूनमापून घ्यावी. तोळामाश्याचाही फरक पडणार नाही, इतके सुंदर.

[त्याना जर स्टेशनरीच्या दुकानात मिळणार्‍या नेहमीच्या लिफाफ्यापेक्षा खास त्यांच्यासाठी म्हणून तयार केलेल्या डिझाईन्ड् एन्व्हेलोपमधून पत्र पाठविले की त्याना खूप आनंद होत असे. अशा लिफाफ्याच्याबाबतीत त्यानी लिहिले की 'तुम्ही हे माझ्याकरीताच खास करत असाल तर ते करू नये असेदेखील मी म्हणणार नाही, इतकी ही गोष्ट मला भावते. अशा लखोट्यातून घरमालकाने मला भाडे तुंबल्याची नोटीस जरी पाठविली तर त्याच संध्याकाळी मी व्याजासह बाकी भरून टाकेन."]

अशोक पाटील

पूर्णवर्तुळ

टचस्क्रीन टॅबलेटमुळे हस्ताक्षराचा वापर पुन्हा वाढू शकेल काय? की ओसीआर तंत्रामुळे तेथेही हस्ताक्षर बिघडेलच?

होय आणि होय

मध्यंतरी "पीडीए" म्हणून एक प्रकार बराच वापरात होता. त्याच्या टचस्क्रीनवर "ग्राफिटी" नावाचे हस्तलेखनतंत्र वापरता येत असे. अक्षर बरेच मोघम असले, तरी कुठले होते, ते ओळखायची ती प्रणाली होती. या तंत्राबाबत पेटंट-खटला भरला होता.

अवांतर : आजकाल swype नांवाचे एक तंत्र आहे. कळफलकावर हाताचे फराटे ओढून शब्द लिहितात. माझा एक मित्र फार सफाईदारपणे वापरतो. मी वापरायचा प्रयत्न केला, तर नीट जमले नाही.

एका सुंदर कलेचा अस्तकाल...अपरिहार्य.

दिवटे डॉक्टरांनी अतिशय सुंदर व बहूतांशी मुद्दे पटणारा लेख लिहीला आहे. सुंदर हस्ताक्षर हा दागिना आहे पण आजकाल दागिने कोण घालतो हे ही तितकेच खरे. बाकी ज्यांचे अक्षर सुंदर असते त्यांचा स्वभावही टिपटाप आवडणाराअसतो असे माझेही निरीक्षण आहे. मुळात टिपटाप आवडण्यातूनच सुंदर हस्ताक्षर आपसूक अंगी बाणले जात असावे असे वाटते. आजकाल संगणकाच्या युगात सुंदर हस्ताक्षराचे कौतूक आणि हातावर अतिशय सुंदर व बारीक शेवाया करणाऱ्या आईचे कौतूक या दोन्ही गोष्टी एकाच पठडीतल्या. कारण आता यांत्रिकी करणामूळे विनासायास जर सफाईदार अक्षर लिहीणे (आणि अर्थात शेवाया करणे) जमत असेल तर जून्या कलांना जोपासण्याचा अट्टहास धरणे हे नॉस्टाल्जिकच (गतकालरमणीय ??) म्हणावे लागेल. मी शालेय जीवनापासून माझ्या हस्ताक्षराचे तोंडभरून कौतूक ऐकत आलो आहे. अगदी अलिकडे ही सुंदर मराठी अक्षर पाहीले की लोक आनंदाची (आणि आश्चर्याचीही) प्रतिक्रीया देतात. बऱ्याचदा अर्ज वगैरे लिहीतांना मी मुद्दाम हस्ताक्षरात देत असे. कारण टंकलेखन किंवा संगणकावरून अर्ज तयार करणाऱ्यांचे अक्षरच मूळात चांगले नसते असा माझा समज होता. पण संगणकाच्या युगात हस्ताक्षराने अर्ज लिहून वेळ व श्रम वाया घालवणे हे मागासलेपणाचे लक्षण असल्याचे बोधामृत प्राशन केल्यावर मी हस्तलिखिताच्या अट्टहासातून (आणि सुंदर हस्ताक्षराच्या गर्वातून) बाहेर आलो. आज शतकी बेरजा व वजाबाक्या करणे आपल्याला कैलक्यूलेटर शिवाय जमत नाही. आणि विसाच्या पूढचे पाढे पाठ करणे हे तर आदीमपणाचेच लक्षण ठरेल. (पावकी , सवाकी, दिडकी आठवल्या...) त्यामूळे आता लिहीण्याची बाब ही संगणकीय झाली आहे. काहीबाही सटरफटर नोंदी पूरत्या उरलेल्या हस्ताक्षरलेखनालाही आता जड अंतःकरणाने का होईना निरोप द्यायलाच हवा.

धन्यवाद

सर्वाँनीच या विषयावर उत्तम चर्चा घडवून आणलीत. त्याबद्दल अभिनंदन. नवी माहिती मिळाली अन ज्ञानवृद्धी देखील झाली. साधकबाधक प्रतिक्रियांसाठी धन्यवाद!

 
^ वर