रॉन पॉल २००८
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जरी २००८ मध्ये होणार असली तरी त्याची धूळवड मात्रा आता पासूनच सुरू झाली आहे. २४ तास वृत्तपत्र वाहिन्यांचे त्यांमुळे चांगलेच फावले असून सतत ह्या विषयावर काहीतरी काथ्याकूट कोणत्यातरी वाहिनीवर चालूच असतो. बुश साहेबांच्या करामतींमुळे आम जनताही त्रस्त असून त्याने ह्या कार्यक्रमांचे टीआरअपी वाढण्यास चांगलीच मदत होते. अमेरिकेत द्विपक्षीय पद्धती असल्याने इथल्या प्रमुख दोन पक्षांनी (रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटीक) आपापल्या पक्षातील उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांची यादी तयार केली आहे. ह्या इच्छुक उमेदवारांचे वाद विवाद सध्या इथल्या टी व्ही वर पाहायला मिळत आहेत. राजकारणी हे कोणत्याही देशाचे/पक्षाचे असले तरी राजकारणी हे राजकारणीच ह्याचा प्रत्यय यावा अश्या ह्या बाष्कळ चर्चा. तेच तेच वीट आणणारे मुद्दे,पोकळ आश्वासने , बढाया हे सगळे जोरात चालू आहे. डेमोक्रॅटसनि युद्ध कसे चुकीचे आहे म्हणून हंबरडा फोडायचा आणि रिपब्लिकन्सनी देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे असला भंपक युक्तिवाद करायचा हे सतत चालू आहे. आधी युद्धाच्या ठरावाला संमती देणारी आणि आता युद्धा विरुद्ध उर बडवणारी हिलरी काय आणि ९/११ रोजी योगायोगाने न्यूयॉर्क चा मेयर असण्याच्या एकमेव भांडवलावर उड्या मारणारा ज्युलिआनी काय सगळे एकाच माळेचे मणी वाटतात. अशा वातावरणात सध्या डॉ. रॉन पॉल हे नाव मात्र चांगलेच गाजत आहे.
रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असणारे आणि टेक्सास मधील एक प्रांताचे प्रतिनिधित्व करणारे सुमारे ७५ वय असलेले रॉन पॉल ह्यांनी चांगलीच खळबळ उडवली आहे. उमेदवारीच्या शर्यतीत बहुदा सर्वात शेवटी असूनही आणि रिपब्लिकन पार्टीच्या एकूण एक इच्छुक उमेदवारांशी मतभेद असतानाही रॉन पॉल आपल्या मतांशी खंबीर आहेत. ही मते त्यांनी जाहीरपणे रिपब्लिकन डिबेट मध्ये मांडून आपल्याच पक्षातील लोकांचा रोष ओढवला असला तरीही सामान्य जनतेची मात्र वाहवा मिळवली आहे. आपली मते अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि खंबिर पणे मांडणारा नेता आजकालच्या राजकारणात बघून अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
काय मुद्दे आहेत रॉन पॉल ह्यांचे? सर्वप्रथम अमेरिकेला सध्या असलेली अतिरेक्यांची साडेसाती ही त्यांच्याच कर्माची फळे आहेत हे कटू सत्य त्यांनी जाहीरपणे मांडले आहे. १९५३ पासून अमेरिकेची अंतर राष्ट्रीय राजकारणातील ढवळाढवळ आता त्यांच्याच अंगलटी येत आहे. इराण मधील लोकशाही उलथवण्यास मदत करून तिथे घराणेशाही आणणे, ओसामा लादेन सारख्या अतिरेक्यास सामर्थ्यशाली बनवणे, आधी सद्दामाचा पाठिंबा आणि नंतर त्याच्यावरच हल्ला आणि फाशी असलं ह्या स्वार्थापोटी केलेल्या परंतु दूरदृष्टीचा अभावाने केलेल्या ह्या घोडचुका आता अमेरिकेला सतावत आहेत. इतर राजकारणी फक्त पृष्ठभागावर बुडबुडे आणणारी गुळमुळीत विधाने करत असताना रॉन पॉल ह्यांनी मात्रा खोलात हात घातला आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकांना देखिल खोटी नाटकी टीव टीव ऐकण्याची इतकी शिसारी आली आहे की कडू असले तरी मुद्द्यांना प्रामाणिक असणारे रॉन पॉल ह्यांचे विचार त्यांना अधिक आवडले आहेत.
रॉन पॉल ह्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली असली तरी त्यांच्यांसमोर समस्या आहे ती लोकप्रियते बरोबरच सध्याच्या लोकशाहीत अत्यंत आवश्यक असणाऱ्या घटकाची म्हणजेच ' प्रचारासाठी आवश्यक पैशाची'. रॉन पॉल ह्यांचा पैसा उभारण्यामध्ये सध्यातरी सर्व उमेदवरात बहुदा शेवटचा क्रमांक लागतो. निव्वळ लोकप्रियतेच्या लाटेवर अवलंबून पैशाअभावी देखिल रॉन पॉल ह्यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळणार का? की लोकप्रियते मुळेच पैसा देखिल उभारला जाऊन सुखद रॉन पॉल ह्यांना उमेदवारी मिळण्याचा सुखद धक्का बसणार? ह्या दोन्हीचे सध्या कुतूहल लागले आहे.
-वरूण
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
'राजकारण' हा विषय उपक्रमावर नाही आहे ह्याची कृपया चालकांनी नोंद घ्यावी.
'राजकारण' अश्या लेखनविषयाची भर टाकली आहे. लेखनविषयांची यादी परिपूर्ण होण्यासाठी सदस्यांच्या सुचवण्यांचे स्वागत आहे.
Comments
दगड!
बुशसाहेबांच्या लोक-अप्रियतेमुळे यंदा डेमॉक्रॅटिक पक्षाने उमेदवार म्हणून एक दगड जरी उभा केला, तरी जिंकेल असे सध्यातरी चित्र आहे.
बुश विरुद्ध दगड म्हणजे दगड विरुद्ध दगड
हा हा हा!
आपला
दगडोपंत
बुश विरुद्ध दगड
मागच्या निवडणु़कीत तरी बुश साहेबांना केरी नावाच्या दगडाला हरवणे साधले होते. आता परिस्थिती बदलली असली तरी बुश साहेब दोनही टर्म्स संपवून बसल्याने असा रंजक सामना बघण्यास आपण मुकणार आहोत.
वॉशिंग्टन बहुत दूर है
रॉन पॉल ह्यांची लोकप्रियता नक्किच वाढते आहे.. उमेदवार निवडून येण्यासाठी पैसा हा महत्वाचा असला तरी प्रत्यक्षात पैसा हा तितकासा प्रभावी नसतो हे फ्रिकॉनॉमीक्स ह्या पुस्तकात लेखकाने सोदाहरण दाखवले आहे... अर्थात अभी वॉशिंग्टन बहुत दूर है :-) हे ही खरेच!!
साडेसाती?
सर्वप्रथम अमेरिकेला सध्या असलेली अतिरेक्यांची साडेसाती ही त्यांच्याच कर्माची फळे आहेत
साडेसाती ही शनी चे भ्रमण होताच संपते. पण अमेरीकेने आणी मुस्लिम जगताने जे काही चालवले आहे ते काही संपेल असे दिसत नाही. (दोघांच्या विचारसरणी मध्ये काही खास फरक आहे असेही आम्हाला वाटत नाही.)
असो.
(सध्या तटस्थतावादी)
गुंडोपंत
ही पण संमती
याबरोबरच,
इरा़क मध्ये जो हिंसाचार आणी नरसंहार चालला आहे त्यात तर अमेरिकाच सहभागी आहे. इतकेच नाही तर एका स्वतंत्रतावादी देशाच्या संसदेने हे युद्ध संमत केले आहे. अमेरिका प्रेमींची मतेही या विषयी ऐकायला आवडतील! (चीन चे राजकारणी हे अमेरिकन राजकारण्यांसारखेच आहेत. फक्त जरा जास्त 'चोट्टाळ' आहेत.)
आपला
शांततावादी
गुंडोपंत
~ युयुत्सुंनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवावी याचे समर्थन करतो ;) ~
सी. एन्. एन्.
सी. एन्. एन्. वर झालेल्या वादविवादांचा वरुण उवाच किंवा अन्य कोणीही उवाच आँखो देखा हाल वाचायला मिळाला तर आवडेल.
सी एन् एन्
सी एन् एन् वरील गाढवांचा वाद विवाद पाहू शकलो... त्याचा आमच्या अत्यंत आवडत्या 'जॉन स्टुअर्ट' ने घेतलेला आढावा देखिल 'डेली शो' मध्ये बघितला..अमेरिकेची राष्ट्रभाषा (ऑफिशियल लँग्वेज) इंग्रजी असावी का? ह्या प्रश्नाला फक्त अलास्का च्या ग्रावेलने हात वर केला!
हिलरीने, 'आम्ही सगळे संघटीत आहोत आमच्या विचारत फारसा फरक नाही' असे सांगीतले तर एडवर्ड्स ने 'आमच्यात मतभेद आहेत' असे व्यक्तव्य केले...
.. हत्तींची साठमारी मात्र पाहु शकलो नाही. ;-)..
हत्ती, गाढव
दोघांचीही झोंबाझोंबी बघायचा जोरदार बेत होता... पण जमले नाही.
रेडिओ चॅनल्सवर (टोक शोज्) मनसोक्त ऐकून घेतले...
हत्तींची चर्चा देवाधर्म आणि पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत राहिली तर गाढवे बगदादकडे उधळत राहिली असे ऐकून आहे.
असो... यूट्यूब/गूगल (चूभूद्याघ्या) यांच्या माध्यमातून पुढील वादविवाद हा अभूतपूर्व असणार आहे अशी दवंडी जोरदार चालली आहे.