त्या मोरयाची कृपा
कांही वर्षांपूर्वीची गोष्ट.त्यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रा.साठे आमचे विभाग प्रमुख होते.ते समयदक्ष होते. वेळापत्रकानुसार असलेले आपले सर्व तास ते नियमितपणे घेत.त्यामुळे ते विद्यार्थिप्रिय होते.
एका सोमवारी कॉलेजात आल्या आल्या बातमी समजली की प्रा.साठे यांना गंभीर अपघात झाला असून ते रुग्णालयात आहेत. आणखी समजले की काल संकष्टी होती.प्रत्येक संकष्टीला चिंचवडच्या मोरया गणपतीला जाण्याचा प्रा.साठे यांचा क्रम होता. त्याप्रमाणे काल दर्शन घेऊन परत येत होते.तेव्हा त्यांच्या स्कूटरला समोरून येणार्या ट्रकची (का टेंपोची) धडक बसली. ते दूर जाऊन पडले. कमरेला फ्रॅक्चर झाले.
आमच्या विभागातील आम्हां दोन प्राध्यापकांना पहिली दोन लेक्चरें नव्हती.आम्ही जवळच असलेल्या रुग्णालयात गेलो.एका हाताला मनगटापासून काखेपर्यंत बॅण्डेज,प्लॅस्टर घातलेला एक पाय दोरी बांधून वर केलेला. बॅंडेजच्या पट्ट्य़ांवर पट्ट्या बांधलेल्या कमरेखाली उशांची चळत लावलेली. अशा अवस्थेत असलेले साठेसर आमच्याकडे पाहून क्षीणपणे हसले. त्यांची ती शोचनीय स्थिती पाहून मन हेलावले. अपघातासंबंधी बोलताना ते म्हणाले,
"माझी काहीच चूक नव्हती हो! काय सांगू तुम्हाला? सगळे अचानक घडले. ट्रकच्या रूपात अंगावर रोंरावत येणारा साक्षात मृत्यू मी काल पाहिला. क्षणभर वाटले आता संपले सगळे! वाचण्याची आशाच दिसत नव्हती. स्कूटरवरून दूर उडालो. पडलो तिथे शेजारीच मोठा दगड होता. त्यावर डोके आपटते तर कपाळमोक्षच झाला असता. थोडक्यात वाचलो. ही केवळ त्या मोरयाची कृपा."
शेवटचे वाक्य ऐकून मी स्तंभित झालो. वाटले केवढी ही श्रद्धा!
"सर ,तुम्ही लौकर बरे होऊन कॉलेजला यायला लागाल आणि वर्गावर जाऊन ताससुद्धा ध्यायला लागाल. काही दिवस सक्तीची विश्रांती आहे".असे काही धीराचे औपचारिक शब्द बोललो. प्रा.साठे पुन्हा क्षीण करुण मुद्रेने हसले.त्यांची परिस्थिती गंभीर दिसत होती.आम्ही दोघे परतलो.
नंतर आम्हा दोघांचे त्या प्रसंगाविषयी बोलणे झाले. शेवटी मी विचारले."वाचलो ही त्या मोरयाची कृपा असे प्रा.साठे म्हणतात ते तुम्हाला पटते का?"
"तुम्हीच पाहाना! किती गंभीर अपघात होता.जवळच्या दगडावर डोके आपटले नाही म्हणून वाचले.थोडक्यात बचावले."
"ते तर खरेच.पण ही त्या मोरयाची कृपा?"
"हो.मला तसेच वाटते.मरता मरता वाचले त्याचे दुसरे कोणते स्पष्टीकरण देता येईल?इतक्या जवळ असलेल्या दगडावर डोके आपटले नाही त्याचे अन्य कारण काय?"
""समजा डोके दगडावर आपटले असते. तर ते आपटण्याचे जे कारण तेच न आपटण्याचे कारण."
"दोघांचे कारण एकच? हे तुमचे तर्कशास्त्र अजब दिसते."
"हो.एकच स्पष्टीकरण.योगायोग,यदृच्छा.आपण वाहन चालवतो तेव्हा कित्येक संभाव्य वाटणारे अपघात केवळ योगायोगाने टळल्याचा अनुभव येतो.त्या प्रत्येक वेळी देवाची कृपा कारणीभूत असते का?"
"टळलेल्या संभाव्य घटनेविषयी मी म्हणत नाही.तो योगायोग असू शकतो.पण अगदी जीवावर बेतणार्या अपघातातून वाचल्यावर देवाच्या कृपेचा प्रत्यय येणे स्वाभाविक आहे."
"आपल्या भक्ताच्या अपघाताविषयी मोरयाला नेमके कधी कळले असेल? टक्कर होण्यापूर्वी की झाली त्या क्षणीच? कारण धडक तर बसलीच. डोके दगडावर आपटणार नाही एवढे मोरयाने पाहिले असे म्हणायचे का?"
"मला काही म्हणायचे नाही. मी एवढा विचार करीत नाही. देव सर्वज्ञ आहे. पुढे काय होणार ते सर्व त्याला आधी कळत असणार."
"हो ना? मग मोरयाने हा अपघात घडू कसा दिला? आपल्या भक्ताला पूर्णपणे वाचविणे देवाला अशक्य होते काय? जीव वाचला हे खरे ,पण आता अंथरुणाला खिळून आहेत. न चुकता प्रत्येक संकष्टीला श्रद्धापूर्वक मोरयादर्शन घेणारे हे निष्ठावंत भक्त किती यातना भोगत आहेत! ही त्या मोरयाची कृपा का?"
"देवाला अशक्य असे काही नाही.पण त्याची करणी अतर्क्य असते. देवाने असे का केले याचे कारण आपल्याला समजणार नाही."
"असे म्हणणे ही माझ्या मते पळवाट आहे . मुळात असत्य गृहीतक खरे मानायचे. मग त्याच्याशी विसंगत गोष्टी घडू लागल्या की आकाशाकडे डोळे लावून ’हे प्रभो विभो अगाध किती तव करणी।’ असे म्हणायचे."
"तुम्हांला नेमके काय सुचवायचे आहे ते मला समजत नाही."
"ते असूं द्या सर. आपण एका प्रसंगाचा विचार करू. काल्पनिक आहे पण अवास्तव नाही. समजा एका बसमध्ये चाळीस प्रवासी आहेत. त्यांत तीस आस्तिक असून दहा नास्तिक आहेत. दोन वेगळे गट आहेत असे नव्हे. आस्तिक-नास्तिक बसमध्ये कसेही विखरून बसले आहेत."
"तुम्हाला हे कसे समजले? तुम्ही त्या सर्वांकडून प्रश्नावली भरून घेतली होती काय?"
"अहो सर,ही काल्पनिक घटना आहे असे मी प्रारंभीच सांगितले.तसेच समजा असेही म्हणालो."
"बरे बरे! पुढे काय ते सांगा."
"दुर्दैवाने त्या बसला अपघात झाला.त्यात दहा जण मृत्युमुखी पडले.दहाजण गंभीर जखमी झाले.तर वीस जणांना कांहीच लागले नाही. हे वीस जण पूर्णपणे वाचले ही देवाची कृपा समजायची ना?"
"होय. ज्या अपघातात दहाजण दगावले. दहाजण गंभीर जखमी झाले, त्यात वीस जणांना काहीच लागले नाही ही देवाची कृपा नाहीतर काय?"
" हे वीस जण श्रद्धाळू देवभक्तच असतील असे तुम्हाला वाटते का? नास्तिकांवर देवाची कृपा होण्याचे काहीच कारण दिसत नाही."
"देव नि:पक्षपाती असतो. कुणाला वाचवताना हा आस्तिक का नास्तिक असा भेदभाव देव करीत नाही."
" भेदभाव नाही? एकाच बसमधले दहाजण निवर्तले. दहा जखमी झाले. तर वीसजण पूर्णतया वाचले. म्हणजे भेदभाव झालाच ना?"
""काय ते प्रत्येकाच्या नशिबाप्रमाणे घडले."
"प्रत्येकाचे दैव? मग देवाच्या कृपेचा प्रश्न कुठे येतो? या विचारसरणीत एकवाक्यता, तर्कसंगत सुसंगतता काही दिसत नाही."
"तुम्ही काहीतरीच प्रश्न विचारता.ईश्वरी लीला अगाध असते हेही तुम्हांला पटत नाही. मग असे काहीतरी सांगावे लागते."
"तसे नव्हे सर.तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात. अनुभवी आहात. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात तुमचा हातखंडा आहे. म्हणून शंका विचारल्या. त्या विचारल्याविना मला राहावतच नाही."
"एकतर तुमची देवावर श्रद्धा नाही. अध्यात्माचे काही वाचन नाही. अभ्यास नाही. उपासना, ध्यानधारणा काही नाही. तुमच्याशी या विषयावर चर्चा करण्यात काही अर्थ आहे असे मला वाटत नाही."
"ठीक आहे सर.निघतो मी. आपला अधिक वेळ घेत नाही."...त्यांच्या केबिनमधून बाहेर पडलो.आपुला संवाद आपणाशी सुरू झाला.
"साक्षात् मृत्यू समोर दिसत होता, तरी साठेसरांचा जीव वाचला ही मोरयाची कृपा असेल का?"
"छे: ! भक्ताला देव संकटातून वाचवतो हे केवळ काल्पनिक पुराण कथांत असते. वास्तवात नसते. अपघातात कुणाचा जीव कधी वाचतो तो यदृच्छया. देवाच्या कृपेने नव्हे. देवदर्शनासाठी गेलेल्या भक्तांच्या वाहनाला अपघात होऊन कांहीजण मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या अनेकदा येतात. अपघात होणे-न होणे याच्याशी वाहनात कोण प्रवासी आहेत याचा काही संबंध असूंच शकत नाही. अपघात देव घडवत नाही. अपघातातून देव वाचवत नाही. हेच तर्कसंगत दिसते."
" समजा या संकष्टीला प्रा.साठे चिंचवडच्या मोरयाला गेले नसते तर अपघात झाला नसता का?"
"निश्चितपणे झाला नसता.ते मुंबई-पुणे मार्गावर गेले नसते तर हा अपघात होण्याचा संभव नव्हता."
"ते घरी असते तरी जवळपास कुठेतरी गणेशदर्शनाला गेले असते. तिथे कदाचित याहीपेक्षा अधिक भयानक अपघात घडला असता."
""असे आपले नुसते म्हणता येईल. पण तसे घडण्याची संभवनीयता अगदीच कमी वाटते."
" म्हणजे असा निष्कर्ष निघतो की--जीव वाचला ही त्या मोरयाची कृपा--यात काही तथ्य नाही. उलट प्रत्येक संकष्टीला चिंचवडच्या मोरयादर्शनाचे व्रत अपघाताला कारणीभूत ठरले.तसे व्रत अंगीकारले नसते तर आज अशा अवस्थेत रुग्णालयात पडून राहावे लागले नसते."
" होय. मला वाटते हेच सत्य आहे.प्रत्येक संकष्टीला चिंचवडच्या मोरयाचे दर्शन घ्यायचे हे व्रताचरण या गंभीर अपघाताला कारणीभूत ठरले यात संशय नाही. म्हणूनच --थोडक्यात वाचलो ही त्या मोरयाची कृपा--अशी प्रा.साठे यांची प्रतिक्रिया ऐकून स्तंभित झालो होतो."
Comments
लेख आवडला
अगदी साध्या शब्दांत उत्तम लेख मांडण्याची हतोटी यनावालांना आहे. त्यांचे लेख नेहमीच पटतात असे नाही पण या लेखात न पटण्याजोगे काही आढळले नाही.
सहमत
त्यांचे लेख नेहमीच पटतात असे नाही
हा भाग सोडून!
श्रद्धाळू
एखाद्याचे सर्व काही पटू लागले की बहुधा त्यावर श्रद्धा जडली असे म्हणता येते. ;-)
तर्क
काही वाईट घडले की देवाची करणी अतर्क्य असते, देवाने असे का केले याचे कारण आपल्याला समजत नाही हाच युक्तिवाद काही चांगले घडले की मात्र लागू होत नाही.
अपघातात साठेंचा जीव वाचला कारण; 'देवाची करणी अतर्क्य असते, देवाने असे का केले याचे कारण आपल्याला समजत नाही!' असे म्हंटलेले साठेंना आवडले नसते पण त्यांच्याच तर्कानुसार त्यात काहीही चूक नाही.
सोपा लेख आवडला.
लेख वाचला...
लेखकाचा देवावर विश्वासच बसू नये अशी व्यवस्था खुद्द देवानेच केली आहे हे जाणवले.
दैवी लीला अगाध आहे.
आता मला आठवेल तशा प्रतिक्रिया पाडतोयः-
१.साठेंच्या निष्ठेची व श्रद्धेची परीक्षा पाहिली जात आहे. अशी सर्वच संतांची व सिद्धांची पाहिली गेली होती. तुक्याची पोरे दुष्काळात उपाशी गेली म्हणतात, कुणाला क्रूसावर चढवले, तर कुणी घशाच्या कर्करोगाने गेला. पण कुणीही निष्ठा सोडली नाही. त्यांना फळ हे मिळणारच.
२.पूर्व जन्मात केलेल्या कृत्याचा परिणाम (की पापाची शिक्षा असू शकते.)
३.मुळात सर्वच काही मिथ्या असल्याने अपघात घडलेलाच नाही, इजाही झालेली नाही. अपघात घडल्याचा लेखकास निव्वळ भ्रम होतो आहे, मला परतिसाद दिल्याचा भास होतो आहे!
४.मनुष्याने जन्मात काही सारीच पुण्ये केलेली नसतात. वाइट कर्माची ही फळे. खरेअतर आता हे इहलोकात भोगून खरी शिक्षा नक्कीच कमी झालेली आहे.परलोकात सत्कर्मांची अनंतपटीने पुण्य मिळेल.
--मनोबा
सत्त्वपरीक्षा
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
परीक्षा का घेतात? विद्यार्थ्याची पात्रता समजण्यासाठी.तो जर उत्तीर्ण झाला तर ज्या पदासाठी (वरचा वर्ग,नोकरीतील जागा इ) परीक्षा घेतली त्यासाठी तो पात्र आहे असे समजायचे. परीक्षा ध्यावी लागते कारण तो पात्र आहे की नाही हे जाणण्याचे दुसरे साधन नसते.
पण देव सर्वज्ञ आहे. या भक्ताचा स्तर काय आहे.सत्त्वपरीक्षेत तो उत्तीर्ण होईल की नाही हे देवाला आधी समजत असलेच पाहिजे.हे सगळे माहीत असताना उगीच परीक्षा घ्यायची? त्यामुळे देव सत्त्व परीक्षा बघतो या म्हणण्यात काही अर्थ नाही.तुकाराम महाराजांची गाथा तारण्यासाठी देवाने त्यांना तेरा दिवस उपोषण करायला लावून का तंगवले? त्यांची निस्सीम भक्ती,एकनिष्ठता,दृढश्रद्धा देवाला आधी ठावूक नव्हती काय? तेरा दिवसांच्या उपोषणाने ती सिद्ध झाली काय? उगीच आपले काहीतरी.विचार करा ना!
.
सत्त्वपरीक्षेच्या बीभत्सपणाचा कळस म्हणजे अतिथीरूपात आलेल्या शंकराने चांगुणेची(चिलयाबाळाच्या आईची) घेतलेली सत्त्वपरीक्षा.माझ्यामते कुण्या मनोविकृत माणसाने लिहिलेली ती गोष्ट आहे.
देवा!
>उगीच आपले काहीतरी.विचार करा ना!
देवा, यनावाला सरांना उपहास कळत नाही याबद्दल त्यांना माफ कर. :)
मात्र "मी" या पात्राने "सर ,तुम्ही लौकर बरे होऊन कॉलेजला यायला लागाल आणि वर्गावर जाऊन ताससुद्धा घ्यायला लागाल. काही दिवस सक्तीची विश्रांती आहे". असे धीराचे औपचारिक शब्दही का बरे बोलावेत? जर त्यांची परिस्थिती गंभीर असली तर हा खोटा धीरही नको, नाही का? खरेखरे काय ते सांगून टाकावे.
(सॉरी, थोड्या खोड्या काढण्याचा मोह कधीतरी आवरत नाही).
लेख आवडला. (लेखाच्या प्रकारावरून मिपावरील सामंतकाकांची आठवण झाली). फक्त जरा मोठा आहे.
उपहास? कुठे आहे तो?
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"देवा, यनावालांना उपहास कळत नाही याबद्दल त्यांना माफ कर. :) " ...चित्रा यांच्या प्रतिसादातून.
.
मन यांनी अदृश्य शाईत लिहिले आहे,"साठेंच्या निष्ठेची व श्रद्धेची परीक्षा पाहिली जात आहे.अशी सर्वच संतांची व सिद्धांची पाहिली गेली होती.तुक्याची पोरे दुष्काळात उपाशी गेली...."
...या लेखनावर मी सत्त्वपरीक्षा हा प्रति-प्रतिसाद लिहिला.चित्रा यांच्या टिप्पणी नंतर मन यांचा प्रतिसाद पुनःपुन्हा वाचला.पण त्यात उपहास कुठे आहे ते मला कळतच नाही.पौराणिक कथांतील सत्त्वपरीक्षा हा प्रकार तसा बहुपरिचित आहे.पण त्यात काही उपहासात्मक असावे असे वाटत नाही.
स्पष्टीकरण
मन यांचा सर्व प्रतिसादच उपहासात्मक/व्यंगात्मक आहे. तुमचा उपहास नाही, तर तुमच्या लेखाला श्रद्धावंत कशी उत्तरे देतील असे लिहीण्याचा तो प्रयत्न आहे असे मला वाटते. तर तुम्ही त्यांनाच जरा विचार करा ना म्हणता आहात याची गंमत वाटली.
आभार.
स्पष्टीकरणाबद्दल चित्रातैंचे आभार. आम्हास प्रतिसाद खुलवणे बहुदा जमले नसावे.
--मनोबा
शंका.
माझ्या मते 'मोरया' ही 'कन्सेप्ट' फक्त धीर देण्यासाठी असते.
कुणास ठावे? कदाचित तो मोरया लेखकांचे रूपाने या साठे सरांना धीर देत असेल? शेवटी अगाध. अन् लीला. दोन भयंकर विनोदी शब्द.. अन् खरे काय ते तो साक्षात मोरयाही सांगू शकत नाही असे आमचे प्रतिपादन (contention) आहे.
(नास्तिक) आडकित्ता
भयंकर!
भीषण सुंदर्!
पूर्ण सहमत. अगदी प्रत्येक अक्षराशी.
हम्म
माफ करा, थोडा गम्भीर प्रतिसाद देतोय.
१.साठेंच्या निष्ठेची व श्रद्धेची परीक्षा पाहिली जात आहे. अशी सर्वच संतांची व सिद्धांची पाहिली गेली होती. तुक्याची पोरे दुष्काळात उपाशी गेली म्हणतात, कुणाला क्रूसावर चढवले, तर कुणी घशाच्या कर्करोगाने गेला. पण कुणीही निष्ठा सोडली नाही. त्यांना फळ हे मिळणारच.
- हा मनाची समजूत घालण्याचा आणि विपदेने खचून जाऊ नये या दृष्टीने रचलेला उपयुक्त 'मनोव्यापार' आहे. फक्त यामागे अकर्मण्य वृत्ती नसणे, त्यापेक्षा खूपच उदात्त मनोभूमिका असणे अपेक्षित असते.
२.पूर्व जन्मात केलेल्या कृत्याचा परिणाम (की पापाची शिक्षा असू शकते.)
- हा कर्मविपाकाचा सिद्धान्त. जो आपल्याजागी खरा आहे. त्याविना सैद्धान्तिक पातळीवरही कसलीच 'टोटल' लागत नाही.
३.मुळात सर्वच काही मिथ्या असल्याने अपघात घडलेलाच नाही, इजाही झालेली नाही. अपघात घडल्याचा लेखकास निव्वळ भ्रम होतो आहे, मला परतिसाद दिल्याचा भास होतो आहे!
- हा अजातवाद. देहतादात्म्य नष्ट झालेल्या, मन, बुद्धीपलीकडच्या आणि जागृती, निद्रा, सुषुप्तीला गिळून उरणार्या तुरीयातीत सहज अवस्थेतल्या योग्यासाठीच हे लागू पडते. (उदा. रमण महर्षीन्चे चरित्र वाचा). तुम्हाआम्हाला नाही. या सिद्धान्ताचे सरसकट प्रतिपादन केले जात नाही. 'अधिकार तैसा करा उपदेश' असा दन्डक असतोच.
४.मनुष्याने जन्मात काही सारीच पुण्ये केलेली नसतात. वाइट कर्माची ही फळे. खरेअतर आता हे इहलोकात भोगून खरी शिक्षा नक्कीच कमी झालेली आहे.परलोकात सत्कर्मांची अनंतपटीने पुण्य मिळेल.
- जोवर 'कर्ताभाव' आहे तोवर कर्मे बन्धनकारक होतात. ती मुक्तीकडे न नेता पापपुण्याच्या चक्रात अडकवतात असा मूळ सिद्धान्त आहे. त्यामुळे पापपुण्याचे हिशेब लावत बसण्यापेक्षा अहन्कार, कर्ताभाव कमी करण्यासाठी विहीत कर्मे सचोटीने करत असतानाच आपल्या पिन्डाला अनुकूल मार्ग निवडून साधना, उपासना करावी यावर अध्यात्मशास्त्रात भर दिलेला असतो. असो.
म्हणजे?
चारही स्पष्टीकरणांवर एकच शंका:-
म्ह ण जे ?
--मनोबा
अजातवादखंडन
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.मूकवाचक लिहितात,"मुळात सर्वच काही मिथ्या असल्याने अपघात घडलेलाच नाही, इजाही झालेली नाही. अपघात घडल्याचा लेखकास निव्वळ भ्रम होतो आहे, मला प्रतिसाद दिल्याचा भास होतो आहे!- हा अजातवाद."
..
म्हणजे हे नामरूपात्मक जग ,जे आपल्याला दिसते,अनुभवाला येते,जिथे आपण पिढ्यान् पिढ्या सर्व व्यवहार करतो,ते सगळे मिथ्या! असा हा अजातवाद.तो मांडणारी व्यक्ती या जागातीलच आहे. म्हणून या सगळ्यासह ती व्यक्तीही मिथ्या आहे. अशा मिथ्या व्यक्तीने प्रतिपादन केलेला हा अजातवाद मिथ्या म्हणजे खोटाच असणार हे उघड आहे.परिणामतः अपघात घडला,इजा झाली,सदस्यानी प्रतिसाद दिला या सर्व गोष्टी वास्तव म्हणजे खर्या ठरतात.(आणि तशा त्या आहेतच.)
जगत मिथ्या वर सगळे सम्पत नाही
सगळे मिथ्याच आहे हे जर मान्य असेल तर त्यातून अजातवादाचे खन्डन करणारे तर्क कुठल्या निकषावर वगळायचे? मुळात मिथ्या याचा अर्थ खोटा असा नसून अनित्य, भासमान (अस्तित्व आणि मनबुद्धीने त्यावर केलेले नाना प्रकारचे मनःकल्पनान्चे, ईच्छा, अपेक्षा इ. चे आरोपण याची सरमिसळ), कधीही नष्ट होउ शकणारे असा काहीसा आहे. असो.
साधकावस्थेत नित्यानित्य विवेक आणि वैराग्य बळकट करण्यासाठी ब्रह्म सत्य, जगत मिथ्या अशी भूमिका घेणारा साधक शेवटी 'सर्वम् खलु इदम् ब्रह्म' या प्रचितीप्रत (वैचारिक निष्कर्षाप्रत नव्हे) पोचतो. यात नामरूपात्मक जगाचे सत्यत्व नाकारणे न घडता आत्मौपम्य वृत्तीने सगळे व्यवहार घडणे सुरू होते.
( निव्वळ तर्कदृष्ट्या बघता या बाबतीत प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तुम्हालाही वाटेत येणारी खुर्ची दिसते, तुम्ही तिला वळसा घालूनच पुढे जाता, मग 'जगत मिथ्या' असे कसे काय म्हणता येईल? या सारखे प्रश्न ते थेट सगळीच माया म्हणल्यावर जगणे निरर्थक वाटून माणूस आत्महत्या नाही का करणार? इथवरचे प्रश्न लोक महर्षीना विचारायचे. 'डे बाय डे', 'बी ऍज यू आर' -डेव्हिड गॉडमन या रमण महर्षी विषयक पुस्तकात याविषयी सविस्तर विवेचन आहे. ते मुळातून वाचण्यासारखे आहे. )
अजातवाद हाच एकमेव आणि परिपूर्ण सिद्धान्त आहे असा दावा महर्षी करत नसत आणि तो सरसकट सगळ्यान्वर लादण्याचा प्रयत्न आजवर कुणीही केलेला नाही हे ही महत्वाचे.
संसारातील विपदा
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री मूकवाचक लिहितात,
..संसारात विपदा,संकटे ही येणारच.अशावेळी आपले मित्र,आप्तेष्ट यांची मदत,सल्ला घेऊन ,योग्य तर्कसंगत विचार करून संकटाला तोंड द्यायला हवे.पुन्हा असे संकट शक्यतो येऊ नये याची दक्षता घ्यायला हवी.जीवनाला सामोरे जायला हवे.हाच उचित मार्ग.उगीच कसल्यातरी भ्रामक मनोव्यापाराच्या मागे लागल्यास नैराश्य येईल.
अपघात झाला म्हणजे मोरया माझी परीक्षा पाहात आहे.असे प्रा. साठे यांनी समजायचे का?
मग अकर्मण्य नको म्हणून पुढच्या संकष्टीला मी मोरयाच्या दर्शनाला जाणारच मग स्ट्रेचरवरून आंब्युलन्समधून जावे लागले तरी बेहत्तर असे म्हणून आणि ते अंमलात आणून त्यांनी आपली निष्ठा सिद्ध करायची का? काहीतरीच काय? विचार करा.
अपघात झाला
सहमत आहे.
अपघात झाला तर परीक्षा आणि एखादा जिवानिशी जातो त्याचे काय? त्याचे बहुधा संचित किंवा पूर्वजन्मातील पाप. विमान दुर्घटनेत बहुधा सर्व पापी माणसं एकत्र एकसाथ जमलेली असतात आणि नैसर्गिक आपत्तींमध्येही. आयुष्यात कमी जास्त प्रमाणात संकटे आली नाहीत असा माणूस विरळा आणि एक संकटातून बचावला, परीक्षेत उत्तीर्ण झाला म्हणून पुढले संकट येणार नाही किंवा जिवावर बेतणार नाही असे काही नसते.
जिवानिशी ...
जिवानिशी जातो त्यास मोक्ष प्राप्त होतो, नाहीच झाला तर निदान मरणोत्तर जीवनात स्वर्ग वगैरेची उपलब्धी होते.
जीवात्मा तळमळत रहात नाही. पिशाच्च योनीत अधिक काळ रहायची वेळ येत नाही. समंध बनावे लागत् नाही. तो एक् यथार्थ पितर ठरतो, त्याच्या घराण्याची भरभराट होते. अशा सर्व मान्यता, समजुती आहेत.
आणि हे आपल्याकडेच आहे असे नाही. ईश्वरभक्तीसाठी निघालेला मध्य पूर्वेतील,अरब जगातील माणूस मधेच दगावला तर त्यास ता-कयामत शांती/अमन् मिळते व "कयामत के दिन उसे जन्नत(स्वर्ग) नसीब होता है "
कट्टरवादी जिहादी मृत्यूस तयार होण्यासाठी नमनावर बिंबवल्या गेलेल्या ह्या गोष्टीही महत्वाच्या ठरतात.
....विमान दुर्घटनेत बहुधा सर्व पापी माणसं एकत्र एकसाथ जमलेली असतात आणि नैसर्गिक आपत्तींमध्येही.
हो तसेच असते. ह्याला खास "समूह मृत्यू योग" अशी संज्ञा आहे. विधीलिखित व विधियोजना किती अचूक असू शकते हे विशद करण्यासाठीही ह्याचा बर्याचदा उल्लेख होतो. शरद उपाध्ये नावाचे गुरुजी ह्यावर् कधीतरी बोलताना दिसतात. बहुतेक् त्यांच्या पिवळ्या कव्हरच्या पुस्तकातही(नाव विसरलो) ह्याचा उल्लेख आहे.
--मनोबा
औपरोधिक
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.मन यांनी प्रियाली यांच्या प्रतिसादावर लिहिलेला प्र-प्रतिसाद वाचला.त्यांच्या औपरोधिक(सारकॅस्टिक) लेखनशैलीची कल्पना आली. आता चित्राताईंच्या लिखित उद्गाराचा अर्थ उमगला.पण फार काळ लागला.असो.कधीच न कळण्यापेक्षा विलंबाने का होईना काही कळणे हे ठीक.
जिज्ञासा ?
एकंदर असे दिसून येते, की माणसाला कुठलीही गोष्ट का घडली असावी याबद्दल जिज्ञासा किंवा कुतूहल असते, जे शमवले जाणे ही त्याची कदाचित मानसिक गरज असते. मग ते स्पष्टीकरण तर्कसुसंगत असलेच पाहिजे, याबद्दल तो आग्रही असतोच असे नाही. काही गोष्टी (खरं तर अनेक गोष्टी ) निव्वळ योगायोगाने किंवा यदृच्छेने घडतात हे माणूस मान्य करत नाही. मोठ्या अपघातात एखाद्याचा जीव जाणे आणि इतरांचा न जाणे, एकालाच लॉटरी लागणे आणि इतरांना न लागणे यात काहीतरी कार्यकारणभाव शोधण्याचा माणसाचा प्रयत्न असतो. अशा गोष्टी योगायोगावर सोडाव्यात असे त्याला वाटत नाही. मला वाटते, या ठिकाणी कर्मविपाक सिद्धांत सामान्य भाविक माणसाला फसवे का होईना, पण समाधान देण्यात यशस्वी ठरतो !
ह्या विरोधाभासाची गंमत वाटते की याठिकाणी कार्यकारणभाव शोधू पाहणारा माणूस दैववादी ठरतो, आणि योगायोगावर विश्वास असणारा माणूस बुद्धीप्रामाण्यवादी ! योगायोगांवर विश्वास असणे हीसुद्धा बुद्धीप्रामाण्यवादी असण्याची एक पायरी/गरज आहे असे दिसते.
कार्यकारणभाव
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
इथे श्री.ज्ञानेश यांनी एक महत्त्वाचा मुद्दा निदर्शनाला आणला आहे.ते म्हणतात," कुठलीही घटना का घडली याबद्दल माणसाला जिज्ञासा असते.ती शमवली जाणे ही त्याची मानसिक गरज असते.ते स्पष्टीकरण तर्कसुसंगत असलेच पाहिजे याबद्दल तो आग्रही असतोच असे नाही."
.
हे अगदी खरे आहे.अनेक अंधश्रद्धांचा उगम या जिज्ञासेत आहे.अल्पशिक्षित तसेच निरक्षर माणसांनासुद्धा हे असे का घडले? याचे कारण हवे असते. मात्र निसर्गनियम आणि कार्यकारणभाव यांविषयी अनेकांची समज क्षीण असल्याने त्यांना कोणतेही सोपे कारण खरे वाटते. उदा:
** कालपर्यंत चांगले खेळत असणारे मूल आज तापाने फणफणले. कारणः-- त्याला कुणाची तरी नजर/दृष्ट लागली.(कुठल्याही माणसाच्या डोळ्यांतून कसलेही किरण,स्पंदने ऊर्जा बाहेर पडत नाही.केवळ अश्रू आणि एक प्रकारची चिकट घाण एवढेच बाहेर पडते हे त्याला माहीत नसते.)
** तहसिल ऑफिसात सर्व तयारीनिशी गेलो पण अपेक्षित काम झाले नाही:
कारणः-- १)घराबाहेर पडताना नेमके कोणीतरी शिंकले.
किंवा २) बाहेर पडल्यावर मांजर आडवे गेले.
किंवा३) कुठे जातो आहेस असा एकाने प्रश्न विचारला.
**गेल्या उन्हाळ्यात विहिरीला भरपूर पाणी होते. या उन्हाळ्यात आटले.कारण:-- चुलत्याबरोबर जमिनीचा वाद आहे. त्याने करणी केली.
अशी कसलीही कारणे पटतात. मात्र झाल्या घटनेचे कारण हवे.किंबहुना शिकल्या सवरलेल्यांपेक्षा अडाणी माणसांनाच हे असेच का घडले हे हवे असते.
»
भाव
उणे ते माझे, अपश्रेय ते माझे, आणि उत्तम ते, श्रेय ते, इतरांचे, या भावाने श्रद्धाळू माणूस आपल्या बाबतीत घडणार्या वाईट गोष्टींची जबाबदारी स्वतःच्या कर्मांना देतो, तर चांगल्या गोष्टींचे श्रेय देवाला/ दैवाला/ गुरुला देतो. हा भाव आहे. तर्काच्या प्रांतात भावनेला जसे स्थान नसते, तसेच भावनेच्या क्षेत्रात तर्काने लुड्बुड करण्याचे कारण नाही.
बाकी, योगायोग म्हणले की "रासलीला" आणि दैव/ कर्म म्हणले की "कॅरॅक्टर ढीला है" असा न्याय दिसतो खरा.
भावना काय आहे बरे?
तर्काच्या प्रांतात भावनेला स्थान नसते हे योग्यच आहे. पण तर्काने भावनेच्या क्षेत्रांत लुडबूड करण्याचे कारण नाही असे म्हणण्यामागची भावना काय आहे बरे?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
लुडबुड किंवा ढवळाढवळ
या वाक्याच्या उत्तरार्धाशी असहमती आहे. भावनेच्या आहारी जाऊन माणूस स्वतःचे नुकसान करून घेतो असे अनेकदा दिसते. तर्क आणि विज्ञान यांनी भावनेच्या क्षेत्रात अवश्य लुडबूड करावी. अशी लुडबुड केल्यानेच अंधश्रद्धेला पायबंद होऊ शकेल. लुडबुड करणे याचा अर्थ एखाद्याला दुखावणे, त्याचा अपमान करणे असा होत नाही. वरील लेख मला यासाठीच आवडला कारण येथे प्रा. साठ्यांना अतिशय शांतपणे आणि संयत शब्दांत त्यांच्या मित्राने समजावण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती पद्धत मला पटते.
विपर्यास
बहुदा आळश्यांच्या राजाच्या आत्तापर्यंतचा प्रतिसाद इतिहास बघितल्यास त्यांच्या म्हणण्याचा विपर्यास केला जात आहे असे वाटते आहे, निरुपद्रवी भावनेच्या जगात (वरिल लेखातिल उदाहरण) तर्काने लुड्बूड करण्याचे काय प्रयोजन?
+१
+१
ऋषिकेश
------------------
'नाविन्य' हे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या आयडीने लिहुन कसे बरे तयार व्हावे?
नुसते नावात गोड पदार्थ घालुन तसे लिहिता थोडेच येते?
प्रयोजन
आळशांच्या राजाचा इतिहास बघून प्रतिसाद देण्यापेक्षा मी त्यांनी सध्या लिहिलेल्या वाक्याकडे पाहते आहे. कोणी लिहिले आहे यापेक्षा काय लिहिले आहे हे महत्त्वाचे वाटते. (अर्थात, कोणी लिहिले हे अनेकांना अनेकदा टा़ळता येत नाही हे खरेच)
बाकी, विपर्यास का दिसावा. निरुपद्रवी भावना हा शब्दप्रयोग तुमचा. तो मूळ वाक्यात नाही. मूळ लेखात प्रो. साठ्यांचा गैरसमज आहे. तेथे तो तर्काने सोडवायचा प्रयत्न त्यांच्या मित्राने केला तर काय चुकले? तेथे "लुडबूड करण्याचे कारण नाही" असा आज्ञार्थी शब्दप्रयोग का यावा?
अवांतरः आरा यांचा इतिहास आणि यना यांचाही इतिहास मला माहित आहे. यना यांच्या लेखाला मी अनेकदा असहमती दर्शवली आहे. जर यनांचा इतिहास पाहून त्यांच्या आताच्या लेखाला सहमती दर्शवणे म्हणजे विपर्यास आहे असे कोणी म्हणू नये असे वाटते.
खुलासा
आ.रा.ह्यांचा प्रतिसाद लेखाच्या संदर्भात घेतल्यास निरुपद्रवी भावना लक्षात येउ शकते, संदर्भाशिवाय त्यांचे ते वाक्य थोडेसे अवांतरच ठरले असते. बाकी आ.रा. ह्याना वेगळेच काही म्हणायचे असल्यास ते तसे सांगतिलच.
लेखातिल प्रो. साठ्यांचा गैरसमज/श्रध्दा ही लेखातिल गोष्टीत उपद्र्व माजविताना दिसत नाहिये, त्यामुळे त्यांची भावना/श्रध्दा निरुपद्रवी ठरते.
"हस्तक्षेप अस्थायी वाटू शकतो" असे लिहावे असे मी आ.रा. ह्याना सुचवितो.
प्रो. साठे ह्यांनी कारणमिमांसा न करता "अपघात यदृच्छेने घडला" असे म्हंटले असता तरी तो गैरसमज समजला गेला असता काय?
अवांतर - "कोणी लिहिले आहे, काय लिहिले आहे, का लिहिले आहे" ह्या सर्वच गोष्टीं मला महत्त्वाच्या वाटतात.
उच्चता
भावनेच्या क्षेत्रात तर्काची लुडबूड वांछित आहे.
'आम्ही' असे मानतो की भावनांनी नियंत्रित वर्तणूक हीन असते आणि भावनांवर तर्काचे वर्चस्व ठेवणे हे मानवाचे कर्तव्य आहे. ते न पाळणार्यांना/न पाळू शकणार्यांना पूर्ण समान मानणे, पूर्ण समान अधिकार देणे मला पटत नाही (टिंगलीचा/टीकेचा अधिकार मिळावा असे यनावाला, धम्मकलाडू, वैद्य यांनाही वाटते असा माझा अंदाज आहे).
रिलिजस क्वेश्चनवर इहवाद्यांनी कायतरी फायनल सोल्यूशन शोधण्याची आवश्यकता आहे.
प्रति
कधी, कधी.
हि 'तुम्हा' लोकांची भावना काय? भावनांच्या मर्यादित भावनेतर उपद्र्वासाठी ह्या वाक्याशी मी सहमत आहे.
तर्कावर भावनेचे वर्चस्व ठेवणे देखिल मानवाचे कर्तव्य आहे, तसे न झाल्यास तर्काचा अविवेक होउ शकतो. तसे न मानून भावनिक/भावनेतर उपद्र्व माजविणार्यांना पूर्ण अधिकार देणे मला गैर वाटते. (मर्यादित टिंगलेचा अधिकार सर्वाना असावा असे वाटते)
प्रति: प्रति
नाही. तर्कनिष्ठ निरीक्षण आहे.
विवेक आणि तर्कात फरक असतो?
'त्यांना' समान (किंबहुना, बहुतेकदा आमच्यापेक्षा वरचढ) वागणूक मिळालेली बघून आमच्या पोटात दुखते. 'ते' घेटोत वास्तव्य करण्यास गेले तर आम्ही टिंगल बंद करू.
प्रति:
तसे असल्यास तर्क-विदा अपुरा आहे किंवा हीनतेचे निकश अयोग्य आहेत.
तर्क कुठे लागू करावा हा निर्णय भावनेतुन घेतला गेल्यास विवेक ठरतो. भावनिक गुणांक आणि बौध्यांक मिळून विवेक ठरु शकेल.
असे झाल्यास माझ्या पोटातदेखिल दुखेल. बाकी घेटोत पाठ्विणार्यांचे हाल सर्वांनाच ठाऊक आहेत.
छ्या!
'जैवरासायनिक यंत्रमानवाचा दीर्घकालीन ऐहिक लाभ' हा तार्किक निकष आहे. ऐहिक निरीक्षणे हाच विदा शक्य आहे.
त्या अर्थाने आम्ही अविवेकीच बरे.
पाठविण्याचे निकष तार्किक नव्हते. युजेनिक्स मूलतः वाईट नाही.
अरे हो पण
सहमत, फक्त ऐहिक ते काय हे ठरविण्याचे मर्यादित वैयक्तिक स्वातंत्र्य असावे.
युजेनिक्स मुळे स्वातंत्र्य बाधित होत नाही तोपर्यंत.
अमान्य
नाही. स्वतःचे मत इतरांस पटवून देण्याचे उत्तरदायित्व असते.
डाऊन सिंड्रोमच्या मुलांचे/गर्भांचे स्वातंत्र्य बाधित होतेच. श्रद्धा बाळगणे हा रोग कदाचित मामुलीच असेल परंतु त्याच्या रुग्णांच्या स्वातंत्र्यावर जुजबी का होईना, बंधने आवश्यकच आहेत.
अन्योन्य
"आपला तो बाब्या दुसर्याचं ते कार्टं" हा नियम अन्योन्य आहे. तसेच आपलं डोकं न लावता इतरांचं ऐकतात हाही आरोप श्रध्दाळूंवर होतो नाही?
आणि लोक म्हणतात पुणेकर माजोरडे आहेत.
वैचारिक नाझीझम आवडला नाही
हे तर्कनियंत्रित भावनावाले कसे ओळखायचे - म्हणजे वैचारिक निळे डोळे, गौर वर्ण, सोनेरी केस, आणि वैचारिक सहा फूट उंची वगैरे वगैरे का?
टिंगलीचा/टीकेचा अधिकार किंवा समानतेचा अधिकार वगैरेचं वाटप नक्की कोण करणार? वैचारिक गेस्टापो का?
फायनल सोल्यूशन वगैरे शब्द अश्लाघ्य वाटतात. ते तर्काधिष्ठित आहेत की भावनिक असा प्रश्न विचारत नाही. भावनाविरहित विधान करता येतं का? हा तर फारच कठीण प्रश्न झाला त्यामुळे मी तोही विचारत नाही.
जमलं तर 'देव नाही' हे तार्किक पद्धतीने सिद्ध करून दाखवा. मग फायनल सोल्यूशन वगैरेची बात करा.
माझं मत असं आहे की अतिरेक करू नये, कुठच्याच गोष्टीचा. पी. जी. वुडहाउस म्हणाल्याप्रमाणे, कोणाचाच घाऊक द्वेष करू नये.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
क्लोजेट विज्ञानशत्रू
बाण लागला!
"हा भाव आहे. तर्काच्या प्रांतात भावनेला जसे स्थान नसते, तसेच भावनेच्या क्षेत्रात तर्काने लुड्बुड करण्याचे कारण नाही." असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येत नाही.
तार्किक चर्चेची तयारी असल्यास सहमतीनेच निर्णय होईल. अन्यथा बळी तो कान पिळी आहेच.
हुश्श्य! दखल घेतल्याबद्दल आभारी आहे.
देव म्हणजे काय? सामान्यपणे वापरल्या जाणार्या अर्थाने देव हा हा शब्द वापरला तर देव ही व्याख्येच्या पातळीवरच अवास्तव संकल्पना असल्याचे प्रतिपादन मी केले तेव्हा तुम्ही दूर राहिलात, किंबहुना 'खुर्चीची व्याख्या' ही टिंगलही केलीत.
मग फॅसिस्टांचाही घाऊक विरोध करू नका. काही परिस्थितींमध्ये (उदा., वैज्ञानिक फॅसिजम) फॅसिजम योग्य असू शकेल असे तुम्हाला वाटते काय?
अरे देवा...
वरची बरळ प्रतिसाद देण्याच्या लायकीची नाही. मी विज्ञानशत्रू नसून मूर्खशत्रू आहे एवढंच लिहितो.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
देवाचे अस्तित्व
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"जमलं तर 'देव नाही' हे तार्किक पद्धतीने सिद्ध करून दाखवा. "
....राजेश यांच्या प्रतिसादातून
.
*एखादी गोष्ट अस्तित्वात नाहीच असे सिद्ध करता येईलच असे नाही(बर्टरॅण्ड रसेल यांची किटली)
*जे कोणी देवाचे अस्तित्व सत्य मानतात त्यांच्यावर ते सिद्ध करण्याचे उत्तरदायित्व असते.ते पार पाडता आले नाही तर देवाचे अस्तित्व नाही हेच सिद्ध होते.
*असल्याचा पुरावा नसणे हा नसल्याचा पुरावा असतो. (आब्सेन्स ऑफ् इव्हिडन्स इज इव्हिडन्स ऑफ् आबसेन्स)
*वस्तुनिष्ठ पुराव्याने,सार्वत्रिक अनुभवाने,अथवा तर्कसंगत युक्तिवादाने जोवर देवाचे अस्तित्व सिद्ध होत नाही,तोवर देव अस्तित्वात नाही हे सिद्ध झाले आहे असे मानणे योग्य ठरते.सध्या अशी स्थिती आहे.(म्हणजे देव नाही हे सिद्ध झाले आहे.)
*"देव अस्तित्त्वात नाही" हे तत्त्व आता डार्विनच्या उत्क्रांतिवादामुळे अधोरेखित झाले आहे अशी नास्तिकांची धारणा आहे.
योग्य मुद्दे
या मुद्द्यांवर चर्चा निश्चित होऊ शकते. युजेनिक्स, फायनल सोल्युशन, घेटो वगैरे शब्द वापरून समान अधिकार नाकारावेत या विचाराला ते आव्हान होतं. सविस्तर प्रतिसाद नंतर.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
प्र-प्रतिसादाची मर्यादा
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.राजेश यांच्या प्रतिसादातील जे वाक्य प्र-प्रतिसादात उद्धृत केले आहे त्यापुरताच तो प्रप्रतिसाद मर्यादित आहे.
...राजेश यांच्या सविस्तर प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
यनावाला
गॉड्स ऍडव्होकेट
This comment has been moved here.
यदृच्छा
एखादी निरुपद्रवी वाटणारी जखम आणि भावना कधी उपद्रवी ठरेल याचा भरवसा देता येत नाही. (हे जसे जखमेबाबत खरे आहे तसेच भावनेबाबतही) तेव्हा प्रयत्न करण्यासाठी (किंवा प्रीकॉशन घेण्यासाठी) एखाद्याला ना करू नये. खाली अशोक पाटील यांनी दिलेले एक उदाहरण असेच आहे. एखाद्या आस्तिकाने "देवाची कृपा" असे सतत निरुपद्रवी वाक्य म्हणणे हे एखाद्या नास्तिकाला उपद्रवी वाटू शकते. (जसे, हा कसला देव, हा तर दगड असे नास्तिकाने म्हटले की आस्तिकांच्या भावना दुखावतात तसेच.) निरुपद्रवी आणि उपद्रवी वाटणे हे या उदाहरणात वैयक्तिक ठरावे. अर्थातच, भावना दुखावल्याने माणूस डोके बंद करून घेतो आणि आडमुठा बनतो असा अनुभव असल्याने लेखातील समजावण्याची पद्धत मला आवडली हे मी आधीच नमूद केले आहे.
ओह! जर तुम्ही सुचवणी करू इच्छिता तर मग मी त्या वाक्याशी असहमती दाखवली हा आपल्याला विपर्यास कसा वाटला. ते वाक्य ठीक वाटले नाही म्हणूनच असहमती आली ना! जर वाक्य योग्य असते तर आपण सुचवणी केली नसती.
हो शक्य आहे. एखाद्याला चष्म्याशिवाय अंधारात दिसत नसतानाही जर तो चष्म्याशिवाय ड्रायविंग करून अपघातात फसला तर "गाढवा! ही यदृच्छा नाही. तुझा निष्काळजीपणा आहे." असा तर्क पुढे करण्यास कोणी मला थांबवू नये.
अवांतर - "कोणी लिहिले आहे, काय लिहिले आहे, का लिहिले आहे" ह्या सर्वच गोष्टीं मला महत्त्वाच्या वाटतात. ठीक! त्या मलाही महत्त्वाच्या वाटतात. म्हणून कोणी लिहिले याला काय लिहिलेपेक्षा अधिक गुण देणे मला पटत नाही. कृपया, तशी अपेक्षा ठेवू नये. अन्यथा आंधळेपणाने मी यनांच्या या लेखालाही असहमती दर्शवावी अशी एखाद्याची भावना होऊ शकेल.
प्रति
एकंदरित मताशी मी सहमत आहे (हे माझ्या खालिल प्रतिसादात देखिल मी सांगितले आहेच)..तरी.
हे पटले, फक्त नास्तिकांच्या भावना दुखावतात (खरेच) हे देखिल तुम्ही केवळ दाखल्याखातिर म्हंटले नसेल अशी अपेक्षा करतो.
ओह! :) तुमच्या मुळ प्रतिसादावरुन तुम्हाला शब्दप्रयोगाबद्दल नव्हे तर मताबद्दल आक्षेप होता असे जाणवले, अन्यथा तो शब्दप्रयोग तुम्ही देखिल वापरला आहेच, किंवा तुम्ही तो मुद्दाम वापरला असावा. मला आ.रा. ह्यांच्या मताबद्दल तुमचा आक्षेप विपर्यास वाटला होता.
ठीक. वरिल लेखातिल वाक्य - ""हो.एकच स्पष्टीकरण.योगायोग,यदृच्छा."
अवांतर-ठीक.
मला नव्हे :-)
नाही. मी हे अनुभवलेले आहे. घरातील आस्तिक व्यक्तिचा, नास्तिक व्यक्तिला मानसिक त्रास होऊ शकतो. अगदी, यासाठी आस्तिक नास्तिक असायला हवे असे नाही. कर्मठ, कर्मकांडावर विश्वास ठेवणार्या आणि सुधारक असा फरकही चालेल. तेव्हा भावना दुखावणे ही विशिष्ट गटाची मक्तेदारी नाही एवढेच.
मला मताबद्दलच आणि आज्ञार्थी शब्दप्रयोगाबद्दलच आक्षेप होता. (लुडबुड या शब्दाबद्दल नाही, त्याऐवजी वेगळा शब्द असता तरी आज्ञार्थी प्रयोगामुळे आक्षेप राहिला असताच.) तरीही खुलासा म्हणून सांगते की माझे वाक्य रिस्पॉन्स म्हणून आले. मी ते वाक्य स्वतंत्र लिहिलेले नाही. तसेही लुडबुड काय, ढवळाढवळ काय किंवा हस्तक्षेप काय, तो करू नये असे निगेटिव्ह विधान करण्यापेक्षा करावा* असे पॉजिटिव्ह विधान करणे कधीही उत्तम. कसें? ;-)
अन्यथा, जसे विज्ञान ज्योतिषात लुडबुडीला परवानगी मागते पण ज्योतिषी लुडबुडीला परवानगी नाकारतात तसे व्हायचे. :-)
* योग्य आणि तार्किक गोष्टींची लुडबुड ही समाजाला नेहमीच उपयुक्त ठरली आहे. सती प्रतिबंधक कायदा जोरजबरदस्तीने राबवला नसता तर.... :-)
अवांतरः आज टैम है आणि यनांची चर्चा शतकी व्हावी अशी सदिच्छा आहे. ;-)
प्रति
ठीक.
म्हणुनच माझी सुचवणी.
*मुळे दुर्लक्ष करतो, अन्यथा नक्कीच ढवळाढवळ केली असती. असें! :)
निरुपद्रवी भावनांना तर्क लावल्यास भावनास्वातंत्र्य बाधित होइल असे वाटते. ;)
अंहं!
अंहं! ही केवळ भीती झाली. भावना स्वातंत्र्य बाधित न करताही तर्काच्या सहाय्याने समजावण्याचा प्रयत्न करता येतो इतकेच मला म्हणायचे आहे. :-) जेव्हा मनुष्य एखाद्याने योग्य रितीने समजावल्यावर स्वबुद्धीने, स्वानुभावाने आणि स्वविचाराने निर्णय बदलतो (किंवा शहाणा होतो म्हणा) तेव्हा त्याचे स्वातंत्र्य किंवा आयुष्य बाधित होण्याचा प्रश्न उरत नाही.
बापरे
भयानक लोडेड वाक्य!! :)
हा नियम सर्व संत, बापू, जी, जोतिषी, वैद्य् (होमिओपाथ, आयुर्वेद) ह्यांनादेखिल लागू पडेल. :)