पर्याय? (एक निव्वळ अनाकर्षक शीर्षक)

भारतामध्ये पोर्नोग्राफीला बंदी आहे पण पॉर्नस्टारच्या वावरावर बंदी नाही. याचाच फायदा घेऊन सोनी टिव्ही वाल्यांनी बिगबॉस मध्ये सनी लिओनला निमंत्रित केले. वृत्तवाहिन्यांनी (नेहमीप्रमाणे) याचा सवंग प्रचार केला. वृत्तपत्रातूनही बातम्या आल्या. आज भारताचा जो संगणकसाक्षर आणि त्यातल्या त्यात नेटसाक्षऱ आणि वापरकर्ता जो वयोगट आहे त्यांपैकी ब-याच जीवांनी लाखो सर्च देऊन या बाबतीतल्या आपल्या ज्ञानात अमुल्य भर घालून घेतली. आज भारतात योग्य वयात (?) लैंगिक शिक्षणाची कुठलीही तरतूद नाही. या विषयावर ‘आमच्या आईवडीलांनी किंवा कुटूंबिय, शिक्षक यापैकी आम्हाला कोणी असे शिक्षण दिले नव्हते, पण मग तरीसुद्धा आम्ही सर्वसाधारण आयुष्य जगलोच ना!’ अशा आशयाचे मत मांडले जाणेही आता काळानुसार विपर्यस्तच ठरेल. निदान निकोप लैंगिक आयुष्यासाठी नाही तर किमान अनैसर्गिक व अवैज्ञानिक मनोधारणांपासून या पिढीस परावृत्त करण्यासाठीतरी योग्य, संयत लैंगिक शिक्षणाची आवश्यकता आहे काय? ( असल्या शिक्षणाचा नेमका फार्म्युला कोणता हा ही मोठा प्रश्न आहेच.) मुळातच हा विषय आपल्याकडे चर्चा न करण्यासारखा मानला गेल्यामूळे त्याचे आकर्षण जास्त प्रमाणात आहे. पाचदहा वर्षापूर्वी इंटरनेटवर जायचे म्हणजे ते या साठीच हा समज रुढ होता. (छोट्या शहरांमधून आजही हिच स्थिती आहे.) आता सोनी टिव्हीने अभिव्यक्ती (?) स्वातंत्र्याच्या नावाखाली पोर्नस्टार या शब्दाची शालेय वयापासूनच मुलांना ओळख करून दिली आहे. असो. जाऊ द्या... आपण कशाला विनाकारण चिंतातूर जंतूंमध्ये आपला समावेश करून घ्या... पण आता बडवलेच आहे तर..( पूर्वीचा खरडले हा शब्द..) यावरून आठवले ! भाषाशुध्दीवाल्यांनी पॉर्नस्टार ला पर्यायी मराठी शब्द शोधायला हवा.

Comments

पर्यायी शब्द्

नीलतारका?
किंवा शुक्राची चांदणी.

!!!!!!!!

>>>"शुक्राची" चांदणी.

जबरी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! साष्टांग नमस्कार _/\_

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

'नीलतारका' आवडले बुवा.

बाबासाहेबांच्या लेखनात एकच दुरुस्ती सुचवतो ती म्हणजे सदरील कार्यक्रम हा 'सोनी' टीवी वर नसून 'कलर्स' वाहिनीवर आहे.

बाकी 'पोर्नोग्राफी' हा व्यवसाय भारतात अधिकृत नसला तरी तो चालू आहेच व त्यात फसवणूक करून आणलेल्या मुलींची संख्या जास्त आहे.
याउलट ज्या 'पॉर्नस्टार' बद्दल आपण बोलत आहोत तिचा तो स्वखुशीने स्वीकारलेला व्यवसाय असून तिच्या कुटुंबियांना देखील त्याबद्दल पूर्णपणे माहिती आहे.

अनैसर्गिक व अवैज्ञानिक मनोधारणांपासून या पिढीस परावृत्त करण्यासाठीतरी योग्य, संयत लैंगिक शिक्षणाची आवश्यकता आहे काय?
होय नितांत गरज आहे, परंतु पुढची किमान ५० वर्षे तरी हे सार्वजनिक स्तरावर शक्य नाही तेव्हा हे शिक्षण घरातूनच द्यावे लागेल असे दिसतेय.


आता सोनी टिव्हीने अभिव्यक्ती (?) स्वातंत्र्याच्या नावाखाली पोर्नस्टार या शब्दाची शालेय वयापासूनच मुलांना ओळख करून दिली आहे.

असे वाटत नाही, कारण १०-१२ वयोगटातील मुलानासुधा हा शब्द आधीपासून माहित असल्याचे उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यांचे माहितीचे स्त्रोत अर्थातच अनधिकृत पोर्नोग्राफी मार्फत आलेले असतात.

पोर्नोग्राफिला अधिकृत मान्यता देणे व त्यात व्यावसायिकता आणणे हाच एक पर्याय उत्तम वाटतो कारण त्यायोगे त्याचा टार्गेट प्रेक्षक निश्चित करता येवू शकतो तसेच व्यवसायात येण्यासाठी मुलींची पिळवणूक थांबवता येवू शकते.
अर्थात आपल्या 'महान' संस्कृती असलेल्या देशात हे थोडे अवघडच वाटते.

यानिमित्ताने एक चित्रपट संवाद आठवला:

" अजीब देश हे भारत !!!
मर्दोकी सोसायटी अलग, औरतोकी सोसायटी अलग
दोनोका उठना बैठना हलाकी खाना खाना भी अलग अलग
.
.
फिर भी बच्चे पैदा करनेमे दुनिया मी नंबर वन !!!!!!!!!!!!!"

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रबोधनकार हे केवळ उपनाम असून थोर विचारवंत प्रबोधनकार ठाकरेंशी सार्धम्य दाखवण्याचा कोणताही हेतू नाही.

लहानग्यांसमोर बसुन बघणे गैरसोयीचे

लहान मुलं काही बावळट नसतात! त्यांना शाळेत योग्य त्या गोष्टींचे योग्य ते ज्ञान यथायोग्य वयात होते.. तेव्हा त्यांच्यासाठी हे धोकादायक नसावे - नाही.
हा आता हा कार्यक्रम ज्या मोठ्यांना बघायचा आहे त्यांना मात्र तो लहानग्यांसमोर बसुन बघणे गैरसोयीचे होत असल्याने ही ओरड होत असावी ;)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

टेन्शन कायकू लेने कां?

ह्या जगात अजून बर्‍याच विचित्र गोश्टी चालतात. प्रत्येक गोश्टीवर पर्यायी शब्द हवाच असे मानणे चूकीचे वाटते. ज्यांचा ज्या गोश्टींशी जास्तीत जास्त संबंध येतो तेंव्हा त्या विशयाचे पर्यायी शब्द त्या-त्या भाशेत आपोआप पुढे येतात. त्यामुळे त्याबातची चिंता नसावी. अमुक एका कारणांमुळे संस्कृती बिघडते-बुडते असे वाटत नाही. तो एक काळ असतो, तो सरला कि मग पुन्हा होते तसेच चालू रहाते. मोगलांच्या काळात कित्येक मंदिरे फोडली गेली, अनेक स्त्रीयांवर बलात्कार झाले, अनेकांचे धर्म बळजबरीने बदलले गेले. आत्ता तसे आहे कां?

संस्कृतीरक्षक

"अमुक एका कारणांमुळे संस्कृती बिघडते-बुडते असे वाटत नाही."

~ १००% सहमत.
...आणि समजा असली सो-कॉल्ड संस्कृती अशा फालतू कार्यक्रमामुळे बुडण्याइतकी कमजोर असेल तर जाऊ दे ना खड्ड्यात् तसल्या बिनकण्याच्या संस्कृतीला.

जरा कुठेतरी खुट्टदिशी वाजले की "संस्कृती रसातळाला चालली" असा हाकाटा चोहोबाजूनी घुमतो आणि मग योग्य तितक्या प्रमाणात त्या चर्चेचा चोथा झाली की मग हेच संस्कृतीरक्षक आणि धर्ममार्तंड कलर्स आणि सोनीवर आता पुढच्या एपिसोडमध्ये काय होणार या विचाराने रीमोट हाती घेतात.

महान संस्कृतीपूजक पूज्य आचार्य अत्रे यानी साहित्यक्षेत्रातील मतभेदाचे उट्टे काढायचे म्हणून ना.सी.फडके-कमल राजाध्यक्ष आणि माधव जूलियन-वरदा अय्यंगार यांच्या प्रेमप्रकरणाला [जी बाब अत्यंत खाजगी मानली गेली पाहिजे होती] जाहीर चव्हाट्याचे रूप देऊन 'संस्कृतीची हानी' झाली असा टाहो फोडला होता आणि फडके त्यातून तरले पण माधवरावाना पुण्यातून वनवास पत्करावा लागला. मात्र पुढे "वनमाला" स्वत:च्या जीवनात आल्यावर मात्र बाबुरावांना छानपैकी संस्कृतीचा विसर पडला.

असले हे आमचे संस्कृतीरक्षक आणि त्यांचा आप्पलपोटी बनेलपणा. आजच्या कुणा बाबुरावाच्या चिरंजीवाला त्याच 'बिग बॉस' मध्ये लिओनसोबत काम करण्याची संधी मिळाली तर मग हे डॉ.संस्कृतराव आख्ख्या अपार्टमेन्टला पार्टी देतील.

अशोक पाटील

असो

लहान मुलं काही बावळट नसतात! त्यांना शाळेत योग्य त्या गोष्टींचे योग्य ते ज्ञान यथायोग्य वयात होते..

असे असेलही. पण हे ज्ञान त्यांना कुठल्याही अधिकृत स्रोतातून मिळत नाही. त्यामुळे ते सुरक्षित असेलच याची खात्री देता येत नाही.

हे शिक्षण घरातूनच द्यावे लागेल असे दिसतेय.

अशी खुप कमी घरे त्यासाठी तयार आहेत आणि सक्षम तर त्याहूनही कमी..

पोर्नोग्राफिला अधिकृत मान्यता देणे व त्यात व्यावसायिकता आणणे हाच एक पर्याय उत्तम वाटतो कारण त्यायोगे त्याचा टार्गेट प्रेक्षक निश्चित करता येवू शकतो तसेच व्यवसायात येण्यासाठी मुलींची पिळवणूक थांबवता येवू शकते.

हे शक्य वाटते. (म्हणेज प्रेक्षक निश्चिती आणि पिळवणूकीला थोपवणे)

बाकी संस्कृतीबद्दल म्हणयाचे तर समर्थ संस्कृती तिचे रक्षण करायला स्वत;च समर्थ असते. संस्कृतीरक्षक अशा कुणाची गरज नसते.

उ ला ला

जिथे सिल्क स्मितावरील चित्रपटाला प्रसिद्धी मिळू शकते तेथे बापड्या सनी लेओनला का नाव ठेवावं? :-) बाकी, अशा प्रकारांनी संस्कृती बुडते याच्याशी असहमत, वर म्हटलेलेच वगैरे.

परंतु

लहान मुलं काही बावळट नसतात! त्यांना शाळेत योग्य त्या गोष्टींचे योग्य ते ज्ञान यथायोग्य वयात होते.. तेव्हा त्यांच्यासाठी हे धोकादायक नसावे - नाही.

या वाक्याशी असहमत. मुलांना ज्या गोष्टीचे ज्ञान शाळासोबतींकडून होते ते बरेचसे अर्धवट असते.

असो.

हा कार्यक्रम किती वाजता टिव्हीवर लागतो? जर तो रात्री ९ नंतर लागत असेल तर ती मुलांनी टिव्ही पाहण्याची वेळ नक्कीच नाही.

तयारीनिशी बसलेली मुले

"जर तो रात्री ९ नंतर लागत असेल तर ती मुलांनी टिव्ही पाहण्याची वेळ नक्कीच नाही."

~ प्रियाली, बीलिव्ह मी. हा कार्यक्रम [पक्षी : 'बिग बॉस'] या देशात मुलांनीच लोकप्रिय केला आहे. (मी ज्यावेळा 'हा' म्हणतो त्यावेळी केवळ चालू पोर्नस्टारसंदर्भातील नसून बिग बॉस सीझन संकल्पना इथे आली त्या वर्षापासून). तुम्ही या क्षणी कुठे आहात हे माहीत नाही (आय मीन, व्हेदर इन इंडिया ऑर् अब्रोड्) त्यामुळे डायरेक्ट सर्व्हे कराल की नाही ते समजून येत नाही. पण मुंबई-पुणे तर सोडाच आमच्या कोल्हापूर, सांगलीत "बिग बॉस" च्या प्रक्षेपण वेळेनुसार आपली सो-कॉल्ड कामे पूर्ण करून 'तयारीनिशी' टीव्हीसमोर बसणारी मुले मी पाहिली आहेत - आणि त्यांच्या हातातील रीमोट काढून घेण्याची हिम्मत एकही बाप दाखवत नाही.

अर्थात हेही मुद्दाम इथे नमूद करतो की हा जो मुलांचा वयोगट आहे तो म्हणून 'वाहवत गेला आहे' असे मी म्हणणार नाही. कारण एरव्ही त्यांच्याकडून शाळा/कॉलेजच्या ज्या अपेक्षा बाळगल्या जातात, त्या यथास्थित चालू आहेत.

अशोक पाटील

बिग बॉस

मी किंवा घरातील कोणीही बिग बॉस* किंवा इतर कोणतेही रिऍलिटी शो बघत नाही. किंबहुना रात्री आठ साडे आठ नंतर घरातील मुख्य टिव्ही बंद असतो. सिरिअल्स आणि रिऍलिटी शो वगैरेंशी माझी ओळख केवळ चॅनेल बदलताना थबकणे किंवा जाहीराती यांतून होते.

पण मुंबई-पुणे तर सोडाच आमच्या कोल्हापूर, सांगलीत "बिग बॉस" च्या प्रक्षेपण वेळेनुसार आपली सो-कॉल्ड कामे पूर्ण करून 'तयारीनिशी' टीव्हीसमोर बसणारी मुले मी पाहिली आहेत - आणि त्यांच्या हातातील रीमोट काढून घेण्याची हिम्मत एकही बाप दाखवत नाही.

पाटील, मला तुमचे म्हणणे पटते; म्हणजे तुमच्या सांगण्यावर अविश्वास नाही. तरीही खरेतर, शालेय दिवसांत रात्री ९ नंतर मुलांनी टिव्ही बघणे गरजेचे नाही. त्या ऐवजी पुस्तक वाचणे किंवा वेळेवर झोपणे हे योग्य ठरते.

बाकी, घरातील रिमोट हा नेहमी घरमालकांच्या** हाती हवा. :-)

* बिग बॉस हा कार्यक्रम मी कधीही पाहिलेला नाही परंतु मध्यंतरी राहुल महाजन प्रकरण गाजत असता काही विडिओ बातम्यांतून येत ते पाहणे झाले होते. एकंदरीत हा कार्यक्रम सुमार दर्जाचा आणि असभ्य वाटला.

** नवरा आणि बायको हे दोघे घरमालक असू शकतात ही कल्पना गृहित धरून.

इस्कटून

या वाक्याशी असहमत. मुलांना ज्या गोष्टीचे ज्ञान शाळासोबतींकडून होते ते बरेचसे अर्धवट असते.

अश्याच प्रकारचे मत वर बाबासाहेब जगताप यांनीही दिले आहे.अश्या रोखाचे दोन प्रतिसाद आल्याने जरा इस्कटून सांगतो :)

मी हे ज्ञान शाळासोबत्यांकडून नव्हे तर लैंगिक आरोग्याशी संबंधित अधिकार्‍यांकडून दिले जाते. हल्ली इयत्त ८वी का ९वी ला असे 'एक पाहुणे' येतात. सारे सर, बाई भांबावलेल्या, ओशाळलेल्या चेहर्‍याने त्यांची वर्गाला ओळख करून गेतात. (मग मागच्या बाकावर जाऊन बसतात किंवा बाहेर सटकतात) मग मुलग्यांना खेळायला सोडले जाते. मुलींना त्यांची मासिक पाळी, गर्भ धारणा, स्वतःच्या व मुलांच्या लैंगिक व्यवस्थे विषयी नीट शास्त्रीय माहिती दिली जाते. मग मुलींना खेळायला सोडले जाते .. आणि मुलग्यांची तत्सम शिकवणी होते.. हे ज्ञान अतिशय शास्त्रोक्त (चित्रे- विडियोसकट) असते. आमच्या शाळेत मुलग्यांनाही हे शिक्षण दिले गेलेली बहुदा आमची पहिलीच ब्याच् आसावी.. आधी फक्त मुलींसाठी हा वर्ग असे. (अर्थात त्या वयात ही घटना पुढे महिनाभर चघळली जाते व गैरसमज पसरु शकतात हे मान्य)

तरीही, आईवडिलांना ओशाळवाणे करण्यापेक्षा ही पद्धत मला आवडली..

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

बारावी

बारावीच्या विज्ञानाच्या पुस्तकात याची साद्यंत माहिती आहे*.
बारावी हा फारच उशीर आहे आणि फक्त विज्ञान शाखेच्या, जीवशास्त्र शिकणार्‍या विद्यार्थ्यांनाच हे शिक्षण अभ्यासक्रमातून मिळतं हे तोटे आहेच.

*निदान मी बारावी झाले तेव्हा हा भाग अभ्यासक्रमात होता.

हतबलता

"एकंदरीत हा कार्यक्रम सुमार दर्जाचा आणि असभ्य वाटला."

~ नक्कीच सहमत आहे मी या मताशी. पण एखाद्या कार्यक्रमाला शिव्याच द्यायच्या असतील तर त्यासंदर्भातील किमान एकदोन एपिसोड पाहूनच दिलेल्या बर्‍या या नात्याने मीदेखील 'राहुल बाळा'चे काही एपिसोड पाहिले होते आणि मग त्यावेळी त्याविषयी जे अप्रिय मत झाले ते आजही कायमच आहे, राहीलही.

पण टक्केवारीच्या हिशोबात बोलायचे झाल्यास रीमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवून मुलांना तसल्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न विफल होत असल्याचे त्या कार्यक्रमाचा वाढलेला टीआरपी सांगतोच. त्यातही 'केबीसी' बंद झाल्यावर आपल्या वाहिनीकडे दर्शकाला खेचून घेणारा, भारतीय प्रेक्षकांच्या दृष्टीने 'बिग बॉस' हा एकमेव कार्यक्रम सध्या चलतीत आहे असेच चित्र दिसते (काही प्रमाणात बिन्धासवरीलही एकदोन). हे चित्र चिंतनीय आहे हे जितके खरे, तितकेच तुम्ही आम्ही त्याबाबतीत हतबल आहोत हेही तितकेच खरे.

अशोक पाटील

केवढी ही अधोगती!

भारतीय पंरपरेत आणि संस्कृतीत गणिकांना अतिशय मानाचे स्थान होते. वैशालीची नगरवधू आम्रपाली आणि शूद्रकाची वसंतसेना ही दोन उदाहरणे माहीत असतीलच. त्याच परंपरेतल्या सनी लिओनचे एका रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणे आणि त्याची जाहिरात होणे हे आता आपल्याला खटकू लागले आहे. केवढी ही सांस्कृतिक अधोगती!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अधोगती नाही, अज्ञान!

वैशालीची नगरवधू आम्रपाली आणि शूद्रकाची वसंतसेना या आठवतच नसतील तर काय बोलावे! अनेकांच्या त्या विस्मृतीत गेल्या आहेत. तसेही मृच्छकटिक वगैरे नाटकांची शालेय जीवनात वगैरे तोंडओळखही करून दिली जात नाही. संस्कृती भाषेप्रमाणेच प्रवाही असते. कालानुसार ती बदलत राहते. देवदासी वगैरे प्रथांमध्ये पुढे स्त्रियांचे शोषण होत गेल्याने आपण मागे टाकल्या आहेत. तेव्हा सनी लेओनच्या व्यवसायाकडे उपेक्षित नजरेने पाहणे साहजिक वाटते.

गणिकांचे प्राचीनकालीन भारतातील स्थान

धम्मकलाडू आणि प्रियाली ह्यांच्या प्रतिसादावरून असे वाटते की गणिकाव्यवसायाचे प्राचीनकालीन भारतातील स्थान उच्च होते आणि नंतरच्या काळात त्या व्यवसायाची अधोगति होत गेली.

आपल्या प्राचीन काळाकडे अशा गुलाबी चष्म्यातून पाहण्याचे काहीच कारण नाही. हजार-दोनहजार वर्षात मनुष्यस्वभावाचे गुणावगुण बदलेले नाहीत आणि गणिकांना समाजात जे स्थान आज आहे - ते उच्च असो वा नीच -तेच २००० वर्षांपूर्वी असणार. फारफारतर असे म्हणता येईल की गायन-नृत्यासारख्या कलांमध्ये नैपुण्य असणार्‍या गणिकांना सर्वसामान्य देहविक्रय करणार्‍या गणिकांपेक्षा थोडे सामाजिक दृष्टया वरच्या थरातील चाहते असणार - उदा. आजची उमराव जान - पण त्या चाहत्यांची अशा गणिकांकडे पाहण्याची दृष्टि भोग्य वस्तु अशीच असणार असे वाटते.

ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे वसन्तसेना हेच होय. शूद्रकाने आपल्या नाटकाची तिला नायिका बनविल्यामुळे आणि चारुदत्तासारख्या धीरोदात्त नायकाचे तिच्यावर प्रेम होते असे दर्शविल्यामुळे आपल्या नजरेत तिचे सामाजिक स्थान थोडे वर चढल्यासारखे वाटते खरे पण वस्तुस्थिति नाटकातच स्पष्ट पुढे येते. मृच्छकटिकाच्या पहिल्या अंकामध्ये विट वसन्तसेनेला तिचे स्थान स्पष्ट शब्दात दाखवून देतो. तो म्हणतो: वहसि हि धनहार्यं पण्यभूतं शरीरम्|समुपचर भद्रे सुप्रियं वाऽप्रियं वा|| 'हे स्त्रिये (My good woman अशा अर्थी), पैशाने विकत घेता येईल असे दुकानातील विकाऊ गोष्टीसारखे तुझे शरीर आहे. आवडत्या वा न आवडत्या अशा सर्वांकडे तुला जायला पाहिजे.' पुढच्याच श्लोकात विट तिची तुलना विहीर/वेलीची फांदी/नदीवरील तरीशी करतो कारण विहिरीवर विद्वान् ब्राह्मण आणि अविद्वान खालच्या जातीचा असे दोघेहि स्नान करतात, कावळा आणि मोर दोघेहि फुलांनी भरलेल्या फांदीवर बसून तिला वाकवतात आणि ब्राह्मण-क्षत्रिय- वैश्य तसेच अन्य जातीचे लोक एकाच तरीने नदी पार करतात.

चाणक्याच्या अर्थशास्त्रात 'गणिकाध्यक्ष' प्रकरणामध्ये गणिकांवर जे अनेक नियम घालून देण्यात आलेले आहेत त्यावरूनहि त्यांचे समाजातील स्थान फारसे उच्च होते असे वाटत नाही

खुलासा

धम्मकलाडू आणि प्रियाली ह्यांच्या प्रतिसादावरून असे वाटते की गणिकाव्यवसायाचे प्राचीनकालीन भारतातील स्थान उच्च होते आणि नंतरच्या काळात त्या व्यवसायाची अधोगति होत गेली.

मी मानाचे स्थान होते की नव्हते याविषयी टिप्पणी केलेली नाही. या नायिका आपल्या संस्कृतीत प्रसिद्ध आहेत आणि देवदासींपासून, वाघ्या-मुरळीपर्यंत सर्व प्रथा आपल्या समाजात रुजलेल्या आहेत किंबहुना त्या गावकुसा बाहेरील व्यक्ती नव्हेत एवढेच म्हणायचा हेतू होता.

तरीही मानाच्या स्थानाबद्दल आता टिप्पणी करते. मृच्छकटिकमध्ये चारुदत्ताचे शेवटी वसंतसेनेशी लग्न होते असे वाटते. (चू.भू.दे.घे) आम्रपालीच्या प्रेमातही बिंबिसार राजा पडलेला दिसतो. नगरवधू हे राजकीय पद दिसते, यावरून काही गणिकांना महत्त्व देण्याची / समाजात सामावून घेण्याची प्रथा असावी. तसेही नगरवधू किंवा प्रमुख गणिका ही राज्याची संपत्ती मानली गेल्याने तिला मान नसेल हे पटत नाही.

आपल्या प्राचीन काळाकडे अशा गुलाबी चष्म्यातून पाहण्याचे काहीच कारण नाही.

नाही, असे कोणतेही चष्मे घातलेले नाहीत. असा गैरसमज आपण न करून घ्याल तर बरे वाटेल. तरीही ज्या काळात देवदासी किंवा नगरवधू वगैरे प्रथांची सुरुवात झाली, ती संकल्पना कालांतराने स्त्रियांच्या शोषणात बदलली असे वाटण्यात मला चूक दिसत नाही.

तेव्हाही आणि आताही

वेश्याबाजारात उच्च आणि नीच दर्जा तेव्हा होता आणि आतासुद्धा आहे.

वेश्याव्यवसायाच्या अर्थशास्त्राबाबत "सुपरफ्रीकोनॉमिक्स" पुस्तकातील निबंध वाचनीय आहे. शहराच्या दरिद्री भागात कधी रस्त्यावर चालून, तर कधी भडव्याकडून गिर्‍हाइके मिळवणारी वेश्या, आणि $५००/तास मागणारी वेश्या, या दोन्ही प्रकारांचे विश्लेषण केलेले आहे. महागडी वेश्या म्हणाली, की तिचा भाव जसा वाढत गेला, तसा विक्रय "वाइनिंग-डाइनिंग-समटाइम्स-नो-सेक्स" अशा डेट्स् सारखा व्हायला लागला. वगैरे.

उच्च दर्जाच्या वेश्याबाजारातून निवृत्त होताना वेश्या "श्रीमंताशी लग्न" वगैरे सोय करू शकतात.

बाजार मूलभूतरीत्या बदलला नाही, असे वाटते. नगरवधू>>गणिका>>दासी आणि सुपरस्टार>>एस्कॉर्ट>>होर हे प्रकार तेव्हाही आणि आताही समांतर असावे.

(असे वाटते : नगरवधूसमोर पैसे टाकून बहुधा वाटेल त्याला संभोग मागता येत नसे. त्या नगरातील उच्च स्थानावरचे लोकच मागू शकत. अशा नगरवधूला दर-संभोगामागे पैसे मिळत नसत. नगरवधूला महाल-प्रतिष्ठा-वेतन वगैरे "रिटेनर"पद्धतीवर मोबदला मिळत असावा. त्याचप्रमाणे खासदार-डॉन अशा लोकांशीच संबंध ठेवणार्‍या तारका दर-संभोगाचे पैसे वसूल करत नसाव्यात...)

मिस इंडिया

वेश्याबाजारात उच्च आणि नीच दर्जा तेव्हा होता आणि आतासुद्धा आहे.

याच्याशी असहमती नाहीच.

नगरवधू म्हणजे वेश्याच होती असा जो समज दिसतो त्याच्याशी मात्र आहे. मला वाटतं नगरवधू या पदाची सुरुवात तिने वेश्या व्यवसाय करावा या हेतूने झाली नसावी परंतु मदांध आणि कामांध समाजाने तिला तेथे आणून ठेवले असावे. (हे तर आजही होत असावे.)

नगरवधू>>गणिका>>दासी आणि सुपरस्टार>>एस्कॉर्ट>>होर हे प्रकार तेव्हाही आणि आताही समांतर असावे.

हो असावे ना! सुपरस्टारला जो मान मिळतो तो वेश्येला मिळत नाही हेच सांगण्याचा प्रयत्न होता. किंबहुना, नगरवधू हे काही काळापुरते मिळणारे पद असून त्या करता सुंदर दिसणार्‍या आणि कलागुणांत निपुण मुलीची निवड केली जात असे. जशी, आजची मिस इंडिया स्पर्धा. नगरवधू ही राष्ट्राची संपत्ती होत्या आणि स्टेप-डाऊन झाल्यावर बहुधा स्वखुशीने जोडीदार निवडत असाव्या (निदान सुरुवातीला) किंवा लग्न करत असाव्या.

गणिकांमध्येही उच्च दर्जाच्या गणिका आपला जोडीदार खुशीने निवडत असाव्या. तसे करताना जोडीदाराच्या ऐपतीचा फायदा त्यांनाही होत असावा.

आता प्रश्न उभा राहतो सरसकट सर्वांना वेश्या मानावे का? तर माझी त्याच्याशी असहमती आहे. ग्रीक हेतैरा आणि जपानी गेश्या यांनाही गणिका म्हणता येईल परंतु वेश्या म्हणता येणार नाही असे वाटते. (तरीही या दोन्हीप्रकारच्या व्यक्ती हातोहात वेश्या व्यवसायात ओढल्या गेल्याची उदाहरणे कमी नसावी.)

सनी लिओनलानेमकं वेश्या म्हणता येईल का या विषयी मी साशंक आहे.

गणिका आणि वेश्या

मुख्य विषयाशी संबंधित हा प्रतिसाद नसून प्रियालीताईंनी उल्लेख केलेल्या "गणिकांमध्येही उच्च दर्जाच्या गणिका आपला जोडीदार खुशीने निवडत असाव्या" या संदर्भातील हे दोन शब्द :

नाट्यशास्त्रासंबंधी ज्याना आद्य मानले जाते त्या भरतमुनीने म्हणून ठेवले आहे की नाटकात केवळ राजाचे पराक्रम, त्याचे विजय तसेच समकालीन ज्ञानी आणि विचारवंत यांचेच सादरीकरण तसेच विशिष्ट वर्गासाठीच ते नाटक असू नये. त्यालाच अनुसरून शूद्रकाच्या "मृच्छकटिक" मध्ये रूढार्थाने जरी चारुदत्त नायक असला तरी नाटकाचा डोलारा फिरतो तो 'वसंतसेना' नामक गणिकेच्या आयुष्यातील घडामोडीभोवतीच. नाटकात, ज्या अर्थी, चोरीच्या भीतीने वसंतसेना आपले दागिने सुरक्षेसाठी चारुदत्ताच्या हवाली करते (आणि शर्विलक येतोही, दागिने चोरतोही) त्या अर्थी त्या काळी - म्हणजे इ.स.पूर्वीच्या काळातील कथानक आहे - जसे चोर होते तद्वतच वेश्याही आणि त्याला अनुसरून समाजाला मान्य असलेला व्यभिचार ("व्यभिचार" आजच्या मीटरप्रमाणे आपण म्हणतो, कदाचित् शूद्रकाला तसा उल्लेख अभिप्रेत नसेलही) चालत असणार, मग 'गणिका' वर्ग तिथे असणे/वसणे क्रमप्राप्तच.

पण तत्कालीन समाज 'गणिका' आणि 'वेश्या' यांच्यात निश्चित फरक करत होता, जाणत होता. वेश्येच्या आजच्या कर्तव्यात आणि इ.स.पूर्व काळातील कर्तव्यात तसूभरही फरक नव्हता. मात्र "गणिका" ही संगीत, नृत्य, शृंगाररस, अभ्यासू, बोलण्यात चतुर आणि एकनिष्ठता राखणारी असणे महत्वाचे मानले जात असे [उदा. "चित्रलेखा", "आम्रपाली"]. ब्राह्मण आणि गणिका यांच्यातील जाहीर विवाह समाजाला मान्य असे. कारण जी काल ज्याच्यासाठी गणिका होती ती आजही त्याच्याशीच सर्वस्व अर्पिलेली असल्याने तो ब्राह्मण असो वा क्षत्रिय, त्याला त्या गणिकेविषयी प्रीती निर्माण झाली तर तिला पत्नीपद देण्यास खळखळ करीत नसे. अर्थात बहुभार्यापद्धती त्या काळात समाजाने स्वीकारलेली असल्याने 'गणिके'लाही आपण 'प्रथम पत्नी'च असू शकू का याबद्दल खात्री नसे. त्यामुळे 'पत्नीपद' मिळाले एवढ्या एका स्थितीशी ती कृतज्ञ असे. ("मृच्छकटिक" मध्येही नायक चारुदत्त हा धूता नावाच्या स्त्रीशी विवाहित असून त्याला रोहिदास नावाचा एक मुलगाही आहे. ज्या विपरित परिस्थितीत वसंतसेना हिने आपल्या पतीला मृत्यूपासून वाचविले हे धूताला माहीत झाल्यामुळे नाटकाच्या शेवटी ती स्वतःहून वसंतसेनेला धाकटी भगिनी समजून तिचा चारुदत्तशी होणारा विवाह आनंदाने मान्य करते.)

अशी ही सामाजिक रचना "गणिका" ला मिळत असे पण वेश्येला मात्र विवाहाचा हक्क नव्हता. हा दोघीतील प्रकर्षाने जाणविणारा फरक.

अशोक पाटील

जवळपास असेच

पाटील यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे. माझ्याकडे देण्यासारखे ऑथेंटिक संदर्भ नसल्याने मी थोडे गुळमुळीत प्रतिसाद देत होते परंतु आम्रपालीच्या आख्यायिकेत आम्रपालीला बिंबिसाराबरोबर न गेल्याने देशभक्त गणले जाते.

असो. मूळ चर्चेकडे परतूया.

बिग बॉससारख्या कार्यक्रमातून सनी लेओनला पुढे केल्याचे आश्चर्य वाटत नाही परंतु आपली मुले आपल्या ताब्यात हवीत. एका विशिष्ट वयापर्यंत त्यांनी काय पाहावे, काय पाहू नये वगैरेंवर पालकांचे नियंत्रण आणि लक्ष हवे.

बरोबर - सनी लेओन पोर्न-नटी, वेश्या-चर्चा अवांतर

बरोबर - सनी लेओन पोर्न-नटी आहे, वेश्या-चर्चा थोडीशी अवांतर आहे.

उपहासाने ?

तुम्ही हे उपहासाने लिहिले आहे काय? अन्यथा, सनी लिओनचे कौतुक तिने स्विकारलेल्या पेशास एक पर्याय म्हणुन सहमती देते, तसे असावे काय?

 
^ वर