पुस्तक् 'गौतम बुध्द और उनका धम्म'
'गौतम बुध्द और उनका धम्म' डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांनी लिहीलेल पुस्तक या दिवाळीच्या सुट्यांमधे वाचनात आले. बबासाहेबांनी लिहीलेल्या अनेक अप्रतीम रचनांपैकी ही त्यांची शेवटची रचना होती. मुळ इंग्रजी भाषेत लीहिलेल्या या ग्रंथाचे श्री. आनन्द कौश्ल्यायन यांनी हिंदीत अनुवाद केलेले आहे.
ज्या बौध्द धर्माला आंबेडकरांनी अंगिकारलं होतं त्या धर्माची तत्व प्रणालीच आजच्या विषमतापूर्वक स्थितीला बदलण्यासाठी एक प्रभावशाली मार्ग आहे असा त्यांचा विश्वास होता. हा ग्रंथ लिहीतांना त्यांच्या समोर संपूर्ण त्रिपिटक होतं. सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. प्रत्येक पिट्कात आणखी १०-१२ ग्रंथ तसेच या सर्व ग्रंथावर आधारीत अनेक अर्थ कथा होत्या, अनेक प्रकारचे बुध्द चरित्र संबंधित साहित्य होतं. या सर्व वाड्मयातुन त्यांना एक अशा ग्रंथाची रचना करायची होती ज्यात संपूर्ण बुध्द चरित्र त्याची शीकवण समाविष्ट होईल आणि त्याची भाषा सर्वसामान्यांना समजायला सोपी असेल.
हा ग्रंथ एकुण आठ काण्डात विभागला आहे. प्रत्येक काण्डात ७-८ भाग आहेत. प्रथम काण्ड बुध्द जीवन कथेनी व्याप्त आहे. उर्वरित काण्डात धर्म दीक्षा, त्यांच आंदोलन, धर्म, अधर्म आणि त्यांच्या समकालीन विचारंबद्दल लिहीण्यात आले आहे. "जे विचार बुध्दी संगत आहेत, जे विचार तर्क संगत आहेत तेच बुध्द विचार आहेत" आशी बुध्द विचारंची अतिशय सोपी आणि समर्पक व्याख्या बबसाहेबांनी या ग्रंथात मांडली आहे.
अनात्मवाद आणि अनिश्वरवाद या बौध्द धर्माच्या दोन मुख्य मान्यता आहेत. गौतम बुध्दांनी आत्मा बद्द्ल असलेल्या सर्व धारणांचा त्याग केला. त्यांनी आत्म्याच्या अस्तित्वाचाच त्याग केला. त्यांनी या द्रुष्टीकोनाचा देखील त्याग केला कि कोणी इश्वराने मनुष्य आणी स्रुष्टीची निर्मीती केली आहे आणि त्यांचे भविष्य आधीपासुनच निश्चित करुन ठेवले आहे. सिध्दार्थ गौतमांनी बुध्द बनण्याच्या आधी अंगिकारलेल्या तपस्या आणि आत्म-पिडनाचा मार्ग त्याना व्यर्थ जाणुन पडला होता. खरी शान्ती आणी चित्ताची एकाग्रता शरीराची आवश्यकता पूर्ण करुनच मिळवता येऊ शकते, त्यासाठी संसारातून पळून जाण्याची नाही तर संसाराला बदलुन श्रेष्ठतम बनविण्याची आवश्यकता आहे.
मी कोण होतो ?, कुठुन आलो ?, भविष्यात मी कोण होणार ?, आत्मा आणि शरीर एकच आहे का ?, संसाराची उत्पत्ती कशी झाली ?, मरणान्तर काय होतं?, असल्या प्रश्नांना त्यांनी कधीच महत्त्व दिले नाही, त्यांच स्वागत केले नाही. त्यांच्या मते या प्रश्नांच्या उत्तरांनी मनुष्याचे कष्ट दुर करण्यात किंवा त्यांचे आचरण सुधारण्यात कुठल्याच प्रकारची मदत होणार नव्हती. या प्रश्नांच्या उत्तराने कुणाला विद्या मिळणार नव्हती, ना ही ते निर्वाणाकडे अग्रेसर करणारे होते. किंबहुना ज्या कुणी 'मजहब' किंवा 'रिलीजन' नी या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला होता गौतम बुध्दांच्या मते त्यांची सर्व सिध्दांत कल्पनाश्रित होते त्यांच सत्य परीक्षित नव्हतं, ना ही त्याची परीक्षा करण शक्य होतं.
त्यानी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गात सर्वप्रथम आहे 'सम्यक द्रुष्टी'. सम्यक द्रुष्टी चा अर्थ आहे मनुष्याची अशा सर्व मिथ्या धारणांपासुन सुटका व्हवी जी मनुष्याच्या मनाची कल्पनामात्र आहे आणि ज्याची मनुष्याच्या अनुभवाशी किंवा यथर्थाशी कुठ्लाच संबंध नाही. सम्यक द्रुष्टीचा अर्थ आहे मनुष्याचे मन आणि बुध्दी स्वतंत्र असणे.
या जगातील दु:ख आणि कष्ट दुर करणे हाच त्यांनी सांगितलेल्या बुध्द धर्माचा मुख्य हेतु होता. धर्माचा अर्थ आहे सदाचरण जीवनाच्या प्रत्येक क्षणी एका मनुष्याचा दुसर्या मनुष्याप्रती चांगला व्यवहार. शरीर वाणी व मनाची पवित्रता टिकवणे हाच खरा धर्म आहे. परा-प्रक्रुतीची पूजा, कर्म काण्ड यज्ञ-बलि, कल्पनाश्रित विश्वास अधर्म आहे. वेद उपनिषदे, धर्म ग्रंथांना अपौरुषेय मानणे, त्यांना चुकीच्या संभावनेपलिकडे मानणे अधर्म आहे. त्यांचा हेतु होता मनुष्याने बुध्दीवादी बनायला हवे, मनुष्याने स्वतंत्रतापूर्वक सत्याची शोध घ्यायला हवी.
बुध्द विचारांमधे अनित्यवाद हा सुध्दा एक महत्वपूर्ण सिध्दांत आहे. मनुष्य अनित्य आहे, निरंतर परिवर्तनशील आहे. जीवनाच्या कुठ्ल्याही दोन क्षणीदेखिल मनुष्य एक नाही. सर्व वस्तु अनित्य आहेत त्यामुळे त्यांच्याप्रती असणारी आसक्ती नेहमी दु:खाचे कारण बनते.
त्यांचा समकालीन ब्राम्हणी समाजाच्या तुलनेत, बौध्द समाज वर्णाश्रम धर्मरुपी बेड्यांपासुन सर्वथा मुक्त होता. बौध्द धर्माच्या सर्व स्त्री व पुरुष सदस्यांना शीक्षा प्राप्त करण्याची, धंदा करण्याची तसेच इतर सर्व प्रकारची समान स्वतंत्रता होती. बौध्द धर्म प्रचारात धर्म दीक्षाचे दोन प्रमुख प्रकार आहेत १) भीक्षुची दीक्षा २) उपासकची दीक्षा.
त्यांनी सांगितलेल्या धर्माचे दोन प्रमुख तत्व होते. १) प्रज्ञा (निर्मळ बुध्दी) २) करुणा (दया, प्रेम, मैत्री). इ.स्.पू. सहाव्या शतकात मांडलेली धर्माची ही व्याख्या जितकी प्राचीन आहे तितकीच आधुनिक.
भगवान बुध्दांनी कधी इश्वराचा अवतार पुत्र किंश्याला वा पैगंबर असण्याचा दावा केला नाही. त्यांनी कुणाला स्वतःचा उत्तराधिकारी देखिल घोषीत केले नाही. त्यांच्या मते धर्म हाच धर्माचा उत्तराधिकारी आहे. त्यांनी कधी कुणाला मुक्त करण्याचे आश्वासन दिले नाही. त्यांच्या मते ते मार्ग दाता होते मोक्ष दाता नव्हे.
हा ग्रंथ प्रकाशीत झाल्यावर त्यावर अनेक विवाद झाले होते. मुळ ग्रंथात कुठेही बाबासाहेबांनी 'रेफरन्सेस' दिले नव्हते. हे ही खरे आहे कि बर्याच ठीकाणी त्यांनी अनेक गोष्टी आपल्या मनानी देखील समाविष्ट केल्या आहेत, परंतु ज्या वाचकांना लक्षात घेऊन हे पुस्तक लिहीण्यात आलं होतं त्यांच्यासाठी आंबेडकरांचं व्यक्तीमत्व आणि लेखनच एवढ मोठ प्रमाण होतं कि त्या व्यतिरिक्त अन्य कुठ्ल्याही रेफरन्सेस ची त्यांना आवश्यकता नव्हती. जर तुलसीदासांनी लिहीलेल्या 'रामचरितमानस' ग्रंथाला कुठ्ल्याही रेफरन्सेस विना स्विकार करण्यात येउ शकतं, तर या ग्रंथाला का नाही अशी त्यांच्या अनुयायीची मते होती.
'माणसाचे मन काबुत असले की सर्व काबुत राहातं' हे बुध्द विचार मांडतांना मात्र बाबासाहेबांनी 'मन' आणि 'चित्त' यावरील बुध्द विचारंवर अधिक खोलात जाउन काही लिहीलेले नाही. या ग्रंथातुन एक गोष्ट स्पष्ट जाणवते की बौध्द धर्मच एक असा प्राचीन धर्म आहे ज्यात मनुष्याला स्वतःच आपला अनुशासक बनण्याची शीकवण देण्यात आली आहे.
Comments
उत्तम....
ओळख् आवडली. ह्या विषयात शून्यस्पर्शी (नगण्य) गती असल्याने अधिक भर घालू शकत नाही. चर्चा वाचायला आवडेल.
--मनोबा
आसक्ति नेहमी दु:खाचे कारण बनते?
सर्व वस्तु अनित्य आहेत त्यामुळे त्यांच्याप्रती असणारी आसक्ती नेहमी दु:खाचे कारण बनते.
मला हे कळत नाही की सर्व पौर्वात्य धर्मांचा आयुष्य आनंदाने उपभोगण्यावर राग का आहे? आयुष्यात नैसर्गिकरीत्या सहज मिळू शकणार्या अनेक आनंदांना 'विषय', 'वासना', 'आसक्ति' आणि तत्सम शब्दांनी हिणवण्याचे कारण काय?
उपभोगांचा अतिरेक करावा किंवा ते मिळविण्यासाठी वाममार्ग स्वीकारावा ह्याचा निषेध समजू शकतो पण अमेरिकेच्या Declaration of Independence मध्ये घोषित केल्याप्रमाणे 'Life, liberty and the pursuit of happiness' मधल्या 'the pursuit of happiness' ह्याचे आपल्या सर्व धर्मांना वावडे का आहे?
ह्यावर असा प्रतिवाद होऊ शकेल की भारतीय तत्त्वज्ञान धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ सांगते आणि ह्यातील काम म्हणजेच 'the pursuit of happiness'. असे खरोखरच आहे काय? ह्या शिकवणीतील 'काम' म्हणजे इन्द्रियभोग्य आनंद, हा आनंद आवश्यक तेव्हढा घ्या पण ते सर्व मोक्षप्राप्तीकडे नेणार्या मार्गावरचा एक टप्पा अशा अर्थानेच घ्या असे आपले तत्त्वज्ञान सांगते. हा टप्पा न घेताच सरळ मोक्षाचा मार्ग दिसला तर आणखीच उत्तम. 'यदहनि विरजेत्तदहनि प्रव्रजेत्' (ज्या दिवशी संसारावरून मन उठेल त्या दिवशी प्रव्रज्या म्हणजे संन्यास घ्या) आणि असे करणारा संन्यासमार्गाचा यात्रिक विषयकर्दमात गुंतलेल्या सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा काकणभर सरस आहे हे भारतीय तत्त्वज्ञानाचे एक गृहीतकृत्य आहे 'The pursuit of happiness' ही संकल्पना ह्याच्या बरीच पलीकडे जाते, नुसत्या इन्द्रियभोग्य आनंदापुरती ती मर्यादित नाही. पण ही साधीसरळ गोष्ट कोणत्याच पौर्वात्य तत्त्वज्ञानामध्ये निर्भयपणे मांडली आहे असे दिसत नाही.
भारतीय संस्कृतीचा सध्या र्हासाचा काळ आहे असा एक सार्वत्रिक बोलबाला आहे. हे खरे असेल तर pursuit of happiness ची निर्भयपणे मागणी करण्याच्या अभावात त्या र्हासाचे बीज आहे असे वाटते.
बुद्ध आणि त्यांचा धम्म
पुस्तकाचा परिचय करून देणारा लेख आवडला. हे पुस्तक मराठीतही उपलब्ध आहे. अनुवादकः घनश्याम तळवटकर, चिटणीस आणि रेगे किंमत १५० रु. प्रकाशक सद्धम्मादित्य प्रकाशन केळझर. मराठीतला अनुवाद चांगला झाला आहे. पुस्तकाचे प्रकाशनमूल्य ही चांगले आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांचे लिखाण वाचण्यासारखे असते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन महाराष्ट्र सरकारने चांगल्या रितीने केले आहे. जवळपास १६ खंड (कदाचित आता वाढले असतील.) प्रकाशित झाले आहेत (पृष्टसंख्येच्या मानाने फारशी महागही नव्हती.) रिडल्स ऑफ हिन्दुइज्म, ऍनिहिलेशन ऑफ कास्ट, पाकिस्तान ही त्यातली गाजलेली पुस्तके. याशिवाय टिळक, रानडे, गांधी, फुले यांच्या वरील निबंध त्यांच्या परखड विचारांची ओळख करून देतात. विशेषतः गांधींनी अस्पृशोद्धारासाठी काय केले यावरचा त्यांचा निबंध वाचण्यासारखा आहे. त्यांनी वेळोवेळी मराठीत लिखाण केले. या लिखाणाचा समुच्चय म्हणून सरकारने दोन खंड प्रकाशित केले आहेत. मराठीतले आंबेडकरही वाचण्यासारखे आहेत. मराठीत लिहिताना ते जास्त थेटपणे लिहितात असे वाटले.
बुद्ध धर्मीयांसाठी बायबल कुराणासारखे एकच पुस्तक नाही. अनेक पुस्तकातील मत मतांतराने बुद्ध धर्मीयात गोंधळ होतो असे आंबेडकर यात म्हणतात. (थोडेसे आठवणीतून लिहित आहे.) हे पुस्तक त्याची कसर काढण्यासाठी लिहिले असावे. या पुस्तकात बुद्ध धर्मातील त्यांना रुचणारा भाग त्यांनी घेतला आहे. (आणि ते साहजिक आहे.) यातील चौथ्या भागातील प्रकरणांची नावे पाहिली तर त्यांचा दृष्टिकोन समजतो. १. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म. २. ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नाही. ३. ब्रह्मसायुज्यावर आधारित धर्म हा अधर्म आहे. ४. आत्म्यावर विश्वास हा अधर्म आहे. ५. यज्ञयागावर विश्वास हा अधम्म आहे. ६. काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्मच नाही. ७. धर्मग्रंथांचे केवळ पठण म्हणजे धम्म नव्हे. ८ धर्म पुस्तके प्रमादातित आहे हे मानणे म्हणजे अधर्म आहे.
आंबेडकरांचे विचार बहुतांशाने विवेकवादी असले तरी ते नेहमीच नाही. बुद्ध आणि धम्म या पुस्तकात त्यांच्या भावनात्मक विश्वाचा थोडा परिचय होतो.
प्रमोद
लेख आवडला.
उद्धरेत् आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत् = उद्धरेदात्मनाऽऽत्मानं नात्मानमवसादयेत्
- आपणच आपला उद्धार करून घ्यायचा असतो. आपणच आपले मित्र वा शत्रू असतो. (भगवद्गीता ६.५) हा श्लोक आठवला.
थोडी सुधारणा
'उद्धरेदात्म आत्मानम्! नात्मानभवसादयेन'
नापृष्टः कस्यचिद् ब्रूयात् (विचारल्याशिवाय सांगू नये) असे म्हणतात पण चुकीचे संस्कृत लेखन आणि उच्चार क्लेश देतात म्हणूनच लिहितो!
वरील उद्धरण असे हवे:
उद्धरेत् आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत् = उद्धरेदात्मनाऽऽत्मानं नात्मानमवसादयेत्
(मनुष्याने स्वतःच स्वतःचा उद्धार करावा, स्वतःला नीच पातळीस नेऊ नये.)
(अवांतर - येथील टंकलेखनात अवग्रहाचे चिह्न -ऽ- दिसले नाही. संस्कृत लेखनाला ते आवश्यक असते. त्याची सोय करता येईल काय? ह्या प्रतिसादासाठी मी ते बराहामधून आणून चिकटविले आहे.)
आऽऽऽहे ना!
येथे शेवटचा तक्ता बघा.
आता दिसलं.
धन्यवाद प्रियाली आणि धनंजय (खरडीच्या माध्यमातून हे कळविल्याबद्दल.) आता दिसलं. आधी कोठे लपून बसलं होतं कोणास ठाऊक...