मुस्लिम देशांतील धर्मनिरपेक्षतावाद

लेखक (अनुवाद) - सुधीर काळे, जकार्ता
दूरगामी परिणाम असणार्‍या ट्युनीशियामधील निवडणुका संपून बरेच दिवस झाले आणि आता लक्ष इतरत्र द्यायची वेळ आली आहे. त्यात काळजाचा थरकाप उडविणारी गद्दाफीची निर्घृण हत्त्या, तुर्कस्तानमधला भूकंप आणि युरोपवरील आर्थिक संकट यांचा समावेश होतो. पण ट्युनीशियामधील निवडणुकांचा प्रभाव मात्र निःसंशयपणे त्या देशाच्या सीमांच्या पलीकडेही पडणार आहे.

अरब राष्ट्रांत स्वातंत्र्याची आणि लोकशाहीची ज्योत प्रज्वलित करण्याचे (ज्याला मीडियाने "अरबी वसंत ऋतू" असे नाव दिलेले आहे) श्रेय ट्युनीशियामधील जनतेच्या उठावालाच जाते. या उठावाची ठिणगी ट्युनीशियामध्येच पडली आणि तिने तिथल्या हुकुमशहाचा बळी घेतला. तेंव्हां अरबी जगातली पहिली-वहिली निवडणूक घेण्याचा मानही त्या देशाला मिळावा हे उचितच आहे. जरी "एन्नाहादा (पुनरुज्जीवन पक्षाला)" या कट्टर नसलेल्या पण "इस्लामी" असलेल्या पक्षाला निर्णायक बहुमत मिळाले नसले तरी अपेक्षेप्रमाणे तो पक्ष ही बहुरंगी निवडणूक २१७ पैकी ९० जागा जिंकून आणि एकूण मतदानाच्या ४१ टक्के मते मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला.
या इस्लामी पक्षाच्या विजयामुळे ट्युनीशियामधील धर्मनिरपेक्ष लोकांत आणि पाश्चात्य राष्ट्रांत अनेक शंकाकुशंका आहेत तर इतरांना हा विजय म्हणजे एक अपरिहार्य परिणामच वाटतो. अनेक वर्षे राज्य केलेल्या झैन-एल अबेदीने (Zein-el Abedine) या हुकुमशहाच्या कारकीर्दीत विरोधी पक्षाला क्रूरपणे चिरडण्यात आले होते आणि कुठल्याही राजकीय पक्षाला धडपणे काम करू दिले गेले नव्हते. एन्नाहादा ही चळवळही एक सामर्थ्यशाली पण भूमिगत चळवळ होती आणि या चळवळीने अशा क्रूरपणाला टक्कर दिली, त्यांच्या सभासदांना अटक झाली, त्यांचा छळ करण्यात आला व दडपशाही मार्गाने त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे प्रयत्नही झाले. या पक्षाचे नेते रशीद घान्नूची यांनी आपल्या आयुष्याची २० वर्षे इंग्लंडमध्ये हद्दपारीत काढली होती आणि गेल्या जानेवारीत ते मायदेशी परत आले होते.
’एन्नाहादा’च्या हुकुमशाहीच्या आणि भ्रष्टाचाराच्या तत्वाधिष्ठित विरोधाकडे पहाता आणि निवडणुका जाहीर झाल्यानंतर धर्मनिरपेक्ष पक्षांमधील अनागोंदी कारभाराकडे पहाता एन्नाहादा पक्षाचा विजय होणे अपेक्षितच होते. ट्युनीशियातील फ्रेंच भाषिक दैनिक "ल ताँ (Le Temps)"ने लिहिल्याप्रमाणे "डाव्या पक्षांतील आपापसातील फाटाफुटीमुळेच त्यांचा पराजय झाला!"
ट्युनीशियामधील धर्मनिरपेक्ष लोकांच्या मनात घर करून राहिलेली भीती बाहेर काढून टाकण्यासाठी ट्युनीशियामधील स्त्रियांनी जी सामाजिक उन्नती करून घेतली आहे तिला ’एन्नाहादा’ पक्षापासून कांहींच भीति नसल्याचे त्या पक्षाच्या प्रवक्तीने स्पष्ट केले. स्त्रियांनी बुरखा वापरण्याची किंवा त्यांना न आवडणारा पोषाख वापरण्याची सक्तीही करण्यात येणार नाहीं असे तिने जाहीर केले. तिने पुढे असेही सांगितले कीं त्यांच्या पक्षाचे धोरण जास्तीत जास्त स्त्रियांनी काम करावे असेच आहे. कामाच्या जागी लैंगिक समानतेवरही त्यांच्या पक्षाचा कटाक्ष आहे असे तिने जाहीर केले.
खरे तर एन्नाहादा पक्षाने स्फूर्ती घेतली आहे तुर्कस्तानमध्ये सत्तेवर असलेल्या "न्याय आणि विकास पक्ष (AK)" या सौम्य इस्लामी पक्षाकडून! रेसेप एर्डोगान यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष एक दशकापेक्षा जास्त वर्षें सत्तेवर आहे आणि त्या पक्षाने तुर्कस्तानचे आर्थिक सामर्थ्य मोठ्या प्रमाणावर वाढविले आहे. तुर्कस्तान हा देश आता या भागातली एक महत्वाची राजकीय शक्ती बनलेला आहे. मी (म्हणजे श्री. इर्फान हुसेन) तुर्कस्तानला गेली पन्नास वर्षें भेट देत आलेलो आहे पण माझ्या शेवटच्या भेटीत माझे डोळे जणू खाड्कन उघडले. या देशात आर्थिक भरभराट पूर्वी कधीही झाली नव्हती अशा वेगाने होत आहे आणि इस्तंबूल हे एक सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र बनू लागले आहे आणि त्यामुळे तिथे सार्‍या जगातून जास्त-जास्त पर्यटकही येऊ लागले आहेत.
आता एन्नाहादा किंवा न्याय आणि विकास पक्ष (AK) या पक्षांची पाकिस्तानमधील धर्माधिष्ठित पक्षांशी तूलना केल्यास एकाद्या कालचक्रात अडकलेला एकादा डायनोसोरच डोळ्यासमोर येतो! मुत्ताहिदा मजलीस-ए-अमल (MMA)[१] गठबंधन खैबर पख्तूनख्वा प्रांतात सत्तेवर असताना त्याने तो पक्ष कसा मध्ययुगीन कालातला आहे हे आपल्याला दाखवून दिले आहेच. त्यांना आधुनिक सत्यतेची कांहींही कल्पनाच नाहीं हेही दिसून आलेले आहे. पाकिस्तानच्या प्रमुख धर्मनिरपेक्ष पक्षांनीसुद्धा राज्यकारभाराबाबत आपल्याला निराश केले असले तरी इस्लामी धर्माधिष्ठित पक्ष अजीबातच विकसित झालेले दिसत नाहींत.
या पक्षांचा निवडणूक जाहिरनामा म्हणजे "कुठला नियम मोडल्यास काय शिक्षा होईल" या धर्तीवर बनविलेली एक शिक्षांची यादीच वाटते. त्यांनी मुस्लिम धर्माचे "काय केलेले चालेल आणि काय केलेले चालणार नाहीं" अशा तर्‍हेच्या नियमावलीतच जणू रूपांतर केलेले आहे. पण त्यात आध्यात्मिकता आणि चिंतन/मनन यांवर कसलाही भर दिलेला नाहीं. त्याहून पुढे पाहिले तर असे दिसून येते कीं हे पक्ष अर्थशास्त्र, शास्त्र व सामाजिक सत्यपरिस्थिती याबाबत अगदीच अनभिज्ञ आहेत. त्यांच्यात फक्त स्त्रियांना घरात डांबून ठेवण्यापुरतीच एकी आहे आणि ते अगदी कट्टर सांप्रदायिक आहेत. त्यामुळे मुशर्रफ यांनी गडबड-गोंधळ करून घेतलेली २००२ची निवडणूक सोडल्यास जवळ-जवळ प्रत्येक निवडणुकीत या पक्षांचा धुव्वा उडालेला आहे यात नवल ते काय?
पाकिस्तानमधील फारसे न शिकलेले मुल्ला-मौलवी एन्नाहादा किंवा AK पक्षांना पाखंडीच समजत असतील. ट्युनीशिया आणि तुर्कस्तान हे मद्यपानाबद्दलही सहिष्णू आहेत कारण त्यांना माहीत आहे कीं मद्यपानावर बंदी घातल्यास पर्यटक येणार नाहींत आणि या देशात पर्यटकांकडून मिळणारे उत्पन्नच विदेशी मुद्रा मिळविण्याचे मुख्य साधन आहे.
मी (म्हणजे श्री. इर्फान हुसेन) जेंव्हां पहिल्यांदा तुर्कस्तानला गेलो होतो त्यावेळच्या मानाने आज तुर्कस्तानमधील जास्त जास्त स्त्रिया आपले केस डोक्यावरून वस्त्र घेऊन झाकू लागल्या असल्या तरी कित्येक स्त्रिया आजही अंगप्रदर्शन करणारे पाश्चात्य कपडे वापरणार्‍या आहेत. आज कुणी काय कपडे वापरावे या वैयक्तिक निवडीबद्दल बाऊ करणारे जे मुल्ला-मौलवी पाकिस्तानात आहेत तसे तुर्कस्तानमध्ये नाहींत. याउलट तालीबानी नेतृत्व कपड्यांना आणि चेहेरेपट्टीला किंवा रूपाला फारच वेगळ्या पातळीवर नेतात. पुरुषांना दाढी करायला मज्जाव करणारे आणि आपल्या घोट्याच्या वरच्या अंगाच्या एकाद्या इंचाचेही प्रदर्शन करणार्‍या स्त्रियांना छडीच्या माराची शिक्षा देण्याची तरतूद करणारे नेतृत्व समाजाला परत ७ व्या शतकात नेत आहे. मग आजच्या अफगाणिस्तानी जनतेत बहुसंख्य लोक तालीबान पुन्हा सत्तेवर येण्याच्या विरोधात आहेत यात नवल ते काय? आणि एकदा पाश्चात्य फौजा परत गेल्यावर कीं तालीबानी पुन्हा सत्ता काबीज करतील याची सामान्य जनतेला भीतीच आहे. बर्‍याच पाकिस्तानी लोकांना या तालीबानी लोकांबाबत कौतुक आहे ही गोष्ट फारच घाबरवणारी आहे. तालीबानचे कौतुक असलेल्या पाकिस्तान्यांना तालीबानच्या राजवटीत कांहीं दिवस ठेवले पाहिजे म्हणजे त्यांना आज पाकिस्तानात मिळणार्‍या व्यक्तिस्वातंत्र्याचे कौतुक वाटू लागेल.
एन्नाहादा पक्षाच्या वर उल्लेखलेल्या प्रवक्तीने जाहीर केले कीं एन्नाहादा हा राजकीय पक्ष असून तो धार्मिक पक्ष मुळीच नाहींय्. अनेक वर्षे विरोधी बांकांवर बसलेल्या ट्युनीशियन सांप्रदायिक पुस्तकी विचारवंतांना कळले आहे कीं या युगात आणि या क्षणीं ते अशा तर्‍हेचे आचरण किंवा कल्पना, स्वप्नें लोकांवर त्यांच्या मर्जीविरुद्ध जबरदस्तीने लादू शकत नाहींत. या उलट पाकिस्तानातील कट्टर धर्माधिष्ठित पक्षांना लष्कराकडून सदैव कृपाछत्र किंवा आश्रय मिळालेला आहे आणि त्यामुळे आपल्या सांप्रदायिक कल्पना लोकांवर लादण्यात या कट्टर धर्माधिष्ठित पक्षांचे कांहींच जात नाहीं! "मुस्लिम ब्रदरहुड" किंवा त्या संघटनेच्या इतर शाखा स्वायत्तपणे वावरतात, पण पाकिस्तानी मुल्ला-मौलवी नेहमीच लष्करशहांचे कनिष्ठ सहचर म्हणूनच वावरले आहेत. त्यामुळे त्यांना कधीच आपली मतप्रणाली किंवा आपली कार्यपद्धती नव्याने पारखून पहायची गरजच भासली नाहीं.
एन्नाहादा हा पक्ष सध्या डाव्या आणि उदारमतवादी/प्रगतीवादी पक्षांशी युती करून संमिश्र सरकार बनविण्याच्या दृष्टीने वाटाघाटी करत आहे. ही युती जर संमिश्र सरकार बनवून स्थिर शासनयंत्रणा जनतेला देण्यात यशस्वी झाली तर एक मुस्लिम राष्ट्र २१व्या शतकात परिणामकारक शासन देऊ शकते हे ट्युनीशिया सार्‍या जगाला एक उदाहरण म्हणून दाखवू शकेल आणि त्याला यशस्वी न व्हायला कांहींच कारण नाहींय्. तुर्कस्तानने प्रगतीपथाची दिशा आणि पद्धत आधीच दाखवून दिली आहे.
मुस्लिम धर्म हे पाकिस्तान्यांसाठी एक परिचित असे प्रभावी चिन्ह आहे आणि म्हणून मुस्लिम धर्म पाकिस्तानच्या राज्यपद्धतीत व्यक्त होणे हे योग्यच आहे. पण सांप्रदायिक मुल्ला-मौलवीं आजच्या आधुनिक युगाचा संदर्भ लक्षात न घेता आपल्या धर्माच्या शिकवणींचा शब्दशः अन्वयार्थ लावतात. यात त्यांचे स्वतःचे अपूर्ण व मर्यादित ज्ञान आणि शिक्षणच व्यक्त होते.
धर्माने मुस्लिम असूनही तुर्कस्तानच्या राज्यघटनेची कोनशिला असलेली धर्मनिरपेक्षता स्वीकारणे यात कसलाही विरोधाभास नाहीं हेच ट्युनीशियाने आणि तुर्कस्तानने दाखविले आहे. इतर धर्मांना सामावून घेण्याची आणि सहिष्णुतेची प्रवृत्ती असल्याशिवाय कुठलाच समाज धर्मनिरपेक्ष होऊ शकत नाहीं. सर्व धर्माच्या लोकांना मुस्लिम समाजात मोकळे वाटले पाहिजे. जोपर्यंत आपले (पाकिस्तानचे) धर्माधिष्ठित पक्ष अशा विचारप्रवाहांशी एकरूप होत नाहींत तोपर्यंत ते पक्ष असंबद्ध आणि अग्राह्यच रहातील.

The above Marathi write-up is translation of original English article "Secularism in Muslim societies" written by Mr Irfan Husain and was first published by DAWN on October 31, 2011
Original article can be read at http://www.dawn.com/2011/10/31/secularism-in-muslim-societies.html

Comments

छान

लेख बरीच नवी माहिती देतो. आभार!

मात्र मुळातील चित्र लेखात दिल्याइतके सकारात्मक आणि सरळ असेल असे वाटत नाही. निधर्मी असण्याच्या टेंभा (?) मिरवणार्‍या पाश्चिमात्य देशांना प्रत्यक्षात इतरत्र निधर्मी-कम्युनिस्ट राजवट आलेली फारशी आवडत नाही. राजवट सुस्थिर निधर्मी होऊ लागताच कट्टर इस्लामवाद्यांना हाताशी धरून राळ उडवण्यात आलेल्ली अनेकदा दिसेल.

९/११ नंतर हे देश काहि शिकले असतील अशी आशा करूया

बाकी प्रस्तुत नकाशा बदलता आला तर बघा. त्यात पॅलेस्टाईन हा प्रदेश दाखवलेला नाही. इस्त्रायल व पॅलेस्टाईन यांच्या वादग्रस्त सीमा निदान तुटक रेषांनी दाखवायला हव्यात (काश्मिरप्रमाणे) असे वाटते

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

+१

मात्र मुळातील चित्र लेखात दिल्याइतके सकारात्मक आणि सरळ असेल असे वाटत नाही.

हेच लिहायचे टाळत होतो. पण उत्साहहर्ता प्रतिसाद् देणे इष्ट वाटत नव्हते.

--मनोबा

म्हणूनच नकाशाखालच्या वर्णनात शेवटून दुसरी ओळ मुद्दाम घातली आहे

ऋषिकेश-जी,
त्यात पॅलेस्टाईन हा प्रदेश दाखवलेला नाही. इस्त्रायल व पॅलेस्टाईन यांच्या वादग्रस्त सीमा निदान तुटक रेषांनी दाखवायला हव्यात (काश्मिरप्रमाणे) असे वाटते
(१) पॅलेस्टाईन हा एक "होऊ घातलेला" देश आहे तर भारतीयांच्या दृष्टीने काश्मीर हा भारतीय संघराज्याचा एक अविभाज्य "प्रांत" आहे. त्यात तूलना कसली? अर्थात या लेखाचा विषय हा नाहीं आहे, तरी चर्चा 'रुळा'वरच राहू दे!
(२) भूगोलाशी फारसा परिचय नसलेल्या वाचकांना ट्युनीशिया आहे तरी कुठे हे लक्षात यावे म्हणूनच हा नकाशा घातला आहे आणि नकाशाखालच्या वर्णनात शेवटून दुसरी ओळही मुद्दाम घातली आहे.
___________
जकार्तावाले काळे

ओके

पॅलेस्टाईन हा एक "होऊ घातलेला" देश आहे तर भारतीयांच्या दृष्टीने काश्मीर हा भारतीय संघराज्याचा एक अविभाज्य "प्रांत" आहे. त्यात तूलना कसली? अर्थात या लेखाचा विषय हा नाहीं आहे, तरी चर्चा 'रुळा'वरच राहू दे!

ओके. (सहज शक्य असले तरी) या धाग्यावर काश्मिरशी तुलना टाळतो :)

फक्त पॅलेस्टाईन हा मात्र 'होऊ घातलेला देश' नाही इतके नमुद करण्याची सुट घेतो. १९८८ मध्येच त्याने स्वातंत्र्य घोषित केले आहे आणि आजमितीला १०० हून अधिक देश त्यास स्वतंत्र राष्ट्र मानतात. (अगदी अमेरिका-इस्रायलही मानायला तयार आहेत-वाद केवळ सीमेचा आहे)
शिवाय आता तर हे युनेस्कोचे पूर्ण सदस्य राष्ट्र आहे.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

स्वागतार्ह बदल

या संवेदनशील विषयावर जागतिक पातळीवर चललेल्या चर्चेची माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद. ( हे काम तू करत आहेसच)
ट्यूनिशिया आणि तुर्कस्तानमध्ये होऊ घातलला बदल स्वागतार्ह असला तरी दोन बाबी थोड्या चिन्ताजनक वाटतात.
१. या देशातील प्रगतिशील पक्षांना 'इस्लामिक' हे विशेषण लावणे का आवश्यक वाटते?
२. कमाल अतातुर्क याने नव्वद वर्षांपूर्वी घडवून आणलेल्या क्रांतीनंतर तो देश आधुनिक (पाश्चात्य ) विचारसरणीच्या मार्गावर वाटचाल करत होता. (असे मी समजत होतो) आज सुद्धा ती विचारसरणी जनमानसात पूर्णपणे प्रस्थापित झालेली दिसत नाही.
याखेरीज महत्वाचा प्रश्न हा आहे की हे देश हिंसक दहशतवादाचा सामना कसा करणार आहेत?

तुर्की-इराकी सत्ताधारी कुर्ड जनतेशी मुळीच सौहार्दाने वागत नाहींत

कुर्ड (Kurd) ही जमात (पूर्व) तुर्कस्तान, उत्तर सीरिया, (उत्तर) इराक आणि (वायव्य) इराण इथे पसरली असून त्यांना स्वतंत्र 'कुर्डिस्तान' हवे आहे (नकाशा पहा). पण चारी देशांना ते नको आहे. तुर्की आणि इराकी सत्ताधारी (आणि कदाचित् इराणीसुद्धा) त्यांच्याशी मुळीच सौहार्दाने वागत नाहींत. आपल्या 'ठाम'पणाबद्दल जे आरोप आपल्यावर होतात त्याच 'ठाम'पणाने त्यांचे सत्ताधारी त्यांच्याशीही वागतात. पण तिथे "आपलेच दात आणि आपलेच ओठ" असा प्रकार असल्याने त्याची जास्त वाच्यता होत नाहीं.
म्हणतात ना? "वो कत्ल करते हैं तो चर्चाभी नहीं होती, हम आहभी भरते हैं तो हो जाते बदनाम!"
हिंसक दहशतवादाचा सामना तुर्की सरकार तस्साच 'ठाम'पणाने करत आहे व करत राहील यात शंका नाहीं.
पण 'कुर्डिस्तान' हा या लेखाचा विषय नाहीं.
___________
जकार्तावाले काळे

काश्मीरसारखे

कुर्ड (Kurd) ही जमात (पूर्व) तुर्कस्तान, उत्तर सीरिया, (उत्तर) इराक आणि (वायव्य) इराण इथे पसरली असून त्यांना स्वतंत्र 'कुर्डिस्तान' हवे आहे (नकाशा पहा). पण चारी देशांना ते नको आहे.

कुर्दिस्तानचे प्रकरण काश्मीरसारखे दिसते आहे. भारत आणि पाकिस्तान दोघांनाही स्वतंत्र कुर्दिस्तान नको आहे.

वो कत्ल करते हैं तो चर्चाभी नहीं होती, हम आहभी भरते हैं तो हो जाते बदनाम!

ओळींचा क्रम चुकला आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हम्म!

वर घारे म्हणतात त्याप्रमाणे तुर्कस्तानमध्ये अतातुर्कनंतर इतक्या वर्षांनीही आधुनिकीकरण पूर्णतः राबू शकत नाही. इस्लामिक ग्रुप्स डोके वर काढत आहेत ही बाब चिंतेची वाटते. भौगोलिकदृष्ट्या युरोपच्या जवळ असणे किंवा ग्रीको-रोमन संस्कृतीचा प्रभाव असणारे इतर मुस्लिम देशही फारसे कट्टर नाहीत. इजिप्तमध्येही बायकांसाठी हिजाब पद्धत 'मस्ट' नाही. सायप्रस वगैरे सारख्या युरेशियन राष्ट्रांतही मुस्लिम धर्मनिरपेक्षता बर्‍यापैकी दिसते. अरब एमिरेट्स आणि बहारिनसारख्या देशांतही आता कायदे शिथिल होत चालले आहेत.

पण याचा अर्थ सर्व आलबेल आहे किंवा होते आहे असे वाटत नाही. हळूच डोके वर काढू पाहणारी कट्टर धार्मिकता आणि त्यासोबत येणारा दहशतवाद यांचा सामना करण्याचे उपाय येथे आहेत असे वाटत नाही.

लोकच हळू हळू जास्त-जास्त धार्मिक होऊ लागले तर?

प्रियाली मॅडम,
एक भारत देश सोडला तर इतर ठिकाणी बहुसंख्यांकच सत्तेवर येतात. अरबस्तानातही तसे झाले तर नवल काय? महत्वाची गोष्ट हीच कीं तालीबान्यांसारख्या कट्टर लोकांच्या हातात सत्ता जाऊ नये.
नव्याने सत्तेवर येणारे अरब नेते स्वतःच अशी कट्टरतेकडे होणारी वाटचाल थांबवू शकतात, इतर कुणीही ती थांबवू शकत नाहीं. पण जशी पाकिस्तानमध्ये झिया उल हक यांनी घेतली तशी नव्या अरब सत्ताधार्‍यांनी सत्तेवर टिकून रहाण्यासाठी जर धर्मगुरूंची मदत घेतली तर ते अरबी जनतेचे दुर्दैव.
आज सौदीमध्येही उदारमतवादी राजवट नाहीं. असलीच तर संयुक्त अमिराती, ओमान, कतार, बहरीन, कांहीं अंशी इजिप्त या सारख्या देशात बरीच उदारमतवादी राजवट आहे.
पण कुठल्याही कारणाने असो पण जर लोकच हळू हळू जास्त-जास्त धार्मिक होऊ लागले तर? म्हणजे धर्मगुरूंचा प्रभाव वाढल्यामुळे धर्माचा पगडा वाढला कीं धर्माचा पगडा वाढल्यामुळे धर्मगुरूंचा प्रभाव वाढला हे कोडे उलगडायला अवघडच वाटते.
पाकिस्तानी आंग्ल वृत्तपत्रांचा व त्यातलाही "वाचकांच्या पत्रव्यवहारा"चा मागोवा घेतल्यास एक गोष्ट स्पष्ट होते कीं तालीबानच्या पुनरुत्थानाची आपल्याला जितकी काळजी वाटते त्यापेक्षा जास्त ती पाकिस्तान्यांना वाटते व त्यातही स्त्रियांना. पण लोकसंख्येचा हा मोठा भाग दुर्दैवाने "सायलेंट मेजॉरिटी"त मोडतो व गप्प राहून त्रास सोसतो!
___________
जकार्तावाले काळे

"भारत सोडला तर" समजले नाही

वर लेखक म्हणतात :

एक भारत देश सोडला तर इतर ठिकाणी बहुसंख्यांकच सत्तेवर येतात.

नीट समजले नाही. याचा अर्थ एक तर असा निघतो, की भारतात बहुसंख्याक सत्तेवर नाहीत, नाहीतर असा अर्थ आहे, की अन्य (घटना-)निधर्मी देशांत बहुसंख्याक अशा प्रकारे सत्तेवर आहेत, ज्या प्रकारे भारतात नाहीत.
उदाहरणार्थ यू.एस. किंवा फ्रान्स मध्ये बहुसंख्याक सत्तेवर आहेत काय? हे "बहुसंख्याक" कोण आहेत? (जर "ख्रिस्ती" असे उत्तर असेल, तर "अन्य धर्मीयांच्या मानाने ख्रिस्ती उमेदवार मोठ्या प्रमाणात सत्तेवर" असा तुमचा अर्थ कळून येतो. पण त्या दृष्टीने बघितले, तर भारतात अन्य धर्मीयांच्या मानाने अधिक हिंदूधर्मीय उमेदवार सत्तेवर निवडून येतात. त्यामुळे हा फरक सांगता येत नाही.)

अन्य विकसनशील देश म्हणजे ब्राझिल, दक्षिण आफ्रिका वगैरे : तेथे "बहुसंख्याक" कुठल्या प्रकारे सत्तेवर आहेत, की त्याच प्रकारे भारतात नाहीत?

लोकशाही राज्ये सोडली आणि नाममात्र लोकशाही/कम्युनिस्ट/पूर्वकम्युनिस्ट राज्ये घेतली म्हणा. चीन किंवा रशियामध्ये कुठल्या प्रकारे बहुसंख्याक सत्तेवर आहेत, की ज्या प्रकारे भारतात नाहीत?

म्हणजे बहुसंख्यांकांपैकीच माणूस "हेड ऑफ स्टेट" असतो.

आपल्या देशात सध्या एक अल्पसंख्याक शीख धर्माचा पंतप्रधान आहे. रिमोट हातात असलेल्या सोनियाताईंचा जन्माच्या वेळी तरी धर्म कॅथॉलिक होता. आता काय आहे माहीत नाहीं.आतापर्यंत झाकिर हुसेन, फकरुद्दिन अहमद, अब्दुल कलाम यांच्यासारखे मुस्लिम व झैलसिंगांसारखे शीख राष्ट्रपती झाले आहेत. असे फक्त भारतातच होते असे माझे निरीक्षण आहे.
अमेरिकेत नेहमी प्रोटेस्टंट ख्रिश्चनच राष्ट्राध्यक्ष होतो. अपवाद फक्त केनेडी जे ख्रिश्चन होते पण कॅथॉलिक. सध्या रिपब्लिकन पक्षातला आघाडीवरचा उमेदवार मिट रॉम्नी मॉर्मन आहे म्हणून त्याचे निवडून यायची शक्यता कमी आहे. ओबामांनाही ते ख्रिश्चन असून मुस्लिम नाहींत हे वारंवार सांगावे लागले होते.
युरोपमध्येही असेच आहे. म्हणजे बहुसंख्यांकांपैकीच माणूस उच्च पदावर असतो.
इस्रायलमध्येही असेच आहे. म्हणजे बहुसंख्यांकांपैकीच माणूस उच्च पदावर असतो.
मध्य-पूर्वेतही असेच आहे. म्हणजे बहुसंख्यांकांपैकीच माणूस उच्च पदावर असतो.
पाकिस्तानात, बांगलादेशातही असेच आहे. म्हणजे बहुसंख्यांकांपैकीच माणूस उच्च पदावर असतो.
मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशियातही असेच आहे. म्हणजे बहुसंख्यांकांपैकीच माणूस उच्च पदावर असतो.
जपान, थायलंडमध्ये, फिलिपीन्समध्येही असेच आहे. म्हणजे बहुसंख्यांकांपैकीच माणूस उच्च पदावर असतो.
फक्त भारत 'वायला' आहे!
___________
जकार्तावाले काळे

सडकी मते

आपल्या देशात सध्या एक अल्पसंख्याक शीख धर्माचा पंतप्रधान आहे. रिमोट हातात असलेल्या सोनियाताईंचा जन्माच्या वेळी तरी धर्म कॅथॉलिक होता.

सडकी मते आणि इनसिन्युएशने.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मते सडकी कीं बरोबर हा वैयक्तिक प्रश्न आहे

आजच झी न्यूजवर दाखविले कीं सोनिया-जी (मनमोहन-जी नव्हे) सरकारात व पक्षात बदल करणार आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून पक्षात बदल करायचा त्यांचा अधिकार आहे पण सरकारात बदल करायचा अधिकार माझ्या (सडक्या?) मतानुसार पंतप्रधानांचा असायला हवा! मग माझ्या म्हणण्यात इन्सिन्युएशन कसले? खर्‍या पंतप्रधान सोनिया-जीच आहेत!
दोन महिन्यापूर्वी बुंदेलखंडमध्ये राहुल गांधींच्या दबावाखाली/प्रेमाखातर आपले पंतप्रधान बुंदेलजखंडात गेले. तिथे त्यांनी केलेल्या भाषणात राहुल यांच्याकडे निर्देश करून म्हणालेले पुढील वाक्य मी स्वत: ऐकलेले आहे कीं "हमें 'आदेश' मिला उस आदेशके अनुसार हमने बुंदेलखंडके लिये ये कदम उठाये"! राहुल यांचा पंतप्रधानाना 'आदेश'? हा शब्दांचा वापर ऐकून मला तरी लाज वाटली. हे इन्सिन्युएशन कसे?
आता एकादे मत सडके कीं बरोबर हा वैयक्तिक प्रश्न आहे. धम्मकलाडूंचे मत त्यांना लखलाभ असो आणि माझे मला! पण इन्सिन्युएशन कसे?
___________
जकार्तावाले काळे

बरे

मनमोहन सिंह हे शीख आहेत आणि सोनिया गांधी रोमन कॅथलिक होत्या असे सांगून काय मिळते/मिळाले किंवा काय मिळवता ते कळत नाही. पण एखाद्याच्या जातीचा, धर्माचा, पंथाचा हलकेच उल्लेख करून बरेच काही सुचवता येत असावे.

आजच झी न्यूजवर दाखविले कीं सोनिया-जी (मनमोहन-जी नव्हे) सरकारात व पक्षात बदल करणार आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून पक्षात बदल करायचा त्यांचा अधिकार आहे पण सरकारात बदल करायचा अधिकार माझ्या (सडक्या?) मतानुसार पंतप्रधानांचा असायला हवा! मग माझ्या म्हणण्यात इन्सिन्युएशन कसले? खर्‍या पंतप्रधान सोनिया-जीच आहेत!

चालू द्या.

दोन महिन्यापूर्वी बुंदेलखंडमध्ये राहुल गांधींच्या दबावाखाली/प्रेमाखातर आपले पंतप्रधान बुंदेलजखंडात गेले. तिथे त्यांनी केलेल्या भाषणात राहुल यांच्याकडे निर्देश करून म्हणालेले पुढील वाक्य मी स्वत: ऐकलेले आहे कीं "हमें 'आदेश' मिला उस आदेशके अनुसार हमने बुंदेलखंडके लिये ये कदम उठाये"! राहुल यांचा पंतप्रधानाना 'आदेश'? हा शब्दांचा वापर ऐकून मला तरी लाज वाटली. हे इन्सिन्युएशन कसे?

चालू द्या.

आता एकादे मत सडके कीं बरोबर हा वैयक्तिक प्रश्न आहे. धम्मकलाडूंचे मत त्यांना लखलाभ असो आणि माझे मला! पण इन्सिन्युएशन कसे?

पुन्हा तेच. मनमोहन सिंह हे शीख आहेत आणि सोनिया गांधी रोमन कॅथलिक होत्या असे सांगून काय मिळते/मिळाले किंवा काय मिळवता ते कळत नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

बहुसंख्याक ओबामा

हल्लीहल्लीपर्यंत यू.एस.मध्ये युरोपियनवंशीय लोक बहुसंख्याक मानले जात असत. (अजूनही मानले जातात. पण लेखकाचे या बाबतीत मत कळलेले नाही.) यू.एस.चा सध्याचा राष्ट्राध्यक्ष हा कृष्णवर्णीय मानला जातो (मिश्रवर्णीयांना कृष्णवर्णीय मानण्याची प्रथा असल्यामुळे).

आता बहुसंख्याक-धर्मच बघितला, म्हणा. जॉन एफ. केनडीच्या पूर्वी यू. एस.चा कोणीही कॅथोलिक अध्यक्ष झाला नव्हता. त्याच्या निवडणुकीच्या वेळी तो अल्पसंख्याक धर्माचा असल्याबाबत चर्चा यू.एस. मध्ये मोठ्या प्रमाणात झाली होती. (आता लेखकाच्या मते कॅथोलिक-प्रोटेस्टंट एकच असतील. पण या बाबतीत लेखकाच्या मतापेक्षा यू.एस. मतदारांना बहुसंख्येने काय वाटते, ते सुसंदर्भ आहे. यू.एस. मध्ये पूर्वी कॅथोलिक-विरोधी कायदे सुद्धा होते.)

ब्रिटनचा भूतपूर्व पंतप्रधान टोनी ब्लेअर हा त्याच्या पंतप्रधानपदाच्या शेवटल्या अंशात रोमन कॅथोलिक होता (किंवा त्याने धर्मांतराची अधिकृत कारवाई सुरू केली होती). ब्रिटनचा अधिकृत धर्म अँग्लिकन आहे. इतकेच नव्हे तर ब्रिटनच्या राजघराण्याचा/पार्लमेंटचा कॅथोलिकविरोधी इतिहास लक्षणीय आहे.

घटना-निधर्मी लोकशाही देशांमधली निव्वळ भूषणात्मक पदे बघता (भारतातल्या राष्ट्रपतीसारखी पदे) बहुधा बहुसंख्याक नसलेल्या धर्मातले लोक अशा पदांवरती सापडतील. पण शोधायचा मला कंटाळा आला आहे.

एक भारत देश सोडला तर इतर ठिकाणी बहुसंख्यांकच सत्तेवर येतात.

एक भारत देश सोडला तर इतर ठिकाणी बहुसंख्यांकच सत्तेवर येतात. जसे भारतात मनमोहन सिंग अथवा अब्दुल कलाम.

काळेसाहेब, तुमच्या मते हे चांगले का वाईट? तुमच्या वरील लिखाणातून ही छटा स्पष्ट होत नाही म्हणून सरळच विचारतो.

अर्थात, हे विधानहि पूर्णपणे सत्य नाही. काही उदाहरणे पहा. बेंजामिन डिझरेली हा ब्रिटनचा पंतप्रधान ज्यू होता अशी समज आहे. स्तालिन रशियन नव्हता, तो जॉर्जियन होता. त्याच्या रशियन बोलण्यावर जॉर्जियनची दाट छाया असे. अल्बर्तो फुजिमोरी हा अलीकडल्या काळातील अर्जेंटिनाचा अध्यक्ष जन्माने जपानी होता आणि त्याला त्यावरून El Chino असे म्हणत असत. ओबामांचे उदाहरण अगदी ताजे आहे. नेपोलियन कॉर्सिकन होता. भगवान दास नावाचे हिंदु गृहस्थ अगदी अलीकडच्या दिवसात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते आणि मुख्य न्यायाधीशांच्या सुटी अथवा परदेश दौर्‍यामध्ये ज्येष्ठताक्रमाने मुख्य न्यायाधीशहि राहिलेले आहेत. हिटलर ऑस्ट्रियन होता. राजेशाहीच्या दिवसात युरोपात असे अनेक राजे होऊन गेले की जे जन्माने परकीय होते. कॅनडामध्ये देवसांझ हे जन्माने भारतीय असून ब्रिटिश कोलंबियाचे मुख्यमन्त्री होते आणि आजहि कनेडियन राजकारणात ते एक महत्त्वाची व्यक्ति आहेत. श्वार्त्झेनएगर जन्माने जर्मन होता तरीहि तो कॅलिफोर्नियाचा गवर्नर झालाच. बॉबी जिंदल लुईझियानामध्ये आणि निकी हॅली (नम्रता रंधावा) साउथ कॅरोलायनामध्ये आज गवर्नर आहेत. अशी अनेक उदाहरणे सहज सुचतात.

हा विषय न संपणारा आहे!

अरविंद-जी,
माझा कॉमेंट प्रियालीताईंच्या "पण याचा अर्थ सर्व आलबेल आहे किंवा होते आहे असे वाटत नाही. हळूच डोके वर काढू पाहणारी कट्टर धार्मिकता आणि त्यासोबत येणारा दहशतवाद यांचा सामना करण्याचे उपाय येथे आहेत असे वाटत नाही." या वाक्यावर होता. या सर्व देशांत एकच बहुसंख्यांकांचा धर्म आहे व सत्ताही त्या धर्मियांकडे आहे. लोकांचा कल जर कट्टरपणाकडे झुकला तर त्यांना कोण काय करणार असे मी विचारले होते?
आपल्या देशात परिस्थिती वेगळी आहे व कुणाला पटो वा न पटो, पण आपल्याकडे बहुसंख्यांकांना 'तसा' आवाज नाहींच आहे! आपले पंतप्रधान गेली निवडणूक तोंडावर आलेली असताना म्हणाले होत कीं देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क (समान हक्क नव्हे!) अल्पसंख्यांकांचा आहे (रिसोर्सेस आणि प्रायॉरिटी हे शब्द त्यांनी वापरले होते). याचा काय अर्थ लावायचा?
आता पाच राज्यात निवडणुका तोंडावर आलेल्या असताना मुस्लिमांना राखीव जागा देण्याचे घाटत आहे. हे बरोबर आहे काय?
ही खरी निवेदने आहेत, माझी (सडकी) मतेही नाहींत आणि इन्सिन्युएशन्सही नाहींत. याचा अर्थ प्रत्येकाने आपापला लावावा, मला विचारण्याची गरज नाहीं!
बाकी राहिली आपण दिलेली उदाहरणे. पहिली गोष्ट म्हणजे मी लोकशाही राज्यपद्धतीबद्दल बोलत आहे, हुकुमशाहीबद्दल नाहीं आणि फक्त Head of State बद्दल बोलत आहे. त्यात राजेरजवाड्यांची, हुकुमशहांची, मुख्य मंत्र्यांची किंवा न्यायधीशांची नावे कशाला? मी धर्मावर बोललो त्यात जाती-उपजाती आणि वर्णभेद कशाला? केनेडींच्याबाबत तर मीच 'ते कॅथॉलिक होते' असे लिहिले होते! उद्या बॉबी जिंदल जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तरी बॉबी हे ख्रिश्चन झालेले आहेत हे आपल्याला तरी नक्कीच माहीत असेल. आणि भारतीय वंशाच्या शीख धर्मात जन्मलेल्या दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नरबाई (निकी हेली) याही ख्रिश्चन झालेल्या आहेत.
आपला देश वेगळा आहे. कुठलेही धोरण चांगले कीं वाईट हे ते धोरण योग्य प्रमाणात वापरले जाणे किंवा त्याचा अतिरेक होणे यावर अवलंबून आहे.
आपल्याकडे अतिरेक होऊ लागला असे माझे मत आहे. "वोटके लिये कुछ्भी करेंगे" ही नवी राजकीय पद्धती प्रचलित झाली आहे आणि काँग्रेसच नव्हे तर इतर पक्षही त्यांच्याकडून शिकून तयार झाले आहेत व हीच पद्धती अवलंबत आहेत. त्याला विरुद्ध दिशेने प्रतिघात (reaction) आला तर दोष कुणाचा?
असो. हा विषय न संपणारा आहे!
___________
जकार्तावाले काळे

'बोल' - पाकिस्तानी चित्रपट

'बोल' अशा नावाचा एक पकिस्तानी चित्रपट २०११ मध्ये पडद्यावर आला आहे आणि मी तो नुकताच पाहिला.

इस्लामची तथाकथित शिकवण, पुरुषी अहंकार आणि पुरुषी वरचष्मा ह्यांच्या एकत्रित परिणामातून निर्माण झालेली ही शोकान्तिका आहे. फाशीच्या देखाव्याविषयीची थोडी अतिशयोक्ति सोडली तर चित्रपट अतिशय वास्तवदर्शी आहे. भारतात, विशेषत: शहरी समाजात जाणवत नाही पण पाकिस्तानात परंपरेने वागण्यार्‍या मध्यमवर्गी घरात वातावरण कसे असते ह्याचे उत्तम चित्रण येथे पाहावयास मिळेल. तसेच हेहि दिसेल की ह्यापेक्षा वेगळे आणि freedom of choice मानणारी तरूण पिढीहि पाकिस्तानात आहे. आपल्या शेजारी राष्ट्रात काय चालू आहे हे जाणण्याची उत्सुकता असणार्‍यांना हा चित्रपट अवश्य पाहावासा वाटेल.

पूर्ण चित्रपट यूटयूबवर येथे उपलब्ध आहे.

एकंदरीत तुर्की शहरांत तरी मला धर्माचा पगडा दिसला नाहीं.....

आनंद, धन्यवाद!
याच लेखावरील दुसर्‍या एका संस्थळावरील वाचकाच्या प्रतिसादाला उत्तर म्हणून मी लिहिलेले माझे मत इथे मांडत आहे.
ही घटना जुनी-१९९३ सालची- आहे. एक तुर्की इंजिनियर जकार्ताला आमच्या कंपनीत अगदी रमजानच्या उपवासाच्या महिन्यांत कामासाठी आला होता. आमच्या कंपनीतील बहुसंख्य अधिकारी आणि कामगार मुस्लिम असल्याने (वर-वर* तरी) उपवास करत होते. त्यांनी या तुर्की इंजिनियरला उपवासाबद्दल विचारले असता त्यांने "I don't believe in this non-sense" असे उत्तर देत दुपारच्या जेवणावर ताव मारला. पण ही झाली १९९३ची गोष्ट.

मी २००७साली तुर्कस्तानला गेलो असताना इस्तंबूलला आणि (आपल्या पुण्याएवढ्या) दोन मध्यम लोकसंख्येच्या शहरांना भेट द्यायचा योग आला. तिथे नखशि़खांत बुरखाधारी महिलांपासून (नको तितक्या) आखूड मिनिस्कर्ट (कीं मायक्रो?) वापरणार्‍या स्त्रिया मला दिसल्या आहेत. थोडक्यात शहरांमध्ये तरी कुणावर काय ल्यावे याची सक्ती नाही.#

एकंदरीत तुर्की शहरांत तरी मला धर्माचा पगडा दिसला नाहीं. पण माझे तेथील तुर्की सहकारी म्हणाले कीं जास्त-जास्त महिला शरीर जास्त-जास्त झाकू लागल्या आहेत. पण हे राष्ट्र धर्मांध नसावे असेच मला वाटले.

दुसरी महत्वाची गोष्ट अशी की AK हा पक्ष धार्मिक पक्ष असला तरी तो १०० टक्के प्रामाणिकपणे घेतलेल्या अस्सल (genuine) निवडणुकांद्वारे सत्तेवर आलेला आहे. या पक्षाने अलीकडे इस्रायलविरोधी ठाम भूमिका घेऊन अमेरिकेला चांगलेच अडचणीत आणले आहे. हा देश पुढील वाटचाल कशी करेल हे अद्याप एक कोडेच आहे! पण या मुस्लिम राष्ट्रात लोकशाही रुजली आहे हे नक्की!

सुहार्तो साहेबांच्या आधी आणि नंतर इंडोनेशियातही लोकशाही होती आणि आहे. आणि सुहार्तोंना कम्युनिस्टविरोधी 'लोहपुरुष' म्हणून गादीवर कुणी आणले? अमेरिकेनेच. लोकशाही झिंदाबाद!

तुर्कस्तानमध्ये जबरदस्तीने धर्मांतर करायला लावण्याबद्दल या वाचकाने लिहिले आहे पण माझ्या वाचनात तरी अशा बातम्या आलेल्या नाहींत.

* वर-वर म्हटले कारण उघडपणे उपवास करतो म्हणणारे माझे कामगार गुपचुप खाताना मी पाहिलेले आहेत व "कुणाला सांगू नका हं" असे ओशाळवाणे हसत सांगतानाही पाहिलेले आहे. माझे निरीक्षण असे आहे कीं इथले गरीब लोक उपवास कडकपणे पाळतात (उदा. माझे आतापर्यंतचे सर्व 'सारथी'! पण सुखवस्तू लोक फक्त पहिल्या आणि शेवटच्या दिवशी पाळत असावेत. माझ्याकडे "पुख्ता सबूत" नाहींय, पण अशी उदाहरणे मी पाहिलेली आहेत.

# इथे जकार्तातही असेच आहे. जकार्ता मी १९८४पासून पहात आलो आहे व इथे पूर्वीच्या मानाने जास्त-जास्त महिला डोके झाकू लागल्या आहेत हे नक्की. म्हणजे लिपस्टिक, नेलपॉलिश आणि इतर मेक-अप असतो पण डोके झाकलेले! पण अगदी आखूड पाश्चात्य वस्त्रे वापरणार्‍या महिलाही हाजारोंनी दिसतात.

अवांतरः तुर्कस्तानमध्ये दही अगदी आपल्याकडे असते तसे गोड, घट्ट आणि सायीसकट असते. अगदी भारतात आल्यासारखेच वाटते. लोक मद्य पितात, पण मद्यार्कविरहित लोकप्रिय राष्ट्रीय पेय आहे खारी लस्सी. त्याला इथे "आयरन" म्हणतात. तसेच हलवाही (दुधी हलव्यासारखा) इथे आपल्याकडील चवी सारखाच मिळतो व लोकप्रिय आहे.

तुर्कस्तानच्या निधर्मीपणाची उदाहरणे हुमाबाईंनी दिलेली आहेत

आजच्या 'डॉन'मध्ये हुमा युसुफ या माझ्या आवडत्या स्तंभलेखिकेचा एक लेख प्रकाशित झालेला आहे. दुवा आहे: http://www.dawn.com/2011/11/07/turkey-iran-factor.html
त्यात तुर्कस्तानच्या निधर्मीपणाची उदाहरणे हुमाबाईंनी दिलेली आहेत व त्यापायी तुर्कस्तान आणि इराण या दोन मुस्लिम राष्ट्रात कसे भांडण उभे राहिले आहे हेही दिलेले आहे. लेख वाचनीय आहे. ज्यांना रस असेल त्यांनी जरूर वाचावा.
तुर्कस्तानच्या निधर्मी पणाच्या या उदाहरणांकडे पाहून कांहीं पाकिस्तानी स्तंभलेखक याची पुनरावृत्ती पाकिस्तानातही होईल अशी "मन्नत" मागत असावेत! आपण त्यांना शुभेच्छा देऊ या!
___________
जकार्तावाले काळे

 
^ वर