अहिंसात्मक प्रतिकाराचा इतिहास (भाग३: एकविसावे शतक आणि समारोप)

अहिंसात्मक प्रतिकाराचा इतिहास भाग१भाग २ मध्ये आपण विसाव्या शतकापर्यंतच्या इतिहासाचा आठवा घेतला. या भागात २१व्या शतकातील घडामोडी बघून या लेखमालेचा समारोप करणार आहोत.
शीतयुद्धातून सावरलेल्या जगाने नव्या शतकात - सहस्त्रकात प्रवेश केला आणि २१व्या शतकाची सुरवातच मोठा अहिंसक धक्का बसून झाली. हा धक्का इतका मोठा ठरला की '२१वे शतक' या मैलाचा दगड न ठरता हा दिवस म्हणजे ९/११ हा जागतिक इतिहासात मैलाचा दगड ठरला. जसे भारतात स्वातंत्र्योत्तर जग म्हणतात तसे जगात ९/११ नंतरचे जग, ९/११नंतरची पिढी असे वाक्प्रचार रूढ झाले. यानंतर अफगाणिस्तान युद्धात केवळ अमेरिकाच नव्हे तर इतरही अनेक देश उतरले. पुढे हे युद्ध संपायच्या आधीच इराक युद्ध सुरू झाले. मध्यपूर्वेत शांततेचे कितव्यांदातरी झालेले प्रयत्न फिसकटलेलेच होते आणि जगाची मध्यपूर्व खदखदत होती.

लायबेरीयामधील महिलांचा प्रतिकार

नव्या सहस्त्रकाच्या पहिल्या दशकात इतक्या हिंसक घटना चालू असताना, काही ठिकाणी मात्र अहिंसक प्रतिकार सुरू होता. शिक्षणामुळे म्हणा, स्वातंत्र्यामुळे म्हणा आफ्रिका देखील जागा होऊ लागला होता. १९९९ मध्ये लायबेरीयामध्ये 'दुसरे नागरी युद्ध' सुरू झाले होते. लायबेरियामधील सरकार विरुद्ध असलेला आक्रोश बाहेर पडत होता असे चित्र पाश्चात्य मिडियाने रंगवायला सुरवात केली होती. शेजारच्या 'गिनिया'ने पाठिंबा दिलेले हे सिविल वॉर थांबायची लक्षणे दिसेनात. २००३ मध्ये एक वेगळीच घटना घडली. लायबेरीयातील मासळी बाजारातील महिलांनी एके दिवशी समूहगानाला सुरवात केली. आणि हे समूहगान दुसऱ्या कशासाठी नसून 'हिंसा थांबावी' म्हणून केलेले कृत्य होते. या घटनेनंतर लायबेरीयामध्ये महिलांनी विविध अहिंसक पद्धती वापरून प्रतिकार केला. सर्वात रोचक प्रकार होते 'सेक्स स्ट्राईक' आणि 'शाप देण्याची भीती' घालणे. त्यांनी दोन्ही पक्षांना हिंसा थांबायला तर लावलीच शिवाय राष्ट्रपती टेलर यांना घाना येथे होणाऱ्या वाटाघाटींना उपस्थित राहायला लावलं. इथे हा प्रतिकार संपला नाही तर घानामध्ये स्त्रियांनी वाटाघाटी चाललेल्या जागेला घेराव घातला. आणि त्या इमारतीच्या बाहेर पडायचे रस्ते, दरवाजे, खिडक्या अशा सगळ्या वाटा तोपर्यंत अडवल्या जोपर्यंत वाटाघाटी पूर्ण होत नाहीत.

२००३च्याच सुमाराला रशियातून वेगळ्या झालेल्या पिलावळीपैकी एक असलेल्या युक्रेन मध्ये निवडणुका झाल्या आणि सत्ताधारी पक्ष जबर भ्रष्टाचार करून पुन्हा निवडून आला. त्यानंतर जनक्षोभ उसळला मात्र लोकांनी शस्त्र न घेता अहिंसक आंदोलन सुरू केले जे 'ऑरेंज रिवोल्युशन' म्हणून ओळखले जाते. जॉर्जियामध्येही निवडणुका झाल्यावर उसळलेला जनक्षोभ अहिंसक मार्गाने व्यक्त झाला त्याला 'रोझ रिवोल्युशन' म्हटले जाते. दुसरीकडे मध्यपूर्वेतला बंडाळींनी पिचलेला लेबननही जागा झाला होता. त्यांच्यावर सिरीयाने लष्करी कब्जा केला होता. त्याविरुद्ध युद्ध करण्याऐवजी लेबनीझ जनतेने 'सेडर क्रांती' उभी केली.


गेल्या वर्षी या अहिंसक चळवळींनी नवे वळण घेतलं कारण नवा मंच तर मिळालाच पण साधन मिळाले आणि ते म्हणजे 'इंटरनेट'. जागा २०१०-२०११ मध्ये जागा झालेला अरब प्रांताने केवळ अहिंसक चळवळी झाल्या असे नाही मात्र त्यापैकी सिरीयन चळवळ मात्र बऱ्याच प्रमाणात अहिंसक पद्धतीने चालली. या एकूणच अरब रिवोल्युशन अजून एक नवा बदल समोर आणला तो म्हणजे फेसबुक, ट्वीटर वगैरेचा वापर.

अहिंसक चळवळीमध्ये अगदी हल्ली भारतात झालेली श्री अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीचं नाव घेल्याशिवाय लेख पूर्णं करता येऊ नये. आधीचा शतकात महात्मा गांधींनी प्रभावीपणे वापरलेले उपोषण त्यांनी भारतीय राजकारण पुन्हा एकदा वापरले. त्यात ते जनमत चेतवण्यात यशस्वीही झाले (त्यांच्या मागण्या मात्र पूर्णपणे मान्य करण्यात ते अयशस्वी ठरले)

अहिंसक प्रतिकाराचा एक फार मोठा फायदा म्हणजे त्याची लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता. जनतेत असलेला असंतोष व्यक्त करण्यासाठी काही मूठभर लोकांनी शस्त्र उचलले तर तो प्रतिकार दाबला जाऊ शकतो. शिवाय शस्त्र चालवता येणे, ते खरेदी करणे, मृत्यूची तयारी असणे यामुळे अश्या प्रकारच्या प्रतिकारात कसब, आर्थिक व मानसिक कणखरता लागते. त्यामानाने प्रतिकार अहिंसक असला तर मात्र तो व्यक्त करणाऱ्याला ते कोणत्याही कसबाविना, आर्थिक गरजेविना पार पाडता येते. शिवाय हे मार्ग इतके सोपे असतात की कोणालाही त्याचा अवलंब करता यावा.

हा अहिंसक प्रतिकाराचा आढावा घेतेवेळी कित्येक वर्षे माणसाने अन्यायाविरुद्ध लढा दिलेला आपण पाहिले. अन्याय झाल्यास त्याचा प्रतिकार करणे हा गुण कोणत्याही प्राण्याप्रमाणे मनुष्य प्राण्यातही आहे. "शस्त्रामाजी शस्त्रची उत्तर" हे प्रसंगी खरं असलं तरी अनेकदा शस्त्र उचलण्याचा पर्याय असूनही जाणीवपूर्वक शस्त्र उचलणे टाळून अधिक प्रभावीपणे हा प्रतिकार केला गेला आहे. माणूस हा मुळात प्राणी आहे. त्यामुळे त्यात प्राण्याचे झगडण्याचे गुण असणारच. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरही 'युद्ध' हे कोणत्याही राजकीय प्रश्नावरचे कायमचे उत्तर नाही ही मानसिकता जगात दृढ होत चालली आहे. एक आशावाद व्यक्त करून थांबतो, की दिवस असा येईल की माणसातील हे हिंसक पाशवीपण जाऊन इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा वेगळे आचरण करणारा - माणुसकी असलेला 'माणूस' जन्म घेईल!

(समाप्त)

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रतिकार

अहिंसक चळवळीमध्ये अगदी हल्ली भारतात झालेली श्री अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीचं नाव घेल्याशिवाय लेख पूर्णं करता येऊ नये.

ठीक. पण अण्णांच्या चळवळीचा प्रतिकाराशी संबंध नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर