अहिंसात्मक प्रतिकाराचा इतिहास (भाग२: विसावे शतक)

भाग१ मध्ये आपण इ. सन २५-२६ ते १९०० मध्ये झालेल्या अहिंसक प्रतिकाराच्या काही महत्त्वाच्या घडामोडी बघितल्या. या भागात विसाव्या शतकातील महत्त्वाच्या घडामोडींचा परामर्श घेण्याचा प्रयत्न करूया.

विसावे शतक हे जितके हिंसेचे मानता यावे तितकेच अहिंसेचेही मानावे लागेल हा सर्वात मोठा विरोधाभास आहे. किंबहुना एकापेक्षा एक हिंसक आणि भयप्रद घटनांमुळेच जग अधिक अहिंसक मार्गांकडे आकृष्ट होत गेले असे म्हणता येईल का? या शतकाने दोन महायुद्धे पाहिली, अनार्यांचे शिरकाण पाहिले त्याच बरोबर महात्मा गांधी, मार्टीन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला बघितले.

विसावे शतक उजाडताना भारतही जागा होत होता. आणि भारतीय असंतोषाचे जनक ज्यांना म्हटले जाते त्या 'लोकमान्य टिळक' यांनी भारतीयांमध्ये असंतोष चेतवण्याचे काम केले होते. कोणत्याही हिंसेला हात न घालता केवळ जहाल शब्द वापरून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध असंतोष पेटवला होताच, त्यातच ब्रिटिशांनी बंगभुमीची फाळणी करायची ठरवून या असंतोषाच्या प्रकटीकरणाला कारण मिळवून दिले. जहाल समजल्या जाणाऱ्या टिळकांनी (लाल-बाल-पाल या त्रयीने) वंगभंग आंदोलन उभारले. १९०५ मध्ये त्यांनी स्वदेशी चळवळ सुरू केली. या चळवळीला मिळालेले यश हे गांधीचा राजकारणात प्रवेश होण्या अगोदर मिळालेल्या कोणत्याही आंदोलनापेक्षा अधिक होते. याच स्वदेशी चळवळीला पुढे गांधीजींनी 'स्वराज्याचा आत्मा' म्हणून गौरविले आहे.
याशिवाय त्याच सुमारास सामोआ बेटांच्या स्वातंत्र्यासाठीची मौ चळवळ ही देखील अहिंसक मार्गाने चालली होती.

मार्च १, १९१९ हा दिवस मात्र आतापर्यंतचा अहिंसक चळवळींचा इतिहास, पद्धत, त्याचा राजकीय वापर या साऱ्या परिमाणांवर बदल करणारा ठरला. "मार्च १ चळवळ" याच नावाने ओळखली जाणारी ही कोरियन चळवळ ही असहकाराचा पाया ठरली असे म्हटले तर वावगे ठरू नये. कोरियन विद्यार्थ्यांमध्ये जपानी साम्राज्यवादाविरुद्ध असंतोष होताच. त्याविरुद्ध एका गटाने १ मार्च १९१९ रोजी दुपारी २ वाजता 'स्वातंत्र्याचे घोषणापत्र' मोठ्याने वाचन केले आणि गव्हर्नर आणि पोलिसांना फोन करून आपण हे वाचन केले आहे हे स्वतःच सांगितले. त्यांना अर्थातच अटक झाली. मात्र या घटनेने अनेक कोरियन नागरिक प्रभावित झाले आणि त्यांनीही हे घोषणापत्र वाचून अटक करवून घेणे सुरू केले. असे म्हटले जाते की साधारणतः २०, ००, ००० कोरियन नागरिक १५०० हून अधिक आंदोलनांमध्ये सहभागी होते. दुर्दैवाने याचा प्रतिकार जपानी सैन्याकडून हिंसेने झाला आणि या चळवळीला हिंसक वळण लाभले. १मार्च पासून ११ एप्रिल पर्यंत ५५३ कोरियन नागरिक मारले गेले १२, ००० जणांना अटक झाली तर ८ पोलिस मारले गेले आणि १५८ जखमी झाले. चळवळीने हिंसक वळण घेतले असले तरी 'घोषणापत्राचे प्रकट वाचन आणि आपणहून केले गेले समर्पण' या अभिनव प्रकाराची नोंद अख्ख्या जगाने घेतली. महात्मा गांधींच्या 'सविनय कायदेभंगाच्या' चळवळीची प्रेरणा या लढ्यातून घेतली गेली असेही म्हटले जाते.

याचे वेळी म्हणजे १९१९ सालीच दुसऱ्या तीन देशांतही स्वातंत्र्ययुद्ध म्हणा किंवा क्रांती म्हणा सुरू होती. भारत, इजिप्त आणि आयर्लंड हे देशही साम्राज्यशाहीच्या विरोधात लढत होते. पैकी इजिप्तमधील चळवळ ही बरीचशी हिंसक असली तरी प्रसंगी अहिंसक मार्ग अवलंबिले जात होते. तर आर्यलंडमध्ये 'असहकार चळवळ' पुकारली होती व जनतेने कर देणे बंद केले होते. 'आयरिश असहकार चळवळ' म्हणून ही चळवळ प्रसिद्ध आहे. त्याच वेळी (१९२०) महात्मा गांधी यांनी जगप्रसिद्ध भारतीय 'असहकार चळवळ' सुरू केली. आपल्या सगळ्यांनाच ती चळवळ माहीत आहे. त्यामुळे इथे त्याबद्दल लिहायचे टाळतो. ही चळवळ मात्र अचानक संपुष्टात आली. चौरीचौरा येथील हिंसक घटना झाल्यामुळे श्री. गांधी यांनी ती चळवळ तत्त्वाला धरून मागे घेतली गेली.

पहिले महायुद्ध संपल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. जगाच्या क्षितिजावर दुसऱ्या महायुद्धाची लक्षणे दिसू लागली होती. मात्र भारतात एक अशी घटना घडणार होती की ज्यामुळे भारतीय स्वातंत्र्यसमरात 'असहकार चळवळ' आणि 'स्वदेशी चळवळ' या दोन्ही चळवळींपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात व व्यापक स्तरावर लोकांचा सहभाग झाला. अर्थातच ती महात्मा गांधींनी सुरू केलेली 'सविनय कायदेभंगाची चळवळ'. आतापर्यंत एका ठराविक (शैक्षणिक / सामाजिक) स्तरात आणि वयाच्या लोकांमध्ये चेतवला गेलेला प्रतिकार या चळवळीमुळे घराघरात पोहोचला. या चळवळीची प्रेरणा वर उल्लेखलेली १ ऑगस्ट ची चळवळ व श्री थोरो यांच्या निबंधाचा प्रभाव मानली जाते.

मात्र याच सुमारास दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि अहिंसा ही कविकल्पना आहे की काय असे वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली. या काळात सगळे जग हिंसेच्या प्रभावाखाली होते. म. गांधी यांनी देखील ब्रिटिश महायुद्धांत गुंतले असताना त्यांना खिंडीत गाठायचे नाही अशी भूमिका घेतल्याने भारतातही एक प्रकारची राजकीय शांतता होती. पुढची गाजलेली अहिंसक चळवळ भारतातच "भारत छोडो" च्या रूपात झाली आणि संपली ती भारताला स्वातंत्र्य देऊन.

पुढे लवकरच महात्मा गांधीच्या हत्येने एका अहिंसक पर्वाचा शेवट झाला असला तरी गांधीजी जाऊनही जगात त्यांचा प्रभाव तसाच चिरंतन राहिला. त्यांच्या या तत्त्वाने पुढे अनेक राजकीय पुढारी घडले. भारताला स्वातंत्र्य मिळत असताना तिथे 'दक्षिण आफ्रिकेतही' पिचलेला कृष्णवंशीय - आशियाई समाज वंशभेदाविरुद्ध एकत्र येत होता. अर्थात हा लढा कोणत्याही स्वातंत्र्य-चळवळीप्रमाणे पूर्ण अहिंसक नसला तरी विविध मार्गाने प्रयंत करणाऱ्यांपैकी एकाचे नाव होते नेल्सन रोलिह्लह्ला मंडेला. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावीत असलेल्या या नेत्यांने अहिंसक चळवळींचे आवाहन केले आणि बघता बघता त्याच्या मागे जनता एकवटली. मात्र स्थानिक राजकारणाने या नेत्याला आपले 'अहिंसक आंदोलन' करणे अशक्य झाले व पुढे त्यांनी 'गनिमी काव्याने' युद्धांचे नेतृत्त्व केले.

>शतकाच्या पुर्वार्धात भारतीयांनी दिलेल्या अहिंसक मार्गावरून पुढे अनेक देश चालल्याचे दिसते. मात्र त्यातीत सगळ्यात गाजला तो आफ्रिकन-अमेरिकन नागरीकांचा समान नागरी अधिकारांसाठीचा लढा. या लढ्याने अमेरिकेलाच नव्हे तर जगापुढे एक नवा नेता आणला 'मार्टीन ल्युथर किंग'. जगातील इतर अनेक नेत्यांप्रमाणे हा देखील गांधीजींच्या विचारांनी प्रभावीत होता. [ही अमेरिकन चळवळ हा पुन्हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होईल. त्यामुळे त्याबद्दल फक्त उल्लेख करतो. अवांतरः या चळवळीवर अनेक पुस्तके, चित्रपट लिहिले गेले मात्र बस मध्ये बसू न दिल्याने रोज घरापासून चालत जाणाऱ्या एका नोकराणीने घडवलेल्या इतिहासावर आधारित लाँग वॉक होम मात्र बघायलाच हवा असा! ] याशिवया इतर काही अमेरिकेतिल घटनांनाचा, चळवळींचा उल्लेखही करणे क्रमप्राप्त आहे.
त्यातील एक आहे चिकानो चळवळ. मेक्सिकन-अमेरिकन नागरीकांच्या नागरी हक्कांसाठीची ही चळवळ आफ्रिकन-अमेरिकनांच्या बरोबरीने लढली गेली. या शिवाय व्हिएतनाम युद्धाविरुद्ध झालेले स्वयंस्फुर्त प्रदर्शन, दुसरा स्त्रीमुक्ती लढा , दुसऱ्या महायुद्धानंतर झालेलेल्या आण्विक विस्तारवादाविरुद्ध उभी राहिलेली 'कमिटी फॉर नॉन व्हॉयलंट अॅक्शन' ही संस्था ही उदाहरणे देखील उल्लेखनीय आहेत.

 

याशिवाय १९८६, ८७ मधील पोलंड मधील ऑरेंज अल्टरनेटिव, फिलिपीन्स मधील जनाअंदोलन यांनी देखील सविनय कायदेभंगांचीच वाट चोखाळली. या दरम्यान अजून दोन वैविध्यपूर्ण अश्या पद्धतीने झालेल्या चळवळींचा उल्लेख करावा लागेल. एक 'सिंगिंग मुव्हमेंट' म्हणून ओळखली जाते. बाल्टिक प्रदेशांतील देशांतील जवळजवळ ४० लाख नागरीकांनी एकावेळी राष्ट्रगीत गाण्याचा प्रसंग एकाचित येऊ शकेल पण इथे ते गायलं जात होते ते राष्ट्रगीतावर बंदी असताना!! दुसरी चळवळ १९८९ ला सुरू झालेली 'वेल्वेट क्रांती' ही चेकोस्लोवाकीया मधील नागरीकांनी मोठ्या रंजक प्रकाराने केली त्यांनी रशियन सैनिकांना फुले देणे सुरू केले. 'पॅसिव रेझिस्टन्स'च नव्हे तर अश्या कृती, मजेशीर घोषणा याद्वारे त्यांनी रशियन सैनिकांना पुरता वात आणला होता. याशिवाय भारतात जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेला 'दुसरा स्वातंत्र्यलढा' बर्‍याच प्रमाणात अहिंसक होता, तोही याच शतकातील.

असो, अजून बरीच यादी आहे. तुर्तास इथे थांबतो. या लेखमालेतील एकेक भाग एक लिहिताना जाणवले की खरंतर या विषयाचे धनुष्य पेलणे माझ्यासारख्याचे काम नाही. याचे कारण विषयाची व्याप्ती प्रचंड आहे आणि त्या तुलनेत माझे वाचन अत्यल्प आहे. तरीही जे सुरू केले आहे ते माझ्या परीने संपवणे गरजेचे वाटल्याने मला जितक्या स्मरतील तितक्या महत्त्वपूर्ण घटना इथे दिल्या आहेत. या प्रसंगांव्यतिरिक्त अनेक प्रसंग असतील- नव्हे आहेतच- त्याची भर मिपाकरांनी घालावी अशी विनंती

टिपः चित्रे विकीपिडीयावरून घेतली आहेत. प्रताधिकार मुक्त आहेत

लेखनविषय: दुवे:

Comments

शुद्धीपत्र

लेख मिसळपाव.कॉम वर येथे पूर्वप्रकाशित आहे. इथे देताना कॉपी पेस्ट केल्याने मिपा/मिपाकर वगैरे शब्द असणारी वाक्य चुकून तशीच राहिली आहेत. तेथे उपक्रम / उपक्रमी असे वाचावे. (संपादकांनी अख्खा लेख वाचून दुरूस्ती केल्यास चांगलेच मात्र आग्रह नाही:) )

याआधीचा भाग उपक्रमावर इथे वाचता येईल

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

मस्त! काही भर....

विसावे शतक हे जितके हिंसेचे मानता यावे तितकेच अहिंसेचेही मानावे लागेल हा सर्वात मोठा विरोधाभास आहे.
१००% सहमत. ह्यापूर्वी कधीही काही लाख लोक रस्त्यावर आल्यावर आंदोलन शांततामय राहिले नव्हते.आणि ह्यापूर्वी कधीही इतका(अणूयुद्ध+ दुसर्‍या महायुद्धाची प्रत्यक्ष्-अप्रत्यक्ष जीवितहानी) अफाट नरसंहार झाला नव्हता.(अपवादः- १२ व्या शतकात मंगोलांनी केलेला अतुलनीय नरसंहार आणि १६-१७ व्या शतकात झालेले अमेरिकेतील मूळ रहिवाशंचे सरसकट निर्वंश.)
किंबहुना एकापेक्षा एक हिंसक आणि भयप्रद घटनांमुळेच जग अधिक अहिंसक मार्गांकडे आकृष्ट होत गेले असे म्हणता येईल का?
काही प्रमाणात होय. सगळ्यांकडेच/सगळ्यांच्याच सहकार्‍यांकडेच अणुबाँब असल्यावर गपगुमान आंतरराष्ट्रिय चर्चेला आणि वाटाघाटींना बसावं लागतं, तसं म्हणता येइल.

या शतकाने दोन महायुद्धे पाहिली
दोनमहायुद्धे+ एक प्रदीर्घ शीतयुद्ध; ज्यात पाचेक दशकाच्या अवधीत मर्यादित पण सातत्याने नुकसान होत राहिल्याने कुणाच्या डोळ्यावर आले नाही इतकेच.

, अनार्यांचे शिरकाण पाहिले
आपण का आर्य्-अनार्य शब्द वापरतो तेच कळत नाही. ज्यांनी नरसंहार केला ते स्वतःला "Nordic" म्हणवुन घेताना वाचलेले आहेत. "आर्य " नाही.

जहाल समजल्या जाणाऱ्या टिळकांनी (लाल-बाल-पाल या त्रयीने) वंगभंग आंदोलन उभारले. १९०५ मध्ये त्यांनी स्वदेशी चळवळ सुरू केली. या चळवळीला मिळालेले यश हे गांधीचा राजकारणात प्रवेश होण्या अगोदर मिळालेल्या कोणत्याही आंदोलनापेक्षा अधिक होते. याच स्वदेशी चळवळीला पुढे गांधीजींनी 'स्वराज्याचा आत्मा' म्हणून गौरविले आहे.

ह्यांचे कार्य निश्चितच थोर आहे, पण त्याच काळाच्या आसपास, थोडेसे आधी सावरकरांनीही विदेशी कपड्यांची होळी केली होती, ह्याचे विस्मरण वारंवार होताना दिसते.(इथेच म्हणुन नाही, बर्‍याच भारतीय आंदोलनांच्या उल्लेखात)

म. गांधी यांनी देखील ब्रिटिश महायुद्धांत गुंतले असताना त्यांना खिंडीत गाठायचे नाही अशी भूमिका घेतल्याने....
तेव्हा गांधींनी थेट "युद्धासारख्या कुठल्याही हिंसक कामात मदत करणे चूक आहे" असे म्हणत युवकांना अप्रत्यक्षपणे "सैन्यात भरती होउ नका" असा संदेश देउन ब्रिटिशांची गोची केली होतीच.(ह्याउलट सावरकर "लवकरात लवकर आणि अधिकाधिक लोकांनी भरती व्हावे" असे वेगळ्याच एका, दूरदर्शी उद्देशाने म्हणत, पन ते अवांतर.)
पुढची गाजलेली अहिंसक चळवळ भारतातच "भारत छोडो" च्या रूपात झाली आणि संपली ती भारताला स्वातंत्र्य देऊन.

ही चळवळ १९४२-१९४७ अशी चालली असा भारतीयांचा समज करुन देण्यात आलेला आहे. खरे तर ऑगस्ट१९४२ मध्ये सुरु झालेली चळवळ सप्टेंबर१९४२ अखिरीपर्यंत काबुत आणली गेली होती; ब्रिटन सरकार धास्तावले ते खरे तर नौदलाच्या बंडातुन १९४४-१९४५ च्या आसपास; जेव्हा १८५७च्या हिंस्त्र आठवणींनी आता महायुद्धोत्तर गलितगात्र झालेल्या इंग्रज शासनच्या पोटात गोळा आला तेव्हा.(हे मत आहे भारताला स्वातंत्र्य देताना ब्रिटनच्या पंतप्रधानपदी असणार्‍या अ‍ॅटली ह्यांचे! पण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते असे वाटु लागले आहे.) अर्थात अहिंसक आंदोलनाने ज्या विराट प्रमाणावर देशभर जनभावना मांडुन संभाव्य धोक्याचा इशारा दिला तोही महत्वाचा आहेच.

नेल्सन मंडेला आणि द.आफ्रिका ह्याबद्दल एक शंका आहे. तिथे नक्की राज्य कुणाचे आहे/होते? जर ब्रिटिशांचे राज्य होते, तर "दुष्ट वर्णभेदी" कुणीकडचे असे म्हणत द्.आफ्रीकेला २०-३० वर्षे क्रिकेटपासुन दूर का ठेवले? ब्रिटिश जर वर्नभेद करत होते, तर ब्रिटनवर बंदी हवी ना? ब्रिटनची राणी ही कुथल्याही वसाहतीची असते तशी द. आफ्रिकन वसाहतीचीही राणी होती ना?

आता मार्टिन ल्युथर किंग ह्यांच्याबद्दल. प्रचंड कर्तृत्व असणार्‍या आणि स्वतःला गांधींचा अनुयायी मानणार्‍या किंगना शांततेचा नोबेल मिलाला, पण खुद्द गांधींना नाही; असे का असावे?

एक अवांतरः- सध्या पाकिस्तान्-बांग्लादेश हे भारताला गोत्यात आणण्यासाठी प्रचंड,कल्प्नातीत प्रमाणावर खोट्या भारतीय नोटा छापुन धो-धो भारतात पाठवताहेत, इतके की २५-३०% चलन हे लवकरच खोट्या नोटांचे होइल.(ही बातमी टाइम्स का DNA मध्ये छापुन आली होती पण पद्धतशीर रित्या सगळीकडुन गायब करण्यात आली.)
ह्याला छुपे-अहिंसक आंदोलन म्हणता येइल का? ;-)

आणि हो, लेखमाला व लेखविषय आवडला.

चांगली लेखमाला

चांगली लेखमाला.

थोडी जास्त वेगवान झाली खरं. पण असो.
_____________________________________________________________________________________
सुतो वा सूतपुत्रोवा यो वा को वा भवाम्यहम् |
दैवायत्ते कुले जन्म मदायत्तं तु पौरूषम्॥

चांगला आढावा

चांगला आढावा

दोन्ही भाग

दोन्ही भाग एकत्रित वाचले. खूप छान माहिती मिळाली.

भाग-१ मधील 'अश्रूंची पाऊलवाट' मुळे एकूणच अमेरिकेतील रेड इंडियन्स यांचा न्यायपूर्ण हक्काचा लढा आणि पिढ्यानपिढ्या होत असलेले त्यांचे 'मागासलेले' असे अमेरिकन चित्रण यांची आठवण आली. मार्लन ब्रॅंण्डोने याच कारणासाठी 'गॉडफादर' साठी मिळालेले ऑस्कर नाकारणे आणि त्यामागील भूमिका विशद करण्यासाठी साशीन् लिटलफीदर या रेड इंडियन युवतीलाच थेट ऑस्करच्या प्लॅटफॉर्मवर पाठविणे अन् तिने 'रेड इंडियन्सना अमेरिकेत मिळत असलेली वागणूक' यावर केलेले संक्षिप्त भाषण, जे मूळचे ब्रॅण्डोचेच होते... या सार्‍या घटना नजरेसमोर आल्या.

(अवांतर होणार नसल्याने एक शंका विचारीत आहे : वर्णवर्चस्वाचा मुखवटा मिरविणार्‍या 'केकेके' विरूद्धचा संघर्ष - जो बहुतांशी शांततामय मार्गानेच जात होता - तुमच्या या धाग्याच्या विषयकक्षेत येईल का ?)

धन्यवाद

केकेके या हिंसक क्लॉक्सविरुद्धचा संघर्ष शांततामय मार्गाने होताच. जरी त्याला पूर्णपणे धार्मिक म्हणता येणार नसले तरी ख्रिस्ती मुलतत्त्ववाद्यांनी हा गट बनवला होता. असो. हा संघर्ष लेखाच्या विषयकक्षेत नक्कीच येईल.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

चांगली माहिती

लेख कालच वाचला होता. प्रतिसाद देणे राहून गेले. :-(

माहिती चांगली संकलित केली आहे.

 
^ वर