अहिंसात्मक प्रतिकाराचा इतिहास (भाग१: इ.सन २५-२६ ते १९००)

भारताला आणि भारतीयांना अहिंसात्मक प्रतिकाराची ओळख असली तरी त्याचा राजकीय वापर श्री. मोहनदास करमचंद गांधी यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध प्रभावीपणे केला आणि त्याची दखल अख्ख्या जगाने घेतली. पण म्हणजे गांधीजींचा प्रयोग जगात अहिंसात्मक प्रतिकाराचा पहिलाच प्रयत्न होता का? का याआधीही असे लढे लढले गेले होते? त्यात कितपत यश आले होते? वगैरे अनेक प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे आपण या ३ लेखांच्या लेखमालेतून शोधायचा प्रयत्न आपण करणार आहोत. मला मिळालेली माहिती इथे लेखाच्या रूपात मांडत आहे. त्यात उपक्रमी अधिकची भर घालतीलच अशी खात्री आहे.
अहिंसेवर आधारित राज्य असा इतिहास बघायला लागलो तर पहिला संदर्भ इसवीसन पूर्व ४७० ते ३९१ मधील चायनामधील 'मोहिझम' या तत्त्वाने राजवट करणाऱ्या 'मोहिस्ट' लोकांना जातो. या मंडळींचा 'युद्ध' या संकल्पनेला विरोध होता. मात्र तो काळ युद्धाचा असल्याने त्यांनी किल्ले मात्र बांधलेले होते. थोडक्यात ही पद्धत 'लढा' या पद्धतीतली नसून "बचाव" या पद्धतीचा अधिक होती असे दिसते. त्यामुळे त्याची अधिक माहिती या लेखात देणे योग्य वाटत नाही.

या इतिहासात पहिल्या ज्ञात अहिंसात्मक राजकीय 'विरोधाचा' मान बहुदा ज्यू मंडळींकडे जातो. 'पाँच्यस पायलट' च्या राजवटीत त्याने सिएस्रा येथे रोमन चिन्हे उभारायची ठरवली होती. त्यातील 'रोमच सम्राट' आणि ' गरूडाचे' चिन्ह ज्यू लोकांमध्ये निषिद्ध समजले जात होते. त्यांनी याचा प्रतिकार करायचा ठरवला. ते एका चौकात जमून निदर्शने करू लागले. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी स्वतः पाँच्यस पायलटला यावे लागले. मात्र हा लढा यशस्वी झाला नाही व हे निदर्शने करणाऱ्यांना मारण्यात आले होते. या अयशस्वी विरोधाचे वर्णन मात्र वेगळे-वेगळे केले जाते. काही लेखनात पाँच्यसने सैनिकांच्या गराड्यात या विरोध करणाऱ्यांची सभा घेतली व त्यांना मारण्यात येईल अशी धमकी दिली तेव्हा ज्यू लोकांनी 'लॉ ऑफ तोरा' न पाळण्यापेक्षा आम्ही मरणे पसंत करू असे सांगितले व मरण पत्करले असे वर्णन आहे तर काही लेखांत पाँच्यसने ज्यू गटांत आपले हेर पाठवले होते. व एकीकडे त्यांच्यापुढे भाषण करताना अचानक हेरांनी हल्ला चढवून ज्यूंना मारल्याचे सांगितले जाते.


या अयशस्वी लढ्यानंतर अनेक अयशस्वी प्रयत्न न्यूझीलंड, इंग्लंड इथे झाल्याच्या नोंदी आहेत. मात्र पहिला यशस्वी प्रयत्न म्हणून त्यातील १८१९चे पीटरलूचे शिरकाण प्रसिद्ध आहे. ६०००० ते ८०००० लोकांच्या जमावाने ब्रिटिश संसदेच्या प्रतिनिधित्वाच्या ढाच्यात बदल करावा या मागण्यांसाठी मँचेस्टर येथील 'सेंट पीटर'स फील्ड' येथे शांततामय निदर्शने केली होती. तेव्हाच्या स्थानिक न्यायाधिकाऱ्यांनी सैनिकांना कारवाईचे आदेश दिले. या निदर्शनात १५ जण मारले गेले तर शेकडो जखमी झाले. मात्र याचा परिणाम असा झाला की राज्यकर्त्यांना संसदीय प्रतिनिधित्वाचा ढाचा अखेर बदलावा लागला.

१८३४-३८ मधील त्रिनिदादची गुलामगिरीपासून मुक्ततेचा लढा हा कोणत्याही हिंसक घटने शिवाय (दोन्ही बाजूने) झालेला पहिला बदल म्हणता येईल. ब्रिटीशसरकारने गुलामगिरी संपवणारा कायदा घोषित केला. त्याच्या नुसार १८४०पर्यंत (पुढील ६ वर्षात) गुलामगिरी बंद करणे आवश्यक होते. १ ऑगस्ट १८३४ रोजी वयस्क आफ्रिकन-अमेरिकन जमावापुढे या नव्या कायद्याचे वाचन करण्यासाठी जेव्हा गव्हर्नर उभा राहिला तेव्हा या जमावाने 'Pas de six ans. Point de six ans' (सहा वर्षे नाहीत, सहा वर्षे नकोत) हे एकच वाक्य एकत्रितपणे बोलायला सुरवात केली. यामुळे गव्हर्नरला कायद्याचे वाचन करणे अशक्य होऊन बसले. हा लढा पुढे फोफावत गेला व तोपर्यंत चालला जोपर्यंत सरकारने याला तत्त्वतः मान्यता दिली नाही. शेवटी ब्रिटिशांना कायद्यात बदल घडवून १८३८ रोजी गुलामगिरीतून त्रिनिदादला मुक्त करावे लागले

या शिवाय इतरत्र छोटे लढे यशस्वी होऊ लागले होते. मात्र प्रत्येक लढ्याला यश येतच होते असे नाही. १८३८ मधील 'करौकेची हकालपट्टी' किंवा 'अश्रूंची पाऊलवाट'
हे अश्याच अयशस्वी लढ्याचे प्रसिद्ध उदाहरण. 'न्यू एकोटा करारा'नुसार (रेड)इंडियन्सना त्यांच्या ' चेरकी भुमी'तून (म्हणजे हल्लीचे जॉर्जिया, टेक्सास, टेनेसी, अलाबामा आणि उत्तर कॅरोलिना) पश्चिमेकडील 'इंडियन भुमी'त हाकलण्यात आले होते. बहुतांश इंडीयन्सने त्याला विरोध केला. स्वतःहून भाग रिकामा करण्याची तारीख येऊनही त्यांनी आपले कोणतेही सामान विकले नाही, शिवाय त्यांनी आपले सामान बांधलेही नाही. या कराराला आम्ही मानत नाही असे त्यांनी घोषित केले. मात्र वाट बघून कंटाळलेल्या फौजांनी शेवटी त्यांना (प्रसंगी नेसत्या वस्त्रानिशी) तेथून हाकलले. या मार्गाला अजूनही 'Nu na da ul tsun yi' (ते जिथे रडले) तो मार्ग असे म्हटले जाते.

पहिल्या महायुद्धाच्या आधी, न्यूझीलंड मधील सविनय कायदेभंगही फार गाजला होता. परिहाका हे त्या आंदोलनाचे केंद्र होते. ब्रिटिशांनी तिथे पाय रोवले व तेथील जमिनीवर हक्क सांगायला सुरवात केली. तेथील जनतेने व राजाने याविरोधात लढा सुरू केला. परिहाकाच्या गावकऱ्यांनी हडपलेल्या शेतजमिनी नांगरायला आणि त्याभोवती स्वतःची कुंपणे घालायला सुरवात केली. ब्रिटिश सरकारने ही चळवळ दडपण्यास सुरवात केली. त्यांच्या नेत्यासकट शेकडो जणांना कोणत्याही ट्रायल शिवाय तुरुंगांत डांबले गेले. तरीही चळवळ सुरू राहिली. शेवटी हॉल गव्हर्नमेंटने स्थानिकांविरुद्ध सशस्त्र लढा आरंभला. त्यावेळी झालेल्या हिंसेला वैतागून माओरी राजा ताहिकोने भाषण केले ज्यात म्हटले होते की "आम्ही रक्तपाताला वैतागलो आहोत. एक राजा असून मी माझी शस्त्रे गाडून टाकली आहेत. आता या भूमीवर रक्तपात सहन करणार नाही आणि कोणत्याही रक्तपातात सामीलही होणार नाही... " या भाषणाचा माओरी जनतेवर इतका प्रभाव होता की पुढे झालेल्या पहिल्या महायुद्धात एकही माओरी सैनिक सामील झाला नाही

सविनय कायदेभंग म्हणताना हेन्री थोरो चा उल्लेख होऊ नये असे होणे कठीण आहे. खरंतर तो वेगळ्या लेखाचा विषय असल्याने इथे विस्तार भयाने केवळ उल्लेख करत आहे. जाचक कर भरण्यास नकार देऊन त्याने या पद्धतीची सुरवात केली. पुढे कर न भरल्याने त्याला कैद झाल्यावर 'सविनय कायदेभंग' नावाचा निबंध त्याने तुरुंगात लिहिला होता. या निबंधाचे पुढे महात्मा गांधी, मार्टीन ल्युथर किंग यांनी अनेकदा स्वागत - उल्लेख केलेला आढळतो

(क्रमशः)

Comments

छान

लेख आवडला, पुढील भागांची वाट पाहतो आहे. पहिलेच उदाहरण ज्यू धर्मीयांचे पाहून 'For sufferance is the badge of all our tribe' आठवलं. 'ट्रेल ऑफ टिअर्स' मध्ये चोखाळलेला अहिंसेचा मार्ग हा बहुतेक अपरिहार्य पर्याय असावा. थोरोप्रमाणेच अंडरग्राऊंड रेलरोड बद्दलही वाचायला आवडेल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

+१

हेच म्हणतो. उत्तम ओळख. क्रमश: भाग वाचायला उत्सुक.

चांगली माहीती

चांगली माहीती.

पुढच्या भाग लवकरच येउद्या.

जाता जाता:
चौथ्या परिच्छेदामधे (त्रिनिदाद) सन थोडे उलटसुलट झाल्यासारखे वाटताहेत.

_____________________________________________________________________________________
सुतो वा सूतपुत्रोवा यो वा को वा भवाम्यहम् |
दैवायत्ते कुले जन्म मदायत्तं तु पौरूषम्॥

अरे हो की!

अरे हो की! नजरेस आणल्याबद्दल आभार
संपादक मंडळास विनंती की लेखात पुढील बदल करावेत:

  • करौकी हा शब्द बदलून चेरकी असा शब्दबदल करावा
  • त्रिनिदादच्या परिच्छेदात जिथे जिथे विसावे शतकातील वर्षे टंकली गेली आहेत ती १९व्या शतकाटील करावीत (१९४० --> १८४० व १९३८ --> १८३८)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

काही उदाहरणे राहिली आहेत्....

१. पहिल्या काही शतकात झालेला ख्रिश्चन धर्माचा प्रसार. येशुला क्रुसावर चढवल्यावर काही वर्षातच त्याचा निकटचा सहकारी व भक्त सेंट पॉल ह्यालाही क्रुसावर चढवण्यात आले. मात्र, त्याने आपली धार्मिक निष्ठा सोडली नाही, लोकांना हिंसेला उद्युक्त केले नाही. हा त्याने रोमन सत्तेविरुद्ध व pagen धर्माविरुद्ध(तत्कालीन ख्रिस्तपूर्व ग्रीको-रोमन् मूर्तिपूजकांविरुद्ध) केलेला नि:शस्त्र प्रतिकारच होता.
२. मुस्लिम- मुघल व प्रस्थापित धर्मांच्या सत्तेच्या विरोधात सुरुवातीच्या काळात गुरुनानक ह्यांनी केलेले कार्य्/आंदोलन.
३. ज्ञानेश्वरांनी रुढीवादी सत्तेला आव्हान देत तत्कालिन लोकभाषेत आणलेली गीता.
४.एकनाथांनी बुरसटलेले विचार दूर सारत (तेव्हाच्या) अस्पृश्याच्या लेकराला जवळ केले ती घटना. ह्या घटनेने पुधे एकनाथांचा बराच छळ झाला. पण त्यांनी आपले कार्य सुरुच ठेवले. आपल्या मतावर ते थाम राहिले. हा ही एक प्रकारचा प्रतिकारच नव्हे काय?
५. गुरु तेघबहादूरः- काही काश्मीरी पंडित वा इतर हिंदुंचा मुस्लिम होण्यासाठी औरंगजेबाच्या आदेशावरुन छळ सुरु होता. हे कळताच गुरु तेघबहादूर ह्यांनी औरंगजेबाकडे निरोप धाडला की "त्या सामन्यांचा छळ करण्यापेक्षा तु माझे मत परिवर्तन करुन दाखव, माझे सर्व अनुयायी तुझ्या म्हणण्यानुसार वागतील. " हे ऐकताच औरंगजेबाने बलप्रयोग सुरु केला. गुरु तेघबहादूर ह्यांनी कुठलाही सशस्त्र प्रतिकार केला नाही. त्यांना अटक झाली. "मी माझा धर्म केवळ जिवाच्या भीतीने बदलणार नाही" असं थेट औरंगजेबाच्या दरबारात सांगितल्याने शिखांचे गुरु तेघबदूर ह्यांना देहांत शासन करण्यात आले. पण आपल्या भूमिका त्यांनी कायम ठेवली. जीवाच्या भयाने त्यांनी गुढघे टेकले नाहित.
हाही अहिंसक प्रतिकारच होय.

अवांतरः- श्री कृष्णाने आकाशात बसलेल्या तथाकथित सर्वशक्तिशाली इंद्राची पूजा सोडून देउन त्याऐवजी आख्ख्या गोकुळास आपल्याला प्रत्य्कषात दहि-दूध देणार्‍या व उपजिविकेत हरप्रकारे मदत करणार्‍या गो-वंशाची पूजा करण्यास सांगितले. इंद्र कोपल्यावर स्वतः गो-वर्धन पर्वत उचलला; हा ही अहिंसक आंदोलनाचाच प्रकार होय.
गौतम बुद्धाचेही तसेच. पण ह्यापैकी एक पुराणपुरुष तर दुसरा इसपूर्व काळातील, दिलेल्या कालमर्यादेत(इ स २५ च्या पुढे ते येत नाहित म्हणुन स्वतंत्र टंकले.)
--मनोबा

आभार+

काहि काय बरीच उदाहरणे राहिली आहेत त्याबद्दल सहमत. विस्तार भयाने मला जी महत्त्वाची वाटली + आठवली तीच उदाहरणे टाकली आहेत व बाकीची भर उपक्रमींना घालायला सांगितली आहे ;)
भर घातल्याबद्दल आभार!
ज्या पाच गोष्टी सांगितल्या आहेत त्याबद्दल माझे मतः

१. पहिल्या काही शतकात झालेला ख्रिश्चन धर्माचा प्रसार.:

२. मुस्लिम- मुघल व प्रस्थापित धर्मांच्या सत्तेच्या विरोधात सुरुवातीच्या काळात गुरुनानक ह्यांनी केलेले कार्य्/आंदोलन.

सहमत आहे असे धार्मिक प्रतिकार काही ठिकाणी नि:शस्त्र असल्याची उदा आहेत. धार्मिक/धर्माधिष्ठीत प्रतिकार लेखात जाणिवपूर्वक टाळले आहेत.

३. ज्ञानेश्वरांनी रुढीवादी सत्तेला आव्हान देत तत्कालिन लोकभाषेत आणलेली गीता.

४.एकनाथांनी बुरसटलेले विचार दूर सारत (तेव्हाच्या) अस्पृश्याच्या लेकराला जवळ केले ती घटना. ह्या घटनेने पुधे एकनाथांचा बराच छळ झाला. पण त्यांनी आपले कार्य सुरुच ठेवले. आपल्या मतावर ते थाम राहिले. हा ही एक प्रकारचा प्रतिकारच नव्हे काय?

सहमत आहे. हा ही एकप्रकारचा अहिंसक प्रतिकारच झाला. त्यामुळे समाजात बर्‍याच स्तरांवर खळबळ माजली हे खरेच आहे.

५. गुरु तेघबहादूरः- काही काश्मीरी पंडित वा इतर हिंदुंचा मुस्लिम होण्यासाठी औरंगजेबाच्या आदेशावरुन छळ सुरु होता. हे कळताच गुरु तेघबहादूर ह्यांनी औरंगजेबाकडे निरोप धाडला की "त्या सामन्यांचा छळ करण्यापेक्षा तु माझे मत परिवर्तन करुन दाखव, माझे सर्व अनुयायी तुझ्या म्हणण्यानुसार वागतील. " हे ऐकताच औरंगजेबाने बलप्रयोग सुरु केला. गुरु तेघबहादूर ह्यांनी कुठलाही सशस्त्र प्रतिकार केला नाही. त्यांना अटक झाली. "मी माझा धर्म केवळ जिवाच्या भीतीने बदलणार नाही" असं थेट औरंगजेबाच्या दरबारात सांगितल्याने शिखांचे गुरु तेघबदूर ह्यांना देहांत शासन करण्यात आले. पण आपल्या भूमिका त्यांनी कायम ठेवली. जीवाच्या भयाने त्यांनी गुढघे टेकले नाहित.
हाही अहिंसक प्रतिकारच होय

माहितीबद्दल आभार. ही घटना मला माहित नव्हती

बाकी अवांतरातील बुद्धाने थेट प्रतिकार केल्याचे म्हणता येईल का?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

"वेद थापाडे आहेत"

"वेद थापाडे आहेत", "स्वर्ग मोक्ष ह्या भ्रामक कल्पना आहेत", "यज्ञाने काही तुम्हाला वाटतो तसा देव वगैरे अजिबात प्रसन्न होणार नाही."
हे इ स पूर्व ५०० मध्ये स्पष्ट शब्दात सांगितले ते बुद्धानेच. स्वतःच्या अनुभवाशिवाय कशावरही विश्वास ठेवु नका. यज्ञयागातील हिंसा त्याज्य समजा. हे त्या काळात वैदिक चालीरितींचा प्रचंड पगडा असताना सांगणे म्हणजे थेट विरोध म्हणता यावा. आज प्रचंड वैज्ञानिक प्रगतीमुळे बर्‍याच गोष्टींची आणि नैसर्गिक घटनांची तर्क संगत माहिती आपल्याकडे आहे. त्या काळात ती अजिबात नसतानाही जे काही घडते ते कुणा एका बाह्य शक्तीच्या इच्छेवर्/लहरीवर घडते हे नाकारणे आणि स्पष्ट शब्दात सांगणे हे तेव्हा मोठेच धैर्याचे काम होते. तेव्हा भारतीय उपखंडात प्रमुख राजसत्ता म्हणजे १६ महाजनपदे होती.(वैशाली, कोसंबी,कोसल्,मगध्,शाक्य वगैरे .) ह्यापैकी काही प्रबळ सतांचे प्रमुख थेट बुद्धाचे जवळचे नातलग होते, परिचित होते, अनुयायी होते.(मगधचा अजातशत्रु, प्रसेनजित वगैरे.)
ह्यांच्याशी घनिष्ठ संबंध असतानाही बुद्धाने आपले मत कायम चर्चेतुन मांडले, "त्रिपिटक " ह्या ग्रंथात बौद्ध मत संपादित केले.शक्य असतानाही बलप्रयोग केला नाही,सैन्य नि फौजफाटा ह्याचा विचारही केला नाही ; तरीही केवळ वैचारिक पातळीवर वैदिक हिंसेला आणि न पटणार्‍या चालीरितींना विरोध केला. ह्याला थेट विरोध म्हणता यावे.
समाजमान्य जुनाट चालीरितींना विरुद्ध "ब्र" सुद्धा काढणे म्हणजे किती धैर्याचे काम आहे हे आपण महात्मा फुले, आगरकर, र धो कर्वे, गाडगेबाबा ह्यांच्या अनुभवावरुन बघु शकतो. अरे हो, बादवे, मी मागील वाक्यात नाव घेतलेल्या व्यक्तींनीही नि:शस्त्र विरोधच केला; नाही का?

बाकी :- धार्मिक/धर्माधिष्ठीत प्रतिकार लेखात जाणिवपूर्वक टाळले आहेत.
ठिक आहे. लेखाचे चर्चाक्षेत्र लेखकाच्या मनात स्पष्ट असणे म्हणजे बांधकाम करण्यापूर्वी समोर घराचा plan स्पष्ट असणे; हे कधीही चांगलेच.

--मनोबा

चांगली माहिती

चांगली माहिती, वाचते आहे.

वर मनोबाने म्हटल्याप्रमाणे शांततामय रितीने आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्याचे अनेक प्रकार आहेत किंवा अन्यायासमोर मान न तुकवता विरोध करण्याचेही. सॉक्रेटिसपासून गौतम बुद्धापर्यंत अनेकांना त्यात सामील करता येईल. आपले ऋषी-मुनी, इतकेच काय रावणसुद्धा तप करून देवादिकांकडून मागण्या पूर्ण करून घेत असे. ;-)

अरे हो....

बुद्धीला न पटनारे मत स्वीकारण्यापेक्षा फर्मावलेली शिक्षा(विषाचा प्याला ) स्वीकारणारा सॉक्रेटिस राहिलाच की. शिवाय सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस त्याच्या हल्ल्य्याची स्पष्ट निंदा करणारे महर्षी कल्याण(http://www.youtube.com/watch?v=1TdFLVcejeA) ह्यांनाही अहिंसक विरोधक म्हणता यावे.
अर्वाचीन इतिहासातील अमेरिकेतील अहिंसेचे उदाहरण म्हणुन इतिहासप्रसिद्ध "बोस्टन टी पार्टी" कडेही बघता येउ शकेल( इ स १७७३). इथुनच अमेरिकन स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात झाली.

बादवे, लेख आवडला; हे सांगायचे राहिलेच. आता सांगतोय.

--मनोबा

+१

सॉक्रेटीस व अन्य शास्त्रज्ञांनी वैयक्तीक पातळीवर अहिंसक लढा दिलाच होता.
बाकी बोस्टन टी पार्टी ही इतकी महत्त्वाची घटना पूर्णपणे विसरलो. खरंतर ती लेखातच यायला हवी होती इतकी महत्त्वाची घटना आहे.
आभार!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

क्वेकर्स्

पुढच्या लेखांची वात बघतेय. चांगला विषय आहे.

इंग्लंड व अमेरिकेतील "क्वेकर्स्" ((रिलिजियस सोसायटी ऑफ फ्रेंड्स्) हा ख्रिश्चन धर्मांतर्गत अहिंसेला मानणारा मोठा समाज आहे. इंग्लंडमध्ये १७व्या शतकात, कॅथलिक/प्रोटेस्टंट यांमध्ये राजकीय पातळीवर संघर्ष चालू असताना जन्माल आला. तेव्हापासून आजपर्यंत धार्मिक विचारांबाबत क्वेकरमंडळींत बरीच विविध मते झाली आहेत, पण हिंसेपेक्षा अहिंसेने लोकांचे मन वळवणे हा मूळा विचार केंद्रस्थानी राहिला आहे. आपल्या भक्तीचा सार्वजनिक खुलासा व स्वीकार करणे हे ही या समाजात महत्त्वाचे आहे. वर उद्देशिलेल्या गुलामगिरीविरुद्धच्या लढ्यात अनेक क्वेकरांचा सहभाग होता. युद्धात सहभागी न होण्यास "विवेकी विरोध" ही अनेक क्वेकरांनी वैयक्तिक स्तरावर केलेला आहे.

उत्तम माहिती आणि लेख

उत्तम माहिती. पुढिल भागाच्या प्रतिक्शेत.

धरना

अहिंसा हा जैन धर्माचा पायाच आहे, आणि थोरो आणि टॉल्स्टॉय सहित जैन विचारांनीदेखील गांधी प्रेरित झाले होते हे नेहमी वाचण्यात येते. गांधींच्या प्रेरणांचा शोध घेताना एका इतिहासकाराने "धरना" या प्रतिकारपद्धतीचा भारतातील दीर्घ इतिहासाचा आढावा घेतला आहे. या पद्धतींतही अहिंसेने प्रतिकार करणे, आणि प्रतिद्वंद्वीबरोबर वाटाघाटीचे चॅनेल केव्हाही चालू ठेवणे दोन्ही महत्त्वाचे होते.

उदा.
१) धंडक म्हणून एक प्रकार ब्रिटिशपूर्व कालात हिमालयातल्या राज्यात (आणी राजस्थानातल्या राज्यातही) आढळतो. प्रजा राजदरबारावर मोर्चा काढायची, आणि समस्या सोडविण्याबाबत राजाचे आश्वासन घेऊन परत जायची. यात एक ठराविकपणा असे, पण राज-प्रजेच्या संबंधाचा महत्त्वाचा अंगही असे.

२) मुघल कालात करवसूली विरुद्ध हिजरत (स्थलांतर - जास्त वसूली मागणार्‍या राज्यातून मोठ्या प्रमाणात शेजारच्या राज्यात जाणे) ही काही शेतकरी गटांनी अवलंबिलेली प्रतिकार पद्धती होती. पण काही वेळा अन्य गटांनी ही अवलंबिली. १६६९ साली, औरंगझेबच्या काळात सूरत च्या बनिया समाजाने एका काझी विरुध्द प्रतिकार दर्शविण्यासाठी एकत्र शहर सोडून भडूच मध्ये आश्रय घेतला आणि शहराचे कामकाज स्थगित केले. काझीने त्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या व बळजबरीने उरलेल्यांचे धर्मांतर करण्याच्या धमक्या दिल्या तरी ते परतले नाहीत, व थेट औरंगझेबाला अर्ज केला. शेवटी त्यानेच काझीला पदावरून काढले, आणि बनियांना अभयपत्र दिले.

३) दुसर्‍यांप्रती अहिंसा असली तरी स्वतः ला इजा करून घेऊन (उपोषण, आत्महत्या) दुसर्‍याचे मतपरिवर्तन करणे, वा कमीतकमी त्यांच्यावर सामाजिक प्रेशर आणून हिणवणे हे प्रकारही अनेक ठिकाणी, विविध संदर्भात होत असे. दिलेले कर्ज परत मिळवण्यासाठी हे केले जाई, व याला अनेक नावे आहेत असे दिसते - चरित, कायव्रत, धरना, तकाजा, इ. आपल्या तक्रारीला सार्वजनिक रूप देणे या मागचा उद्देश्य असे, व विरुद्धपक्षाकडे काही कार्य चालू असताना धरना करण्याचा प्रयत्न असे. त्राग हा त्यातल्या त्यात अतिरेकी प्रकार गुजरात/राजस्थानात प्रसिद्ध होता - चारण-भाट (राजांचे गौरव गाणारे गोंधळी) वसूली विरुद्ध, किंवा लवाजम्याच्या सुरक्षेसाठी राजांसमोर, किंवा डाकूंसमोर स्वत: आत्महत्या करण्याची शपथ खात. अर्थात, असे होऊ देणे, किंवा आपल्यामुळे अशी आत्महत्या होणे अशुभ आहे, ही भावना दोन्ही पक्षात असल्यामुळे त्या पद्धतीला महत्त्व होते. ब्रिटिश कालात ह्या पद्धतींना "ब्लॅकमेल" च्या सत्रा खाली आणले गेले, पण त्यांचा गांधींवर चांगलाच प्रभाव पडला, असे लेखकाचे (प्रथमदर्शनी पटण्यासारखे) म्हणणे आहे.

ही माहिती या पुस्तकातून (पृ ४२-४९) घेतली आहे. तेथेच अधिक तपशील, व माहितीच्या प्राथमिक/दुय्य्म साधनांचे उल्लेखही सापडतील.

आभार

धडक, हिजरत ही अस्सल देशी उदा आवडली. अर्थात त्यांचा गांधींवर प्रभाव होता हे लेखकाचे म्हणणे ही एक शक्यता झाली. स्वतः गांधीजी मात्र त्याचे श्रेय अन्य प्रेरणास्थानांना देतात.
प्रतिसादातील नवनवीन माहितीबद्दल आभार! :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

 
^ वर