ज्ञानाची मक्तेदारी आणि गव्हाणीतील कुत्रा

भारत देशामध्ये फार जुन्या काळापासून जी जातिव्यवस्थेची आणि पुरुष-प्रधान उतरंड होती तिच्यामध्ये दलित आणि अन्य विस्थापित, स्त्रिया आणि एकूणच अबल गटांच्यावर फार अन्याय झाला हे आता कोणीच अमान्य करीत नाही. त्यांना पिढ्यामागून पिढ्या शिक्षणापासून दूर ठेवणे, समाजातील उच्च स्थानांपासून दूर ठेवणे हे सर्व अतिशय उद्वेगकारक आणि चुकीचे होते ह्याविषयी आजतरी कोणाहि सुजाण व्यक्तीला काहीहि संशय नाही. जमेची बाजू इतकीच की १९व्या शतकाच्या उत्तरार्धापासून हे ध्यानात येऊ लागले आणि रॉय-फुले-कर्वे ह्यांच्यासारखे अनेक सुधारक निर्माण होऊन ही कालबाह्य संस्था मोडीत निघावयास प्रारंभ झाला. आजहि हे कार्य पूर्ण झाले आहे असे म्हणता येत नाही पण अधिकृत पातळीवर ह्या जुन्या संस्थेला पाठिंबा देण्याचे धैर्य कोणी दाखवू शकेल असे आता वाटत नाही.

मला असे वाटते की आजतायत ह्या सर्व अन्यायाचा विचार केवळ 'व्यक्तीच्या मूलभूत स्वातन्त्र्याचा संकोच' आणि 'व्यक्तीच्या मानवी अधिकारांचे हनन' अशा भूमिकांतूनच केला गेला आहे. संख्याशास्त्रीय दृष्टीने ह्या प्रश्नाकडे पाहिले गेले आहे काय? ह्या विचारातून पुढील चार शब्द लिहितो कारण व्यक्तींच्या पलीकडे जाऊन संपूर्ण भारतीय समाजाचे ह्या संस्थेने कसे नुकसान केले ते त्यातून दिसेल.

ह्या पद्धतीत समाजाचे बौद्धिक नेतृत्व ही ब्राह्मण समाजाची आणि राजकीय नेतृत्व ही क्षत्रिय समाजाची जबाबदारी आणि मक्तेदारीहि बनली. त्यापैकी माझा मुख्य रोख बौद्धिक नेतृत्त्वाकडे आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात मागे पडलेला समाज हा हळहळू सगळीकडेच मागे पडू लागतो हे उघड आहे. हे ज्ञान कोठे निर्माण होऊ शकते? उत्तर - ते कोठेहि आणि कोणामध्येहि निर्माण होऊ शकते. समाजाची ज्ञाननिर्मितिक्षमता आपण जर १०० मानली तर भारतीय समाजाने ह्यापैकी केवळ दीड ते दोन टक्के क्षमतेचाच वापर केला. हे कसे? तर एकून समाज १०० टक्के मानला तर ९६ टक्के इतक्या गटाला म्हणजे खालच्या जातींना ज्ञाननिर्मितीपासून आपण बाद ठरविले. उर्वरित ४ टक्क्यांपैकी निम्म्या स्त्रिया म्हणून त्याहि बाद. अशा रीतीने मूळ १०० पैकी केवळ २ व्यक्तींना ज्ञानग्रहणाची आणि पर्यायाने ज्ञाननिर्मितीची संधि आपण दिली. हे आता सर्वमान्य आहे की ज्ञान कोणत्याहि व्यक्तीपासून निर्माण होऊ शकते. एकूण समाजापासून होऊ शकणारी ज्ञाननिर्मिति १०० मानली तर उपलब्ध काळात आपण त्यापैकी केवळ २ टक्के ज्ञानच निर्माण होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण केली.

ज्ञाननिर्मितीची संधि मोठ्या गटाला उपलब्ध असल्यास काय होऊ शकते ह्याची दोन उत्तम उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. संगीत, स्थापत्य आणि शिल्पकला ह्या शाखा आपल्याकडे अब्राह्मणांनाहि उपलब्ध होत्या. (गाण्याबजावण्याला सामाजिक दर्जा नव्हता, स्थापत्य आणि शिल्पकलेमेध्ये शारीरिक श्रम अधिक म्हणून बुद्धिजीवी ब्राह्मणवर्गाला त्यात रस नव्हता ही त्याची कारणे.) ह्या तीन क्षेत्रांमधील भारताची कामगिरी आजहि वाखाणण्याजोगी मानली जाते. केवळ दोन टक्क्यांवर भर ठेऊन हे काम झाले नसते.

ज्या दोन टक्के गटाने ज्ञाननिर्मिति हे आपले राखीव क्षेत्र म्हणून ठेऊन घेतले त्यांच्या हातूनहि अशी निर्मिति फार मर्यादित प्रमाणात झाली. त्याचे कारण म्हणजे ह्या गटाने ज्ञान ह्या संकल्पनेचा अर्थच फार संकोचित केला. ज्ञानाची व्याप्ति किती विस्तृत असू शकते ह्याची त्यांना कधी जाणीवच झाली नाही. वेदवेदांगे, षट्शास्त्रे, तत्त्वज्ञान, परमार्थ आणि मोक्षाचा विचार ह्यांचा अभ्यास भरपूर झाला पण राज्यशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, युद्धशास्त्र, नौकानयनशास्त्र, उपयुक्त कला आणि कारागिरी, शेती अशा अनेक शाखांकडे ज्ञानशाखा म्ह्णून पुरेसे लक्ष दिले गेले नाही. बाहेरून आक्रमक येतात आणि आपल्याला सहजी नामोहरम करतात असे का होते ह्यावर फारसा विचार झाला नाही. जवळजवळ १०० टक्के हिंदु असलेला काश्मीर तेराव्या चौदाव्या शतकापासून जवळजवळ १०० टक्के इस्लामकडे गेला ह्यात काहीतरी चुकते आहे अशी जाणीव आपल्या बौद्धिक धुरीणांना कधी तीव्रतेने झाली असे जाणवत नाही. भौतिक आणि दैनंदिन जीवन सोपे होण्याच्या दृष्टीने पाहिले तर सामान्य व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यात सातव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत काहीही बदल घडला नाही. सामान्य माणूस सातव्या शतकात जसे जगत होता तसेच सतराव्या शतकातहि.

काळाने ह्या दुर्लक्षाचा सूड आपल्यावर पुरता उगवला. बाहेरच्या मोगल, अफगाण, तुर्क ह्यांनी तर आपल्याला छळलेच पण भौतिक दृष्ट्या अधिक पुढारलेल्या युरोपीयनांच्या पुढे आपण लगेचच ढेपाळलो. समाजाच्या धुरीणांनी आणि ज्ञानाचा मक्ता घेतलेल्यांनी जी 'Dog in the manger' वर्तणूक १५०० वर्षे चालविली होती तिचे आपण बळी ठरलो.

लेखनविषय: दुवे:

Comments

शंका

एक शंका - चातुरवर्ण्य पद्धतीत ४ वर्ण म्हणजे ब्राह्मण २५% असतील नाही का? मग ९६% गटाला द्न्याननिर्मीतीपासून बाद कसे ठरविले?
का वर्ण जरी ४ असले तरी ब्राह्मण कमी होते? तसे असल्यास आधार काय? तेव्हा तर शिरगणती वगैरे पद्धत नव्हती.

शंकेचे उत्तर

ब्राह्मण ४ टक्के होते हा केवळ तर्क आहे, ह्याला पुरावा मागाल तर कोठेच उपलब्ध नाही. आज साधारणपणे ९६ टक्के प्रजा अब्राह्मण आहे असा अंदाज वर्तविला जातो. तीच टक्केवारी पूर्वीहि असावी असा समज असायला काही हरकत नसावी.

अर्थात् आकडे दोनतीन टक्क्यांनी कमीजास्त झाल्याने मुख्य मुद्द्यास काहीच हानि पोहोचत नाही.

धन्यवाद

धन्यवाद.

असहमत

तर एकून समाज १०० टक्के मानला तर ९६ टक्के इतक्या गटाला म्हणजे खालच्या जातींना ज्ञाननिर्मितीपासून आपण बाद ठरविले.

ज्ञाननिर्मिती म्हणजे वेदांचा आणि संस्कृत शिकण्याचा अधिकार असे आपल्याला अपेक्षित असावे. शूद्र वगळता इतर त्रैवर्णिकांना वेदांचा अधिकार होता. ज्ञानेश्वरीमध्ये "वेद संपन्न असला तरी कृपण आहे कारण तो तीन वर्णांच्याच कानाला लागला आहे. स्त्रिया आणि शूद्र यांना त्यापासून वंचित रहावे लागले आहे. ही आपली उणीव गीतारूपाने सर्वांसाठी प्रकट होऊन वेदांनी दूर केली आहे". अनेक क्षत्रिय वर्णीय राजे संस्कृतात प्रवीण होते. शहाजीराजे आणि संभाजी संस्कृतात पारंगत होते. संभाजीने संस्कृतात काव्यरचना केल्या आहेत. अगदी जुन्या काळातले सत्यकाम जाबाली , गार्गी, मैत्रेयी, विश्वामित्र ही उदाहरणे ज्ञान ब्राह्मणांपुरतेच मर्यादित असल्याच्या सिद्धांताच्या विरुद्ध आहेत.

आता त्रैवर्णिकांना अधिकार असूनही ब्राह्मण वगळता क्षत्रिय - वैश्यांनी वापरला नाही. इतर जातींना (क्षत्रिय - वैश्य) त्यांच्या पोटापाण्याची कामे जातीव्यवस्थेने दिली होती. ब्राह्मणांना ज्ञानार्जन हेच काम आणि त्या बदल्यात समाजाने त्यांच्या चरितार्थाची व्यवस्था करायची असे होते. त्यामुळे एका बाजूला चरितार्थासाठी इतर काही करावे न लागल्याने ब्राह्मण ज्ञानमार्गी झाले तर इतर लोकांना चरितार्थासाठी त्यांचे उद्योग असल्याने ते या मार्गाकडे फारसे वळले नाहीत.

दुसर्‍या बाजूने ब्राह्मण कायम समाजाच्या भीकेवर अवलंबून राहिल्याने दरिद्री राहिले तर क्षत्रिय - वैश्य स्वतंत्र उद्योग असल्याने समृद्ध झाले. अर्थातच क्षत्रिय - वैश्यांना ज्ञानार्जनासारख्या भौतिक लाभ न देणार्‍या उद्योगात रस राहिला नाही. जर वेद, उपनिषदे तत्त्वज्ञान वगैरे शिकून व्यापार किंवा राज्यकारभारापेक्षा जास्त समृद्धी येत असती तर क्षत्रिय - वैश्यांनी ते नक्की केले असते.

आपल्या वर्णाचे काम सोडून दुसर्‍या वर्णाचे काम स्वीकारल्याबद्दल समाजानेविरोध केल्याचे, बहिष्कार टाकल्याचे उदाहरण नाही. वेरूळच्या बाबाजी भोसल्याने शेती सोडून तलवार हातात घेतली किंवा बाळाजी विश्वनाथाने भिक्षुकी सोडून क्षत्रिय वृत्ती धारण केली याबद्दल तत्कालीन ब्राह्मणांनी किंवा इतर कोणी आक्षेप घेतल्याचे माझ्या माहितीत नाही.

वेदवेदांगे, षट्शास्त्रे, तत्त्वज्ञान, परमार्थ आणि मोक्षाचा विचार ह्यांचा अभ्यास भरपूर झाला पण राज्यशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, युद्धशास्त्र, नौकानयनशास्त्र, उपयुक्त कला आणि कारागिरी, शेती अशा अनेक शाखांकडे ज्ञानशाखा म्ह्णून पुरेसे लक्ष दिले गेले नाही

वेदवेदांगे, तत्त्वज्ञान वगैरे शाखांचा अभ्यास करण्यासाठी साधने फारशी लागत नाहीत. पण बाकी गोष्टींचा अभ्यास करायचा तर साधने लागतात आणि त्यासाठी मुख्य म्हणजे राज्यकर्त्यांचे पाठबळ लागते. त्यासाठी राज्यकर्त्यांकडे दूरदृष्टी लागते, जशी शिवाजीकडे होती. म्हणून त्याच्या काळात नवीन किल्ले - जमिनीवरचे आणि समुद्रातले - बांधणे, आरमाराची स्थापना करुन नवीन जहाजे बांधणे, युद्धसामुग्री - खास करून बंदुका, तोफा तयार करण्याच्या पद्धती डचांकडून शिकणे वगैरे उद्योगांना त्याने जोमाने प्रोत्साहन दिले. शिवाजीचे युद्धशास्त्र किंवा राज्याचे व्यवस्थापन हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय होईल इतके महत्त्व या गोष्टींना आहे.

शेवटी, समाजातल्या सर्व वाईट गोष्टींबद्दल ब्राह्मणांना जबाबदार धरून आपण त्यांना अवाजवी महत्त्व देतो. कुरुंदकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे " ब्राह्मणांनी कितीही स्वतःला अग्रजन्मा म्हणवून घेतले तरी पृथ्वीचा खरा उपभोग क्षत्रिय आणि वैश्यच घेतात." ते मला पटते.

ज्ञाननिर्मिती

वरील उद्बोधक चर्चेतील ज्ञाननिर्मिती या शब्दाविषयी अधिक माहिती हवी आहे. ज्ञानाची नवनिर्मिती करता येते का? माझ्या मते सृष्टीत, निसर्गात ज्ञान असतेच, फक्त त्याची जाणीव आपल्याला असत नाही. ज्ञानार्जन हा शब्द अधिक सयुक्तिक वाटतो. ज्ञानी लोकांनी कृपया खुलासा करावा.
सन्जोप राव

ज्ञान

येथे ज्ञानी लोकांनी खुलासा करण्यास सांगितले आहे तरीसुद्धा मी थोडा प्रयत्न करते.

ज्ञानाची नवनिर्मिती- आजुबाजुला जे जग आहे ते आपल्या (पर्स्पेक्टीव्ह)दृष्टीकोनातून कसे दिसते ते सांगणे(स्वत:लाही)/लिहीणे.
प्रत्येकाच्या मेंदुच्या निर्मितीप्रमाणे प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असु शकतो त्यातुन वेगवेगळे ज्ञान निर्माण होऊ शकते{[गॆलेलिओने टेलिस्कोपातुन पाहण्यापुर्वि चंद्र हा विवरे नसलेला एक प्रकाशस्रोत होता त्यानंतर गॅलेलिओने तो विवरे असलेला ग्रह आहे असे नवे ज्ञान निर्माण केले. कविमहाशयांना त्यात प्रेयसीचे मुख दिसते. अजुन कोणत्या शोध लागायच्या बाकि कॅमेरातुन चंद्राबद्दल यापेक्षाही वेगळे ज्ञान निर्माण होऊ शकेल.] त्याचप्रमाणे गॅलेलिओने पृथ्वी सुर्याभोवती फ़िरते या ज्ञानाची निर्मिती केली, दुसरा/री कोणीतरी सुर्यासकट पुर्ण ब्रह्मांड पृथ्वीभोवती फ़िरते अशी नवज्ञाननिर्मिती करेल, तसेच दुस-या कोणत्या ग्रहावर या जगाविषयी वेगळी ज्ञाननिर्मिती झालेली असु शकते.} त्यावर जगन्मान्य पंडीतांचे सहमतीचे शिक्कामोर्तब झाले कि ते ज्ञान(शोध) म्हणुन मानवात(विवक्षित समाजात*) मान्य होते.

* विज्ञानाची माहिती असलेला

जाणून घेणे

मी स्वतःला 'ज्ञानी' म्हणवून घेत नाही. 'ज्ञान' या शब्दाची 'जाणून घेणे' अशी व्याख्या माझ्यापुरती मी केली आहे. पण ही व्याख्या अमूर्त स्वरूपाची आहे. मला काय समजले आहे हे इतरांना कळण्यासाठी त्याची अभिव्यक्ती आवश्यक आहे.
पण मला जेवढे समजलेले आहे ते इतरांना समजेल असे सांगण्यासाठी मी ते शब्द, चित्र यासारख्या मार्गांनी व्यक्त केले आणि या गोष्टी जतन करून ठेवल्या तर मी त्या निर्माण केल्या असे म्हणता येईल. 'ज्ञान' हा शब्द 'नॉलेज' या अर्थाने घेतला तर त्याचे 'व्यवस्थापन' (मॅनेजमेंट) करणे शक्य आहे. त्यात निर्मिती, विकास, वितरण, उपयोग, नाश वगैरे सारे टप्पे येतात.

प्रस्तुत लेखाच्या विषयी मला असे सांगावेसे वाटते की ज्ञानाचा झरा कोणालाही कायमचा अडवून ठेवता येत नाही. त्यासाठी अमूक एका वर्गाला किंवा व्यक्तीला जबाबदार धरून दोषी ठरवणे चुकीचे आहे. परिस्थितीनुसार कोणी काय करायचे हे ठरत जाते आणि त्यासाठी उपयुक्त असे ज्ञान तो प्राप्त करून घेतो. आपली मक्तेदारी टिकून रहावी या कारणाने शंभर दोनशे वर्षांपूर्वीच्या एका वर्गाने ज्ञानसंपादनाविषयी काही नियम सांगितले असले तरी ते पूर्वी अस्तित्वात नसल्याची उदाहरणे आहेत आणि ते कधीच मोडीत निघाले आहेत. आजच्या परिस्थितीत त्यावर चर्चा करण्याचे प्रयोजन समजले नाही.

ते नियम मुख्यत्वे संस्कृत भाषा आणि त्यातील मंत्र.स्तोत्रे वगैरे शिकण्यासंबंधी होते. त्यामुळे ते शिकून फार फार तर कोणाला मोक्षप्राप्ती झाली असेल. ते शिकलेल्या लोकांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कामगिरी करून समाजाची सोडा, निदान स्वतःची प्रगती करून घेतली असे दिसत नाही.

ज्ञानाची मक्तेदारी

ज्ञान ही कोणत्याही एका गटाची मक्तेदारी आहे असे चित्र आज दिसत नाही. तरीही हा विषय चर्चेला घेण्यासाठी "इतिहासातील ज्ञानाची मक्तेदारी" यावरच रोख आहे/ असावा असे वाटले नाही. चर्चेतून नेमके काय साधायचे आहे तेही कळले नाही परंतु

सामान्य माणूस सातव्या शतकात जसे जगत होता तसेच सतराव्या शतकातहि.

हे विधान रोचक वाटले. यावर अधिक विस्तार हवा. आत्ममग्न समाज, ज्याच्या बेसिक गरजा सहज पूर्ण होत असल्याने त्याला गरजा वाढवण्यात विशेष रूची नसावी आणि गरज ही शोधाची जननी आहे असे मानल्यास गरज नाही त्यामुळे नवनिर्मिती नाही असे काहीसे झाले असावे का?

असो.

बाकी,

दुसर्‍या बाजूने ब्राह्मण कायम समाजाच्या भीकेवर अवलंबून राहिल्याने दरिद्री राहिले

समाजाच्या भीकेवर राहून दरिद्री राहिलेल्यांविषयी विशेष सहानुभूती वाटते आणि असली बंडल विधाने वाचून करमणूकही होते. भिका मागण्याव्यतिरिक्त ब्राह्मण काय काय करत होते त्याची माहिती इथे आहेच. दरिद्रीपणा ही ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांची मक्तेदारी नक्कीच नसावी. शूद्रांबद्दल तसे सरसकट विधान करू शकत नाही.

ज्ञानाची मक्तेदारी

मला काय म्हणावयाचे आहे ते मी पुरेसे स्पष्ट करू शकलेलो नाही असे दिसते. पुनः प्रयत्न करतो.

जातिसंस्थेच्या संदर्भात पुढील दोन मुद्दे माझ्यातरी अवलोकनात आजवर कोठे आलेले नाहीत. तसे कोठे आधीच लिहिले गेलेले असल्यास मला कोणीतरी त्याचा संदर्भ देईल अशी एक अपेक्षा. अन्यथा त्यंवर नव्याने चर्चा करता यावी ही दुसरी.

१) समाज सशक्त राहण्यासाठी नवे विचार आणि नवे तंत्रज्ञान सतत निर्माण होत राहिले पाहिजेत. हे बियाणे रुजविण्यासाठी लागणारे शेत आपण आपल्या हाताने संकोचित केले. परकीय आक्रमणासारखी त्याची प्रायश्चित्ते वारंवार मिळूनहि त्याची कारणे शोधण्याचा आपण प्रयत्न केला नाही. हे करण्याची प्रमुख जबाबदारी बुद्धिजीवी गटाची असते. आपले बुद्धिजीवी गट घटपटादि खटपटीतून बाहेर बघायलाच तयार नसल्याने ह्या जबाबदारीची जाणीवच १५०० वर्षात कोणाला झाली. नव्या तोफा आणि गोलंदाज हवेत? भाडोत्री पोर्तुगीज बोलवा. रघुनाथरावला चष्मा हवा आहे? इंग्रज वकिलाला भेट द्यायला सांगा. नवा दारुगोळा निर्माण करण्याची आणि त्यासाठी काही संशोधन करण्याची बुद्धि कोणास झाली नाही. रशियामध्ये पीटर द ग्रेटला दिसले की पश्चिम देशांच्या मानाने आपला देश तंत्रज्ञानात मागासलेला आहे. त्याने काय केले? वेषांतर करून त्याने स्वतः पश्चिमी देशात जाऊन निरीक्षण केले आणि तिकडचा संपर्क अधिक सुकर करण्यासाठी त्याने समुद्रावर एक नवी राजधानीच बांधली. आपण मात्र 'न वदेत् यावनीं भाषां प्राणै: कण्ठगतैरपि' अशा वल्गना करत आणि समुद्रपर्यटनावर निर्बंध घालत आपल्याच पायाखाली खड्डा खणत बसलो. नवीन ज्ञान निर्माण करण्याची आवश्यकता पहिल्यांदा कोणास व्हावयाला हवी होती? तर इतरांना ज्ञानप्रक्रियेपासून ज्यांनी वंचित ठेऊन तो मक्ता आपल्याकडे घेतला होता त्यांना. ह्याचेच मी 'गव्हाणीतील कुत्रा' असे वर्णन केले आहे.

२) ह्या मक्तेदारीमुळे शेत जे मर्यादित झाले ते कसे हे संख्यांच्या मार्गाने दर्शविणे हा दुसरा. म्हणूनच सर्व टक्केवारीचा हिशेब.

यावरून आठवले...कूपमंडुक वृत्ती

शिवाजीकडे दूरदृष्टी होती असे वर म्हटले आहे, पीटर द ग्रेटकडे दूरदृष्टी होती असे तुम्ही म्हणताय. मला दोन्ही मान्य आहे पण या दोन्ही व्यक्ती सतराव्या शतकातल्या म्हणजे त्या बाद ठरतात. सात ते सतरा या शतकांवर विशेष भार या चर्चेने टाकावा असे वाटते.

असो.

मागे यावर चर्चा झाली होती. तिचा दुवा देते.

भिका, भुका वगैरे

भिका मागण्याव्यतिरिक्त ब्राह्मण काय काय करत होते

हे विधान रोचक वाटले. अनेक लोकांनी भीक मागणे याला भिका मागणे असे म्हणतात का? मला भूक लागली आहे आणि आम्हाला भुका लागल्या आहेत असे म्हणतात का? ज्ञानी लोकांनी कृपया खुलासा करावा.
सन्जोप राव

कुत्रा

शीर्षकातील गव्हाणीतील कुत्रा या विषयी अधिक जाणुन घ्यायला आवडेल.
(भुभुप्रेमी)
प्रकाश घाटपांडे

इसापची गोष्ट

मला वाटत होते की इसापची गोष्ट आहे पण विकीवर त्यावर आक्षेप घेतलेला आहे. माहिती वाचा इथे.

वेगवेगळी आर्ग्युमेंटस्

१. (प वि वर्तक मोड): समाजाला ज्ञान मिळाले नाही हे मुळातच गैरसमजावर आधारलेले विधान आहे. (जे काही शक्य असू शकते ते) सर्व ज्ञान वेदांमध्ये आहेच. समाजाला ते वापरता आले नाही.

२. (कुरुंदकर मोड): ज्ञान कोंडून ठेवल्याने समाज मागासलेला राहील असे कोणतेच ज्ञान ब्राह्मणांजवळ नव्हते. त्यांच्याकडे होती व्रतवैकल्ये आणि काही विधी. ते ज्ञान त्यांनी समाजात उधळून टाकले असते तरी समाज मागासच राहिला असता.

सत्य बहुधा तिसरीकडेच असावे. भौतिक विषयातलं ज्ञान हे ज्ञानच नाही असे समाजाला पटवण्यात ब्राह्मणवर्ग यशस्वी झाला. त्याचबरोबर समुद्र ओलांडण्यास बंदी वगैरे घालून बाह्य जगाशी संपर्क कमी करण्याचा (यशस्वी?) प्रयत्न झाला. म्हणजे समजा क्र १ चे आर्ग्युमेंट खरे जरी असेल तरी त्याचा कोणी उपयोग करणार नाही याची खात्री झाली.

नितिन थत्ते

गव्हाणीतील् कुत्रा

लेखाचे शीर्षक "ज्ञानाची मक्तेदारी" इतपत समजले पण एकूण मजकुर वाचल्यानंतर 'गव्हाणीतील कुत्रा" ह्या इसापि दाखल्याची तिथे आवश्यकता का आहे हे समजले नाही. थोडेसे विषयांतर जरी होत असले तरी त्या कथेतील कुत्रा गव्हाणीत चार्‍याच्या ढिगावर बसून तो खाण्यास येणार्‍या गुरांवर गुरगुरत बसला आहे. त्यावर एक म्हातारा बैल समजाविण्याच्या सूरात त्याला म्हणतो, 'अरे बाळा, ज्या चार्‍यावर तू बसला आहेस तो तू खाऊ शकतोस का? नक्कीच नाही, मग जर आम्हाला तो खायचा असेल तर तू का अडवतोस?" इ. इ.

पण श्री.कोल्हटकरांच्या दाखल्यातील सूर असा आहे की, ज्ञानाची मक्तेदारी समाजातील एक विशिष्ट गटाकडे (त्या काळात) होती त्याने इतरांना ती मिळू दिली नाही. पण त्या चार्‍याचा उपयोग त्या गटाने आपल्या उन्नतीसाठी करून घेतला हे तर सिद्ध झालेच आहे. अर्थात त्या गटाने ते 'डेलिबरेटली' केले असे म्हणणेही बालिशपणाचे होईल कारण त्या वेळी वर्णसंस्थेची समाजधारणाच तशीच असल्याने अन्य वर्णांना तिथे तक्रार करायला वाव नव्हताच. वर्णसंस्थेचे काम बुद्धकाळापर्यंत संपले आणि तिची जागा तेव्हापासून जातिसंस्थेने घेतली. आजतर वर्णसंस्था नाममात्रही शिल्लक नाही.

त्यामुळे बौध्दिक नेतृत्व ब्राह्मण समाजाकडे राहिली म्हणून त्यांचे आर्थिक उन्नयन चढत्या भाजणीने झाले असाही कुठे दाखला सापडत नाही. (आजही या घडीला ब्राह्मण समाजात घर नाही, शेत नाही, जवळ पैसा नाही, मुले ज्येष्ठांना पाहात नाहीत, असे अत्यंत हलाखीचे कनिष्ठ आणि दरिद्री जीवनमान जगणारे लोक सांप्रत राज्यात दाखवता येतील.) त्याना राजाश्रय होता हे त्या त्या काळातील समाजरचनेच्या दृष्टीने योग्यच होते शिवाय सत्ताधार्‍यांचीही त्याला ना नव्हती. प्रश्न आहे तो एका विशिष्ट गटाकडे ज्ञानाची मक्तेदारी गेल्यानेच का युरोपीअन्सनी भरतभूमी गिळंकृत केली ? तसे नसावे, कारण मुळातच येथील राजेरजवड्यांनी सामान्य जनता ही हमेशा 'सामान्य राहून मीठभाकरीतच समाधानी राहिल" असेच पाहिले (अपवाद असतील, पण तेही अपवाद ही संकल्पना सिद्ध करण्यापुरतीच). नेभळटपणा हा हिंदुस्थानी रक्तात ख्रिस्तपूर्व काळापासूनच 'बाय डीफॉल्ट' असल्याने २५ हजार गोरे धनगर २५ कोटी मेंढ्यावर निर्धोक आणि सुखनैव राज्य करीत राहिले. तिथे वर्णव्यवस्था काय करणार ? मग ४ टक्केवाल्यांनी बाकीच्या ९६ टक्केवाल्यांनी त्या त्या शतकात कोल्हटकरांना अभिप्रेत असणारी "ज्ञाननिर्मिती" करू दिली असती तरी गुलामगिरी टळली नसतीच.

वर्णव्यवस्था

>>वर्णसंस्थेचे काम बुद्धकाळापर्यंत संपले आणि तिची जागा तेव्हापासून जातिसंस्थेने घेतली. आजतर वर्णसंस्था नाममात्रही शिल्लक नाही.

ग्रंथांमध्ये सांगितलेली वर्णव्यवस्था प्रागैतिहासिक काळ, वेदकाळ, पुराणकाळ, महाकाव्यांचा काळ, बुद्ध-महावीराचा काळ, स्मृतींचा काळ, सुवर्णयुगाचा काळ, शंकराचार्यांचा काळ, हर्षवर्धनाचा काळ, मुस्लिम सत्तेचा काळ, मराठेशाहीचा-पेशवाईचा काळ, पाश्चात्य सत्तेचा काळ, स्वातंत्र्योत्तर काळ यापैकी कोणत्याच काळात अस्तित्वात नव्हती. जातिव्यवस्था नेहमीच अस्तित्वात होती.

नितिन थत्ते

सहमत आहे

वर्णव्यवस्था समाजात कधीच अस्तित्त्वात नव्हती. उलट जातिसंस्था होती. सुरुवातीला समाजात असलेल्या जातींना चार वर्णांमध्ये ठाकून ठोकून बसवण्याचे काम ऋग्वेदाच्या काळात झाले असावे. आजघडीला लोकांमध्ये जातीच्या अभिमान असतो तितका वर्णाचा दिसत नाही. वर्ण असल्याचा भास होतो कारण आज ब्राह्मण ही जातही आहे आणि वर्णही. असे सविस्तर विवेचन कुरुंदकरांनी एका निबंधात केले आहे. वरील प्रतिसाद देताना थत्त्यांच्या मनात बहुतेक तोच निबंध असावा.

वर्णव्यवस्था

वर्णव्यवस्था अगदी ऋग्वेदाच्या काळापासून अस्तित्वात होतीच होती आणि ती नाकारण्यातही काही हशील नाही. ऋग्वेद हा सूक्ते आणि प्रार्थना यांचा वेद आहे हे तरी मान्य होण्यात काही अडचण नसावी. या प्रार्थना आकाश, पृथ्वी, प्रभात, पाणी इत्यादी निसर्गशक्तीना उद्देश्यून् देवता म्हणून केल्या आहेत. त्याच्या आशयाबाबत लिहिण्याचे हे ठिकाण नसल्याने इतपतच त्या आधारे सांगतो की सूक्तात लिहिल्याप्रमाणे आरंभी पृथ्वीवर फक्त पुरुष होता. जेव्हा देवांनी या पुरुषाला आहुती कल्पून यज्ञाची तयारी केली तेव्हा वसंत ऋतू तूप होता, ग्रीष्म हा इंधन आणि शरद हा उपहार. त्या प्रथम जात पुरुषाबरोबर देवानी साध्यानी आणि ऋषींनी यज्ञ केला. त्या यज्ञातून झिरपणार्‍या चरबीतून हवेतील, जंगलातील आणि खेड्यातील पशू झाले; त्या सर्वांच्या यज्ञातून ऋचा, साम, छंद आणि यजुर्मंत्र निर्माण झाले. त्यापासून पुढे घोडे, गायीगुरे, बकरी तसेच दोन दंतपंक्ती असलेले सर्व प्राणी निर्माण झाले. त्याच्या मुखावर ब्राह्मण राहिला, त्याच्या बाहूपासून राजन्य (म्हणजे क्षत्रिय वर्ग) तयार झाला; वैश्य म्हणतात तो त्याच्या मांड्यापासून आला आणि त्याच्या पायापासून शूद्र जन्मला.....(मग पुढे मनापासून चंद्र, डोळ्यांपासून सूर्य, त्याच्या मुखापासून इंद्र आणि अग्नी...इ. इ.).

सूक्तात थेट 'वर्ण' असा उल्लेख नसला तरी जात पुरुषामुळे यज्ञातून जे चार घटक निर्मित झाले ते समाजरचनेत 'वर्ण व्यवस्थे' चेच प्रतीक मानले गेले असतील असा ठोकताळा नंतरच्या अभ्यासकांनी मांडला असल्यास तीत नवल नाही.

"आजघडीला लोकांमध्ये जातीच्या अभिमान असतो तितका वर्णाचा दिसत नाही."

हे मान्यच. त्याला अन्य कुठलेही कारण नसून केवळ राजकारण्यांनी स्वार्थापोटी तो जातिभिमानीपणाचा वडवानल तेवता ठेवला आहे.

स्पष्टीकरण

वर्णव्यवस्था अगदी ऋग्वेदाच्या काळापासून अस्तित्वात होतीच होती आणि ती नाकारण्यातही काही हशील नाही. ऋग्वेद हा सूक्ते आणि प्रार्थना यांचा वेद आहे हे तरी मान्य होण्यात काही अडचण नसावी.

ऋग्वेदामध्ये चारही वर्णांचा उल्लेख आहे हे मान्यच आहे. तसेच वर्णव्यवस्थेचे आणखीही उल्लेख मिळतील. गौतम बुद्धाने ब्राह्मण - क्षत्रिय - वैश्य - शूद्र अशी व्यवस्था बदलून क्षत्रिय - ब्राह्मण - वैश्य - शूद्र अशी करण्याचा प्रयत्न केला असेही वाचले आहे. तरीही कुरुंदकरांच्या मते ह्या सर्व गोष्टी फक्त कागदोपत्रीच होत्या. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वर्णव्यवस्था नव्हती. त्यांनी एक उदाहरणही दिले आहे. समजा एखादा शेतकरी आहे. एखाद - दुसरा एकर शेती असणारा. तो शेती करतो म्हणून शूद्र आहे. शेतातून पिकलेला जास्तीचा माल बाजारात विकतो म्हणून वैश्य आहे. शेतावर चोर - लुटारू आले तर त्यांचा प्रतिकार करतो म्हणून क्षत्रियही आहे आणि घरी काही पूजापाठ करत असला तर ब्राह्मणही आहे. अश्या वेळी त्याचा कुठल्या वर्णात समावेश करणार?

म्हणून त्यांच्या मते व्यवहारामध्ये फक्त जाती होत्या. त्या जातींना चार वर्णांमध्ये बसवायचे काम ऋग्वेदाच्या काळात झाले. वर्णव्यवस्था समाजात नसल्यानेच एखाद्याने आपल्या वर्णाचे काम सोडून दुसर्‍या वर्णाचे काम केले तरी विरोध, बहिष्कार वगैरे प्रकार झाले नाहीत. उदाहरणे आधी दिलीच आहेत. उलट जातीची बंधने न पाळल्याने लोकांना शिक्षा झाल्या आहेत. उदा. ख्रिश्चन मिशनर्‍यांबरोबर चहा प्यायल्याने (कदाचित् बिस्कीटेही खाल्ल्याने) लोकमान्य टिळक आणि रानड्यांना माफी मागून प्रायश्चित्त घ्यावे लागले होते.

वर्ण व्यवस्था आणि भेद

टिळकांवर आलेले अवांतर प्रतिसाद वेगळ्या चर्चेद्वारे येथे हलवले आहेत याची नोंद घ्यावी.

आजघडीला

"आजघडीला लोकांमध्ये जातीच्या अभिमान असतो तितका वर्णाचा दिसत नाही."

हे मान्यच. त्याला अन्य कुठलेही कारण नसून केवळ राजकारण्यांनी स्वार्थापोटी तो जातिभिमानीपणाचा वडवानल तेवता ठेवला आहे.

विनायक गोरे यांना आजघडीला म्हणजे गेली ४००-५०० वर्षे असे अपेक्षित असावे. त्याचा आजच्या राजकारण्यांशी काही संबंध नसावा.

नितिन थत्ते

हो

राजकारण्यांशी संबंध नाही. पण लग्न वगैरे जमवताना सामान्य लोकांच्या बोलण्यातून जातीचा अभिमान जाणवतो. एकच उदाहरण देतो. माझ्या आईच्या एका देशस्थ ब्राह्मण मैत्रिणीच्या मुलासाठी वधूसंशोधन सुरू होते, त्या संदर्भात आईने कश्या प्रकारची मुलगी हवी आहे असे विचारले असता तिचे उत्तर होते "जास्तीत जास्त खालचे म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण चालेल. त्यापेक्षा खालच्या जातीतली मुलगी नको." माझी आई अवाक् झाली. (आम्ही कोकणस्थ आहोत.)

अश्या अभिमानाकडे माझा निर्देश आहे.

कोकणस्थ वि देशस्थ हा जुना वाद

जास्तीत जास्त खालचे म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण चालेल.

हा वाद न संपणारा आहे पण गंमत अशी की बाळाजी विश्वनाथाने महत्त्वाचे स्थान मिळविण्याआधी कोकणस्थ ब्राह्मण कोणाच्याच खिजगणतीत नव्हते आणि वर देशावर खेडयांमधून देशस्थ कुलकर्णी आणि पैठण-नाशिकसारख्या क्षेत्रस्थानी देशस्थांचे पूर्ण वर्चस्व होते. देशस्थ कोकणस्थांना ब्राह्मण मानावयासहि नाखूष होते. पेशवाईमुळे कोकणस्थांना नव्या संधि इतक्या उपलब्ध झाल्या की पुण्याच्या शनिवार-नारायणसारख्या नव्या पेठा जवळ्जवळ त्यांनीच भरला. ह्या पेठांमधल्या घरांची एक यादी मी कोठेतरी पाहिली होती त्यावरून मी हे स्मरणाने लिहीत आहे. पेशवाईनंतरहि हे कोकणस्थी वर्चस्व १९-२०व्या शतकातहि टिकून राहिले आणि कोकणस्थांना आपण सर्वात श्रेष्ठ असा अहंभाव निर्माण झाला आणि तो अजूनहि कोठेतरी त्यांच्या मनात टिकून आहे, यद्यपि महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणात दोघांनाहि स्थान नाही. हे लक्षात आल्यामुळेच की काय, १९६० नंतर पश्चिम पुणे, सांगली, अमरावती, नागपूर धंतोली, दादर-विलेपार्ले अशा कोकणस्थांच्या आवडत्या भागातून अमेरिकेकडे तरुणांचा ओघ सुरू झाला.

ह्याचा मूळ मुद्दयाशी काही संबंध नाही. वाटल्यास obiter म्हणून वाचावा.

अरविंद कोल्हटकर, ऑगस्ट ०२, २०११.

आवडला

प्रतिसाद आवडला.
सन्जोप राव
मुत्तकोडीकव्वाडीहडा, मुत्तकोडीकव्वाSSSडीहडा
प्यार में जो ना करना चाहा, वोभी मुझे करना पडा

गव्हाणीतील कुत्रा

पण श्री.कोल्हटकरांच्या दाखल्यातील सूर असा आहे की, ज्ञानाची मक्तेदारी समाजातील एक विशिष्ट गटाकडे (त्या काळात) होती त्याने इतरांना ती मिळू दिली नाही. पण त्या चार्‍याचा उपयोग त्या गटाने आपल्या उन्नतीसाठी करून घेतला हे तर सिद्ध झालेच आहे.

नाही. असे मी म्हटलेलेच नाही. उलट, मला असे म्ह्णायचे आहे की त्या विशिष्ट गटाने ज्ञान इतरांना तर मिळू दिले नाहीच पण स्वत:हि काही उपयुक्त ज्ञाननिर्मिति केली नाही. घटपटादि खटपट खूप केली पण सर्वसामान्यांना उपयोगी पडेल किंवा त्यांचे आणि आपले जीवित अधिक सुखमय होईल असे काहीहि निर्माण केले नाही. कारण ज्ञान म्हणजे केवळ घटपटादि खटपट अशीच त्याची समजूत होती. अंतत: इतरांचाहि विकास झाला नाही आणि त्या गटाचाहि झाला नाही.

ह्याला मी dog in the manger म्हणतो, जो इतरांना गवत खाऊ देत नाही आणि स्वतःहि खात नाही. हे शब्द अनेकांना बोचले आहेत असे दिसते म्हणून हा खुलासा.

अरविंद कोल्हटकर, ऑगस्ट ०२, २०११.

डॉग्

"पण त्या चार्‍याचा उपयोग त्या गटाने आपल्या उन्नतीसाठी करून घेतला हे तर सिद्ध झालेच आहे."

~ आपण लाल रंगात अधोरेखीत केलेले वाक्य माझे आहे.

"ह्याला मी dog in the manger म्हणतो, जो इतरांना गवत खाऊ देत नाही आणि स्वतःहि खात नाही."

इथेही काहीशी गल्लत होत आहे, कोल्हटकर. "स्वतःही खात नाही" याचा एक छुपा अर्थ असा होतो की, तो कुत्रा ते गवत खाऊ शकतो पण आता त्या घडीला ते बैलांनाही द्यावे लागेल म्हणून स्वतःही खात नाही अन् त्यानाही खाऊ देत नाही. कथेतील कुत्रा असा आहे की निसर्गनियमानुसार त्याला गवत खाताच येत नाही, पण जे स्वतःला खाता येत नाही ते दुसर्‍यालादेखील देऊ करायचे नाही; ही त्याची वृत्ती दिसते.

ज्ञानाची मक्तेदारी असलेल्या त्या काळातील चातुर्वण्याचा पुरस्कार करणार्‍या ब्रह्मवृंदाने जरी इतराना शिक्षण प्रदान केले नसले तरी स्वतःला आणि आपल्या अपत्यांना त्या ज्ञानगंगेत मनसोक्त विहार करू दिला; हेही नाकारण्यात अर्थ नाही.

यामुळे 'गव्हाणीतील कुत्रा' हे आपल्या लेखातील मेटॅफर वस्तुस्थितीला जशेच्या तसे लागू होत नाही. तसा केलेला उपयोग इतराना 'बोचला' हेही समर्थनीय आहेच.

द्न्यानाच्या ओढीमागे काय लपलय? हे जाणून घेणे महत्त्वाचे

लेखात मांडलेला विचार हा काळाच्या दृश्टीने सद्यस्थितीतून - पुढील स्थिती असे असण्यापेक्शा विविध कथा-कादंबर्‍यातून भूतकाळाबाबतची जी चित्रे स्मरणपटलावर उमटली आहेत (त्यात काही चित्रे मोठी व काही दुर्लक्शित उदा.: बौद्ध, जैन काळ राहीली आहेत.) त्यांचेच विश्लेशण करण्याचा प्रयत्न दिसत आहे. (तो गैर आहे असे मी म्हणत नाही.)

हा लेख, 'समाजावरील प्रेमापोटी' आलेला आहे. पण तसे करत असताना तो एका समजुतीवर, धारणेवर आधारलेला आहे, आणी ते आहे - 'ठराविक काळात आपण कसे वागत आहोत? व त्या वागण्यातून काय घडेल? हे त्या समजाला त्या काळातच सुस्पश्ट कळत असते.'

ही धारणा चूकीची आहे. आपण एखाद्या काळात कसे वागत आहोत, हे कोणत्याही समाजाला त्याचवेळी कळत नसते. तसेच भुतकाळातल्या विविध संकल्पना, आचार-विचार हे एखाद्या चिकट-चिवट (हिं.- जिद्दी) धाग्यांसारखे आपल्या समाजरूपी देहाला चिकटलेले असतात. काहि चिकट-चिवट धाग्यांपासून आपण मुक्ती मिळवली तरीही मोकळ्या झालेल्या त्या देहाला परत सद्य काळातले ओलसर स्वरूपातील नवे धागे चिकटू लागतात. जे भावी काळात 'चिकट-चिवट' बनून जातात आणि हे सगळे अगदी सहज होत जाते.

सद्य काळात 'आपण मागासलेले आहोत व पाश्चात्य समाज हा (आपल्यापेक्शा) पुढारलेला आहे.' ह्या धारणेचा सध्या ओलसर स्वरूपात असलेला एक धागा आपल्या समाजरूपी देहाला चिकटतो आहे. ह्या धारणेमुळे पुढारलेपण म्हणजे 'पाश्चात्यपणा' हे समीकरण सध्या दृढ होत आहे, होत आलेले आहे. (आधीच्या काळात तर बरीच मंडळी 'पुढारेलपण' हे बिरूद आपल्याला चिकटावे व ते इतरांपुढे मिरवता यावे ह्यासाठी आपला देश देखिल सोडून पुढारलेल्या देशात निघून गेले.) ह्या धारणेतून काय चूका होत आहेत हे आत्ता आपल्याला कळायचे नाही. पण आजचा काळ सरून गेल्यानंतर जेंव्हा त्या चूकांमधून नवे प्रवाह प्रकट होवू लागतील, तेंव्हा परत नवी धारणा जी त्या काळात ओलसर स्वरूपातील असेल ती आधीच्या धारणेची जागा घेवू लागेल.

लेखातील धारणांबद्दल बोलायचे झाले तर...
'पाश्चात्य जे व जशी 'द्न्यान मिळवण्यासाठी केलेल्या विविध प्रक्रीयांचे प्रकटीकरण' (तुमच्या भाशेत - द्न्याननिर्मिती) शब्दबद्ध करतात तसेच आपण कां नाही करू शकत?'
ह्या विचारापेक्शा 'समस्यांचे निराकरण कसे करायचे असते?' ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी
(चर्चेत दडलेले - गृहितक: 'समाजावरती प्रेम' , भुमिका: 'समाजासाठी काहीतरी करायचे आहे.')
'सध्या आपल्या समाजात कोणत्या समस्या उद्भवत आहेत?' हे शोधत असताना
'आपला समाजामध्ये सद्द्या कोण-कोणत्या धारणा आहेत?' हे शोधायला हवे. ते शोधल्या नंतर,
'त्या पैकी कोणत्या धारणा योग्य व कोणत्या गैर आहेत?' ह्या अंगाने विचार केला जायला हवा.
या व अशा प्रश्नांची उत्तरे सर्वे करून मिळाल्यानंतर मग आपल्याला कळू शकेल, कि सद्द्याच्या काळात आपला समाज कोणत्या दिशेने जात आहे.' हि उत्तरे मिळाल्यानंतर दहा-वीस वर्शांनतर पुन्हा तीच प्रक्रिया (भारताची जनगणना करतात तशी) केल्यानंतर नवे फॅक्टस अंड फिगर' आपल्या मिळू शकतील.

समाजातील बहुसंख्यांच्या 'द्न्यानी होण्याच्या' अभिलाशेमागे काय दडलयं? हे कळले तरच कोणत्या प्रकारचे द्न्यान भविश्यात विकसित होवू शकेल? किंवा आणखी कसे? ते जाणता येईल

ज्ञानार्जनापासून वंचित

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.अरविंद कोल्हटकर यांच्या लेखातील सर्व महत्त्वाचे मुद्दे पटण्यासारखे आहेत.चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेत वैश्य,शूद्र आणि स्त्रिया(सर्व वर्णांतील) यांना ज्ञानार्जनापासून वंचित ठेवले.विशेष बुद्धिमान व्यक्तीचा जन्म कोणत्याही वर्णात होऊ शकतो हे यदृच्छेचे तत्त्व(प्रिंसिपल ऑफ रँडमनेस) आहे. निसर्गाच्या निरीक्षणांतून आणि अनुभवांतून ज्ञान मिळते हे जरी खरे असले तरी ज्ञानात प्रगती करण्यासाठी पूर्वजांचे एकूण ज्ञान काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.त्यादृष्टीने हे वर्ण वंचित राहिले.मागच्या पिढीने जे काही मौखिक ज्ञान पुढच्या पिढीला दिले तेवढेच जुजबी ज्ञान त्यांना (उपजीवेकेपुरते) मिळू शकले.
तसेच समाजातील बुद्धिमंतांना (आणि पुढे सर्वांनाच) मोक्ष हीच जीवनाची इतिकर्तव्यता आहे असे वाटू लागल्यामुळे ऐहिकाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आणि आपण उपयुक्त व्यावहारिक ज्ञानात मागे पडलो ही वस्तुस्थिती आहे. ती आपल्या लेखात मांडण्यात श्री. अरविंद कोल्हटकर यशस्वी झाले आहेत..

इतिहासाचे अवघड ओझे

मला हा चर्चाप्रस्ताव वाचताना एकदम विंदांच्या खालील ओळी आठवल्या:

इतिहासाचे अवघड ओझे, घेऊन डोक्यावर ना नाचा
करा पदस्थल त्यावर आणिक, चढून त्यावरी भविष्य वाचा!

(आता ह्या ओळी विंदांच्या असल्याने, भविष्य ह्या शब्दातून चर्चा भलतीकडेच वळणार नाही अशी आशा करतो! ;) )

प्रस्तावातील चार टक्के, तीन टक्के वगैरे आकडेवारीचा भागावर बरोबर-चूक या अर्थाने लक्ष देत बसत नाही, कारण प्रस्तावात एकूण सर्वसाधारण ऐतिहासीक माहितीच्या आधारावर मते मांडलेली आहेत, संशोधनाचा क्लेम केलेला नाही... तर नक्की काय दिसते?

तत्कालीन जातीव्यवस्थेत जे अल्पसंख्य होते त्यांनी, त्यांना ज्यात स्वतःचा स्वार्थ वाटला होता, तो तत्कालीन राज्यकर्त्यांना हाताशी धरून सांभाळला. जे बहुसंख्य होते त्यांचे काय चुकले असावे? तर ते अर्थातच एकत्र नव्हते. जेंव्हा फुले-आंबेडकर यांनी अधुनिक काळात जागे केले तेंव्हा थोडेफार समजले आणि अर्थातच ज्ञानाची कवाडे त्यांच्यासाठी उघडली.

आता अजून दोन उदाहरणे बघुयातः

सातव्या-आठव्या शतकानंतर झालेल्या मध्यआशियातून झालेल्या आक्रमणांमधे देखील ते अल्पसंख्य होते, तत्कालीन भारतीय समाज बहुसंख्य होता. तरी देखील आपण हरत गेलो.

त्याहुनही नंतर पोर्तुगिज, डच, फ्रेंच, आणि अर्थातच ब्रिटीश आले - सर्वच अल्पसंख्य होते पण आपण तरी देखील हारत गेलो. आणि त्यांच्याकडेच ज्ञानाचीच काय सत्तेची पण मक्तेदारी गेली...

थोडक्यात विंदांच्या ओळीचा विचार करत म्हणायचेच झाले तर आपण आता परत परत भारतीयांमध्ये फुट पाडणारे वागून नक्की काय साधणार आहोत. पुर्वीचे चुकले होते. तसे काय अमेरीकेत-युरोपात देखील गुलामगिरी होतीच. त्यांनी चूक मान्य केली आणि पुढे गेले. भले सगळे एकमेकांशी पटले नसले, काहीजण जुनाट आणि चुकीच्या विचाराचे राहीले तरी सगळा समाज म्हणून पुढेच जात राहीला. आपण तसे होयचे का एकमेकांना गंजीवरचे कुत्रे म्हणत सामाजीक आणि राष्ट्रीय स्वार्थाशी फारकत करायची हे भविष्य सर्वांनी विचारात घ्यावे असे वाटते.

विश्लेषण करणे म्हणजे फूट पाडणे नव्हे

अमेरिकेत रहात नसल्याने अमेरिकेत गोरे-काळे भेदावर/वादावर/प्रश्नावर काय चर्चा घडतात हे माहिती नाही. पण व्हाईट सुप्रीमसीवादी लोक तेथे आहेत आणि ते काही अतिरेकी कृत्येही करतात त्या अर्थी तेथे अश्या स्वरूपाच्या चर्चा नक्कीच घडत असणार. मला नक्की माहिती असलेली घटना म्हणजे एका काळ्या व्यक्तीला पोलिसांनी बदडून काढल्याचे कुणीतरी केलेले चित्रण आणि त्यावरून उठलेला गदारोळ. त्यावेळी गोर्‍यांच्या मनातल्या सुप्त द्वेषाविषयी चर्चा झाली होती.

पूर्वी ब्राह्मण असे वागले म्हणून आज तुम्ही ब्राह्मणांशी तसेच वागा किंवा त्यांच्याशी संबंध ठेवू नका, अशा प्रकारचे प्रतिपादन कोणी येथील चर्चेत* करीत असेल तर त्याला "फूट पाडणे" म्हणता येईल. तसे इथे कोणी करीत नाहीयेत. धागाप्रस्तावकानेही तसे म्हटलेले किंवा सुचवलेले नाही.

असे असताना "जातीमुळे झालेल्या परिणामांचे विश्लेषण करणे" म्हणजे फूट पाडणे असा दावा करून जातीचा उल्लेखच नको किंवा चर्चाच नको असे म्हणणे म्हणजे शहामृगाप्रमाणे वाळूत तोंड खुपसून बसण्यासारखे आहे.

वर उल्लेखलेल्या व्हाईट सुप्रीमसीवादी लोकांसारखे "जुन्या काळातील वर्णव्यवस्था ही आदर्श व्यवस्था होती असे उघड प्रतिपादन करणारे" लोक अजून (काहीशा अलार्मिंग संख्येने) भारतात आहेत यात शंका नाही. ती व्यवस्था आदर्श होती असे म्हणणार्‍यांना "म्हणजेच ज्ञानाचा हक्क (जन्माच्या आधारे) थोड्यांकडे असणे हेही योग्यच होते" असे वाटत असणारच. त्या व्यवस्थेतून काय तोटे झाले हे धागाप्रस्तावकाने लिहिले आहे. ते तोटे तसे झाले की नाही की काही वेगळी कारणे होती हा विषय आहे. आजचे ब्राह्मण हरामखोर असतात की नाही हा लेखाचा विषय नाही. तेव्हा कृपया बुद्धिभेद करू नये.

पूर्वी घडलेल्या गोष्टींची जवाबदारी टाळण्यासाठी "इतिहासाचे ओझे" झटकून टाकायला लोक उत्सुक असणार यात शंका नाही. ;-)

*बाहेरच्या जगात संभाजी ब्रिगेड वगैरे असे उद्योग करीत असतील त्याचा संदर्भ देऊन येथील चर्चेवर आक्षेप घेऊ नये.
नितिन थत्ते

फूट

पूर्वी ब्राह्मण असे वागले म्हणून आज तुम्ही ब्राह्मणांशी तसेच वागा किंवा त्यांच्याशी संबंध ठेवू नका, अशा प्रकारचे प्रतिपादन कोणी येथील चर्चेत* करीत असेल तर त्याला "फूट पाडणे" म्हणता येईल. तसे इथे कोणी करीत नाहीयेत. धागाप्रस्तावकानेही तसे म्हटलेले किंवा सुचवलेले नाही....असे असताना "जातीमुळे झालेल्या परिणामांचे विश्लेषण करणे" म्हणजे फूट पाडणे असा दावा करून जातीचा उल्लेखच नको किंवा चर्चाच नको असे म्हणणे म्हणजे शहामृगाप्रमाणे वाळूत तोंड खुपसून बसण्यासारखे आहे.

शहामृग आणि मी? अहो मी कधी "गप्प बसायचे ठरवत नाही." :-) बाकी, या संदर्भात एका प्रश्नाचे उत्तर मिळाले तर बरे होईल... जर अशाच प्रकारचा माहितीपूर्ण धागा भारतीय आक्रमकांविरुद्ध काढला, त्यात त्यांना गंजीवरचे कुत्रे वगैरे म्हणले तर त्याचा आत्ताच्या काळात, आपण केवळ "विश्लेषण" म्हणूनच अर्थ घ्याल का? का तेंव्हा त्यामुळे सामाजीक फूट पडेल असे वाटून निषेध कराल? का धर्मांचा उल्लेख नको अथवा चर्चाच नको असे म्हणाल? (हव्या असल्या तर नुसत्या अशा शंका आल्यावर देखील कशा पद्धतीचे प्रतिसाद दिले जातात हे उपक्रमावर देखील बघायला मिळेल. हवे असल्यास दुवे देतो.)

आजचे ब्राह्मण हरामखोर असतात की नाही हा लेखाचा विषय नाही. तेव्हा कृपया बुद्धिभेद करू नये.

(बुद्धीभेद वगैरे कॉपिराईट असलेले शब्द वापरू नका हो! कधी कधी लोकांचा उगाच गैरसमज होतो. ;) )

माझ्या पुरते म्हणाल, तर आधी देखील अनेकदा सांगून झाले आहे, आजच्या काळात मी जात मानतच नाही आणि कोणी मानू नये अशा मताचा आहे. पण कायम उलटेच दिसते, ज्यांना धर्म देखील मान्य नसतो असेच बर्‍याचदा जातींना आजही मनात आणि जनात ठेवताना दिसतात. हा माझ्या दृष्टीने बुद्धीभेदच आहे... आता तसे मूळ चर्चा प्रस्तावकाला म्हणायचा आहे का ते माहीत नाही पण तुमच्या वरील वाक्यातून मात्र जाणवते असे खेदाने नमूद करू इच्छीतो... बाकी माझा मुद्दा इतर काही प्रतिसादकांप्रमाणेच "गंजीवरचे कुत्रे" या वाक्प्रयोगाशी होता. त्याला तुम्ही देखील दुर्लक्षिलेले आहे असे दिसले.

पूर्वी घडलेल्या गोष्टींची जवाबदारी टाळण्यासाठी "इतिहासाचे ओझे" झटकून टाकायला लोक उत्सुक असणार यात शंका नाही. ;-)

हा पण एक बुद्धीभेदाचाच प्रकार आहे! मी अथवा विंदांनी "इतिहासाचे ओझे" झटकून टाकायला सांगितलेले नाही तर ते डोक्यावर घेऊन नाचू नका असे म्हणले आहे. अशा ओझ्याच्या डोक्यावर आपण चढून फॉरवर्ड थिंकींग केले पाहीजे असे म्हणणे आहे. पण आजही जाती मानणार्‍यां एकीकडे तथाकथीत बुद्धीवादीं आणि दुसरीकडे बुरसटलेले धार्मिक यांच्या मधे अडकलेल्या जनतेला हे कसे समजणार? म्हणून म्हणतो की फूट पडेल असे वागू नये.

माझे मत

हे ज्ञान कोठे निर्माण होऊ शकते? उत्तर - ते कोठेहि आणि कोणामध्येहि निर्माण होऊ शकते. समाजाची ज्ञाननिर्मितिक्षमता आपण जर १०० मानली तर भारतीय समाजाने ह्यापैकी केवळ दीड ते दोन टक्के क्षमतेचाच वापर केला. हे कसे? तर एकून समाज १०० टक्के मानला तर ९६ टक्के इतक्या गटाला म्हणजे खालच्या जातींना ज्ञाननिर्मितीपासून आपण बाद ठरविले. उर्वरित ४ टक्क्यांपैकी निम्म्या स्त्रिया म्हणून त्याहि बाद. अशा रीतीने मूळ १०० पैकी केवळ २ व्यक्तींना ज्ञानग्रहणाची आणि पर्यायाने ज्ञाननिर्मितीची संधि आपण दिली. हे आता सर्वमान्य आहे की ज्ञान कोणत्याहि व्यक्तीपासून निर्माण होऊ शकते. एकूण समाजापासून होऊ शकणारी ज्ञाननिर्मिति १०० मानली तर उपलब्ध काळात आपण त्यापैकी केवळ २ टक्के ज्ञानच निर्माण होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण केली.

तुमचे हे संख्याशात्रीय गणित थोडे गडबड वाटते खरे ते असे -

किमान जगण्याचे आणि अशा प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्याचे ज्ञान 'कोणामध्येही' निर्माण होऊ शकत नाही का? होते असे तुमचे म्हणणे आहे, तसे असेल तर ज्ञान निर्माण झाले असेल पण ते 'कृतीशील' नसावे. जर तुमचे उत्तर असेल की सर्वांमध्ये ज्ञान निर्माण होऊ शकत नाही तर मग पुढचा प्रपंच येत नाही.

वेदवेदांगे, षट्शास्त्रे, तत्त्वज्ञान, परमार्थ आणि मोक्षाचा विचार ह्यांचा अभ्यास भरपूर झाला पण राज्यशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, युद्धशास्त्र, नौकानयनशास्त्र, उपयुक्त कला आणि कारागिरी, शेती अशा अनेक शाखांकडे ज्ञानशाखा म्ह्णून पुरेसे लक्ष दिले गेले नाही.

तक्षशीला आणि नालंदा सारख्या विद्यापीठात हे सर्व शिकविले जात होते असे कुठेसे वाचण्यात आहे.

जवळजवळ १०० टक्के हिंदु असलेला काश्मीर तेराव्या चौदाव्या शतकापासून जवळजवळ १०० टक्के इस्लामकडे गेला ह्यात काहीतरी चुकते आहे अशी जाणीव आपल्या बौद्धिक धुरीणांना कधी तीव्रतेने झाली असे जाणवत नाही.

हे वाक्य तर उपक्रमाच्या ह्या धर्तीवर पूर्णपणे आक्षेपार्ह आहे, आज मिझोराम आणि नागलँड प्रदेश जवळपास पूर्णपणे ख्रिस्त धर्मीय होतोय पण तुम्हाला त्यात काही चुकते आहे अशी जाणीव आहे काय?

एक निरर्थक लेखल्

लेख मोठ्या अभ्यासपूर्ण रितीने लिहिला आहे परंतु या लेखातून लेखकाला काय सांगायचे आहे ते समजले नाही. असल्या जुन्या कालबाह्य विषयावर चर्चा करून काय साध्य होणार तेही कळू शकले नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

एक शंका

भौतिक आणि दैनंदिन जीवन सोपे होण्याच्या दृष्टीने पाहिले तर सामान्य व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यात सातव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत काहीही बदल घडला नाही. सामान्य माणूस सातव्या शतकात जसे जगत होता तसेच सतराव्या शतकातहि.

ब्राह्मणांच्या पाजीपणामुळे हिंदुस्थानात ही स्थिती राहिली हे समजू शकते. पण हिंदू आणि ब्राह्मण नसलेल्या जगाच्या इतर भागात सामान्य माणसाच्या आयुष्यात याच काळात नेमके काय बरे बदल झाले?

७वे आणि १७वे शतक - युरोपात

कित्येक उदाहरणे देता येतील.

छपाईचे तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे मोठया प्रमाणात सर्वसामान्य जनता बायबल स्वतः वाचू लागली. तेव्हढया प्रमाणात धर्मगुरुंचे वर्चस्व कमी होऊ लागले.

नौकानयनात प्रगति होऊन अमेरिका खंड हा प्रचंड भूभाग वसाहतीसाठी उपलब्ध झाला. तेणेकरून संपत्तीचा नवा ओघ युरोपात येऊ लागला. युरोपातून बाहेर पडून मोकळा श्वास घेऊ इच्छिणार्‍यांना नवे क्षेत्र उपलब्ध झाले. भारत आणि अन्य पौर्वात्य देशांकडे जाण्याचा रस्ता खुला झाला. अजून संपत्ति आणि व्यवसायाच्या संधि!

दोन अगदी उघड गोष्टींवर थांबतो.

आस्ते भग आसीनस्य ऊर्ध्वस्तिष्ठति तिष्ठतः|
शेते निपद्यमानस्य चराति चरतो भग।||

य: पठति लिखति पश्यति परिपृच्छति पण्डितानुपाश्रयति|
तस्य दिवाकरकिरणैर्नलिनीदलमिव विकास्यते बुद्धि:||

अरविंद कोल्हटकर, जुलै ३१, २०११.

पाजी ब्राह्मण?

अजून एक खुलासा.

'पाजी' हा शब्द माझा नाही. माझ्या समजुतीनुसार मी लिहिलेले कोणत्याहि अभिनिवेशानुसार लिहिलेले नाही.

अरविंद कोल्हटकर, जुलै ३१, २०११.

सहमत - असहमत

छपाईचे तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे मोठया प्रमाणात सर्वसामान्य जनता बायबल स्वतः वाचू लागली.

मान्य.

नौकानयनात प्रगति होऊन अमेरिका खंड हा प्रचंड भूभाग वसाहतीसाठी उपलब्ध झाला. तेणेकरून संपत्तीचा नवा ओघ युरोपात येऊ लागला. युरोपातून बाहेर पडून मोकळा श्वास घेऊ इच्छिणार्‍यांना नवे क्षेत्र उपलब्ध झाले. भारत आणि अन्य पौर्वात्य देशांकडे जाण्याचा रस्ता खुला झाला. अजून संपत्ति आणि व्यवसायाच्या संधि!

या सर्व गोष्टींनी सर्वसामान्य माणसाच्या राहणीत फरक झाला? माझ्या मते या गोष्टी फक्त मूठभर श्रीमंत लोकच करू शकत. औद्योगिक क्रांतीनंतरच (१९ व्या शतकानंतरच) सामान्य माणसाच्या राहणीत लक्षणीय फरक पडू लागला असे वाटते.

धर्मगुरूंचे वर्चस्व

"...तेव्हढया प्रमाणात धर्मगुरुंचे वर्चस्व कमी होऊ लागले...."

~ सर्वसामान्य जनता बायबल वाचू लागली...इतपत श्री.कोल्हटकरांचे रीडिंग मान्य, पण पुढील [वरील] विधान धाडसाचे वाटते. आजही व्हॅटिकन तितकेच सामर्थ्यवान आहे जितके मागील कित्येक शतकात होते. जगभर लोकसंख्या वाढीचा बॉम्ब फुटण्याच्या बेतात असूनही पोप आणि सीनेट अद्यापि बर्थ कंट्रोलला परवानगी देण्याच्या सक्त विरोधात आहे. ही बाब चीन-भारत सारखे 'अब्जाधीश' देश पचवू शकलेले नाहीत; पण तरीही ते व्हॅटिकनच्या 'दादागिरी' पुढे हतबल आहेत.

आत्ताच नव्हे तर अगदी १९६८ मध्ये ब्ल्यू रिबन् व्हॅटिकन कमिशनने या बाबतीत सादर केलेल्या सविस्तर अहवालात शेवटी जसे म्हटले गेले होते "सध्याची जगभरची लोकसंख्येची स्थिती पाहता चर्चने कॉन्ट्रास्पेशन शिकवणी संदर्भातील आपली भूमिका बदलणे फार गरजेचे आहे. संततीप्रतिबंधक उपाय वापरण्यास जोडप्यांना परवानगी देणे संयुक्तिक वाटते" इ. त्याला त्यावेळचे पोप पॉल-६ यानी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि थेट त्या तारखेपासून अगदी या क्षणापर्यंत त्या विषयावर चर्चा पुन्हा उघडली गेलेली नाही.

हा धर्मगुरूंचा वर्चस्वाचाच एक मासला म्हटले पाहिजे; जो आपण नाकारूच शकत नाही.

स्फूर्तिदायक, पण ऐतिहासिक विश्लेषण म्हणून?

ज्ञानार्जन करणारा समाजाचा अंश जास्तीतजास्त मोठा असावा - जवळजवळ १००% - आणि ज्ञाननिर्मिती ही समाजाच्या मोठ्या अंशाने करावी, हे म्हणणे स्फूर्तिदायक आहे. "सामाजिक उतरंडीमधील स्थान जन्मावर आधारित नको" हे म्हणणे सुद्धा स्फूर्तिदायक आहे.

- - -

पण ऐतिहासिक विश्लेषण म्हणून लेख पटत नाही. काही बाबतीत भारताची ध्वनित/अस्पष्ट तुलना दूरदेशांशी केलेली आहे, आणि काही बाबतीत हिंदू समाजाची ध्वनित तुलना बिगरहिंदू समाजांशी केलेली आहे. तुलना करणे ठीकच आहे. पण तुळेतली दोन्ही पारडी डोळ्यांसमोर ठेवायला पाहिजे. नाहीतर विश्लेषण कसले?

(आपला...) एकून समाज १०० टक्के मानला तर ९६ टक्के इतक्या गटाला म्हणजे खालच्या जातींना ज्ञाननिर्मितीपासून आपण बाद ठरविले. उर्वरित ४ टक्क्यांपैकी निम्म्या स्त्रिया म्हणून त्याहि बाद. अशा रीतीने मूळ १०० पैकी केवळ २ व्यक्तींना ज्ञानग्रहणाची आणि पर्यायाने ज्ञाननिर्मितीची संधि आपण दिली.

आता आकडा ५% की १०% ही बाब गौण आहे, हे मान्य आहे. पण अन्य कुठल्याशा देशात यापेक्षा अधिक लोकांमध्ये ज्ञाननिर्मितीची टक्केवारी होती, असे ध्वनित केलेले आहे. असा देश कुठला आहे, आणि कुठल्या काळातला?

संगीत, स्थापत्य आणि शिल्पकला ह्या शाखा आपल्याकडे अब्राह्मणांनाहि उपलब्ध होत्या. (गाण्याबजावण्याला सामाजिक दर्जा नव्हता, स्थापत्य आणि शिल्पकलेमेध्ये शारीरिक श्रम अधिक म्हणून बुद्धिजीवी ब्राह्मणवर्गाला त्यात रस नव्हता ही त्याची कारणे.) ह्या तीन क्षेत्रांमधील भारताची कामगिरी आजहि वाखाणण्याजोगी मानली जाते.

यात ध्वनित तुलना अशी आहे, की या क्षेत्रातील भारतातली कामगिरी अन्य कुठल्या देशाच्या (कुठल्याशा काळात) तुलनेने वाखाणण्याजोगी मानली जाते. त्या वेगळ्या देशात एक तर या तीन कलांमध्ये थोड्याच उच्चशिक्षितांचे वर्चस्व होते, म्हणून त्या देशांत त्या काळात या तीन कलांमधली कामगिरी निकृष्ट होती, असे ध्वनित करायचे असेल. किंवा त्या देशांमध्ये या तीन कला धरून खूप वेगवेगळ्या कलांमध्ये कामगिरी उत्तम होती, पण भारतात फक्त या तीन कलांतच वाखाणण्याजोगी होती, अशी तुलना ध्वनित करायची असेल. पण काय ते कळत नाही. मुखुअ म्हणजे ते कोणते देश, आणि तो कोणता काळ हे माहीत नसल्यामुळे स्वतःहून शोधून तुलना करणेसुद्धा मला जमत नाही.

कालमर्यादा काय असावी त्याची कल्पना या वाक्यावरून येते :

जी 'Dog in the manger' वर्तणूक १५०० वर्षे चालविली होती तिचे आपण बळी ठरलो

पण १५०० वर्षे भारतातील राज्यांपेक्षा सातत्याने अधिक ज्ञाननिर्मिती करणारा देश कुठला ते माझ्या लक्षात येत नाही. त्यामुळे मला माहीत असलेल्या प्रत्येक देशाबाबत संशोधन करून १५०० वर्षांची तुलना भारताशी केली, तरी लेखातील विश्लेषण मला समजणार नाही, असे वाटते.

बाहेरून (...मोगल, अफगाण, तुर्क...) आक्रमक येतात आणि आपल्याला सहजी नामोहरम करतात असे का होते ह्यावर फारसा विचार झाला नाही. जवळजवळ १०० टक्के हिंदु असलेला काश्मीर तेराव्या चौदाव्या शतकापासून जवळजवळ १०० टक्के इस्लामकडे गेला ह्यात काहीतरी चुकते आहे अशी जाणीव आपल्या बौद्धिक धुरीणांना कधी तीव्रतेने झाली असे जाणवत नाही.

विचार केला पाहिजे, हे ठीक. पण या लेखाच्या संदर्भात वरील परिच्छेदाचा काय म्हणून अर्थ लावायचा आहे? (येथे - कश्मिराच्या संदर्भात तरी - हिंदू विरुद्ध बिगरहिंदू अशी तुलना करायची आहे, असे गृहीत धरल्याशिवाय कुठलाच अर्थ लागत नाही.) बाहेरून काही आक्रमक आले, आणि दौलत लुटून परत गेले. काही एतद्देशीय झाले. यापैकी काही आक्रमकांनी ज्यांना नामोहरम केले, ते बिगरहिंदू होते. उदाहरणार्थ बाबराने लोदीशी लढाई केली, हुमायुनाने शेरशहा सूरीशी. (हुमायून सूरीशी लढाई हरून अफगानिस्तानात गेला, तर गुजरातेतला सूरी विजयी झाला - त्याचा लेखाशी काय संबंध लावायचा ते मला ठाऊक नाही.) बाबराच्या -किंवा कोण ते तुर्क त्यांच्या - पितृदेशात काय परिस्थिती होती त्याच्याशी भारताची तुलना ध्वनित केलेली आहे, पण लेखामध्ये त्याबद्दल माहिती काहीच दिलेली नाही. मंगोलिया ते अफगानिस्तान ते तुर्कस्तान या प्रदेशांमध्ये ज्ञानाची मक्तेदारी किती टक्के लोकांमध्ये होती?

कश्मीरात लोकसंख्या १०० टक्के हिंदूंपासून काही शतकांत १०० टक्के मुसलमान झाली. या काळात कश्मीरात ज्ञानाच्या मक्तेदारीच्या टक्केवारीत फरक पडला का? टक्केवारीत फरक पडला असेल, तर जाणून घ्यायला आवडेलच. पण त्याबद्दल कुठलीच माहिती लेखात दिलेली नाही. आणि जर फरक पडला नसेल तर या लेखाच्या ओघात हा मुद्दा सुसंदर्भ तो कसा? (सफेत रंगात मजकूर : इ.स.७०० मध्ये शैव-वैष्णव असलेले ख्मेर राज्य एक-दोन शतकांत पुरते महायान बौद्ध झाले. इ.स. ६०० मध्ये १००% पारशी असणारे पार्स राज्य एक-दोन शतकांत पुरते मुसलमान झाले. या सर्व ठिकाणी लेखातील विश्लेषण लागू आहे काय?)

- - -

मला वाटते, की लेखाच्या सुरुवातीला लेखकाच्या मनात औद्योगिक क्रांतीनंतरची युरोपीय राज्ये विरुद्ध इ.स १४००-१८७५ काळातला भारत यांची समकालीन<->समकालीन तुलना करायची असावी. परंतु लेखकाने तसा स्पष्ट निर्देश केलेला नाही. मग लेखाच्या उत्तरार्धात वेगवेगळ्या तुल्य-मागासलेल्या मध्ययुगीन राजवटींमध्ये भ्रांत तुलना करून विश्लेषणाचा अनर्थ केलेला आहे.

लेखाच्या उत्तरार्धाकडे डोळेझाक करून औद्योगिक क्रांतीमधील युरोपीय देशांपुरते लक्ष मर्यादित ठेवल्यास : औद्योगिक क्रांतीपूर्वी युरोपीय देशांत बहुधा ज्ञानार्जन करणार्‍या समाजाची टक्केवारी खूपच कमी होती. औद्योगिक क्रांतीनंतर शेतांवरून हाकललेल्या शेतकर्‍यांना पारंपरिक शेतकी ज्ञानावेगळे शिक्षण घ्यावे लागले. शिक्षण मोकळे झाले, म्हणून आपखुशीने शेती सोडून सुशिक्षित शहरी झाले, असे नव्हे. त्यामुळे लेखकाचा कार्यकारणनिर्देश चुकलेला आहे.

भारताच्या अंतर्गतही बघावे : औद्योगिक प्रगती झालेल्या प्रदेशांत समाजातील अधिक मोठा अंश शिक्षण घेतो. मी मानतो की एकदा सुरू झाले, की कार्यकारणभाव चक्रीय आहे. सुशिक्षित लोकांचे प्रमाण अधिक असल्यास मग औद्योगिक प्रगतीसुद्धा अधिक होते, आणि चक्रीवाढ होते. म्हणून शिक्षणाच्या प्रसाराबाबत स्फूर्तिदायक वक्तव्ये करणे चांगलेच आहे.

- - -
पुनश्च : स्फूर्तिदायक म्हणून लेखाचा रोख चांगला आहे, पण ऐतिहासिक विश्लेषण म्हणून पटण्यासारखा हा लेख नाही.

बरोबर

धनंजय यांचा प्रतिसाद आवडला.

सर्व समाजात सर्व काळी ज्ञानसाधना करणार्‍यांचे किंवा ज्ञान साधने उपलब्ध असणार्‍यांचे प्रमाण कमीच असते हे खरेच दिसते. मग फरक पडत असावा की हे अल्पसंख्य "ज्ञान" या क्षेत्रात कोणत्या विषयांचा समावेश करतात याचा. [वर मी दुवा दिलेल्या धनंजय यांच्या लेखात असेच काहीसे प्रतिपादन आहे].

नितिन थत्ते

अवांतराचा मुद्दा

@ विकास : "असे अजून बरेच काही सांगता येईल. हवी असल्यास पुढची चर्चा खव अथवा वेगळ्या चर्चेद्वारी करता येईल."

@ नितिन थत्ते : "अवांतर वाढत चालले आहे हे खरे. या अवांतराचा वेगळा धागा बनवता येईल का?"

~ दोन्ही मतांशी पूर्णपणे सहमत आहे. संपादक मंडळाने आपल्या अधिकारात अशा स्वरूपाचा वेगळा धागा इथे उघडल्यास तिथे मला (आणि अर्थात त्याचबरोबर इतरांनाही तिथे या अवांतर होत चाललेल्या विषयावर सविस्तर लिहिता येईल असे वाटते.

असे करता येत नसेल तर मग इथेच ती संदर्भीय चर्चा वाढविता येईल. योग्य ते व्हावे.

 
^ वर