पद, हुद्दे, पदवी आणि हक्क, अधिकार
खालील पदे, हुद्दे आणि त्याबरोबर चालत येणारे हक्क आणि अधिकार यांची माहिती हवी आहे. तसेच, समानार्थी भासणार्या शब्दांत काही अर्थच्छटांचे फरक असल्यास तीही माहिती हवी आहे. काही पदे खाली दिली आहेत.
१. जहागिरदार
२. जमीनदार
३. वतनदार
४. देशमुख
५. कुलकर्णी
६. खोत
७. देसाई
जहागिरदार, जमीनदार आणि वतनदार हे शब्द वेगवेगळे वापरले जातात की एकाच अर्थाने हे जाणून घ्यायचे आहे.
देशमुख आणि देसाई हे जवळपास सारखेच असावे असे वाटते पण त्यांत नेमका फरक कोणता? देशमुखांची वतने होती. त्यांनाच वतनदार असे म्हटले जात होते की अर्थांमध्ये थोडाफार फरक आहे? याविषयी माहिती असल्यास येथे द्यावी. मोल्जवर्थवर यातले बरेच शब्दार्थ दिलेले आहेत परंतु ते संक्षिप्त आहेत. त्यापेक्षा अधिक माहिती या चर्चेतून अपेक्षित आहे.
मुसलमानी राजवटीत कोणते नवे शब्द वापरात आले ते ही सांगावे.
याखेरीज, मला माहित असणारे पण इतरांना माहित नसणारे अनेक शब्द असतील (किंवा उलट. जसे, फडणीस, चिटणीस, कोतवाल, फौजदार वगैरे) त्यांची माहितीही या चर्चेतून करून घ्यावी.
Comments
खोती
खोती बद्दल थोडीफार माहिती आहे, इतर शब्दांबद्दल माहित करून घ्यायला आवडेल.
खोताकडे पंचक्रोशीतील गावांतील महसूल गोळा करण्याचे अधिकार असतात. महसूल गोळा झाला न् झाला तरी ठराविक सारा त्याला सरकारजमा कराचाच लागतो.सरकारजमा झालेला सारा भरून उरलेला सारा ही खोताची कमाई.
खोती प्रामुख्याने कोंकणातच पाहिली आहे. विदर्भाकडे ह्याला बहुधा मालगुजार असे नाव आहे.
तळटीप - खोतीला जातींचे बंधन नाही. जसे ब्राह्मण खोत होते तसे मराठादेखिल होते. एक खोत आडनावाचे मुसलमान कुटुंब माझ्या परिचयाचे आहे. तेही बहुधा एकेकाळी खोतच असावेत.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
देशमुख्,देसाई वगैरे
महाराष्ट्रापुरते माहिती देणे उचित होईल. कारण येथील जहागिरदार व उत्तर प्रदेशातील जहागीरदार यांची तुलना करणे योग्य होणार नाही.
पूर्वी राजा हा आपल्या राजधानीत बसून राज्य करी तेंव्हा त्याला दूरदूरच्या ठिकाणची कामे करून घेणे, उदा. कर गोळा करणे, या करिता पगारी माणसे ठेवणे सहजशक्य नव्हते. याचे मुख्य कारण म्हणजे दळणवळणाच्या असुविधा. व दुसरे कारण म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या चालीरिती. ग्रामसंस्था फार पुरातन आहेत व त्यात ढवळाढवळ करणे अवघड होते. उदा. पाटील. तो जर वंशपरंपरेने गावाच्या संरक्षणाची कामे करत असेल तर त्याला काढून नवीन पगारी माणूस नेमणे दुरापास्त होते. त्यामुळे राज्याची दोन महत्वाची कामे महसूल गोळा करणे व संरक्षणव्यवस्था राखणे ही कामे उक्ती देणे सोयिस्कर होते. प्रत्येक कुळाकडून सारा गोळा करण्यापेक्षा एका माणसाकडून गावाचा सारा एकदम, एकत्र घेणे सोपे होते. त्यामुळे "या गावाचा सारा म्हणून एवढे पैसे तू राजधानीत आणून दे" असे सांगणे तो पसंत करे. जी गोष्ट एका गावाची, तीच पेठ्याची, तालुक्याची,जिल्ह्याची वा प्रांताची.मग तो माणूस, राजाला १०० रुपये द्यावयाचे असतील, तर स्वत: १५० रु. गोळा करतो की २०० रु. इकडे राजाला लक्ष देण्याची गरज भासत नसे. शिवाय असे काम कोणाला द्यावयाचे हे राजाच्या हातात असल्याने गावकामगार मिंधा रहावयाचा. पाटील, कुलकर्णी, खोत, देसाई,देशमुख, देशपांडे, सरदेसाई, सरदेशपांडे, ही सगळी एका माळेतली.
वतनदार निराळे. एकाद्या देवळाकरिता, त्याच्या खर्चाला उत्पन्नाचे साधन म्हणून काही जमीन, गाव (किंवा काही गावे !) नावे करून देली जावयाची. त्याची व्यवस्था कूळ बघावयाचे. अशा जमीनीतील उत्पन्न सरकारकडे न जाता देवळाकडे जायचे. असाच प्रकार माणसाच्या बाबतीतही होई.एखाद्याने लढाईत विषेश कामगिरी केली तर त्याला बक्षीस म्हणून जमीन/गाव मिळे. हे वतन.( थोडक्यात विकत न घेता मिळालेली जमीन.) महाराष्ट्रात महार वतने फार प्रसिद्ध होती.
गावचा जसा पाटील तसा देसाचा/देशाचा/ परगण्याचा देशमुख. परगणा म्हणजे हल्लीचा तालुका म्हणा. हा "देशा"च्या अंतर्गत व्यवस्थेत सर्वाधिकारी. समाजात व राज्यकारभारात याला मोठा मान असे, जहागीरदार/इनामदार यांपेक्षा जास्त.देशमुखी वंशपरंपरागत असे. पिकाची आणेवारी ठरविणे, खंड माफ करणे,तंटे-बखेडे मिटविणे, सीमा ठरविणे, जुलुम होऊ न देणे वगैरे त्याचे कामे. त्याच्या पदरी बरेच सैन्य असे. राजाने बोलाविल्यावर त्याने सैन्य घेऊन जाणे अपेक्षित असे.
त्याचे देशपांडे, यारदी,कुलकर्णी, खासनीस इत्यादी अधिकारमण्डल असे.थोडक्यात तालुक्याचा शाश्वत सर्वाधिकारी. त्यामुळे पुंडगिरीही फार. राज्यसंस्था दुर्बळ
झाली तर ती झुगारून दिली जाई. हा धोका लक्षात घेवून त्याला लगाम घालावयाचा प्रयत्न छ.शिवाजी महाराजांनी केला. उलट राजाराममहाराज व पेशवे यांच्या
काळात त्याने परत जोर धरला. देशमुख सरकारी सार्यापैकी २ ते ५ टक्के भाग स्वत: घेत. बलुतेदारांकडूनही जास्तच वसूली करत.
गावात पाटीलाचा कुलकर्णी, तसा देशमुखाचा देशपांडे.परगण्यातील जमाबंदीचे सर्व कागदपत्र देशपांडेकडे असत. कोकणातील प्रभू किंवा देसाई ही देशावरील देशपांडे
याचे प्रादेशिक पर्याय. यातील ज्येष्टाना सरदेशपांडे, सरदेसाई, प्रभुदेसाई असेही म्हणत व पुढे ती आडनावे झाली.
कोकणात खोत गावाचा सारा गोळा करावयाचा. पण तो सरकारात भरावयाचा नाही. त्याऐवजी सुरवातीलाच ठरवलेली रक्कम सरकारजमा करावयाचा. गावातील बरीच जमीनही या-त्या प्रकाराने मालकीची करून घेऊन परत कुळांना कसावयाला द्यावयाचा. कुळकायदा लागू झाल्यावर यांची वाट लागली.
बंगाल-उत्तरप्रदेश यातील जहागीरदार, महाराष्ट्रात नाहीत. पेशवाईत निर्माण झालेली छोटी छोटी संस्थाने यांना जहागिरी म्हणावयास हरकत नाही.
शरद्
कुलकर्णी, देसाई, इ.
थोडी ऐकीव / वाचीव माहिती पण असंदर्भ (क्षमस्व).
पाटील व कुलकर्णी हे गाव पातळीवरचे. पहिला महसूल अधिकारी, दुसरा लेखा अधिकारी (अकाउंटंट्).
याला समांतर जिल्हा(?) किंवा परगणा (?) पातळीवरचे देशमुख व देशपांडे. काम तेच.
यातले करण म्हणजे हिशेब. यावरूनच कर्णिक हे नाव आले आहे.
हेमाडपंत किंवा हेमाद्रिपंडित हा राज्याचा श्रीकरणाधिप म्हणजे चीफ् अकाउंटंट् होता म्हणे.
(चक्रधरस्वामीच्या एका चरित्रकथेत याला खलपुरुष असे रंगवलेले आहे पण तो विषय वेगळा झाला.)
देशमुख व देसाई हे एकच असे ऐकले आहे. दक्षिण महाराष्ट्र - उत्तर कर्नाटक या भागात देसाई हे नाव अधिक प्रचलित असावे. कर्नाटकात देसायी हे जास्त पाहिले आहे.
"णीस" हे नवीस म्हणजे कारकून हे आपल्याला माहीतच आहे. ते पागा, चिट् (स्टेनो), वाक्या (जर्नल्), फड (हेड् ऑफिस्), इ. वेगवेगळ्या खात्यात्त कामे करीत असतील त्याप्रमाणे त्यांची नावे असतात.
कार-कून चा शब्दशः अर्थ (कार) काम (कुन) करणारा -कर्मचारी किंवा कामकरी, पण आपण लिखापढी करणार्यालाच फक्त कारकून म्हणतो. या दृष्टीने पाहिल्यास त्याऐवजी नवीस हाच शब्द मराठीने स्विकारायला हवा होता असे वाटते.
आता परभाषेतून आत घेतलेल्या या व अशा सगळ्याच शब्दांना वेगळ्या वेगळ्या खास मराठी अर्थछटा आलेल्या आहेत त्यावर उपाय नाही.
- दिगम्भा
हक्क आणि अधिकार यांची माहिती
अहो, आपण नाईक घराण्याला विसरलात का?
कि चुकुन राहिले आहे?
अधिक माहीतीसाठी नाईक घराण्याला भेटद्या. सन १८०१ पासून आपल्याला दस्ताऐवज वाचण्यास व बघण्यास मिळेल. पण येथे चर्चा नको. उपक्रमाच्या सदस्याना लिहण्याचा त्रास नको.
उपक्रमाची डोके दुखी
संजीव
धन्यवाद
शरदराव, सुनील आणि दिगम्भा यांचे प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. माहितीबद्दल आभार.
नाईकसाहेब,
जी काही चर्चा आहे ती इथेच करा. भेट देणे वगैरे कठिण आहे.
याखेरीज, डबीर, मुजुमदार वगैरेंबद्दलही जाणून घेण्यास आवडेल.
मोकाशी, नाडगौंडा
मोकाशी ( 'मोकासा' जमिनीचा अधिकारी. मोकासा म्हणजे 'चौथ'१ मधून राज्याच्या प्रमुखाला जाणारा हिस्सा, 'राजबाबती', उणे केल्यावर उरलेला हिस्सा. )
नाडगवंडा किंवा नाडगौंडा ( देशमुखांचा समकक्ष. नाडगवंडा म्हणजे चौथचा ३ टक्के हिस्सा. मूळ कानडी शब्द.)
साहोत्रे/साहोत्रा ( साहोत्रा म्हणजे 'चौथ'चा ६ टक्के हिस्सा. पंतसचिवांचा हिस्सा.)
मिराशी
मिरासदार
शेखदार
मुतालिक
मुकादम/मोकदम
सुभेदार ( सूबा > इक्ता > शिक > तालुका अशी प्रांताची विभागणी होती. )
जाता जाता
वाकणीस किंवा वाकियानवीसाचे माहिती गोळा करण्याचे (इथे 'इंटेलिजन्स गॅदरिंग' असा अर्थ घ्यावा) करण्याचे होते असे वाचल्याचे आठवते
१.मोल्सवर्थवर चौथ
गृहितसहस्रक ते घैसास.
घैसास, घळसासी ही कुलनामे ऋग्वेदाच्या सहस्र ऋचा ग्रहण केलेल्या गृहितसहस्रक - गहीअसहसअ- घैसास अशी आली आहेत.
(२००० वर्षांपासून)
करणिक त्ताम्रपत्रावर कोरत असत, अक्षपटलाध्यक्ष- पटलाध्यक्ष हे पत्रे कोरताना समक्ष असत. त्यांचेच कुलकरणी पाटील झाले. ही नावे १६०० वर्षांपूर्वी पासून प्रचारात आहेत.
पुळुमावी प्रमोदिनिपुत्त
त्रीसमुद्रपीततोय!
जहागीर
फारशी शब्द कोशात जहागीर म्हणजे पेन्शन असा दिला आहे.
पुळुमावी प्रमोदिनिपुत्त
त्रीसमुद्रपीततोय!