अल बिरुनीचा भारत

'अल् बिरुनी' चे भारतावरचे पुस्तक वाचायचे मनात बरेच दिवस होते. नॅशनल बुक ट्रस्ट ने प्रकाशित केलेले ( पुस्तकाचे नाव इंडिया, फक्त ८५ रु ) हे पुस्तक नुकतेच हाती लागले आणि एक मनसुबा पूर्ण झाला. हे पुस्तक वाचायच्याआधी बिरुनीचे निवडक वेचे ठिकठिकाणी वाचले होते. त्या वाचण्यावरून जे मत झाले होते त्या मतात हे पुस्तक वाचून बराच फरक पडला. मूळ भाषांतरकार Edward Sachau च्या पुस्तकाचे संक्षिप्तीकरण कयुमुद्दीन अहमद यांनी केले आहे. (आता संक्षिप्तीकरण न केलेले पुस्तक वाचावेसे वाटते आहे.)

अल बिरुनीचा जन्म उत्त्तर इराण मचे इ.स. ९७३ मधे झाला. याच सुमारास गझनीच्या महमदाचाही जन्म इराणमधेच झाला (९७१). बिरुनी १०४८ पर्यंत जगला तर गझनी १०३० पर्यंत. बिरुनी ज्या प्रदेशात राहत असे तो पदार्थ गझनीच्या (वडिलांच्या) ताब्यात नव्हता. १०१७ मधे गझनीने तो जिंकला. बिरुनी तेव्हापासून गझनीत नेला गेला. गझनीच्या भारतावरील स्वार्‍यांचा काळ हा १००१-१०२४ असा धरता येतो. बिरुनी या दरम्यान भारतात गेला असेल असा अंदाज बांधता येतो. पण तो भारतात गेला होता की नाही यावर निश्चिती नाही.

बिरुनीला फारसी सोबत हिब्रु, सिरियाक, संस्कृत आणि अरेबिकचे चांगले ज्ञान होते. त्याचा खगोलशास्त्र आणि गणित यात विशेष अभ्यास होता. त्याने भरपूर ग्रंथ निर्मिती केली. अशी आख्यायिका आहे की त्याने उंटाच्या वजनाएवढे ग्रंथ लिहिले असावेत. पुस्तक वाचून बिरुनीच्या ज्ञानाच्या व्याप्ति केवढी मोठी आहे ते कळते. त्याच्या शेवटच्या दिवसातली एक आख्यायिका आहे. तो आसन्नमरणावस्तेत असताना त्याला एका गणिती प्रश्नाबद्दल जाणायचे होते. त्यासाठी त्याच्या एका मित्राला त्याने बोलावले होते. मित्राने त्याला त्या गणिताबद्दल सांगितले. आणि मग काळजी पोठी म्हणाला की अशा अवस्थेत तू हा विचार का करतो आहेस? तर बिरुनी म्हणाला 'मी मरताना ह्या प्रश्नाचे उत्तर समजून मेलो तर बरे का न समजता मेलो तर बरे राहिल?'

बिरुनीने स्वतः कित्येक पुस्तकांचे भाषांतर केले. त्यात जसा संस्कृत ग्रंथांचा समावेश होता तसेच त्याने युक्लिड आणि अल्मागेस्ट (Almagest ) चे संस्कृत (वा दुसर्‍या भारतीय भाषा) मधे भाषांतर केले पुस्तक वाचताना बिरुनीचा मोकळेपणा जाणवतो. माहिती अपूरी असेल तर त्याबद्दल नीट माहिती नाही असे सांगतो. धार्मिक बाबतीत त्याची भूमिका सहिष्णुततेची जाणवते. त्याच्या पुस्तकात बर्‍याच चुका झाल्या आहेत. पण त्यात त्याचा अप्रामाणिकपणा निश्चितपणे जाणवत नाही. भारतातील लोकांबद्दलचे त्याचे मत हे छोट्या जनसमुदायातून झाले असावे असे वाटते. (या सुमारास गझनीने पंजाब प्रांत काबीज केला होता.) गझनीत (गावात) आलेल्या (वा पकडून आणलेल्या) संस्कृत पंडित हा एक ज्ञानाचा स्रोत असावा असे वाटते. स्वतः बिरुनीचे भारतीय ग्रंथांचे वाचन भरपूर चांगले होते. १८ पुराणातील कथा या दरम्यान सहज येतात. त्यासोबत भारतीय विज्ञानाची त्याने चांगली माहिती करून घेतली होती.

'माझे पुस्तक हे एक साधेसे ऐतिहासिक घटना मांडणारे आहे. मी वाचकांपूढे हिंदूंच्या थियरीज जशा आहेत तशा ठेवणार आहे. आणि त्यासोबत ग्रीकांच्या तशाच थियरीज मांडणार आहे. जेणेकरून या दोहोतील साम्यस्थळे आणि संबंध लक्षात यावेत.' या वाक्यांनी त्याच्या पुस्तकाला सुरुवात होते. एकंदर ८० प्रकराणातून हा प्रवास चालतो. आपल्या पुस्तकात काही ढिलाई आहे हे तो सुरुवातीलाच मान्य करतो. त्याची कारणे म्हणजे 'जगातल्या इतर राष्ट्रांपेक्षा येथे फार निराळे आहे. संस्कृत ही फार मोठी आणि अर्थगर्भ शब्द असलेली भाषा आहे. धर्म अगदी वेगळा आहे. विशेषतः ते विदेस्यांचा काही बाबतीत विटाळ मानतात. भारतीय ग्रंथाचे लेखनिक प्रती करताना नीटशा करत नाहीत.' अशी आहेत. हे सगळे अगदी सुरुवातीस येते. आपण संस्कृत ग्रंथ जमवण्यासाठी प्रयत्न आणि पैसा दोन्हीची कमतरता होऊ न देण्याचा प्रयत्न करत असतो असेही त्याने म्हटले आहे.

त्याने दिलेल्या ८० प्रकरणांची यादी वाचली की त्यातील विविधता ध्यानात येते. यात धार्मिक, वैद्यकीय, खगोलशास्त्र, गणित, इतिहास, समाजशास्त्र, आख्यायिका अशा अनेक गोष्टी येतात. विशेषतः खगोल शास्त्र येते. त्याची भारतीय खंडाच्या भुगोलाची माहिती पण फार वेधक आहे. (ही माहिती सांगोवांगीवर आधारित आहे हे जाणवते.)

एकंदर लिखाण वाचताना कंटाळा येत नाही. लेखन हे जास्त प्रमाणात संकलनात्मक असल्याने काही भाग कंटाळवाणा वाटल्याने सोडल्यास पुढचा भाग वाचताना अडचण येत नाही. संक्षिप्तीकरणात काही गोष्टी गाळल्या आहेत त्या का हे कळत नाही. काय गाळले गेले आहे हे पुस्तकात स्पष्ट लिहिले आहे. त्यात काही क्रॉसरेफरन्सिंग आहे. पण त्याचा नीटसा मागोवा घेता येत नाही. ही त्या पुस्तकाच्या निर्मितीमूल्यात जाणवलेली मुख्य अडचण. सोमनाथच्या हकीकतीचा भाग सेन्सेटिव म्हणून गाळला असावा असे वाटते. पण पुस्तकाच्या एकंदर स्वरुपामधे हे काही फारसे बसत नाही. हे सर्व असले तरी पुस्तक वाचनीय झाले आहे.

पुस्तकातील काही महत्वाचा भाग पुढच्या भागात देऊ म्हणतोय.

प्रमोद

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम

पुढल्या भागाच्या प्रतीक्षेत. अल् बिरुनीचा भारत येथून उतरवून घेता येईल. मी अशी जुनी पुस्तके धडाक्यात उतरवून बितरवून घेत असते. वेळे अभावी वाचत मात्र नाही, त्यामुळे आयतं उपक्रमावर वाचायला मिळणार असेल तर उत्तम झाले.

'माझे पुस्तक हे एक साधेसे ऐतिहासिक घटना मांडणारे आहे. मी वाचकांपूढे हिंदूंच्या थियरीज जशा आहेत तशा ठेवणार आहे. आणि त्यासोबत ग्रीकांच्या तशाच थियरीज मांडणार आहे. जेणेकरून या दोहोतील साम्यस्थळे आणि संबंध लक्षात यावेत.'

छान! दोन संस्कृतीतल्या पौराणिक कथांत आणि सिद्धांतात साम्यस्थळे असतात हे त्याकाळी बिरुनीला जाणवले यातच खूप आले.

अवांतर १:

ज्या प्रदेशात राहत असे तो पदार्थ गझनीच्या (वडिलांच्या) ताब्यात नव्हता.

प्रदेश म्हणायचं होतं का? की जेवता जेवता लेख लिहिलात? हलकेच घ्या. :-)

अवांतर २:

बिरुनी म्हटल्यावर ईश आपटे आठवले.

धन्यवाद

दुव्याबद्दल धन्यवाद. कोलंबियातील या वाचनालयाचा दुवा मी पूर्वी बघत असे. हल्ली बघायचा राहून जातो.
आता दुव्यावर उपलब्ध असल्याने संदर्भ देण्याचे/तपासण्याचे काम सोपे झाले.

प्रमोद

योगायोग

मी दोनच दिवसापूर्वी हे पुस्तक व अल बिरुनीचा भारताचा इतिहास ही पुस्तके उतरवून घेतली आहेत. काल हे पुस्तक चाळले. वाचायला अजून वेळ झाला नाही. उपक्रमवर आयतेच मिळणार असले तर उत्तमच.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

चर्चेचा विषय

बिरुनीचे वाचक इथे मिळतील असा अंदाज होता.
आता ते मिळाल्याने, लेखाऐवजी चर्चेचा विषय करता येईल.

प्रमोद

उत्तम पुस्तक

इतिहासात रुची असणा-यांसाठी उत्तम पुस्तक आहे. आजचा भारत कसा आहे हे लिहिले तर आणखी १००० वर्षांनी ते कशा स्वरुपात सापडले तर त्याकाळच्या लोकांना वाचता येइल असे वाटून गेले. इतिहासात (गतकालिन जगात) अजिबात रुची नसल्यामुळे मला तरी ह्या पुस्तकासाठी वेळ देणे परडणार नाही, त्यापेक्षा मी एखादे प्रोग्रामिंगचे पुस्तक वाचेन.

उत्तम विषय

अल बिरुनी हा उत्तम विषय आहे. अलबिरुनीचे पुस्तक वाचल्यावर मला एक भाग लक्षात राहिला होता. तो म्हणजे अल बिरुनीने ब्राह्मणांच्या विद्वत्तेची तारीफ करीत कूपमंडुकपणावर टीका केली आहे. 'जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!' असे त्यालाही वाटत असे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

तो काळ लक्षात घ्या..

ब्राह्मणांनी सरसकट कूपमंडूक वृत्तीचे दर्शन घडवलेले नाही.

जे खरे विद्वान आणि व्यासंगी ब्राह्मण होते त्यांनी शिष्याचा अधिकार ओळखून आपले संचित त्यांना देऊ केले आहे.
नालंदा विद्यापीठात ह्यु एन त्सांग राहिला होता. त्या काळात भारतातील नालंदा व तक्षशिला विद्यापीठांत आसपासच्या देशांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत असे. ह्यु एन त्संग चीनला परत गेला त्यावेळी आठ खेचरांवर लादता येतील इतकी हस्तलिखिते त्याला नालंदा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु आचार्य शीलभद्र यांनी मोठ्या आनंदाने दिली होती. ज्या ज्या परकीय व्यासंगी लोकांना येथील शास्त्रांमध्ये कुतुहल होते त्यांच्याशी येथील ब्राह्मणांनी शास्त्रार्थ केला आहे. मिनॅन्डर व साधू नागसेन यांची चर्चा 'मिलिंद प्रश्न' म्हणून प्रसिद्ध आहे. गणिताचे खूपसे ज्ञान अरबी पंडितांना भारतातील विद्वान आणि व्यापार्‍यांमुळेच मिळाले आहे.

ब्राह्मण म्हणजे नेहमीच विद्याव्यासंगी असे नव्हते. बहुतेकजण तर पोटार्थी आणि पोपटपंची करुन पाठांतर केलेले होते. तो काळही असा होता, की आपले धर्मग्रंथ, पारंपरिक ज्ञान परकी आक्रमणापुढे सुरक्षित राहील, की नाही याची धास्ती घेण्याचा होता. या स्थितीत कुणाही परकीयाला ' या बसा. आमची शास्त्रे शिकवतो' असे सहजपणे कसे म्हणता येईल. केवळ ब्राह्मण समाजावर कूपमंडूकतेचा आरोप कशाला? अन्य समाजही आपले पारंपरिक व्यावसायिक ज्ञान पिढ्यानपिढ्या जतन करुन होते. त्यांनी कुणा परकीयांना कधी उदारतेने म्हटले का, की 'या तुम्हाला तलम वस्त्रे कशी विणायची ते शिकवतो' म्हणून.

पण परकी माणूसही ज्ञान देण्यास पात्र आहे, हे ओळखून भारतातील विद्वानांनी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला आहे. ब्रिटीशांना संस्कृत ग्रंथांचे इंग्रजीत भाषांतर करुन देण्यात कुणी मदत केलीय? अल बरुनी संस्कृत शिकला होता याचाच अर्थ त्याला ही भाषा कुणी पंडिताने शिकवली असणारच. हाच पुरावा होत नाही का?

पाश्चात्यांप्रमाणे भारतातही ज्ञानप्रसाराची लिखित आणि मौखिक परंपरा होती. वेदविद्येचे जतन मौखिक परंपरेने केले जाई. शास्त्र-पुराणे भूर्जपत्रावर व नंतर कागदावर लिहून साठवून ठेवली जात. नालंदा विद्यापीठ आक्रमकांनी जाळले तेव्हा तेथील लक्षावधी भूर्जपट्टिका भस्मसात केल्या. ही ग्रंथसंपदा कित्येक महिने जळत होती. रोममध्ये हेच झाले होते. ज्ञानाचा ठेवा अशा आक्रमणांत नष्ट झाल्यावर पुढच्या पिढ्यांना 'कुठे आहे तुमच्या ज्ञानाचे लिखित पुरावे?' असे म्हणणे सोपे असते.

कूपमंडूकता

ब्राह्मणांनी सरसकट कूपमंडूक वृत्तीचे दर्शन घडवलेले नाही.

जे खरे विद्वान आणि व्यासंगी ब्राह्मण होते त्यांनी शिष्याचा अधिकार ओळखून आपले संचित त्यांना देऊ केले आहे.

हे खरे असावे. पण त्याच बरोबर जगात जे काही इतरत्र चालू आहे त्याचा स्वीकार करत होते का? तुमच्या वरील वक्तव्याने यावर प्रकाश पडला नाही.
बिरुनीने वा कित्येकांनी अनेक संस्कृत पुस्तकांचे झान जगभर नेले. पण त्याच बरोबर इकडच्या किती जणांनी ग्रीक, अरेबीक, फारसी इत्यादींचा अभ्यास करून ते ज्ञान भारतात आणले?
कूपमंडूकतेत बेडूक आपल्या विहीरीला जग मानतो. त्या विहीरीत इतर आले तर त्यांना नाकारतो असे नाही.

आमचे सगळे शोधून झाले आहे. तुम्हाला काय हवे ते घ्या. तुम्ही (तुमचे न ऐकता) आमच्या ज्ञानापेक्षा जास्त काय सांगणार? हा रोग पूर्वी होता का?

अगदी हल्लीच येथे झालेल्या चर्चेत राशी ग्रीकांकडून आल्या म्हटल्यावर विरोधी मतांची चर्चा आली. नालंदातील जाळलेले ग्रंथ आणि पेशवाईतली मोडीतली पत्रे या झाकल्या मुठी आहेत का?

मला वाटते की जगातील ज्ञान भारतात येत होते. (जसे रसशास्त्र किंवा अल्केमी)तंत्रज्ञान तर येतच असे. पण हे इथल्या लोकांच्या प्रोऍक्टिविज्ममधून यायचे का?

भारतीय आणि कदाचित चीनी संस्कृतींना यासाठी कूपमंडूक प्रवृत्तीचे म्हटले तर ते परिस्थितीचे योग्य वर्णन असावे.

प्रमोद

समाज स्वयंसक्रिय केव्हा असतो?

एखादी संस्कृती/समाज स्वयंसक्रिय (प्रोएक्टिव्ह) केव्हा असतो?
शोध, साहित्य निर्मिती, कलांचा विकास केव्हा होतो?

रांष्ट्रात शांतता नांदत असेल तर. सत्ताधारी सामान्यांच्या गुणकौशल्याला उत्तेजन देत असतील तर.
(चाणक्य म्हणतो : सर्व उद्योगांचा उगम शांततेतून होतो म्हणून प्रथम देशात शांतता आणि सुव्यवस्था नांदायला हवी)

भारतावर किती आक्रमणे झाली आणि इथल्या समाजाला दुसर्‍या संस्कृतीशी आदान-प्रदान करायला तेवढा वेळ मिळाला का? एकतर भारताचा परदेशांशी संबंध हा विद्वानांच्या पातळीवर आलेला नाही. अगदी कारागिरांच्या पातळीवरही आलेला नाही. जो काही संबंध आला तो व्यापारी संघ आणि राजांमधल्या लढायांतून आला. अरबांना भारतीय गणिताचे आणि खगोलशास्त्राचे ज्ञान भारतीय व्यापार्‍यांकडून झाले. ठासणीची बंदूक आणि गोळीची दारु हे प्रभावी आणि प्राणघातक शस्त्र आहे, हे बाबराने १२००० सैन्यासह लोदीच्या एक लाख सैन्याचा पराभव करेपर्यंत भारतीयांना ठाऊक नव्हते, तसेच तळहाताच्या आकाराची घडी करता येईल, इतके तलम वस्त्र विणता येते, हे युरोपातील लोकांना भारताशी संबंध येईपर्यंत ठाऊक नव्हते.

ग्रीकची संस्कृती भारतासाठी खूपच लांबची होती. तिचा परिचयही भारतीयांना अलेक्झांडर चालून आल्यावर झाला. चीन आणि भारत या संस्कृतींमधील देवाण-घेवाण मात्र जुनी आहे. पण जसा ह्यु एन त्सांग भारतात शिकण्यासाठी कष्टाने आला तसे भारतीय लोक इतर ठिकाणी गेलेले नाहीत. एकतर त्यांच्या गरजा इथेच भागत होत्या आणि परदेश प्रवासही सोपा नव्हता. कोणताही समाज अस्तित्व टिकवण्यासाठी सोपा पर्याय निवडतो. भारतीयांनी तेच केले. इथल्या राजांनाही साम्राज्य विस्तार करण्यासाठी परदेशात जाऊन आक्रमणे करण्याची गरज भासली नाही. मग ग्रीक, शक, हूण, मुसलमान यांच्या तुलनेत भारतीय राजे धाडसी नव्हते, कूपमंडूक होते, असे म्हणायचे का?

मला इतकेच वाटते, की एखाद्या समाजाच्या मानसिकतेचा विचार करताना आपल्याला त्याच काळात जाणे जमले पाहिजे. वर्तमानकाळाच्या निकषांवर भूतकाळाची चिकित्सा करणे, म्हणजे अभ्यासाची शिस्त मोडणे.

कूपमंडुक वृत्ती

प्रमोद सहस्रबुद्धे यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे आणि योगप्रभूंचा मुद्दा की फक्त ब्राह्मण नाही तर इतर समाजही आपले ज्ञान बाहेर वाटण्यास नाखूश असावेत याच्याशी सहमती वाटते.

भारतावर किती आक्रमणे झाली आणि इथल्या समाजाला दुसर्‍या संस्कृतीशी आदान-प्रदान करायला तेवढा वेळ मिळाला का?

भारताकडे अवश्य वेळ होता. "सोन्याचा धूर निघत असे भारतात" असे म्हटले जाते ना! समृद्धी आणि शांततेशिवाय सोन्याचे धूर निघत नाहीत. नालंदा फार नंतर नष्ट झाले त्याच्या आधीची काही शतके तेथे अभ्यास सुरु होता. भारतात नालंदा आणि तक्षशिला ही दोनच विद्यापिठे नव्हती. विक्रमशिला, ओदंतपुरी अशा अनेक विद्यापिठांतून ज्ञानदान चालत होते. परदेशी विद्यार्थी येथे येऊन सर्रास शिकत परंतु भारतातून परदेशी जाऊन कोणी शिकल्याचे दाखले मिळत नाहीत. भारतात संशोधक वृत्तीने बाहेर जाऊन भूगोल शिकणारे, इतरांची संस्कृती शिकणारे कोणी नाही. त्या अर्थी याला नक्कीच कूपमंडुक वृत्ती म्हणता येईल.

भारतात अनेक काळ शांतता नांदत होती असेच वाटते. अलेक्झांडर येथे येण्यापूर्वी आणि अलेक्झांडर येऊन गेल्यावरही अनेक काळ. आक्रमणांची गणितेच करायची झाली तर ग्रीस, पर्शिया आणि इजिप्तवरली आक्रमणे कमी नाहीत त्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा वाटत नाही.

एखाद्या समाजाच्या मानसिकतेचा विचार करताना आपल्याला त्याच काळात जाणे जमले पाहिजे. वर्तमानकाळाच्या निकषांवर भूतकाळाची चिकित्सा करणे, म्हणजे अभ्यासाची शिस्त मोडणे.

नक्कीच. समुद्रबंदीचा कायदा किंवा अलेक्झांडर समवेत ग्रीसला जायला निघालेल्या कल्याण ऋषींना विरोध करणे, विद्यार्जनासाठी इतरत्र जाण्याची इच्छा नसणे, धर्मांतरबंदी वगैरे वगैरे अशा अनेक उदाहरणांतून भारतीयांची कूपमंडूक वृत्ती दिसून येते.

ग्रीक, शक, हूण, मुसलमान यांच्या तुलनेत भारतीय राजे धाडसी नव्हते, कूपमंडूक होते, असे म्हणायचे का?

धाडसी नसणे म्हणजे कूपमंडूक असणे अशी व्याख्या नसावी असे वाटते. ग्रीकांचे सोडून देऊ पण शक, हूण, मंगोल, तुर्क,अरब हे बहुतांश रानटी होते. एकमेकांचा जीव घेऊन स्वतःचा जीव वाचवायचा असतो या प्रवृत्तीचे होते. त्यांच्यामानाने सुसंस्कृतीत वाढलेले भारतीय राजे शांतताप्रेमी असल्यास नवल नाही. जेथे शांतता नांदते तो समाज थोडा ढिला पडतो (यापेक्षा बरी वाक्यरचना शोधत होते पण नाही आठवत) कारण तो कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास ठेवू लागतो. सैन्य किंवा कवायतींवर कमी खर्च करतो असे सर्वत्र दिसून आले आहे म्हणूनच बर्‍यावाईटाची तमा न बाळगणार्‍या रानटी टोळ्या लांडगेतोड करून जाऊ शकत होत्या.

जसा ह्यु एन त्सांग भारतात शिकण्यासाठी कष्टाने आला तसे भारतीय लोक इतर ठिकाणी गेलेले नाहीत. एकतर त्यांच्या गरजा इथेच भागत होत्या आणि परदेश प्रवासही सोपा नव्हता. कोणताही समाज अस्तित्व टिकवण्यासाठी सोपा पर्याय निवडतो. भारतीयांनी तेच केले. इथल्या राजांनाही साम्राज्य विस्तार करण्यासाठी परदेशात जाऊन आक्रमणे करण्याची गरज भासली नाही.

मला वाटते यालाच कूपमंडूक प्रवृत्ती म्हटले आहे. लोकांच्या गरजा ग्रीक आणि यवनी राज्यांतही भागत होत्या पण तिथून प्रवास करणारे एक्सप्लोरर्स नक्कीच निर्माण झाले.

सहमत

+१ सहमत

योगप्रभूंचा मुद्दा की फक्त ब्राह्मण नाही तर इतर समाजही आपले ज्ञान बाहेर वाटण्यास नाखूश असावेत याच्याशी सहमती वाटते.

तांत्रिक झान हे संरक्षित असते कारण त्याच्या संरक्षित असण्यात रोजीचा सवाल असतो. पण जे पुस्तकात बद्ध झालेले जुने ज्ञान आहे (जसे खगोलशास्त्र, गणित, भूगोल, इतिहास, विज्ञान) त्यास असे संरक्षित असण्याची गरज नाही.

प्रमोद

अरे देवा! पुन्हा तेच..

प्रियाली ताई,

अहो पूर्वी परदेशात शिकायला जाणे, दुसर्‍या संस्कृतीचा अभ्यास करायला जाणे आजच्याइतके सोपे नव्हते. अगदी ३०० वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राचे उदाहरण घ्या. त्या काळी केवळ ब्राह्मण समाजच शिकत असे. क्षत्रिय समाज व्यवहारज्ञान होण्यापुरता शिकत असे. उर्वरित समाज हा शेतीवाडी आणि जातीनुसार येणारे पारंपरिक व्यवसाय पत्करुन लहान वयातच पोटापाण्याला लागत असे.

ब्राह्मणांची मुले आधी गावातील भिक्षुकाकडून संथा घेत. त्यातील ८० टक्के लगेच देवळात पूजाअर्चा आणि भिक्षुकी करुन संसाराला लागत. अगदी निवडकच हुशार मुले पुढे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या गुरुकुलात दाखल होत. पैठण हे एकच धर्म पीठ होते. तेथून पुढे काशीला जावे लागत असे. हा प्रवासही सोपा नव्हता. काशीला जाऊन दशग्रंथी ब्राह्मण किंवा शास्त्रात पारंगत होणारा हजारांत एखादा असे. तो पंडित म्हणून राजदरबारात दाखल होई.

आज शिक्षणामुळे आपल्याला दुसर्‍या संस्कृतीविषयी जितके कुतुहल वाटते ते त्याकाळी नव्हते. लोक मुलगीसुद्धा पंचक्रोशीत देत. घरचे कुणी देशांतराला जाऊ लागले तर हा जिवंत परत येईल का, याच विचाराने कुटुंबीय आक्रोश मांडत. जिथवर मुलखांच्या सीमा लागून होत्या तिथवरच लोकसंस्कृतीचा संगम असे. महाराष्ट्राचा आणि कर्नाटकचा जितका घनिष्ट संबंध आला तेवढा पलिकडच्या केरळशी आला नाही. आता ही स्थिती असताना भारतातून उठून एखादा ग्रीक संस्कृतीचा किंवा इजिप्शियन संस्कृतीचा अभ्यास करायला कसा जाऊ शकेल? आपण तर त्याहीपूर्वीच्या म्हणजे हजार-दीडहजार वर्षे काळापूर्वीचे बोलतोय जेव्हा दळणवळणाचे सोपे मार्गही विकसित झालेले नव्हते.

त्या काळात परदेशी संस्कृतीशी जास्त संबंध येई तो व्यापारी संघांचा. पण हे व्यापार्‍यांचे तांडेही ठराविक क्षेत्रापुरतेच फिरत. सिंधी व्यापारी अरब देशांत माल विकत, तिथून पुढे तो अरब व्यापार्‍यांमार्फत इजिप्त व पुढे जाई. थेट ग्रीसमध्ये जाऊन भारतीय व्यापार्‍यांनी व्यापार केल्याचे माझ्या वाचनात नाही. सांगायचा मुद्दा म्हणजे भारतीय व्यापार्‍यांचा संबंध केवळ अरब देशांशी. दुसर्‍या बाजूला सिल्क रुटवरुन चीनशी व्यापार करणारे व्यापारी संघही वेगळे होते. हा प्रवास खडतर होता. सर्वसामान्यांना किंवा विद्वानांना झेपलाही नसता आणि परवडलाही नसता.

भारत हे केवळ आक्रमकांचेच नव्हे तर व्यापार्‍यांचेही आकर्षण होते. येथील व्यवस्था स्वयंपूर्ण होती. गरज पडल्याखेरीज खेड्यांतील लोक शहरांतही येत नव्हते. म्हणून मी म्हटले, की समाजाच्या गरजा भागत असताना कोण उठून अज्ञात प्रदेशात जाणार? एक्स्प्लोरर्सचा मुद्दा म्हटला तर त्यांच्या साहसी मोहिमांमागेही व्यापारी धाडसाच्या प्रेरणा होत्या. सर्व परदेशी प्रवाशांचा आणि आक्रमकांचा डोळा भारतातील संपत्तीवर होता. ह्यु एन् त्सांगसारखे कुणी ज्ञानप्राप्तीच्या लालसेने आलेले नव्हते.

परदेशी ज्ञानसाधक हजारोंच्या संख्येने भारतात येत होते, अशीही स्थिती नव्हती. अलेक्झांडरच्या स्वारीपूर्वी ग्रीक विद्वानतरी भारतात आदान-प्रदान करायला आले होते का?

एक अलिकडचे उदाहरण देतो. सुवेझ कालवा खुला होईपर्यंत इंग्लंडमधून भारतात यायला तीन महिने लागत.(त्यानंतर हा काळ केवळ १७ दिवसांवर आला). तोवर दोन्ही देशांत जाणार्‍या-येणार्‍यांचे प्रमाण कमीच होते. केवळ सैनिक अथवा भारतात नेमणूक झालेले अधिकारी येत असत. स्त्रिया तर अगदी मोजक्या संख्येने येत. इंग्रजांनी त्यांचे तंत्रज्ञान फार प्रेमाने आपल्याला दिलेले नाही. भारतीय संशोधकांच्या वाटेत अडचणीए निर्माण कशा केल्या त्याचे दाखले आहेत. दळणवळणाच्या सुविधा सोप्या झाल्यानंतरच भारतीय लोक शिक्षणासाठी लंडनला जायला लागले.

समाजाच्या वाटचालीचा प्रवास कुतुहलाने समजून घेण्याआधीच एकदम त्याला कूपमंडूक म्हणणे मला पटत नाही. बरं बोलतानाही एकदम अचाट आणि घाऊक विधाने करायची म्हणजे 'सर्व ब्राह्मण कूपमंडूक होते'. 'सर्व भारतीय कूपमंडूक असतात', हे निदान आपण अभ्यासक आहोत, म्हणणार्‍यांनी टाळले पाहिजे.

समुद्रबंदी सगळीकडेच कडकपणे पाळली जात नव्हती. दक्षिण भारतीय समाजात रामानुजमसारख्या गणितज्ज्ञाला सनातन्यांनी समुद्र उल्लंघनाबद्दल प्रायश्चित्त घ्यायला लावले होते. (मराठी समाजात आनंदीबाई जोशींना ते घ्यावे लागले होते का?) पण पेशव्यांच्या काळात नरोत्तम जोशी नावाचा गुजराती ब्राह्मण मस्कतचा रहिवासी होता. त्याची 'भोरशृंगार' नावाची डंगी मराठा आरमाराने जकात भरली नाही म्हणून जप्त केली होती. जोशीने पेशव्यांकडे दाद मागितली आणि पेशव्यांनी ती सोडण्याचा हुकूम दिला. गुजराती ब्राह्मणांनी जोशीला समुद्र उल्लंघनाचे प्रायश्चित्त घ्यायला लावलेले नाही. समुद्रबंदी इतकी प्रभावी असती तर जावा, सुमात्रा, इंडोनेशिया देशांत वैदिक संस्कृतीचे ठसे दिसले नसते.

वाद नेमका कशाबद्दल आहे?

वाद नेमका कशाबद्दल आहे? सर्व ब्राह्मण कूपमंडूक होते असे चर्चेत आणि स्वतः बिरुनीने म्हटल्याचे आढळलेले नाही तेव्हा ही वाक्ये वापरण्याचे प्रयोजन लक्षात आले नाही.

आपण अल् बिरुनीच्या काळाबद्दल बोलतो आहोत. तेथे गेल्या शतकात काय झाले हे लक्षात घेऊन काय उपयोग?

आपण जे वर काही लिहिले त्या अडचणी, ते प्रश्न फक्त भारतीयांनाच होते आणि बाकी जगातील कुणाला तसे काही प्रश्न नव्हते असे तुमचे मत नसावे असे वाटते. जर प्रश्न तेच आहेत तर ते येऊ शकत होते पण हे जाऊ शकत नव्हते असे म्हणण्यात काय अर्थ आहे?

आज शिक्षणामुळे आपल्याला दुसर्‍या संस्कृतीविषयी जितके कुतुहल वाटते ते त्याकाळी नव्हते.

अगदी असहमत. भारतीय संस्कृतीविषयी कुतूहल होते म्हणूनच परदेशी येथे आले. उलटपक्षी, आपल्या लोकांना बाहेरचे काही नवे शिकावे असे वाटले नाही.

आता ही स्थिती असताना भारतातून उठून एखादा ग्रीक संस्कृतीचा किंवा इजिप्शियन संस्कृतीचा अभ्यास करायला कसा जाऊ शकेल?

आपण प्रतिवाद कसला करता आहात हेच मला कळत नाही. वन वे ट्रॅफिक होते असे तुम्हाला सुचवायचे आहे का?

सांगायचा मुद्दा म्हणजे भारतीय व्यापार्‍यांचा संबंध केवळ अरब देशांशी. दुसर्‍या बाजूला सिल्क रुटवरुन चीनशी व्यापार करणारे व्यापारी संघही वेगळे होते. हा प्रवास खडतर होता. सर्वसामान्यांना किंवा विद्वानांना झेपलाही नसता आणि परवडलाही नसता.

म्हणजे जे भारतीय किंवा इतर व्यापारी प्रवास करत होते ते सर्वसामान्य नव्हते? विद्वानांना प्रवास झेपले नसते वगैरे कारणे पटली नाहीत. जर एका संस्कृतीतील लोकांना प्रवास झेपले तर दुसर्‍या संस्कृतीतील लोकांनाही झेपवता आले असते परंतु आपली राहणी, खाणे वगैरे बदलण्याची किंवा इतरत्र ऍडजस्ट करून न राहण्याची प्रवृत्ती यामुळे ते साधले नाही.

परदेशी ज्ञानसाधक हजारोंच्या संख्येने भारतात येत होते, अशीही स्थिती नव्हती. अलेक्झांडरच्या स्वारीपूर्वी ग्रीक विद्वानतरी भारतात आदान-प्रदान करायला आले होते का?

हजारो कशाला हवेत? पण जे काही आले गेले त्यातून आपला एकही नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे. अलेक्झांडरच्या स्वारीपूर्वी ग्रीक येथे येऊन गेल्याच्या आख्यायिका आहेत पण त्या सोडून देऊ कारण ग्रीकांना आशियाचा हा भागच माहित नव्हता पण एकदा कळल्यावर ते येऊ लागले हे महत्त्वाचे आहे ना. अलेक्झांडरचा काळ अदमासे इ.स.पूर्व ३४० आणि अल् बिरुनी इ.स. १००० यात अनेक शतकांचा फरक आहे त्यात येण्याजाण्याचे मार्ग जर परदेशी लोकांनी वापरले तर एकाही भारतीयाने वापरू नये हे पटणारे नाही.

बरं बोलतानाही एकदम अचाट आणि घाऊक विधाने करायची म्हणजे 'सर्व ब्राह्मण कूपमंडूक होते'. 'सर्व भारतीय कूपमंडूक असतात', हे निदान आपण अभ्यासक आहोत, म्हणणार्‍यांनी टाळले पाहिजे.

सर्व भारतीय कूपमंडूक कसे असतील? असे वाक्य मूळ चर्चेत वापरलेले नाही. व्यापारी सिल्क रुटवरून जात होते असे तुम्हीच म्हणालात ना. विद्वानांना जाणे शक्य नव्हते असेही तुम्हीच म्हणालात आणि विद्वान ब्राह्मण होते हे ही सत्य आहे तर मग अचाट आणि घाऊक विधाने कुठे आहेत? माझ्यामते तुम्ही तुमचे प्रतिसाद पुन्हा वाचून बघावे. एकमेकांना खोडून काढणारी वाक्ये त्यात सापडतील.

(मराठी समाजात आनंदीबाई जोशींना ते घ्यावे लागले होते का?) पण पेशव्यांच्या काळात नरोत्तम जोशी नावाचा गुजराती ब्राह्मण मस्कतचा रहिवासी होता. त्याची 'भोरशृंगार' नावाची डंगी मराठा आरमाराने जकात भरली नाही म्हणून जप्त केली होती. जोशीने पेशव्यांकडे दाद मागितली आणि पेशव्यांनी ती सोडण्याचा हुकूम दिला. गुजराती ब्राह्मणांनी जोशीला समुद्र उल्लंघनाचे प्रायश्चित्त घ्यायला लावलेले नाही.

ते अल् बिरुनीच्या काळी नव्हते. त्यांचा या वादात काहीच संबंध नाही.

समुद्रबंदी इतकी प्रभावी असती तर जावा, सुमात्रा, इंडोनेशिया देशांत वैदिक संस्कृतीचे ठसे दिसले नसते.

नक्कीच. ज्या शतकात आपली संस्कृती तेथे गेली तेव्हा समुद्रबंदी नसण्याची शक्यता आहे. किंबहुना, बौद्ध संस्कृतीच्या उदयानंतर समुद्रबंदी आली असे म्हटले जाते.

तो प्रतिसाद गैर होता

''म्हणजे अल बिरुनीने ब्राह्मणांच्या विद्वत्तेची तारीफ करीत कूपमंडुकपणावर टीका केली आहे.'' धम्मकलाडू यांचे हे विधान एका अंगाने भावना दुखावणारे आहे. तर दुसर्‍या अंगाने चूकीचा आहे. अल् बिरूनीने बामण जातीच्या लोकांबद्दल कोणते ही विधान केलेले नव्हते. त्याने भारतातील विद्वानांबाबत ('विदा'वानांबाबत) आपले मत व्यक्त केले होते.

कोणाच्या भावना?

धम्मकलाडू यांचे हे विधान एका अंगाने भावना दुखावणारे आहे.

कोणाच्या भावना दुखावल्या? आणि का? भावना दुखावल्या म्हणून "सर्व ब्राह्मण" वगैरे आरोप करणे अयोग्य आहे.

तर दुसर्‍या अंगाने चूकीचा आहे. अल् बिरूनीने बामण जातीच्या लोकांबद्दल कोणते ही विधान केलेले नव्हते. त्याने भारतातील विद्वानांबाबत ('विदा'वानांबाबत) आपले मत व्यक्त केले होते.

बामण हा शब्द भावना दुखावणारा नाही असे सांगता येईल का? भारतातील विद्वान कोणत्या जातीचे होते बरे?

----
उपक्रमावर वावरताना लोक भावनातैंना घरी ठेवून येतील तर बरे असे मागे कोणीतरी व्यक्त केलेले मत आढळले.

भावनातै कोण?

भावनातै कोण? मी तर फक्त 'कुमारी भावना चाळवते' यांनाच ओळखतो.

माझे मत नाही

अल बिरूनीचे मत आहे.

पृष्ठ क्रमांक २७. परिच्छेद क्रमांक ३.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

ती अल् बिरूनीची टिका नव्हती.

'अल् बिरूनीने नोंद केली होते.', असे लिहीले आहे. त्याने टिका केली होती असे लिहीलेले नाही.

============================
'ऑंखें खोल के देख कालिया!' इति रामगढचा ठाकूर

ही बघा तुमची विधाने..

>>नक्कीच. समुद्रबंदीचा कायदा किंवा अलेक्झांडर समवेत ग्रीसला जायला निघालेल्या कल्याण ऋषींना विरोध करणे, विद्यार्जनासाठी इतरत्र जाण्याची इच्छा नसणे, धर्मांतरबंदी वगैरे वगैरे अशा अनेक उदाहरणांतून भारतीयांची कूपमंडूक वृत्ती दिसून येते.<<

आणि हे वाक्यही पुढच्याच प्रतिसादात तुमचेच

>>सर्व भारतीय कूपमंडूक कसे असतील? असे वाक्य मूळ चर्चेत वापरलेले नाही.<<

आता समुद्रबंदीचा कायदा, ऋषींना विरोध, विद्यार्जनासाठी इतरत्र जाण्याची इच्छा नसणे आणि धर्मांतरबंदी हे सगळे ब्राह्मण समाजातील जे लोक धर्म पंडितांची भूमिका बजावत होते त्यांच्याशी संबंधित आहेत. (पुन्हा मी इथे सर्व ब्राह्मण समाज म्हणत नाही कारण ब्राह्मण त्यावेळीही शेतकरी होते, साधे भिक्षुक होते, सन्यासी होते आणि सैनिकही होते.) त्याचा इतर भारतीयांशी काय संबंध? तरी तुम्ही शब्द वापरलेत, की या उदाहरणावरुन भारतीयांची कूपमंडूक वृत्ती दिसून येते. पुन्हा तुम्हीच म्हणताय सर्व भारतीय कूपमंडूक कसे असतील?

मी पहिल्या प्रतिक्रियेपासून सातत्याने मुद्दा मांडतो आहे, की बरुनीला भारतीय विद्वान कूपमंडूक वाटत असले तरी तो परदेशी प्रवासी होता. त्याचे निरीक्षण म्हणजे आपणही 'होय ते तसेच होते' असे स्वीकारणे नव्हे. भारतीय विद्वान संस्कृतीची देवाण-घेवाण करायला अगर नवे शास्त्र/तंत्र शिकायला खूप दूरवर जात नव्हते कारण त्यांना तशी गरजही नव्हती. कूपमंडूक म्हणण्यापेक्षा ही वृत्ती स्वान्तसुखाय म्हणावी लागेल. म्हणजे 'आहे त्या परिस्थितीत सुख मानणे'
(अलेक्झांडरलाच एका भारतीय साधूने सांगितले होते, 'मला तुझ्याकडून काही नको. फक्त मी कोवळे उन खातोय. त्या वाटेत तू आडवा येतो आहेस. तेवढा बाजूला हो.)

अलिकडच्या काळातील उदाहरणे एवढ्यासाठी दिली, की ३०० वर्षांपूर्वीपर्यंतही राजे व श्रेष्टी वगळता सर्वसामान्यांना दूरवरचे प्रवास खडतर आणि न परवडणारे होते. मग १५०० वर्षांपूर्वी लोक उठून ग्रीक आणि इजिप्शियन संस्कृतीशी देवाण-घेवाण कशाला करायला जातील? परदेशी प्रवाशांना भारतात अनेक अनुभव आले आहेत. एकजण दक्षिण भारतातील देवळात पादत्राणे घालून जात असताना तेथील पुजारी त्याच्या अंगावर धाऊन आले आणि त्याला हाकलून लावले. तेच किरोसारखा जगप्रसिद्ध हस्तसामुद्रिक ही विद्या भारतातील एका ब्राह्मणाकडून शिकल्याचे कृतज्ञतेने नमूद करतो.

इस्ट ईंडिया कंपनीच्या माध्यमातून हजारो इंग्रज १६७५ पासून महाराष्ट्रात आले, पण अधिकृतरीत्या पहिला मराठी माणूस १९१० साली ब्रिटनला जाऊन स्थाईक झाला. म्हणून मराठी समाज हा कूपमंडूक वृत्तीचा आहे, असे म्हणूया का मग?

भारतीय....

अशा अनेक उदाहरणांतून भारतीयांची कूपमंडूक वृत्ती दिसून येते

जी उदाहरणे दिली ती भारतीयांची होती ना की जपानी, चिन्यांची होती? जर भारतीयांची उदाहरणे दिली तर भारतीय असाच शब्द वापरेन. "सर्व" भारतीयांची असे म्हटलेले नाही.

उद्या भारतातील भ्रष्टाचार सहज दिसून येतो किंवा भारतीयांचा भ्रष्टाचार सहज दिसून येतो म्हणजे प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी असतो असे तर नाही.

आता समुद्रबंदीचा कायदा, ऋषींना विरोध, विद्यार्जनासाठी इतरत्र जाण्याची इच्छा नसणे आणि धर्मांतरबंदी हे सगळे ब्राह्मण समाजातील जे लोक धर्म पंडितांची भूमिका बजावत होते त्यांच्याशी संबंधित आहेत. (पुन्हा मी इथे सर्व ब्राह्मण समाज म्हणत नाही कारण ब्राह्मण त्यावेळीही शेतकरी होते, साधे भिक्षुक होते, सन्यासी होते आणि सैनिकही होते.) त्याचा इतर भारतीयांशी काय संबंध? तरी तुम्ही शब्द वापरलेत, की या उदाहरणावरुन भारतीयांची कूपमंडूक वृत्ती दिसून येते. पुन्हा तुम्हीच म्हणताय सर्व भारतीय कूपमंडूक कसे असतील?

वर समुद्रबंदी आणि इतर गोष्टी करणारे भारतीय नव्हते? जे इतर भारतीय होते (आणि बहुधा त्यात ब्राह्मण समाज नाही तर क्षत्रिय वगैरे समाजही असावा) त्यांनी समुद्रबंदीचा वगैरे कायदा सोडून प्रवास केला असता का? माझ्यामते नसता केला कारण त्यांना परिणाम भोगावे लागले असते त्यामुळे त्यांनी आपल्याच विहीरीत राहणे पसंत केले असते. ते भारतीय होते म्हणून भारतीय हा शब्द वापरला आहे. मी सर्व हा शब्द वापरलेला नाही. तो तुम्ही चिकटवला. (तसेही सर्व समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र जाती येतात.) मराठी माणसे खेकडा प्रवृत्तीने एकमेकांचे पाय ओढतात असे म्हटले तर सर्वच मराठी माणसे अशी असतीलच असे नाही पण हे मराठी माणसाविषयी "सर्वसाधारण" मत झाले. सर्व भारतीय विद्वान होते असेही म्हटलेले नाही म्हणूनच खाली "सर्व" भारतीय नाहीत हा स्पष्ट खुलासा दिला आहे.

बरुनीला भारतीय विद्वान कूपमंडूक वाटत असले तरी तो परदेशी प्रवासी होता. त्याचे निरीक्षण म्हणजे आपणही 'होय ते तसेच होते' असे स्वीकारणे नव्हे.

होय ते तसेच होते असे कोणीही म्हटलेले नाही. त्याच्या विधानात सत्यांश आहे किंवा त्याचे निरीक्षण त्या काळी बरोबर असावे असे म्हणणे यात मला काहीच गैर दिसत नाही.

कूपमंडूक म्हणण्यापेक्षा ही वृत्ती स्वान्तसुखाय म्हणावी लागेल. म्हणजे 'आहे त्या परिस्थितीत सुख मानणे'
(अलेक्झांडरलाच एका भारतीय साधूने सांगितले होते, 'मला तुझ्याकडून काही नको. फक्त मी कोवळे उन खातोय. त्या वाटेत तू आडवा येतो आहेस. तेवढा बाजूला हो.)

स्वान्तसुखाय लोक नसतील असे नाही पण कूपमंडूक दिसले नसतील याच्याशी असहमत.

अलिकडच्या काळातील उदाहरणे एवढ्यासाठी दिली, की ३०० वर्षांपूर्वीपर्यंतही राजे व श्रेष्टी वगळता सर्वसामान्यांना दूरवरचे प्रवास खडतर आणि न परवडणारे होते. मग १५०० वर्षांपूर्वी लोक उठून ग्रीक आणि इजिप्शियन संस्कृतीशी देवाण-घेवाण कशाला करायला जातील? परदेशी प्रवाशांना भारतात अनेक अनुभव आले आहेत. एकजण दक्षिण भारतातील देवळात पादत्राणे घालून जात असताना तेथील पुजारी त्याच्या अंगावर धाऊन आले आणि त्याला हाकलून लावले. तेच किरोसारखा जगप्रसिद्ध हस्तसामुद्रिक ही विद्या भारतातील एका ब्राह्मणाकडून शिकल्याचे कृतज्ञतेने नमूद करतो.

जे परदेशी प्रवाशांना अनुभव आले ते खरे असतील आणि त्यांनी नमूद केले असतील तर त्यावर तुटून पडण्याची मला गरज दिसत नाही. मला ते मान्य आहेत. प्रवाशाच्या अंगावर धावून जाणार्‍या पुजार्‍याचा मी निषेधच करेन. पुढे कोणी म्हणाले की 'दक्षिण भारतीय थोडे जास्तच कर्मठ असतात' तरीही मला त्यांचा दावा मान्य आहे कारण त्याविषयी अनेक उदाहरणे देता येतील. अगदी वैयक्तिक अनुभवही आहेत. (पुन्हा दक्षिण भारतीय म्हणजे "सर्व" दक्षिण भारतीय कर्मठ असतील असा त्याचा अर्थ होत नाही.)

बाकी प्रवास खडतर असण्याचा मुद्दा वरच खोडलेला आहे. त्यात काहीही तथ्य नाही. ज्ञानलालसेच्या पोटी लोकांनी खडतर प्रवास केलेले आहेत.

इस्ट ईंडिया कंपनीच्या माध्यमातून हजारो इंग्रज १६७५ पासून महाराष्ट्रात आले, पण अधिकृतरीत्या पहिला मराठी माणूस १९१० साली ब्रिटनला जाऊन स्थाईक झाला. म्हणून मराठी समाज हा कूपमंडूक वृत्तीचा आहे, असे म्हणूया का मग?

१६७५ मध्ये महाराष्ट्रात इंग्रज आले तरी व्यापारी किंवा इतर कारणांसाठी भारताने पुढाकार घेऊन इंग्रजांशी व्यापार सुरु केला नव्हता. करण्यास निदान माझी तरी काही हरकत नाही. तरीही शिक्षणाचे महत्त्व कळल्यावर मराठी माणसाने आपली कूपमंडूक वृत्ती सोडून इंग्लंडला प्रयाण केले हे उत्तम झाले.

या पुस्तकातील अल बिरुनीची अनेक मते न पटण्याजोगी आहेत असे एकले आहे. त्यावर वेगळी चर्चा करता येईलच पण या मतात मला तरी सत्यांश दिसतो. - इत्यलम्.

प्रियालीताई मी थांबतो..

वाद, मुद्दे खोडले, तथ्य नाही, असा अभिनिवेश यायला लागला, की चर्चेला वेगळे वळण लागू शकते. मी नेहमीच अशा टप्प्यांवर थांबतो. तसे इथेही थांबतो.

परक्यांच्या नजरेतून दिसणारा भारत वेगळा असतो आणि आपल्या नजरेतून दिसणारा भारत वेगळा असतो. 'आखरी रास्ता' चित्रपटात बाप झालेला बच्चन मुलाला तळहातावरचा इंग्रजी सहाचा आकडा दाखवून सांगतो, 'यहॉसे ये मुझे छे दिखाई देता है और वहाँसे तुझे नौ. दोनो अपनी जगह सही है. बस देखनेका तरीका अलग है.'

बरुनी साहेबांना कुणी तरी सांगायला नको का? की 'नाही हो. तुम्ही समजता तसे आम्ही कूपमंडूक नाही' तेवढे मी सांगितले. :)
बाकी वाद वगैरे काय तो चालू दे.

:-)

'आखरी रास्ता' चित्रपटात बाप झालेला बच्चन मुलाला तळहातावरचा इंग्रजी सहाचा आकडा दाखवून सांगतो, 'यहॉसे ये मुझे छे दिखाई देता है और वहाँसे तुझे नौ. दोनो अपनी जगह सही है. बस देखनेका तरीका अलग है.'

हे बरोबर आहे पण त्या तो सहाचाच आकडा आहे हे जसे त्या बापाला आणि प्रेक्षकांना माहित असते तसेच बिरुनीच्या म्हणण्यात तथ्य आहे असे इथल्या अनेकांना माहित आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे हेच सांगायचे आहे.

थांबण्याशी सहमत.

कूपमंडूक

एकंदर प्रतिवादात, 'कूपमंडूक प्रवृत्ती होती पण त्याला काही कारणे होती' असे काहीसे असावे असे वाटले. कारणे दोन प्रकारची फार आक्रमणे झाली म्हणून विचार करायला वेळ मिळाला नाही आणि सगळ्या गरजा इथेच भागत होत्या तेव्हा उगाच परदेश प्रवास कशाला. तुम्ही ही प्रवृत्ती मान्य करत असाल (कुठल्याही कारणांनी) तर आपल्या दुमतास स्थान नसावे.

वर्तमानकाळाच्या निकषांवर भूतकाळाची चिकित्सा करणे, म्हणजे अभ्यासाची शिस्त मोडणे.
सहमत.

यावरूनच अल-बिरुनी ज्यावेळच्या भ्रारताबद्दल लिहितो आहे तेव्हाचा भारत आक्रमणाने फारसा त्रस्त नव्हताअ. गझनीच्या स्वार्‍या या काळात सुरु झाल्या होत्या. या स्वार्‍यात फारसा राज्यविस्तार नव्हता. माझ्या मते इतिहास आक्रमणांसाठी (चीन सोडल्यास) भारतावर फारसे गंभीर प्रसंग आलेच नाही. विशेषतः अल बिरुनीच्या काळापूर्वी. ग्रीकांचे आक्रमण भारतात येऊन विरले. पण त्यांनीच इराणवर पूर्ण कब्जा मिळवला होता. शक आणि हूण हे त्यानंतरचे दोन आक्रमक. यातील हूणांचे आक्रमण इराण, रोमन संस्कृतींना जेवढे भोवले तेवढे भारतात जाणवले पण नाही. शकांनी येथे राज्ये केली. पण ती बरीच मिळून मिसळून. याउलट इराण, ग्रीस, रोमन, तुर्कस्थान, सिरिया या संस्कृतींवर भीषण आक्रमणे आली. देश पादाक्रांत झाले. ग्रीकांचे, रोमनांचे नामोनिशाण उरले नाही.

ग्रीकची संस्कृती भारतासाठी खूपच लांबची होती. तिचा परिचयही भारतीयांना अलेक्झांडर चालून आल्यावर झाला. चीन आणि भारत या संस्कृतींमधील देवाण-घेवाण मात्र जुनी आहे. पण जसा ह्यु एन त्सांग भारतात शिकण्यासाठी कष्टाने आला तसे भारतीय लोक इतर ठिकाणी गेलेले नाहीत.

भारतातले लोक चीन, दक्षिण-पूर्व, आणि अगदी पश्चिमेला गेले आहेत. बौद्धांनी आपले तत्वज्ञान जगभर (त्यावेळचे सीमित) जाऊन पसरवले. भारतीय व्यापारी पूर्वीपासून मध्य, पूर्व आणि दक्षिण पूर्वेत जात असत. अगदी सॉलोमन/सुलेमानच्या वेळ पासून हा व्यापार चालू असल्याची उदाहरणे आहेत. पण या देशातून ज्ञानात्मक आयात इथल्या लोकांच्या प्रयत्नाने झाल्याचे मला फारसे जाणवले नाही. (अल्केमी हे एक वेगळे उदाहरण आठवले.)

माझी माहिती तोकडी असेल असे बरेचदा वाटते.

भारतीय राजे आक्रमक होते की नाही हा ज्ञानप्रसारातील कूपमंडूक वृत्तीशी संबंधीत नसलेला विषय आहे असे मला वाटते. चालुक्यांचे दक्षिणपूर्वेतले आक्रमण हा म्हणून अवांतर विषय होतो.

प्रमोद

संशोधन वृत्ती

भारतीय लोक संशोधन वृत्तीत मागे का? तुमच्या वरील प्रतिसादामु़ळे ह्याची आठवण आली. अशी चर्चा करायला घेतली तर बहुतेक वेळा खालील एस्क्युजेस ऐकायला मिलतात-

१. नालंदाची लायब्ररी जाळली- द्न्यान नष्ट झाले
२. सततच्या परकीय आक्रमणांनी शांतता लोप पावली
३. मौखिक परंपरेमुळे द्न्यान ठराविक लोकांकडेच राहीले व कालाच्या उदरात गडप झाले
४. शाळा नीट शिकवत नाहीत- शिक्षकांची क्वालीटी लय बेकार झाली
थोडक्यात काय तर आम्ही काहीही मुलभूत संशोधन करु शकत नाही कारण ....

बी आय एस एस शिक्षणपद्धती

भारतीय लोक संशोधन वृत्तीत मागे का?

बी आय एस एस - म्हणजे "बिकॉज् आय से सो" शिक्षणपद्धती... जर पहीलीत तीन त्रिकोणांचा डोंगर त्यातून डोकावणारा हसरा सूर्य, मधून वाहणारी नदी, मराठीतील चार या आकड्याचा वापर केलेले उडणारे पक्षी काढले नाहीत तर ते निसर्गचित्र धरले जात नाही. :-)

वरील उदाहरण अतिशयोक्तीपूर्ण आहे. पण वास्तवात "समजले नाही" म्हणून प्रश्न विचारणारा विद्यार्थी आपण तयार करतो, "वेगळ्या पद्धतीने" विचार करणार्‍याला उत्तेजन देत नाही, कारण (आत्ताच्या जमान्यात) प्रवेशपरीक्षांमधे आणि नंतर पैसे कमवताना त्याचा उपयोग होत नाही...जेंव्हा शिक्षण हे प्रवेशपरीक्षा आणि नंतर मिळवायचे पैसे यांच्या कन्स्ट्रेंटमधूनच शिकले जाते तेंव्हा संशोधनवृत्ती कशी येणार?

मौखिक परंपरेवरून आठवले

शूद्रांना आणि स्त्रियांना वेदपठणाचा अधिकार होता का? संस्कृत नाटकांतही स्त्रियांच्या तोंडी संस्कृत संवाद नसत.

बौद्ध धर्माचा ऱ्हास होत गेला तसा ज्ञानाचा प्रचार-प्रसार आणि देवाणघेवाण कमी होत गेली. कारण हळूहळू व्यापार कमी होत गेला. मध्ययुगात भारतीय समाज आणखीनच कूपमंडूक होत गेला असे वाटते. अल बिरुनी इथे आल्यावर त्याला जे दिसले ते त्याने मांडले आहे असे वाटते.

अवांतर:
भारतीय विचारवंत, नर्तिका, बहुधा पोपटबिपट आणि मसाले ह्यांना जुन्या काळात मागणी होती असे वाचल्याचे आठवते. आपण एकंदर मसाले विकून तथाकथित सोन्याचे धूर काढले.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

लवकर लिहा, वाट पाहतोय.

श्री. सहस्त्रबुद्धे तुम्ही ज्या पुस्तकाबद्दल म्हणत आहात ते पुस्तक केवळ ८५ रुपये आहे, हे वाचून नवलं वाटले. कारण वर मुळ पुस्तक म्हणजे ज्या पुस्तकावरून ते पुस्तक लिहीले आहे त्याची पाने भरपूर आहेत. मी देखील आंतरजालावरून मुळ पुस्तकाची (इंग्रजीतील ) प्रत संगणकामध्ये उतरवून घेतली आहे. ह्यातील काही पाने वरच्यावर वाचताना त्याकाळातील 'भारतातील विद्वानांकडे काही (शास्त्र, विद्न्यान ह्या बाबत) हिरे-माणके आहेत तर काही दगड-गोटे आहेत, पण त्यांच्या संकुचितपणामुळे (पद्धतशीरपणे अभ्यास करण्याची सवय नसल्यामुळे) ते त्यातील फरक ओळखू शकत नाहीत.' हे अल् बिरूनेचे मत वाचले तेंव्हा 'श्री. सतीश आपटे' हे नांव मनचक्शूंसमोर आले होते.

ब्राह्मी लिपी बाबतची ही अनेक पुस्तके वाचायची आहेत, पण वाचायला वेळच मिळत नाही. साला, हल्ली दिवसाचे २४ तास देखील कमी पडतात, त्यात हे आयपीएल!, बिन लादेन, अण्णा हजारे, कोणा-कोणाकडे लक्श द्यायचं बुवा!

तुम्ही मराठीतून काही माहिती इथे दिलीत तर काहीसे सोपे होईल.

पाने

मूळ पुस्तकात ८००+ पाने दिसतात तर संक्षिप्त आवृत्तीत ३०० पाने आहेत. ३०० पानांच्या पुस्तकाची किंमत ८५ रु. आहे.

प्रमोद

वाचत आहे.

वाचत आहे.

छान - पुढील भागाच्या प्रतीक्षेत

छान - पुढील भागाच्या प्रतीक्षेत

+१

छान - पुढील भागाच्या प्रतीक्षेत

असेच म्हणतो.

-Nile

तो साधू भारतीय नव्हे!

(अलेक्झांडरलाच एका भारतीय साधूने सांगितले होते, 'मला तुझ्याकडून काही नको. फक्त मी कोवळे उन खातोय. त्या वाटेत तू आडवा येतो आहेस. तेवढा बाजूला हो.)

ही कथा डायोजेनेसबद्दल सांगितली जाते. त्याचा संदर्भ प्लुटार्कच्या लिखाणात येतो (पॅरॅलल लाईव्ह्ज - लाईफ ऑफ अलेक्झांडर). अधिक माहितीसाठी हे पहा.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

धन्यवाद चिं. ज.

संदर्भ दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद चिं. ज.
मी लक्षात ठेवेन.

ब्राह्मणत्व

इतिहासाच्या माझ्या त्रोटक माहितीतील माझ्या अंधुक आठवणीनुसार ब्राह्मणत्व हे त्याकाळी कशातही नैपुण्य, उच्च गुण प्राप्त केल्याने मिळत असे. ह्या व्याख्येनुसार, हा माणूस त्याकाळच्या उच्चगुणांच्या भारतीय लोकांना कूपमंडूक म्हणतो आहे हे का त्याबद्दल त्याने काही दाखले दिले आहेत का? येथे आजच्या काळातील लोकांनी काही विधाने केली की, त्यास लगेच पुरावा काय, वगैरे विचारणा होऊन अधिक विचारमंथनास आडकाठी आणली जाते. पण हा परका माणून १००० वर्षांपुर्वी काही-बाही प्रवासवर्णने लिहितो आणि ते प्रमाण मानले जाऊन लोकं त्यावर यथेच्छ चर्चा करतात हे पाहून मनोरंजन झाले.

जातिसंस्था

अल् बेरुनीच्या काळात भारतात जातिसंस्था चांगलीच स्थिर झाली होती. एव्हढेच नव्हे तर धर्मबंधने(रूढी किंवा नियम म्हणता येईल) अधिक कडक झाली होती. तेराव्या शतकातल्या ज्ञानेश्वरादी भावंडांना धर्ममार्तंडांकडून पुष्कळ त्रास झाला. गुणकर्मानुसार जाती ठरण्यापासून त्या जन्माने ठरेपर्यंतचा बदल केवळ दोनशे वर्षांत झाला असेल हे संभवनीय नाही. दत्तसंप्रदायाचा प्रमुख ग्रंथ गुरुचरित्र यामधे जातींचे नामोल्लेख अनेकवेळा येतात. सांप्रतच्या जन्मात परीट असलेल्याला या जन्मी केलेल्या पुण्यकृत्यांमुळे पुढील जन्म ब्राह्मणाचा मिळेल किंवा या जन्मीच्या दुष्कृत्यामुळे पुढील जन्म अधिक खालच्या जातीचा मिळेल अशी अनेक स्पष्टीकरणे त्यात आहेत. आपले धार्मिक वाङ्मय अशा सामाजिक संदर्भांच्या दृष्टीने अभ्यासण्याजोगे आहे.

कधीही न वाचण्याची खात्री

--सांप्रतच्या जन्मात परीट असलेल्याला या जन्मी केलेल्या पुण्यकृत्यांमुळे पुढील जन्म ब्राह्मणाचा मिळेल किंवा या जन्मीच्या दुष्कृत्यामुळे पुढील जन्म अधिक खालच्या जातीचा मिळेल अशी अनेक स्पष्टीकरणे त्यात आहेत. आपले धार्मिक वाङ्मय अशा सामाजिक संदर्भांच्या दृष्टीने अभ्यासण्याजोगे आहे.--

आपले धार्मिक वाङ्मय जर अशा संदर्भांनी भरलेले असेल तर ते कधीही न वाचण्याची मी खात्री देतो. त्यापेक्षा तो वेळ आयपीएल पाहून वाया गेला तरी वाईट वाटणार नाही.

धार्मिक वाङ्मय आणि संदर्भ

धार्मिक वाङ्मय श्रद्धाळू वृत्तीनेच वाचले पाहिजे असे नाही. ते चिकित्सक आणि संशोधक वृत्तीनेही वाचता येते. तसेच धार्मिक वाङ्मय वाचले म्हणून कोणाची वृत्ती बदलेल असेही नाही. संशोधकाला कोणतेही विषय(आपल्या संशोधनाच्या परिघात असणारे) वर्ज्य किंवा अस्पर्श्य असू नयेत असे वाटते. हे अर्थात् वैयक्तिक मत. ज्ञानेश्वरीची अनेक अंगांनी परिशीलने झालेली आहेत आणि त्याद्वारे तत्कालीन भाषा,व्युत्पत्ती,समाजव्यवस्था,तत्कालीन उपलब्ध माहिती(विज्ञान वगैरे)इ. पैलूंवर प्रकाश पडलेला आहे. प्रा. म. वा.धोंड यांचे ज्ञानेश्वरीवरील शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. असो.
गुरुचरित्र नको असेल तर चोखामेळा तरी चालेल का? हा ज्ञानेश्वरांच्या जवळजवळ समकालीन. त्याचा "शिव्या देती,म्हणती 'महारें देव बाटवीला'...धाव घाली विठू आता.." हा अभंगचरण सुप्रसिद्ध आहे.
दुसर्‍या सहस्रकाच्या सुरुवातीला ज्ञातिसंस्था सुस्थिर आणि दृढ झाली होती. इतकेच नव्हे तर ती जाचक आणि जुलमी बनू लागली होती. त्यामुळेच पुढील एक-दोन शतकात दक्षिणोत्तर भारतात अनेक विद्रोही चळवळींचा उद्भव झाला. उत्तरेला नानक पंथ, कबीर पंथ, महाराष्ट्रात भक्तिपंथ,तमीळ्नाडूत अलवार आचार्यांची परंपरा ही काही उदाहरणे.
खरे तर अळ्वार् संतांची वैष्णव परंपरा ही खूप आधीची. त्यांनी प्रस्थापित आणि कर्मकांडप्रधान शैव,जैन, बौद्धमताविरुद्ध जागृती केली आणि तुलनेने कमी कर्मठ असे वैष्णव मत लोकप्रिय केले. ही परंपरा जरी पाचव्या-सहाव्या शतकापासूनची असली तरी अकराव्या-बाराव्या शतकात तिचे जोरदार पुनरुज्जीवन झाले. त्याआधी संत नाथमुनी यांनी आधीच्या संतांची काव्ये एकत्रित आणि संशोधित करून दिव्यप्रबंधम् या नावाचा ग्रंथ सिद्ध केला. या अळ्वार् परंपरेतच आपल्या वारकरी भक्तिपंथाचे उगमस्थान असावे असा एक मतप्रवाह आहे.
असो. फारच अवांतर होतेय्.

अप्लिकेशन

--धार्मिक वाङ्मय श्रद्धाळू वृत्तीनेच वाचले पाहिजे असे नाही. ते चिकित्सक आणि संशोधक वृत्तीनेही वाचता येते. तसेच धार्मिक वाङ्मय वाचले म्हणून कोणाची वृत्ती बदलेल असेही नाही. संशोधकाला कोणतेही विषय(आपल्या संशोधनाच्या परिघात असणारे) वर्ज्य किंवा अस्पर्श्य असू नयेत असे वाटते. हे अर्थात् वैयक्तिक मत.--

हे मत योग्यच आहे. फक्त त्याचे अप्लिकेशन करायचेच झाले तर मला ते न्यानो टेक्नॉलजीतील निबंध वाचून त्यातून काही अभ्यास करायला आवडेल. हे असले धार्मिक ग्रंथ वाचून फारसे काही पदरी पडणार नाही हे कळून चुकले आहे.

तुम्हाला जे कळले आहे ते 'चूकीचं' आहे.

'केलेल्या अभ्यासाचं' सिहावलोकन करून ते 'स्वतःच्या पद्धतीने सादर करता येणं' हेच खर्‍या विद्यार्थ्याचं लक्शण असते. बाकिचे केवळ पाठांतर करून पोपटपंची करत बसतात, उजळणी करत बसतात.

आपले हे वरील मत तितकेसे योग्य नाही. ज्यांना धार्मिक ग्रंथ म्हणतात ते कोणत्या काळात लिहीले गेले आहेत त्यावरून त्या काळाचा देखिल अभ्यास करता येवू शकतो. पण त्यासाठी अभ्यासक चिकित्सिक वृत्तीचा असायला हवा. मला स्वत:ला आत्तापर्यंत च्या वाचनात श्री. नरेंद्र रणदिवे यांच्या अभ्यासाची पद्धत जी त्यांच्या विचार सादरीकरणातून व्यक्त होते, ती आवडली आहे. http://www.narendranath.webs.com/ ह्या संकेतस्थळावरील सगळ्यात खालील चित्र पाहिल्या नंतर त्या चित्रातून त्यांनी केलेला अभ्यास नक्कीच पद्धतशीरपणे केला आहे हे कोणासही पटेल.

अभ्यास सादर करावा तर असा! नाहीतर उपक्रमवर काहि मंडळी केवळ इतिहासाच्या पुस्तकांची त्यांच्या पान क्रमांकासहीत 'उजळणीच' करत असतात. ढिगभर पुस्तके केवळ वाचली, पाठ केली म्हणजे अभ्यास नव्हे हे त्यांना कोण समजावेल?

असेलही

असेलही बुवा.
ज्या ग्रंथात "सांप्रतच्या जन्मात परीट असलेल्याला या जन्मी केलेल्या पुण्यकृत्यांमुळे पुढील जन्म ब्राह्मणाचा मिळेल किंवा या जन्मीच्या दुष्कृत्यामुळे पुढील जन्म अधिक खालच्या जातीचा मिळेल अशी अनेक स्पष्टीकरणे त्यात आहेत." असे संदर्भ असतील त्यांचा अभ्यास करण्याची इच्छा नाही. पण हे माझे मत आहे, ज्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांच्याबद्दल काही मत प्रदर्शन करण्याचा मला अधिकार नाही

पण मुळात मी जी प्रतिक्रिया दिली होती त्यात दोन भाग होते. त्यातला दुसरा भाग नियमांत कसे कॉंट्रॅडीक्शन असते त्याबद्दल आहे. म्हणजे असे की, एखादा चिनी किंवा मध्यपुर्वेतील प्रवासी काही शतके आधी भारतातून प्रवास करतो, प्रवास-वर्णन करतो, त्यात काही संदीग्ध माहिती देतो, काही स्थळांची माहिती कोडे दिल्यासारखी देतो. ही सगळी माहिती खरी-खुरी आहे असे मानुन त्यावर चर्चा / संशोधन होते. स्थळांची वर्णने कोणती ह्याची उकल करण्यासाठी अटीतटीची चर्चा होते हे सगळे चांगलेच आहे.

आजच्या काळातील माणूस त्याच्या आयुष्यातील ख-या घडलेल्या घटनांची माहिती देतो. त्यातील काही संवेदनाशील माहिती मुद्दाम देणे टाळलेली असते कारण काहीही झाले तरी त्यातील अनुभव त्या व्यक्तिला आलेले असतील तर त्यातील सार घेऊन इतरांनी त्या माहितीचे कंझप्शन करावे एवढीच अपेक्षा असते. उलट तसे न होता, सदस्य त्या माहितीच्या बद्दल शंका घेतात व योग्य चर्चा घडू देत नाहीत. काही सदस्य ह्याच्याही पुढे जाऊन त धागा लिहिणा-याची प्रतिमा मलिन करतात हे सगळे मजेशीर वाटते.

प्रसिद्ध व्हा

आजच्या काळातील माणूस त्याच्या आयुष्यातील ख-या घडलेल्या घटनांची माहिती देतो. त्यातील काही संवेदनाशील माहिती मुद्दाम देणे टाळलेली असते कारण काहीही झाले तरी त्यातील अनुभव त्या व्यक्तिला आलेले असतील तर त्यातील सार घेऊन इतरांनी त्या माहितीचे कंझप्शन करावे एवढीच अपेक्षा असते. उलट तसे न होता, सदस्य त्या माहितीच्या बद्दल शंका घेतात व योग्य चर्चा घडू देत नाहीत.

हे योग्यच आहे. अल् बिरुनीसारखे तुमच्या घटनांवर चर्चा होण्यासाठी प्रसिद्ध व्हा. लेखन करून जपून ठेवा. आज जसे अल् बिरुनीच्या लेखनावर हजार वर्षांनी चर्चा होते आहे तशी तुमच्या लिखाणावर आणि "बीफ चॉकलेट"वर अजून १००० वर्षांनी चर्चा होईल.

दोन्ही उदाहरणे

ही दोन्ही उदाहरणे जातिसंस्था दृढमूल झालेली असल्याचे तत्कालीन वाङ्मयात कसे परावर्तित(रीफ्लेक्ट्)झालेले आढळते, ते दाखवण्यासाठी दिली होती. पापपुण्य,देव ह्या संकल्पना खर्‍या की खोट्या ह्या वादाचा काहीच संबंध इथे येत नाही. शिवाय ही अवतरणे आहेत. माझी मते तशी (देवधर्म,पापपुण्य वगैरे मानणारी)असतीलच असे नाही.
ते माझे लिखाण नसल्याने आणि या कल्पना खर्‍या आहेत असे काही गृहीतक सिद्ध करण्यासाठी मी ते वापरलेले नसल्याने त्याच्या प्रतिवादाची जबाबदारी माझ्यावर येत नाही. तसे प्रतिपादन मुळात केलेलेच नसल्याने उपक्रमवासीयांचीही काही जबाबदारी आहे असे मला वाटत नाही.

उदाहरणेच तुम्ही ग्राह्य धरत नाही ?

--ब्राह्मणत्व हे त्याकाळी कशातही नैपुण्य, उच्च गुण प्राप्त केल्याने मिळत असे.--
ह्या माझ्या प्रतिसादातील वाक्याला प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही धार्मिक ग्रंथातील उदाहरणे दिली आहेत. आता ती उदाहरणेच तुम्ही ग्राह्य धरत नाही ?

ब्राह्मणत्व

'ब्राह्मणत्व हे त्याकाळी कशातही नैपुण्य,उच्च गुण प्राप्त केल्याने मिळत असे' ह्या तुमच्या मताचा प्रतिवाद करण्यासाठीच ती उदाहरणे दिली होती. ब्राह्मणत्व हे गुणकर्माने नव्हे तर जन्मावरून ठरवणारी, जन्मजात श्रेष्ठ कनिष्ठत्व मानणारी जातिसंस्था अल् बिरुनीच्या काळात भारतात चांगलीच प्रस्थापित होती, ह्याचे तत्कालीन वाङ्मयात पडलेले प्रतिबिंब दाखवणारी ती उदाहरणे आहेत.

एकमेकाविरुद्ध

--ते माझे लिखाण नसल्याने आणि या कल्पना खर्‍या आहेत असे काही गृहीतक सिद्ध करण्यासाठी मी ते वापरलेले नसल्याने--
--अल् बिरुनीच्या काळात भारतात चांगलीच प्रस्थापित होती,ह्याचे तत्कालीन् वाङ्मयात पडलेले प्रतिबिंब दाखवणारी ती उदाहरणे आहेत.--

ही वाक्ये एकमेकाविरुद्ध आहेत. धार्मिक ग्रंथात आणि अल् बिरुनीच्या लेखनात समान धागा असल्यामुळे त्याचे लेखन खरे माना असे तुम्ही सुचवित आहात हे कळतेय. त्याबद्दल काहीच प्रश्न नाहीत.

विचारमंथन करताना माहिती देखिल पुरवायची असते.


इतिहासाच्या माझ्या त्रोटक माहितीतील माझ्या अंधुक आठवणीनुसार ब्राह्मणत्व हे त्याकाळी कशातही नैपुण्य, उच्च गुण प्राप्त केल्याने मिळत असे.


तुम्हाला मी खालील एका प्रतिसादात एका संकेतस्थळाचा दुवा दिला होता. कृपया त्यातील हे चित्र पहा. 'ब्राह्मणत्वाची व्याख्या' जी तुम्ही म्हणत आहात ती 'त्या काळी' म्हणजे कोणत्या सालात, वर्शात हे तुम्ही सांगाल कां?


हा माणूस त्याकाळच्या उच्चगुणांच्या भारतीय लोकांना कूपमंडूक म्हणतो आहे हे का त्याबद्दल त्याने काही दाखले दिले आहेत का?

त्या पुस्तकाची माहिती श्री. सहस्त्रबुद्धे यांनी दिली आहे. तसेच मुळ पुस्तक ही अंतरजालावर उपलब्ध आहे त्याचा दुवा वरील एका प्रतिसादात दिला गेला आहे. दाखला हवाच असेल तर, व तो असेल तर तुम्ही ते जरूर वाचू शकता. सगळेच भारतीय उच्चगुणांचे होते, असतात कां? अल् बिरूनीला जो अनुभव आला तो त्याने त्याच्या पुस्तकात नोंदवून ठेवला आहे. त्याचे एवढे वाईट वाटून का घ्यायचे?


परका माणूस १००० वर्षांपुर्वी काही-बाही प्रवासवर्णने लिहितो आणि ते प्रमाण मानले जाऊन लोकं त्यावर यथेच्छ चर्चा करतात हे पाहून मनोरंजन झाले.

तुमचा हा प्रतिसाद तुमचा स्वभाव कसा आहे? हे सांगत आहे. इतिहासात डोकावले तर हे कळू शकते की संकुचित स्वभावाच्या मंडळीमुळे (ते बामण जातीत जन्माला आले वा राज घराण्यात जन्माला आले पण त्यांच्या कडून) समाजाला त्रास झालेला होता, समाजाचे नुकसान झाले होते. ते सगळे झिडकारायचे कशासाठी?

सत्याकडे सत्य म्हणून पहायचे असेल तर मनाचा संकुचितपणा सोडावाच लागतो. आणी त्यासाठी धाडसी असावे लागते. आणी हे धाडस वाढवण्या करीता 'अभ्यास' करायचा असतो.

डोळे खाडकन उघडले

तुमच्या प्रतिसादामुळे माझे डोळे खाडकन उघडले असुन मी आता रोज अभ्यास करायचे ठरवले आहे. (इतिहासाचा मुळीच नाही).

गिरीश ! थोडे तुमच्यासाठी

परका माणूस काही-बाही वर्णने लिहितो, असे नाही आपण म्हणू शकत. त्याला समोर जे दिसते ते तो त्याच्या आकलनक्षमतेनुसार अर्थ लाऊन नोंदवतो. तो काही विशिष्ट हेतूने असे करतो, हेही म्हणता येत नाही कारण परिसर, समाज, प्रथा या त्याच्यासाठी कुतुहलाच्या आणि नवीन असतात. येथे मुद्दा हा आहे, की हे त्याचे सकृतदर्शनी निरीक्षण आहे, हे वाचकांनी व अभ्यासकांनी लक्षात ठेवावे लागते. म्हणजे मला म्हणायचे ते असे, की फिरस्त्या प्रवाशापेक्षा येथील समाजात दीर्घकाळ राहून ज्यांनी निरीक्षणे नोंदवली आहेत ती अधिक ग्राह्य मानावी लागतात. पूर्वी भारत म्हणजे साप, हत्ती, गारुडी यांचा देश असे वर्णन परकी प्रवाशांनी केले. अमेरिका व युरोपात आजही बहुतेक ठिकाणी या समजापलिकडे जाण्याची वृत्तीच नाही. (वस्तुतः त्याही काळी आणि आजही भारत यापलिकडे बराच आहे, हे आपण जाणतोच)

दुसरे एक उदाहरण देतो. विडा खाऊन लाल मुखरस थुंकण्याची भारतीयांची फार जुनी परंपरा आहे. समजा खायचे पान हे काय आहे हे ठाऊक नसलेला परकी प्रवासी येथे आला आणि घाबरुन त्याने नोंदवले, की ' हे भारतीय लोक येता जाता रक्त ओकतात' तर काहीशे वर्षांनी ती नोंद प्रमाण मानून त्याआधारे भारतीय लोकांमध्ये बहुतेक रक्ताचा कर्करोग/ दंतरोग जुन्या काळापासून प्रचलित आहे, असेही मत नोंदवले जाऊ शकते.

परकी माणसांच्या नोंदीत डोळे झाकून (किंवा उघडे ठेऊन) तथ्य मानण्याची भारतीय लोकांची शरणागत वृत्ती अगदी आजही दिसते. अन्यथा जेम्स लेनच्या बसस्टॉपवर ऐकलेल्या आचरट किश्श्याच्या नोंदीत तथ्य मानून एका सर्व समाजाला झोडपत बसण्याचे उद्योग झाले नसते. परकी माणूस काय म्हणतो यापेक्षा आपली माणसे काय म्हणतात, याचा शोध इथे महत्त्वाचा ठरतो. बरं परकी कशाला? भारतीय लोकही चुकतात. पंडित नेहरुंनी शिवाजीला 'वाट चुकलेला देशभक्त' म्हटले होते. नेहरु भले केंब्रिजला शिकले असतील, पण आपण त्यांचे खरे मानायचे का? शिवाजीच्या मुलखात राहाणारी माणसे त्याची वाट चुकली, असे म्हणतील का? १८५७ चे युद्ध ब्रिटीशांसाठी बंड होते. आपल्या बाजूने ते स्वातंत्र्ययुद्ध म्हणूनच पाहावे लागेल.

ब्रिटीशांनी त्यांच्या कारभाराच्या सोईसाठी केलेले कायदे असोत अथवा भारताचा लिहिलेला इतिहास असो, त्यात आपण स्वतंत्र झाल्यानंतरही बदल/परिशीलन करण्याची आमच्या लोकांना गरज वाटत नाही. त्या बेरुनीच्या एका नोंदीचे काय घेऊन बसलात?

श्रेष्ठ प्रतिसाद

योगप्रभू, तुमच्या प्रतिसादाला मी गेल्या कित्येक दिवसातील उपक्रमावरील वाचलेल्या अनेक प्रतिसादातील काही श्रेष्ठ प्रतिसाद मानतो - एक उत्तम उदाहरण ! धन्यवाद.

"परका माणूस काही-बाही वर्णने लिहितो, ....त्याही काळी आणि आजही भारत यापलिकडे बराच आहे, हे आपण जाणतोच)"
ह्या परीच्छेदातील भावनेशी मी सहमत आहे. आणि तीच भावना मी माझे लेखन करतांनाही ठेवतो व त्याच अपेक्षेने इतरांनीही पहावे असे वाटते. म्हणजे काय तर एखाद्या निरीक्षणाबद्दल मी (किंवा आजच्या काळातील व्यक्ति) लिहिले असेल तर ते खोटे व असे एखादे पुस्तक पुर्वीच्या प्रवाशाने लिहिले असेल तर ते प्रमाण मानुन पुढील चर्चेला सुरुवात ही वृत्ती चूकीचे आहे असे वाटते.

असो, इतर परीच्छेदातील भावनेशीही मी सहमत आहे.

एकंदरीतच मला इतिहासात रमता येत नाही. इतरांनीही तसे करावे अशी अपेक्षा मी बाळगणे मुर्खपणाचे ठरेल. पण जेव्हा इतिहासातील संदर्भ तेव्हढे खरे आणि आजचे जे दिसतेय ते चूकीचे असे म्हणले जाते ते अर्थातच अयोग्य आहे असे वाटते. (हे वाक्य लोडेड् आहे- त्यास इतर चर्चातील अनुभव संदर्भ आहे)

ज्या कारणांसाठी वाचक व लेखक येथे येतात ते ज्या कारणांसाठी येतात ते कोणते व त्या अपेक्षा पुर्ण होतात का? असतील /नसतील तर का? हे समजुन घेणे आवश्यक आहे असे वाटते.

चष्मा!

एकंदरीतच मला इतिहासात रमता येत नाही. इतरांनीही तसे करावे अशी अपेक्षा मी बाळगणे मुर्खपणाचे ठरेल. पण जेव्हा इतिहासातील संदर्भ तेव्हढे खरे आणि आजचे जे दिसतेय ते चूकीचे असे म्हणले जाते ते अर्थातच अयोग्य आहे असे वाटते. (हे वाक्य लोडेड् आहे- त्यास इतर चर्चातील अनुभव संदर्भ आहे)

तो लोड चष्म्याचा आहे असे दिसते.
अन् हा चष्मा तुम्ही स्वतः शोधून आणून लावून घेतला आहात असे ही दिसते.. अन्यथा इतिहासात रमता न येणार्‍याने इतिहासातिल चर्चेत असला भाग घेऊन लोडेड् स्टेटमेंट्स् केलीच नसती.
असो.

 
^ वर