भारतीय गणित

भारतीय गणितज्ञांच्या कर्तृत्वाचा रोचक परिचय

नागपूर चे नचिकेत प्रकाशन हे वैशिष्ट्यपूर्ण विषयांवर पुस्तके प्रसिद्ध करण्याचे ध्येय बाळगून असलेले आणि या व्यवसायात तसे नवेच असले तरी विचक्षण गं्रथप्रेमींमध्ये मान्यता मिळालेले आहे. ज्या विषयांना तसा साधारणत: स्पर्श झाला नाही, असे विषय वाचकांपुढे ठेवण्याच्या या मालिकेत गणिताचे सिद्धहस्त व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक श्री अनंत वासुदेव व्यवहारे यांचे भारतीय गणिती हे पुस्तक ङ्कनचिकेतङ्ख ने नुकतेच प्रकाशित केले आहे.
गणित हा विषय सर्वसामान्य माणसासाठी तसा रूक्ष असतो. पण या शास्त्राच्या आधारानेच अन्य शास्त्रे व कलविश्र्वही बहरते. गणित हा एका अर्थी सर्व शास्त्रांचा पायाच आहे. या विश्र्वाचे संचालन अत्यंत काटेकोर पद्धतीने चालते, आकाशस्थ ग्रहगोलांच्या चलन व परिचालनाचे परिणाम मानवी जीवनावर होतात या दृढ विश्वासातून प्राचीन भारतीय गणितज्ज्ञ व ज्योतिर्विदांनी याचे रहस्य उलगडायला प्रारंभ केला. आर्यभट्ट-प्रथम यांच्या पासून सुरू झालेल्या या गणितज्ञांच्या प्रयत्नांना पुढे अनेक भारतीय गणितींनी आपापल्या परीने विकसित केले. याचे फलित म्हणूनच भारतीय गणितशास्त्र सर्व जगापुढे एक प्रगत व परिणत शास्त्र म्हणून प्रकट झाले. अशा 51 थोर भारतीय गणितज्ञांच्या कार्यकर्तृत्त्वाचा परिचय प्रा. व्यवहारे यांनी या पुस्तकातून घडविला आहे.
आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कर, ब्रह्मगुप्त, लल्लाचार्य, महावीराचार्य, श्रीधराचार्य, माधव, परमेश्र्वरन असे इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत गणित अभ्यासणाऱ्या संशोधकांचा परिचय वाचताना मन थक्क होते. या प्रत्येकाने लिहिलेल्या मूळ संस्कृत ग्रंथांची यादीच लेखकाने दिली आहे. आर्यभटांचे क्रांतिकारी विचार, वराह मिहिरांचे फलज्योतिष साधन, लल्लाचार्यांचे कालमापन, अंकगणित व महत्वमापनावरील श्रीधराचार्यांचे मूलभूत संशोधन, माधवांची धनभूमिती याची अत्यंत रोचक माहिती प्रा.व्यवहारे यांनी त्या-त्या ग्रंथामधील मूळ संस्कृत श्र्लोकांसह आणि त्यांच्या स्पष्टीकरणासह दिलेली आहे.
पंधराव्या शतकाच्या शेवटी जन्माला आलेले केरळी गणिती ज्येष्ठदेव यांच्या पासून आधुनिकाळातील प्रसिद्ध गणिती श्रीनिवास रामानुजन या कालखंडातील महत्वाचे गणिती म्हणजे स्वामी भारती कृष्णतीर्थ शंकराचार्य हे होत. वैदिक गणिताचे हे प्रणेते. स्वत: प्रा.व्यवहारे हे वैदिक गणिताचे सखोल अभ्यासक व प्रचारकही आहेत. यामुळे हा लेख जरा विस्तृत आहे. सामान्य परिस्थितीतून वर आलेला पण आपल्या विलक्षण आणि मेधावी प्रतिभेने जगाचे डोळे दिपवून टाकणारा भास्कराचार्यांनंतरचा भारतीय गणिती म्हणजे श्रीनिवास रामानुजन्‌‌‌‌‌‌‌‌‌! यांच्यावरील लेखही माहितीपूर्ण आहे.
अठरावे, एकोणीसावे व विसावे शतक वैज्ञानिक व औधौगिक क्रांतीसोबतच अवकाश संशोधनाच्या दिशेने पावले टाकणारे ठरले. त्यात डॉ. सत्येंद्रनाथ बोस, डॉ. राजचंद्र बोस, डॉ. सी.एस.वेंकटरमण, डॉ.जयंत नारळीकर, डॉ.नरेंद्र करमरकर, डॉ. प्रभुलाल भटनागर, डॉ. अमलकुमार रॉय चौधरी, राधानाथ सिकदार, डॉ. सर्वदमन चावला, डॉ. हरिश्र्चंद्र खरे यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच द.रा.काप्रेकर, डॉ.के.ल.दप्तरी, डॉ. हरिश्र्चंद्र खरे यांचाही वाटा आहे. अशा 51 दिग्विजयी गणितज्ञांची माहित एकमित्र करणे व ती परिष्कृत करून सामान्य वाचकांसाठी पुस्तकरूपाने उपलब्ध करून देणे, हे सोपे काम नाही, कारण हा विषयच वेगळा आहे. प्रा. व्यवहारे यांनी अत्यंत परिश्रमाने ही माहिती संकलित केली. ते स्वत: गणिताचे प्राध्यापक असल्याने या विषयाकडे त्यांनी एका स्वतंत्र दृष्टिकोनातून पाहिले. देशाच्या उभारणीसाठी याही शास्त्रज्ञांचे योगदान फार महत्वाचे असून त्या प्रयत्नात या गणितज्ञांनी भारताची मान उंचावण्याचा प्रयत्न कसा केला, याचेही दर्शन प्रा.व्यवहारे यांनी घडविले आहे.
गणिताचे प्राध्यापक, अध्यापक, विद्यार्थी व गणितात रूची असणाऱ्यांसाठी हा गं्रथ म्हणजे एक ङ्कगोल्डन ट्रेझरीङ्ख आहे. विशेषत: गणिताच्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे, संग्रही ठेवले पाहिजे. गं्रथाच्या शेवटी प्रा. व्यवहारे यांनी संदर्भ गं्रथांची यादी दिल्याने ते गं्रथ वाचण्याची उत्सुकता लागावी. गणितासारखा जड विषय असूनही लेखकाची शैली सहज व प्रासादिक आहे. त्यामुळे लेखनाला लालित्याचाही स्पर्श झाला आहे. नागपूरच्या मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक राहिलेले जुन्या पिढीतील सिद्धहस्त गणित प्रबोधक व प्रा. व्यवहारेंसह अनेकांचे गुरू असलेले कै. प्रा. श्रीनिवास मंगळगिरी यांना हा गं्रथ लेखकाने अर्पण केला आहे. एक उत्तम, दर्जेदार पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल आणि त्याचे अंतरंग व बहिरंगही दर्जेदार राखल्याबद्दल प्रकाशकांचे अभिनंदन! ी प्रकाश एदलाबादकर
भारतीय गणिती प्रकाशक
लेखक-प्रा. अनंत व्यवहारे नचिकेत प्रकाशन
पृष्ठे-180 24, योगक्षेम ले आऊट,
मूल्ये-180 रू. स्नेहनगर, वर्धारोड, नागपूर-400015,
(:0712-2285473, 9225210130

Comments

ढापलेला लेख

हा लेख येथून कॉपीपेस्ट करून उतरवला आहे.

अनावश्यक टिप्पणी

अनिल सांबरे ह्यांनी लेखकाच्या नावासकट हा लेख उपक्रमावर पुनर्प्रकाशित केलेला आहे. ज्या संकेतस्थळावरून हा लेख घेतला आहे ते संकेतस्थळही अनिल सांबरे ह्यांचेच आहे असे दिसते आहे. अशा पुनर्प्रकाशनास उपक्रमावर प्रतिबंध नाही. तुमची टिप्पणी अनावश्यक आहे.

नचिकेत प्रकाशन

प्रकाश एदलाबादकर यांनी लिहीलेला आणि अनिल सांबरे यांनी उपक्रमावर पुनर्प्रकाशित केलेला पुस्तक परिचय आवडला.

हे पुस्तक प्रकाशित करणारे नचिकेत प्रकाशनही अनिल सांबरे यांच्या मालकीचेच आहे असे दिसते. सदस्य लेखकाकडून खुलासा व्हावा. या दुव्यावर त्यांच्या प्रकाशनाच्या इतर पुस्तकांचाही परिचय वाचता येईल.
अवांतर : पुस्तक परिचय आणि पुस्तकाची जाहिरात यांच्यातली सीमारेषा फारच पुसट आहे.< ही टिप्पणी अनावश्यक वाटल्यास काढून टाकावी.

वैदिक गणित

वैदिक गणिताचा अलीकडे बराच बोलबाला झाला आहे. ज्यांना इंग्रजीमध्ये revivalist म्हणता येईल अशा व्यक्ति आणि गट हा बोलबाला करण्यात आघाडीवर आहेत. ह्यामागचे सत्य काय आहे? ह्याविषयीचे माझे मत थोडक्यात मांडतो. माझ्यापेक्षा कितीतरी अधिक अधिकारी मंडळींनी ह्यावर केलेले बरेच लिखाण इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यापैकी काही संदर्भ शेवटी दिले आहेत.

ह्या वैदिक गणितामध्ये प्रत्यक्ष 'वैदिक' काय आहे हे आजतागायत कोणासही कळलेले नाही. 'स्वामीजी असे म्हणतात' एव्हढा एकच ipse dixit गटातला आधार ह्या विधानामागे आहे. कोणत्याही वेदामध्ये आणि वेदांगामध्ये, वा अन्यत्रहि कोठे, वैदिक गणिताचा मूलस्रोत आजतागायत दिसून आलेला नाही. वैदिक गणिताला वहिलेल्या पुस्तकांमध्येहि कोठेही ससंदर्भ हा स्रोत प्रकाशित झालेला नाही. अशा परिस्थितीत एवढा एकच निष्कर्ष काढता येतो की वैदिक गणिताची मूलभूत सूत्रे स्वामीजीनीच स्वतःच्या बुद्धीतून निर्माण केली असून ती मूळ वेदग्रंथात कोठेही नाहीत. वेद हे बदलण्याचा किंवा वेदांना पुरवणी जोडण्याचा कोणासहि अधिकार दिलेला नाही. स्वामीजीनी स्वतः निर्माण केलेल्या सूत्रांना 'वैदिक' म्हणणे हा वेदांचा अधिक्षेप आहे.

ह्यात Mathematics अशा अर्थाने गणित किती आहे हेहि विचारात घ्यायला हवे. आपण अंकगणित (Arithmetic) आणि उच्च गणित (Mathematics) ह्या दोहोंसहि गणित ही एकच उपाधि देतो. प्रत्यक्षात अंकगणित हे आकडेमोड आणि हिशेब करण्याचे तंत्र आहे. उच्च गणितात प्रवेश करावयाचा असेल तर अंकगणिताचे पूर्ण ज्ञान हवेच पण उच्च गणित अमूर्त कल्पनांचा शोध घेते आणि अंकगणित मूर्त आकड्यांशी खेळते. उच्च गणितात आकडेमोड अशी फारच थोडी करावयास लागते, जेथे लागते तेथे ती शाळेत शिकलेल्या अंकगणिताच्या उपयोगाने सहज करता येते. त्यासाठी 'वैदिक गणिता'तील गुंतागुंतीची सूत्रे डोक्यात भरून घेण्याची काहीहि जरूर नसते. गणिताच्या विद्यार्थ्यांना हाही Rule of Thumb माहीत आहे की एखाद्या गणितात फार वेडीवाकडी आकडेमोड करावयाला लागणे हा सर्वसाधारणपणे पूर्वीच्या सोडवणुकीत काहीतरी चूक आहे ह्याचा निदर्शक असतो. ह्यामुळे अंकगणिती आकडेमोडीला Vedic Mathematics हे संबोधन गैरलागू आहे आणि दिशाभूल करणारे आहे, ती आकडेमोड कितीहि 'जादुई चिराग' वाटली तरी. आकदडेमोडीच्या पद्धती म्हणूनहि त्या खर्‍या कितपत उपयुक्त आहेत ते खालील अभ्यासनिबंधांमध्ये दर्शविले आहे.

उच्च गणिताचे आणखी एक वैशिष्ट्य असे की ते गणित आपाततः भिन्न दिसणार्‍या गोष्टींमधील समान दुवा हेरून त्यांमधील आंतरिक साम्याचा अभ्यास करते. सोपे सर्वपरिचित असे उदाहरण देऊन हे स्पष्ट करतो. दोन समान्तर रेषा, दोन रेषा, पॅराबोला, लंबवर्तुळ (ellipse), वर्तुळ, हायपरबोला ह्या सर्व भौमितिक आकृति एक दुसर्‍यापासून वरकरणी पाहिल्यास वेगळ्या वाटतात. प्रत्यक्षात त्रिमिति शंकूचे समतलाने वेगवेगळे छेद घेऊन ह्या सर्व द्विमिति भौमितिक आकृत्या निर्माण होतात. हे सर्व Conic Section ची भिन्नभिन्न उदहरणे आहेत हे एकदा लक्षात आले की Conic Section ह्या संकल्पनेचा पुढील अभ्यास करून शोधलेली प्रमेये ह्या सर्व आकृत्यांना लागू पडतात. अशा अर्थाने तथाकथित Vedic Mathematics मध्ये काहीच Mathematics दृग्गोचर होत नाही.

एखादया गोष्टीला `वैदिक`अशी उपाधी चिकटवली (आणि चिकटवणारे स्वत: शंकराचार्य असले) की बहुसंख्य श्रद्धाळू जन ती गोष्ट वेदप्रणीतच आहे असे मानू लागतात. हे एक मार्केटिंग गिमिक् आहे. अशापासून खरे नुकसान काय होते ही खालील आधारांमध्ये दर्शविले आहे.

एवंच काय, ज्यांना असल्या कसरतींचे कौतुक आहे त्यांनी जरूर त्यांचा अभ्यास आणि प्रसार करावा, मात्र ते करतांना त्या कसरतीला Vedic Mathematics असे गौरवू नये कारण त्यात `वैदिक` काहीच नाही आणि ते `Mathematics`हि नाही.

हे विचार सर्वसामान्य समजुतींच्या विरोधात जाणारे आहेत ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यांना काही साधार उत्तर मिळाल्यास मला ते वाचायची उत्सुकता आहे

आधारः

http://www.math.tifr.res.in/~dani/vmtimeart.pdf
http://www.tifr.res.in/~vahia/dani-vmsm.pdf
http://en.wikipedia.org/wiki/Bharati_Krishna_Tirtha%27s_Vedic_mathematics

अरविंद कोल्हटकर, जुलै २५, २०११.

+१

पूर्ण सहमत.

+१

+१

+२

+२

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

हिंदूंचे गणित

जुन्या भारतीय पद्धतीच्या गणितामध्ये ज्यांना स्वारस्य असेल अशांनी बिभूतिभूषण दत्त आणि अवधेश नारायण सिंग ह्यांचा द्विखंडात्मक `A History of Hindu Mathematics`हा ग्रंथ जरूर वाचावा. १९३५ साली प्रसिद्ध झालेला हा ग्रंथ अद्यापि ह्या क्षेत्रातील अधिकारी ग्रंथ मानला जातो.

ही थोडी खेदाची बाब आहे की books.google.com वा archive.org अजून उपलब्ध नाही. DLI मध्ये आहे पण तेथे वाचण्यास सौकर्य थोडे कमी आहे.

मुख्य लेखातील रामानुजनसारखे अलीकडचे सर्व भारतीय गणिती हे पाश्चात्य देशात गणितशास्त्राचा जो विस्तार १७व्या शतकानंतर झाला त्या परंपरेतील आहेत. त्यांचे पितृत्व भास्कराचार्यासारख्या हिंदु गणितींशी पोहोचत नाही.

अरविंद कोल्हटकर, जुलै २५, २०११.

?

वैदिक गणिताची भलामण करणार्‍या काही लेखांमध्ये मोठाली डिफरन्शियल इक्वेशन्स वगैरे लिहिलेली पाहिली आहेत. ती त्या वैदिक गणितात आहेत की नाहीत?

नितिन थत्ते

वैदिक गणित? गिव् मी अ ब्रेक!

वेदांशी आणि उच्च गणिताशी काडीचा संबंध नसतांना त्याला Vedic Mathematics म्हणून डोक्यावर घ्यायचे ह्या भंपकपणावरच काय तो माझा रोख आहे, बाकी ज्यांना त्यात स्वारस्य असेल त्यांनी जरूर त्याचा सखोल अभ्यास करावा.

अरविंद कोल्हटकर, जुलै २६, २०११.

वैदिक गणित किंवा जे काय असेल ते.

अहो तसं नाही. म्हणजे वैदिक गणितावरील काही लेखात अशी इक्वेशन वगैरे दिसली होती. म्हणून विचारले. म्हणजे आकडेमोडीसाठी असलेल्या सूत्रांतून तसेही काही अर्थ निघतात का काय?

नितिन थत्ते

सहमत आणि थोडी भर

+३ सहमत.

वेदिक (इंग्रजीत वेदिक लिहिले जाते म्हणून) मॅथेमॅटिक्स या नावाचे पुस्तक (प्रकाशक मोतिलाल बनारसीदास लेखक अर्थातच भारती कृष्ण तीर्थजी महाराज शंकराचार्य) उपलब्ध आहे. या पुस्तकाचे जनरल एडिटर म्हणून वी.एस.अगरवाला हे आहेत. माझ्याकडची प्रत १९९७ ची आहे.

मूळ पुस्तक भारती तीर्थ निवर्तल्यावर पाच वर्षांनी प्रसिद्ध झाले (१९६५ प्रथमावृत्ती.) वी. एस. अगरवाला यांच्या टिपणात दोन तीन गोष्टींचा उहापोह केला आहे. पहिले म्हणजे हे गणित वेदातील आहे का? आणि शंकराचार्य तसे म्हणतात का? तसेच या पुस्तकाचा थोडाफार इतिहास दिला आहे.
अगरवाला यांच्या मते ही सूत्रे मूळ वेदातली नाहीत. असे म्हणताना भारती तीर्थ यांचा एक परिच्छेद दिला आहे. त्याचा गोषवारा थोडा फार या प्रमाणे. ' वेद म्हणजे ज्ञानारंभ (फाऊंटनहेड ऑफ नॉलेज). म्हणून वेदांमधे सर्वशाखांचे ज्ञान येणे आवश्यक (शुड कंटेन) आहे. नुसतेच आत्मिक नाही तर सर्व ज्ञानशाखांचे.' (गांधर्ववेद, आयुर्वेद, स्थापत्यवेद इत्यादी) अगरवाला यांच्या मते वेदांची व्याख्या अशी केल्यावर या गणितास वेदिक (फक्त याच गणितास का म्हणावे न कळे) म्हणण्यात फारशी चूक नाही. यातील सूत्रे अथर्ववेदाचे परिशिष्ठ म्हणून गणली जावीत.

मूळ पूस्तक भारती तीर्थांनी नागपूरला दिलेल्या भाषण/प्रात्यक्षिकावर आधारित आहेत. (१९५२ साली.) हे स्वामी बहुदा आधुनिक गणित चांगल्यापैकी शिकलेले होते.

बाकी १६ सूत्रे फारशी विचारकरण्याजोगी नाहीत. यामधे डिफरंशीयल इक्वेशन वगैरे आढळले नाही. मूख्य भर अंकगणितावर दिसतो (काही समीकरणे सोडल्यास. तीही अंकगणितातून सोडवल्यासारखी आहेत.)

ही सूत्रे वेदिक असली किंवा नसली तरीही अंकगणिते सोडवण्यासाठी फारशी उपयोगी नाहीत असे माझे मत झाले.

प्रमोद

सहमत

१०००% सहमत !

उगीचच केलेला विरोध

वैदिक गणित किंवा 'भारतीय विचार पद्धतीतून सांगितलेली गणिताची सुत्रे' हि गणित पद्धत नाही. असे जे कोल्हटकरांचे म्हणणे आहे ते मला खालील प्रमाणे वाटत आहे. ---
'मार्गक्रमण' आणि 'प्रवास' ह्या दोन वेगवेगळ्या गोश्टी आहेत.
'मार्गक्रमण' म्हणजे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणे. याउलट
'प्रवास' ह्या विशयात फक्त मानवाच्या दोन पायांनी केलेली मार्गक्रमणाच होय. इतर कोणत्याही पद्धतीने मार्गक्रमण करणे हे 'प्रवास' ह्या विशयाच्या संदर्भाने निशिद्ध आहे, गैर आहे. आणि ते त्याज्य हि आहे.

समजा एक व्यक्तीला भारतातून युरोपात किंवा अमेरीकेत किंवा अफ्रिकेत जायचे असेल तर त्या व्यक्तीने केवळ आपल्या दोन पायांचा वापर करूनच मजल-दरमजल करत तिथपर्यंत पोहचायला हवे. तसे केले तरच तो 'प्रवास' इतर कोणत्याही पद्धतीने म्हणजे बोटीने, जहाजाने, विमानाने, हॅलिकॉप्टरने इत्यादी गोश्टींचा वापर करीत 'मार्गक्रमण' केले तर तो 'प्रवास' होत नाही.

बरं हा 'प्रवास' नावाचे कर्म करताना अनवाणी होवूनच प्रवास करायचा असतो. त्यात जो आनंद मिळतो तो खरा आनंद असतो. ज्या व्यक्तीला हे कठोर श्रम करीत आपले इच्छित स्थळ गाठता येते, तो 'खरा प्रवासी' म्हणून घेण्याच्या लायकीचा असतो.
बाकी, सब झूठ है!

वैदिक, जैन, आर्यभटीय आणि केरळी गणित

पुस्तक परिचय आवडला. पुस्तक संग्राह्य आहे. (संग्रहणीय? :))

वैदिक गणित हे 'वैदिक' नाही. पण अंकगणित आहे.
जैन गणित हे जैन नाही. पण अंकगणित आहे.
आर्यभट्ट १,२,भास्कराचार्य१,भास्कराचार्य २ आणि तत्सम ,
केरळी गणित तर निश्चितच उच्च गणित आहे. मॅथ्स् ऑलिंपियाडमध्ये प्रामुख्याने याच प्रकारच्या गणितावर भर आहे.

भारतीय गणित परंपरा 'वैदिक' नसली तरी वेदांच्या कर्मकांडांसंबंधी शल्वसूत्रांपासून त्यांची सुरुवात झाली असे म्हणता येते. कोणत्याही विषयाची जशी वाढ होते तशीच गणिताची वाढ भारतात झाली होती आणि ग्रीकोरोमन+पर्शियन संस्कृतीशी त्याची देवाणघेवाणही झाली होती.
त्यामुळे-

मुख्य लेखातील रामानुजनसारखे अलीकडचे सर्व भारतीय गणिती हे पाश्चात्य देशात गणितशास्त्राचा जो विस्तार १७व्या शतकानंतर झाला त्या परंपरेतील आहेत. त्यांचे पितृत्व भास्कराचार्यासारख्या हिंदु गणितींशी पोहोचत नाही

.
-असे म्हणताना रामानुजन यांच्या खूप पूर्वी भारतात झालेले गणिती हे पाश्चात्य गणितज्ञांच्या पितामहांच्या समकालीन आणि समकक्ष होते हे नाकारता येत नाही.

आज 'वैदिक गणित' नावाखाली जे चटकन् गणित शिकवले जाते ते फाडफाड इंग्रजी सारखेच आहे हे मात्र खरे. त्यामुळे भारतीय गणिताबद्दल निष्कारण गैरसमज होतात.

गणित आणि अंकगणित

गणित म्हणजे आकडेमोड आणि आकडा जेवढा मोठा तेवढा ती करणारा महान अशी एक भाबडी समजूत अनेक लोकांची असते. त्यामुळे पाश्चात्य लोक ट्रिलियनपाशी थांबतात तर आपल्या पूर्वजांना शहाण्णऊ की अठ्ठ्याण्णऊ अंकी संख्या 'माहीत' होत्या म्हणून ते आजच्या मॅथेमेटिशियन्सपेक्षाही महान असले अचाट दावे केले जातात. सायन्स किंवा इंजिनीयरिंगमध्ये ज्यांनी मॅथेमॅटिक्सचे शिक्षण घेतले असेल त्यांना या विषयाचा विस्तार अंकगणितापेक्षा किती विशाल आहे याची कल्पना असते.

आपल्याला जे करता येत नाही ते करू शकणारा आभाळाएवढा मोठा अशी आणखी एक कल्पना असते. शकुंतलादेवी ज्या प्रकारची आकडेमोड तोंडी करून दाखवत ते थक्क करणारे आहे. पण मी त्यांना महान 'गणितज्ञ' मानणार नाही, कारण थोडा जास्त वेळ घेऊन ती सर्व गणिते मी शाळेत शिकत असतांना सोडवू शकत असे.

तथाकथित वैदिक गणित 'वैदिक' आहे की नाही, वेद हे 'अपौरुषेय' आहेत की नाहीत, देव आणि वेद यांचा काही संबंध आहे की नाही या सगळ्या विषयात मला रस नाही. पण 'वैदिक गणित ' म्हणून किंवा 'भारतीय गणित' म्हणून ज्याचा एवढा उदो उदो केला जातो ते फक्त अंकगणित आहे. मॅथेमॅटिक्सच्या तुलनेत अंकगणित हा त्याचा अगदी छोटा असा भाग आहे. कॉम्प्लेक्स नंबर्स किंवा लॉगॅरिथम्स यासारख्या मॅथेमेटिक्समधील अत्यंत पायाभूत संकल्पनांचा साधा उल्लेख मला त्यात कुठे आढळला नाही.

साधा कागद पेन्सिलसुद्धा उपलब्ध नसतांनाच्या काळात सूत्रांच्या सहाय्याने आकडेमोड करण्याच्या रीतींना महत्व होते आणि ते करणार्‍यांच्याबद्दल मला खूप आदर वाटतो. पण आजच्या काळात त्यांचा फारसा उपयोग नाही हे तितकेच खरे आहे.

भारतीय गणित हे केवळ अंकगणित नाही

भारतीय गणिताचे हे अनावश्यक अवमूल्यन आहे असे मी म्हणेन. ( पुढील लिखाण जुन्या भारतीय किंवा 'हिंदु' गणिताबद्दल आहे. ते तथाकथित वैदिक गणिताच्या संदर्भात वाचू नये. वैदिक गणिताबद्दलचे माझे मत वर स्पष्ट केले आहेच.)

शास्त्राची प्रगति नेहमी पुढच्या दिशेनेच होत असते त्यामुळे आजचे शास्त्र कालच्या शास्त्रापेक्षा अधिक प्रगल्भ असणार हे उघड आहे पण त्यामुळे कालच्या शस्त्राची महती अजिबात कमी होत नाही, आजचे शास्त्र कालच्याच्या खांद्यावर उभे असते.

जुने भारतीय गणित केवळ अंकगणित होते हेहि खरे नाही. भास्कराचार्याच्या बीजगणितात खरोखरचा Algebra आहे. ग्रहगणित करण्यासाठी त्याचा प्रामुख्याने उपयोग असल्याने आपणास तो थोडा एकांगी वाटू शकेल. पण त्या बीजगणितातील कुट्टक पद्धति वापरूनच भास्कराचार्याने तथाकथित Pell's Equation सोडविण्याची पद्धति ते युरोपात पोहोचण्याच्या ५०० वर्षे आधी शोधून काढली होती आणि (१७६६३१९०४९)^२ - ६१*(२२६१५३९८०)^२ = १ हे शोधून काढले होते.

ह्याच्यावर अधिक टिप्पणी खालील चित्रात पहावी. मी ही टिप्पणी दुसर्‍या एका इंग्रजी ग्रुपमध्ये केली होती. ती संपूर्ण देवनागरीत पुनः लिहिण्याऐवजी मी हा shortcut वापरला आहे

 पेलचे समीकरण
पेलचे समीकरण

मूळ टिप्पणी http://groups.google.com/group/samskrita/browse_thread/thread/6ff79b8f0b... येथे उपलब्ध आहे.

अरविंद कोल्हटकर, जुलै २६, २०११.

+

सहमत.

जेव्हा आगपेट्या लायटर नव्हते तेव्हा गारगोटी आपटून आग पेटवणार्‍याचे कौतुक व्हावे हे साहजिक आहे. परंतु आज लोकांनी गारगोटी आपटून आग पेटवण्याचे क्लास चालवावेत हे काही बरोबर नाही.

नितिन थत्ते

अगदी खरं आहे हे!

अगदी खरं आहे हे! लायटररुपी कॅलक्युलेटर जवळ असताना गारगोटीरूपी मेंदूचा वापर कशासाठी करायचा?
मेंदुचा वापर 'भारतीयांनी विकसित केलेलं' असे दिसले कि, केवळ नाकं मुरडण्यासाठीच केला जायला हवा. 'जे आहे ते अजून विकसित कसं करता येईल?' ह्याचा विचार करणं गैर आहे.

कारण

थोडी सुधारणा: कॅलक्युलेटररूपी आगपेटी जवळ असताना, मेंदूचा गारगोटी म्हणून उपयोग कशाला करायचा... असे हवे.

१. लायटर आणि आगपेट्या आल्यावरही गारगोटी विकसित करायची?

२. सदरचे 'वैदिक' गणित हे अगदी अलिकडे तयार केलेले आहे असे दिसत असेल तर आगपेट्या नसतानाची गारगोटी म्हणून तरी त्याचे कौतुक तरी कशासाठी करायचे?

३. गणिताच्या पेपरात पटपट आकडेमोड करण्यासाठी उपयुक्त म्हणावे तर गणिताच्या पेपरात आकडेमोडीला स्थानच असू नये. संकल्पना समजली आहे की नाही हे तपासणे हाच गणिताच्या पेपरचा उद्देश असला पाहिजे. चार्/सहा आकडी संख्या असलेली समीकरणे ५ मिनिटात सोडवणे हा गणिताच्या परीक्षेचा उद्देश असूच नये. (आनंद घारे यांनी हा मुद्दा मांदला आहे).

नितिन थत्ते

भाऊ, गणित म्हणजे काय रे?

<चार्/सहा आकडी संख्या असलेली समीकरणे ५ मिनिटात सोडवणे हा गणिताच्या परीक्षेचा उद्देश असूच नये. (आनंद घारे यांनी हा मुद्दा मांदला आहे).

मीहि हेच वेगळ्या शब्दात लिहिले आहे. एखादे गणित आकड्यांच्या जंजाळात फार घुसणे हे सोडवणूक कोठेतरी चुकते आहे ह्याचे बहुतांशी द्योतक असते. बहुतांशी अनावश्यक अशा आकडेमोडीमधले निरर्थक कौशल्य, ज्याला मी कसरत म्हटले आहे, ह्याचा गणिताशी काहीहि संबंध नाही.

आकडेमोडीमध्ये काही elegance असला तरच गणितज्ञांना त्याचे आकर्षण असते. (हा शब्दहि गणितज्ञांचा आवडता शब्द आहे.) उदाहरणार्थ १७२९ हा आकडा.

रामानुजनला इंग्लंडमध्ये बोलावून नेणारा गणितज्ञ हार्डी एकदा रामानुजला भेटायला गेला. जातानाच्या त्याच्या टॅक्सीचा नंबर १७२९ होता. हार्डीने बोलता बोलता सहज १७२९ चा उल्लेख केला आणि तो म्हणाला, "ह्या संख्येत वैशिष्ट्यपूर्ण असे काहीच नाही. त्यामधून काही वाईट न घडो म्हणजे झाले." रामानुजनने लगेच उत्तर दिले. "त्यात काहीच वैशिष्ट्यपूर्ण नाही असे नाही. दोन घनांची बेरीज आहे असा हा सर्वात छोटा आकडा आहे." (१७२९=१^३+१२^३=९^३+१२^३).

अरविंद कोल्हटकर, जुलै २७, २०११.

भाऊ, गणित म्हणजे काय रे?

Elegance चे सर्वपरिचित उदाहरण म्हणजे वस्तुमान आणि ऊर्जा ह्यातील संबंध दर्शविणारे आइन्स्टाइन चे सूत्र: E=mc^2.

अरविंद कोल्हटकर,जुलै २७, २०११.

भाऊ, गणित म्हणजे काय रे?

गणितामध्ये, किंबहुना कोठल्याच ज्ञानशाखेमध्ये, भारतीय आणि अभारतीय अशा अभिनिवेशाला काहीहि स्थान नाही. विचारात काही सघनता आहे की नाही हे महत्त्वाचे.

गणित आणि एक-दिवसीय क्रिकेट ह्यांमध्ये फरक करायला हवा.

अरविंद कोल्हटकर, जुलै २७, २०११.

हेच

गणितामध्ये, किंबहुना कोठल्याच ज्ञानशाखेमध्ये, भारतीय आणि अभारतीय अशा अभिनिवेशाला काहीहि स्थान नाही.
हेच सांगण्याचा प्रयत्न मी माझ्या लेखनामधून वेळोवेळी करत आलो आहे.

 
^ वर