पानशेतच्या प्रलयाची ५० वर्षे

"Courage, in the final analysis, is nothing but an affirmative answer to the shocks of existence."

-Kurt Goldstein

इतिहासातील काही घटना त्या इतिहासाचा भाग असलेल्या शहरावर, प्रांतावर किंवा समाजावर एक ठळक, दूरगामी असा परिणाम करत असतांना दिसतात. अशा काही ऐतिहासिक घटनांनी एखाद्या प्रांताचा इतिहास आणि भूगोलही कायमसाठी बदलून गेला असण्याची उदाहरणे जगभर आहेत. अशीच एक अकल्पित आपत्ती आजच्या पुणे शहरावर बरोब्बर ५० वर्षापुर्वी ओढवली होती.

१२ जुलै २०११ हा पानशेतच्या प्रलयाचा पन्नासावा स्मृतीदिन आहे. पन्नास वर्षांपूवी, १२ जुलै १९६१ ला सकाळी आठ वाजता पानशेतची भिंत खचली आणि लालभडक लोंढ्याचा आतंक सुरु झाला. कल्पनातीत आवेग घेउन मूठा नदी शहरावर चालून आली. लकडीपूलाचा सापळा झाला. नव्यापूलावर नदीपात्रापासून ५४ फूट उंच पाणी होतं. ओंकारेश्वराचा अजस्त्र नंदी कित्येक मीटर दूर फेकला गेला. आता महानगरपालिका भवन पीएमटी डेपो आहे तिथे एक विस्तीर्ण उद्यान होतं. ते आख्खं उद्यान वाहून गेलं. तलाव उखडला गेला.

१२ जुलै १९६१ ला नदीतीरानजीकचा विस्तृत भाग सात-आठ तास पाण्याखाली होता. शहराच्या मध्यवर्ती भागांत नदीकाठालगतच्या पेठांतून पाणी घुसले होते. संपूर्ण मंगळवार पेठ, शनवार, नारायण, सोमवार, कसबा या पेठा पाण्याखाली होत्या. सदाशिव, बुधवार, एरंडवणे, शिवाजीनगर या सकृतदर्शनी नदीपासून लांब असलेल्या भागांनाही पूराचा तडाखा सहन करावा लगला. मूठेच्या पाण्यानं मुळेस मागे रेटलं आणि ते पाणी संगमवाडी, खडकी यामधून पसरलं. नागझरी आणि माणीक कालव्यातून शिरलेल्या लोंढयानं रविवार आणि गणेश पेठाही बुडाल्या.

पुणेकरांवर हा घाला अचानक पडला. त्यांना संकटाची कोणतीही व्यवस्थित पूर्वसूचना मिळाली नव्हती. जेव्हा पाणी वाढायला लागलं, तेव्हा नुकत्याच झालेल्या भरपूर पावसामूळं नदीस मोठा पूर आला असं लोकांना वाटत होतं. तेव्हा नदीचं पाणी नेहमीच तीरावर शिरत असे त्यामुळे लोकांना ती गोष्टही विशेष भयसुचक वाटली नाही. आपत्तीच्या भयानकतेची पूर्ण कल्पना येण्या आधीच कित्येकांची घरंदारं पाण्याने पूर्णत: वेढली गेली. नदीचं पाणी किती पसरणार कळत नव्हतं. बेसावध लोकांना जीव वाचवून कुठे जावं कळत नव्हतं. घरातलं सामानसुमान तसंच टाकून लोक पळाले.
काही अडकले, काही सुटले.

दिवसभर उत्पात घडवून पाणी हटलं, तेव्हा आपद्ग्रस्त भागांतली हजारो घरं पूर्णपणे उध्वस्त झाली होती. सुमारे १० हजार कुटुंबं निराधार. घरातलं बहुतांश सामान वाहून गेलं होतं. आयुष्यभर अवलीपावली जमवत मिळवलेली सुबत्ता डोळ्यांदेखत पुसली गेली होती.

पण पुणेकर त्यातही ढळला नाही. उभा राहिला. धूळ झटकत त्यानं तुळया उभारल्या आणि पुणं पुन्हा बांधलं.

पानशेत प्रलयाचं थैमान, त्याने ग्रासलेल्या पुणेकरांच्या गोष्टी आणि पुनर्निर्माण ही एक मोठी गाथा आहे.

पानशेतच्या प्रलयानं जुनं पुणं लयास गेलं.
पुण्याचा मानबिंदू जी वाडासंस्कृती, ती नामशेष झाली. आज विद्येच्या माहेरघराचं 'ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट' मध्ये झालेलं परिवर्तन, किंवा पेन्शनरांच्या शांत शहरानं अंग चोरत आयटीबूमला करुन दिलेली जागा या सर्व बर्‍यावाईट बदलांची नांदी १२ जुलै १९६१ नं केली.

पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या विलक्षण घडामोडींना आज उजाळा देण्यासाठी 'अथांग क्रियेशन्स' तर्फे आम्ही
'१२ जुलै १९६१: प्रलय, प्रत्यय' हा दृकश्राव्य कार्यक्रम घेत आहोत. पुण्याच्या भरारीची ही कहाणी व्हिडियोज आणि महितीपटांकरवी सादर केली जाईल. ती कहाणी आजच्या तरुणांस ऐकण्यास मिळावी आणि उज्वल आदर्शाचं कथन व्हावं असा या कार्यक्रमाचा हेतू आहे.

त्यासाठी आम्ही जवळपास दीडशे पुरग्रस्तांच्या मुलाखती घेतल्या. त्यांचे चित्रीकरण, विलक्षण अनुभव, त्या काळातले व्हिडीओज आणी फोटोज, आणि तत्कालीन वृत्तपत्रे या सार्‍यांचा अर्क 'प्रलय, प्रत्यय' मध्ये पाहता येईल.

या कार्यक्रमास 'मराठी अभिमान गीत' आणि 'बालगंधर्व'चा संगीतकार कौशल इनामदारचं संगीत संयोजन लाभलंय. सुधीर गाडगीळ सूत्रसंचालक असून शरद पोंक्षे व्हिडियोजना निवेदन करणार आहेत.

पूरस्थितीशी लढलेले पुणेकर आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांचे प्रतिनिधी, मुळात प्रत्येकाने; त्या प्रेरक घटनांचा साक्षीदार होण्यासाठी यावं.

कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात, मंगळवार दिनांक १२ जुलै २०११ रोजी सायं ५ ते ८ या वेळात होईल.
कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असला तरी प्रवेशिका आवश्यक आहेत. त्या लवकरच उपलब्ध करुन देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. प्रवेशिकांसंबंधी पुढील माहिती लवकरच या धाग्यावर दिली जाईल.

नक्की या. प्रलयाच्या इतिहासासाठी, असामान्य धैर्यासाठी !

-----------------------------------------------------------

(सदर लेख अधिकाधिक वाचकांपर्यन्त पोचण्यासाठी अन्य मराठी संस्थळावर प्रकाशित केला आहे.
सदर लेखामुळे उपक्रमाच्या प्रशासकीय धोरणांचे उल्लंघन होणार नाही, अशी आशा आहे.)

Comments

धन्यवाद!

कार्यक्रमाला शुभेच्छा.

कार्यक्रम झाल्यावर जरुर अजुन माहिती लिहा.

वृत्तांत कळवा

कार्यक्रम झाल्यावर वृत्तांत अवश्य कळवा.

पानशेत

पानशेत प्रलयाविषयी अजून माहिती वाचायला आवडेल.
दृकश्राव्य कार्यक्रमा साठी शुभेच्छा. शक्य झाल्यास डिव्हीडी बनवा या कर्यक्रमाची.

-निनाद

लोकसत्तेतील लेख

'पुरा'तन पुण्याची ५० वर्षे हा लोकसत्तेतील लेखाचा दुवा या निमित्ताने येथे देते.

 
^ वर